Latest Post

इस्लाममध्ये रमजानला एवढे महत्व का? त्याची कुरआनाच्या आधारे दिलेली माहिती

रमजान हा सुरुवातीला अरबी कॅलेंडरमधील नवव्या क्रमांकाचा सर्वसामान्य महिन्यासारखा एक महिना होता. मग त्याला एवढे महत्व का प्राप्त झाले? याचे उत्तर कुरआनात सापडते -
कुरआनात अल्लाह सांगतो -
''रमजान तो महिना आहे ज्यात कुरआन अवतरित झाले, जे समस्त मानवांकरिता मार्गदर्शन आणि सत्य - असत्य स्पष्ट करण्याचे मापदंड आहे.'' - कुरआन (२:१८५)
याचा अर्थ रमजानला कुरआनच्या अवतरणामुळे महत्व प्राप्त झाले आहे. आता हे अवतरण झाले म्हणजे नेमके काय झाले? हे सविस्तरपणे आपण पाहू या-
प्रेषित मुहम्मद सल्लम यांना प्रेषित्व प्राप्त होण्यापूर्वी म्हणजे ते चाळीस वर्षांचे होते त्यावेळी त्यांना या सृष्टीच्या निर्मिकाची तीव्रतेने ओढ लागली होती. ते अल्लाहचे नामःस्मरण, चिंतन-मनन  करण्याकरिता मक्का शहराच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या हिरा गुहेत जाऊन बसायचे. रमजानच्या महिन्यातील अशाच एका रात्री ते त्या गुहेत चिंतन मनन करत असतांना त्यांना ''जीब्रइल'' नावाचे ईशदूत (फरिश्ते) दिसले. फरिश्ते हे अल्लाहचे दूत असतात. त्यांना वेगवेगळे काम अल्लाहने सोपवलेले आहेत. ते नेमके कसे दिसतात, त्यांचे नेमके स्वरूप काय आहे, त्याबद्दल फार जास्त माहिती सापडत नाही. जीब्रइल हे त्यापैकी सर्वात महत्वाचे फरिश्ते मानले जातात. त्यांच्याकडे प्रेषितांपर्यंत अल्लाहचा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी असते. असे संदेश ते प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यापूर्वीही आलेल्या अनेक प्रेषितांपर्यंत पोहोचवत होते.
प्रेषित मुहम्मद सल्लम हे इस्लामचे संस्थापक असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. त्यांच्यापूर्वीही जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित आलेले आहेत. भूतलावरील पहिले मानव आदम हे इस्लामचे पहिले प्रेषितदेखील होते. त्या प्रेषितांकडेही जीब्रइल हेच ईशदूत येत होते. त्या रात्रीही तेच जिब्रइल अल्लाहचा संदेश घेऊन आले होते. काही इतिहासकार सांगतात कि, त्यांनी सोबत एक प्रकाशमान पटलावर लिहिलेले शब्द दाखवत प्रेषित मुहम्मद सल्लम यांना सांगितले -
''इकरा (वाचा)''
प्रेषितांनी उत्तर दिले कि, ''मला वाचता येत नाही.'' कारण प्रेषित हे उम्मी (अक्षरशून्य) होते. त्यांचा कुणीही गुरु नव्हता. गुरुविनादेखील मुक्ती शक्य आहे, हे प्रेषितांनीच जगाला कृतीतून शिकविले. जिब्रइल यांनी प्रेषितांना छातीशी घट्ट धरले आणि पुन्हा सांगितले -
''वाचा!''
असे तीनवेळा झाल्यानंतर प्रेषितांनी वाचायला सुरुवात केली. त्या प्रसंगानंतर पुढे कुरआनचा एक एक अध्याय वेगवेगळ्या प्रसंगानुरूप अवतरित होत गेला. अवतरित झाल्यानंतर प्रेषित ते मुखोदगत करून घ्यायचे. अल्लाहने प्रेषितांना कुरआन पाठ करण्याची एक जबरदस्त क्षमता प्रदान केली होती. अध्याय अवतरित होण्याचे तीन प्रकार होते. एक तर फरिश्ता मानवी रूपात येऊन अध्याय सांगायचा, दुसरा प्रकार म्हणजे स्वप्नात अध्याय सांगितला जायचा आणि तिसरा प्रकार म्हणजे अध्याय थेट अल्लाहकडून प्रेषितांच्या हृदयावर अवतरित होत होते. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी फार जड जात होती. कोणतीतरी जड वस्तू विजेसारखी आकाशातून येऊन हृदयावर पडत असल्याचा आभास त्यांना व्हायचा आणि तो अध्याय त्यांच्या मनःपटलावर जणू कोरला जायचा. नंतर तो अध्याय प्रेषित लोकांसमोर पठन करायचे आणि लोकं ते झाडांच्या पानावर, जनावरांच्या चामड्यावर किंवा लाकडांच्या पाटयावर लिहवून घेत होते. पुढे खलिफा उस्मान गनी यांनी एक आयोग नेमून त्या मूळ प्रतीच्या अनेक लिपिबद्ध करून त्याच्या शंभर प्रति जगभरात पाठवून दिल्या. आजही त्या अस्तित्वात आहे. अशाप्रकारे कुरआन रमजान महिन्यात अवतरण्यास प्रारंभ होऊन प्रेषितांद्वारे अल्लाहकडून (भगवंताकडून) भक्तांपर्यंत पोहोचला. पण या ज्ञानरूपी गंगोत्रीची सुरुवात याच रमजानमध्ये झाली होती. याच महिन्यात जगभरात कुराणाचा समता व एकत्वाच्या संदेशाचा जमजम झरा वाहू लागला होता.

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

पवित्र कुरआनचे इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे, मात्र रमजानमध्ये ते आणखी जास्त आहे.

रमजानमध्ये कुरआन इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात जास्त पठण केले जाते, श्रवण केले जाते. कारण रमजान व कुरआन यांचा फार घनिष्ट संबंध आहे. ज्याप्रकारे एखाद्या वृत्तपत्राचा पहिला अंक ज्या दिवशी प्रकाशित होतो, त्याच तारखेला दरवर्षी त्याचा वर्धापन दिवस साजरा करण्याची पद्धत काही ठिकाणी असते. अशाप्रकारे रमजान हा जणू कुरआनचा एकप्रकारे वर्धापन मास आहे. कारण याच महिन्यात कुरआनचा पहिला श्लोक अल्लाहकडून प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अवतरित झाला होता.

या महिन्यात जे रोजे अनिवार्य करण्यात आले त्याचा उद्देशही रोजाधारकाला अल्लाहच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन लोकांना ईशपरायण बनविणे आहे. ईशपरायण म्हणजे ईश्वराने, अल्लाहने जे करायला सांगितले ते सत्कर्म करणे आणि जे करायला मनाई केली ते करू नये. मग अल्लाहने काय करायला सांगितले आणि कशाला मनाई केली हे कसे माहीत होईल? तर त्यासाठीचे मार्गदर्शन म्हणून कुरआन अवतरित केले. अशाप्रकारे रमजान, कुरआन व रोजे यांचा आपसात घनिष्ट संबंध आहे.
या कुरआनचा विषय 'माणूस' आहे. जीवन कसे जगावे, प्रेषितांनी आणि इतर महापुरुषांनी जीवन कसे जगले, त्यांना त्याचा योग्य मोबदला कसा मिळाला आणि पारलौकिक मोबदला कसा मिळणार आहे, तसेच ज्या वाईट लोकांनी अल्लाहचा कल्याणकारी संदेश नाकारला त्यांचे लौकिक व पारलौकिक नुकसान कसे झाले त्याचे सोदाहरण विवेचन यात आलेले आहेत. वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात निर्णय घेतांना कोणते निकष वापरावे याचे सुंदर मार्गदर्शन यात आहे.

हा एक अध्यात्मिक ग्रंथ तर आहेच, शिवाय यात संपूर्ण जीवन व्यवस्थेचे कायदे देखील आहेत. हे कायद्याचे पुस्तकदेखील आहे. अल्लाह, प्रेषितांचे प्रेषित आणि मरणोत्तर जीवनाचे अस्तित्व हे काही ठिकाणी वैज्ञानिक दाखले देऊन भोवतालच्या सृष्टीची तसेच कुरआनचीही चिकित्सा करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. सारांश असा कि, अल्लाहने कुरआनात सर्वोच्च स्थान मानवी जीवाला दिलेले  आहे. अल्लाहसाठी मानवापेक्षा कोणतीच निर्मिती श्रेष्ठ नाहीये. हा सन्मान माणसाला अल्लाहने कुरआनात दिला आहे. म्हणूनच अल्लाहने एका जीवाची हत्या म्हणजे पूर्ण मानवतेची हत्या संबोधले आहे. (संदर्भ: अध्याय- ५, श्लोक क्र. ३२)

परंतु कुराणविषयी अनेक गैरसमज पसरले आहेत. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे कुरआनचा एखादा श्लोक समजून घेण्यासाठी तो कोणत्या परिस्थतीत अवतरला, त्या पार्श्वभूमीनुसार त्याचा अर्थ घ्यावा लागतो. उदाहरणार्थ गांधीजींनी ''अंग्रेजो भारत छोडो'' म्हटले तर याचा अर्थ प्रत्येक युरोपियन मूळच्या माणसाने भारत सोडून दिला पाहिजे आणि पुन्हा कधी त्या देशातल्या कोणत्याच माणसाने भारतात पायच ठेवला नाही पाहिजे, असा होत नाही. कारण गांधीजींनी ते फक्त जुलमी सत्ताधारी इंग्रजांना उद्देशून बोलले होते, ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतो. तसेच कुरआनचा एखादा श्लोक युद्धप्रसंगी अवतरीत झाला आणि त्यात मुस्लिमेतरांवर कारवाई म्हणून त्यांना मारण्याचा आदेश आला तर याचा अर्थ प्रत्येक युगातल्या प्रत्येक मुस्लिमेतराला ठार करण्याचा तो आदेश नसून, जुलमी सत्ताधारीशी जर युद्ध झाले तर त्यावेळी वैध मार्गाने करावयाची कार्रवाईसंबंधी तो नियम असतो. याचा अर्थ कुरआन कालबाह्य आहे, असे नाही. तर ती परिस्थिती भविष्यातही उदभवू शकत असल्यामुळे तो आदेश त्रिकालाबाधित ठरतो. परंतु तो आदेश सरसकट एखाद्या समाज किंवा धर्मसमूहाविरुद्ध नसतो. म्हणून कुरआनचा अभ्यास शक्यतोवर त्यावरील भाष्य ( तफसीर)मधून केलेला बरा . कारण त्याच्या तळटिपांत त्या त्या श्लोकाची अवतरण काळ आणि पार्श्वभूमी दिलेली असते. अशा पद्धतीने कुरआनचा अभ्यास केल्यास त्याविषयीचे गैरसमज दूर होऊ शकतात. अशाप्रकारे कुरआन समजून घेतल्यास रमजान समजून घेणे सोपे जाते आणि ते आवश्यक आहे. आज मराठीसहित सर्व भारतीय भाषेत कुरआन उपलब्ध आहे. अगदी नेत्रहीन बांधवांकरिता ब्रेल लिपीतही त्याचे भाषांतर उपलब्ध आहे. मग या रमजानमध्ये वाचणार ना कुरआन?


- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

पवित्र रमजान महिन्यात महिलाही रोजे ठेवतात. धार्मिक रिवाज पाळतात. त्याचवेळी इफ्तारी, सहरीसाठी कुटुंबीयांसाठी रुचकर पदार्थही त्याच रांधतात. त्याविषयीची माहिती
संस्कृतीचं रक्षण आपल्या देशात खऱ्या अर्थानं कुणी करत असतील तर त्या महिलाच.  सण, उत्सवात महिलांची फार मोठी भूमिका असते, तशीच रमजानमध्येही महिलांची फार महतवाची भूमिका आहे. याला ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. याच रमजानच्या एके रात्री प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अल्लाहकडून (ईश्वराकडून) कुराणाचा पहिला श्लोक ''इकरा (वाचा/शिका)'' पहिल्यांदाच अवतरित झाला. त्याबरोबरच त्यांना प्रेषित्व प्राप्त झाल्याची घोषणाही याच महिन्यात झाली. त्यानंतर प्रेषितांनी ईश्वरी संदेशाच्या प्रचाराचा प्रारंभ केला तो त्यांच्या पत्नी आदरणीय खतिजा यांना इस्लामची दीक्षा देऊन. अशाप्रकारे प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्याकडून इस्लामची दीक्षा घेणारी सर्वात पहिली व्यक्ती एक स्त्रीच होती आणि ती ऐतिहासिक घटना रमजानमध्येच घडली. आदरणीय खतिजापासून तर आज जगाच्या जवळपास दोनशे कोटी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचलाय आणि तो त्यांनी स्वीकारला. पण या लोकशिक्षणाची सुरुवात एका स्त्रीपासून प्रेषितांनी सुरु केली होती हे विशेष.

आजही रमजान महिन्याच्या दैनंदिन सोपस्कारात महिला फार महत्वाची भूमिका निभावतात. ती स्वतः आणि घरचे लोकं रोजा ठेवतात म्हणून त्यांच्या सहेरीकरिता ती रात्रीच तयारी करून ठेवते. कणिक भीजवून फ्रीजमध्ये ठेवते, तर कधी मटन उकळून फ्रीजमध्ये ठेऊन देते. मूग किंवा वाटाणे वगैरेची एखादी डिश सहेरीला करायची असेल तर रात्रीच ते भिजवून ठेवते.

आजकाल औरंगाबादमध्ये सहेरीची अंतिम वेळ जवळपास साडे चार वाजता आहे. अशावेळी महिलांना तीन साडे तीन वाजताच उठावे लागते. तब्बल पावणेचार वाजेपर्यंत स्वयंपाक आटपून घरच्या मंडळींना झोपेतून उठवतात आणि जेवण वाढतात. स्वतःदेखिल त्यांच्यासोबत सहेरी करून रोजा ठेवतात. ती थकली असेल तर काही पुरुषदेखील स्वतः स्वयंपाक करून तिला जेवू घालतात. प्रेषित स्वतः देखिल काहीवेळा स्वयंपाक करून त्यांच्या पत्नींना जेवू घालायचे. ही प्रेषित परंपरा आहे.
सहेरी करून सगळे नमाज पढतात, महिलादेखील नमाज पढतात. महिलांनादेखील मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी आहे, पण घरी नमाज पढण्याची सवलत दिलेली आहे. नाहीतर भल्या पहाटे उठून स्वयंपाक केल्यावर नमाजसाठी दूर एखाद्या मशिदीत जाणे त्यांना अवघड गेले असते. या सवलतीचा आपल्या देशात महिला पुरेपूर लाभ घेत सहसा घरीच नमाज पढतात. मुंबई, दिल्ली व इतर काही ठिकाणी मात्र काही महिला मशिदीत जाऊन नमाज पढतात.

नमाजनंतर काही महिला कुराणाचे पठण करतात तर काही महिला थकल्यामुळे आराम करतात. बऱ्याच शहरात आजकाल ''समाअत ए कुरआन'' म्हणून खास फक्त महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत. त्यात एखादी आलेमा (पुरुष मौलवी किंवा आलिम असतो तशी महिला देखील आलेमा असते) कुरआनचे अरबीत पठन करते, त्याचे उर्दूत भाषान्तर वाचते आणि नंतर त्याचे निरूपण स्थानिक भाषेत समजाऊन सांगते. दोन ते तीन तासांचा तर कुठे कुठे चार तासांचा  हा कार्यक्रम असतो. कुरआनच्या तीस खंडांपैकी दररोज एका खंडाचे पठन केले जाते. औरंगाबादमध्ये सध्या जमाअत ए इस्लामी हिंद या एकाच संघटनेच्या महिला आघाडीतर्फे शहरात विविध ठिकाणी असे जवळपास चाळीस ''समाअत ए कुरआन''चे वर्ग चालतात. इतर संघटनांची संख्या वेगळी. ही एकप्रकारे महिलांमध्ये प्रबोधनाची लोकशिक्षणाची चळवळच आहे.
त्यांनतर अनेक महिला आराम करतात. दुपारची आणि सूर्यास्तापूर्वीची नमाज पढली जाते. पुरुषही ही नमाज पढतात. लहान लेकरांसाठी कधी कधी थोडेसे काही तयार करावे लागते. पण सहसा महिनाभर दुपारी एकप्रकारची महिलांना सुट्टीच असते. मात्र संध्याकाळी पाच नंतर पुन्हा त्यांची लगबग सुरु होते. कारण सूर्यास्तानंतर इफ्तार करावयाचा असतो. खरं म्हणजे इफ्तार हा साध्या पद्धतीने देखील केला जातो. पण दिवसभर खाणे पिणे बंद असल्यामुळे काहीतरी खास खावं म्हणून थोडेफार फराळाचं तयार करून घेतात. सूर्यास्तानंतर घरच्या सर्वांसोबत इफ्तार केला जातो. इफ्तार नंतर नमाज पढतात. मग रात्रीचे जेवण उरककल्यानंतर रात्रीची ''तराविह'' ही खास दीर्घ नमाज पढली जाते. काही ठिकाणी महिलांची स्वतंत्र तराविहची नमाज होते, त्याचे नेतृत्व महिला-मौलवीच (आलेमाच) करते. रात्री त्या आराम करतात.  अशाप्रकारे महिलांचा रमजानची दैनंदिनी संपते. यात पुरुष मंडळीही त्यांना नक्कीच हातभार लावतात, पण किचनक्वीन असतात त्या फक्त महिलाच!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

रमजानच्या पवित्र महिन्यात पहाटे रोजेदारांना उठवण्यासाठी घरोघरी जाऊन भक्ती गीते गाण्याचे काम 'मेसहेराती' करतात. त्यांच्या कार्याचा हा परिचय
सहेरी करण्यासाठी लोकांना जाग आणण्याकरिता काही लोकं घरोघरी जाऊन आवाज देऊन उठवतात. त्यांना 'मेसहेराती' म्हणतात. हे मेसहेराती लोकं गल्ली बोळात फिरून काही खास भक्ती गीते गात असतात, त्यांना ''सदा ए रमजान'' देखील म्हटले जाते. याला आपण 'रमजानची भूपाळी' म्हणू या.

सर्वात पहिले मेसहेराती आदरणीय बिलाल हबशी (निग्रो) होते. जुन्या काळात भा.रा. तांबेंची भूपाळी ''उठ उठी गोपाळा ...'' ही फार प्रसिद्धीस पावली होती. कारण सकाळी उठण्याचे महत्व जुन्या लोकांना कळले होते. सकाळी आणि विशेष करून पांढरं फाटण्यापूर्वीच्या वेळी वातावरणात एक प्लाझ्मा स्टेट तयार होते. म्हणजे एकावर एक असलेल्या हवेच्या थरावरचे ओझोनचे महत्वाचे थर हे खालील हवेच्या थरात मिसळले जाते आणि त्यावेळी प्रदूषणरहित शुद्ध हवा उपलब्ध होते. पण अशावेळी बंदिस्त घरात ढाराढूर झोपणारे निसर्गाच्या या देणगीला पारखे होतात. म्हणूनच आज वेगवेगळ्या रोगांनी थैमान घातले आहे. फार कमी जण याबद्दल जागृत आहेत.

यावेळी उठण्याचे फक्त शारीरिकच नव्हे तर आर्थिक कारणे देखील आहेत. उठायला उशिर झाला तर दिवसाची इतर कामे पुढे पुढे ढकलली जातात. कधी कधी त्या कामांसाठी अर्ध्या दिवसाची सुटी काढावी लागते तर व्यापाऱ्यांना दुकान अर्धा दिवस बंद करावे लागते. सकाळी उठून दुकान उघडणाऱ्यांचा धंदा नेहमीच जोरात असतो. म्हणूनच त्या एकमेव अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी म्हटले आहे -
''पहाटेचं झोपणं हे रोजीरोटीला आडकाठी आणणे आहे.''

अशाप्रकारे सहेरच्या वेळी खाने हे रोजाधारकाला फक्त अध्यात्मिक आणि शारीरिकच नव्हे तर आर्थिक फायद्याच्या सवयीदेखील लावते.
पण आजकाल अलार्म घड्याळे, मोबाईल अलार्ममुळे या मेसहिरातींची गरज नाही, असे सांगण्यात येते. म्हणून हे मेसहेराती शहरी भागातून लुप्त झाले आहेत. पण आलं;अलार्म वाजल्यानंतरही घडीचे बटन किंवा मोबाईल अलार्मचे 'स्नूज'ऐवजी 'डिसमिस'चे बटन दाबून पुन्हा झोपणारे तरुण महाभाग खूप आहेत. अशा लोकांना सकाळी उठणे हे एक दिव्य वाटते. काही देशात तर अलार्म वाजल्यावर इलेक्ट्रिक पलंग हा आपोआप वर खाली हलवून त्यावर झोपणाऱ्याला जागे करतो, अशी व्यवस्था केलेली असते. तेव्हा माणसाची जागा मशीन घेऊच शकतं नाही, हेच खरं. त्यामुळे आजही या मेसहेरातीची गरज आहेच आहे.

ग्रामीण भागात आजही हे मेसहेरातीं बाकी आहेत. परंतु त्यांना आता फार विकृत नाव देण्यात आले आहे - ''सहेरी के फकीर''. खरे म्हणजे हे भिकाऱ्यांचे काम नाही, यापूर्वी नव्हते. एक धर्मकार्य आणि समाजकार्य म्हणून विनामूल्य ही सेवा केली जात होती, त्यामुळे त्या कार्याची अस्मितादेखील जिवंत होती. परंतु आज त्यांना 'सहेरी के फकीर' म्हणून ईदच्या दिवशी थोडं जास्त धान्य दान (फितरा) म्हणून दिला जातो. हे काम कुणी दुसरे करत नसल्यामुळे आणि पोटाला प्रपंच देखील लागलेला असल्याने जे फकीर लोकं हे करत आहेत, तेही काही कमी नाही. काही मेसहेराती भूपाळीसोबतच खंजेरी, डफलीदेखील वाजवतात. याचा फायदा सकाळी उठणाऱ्या मुस्लिमेतर चाकरमान्यांनाही होतो. आज झोपलेल्या समाजाला बोधप्रत भूपाळी गाऊन जागे करणाऱ्या मेसहेराती आणि मराठीत अजरामर प्रभातगीते लिहिणाऱ्या भा.रा.तांबेंची खरंच गरज आहे!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

इस्लाम धर्मात चंद्राचे नेमके काय महत्व आहे, त्याविषयी असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी रमजाननिमित्त केलेले विवेचन.
मशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारण्पणे चंद्रकोरीच्या उपयोग केला जातो. पहिली चंद्रकोर पाहूनच रमजानचे रोजे सुरु होतात आणि त्यानंतर येणाऱ्या 'शवाल' या अरबी महिन्याच्या सुरुवातीला चंद्रकोर पाहूनच रमजानची सांगता होते आणि दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. अशाप्रकारे ही चंद्रकोर एकप्रकारे नैसर्गिक कॅलेंडरच आहे. कुरआनात  याविषयी म्हटले आहे -
''तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरीत्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. '' - कुरआन  (10:5)
या श्लोकात वाढत्या आणि कमी होणाऱ्या चंद्रकला या फक्त तारखा निश्चित करण्यासाठीच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले आहे. यापेक्षा जास्त चंद्राचे महत्व इस्लाम धर्मात नाही.
मशीद, मदरसा किंवा मुस्लिमांची लग्न पत्रिकेवर बहुतेकवेळा चंद्रकोर काढलेली असते. तुर्कस्थान, पाकिस्तान या मुस्लिमबहुल देशांच्या राष्ट्रध्वजावरही चंद्रकोर काढलेली असते. त्यामुळे आमच्या बऱ्याच मुस्लिमेतर बांधवांचा असा गैरसमज होतो कि, मुसलमान हे चंद्राची पूजा करत असतात.
मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सण १९२४ पर्यंत मुसलमानांची एक वैश्विक सत्ता होती, त्याचे मुख्यालय तुर्कस्थानातीळ इस्तंबूल होते. तेथील खलिफा हा जगातील समस्त मुस्लिमांचा खलिफा गृहीत धरला जात होता. त्या उस्मानी खिलाफत (राज्य प्रणाली)च्या ध्वजावर हिलाल (चंद्रकोर) होती. तेव्हापासून मुस्लिमांचे एक सांस्कृतिक चिन्ह चंद्रकोर बनले. अशाप्रकारे यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. परंतु याला काहीही धार्मिक आधार मुळीच नाही. चंद्र एक उपग्रह असून तो आपले काहीही बरे वाईट करू शकत नाही, तो पूज्य अजिबात नाहीये, ही समस्त मुस्लिमांची धारणा आहे, इस्लामचीही तीच भूमिका आहे. फक्त मुस्लिम समाज सौर कालगणना (सोलर केलेंडर) ऐवजी  ''चांद्र कालगणना (लुनार केलेंडर)'' नुसार आपले धार्मिक सण उत्सव साजरा करत असतो आणि ही कालगणना चंद्रावर अवलंबून असते.
चंद्र कालगणनेनुसार वर्ष हे ३६५ ऐवजी ३५५ किंवा ३५४ दिवसांचेच असते. त्यामुळे सौर कॅलेंडरच्या वर्षाच्या तुलनेत ते दरवर्षी दहा दहा दिवस मागे मागे येत असते. त्यामुळे पूर्ण ३६ वर्षात रमजान हा महिना पूर्ण इंग्रजी वर्षात फिरत असतो. त्यामुळे रमजान हा एखाद्या देशात कधी कडक उन्हाळ्यात तर कधी थंड हिवाळ्यात तर कधी ओल्या पावसाळ्यात येतो. त्यामुळे प्रत्येक देशाच्या नागरिकांना नेहमीच एकाच ऋतूत रोजे ठेवण्याची पाळी येत नाही. सौर कॅलेंडरनुसार जर रोजे ठेवले गेले असते तर काही विशिष्ट देशांना भर उन्हाळ्यात दर वर्षी रोजे ठेवावे लागले असते. पण चांद्र कालगणनेचा हा नैसर्गिक फायदा रोजेधारकांना होतो. अशाप्रकारे निसर्गनियमांवर आधारित इस्लाम धर्म हा निसर्ग नियमांचे पालन करण्याचे एकप्रकारे संकेत देतो. कारण इस्लाम हा नैसर्गिक धर्म आहे. रमजानमधील आकाशातील चंद्रकोर जणू स्मित हास्य करत हेच सांगत असते.

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

जशी सहिष्णुता एक प्रवूत्ती आहे, तशीच दहशतवाद हीदेखील एक प्रवृत्ती आहे. असंयम, असहिष्णुता व कुणाचीही भिती मनात नसणे ही प्रवृत्ती म्हणजे दहशतवाद होय. कायदा, पोलीस व सरकारी यंत्रणा कुणाचं काहीही बरंवाइट करू शकत नाही कारण या ऐहिक संस्थांना अनेक मर्यादांनी वेढलेले आहे. अमर्याद अशा एका प्रचंड सार्वभौम शक्तीची भिती माणसावर असणे आवश्यक आहे. ती शक्ती म्हणजे ईश्वर होय. ईश्वराची प्रेमयुक्त भिती मनात जपण्यासाठी उपवास हे प्रभावी साधन आहे. सध्या उपवासांचा रमजान महिना सुरू आहे. यानिमित्त दहशतवादाच्या निर्मूलनात रमजान कसे सहकार्य करू शकतो यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे. 
रमजान महिन्यात ईश्वराने त्याचा सर्वात शेवटचा ग्रंथ कुराणाचे अवतरण केले. कुराण हा रमजानचा आत्मा आहे. कुराणावर जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आचरण करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी उपवास ठेवले जातात. शांततेचा संदेश देणाऱ्या कुराणाला आत्मसात करण्यासाठी उपवास ठेऊन आपल्या अंतकरणात ईशपरायणतेचा प्रकाश आवश्यक आहे. कारण कुराणाची शिकवण ही मानवाच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकते. कुराणात ईश्वर सांगतो:
‘‘... खुनी अथवा जगातील दहशतवाद्यांशिवाय इतर कुणालाही ज्याने ठार केले त्याने जणू समस्त मानवांना ठार केले आणि ज्याने एखाद्याचा जीव वाचविला त्याने जणू समस्त मानवांचा जीव वाचविला.’ परंतु त्यांची (इस्रायली लोकांची) अवस्था अशी आहे कि, आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड-उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात भूतलावर आंतक माजविणारे मोठ्या संख्येने अतिरेकी आहेत’’
-भावार्थ:  कुराण (५-३२)
इस्रायली लोकांना उपदेश देण्यासाठी आलेल्या प्रेषितांवर अवतरित ग्रंथांवर त्यांची श्रद्धा असल्याचे ते सोंग करत होते. परंतु त्यावर आचरण न करता भूतलावर दहशतवाद पसरविण्याचे घृणास्पद काम करत होते. कारण त्यांची ग्रंथावरची श्रद्धा प्रामाणिक नव्हती. प्रामाणिक श्रद्धेसाठी ईश्वराच्या प्रकोपाची भिती, ईशप्रेम व ईश्वराच्या कृपेची अभिलाषा या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. यालाच तकवा म्हणजे ईशपरायणता म्हणतात. ही ईशपरायणता नसानसात भिनली पाहिजे यासाठीच रमजान महिन्यात उपवास हे कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले आहे. म्हणून हे उपवास ठेवणाऱ्यांनी कुराणानुसार आचरण करायलाच हवं हे ओघानं आलंच. उपरोक्त श्लोकावरून कळते कि, जगभरातला दहशतवाद समूळ नष्ट करण्याची जबाबदारी उपवास ठेवणाऱ्यांची आहे. त्यांनी कुराणाच्या शांती संदेश जगभरातल्या समस्त मानवांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. उपवासामुळे संयम, सहिष्णूता व ईश्वराची प्रेमयुक्त भिती म्हणजेच ईशपरायणता उत्पन्न होऊ शकते. गरज आहे फक्त उपवासाची वास्तविकता समजून उपवास ठेवण्याची, कुराणावर आचरण करण्याची आणि त्याचा सर्वांना परिचय करून देण्याची! अशाप्रकारे रमजान व रोजे यांच्या संस्कारातून येणाऱ्या सहिष्णुतेचा सुगंध वर्षभर दरवळू द्या, आमीन!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

माणूस हा समाजशील, दुसऱ्या शब्दात, कळपात राहणारा प्राणी आहे. संवाद हा समाजाचा आत्मा असतो. पण आज सोशल मीडियाच्या युगात संवादच हरवलाय. आज लाखो कोस दूरवरच्या माणसाशी चॅट करायला वेळ आहे पण आपल्याजवळ शेजाऱ्यांसाठी दोन मिनिटे नाहीत. अशावेळी गेट टू गेदर, स्नेह संमेलनं फायदेशीर ठरतात. अशाचप्रकारे रमजान व ईदनिमित्तदेखील परस्पर सुसंवादाच्या माध्यामातूनही जातीय सलोखा कायम राहू शकतो. इफ्तारच्या फराळाचा आस्वाद घेतांना शिरकुर्म्याच्या दुधात साखर व कुर्मा (खारिक/खजूर) मिसळावी त्याप्रमाणे ईदच्या दिवशी माणसांची मनं एकमेकांत मिसळतात. धन्य-धन्य तो अल्लाह! ज्याने आम्हाला विविधतेने नटलेल्या या देशात जन्मास घातले! गरमागरम सुगंधीत शिरकुर्मा रिचवताना गप्पा रंगतात. ‘काय खबरबात, खुशाल? वावरात काय पेरलं आणि पोरगी कुठे दिली? यासारख्या विषयांवर गप्पा मारल्या जातात. तर तरूण घोळक्यात ‘ग्रॅज्युएशननंतर काय करणार? किंवा ईदनिमित्त कोणत्या टॉकीजवर कोणता नवीन पिक्चर लागला’ वगैरे.
 पण इतर खाजगी गोष्टींसह ज्या मुख्य मुद्यावर चर्चा होणे अपेक्षित असते, त्यावर सहसा कुणी बोलत नाही, तो म्हणजे या ईदचा, रमजानचा मूळ उद्देश! कोणतीही गोष्ट आपण का करतो हे जर ती गोष्ट करणाऱ्याला माहीत असणे अभिप्रेत असते. त्यामुळे कोणताही धार्मिक उत्सव किंवा विधी आपण का पार पाडत आहे हेही प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याविषयी आपण एकमेकांना विचारायला हवे. ‘कपडे कितीला घेतले' किंवा ‘शिरकुर्म्याचं दूध काय भाव घेतलं’ अशा शुल्लक गोष्टींऐवजी ‘‘ईदच्या दिवशी जिथे नमाज पढली जाते, त्या ईदगाहच्या मैदानावर मूर्ती किंवा काहीही अधिष्ठान मांडलेले नसते. मग तिथं उपासना होते तरी कशाची?" "तुझा देव कोणता?" "तुझे देव किती ?", "तुझा ग्रंथ कोणता?"" तो कुणी लिहिला अन् कुणी सांगितला?" या सर्व प्रश्नांवर बिनधोक मुद्देसुद चर्चा व्हायला हवी. "नाही बा! धर्माबिर्माचं काही विचारायचं नाही. उगीच त्याला राग आला तर?" ही भीती नको. एकमेकांच्या श्रद्धा, धर्मभावना समजून घ्यायला हव्या. मनात साचलेल्या गढूळ डोहाला रमजाननिमित्त मोकळी वाट करून द्यायला हवी. आपण सर्व एकच वडिल आदम व एकच आई हव्वाची संतती असून परस्परांचे बांधव आहोत, एकाच ईश्वराचे भक्त आहोत, असा संदेश देणारे कुरआन रमजानमध्ये अवतरीत झाल्याची आणि त्यामुळेच रमजान साजरा केला जात असल्याची माहिती सर्वांना करून देण्याची गरज आहे. त्यासाठी संवादाची गरज आहे, सोशल मीडियावर "तू तू - मै मै" ची नव्हे! या रमजानच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा सामाजिक संवादाला नवी झळाळी देऊ या इन्शा अल्लाह!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान इस्लामचे अभ्यासक आहेत)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget