Latest Post

माननीय अबू बकर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,‘‘दु:खी-कष्टी मनुष्याने ही प्रार्थना (दुआ) करावी– ‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत)’ अर्थात- हेअल्लाह! मी तुझ्या कृपेचा इच्छुक आहे. तू मला क्षणभरदेखील माझ्या इच्छा-वासनेच्या हवालीकरू करू नकोस (आपल्या देखरेखीत ठेव) आणि माझी वाणी, अहवाल व व्यवहार व्यवस्थित कर, तुझ्याशिवाय कोणीही उपासनेस योग्य नाही.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण :
जोपर्यंत एखादा भक्त अल्लाहच्या संरक्षणात व देखरेखीत असतो इच्छा- वासनांचात्याच्यावर कसलाही प्रभाव पडत नाही आणि त्याच्याकडून कसलेही पापकृत्य करवू शकत नाही.परंतु जेव्हा अल्लाहच्या संरक्षणापासून भक्त स्वत:ला वंचित करून घेतो तेव्हा इच्छा-वासनात्याला विनाशाच्या मार्गावर सोडतात. म्हणून मोमिन दुआ (प्रार्थना) करतो की ‘‘हे अल्लाह!मला इच्छा-वासनांच्या हवाली करू नकोस अन्यथा माझा विनाश होईल आणि माझ्या संपूर्णजीवनाला पवित्र बनव, व्यवस्थित कर.’’

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) ही दुआ पठणकरीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो संकटांपासून, दु:खापासून, त्रासापासून, आळस व सुस्तीपासून, कर्जाच्या ओझ्यापासून आणिमानवांनी प्रभुत्व मिळविण्यापासून.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : अल्लाहच्या आश्रयात स्वत:ला देण्याचा अर्थ आहे की दासाला आपल्या दुर्बलतेचीव विवशतेची जाणीव आहे. त्याला वाटते की आपण दुर्बल आहोत म्हणून शक्तिशाली स्वामीचाआश्रय मागतो जेणेकरून त्याने त्या दुष्टव्यांपासून वाचवावे.
येणाऱ्या संकटांना जो त्रास व काळजी संलग्न असतात त्यास ‘हम’ म्हणतात आणि‘हु़ज्न’ दु:खाला म्हणतात जे संकट आल्यानंतर पोहोचते. ‘अज़्ज’ म्हणजे एखादे काम करू न  शकणे आणि ‘मूर्खपणा’ व ‘बेसावधपणा’ या अर्थानेदेखील घेतला जातो. म्हणजे असे की मनुष्याला वाटते की ‘हे तर सोपे काम आहे, रात्री करू’, परंतु रात्र निघून जाते आणि तो ते काम करू शकला नाही तर म्हणतो, ‘बरे चला, उद्या होईल.’ अशाप्रकारे कामाची मूळ संधी वाया जाते. या दुआचा सार असा आहे की मोमिन आपल्या पालनकर्त्याला म्हणतो, ‘‘हे अल्लाह! माझे रक्षण व देखरेख कर. येणाऱ्या संकटांमुळे माझ्या मनाला त्रास होऊ नये. जेव्हा संकटयेईल तेव्हा मला संयम दे, जी वस्तू हरवली जाईल त्यावर मला दु:ख होऊ नये आणि तुझ्यामार्गावर चालण्यात आळस व सुस्ती माझ्यापाशी फिरकू नये आणि माझ्यावर लोकांचे इतके कर्जहोऊ नये जेणेकरून मला त्याची परतफेड करता येणे शक्य न व्हावे आणि काळजीने ग्रासला जाऊ नये आणि वाईट लोकांना माझ्यावर प्रभुत्व प्रदान करू नकोस.’’

माननीय ज़ैद बिन अरकम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) ही दुआ करीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! तू माझ्या वासनेला असे बनव की तिने तुझी अवज्ञा करू नये आणि तुझ्या शिक्षेचे भय वाटावे, दुर्गुणांपासून पवित्रकर, तू त्यास उत्तमप्रकारे पवित्र करणारा आहेस, तू त्याचा संरक्षक आणि स्वामी आहेस, हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो त्या ज्ञानापासून जे मला लाभ देणार नाही आणि त्या हृदयापासून जे तुझ्यासमोर नतमस्तक होणार नाही आणि त्या वासनेपासून जी संतुष्ट न व्हावी आणि अशा दुआपासून जी कबूल न व्हावी.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : ‘लाभ देणारे ज्ञान’ मनुष्याला ईशपरायणता शिकविते, अनुसरणासाठी प्रोत्साहित करते आणि जग व परलोकात अल्लाहच्या कृपेचा हक्कदार असते. ‘वासनेपासून संतुष्ट न होणे’ म्हणजे त्याला जगातील कितीही मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती प्राप्त झाली तरी संतुष्ट न होता त्याची भूक वाढत जाते आणि दुआ कबूल न होण्याची अनेक कारणे आहेत ज्यापैकी एक कारण असे आहे की मनुष्याची मिळकत अवैध असणे, जसे- व्यवहारांच्या बाबतीत ‘वैधमिळकती’च्या बाबतीत वर्णन आले आहे.माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) हीदुआ करीत असत, ‘‘अल्लाहुम्मा... (शेवटपर्यंत) अर्थात- हे माझ्या अल्लाह! मी तुझा आश्रय मागतो या गोष्टीपासून की जी देणगी तू मला दिली आहे (माझ्या दुष्कर्मांमुळे) हिसकावून घेतली जावी आणि जी खुशाली मला प्राप्त झाली आहे त्यापासून मी वंचित व्हावे आणि असे की तुझा कोप कोसळावा आणि असे की तू माझ्यावर निराश व्हावा, मी या गोष्टींपासून तुजा आश्रय मागतो.’’ (हदीस : मुस्लिम)

- डॉ. आयशा पठाण, नांदेड
9158805927


इस्लामी महिना रमजान, ज्यात रोजे अनिवार्य केले आहेत. जेणेकरून मनात ईशभय निर्माण व्हावे. पवित्र ईशवाणी, दिव्य कुरआनात म्हटले आहे. रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले. मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यानी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. (2ः185)
    रमजान पवित्र ग्रंथ कुरआनचा महिना याच महिन्यात संपूर्ण मानवजातीसाठी कुरआनचे अवतरण अंतिम प्रेषित मोहम्मद सल्ल. यांच्यावर झाले. म्हणजेच कुरआन-रोजा- रमजान या महत्त्वपूर्ण तीन सुत्रांचा जर विचार केला तर कुरआनातील पहिला श्‍लोक (आयात) सर्व सृष्टीचा पालनकर्ता, विश्‍वाचा कर्ता आहे. कुरआन हा ईशवाणीचा ग्रंथ धरतीवरच्या प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शन आहे.
    मानवाने जीवन कसे व्यतीत करावे, जीवन कसे जगावे, सत्य व अत्याची कसोटी,मानवसेवेसाठी, समर्पित समाज निर्माण करण्यासाठीची जीवन पद्धती आहे. अल्लाह रब्बूल आलमीन आहे. म्हणजे संपूर्ण मानवजातीचा पालनकर्ता आहे.
    ईशग्रंथ पवित्र कुरआनचे अवतरण याच रमजान महिन्यात पूर्णत्वाला आले. याच महिन्यात तीस दिवसाचा रोजा जो अल्लाहसाठी करतात जेणेकरून त्यांच्या मनात ईशभय निर्माण व्हावे. आत्मीक बळ वाढवणारे विनय नम्रता अंगी येणे पापकृत्या विरूद्ध ढाल शरीरासाठी, उत्तम आरोग्यासाठी वरदान, रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो सत्याधिष्ठित नियम ज्यामुळे वैयक्तिक व सामाजिक जीवनात सुख समाधानाने जीवन जगू शकतो. तसेच उत्तम रीतीने जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सदाचारी आचरण व ईशभयानेच निर्माण होते. ईशभयासाठीच इमानधारक रोजे करतात. अल्लाहशी जवळीक साधण्यासाठीच अल्लाहपुढे नतमस्तक होऊन (प्रार्थना)  नमाज पढतात. निःस्वार्थ वृत्तीने संपूर्ण मानवजातीचा विचार करायला लावणारे धैर्य, संयम, सहनशीलता, विचार करायला भूकेची जाणीव होते. गोरगरीब, निराधार, अनाथाशी आपुलकी व मदतीसाठी हात पुढे येतात. मदत फक्त मुसलमानांच नाही तर धरतीवरच्या प्रत्येक मानवाच्या सुख, दुःखात सामील होण्यासाठी पुढे येतो तो इमानधारकच ! आपल्या कुटुंबातल्या शिवाय शेजारी मग तो कोणीही असो निःस्वार्थ वृत्तीने मदतीसाठी पुढे येतो. सत्य-असत्याची जाण ठेवतो. चांगले वाईट, वैध-अवैध याची जाण मनात ईशभय ठेवतो व जीवन जगण्यास तत्पर होतो.
    ईशभय ठेवणार्‍यावर कृपाप्रसादाचा वर्षाव होतो, रोजा माणसाला माणूस बनवतो. चारित्र्यशील निष्ठावान बनतो रोजामुळेच मानव!
    सर्वशक्तीमान अल्लाहने आपल्या पवित्र ग्रंथ कुरआनात वारंवार आदेश दिलेले आहेत. ”नमाज कायम करा, जकात द्या. तुम्ही जमिनीवर वावरणार्‍यावर दया करा. अल्लाह तुमच्यावर दया करील. ही श्रद्धा उदात्त सत्कृत्याचा नैतिकतेचा संग्रह करीत असतो. माणसाच्या मनावर उदात्त अध्यात्मिक जीवनाची वस्तुनिष्ठ वास्तवता बिंबवण्यासाठीच हा आदेश दिला गेला आहे. रमजान महिन्यात रोजा तर करतात त्याबरोबर आध्यात्मिक व नैतिक प्रशिक्षणाबरोबर सह्योग, सेवा, त्याग, बलिदान, आत्मीक शुद्धता करतो, रोजा वाईट कृत्यापासून अलिप्त दहशतवादापासून गुन्हेगारीपासून दूर करतो.
    आम्ही सर्व मानवजात एकाच माता-पित्याची संतान. अल्लाहचे अनंत उपकार आहेत आमच्यावर परिपूर्ण जीवन व्यवस्थेत एक अल्लाहचा ईशग्रंथ पवित्र कुरआन व प्रेषित मोहम्मद सल्ल. यांचे आचरण आमच्यासाठी आदर्श नमुना आहे.
कुरआनात म्हटले आहे, ’तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. प्रत्येक गोष्टीला तो जाणतो आहे.’
    आकाश, पृथ्वीची निर्मिती, रात्रं-दिवसाचे परिवर्तन, नद्या-सागर, पाऊस, मृत जमिनीला पुनरूज्जीवन करणे, एक बियापासून हजारो दाने तयार करणे ह्या निशाण्या कुरआनात व्यक्त केल्या आहेत. पालनकर्ता अल्लाह सर्व साक्षी आहे. जीवनाच्या वास्तवाची जाण या स्पर्धात्मक युगात ठेवायची आहे. मृत्यू पश्‍चात जीवनाचा धाक व न्यायासाठी करावयाची तयारी, पवित्र कर्माची शिदोरी तयार करण्यासाठी मानव मनात ईशभयाची नित्तांत आवश्यकता आहे. अल्लाह जवळ प्रार्थना आहे, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी. आम्हा सर्व मानवांना सरळ मार्ग दाखव व मनात ईशभय ठेवणारे बनव. आमीन!

- बशीर अमीन मोडक, रत्नागिरी

मुस्लिमांना सर्वाधिक आनंद देणारा महिना रमजान होय. या महिन्याच्या  आगमनापासूनच आनंद पुढील 29/30 दिवस वाढतच जात असतो. शबे कद्र त्यास रमजानच्या पूर्णता समीप असल्याची जाणीव करून देणारी असली तरी ही रात्र संपूर्ण वर्षातील रात्रीपेक्षा आणि दिवसापेक्षाही अमर्याद आनंद देणारी असते. या रात्री पासूनचा आनंद रमजान महिना संपला तरी लगत पहिल्या दिवशी तो साजरा करूनच विश्रांती घेतात. या कालावधीत श्रीमंत किंवा गरीब यांच्या आनंदात कसलाही फरक नसतो. समानतेचा हा एक आगळा-वेगळा प्रकार मुसलमान स्वतः अनुभवतात आणि तो इतरांनाही देतात.
    हा आनंद असण्यामागच्या कारणां पैकी प्रमुख कारणे 1) कुरआन 2) रोजे. तेव्हा कुरआन आणि रोजे का हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे. 1) कुरआन अल्लाहने हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्यावर याच रमजान महिन्यात अवतरित केले ते सत्य जाणून सर्वत्र व्यापून असलेला जुलूम नष्ट व्हावा म्हणून आणि हे ही स्पष्ट करून की कुरआनद्वारे दिले जात असलेले मार्गदर्शन हे अंतिम असेल. अल्लाहची ताकीद आणि ही हिकमत एवढी यशस्वी ठरली की कुरआन अवतरित होताच जुलूम, अशांतता, अमानुषता नष्ट होऊन मानवता अस्तित्वात आली. इस्लाम मानवीय धर्म म्हणून आज सर्वमुखी आहे. कोणी याला मानवता धर्म म्हणो की इस्लाम एकच. कारण निरपराध माणसाची हत्या म्हणजे समस्त मानवतेची हत्या. कुरआनात स्पष्ट नमूद आहेच. सुरा 2 आयत 3 मधून दीन (धर्म) इस्लाम स्पष्ट होतो.
    शिवाय नमाज, जकात, हज आणि हे रोजे हे या मानवतेचे जपणुकीसाठीचे प्रशिक्षणासाठीच आहेत. कसे ते पाहू. या सर्वांचे महत्त्व कुरआनमध्ये तपशीलवार आहे. आज रमजान आणि रोजे याबाबत विवरण आहे ते रमजानमुळे आणि म्हणून रोजे आणि कुरआन बाबत प्राथमिकता उचित ठरावी.
    कुरआन नुसार एकमेव अल्लाहची इबादत आणि सदाचार (चारित्र्य) या बाबी अल्लाहला अधिक प्रिय आहेत. तर या दोनही बाबी रोजांद्वारे सहज आत्मसात होऊ शकतात. जसे रोजा असताना ठरवून दिलेल्या बाबी उदा. खोटे बोलणे, चहाड्या करणे, जाणीवपूर्वक रोजा तोडणे, विडी, सिगारेटचे सेवन या सर्वांपासून मुक्त असल्याने आणि ते सतत 29/30 दिवस घडून आल्याने दुराचार सहजरित्या निघून जातो आणि आपल्या ठायी असलेले सदाचार कायम राहतात. अल्लाह सदाचार्‍याना पसंत करत असल्यामुळे त्याची प्रसन्नता लाभते. थोडक्यात अल्लाहच्या प्रसन्नतेतून आपल्याला शांंती लाभते. शांती ही प्रगती करण्यास मोलाचे सहकार्य करते. शांती आणि प्रगतीतून मुक्तीचा मार्ग सुकर होतो. अल्लाहने रोजा माझा आहे आणि मी त्यास जबाबदार आहे.
    बरे ही प्रसन्नता ही होते ती रमजानच्या रोजाबरोबर अदा केलेला सदका, अदा केलेली जकात यामुळे ही शिवाय रोजांमधून मानवता ही अंमलात येते आणि शेजार धर्मही दोन्ही बाबी मानवतेची हाक आहे. आणि हाकेला ओ देणे इस्लामने इबादतमध्ये समाविष्ट केले आहे.
    रमजानमधील रोजे त्यातून लाभणारे सर्वोत्तम आचरण, तिलावत, शबेकदरची रहमत तसेच शेजारी सहेरी किंवा इफ्तार याची वाहिली जाणारी काळजी जिच्यामुळे मिळणारी आत्मीक शक्ती आणि समाधान, जकात, सदका यामुळे संपत्तीची होणारी शुद्धता. रोजामुळे वेळेची झालेली जाण आणि शिस्त आणि इबादतमध्ये उद्दिष्ट अशा सर्वच बाबी अल्लाहचे प्रेम यातून पूर्णत्वास जाऊन अल्लाहप्रती असलेले कर्तव्य व ते पार पाडण्याची जबाबदारी सर्व काही सुरळीत घडून येण्यासाठी एकमेव कालावधी म्हणजे रमजान होय. आणि अल्लाहस त्याच्या दासाचे शारीरिक स्वास्थ्याचा लाभ होवून जीवन सुखी समाधानी राहते व याचाच आनंद रमजानला अलविदा करूनही टिकत असतो. ईद त्याचेच प्रतीक. ईद मुबारक.

- शकील शेख
येवला


रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स.अ. यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
    इस्लामिक महीने चान्द्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्र दर्शन ज्या दिवशी होते याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे, म्हणूनच त्याच्या दुसर्‍या दिवसापासुन मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत चे दार उघडले जातात व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सुचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे. त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत त्यांनी त्यापासुन लांब थांबावे.
    या महिन्यातील प्रमुख गोष्टी :
1. रोजा, 2. नमाज, तराविहची विशेष नमाज, 3. कद्रची रात्र 4. कुरआन 5. जकात आणि फित्र
1. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज्य असते, असे पुर्ण महिनाभर 30 दिवस चालते.
    या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्ष चाणार्‍या मशीनला/गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे/मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीर रूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे म्हणुन रोजा केला जातो. यामुळे शरीराची पचन व्यवस्था आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते. व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
    1. रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची उर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिक रित्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरीबीची जान करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवन न करता एक वेळ जेवुन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात, श्रीमंत लोकांच्या मनात गरीबाबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजामुळे निर्माण होते, याचा परिणाम अन्न धान्य, दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पदरात पडून बर्‍याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.
    रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर आदी), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न उदभवु शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत-कमी सात वर्षे/अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे.
    2. तराविह (रात्रीची विशेष नमाज) : मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजर ची नमाज, दुपारी जोहर ची नमाज, दुपारी असरची नमाज (सुर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीब ची नमाज, आणि रात्री इशाची नमाज असे एकुण पाच नमाज आहेत.
    नमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहु अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरीक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते.
    3. शब-ए-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले. ’आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. ’(दिव्य कुरआन 97:1)
    या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या 1000 महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.
    कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.
(दिव्य कुरआन 97:3)
    या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्व आहे जो कोणी खर्‍या भक्ति भावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्‍चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुंह्यांची माफी मिळते परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.
    4. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या वर अल्लाहकडुन उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.
    जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड, 114 अध्यायामध्ये करण्यात आलेली आहे. यात 6000 पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
    कुराण हा पवित्र ग्रंथ असून तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः अल्लाहने स्विकारलेली आहे. व याच प्रमुख कारणामुळे आज 1438 वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही. आणि इन्शाअल्लाह कयामत पर्यंत होणारही नाही.
    ’उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत.’ (दिव्य कुरआन 15:9)
    5. जकात- फित्र (दानधर्म) - हा या महिन्याचा फार महत्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणार्‍या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे 1.75 किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या सणामध्ये सामील होता यावे.
    फित्र्याशिवाय, प्रत्येक सधन व्यक्तीला त्याच्याकडे असलेल्या एकूण नगदी आणि सोनेनाणे धरून 7.5 तोळे सोने किंवा 52.5 तोळे चांदी. यापैकी कोणताही एक संपत्ती असेल व त्यावर एक वर्षे पूर्ण झालेले असेल तर त्याला 2.5 टक्के जकात द्यावी लागेल.
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटूंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या जकात व फित्रचे महत्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकात व सदकतुल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाचे वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
    वरील सर्व बाबीवरून आपल्या असे लक्षात येते की, रमजानचा रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविह ची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआन, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे. जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खर्‍या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, दारू, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
    महिनाभराच्या उपवासानंतर चंद्र दर्शन होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिद मध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फित्रची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजनंतर ऐकामेकांना अलिंगण (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.

- सरफराज शेख

भारतीय समाज हा उत्सवप्रिय मनोभुमिकेत जगत आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मीक रचनेच्या बळकटीकरणासाठी समाजाने नेहमी प्रयत्न केले आहेत. सण हिंदू धर्मीय असो वा इस्लामी, भारतीय समाजाने त्याचे रुप सामाजिक सौहार्दाच्या अधिष्ठानावर आकाराला आणले आहे. होळी, रक्षाबंधनसारखे सण भारतीय समाजाची एकात्मीक रचना मजबूत करत आले आहेत. मध्ययुगीन काळापासून ईदच्या माध्यमातून भारतीय समाजातील काही समाजघटकांनी एकामेकांच्या जवळ येण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. मोहम्मद तुघलकाच्या काळात ईदच्या दिवशी व त्याच्या आधी हिंदु बांधवासाठी ईद साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सुफींच्या खानकाह मधील लंगर असो वा इफ्तारसाठी वाटसरुंना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा असो, हिंदू-मुस्लीमांसाठी सारख्याच पध्दतीने उपलब्ध असत. मानवी मुल्यांची उद्घोेषणा या माध्यमातून केली जात असे. सुफींनी मानवकल्याणाची जाणीव रमजान महिन्यात देखील जपली होती. वस्त्रभांडार त्यांनी रमजान महिन्यात गरीबांच्या सहाय्यासाठी खुले केल्याचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनात उपलब्ध आहेत. रमजानच्या महिन्यात जकातच्या माध्यमातून आर्थिक समन्वयातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ययुगीन काळात हा कर शासनाच्या एका विशिष्ट विभागामार्फत वसूल केला जात असे. त्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जात असत. औरंगजेबाने ब्रम्हपुरी मुक्कामी असताना रमजानच्या काळात विहिरी व कालव्यांचे बांधकाम करुन घेतले होते. काही बागा निर्माण केल्या होत्या. जहांगीरच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ईदचा माध्यम म्हणून वापर करण्यात आल्याचे संदर्भ ’तुज्क इ जहांगीरी’ मध्ये उपलब्ध आहेत. सेतू माधव पगडी यांनी भाषांतरीत केलेल्या काही फारसी बातमीपत्रांच्या माध्यमातून अशा अनेक नोंदी समोर आल्या आहेत. ईदच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपण्याची ही प्रेरणा भारतीय समाजाने घेतली. आजही अनेक मुस्लीम बांधव जकात च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ह्या जकातच्या माध्यमातून विधायक कार्य करत आहेत. ईदच्या माध्यमातून अनेक भारतीय समाजबांधवांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे ईदचे सामाजिक महत्व आधिक आहे. 

- डॉ.रफिक पारनेरकर
अहमदनगर


रोजा आणि कुरआन ही रमजान महिन्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रोजासंबंधी कुरआनात म्हटले आहे, ’ हे ज्ञानधारकांनो, तुम्हावर रोजे (उपवास) अनिवार्य आहेत. त्याप्रमाणे पूर्वीच्या लोकांवर ही अनिवार्य होते. यासाठी की तुमच्यात ’तक्वा’ निर्माण व्हावा” (2-182).
    ’तक्वा’ हाच रोजांचा उद्देश आहे. म्हणूनच तक्व्याचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे रोजासंबंधीचे काही उपदेश यासाठी पुरेसे आहेत. ते एकदा म्हटले, ’जो रोजा ठेवूनही खोटे बोलने व खोटे वागणे सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काही एक गरज नाही.’ अर्थातच माणसाच्या वागण्यात, बोलण्यात परिवर्तन होऊन त्याने सत्य बोलावे व सत्य वागावे हाच रोजांचा खरा उद्देश आहे. पैगंबर (सल्ल.) एकदा म्हटले, ’रोजा म्हणजे फक्त पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे! रोजा जिभेचापण आहे, डोळ्यांचा पण आहे. कानांचा देखील व हाता पायांचा सुद्धा रोजा आहे!” या पैगंबरी उपदेशातून स्पष्ट होते की माणसाचे संपूर्ण चारित्र्यसंवर्धन हा खरा रोजांचा उद्देश आहे. जर कोणी रोजा ठेवूनही निंदा-नालस्ती, शिवीगाळ करीत असेल, डोळ्यांनी अश्‍लीलता, नग्नता पाहात असेल, कुणाकडे वाईट नजरेने पाहत असेल, भ्रष्टाचार करत असेल, अन्याय-अत्याचार करत असेल तर त्याच्या रोजाची, त्याच्या अन्न-पाणी सोडण्याची अल्लाहला काडीमात्र गरज नाही. आदरणीय उमर (र.) यांंनी आपले ज्येष्ठ व जाणकार सहकारी मा. उबई बिन कअब (र.) यांनी ’तक्वा’ विषयी विचारणा केली असता ते म्हटले, हे उमर (र.)! कधी आपणांवर अत्यंत काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग झाला? उमर (र.) म्हटले, ’हो! एकदा असे घडले!’ ’मग काय केलं?’  उमर (र.) म्हटले, एक-एक पाऊल अत्यंत दक्षतेने पुढे टाकून , की एखादा काटा टोचू नये, अशा सावधानतेेने मी ते पार केले. उबई बिन कअब म्हटले, ” उमर (र.)! हाच तक्वा आहे!” अर्थात माणसाने संपूर्ण जीवन अशा सावधानतेने जगावे की त्यांच्याकडून ईश-अवज्ञा अर्थात अन्याय-अत्याचार घडू नये हाच तक्वा आहे. हाच रोजांचा खरा हेतू आहे. थोर इस्लामी विद्वान मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी ’ रोजा आणि वासनांवर नियंत्रण’ या पुस्तकात तक्वाचे स्पष्टीकरण करतांना दोन घोडेस्वारांचे सुंदर उदाहरण दिले आहे. पैकी एकाच्या हाती घोड्याचा लगाम आहे तर दूसर्‍याच्या हातातून तो सुटलेला आहे. लगाम हाती असल्याने पहिल्याचे घोड्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मात्र लगाम हाती नसल्याने दुसर्‍या घोडेस्वाराचे घोड्यावर नियंत्रण नाही. उलट तो घोड्याच्या नियंत्रणात आहे. हे उदाहरण देऊन मौलाना लिहितात की, घोडे म्हणजे वासना (ख्वाहिशाते नफ्स) आहेत आणि जगातील प्रत्येक माणूस वासनारूपी घोड्यावर स्वार असलेल्या प्रवाशासमान आहे. रोजाचा उद्देश अर्थातच तक्वा हा आहे की वासनांरूपी घोड्याचा लगाम रोजेदाराच्या हाती यावा व त्याला वासनांवर नियंत्रण प्राप्त व्हावे. वासनांची गुलाम बनलेली माणसं अल्लाहची अर्थात सत्याची गुलामी कदापि करू शकत नाहीत. रोजानंतर रमजानचे दूसरे वैशिष्ट्ये कुरआन आहे. कुरआनची ओळख स्वतः कुरआननेच अशी करून दिली आहे, ” रमजान तो पवित्रा महिना आहे, ज्यात कुरआनचे अवतरण झाले. कुरआन समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे, सुस्पष्ट असे मार्गदर्शन, कुरआन सत्य-असत्याची कसोटी (अलफुर्कान) आहे.” जीवनाविषयी जे मार्गदर्शन माणसासाठी कुरआन ने सांगितले ते संक्षिप्तपणे असे आहे.
    1) दुनिया अंधेर नगरी नव्हे आणि मोकळे रान (चरण्याची) ही नाही. सफल चराचर सृष्टिचा व तुझा निर्माता अल्लाह तुला सदा सर्वदा पाहात आहे. तू सार्‍या जगाला फसवशील मात्र त्याच्या नजरेतून वाचू शकत नाहीस, ही दुनिया तुझ्यासाठी परीक्षा गृह (एक्झाम हॉल) आहे. त्यासाठीच तुला आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र मृत्यू येताच तुला या परीक्षा गृहामधून बाहेर पडावे लागेल. आणि मग एक दिवस तो उजाडलेला असेल जेव्हा या परीक्षेचा रिझल्ट लागेल. जो सर्वस्वी तुझ्या कर्मावर (कृत्यावर) अवलंबून असेल. आज तू सत्याच्या न्यायाच्या नीतिच्या मार्गाने जगलास तर जीवनरूपी या परीक्षेत उत्तीर्ण होशील. मात्र जर असत्य, अन्याय, अनीतिच्या मार्गाने जगलास तर घोर निराशा तुझ्या पदरी येईल! मग पश्‍चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वेड्या आजच शहाणा हो! सत्य जाणून घे, जीवनाचा वास्तविक उद्देश जाणून घे! चंगळवादाच्या आहारी जाऊ नकोस! ही संपूर्ण मानवजात अल्लाहने एकाच जोडप्यापासून निर्मिली आहे. म्हणून तुम्ही सर्व आपापसात बंधू भगिनी आहात. समान आहात. कोणी श्रेष्ठ नाही. की कोणची नीच नाही. म्हणून वेड्या, जीवनात भेदभाव करू नकोस. सर्वांशी बंधू भावाने, प्रेमाने, आपुलकीने वाग! कुणाचे स्वातंत्र्य हिराऊन घेऊ नकोस. कुणाला स्वतःपेक्षा हीन लेखू नकोस कोणाचा द्वेष-मत्सर करू नकोस.
    3) हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेही सत्कर्म अल्लाह स्विकारत नाही. म्हणून अर्थार्जन कर पण कष्टाने, न्यायाने, नीतिने, भ्रष्टाचार करू नकोस, बेईमानी धोकेबाजी करू नकोस.
    4) माता-पिता, भाऊ-बहिणी, पत्नी, मुले व इतर आप्तेष्टांचे तुझ्यावर हक्क आहेत. त्यांना पायदळी तुडवू नकोस, माय-बापाशी अत्यंत आदराने, सन्मानाने वाग. त्यांच्याशी कृतघ्नता करणे, अल्लाहशी कृतघ्नता करण्यासमान आहे. याची जाणीव ठेव. पैगंबर (सल्ल.) यांनी म्हटले, आईच्या चरणाखाली (स्वर्ग) जन्नत आहे. माता-पिता प्रसन्न तरच अल्लाह प्रसन्न! माता-पिता नाराज तर अल्लाह नाराज. हे सारं जग अल्लाहच कुटुंब आहे असे जाणून जो सार्‍या जगाच भलं इच्छितो तोच खरा सज्जन आहे.
    5) मृत्यू अटळ आहे! तुझी इच्छा असो वा नसो, मृत्यू पश्‍चात तुझी गाठ शेवटी अल्लाहशीच आहे हे वास्तव कधी नजरेआड होऊ देऊ नकोस. मृत्यूचे स्मरण तुला मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही आणि कुरआनचे अध्ययन कर! ते तुला खर्‍या सन्मार्गाची ओळख करून देईल. पैगंबरांचा हा उपदेश सतत ध्यानी-मनी असू दे की अंत्येयात्रा जेव्हा निघते (जनाजा) तेव्हा तीन गोष्टी तिच्याबरोबर निघतात. दुनिया (संपत्ती), आप्तेष्ट आणि कर्म. पैकी पहिल्या दोन गोष्टींना एक मर्यादा आहे. मृत्यू आला की ही सारी दौलत वारसांची होईल. आप्तेष्ठ तुझा विधी करून परत जातील. तीसरी गोष्ट तुझे कर्म तुझ्या विधीपश्‍चातही तुझ्या संगती येतील आणि तुझ्या कर्मावरच तुझ्या मृत्यू पश्‍चातच्या जीवनाची धुरा आहे. ते चांगले असले तरच तुझ्या मरणोत्तर जीवनाच ’चांगभलं’ होईल! याची जाणीव ठेव!

- नौशाद उस्मान
औरंगाबाद
9029429489


आज ज्या लोकांनी चाळीशी पार केलेली आहे, त्यांना माहित आहे की, आजपासून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजसारखे वातावरण नव्हते. सगळे मिळून मिसळून राहत होते. आजही अजिबात राहत नाही, असं नाही, पण त्यावेळचं वातावरणच वेगळं होतं. आजही अनेक गाव खेड्यात तेच वातावरण नक्कीच आहे, पण शहरी वातावरण बर्‍याच अंशी जातीय वार्‍याने प्रदुषित झालेले आहे, हे कटू सत्त्य आहे. मला आठवते माझ्या बालपणातली दिवाळी. आमच्या बच्चे कंपनीने दिवाळीच्या फराळावर मारलेला ताव! तुम्ही कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा, पण तुमच्याही बालपणात जर तुमचा एक जरी मुस्लिम मित्र असेल तर तुम्हाला तुमच्या बालपणातला अनुभवलेला रमजान, ईद आणि शिरखुर्मा आजही आठवत असेलच.
पाटलाच्या वाड्यावर चढून आकाशात चंद्रकोर शोधत असलेले ते जुम्मनमियां ... चंद्रकोर दिसली रे दिसली की, ’चांद दिख गया ... चांद दिख गया’ करत सगळी येटाळ डोक्यावर घेणारी ती चिल्लर पार्टी अन् विजेच्या खांबावरील जुन्या दिव्याच्या त्या अंधूक प्रकाशात त्या चिमुकल्या पाखरांच्या पदन्यासाने उडालेल्या धुराळ्यातही एक अजबच चैतन्य निर्माण होत असे. येटाळीतल्या एकमेव पाटलाच्या वाड्यातून बाहेर आलेल्या काकूंच्याही चेहर्‍यावर तोच आनंद वाहत असलेला दिसायचा जो त्या बाल-गोपालांच्या चेहर्‍यावर असायचा.
    आजची ’हॅप्पी रमदान’ म्हणून सदिच्छा देणारी धीर गंभीर चेहर्‍याची कॉन्वेंटठास्त मुलं त्या निरागस गोड आनंदाला कुठंतरी पारखी झालेली दिसत आहेत. तो आनंद पुन्हा परत आणायची गरज आहे. तो भारत आपल्याला पुन्हा परत हवा आहे. लहाणपणीच वैचारिकतेची घडी बसत असते. म्हणून भविष्यात जातीयवादाच्या दुर्धर रोगाची लागण होऊ नये म्हणून धर्मसहिष्णुतेची लस लहाणपणीच देणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विशेष करून जे लोकं रोजे ठेऊन रमजान पाळतात, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांवर रमजानचे सहिष्णुतेचे, एकात्मतेचे, समतेचे संस्कार घडवण्यासाठी इथे काही ’टिप्स’ दिल्या जात आहेत -
    आपल्या लेकरांच्या मुस्लिमेतर मुलांसाठी आपल्या घरी छोटीसी इफ्तार पार्टी घ्या. त्यात त्यांना सोप्या भाषेत इफ्तार, रोजा, रमजानविषयी माहिती द्या. त्याविषयावर छोटी छोटी मराठी पुस्तकं असतील तर ती त्यांना भेट म्हणून अवश्य द्या.
    ईदच्या दिवशीही त्यांना शिरखुर्म्यासाठी विशेष करून निमंत्रित करण्यास सांगा. ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी झोके, आकाश पाळणे व इतर लहान मुलांच्या करमणुकीची साधणं येत असतात. तेंव्हा आपल्या लेकरांना तिथे नेतांना मुस्लिमेतर आणि विशेष करून तळागाळातील वंचित गोरगरीबांच्या मुलांना आपल्या लेकरांसोबत तिथे न्या. ईदगाहवर नमाज पढण्यासाठी शक्य असेल तर लेकरांनाही न्या.
    ईदच्या दिवशी भिक्षा मागणारे ईदगाहबाहेर उभे असतात. त्यांना भिक्षा देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जकातची रक्कमही गोरगरीबांना देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जेणेकरून त्यांच्यात दातृत्वाचे संस्कार होऊ शकावे. मुस्लिम समाजात ईदसाठी नवीन कपडे वगैरे घेतांना मुलगा - मुलगी असा भेद केला जात नाही, उलट मुलींना झुकते माप दिले जाते, हा एक चांगला गुण आजही मुस्लिम समाजात आढळतो, ही उदात्त प्रेषित परंपरा अशीच पुढेही सुरू राहिली पाहिजे.
      अशाप्रकारे आम्ही आधी बालपणी जसा भेदभावरहित सर्वधर्मसहिष्णु वातावरणात रमजान साजरा करायचो, ईद साजरी करायचो तसाच रमजान आणि तशीच ईद आताही प्रत्येक गावा-गावात शहरा-शहरात साजरी होवो आणि समाजात शांती निर्माण होऊन देश प्रगती करो, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन!

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget