Latest Post

स्त्री आणि इस्लाम हा जगभरात  सदैव  एक चर्चेचा  विषय राहिला आहे


19 ऑक्टोबर 2021 हा  अल्लाहच्या अंतिम  पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचा स्मृतीदिवस होता. या निमित्ताने, स्त्रियांप्रती त्यांच्या   उपकारांचे अन्वेषण करूया. सातव्या शतकात स्त्रीयांची दडपशाही सामाजिक मान्यता पावलेली होती तेव्हा  मुहम्मद (सल्ल.) स्त्री  अधिकारांचे मशाल वाहक म्हणून कसे पुढे आले हे समजून घेण्यासठी हदीस च्या पुस्तकांचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. ज्यात त्यांच्या जीवनाची गाथा आम्हाला मिळते. मुहम्मद (सल्ल.) स्वतः अनाथ होते.  ज्यांनी आपल्या जन्मापूर्वीच वडिलांना  गमावले. त्यांचे  पालनपोषण दायी हलीमा सादिया यांनी केले. इस्लाममध्ये दायीला विशेष  दर्जा दिला गेलेला आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी जेव्हा त्यांच्या दायी म्हणजेच पालक मातेची मुलगी शैमा एकदा त्यांना भेटली तेव्हा त्यांनी तिचे स्वागत केले, तिच्यासाठी आपली शॉल अंथरली आणि तिला  आपल्या शेजारी बसवले. 

तारूण्यात प्रवेश करताच मुहम्मद (सल्ल.) यांनी वयाच्या 25 व्या वर्षी पहिले लग्न  एका वयस्कर विधवा महिलेशी केले ज्यांचे  वय 40 वर्ष होते. त्यांचे नाव खतिजतुल कुब्रा (रजि.) असे होते.  बहुपत्नीत्व ही त्याकाळाची  एक सामान्य स्थिती असली तरी मुहम्मद (सल्ल.) आपल्या पत्नीच्या सोबतीत तिच्या  मृत्यूपर्यंत, एकपात्री विवाहात वावरले, तेही आपल्या वयाच्या पन्नास वर्षापर्यंत. खतिजतुल कुब्रा (रजि.) ह्या अरबी कबिल्यांमधील एक व्यावसायिक महिला होत्या. ज्यांनी मुहम्मद (सल्ल.) ह्यांनी त्यांच्या व्यावसायामध्ये मदत केली. 

इस्लामने अमर्याद  बहुपत्नीत्वाची प्रथा बंद केली आणि काही अटी आणि शर्तींच्या आधीन केले. बहुपत्नीत्वसाठी कुरआनमध्ये जे श्लोक अवतरित झाले ते परित्या्नत्या, विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या बरोबर विवाह करून त्यांच्या जीवनाला आधार म्हणून देण्यासाठी पण  ह्या अटीवर की सगळ्या पत्नींना   समान वागणूक आणि दर्जा मिळावा आणि जर तुम्हाला भीती वाटते  की तुम्ही त्यांना  न्याय देऊ शकणार नाही, तर एक पत्नीवरच थांबा. (कुरान 4: 3)

अशाप्रकारे आपण पाहतो की,  पैगंबर (सल्ल.) यांचे पुढील सर्व  विवाह एकतर राजकीय संबंध मजबूत करण्यासाठी  किंवा विधवेला आश्रय देण्यासाठी  होते. त्यांच्या  दत्तक मुलाच्या घटस्फोटीत पत्नीबरोबर त्यांचे लग्न हे  ईश्वराच्या आज्ञेनुसार, अज्ञानाची परंपरा मोडून काढण्यासाठी होते. त्या काळी दत्तक मुलाला खऱ्या मुलाची मान्यता मिळायची.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फक्त एका अशा मुलीबरोबर विवाह केला ज्या कुमारी होत्या. त्यांचे नाव हजरत आयशा (रजि.) होते. हजरत आयशा रजि. हदीसच्या महान विद्वान म्हणून ओळखल्या जातात. मुहम्मद (सल्ल.) यांनी त्यांना धार्मिक प्रश्नांवर इतर लोकांबरोबर सल्लामसलत करण्याचा अधिकार दिला होता  जो की पैगंबर (सल्ल.) यांच्या पर्दा फरमावल्यानंतर सुद्धा आचरणात होता. ह.आयशा (रजि.) ह्यांनी  इस्लाममधील फिख (न्यायशास्त्र) ची पहिली शाळाही उघडली.

ह.आयशा (रजि.) आणि मुहम्मद (सल्ल.) ह्यांचा संबंध इतका मोहक होता की ते  एकत्र  खेळत, एकाच पात्रातून पाणी पीत आणि सतत एकमेकांबरोबर  गोड शब्दांची  देवाणघेवाण करत. मुहम्मद (सल्ल.) आणि त्यांची पत्नी ह.आयशा (रजि.) यांची एकदा झालेली एकत्रित धावण्याची स्पर्धा इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. एकदा, जेव्हा एका माणसाने ह. आयशा (रजि.) यांना विचारले की पैगंबर (सल्ल.) घरात काय करतात? त्यावर ह. आयशा (रजि.) यांनी  उत्तर दिले की, ते आपल्या कपड्यांना रफू करतात, घरकामात  व्यस्त असतात.  जनावरांची देखभाल करतात  आणि बाजारातून  घरासाठी साहित्य खरेदी करून आणतात. आपल्या फाटलेल्या  बुटांना  ते स्वतः शिऊन घेतात. ते  पाण्याच्या बादलीला  दोरी बांधतात, उंटाना  सुरक्षित बांधतात आणि पीठ मळतात. (बुखारी)

पुरूषांना त्यांनी त्यांच्या पत्नींबद्दल जे मार्गदर्शन केले ते खालीप्रमाणे :

 ’’तुमच्यात सर्वात चांगला तो  आहे जो आपल्या पत्नींबरोबर चांगला आहे आणि मी तुम्हा सर्वांपेक्षा आपल्या पत्नीबरोबर सर्वात जास्त चांगला आहे’’ (तिर्मिजी)

’’अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी   तुम्ही जे काय खर्च  करता त्याच्यासाठी तुम्हाला बक्षीस मिळेल मग तो  आपल्या पत्नीच्या तोंडात घातलेला एक घास ही का असेना’’  (बुखारी)

पत्नींच्या आब्रू च्या  संरक्षणाबाबत, पैगंबर (सल्ल.) यांनी म्हटले की, ’’ त्या व्यक्तींचा समावेश सगळ्यांत वाईट लोकांमध्ये होईल जे आपल्या पत्नींबरोबरचे व्यवहार दुसऱ्यांसमोर उघड करतात.’’   ( मस्नद अहमद)

इस्लामी इतिहासामध्ये ह. मुहम्मद (सल्ल.) आणि त्यांची मुलगी ह. फातिमा (रजि.) ह्या दोघांमधील  अपार  स्नेहाच्या अनेक घटना नमूद आहेत. जेव्हा त्या ह. मुहम्मद (सल्ल.) यांच्या खोलीत प्रवेश करायचे तेव्हा त्यांच्या कपाळाचे चुंबन घ्यायचे, त्यांचा हात पकडून त्यांना आपल्या जागेवर बसवायचे.

ह. पैगंबर (सल्ल.) म्हणत, ’’फातिमा माझा एक भाग आहे आणि जो कोणी तिला त्रास देईल तो मला त्रास देईल’’ (बुखारी 3767)

फक्त आपल्या कुटुंबातील  स्त्रियांनाच नाही तर   सामान्य स्त्रियांचा  सुद्धा दर्जा   पैगंबर   (सल्ल.) यांनी उंचावला. त्यांना समाजात  समान अधिकार आणि सन्मान प्रदान केला. त्यांनी  त्यावेळी प्रचलित असलेली स्त्रीभ्रूण हत्येची प्रथा नष्ट  केली. लोकांना  परलोकांत  न्यायाच्या दिवशी  होणाऱ्या या अपराधाच्या शिक्षेची  आठवण   करून दिली, जेव्हा  सर्वशक्तिमान ईश्वर सर्वांना आपल्या कर्मांचा हिशोब देण्यासाठी जमा करेल. ’’आणि जेव्हा प्राण (शरीरांशी) जोडले जाती आणि जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की तू कोणत्या अपराधापायी ठार केली गेली? आणि जेव्हा  कर्मनोंदी उघडल्या जातील आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल आणि जेव्हा नरकभडकविले जाईल आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल, त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे (कुरआन 81: आयत नं. 7-14) 

प्रेषित सल्ल. यांनी मुलींना  आपल्या पसंदीच्या लग्नासाठी  संमती दिली 

’एकदा एक मुलगी प्रेषित (सल्ल.) यांच्याकडे तक्रार करत आली की तिच्या वडिलांनी  तिला  आपल्या भाच्याबरोबर  लग्न  करायला   भाग पाडले, हे जाणून सुद्धा कि ती त्याला पसंत करत नाही.  पैगंबर (सल्ल.) यांनी वडिलाला बोलावले आणि मुलीला प्रस्तावित विवाह स्वीकारण्यास किंवा नाकारण्यास स्वातंत्र्य दिले. त्यानंतर तिने स्वतः ते लग्न मान्य केले  आणि म्हटले,’’ हे अल्लाहचे दूत. माझ्या वडिलाने   जे केले ते मी स्वीकार केले आहे ; तरीही मला स्त्रियांना हे दाखवून द्यावयाचे होते  की वडिलांचा  या बाबतीत अधिकार  नाही.’’(अबू दाऊद)

स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला :

एकदा थबीत नावाच्या एका गृहस्थाची पत्नी  बीकैस ने प्रेषित (सल्ल.) यांना  तिच्या पतीकडून  घटस्फोटाची विनंती केली. पैगंबर (सल्ल.) यांनी   तिला लग्नाच्या वेळी जे महेर म्हणून भेट दिले होते ते परत करायला सांगितले तिने ही अट मान्य केली आणि तिला खुला मिळाला. 

महिलांच्या आब्रूचे  रक्षण करण्यासाठी   आणि त्यांच्यावर खोटे आरोप टाळण्यासाठी  अल्लाहने    कुरआनमध्ये   दिलेल्या  आदेशानुसार  साक्ष देण्याची कडक अट लागू केली.

’’तुमच्या स्त्रियांपैकी ज्यानी व्यभिचार केला असेल त्यांच्यासंबंधी आपल्यापैकी चार पुरुषांची साक्ष घ्या व जर चार पुरुषांनी साक्ष दिली तर त्यांना घरात बंद करून ठेवा येथ पावेतो की त्यांना मृत्यू येईल अथवा अल्लाह त्यांच्यासाठी काही मार्ग काढील.’’  (4:15)

  महिलांच्या   ह्नकासाठी  जे प्रावधान आज मान्य केले  गेले आहेत, इस्लामने सातव्या शतकातच ते तिला  देण्याचे   पाऊल उचलले. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या वारसा हक्कात पूर्वी महिलांना वाटा मिळत नव्हता व आजही मिळत नाही. मात्र सातव्या शतकातच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अशी काही सामाजिक सुधारणा केली की, मृत व्यक्तीच्या महिला वारसदारांना सुद्धा वारसाहक्क मिळण्यास सुरूवात झाली. पुरुष  आणि स्त्रियांना जरी  वारसामध्ये   भिन्न हिस्से आसले  तरी  समाजांत पुरुष आणि स्त्रियांची   स्थिती आणि भूमिका लक्षात घेऊन हे समभाग न्याय्य कुरआनद्वारे अवतरित झाले आहेत . पवित्र कुरआन  मध्ये   ईश्वराची  आज्ञा म्हणून हे उघड झाले  कि पुरुष आणि स्त्री दोघांना वारशात वाटा आहे.

‘‘पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल, मग ती कमी असो अथवा जास्त, हा वाटा (अल्लाहकडून) ठरविलेला आहे.  ( कुरआन 4:7)    - (उर्वरित आतील पान 7 वर)

प्रेषित  मुहम्मद (सल्ल.) यांनी   या शब्दांत  चेतावणी देऊन  या आज्ञेची अंमलबजावणी केली. ’’जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वर्ग प्राप्तीसाठी योग्य अशा लोकांसारखे काम केले, पण   मरता मरता आपले जीवन चुकीच्या मृत्यूपत्राने  संपवले , तर त्याला नरकात  घातले जाईल.’’ (इब्न कसीर, खंड 2, पृ. 218.) ही एक भयानक चेतावणी आहे ज्यात ईश्वराच्या वारशाच्या कायद्यांबरोबर छेडछाड करणाऱ्याला ईश्वराने आपल्या  पुस्तकात   स्पष्टपनांने दिलेल्या कायदेशीर मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्याला लोकांना अनंत शिक्षेचा इशारा दिला. 

स्त्रियांच्या हक्कांबद्दल त्यांच्या आणखीन ही काही   शिकवणी आहेत : ’’महिलांना मशिदीत जाण्यापासून रोखू नका’  (मुस्लिम). ज्याला मुलगी आहे  आणि तो तिला  जिवंत पुरत नाही , तिची   विटंबना करत नाही , किंवा मुलाला  तिच्यापेक्षा जास्त  प्राधान्य देत नाही , अल्लाह त्याला स्वर्गात प्रवेश  देणार. (अबू दाऊद). ज्ञान मिळवणे हे मुस्लिम पुरुष आणि स्त्रीचे कर्तव्य आहे. (इब्ने माजा)

आईबद्दलच्या वागणुकीचा  उल्लेख केल्याशिवाय लेखन पूर्ण होऊ शकत नाही जिच्याबद्दल पैगंबर (सल्ल.) यांनी सांगितले  कि,’’ चांगल्या वागणुकीच्या बाबतीत माता सर्वात प्रथम  पदावर आहे आणि पुढील दोन पदांवर सुद्धा तिचे पद प्रथमच राहते  त्यानंतर चौथ्या स्थानावर वडिलांचे पद आहे.  (बुखारी)

अशाप्रकारे   आपण पाहतो की, ईश्वराचे अंतिम प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी स्त्री आणि पुरूष या दोघांनाही समान वागणूक देणारी एक परिपूर्ण अशी जीवनशैली दिली आहे जी फक्त  महिलांना सामाजिक स्थान प्रदान करत नाही तर त्यांची  समाजात सामाजिक जागाही सुनिश्चित करते. 



(१) माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, (एका प्रवासादरम्यान) मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे उंटावर बसलो होतो आणि माझ्या आणि पैगंबरांच्या दरम्यान 'कज़ावा' (उंटाच्या पाठीवर घालावयाचा लाकडी हौदा. याच्या दोन्ही बाजूंस माणसे बसतात.) चा फक्त मागील भाग होता.

पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी म्हणालो, ''हुजूर, गुलाम हजर आहे, आदेश द्यावा.'' पैगंबर (स.) काही बोललेच नाहीत. मग काही अंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी तेच शब्द पुन्हा उच्चारले जे पहिल्यांदा म्हटले होते. (परंतु पैगंबर काहीच बोलले नाहीत.) मग काही अंतर पुढे गेल्यानंतर पैगंबर म्हणाले, ''दासांवर अल्लाहचा कोणता अधिकार आहे हे तुम्हाला माहीत आहे काय?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांनाच खरे काय ते माहीत.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचा अधिकार दासांवर असा आहे की त्याने (दासाने) त्याचीच उपासना करावी आणि त्याच्या उपासनेत कोणा दुसऱ्याला अजिबात भागीदार बनवू नये.'' मग काही अंतर चालल्यानंतर पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज!'' मी म्हणालो, ''बोला. हा गुलाम आपले वक्तव्य लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि प्रामाणिकपणे आपले आज्ञापालन करील.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''तुम्हाला ठाऊक आहे काय की दासांचा अल्लाहवर कोणता अधिकार (हक्क) आहे?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरांनाच उत्तमप्रकारे ठाऊक.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचे दासत्व करणाऱ्या दासांचा अल्लाहवर असा हक्क आहे की अल्लाहने त्यांची शिक्षा माफ करावी.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण : माननीय मुआज यांच्या कथनाचे स्पष्टीकरण असे आहे की मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अगदी जवळ बसलो होतो, ऐकणे व ऐकवण्यास कसलाही अडथळा नव्हता, पैगंबरांचे वक्तव्य अगदी सहजतेने मी ऐकू शकत होतो परंतु जी गोष्ट पैगंबर (स.) ऐकवू इच्छित होते ती अत्यंत महत्त्वाची होती, म्हणून पैगंबरांनी तीन वेळा हाक दिली आणि ती गोष्ट सांगितली. असे यासाठी केले जेणेकरून मला या गोष्टीचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळावे आणि मी अगदी लक्ष्यपूर्वक कान देऊन ऐकावे. पैगंबरांच्या वक्तव्याद्वारे 'एकेश्वरत्वा'चे महत्त्व स्पष्ट झाले की ते नरकाच्या यातनांपासून वाचविणार आहे. जी गोष्ट अल्लाहच्या क्रोधापासून वाचविणारी असेल आणि स्वर्गाचा (जन्नतचा) हक्कदार बनविणारी असेल, तिच्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट दासालाच्या दृष्टीने दुसरी कोणती असू शकते?

(२) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (अब्दुल कैस यांच्या कबिल्याची देखभाल करणाऱ्यांना) विचारले, ''एक अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय?'' त्यांनी उत्तर दिले, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरच उत्तमप्रकारे जाणतात.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''ईमान म्हणजे मानवाने या सत्याची ग्वाही द्यावी की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत आणि नमाज (प्रार्थना) योग्य पद्धतीने अदा करावी आणि जकात (दानधर्म) द्यावी आणि रमजान महिन्याचे रोजे (उपवास) करावेत.'' (हदीस : मिश्कात)

(३) माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा जेव्हा प्रवचन दिले, त्यात हे अवश्य सांगितले की ''ज्याच्यात ठेव नाही त्याच्यात ईमान नाही आणि ज्याच्यात वचनाचे संरक्षण व आदर नाही त्याच्याकडे दीन (जीवनधर्म) नाही.'' (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की जो मनुष्य अल्लाहचे हक्क आणि दासांचे हक्क, ज्यांची पूर्ण यादी अल्लाहच्या ग्रंथात आहे, अदा करीत नाही त्याचा ईमान परिपूर्ण नाही आणि जो मनुष्य एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन देतो, मग ती गोष्ट पूर्ण करीत नाही आणि ते वचन पाळत नाही, तो धर्मपरायणतेच्या ईशदेणगीपासून वंचित राहतो. ज्याच्या मनात ईमानची मुळे दृढ रुतलेली असतात तो सर्व प्रकारचे हक्क प्रामाणिकपणे अदा करतो. कोणताही हक्क अदा करण्यात कुचराई करीत नाही. अशाप्रकारे ज्या मनुष्यात धर्मपराणता असेल तो मरेपर्यंत वचनाचे पालन करील. लक्षात असू द्या की सर्वांत मोठा हक्क अल्लाहचा आहे, त्याच्या पैगंबरांचा आहे, त्याने अवतरित केलेल्या ग्रंथाचा आहे आणि एखाद्या मनुष्याने आपल्या अल्लाहशी आणि त्याने पाठविलेल्या पैगंबराशी आणि पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माशी केलेला करार सर्वांत मोठा करार असतो.

(४) माननीय अमर बिन अबसा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ''ईमान म्हणजे काय?'' पैगंबरांनी उत्तर दिले, ''संयम आणि दानशूरता म्हणजेच ईमान होय.'' (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : याचा अर्थ असा की ईमान म्हणजे मनुष्याने अल्लाहचा मार्ग स्वत:साठी पसंत करावा आणि त्या मार्गात जी काही संकटे येतील ती सहन करावीत आणि अल्लाहच्या आधारे पुढे पुढे जावे (हा संयम आहे) आणि मनुष्याने आपली मिळकत अल्लाहच्या वंचित व निराश्रित दासांवर अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी खर्च करावी आणि खर्च करून खुशी अनुभवावी (ही दानशूरता आहे).


आदर्श इस्लामी निकाहची पहिल्यांदाच प्रचिती : प्रा.डॉ.रणजित जाधव


लातूर (बशीर शेख) 

लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट आणि कठीन असेल, वायफळ खर्च करून झालेला असेल तर ते कुटुंब, समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही. इस्लाममध्ये लग्न फक्त एक इबादत (उपासना) आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांची सुन्नत (अनुकरण) आहे. आणि एक सामाजिक करार आहे. याचीच प्रचिती लातूर येथे मुहम्मद युनूस पटेल यांच्या मुलीच्या निकाह दरम्यान उपस्थितांना आली. दोन मुस्लिम गवाह, दोन हिंदू निरीक्षक आणि दोन खजुरांच्या अल्पोपहारात साधा, सोपा आणि अध्यात्मिक वातावरणात निकाह संपन्न झाला

लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या महेबुबीया मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंदचे सदस्य युनूस पटेल यांची सुकन्या अनम जोहरा आणि बीदरचे रहिवाशी मुहम्मद जहीर यांचे चिरंजीव मुहम्मद सुलेमान यांचा निकाह 22 नोव्हेंबर रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्ये असे की, अतिशय पवित्र वातावरणात मस्जिदीत निकाह झाला. यात कुठल्याही प्रकारचा आवाजवी खर्च झाला नाही. मुलीच्या वडिलांनी मुलाला हुंडा दिला नाही. दहेजच्या नावाखाली कुठल्याही वस्तू दिल्या नाहीत उलट वर सुलेमान यांनी 50000 रुपये रोख वधू अनम जोहरा हिला महेर (भेट) म्हणून दिले. याप्रसंगी इस्लामी लग्न हा एक सामाजिक करार आहे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सर्वधर्मीय 50-55 बांधवांच्या उपस्थितीत, अल्पोपहार म्हणून फक्त दोन खजूर आणि पाणी देण्यात आले. निकाह-ए-खुत्बा (विवाह विधी) वधूचे पिता मुहम्मद युनूस पटेल यांनी पठण केला. 

विवाहात प्रारंभी वधू अनम जोहरा हिची सम्मती वकील आणि साक्षीदार यांनी घेतल्याची घोषणा वकील अश्फाक अहमद (अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद लातूर) यांनी केली. त्या नंतर करार पत्रावर वर मोहम्मद सुलेमान मोहम्मद जहीर अहमद  यांनी सही केली. यावेळी साक्षीदार म्हणून सय्यद अब्दुल रऊफ लातूर आणि शहरीयाज पटेल बिदर हे उपस्थित होते. या निकाहचे विशेष निरीक्षक म्हणून शाहू महाविद्यालयातील प्रा.डॉ. रणजीत जाधव  (अध्यक्ष कबीर प्रतिष्ठान लातूर) आणि  प्रा.डॉ. अनिल जायभाये (समाजशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर) उपस्थित होते. 

या प्रसंगी औरंगाबादहुन आलेले जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र संदेश विभागाचे सचिव प्रा. वाजिद अली खान, यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्यात इस्लामी निकाह म्हणजे काय असतो? तो कसा असतो? या प्रसंगी काय वाचले जाते? कुरानच्या आयतींचा अर्थ वगैरे समजून सांगितला.

यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान म्हणाले, ’’विवाह एक सोहळा नसून ती एक प्रार्थना आहे. विवाहाला इस्लामने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करण्याचे आवाहन करत तो कसा असावा याची नियमावली सांगितली आहे. विवाह त्याच पुरूषाला करण्याचे आवाहन केले आहे जो त्याला निभावण्याची ऐपत राखतो. ज्याला वाटते की आपण विवाह व त्यानंतर येणारी जबाबदारी पार पाडू शकत नाही त्याने विवाह न केलेलाच बरा. कारण विवाहानंतर सगळी जबाबदारी पुरूषावरच असते. आज आपण पाहिलात की विवाहाप्रसंगी मुलीच्या पित्याकडून मुलाला काहीही देणेघेणे झाले नाही. उलट वराने मुलीला 50 हजार रूपये नगदी मेहरची रक्कम दिली आणि मुलीला विचारले गेले की तुम्हाला ही रक्कम मंजूर (कुबुल) आहे का, वर कबुल आहे का? ज्यावेळी मुलीने ’कबुल है’ असे साक्षीदार आणि वकीलासमोर म्हटल्यानंतर पुढील विवाहाची कार्यवाही करण्यात आली. मुलीने निकाहनाम्यावर हस्ताक्षर केले. म्हणजेच मुलीच्या मर्जीनुसार विवाह करावा. कारण या विवाहातून पुढील समाजाची, आपआपसातील नात्यांची विण घट्ट बसत असते. या जोडप्यांमध्ये प्रेम, आपुलकीची भावना अधिक निर्माण होते. या दोघांत सामंजस्य असेल तर हे दोघे घराला, समाजाला, देशाला अधिक फायदा पोहोचवू शकतात. त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना ते चांगले संस्कार, शिक्षण देऊन ते देशाला चांगले नागरिकही देवू शकतात.’’ 

निकाहाचे विशेष निरीक्षक प्रा. रणजीत जाधव  याप्रसंगी म्हणाले की, ’’एवढ्या सोप्या पद्धतीने असा विवाह मी पहिल्यांदाच पाहिला आहे. त्यामुळे मी युनूस पटेल आणि त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करतो. आपल्या समाजात जी वाईट पद्धती आहे ती म्हणजे हुंडा पद्धत. आणि जो विवाहात अकारण खर्च होतो ती एक चुकीची पद्धत आहे. मोठ्या व्यक्तींच्या लग्नात होणारा खर्च पाहून गरीब मुलीचा पिता आपल्या मुलीसाठी आपण काहीच करू शकत नसल्याची खंत मनात बाळगून असतो. तो तिच्या लग्नासाठी सर्वस्व पणाला लावून पैसे जमा करत असतो. त्यालाही वाटते की आपण खर्च करावा, तो व्याजाने पैसे काढतो. मुलीचे लग्न करतो. पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या मुलीचा निकाह केला त्या पद्धतीने जर समाजातील इतर बांधवांनी आपल्या मुलीचे विवाह केले तर अनेक समस्या मिटू शकतील. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्येत एक कारण मुलीच्या लग्नासाठी पैसे नसणे हे ही आहे.’’ आदर्श इस्लामी निकाहाची आज मला पहिल्यांदाच प्रचिती आल्याचेही प्रा.डॉ. रणजित जाधव म्हणाले. 

उर्दूचे प्रसिद्ध शायर अजय पांडे ’बेवक्त’ याप्रसंगी म्हणाले की, ’’आमचे मित्र मो. युनूसभाई पटेल यांच्या मुलीचे इस्लामी परंपरेनुसार लग्न झाले. अत्यंत साधेपणाने हा विवाह पार पडला. या विवाहाला उपस्थित राहून आम्हाला सुद्धा लग्नामधील नवीन प्रकार पहायला मिळालेला आहे. पटेल परिवाराचे याप्रसंगी अभिनंद करतो. शुभेच्छा देतो.’’ 

याप्रसंगी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अभिजित देशमुख म्हणाले की, ’’आमचे मित्र युनूस पटेल यांच्या मुलीचा विवाह मस्जिद मध्ये आमच्या उपस्थितीत झाला.  त्यांना व नववधू-वरांना शुभेच्छा. ज्या साध्या पद्धतीने हा विवाह संपन्न झाला ते पाहून फार आनंद झाला. मालमत्ता अल्लाहने दिलेली देणगी आहे. समाजात असे होत आहे की ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यानेच मोठे विवाह करावे आणि ज्याच्याकडे नाही तो करण्यास असमर्थ ठरतो. यासाठी ईश्वराने आम्हाला साध्या पद्धतीने विवाह करण्याची जी शिकवण दिली त्यावर पूर्णरूपाने अमल झाला पाहिजे. या मस्जिदीतील विवाहाप्रसंगी आमचे काही हिंदू बांधवही उपस्थित होते. वधूपिता युनूस पटेल यांच्या स्वभावानुसार ते सर्वधर्मीय बांधवांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहातही सर्वांना बोलावून मस्जिदीत साध्या पद्धतीने विवाह केला. विशेष बाब तर ही आहे की त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहात दोन निरीक्षकही हिंदू बांधव होते. ही एकोप्याची दृष्टी पाहूनही फार आनंद झाला. खरे तर लातूर कौमी एकतेसाठी प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात पाहत आहोत. या एकतेचा संदेश दूरवर पोहचेल. जो आमच्या मनाला फार आनंद देऊन गेला आहे.’’   

या निकाहसाठी लातूर शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मोईज शेख, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे माधव बावगे, कवी योगिराज माने, प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रयोगशील शिक्षक नजिउल्लाह शेख यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिलांची उपस्थिती होती. तौफिक  असलम खान (सदस्य केंद्रीय प्रतिनिधी मंडळ जमाते इस्लामी हिंद) यांनी शेवटी दुआ मागितली. युनूस पटेल यांनी आभार मानले.



एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांना त्यास काही उपदेश द्यावयास विनंती केली. प्रेषित म्हणाले, ‘‘रागावू नका.’’ त्या व्यक्तीने अनेकदा ही विनंती केली. प्रत्येक वेळी प्रेषितांनी रागावू नका असेच म्हटले. (हदीस – अबू हुरैरा)

तसेच एक दुसरी व्यक्ती प्रेषितांकडे आली आणि म्हणाली, हे प्रेषिता! मला काही शिकवण द्या. पण थोडक्यात सांगा, मला सजता येण्यासारखे. प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘रागावू नका.’’ (हदीस – अबू हसीन, तिर्मिजी)

हजरत अब्दुल्लाह बिन उमरो म्हणतात, मी प्रेषितांना अल्लाहच्या प्रकोपापासून बचाव करण्यास काय करावे, असे विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘‘रागावू नका.’’ (मुसनद अहमद)

तसेच हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक म्हणतात की रागावर नियंत्रण हे सर्वोत्कृष्ट चारित्र्याचे प्रतीक आहे.

एक व्यक्ती प्रेषितांकडे येऊन विचारले की कोणते कर्म सर्वश्रेष्ठ आहे? प्रेषित म्हणाले, ‘‘उच्चतम चारित्र्य.’’ त्यांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर प्रेषित म्हणाले, ‘‘कुणावर रागावू नये.’’

प्रेषितावच्या या शिकवणीचा अर्थ असा की अशी कर्मं करणे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचे दर्शन होते. म्हणजे मनाची उदारता, लोकांशी आपुलकी, लाज, नम्रता, कुणास त्यास न देणे, क्षमेचा व्यवहार करणे, कुणाला भेटताना दिलखुलासपणे त्याचे स्वागत करणे.

पवित्र कुरआनात अल्लाह अशा लोकांविषयी म्हणतो की त्यांना राग आला तर त्याकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्यांकडून झालेल्या चुका माफ करतात. अशा प्रकारचे नेक लोक अल्लाहला आवडतात. (पवित्र कुरआन-३:१३४)

प्रेषितावचे एक सेवक हजरत अनस यांनी लहानपणापासून सुमारे दहा वर्षे त्यांची सेवा केली. या दहा वर्षांच्या काळात प्रेषितांनी एकदाही त्यांच्यावर थोडादेखील राग केला नाही. एखादे काम का झाले नाही, असा प्रश्न कधी विचारला नाही. घरातल्यांनी हजरत अनस यांना एकदा कामाबाबतीत विचारले तर प्रेषित म्हणायचे, ‘‘जाऊ द्या, अल्लाहची इच्छा असती तर ते काम झाले असते.’’

प्रेषित म्हणाले, ‘‘राग माणसाच्या मानेभोवतीच्या रिंगीसारखा आहे. अशा परिस्थितीत तो जर उभा असेल तर खाली बसावे, बसलेला असेल तर जमिनीवर झोपावे.’’

प्रेषित म्हणाले, ‘‘रागावणे सैतानाचे कृत्य आहे. सैतानाला आगीपासून निर्माण केले आहे. तेव्हा कुणाला राग आवरला नाही तर त्याने थंड पाण्याने वुजू करावी.’’


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget