Latest Post

 -अनुवादक : अब्दुल हुसैन मनियार
    या पॉकेट साईझ पुस्तिकेत मानवी जीवनात आदर्शाची आवश्यकता सांगितली गेली आहे. आदर्श खरेतर मापदंडाचे काम करतो.
    पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन समस्त मानवजातीसाठी आदर्श आहे. त्याचे संपूर्ण जीवन प्रकाशासारखे स्पष्ट आहे. या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अत्यल्प जीवन चरित्राची झलक आणि त्यांच्या शिकवणुकीची झलक देण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 31     -पृष्ठे - 8     मूल्य - 06         आवृत्ती - 5 (2014)




डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/ral3g6xva7qvclq602ubwroo9ec5e2nf


  - एस. एम. इक्बाल
    या पुस्तिकेत लेखकाने सांगितले की, सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळते. परंतु मनुष्याने परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे.
    इस्लामचा संक्षिप्त परिचय देवून आणि जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन सांगितला आहे. अल्लाहने जेव्हा जेव्हा पैगंबर या पृथ्वीवर पाठविले तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोहचविला हे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 30     -पृष्ठे - 24     मूल्य - 10       आवृत्ती - 3 (2012)


डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/sotnn36kc0n7o1pofqcpxk0eko3whhx8


- नौशाद उस्मान

मजानचा अनेक अंगाने अभ्यास केला जाऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनेदेखील रमजानचे काय महत्व असू शकते ते आज आपण पाहू या.

मूळात रमजानचा महिनाच माणसाला एखाद्या घोड्यासारखा चपळ बनवण्यासाठीच असतो. रोजा हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ "दिवस" किंवा "वार" होतो. हिंदूमध्ये जसं उपवासासाठी "वार धरणं" म्हणतात तो वार, पण रोजा आठवड्यातील विशिष्ट वारालाच ठेवला जातो असे नाही. रोजा फक्त दिवसाच ठेवला जातो, रात्री नाही, म्हणून कदाचित त्यासाठी ''दिवस (रोजा)'' शब्दप्रयोग केला गेला असेल. कुरआनात रोजा हा शब्द नसून मूळ अरबी शब्द "सौम" आहे. अरबस्थानात एखाद्या घोड्याला अधिक चपळ बनविण्यासाठी त्याला काही दिवस उपाशी ठेवलं जायचं, अशा उपाशी घोड्याला "फरजूस- सौम (उपासधारक घोडा) " म्हटलं जायचं. तो लांबच्या प्रवासासाठी किंवा युद्ध मोहिमेवर कामी येत असे. रमजानचा रोजा देखील कुणाच्या अंगात आळस असेल तर तो काढून त्याला चपळ बनवितो आणि कुणी चपळ असेल तर त्याला आणखी चपळ, चाणाक्ष बनवितो. कारण जास्त जेवण केल्याने सहसा स्थूलता वाढत असते, आळस येतो. म्हणूनच परीक्षेला जातांना जास्त खाऊन जाऊ नये असं तज्ज्ञ सांगत असतात.

चपळता हा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा नेहमीच एक अविभाज्य भाग असतो. आळसी व्यक्तिमत्व काहीही कामाचं नसते आणि ते दुसऱ्याला आवडतही नसते.

चपळतेमध्ये जो सर्वात महत्वाचा गुन असायला पाहिजे तो म्हणजे वक्तशीरपणा. रमजानच्या सर्व उपासनांचे वेळापत्रक ठरलेले असते. वृत्तपत्रात तुम्ही वाचतच असाल कि, आजका इफ्तार, कल की सहेरी. त्यात इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी सहेरी आणि इफ्तार करायची वेळ दिलेली असते. रमजानच्या आधीच्या शुक्रवारी मशिदीबाहेर रमजानचे छापील वेळापत्रक वितरित केले जाते. अनेक मुस्लिमेतरांच्या कंपन्यादेखील आता  जाहिरातीसाठी असे वेळापत्रक वितरित करत आहेत.

फक्त रमजानच नव्हे तर इतर महिन्यातही नमाज ही वेळेवरच अदा करायची असते. परंतु रमजानमध्ये तराविह ही विशेष नमाज इमामच्या नेतृत्वातच पढली जाते, कारण त्यात संपूर्ण कुरआन महिनाभर थोडे थोडे मुखोदगत पढले जाते आणि संपूर्ण कुरआन प्रत्येकाला मुखोदगत असत नाही. म्हणून एकाच मशिदीत अगदी वेळेवर नमाजला हजर राहण्याचा अनेक जन प्रयत्न करत असतात.

हा रमजानचा सगळा ताळेबंद हा महिना सुरु होण्यापूर्वीच ठरवावा लागतो, सगळं नियोजन करावं लागतं. यासाठी ''इस्तेकबाल ए रमजान (रामजानचे स्वागत)'' म्हणून अनेक संघटना कार्यक्रम घेतले जातात.
अशाप्रकारे वक्तशीरपणा पाळणे, नियोजन करणे, सतत क्रियाशील राहणे, समय सूचकता पाळणे, कामात दिरंगाई, आळस न पाळणे, सकाळी लवकर उठणे हे संस्कार महिनाभर रोजाधारकांवर होत राहिल्याने त्याचं व्यक्तिमत्व उजळून निघते. ज्यांनी इमाने इतबारे पूर्ण रोजे ठेऊन तराविह अदा केली, त्यांचं व्यक्तिमत्व ईदच्या दिवशी तेजाळलेले असते, इमानचे एक भारदस्त तेज त्यांच्या  चेहऱ्यावर दिसते. अशाप्रकारे रमजान व्यक्तिमत्व विकासातही योगदान देतो. फक्त गरज आहे त्या बहुउद्देशीय महिन्याचा प्रत्येक अंगाने अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करण्याची.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

- नौशाद उस्मान

रमजान मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा महिना. या महिन्यातच प्रेषितांनी मक्केवर विजय मिळवतानाच शांतीचा संदेश दिला होता. कसा ते समजून घेऊया

रमजानमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. बद्रच्या युद्धाखेरीज काही वर्षांनी आणखी एक युद्ध होता होता वाचले आणि युद्ध न होताच शांतीच्या मार्गाने रक्तहीन क्रान्ती घडली होती. हो,   रमजानमध्येच प्रेषितांनी मक्का शहरावर विजय मिळवला होता. त्याची पार्श्वभूमी आपण सुरुवातीला समजून घेऊ.

प्रेषित आदम यांच्यापासून तर प्रेषित इब्राहिम (यांचा इ.स.पूर्व १८६१ मध्ये जन्म म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या २,४३१ वर्षांपूर्वी) आणि प्रेषित इस्माईल (जन्म- इ.स.पूर्व १७८१ म्हणजे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या २, ३५१ वर्षांपूर्वी) यांच्यापर्यंत काबागृहात एकाच निर्गुण निराकार अल्लाहची उपासना होत होती. तीस चाळीस फूट उंच, लांब आणि जवळपास तेवढीच रुंद चौरस इमारत असलेल्या काबागृहात त्याकाळी काहीही मांडलेले नव्हतं, आत स्वच्छ जागा होती फक्त अल्लाहच्या उपासनेकरिता. प्रेषित इस्माईल नंतर मात्र खूप वर्षांनी हारिस इब्न अमीर नावाचा एका पुढाऱ्याने सीरियाहून काही मुर्ती आणून काबागृहात ठेवल्या. उज्जा, मनात, लात, हुबल अशी त्या मुर्तींची नावं होती.  त्यानंतर तिथे त्या मुर्तींची पूजा होऊ लागली. (संदर्भ: मुस्लिम मनाचा शोध, ले. प्रा.शेषराव मोरे) अशाप्रकारे काबागृहात पुरोहितगिरी सुरु झाली होती. तसेच तिथे ज्योतिषगिरीदेखील वाढली होती. लहान सहान कामासाठी लोकं तिथे फल ज्योतिष्य पाहायला यायचे. तिथले पुरोहित तिथल्या भोळ्या भाबड्या बहुजन जनतेचे शोषण करत होते. अशा या पुरोहितगिरीतून प्रेषित मुहम्मद सल्लम यांना काबागृहाला आणि पर्यायाने समस्त जनतेलाच मुक्त करायचं होतं. त्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्लम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रस्थापितांविरुद्ध चळवळ सुरु केली होती. पण प्रस्थापितांनी प्रचंड छळ केल्याने त्यांनी सहकाऱ्यांसह मक्केहून मदिनेकडे स्थलांतर केले होते.

मदिनेत समतावादी व्यवस्था कायम केल्यानंतर काही वर्षांनी प्रेषितांनी मक्केकरांसोबत ''दोन्ही पक्ष एकमेकांच्या लोकांवर हल्ला करणार नाहीत'' असा शांतता करार केला होता. पण मक्केकरांकडच्या लोकांकडून या कराराचा भंग झाल्यामुळे प्रेषितांनी दहा हजारांची फौज सोबत घेऊन मक्केकडे कूच केले. प्रेषित आणि त्यांचे सैन्य मक्केजवळील एका डोंगराजवळ थांबले. प्रेषितांनी रात्री प्रत्येक सैनिकाला दहा दहा चुली पेटवायला सांगितले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात दहा हजारांनी पेटवलेल्या एक लाख चुलीच फक्त डोंगरावरून बघत असलेल्या मक्केकरांना दिसत होत्या. ते पाहून मक्काप्रमुख अबू सुफियान शरण आले. तेदेखील प्रेषितांचे अनुयायी बनले. अशाप्रकारे रक्ताचा एक थेंबही न सांडता प्रेषितांनी २० रमजान हिजरी ८ (११ जानेवारी इ.स. ६३०) ला मक्केवर विजय मिळविला आणि सर्व सैनिकांसह मक्का शहरात प्रवेश केला. काबागृहात जाऊन तेथील सर्व मुर्तींचे अतिक्रमण तेथून काढून काबा स्वच्छ केले. आता प्रेषित आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची हीच वेळ होती. पण प्रेषितांनी सर्वांना सांगितलं कि, ''जा माफ केलं तुम्हाला.'' क्षमा आणि दयेचा हा कळस आहे.

त्यांनतर आफ्रिकन आदिवासी समाजातून आलेले आदरणीय बिलाल हबशी यांनी काबागृहावर उभे राहून मक्केतली पहिली अजान दिली. हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या एका पुरोहितवाद्याने पाहिले आणि तो पुटपुटला कि, ''माझा बाप आज जिवंत असता तर हे दृश्य (आफ्रिकन आदिवासी समाजातला माणूस काबागृहावर पाय देऊन उभा असल्याचे दृश्य) पाहून तो दुःखावेगाने मरून गेला असता.'' इतका भयानक असलेला वर्णवाद, पुरोहितवाद प्रेषितांनी संपविला.

मक्का विजयानंतर केलेल्या आयुष्यातील त्यांच्या अंतिम प्रवचनात प्रेषितांनी घोषणा केली कि, आज मी सगळा वर्णवाद माझ्या पायाखाली तुडवलाय. कोणत्याही अरबाला कोणत्याही अरबेतरावर आणि कोणत्याही अरबेतराला अरबावर श्रेष्ठत्व नाहीये तसेच कोणत्याही काळ्याला गोऱ्यावर आणि गोऱ्याला काळ्यावर श्रेष्ठत्व नाहीये. तुम्ही सगळे आदमची संतती आहात आणि आदम मातीपासून बनलेले होते.''
अशाप्रकारे रमजान महिन्यात झालेली ही इमान, समता, बंधुता, न्याय व बंधुभावावर आधारित रक्तहीन झालेली क्रान्ती म्हणजे मक्का विजय होय. ही घटना रमजानच्या वीस तारखेला घडली होती. म्हणून आजही अनेक जागी विसाव्या रोजच्या दिवशी ''फतेह मक्का'' (मक्का विजय)''चा कार्यक्रम घेतले जातात आणि लोकांचे या ऐतिहासिक घटनेतून अहिंसेचे महत्व विशद केले जाते. इस्लामवर रक्तपाताचा आरोप करणाऱ्यांना ही ऐतिहासिक रक्तहीन क्रान्ती म्हणजे एक सडेतोड उत्तरच म्हणावे लागेल.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

- नौशाद उस्मान

रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात मशिदीत एका कोपऱ्यात काही लोकं एकांतवासात जातात, त्याला ''एतेकाफ'' म्हणतात. त्या परंपरेची माहिती


कल्पना करा कि,  समजा एकेरात्री आपण झोपेत असतांना कुणीतरी आपल्याला पलंगासहित उचलून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेऊन दिले तर सकाळी उठून आपण काय करणार? लागलीच त्या हॉटेलमधील सुखसोयींचा सर्रास वापर करायला सुरुवात करणार का? नाही. आधी याची माहिती काढणार, आपल्याला इथे कोण आणि कशासाठी आणलं? इथे आपण ज्या सुविधा घेणार आहोत त्याचा शेवटी हिशोबही द्यावा लागेल की असेच सुटणार आहोत? 

तसंच आपण या जगरूपी पंचतारांकित हॉटेलमध्ये आईच्या कुशीत डोळे उघडलेत आणि या हॉटेलमधील सोयीसुविधांचा लाभ घेऊ लागलो. पण याचा विचार आपण करतो का की, आपल्याला इथे आणणारा कोण आहे? की या सर्व सोयी सुविधा, या नैसर्गिक देणग्यांचा कुठेतरी हिशोबही द्यावाच लागणार आहे का?

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एवढा विचार करायची कुणाला उसंतच मिळत नाही. म्हणून नेहमीच्या दैनंदिनीतुन काही दिवस काढून एकांतात चिंतन मनन करणे आवश्यक आहे. थोडे एकांतात थांबून स्वतःचा, स्वतःच्या भोवतालच्या जगाविषयी आत्मचिंतनदेखील करणे आवश्यक आहे. आपलं लक्ष्य काय आणि त्यासाठी आपण आतापर्यंत केलेले प्रयत्न किती? कशासाठी करायचे वगैरे या सर्व गोष्टींकडे माणसाचं कधी कधी दुर्लक्ष होते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपला निर्मिक कोण? त्याला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागणार आहे कि नाही? त्याने आपल्यासाठी ग्रंथरूपी जे मार्गदर्शन प्रेषितामार्फत दिले आहे, त्यात एक माणूस म्हणून माझे काय कर्तव्य आहे? 
या सर्वांसाठी त्या ग्रंथाचे वाचन, पठन, चिंतन मनन, अल्लाहचे नामःस्मरण करण्याकरिता रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात मशिदीत एका कोपऱ्यात काही लोकं एकांतवासात जातात, त्याला ''एतेकाफ'' म्हणतात. 

प्रेषित मुहम्मद सल्लम रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांत एतेकाफ करत असत. त्यांच्या पत्नी आदरणीय आयेशा सिद्दिका निवेदन करतात कि, ''अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (सल्लम) रमजानच्या अखेरच्या दहा दिवसांत एतेकाफ करायचे आणि जगाचा निरोप घेईपर्यंत त्यांनी हे (ही परंपरा) सुरूच ठेवले होते.'' (संदर्भ: हदिस अल-बुखारी शरीफ)
एतेकाफ सर्वसाधारणपणे मशिदीतच केला जातो. काही उलेमा मशिदीबाहेर एखाद्या खोलीतही एतेकाफ करण्याचे मान्य करतात. इराणची राजधानी तेहरानमधील विद्यार्थी तर चक्क विद्यापीठातच एतेकाफ करत असल्याची छायाचित्रे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. महिला घरीच एका खोलीत एकांतात एतेकाफ करतात. 
एतेकाफमध्ये एकदा का मशिदीत प्रवेश केला तर फारच महत्वाचं काम (एखाद्या अंत्ययात्रेत जाण्यासारखे काम) असल्याखेरीज पूर्ण दहा दिवस बाहेर पडता येत नाही. जेवणे, झोपणे आणि इतर सर्व कामे मशिदीतच केले जातात. मशिदीत यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. सांयकाळी सूर्यास्तानंतर मशिदीत प्रवेश केला जातो ते दहाव्या दिवशी सूर्यास्तापर्यंत मशिदीतच मुक्काम केला जातो, बाहेर पडता येत नाही. यादरम्यान कुणाशीही अनावश्यक गप्पा मारता येत नाही. मौन राहण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त कुणाला काही महत्वाचे असेल तर बोलू शकता. सहेरी आणि इफ्तार तसेच रात्रीच्या जेवणासाठी घरची मंडळी मशिदीतच डबा पाठवत असतात. 

एतेकाफमध्ये सर्वसाधारणपणे रोजच्या नमाजसह अल्लाहचे नामःस्मरण करणे, कुरआनचे चिकित्सक पद्धतीने अध्ययन करणे, हदीस (प्रेषित वचन) चे अध्ययन करणे, दुसऱ्या मुतकिफ (एतेकाफकरी लोकांचे) प्रबोधन करणे किंवा त्यांच्याकडून प्रबोधन करवून घेणे  आणि आराम करणे तसेच इतर विधी उरकणे यांचा समावेश असतो. यादरम्यान माणूस आपल्या घर संसाराशी दूर असल्याने पूर्ण एकाग्रचित्त होऊन अल्लाहची आराधना करू शकतो, चिंतन मनन करू शकतो. अनेक लोकांना दहा दिवसांचा एतेकाफ शक्य नसतो, तेंव्हा शेवटच्या एक किंवा तीनच दिवसांचा एतेकाफ करतात. आदल्या दिवसाच्या सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत एक दिवस गृहीत धरला जातो. एतेकाफ संपल्यानंतर प्रपंचासाठी घरी परत येतांना नव्याने जीवन सुरु करत असल्याचा आभास होतो, कारण एक नवी ऊर्जा याद्वारे मिळालेली असते.


(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

- नौशाद उस्मान

एरवी फक्त पाच वेळची नमाजच पढली जाते. परंतु रमजानमध्ये उशिरा रात्री जगभरातील सर्वच मशिदीत सामूहिकरीत्या अधिकची एक विशिष्ट दीर्घ नमाज पढली जाते, त्याला तराविह म्हटले जाते. रात्रीची ('इशा'ची) नमाज झाल्यानंतर लगेच ही नमाज पढली जाते. आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या काळात ही नमाज वैयक्तिकरीत्या पढली जायची. परंतु प्रेषितांनंतरचे दुसरे आदर्श खलिफा आदरणीय उमर फारूक यांनी ती सार्वजनिकरित्या पढण्याची परंपरा सुरु केली. ही नमाज अनिवार्य (फर्ज) नसून सुन्नत (प्रेषित-परंपरा म्हणून) आहे.

यात सर्वसाधारणपणे कुरआनच्या ३० खंडांपैकी दररोज एक किंवा दुध खंड पठन केला जातो आणि अशाप्रकारे या नमाजमध्ये पूर्ण महिनाभरात एक कुरआन श्रवण केले जाते. या नमाजचे नेतृत्व करणाऱ्यांना पूर्ण कुरआन मुखोद्गत असते, अशा लोकांना ''हाफिज'' म्हणतात. मदरशात अनेक अभ्यासक्रमापैकी एक 'हाफिज' बनण्याचादेखील अभ्यासक्रम असतो. अनेक ठिकाणी गावोगावी असे हाफिज इतर शहरांतून महिन्याभरासाठी खास आमंत्रित केले जातात. महिन्याअखेरीस त्यांना मशिदीत मोहोल्ल्यातील लोकांतर्फे किंवा मशीद व्यवस्थापन समितीतर्फे भेट वस्तू देऊन कपडे व इतर खर्च देऊन सम्मान सत्कार केला जातो. 

या तराविहमध्ये वीस रकाअत नमाज पढली जाते. रकाअत हे नमाज पढण्याचे एकप्रकारचे एकक आहे. 'अल्लाह हू अकबर (याचा अर्थ अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, इथे अकबर बादशहाचा काहीएक संबंध नाहीये. अकबर म्हणजे सर्वश्रेष्ठ) असे हाफिजने म्हणताच सर्व जण दोन्ही हाथ कानांपर्यंत उंचावून नंतर पोटावर किंवा छातीवर दोन्ही हाथ एकमेकांवर बांधतात. नंतर हाफिज साहेब कुराणातील आयती (श्लोक) पठन करतात. सर्व जन खांद्याला खांदा लावून रांगांमध्ये शांतपणे ते कुरआन पठन ऐकतात. कुणीही इकडे तिकडे पाहत नाही. जणु सर्वांना समाधी लागली आहे. नंतर पुन्हा हाफिज अल्लाह हू अकबर म्हणतो. तेव्हा सगळे अर्धे वाकून घुडग्यावर हाथ ठेवतात. याला ''रूकुअ'' म्हणतात. हाफिज नंतर म्हणतात 'समिल्लाहू निअमल हमिदा (अल्लाहनं त्याचं ऐकून घेतलं ज्याने कुणी त्याचे स्तवन म्हटले). सर्वजण सरळ उभे राहतात. नंतर पुन्हा अल्लाहू अकबर असे हाफिजने म्हटल्यावर सगळे एका दमात नतमस्तक होतात, याला सजदा म्हणतात. असे एका नंतर एक दोन सजदे केले जातात. सजदा अशाप्रकारे सरळ उभे राहून कुराणाचे श्लोक ऐकणे, रूकुअ करणे, नंतर सरळ उभे राहूने, नंतर दोन सजदे करणे या नमाजच्या पूर्ण प्रक्रियेला एक रकाअत म्हणतात. तराविहमध्ये असे वीस रकाअत पढले जातात. 

प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी या तराविह मध्ये कधी आठ रकाअत तर कधी बारा तर कधी वीस रकाअत पढल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो. त्यामुळे काही मशिदीत आठ रकाअत तर काही मशिदीत वीस रकाअत तराविह पढली जाते. यामुळे अध्यात्मिक आणि पारलौकिक लाभ तर मिळतोच शिवाय शारीरिक व्यायामदेखील भरपूर होतो. अशाप्रकारे रमजानचे रोजे आणि तराविह हे भक्ताला ईशपरायण तर बनवतातच, शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि चपळ देखील बनवते जेणेकरून त्याचा उपयोग त्याला सामाजिक परिवर्तनाच्या कामात व्हावा. काही मशिदीत तर महिलांसाठीदेखील ही नमाज पढण्याची विशेष व्यवस्था केली जाते. 
या तराविहच्या नमाजमध्ये रात्रीच्या निरव शांततेत तल्लीन होऊन भक्ताचा भगवंताशी संबंध आणखीनच दृढ होत जातो.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

- नौशाद उस्मान

जगातले ते फार मोजके युद्ध ज्यांनी जगाच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींवर दूरगामी परिणाम झाला, त्यापैकी एक असलेले प्रेषितकालीन युद्ध म्हणजे ''बद्रचे युद्ध'' जे रमजान महिन्यातच घडले होते. रमजान, रोजे आणि त्या युद्धाचा कसा संबंध आहे, ते जाणून घेण्यासाठी त्या युद्धाची माहिती घेणे आवश्यक आहे.
पार्श्वभूमी -
प्रेषित मुहम्मद सल्लम यांची चळवळ मक्केतल्या प्रस्थापितांच्या पुरोहितगिरीच्या मुळावरच उठली होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्लम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ सुरु केला होता. मर्यादेपेक्षा जास्त छळ सुरु झाल्यामुळे शेवटी त्यांनी मदिन्याकडे स्थलांतर (हिजरत) केले. प्रेषितांच्या मक्केतील अनेक अनुयायिनींही हिजरत केली. मदिन्यात स्थायिक झाल्यानंतर तिथे त्यांनी इमान, न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्यवर आधारित एक व्यवस्था कायम केली. त्यामुळे मक्केकर मोठ्या युद्धाच्या तयारीत होते. प्रेषितांच्या अनुयायींना मात्र सुरुवातीला कुणावरही हाथ उगारण्याची परवानगी नव्हती. पण हिजरतच्या दोन वर्षांनंतर स्वतः अल्लाहने (ईश्वराने) युद्धाची परवानगी कुराणाचा हा श्लोक अवतरवून दिली -
''ज्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारण्यात आलेले आहे, त्यांना (युद्ध करण्याची ) परवानगी देण्यात येत आहे. कारण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. अन अल्लाह त्यांना विजयी करण्यास निश्चितच समर्थ आहे. या लोकांना त्यांच्या घरातून अन्यायपूर्वक बाहेर घालविले गेले आहे. केवळ या कारणासाठी, कारण ते म्हणतात, ''आमचा पालनकर्ता (एकमेव) अल्लाह आहे.'' 
- कुरआन (२२: ३९-४०)

या श्लोकात संरक्षणासाठी युद्ध करण्याची त्या लोकांसाठी परवानगी दिली गेली आहे, ज्यांना घरदार सोडून लेकरांबाळांसोबत, आपल्या नातेवाईकांना सोडून देशाबाहेर विस्थापितांचे जीवन जगण्यास भाग पाडले गेले होते.

घडामोडी -
मक्केकरांनी मदिन्यावर हल्ला करण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसाठी पैसा गोळा करण्याचे ठरविले. त्यासाठी खास सत्तर व्यापाऱ्यांचा तांडा सैनिकांसह सीरियाला पाठविण्यात आला. मदिनेवर हल्ला करण्याची आर्थिक तयारी म्हणून पाठविलेला हा तांडा सीरियाहून परतत असतांना त्यांच्या सैनिकांवर हल्ला करण्याची योजना प्रेषितांनी बनवली.

प्रेषित त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बद्र या मोक्याच्या ठिकाणी निघाले. मात्र ते पोहोचण्याआधीच मक्केकरांचे आर्थिक केंद्र असलेला तो तांडा तिथून निसटला. त्या तांड्याचे नेतृत्व अबू सुफियानकडे होते. ते नंतर प्रेषितांचे अनुयायी बनले, पण या युद्धावेळी ते शत्रुपक्षाचे प्रमुख होते. त्यांना मुसलमान हल्ला करण्यासाठी येत असल्याचा सुगावा लागला आणि त्यांना कुमक पाठविण्यासाठी मक्केला निरोप पाठवला. परंतु मक्केची कुमक येण्यापूर्वीच ते माल घेऊन तांड्यासोबत मक्केकडे निघून गेले. त्यानंतर मक्केहून निघालेल्या जवळपास हजार सैनिकांची कुमक बद्र मध्ये येऊन धडकली आणि त्यांनी युद्धाचे आव्हान केले. प्रेषितांसोबत फक्त ३१३ अनुयायी होते, तरी त्यांनी अल्लाहवर विश्वास ठेऊन ते आव्हान स्वीकारले. 

दि. १७ रमजान हिजरी २ (१३ मार्च ६२४) चा तो ऐतिहासिक दिवस. प्रत्यक्ष लढाईपूर्वी प्रेषितांनी अल्लाहला स्मरून नतमस्तक होऊन प्रार्थना केली. 
युद्धापूर्वी प्रेषित नेहमी सैनिकांना खालीलप्रमाणे काही सूचना करत असत -
१) महिला व लहान लेकरांना मारू नका (संदर्भ: मुस्लिम शरीफ)
२) वृद्ध लोकांना आणि गुहेत असणाऱ्या भिक्कूना मारू नका. (संदर्भ: बैहिकी शरीफ, नायलूल औतार)
३) मजूर, कामगारांना ठार मारू नका (संदर्भ: अहमद शरीफ )
४) अपंग, दिन दुबळ्या लोकांना मारू नका (संदर्भ: अल - मुगनी )
५) शत्रूंच्या प्रेतांची विटंबना करू नका (संदर्भ: मुस्लिम शरीफ)
६) शरण आलेल्यांना ठार मारू नका (संदर्भ: कुरआन - ९:५ )
७) युद्धकैद्यांना खाऊ पिऊ घाला (संदर्भ: कुरआन - ७६:८) 
८) युद्धभूमीवरील झाडे, पिके विनाकारण उद्ध्वस्त करू नका, तेथील गुरं, ढोरं, जनावरांना विनाकारण इजा करू नका (संदर्भ: आलं-मुवत्ता)  
९) धर्मात कोणतीही जोरजबरदस्ती नाही. (संदर्भ: कुरआन २:२५६)
घोर युद्ध झाले. प्रेषितांचे हबशी (आफ्रिकन आदिवासी) असलेले सेवक आदरणीय बिलाल यांनी त्यांचा पूर्वाश्रमीचा अत्याचारी मालक उमैय्याला भाला फेकून ठार केले. शत्रूकडचे ७० ठार झाले, ज्यात शत्रूचा म्होरक्या अबू जहलही मारला गेला, तर प्रेषितांकडचे फक्त १४ जन शहिद झाले. प्रेषितांच्या अनुयायींना अल्लाहची मदत लाभली. म्हणूनच शत्रूचे जवळपास तिप्पट सैनिक असूनही इमानवंतांचा विजय झाला.
बोध -
अल्लाहवर विश्वास ठेऊन कोणतेही आव्हान स्वीकारले आणि युद्धसदृश्य परिस्थितीतही संयम आणि नैतिकता सोडली नाही तर विजय हमखास आपलाच असतो. मग रमजानच्या रोजा ठेवणाऱ्या सैनिकांनाही अल्लाह बळ पुरवितो. एकांतातही पाणी न पिणाऱ्या रोजाधारकाला अल्लाहच्या अस्तित्वावर, त्याच्या प्रभुत्वावर विश्वास असतो, हा विश्वास वृद्धिंगत करणे, हा तर रोजचा उद्देश आहे. तसेच आळस सोडून सामाजिक चळवळीत युद्ध पातळीवर कार्य करण्यासाठी चपळ बनविणेही याचा उद्देश आहे. सध्या फक्त सोशल मीडियावरच सक्रिय असणाऱ्या चळवळींनी या रामजाननिमित्त तरी आभासी विश्वातून थोडेसे बाजूला होऊन वास्तविकतेच्या जमिनीवर सक्रिय व्हावे हीच अपेक्षा!

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget