Latest Post

- मुहम्मद फारूक खान
    मनुष्य या जगात येतो परंतु तो या जगात जगासाठी येतो काय? कदापि नाही, जर तो या जगासाठी आला असता तर तो येथून परत गेला नसता. त्याचे शाश्वत ठिकाण तर पारलौकिक जीवन आहे. या जगातील जीवन फळ कापून तोंडात घालण्यासारखे आहे.
या फळाची चव पारलौकिक जीवन आहे ज्याने फळच खाल्ले नाही त्याला चव कशी कळू शकते? ज्याने कडू फळ खाल्ले त्याला गोडी कशी मिळणार? या जगातील जीवनाच्या शेतीत जो चांगले बी पेरील त्यालाच परलोकात चांगले पीक मिळेल. काटे पेरणाऱ्याच्या वाट्याला तर तिथे काटेच येतील.
आयएमपीटी अ.क्र. 48              -पृष्ठे - 136                  मूल्य - 50               आवृत्ती - 2 (2011)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/83f2xfgfkhws9j3jbrb5wq3cmm6k8j9t

- प्रा. के. एस. रामाकृष्णराव
   
    प्रसिद्ध तत्त्वेत्ते प्रा. के. एस. राव यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणींचा सखोल अभ्यास केला आहे.
    त्यांनी आपल्या सखोल अभ्यासंगति आपले मत बुद्धीवादी लोकांसमोर मांडावयाचे ठरविले आणि त्यानुसार त्यांनी `मुहम्मद-द प्राफेट ऑफ इस्लाम' (मुहम्मद (स.) इस्लामचे पैगंबर) या नावाने पुस्तक प्रकाशित केले अनेक वेळा हे पुस्तक भारतात व भारता बाहेर अनेक भाषेत प्रकाशित झाले आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 47     -पृष्ठे - 24      मूल्य - 16               आवृत्ती - 9 (2013)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/j1iw0e3fo2cpqnezym1rihj7usms68vq

आदरणीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, अल्लाहला कोणते कर्म सर्वाधिक प्रिय आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, वेळेवर नमाज अदा  करणे. मी विचारले, त्यानंतर? पैगंबर म्हणाले, माता-पित्यांशी सद्वर्तन. मी पुन्हा विचारले, त्यानंतर? पैगंबर (स.) म्हणाले, ईशमार्गात जिहाद करणे.

निरुपण
उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी तीन सर्वश्रेष्ठ कर्म करण्याचा उपदेश केला आहे.
(१) माणसाने जीवनात अल्लाहशी सदैव कृतज्ञ राहावे. हे अनंत विश्व अल्लाहचे आहे. त्यानेच मला निर्माण केले आणि या अनंत कृपा त्याच्याच आहेत ही जाणीव सतत ध्यानीमनी  ठेवावी. हे ईशऋण व्यक्त करण्याचे श्रेष्ठतम माध्यम नमाज आहे. दिवसातून पाच वेळा वक्तशीरपणे आयुष्यभर अल्लाहसमोर नतमस्तक होऊन नमाज अदा करणाऱ्याचे जीवन  यशस्वी, सफल होईल. यात शंकाच नाही.
(२) जीवनाचे सार्थक करण्यासाठी दुसरे श्रेष्ठ कर्म ज्याचा पैगंबर उपदेश करतात, ते आहे माता-पित्यांशी सद्वर्तन! खरे तर अल्लाहनेच माणसाला माता-पित्यांशी सद्वर्तन करण्याचा  आदेश दिला आहे. ही माणसाच्या सात्विकतेची लिटमस टेस्ट आहे. जो माता-पित्यांशीच सद्वर्तन करत नसेल त्याच्यात सात्विकता ती कोणती? माता-पित्यांशी सद्वर्तन हे इस्लामी  समाजाचे पायाभूत तत्त्व आहे, जे कुटुंब व्यवस्थेला मजबूत बनवते. ज्या कुटुंबात माता-पिताच दुर्लक्षित, उपेक्षित असतील, ते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहात नाही.
(३) यानंतर ज्या श्रेष्ठ कर्माचा पैगंबरांनी उपदेश केला आहे ते जिहाद. माणसावर सामाजिक जबाबदारीदेखील आहे, जिला पूर्ण केल्याशिवाय त्याच्या जीवनाचे सार्थक होणार नाही.  समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच गुलामीविरूद्ध संघर्ष करणे व मानवजातीला स्वार्थी लोकांच्या गुलामीतून मुक्त करणे, शोषणमुक्त समाज निर्माण करणे. सामाजिक विषमता, परस्पर द्वेष आणि अन्यायाविरूद्ध बंड करणे हाच जिहाद आहे. दुर्दैवाने समाजकंटकांनी जिहादविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवलेले आहेत. ते दूर करून जिहादचे वास्तव समाजासमोर आणणे गरजेचे आहे. समाजामध्ये शांती, सद्भावना आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच जिहाद होय. याकामी आपले सर्वस्व पणाला लावणे, त्यात येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणे हाच खरा जिहाद आहे.
समाजामध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार बोकाळलेला असताना सज्जनांचे शांतपणे, निष्क्रियपणे जगणे इस्लामला कदापि मान्य नाही. या उलट इस्लामला असे नमाजी व असे हाजी  अपेक्षित आहेत जे सामाजिक स्वास्थ्यासाठीही संघर्ष करण्यास तत्पर असावेत. आपल्या देशातील सर्व शांतीप्रिय नागरिकांनी संघटित होऊन आदर्श, सत्याधिष्ठित, समताधिष्ठित व  न्यायाधिष्ठित भारताच्या नवनिर्माणासाठी जिहाद करणे ही आज काळाची गरज आहे. अन्यथा सर्व भारतीयांना या निष्क्रिय राहण्याची कटु फळे भोगावी लागतील व पश्चात्तापाची वेळ  येईल. अल्लाह आम्हा सर्वांना वेळीच सद्बुद्धी देवो, आमीन.

(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

- श्री नाथू राम
हिंदू विद्वान लेखक श्री नाथू राम एक विचारंवत असून त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग मध्यपूर्वेच्या इस्लामी संस्कृतीत व्यतीत केला. त्यांना ही संस्कृतीजवळून पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळाली.
धर्मास बंधीच्या गैरसमजूतींचे निवारण झालेच पाहिजे आणि धर्माचा निष्पक्षपणे अभ्यास केला जावा हेही अत्यावश्यक आहे. याच भावनेने श्री नाथू राम यांनी एक लेखमाला इस्लामविषयी सादर केली होती आणि तोच लेखसंग्रह पुस्तक रूपात आज उपलब्ध आहे.

आयएमपीटी अ.क्र. 46     -पृष्ठे - 56      मूल्य - 28            आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/eg8zohhft5ncdritpfizrj7arbkf3mzh



हजरत अबू उमामा (रजि.) म्हणतात की, एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘हे प्रेषिता! माता-पित्यांचे संततीवर काय हक्क आहेत?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले,  ‘‘माता-पिताच तुमची जन्नत (स्वर्ग) आहेत आणि माता-पिताच तुमची जहन्नुम (नरक).’’ (इब्ने माजा)
निरुपण
माता-पित्यांशी सद्वर्तन करणारेच जन्नतमध्ये (स्वर्गात) जातील. माता-पित्यांशी दुर्वर्तन करणारे कदापि स्वर्गात जाऊ शकत नाहीत. असे लोक जहन्नुममध्ये (नरकात) टाकले जातील. कुटुंब हे मानवी समाजाचा एक घटक आहे. समाजातील सारे कुटुंब आदर्श असतील तरच समाजही आदर्श होईल. प्रत्येक कुटुंबामध्ये माता-पिता हे महत्त्वाचे घटक असतात. ज्या  कुटुंबात माता-पित्यांचा सन्मान होत असेल, त्यांच्याशी सद्वर्तन होत असेल व त्यांची सेवा घडत असेल तेच कुटुंब सुखी-समाधानी व आदर्श कुटुंब म्हणता येईल. उलटपक्षी ज्या घरात  माता-पिता उपेक्षित असतील, त्यांचा सन्मान होत नसेल, त्यांची सेवा होत नसेल त्या घराला सुखी-समाधानी म्हणता येणार नाही. 
आपल्या राज्यात गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटना यासंबंधी अतिशय गांभीर्याने चिंतन करण्यास बाध्य करणाऱ्या आहेत. पहिली घटना आहे नांदेडचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.  अरुण गोधमगावकरांची. अहमदपूरमधील रुक्मिनी वृद्धाश्रमात दि. १८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले. अमेरिकेत असणाऱ्या डॉ. मुलाला व डॉ. मुलीला कळल्यावर त्यांनी  अंत्यविधी उरकून घ्या, आमचा काहीएक आक्षेप नाही व आम्ही येऊ शकत नाही, असे उत्तर दिले. अखेर वृद्धाश्रमाच्या चालकांनी त्यांचा विधी पूर्ण केला. 
दुसरी घटना नीराबाई पटेल या वृद्ध महिलेची आहे. पालघर जिल्ह्यातील मधोर येथे या वृद्ध मातेचे निधन झाले. वृद्ध पिता धीरज पटेल यांनी अहमदाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या  एकुलत्या एक मुलीला फोन करून कळवलं. ती आली नाही. गावातील हिंदू-मुस्लिम ग्रामस्थांनी या वृद्धेचा अंत्यविधी केला. नंतर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तीने त्या मुलीला  अस्थिविसर्जनासंबंधी विचारल्यावर ती फोनवर म्हणाली, ‘अस्थी कुरिअरने मला पाठवून द्या.’ मुलीचे असे वागण्याने बापाच्या काळजाचे पाणी केले. आजचा समाज कुठे चाललाय आणि  कुटुंब व्यवस्थेची कशी वाट लागली आहे त्याची ही दोन बपोलकी उदाहरणे आहेत. ज्यांना मातापित्यांचीच ओळख नाही ते इतर कुणाची ओळख ठेवणार? समस्या गंभीर आहे. त्यावर  वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी घरात आणि शालेय जीवनातही मुलांवर योग्य संस्कार महत्त्वाचे आहेत.
इस्लामची माता-पित्यांसंबंधी काय भूमिका आहे ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपरोक्त उपदेशावरून आपल्या लक्षात येईल. ते म्हणाले, ‘माता-पिताच तुझा स्वर्ग आणि माता-पिताच  तुझा नरक.’ म्हणजे त्यांच्याशी सद्वर्तन कर आणि स्वर्गात जा अन्यथा त्यांच्याशी दुर्वर्तन कर आणि खुशाल नरकात जा!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक 

- लातूर (बशीर शेख) 
 सन्माननीय मित्रानों अल्लाहचे कोटी- कोटी उपकार आहेत की त्याने आपल्या सर्वांना इस्लाम सारख्या वैभवशाली धर्मामध्ये जन्म दिला. त्यातल्या त्यात भारतात जन्म दिला. आज आपण या ठिकाणी ईदच्या पावन पर्वावर नमाज अदा करण्यासाठी एकत्रित जमा झालो आहोत. आज जगातून लाखो मुस्लिम एकत्रितरित्या मक्कामध्ये नमाज अदा करत आहेत आणि आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी नमाज अदा करत आहोत, ही समानता इस्लामचे वैशिष्ट्ये असल्याचे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी सांगितले. ईद उल अजहा निमित्त लातूर येथील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज प्रसंगी खुत्बा देताना ते बुधवारी बोलत होते. 
ते पुढे म्हणाले, पैगम्बर इब्राहीम अलै. संबंधी कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” आठवण करा जेव्हा अल्लाहने इब्राहीमची काही गोष्टींमध्ये परीक्षा घेतली आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाहने त्यांना म्हटले, ”मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.” तेव्हा इब्राहीमने विचारले, ” आणि माझ्या संततीसाठीही हेच अभिवचन आहे का?” तेव्हा अल्लाहने उत्तर दिले, ” माझे अभिवचन अत्याचार्‍यांसाठी नाही.”( सुरह अलबकरा आयत नं. 124).
इब्राहीम अलै. यांच्या काळात काबागृहामध्ये अनेक मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि लोक त्यांची पूजा करीत होते. त्यांचे वडील स्वत: मूर्तीकार होते. त्यांची समाजात मोठी प्रतीष्ठा होती. मूर्तीपूजा त्या काळी प्रस्थापित अशी पूजा पद्धती होती. मात्र लहानपणापासूनच इब्राहीम अलै. सलाम यांना  -(उर्वरित पान 7 वर)
मूर्तीपूजेमध्ये रस नव्हता. ते सारखा विचार करायचे की, ईश्‍वर कोण आहे? एकदा त्यांना आकाशात तारा चमकताना दिसला. त्यांना वाटले हा एवढा प्रकाशमान आहे तर हा ईश्‍वर असावा. पण तो लोप पावताच त्यांना वाटले की हा तर लोप पावला हा कसा ईश्‍वर असू शकतो. असेच चंद्र आणि सूर्या बाबतीत झाले. विचार प्रक्रियेनंतर त्यांच्या लक्षात आले की, ईश्‍वर तो आहे ज्याने हे चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी व सौरमंडल तयार केेली आहेत. पृथ्वीवरील सर्व जीव जंतू आणि मनुष्य यांना जन्माला घातले आहे. त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या आहेत. हे सत्य लक्षात आल्याबरोबर इब्राहीम अलै. यांनी  एकदा गावातील सर्व लोक यात्रेमध्ये गेल्याची संधी साधून  काबागृहात घुसून सर्व मुर्त्या कुर्‍हाडीने तोडून टाकल्या आणि कुर्‍हाड सर्वात मोठ्या मुर्तीच्या हातात ठेवून दिली. यात्रेतील लोक परत आल्यानंतर त्यांनी काबागृहातील मुर्त्यांची अवस्था पाहिली व त्यांचा संशय इब्राहीम अलैह सलामवर आला. त्यावर ते म्हणाले, मला काय माहित त्या मोठ्या मूर्तीला विचारा त्याच्या हातात कुर्‍हाड आहे. तेव्हा लोकांनी आश्‍चर्याने विचारले तो कसा काय तोडील तो तर हालचालच करू शकत नाही? तेव्हा इब्राहीम अलैह सलाम म्हणाले, लोक हो! जो स्वत: हालचाल करू शकत नाही तो तुमचा ईश्‍वर कसा असू शकतो? लोकांच्या लक्षात हे सत्य आले की, मूर्ती पूजेमुळे काही साध्य होत नाही. मात्र परंपरेपासून चालत आलेली मूर्तीपूजा आणि त्यासोबत येणारे पौरोहित्याचे फायदे सोडण्यासाठी ते तयार झाले नाही. यानंतर अग्नीकुंड पेटविण्यात आले व त्यात इब्राहीम अलै. यांना टाकण्यात आले. मात्र ईश्‍वरीय आदेशाने आगीने इब्राहीम अलै. यांना कुठलीही हानी पोहोचली नाही आणि ते सुखरूप बाहेर आले. 
इब्राहीम अलै. सलामच नव्हे तर जेवढे काही प्रेषित या पृथ्वीवर आले, त्यांनी एका ईश्‍वराची भक्ती करण्याचा संदेश दिला. त्या सर्वांना त्या-त्या काळच्या लोकांनी अभूतपूर्व असा त्रास दिला. अनेकांना देशोधडीला लावले. अनेकांच्या हत्या केल्या. आजही एक ईश्‍वराची भक्ती करण्याची हाक दिली की, अनेक लोक त्याच्या विरोधात उठून उभे राहतात. 
21 व्या शतकातल्या आधुनिक विज्ञानालासुद्धा आज हे सांगता येत नाही की, सौरमंडल किती मोठे आहे? आपल्याला एक चंद्र, एक सूर्य दिसतो पण सौर मंडलमध्ये लाखो चंद्र, सूर्य आहेत आणि आपल्याला दिसणार्‍या चंद्र, सूर्यापेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. इब्राहीम अलै. यांनी सांगितले की, माझा ईश्‍वर तो आहे ज्याने हे सौरमंडल नुसते निर्माणच केले नाही तर ते व्यवस्थित संचलित सुद्धा केलेले आहे. सूर्य आणि चंद्र वेळेवर निघतात. त्यांच्या उगवण्या आणि मावळण्याचे जे वेळापत्रक आज आहे तेच हजारो वर्षापूर्वीही होते. हे सहज शक्य आहे का? लाख प्रयत्न करून सुद्धा रेल्वे वेळेवर धावू शकत नाही मात्र लाखो वर्षापासून सूर्य, चंद्र, तारे वेळेवर धावत आहेत. ही सर्व ईश्‍वरीय व्यवस्था आहे. इब्राहीम अलै. यांचे वारस प्रेषित मुहम्मद सल्ल. होत व त्यांचे उम्मती म्हणून आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की, एक ईश्‍वराच्या संकल्पनेपासून लांब असलेल्या सर्व बांधवांना एक ईश्‍वराच्या आराधनेचे महत्व समजावून सांगावे.
इब्राहीम अलै सलाम यांना मूलबाळ होत नव्हते. त्यांनी मुलासाठी विशेष अशी प्रार्थना केली व 80 वर्षाच्या पेक्षा जास्त वयात त्यांना मुलगा झाला. त्यालाही वाळवंटात एकटा सोडून देण्याबद्दल ईश्‍वरीय आज्ञा झाली. तेव्हा इब्राहीम अलै. यांनी आपली प्रिय पत्नी हाजरा अलै. आणि लहान बाळ ईस्माईल अलै. यांना मक्का येथील सफा व मरवा पर्वताच्या मध्ये वाळवंटात सोडून दिले. उतारवयात झालेल्या मुलाविषयी माणसाला किती प्रेम असते याचा अंदाज आपण करू शकतो. असे असतांनाही अल्लाहच्या आदेशाने त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला तेथे सोडले. मुलगा तहान लागल्याने रडू लागला. हाजरा अलै. यांनी कुठला काफिला दिसतो का म्हणून सफा आणि मरवा पर्वतांमध्ये सात फेर्‍या मारल्या. इकडे बाळ आक्रस्ताळपणे रडत-रडत पाय खोरत होते. त्याच्या पायाच्या हालचालीने वाळू सरकू लागली आणि ईश्‍वरकृपेने वाळवंटात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. ही ईश्‍वरीय लीला होती. आजही त्या ठिकाणी गोड पाण्याचा स्त्रोत अस्तित्वात आहे. त्याला आब-ए-जम-जम असे म्हणतात. आब म्हणजे पाणी जमजम म्हणजे थांब-थांब, असे हाजरा अलै. यांनी म्हटल्याने त्या पाण्याचा प्रवाह एकाच ठिकाणी थांबला. सार्‍या जगातील लोक हजला गेल्यानंतर ते पाणी पितात आणि सोबत घेऊनही जातात. आजही त्या ठिकाणी शक्तीशाली दोन मोटारीने रात्रंदिवस पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, पाणी संपत नाही. हजारो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. रूक्ष वाळवंटात ज्या ठिकाणी पाणीच मिळत नाही अशा ठिकाणी गोड्या पाण्याचा एवढा मोठा स्त्रोत हजारो वर्षापासून अखंडपणे प्रवाहित राहणे ही एकच गोष्ट बुद्धीमान व्यक्तीसाठी अल्लाहचे अस्तित्व मान्य करण्यासाठी पुरेशी आहे. 
जगातील प्रमुख तीन संप्रदाय ज्यू, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम हे इब्राहीम अलै., हाजरा अलै., इस्माईल अलै. सलाम आणि या तिघांच्या जीवन प्रवासावर विश्‍वास ठेवतात. हे तीन्ही संप्रदाय मिळून जगातील दोन तृतीयांश लोक होतात. मात्र अजूनही एक तृतीयांश लोक एक ईश्‍वराच्या संकल्पनेपासून लांब आहेत. त्यांच्यापर्यंत इब्राहीम अलै. यांचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे. 
कालांतराने ईश्‍वरीय आदेशाने इब्राहीम अलै. पुन्हा आपल्या परिवारात परत येतात. एव्हाना इस्माईल अलै. सलाम तरूण झालेले असतात. अशा अवस्थेत असतांना सतत तीन दिवस पुन्हा इब्राहीम अलै. यांना स्वप्न पडते की ते इस्माईल अलै. यांची कुर्बानी देत आहेत. प्रेषितांचे स्वप्न हे निव्वळ स्वप्न नसून ईश्‍वरीय मार्गदर्शनाचा एक स्त्रोत असतो. त्यांनी आपल्या या स्वप्नाची कल्पना हाजरा अलै. आणि इस्माईल अलै. सलाम यांना दिली. ते दोघेही कुर्बानी देण्यासाठी तयार झाले. इब्राहीम अलै. सलाम यांची ही शेवटची परीक्षा होती. त्यातही ते उत्तीर्ण झाले. त्यांनी आपल्या मुलाला गावापासून दूर निर्जनस्थळी नेले व आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून इस्माईल अलै. सलाम यांना जमिनीवर पाडून मानेवर सुरी चालविली. मात्र क्षणार्धात ईश्‍वरीय दूत हजरत जिब्राईल अलै. त्या ठिकाणी प्रकट झाले व त्यांनी स्वर्गातील मेंढा आणून इस्माईल अलै. सलाम यांच्या ठिकाणी ठेवला. येणेप्रमाणे इस्माईल अलै. यांच्या ठिकाणी मेंढ्याची कुर्बानी झाली. स्वत:च्या तरूण मुलाची कुर्बानी तेही ईश्‍वरीय आदेशाचे पालन म्हणून देणे हे किती कठीण काम आहे हे, एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल. इब्राहीम अलै. यांनी ती कुर्बानी दिली. अर्थात डोळ्याची पट्टी सोडल्यानंतर खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मात्र सुरी तर त्यांनी मुलाच्या मानेवरच चालविली होती. ही घटना मानवी इतिहासातील एवढी मोठी घटना ठरली की, प्रलयाच्या दिवसापर्यंत संपूर्ण मुस्लिम समाजातील ऐपतदार लोकांना दरवर्षी त्या घटनेची आठवण रहावी म्हणून जनावर कुर्बान करण्याचा आदेश देण्यात आला. 
म्हणून ईद-उल-अजहा ही आईचा त्याग, वडिलांची कुर्बानी आणि मुलाचे समर्पण या तिन्ही उच्च मानवी मुल्यांचा समुच्चय आहे. इब्राहीम अलै. सलाम हे आयुष्यातील प्रत्येक ईश्‍वरीय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना सार्‍या जगाचे इमाम (नेता) केले जात असल्याची घोषणा अल्लाहने केली. त्यावर इब्राहीम अलै. यांनी हे नेतृत्व त्यांच्या वंशाकडेही राहील का अशी विचारणा केली. तेव्हा उत्तर मिळाले की, तुमच्या वंशामध्ये जर कोणी अत्याचारी निपजला तर त्याला नेतृत्व बहाल करण्यात येणार नाही. 
आज ईब्राहीम अलै. यांचा हा संदेश तसेच कुरआनचा आदेश सार्वजनिक करण्याची आवश्यकता आहे. अल्लाहच्या सोबत कोणालाही सामिल करणे अर्थात शिर्क करणे यापेक्षा मोठा अपराध दूसरा नाही. हे सत्य पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. वरील प्रमाणे नमूद ईश्‍वरीय आदेश जर का जाणते किंवा अजाणतेपणे आपण मानवजातीपासून लपवत असू तर आपल्यावर ईश्‍वराची अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत जे काही अपराध आपल्याकडून झाले, कुरआनचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यामध्ये आपण गफलत केली, तरी शेवटचा एक मार्ग अजून मोकळा आहे तो म्हणजे तौबा (माफी) मागणे. आपल्या या नाकर्तेपणाची माफी मागून जर का आपण इस्लामचा संदेश जगापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग पत्करला तर आजही आपल्यावर ईश्‍वरीय कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अल्लाहने म्हटलेले आहे, मी माफी स्विकारणारा आहे. एवढी संधी असतानांसुद्धा जर आपण ईश्‍वरीय आदेश सर्व मानवजातीपर्यंत पोहोचविण्यामध्ये हयगय केली तर मात्र आपल्यावर ईश्‍वरीय कोप झाल्याशिवाय राहणार नाही. आज मुस्लिम समाजामध्ये या कर्तव्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती बळावते आहे, म्हणून त्यांना चारही बाजूने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
इस्लामला स्वत: समजणे आणि दुसर्‍यापर्यंत त्याचा संदेश पोहोचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यापासून सुटका नाही. मला माहित नव्हते, मला कोणी सांगितले नाही, अशा प्रकारची बहानेबाजी करता येणार नाही. केली तरी अल्लाहपुढे चालणार नाही. आज इस्लामसंबंधी कोणतीच गोष्ट लपून राहिलेली नाही. हजारोंच्या संख्येत मुफ्ती, आलीम उपलब्ध आहेत, लाखो पुस्तके उपलब्ध आहेत, कुरआनचे भाषांतरे जवळजवळ प्रत्येक मोठ्या भाषेत झालेली आहेत. इंटरनेटवर इस्लामसंबंधी सर्व बारिक सारीक माहिती अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे, असे असतांना आपण मागे राहिलो तर मात्र आपली काही खैर नाही. 
  इस्लामचा अभ्यास करताना भौतिक शास्त्रांचा अभ्यास करण्यापासून कोणीही रोखलेले नाही. उलट असे ज्ञान हस्तगत करण्यासाठी चीनपर्यंत जाण्याची प्रेरणा स्वत: प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेली आहे. तुम्ही दोन्ही विधींमध्ये अभ्यास करून मोठ्या पदावर जावू शकता. एस.पी. बनू शकता, कलेक्टर बनू शकता पण हे कशासाठी बनायचे? तर न्याय करण्यासाठी. याशिवाय, दूसरा तुमचा कुठला उद्देश असता कामा नये. इस्लामची इमारत  न्यायावर उभी आहे. त्यासाठी स्वत: न्यायप्रिय असणे आवश्यक आहे, चारित्र्यवान असणे आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही दुसर्‍यासाठी न्याय करू इच्छिता तेव्हा अगोदर लोक तुमच्याकडे पाहतील, तुम्ही कसे आहात, तुमचा व्यवहार कसा आहे, तुमचे चारित्र्य कसे आहे? याकडे पाहूनच लोक तुमच्याबद्दल मत बनवतील. 
इब्राहीम अलै. हे सगळ्यांचे इमाम आहे. कुरआन सगळ्या जगासाठी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना काळजी फक्त मुस्लिमांचीच नव्हती त्यांना सगळ्यांची काळजी होती. तीच काळजी आपणासर्वांची असायला हवी, हाच आजच्या ईदुल अजहाचा संदेश आहे. कुर्बानी तर करावीच लागणार आहे. कुर्बानी करण्यापासून कोणत्याही ऐपतदार व्यक्तीची सुटका नाही. कुठलेही कारणं सांगून कुर्बानी टाळता येत नाही. तुम्ही दुसर्‍या तर्फे कुर्बानी देऊ शकत नाही. तुम्हाला स्वत:ला कुर्बानी द्यावी लागेल. कारण त्यामुळे समाजातील अनेक दुर्बल घटकांचा उदा. पशुपालक व गरीबांचा फायदा होतो. 
आपण आपल्या देशाच्या उन्नतीसाठी योगदान देणेही गरजेचे आहे. आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे. आमचं भाग्य आहे की आम्ही या देशात जन्मलो. या देशाच्या उन्नतीसाठी आमचं मोठं योगदान असलं पाहिजे. सगळ्यांच हित हे आमचं हित आहे. जनकल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणं हे जरी अवघड असलं तरी यासाठी आम्ही स्वत:ला झोकून देऊन आमच्या आशा, आकांक्षाची कुर्बानी देत कार्य केलं तर नक्कीच आम्ही प्रगतीपथावर जाऊ शकू, सगळ्यांची मनं जिंकू शकू. आपसातील भेदभाव मिटविण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमच्या देशाचं ब्रिदच ’सत्यमेव जयते’ हे आहे. म्हणजेच सत्यच विजयी होणार. देशात स्वच्छ भारत अभियान राबविलं जातंय. इस्लामच सांगणंच आहे की, ’पाकी आधा ईमान है’ याचा अर्थच स्वच्छता हे आमचं ईमान आहे, त्यासाठी आम्ही आपलं घर, परिसर, शहर, राज्य, देश स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावा. याकामी सर्व मुस्लिम बांधवांनी स्वतला झोकून द्यावे. धार्मिक शिक्षणाबरोबरोच आधुनिक शिक्षणही घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
केरळ हे राज्य सर्वांच्या मदतीला धावते. जेथे जेथे आजपर्यंत आपत्ती आली केरळवासियांनी मदतीसाठी सर्वात अधिक योगदान दिले. ते मोठ्या मयाळू प्रवृत्तीचे लोक आहेत. आज ते नैसर्गिक संकटात सापडलेले आहेत. आता आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांनी आपसातील मतभेद विसरून त्यांच्या मदतीला धावले पाहिजे, शेवटी असे आवाहनही तौफिक असलम खान यांनी केले.

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांचे पुत्र अब्दुर्रहमान यांच्या कथनानुसार,
सुफ्फावाले गरीब लोक होते. एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याच्या घरात दोन मनुष्यांचे अन्न आहे त्याने येथून तिसऱ्याला घेऊन जावे आणि ज्याच्याजवळ चार  मनुष्यांचे अन्न आहे त्याने एक अथवा दोन मनुष्यांना घेऊन जावे.’’
तेव्हा माझ्या वडिलांनी (अबू बक्र (रजि.) यांनी) आपल्या घरी तीन लोकांना आणले आणि पैगंबरांनी आपल्या घरात दहा लोकांना नेले. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : 
पैगंबर मुहम्मद (स.) लोकांचे नेता व सेनापती होते. जर त्यांनी त्यांच्या घरी दहा लोकांना घेऊन गेले नसते तर सर्वसामान्य लोक दोन, चार, सहा आणि आठ लोकांना  आनंदाने का घेऊन जातील. कायद्यानुसार जबाबदार लोकांनी त्याग व बलिदान केले तर त्याच्या मागे चालणाऱ्यांमध्ये अधिकाधिक त्याग व बलिदानाची भावना उद्दिपित होईल आणि  पुढे चालणारेच जर मागे राहिले तर मागे चालणाऱ्यांमध्ये आणखीन मागे जाण्याच्या भावनेस चालना मिळेल.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, इस्लामकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पैगंबर मुहम्मद (स.) लोकांना देत होते. पैगंबरांना जे काही मागण्यात आले, त्यांनी मागणाऱ्याला  ती वस्तू अवश्य दिली. एकदा एक मनुष्य पैगंबरांकडे आला तेव्हा पैगंबरांनी त्याला दोन टेकड्यांदरम्यान चरणाऱ्या सर्व शेळ्या देऊन टाकल्या. तो मनुष्य आपल्या कबिल्यात गेला आणि  म्हणाला, ‘‘हे लोकहो! इस्लामचा स्वीकार करा कारण दारिद्र्य व उपासमारीला न घाबरणाऱ्या मनुष्यासारखे मुहम्मद (स.) देतात.’’
कथनकार (माननीय अन रजि.) पुढे म्हणतात की मनुष्य फक्त जगाच्या इच्छेपोटी ईमान बाळगतो, परंतु अधिक काळ लोटला नाही तोच इस्लाम त्याच्या आत्म्यामध्ये पैगंबरांच्या  शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे प्रवेश करतो आणि जग व जगातील साधनसामुग्रीपासून इस्लामच्या दृष्टीने अधिक प्रिय बनतो. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार,
एका ‘नबी’ (पैगंबर)चा परिचय करून देताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर आहे.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘धर्माचा प्रसार (आवाहन) करण्याच्या अपराधापोटी त्या ‘नबी’च्या समुदायातील लोकांनी त्यांना इतके मारले की ते रक्तबंबाळ केले आणि ‘नबी’ची स्थिती अशी होती की त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील रक्त पुसत पुसत  म्हणायचे की हे अल्लाह! माझ्या समुदायाचा हा अपराध क्षमा कर. (आणि आता यांच्यावर प्रकोप कोसळवू नकोस.) कारण हे लोक अज्ञान आहेत, सत्य स्थिती जाणत नाहीत.’’ (हदीस  : बुखारी) 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget