Latest Post

वेळेचे व्यवस्थापन म्हणजे जीवनाचे व्यवस्थापन. ज्याला हे जमले तो यशस्वी आणि ज्याला हे जमले नाही तो अयशस्वी! प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी अनेकवेळेस मार्गदर्शन केलेले आहे.
    प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टींपूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा. (तिर्मिजी)
    या पाचही निर्देशांमध्ये वेळेचे महत्व अधोरेखित केलेले आहे. साधारणपणे तारूण्य हे मनोरंजनासारख्या निरूपयोगी गोष्टींमध्ये तरूण वाया घालवतात. वास्तविकपणे तारूण्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा उपयोग वेळेवर केल्यास अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. ज्या की, प्रयत्न करूनही वृद्ध झाल्यानंतर करता येत नाहीत. व्यस्त होण्यापूर्वी जो रिकामा वेळ माणसाकडे असतो त्या वेळेच्या एकेका क्षणाचा उपयोग करण्याकडे माणसाचा कल असायला हवा. याची जाणीव ज्यांना असते तेच मोठमोठे कार्य करू शकतात. ज्यांना याची जाणीव नसते ते लोक आयुष्यात फार काही करू शकत नाहीत.
    एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे -1.जीवन कुठे व्यतीत केले? 2. तारूण्य कुठे खर्चि घातले? 3. संपत्ती कोठून मिळविली? 4. संपत्ती कोठे खर्च केली? 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला?
    यात पहिले दोन प्रश्न वेळेच्या व्यवस्थापनासंबंधीचेच आहेत. जीवन कुठे व्यतीत केले? त्यातही तारूण कुठे खर्ची घातले? हे दोन प्रश्न असे आहेत की, वेळेचे कुशल व्यवस्थापन करू शकणाऱ्या इसमालाच या प्रश्नाची नीट उत्तरे देता येतील. अन्यथा या प्रश्नाची उत्तरे देणेच शक्य नाही. खरे तर ही हदीस आय ओपनिंग (डोळे उघडणारी) हदीस आहे. या हदीसला नीट समजून घेतल्यानंतर कोणताही सश्रद्ध मुस्लिम वेळेचा अपव्यय करण्याचे धाडस करणार नाही.
    प्रेषित सल्ल. यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांचे प्रेषित्वाच्या आधीचे जीवन असो का प्रेषित्व मिळाल्यानंतरचे जीवन असो. दोन्हीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना मिळालेल्या वेळेच्या एकेका क्षणाचा सदुपयोग केलेला आहे. म्हणूनच कमी अवधीमध्ये इस्लामची सत्यता ते लाखो लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये यशस्वी झाले.
    आजच्या आधुनिक जगामध्ये वेळेला प्रोडक्टीव्ह (उत्पादक) करण्याकडे सर्वांचा कल असतो. मुस्लिमांनी तर जगातच नव्हे तर मृत्यूनंतरचे जीवन सुद्धा सुखमय व्हावे, याचा विचार करायला हवा. त्यांच्या लेखी तर वेळेचे दुहेरी महत्व आहे. म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचे उत्पादक मुल्य कसे वाढविता येईल, याकडे लक्ष देण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक मुस्लिमावर आहे.
    अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर पाच वेळेसची नमाज त्या-त्या नमाजच्या वेळेच्या बंधनात अदा करण्याची सक्ती केलेली आहे. जरा डोळसपणे पाहिल्यास, आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी नमाजच्या माध्यमातून उत्कृष्ट असे वेळेचे व्यवस्थापन करण्याची संधी अल्लाहने आपल्याला दिलेली आहे. रमजानच्या रोजांची अनिवार्यता सहर आणि इफ्तारीच्या वेळेसह प्रत्येक मुस्लिमांवर अनिवार्य करण्यात आलेली आहे. यातूनसुद्धा आपल्याला वेळेचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येईल. अनेक मुस्लिम स्वत:ला स्वतंत्र समजतात. कुठलेही वेळेचे बंधन पाळणे त्यांना जमत नाही. मनात आले तर नमाज अदा करतात, नाही आले तर करत नाहीत. मात्र त्यांना कळत नाही की, आखिरतच्या दिवशी प्रत्येक व्यक्तिला त्याला प्रदान करण्यात आलेल्या वेळेचा कसा उपयोग केला, याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. त्यातून कोणालाच सूट नाही. म्हणून आपल्याला वेळेचे महत्व ओळखायला हवे.
    सैतान माणसांच्या पाठिमागे लागलेला आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या मनावर ताबा मिळवून त्याला अल्लाहच्या निर्देशाविरूद्ध चालण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. जो व्यक्ती सैतानाच्या कचाट्यात सापडून अनुशासनहीन जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो, हे आपण सर्व जाणून आहोत. माणसांनी वेळेवर दिलेले काम पूर्ण केले तर त्याच्यावर तणाव येत नाही. नमाजी माणसाला वेळेत दिलेले काम पूर्ण करण्याची सवय जडते. त्याच्यामुळे त्याचे जीवन तणावविरहित होते.
    आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा दिलेले काम (टार्गेट) वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. नमाजचेच उदाहरण घ्या. अजान झाल्याबरोबर माणूस जर नमाजच्या तयारीला लागला तर वेळेवर नमाज अदा करू शकतो. तेच अजान झाल्यावरसुद्धा तो इकडे-तिकडे रमत राहिला आणि शेवटच्या दोन मिनिटात नमाज अदा करण्याचा प्रयत्न करू लागला तर ती अदा करण्यासाठी त्याला किती धावपळ करावी लागते व त्यातून कसा स्ट्रेस निर्माण होतो, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना आलेलाच असावा. वेळेत काम करण्याची सवय नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे माणसाचे आरोग्यसुद्धा प्रभावित होते.
    रिकाम्या वेळाची कुठलीच संकल्पना इस्लाममध्ये नाही. उदा. फन (एन्जॉयमेंट), रिकामटेकडेपणा याला इस्लाममध्ये थारा नाही. सुरे अलमनशराहमध्ये प्रेषित सल्ल. यांना निर्देश देण्यात आले आहे की, ’फ-इजा फरगता-फअनसब व-इला रब्बिका फऱगब’ (जेव्हा तुमच्याकडे फारीग म्हणजे मोकळा वेळ असेल तेव्हा अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यस्त होवून जा.) प्रेषित सल्ल. यांना जेव्हा एवढी सक्त ताकीद देण्यात आली तेव्हा आपली काय बिशात? म्हणून फावल्या वेळी फालताड मालिका, क्रिकेट वगैरे पाहण्याचा व वेळ वाया घालवण्याचा एक श्रद्धावंत मुस्लिम विचार सुद्धा करू शकत नाही. माणसाकडे जस-जसे नवीन उपकरण येत आहेत तसा-तसा तो अधिक व्यस्त होत आहे. म्हणून प्रत्येक श्रद्धावंत माणसाला आपल्या वेळेची समिक्षा करावी लागेल. त्याला विचार करावा लागेल की आपला वेळ कुठे जास्त चाललाय? झोपेत जास्त चाललाये? की टी.व्ही. पाहण्यामध्ये जास्त चाललाय? की सोशल मीडियावर जास्त चाललाय?
    एखाद्या माणसाचे पंचाहत्तर वर्षे आयुष्य गृहित धरले आणि तो सरासरी दररोज सात तास झोपत असेल असे गृहित धरले तर 22 वर्षे नुसती झोपण्यात जातात. जर कोणी सात तासापेक्षा जास्त झोपेत असेल तर त्याचे दोन नुकसान आहेत. एक तर त्या अतिरिक्त झोपेचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूसरा बहुमुल्य वेळ झोपण्यामध्ये जातो. कामाचे दहा तास जरी गृहित धरले तर तो 32 वर्षे सतत काम करत राहतो. तयार होण्यासाठी रोज 45 मिनिट जरी गृहित धरली तरी यात सव्वा दोन वर्षे निघून जातात. दैनंदिन जेवण वगैरे करण्यासाठी दीड तास गृहित धरला तरी तो साडे चार वर्षे व परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर 75 वर्षात तीन वर्षे तो वेळ खर्ची घालतो. मित्र परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर त्यातही तीन वर्षे निघून जातात.
    याशिवाय, उरलेला अन डिफाईन्ड जो वेळ असतो तो साधारणत: रोज तीन ते चार तास असतो. तर ह्या मोकळ्या वेळेचे योग्य नियोजन केले व त्याला उत्पादक मुल्य कसे मिळवून देता येईल याचा विचार केला तर वेळेचे व्यवस्थापन केले असे म्हणता येईल. जर हे व्यवस्थापन करता आले नाही तर त्या वेळेचा सदुपयोग करता येणार नाही व त्या काळात माणसाची उत्पादकता कमी होईल, हाच वेळ वाचवून जर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला तर तो माणूस समाजासाठी हिताचा होवून जाईल, त्याच्या हातून मोठ-मोठी चांगली कामे होतील.
    अल्लाहने आपल्यावर फर्ज (अनिवार्य)  काय-काय केले आहे, याला केंद्रस्थानी ठेवून आपण वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. याउलट आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या इतर कामांना केंद्रस्थानी ठेवून वेळ मिळाल्यास फर्ज गोष्टींकडे लक्ष देत असतात. हेच ते लोक आहेत ज्यांना अल्लाहच्या आदेशांची व वेळेच्या व्यवस्थापनाची पर्वा नाही.
    वेळेच्या बाबतीत चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट वेळ वाया घालविणे. दूसरी वेळ खर्ची घालणे, तीसरी वेळ वाचविणे, चौथी वेळेची गुंतवणूक करणे.         वेळ वाया घालविण्याचे सगळयात मोठे मार्ग टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहेत. आज अनेक व्यक्ति रिमोट हातात घेवून सारखे चैनल बदलत असतात. त्यांना कोणत्याच चॅनलवर समाधान मिळत नाही. अनेक लोक मोबाईल फोनवर अनावश्यक सामुग्री खात्री न करता इकडची तिकडे पाठवित असतात. त्यांची बोटं सारखी स्क्रीनवर चालत असतात. त्यांनाही कोणत्याच समाज माध्यमांवर समाधान मिळत नाही. अशा लोकांचा वेळ वाया जातो, मोठी कामे तर सोडा कधी-कधी स्वत:च्या घरगुती गरजांसुद्धा पूर्ण करण्यासाठी अशी माणसे कमी पडतात.
    दूसरी गोष्ट वेळ खर्ची घालणे, म्हणजे प्रत्येक माणसाला दरदिवशी चोवीस तास मिळत असतात. ते तास प्रत्येक माणूस कसा खर्ची घालतो, यावर प्रत्येक माणसाचे भविष्य अवलंबून असते. कोणतीही गोष्ट खर्च केल्याने संपून जाते. वेळ अमूल्य आहे. त्याला खर्च करतांना कोणत्या कारणासाठी आपण खर्च करीत आहोत, याची जाणीव जोपर्यंत प्रत्येकाला होणार नाही, तोपर्यंत रूपया जसा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो तसाच वेळ सुद्धा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो. वेळेला भांडवल समजून त्याची जर गुंतवणूक केली तर भविष्यात त्या गुंतवणुकीचा चांगला परतावा आपल्याला मिळू शकतो. याची जाणीव प्रत्येक श्रद्धावंत मुस्लिमांने ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर कोणी कुरआन समजून वाचण्यात वेळ खर्च करीत असेल तर नक्कीच त्याचा परतावा त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या रूपाने मिळेल. या उलट जर कोणी आपला वेळ हॉटेलमध्ये बेकारच्या गप्पा मारण्यात खर्च करत असेल तर त्याचा परतावा त्याला नकारात्मक रूपात मिळेल. रूपयांच्या गुंतवणुकीतून कधी-कधी नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, वेळेच्या गुंतवणुकीतून कधीच नुकसान होत नाही.
    शेवटची गोष्ट म्हणजे वेळ कसा वाचविता येईल, याचाही विचार करणे. म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय. याचे उदाहरण असे की, समजा आपल्याला कोणाला भेटणे आवश्यक आहे, तर अगोदर दूरध्वनी करून त्यांची वेळ मागून घेणे व नंतर वेळेवर त्यांना जाऊन भेटणे म्हणजे वेळ वाचविणे. या उलट भेटीची वेळ न मागता, ते आहेत का नाहीत याचीसुद्धा  खात्री न करता गेल्यास इच्छित व्यक्ति हजर नसल्यास अगर इतर कामात व्यस्त असल्यास आपला जो वेळ वाट पाहण्यात जातो तो व्यर्थ जातो. तसेच रात्री तासन्तास गप्पा मारण्यात काही लोकांना मोठा आनंद होतो. वास्तविक पाहता इशाच्या नमाजनंतर अत्यावश्यक असल्याशिवाय जागरण करण्याची परवानगी नाही. दहाच्या आसपास झोपल्यास फजरच्या नमाजला बरोबर जाग येते. परंतु, आपण पाहतो की अनेक लोक विनाकारण रात्री उशिरापर्यंत जागत असतात. विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की, लवकर झोपणारे आणि लवकर उठणारे लोकच स्वस्थ असतात. आजकाल रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. रात्रीतून जागरण केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. सुरूवातीच्या काही तासाची झोप शरिरासाठी अत्यंत पोषक असते. प्रेषित सल्ल. लवकर झोपून तिसऱ्या प्रहरी उठत होते. 
    अनेक लोक आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये तासनतास रमतात. आपण कसे होतो आणि कसे झालो. याचा विचार करीत राहतात. त्यात किती वेळ खर्ची जातो याचा त्यांना अंदाजच येत नाही. म्हणून आपण भूतकाळात जास्त रमू नये याची जाणीव निर्माण होणे व त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापनच होय.
    शेवटी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनामध्ये शिस्त असणे आवश्यक आहे. अनावश्यक सुस्ती आणि निष्काळजीपणामुळे माणसाचा वेळ वाया जातो. याशिवाय, वेळेचे व्यवस्थापन करण्यामध्ये योजनेचे फार महत्त्व आहे. कोणत्याही कामाची अगोदर योजना तयार करून नंतर ते काम करणे गरजेचे असते. कुठलीही योजना नसतांना काम सुरू केल्यास वेळ अनावश्यकरित्या खर्ची होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक माणसाने भौतिक तसेच आखिरतचे जीवन सफल व्हावे,  असे वाटत असेल तर त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

अबरार मोहसीन
शहराध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, लातूर

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘माझा दास आपल्या  ज्या कर्मांद्वारे माझी जवळीक प्राप्त करतो त्यांपैकी सर्वाधिक आवडती कर्मे ती आहेत ज्यांना मी त्याच्यावर अनिवार्य केले आहे  आणि माझा दास ऐच्छिक (नफील) नमाज अदा करून नेहमी माझ्या जवळ येत राहतो, इतकेच नव्हे तर मला तो आवडू लागतो  आणि जेव्हा तो मला प्रिय बनतो तेव्हा मी त्याचा कान बनतो ज्याद्वारे तो ऐकतो आणि त्याचा डोळा बनतो ज्याद्वारे तो पाहतो  आणि मी त्याचा हात बनतो ज्याद्वारे तो पकडतो आणि त्याचा पाय बनतो ज्याद्वारे तो चालतो.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : जो मनुष्य अल्लाहची जवळीकी प्राप्त करू इच्छितो तो सर्वप्रथम अल्लाहने अनिवार्य केलेल्या आदेशांची अंमलबजावणी  करण्याची काळजी घेतो. मग एवढे करून तो थांबत नाही तर तो स्वत:हून अल्लाहच्या प्रेमाच्या आधिक्यामुळे ऐच्छिक नमाज  (प्रार्थना) आणि ऐच्छिक रोजे (उपवास) आणि ऐच्छिक दान (सदका) आणि इतर पुण्याची कामे करीत राहतो; इतकेच नव्हे तर तो  अल्लाहचा प्रिय बनतो. याचा अर्थ असा की त्याच्या शरीराच्या व प्राणाच्या सर्व कुशलता व क्षमतांना अल्लाह आपल्या संरक्षणात व  देखरेखीत घेतो. आता त्याचे डोळे, कान, हात, पाय आणि त्याच्या सर्व कुशलता अल्लाहला प्रसन्न करू लागतात आणि शैतान त्याच्या कुशलतांना धक्का पोहोचवू शकत नाही. माननीय उम्मे सलमा (रजि.) यांच्या एके रात्री पैगंबर मुहम्मद (स.) झोपून उठले  आणि म्हणाले, ‘‘पवित्र आहे अल्लाहचे अस्तित्व, ही रात्र किती उपद्रवांनी व्यापलेली आहे, त्यांपासून वाचण्याची काळजी घेतली  पाहिजे आणि ही रात्र स्वत:मध्ये किती खजिने बाळगते, म्हणजे कृपेचे खजिने, ज्यांना समेटून घेतले पाहिजे. या पडद्यात  राहणाऱ्यांना (आपल्या पत्नींना) कोणी जागे करावे? अनेक लोक आहेत ज्यांचा दुर्गुण लपलेला आहे आणि परलोकात त्यांचा पडदा  बाजूला होईल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या पत्नींना ‘तहज्जुद’ (मध्यरात्रीनंतरच्या नमाज) करिता उठण्यास प्रोत्साहित करीत होते  आणि त्यांना म्हणत होते, ‘‘अल्लाहच्या कृपेचा खजिना समेटण्याची काळजी घ्या. जगात तुम्ही पैगंबराची पत्नी म्हणविल्या जाता  आणि तुम्हाला या पैलूने उच्च स्थान लाभलेले आहे, परंतु अनुसरण न केल्यास अल्लाहपाशी हे सर्व कामी येणार नाही, फक्त तुमचे  अनुसरणच कामी येईल. पैगंबराची पत्नी होणे तेथे काहीही उपयोगी पडणार नाही.’’
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) एके रत्री ‘तहज्जुद’ (मध्यरात्रीनंतरच्या नमाज) च्या वेळी आमच्या  घरी आले आणि मला आणि फातिमा (रजि.) यांना म्हणाले, ‘‘तुम्ही दोघे ‘तहज्जुद’ची नमाज अदा करीत नाही?’’ (हदीस : बुखारी,  मुस्लिम)
स्पष्टीकरण : या हदीसवरून विशिष्ट बोध असा होतो की जबाबदार व वरिष्ठ लोकांनी आपल्या हाताखालच्या लोकांना  ‘तहज्जुद’बाबत प्रोत्साहित करावे. माननीय अब्दुल्लाह (रजि.) (अमर बिन अल-आस यांचे पुत्र) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी सांगितले, ‘‘हे अब्दुल्लाह! तुम्ही त्या मनुष्यासारखे बनू नका जो ‘तहज्जुद’ची नमाज अदा करण्यासाठी उठत होता आणि  मग त्याने उठणे सोडून दिले.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय मसरूक (रह.) (ताबई) यांच्या कथनानुसार, मी माननीय आएशा (रजि.) यांना विचारले, ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) यांना कोणत्या प्रकारचे अनुसरण अधिक पसंत होते?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘न चुकता केले जाणारे काम पैगंबरांना अधिक पसंत होते.’’ मी विचारले, ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) रात्री कोणत्या वेळी (तहज्जुदकरिता) उठत होते?’’ माननीय आएशा (रजि.) यांनी उत्तर दिले,  ‘‘पैगंबर कोंबडा आरवण्याच्या वेळी उठत होते.’’ (म्हणजे रात्रीच्या अंतिम कालखंडात.) (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जेव्हा रात्रीचा एकतृतीयांश भाग उरतो  तेव्हा अल्लाह या दृष्टीस पडणाऱ्या आकाशावर येतो आणि भक्तांना बोलवितो, म्हणतो, ‘‘कोण मला बोलवित आहे की त्याच्या  मदतीकरिता धावत येऊ? कोण मला मागतो की त्याला देऊ? कोण माझी क्षमायाचना करतो की त्याला क्षमा करू?’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

    माननीय नवास बिन समआन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी कुरआन आणि कुरआनवर ईमान बाळगणारे जे त्याचे अनुसरण करीत होते अल्लाहपाशी आणले जातील आणि सूरह बकरा व सूरह आलिइमरान संपूर्ण कुरआनचे नेतृत्व करत आपले अनुसरण करणाऱ्यांसाठी अल्लाहपाशी शिफारस करतील की हा मनुष्य आपली कृपा व मोक्षाचा हक्कदार आहे म्हणून त्याच्यावर कृपावर्षाव व्हावा.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय उबैदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे कुरआनवर ईमान बाळगणाऱ्यांनो! कुरआनला लोड बनवू नका आणि रात्री व दिवसा त्याचे योग्य प्रकारे पठण करा आणि त्याच्या पठण व शिक्षणास प्रथा बनवा आणि त्याच्या शब्दांचे योग्य पद्धतीने वाचन करावे आणि जे काही कुरआनात सांगितले आहे उपदेश प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्यावर लक्षपूर्वक विचार करावा जेणेकरून तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी. आणि त्याद्वारे जागतिक परिणामाची इच्छा न बाळगता अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी त्याचे पठण करा.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : कुरआनला लोड न बनविणे म्हणजे त्यापासून गाफील राहू नये आणि शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की कुरआनचे ज्ञान प्राप्त करून त्यास जागतिक प्रतिष्ठा व ऐशोआराम आणि धनसंपत्ती प्राप्त करण्याचे साधन बनवू नये. जसे एका हदीसमध्ये सूचना करण्यात आली आहे की काही लोक कुरआनचे ज्ञान प्राप्त करून त्यास भौतिक संपत्ती प्राप्त करण्याचे साधन बनवितील.
    माननीय अबू ़जर गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो. मी म्हणालो, ‘‘काही उपदेश करावा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहच्या संयमाचा अवलंब करा. ही गोष्ट तुमच्या संपूर्ण ‘दीन’ व सर्व व्यवहारांना योग्य स्थितीत ठेवणारी आहे.’’ मी म्हणालो, ‘‘आणखी काही सांगावे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘स्वत:ला कुरआनचे पठण आणि अल्लाहची भक्ती व महिमागान निरंतर करीत राहा तेव्हा अल्लाह तुमची आकाशात आठवण करील आणि जीवनातील अंधकारात तुमच्यासाठी प्रकाशाचे काम करील.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘अल्लाह आठवण करील’चा अर्थ आहे की अल्लाह तुम्हाला विसरणार नाही. तुम्हाला आपल्या संरक्षणात ठेवील. अल्लाहचे महिमागान आणि कुरआनच्या पठणाने मोमिनला प्रकाश मिळतो. जीवनातील अंधकारांत मोमिन योग्य मार्ग प्राप्त करतो.
    माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जसा लोखंडाला पाण्यामुळे गंज चढतो तसा हृदयालादेखील गंज चढतो.’’ विचारण्यात आले, ‘‘कोणत्या गोष्टीमुळे हृदयाचा गंज नष्ट केला जाऊ शकतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हृदयाचा गंज अशाप्रकारे नष्ट केला जाऊ शकतो की मनुष्याने मृत्यूची खूप आठवण करावी आणि दुसरे असे की कुरआनचे पठण करावे.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘मृत्यूची आठवण करणे’ म्हणजे मनुष्याचे याचा विचार करावा की जीवनाची अवधी फक्त एकच अवधी आहे. दुसऱ्यांदा अंमलबजावणी करण्यासाठी अवधी मिळणार नाही. ‘तिलावत’ (कुरआन पठण करणे) म्हणजे कुरआनच्या शब्दांचे योग्य पद्धतीने वाचन करणे आणि त्यात जे काही सांगितले आहे ते समजून घेणे आणि त्याचे अनुसरण करणे. पवित्र कुरआन आणि अहादीसमध्ये ज्या ज्या ठिकाणी या शब्दाचा पूर्ण अर्थ सांगितला गेला आहे तेथे हेच सांगितले आहे. तसेच आणखी एकेठिकाणी असा अर्थ सांगितला आहे की कुरआनचा प्रचार करा, त्यास दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा.
ऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज
    माननीय अबू ज़र गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘जो मनुष्य माझ्याकडे वीतभर येतो मी त्याच्याकडे हातभर जातो आणि जो माझ्याकडे हातभर सरसावतो मी त्याच्याकडे दोन हात सरसावतो आणि जो माझ्याकडे पायी चालत येतो मी त्याच्याकडे धावत येतो.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : जो मनुष्य आपली आकांक्षा व सामथ्र्याने अल्लाहच्या मार्गावर चालण्याची इच्छा बाळगतो तेव्हा अल्लाह त्याचा तो प्रवास सुलभ करतो. अल्लाहचा दास त्याच्याकडे सरसावतो तेव्हा त्याच्यात दुर्बलता असल्यामुळे अल्लाह त्याच्यावर दया करतो आणि पुढे येऊन त्याला आपल्या जवळ करतो; जसे एखादे बाळ आपल्या पित्याकडे सरसावतो परंतु आपल्या दुर्बलतेमुळे पोहोचू शकत नाही तेव्हा त्याचा पिता त्याच्याकडे धावून येतो आणि त्याला कडेवर घेतो आणि आपल्या कुशीत घेतो.

    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो मनुष्य ज्याला अल्लाहने मोठे आयुष्य प्रदान केले, इतकेच काय तो ६० वर्षांच्या वयापर्यंत पोहोचला (आणि तरीही तो सदाचारी बनू शकला नाही) तेव्हा अल्लाहपाशी त्या मनुष्याकडे काही बोलायला बाकी उरणार नाही.’’ (हदीस : बुखारी)
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले, ‘‘अल्लाहपासून पूर्णत: लज्जित व्हा.’’ आम्ही विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अल्लाहची कृपा आहे की आम्ही अल्लाहपासून लज्जित होतो.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहशी लज्जित होण्याचा अर्थ एवढाच नसून अल्लाहपासून पूर्णत: लज्जित होण्याचा अर्थ आहे की तू आपले मष्तिष्क आणि मष्तिष्कात येणाऱ्या विचारांवर देखरेख ठेवावी आणि पोटात जाणाऱ्या अन्नाची देखरेख करीत राहावे आणि मृत्यूच्या परिणामस्वरूप सडण्याची व नष्ट होण्याची आठवण ठेवावी.’’ (त्यानंतर पैगंबर म्हणाले,) ‘‘आणि जो मनुष्य परलोकाला पसंत करणारा असेल तो जगातील सजावट व शृंगार सोडून देतो आणि प्रत्येक क्षणी परलोकाला जगाऐवजी प्राधान्य देतो, तोच मनुष्य खऱ्या अर्थाने अल्लाहपासून लज्जित होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
    माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! मला अत्यल्प व परिपूर्ण उपदेश करावा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जेव्हा तुम्ही आपली नमाज अदा करण्यासाठी उभे राहाल तेव्हा त्या मनुष्यासारखी नमाज अदा करा जो जग सोडून जाणार आहे आणि आपल्या तोंडाने असे शब्द बोला जर अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याचा हिशोब घेण्यात आला तर तुमच्यापाशी काही सांगण्यास उरणार नाही आणि लोकांजवळ जी काही संपत्ती व मालमत्ता आहे त्यापासून तुम्ही पूर्णत: बेपर्वा राहा.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जो मनुष्य या जगातून जात असेल आणि तो जीवंत राहू शकणार नाही याची त्याला खात्री पटली असेल तो मनुष्य अतिशय नम्रपणे नमाज अदा करील. त्याचे लक्ष पूर्णत: अल्लाहकडे असेल आणि नमाज अदा करताना जगाच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये त्याचे मन भटकत राहणार नाही.
    मनुष्याचे बोलणे जर सत्याविरूद्ध असेल आणि मनुष्याने आपल्या या जगातील जीवनात त्याबद्दल क्षमा मागितली नाही तर हिशोबाच्या वेळी त्याच्याजवळ काही बोलण्यास आणि विवशता सादर करण्यास काहीही उरणार नाही हे उघड आहे. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की लोकांची धनसंपत्तीच्या आधिक्क्यावर ईष्र्या करू नका कारण ती संपुष्टात येणार आहे. जोपर्यंत जगाबद्दल मनुष्यामध्ये निस्पृहता निर्माण होत नाही तोपर्यंत परलोकाच्या शिखरांपर्यंत त्याची दृष्टी जाऊ शकत नाही.
    माननीय अबू बऱजा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी मनुष्याकडून जोपर्यंत पाच गोष्टीचा हिशोब घेतला जात नाही तोपर्यंत तो अल्लाहच्या न्यायालयातून बाहेर पडू शकणार नाही. त्याला विचारले जाईल की आयुष्य कोणत्या गोष्टींमध्ये व्यतीत केले? ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले असेल तर त्याचे किती प्रमाणात अनुसरण केले? धन कोठून कमविले? आणि कोठे खर्च केले? शरीराला कोणत्या कामात झिजविले? (हदीस : तिर्मिजी)
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या प्रवाशाला आपण वाटेतच राहू आणि निश्चितस्थळी वेळेवर पोहोचू शकणार नाही याचे भय वाटत असेल, तो रात्री न झोपता रात्रीच्या सुरूवातीलाच आपला प्रवास सुरू करतो. असे करणारा निश्चितस्थळी वेळेवर सुखरूप पोहोचतो. ऐका! अल्लाहची संपत्ती मोठ्या प्रमाणात लाभेल. ऐका! अल्लाहचा माल नंदनवन (जन्नत) आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : आपल्या मूळ हकीगतीच्या दृष्टिकोनातून मानव प्रवासी आहे आणि परलोक त्याची खरी मातृभूमी आहे, येथे तो कमाई करण्यासाठी आला आहे. आता ज्यांना आपली खरी मातृभूमी आठवते, ते जर सुखरूपपणे आपल्या मातृभूमीस पोहोचू इच्छित असतील आणि मार्गातील अडथळे पार करून पोहोचले तर त्यांनी बेपर्वा न राहता आपला प्रवास सुरू करावा अन्यथा जर ते झोपत राहिले तर त्यांना पश्चात्ताप होईल. मग ज्याने अल्लाहची प्रसन्नता व बक्षिसाचे घर ‘जन्नत’ प्राप्त करण्याचे निश्चित केले असेल तर त्याला ज्ञात असावे की तो व्यापाऱ्याने फेकून दिलेला माल जो क्षुल्लक किमतीला विकला असावा आणि एखाद्याने तो घ्यावा. अल्लाहचा माल प्राप्त करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागेल. तो माल प्राप्त करण्यासाठी आपल्या काळ व मालाचे, शरीर व प्राणाचे बलिदान द्यावे लागेल. तेव्हाच ती गोष्ट प्राप्त होईल जी मिळाल्यामुळे मनुष्य आपला सर्व प्रकारचा त्रास विसरून जाईल.

माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी तुला अगोदर कब्रस्तानात येण्यापासून रोखले  होते (जेणेकरून एकेश्वरत्वाची धर्मनिष्ठा पूर्णत: हृदयात सामावली जावी.) आता तू दृढत्वाचा अवलंब कर.’’ मुस्लिमच्या दुसऱ्या हदीसमध्ये म्हटले आहे, ‘‘आता तू हवे तर जा कारण कबरी पारलौकिक जीवनाच्या स्मृती जागृत करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, जे लोक कब्रस्तानात जातात त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘तेथे पोहोचून  म्हणा की ‘अस्सलामु अलैकुम...’ (अर्थात) तुम्हाला शांतता लाभो, हे वस्तीतील ईशपरायण आज्ञाधारकांनो! आम्हीदेखील अल्लाहने  इच्छिले तर तुम्हाला भेटणार आहोत, आम्ही स्वत:साठी आणि तुमच्यासाठी अल्लाहच्या शिक्षा व क्रोधापासून वाचण्याची प्रार्थना  करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा त्यांना यमनचे न्यायाधीश अथवा गव्हर्नर  बनवून पाठविले तेव्हा म्हणाले, ‘‘हे मुआ़ज! स्वत:ला विलासीपणापासून अलिप्त ठेवा कारण अल्लाहचे दास विलासी नसतात.’’  (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तुम्ही एका मोठ्या पदावर जात आहात. तेथे जीवनाच्या स्वादापासून लाभ घेण्याची आणि हात साफ करण्याची खूप  संधी मिळू शकते. परंतु तुम्ही जगाच्या प्रेमात अडकू नका आणि जगाला पसंत करणाऱ्या शासकांसारखा स्वत:चा स्वभाव  बनवू नका कारण तो अल्लाहच्या दासत्वाशी मेळ खात नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना सांगितले, ‘‘माझ्या  जनसमुदायावर ती वेळ येणार आहे जेव्हा दुसरे जनसमुदाय त्याच्यावर अशाप्रकारे तुटून पडतील जसे खाणारे लोक वाढलेल्या  अन्नावर तुटून पडतात.’’ मग एका विचारणाऱ्याने म्हटले, ‘‘ज्या कालखंडाचे आपण वक्तव्य करीत आहात त्या काळात आम्ही  मुस्लिम लोक इतक्या कमी संख्येत असू की आम्हाला गिळंकृत करण्यासाठी इतर जनसमुदाय एकत्रितपणे तुटून पडतील?’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही, त्या काळात तुमची संख्या कमी असणार नाही तर तुमची संख्या मोठी असेल, परंतु तुम्ही महापुरातील लाटेसारखे  व्हाल आणि तुमच्या शत्रूंच्या उरातील तुमची भीती नष्ट होईल आणि तुमच्या हृदयात भित्रेपणा घर करील.’’ मग एका मनुष्याने  विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हा भित्रेपणा कोणत्या कारणामुळे येईल?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे कारण असे असेल की तुम्ही (परलोकावर प्रेम करण्याऐवजी) जगावर प्रेम करू लागाल आणि (अल्लाहच्या मार्गात प्राण देण्याच्या इच्छेऐवजी) मृत्यूपासून पळ  काढू आणि द्वेष करू लागाल.’’ (हदीस : अबू दाऊद)
माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगावर प्रेम करणारा मनुष्य आपले  पारलौकिक जीवन उद्ध्वस्त करील आणि पारलौकिक जीवनावर प्रेम करणारा मनुष्य या जगातील आपल्या जीवनाचे नुकसान करून  घेईल. हे लोकहो! तुम्ही मागे उरणाऱ्या जीवनाला नष्ट होणाऱ्या जीवनावर प्राधान्य द्या.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : हे जग आणि परलोक यापैकी एकाची निवड करणे आवश्यक आहे. एकतर जगाला आपले ध्येय बनवा अथवा  परलोकाला. जर जगाला आपला आपले ध्येय निश्चित करीत असाल तर पारलौकिक सुख व खुशी लाभणार नाही आणि परलोकाला
आपले ध्येय बनविले तर त्याच्या परिणामस्वरूप कदाचित तुमचे जग नष्ट होऊ शकते, परंतु त्याच्या बदल्यात पारलौकिक बक्षीस  मिळेल जे निरंतर राहणारे आहे. जी गोष्ट परलोकाच्या मार्गावर चालण्याने नष्ट होईल ती समाप्त होणारी आहे आणि जीवनदेखील  नष्ट होणारे आहे. या नष्ट होणाऱ्या गोष्टीचे बलिदान देण्याने जर निरंतर राहणारे बक्षीस मिळाले तर हा तोट्याचा सौदा नाही,  पुरेपूर नफ्याचा सौदा आहे. माननीय शद्दाद बिन औस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरा  विद्वान तो आहे ज्याने आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवले आणि मृत्यूनंतर येणारे जीवन अलंकृत करू लागला. मूर्ख तो आहे ज्याने  स्वत:ला वासनेच्या अवैध इच्छांच्या मागे लावले आणि अल्लाहकडून चुकीची अपेक्षा बाळगली.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : म्हणजे सत्याला सोडून आपल्या मनाचे म्हणणे ऐकतो आणि अपेक्षा करतो की अल्लाह त्याला नंदनवनात  (जन्नतमध्ये) स्थान देईल. अशाप्रकारच्या चुकीच्या आकांक्षांमध्ये कुरआन अवतरणकाळातील ज्यू आणि खिस्ती पडलेले होते आणि  आज आमचे अनेक मुस्लिम बंधुदेखील अशाच चुकीच्या आकांक्षांवर जीवन व्यतीत करीत आहेत.

- फेरोजा तस्बीह, चिपळून
यात मुळीच शंका नाही की इस्लाम एक यशस्वी जीवन जगण्याची व मुक्ती मिळविण्याची एकमेव पद्धत आहे. याचा आधार पवित्र ग्रंथ कुरआन आहे. अल्लाह एकमेव सत्ताधीश आहे. जमीन आणि आकाश या दरम्यान जे काही आहे, सर्व त्याचेच आहे. एकदा का या तत्वावर विश्‍वास बसला की, माणसाचे जीवन योग्य दिशेने मार्गक्रमण सुरू करते. अल्लाहने जेव्हा पहिल्या मानवाची म्हणजेच आदम आणि हव्वा अलै. यांना पृथ्वीवर पाठविले, त्यांना मुस्लिम म्हणून पाठविले. त्यांच्यापासून वंश वाढला, तो वंश म्हणजेच पृथ्वीतलावरील सर्व मानवजात होय. वेगवेगळे रंग, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृती या तर फक्त एकमेकांची ओळख पटविण्यासाठी आहे. बाकी सर्व आदम आणि हव्वा अलै. यांचीच लेकरे आहेत. त्यामुळे त्यांचा धर्म एक, त्यांची जीवन व्यवस्था एक आणि त्यांच्या मुक्तीचा मार्गही एक, म्हणजेच इस्लाम होय. या तत्त्वाचा ज्यांनी अव्हेर केला त्यांनी पृथ्वीवर आपली मर्जी गाजविली, आपले स्वतःचे कायदे बनिवले, गरीबांना पिळले, महिलांवर अत्याचार केले. माणसाच्या या पतभ्रष्ट जीवन क्रमाला मूळ पदावर म्हणजे इस्लामवर आणण्यासाठी अल्लाहने 1 लाख 24 हजार प्रेषित पाठविले. जेव्हा अरबस्थानामध्ये सामाजिक अनागोंदीची परिसिमा झाली तेव्हा अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना पाठविण्यात आले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला योग्य म्हणजे इस्लामी दिशा दिली. व 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी समग्र अरबस्थानाचे सामाजिक वातावरणच बदलून टाकले. वाईट लोक चांगले झाले. प्रेषितांनी हे सगळे त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या आदेशानुसार केले. हेच आदेश राहत्या जगापर्यंत अंतिम आदेश आहेत. या प्रमाणे जो समाज जीवन जगेल तोच मुक्ती मिळवेल.
    पृथ्वीवर अनेक व्यवस्था अस्तित्वात असून, त्यांचा अन्याय आणि अत्याचार टिपेला पोहोचलेला आहे. सहाव्या शतकात प्रेषित सल्ल. यांच्या पूर्वी जी जहालत होती तीच आज अस्तित्वात आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. कन्याभ्रुणहत्या होत आहेत. दारू आणि ड्रग्स यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. विश्‍वासघात, खोटारडेपणा, अश्‍लीलता, अनैतिकता इत्यादी अवगुणांनी अवघी पृथ्वी व्यापून राहिली आहे. हीच परिस्थिती सहाव्या शतकात असतांना प्रेषितांनी अल्लाहचा संदेश कळविला की, ”हे इमानधारकांनो तुमच्यासाठी योग्य नाही की तुम्ही महिलांचे मालक बनाल” (संदर्भ : सुरे निसा आयत नं. 19). ही आयत अवतरित झाल्यानंतर अरबांमध्ये महिलांची परिस्थिती एकदम बदलली. जे अरब मुलींना जीवंत पुरत होते ते आपल्या मुलींना आपल्या संपत्तीमधून त्यांना वाटा द्यायला लागले. याशिवाय, दारूच्या विरूद्ध जेव्हा आयत नाजील झाली तेव्हा न भुतो न भविष्यती असा बदल अरबस्थानात झाला. जुन्या दारूचे शौकीन अरबांनी दारूचा असा नायनाट केला की आजपर्यंत मक्का मदिना आणि आसपासच्या क्षेत्रात दारूचा लवलेशसुद्धा मिळत नाही. एकंदरित असाच बदल आजही शक्य आहे, फक्त इस्लामची वाट चोखाळावी लागेल.

: संकलन :
 प्रा. अब्दुलरहेमान शेख
9511208946

आमच्यापैकी असा कोण आहे जो या जीवनात सफल होऊ इच्छित नाही? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सर्व याच एकमेव प्रयत्नात असतो की स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाचे जीवन सफल व्हावे. यासाठी आम्ही सर्वांनी जीवनाचे काही उद्देश ठरविले आहेत. ज्यांना प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो. जेव्हा आम्ही उद्देश प्राप्त करतो तेव्हा आमच्या आनंदाला सीमा राहत नाही, सफलताप्राप्तीनंतर आम्ही आनंदविभोर होतो. परंतु, जेव्हा काही कारणांमुळे उद्देश प्राप्त होऊ शकत नाही, तेव्हा या असफलतेमुळे आम्ही अति दु:खी होतो आणि कधी-कधी ईश्वराला यासाठी दोषी ठरवितो.
       मनुष्य जीवन त्याच्या मृत्यूपश्चात समाप्त होत नाही तर त्यानंतरसुद्धा जीवन आहे. सफलतेची ही सर्व धडपड याच जगातील जीवनाला सफल बनविण्यात आणि भौतिक सुखसुविधांना प्राप्त करण्यापर्यंतच सीमित आहे. मृत्यूपश्चात काय होणार आहे? याकडे आमचे लक्ष कमीच जाते. खरे तर संपूर्ण जीवनाला सफल बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
-धर्माची भूमिका-
    उपासनाविधीच्या ज्ञानासह मनुष्याला पूर्ण मार्गदर्शन करणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करणे धर्माचे दायित्व आहे. सर्व धर्मांनी आणि विचारप्रणालींनी ही दायित्वपूर्ती करताना मनुष्यासमोर मोक्ष आणि मुक्तीचा उद्देश प्रस्तुत केला आहे. मानवी इतिहास यावर साक्षी आहे की मुक्तीला मनुष्य जीवनाच्या सफलतेसाठी मापदंड म्हणून वेगवेगळ्या रूपात सांगितले गेले आहे. मुक्तीविषयी प्रत्येक धर्मात मतभेद आणि विरोधाभास आढळून येतो.
- हिंदू धर्म-
हिंदू धर्मात मरणोत्तर जीवन आणि पुनर्जन्म अशा दोन वेगवेगळ्या धारणा आढळतात. एकीकडे वेदांमध्ये स्वर्ग व नरकाचे वर्णन सापडते ज्याद्वारे मरणोत्तर जीवनात पुन्हा जन्म होण्याची पुष्टी होते तर दुसरीकडे अन्य ग्रंथांत आवागमनीय पुनर्जन्माचे वर्णनसुद्धा सापडते ज्यात मनुष्य आत्मा विभिन्न योनितून अनेकदा जन्म घेऊन आवागमनीय (पुनर्जन्म) उन्नत होऊन ईश आत्म्यामध्ये विलीन होतो आणि हीच मनुष्याची मुक्ती आहे. या दोन्ही धारणांव्यतिरिक्त श्रीमद्भगवदगीतेमध्ये मोक्षप्राप्तीचा एक मार्ग संन्यास घेऊन आणि सत्यज्ञानप्राप्तीसाठी स्वत:ला पूर्णत: समर्पित करणे आहे. तसेच दुसरीकडे या जगाच्या जीवनकर्तव्यांना पूर्ण करताना तुच्छ स्व-इच्छांना त्यागणेसुद्धा मोक्ष आहे, असे सांगितले आहे. वेदांमध्ये आवागमनीय पुनर्जन्म संकल्पना आढळत नाही. वेद अध्ययनाने स्पष्ट होते की वास्तवता दोनच लोक आहेत. एक वर्तमान लोक आणि दुसरे परलोक. परलोकात मनुष्याला उच्च स्थान प्राप्त होणे म्हणजेच मुक्ती होय. जिथे सर्व कामनापूर्ती, प्रत्येक प्रकारचा आनंद व सुख असेल आणि तिथे ईश्वराचे राज्य असेल. वेदांमध्ये स्वर्गाचे अति सुंदर व आकर्षक वर्णन सापडते आणि नरकाचे अति दु:खदायक वर्णन आहे. वेदांनुसार परलोक सफलताच वास्तविक सफलता आणि मुक्ती आहे.
- बौद्ध धर्म-
बौद्ध मतानुसार मुक्ती अथवा निर्वाण म्हणजे मनुष्याने स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना स्वनियंत्रित करावे किंवा त्यांच्यापासून मुक्ती मिळवावी. बुद्धांच्या दृष्टीने स्वर्ग किंवा नरकाचे लौकिक अस्तित्व नाही आणि मनुष्य याच जीवनात त्याच्या चांगल्या व वाईट कर्मांनी स्वर्ग अथवा नरकास प्राप्त करू शकतो. गौतम बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाला स्वीकारले किंवा अस्वीकारलेले नाही. त्याच्यानुसार मनुष्याच्या मुक्तीसाठी कोणत्याही ईश्वराची किंवा देवीदेवतांची कृपा व अनुग्रहाची आवश्यकता मुळीच नाही. बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचासुद्धा अस्वीकार केला आहे. बुद्धमतानुसार मुक्ती व निर्वाणाचा संबंध मनुष्याच्या भौतिक जीवनाशीच सीमित आहे. मरणोत्तर जीवनाविषयी बौद्धमत काहीच मार्गदर्शन करत नाही. धर्मात नैतिकता जर ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारण्यावर आधारित असेल तर त्याचे पालन करणे जास्त काळापर्यंत अशक्य होते आणि हेच बौद्ध धम्माविषयी घडले आहे.
-जैन धर्म-
जैन मतानुसार आत्मा मनुष्य शरीरात कैद आहे आणि या भौतिक शरीरापासून त्याची मुक्तीच मनुष्याची खरी मुक्ती आहे. यासाठी शरीराला इतके काही कष्ट देणे आवश्यक आहे की, ज्यामुळे आत्मा शरीरातून निघून जाईल. कठोर तपश्येनेसुद्धा हे साध्य होते. या मतानुसार श्रेष्ठ व प्रशंसनीय मृत्यू तो आहे ज्यात मनुष्य भुकेने व्याकूळ होऊन मरतो. जैन मत ईश्वराला सृष्टीनिर्माता म्हणून स्वीकारत नाही, परंतु एका मुक्त आत्म्याला मात्र समस्त ईशगुणांनी संपन्न करतो. या मतानुसार प्रत्येक सजीव ही स्थिती प्राप्त करू शकतो आणि करतसुद्धा आहे. अशा प्रकारे जैन मत अगणित ईश्वरांना स्वीकारतो. यांचा विश्वास आहे की प्रत्येक आत्मा कर्माशी जोडलेला आहे आणि यापासून सुटका होणे म्हणजेच आत्म्याला मुक्ती मिळणे आहे.
-शीख धर्म-
शीख धर्म ईश्वरात विलीन होण्यास मुक्ती मानतो. यासाठी जगातील सुखसुविधांना त्यागणे, उपवास करणे व तपस्या करणे आवश्यक नाही. फक्त ईश्वरावर आस्था ठेवून त्याचे चिंतन मनन करून सत्यमय जीवन व्यतीत करणे आहे. शीख धर्म एकेश्वरत्वाचा समर्थक आहे.
”जे लोक ईश्वराचे चिंतनमनन करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. अशा लोकांना जीवनमृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते.” (गुरुग्रंथसाहिब-11)
- ख्रिश्चन धर्म-
ख्रिश्चन धर्मसुद्धा एकेश्वरत्वाचा समर्थक आहे, परंतु याविषयीची परिभाषा यात स्पष्ट सांगितली नाही. प्रेषित इसा मसीह (अ.) यांना ईश्वरसुद्धा मानले गेले आहे. तसेच ईश्वराचा पुत्रसुद्धा आणि पवित्र आत्मासुद्धा. ख्रिश्चन धर्मानुसार पापांपासूुन पूर्णत: मुक्ती खरी मुक्ती आहे. पाप मनुष्याच्या जन्मापासून त्याच्याशी निगडीत आहे. या पापांपासून मुक्तीचा एकमेव मार्ग इसा मसीह (अ.) यांच्यावर आस्था ठेवणे आहे. या धर्मानुसार दोन हजार वर्षांपूर्वी ईश्वरपुत्र ईसामसीह यांनी सुळावर स्वत:चा बळी देऊन सर्व मानवांच्या पापांचे प्रायश्चित्त केले आहे. पाप आणि जीवनाच्या मुक्तीचा एकच मार्ग इसा मसीह (अ.) वर आस्था बाळगणे आहे. ख्रिश्चन धर्माच्या ग्रंथांत प्रेषित इसा मसीह (अ.) यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या मुक्तीविषयीचा उल्लेख मात्र सापडत नाही. तसेच इसा मसीह (अ.) वर आस्था बाळगूनसुद्धा मनुष्य जर पापी कृत्य करीत गेला तरी त्याची मुक्ती होणारच काय? याविषयीचे स्पष्टीकरणसुद्धा सापडत नाही.
- यहुदी धर्म-
यहुदी लोक समजतात की जगात ईश्वराने निवडलेला सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ एकमेव वंश त्यांचाच आहे आणि ईश्वराशी त्यांचा विशेष संबंध आहे. यहुदी म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मोक्ष जन्मापासूनच सुनिश्चित झालेला असतो. त्यांची मान्यता आहे की नरक अन्य धर्मियांसाठी आहे आणि यहुदींना नरकात टाकले जाणार नाही. हे यहुदीमत साडेतीन हजार वर्षांपासून प्रचलित आहे. येथेसुद्धा हे स्पष्टीकरण मिळत नाही की एखाद्या वंशात जन्म घेणेच मुक्ती आहे तर या वंशाबाहेर जन्मलेल्या लोकांचे काय होईल?
- इस्लाम धर्म-
इस्लाममध्ये मुक्तीची धारणा सहज, सरळ, स्पष्ट व विवेकपूर्ण अशी आहे. इस्लामनुसार मोक्ष व मुक्ती प्राप्त करण्यासाठी भौतिक जगाचा त्याग करून संन्यास घ्यावे लागत नाही की या जगातील सुखसुविधांना त्यागावेसुद्धा लागत नाही. तसेच स्वत:च्या शरीरालासुद्धा त्रास (इंद्रिय दमन) द्यावे लागत नाही. इस्लामनुसार जन्माच्या आधारावर सर्व मानव समान आहेत आणि स्वर्ग एखाद्या वर्गविशेषासाठी आरक्षित नाही. इस्लाम मानवांना ऊच-नीचतेच्या आधारावर विभाजित करीत नाही, ज्यानुसार उच्चवर्णियांसाठी स्वर्ग आणि दुसर्यांसाठी नरक आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. यात जगातील सर्व मानवी समस्याची उकल व मुक्ती आहे. या जीवनात व पारलौकिक जीवनात सफलताप्राप्तीचे संपूर्ण मार्गदर्शन इस्लाम करतो, ज्याचे जीवंत उदाहरण पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आहे.
    इस्लाम आवागमनीय पुनर्जन्माला पूर्णत: नाकारतो आणि त्यास अस्वाभाविक व अविश्वसनीय मानतो. इस्लामची मौलिक धारणा आहे की मोक्ष व मुक्ती प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य आहे. मग तो कोणत्याही देशाचा, वंशाचा अथवा कोणत्याही काळात जन्मलेला असो, अट फक्त ही आहे की त्याने ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत केले असावे. ईश्वराने पूर्वी अवतरित ग्रंथांचे अवशेष आजसुद्धा उपलब्ध आहेत परंतु त्यांच्यापैकी कोणताच ग्रंथ आज मूळ रूपात उपलब्ध नाही. या सत्याला कोणीही नाकारू शकत नाही की लोकांनी त्या ग्रंथांना स्वत:च्या इच्छेनुसार बनविण्यासाठी त्यांच्यामध्ये अतोनात फेरबदल केले आणि त्यामुळे त्या ग्रंथांची मूळ शिकवण आज लुप्त झाली आहे. आज पवित्र कुरआनच तो अंतिम व सुरक्षित ईशग्रंथ आहे जो ईश्वराच्या वास्तविक व मूळ शिकवणी मानवांपर्यंत प्रस्तुत करत आहे. या ग्रंथाचे 1450 वर्षांपासून पूर्णत: सुरक्षित असणे त्याच्या सत्यतेचे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. यावरून हेच स्पष्ट होते की इस्लाम हाच मानवतेच्या सफलतेचा, शांती, प्रगती व मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व शिकवणी मनुष्यनिर्मित आहेत आणि त्यांचा ईशमार्गदर्शनाशी काहीएक संबंध नाही. ईश्वराला केवळ पूजेसाठी सीमित करून आपल्या जीवनाला ईशमार्गदर्शनापासून पूर्णत: अलिप्त ठेवणे मनुष्याची एक घोडचूक आहे. याच कारणाने आज पूर्ण व्यवस्था अस्तव्यस्त झालेली दिसून येत आहे आणि मनुष्य शांती, प्रगती व मुक्तीच्या मार्गापासून दूर भरकटला गेला आहे.
    जीवन व जीवनाच्या प्रश्नांचा विचार करणारे आणि आपल्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा बाळगणार्या विचारवंतांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी इस्लाम धर्माच्या ज्ञानापासून अपरिचित राहू नये.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget