Latest Post

नाजिम खान, बार्शीटाकळी
9763869830
इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शरण असा होतो. मनुष्याला वास्तविक शांती त्याच वेळी प्राप्त होते जेव्हा तो स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनःशांती प्राप्त होते आणि समाजात शांती नांदू लागते. अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसारच आचरण हीच खरी शांती आहे आणि म्हणून या धर्माचे नाव ’इस्लाम’ (शांती) असे अल्लाहने ठेवले आहे. इस्लामने शांततेला अधिक महत्त्व दिले आहे. कुरआनात म्हटले आहे की, ”त्यांच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता शांतीचे निवासस्थान आहे. आणि तो त्याचा वाली आहे, त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगिकारली”(कुरआन, 6 :127) मानवी समस्यांवर एकमेव उपाय इस्लामी जीवनव्यवस्था आहे. जगात सुखशांती तेव्हाच नांदू शकते जेव्हा मानव आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनाची पायाभरणी इस्लामच्या तत्त्वानुसार करेल. हे मत फक्त यामुळे नाही की आम्ही मुस्लिम आहोत आणि इस्लाम आमच्या ईमानाचा अनिवार्य भाग आहे. वास्तविक पाहता हीच वस्तुस्थिती आहे.
मनुष्य एक सामाजिक अस्तित्व आहे. तो जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेकानेक संबंधामध्ये जखडलेला असतो. तो या जगात डोळे उघडताच आईवडील, आजी, सगेसंबंधींशी संबंध ठेवण्यास बाध्य होतो.  त्याचे संबंध कौटुंबिक, शेजारीपाजारी, आपल्या गावाशी, आपल्या देशाशी आणि समस्त मानवतेशी अनेकानेक प्रकारांनी जोडले जातात. हे सर्व संबंध जर सत्य आणि नैसर्गिक, स्वाभाविक पायावर उभारले गेले तरच ही आशा धरली जाऊ शकते की जगात मानवी हक्कांची पायमल्ली कधीही होणार नाही आणि जगात शांती, समृद्धी नांदू शकेल. या मानवी संबंधांना संतुलित, स्वाभाविक व शाश्वत करण्यासाठी एक अशा वैश्विक परिपूर्ण जीवनव्यवस्थेची आवश्यकता आहे जी अत्यंत संतुलित आहे. सुखसमृद्धी व विश्वशांतीची हमी देणारी आहे. अशा व्यवस्थेत उच्चनीचता नसते, त्यात श्रीमंत-गरीब, काळा-गोरा असा अस्वाभाविक भेद नसतो. अल्लाहने (ईश्वराने) या परिपूर्ण जीवनव्यवस्थेची सोय केली आहे. अल्लाह एक असे महान अस्तित्व आहे जो समस्त मानवजातीचा आणि सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, शासनकर्ता, मालक असल्याने प्रत्येक माणसाशी तो न्याय करू शकतो. मनुष्याच्या फक्त भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्याची सोय अल्लाहने केली आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आजपासून साडेचौदाशे वर्षांपूर्वी जीवनव्यवस्थेला व्यावहारिक रूप दिले. असे करून प्रेषितांनी इस्लामला मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व जीवनव्यवहारात कार्यान्वित करून जगापुढे समस्त मानवतेच्या कल्याणासाठी एक आदर्श ठेवला आहे.
अल्लाहला तो इस्लाम अपेक्षित नाही ज्याचे प्रदर्शन मुस्लिम लोक शतकानुशतके आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात करत आहेत. तो इस्लाम नव्हे जो मुस्लिमांंना त्यांच्या वारसाहक्कात प्राप्त झाला आहे. खरा इस्लाम कुरआन आणि सुन्नत (हदीस) मध्ये सुरक्षित आहे. आदर्श खलीफांच्या राज्यकाळात जी चालतीफिरती जीवनव्यवस्था प्रचलित होती तो खरा इस्लाम आहे, ज्यामुळे सुखसमृद्धी आणि मानवी कल्याणाचा समुद्र उफाळून आला होता. खरा इस्लाम एकमेव अल्लाहच्या आज्ञापालनाची शिकवण देतो. समस्त मानवतेसाठी एक आदर्श, संतुलित जीवनव्यवस्था म्हणजे इस्लाम होय. मानवतेला त्या इस्लामपासून लाभ घेण्याचा तसाच अधिकार आहे ज्या प्रकारे मानव ईश्वराच्या देणग्यांचा लाभ दररोज घेत आहे. मानवतेचे वैश्विक कल्याण, वैश्विक मुक्तीची हमी आणि परिपूर्ण व्यवस्था पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रात (सुन्नत) सुरक्षित आहे.
आजसुद्धा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील समस्त समस्यांची उकल इस्लाम आणि फक्त इस्लाममध्येच आहे. कुरआन स्पष्ट करतो की, ”आज आम्ही तुमची जीवनपद्धती (दीन) परिपूर्ण केली. तुमच्यावर आपल्या देणग्यांचा वर्षाव पूर्ण केला आणि इस्लामला तुमच्यासाठी आदर्श जीवनव्यवस्था म्हणून निश्चित केले.”
अशाच प्रकारे पवित्र कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी सृष्टीनिर्माता अल्लाहने स्पष्ट केले आहे, ”अल्लाहजवळ तर परिपूर्ण जीवनव्यवस्था फक्त इस्लाम आहे.”
इस्लामच्या शिकवणी आणि आदेश जगातील दुसऱ्या सर्व जीवनव्यवस्थांपेक्षा आणि शिकवणींपेक्षा पूर्णत: स्वाभाविक, समस्त मानवजातीसाठी स्वीकृत असे प्रत्येक देशासाठी आणि काळासाठी उपयुक्त सिद्ध झाले आहेत.

मोहम्मदी बेगम, अकोला
अल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधिश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले - वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ वसीला घेतो. परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही.

कुरआन आणि नबी सल्ल. यांची सुन्नत म्हणजे इस्लाम होय. इस्लाम या शब्दाचा अर्थच शांती आहे. म्हणजेच इस्लाम शांतीपूर्ण धर्म आहे. या धर्मामध्ये अल्लाहने एक लाख चोविस हजार प्रेषित पाठविले़ त्यामध्ये अंतिम प्रेषित म्हणून मुहम्मद सल्ल़ यांना पाठविले. ते समस्त मानवजातीसाठी. सर्व जगाला सत्याचा मार्ग दाखविण्यामध्येच मानवाची सुख, शांती सामावलेली आहे़ कुरआन या ईश्वरीय ग्रंथामध्ये शांतीचे सर्व मार्ग दाखविलेले आहेत. ते कसे? जर आपल्या घरात आपण एक शिकली सवरलेली सून जर का आणली आणि त्या मुलीने आपल्या नवीन झालेल्या वंशाला जर चांगली शिकवण दिली आणि त्याचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने केले तर ते एक कुटुंब, कुटुंबापासून एक समाज या दोन्ही गोष्टीमध्ये शांती दिसून येईल़ आपण आपल्यापासून दुसऱ्याचा फायदा जर होत असेल तर तो करावा़  उदा़ एखाद्या गरीब घराण्यात फार हुशार मुलगा आहे़ तो गरीबीमुळे शिकू शकत नाही तर त्याला मदत देणे़  म्हाताऱ्या माणसांना मदत करणे, शेजाऱ्यांच्या सुख-दु:खात सामिल होणे. हे सर्व तत्व कुरआनमध्ये शांती म्हणून सांगितले आहेत. आजच्या काळामध्ये लोक सगळं काही विसरले. कारण हे जग फक्त पैशाच्या मागे धावत आहे. लोकांना मूल, बाळ, आई-वडिल, नातेवाईक, समाज हे काहीच दिसत नाही. परंतु, माझ्या बंधू आणि भगिनीनों! जगामध्ये पैसाच सर्व काही नाही़ तर नबी सल्ल़ सांगतात आणि कुरआनच्या अनेक आयातींमध्ये सुद्धा सांगितले आहे की, माणसामध्ये माणुसकी प्रेमभाव आणि बंधुत्व असायला पाहिजे. हा आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे़ 
1. माणुसकी म्हणजे प्रेम 2. माणुसकी म्हणजे एकमेकांना समजून घेणे 3. माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणा 4. माणुसकी म्हणजे एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात. या नंतर आपण प्रगतीसंबंधी चर्चा करूया.
प्रगती : आपण सर्व लोक फक्त जगाची प्रगती बघतो़ जगाची प्रगती म्हणजे हेच एक घर आहे तर दुसरे घर असलं पाहिजे़ साध घर असेल तर बंगला असला पाहिजे, त्या बंगल्यामध्ये दुचाकी असली तर चारचाकी गाडी असली पाहिजे, पाच मुलं आहेत तर पाच बंगले असले पाहिजे़ या सर्व जगाला फक्त इथल्या प्रगतीची पडली आहे़  परंतु ही प्रगती मिळवून आपल्याला काही फायदा होणार नाही़  कारण हा प्रगतीचा प्रवास इथेच थांबणार आहे़  आपल्या प्रगतीचा खरा प्रवास म्हणजे पारलौकिक जीवन आहे़  आपण या जगामधून निघून गेल्यावर त्या जगाच्या प्रगतीसाठी आम्हाला काय करावे लागेल याचा विचार आज करणे गरजेचे आहे. तो प्रगतीचा प्रवास हाच खरा प्रवास आहे़ आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांनी सांगितलेल्या मार्गावर चलावे लागेल़ वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा लागेल़ मुला-बाळांना चांगले संस्कार द्यावे लागतील़ कधी खोटे बोलू नये, चोरी करू नये, कोणाची निंदा करू नये़ कारण अल्लाहतआलाने कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ”हे लोकहो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. पुरूषांनी दुसऱ्या पुरूषांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील, आणि स्त्रियांनीसुद्धा दुसऱ्या स्त्रियांची टिंगल उडवू नये. शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील. आपापसांत एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका. श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारात नाव मिळविणे फार वाईट गोष्ट आहे. जे लोक या वर्तनापासून परावृत्त होत नसतील ते अत्याचारी होत”(सुरःअलहुजरात आयत नं. 11). 
मुक्ती : मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला चांगली कामे करावी लागतील़ म्हणजे आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा अल्लाहने जगात मानवाला आचार व विचार स्वातंत्र्य देवून पाठविलेले आहे़ जेणेकरून पहावे की कोण सर्वोत्कृष्ट कर्म करतो? सदाचार म्हणजे काय हे अल्लाहने प्रत्येक युगात पैगंबरांद्वारे मनुष्यास शिकवले आहे़ आणि सर्वात अंतिम पैगंबर मुहम्मद सल्ल़ यांच्यावर पवित्र कुरआन हा ग्रंथ अवतरित करून सर्व काही विस्ताराने जगापुढे मांडले आहे़ मग आता जो कोणी कुरआनच्या मार्गदर्शनाचे पालन करील तो मरणोत्तर जीवनात स्वर्गप्राप्ती करेल आणि जो कोणी नकार देईल त्यास नरकामध्ये नेहमीसाठी फेकून दिले जाईल. आणि मग आपल्या शेवटच्या निर्णयापूर्वी या जगात जन्माला आलेल्या सर्वांच्या कर्माचा हिशोब घेण्यासाठी या सृष्टीच्या राजाचे न्यायालय स्थापित होईल़ ज्याने कणभर सुद्धा पुण्यकर्म केले असेल तो त्यास पाहील़ आणि ज्याने कणभर पापकर्म केले असेल ते सुद्धा तो पाहील.
अल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले आणि वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही तिथे तर आम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की, मी तुम्हाला जगात एवढे वर्ष ठेवले तेव्हा तुम्ही काय केले? म्हणून कुरआन आणि नबी सल्ल. यांनी सांगितले की, तुम्ही सत्याच्या मार्गावर चला तुमचा फार मोठा फायदा आहे आणी हीच खरी मुक्ती आहे़ 
यानंतर थोर पुरूष आणि संतांची नबी सल्ल़ यांच्या विषयीची व्यक्तव्य पाहू. 
1. शंकराचार्य सांगतात, इस्लाम आतंक नव्हे तर आदर्श आहे़ 
2. डॉ़ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इस्लाम शांती देणारा एक धर्म आहे़

नौशाद उस्मान, औरंगाबाद
9029429489
ज्या प्रकारे मनःशांतीशिवाय अभ्यास, अध्ययन शक्य नाही, परिक्षेत पास होणे शक्य नाही, त्याचप्रकारे कुटूंबात शांतीशिवाय कुटूंबियांची प्रगती शक्य नाही. तसेच गावात, शहरात संचारबंदी, तणाव असेल, तरीही गावात उद्योगधंदे, शिक्षण वगैरे हे सुरळीत चालणे शक्य नाही. यामुळे देशाची प्रगती शक्य नाही. शांती नांदावी यासाठी अशांती पसरविणारी तत्वे कोण व त्यांची मानसिकता कोणती आहे, त्याचे निदान होणे आवश्यक आहे. जाऊ द्या, उगीच कशाला नकारात्मक गोष्टींची घुसळण कशाला? असं म्हणून जर आपण याकडे दुर्लक्ष करत गेलो तर हा रोग आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. म्हणून काही कटू सत्ये पचवणेदेखील आवश्यक आहेत. त्याला फाटा देऊन प्रगती करणे शक्य नाही.
समाजात अफवा, गैरसमज पसरवून, तेढ निर्माण करून, ध्रुवीकरण आणि विषमता पसरवून आपली पोळी भाजवून घेणारी एक मानसिकता जोपासणारा फॅसिस्ट गट नेहमी राहिला आहे. हा गट समाजात कालांतराने एक एक टूम सोडत असतो. त्यासाठी तो गट फक्त निमित्त शोधत असतो. समाजात तेढ निर्माण करण्याची जी निमित्ते वापरली जातात, त्यापैकी एक म्हणजे आंतर धर्मीय किंवा आंतरजातीय विवाह.  उदाहरणार्थ अशीच एक टूम नुकतीच या गटाने सोडली होती, ती म्हणजे हादिया प्रकरण. 
लव जिहाद हा शब्द सर्वात आधी हिंदू जनजागृतीच्या वेब साइटवर आलाय. तथाकथित ’लव जिहाद’ अपराध आहे, असा कोणताही कायदा घटनेत नाही. धर्मांतरासाठी जबरदस्ती ही कोणीही करो, तो अपराधच असतो, पण त्याला विशिष्ट धार्मिक विशेषण लावणे, हा अपराध आहे. पूर्वोत्तर राज्यात ख्रिश्चन लोकं हे ’गन पॉइंट’वर धर्मांतर करत असल्याचाही आरोप होतो, त्याला काय म्हणाल? वस्तुस्थिती अशी आहे की, कोर्टात लग्न करण्यापूर्वी एक महिना अगोदर रजिस्ट्री कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यामुळे पालकांची मर्जी नसेल तर दोघांच्याही पालकांना याचा सुगावा लागतो आणि ते आपल्या पाल्यांना यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कधी-कधी यातून नितीन आगे सारखे प्रकार घडतात, तर कधी सैराट सारखे ऑनर किलींगचेही प्रकरण समोर येतात. हे टाळण्यासाठी वकील लोकं दोघांना ’वन डे मॅरेज’चा सल्ला देतात. वन डे मॅरेज म्हणजे कोणत्याही एका धर्म संस्कृतीनुसार लग्न करायचं आणि त्याच लग्नाची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयात करून टाकायची. यासाठी दोघेही एका धर्माचे असणे आवश्यक असते. म्हणून दोघांपैकी एक जण दुसऱ्याचा धर्म स्वीकारून टाकतो. यात नेहमी इस्लामच स्वीकारला जातो असं नाही. धर्मयुग मासिकात दर महिन्याला काही मुस्लिम मुली हिंदू बनून हिंदू युवकांशी लग्न केल्याच्या बातम्या देणारं एक नियमित स्तंभच आहे. त्यात त्या धर्माशी काही घेणं देणं नसते. फक्त ती एक कायदेशीर पळवाट असते. यात कोणतंही षडयंत्र, योजना वगैरे नसते. हे केरळ न्यायालयानेही मान्य केलंय की, हिंदू मुली इस्लाम स्वीकारून मुस्लिम युवकांशी लग्न करण्याचे प्रमाण जास्त आहे, मात्र त्यामागे कोणतीही देशविरोधी अशी योजना नाही. 
परंतु मुस्लिम युवकांशी लग्न केल्यानंतर त्यांना जेंव्हा इस्लाम कळतो, तेंव्हा ते इस्लामच्या प्रेमात पडतात. मग त्या मुस्लिम युवकाने काही वर्षांनंतर तीला सोडूनही दिलं, तरी त्या इस्लाम सोडत नाहीत. कारण एक कायदेशीर गरज म्हणून स्वीकारलेला समतावादी इस्लाम त्यांना आता मूक्तीचा एकमेव मार्ग वाटतो. म्हणून त्या दुसरं लग्न करतात तेही मुस्लिम युवकांशीच. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, अशा लोकांशी प्रत्यक्ष भेट करवून देऊ शकतो. मात्र स्वधर्म अहंकारापायी या गोष्टी अनेक जण मान्य करत नाही. हे कटू सत्त्य पचविण्यासाठी विवेक असावा लागतो. फक्त माझंच किंवा फक्त माझ्याच समाजाचं योग्य, याशिवाय सर्वकाही खोटं, कारण ते दुसऱ्यांचं आहे म्हणून, ही अविवेकी भुमिका सोडली पाहिजे. जे-जे माझं तेच चांगलं म्हणण्यापेक्षा जे-जे चांगलं तेच माझं म्हणून चांगुलपणा आत्मसात करण्याचा सामाजिक विवेक जोपासला गेला पाहिजे. याचे एक उदाहरण अमेरिकेत पाहायला मिळते. 
एक ज्यू महिला दोन वेगळे स्वयंपाक करत होती. तीला कारण विचारले तर म्हणाली की, माझ्या एका मुलाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर दुसऱ्याने इस्लाम स्वीकारलाय. माझ्या मुस्लिम मुलाला वराहाचे मांस चालत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करतेय. 
असे उदार स्वातंत्र्य आपले भारतीय संविधानदेखील प्रत्येकाला देते. ती उदारता प्रत्येक भारतीयात असली पाहिजे. याचा अर्थ सगळेच अविवेकी आहेत, असं नाही. विशेषकरून काही अपवाद वगळता हिंदू समाज हा नक्कीच विवेकी, सहिष्णु आहे. आनो भद्राय कांता क्रतवो यन्तु विश्वतः म्हणजे विश्वभरातून चांगले विचार आमच्याकडे येऊ द्या असे उदात्त विचार हिंदूंचा यजुर्वेद देतो. म्हणूनच भारतात सर्वात जास्त उदात्त इस्लाम, उदात्त अशा हिंदूंनीच स्वीकारला आहे. पण हळूहळू आता वातावरण बदलत आहे. देशाची ओळख असलेली ही उदात्त अशी सहिष्णुता कमी कमी होत चालली आहे, पण संपलेली नाही. आजही या देशातले बहुसंख्य लोकं शांतीवादी, सहिष्णु आहेत. फॅसिस्ट लोकांना मिळालेल्या मतांची टक्केवारी याचा पुरावा आहे. पण देशातली ही शांती, सहिष्णुता टिकवून ठेवण्याची, त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सामुहिक प्रयत्न करण्याची जबाबदारीही याच उदारवादी लोकांची आहे.

अता महंमद, कन्नड
मानवी जीवनातील सर्वांत महत्त्वाचा शक्तीस्रोत : एकेश्वारवाद आहे.
अल्लाह हा या संपूर्ण विश्वाचा, विश्वातील चराचर सृष्टीचा पालनकर्ता, शासक, मालक, व्यवस्थापक, सार्वभौम, सत्तेचा स्वामी , स्वयंपूर्ण, सर्वज्ञ, एकमेवाद्वितीय व अविभाज्य असल्याचे इस्लाम मानतो.
    हे चंद्र, सूर्य, तारे व धरती अब्जो वर्षांपासून भ्रमण करताहेत. सर्व अल्लाहच्या आदेशाला बांधलेले आहेत. आकाशाला त्याने छत बनविले. जीवितासाठी हवा, पाणी, वर्षा, अन्नधान्य, फलोपहार व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू निर्मिल्या. जगातील प्रत्येक वस्तू त्या अल्लाहवर विसंबून आहेत. परंतु तो कोणावर विसंबून नाही. म्हणून पवित्र कुरआनमध्ये असा उल्लेख आहे की या सृष्टीमध्ये एकापेक्षा जास्त ईश्वर असते तर साम्राज्य विस्तारासाठी त्यांच्यात भांडणे झाली असती व ही प्रचलित व्यवस्था केव्हाची कोलमडून पडली असती.
मानवाने ईश्वरी व्यवस्थेला बाजूला ठेवून जी धोरणे व व्यवस्था अमलात आणल्या त्या सर्व निरर्थक, निष्प्रभ व असफल ठरल्या. मग ती व्यवस्था सेक्युलर असो, जातीयवादी फासिस्ट असो, कम्युनिस्ट असो कोणतीही असो. केवळ पोकळ नारेबाजी आणि आंधळ्या-बहिऱ्या इच्छेतून लोकांना भाषणांच्या आहारी नेऊन सत्तेचा लाभ घेत राहण्यापलीकडे यांच्याजवळ दुसरे कोणतेही उपाय नाहीत, हे कटु सत्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी साडेचौदाशे वर्षांपूर्वी अस्पृश्यता, श्रेष्ठ-कनिष्ठ व सर्व प्रकारच्या विषमतेची सर्व भिंताडे पाडली. प्राचीन इतिहास आरंभापासून लाखो दासदासींनी भरलेला आहे. त्या प्रथेला संपुष्टात आणून जगभर प्रेम, दया करुणा व सहिष्णुतेचा संदेश पोहचविला व त्याला प्रत्यक्षात प्रस्थापित केले.’इस्लाम’ हा अरबी शब्द आहे व त्याचा अर्थ होतो- शांती. आत्मसमर्पण, आज्ञापालन, शिर नमविणे. ’मुस्लिम’चा अर्थ होतो- आज्ञाधारक, आत्मसमर्पण करणारा, शिर नमविणारा व शांतीचा मार्ग प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणारा. पवित्र कुरआनच्या अनुसार मर्यादा सांभाळून वागणारा म्हणजे विशिष्ट प्रकारे वागण्याची प्रक्रिया अवलंबविणारा म्हणजेच कर्तव्यदक्ष व्यक्तिलाच मुस्लिम म्हटले गेले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ”लोकांच्या कामी येऊन मनाला आनंद मिळत असेल व दुसऱ्याला आपणाकडून त्रास झाला तर मनात वेदना उठत असतील तर तुम्ही मुस्लिम आहात.” ज्याच्या छळापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल, जो पोट भरून जेवत असेल व शेजारी उपाशी झोपला असेल तर तो मुस्लिम नाही.”असे शेकडो आदेश आहेत की ज्यांचे पालन प्रत्येक मुस्लिमाला अत्यावश्यक आहेत. 

एम.आय.शेख
9764000737
आज अवघे जग या विचारसरणीने व्यापलेले आहे. मुस्लिमांची ही एक मोठी संख्या याच मार्गान जात आहे. अल्लाहची एक सुन्नत (सवय) अशी आहे की, जो ज्या दिशेने प्रयत्न करतो अल्लाह त्याला त्या दिशेत यशस्वी करतो. जो  दाऊद इब्राहीम बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत असेल तर त्याला फरिश्ते बळजबरीने ओढून एपीजे कलाम बनवित नाहीत किंवा जो एपीजे कलाम बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत असेल त्याला बळजबरीने दाऊद बनवित नाहीत. अल्लाहने या जगात प्रत्येकाला आचरण स्वातंत्र्य दिलेले आहे. त्या अनुसार कमी अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्ती प्रगती करीत असते. 
कल्पना करा की, दोन अशा व्यक्ती आहेत, ज्यांना अशा एका देशात जावयाचे आहे की, ज्या देशांशी भारत सरकारशी आरोपी संबंधी देवाण-घेवाण करार झालेला नाही.  एकाला कायम त्याच देशात रहावयाचे आहे तर दुसर्याला 60-70 दिवसात परत यावयाचे आहे. या दोघांच्या विदेश प्रयाणापूर्वीच्या आचरणात ’जमीन-आसमान’ एवढे अंतर  असेल. ज्याला परत यावयाचे आहे तो जवाब दारीने वागेल. कारण त्याला माहित आहे. 60 दिवसांनी परत येऊन याच देशात कायमचे रहावयाचे आहे. मात्र ज्याला परत यावयाचे नाही त्याचे प्रस्थानापूर्वीचे वर्तन बेजबाबदारपणाचे असेल कारण त्याला माहिती आहे की पुन्हा या ठिकाणी आपल्याला परत यावयाचे नाही. ठीक हाच फरक मरणोत्तर जीवनावर ज्यांचा विश्वास आहे व ज्यांचा नाही त्यांच्याबाबतीत आहे. ज्याला मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास नाही तो या जीवनात बेदरकारपणे वागेल  मात्र ज्याला मृत्यूपश्चातही जीवन आहे यावर विश्वास असेल तो या जीवनात जबाबदारीने वागेल. 
पश्चिमेचे वैचारिक संक्रमण संपूर्ण जगावर झालेले आहे. मुस्लिमांमधील काही लोक सोडता बहुसंख्य मुस्लिमांसह संपूर्ण जगाने या वैचारिक संक्रमणासमोर शरणागती पत्करलेली आहे. ‘आम्ही बांधू ते तोरण, आम्ही ठरवू ते धोरण’ या पद्धतीने पश्चिम वागत आहे. त्यांनी गुडघ्यावर फाटलेल्या जीन्सला फॅशन ठरवले की आपण फाटक्या जीन्स घालून फिरणार. त्यांनी दारू पिण्याला प्रतिष्ठा दिली की आपण ही दारू पिण्यात प्रतिष्ठा मानणार. त्यांनी पिझ्झा, बर्गर खाणे व कोल्ड्रींक्स पीने याला स्टाईल म्हंटले की आम्ही अभिमानाने तेच खाणार व पीनार. त्यांनी मुक्त लैंगिक संबंधांना, समलैंगिक संबंधांना मान्यता दिली की आपण ही देणार. एवढेच नव्हे तर ते पॉर्नला प्रोत्साहन देणार तर आपण त्याचा ही डोळे मिटून स्विकार करणार? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांची कॉपी करण्यात स्वतःचा सम्मान समजणार. 
  पश्चिमेचे हे वैचारिक संक्रमण अधिक धारदार बनविण्यासाठी चार गोष्टी कारणीभूत आहेत. एक-त्यांची प्रचंड लष्करी ताकत, दोन- व्याजावर आधारित आंतरराष्ट्रीय आर्थिक वित्तीय संस्था (वर्ल्ड बँक/आयएमएफ) मधील व्यवहारातून मिळविलेली प्रचंड माया, तीन - राक्षसी आकाराच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्या व चार-प्रभावशाली मीडिया. थोडक्यात वैचारिक, सैनिक, आर्थिक आणि माध्यमांच्या आक्रमणापुढे कोणताच देश त्यांना आव्हान देऊ शकत नाही. जे आव्हान देतात त्यांचा सद्दाम हुसैन किंवा कर्नल गद्दाफी केला जातो. म्हणून अवघे जग पश्चिमेच्या तालावर नाचत आहे. या जीवनशैलीच्या फैलावाचे मुख्य कारण म्हणून पश्चिमेने मरणोत्तर जीवनाच्या संकल्पनेचा केलेला त्याग होय. अवघे जग त्यांचे अनुसरण करत आहे. या जीवनशैलीचा सर्वाधिक फटका महिला, मुलं आणि गरिबांना बसतो आहे. हे तिन्ही घटक स्वतःच्याच समाजाने केलेल्या अत्याचारांनी खचून गेलेले आहेत. त्यांची प्रगती अवरूद्ध झालेली आहे. या भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान फक्त इस्लामी व्यवस्थेकडूनच मिळत असल्याने पश्चिमेतील झाडून सर्व देश इस्लामचा द्वेश करतात. त्यांना चांगले माहित आहे की आपल्या अनैतिक जीवन पद्धतीला इस्लामी नैतिक जीवन पद्धतीच उध्वस्त करू शकते. म्हणून हाती असलेल्या मीडियाचा उपयोग करून इस्लामी जीवनशैलीला बदनाम करण्याचे काम अखंडपणे चालू आहे. 
माणसाची रचना करतांना अल्लाहने त्याच्या मध्ये दोन प्रवृत्ती समसमान ठेवलेल्या आहेत. एक सद्प्रवृत्ती दूसरी खलप्रवृत्ती. आता हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे की तो कोणत्या प्रवृत्तीकडे झुकतो. साधारणपणे ज्याप्रमाणे सायकल उतारावर विनासायास पळते तसेच मानसाचे नफ्स (मन) वाईट मार्गाकडे विनासायास पळते. परंतु त्याला वाईट मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे खेचून आणणे गरजेचे आहे. अन्यथा काही शतकात पृथ्वीवरील जीवन नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम कठीण आहे म्हणूनच करण्याजोगे आहे. ही कठिण जबाबदारी अल्लाहने मुस्लिम उम्मत (समाज)वर टाकलेली आहे. कुरआनमध्ये आदेश दिलेला आहे की, 
“आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.” (कुरआन : सुरे आलेइमरान आयत नं. 110)
या आयातींद्वारे जी जबाबदारी मुस्लिम उम्मतवर टाकलेली आहे ती जबाबदारी ही उम्मत योग्य पद्धतीने पार पाडत नाहीये. म्हणून ती ज्या ठिकाणी अल्पसंख्येत आहे त्या ठिकाणी ही अपयशी आहे व ज्या ठिकाणी बहुसंख्येत आहे त्या ठिकाणी ही अपयशी आहे. प्रेषित सल्ल. पूर्वी जी उम्मत आपल्या उद्देशापासून दूर जात असे तिला नष्ट केल्या जात असे, उम्मते आद, समूद व लूत अलै. यांच्यासह अनेक कौमांना त्यांच्या अनैतिक आचरणासाठी विध्वंसित करण्यात आल्याचे अनेक दाखले कुरआनमध्ये दिलेले आहेत. कुणावर दगडांचा वर्षाव झाला तर कुणाला पाण्यात बुडवून मारण्यात आले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची उम्मत ही अंतिम उम्मत असल्यामुळे तिच्यावर मागील उम्मतींना जसे नष्ट करणारे अजाब (प्रकोप) आले तसे या उम्मतवर येणार नाहीत, मात्र ही उम्मत जेव्हा-जेव्हा व जेथे-जेथे आपल्या कर्तव्यापासून दूर जाईल तेव्हा-तेव्हा तेथे-तेथे निलंबित केली जाईल एवढे मात्र निश्चित. पश्चिमेच्या अनैतिक जीवन शैलीचा यल्गार होत असतांना त्याचा सामना करण्याचे आपले अवतार कार्य करण्याऐवजी जेंव्हा ही उम्मत जीन्स, टी-शर्ट घालून, अश्लिल चित्रफिती पाहून स्वतः त्यांच्यापेक्षा पुढे पळत असेल तर हे अल्लाहचे नातेवाईक नाहीत की यांच्यावर दया दाखविली जाईल. 
कुरआनने मानवावर खालील प्रतिबंध लादलेले आहेत. कुरआन म्हणतो, ‘हे पैगंबर (स.) यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने ज्या वस्तू निषिद्ध (हराम) केल्या आहेत. ती ही आहेत, निर्लज्जपणाची (अश्लिल) कामे - मग ती उघड असोत अथवा गुप्त - आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि अल्लाहबरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार (शरीक) कराल ज्याच्या संबंधात त्याने कोणतेही प्रमाण उतरविले नाही, आणि असे की अल्लाहच्या नावाने तुम्ही एखादी अशी गोष्ट सांगावी जिच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नसेल (कि ती  खरोखर त्याने फर्माविली आहे.)’(संदर्भ : सुरे एराफ आ.क्र. 33).
याशिवाय कुरआनने अनेक ठिकाणी वाम मार्गापासून दूर राहण्याची चेतावणी दिलेली आहे. जे लोक या चेतावणीला जुमानणार नाही त्यांच्यासाठी आखिरत (द डे ऑफ जज्मेंट) च्या दिवशी कसा व्यवहार केला जाईल? “तेंव्हा काहींचे चेहरे तेजःपुंज असतील तर काहींचे चेहरे काळवंडलेले असतील. ज्यांचे चेहरे काळवंडतील (त्यांना सांगण्यात येईल की) श्रद्धेची देणगी मिळाल्यानंतर अश्रद्धावंतांप्रमाणे वर्तन करता? बरे तर आता कृतघ्नतेच्या मोबदल्यात प्रकोपाचा आस्वाद घ्या” 
(संदर्भ : कुरआन - आले इमरान आ.क्र. 106.)
या आयतींना मुस्लिम त्यांच्या श्रद्धेमुळे खऱ्या मानतील परंतु, मुस्लिमेत्तरांनी यांना खरे का बरे मानावे? या प्रश्नावर मौलाना अबुल आला मौदूदी यांचे उत्तर असे आहे की - 
”जेव्हा बुद्धीजीवी माणसे या ब्रह्मांडाच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, ही रचना अतिशय चिकित्सीय पद्धतीने केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की, ज्या अल्लाहने मानवाला बुद्धी देऊन वैचारिक शक्ती दिली, त्या बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती दिली, त्याला तमीज (शिष्टाचार) ने वागण्याची उर्मी दिली, त्याने त्या सगळ्या शक्तींचा वापर कसा केला? यासंबंधी त्याला विचारपूसही केली जाणार नाही. त्याला पुण्य केल्यावर पुरस्कार व पाप केल्यावर शिक्षा दिली जाणार नाही, हे कसे शक्य आहे? ब्रह्मांडाच्या रचनेवर अशा प्रकारे जे विचार करतात त्यांचा आखिरतवर विश्वास बसतो व ते अल्लाहने तजवीज (प्रस्तावित) केलेल्या शिक्षेपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतात.” (अर्थात आपल्या जीवनात चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न करतात.) (संदर्भ : तफहिमल कुरआन खंड-1, पान क्र. 311).
तसे पाहता आपण भारतीय मुस्लिम श्रद्धावान आहोत. आपल्यामध्ये नास्तिकांची संख्या फार कमी आहे. मात्र पूर्ण आस्तिक ही नाही व पूर्ण नास्तिकही नाही अशा फक्त नावाचे मुस्लिम असलेल्या लोकांची संख्या मागील काही वर्षापासून वेगाने वाढत आहे. त्यांना धार्मिक प्रतिकांचा उदो-उदो करण्यामध्ये मोठा रस आहे. पैगम्बर (सल्ल.) जयंतीमध्ये डीजे लावून नाचण्यात त्यांना आनंद येतो. मात्र प्रत्यक्ष प्रेषित (सल्ल.) यांनी  आदेशित केलेले धार्मिक (नैतिक) आचरण करतांना मात्र अवती भोवतीच्या वातावरणातून मिळालेले संस्कार त्यांना आडवे येतात. पश्चिमेकडून आलेल्या सर्वच गोष्टी स्विकार्य नाहीत. याची साधी जाण यांना नाही.
प्रत्येक माणसाचे खरे यश आखिरतमध्ये मिळणारे यश आहे. याची जाणीव निर्माण झाल्याशिवाय आपल्या मधून ’दाई ’ निर्माण होणार नाहीत व अन्य धार्मिक समुहांना खरे मार्गदर्शन मिळणार नाही. ही जाणीव निर्माण व्हावी यासाठी कुरआनचे शिक्षण प्रत्येक मुस्लिमाने आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. आज अस्तित्वात असलेल्या कुरआन पठणाच्या पद्धतीत अमुलाग्र असा बदल करून त्याचे फक्त ’वाचन’ न करता ते ’आत्मसात’ करण्याकडे बुद्धीजीवी लोकांना लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. एकदा का कुरआन आत्मसात करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली की मला उद्याच्या सूर्य उगवण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक विश्वास या गोष्टीवर आहे की आत्मसात केलेल्या कुरआनचा प्रभाव एवढा जबरदस्त असेल की आत्मसात करणार्यांचे जीवन आंतरबाह्य बदलून जाईल व हा बदल सकारात्मक बदल असेल, अशा लोकांच्या जीवनातून अंधार नष्ट होईल. नैतिकतेचा सूर्य प्रकाशमान होईल, त्यांच्या हातून गुन्हा तर सोडा अनैतिक काम सुद्धा होणार नाही. ते इतरांच्या मानवाधिकारांची पायमल्ली करणार नाहीत. त्यांच्यातून सकारात्मक उर्जेचा संचार होईल व त्या उर्जेतून सर्व समाजाच्या प्रगतीचे मार्ग प्रशस्त होईल. मुस्लिम उम्माहला ’उम्मत-ए-वस्त’ असे म्हणतात. याचा अर्थ या उम्मतच्या पाठिमागे 1 लाख 24 हजार प्रेषित आहेत तर पुढे कयामत (प्रलयाचा दिवस) पर्यंत जगात जन्मणारे लोक आहेत. दोघांच्या मधोमध मुस्लिम उम्मत उभी आहे. म्हणून त्यांना उम्मते वस्त म्हणजेच दरम्यानमधील उम्मत असे म्हणतात. 
या पार्श्वभूमीवर इस्लामच्या संदर्भात माझे वैयक्तिक मत असे आहे की, मुस्लिम समाजाची स्थिती रेल्वे इंजिनसारखी आहे. इंजीन जसे अनेक डब्यांना आपल्या अंगभूत ताकतीने ओढत इच्छीत स्टेशनपर्यंत घेऊन जाते, तसेच मुस्लिमांनी इतर लोकांना ओढत स्वर्गा (जन्नत) च्या स्टेशनपर्यंत घेऊन जाणे इस्लामला अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे डब्यांना खेचण्यासाठी इंजीनाला दोन रूळावर असणे आवश्यक आहे. इंजिन जर रूळावरून घसरले तर बाकीच्या डब्यांना ओढणे तर सोडा ते स्वतःच जमिनीत रूतून बसते. ठीक याचप्रमाणे प्रत्येक मुस्लिम (दाई) ला इस्लामच्या नैतिक शिकवणीच्या रूळावर राहणे आवश्यक आहे. असे असेल तरच ते स्वतःसह इतर समाजाची प्रगती सुनिश्चित करू शकतील अन्यथा ते स्वतःही इतरांसोबत वाहवत वाम मार्गाला जातील. अशामुळे वाईट गोष्टींची सुरूवात करण्याची पावती जरी त्यांच्या नावावर फाडली गेलेली नाही तरी वाईट गोष्टींना विरोध न केल्याचा ठपका मात्र त्यांच्यावर अल्लाहच्या न्यायालयात लागल्याशिवाय राहणार नाही. 
प्रत्येक मुस्लिमाने जर व्यक्तिगत नैतिक आचरणाची काळजी घेतली तर त्यातूनच सामुहिक चारित्र्याची निर्मिती होते व अशाच समाजात शांती आणि प्रगती शक्य होते. महिला सुरक्षित होतात. मुलांना निकोप वातावरणात वाढण्याची संधी मिळते. आज ज्या वातावरणात मुले वाढत आहेत ते वातावरण निकोप आहे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. या अवस्थेतून बाहेर काढून दुसर्यांना आपल्या सोबत चांगल्या व्यवस्थेत घेण्याची मोठी जबाबदारी मुस्लिमांवर आहे. याची जाणीव सर्वांना असणे ही काळाची गरज आहे.  
जुगनूओं को साथ लेकर रात रौशन कीजिए
रास्ता सूरज का देखा तो सहर हो जाएगी
जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशीच जाणीव असणारी संस्था आहे. ही संस्था मुस्लिम व मुस्लिमेत्तर दोन्ही समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी कटिबद्ध आहेत. कुरआन व हदीसची शिकवण सर्वांपर्यंत पोहचावी व त्यातून त्यांची नैतिक व भौतिक प्रगती व्हावी व सर्वांना मुक्ती मिळावी यासाठीची काळजी घेते. जमाअते इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र विभागाने या काळजीतूनच 12 ते 21 जानेवारी 2018 या कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात राहणार्या सर्व धर्मीय लोकांपर्यंत इस्लामच्या नैतिकतेचा संदेश पोहोचवावा म्हणून ’इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ या शिर्षकाखाली एक विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. तरी सामान्यतः प्रत्येकांनी व विशेषतः मुस्लिमांनी या मोहिमेत सामील होऊन आपले सक्रीय योगदान द्यावे. ही आपली दुहेरी जबाबदारी आहे. एक नैतिक दूसरी राष्ट्रीय. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की,” ऐ ! अल्लाह आम्हाला इस्लामी आचरण किती महत्वाचे आहे व त्या आचरणापासून दूर झाल्याने आज आपल्या प्रिय देशात जो अनैतिक हाहाकार माजला आहे. जनता त्राहीमाम-त्राहीमाम करीत आहे त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आम्हा सर्वांना समज दे.” (आमीन.)

डॉ. शेख इक्बाल मिन्ने
7040791137
इस्लाम हा शब्दच मुळी ’सलाम’ या पासून आला आहे. या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. त्यामुळे इस्लाम धर्मियांच्या मनात शांतताही आपसुकच रूजलेली असते. इस्लामचा मूळ गाभा ’तौहिद’ आहे. तौहिद म्हणजेच एकेश्वरवाद. याचा अर्थ असो आहे की, ”अल्लाहच या जगाचा आणि जगातील साऱ्यांचा निर्माता आहे. तोच पालनकर्ता आणि साऱ्यांचा स्वामी आहे. त्याचेच शासन आणि त्याचाच अधिकार आहे. आज्ञा देण्याचा आणि मनाई करण्याचा अधिकारही फक्त त्याचाच आहे. त्यामुळे त्याच्या आज्ञांचे पालन आणि गुलामीही फक्त त्याचीच. तोच या विश्वांचा खालीक, मालीक आहे. त्याचा कोणीही भागीदार नाही. साऱ्यांवर फक्त त्यांचीच हुकूमत चालते. जी व्यक्ती अल्लाहचे हे सारे अधिकार मानते ती सहिष्णू, शांतताप्रिय, समंजस आणि पापभीरू असतेच. समाजात शांतता नांदण्यासाठी एक विचार आणि सिद्धांत हवा. इस्लामची सामाजिक व्यवस्था पवित्र कुरआनच्या एका आयातीवर आधारित आहे. ज्यात म्हंटले आहे की, जगातील सारे लोक हे एका वंशापासून आहेत. इस्लाम जगातील साऱ्या लोकांना सांगतो की तुम्ही सर्व एका आई-बापाची संतती आहात. एकमेकांचे भाऊ-बहिण आहात म्हणून माणसाच्या नात्याने समान आहात. मानवतेचा हा विचार, हे तत्त्व स्वीकारल्यानंतर घृणा, असुया, द्वेष आपोआप गळून पडतात. त्यामुळे शांतता नांदण्यास मदत होते. समाजात शांतता नांदणे आग्रहाचे असते कारण शांततेचा मार्ग हा एकमेव मार्ग यशाकडे आणि मुक्तीकडे नेतो. 
प्रगती : प्रगती ही सापेक्ष संज्ञा आहे. परंतु, आजच्या युगात प्रत्येकजण आपली वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. यातही आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी जो तो झटताना दिसतो. पण ही प्रगती करीत असतांना आपण कोणाचा हक्क मारीत नाही का? कोणाला वंचित करीत नाही ना? याचेही भान रहात नाही. इस्लामने सामुहिक जीवनामध्ये आर्थिक स्पर्धा खुली आणि निरंकुश असावी अशी व्यवस्था केलेली आहे. माणसांनी एकमेकांशी निर्दयीपणे आणि निष्ठुरपणे वागू नये यासाठी इस्लामने माणसांना नैतिकतेचे धडे गिरवायला सांगितले आहेत. एकमेकांना सहाय्य करण्याचे, एकमेकांबद्दल सहानुभूती आणि बंधुभाव बाळगण्याची शिकवण इस्लाम जगाला देतो. एकदा नैतिकतेचे बळ आणि अधिष्ठान प्राप्त झाले की वैयक्तिक आणि आर्थिक प्रगती होणारच. पण समाजातील निराधार, लाचार, दीन, दुबळ्या बांधवांना आश्रय, मदत आणि पाठबळ द्यायला हवे. आपण एकटे प्रगती पथावर असलो तरी आपल्या बरोबरीचा समाज ही आपल्या सोबत प्रगती पथावर आल्याशिवाय प्रगती साधणे अशक्य आहे. वैयक्तिक वैचारिक प्रगल्भता आणि दृष्टी आली की प्रगतीपथ दृष्टीपथात येतो. आर्थिक प्रगतीसाठीही योग्य आणि कायदेशीर मार्गाने अर्थाजन करण्याची शिकवण इस्लामने दिल्यामुळे स्वतःच्या उन्नतीबरोबर सार्वजनिक हित ही साधले जाते. व्यक्तिमत्वाच्या विकासामुळे आचरण आणि वैचारिक ठेवण सुदृढ होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. वैध मार्गाने कमविलेल्या धनदौलतीवर इस्लाम माणसाचे हक्क मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर वैधमार्गाने कमविलेल्या संपत्तीला उचित आणि रास्त मार्गातच खर्च करण्याचे बंधनही इस्लाम घालते. 
त्याचप्रमाणे माणूस जेव्हा जबाबदारी, कर्तव्यपालन, आज्ञापालन, भक्ती आणि ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करील तेवढा तो ईश्वराच्या निकट होईल. इस्लाममध्ये ईश्वराशी जवळीक करणे म्हणजेच आध्यात्मिक प्रगती समजली जाते. 
मुक्ती : पवित्र कुरआननुसार मरणोपरांत जीवन हे खऱ्या अर्थाने खरे जीवन आहे. या जीवनात केलेले कृत्य, कर्मावरून जन्नत आणि जहन्नम कायमस्वरूपी प्राप्त होणार आहे. पण पूर्वानुअट अल्लाहवरच्या ईमानची आहे. माणसाच्या मनात आणि बुद्धीत हाच विचार कायम असणे आवश्यक आहे. की, ” अल्लाहच त्याचा स्वामी, त्याचा शासक, त्याचा निर्माता आणि त्याचा ईश आहे” अल्लाहची प्रसन्नता कमावणे हे त्याच्या सर्व प्रयत्नांचे उद्दीष्ट आहे आणि अल्लाहची आज्ञा हाच त्याच जीवनाचा कायदा असतो. मुक्तीचा मार्ग तसा कठीण आहे. कारण ईमानबरोबरच माणसाने जाणीवपूर्वक आपली स्वच्छंदता सोडायला हवी. पण त्याचबरोबर संयम आणि विवेकही असायला हवा. यालाच कर्तव्यपरायणता आणि जबाबदारीची जाणीव म्हटले जाते. याच गोष्टीला ’तक्वा’ म्हणतात. ही कर्तव्यपरायणता आणि जबाबदारीची जाणीव पराकोटीला गेली की ईश्वराची इच्छा माणसाची इच्छा होते. ईश्वराची आवड दासाची आवड बनते आणि ईश्वराला ज्या गोष्टी नापसंत आहेत ते दासालाही नापसंत वाटते. या गोष्टीलाच ’एहसान’ (समर्पन) असे म्हटले जाते. या स्थानावर पोहोचल्यावर माणसास ईश्वराची अत्यंत जवळची निकटता प्राप्त होते आणि हे माणसाच्या उच्चतम आध्यात्मिक विकासाचे स्थान आहे.

""अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे''

1. अल्‌फातिहा

परिचय
शीर्षक :
या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव "अल्‌फातिहा' त्यातील तपशीलाच्या अनुषंगाने आलेले आहे. "फातिहा' एखाद्या कार्याच्या शुभारंभाला अथवा ग्रंथाच्या प्रारंभाला म्हटले जाते. दुसऱ्या शब्दांत यास ग्रंथाचा प्रारंभ (प्रस्तावना) म्हटले जाते.
अवतरण काळ :
कुरआनचा हा सूरह (अध्याय) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाच्या प्रारंभकाळात अवतरित झालेला आहे. विश्वसनीय सूत्रांद्वारे स्पष्ट होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर  सर्वप्रथम पूर्णरुपेण अवतरित अध्याय हाच आहे. या अगोदर फक्त वेगवेगळी वचने (आयत) अवतरित झाली होती जे अध्याय "अलक', "मुजम्मिल' आणि "मुदस्सिर' यात समाविष्ट आहेत.
विषय :
खरे तर हा अध्याय एक प्रार्थना आहे. ही प्रार्थना अल्लाहने त्या प्रत्येक मनुष्याला शिकविली आहे जो दिव्य कुरआन अध्ययन प्रारंभ करतो आहे. दिव्य कुरआनच्या प्रारंभी या सूरहला (अध्यायाला) निश्चित करण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही या ग्रंथापासून लाभ घेऊ इच्‌िछता तर सर्वप्रथम अल्लाहशी ही प्रार्थना करा. स्वभावत: मनुष्य प्रार्थना त्या गोष्टीसाठी करतो जिला प्राप्त करण्याची त्याची मनोमन इच्छा असते आणि त्याच विभूतिकडे करतो जिच्याकडून आपल्या अपेक्षेची परिपूर्त होण्याची त्याला खात्री असते. कुरआनने प्रारंभी या प्रार्थनेची शिकवण देऊन मनुष्याला जणूकाही सावध केले आहे की सत्य जाणून घेण्यासाठीच सत्यशोधक वृत्तीने या ग्रंथाचे पठण करावे. प्रथमत: मनुष्याने याची खूणगाठ मनात बांधून घेतली पाहिजे की ज्ञानाचा मूळ स्त्रोत एकमेव अल्लाह आहे. म्हणून मार्गदर्शनासाठी अल्लाहजवळ प्रार्थना करूनच दिव्य कुरआन अध्ययन करावे.
या विषयावरून हेच सिद्ध होते की दिव्य कुरआन आणि सूरह अल्‌फातिहा या दोहोतील वास्तविक संबंध ग्रंथ आणि त्याच्या प्रस्तावनेचा प्रथम सूरह (अध्याय) नसून एक प्रार्थना आणि प्रार्थनेला दिलेल्या उत्तरासमान आहे. "सूरह अल्‌फातिहा' ईशदासाने केलेली एक प्रार्थना आहे आणि प्रार्थनेचे अल्लाहाने दिलेले उत्तर म्हणजेच दिव्य कुरआन आहे. दास प्रार्थना करतो, "हे अल्लाह, तू माझे मार्गदर्शन कर.' उत्तरादाखल अल्लाह पूर्ण कुरआन दासापुढे ठेवतो आणि सचेत करतो, ""हाच तो सरळ मार्ग आणि मार्गदर्शन आहे ज्यासाठी तू माझ्यायाजवळ प्रार्थना केली आहेस.''

[next]

१. अल‌फातिहा 


(मक्‌काकालीन, एकूण ७ आयती)
अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे जो सर्व सृष्टीचा रब (पालनकर्ता) आहे. (२) एकमात्र असीम करुणामय आणि परम दयावंत, (३) निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे.

१) इस्लाम मनुष्याला ज्या संस्कृतीचे धडे देतो त्यापैकी एक नियम हासुद्धा आहे की, मनुष्याने आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात अल्लाहच्‌या नावाने करावी.
२) हा अध्याय एक प्रार्थना आहे. मात्र ही प्रार्थना त्या अस्तित्वाचे स्तुतीगान करून होत आहे ज्याच्‌याकडे मनुष्‌य याचना करीत आहे. प्रार्थना करण्याच्‌या योग्य पद्धतीचीच ही शिकवण आहे. म्हणजे ज्याच्‌याशी प्रार्थना केली जात आहे त्याची सर्वप्रथम स्तुती आणि प्रशंसा केली जावी. त्याचे गुण, कृपा आणि श्रेष्‌ठत्व स्वीकार करावे. ""स्तुती तर फक्त अल्लाहसाठीच आहे'' असे सांगून एक मोठे वास्तव स्पष्टि करण्यात आले आहे. जगात कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात सौंदर्य दिसते व श्रेष्ठत्व व प्रभुत्वाची प्रचिती होते; त्या सर्वांचा मूळ स्त्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रशंसा आणि स्तुतीला पात्र तोच निर्माता आहे, निर्मिती मुळीच पात्र नव्‌हे. सामर्थ्य व श्रेष्ठत्व प्रदान करणारा अल्लाह स्तुतीला पात्र आहे.
३) "रब' हा शब्द प्रयोग अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयुक्त आहे. 1) मालक व स्वामी 2) पालनपोषण, खबरगिरी व देखभाल करणारा, 3) शासक, प्रशासक, स्वामी, व्‌यवस्थापक. अल्लाह या सर्व अर्थाने सृष्टिचा "रब' आहे.
४) अल्लाहचे स्तुतीगान करताना "रहमान' (परम कृपाळू) यानंतर पुन: रहीम (परम दयाळू) या शब्दाचा प्रयोग यासाठी केला आहे की, अल्लाहची कृपा अनंत आहे. दया असीम आहे.
५) अल्लाहचे स्तुतीगान असीम दयाळु व कृपाळु असे केल्यानंतर अल्लाह न्याय-निवाड्याच्या (अंतिम) दिवसाचा स्वामी आहे, असे म्हटले गेले आहे. यावरून हेच स्पष्टि होते की अल्लाह फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो न्यायीसुद्धा आहे. न्याय देणारासुद्धा असा की अंतिमदिनी न्याय-निवाडा करण्याचा पूर्ण अधिकार त्याच्‌याच हातात असेल. म्हणून आम्ही अल्लाहशी फक्त प्रेमच करीत नाही तर त्याच्‌या न्यायी गुणवैशिष्ट्यांमुळे  त्याचे  भय बाळगून आहोत. 
[next]

(४) आम्ही तुझीच इबादत (उपासना) करतो आणि तुजपाशीच मदत मागतो. 
(५) आम्हाला सरळ मार्ग दाखव. (६) त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस. (७) जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.१०


६) "इबादत' (उपासना, भक्ती) हा शब्दसुद्धा अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयोग केला जातो.                 १) उपासना, पुजाअर्चा, २) आज्ञापालन, ३) दास्यत्व व गुलामी. येथे हे तिन्ही अर्थ अपेक्षित आहेत. म्हणजे आम्ही तुझे उपासक, आज्ञाधारक आणि गुलामसुद्धा आहोत.
७) म्हणजे आम्ही आमच्या गरजपूर्तसाठी तुझ्याकडेच रुजू होतो. केवळ तुझ्याच मदतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. याच कारणास्तव आम्ही विनंतीसह तुझया सेवेत हजर होत आहोत.
८) म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचार, विचार व वागणुकीचा असा मार्ग आम्हाला दाखव जो निव्वळ सत्य असावा. ज्यावर चालून आम्ही आमच्या जीवनात वास्तविक सफलता आणि सौभाग्य प्राप्त करू शकावे.
९) हा तो सरळ मार्ग आहे ज्याचे ज्ञान आम्ही अल्लाहजवळ मागत आहोत. तो सरळ मार्ग जो  तुझया प्रियजनांनी अंगीकारला आहे.
१०) "अनुग्रह' म्हणजे खरी आणि शाश्वत कृपा आहे जी सरळ मार्गावर चालून आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करूनच मनुष्‌याला मिळते. तो क्षणिक आणि दिखाव्याचा अनुग्रह नव्‌हे जो मार्गभ्रष्ट लोकांना जगात मिळतो आणि पूर्व फिरऔन, नमरूद आणि कारूनसारख्या अनेक अत्याचारींना मिळाले आहेत आणि आजही आमच्या डोùयांदेखत मोठमोठया अत्याचारींना, दुष्टांना आणि मार्गभ्रष्ट लोकांना मिळत आहेत.
[next]
"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे''

२. अल्‌बकरा 

परिचय
शीर्षक : 
या अध्यायाचे नाव "बकरा' यासाठी आहे की यात एके ठिकाणी गाईचा (बकरा) उल्लेख आला आहे. "बकरा'चा अर्थ होतो गाय. दिव्य कुरआनच्या प्रत्येक अध्यायात (सूरह) अनेक विषय आल्यामुळे त्या प्रत्येकाचे विषयानुरूप नामकरण अशक्‌य आहे. यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनात कुरआनच्या बहुतेक अध्यायासाठी (सूरह) विषयानुसार शीर्षक देण्याऐवजी प्रतिकात्मक नावे निश्चित केली आहेत ज्यामुळे अध्याय ओळखले जाते. या अध्यायाला (सूरह) "बकरा' हे नाव देण्याचा अर्थ हा मुळीच नाही की यात गाईविषयी तपशील आला आहे तर फक्त हाच अर्थ आहे की तो सूरह (अध्याय) ज्यात गाईचा उल्लेख आला आहे.
अवतरण काळ :
या अध्यायाचा (सूरह) बहुतांश भाग मदिनेला हिजरत (स्थलांतर) केल्यानंतर "मदनीकाळा'च्या प्रारंभी अवतरित झाला आणि कमी भाग नंतर अवतरित झालेला आहे. परंतु विषयानुकूल यात समाविष्ट केला आहे.
पाश्र्वभूमी :
या अध्यायाला समजून घेण्यासाठी प्रथमत: याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
१) "हिजरत'पूर्व मक्का शहरात इस्लामचे आवाहन प्रामुख्याने अरब अनेकेश्वरवादी लोकांसाठी होते. हे आवाहन त्या लोकांसाठी नवीन व अनोळखी असे होते. हिजरतनंतर आता संबंध यहुदी लोकांशी आला. हे यहुदी लोक एकेश्वरत्व, प्रेषित्व, परलोकत्व, दिव्यप्रकटन, फरिश्ते आणि ईशग्रंथाशी परिचित होते. तत्वत: त्यांचा दीन (धर्म) इस्लामच होता ज्याची शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) देत होते. परंतु शतकानुशतकात झालेल्या फेरबदलाने व विकृतीने त्या लोकांना खऱ्या धर्मापासून फार दूर हाकलून दिले होते. तेव्‌हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे आल्यानंतर अल्लाहने आदेश दिला की त्यांना (यहुद्यांना) सत्यधर्माचे (इस्लामचे) आवाहन द्या. म्हणून या अध्यायातील प्रारंभीच्या एकशे एक्केचाळीस (१४१) आयती या विषयाशी निगडीत आहेत.
२) मदीना येथे पोहचल्यानंतर "इस्लामी आंदोलन' एका नव्या स्थितीला सामोरे जात होते. मक्केतील कार्य फक्त इस्लामी मूलतÎवांचा प्रचार आणि नवमुस्लिमांचे नैतिक प्रशिक्षणापुरतेच 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget