Latest Post

- बशीर शेख
9923715373

रमजान दु:ख हरण करणारा (गमगुसारी) महिना आहे. या महिन्यात पवित्र कुरआनचे अवतरण झाले आणि जगाला एक अशा जीवन व्यवस्थेची ईश्वरीय देणगी मिळाली की त्यानुसार चालणारा प्रत्येक व्यक्ती आनंदात राहू शकतो. त्याचे सर्व दु:ख हरण होऊन जातात. कुरआनचे आदेश सर्वांसाठी आहेत. त्यामुळे ते कोण्या एका जाती आणि समुहापुरते मर्यादित नाहीत. रमजानमध्ये कुरआन अवतरित झाल्यामुळे या महिन्याला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात, हज या पाच  इस्लामच्या मुलभूत तत्वांपैकी रोजा एक आहे.  रोजाचा मूळ उद्देश चारित्र्यनिर्मिती हा आहे. अल्लाहचे भय मनात वाढावे यासाठी रोजा ठेवला जातो. कारण अल्लाहचे भय असल्याखेरीज चांगले चरित्र असलेली माणसे निर्माणच होऊ शकत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे.
    या महिन्यात नमाज, रोजा, जकात, सदका, फित्रा व ऐच्छिक दान याला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे ऐपतदारच नव्हे साधारण आर्थिक स्थिती असलेले मुस्लिम सुद्धा या महिन्यात दानशूर बनतात. ते आपल्या मेहनतीच्या हलाल कमाईचे शुद्धीकरण करून घेतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात जकात अदा केली जाते आणि जकात दिल्याने देणार्याच्या संपत्तीचे शुध्दीकरण तर होतेच उलट त्यात वृद्धीसुद्धा होते. रमजानमध्ये केल्या जाणार्या जकात, सदका, फित्रा, खैरात इत्यादी मार्गाने केलेल्या अर्थत्यागातून प्रत्येकाला आत्मीक आनंद मिळतो. घेणार्याचीही आर्थिक चणचण दूर होते  आणि त्याला जीवन जगणे काही प्रमाणात सुसह्य होते.  यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावा करण्यासही बंद घातलेली असल्यामुळे प्रत्येक देणारा व्यक्ती हा काळजी घेतो की त्याची प्रसिद्धी होणार नाही. आणि ज्याला आपण दान देत आहोत त्यालाही अपमानित झाल्यासारखे वाटणार नाही.   दान देणार्या व्यक्तीबाबत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, जो कोणी या महिन्यात एक रूपयाही कुण्या गरजवंतांना दान करील त्याला त्याचा 70 पट मोबदला अल्लाह देईल. जकात काढणे अनिवार्य असल्यामुळे ती योग्य लोकांत देण्याची जबाबदारीही त्याच व्यक्तीवर आहे.
    सुरे तौबाच्या आयत नं. 60 मध्ये 8 व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह असे नमूद केलेले आहेत ज्यांना जकात दिली जावू शकते. 1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई)म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. माना सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात गुलाम व निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्गासाठी म्हणजे इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी सुद्धा जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी . वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    सदका (दान) : सदका देणे ऐच्छिक आहे. सदका देताना सांगितले आहे की, तो कुठलाही गाजावाजा न करता फार नम्रतेने द्यावा. ’सदका तुम्हारी जान व माल की हिफाजत करता है, अल्लाह गजब को ठंडा करता है’ असेही हदीसमध्ये नमूद आहे. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचाराने थरकांप होत असतो की आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे’ (कुरआन : अलमोमिनून- 60).
    खैरात (दान) : फकीर/भिकार्याला स्वेच्छेन दान देणे म्हणजे खैरात. याबद्दल असे म्हटलेले आहे की, फकीर आणि गरजवंतांसोबत नरमाईचा व्यवहार करा. त्यांच्याशी तुसडेपणाने वागू नका, त्यांना रूबाब दाखवू नका आणि आपले श्रेष्ठत्व त्यांच्यासमोर जाहीर करू नका. मागणार्याला देण्यासाठी तुमच्याकडे काही नसले आणि तो मागतच असेल तरी तुम्ही त्याला नरमाईने सांगा त्याची नम्रपणे क्षमा मागा, त्यामुळे त्याला काही दिले नाही तरी तो शांतपणे तुम्हाला दुआ देत जाईल. अल्लाहचा आदेश आहे, ” आणि मागणार्याला झिडकारू नका’. खैरात करणे पुण्याचे काम आहे.
    फित्रा : फित्रा देणे अनिवार्य केले गेले आहे. प्रत्येक श्रीमंत व्यक्तीवर त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे पावणे दोन किलो गहू किंवा तत्सम रक्कम गरजवंतांना दिली गेली पाहिजे. ईदच्या नमाज अगोदर त्यांना फित्रा देणे बंधनकारक केले गेले आहे. म्हणजे महिनाभर दान, पुण्य तर कराच करा उलट ईदचा आनंद साजरा करतानासुद्धा गरीबांकडे अगोदर लक्ष द्या, अशी नितांत सुंदर शिकवण इस्लामणे आपल्या अनुयायांना दिलेली आहे.
    एकंदर या रमजानच्या महिन्यात गरीबांना दिलासा तर देणार्याला अत्युच्च आत्मिक आनंद मिळतोच मिळतो, शिवाय त्याला याचा ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही फायदा मिळतो. याबद्दल अल्लाहने मोबदला देण्याचा वादाही कुरआनमध्ये केला आहे.

- सीमा देशपांडे
7798981535

कुरआनच्या प्रकटीकरणाचा उद्देश सर्व मानवजातीला अल्लाहच्या मार्गावर येण्यासाठी मार्गदर्शन करणे आहे. कारण कुरआनमध्ये, मागील सर्व संदेश परिपूर्ण झालेले आहेत. कुरआनमध्ये अगदी प्रेषित आदम अलै. (पहिले मानव) यांच्या काळापासून मानवजातीस अल्लाहकडून मिळालेले संदेश समाविष्ट आहेत आणि ते स्वर्गीय संविधान पुनरुत्थान दिवसा पर्यंत पूर्णपणे अवतरण करण्यात आलेले आहेत. शिवाय, कुराण आकाश, पृथ्वी आणि मानवाच्या निर्मितीच्या घटनांचे वर्णन करतो आणि त्यासोबत प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या आधी आलेले दूत आणि प्रेषितांचे समर्थन करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुराण स्पष्ट करतो की ईश्वरीय संदेशांमध्ये पुर्वीच्या लोकांनी काय लुड्बुड केलेली होती आणी काय लपवून ठेवले होते व त्यातून काय-काय काढून टाकले होते व त्याचा दोष त्या लोकांनी ईश्वरावर  आणि प्रेषितांवर कसे मढलेले होते, म्हणून कुरआनने पूर्वीच्या (ग्रंथात)  ईशसंदेशांमध्ये मनुष्याने जे बदल किंवा विकृत केले होते त्यांना सुधारित केले. कुराणात ईश्वर म्हणतो, ’हे मुहम्मद (सल्ल.) सांगा की, ”हे मानवांनो, मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तोच जीवन प्रदान करतो व तोच मृत्यू देतो, म्हणून श्रद्धा ठेवा अल्लाहवर आणि त्याने पाठविलेल्या निरक्षर नबी (सल्ल.) वर, जो अल्लाह व त्याच्या आदेशांना मानतो, आणि अनुसरण करा त्याचे, जेणेकरून तुम्ही सरळमार्ग प्राप्त कराल.”  (  कुरआन 7:158)
    अलिफ, लाऽऽम, रा. ही वचने आहेत ईश्वरी ग्रंथाची व स्पष्ट कुरआनची. (कुरआन 15:1)
    ’दुरापास्तच नाही, जेव्हा ते लोक ज्यांनी आज (इस्लामचा आवाहन स्विकारण्यास) इन्कार केला आहे, पश्चात्ताप करून सांगतील की, आम्ही इस्लामचा स्वीकार केला असता तर बरे झाले असते!  ( कुरआन 15:2).
    ’सोडा यांना, खाऊ-पिऊ द्या, मौज-मजा करू द्या आणि खोट्या आशेच्या संभ्रमात राहू द्या, लवकरच यांना कळून चुकेल.  (कुरआन 15:3)
    खरे मार्गदर्शन केवळ ईश्वराकडून आहे. तथापि, हे केवळ अर्धे समीकरण आहे. इतर अर्धे समीकरण स्वतः मनुष्यावर अवलंबून  आहे. मग प्रश्न पडतो हे ईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे कोणते गुण असणे आवश्यक आहे?
    या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधी अगोदर आपण ईश्वराच्या मार्गदर्शनाचे परीक्षण करु. विशेषतः, आपण ईश्वराचे ‘सामान्य मार्गदर्शन’ आणि त्याचे ‘विशेष मार्गदर्शन’ यातील फरक ठळकपणे पहायला हवा. चला तर त्यांना एक-एक करुन पाहूया .
    सर्वप्रथम, ईश्वराने मनुष्याला आपल्या मार्गाकडे येण्यासाठी त्याचा धार्मिक विश्वास आणि कृती यांचा विचार न करता, त्याच्या संपूर्ण सृष्टीला मार्गदर्शित केले आहे व त्यासाठी  ईश्वराने प्रत्येक मानवाच्या फायद्यासाठी प्रेषीत (धर्मोपदेशक) आणी दैविक ग्रंथ पाठविले आहे. हे मार्गदर्शन ‘सामान्य मार्गदर्शन’ म्हणून ओळखले जाते. हे मार्गदर्शन प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, पण  त्याचे  अनुसरण करणे किंवा न करणे हे निवडण्याचे स्वातंत्र्य ईश्वराने पूर्णतः मनुष्याला दिले आहे. हे अजुन स्पष्ट होण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया.
जसे एका आईला दोन मुले असतात ,ती दोघांवर सारखे प्रेम करते व त्या दोघांच्या भविष्यासाठी योजना ही आखते. जसेजसे त्या मुलांना समज येते तसेतसे आई त्यांना चांगले जीवन व्यतीत करण्यासाठी नियमावली सांगत जाते जेणेकरून ते त्यांचे भविष्य साध्य करतील. पण त्यामधील एक मुलगा आईच्या नियमांचे पालन व अनुसरण अगदी जोमाने करतो. त्याचबरोबर दुसरा मुलगा आईच्या नियमाचे उल्लंघन करतो कारण त्याला आईपेक्षा ऐहिक सोबत्यांचे जीवन जास्त आकर्षक वाटते व त्यांचेच नियम बरोबर वाटू लागतात. अशावेळी  जरी आई दोघांवर सारखे प्रेम करत असली तरी जो तिच्या नियमाचे अनुसरण करतो त्या मुलाकडे विशेष लक्ष देते जेणेकरून तो त्याचे भविष्य साध्य करेल. व दुसऱा मुलगा जो तिच्या नियमाचे अनुसरण करत नाही तरी त्याला नियमाचे पालन करण्यास वारंवार सांगते पण तेव्हाही तो नाकारत असल्यास आई त्याला त्याच्या निर्णयावर सोडून देते. अशाप्रकारे आई दोन्ही मुलांना सारखेच मार्गदर्शन ( हे झाले सामान्य मार्गदर्शन) करते पण जो तिच्या नियमांचे अनुसरण करेल त्याच्याकडे अजून विशेष लक्ष देते (हे झाले विशेष मार्गदर्शन) व दुसर्याला त्याच्या निर्णयावर सोडून देते.
    मग प्रश्न पडतो आई ही मनुष्य आहे तिचे नियम चुकीचे असू शकतात पण तिला व आपण सर्वांना निर्माण करणार्याचे नियम कसे चुकु शकतात?  तोच तर आहे ज्याने तुम्हाला माती पासून निर्माण केले मग तुम्हाला कान,डोळे, र्हृदय दिले जेणेकरून तुम्ही त्याच्या नियमांचे पालन करुन सात्विक जीवन जगावे व स्वतः चे भविष्य (स्वर्ग) साध्य करावे. म्हणून सर्वसमर्थ अल्लाह  म्हणतो,
जर मनुष्याने  अल्लाह वर विश्वास (एकेश्वरत्व) आणि  सामान्य मार्गदर्शन (कुरआन) नाकारण्याचे निवडल्यास, तो त्याला भ्रामक होण्यास प्रवृत्त करेल. परंतु दुसरीकडे, जर त्याने एका ईश्वराला स्वीकारून कुरआनचे पालन करणे पसंत केले तर अल्लाह त्याला विपुल प्रमाणात मदत करेल व संरक्षण देईल. याला ईश्वराचे ‘विशेष मार्गदर्शन’ म्हणून ओळखले जाते कारण पुढे स्पष्ट म्हटलेले आहे-
    ’उरले ते लोक ज्यांना मार्गदर्शन प्राप्त झाले आहे, अल्लाह त्यांना आणखी जास्त मार्गदर्शन देतो आणि त्यांना त्यांच्या हिश्याची  ईशपारायणता प्रदान करतो. (पापा पासुन संरक्षण व सात्विक जीवन) ( कुरआन 47:17)
    इथे काही लोकांना गैरसमज आहे कि जे लोक अल्लाह वर विश्वास ठेवतात पण कुरआनच्या नियमाचे पालन स्वतःच्या सोयीनुसार केले तरी त्यांना अल्लाहचे विशेष मार्गदर्शन प्राप्त होईल. कदापि नाही! मोठया संभ्रमात आहेत हे लोक.
अशाप्रकारे ईश्वराचे विशेष मार्गदर्शन फक्त त्याच्या वरचा विश्वास व त्याच्या मार्गाचे अनुसरण करणार्यांसाठी आहे. आपण पुढील दोन अध्यायामध्ये ईश्वराचे सामान्य आणि विशेष मार्गदर्शन या दरम्यानचा फरक पाहू शकता. ईश्वर आपल्या प्रेषिताला  संबोधित करून म्हणतो, ’हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत.’  (कुरआन - 28:56)
    म्हणून  सर्वात महत्त्वाचा मुद्दा  लक्षात ठेवणे गरजेचे आहे की : ईश्वर  संपूर्ण मानवतेला त्यांचे सामान्य मार्गदर्शन प्रदान करतो पण त्याद्वारे अल्लाहच्या नियमांचे पालन करणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि मग त्यानुसार त्याचे विशेष मार्गदर्शन प्राप्त करणे  हे पुर्णतः आपल्यावर(मनुष्यावर) अवलंबून आहे.
    यावरून  आपण स्वतःला असेही  विचारू शकता की, मी काय करु शकतो? किंवा माझ्यात कोणकोणते गुण असायला हवेत? जेणेकरून मी त्या लोकांमधे असेल, ज्यांना अल्लाह विशेष मार्गदर्शन देतो आणि समर्थन करतो. चला तर या गुणांचे स्पष्टीकरण पाहूया पुढच्या लेखात..

माननीय सौबान (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या मुलाबाळांवर खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे  जो मनुष्य अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ (प्रयत्नांची पराकाष्ठा) करण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या सहकाऱ्यांवर खर्च  करतो, त्या सहकाऱ्यांवर जे अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि विचारले, ‘‘कोणते दान (सदका) कृपा व पुण्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट  आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ते दान (सदका) सर्वोत्तम आहे जे तू त्या काळात द्यावे जेव्हा तू योग्य व सुदृढ असशील आणि तुला गरजूपणाचीही भीती आहे आणि अशी आशाही आहे की तुला आणखीन धन मिळू शकते अशा काळात ‘सदका’ (दान) करणे अतिशय उत्तम आहे आणि तू असे करू नये की जेव्हा तुझे प्राण कंठात यावेत आणि मरू लागशील तेव्हा तू दान कर आणि असे म्हण की इतके अमक्याचे आहे, आता तुझ्या म्हणण्याचा काय उपयोग? आता ते अमक्याचे झालेलेच आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहकडून दोन देवदूत (फरिश्ते) उतरत नाहीत असा कधी दिवस उगवत नाही. त्यांच्यापैकी  एक खर्च करणाऱ्या भक्तासाठी प्रार्थना (दुआ) करतो आणि म्हणतो की हे अल्लाह! तू खर्च करणाऱ्याला उत्तम बदला दे आणि दुसरा देवदूत संकुचित वृत्तीच्या कंजूष लोकांसाठी  शापाची प्रार्थना करतो आणि म्हणतो की हे अल्लाह! कंजूषी करणाऱ्यांना नष्ट व उद्ध्वस्त कर.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे आदमपुत्रा! जर तू आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक धन अल्लाहच्या गरजवंत भक्तांवर  आणि ‘दीन’च्या कार्यावर खर्च केले तर ते तुझ्यासाठी उत्तम असेल आणि जर तू आवश्यकतेपेक्षा अधिक धन गरजवंतावर खर्च केले नाही तर सरतेशेवटी ते तुझ्यासाठी वाईट असेल  आणि जर तुझ्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक धन नसेल म्हणजे तितकेच धन आहे ज्यातून तू आपल्या गरजा भागवू शकतोस, तेव्हा जर तू त्यातून खर्च केला नाही तर खर्च न  केल्याने अल्लाह तुझी निर्भत्सना करणार नाही. आपला सदका (दान) त्या लोकांपासून सुरू करा ज्यांचे तुम्ही संगोपन करता.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘तू माझ्या गरजवंत भक्तांवर आणि ‘दीन’चे कार्य पार पाडण्यासाठी खर्च  करशील तर मी तुझ्यावर खर्च करीन.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘तुझ्यावर खर्च करीन’चा अर्थ आहे की मनुष्य जे काही आपल्या मिळकतीतून अल्लाहच्या गरजवंत भक्तांच्या आवश्यकता आणि ‘दीन’च्या कार्यात खर्च करतो तेव्हा  त्याचा पैसा वाया जाणार नाही तर तो त्याचा बदला परलोकातदेखील प्राप्त करील आणि या जगातदेखील. जगात त्याच्या संपत्तीत समृद्धी येईल आणि परलोकात त्याला इतके मिळेल  की त्याची कल्पनासुद्धा करता येत नाही. माननीय अबू ज़र गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो असता ते सावलीत बसले होते. जेव्हा त्यांची दृष्टी माझ्यावर पडली तेव्हा ते म्हणाले, ‘‘ते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले.’’ मी म्हणालो, ‘‘माझे माता-पिता तुम्हांवर कुर्बान, कोणते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले?’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘ते नष्ट व उद्ध्वस्त झाले जे श्रीमंत असतानाही खर्च करीत नाहीत. आपली धनसंपत्ती खर्च करील, समोरच्यांना देईल, मागच्यांना देईल आणि उजवीकडे असलेल्यांना देईल तोच सफल होईल आणि अशाप्रकारचे श्रीमंत खर्च करणारे फारच कमी आहेत.’’  (हदीस : बुखारी, मुस्लिम)

- अबरार मोहसीन 
शहराध्यक्ष जेआयएच लातूर. 
9890946103
 
मागच्या रमजानमध्ये असे कितीतरी लोक होते जे आपल्यासोबत रमजानच्या पवित्र गतिविधींमध्ये हिरहिरीने भाग घेत होते, पण आज ते नाहीत. पुढच्या रमजानमध्ये होणाऱ्या गतिविधींमध्ये भाग घेण्यासाठी आपल्यापैकी किती लोक जीवंत राहतील याचा अंदाज कोणीच करू शकत नाहीत. म्हणून ज्यांना रमजान मिळालेला आहे, ते नशीबवान आहेत. रमजानमधील सर्व गतिविधींमध्ये मुस्लिमांनी अतिशय आनंदाने सहभाग घ्यायला हवा. त्याच गतिविधींपैकी एक महत्त्वाची गतिविधी म्हणजे जकातचे संकलन आणि वितरण होय.
    इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभापैकी जकात एक स्तंभ आहे. यात अल्लाहने प्रेषितांना जकात वसूल करून लोकांमध्ये वितरित करण्याचा आदेश दिलेला आहे. याचे दोन फायदे कुरआनमध्ये सांगितलेले आहेत. एक तर जकात देणाऱ्याची संपत्ती पाक (पवित्र) होते व त्या संपत्तीमध्ये वाढ होते. तर दूसरा फायदा असा की, गरीबांची मदत होते. जकात दिल्याने संपत्तीमध्ये वाढ होते. हे सकृतदर्शनी खरे वाटत नसले तरी प्रत्यक्षात वाढ होते, हा प्रत्येक जकात देणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आहे.
    जकात ही एक सामुहिक इबादत आहे. इस्लामी शासन असलेल्या देशात जकात संकलित करणे व वितरित करणे यासाठी एक मंत्री व त्याचा खास विभाग असतो. ज्या ठिकाणी इस्लामी शासन नाही अशा ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सगळ्यांची जकात एकत्रित जमा करून मग त्याचे न्याय वितरण करण्याची व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी स्थानिक मुस्लिमांवर आहे. जमाअते इस्लामी हिंद या दृष्टीने आपल्या स्थापनेपासून हे काम करत आहे. आजकाल वैयक्तिक जकात अदा करण्याची सवय लोकांना लागलेली आहे. ती चुकीची आहे. जरी या पद्धतीने जकात अदा होवून जाते तरी पण अशामुळे जकात घेणाऱ्या व्यक्तिचा आत्मसन्मान दुखावतो. तसेच जकात देणाऱ्यांमध्ये अहंमभाव निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून जकात कधीही एकत्रित जमा करून अदा करावी, हेच उचित.
    तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि खर्च करून टाकले. तर कुठलीही जकात तुम्हाला द्येय नाही. जकात त्याच बचतीवर द्येय आहे, जी ती वर्षभर तुमच्या ताब्यात होती. साधारणपणे रमजान ते रमजान एका वर्षाचा काळ जकात अदा करण्यासाठी सर्वमान्य समजला जातो, असे अनेक लोक आहेत जे जकातची रक्कम काढण्यात दिरंगाई करतात व रमजानच्या शेवटच्या आठवड्यात अदा करतात. त्यामुळे घाई होते आणि वितरण व्यवस्थित होऊ शकत नाही. या घाई गडबडीमध्ये अनेक मुस्तहिक (पात्र) व्यक्ती जकात प्राप्त करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. म्हणून रमजानच्या पहिल्याच आठवड्यात जकात काढून ती संकलित केली गेली पाहिजे. जेणेकरून तिच्या वितरणामध्ये बराच कालावधी मिळू शकतो.
    जकात प्रत्येक ’साहेबे माल’ म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन तोळे चांदी किंवा त्यापैकी एका समकक्ष मुल्याची संपत्ती पदरी असेल, आणि त्यावर एक वर्ष संपलेला असेल, मग तो स्त्री असेल किंवा पुरूष दोघांनाही अडीच टक्के जकात अदा करणे बंधनकारक आहे. सुरे तौबा आयत नं. 34 आणि 35 मध्ये अल्लाहने चेतावनी दिलेली आहे की, जे सोने आणि चांदी जमा करतील आणि त्यावर जकात अदा करणार नाहीत त्यांना मरणोपरांत त्याच धातूला तापवून डाग देण्यात येईल व त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल की, हाच माल तुम्ही जमा केला होता व यावर जकात अदा केली नव्हती. तर आता याच मालाचा स्वाद चाखा. जकात संपत्तीद्वारे केली जाणारी अनिवार्य अशी सुंदर इबादत आहे.
    निसाब प्रमाणे संपत्तीचे मुल्य नसेल तर जकात अनिवार्य नाही. तसेच संपत्तीचा मालक आहे परंतु, ती ताब्यात नसेल व येण्याची शक्यता पक्की नसेल तरी जकात देणे आवश्यक नाही. जकात देणारी व्यक्ती कर्जमुक्त हवी. कर्ज डोक्यावर ठेऊन जकात देता येत नाही. समजा एखाद्या व्यक्तीकडे नगदी, दागिने व विक्री करावयाच्या दृष्टीने ठेवलेला प्लॉट या सगळ्यांची बचत अंदाजे 5 लाख होते. मात्र त्याच्या डोक्यावर दोन लाख कर्ज आहे. तर अगोदर ती कर्जाची रक्कम वजा केली जाईल व तीन लाखावर त्याला जकात अदा करावी लागेल. समाजाचे साधारणत: तीन भाग असतात. एक श्रीमंत, दूसरा मध्यमवर्गीय आणि तिसरा गरीब. पहिल्या भागातील व्यक्तींना जकात देणे भाग आहे. दूसऱ्या भागातील व्यक्तींना जकात देणे जरी भाग नसेल तरी त्यांना घेता पण येत नाही. कारण त्यांची सांपत्तीक स्थिती हलाकीची नसते, अशा लोकांना ’सफेद पोश’ असे म्हणतात. तिसरा गट दरिद्री लोकांचा आहे. ज्यांना जकात देण्याची गरज नाही उलट त्यांना जकात घेण्याचा अधिकार आहे. एखादा व्यक्ती मेली असेल आणि ती साहेबे निसाब असेल आणि त्याच्या संपत्तीवर एक वर्ष पूर्ण झालेला असेल तर अगोदर त्या संपत्तीची जकात वेगळी काढली जाईल आणि उरलेल्या संपत्तीमधून शरियतप्रमाणे वाटा वारसांमध्ये वाटला जाईल.
    शेअर, इपीएफ, पीपीएफ व इतर प्रकाराची संपत्ती आणि व्यापाऱ्यांनाही त्यांच्या ताब्यात असलेल्या मालाची जकात अदा करावी लागते. तसेच शेती मालावरही जकात द्यावी लागते, त्याला उश्र म्हणतात. या सर्वांचे वेगवेगळे नियम आहेत. ज्यांना तपशील हवा असेल त्यांनी जकात संबंधी आयातींचा अभ्यास करावा. एवढे मात्र नक्की की, एकेका रूपयाचा हिशेब करून जकात अदा करणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास मृत्यूपरांत त्याचे परिणाम भोगण्यास संपत्ती धारक मुस्लिमांनी तयार रहावे. जकात फक्त मुस्लिम व्यक्तिंवर लागू होते.
जकात कोणाला देते येते?
     सुरे तौबाच्या आयत नं. 60 मध्ये 8 व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह असे नमूद केलेले आहेत ज्यांना जकात दिली जावू शकते. 1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई)म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. माना सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात गुलाम व निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्गासाठी म्हणजे इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी सुद्धा जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी . वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    जकात जवळच्या नातेवाईकांना अर्थात आई-वडिल, आजी-आजोबा, भाऊ-बहिण, पती-पत्नी अशांना देता येत नाही. तसेच हाश्मी म्हणजे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या वंशातील व्यक्तींना ही देता येत नाही. हाश्मी वंशाचे लोक एकमेकांनाही जकात देऊ शकत नाहीत.
    इस्लामी अर्थव्यवस्थेचा मूळ उद्देश चलन हे प्रवाही राहील हा आहे. त्यासाठी जकातीचा फार्म्युला अवलंबिल्यास चलन हे मोठ्या प्रमाणात श्रीमंतांकडून गरिबांकडे नियमितपणे वळते केले जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होते व सामाजिक सौहार्द प्रस्थापित होतो, अन्यथा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये श्रीमंतांच्या बाबतीत गरीबांच्या मनामध्ये कायम एक अढी पडलेली असते. त्यामुळे गरीब हे नेहमी श्रीमंताचा दुस्वास करत असतात. त्यातून संधी मिळेल तेव्हा गरीब लोक श्रीमंतांच्या विरूद्ध हिंसक उठावही करतात. एकूणच सामाजिक सौहार्दतेला बाधा पोहोचते. भारतीय परीपेक्षामध्ये प्रत्येक शहरामध्ये सामुहिकरित्या जकातचे संकलन करून वितरण केल्यास समाजाचे अनेक आर्थिक प्रश्न यशस्वीपणे सुटू शकतात.

- इनामुर्रहमान खान
   
    अल्लाह सर्वसत्ताधिकारी आहे, तोच मालक, पालक, नियंता व शासक आहे. अल्लाहच्या सार्वभौमत्वात कोणीही भागीदार नाही. अल्लाह स्वयंभू आहे. आदर्श जीवन एकेश्वरत्वावरच अवलंबून आहे. अल्लाहशिवाय इतर कोणीही उपास्य नाही आणि अन्य कोणीही शासनकर्ता नाही.
    याउलट नास्तिकता, भौतिकता आणि अनेकेश्वरत्व जोडण्यापेक्षा फोडण्याचे काम करतात. या दोघी भटक्या भगिणी मानवी स्वभावाला प्रेमळ व मित्रत्वाचे न बनवता संघर्षरत व विरोधक बनवितात. मुस्लिम समाजाचा एकेश्वरत्व प्रारंभ व अंतसुद्धा आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 34    -पृष्ठे - 32       मूल्य - 18                आवृत्ती - 6 (2013)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/v8ou14j1yyczoimwtqkmmafwsmwi618l

- स. जलालुद्दीन उमरी
    या छोटेखानी पॉकेट बुकमध्ये मानवी एकता इस्लाम कशी स्थापित करतो. या विषयीचे विवेचन आले आहे. जीवनाला एका उद्देशाची गरज आहे. परंतु जीवनाचे चुकीचे उद्देश निश्चित केल्याने ते मानव जातीच्या विघटनास कारणीभूत ठरतात.
    आजच्या विश्वव्यापी बंधुत्वाच्या कल्पना व उणीवा स्पष्ट करून जीवनोउद्देश चुकीचे असल्याने ते शत्रुत्वाला जन्म देतात हे स्पष्ट करून मानवी एकतेचा इस्लामी पाया स्पष्ट करून सांगितले. संपूर्ण मानवजात एकाच अल्लाहची निर्मिती व सेवक आहे आणि मानव जातीचे मूळ एक आहे आणि मानवजातीची एकता भंग करणे विकृती आहे.

आयएमपीटी अ.क्र. 33   -पृष्ठे - 18    मूल्य - 10      आवृत्ती -3 (2011)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/knq9hure4vjvzn13lnh0foo60kymlwpt

- अबुल आला मौदूदी
    या पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना मुस्लिमांसाठी नवीन नाही. दुसऱ्यांसाठी या मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून अथवा इंग्लडच्या मॅग्नाकार्टापासून सुरू होत असेल, असे स्पष्ट केले आहे. मानवी हक्कांच्या संकल्पनेचा प्रारंभ कसा झाला याचे विवेचन यात आले आहे. कुरआन व हदीस द्वारा या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि इस्लाम मानवी मौलिक अधिकार बहाल करतो, हे सिद्ध केले आहे
आयएमपीटी अ.क्र. 32    -पृष्ठे - 24           मूल्य - 07           आवृत्ती - 2 (2005)



डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/133zfgz6oj4qqjif4rqqfpkiz3be9ruv

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget