Latest Post

आपल्या समस्या दुसरा कोणीतरी येवून सोडवेल हा विचारच मूर्खपणाचा आहे. हुंडा आणि दहेज भारतीय मुस्लिम समाजामध्ये खोलपर्यंत रूजलेली समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आता कोणी पैगंबर येणार नाहीत. म्हणून ही प्रथा आपल्यालाच दूर करावी लागेल. कुठलेही मोठे काम योजनेशिवाय पूर्ण होत नाही. ऐन वेळेसची जमवाजमव निरूपयोगी असते. दहेज प्रथेचे उन्मूलन करण्यासाठी जेवढे प्रयत्न होतात तेवढे ती प्रबळ होते, आतापर्यंतचा असा अनुभव आहे. जोपर्यंत आपण एक उम्मत म्हणून या समस्येचे गांभीर्य ओळखणार नाही, त्यापासून होणारे नुकसान तपासून पाहणार नाही तोपर्यंत ही समस्या दूर होणार नाही.
दहेज देण्याची कारणे
मुस्लिमांमधील अनेक विचारवंत दहेज प्रथेला योग्य ठरविण्यासाठी, ’दहेज-ए-फातमी’चे उदाहरण देतात. म्हणजे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल.च्या लाडक्या मुली ह.फातेमा रजि.चा निकाह जेव्हा हजरत अली रजि. बरोबर झाला तेव्हा बिदाईच्या वेळी काही गृहउपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. हे ऐतिहासिक सत्य आहे. मात्र या वस्तू देण्यामागची वस्तूस्थिती समजून न घेताच या घटनेचा सोयीस्कर अर्थ लावून टी.व्ही. फ्रिजपासून उंची फर्निचर पर्यंत लाखो रूपयांच्या वस्तूंची देवाण-घेवाण मुस्लिम समाजात होते. हा शुद्ध ढोंगीपणा आहे. या दहेज-ए-फातमी ची वस्तूस्थिती खालीलप्रमाणे नमूद आहे.
हे सत्य आहे की, खजूरच्या सालीपासून तयार केलेले एक अंथरून, चामड्याचा एक मिश्कीजा (पाणी भरण्याचे साधन) आणि काही मातीची भांडी ह.फातिमा रजि. यांना बिदाईच्या वेळी देण्यात आल्या होत्या. याचे कारण असे की, ह.अली रजि. हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चुलतभाऊ होते व लहानपणापासून त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले होते. त्यांचे स्वतंत्र असे घर नव्हते. जेव्हा हा विवाह  निश्‍चित झाला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी महेर आणि गृहउपयोगी वस्तू घेण्यासाठी हजरत अलीच्या मालकीची असलेली एकमेव वस्तू ’जर्रा’ (घोड्यावर बसण्यासाठी वापरण्यात येणारे आसन) विकून त्यातून आलेल्या रकमेतून महेर आणि गृहउपयोगी वस्तू घेण्याचे निर्देश ह.अली रजि. यांना दिले. त्याप्रमाणे ह.अली रजि. यांनी आपल्या मालकीची जर्रा विकली. ती ह. उस्मान रजि. यांनी खरेदी केली व त्या मोबदरल्यात जी रक्कम मिळाली त्यातून महेर अदा करण्यात आली व उपरोक्त नमूद वस्तू खरेदी करण्यात आल्या. वरील वस्तू खरेदी करण्यामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मालकीचे एक दिरहमही खर्च करण्यात आलेले नव्हते. ही सत्य घटना आहे. एवढ्याश्या घटनेचे भांडवल करून कोट्यावधी मुस्लिमांनी आतापावेतो अब्जावधी रूपयांच्या दहेजची देवाण-घेवाण केलेली आहे.
दहेज-ए-फातमीचे कारण पुढे करणारे विचारवंत हे विसरून जातात की, ज्या मदिना शहरामध्ये ह.फातिमा रजि. आणि ह.अली रजि. यांचा निकाह झाला. त्याच मदिना शहरामध्ये प्रेषित सल्ल. यांच्या दोन मुलींचे निकाह (ह.रूकैय्या रजि. आणि ह.उम्मे कुलसूम रजि.) एकीच्या मृत्यूनंतर एक ह.उस्मान रजि. यांच्याबरोबर झाले. तेव्हा कुठल्याही गृहउपयोगी वस्तू देण्यात आलेल्या नव्हत्या. म्हणून दहेज-ए-फातमीच्या नावाखाली हा जो दहेज देण्याघेण्याचा खेळ मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी सुरू केलेला आहे व त्यामुळे निकाह महाग झालेला आहे. गरीबांना परवडेनासा झालेला आहे. तो ताबडतोब बंद करण्याची गरज आहे.
एक मजेशीर गोष्ट आपल्याला सांगतो, माणसाचे शरीर असो का विचार, यावर बर्‍याच गोष्टींचा प्रभाव नकळतपणे पडत असतो. हा प्रभाव (बदल) इतका सूक्ष्म असतो की, दैनंदिन जीवनात तो लक्षात येत नाही. उदा. समजा आपला एखादा बालमित्र अचानक दहा वर्षानंतर भेटला तर आपल्याकडे पाहताच तो म्हणतो, ” अरे! कम्प्लिट चेंज झालास” त्याला गेल्या दहा वर्षात आपल्यात झालेले बदल चटकन लक्षात येतात पण आपल्या  लक्षात येत नाहीत. लग्नाच्या बाबतीतही काही बदल आपण आपल्या देशातील बहुसंख्य हिंदू बांधवांच्या लग्न पद्धतीतून स्वीकारलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या जवळच्या बहुसंख्य बांधवांच्या लग्नसोहळ्यास उपस्थित राहत असतो व नकळत त्या सोहळ्यातील बर्‍याच गोष्टींने प्रभावित होत असतो. उदा. लग्नपत्रिका छापणे, फेटे बांधणे, शॉल देऊन उपस्थितांचा सत्कार करणे, आलेल्या लोकांना जेवन देणे, रोषणाई करणे, बँड/ डी.जे.वाजविणे, वरात काढणे इत्यादी. मुळात सोहळ्यासाठी ह्या गोष्टी आवश्यकच असतात. परंतु, इस्लाममध्ये निकाह हा मुदलात सोहळाच नाही. तो एक सामाजिक करार आहे. ज्याच्याबद्दल दस्तुरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच सांगितलेले आहे की, ”तो निकाह सर्वात चांगला ज्यात साधेपणा आहे”.
बहुसंख्य हिंदू बांधवांचे लग्न मनुस्मृती खंड 3 मधील नियम 20 ते 34 अनुसार प्रजापती पद्धतीने होत असतात. त्यात मुलीचे वडील ’कन्यादान’ करीत असतात. कल्पना करा ज्या मुलीला जन्मापासून लग्नापर्यंत लाडात वाढविले तीचे दान करताना कोणता पिता तिला साध्या पद्धतीने सासरी पाठवेल? म्हणून बहुसंख्य बांधवांमध्ये लग्नाचा सोहळा आयोजित केला जातो. त्यात पिता आपल्या ऐपतीप्रमाणे हुंडा, संसारोपयोगी वस्तू बिदायीच्या वेळेस मुलीला देत असतो.
यानंतर त्या मुलीचा माहेरशी संबंध औपचारिक असतो. तिचे सर्व जग बदलून जाते. पतिच्या नावाचे कुंकू कपाळी तर पतीच्या हातचे मंगळसूत्र गळ्यात बांधले जाते. लग्नानंतर तिच्या नावाच्या पुढे वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव लावले जाते. एवढेच नव्हे तर लग्नानंतर आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क समाप्त होतो. (महिलांना वारसा हक्क हिंदू कोडबिल 1956 प्रमाणे मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.)
या उलट इस्लाममध्ये लग्नाचा करार मस्जिदीमध्ये अतिशय साध्या पद्धतीने करण्याचे प्रेषित सल्ल. यांचे निर्देश आहेत. लग्नानंतर मुलीचे नाव बदलले जात नाही. मरेपर्यंत तिच्या नावाच्या पुढे तिच्या वडिलाचेच नाव असते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले जात नाही. (ज्या विवाहित मुस्लिम महिला लच्छा/गलसर घालतात ती मंगळसूत्राचीच नक्कल असते.) आई आणि वडिल दोघांच्याही संपत्तीत तिचा वारसा हक्क अबाधित असतो. म्हणून अनेक मुस्लिम लोक मुलीच्या निकाहमध्ये भरपूर खर्च करून तिला वारसाहक्कापासून वंचित करण्याचा डाव खेळतात. हा एकप्रकारे शरियतचा अपमान आहे.
एकदा असे झाले की, नव्याने इस्लाममध्ये प्रवेश केलेल्या व जहालती (अडानीपणा)चे काही संस्कार शिल्लक असलेल्या बदू (ग्रामीण) लोकांमध्ये कोणाचा कबिला श्रेष्ठ? यावर चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण आपलाच कबिला श्रेष्ठ असल्याचा दावा करीत होता. प्रकरण हमरीतुमरीवर पोहोचताना पाहून एका वृद्ध बदुने सर्वांना शांत राहण्याची विनंती करून आवाहन केले की, आपण सर्वजण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेकडे जावून त्यांनाच विचारू की आपल्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ? ते आपल्या सगळ्यांनाच ओळखतात. ते जे निर्णय देतील ते आपण मान्य करू. यावर सर्वांचे एकमत झाले आणि सर्वजण प्रेषित सल्ल. यांच्या समोर हजर झाले. वृद्ध बदुने म्हटले की, ”हे प्रेषित! आपल्यावर आमचे आई-वडिल कुर्बान, आम्हाला एका प्रश्‍नाचे उत्तर हवे आहे की, आमच्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ आहे?” प्रेषित सल्ल. यांनी स्मित करून उत्तर दिले की, ”तुमच्यापैकी ज्यांच्या कबिल्यामध्ये निकाह जितका सोपा व व्याभिचार जितका अशक्य आहे तो कबिला तेवढा श्रेष्ठ.” यावरून सुद्धा निकाह सोपा करण्याच्या आवश्यकतेवरच भर दिलेला आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
दहेजचे दुष्परिणाम
दहेजमुळे लग्न महाग होतात व गरीबांच्या मुलींचे लग्न होणे अवघड होवून जाते. खर्च वाढल्यामुळे त्याची जमवाजमव करताना वेळ जातो व उपवर मुला-मुलींचे वेळेवर लग्न होत नसल्यामुळे त्यांचा व्याभिचाराकडे वळण्याचा धोका असतो. व्याजाने रकम उचलून ऐपत नसताना खर्चीक लग्ने करून अनेक परिवार देशोधडीला लागलेले आहेत. लग्न महाग झाल्याने मुलींचे वडील भ्रष्ट मार्गाने कमाई करण्यासाठी बाध्य होतात. आज अशी परिस्थिती आहे की, मुस्लिम समाजातील प्रत्येक बाप आपल्या मुलींचे व प्रत्येक भाऊ आपल्या बहिणींचे थाटा-माटात लग्न करण्यासाठीच जणू कमावितो आहे. कुठल्याही मुस्लिम बहूल भागामध्ये ’भव्य शादीखाने’ आपले लक्ष वेधून घेतात. याउलट हिंदू बहूल भागामध्ये, ”भव्य खाजगी शिक्षण संस्था लक्ष वेधून घेतात.” लग्न महाग झाल्याने, मुलींचे लग्न होत नसल्याने अनेक ठिकाणी मुलांची लग्नेही खोळंबून ठेवली जातात. लग्न महाग झाल्यामुळे मुलगी जन्मली की काळीज धस्स करते. म्हणून अलिकडे मुस्लिमामध्ये सुद्धा कन्याभ्रूण हत्येची प्रवृत्ती वाढीस लागल्याची चाहूल लागलेली आहे. हा सगळा अनर्थ निकाह महाग केल्यामुळे होत आहे.
अलिकडे काही उलेमा आणि धार्मिक जमातींद्वारा मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या गेल्यामुळे सरळ हुंडा/ दहेज  मागण्याचे प्रकार कमी झालेले आहेत. मात्र जेथे, ”न मागताच” या गोष्टी मिळू शकतील. अशाच घराण्यामधील मुलींसाठी निकाहचे प्रस्ताव पाठविण्याची पद्धत रूढ झालेली आहे. याचा सरळ फटका गरीब आणि मध्यवर्गीय विशेष करून ज्यांना ज्यास्त मुली आहेत, अशा लोकांना बसत आहे. मुली पाहून नकार कळविण्यापेक्षा जेथे काही मिळण्याची शक्यता नाही तिथे जाणेच टाळले जात असल्याने अनेक परिवारांमध्ये 35 ते 40 वर्षाच्या व्हर्जीन (कुमारी) मुलींची संख्या समाजात भयावह पद्धतीने वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी इज्तेमामध्ये साध्या पद्धतीने लग्न करून बिदाईच्या वेळी पुन्हा भव्य सोहळा आयोजित करून लाखोंचा खर्च केला जात आहे. काही ठिकाणी तर निकाह साधेपणाने मस्जिदीमध्ये पण बाकीचा सोहळा फंक्शन हॉलमध्ये यथोचित स्वरूपात पार पाडल्या जात आहे.
अल मारूफ अल मशरूत
अरबीमध्ये एक म्हण आहे, ’अल मारूफ अल मशरूत’ अर्थात जी गोष्ट आज समाजात प्रचलित होते काही काळानंतर ती अनिवार्य बणून जाते. हुंडा, दहेज, निकाहचे जेवण देणे ह्या गोष्टी अशाच मारूफ (प्रचलित) मधून मशरूत (अनिवार्य) प्रथा बनलेल्या आहेत. यामुळेच निकाह महाग झालेला आहे.
तोंडाने मागायचे नाही पण मनात आशा ठेवायची, अशी दुटप्पी भूमिका बरेचजण घेताना दिसतात.” हमें तो कुछ नहीं चाहिए आप अपनी खुशीसे जो देना है सो दें.” किंवा ” हमारे पास तो अल्लाह का दिया सबकुछ है, जो भी देना है आप अपनी बेटी को दीजिए” सारख्या सभ्य शब्दात आजकाल भीक मागितली जात असून, ’एक दूसरे को तोहफे देने में आखिर हर्ज ही क्या है’, असे म्हणून या भीकेचे समर्थन केले जात आहे. हे इस्लामच्या आत्म्याच्या विरूद्ध आहे.
मौलाना मौदूदी रहे. म्हणतात, ”एक मुसलमान की हैसियत से आप देखें तो, अखलाक की पस्ती के साथ हम सीरे से किसी इस्लामी जिंदगीका तसव्वुरही नहीं कर सकते. मुसलमान को तो मुसलमान बनायाही इसलिए गया है के, उसकी जात से दुनिया में भलाई कायम हो और बुराई मिटे. भलाई को मिटाना और बुराई को फैलाना और उसके साथ मुसलमान भी होना ये दर हकीकत एक खुला हुआ तनाखुज (विरोधाभास) है. एक शख्स मुसलमान हो और फिर भी उसके शरसे दूसरे बंदगाने खुदा महेफूज न हो, एक शख्स मुसलमान हो और फिर भी उसपर किसी मामले में ऐतेमाद न किया जात सके, एक शख्स मुसलमान हो और फिर भी वो नेकी से भागे और बदी की तरफ लपके, हराम खाये और हराम तरीके से अपनी ख्वाहिशें पूरी करे, तो आखिर उसके मुसलमान होने का फायदा क्या है? किसी मुआशरे (समाज) की इससे बढकर कोई जिल्लत नहीं हो सकती के वो इन्साफ से खाली और जुल्म से लबरेज होता चला जाए. उसमें रोज बरोज भलाईयाँ दबती और बुराई फरोग पाती चली जाएं और उसके अंदर दियानत, अमानत और शराफत के लिए फलने फुलने के मौके कमसे कमतर होते चले जाएं. ये खुदा के गजब को दावत देनेवाली हालत है. अगर किसी मुस्लिम मुआशरे की ये हालत हो जाए तो उसके मानी ये हैं के वो इस्लाम के रूह से खाली हो चुका है. सिर्फ इस्लाम का नाम ही उसमें बाकी रहे गया है और ये नाम भी अब सिर्फ इसलिए रहे गया है के दुनिया को इस दीन-ए-हक से दूर भगाता रहे.’ (संदर्भ ः तामीरे अख्लाक क्यूं और कैसे पेज क्र. 3-4).
मुस्लिम युवकांची जबाबदारी
वो फरेब खुर्दा शाहीं जो पला हो किरगीसों में
उसे क्या खबर के क्या है रहवेरस्मे शाहबाजी
मुस्लिम तरूणांना माझे आवाहन आहे की, ” ऐ शाहीनों! अपने अल्लाह पर भरोसा रख्खो, अपनी मनगट की ताकत पर भरोसा रख्खो, दुल्हन आयेगी तो उसके कदमों से बरकत भी आयेगी, हे भीक मागायचे प्रकार सोडून द्या. हा तुमच्या पुरूषार्थाचा अपमान आहे. मित्रांनों! परिश्रमाला पर्याय नाही. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. मन लावून मेहनत करा, सजद्यामध्ये जावून मदद मागा, नैतिक मार्गाने पैसे कमाविण्याचा प्रयत्न करा, इस्लामी नितीमत्तेचे प्रदर्शन करा, विश्‍वास ठेवा आज समाजामध्ये भरोसा ठेवण्यालायक लोकांची संख्या फार कमी झालेली आहे. तुम्ही ही जागा भरू शकता. अनैतिकतेमध्ये ग्रासलेल्या या भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेमध्ये नितीमान व प्रामाणिक व्यावसाय करणार्‍यांना भरपूर मागणी आहे. ती मागणी तुम्ही पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा! प्रामाणिक नागरिकांची देशाला आपुर्ती करण्यापेक्षा मोठी देशसेवा दूसरी नाही आणि प्रामाणिक नागरिक बनविण्याचा हमखास यशस्वी मार्ग शरियत आहे. आज शपथ घ्या की मी हुंडा मागणार नाही, दहेज घेणार नाही, साधेपणाने मस्जिदीमध्ये निकाह करणार, फुकटाचे निकाहचे जेवण करणार नाही, साध्यापद्धतीने निकाह करून पुरूषार्थ सिद्ध करण्याची संधी कदापि सोडू नका, मग पहा पत्नीकडून व सासरवाडीकडून तुम्हाला नायकासारखा सन्मान मिळेल.
अलिकडे अशी लग्ने होत आहेत. ही संतोषजनक बाब आहे. जमाअते इस्लामी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांच्या मुलीचे नुकतेच लग्न अगदी साध्या पद्धतीने मस्जिदे महेबूबिया लातूर येथे झाले. तसेच जमातचे सदस्य अशफाक अहेमद यांच्या मुलीचेही लग्न मस्जिदे मुहम्मदिया लातूर येथे अगदी साधेपणे झाले. मात्र अशा प्रकारचे निकाह करण्याची एक व्यापक चळवळ सुर व्हायला हवी. इतकी की इतर समाजांनी आपले अनुकरण करण्यास प्रवृत्त व्हावे. अल्लाह आपल्या सर्वांना निकाह सोप्या पद्धतीने करण्याची तौफिक अता करो. (आमीन.)

- एम आय. शेख
www.naiummid.com
           

पुणे (वकार अहमद अलीम)-
ईश्वर एकच आहे. त्याचा कोणीही समकक्ष नाही. सबंध सृष्टीची निर्मिती आणि तिची व्यवस्था तोच पाहतो. माणसाने केवळ त्याचीच भक्ती करावी. केवळ त्याचीच गुलामगिरी  पत्करावी, असा चिरकालीन संदेश देत इस्लामने माणसाला माणसाच्या गुलामगिरीतून मुक्त केले. एकेश्वरवादी संकल्पनेमुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर १४५०० वर्षांपूर्वी  इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एक जीवंत समाज उभा केला. इस्लामने मानवाने मानेवावर लादलेल्या गुलामगिरीच्या मुळावरच घाव घातला.
याचा फार मोठा प्रभाव क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले आणि परिवर्तन चळवळीचे खंदे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर झाला, असे भावपूर्ण प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंद  महाराष्ट्रचे प्रसार व प्रचार विभागाचे सचिव इम्तियाज शेख यांनी केले.
बहुजन महामानव विचार प्रबोधिनीतर्फे फुले-आंबेडकर फेस्टिवल – २०१८ अंतर्गत सामाजिक ऐ्क्य परिषदेचे आयोजन ११ ते १५ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. दि. १३ एप्रिल रोजी पुण्यातील गंगापेठेत म. ज्योतिबा फुलेवाडा येथे ‘म. ज्योतिबा फुले आणि इस्लाम’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून इम्तियाज शेख बोलत होते. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत डॉ. रफीक सय्यद यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले.
सावित्री-फातिमा विचार मंच आणि देश बचाओ आघाडी तर्फे सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अली इनामदार यांनी हाच विषय का निवडला? याबाबत आपल्या प्रास्ताविकेत स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित खोटा इतिहास गेल्या १५ वर्षांत मराठा सेवा संघाने उघडा पाडला. त्यामुळे देशात शिवाजी राजांच्या नावाने होणाऱ्या जातीय दंगली संपुष्टात आल्या. त्याच धर्तीवर म. फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर याचा खरा इतिहास लोकांसमोर आणने आणि या महामानवांच्या विचारांनुसार मार्गक्रमण  व्हावे, हाच हेतू आणि उद्देश परिसंवाद आयोजनामागे आहे.
जमाअत-ए-इस्लामी हिंद पुण्याचे सदस्य अजीमुद्दीन शेख यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सन्मानार्थ लिहिलेला पोवाडा ‘मुहम्मद झाला  जहांमर्द खरा’ अत्यंत सुरेल आवाजात सादर करून वातावरण भक्तिमय केले.
पुण्यातील कौसरबागचे चेअरमन शेख सलीम यांनी परिसंवादाचे उद्घाटन करताना उद्देशप्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. मुजफ्फर सलीम यांनी संस्कृतप्रचुर अस्खलीत मराठी भाषेत विषयावर भाष्य करताना सांगितले की इस्लामने शिक्षणाचे महत्त्व ठासून सांगितले. इतकेच नव्हे तर ज्ञानार्जन करून इतरांना त्याचा लाभ द्यावा, असा आदेश  प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिला. इस्लामच्या या मूळ आदेशानुसार म. फुले यांनी महिलांना व अस्पृश्य समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.
परिवर्तन चळवळीतील प्रमुख नेते अंजुम इनामदार यांनी म. फुले यांचे अर्धवट शिक्षण व नंतर शिक्षण निरंतर सुरू होण्यामध्ये मुन्शी गफ्फार बेग यांच्या बहुमूल्य योगदानाची आठवण  करून दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या गौरवार्थ म. फुले यांनी लिहिलेल्या पोवाड्याचे उर्दूमध्ये इब्राहीम फैज यांनी भाषांतर केले. अंजुम इनामदार यांनी उर्दू पोवाड्याचे वाचन करून  श्रोत्यांना थेट हृदयाला हात घातला.
कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचरणामध्ये वेळोवेळी शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले, त्याचा फार मोठा प्रभाव फुल्यांवर झाला. त्याचीच परिणती म्हणजे देशातील एतदेशीयांची मुलींची पहिली शाळा पुण्यात ज्योतिबांनी सुरू केली. पुढे शाळेची जागा अपुरी पडत असल्याने गंजपेठेतील उस्मान शेख यांनी स्वत:ची जागा शाळेसाठी दिली. फुलेंचे  निवासस्थान व मुलींची शाळा म्हणजेच आज होत असलेला कार्यक्रम म. ज्योतिबा फुले वाडा होय.
पवित्र कुरआनमधील सूरह हुजूरातमधील १२ व्या आयतीचे पठण व भाषांतर करून इम्तियाज शेख यांनी सांगितले की समस्त मानवाची निर्मिती एकच पुरुष व एकच स्त्रीद्वारे झाली. त्यानंतर वेगवेगळ्या वंशावळीत त्यांची विभागणी ईश्वराने केली, जेणेकरून त्यांची आपापसात ओळख व्हावी.
पुढे इम्तियाज शेख यांनी सांगितले की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ‘ला इलाहा इल्लल्लाह’ संदेशाद्वारे शुद्ध एकेश्वरवादाची शिकवण दिली. त्यामुळे त्या काळी हजारो ईश्वरांना  मानणाऱ्यांपुढे केवळ एकच ईश्वराचे स्वामित्व स्वीकारण्याचे आवाहन केले. या आवाहनामुळेच माणसाची माणसाच्या गुलामीतून मुक्तता झाली. लोक केवळ एकच ईश्वराच्या गुलामीत  लिप्त झाले. अशा प्रकारे इस्लामने गुलागिरीच्या मुळावरच घाव घालून जगासमोर एक आदर्श जीवनपद्धती ठेवली.या सिद्धांताचा फार मोठा प्रभाव म. फुले यांच्यावर झाला. फुले यांनी  ‘मानवाचा धर्म एक’ या शीर्षकाच्या अखंडात निर्मिकाचे तपशीलवार वर्णन केले.
‘‘सर्वाचा निर्मिक आहे एक धनी।
त्याचे भय मनी, धरा सर्व।।१।।
मानवाचे धर्म नसावे अनेक।
निर्मिक तो एक, ज्योती म्हणे।।’’
देशात जातीजातीत विद्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. अशा वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या इस्लामच्या प्रमुख सिद्धान्तांना अनुसरून सर्व बहुजनांना  एकत्रित करून परिवर्तन चळवळ पुढे नेण्याचा आशावाद इम्तियाज शेख यांनी केला.
सामाजिक चळवळीचे प्रखर विचारवंत रमेश राक्षे यांनी ब्राह्मणवादी विचारावर कडाडून हल्ला चढविताना सांगितले की मुन्शी गफ्फार बेग, उस्मान शेख, फातिमा शेख आदींचे म. पुले  यांना मिळालेले सहकार्य ब्राह्मण्यवाद्यांनी लपवून ठेवले. फुल्यांनी ब्राह्मण्यवादावर घणाघाती हल्ला चढविला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी १४५० वर्षांपूर्वी स्त्री-पुरुषांना शिक्षण सक्तीचे केले. नव्हे तर माणसाला माणूस बनविणारे शिक्षण असावे असे बजावले, असे सांगून आपल्या अभ्यासपूर्ण  धीरगंभीर वाणीने अध्यक्षीय समारोप करताना डॉ. रफीक सय्यद पारनेरकर यांनी जीवाची उद्दिष्ट्ये काय? असा खडा प्रश्न श्रोत्यांसमोर टाकला.
जीवनाचा उद्देश ठाऊक नाही तरीही लोक जीवन जगतात. म्हणून दु:खकष्टी राहतात. फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची चाल म्हटली जाते, पण त्यांच्यापूर्वी हजारो वर्षापूर्वीपासून  वर्णद्वेषी व्यवस्था कुणी निर्माण केली? वस्तुत: इंग्रज हे तर मनुवाद्यांचे शिष्य आहेत. आदर्श समाज निर्मितीसाठी फुले, आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’चा नारा  दिला. साडे चौदाशे वर्षांपूर्वी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याचे केवळ आवाहनच केले नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित एका आदर्श समाजाची निर्मिती केली. या  सर्वांचा म. फुले यांच्यावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे. १८९१ साली ‘सार्वजनिक सत्य धर्म’ या पुस्तकाच्या मूळ हस्तलिखित प्रतीवर म. फुले यांचा दुर्मिळ अखंड फुलेंच्या हस्ताक्षरात लिहिलेला आहे. ती प्रत लंडनच्या म्युजियममध्ये आजही उपलब्ध आहे. त्यात फुले लिहितात,
‘‘तेरावे सद्दीची पैगंबरी खूण।
दावितो प्रमाण कुरानात।।
जगी स्त्री-पुरुष सत्यधर्मी होवी।
आनंदे वर्तती ज्योती म्हणे।।’’
शब्बीर अत्तार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. बोराडे यांनी आभारप्रदर्शन केले. फुलेवाडा सर्वधर्मीय स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्रितरित्या  सामूहिक भोजन करून आम्ही सर्व एकाच ईश्वराची लेकरे याचे प्रात्यक्षितकच सादर केले.

वेळेचे व्यवस्थापन म्हणजे जीवनाचे व्यवस्थापन. ज्याला हे जमले तो यशस्वी आणि ज्याला हे जमले नाही तो अयशस्वी! प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी अनेकवेळेस मार्गदर्शन केलेले आहे.
    प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टींपूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा. (तिर्मिजी)
    या पाचही निर्देशांमध्ये वेळेचे महत्व अधोरेखित केलेले आहे. साधारणपणे तारूण्य हे मनोरंजनासारख्या निरूपयोगी गोष्टींमध्ये तरूण वाया घालवतात. वास्तविकपणे तारूण्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा उपयोग वेळेवर केल्यास अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. ज्या की, प्रयत्न करूनही वृद्ध झाल्यानंतर करता येत नाहीत. व्यस्त होण्यापूर्वी जो रिकामा वेळ माणसाकडे असतो त्या वेळेच्या एकेका क्षणाचा उपयोग करण्याकडे माणसाचा कल असायला हवा. याची जाणीव ज्यांना असते तेच मोठमोठे कार्य करू शकतात. ज्यांना याची जाणीव नसते ते लोक आयुष्यात फार काही करू शकत नाहीत.
    एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे -1.जीवन कुठे व्यतीत केले? 2. तारूण्य कुठे खर्चि घातले? 3. संपत्ती कोठून मिळविली? 4. संपत्ती कोठे खर्च केली? 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला?
    यात पहिले दोन प्रश्न वेळेच्या व्यवस्थापनासंबंधीचेच आहेत. जीवन कुठे व्यतीत केले? त्यातही तारूण कुठे खर्ची घातले? हे दोन प्रश्न असे आहेत की, वेळेचे कुशल व्यवस्थापन करू शकणाऱ्या इसमालाच या प्रश्नाची नीट उत्तरे देता येतील. अन्यथा या प्रश्नाची उत्तरे देणेच शक्य नाही. खरे तर ही हदीस आय ओपनिंग (डोळे उघडणारी) हदीस आहे. या हदीसला नीट समजून घेतल्यानंतर कोणताही सश्रद्ध मुस्लिम वेळेचा अपव्यय करण्याचे धाडस करणार नाही.
    प्रेषित सल्ल. यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांचे प्रेषित्वाच्या आधीचे जीवन असो का प्रेषित्व मिळाल्यानंतरचे जीवन असो. दोन्हीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना मिळालेल्या वेळेच्या एकेका क्षणाचा सदुपयोग केलेला आहे. म्हणूनच कमी अवधीमध्ये इस्लामची सत्यता ते लाखो लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये यशस्वी झाले.
    आजच्या आधुनिक जगामध्ये वेळेला प्रोडक्टीव्ह (उत्पादक) करण्याकडे सर्वांचा कल असतो. मुस्लिमांनी तर जगातच नव्हे तर मृत्यूनंतरचे जीवन सुद्धा सुखमय व्हावे, याचा विचार करायला हवा. त्यांच्या लेखी तर वेळेचे दुहेरी महत्व आहे. म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचे उत्पादक मुल्य कसे वाढविता येईल, याकडे लक्ष देण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक मुस्लिमावर आहे.
    अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर पाच वेळेसची नमाज त्या-त्या नमाजच्या वेळेच्या बंधनात अदा करण्याची सक्ती केलेली आहे. जरा डोळसपणे पाहिल्यास, आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी नमाजच्या माध्यमातून उत्कृष्ट असे वेळेचे व्यवस्थापन करण्याची संधी अल्लाहने आपल्याला दिलेली आहे. रमजानच्या रोजांची अनिवार्यता सहर आणि इफ्तारीच्या वेळेसह प्रत्येक मुस्लिमांवर अनिवार्य करण्यात आलेली आहे. यातूनसुद्धा आपल्याला वेळेचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येईल. अनेक मुस्लिम स्वत:ला स्वतंत्र समजतात. कुठलेही वेळेचे बंधन पाळणे त्यांना जमत नाही. मनात आले तर नमाज अदा करतात, नाही आले तर करत नाहीत. मात्र त्यांना कळत नाही की, आखिरतच्या दिवशी प्रत्येक व्यक्तिला त्याला प्रदान करण्यात आलेल्या वेळेचा कसा उपयोग केला, याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. त्यातून कोणालाच सूट नाही. म्हणून आपल्याला वेळेचे महत्व ओळखायला हवे.
    सैतान माणसांच्या पाठिमागे लागलेला आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या मनावर ताबा मिळवून त्याला अल्लाहच्या निर्देशाविरूद्ध चालण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. जो व्यक्ती सैतानाच्या कचाट्यात सापडून अनुशासनहीन जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो, हे आपण सर्व जाणून आहोत. माणसांनी वेळेवर दिलेले काम पूर्ण केले तर त्याच्यावर तणाव येत नाही. नमाजी माणसाला वेळेत दिलेले काम पूर्ण करण्याची सवय जडते. त्याच्यामुळे त्याचे जीवन तणावविरहित होते.
    आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा दिलेले काम (टार्गेट) वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. नमाजचेच उदाहरण घ्या. अजान झाल्याबरोबर माणूस जर नमाजच्या तयारीला लागला तर वेळेवर नमाज अदा करू शकतो. तेच अजान झाल्यावरसुद्धा तो इकडे-तिकडे रमत राहिला आणि शेवटच्या दोन मिनिटात नमाज अदा करण्याचा प्रयत्न करू लागला तर ती अदा करण्यासाठी त्याला किती धावपळ करावी लागते व त्यातून कसा स्ट्रेस निर्माण होतो, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना आलेलाच असावा. वेळेत काम करण्याची सवय नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे माणसाचे आरोग्यसुद्धा प्रभावित होते.
    रिकाम्या वेळाची कुठलीच संकल्पना इस्लाममध्ये नाही. उदा. फन (एन्जॉयमेंट), रिकामटेकडेपणा याला इस्लाममध्ये थारा नाही. सुरे अलमनशराहमध्ये प्रेषित सल्ल. यांना निर्देश देण्यात आले आहे की, ’फ-इजा फरगता-फअनसब व-इला रब्बिका फऱगब’ (जेव्हा तुमच्याकडे फारीग म्हणजे मोकळा वेळ असेल तेव्हा अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यस्त होवून जा.) प्रेषित सल्ल. यांना जेव्हा एवढी सक्त ताकीद देण्यात आली तेव्हा आपली काय बिशात? म्हणून फावल्या वेळी फालताड मालिका, क्रिकेट वगैरे पाहण्याचा व वेळ वाया घालवण्याचा एक श्रद्धावंत मुस्लिम विचार सुद्धा करू शकत नाही. माणसाकडे जस-जसे नवीन उपकरण येत आहेत तसा-तसा तो अधिक व्यस्त होत आहे. म्हणून प्रत्येक श्रद्धावंत माणसाला आपल्या वेळेची समिक्षा करावी लागेल. त्याला विचार करावा लागेल की आपला वेळ कुठे जास्त चाललाय? झोपेत जास्त चाललाये? की टी.व्ही. पाहण्यामध्ये जास्त चाललाय? की सोशल मीडियावर जास्त चाललाय?
    एखाद्या माणसाचे पंचाहत्तर वर्षे आयुष्य गृहित धरले आणि तो सरासरी दररोज सात तास झोपत असेल असे गृहित धरले तर 22 वर्षे नुसती झोपण्यात जातात. जर कोणी सात तासापेक्षा जास्त झोपेत असेल तर त्याचे दोन नुकसान आहेत. एक तर त्या अतिरिक्त झोपेचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूसरा बहुमुल्य वेळ झोपण्यामध्ये जातो. कामाचे दहा तास जरी गृहित धरले तर तो 32 वर्षे सतत काम करत राहतो. तयार होण्यासाठी रोज 45 मिनिट जरी गृहित धरली तरी यात सव्वा दोन वर्षे निघून जातात. दैनंदिन जेवण वगैरे करण्यासाठी दीड तास गृहित धरला तरी तो साडे चार वर्षे व परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर 75 वर्षात तीन वर्षे तो वेळ खर्ची घालतो. मित्र परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर त्यातही तीन वर्षे निघून जातात.
    याशिवाय, उरलेला अन डिफाईन्ड जो वेळ असतो तो साधारणत: रोज तीन ते चार तास असतो. तर ह्या मोकळ्या वेळेचे योग्य नियोजन केले व त्याला उत्पादक मुल्य कसे मिळवून देता येईल याचा विचार केला तर वेळेचे व्यवस्थापन केले असे म्हणता येईल. जर हे व्यवस्थापन करता आले नाही तर त्या वेळेचा सदुपयोग करता येणार नाही व त्या काळात माणसाची उत्पादकता कमी होईल, हाच वेळ वाचवून जर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला तर तो माणूस समाजासाठी हिताचा होवून जाईल, त्याच्या हातून मोठ-मोठी चांगली कामे होतील.
    अल्लाहने आपल्यावर फर्ज (अनिवार्य)  काय-काय केले आहे, याला केंद्रस्थानी ठेवून आपण वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. याउलट आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या इतर कामांना केंद्रस्थानी ठेवून वेळ मिळाल्यास फर्ज गोष्टींकडे लक्ष देत असतात. हेच ते लोक आहेत ज्यांना अल्लाहच्या आदेशांची व वेळेच्या व्यवस्थापनाची पर्वा नाही.
    वेळेच्या बाबतीत चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट वेळ वाया घालविणे. दूसरी वेळ खर्ची घालणे, तीसरी वेळ वाचविणे, चौथी वेळेची गुंतवणूक करणे.         वेळ वाया घालविण्याचे सगळयात मोठे मार्ग टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहेत. आज अनेक व्यक्ति रिमोट हातात घेवून सारखे चैनल बदलत असतात. त्यांना कोणत्याच चॅनलवर समाधान मिळत नाही. अनेक लोक मोबाईल फोनवर अनावश्यक सामुग्री खात्री न करता इकडची तिकडे पाठवित असतात. त्यांची बोटं सारखी स्क्रीनवर चालत असतात. त्यांनाही कोणत्याच समाज माध्यमांवर समाधान मिळत नाही. अशा लोकांचा वेळ वाया जातो, मोठी कामे तर सोडा कधी-कधी स्वत:च्या घरगुती गरजांसुद्धा पूर्ण करण्यासाठी अशी माणसे कमी पडतात.
    दूसरी गोष्ट वेळ खर्ची घालणे, म्हणजे प्रत्येक माणसाला दरदिवशी चोवीस तास मिळत असतात. ते तास प्रत्येक माणूस कसा खर्ची घालतो, यावर प्रत्येक माणसाचे भविष्य अवलंबून असते. कोणतीही गोष्ट खर्च केल्याने संपून जाते. वेळ अमूल्य आहे. त्याला खर्च करतांना कोणत्या कारणासाठी आपण खर्च करीत आहोत, याची जाणीव जोपर्यंत प्रत्येकाला होणार नाही, तोपर्यंत रूपया जसा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो तसाच वेळ सुद्धा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो. वेळेला भांडवल समजून त्याची जर गुंतवणूक केली तर भविष्यात त्या गुंतवणुकीचा चांगला परतावा आपल्याला मिळू शकतो. याची जाणीव प्रत्येक श्रद्धावंत मुस्लिमांने ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर कोणी कुरआन समजून वाचण्यात वेळ खर्च करीत असेल तर नक्कीच त्याचा परतावा त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या रूपाने मिळेल. या उलट जर कोणी आपला वेळ हॉटेलमध्ये बेकारच्या गप्पा मारण्यात खर्च करत असेल तर त्याचा परतावा त्याला नकारात्मक रूपात मिळेल. रूपयांच्या गुंतवणुकीतून कधी-कधी नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, वेळेच्या गुंतवणुकीतून कधीच नुकसान होत नाही.
    शेवटची गोष्ट म्हणजे वेळ कसा वाचविता येईल, याचाही विचार करणे. म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय. याचे उदाहरण असे की, समजा आपल्याला कोणाला भेटणे आवश्यक आहे, तर अगोदर दूरध्वनी करून त्यांची वेळ मागून घेणे व नंतर वेळेवर त्यांना जाऊन भेटणे म्हणजे वेळ वाचविणे. या उलट भेटीची वेळ न मागता, ते आहेत का नाहीत याचीसुद्धा  खात्री न करता गेल्यास इच्छित व्यक्ति हजर नसल्यास अगर इतर कामात व्यस्त असल्यास आपला जो वेळ वाट पाहण्यात जातो तो व्यर्थ जातो. तसेच रात्री तासन्तास गप्पा मारण्यात काही लोकांना मोठा आनंद होतो. वास्तविक पाहता इशाच्या नमाजनंतर अत्यावश्यक असल्याशिवाय जागरण करण्याची परवानगी नाही. दहाच्या आसपास झोपल्यास फजरच्या नमाजला बरोबर जाग येते. परंतु, आपण पाहतो की अनेक लोक विनाकारण रात्री उशिरापर्यंत जागत असतात. विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की, लवकर झोपणारे आणि लवकर उठणारे लोकच स्वस्थ असतात. आजकाल रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. रात्रीतून जागरण केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. सुरूवातीच्या काही तासाची झोप शरिरासाठी अत्यंत पोषक असते. प्रेषित सल्ल. लवकर झोपून तिसऱ्या प्रहरी उठत होते. 
    अनेक लोक आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये तासनतास रमतात. आपण कसे होतो आणि कसे झालो. याचा विचार करीत राहतात. त्यात किती वेळ खर्ची जातो याचा त्यांना अंदाजच येत नाही. म्हणून आपण भूतकाळात जास्त रमू नये याची जाणीव निर्माण होणे व त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापनच होय.
    शेवटी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनामध्ये शिस्त असणे आवश्यक आहे. अनावश्यक सुस्ती आणि निष्काळजीपणामुळे माणसाचा वेळ वाया जातो. याशिवाय, वेळेचे व्यवस्थापन करण्यामध्ये योजनेचे फार महत्त्व आहे. कोणत्याही कामाची अगोदर योजना तयार करून नंतर ते काम करणे गरजेचे असते. कुठलीही योजना नसतांना काम सुरू केल्यास वेळ अनावश्यकरित्या खर्ची होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक माणसाने भौतिक तसेच आखिरतचे जीवन सफल व्हावे,  असे वाटत असेल तर त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

अबरार मोहसीन
शहराध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, लातूर

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘माझा दास आपल्या  ज्या कर्मांद्वारे माझी जवळीक प्राप्त करतो त्यांपैकी सर्वाधिक आवडती कर्मे ती आहेत ज्यांना मी त्याच्यावर अनिवार्य केले आहे  आणि माझा दास ऐच्छिक (नफील) नमाज अदा करून नेहमी माझ्या जवळ येत राहतो, इतकेच नव्हे तर मला तो आवडू लागतो  आणि जेव्हा तो मला प्रिय बनतो तेव्हा मी त्याचा कान बनतो ज्याद्वारे तो ऐकतो आणि त्याचा डोळा बनतो ज्याद्वारे तो पाहतो  आणि मी त्याचा हात बनतो ज्याद्वारे तो पकडतो आणि त्याचा पाय बनतो ज्याद्वारे तो चालतो.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : जो मनुष्य अल्लाहची जवळीकी प्राप्त करू इच्छितो तो सर्वप्रथम अल्लाहने अनिवार्य केलेल्या आदेशांची अंमलबजावणी  करण्याची काळजी घेतो. मग एवढे करून तो थांबत नाही तर तो स्वत:हून अल्लाहच्या प्रेमाच्या आधिक्यामुळे ऐच्छिक नमाज  (प्रार्थना) आणि ऐच्छिक रोजे (उपवास) आणि ऐच्छिक दान (सदका) आणि इतर पुण्याची कामे करीत राहतो; इतकेच नव्हे तर तो  अल्लाहचा प्रिय बनतो. याचा अर्थ असा की त्याच्या शरीराच्या व प्राणाच्या सर्व कुशलता व क्षमतांना अल्लाह आपल्या संरक्षणात व  देखरेखीत घेतो. आता त्याचे डोळे, कान, हात, पाय आणि त्याच्या सर्व कुशलता अल्लाहला प्रसन्न करू लागतात आणि शैतान त्याच्या कुशलतांना धक्का पोहोचवू शकत नाही. माननीय उम्मे सलमा (रजि.) यांच्या एके रात्री पैगंबर मुहम्मद (स.) झोपून उठले  आणि म्हणाले, ‘‘पवित्र आहे अल्लाहचे अस्तित्व, ही रात्र किती उपद्रवांनी व्यापलेली आहे, त्यांपासून वाचण्याची काळजी घेतली  पाहिजे आणि ही रात्र स्वत:मध्ये किती खजिने बाळगते, म्हणजे कृपेचे खजिने, ज्यांना समेटून घेतले पाहिजे. या पडद्यात  राहणाऱ्यांना (आपल्या पत्नींना) कोणी जागे करावे? अनेक लोक आहेत ज्यांचा दुर्गुण लपलेला आहे आणि परलोकात त्यांचा पडदा  बाजूला होईल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या पत्नींना ‘तहज्जुद’ (मध्यरात्रीनंतरच्या नमाज) करिता उठण्यास प्रोत्साहित करीत होते  आणि त्यांना म्हणत होते, ‘‘अल्लाहच्या कृपेचा खजिना समेटण्याची काळजी घ्या. जगात तुम्ही पैगंबराची पत्नी म्हणविल्या जाता  आणि तुम्हाला या पैलूने उच्च स्थान लाभलेले आहे, परंतु अनुसरण न केल्यास अल्लाहपाशी हे सर्व कामी येणार नाही, फक्त तुमचे  अनुसरणच कामी येईल. पैगंबराची पत्नी होणे तेथे काहीही उपयोगी पडणार नाही.’’
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) एके रत्री ‘तहज्जुद’ (मध्यरात्रीनंतरच्या नमाज) च्या वेळी आमच्या  घरी आले आणि मला आणि फातिमा (रजि.) यांना म्हणाले, ‘‘तुम्ही दोघे ‘तहज्जुद’ची नमाज अदा करीत नाही?’’ (हदीस : बुखारी,  मुस्लिम)
स्पष्टीकरण : या हदीसवरून विशिष्ट बोध असा होतो की जबाबदार व वरिष्ठ लोकांनी आपल्या हाताखालच्या लोकांना  ‘तहज्जुद’बाबत प्रोत्साहित करावे. माननीय अब्दुल्लाह (रजि.) (अमर बिन अल-आस यांचे पुत्र) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी सांगितले, ‘‘हे अब्दुल्लाह! तुम्ही त्या मनुष्यासारखे बनू नका जो ‘तहज्जुद’ची नमाज अदा करण्यासाठी उठत होता आणि  मग त्याने उठणे सोडून दिले.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय मसरूक (रह.) (ताबई) यांच्या कथनानुसार, मी माननीय आएशा (रजि.) यांना विचारले, ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) यांना कोणत्या प्रकारचे अनुसरण अधिक पसंत होते?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘न चुकता केले जाणारे काम पैगंबरांना अधिक पसंत होते.’’ मी विचारले, ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) रात्री कोणत्या वेळी (तहज्जुदकरिता) उठत होते?’’ माननीय आएशा (रजि.) यांनी उत्तर दिले,  ‘‘पैगंबर कोंबडा आरवण्याच्या वेळी उठत होते.’’ (म्हणजे रात्रीच्या अंतिम कालखंडात.) (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जेव्हा रात्रीचा एकतृतीयांश भाग उरतो  तेव्हा अल्लाह या दृष्टीस पडणाऱ्या आकाशावर येतो आणि भक्तांना बोलवितो, म्हणतो, ‘‘कोण मला बोलवित आहे की त्याच्या  मदतीकरिता धावत येऊ? कोण मला मागतो की त्याला देऊ? कोण माझी क्षमायाचना करतो की त्याला क्षमा करू?’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

    माननीय नवास बिन समआन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी कुरआन आणि कुरआनवर ईमान बाळगणारे जे त्याचे अनुसरण करीत होते अल्लाहपाशी आणले जातील आणि सूरह बकरा व सूरह आलिइमरान संपूर्ण कुरआनचे नेतृत्व करत आपले अनुसरण करणाऱ्यांसाठी अल्लाहपाशी शिफारस करतील की हा मनुष्य आपली कृपा व मोक्षाचा हक्कदार आहे म्हणून त्याच्यावर कृपावर्षाव व्हावा.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय उबैदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे कुरआनवर ईमान बाळगणाऱ्यांनो! कुरआनला लोड बनवू नका आणि रात्री व दिवसा त्याचे योग्य प्रकारे पठण करा आणि त्याच्या पठण व शिक्षणास प्रथा बनवा आणि त्याच्या शब्दांचे योग्य पद्धतीने वाचन करावे आणि जे काही कुरआनात सांगितले आहे उपदेश प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्यावर लक्षपूर्वक विचार करावा जेणेकरून तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी. आणि त्याद्वारे जागतिक परिणामाची इच्छा न बाळगता अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी त्याचे पठण करा.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : कुरआनला लोड न बनविणे म्हणजे त्यापासून गाफील राहू नये आणि शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की कुरआनचे ज्ञान प्राप्त करून त्यास जागतिक प्रतिष्ठा व ऐशोआराम आणि धनसंपत्ती प्राप्त करण्याचे साधन बनवू नये. जसे एका हदीसमध्ये सूचना करण्यात आली आहे की काही लोक कुरआनचे ज्ञान प्राप्त करून त्यास भौतिक संपत्ती प्राप्त करण्याचे साधन बनवितील.
    माननीय अबू ़जर गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो. मी म्हणालो, ‘‘काही उपदेश करावा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहच्या संयमाचा अवलंब करा. ही गोष्ट तुमच्या संपूर्ण ‘दीन’ व सर्व व्यवहारांना योग्य स्थितीत ठेवणारी आहे.’’ मी म्हणालो, ‘‘आणखी काही सांगावे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘स्वत:ला कुरआनचे पठण आणि अल्लाहची भक्ती व महिमागान निरंतर करीत राहा तेव्हा अल्लाह तुमची आकाशात आठवण करील आणि जीवनातील अंधकारात तुमच्यासाठी प्रकाशाचे काम करील.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘अल्लाह आठवण करील’चा अर्थ आहे की अल्लाह तुम्हाला विसरणार नाही. तुम्हाला आपल्या संरक्षणात ठेवील. अल्लाहचे महिमागान आणि कुरआनच्या पठणाने मोमिनला प्रकाश मिळतो. जीवनातील अंधकारांत मोमिन योग्य मार्ग प्राप्त करतो.
    माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जसा लोखंडाला पाण्यामुळे गंज चढतो तसा हृदयालादेखील गंज चढतो.’’ विचारण्यात आले, ‘‘कोणत्या गोष्टीमुळे हृदयाचा गंज नष्ट केला जाऊ शकतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हृदयाचा गंज अशाप्रकारे नष्ट केला जाऊ शकतो की मनुष्याने मृत्यूची खूप आठवण करावी आणि दुसरे असे की कुरआनचे पठण करावे.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘मृत्यूची आठवण करणे’ म्हणजे मनुष्याचे याचा विचार करावा की जीवनाची अवधी फक्त एकच अवधी आहे. दुसऱ्यांदा अंमलबजावणी करण्यासाठी अवधी मिळणार नाही. ‘तिलावत’ (कुरआन पठण करणे) म्हणजे कुरआनच्या शब्दांचे योग्य पद्धतीने वाचन करणे आणि त्यात जे काही सांगितले आहे ते समजून घेणे आणि त्याचे अनुसरण करणे. पवित्र कुरआन आणि अहादीसमध्ये ज्या ज्या ठिकाणी या शब्दाचा पूर्ण अर्थ सांगितला गेला आहे तेथे हेच सांगितले आहे. तसेच आणखी एकेठिकाणी असा अर्थ सांगितला आहे की कुरआनचा प्रचार करा, त्यास दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा.
ऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज
    माननीय अबू ज़र गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘जो मनुष्य माझ्याकडे वीतभर येतो मी त्याच्याकडे हातभर जातो आणि जो माझ्याकडे हातभर सरसावतो मी त्याच्याकडे दोन हात सरसावतो आणि जो माझ्याकडे पायी चालत येतो मी त्याच्याकडे धावत येतो.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : जो मनुष्य आपली आकांक्षा व सामथ्र्याने अल्लाहच्या मार्गावर चालण्याची इच्छा बाळगतो तेव्हा अल्लाह त्याचा तो प्रवास सुलभ करतो. अल्लाहचा दास त्याच्याकडे सरसावतो तेव्हा त्याच्यात दुर्बलता असल्यामुळे अल्लाह त्याच्यावर दया करतो आणि पुढे येऊन त्याला आपल्या जवळ करतो; जसे एखादे बाळ आपल्या पित्याकडे सरसावतो परंतु आपल्या दुर्बलतेमुळे पोहोचू शकत नाही तेव्हा त्याचा पिता त्याच्याकडे धावून येतो आणि त्याला कडेवर घेतो आणि आपल्या कुशीत घेतो.

    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो मनुष्य ज्याला अल्लाहने मोठे आयुष्य प्रदान केले, इतकेच काय तो ६० वर्षांच्या वयापर्यंत पोहोचला (आणि तरीही तो सदाचारी बनू शकला नाही) तेव्हा अल्लाहपाशी त्या मनुष्याकडे काही बोलायला बाकी उरणार नाही.’’ (हदीस : बुखारी)
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले, ‘‘अल्लाहपासून पूर्णत: लज्जित व्हा.’’ आम्ही विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अल्लाहची कृपा आहे की आम्ही अल्लाहपासून लज्जित होतो.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहशी लज्जित होण्याचा अर्थ एवढाच नसून अल्लाहपासून पूर्णत: लज्जित होण्याचा अर्थ आहे की तू आपले मष्तिष्क आणि मष्तिष्कात येणाऱ्या विचारांवर देखरेख ठेवावी आणि पोटात जाणाऱ्या अन्नाची देखरेख करीत राहावे आणि मृत्यूच्या परिणामस्वरूप सडण्याची व नष्ट होण्याची आठवण ठेवावी.’’ (त्यानंतर पैगंबर म्हणाले,) ‘‘आणि जो मनुष्य परलोकाला पसंत करणारा असेल तो जगातील सजावट व शृंगार सोडून देतो आणि प्रत्येक क्षणी परलोकाला जगाऐवजी प्राधान्य देतो, तोच मनुष्य खऱ्या अर्थाने अल्लाहपासून लज्जित होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
    माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! मला अत्यल्प व परिपूर्ण उपदेश करावा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जेव्हा तुम्ही आपली नमाज अदा करण्यासाठी उभे राहाल तेव्हा त्या मनुष्यासारखी नमाज अदा करा जो जग सोडून जाणार आहे आणि आपल्या तोंडाने असे शब्द बोला जर अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याचा हिशोब घेण्यात आला तर तुमच्यापाशी काही सांगण्यास उरणार नाही आणि लोकांजवळ जी काही संपत्ती व मालमत्ता आहे त्यापासून तुम्ही पूर्णत: बेपर्वा राहा.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जो मनुष्य या जगातून जात असेल आणि तो जीवंत राहू शकणार नाही याची त्याला खात्री पटली असेल तो मनुष्य अतिशय नम्रपणे नमाज अदा करील. त्याचे लक्ष पूर्णत: अल्लाहकडे असेल आणि नमाज अदा करताना जगाच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये त्याचे मन भटकत राहणार नाही.
    मनुष्याचे बोलणे जर सत्याविरूद्ध असेल आणि मनुष्याने आपल्या या जगातील जीवनात त्याबद्दल क्षमा मागितली नाही तर हिशोबाच्या वेळी त्याच्याजवळ काही बोलण्यास आणि विवशता सादर करण्यास काहीही उरणार नाही हे उघड आहे. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की लोकांची धनसंपत्तीच्या आधिक्क्यावर ईष्र्या करू नका कारण ती संपुष्टात येणार आहे. जोपर्यंत जगाबद्दल मनुष्यामध्ये निस्पृहता निर्माण होत नाही तोपर्यंत परलोकाच्या शिखरांपर्यंत त्याची दृष्टी जाऊ शकत नाही.
    माननीय अबू बऱजा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी मनुष्याकडून जोपर्यंत पाच गोष्टीचा हिशोब घेतला जात नाही तोपर्यंत तो अल्लाहच्या न्यायालयातून बाहेर पडू शकणार नाही. त्याला विचारले जाईल की आयुष्य कोणत्या गोष्टींमध्ये व्यतीत केले? ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले असेल तर त्याचे किती प्रमाणात अनुसरण केले? धन कोठून कमविले? आणि कोठे खर्च केले? शरीराला कोणत्या कामात झिजविले? (हदीस : तिर्मिजी)
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या प्रवाशाला आपण वाटेतच राहू आणि निश्चितस्थळी वेळेवर पोहोचू शकणार नाही याचे भय वाटत असेल, तो रात्री न झोपता रात्रीच्या सुरूवातीलाच आपला प्रवास सुरू करतो. असे करणारा निश्चितस्थळी वेळेवर सुखरूप पोहोचतो. ऐका! अल्लाहची संपत्ती मोठ्या प्रमाणात लाभेल. ऐका! अल्लाहचा माल नंदनवन (जन्नत) आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : आपल्या मूळ हकीगतीच्या दृष्टिकोनातून मानव प्रवासी आहे आणि परलोक त्याची खरी मातृभूमी आहे, येथे तो कमाई करण्यासाठी आला आहे. आता ज्यांना आपली खरी मातृभूमी आठवते, ते जर सुखरूपपणे आपल्या मातृभूमीस पोहोचू इच्छित असतील आणि मार्गातील अडथळे पार करून पोहोचले तर त्यांनी बेपर्वा न राहता आपला प्रवास सुरू करावा अन्यथा जर ते झोपत राहिले तर त्यांना पश्चात्ताप होईल. मग ज्याने अल्लाहची प्रसन्नता व बक्षिसाचे घर ‘जन्नत’ प्राप्त करण्याचे निश्चित केले असेल तर त्याला ज्ञात असावे की तो व्यापाऱ्याने फेकून दिलेला माल जो क्षुल्लक किमतीला विकला असावा आणि एखाद्याने तो घ्यावा. अल्लाहचा माल प्राप्त करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागेल. तो माल प्राप्त करण्यासाठी आपल्या काळ व मालाचे, शरीर व प्राणाचे बलिदान द्यावे लागेल. तेव्हाच ती गोष्ट प्राप्त होईल जी मिळाल्यामुळे मनुष्य आपला सर्व प्रकारचा त्रास विसरून जाईल.

माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी तुला अगोदर कब्रस्तानात येण्यापासून रोखले  होते (जेणेकरून एकेश्वरत्वाची धर्मनिष्ठा पूर्णत: हृदयात सामावली जावी.) आता तू दृढत्वाचा अवलंब कर.’’ मुस्लिमच्या दुसऱ्या हदीसमध्ये म्हटले आहे, ‘‘आता तू हवे तर जा कारण कबरी पारलौकिक जीवनाच्या स्मृती जागृत करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, जे लोक कब्रस्तानात जातात त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘तेथे पोहोचून  म्हणा की ‘अस्सलामु अलैकुम...’ (अर्थात) तुम्हाला शांतता लाभो, हे वस्तीतील ईशपरायण आज्ञाधारकांनो! आम्हीदेखील अल्लाहने  इच्छिले तर तुम्हाला भेटणार आहोत, आम्ही स्वत:साठी आणि तुमच्यासाठी अल्लाहच्या शिक्षा व क्रोधापासून वाचण्याची प्रार्थना  करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा त्यांना यमनचे न्यायाधीश अथवा गव्हर्नर  बनवून पाठविले तेव्हा म्हणाले, ‘‘हे मुआ़ज! स्वत:ला विलासीपणापासून अलिप्त ठेवा कारण अल्लाहचे दास विलासी नसतात.’’  (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तुम्ही एका मोठ्या पदावर जात आहात. तेथे जीवनाच्या स्वादापासून लाभ घेण्याची आणि हात साफ करण्याची खूप  संधी मिळू शकते. परंतु तुम्ही जगाच्या प्रेमात अडकू नका आणि जगाला पसंत करणाऱ्या शासकांसारखा स्वत:चा स्वभाव  बनवू नका कारण तो अल्लाहच्या दासत्वाशी मेळ खात नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना सांगितले, ‘‘माझ्या  जनसमुदायावर ती वेळ येणार आहे जेव्हा दुसरे जनसमुदाय त्याच्यावर अशाप्रकारे तुटून पडतील जसे खाणारे लोक वाढलेल्या  अन्नावर तुटून पडतात.’’ मग एका विचारणाऱ्याने म्हटले, ‘‘ज्या कालखंडाचे आपण वक्तव्य करीत आहात त्या काळात आम्ही  मुस्लिम लोक इतक्या कमी संख्येत असू की आम्हाला गिळंकृत करण्यासाठी इतर जनसमुदाय एकत्रितपणे तुटून पडतील?’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही, त्या काळात तुमची संख्या कमी असणार नाही तर तुमची संख्या मोठी असेल, परंतु तुम्ही महापुरातील लाटेसारखे  व्हाल आणि तुमच्या शत्रूंच्या उरातील तुमची भीती नष्ट होईल आणि तुमच्या हृदयात भित्रेपणा घर करील.’’ मग एका मनुष्याने  विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हा भित्रेपणा कोणत्या कारणामुळे येईल?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे कारण असे असेल की तुम्ही (परलोकावर प्रेम करण्याऐवजी) जगावर प्रेम करू लागाल आणि (अल्लाहच्या मार्गात प्राण देण्याच्या इच्छेऐवजी) मृत्यूपासून पळ  काढू आणि द्वेष करू लागाल.’’ (हदीस : अबू दाऊद)
माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगावर प्रेम करणारा मनुष्य आपले  पारलौकिक जीवन उद्ध्वस्त करील आणि पारलौकिक जीवनावर प्रेम करणारा मनुष्य या जगातील आपल्या जीवनाचे नुकसान करून  घेईल. हे लोकहो! तुम्ही मागे उरणाऱ्या जीवनाला नष्ट होणाऱ्या जीवनावर प्राधान्य द्या.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : हे जग आणि परलोक यापैकी एकाची निवड करणे आवश्यक आहे. एकतर जगाला आपले ध्येय बनवा अथवा  परलोकाला. जर जगाला आपला आपले ध्येय निश्चित करीत असाल तर पारलौकिक सुख व खुशी लाभणार नाही आणि परलोकाला
आपले ध्येय बनविले तर त्याच्या परिणामस्वरूप कदाचित तुमचे जग नष्ट होऊ शकते, परंतु त्याच्या बदल्यात पारलौकिक बक्षीस  मिळेल जे निरंतर राहणारे आहे. जी गोष्ट परलोकाच्या मार्गावर चालण्याने नष्ट होईल ती समाप्त होणारी आहे आणि जीवनदेखील  नष्ट होणारे आहे. या नष्ट होणाऱ्या गोष्टीचे बलिदान देण्याने जर निरंतर राहणारे बक्षीस मिळाले तर हा तोट्याचा सौदा नाही,  पुरेपूर नफ्याचा सौदा आहे. माननीय शद्दाद बिन औस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरा  विद्वान तो आहे ज्याने आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवले आणि मृत्यूनंतर येणारे जीवन अलंकृत करू लागला. मूर्ख तो आहे ज्याने  स्वत:ला वासनेच्या अवैध इच्छांच्या मागे लावले आणि अल्लाहकडून चुकीची अपेक्षा बाळगली.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : म्हणजे सत्याला सोडून आपल्या मनाचे म्हणणे ऐकतो आणि अपेक्षा करतो की अल्लाह त्याला नंदनवनात  (जन्नतमध्ये) स्थान देईल. अशाप्रकारच्या चुकीच्या आकांक्षांमध्ये कुरआन अवतरणकाळातील ज्यू आणि खिस्ती पडलेले होते आणि  आज आमचे अनेक मुस्लिम बंधुदेखील अशाच चुकीच्या आकांक्षांवर जीवन व्यतीत करीत आहेत.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget