Latest Post

वैराग्य इस्लामला मान्य नाही. इस्लामला वरील तीन संकल्पनांपैकी प्रथम संकल्पना अजिबात मान्य नाही. इस्लामची तत्त्वे या संकल्पनेच्या पूर्ण विरोधात आहेत. इस्लामची आचारप्रणाली, श्रध्दा आणि मूलकर्तव्ये सर्वप्रथम या संकल्पनेच्या विरोधात जातात. त्याची स्पष्ट कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१) इस्लाम धर्मात अल्लाहबद्दलची संकल्पना ही फक्त ‘खरा प्रियतम’ची नाही तर ती ‘खरा मालक’ आणि ‘खरा कायदे करणारा’ अशी आहे. जर अल्लाहला फक्त ‘खरा प्रियतम’ मानले तरच वैरागी आणि संन्यासी जीवन पुढे येते. परंतु इस्लामच्या जीवनपध्दतीत अल्लाह मालक, शासक आणि पालक आहे. अल्लाहजवळ त्याच्या निर्मितीसाठी काही कायदे आणि दिव्य मार्गदर्शन आहे. म्हणून मनुष्याने फक्त अल्लाहच्या प्रेमात अथवा अल्लाहच्या भीतीपोटी स्वतःला विसरून जाणे पुरेसे नाही. तर हे तितकेच महत्त्वाचे आहे की त्या व्यक्तीने आचरणातून स्वतःला अल्लाहचा आज्ञाधारक सिध्द करण्यासाठी अल्लाहच्या ईशआदेशांचे पालन करावे.
२) इस्लामच्या मूलतत्त्वांना आचरणात आणण्यासाठी सामाजिक जीवन अत्यावश्यक आहे. संन्यासी संकल्पनेत सार्वजनिकतेला अजिबात थारा नाही. इस्लामच्या मुख्य कर्तव्यांना जर जीवनव्यवहारात पार पाडले जात नसेल तर अशा व्यक्तीकडून इस्लाम पूर्ण रूपात आपल्या जीवनव्यवहारात आचरणात आणणे अशक्य आहे.
३) इस्लामचे आधारस्तंभ हे सर्व खरे तर प्रार्थनेच्या स्वरूपात आहेत. परंतु त्याच वेळी त्या प्रार्थनेत अनेक सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रीय व्यवहार्यता समाविष्ट असतात. म्हणूनच इस्लामचे आधारस्तंभ (प्रार्थना) वैयक्तिकरित्या नव्हे तर सामुदायिकरित्या अदा केले जातात. एकीकडे इस्लामच्या मूळ कर्तव्यामुळे इस्लामी चरित्र जे साकार होते ते संन्यास, वैराग्य आणि सर्वसंग परित्यागच्या विरुध्द आहे. दुसरीकडे व्यक्तीजर सामुदायिकरित्या (जमात) नव्हे तर एकटाच दररोजची नमाज अदा करत असेल आणि जकात देत असेल तर यामुळे इस्लामला अभिप्रेत आणि अपेक्षित परिणाम मुळीच मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत, अधिक काय सांगावे, प्रार्थनेचे उच्च टोक जरी एखाद्याने पटकावले तरी अल्लाहच्या उपासनेचा हक्क पूर्णतः ती व्यक्ती पार पाडूच शकत नाही.
४) इस्लामच्या पाच मुख्य कर्तव्यांना इस्लामचा आधार स्तंभ म्हटले आहे आणि ‘पूर्ण इस्लाम’ असे संबोधण्यात आलेले नाही. हे सत्य येथे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याचाच अर्थ असा होतो की इस्लामची ही पाच मुख्य कर्तव्ये म्हणजे इस्लाम नव्हे. आणखी काही प्रमुख बाबींचा समावेश त्यात आहे. इमारत स्तंभाविना उभी राहिली असे आपण म्हणू शकत नाही. इमारतीचे आधारस्तंभ म्हणजेच इमारत हे म्हणणे सुध्दा चुकीचे त्याच प्रमाणे इस्लामची पाच आधार स्तंभ म्हणजे पूर्ण इस्लाम नव्हे. एखाद्याच आधारस्तंभाला (उदा. नमाजला) फक्त इस्लाम कदापि म्हटले जाऊ शकत नाही. इमारत खांब, भिती आणि छत मिळून तयार होते. त्याचप्रमाणे इस्लाम धर्माचे आहे. इस्लाम धर्माचे छत हे त्याची शिकवण आहे जी पाच मूळ कर्तव्यांसोबत जीवनव्यवहारात आचरणात आणली जाते. त्यांना वैयक्तिकरित्या (एकटे) आचरणात आणणे हे तितकेच कठीण कृत्य आहे जितके वाळूत पोहणे. एकटेपणा हा इस्लामला पूर्ण न्याय देऊच शकत नाही. सामुदायिकपणा हा इस्लामच्या कर्मशीलतेचा गाभा आहे. इस्लामच्या पाच मूलतत्त्वांना (मूलाधार) पूर्ण न्याय देणे आणि इस्लामला पूर्णतः कृतीशील आचरणात आणणे या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. इस्लाम आणि वैराग्य व संन्यासचा दूरदूरचासुध्दा संबंध नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट म्हणणे आहे,
‘‘इस्लाममध्ये वैराग्याला अजिबात स्थान नाही.’’
एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे उस्मान बिन माजून यांनी स्वतःहून वैराग्य पत्करण्यासाठी परवानगी मागितली तेव्हा नकार देत प्रेषित म्हणाले,
‘‘वैराग्याऐवजी अल्लाहने आपणास एक साधा सरळ मार्ग दिला आहे आणि इब्राहीमचा धर्म दिला.’’
अशा प्रकारे ख्रिस्ती धर्मात वैराग्याला सदाचार आणि ईशभक्तीचा उच्चांक समजला जातो, त्याला इस्लामने रद्दबातल ठरविले आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि त्या सर्वानंतर मरयमपुत्र ईसा (अ.) ला पाठविले आणि त्याला इंजील (बायबल) प्रदान केले, आणि ज्या लोकांनी त्याचे अनुयायित्व स्वीकारले त्यांच्या हृदयात आम्ही करूणा आणि दया घातली, आणि वैराग्य त्यांनी स्वतःच काढले, आम्ही ते त्यांच्यासाठी कर्तव्य म्हणून ठरविले नव्हते, परंतु अल्लाहच्या प्रसन्नतेच्या शोधात त्यांनी स्वतःच ही कुप्रथा (बिदअत) काढली.’’ (कुरआन ५७: २७)
वरील ईशवाणीने हे स्पष्ट झाले की इस्लामच फक्त वैराग्याचा धिक्कार करणारा एकमेव धर्म नाही तर इतर ईश्वरीय धर्म सुध्दा वैराग्याचा त्याग करतात. जो कोणी वैराग्य आणि सन्यास पत्करतो, तो स्वतः आपल्यातर्फे तसे करतो. कोणत्याच ईश्वरी धर्माने वैराग्याचे समर्थन केलेले नाही.
ज्याप्रमाणे ईश्वरी धर्म आणि त्याची मूलभूत तत्त्वे वैराग्याच्या विरोधात आहेत, त्याचप्रमाणे त्या ईश्वरी धर्माची शिकवणसुध्दा वैराग्य तथा संन्यासच्या विरोधात आहे. याचमुळे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अशा सर्व कृत्यांना निषिध्द ठरविले आहे जी वैराग्याशी साम्य राखतात अथवा वैराग्याला प्रोत्साहन देतात. म्हणूनच ब्रम्हचर्य, खच्चीकरण अथवा वैराग्य घेणे, निरंतर उपवास अथवा अन्नत्याग, मौन धारण करणे, रात्रभर जागरण करणे इ. कृत्ये जी शरीराला त्रासदायक आहेत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या हक्कांना पायमल्ली करणारी आहेत. ही सर्व कृत्ये अवैध ठरविण्यात आली आहेत.
इस्लामचे वैयक्तिक जीवन: दुसरी ही संकल्पनासुध्दा इस्लामला मान्य नाही. इस्लाम काही असा धर्म मुळीच नाही जो ईश्वर आणि मनुष्याच्या संबंधांना वैयक्तिक बाब समजतो. तसे असते तर इस्लामच्या सर्व शिकवणी वैयक्तिक जीवनाच्या समस्या सोडविण्यासाठीच मर्यादित असत्या. मग फक्त मशिदपुरते, उपवासापुरते अथवा काही नैतिक मूल्यांचा फक्त इस्लाम धर्मात उल्लेख असता. परंतु कुरआन आणि हदीसचे प्रत्येक पान अन् पान ग्वाही देत आहे की इस्लाम धर्म फक्त वैयक्तिक बाब नाही. इस्लाम फक्त नमाज अथवा इतर उपासनापध्दतीचे नीतीनियम आणि वैयक्तिक जीवनाचे नीतीनियमच देत नाही. इस्लाम मनुष्यजीवनाच्या सर्व क्षेत्रांत मार्गदर्शन करते. आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शासकीय, सामाजिक क्षेत्रात कुरआनने मानवी जीवनव्यवहारासाठी नियम आणि मर्यादा घालून दिल्या आहेत. उदा. कुरआन व्यभिचार करणाऱ्याला शंभर फटके देण्याचा आदेश देत आहे. हा ईशआदेश शासनसंस्था, पोलीस आणि न्यायसंस्था यांच्याशी निगडीत आहे. हे सामाजिक कार्य आहे. परंतु कुरआननुसार हे दिव्य प्रकटन ‘अल्लाहचा धर्म आहे.’ कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरूष दोहोंपैकी प्रत्येकास शंभर फटके मारा, आणि त्यांची कींव करू नका, अल्लाहच्या धर्माच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रध्दा बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रध्दावंतांचा एक समूह उपस्थित असावा.’’ (कुरआन २४: २)
अशा प्रकारे वरील दिव्य प्रकटना नुसार शंभर फटके व्यभिचारी व्यक्तीला मारणे हा ‘अल्लाहच्या धर्माचा’ एक भाग आहे. हे कृत्य धर्माच्या बाहेरचे मुळीच नाही. त्याच प्रमाणे कुरआन नुसार वर्षातील चार महिने पवित्र मास आहेत (पवित्र चातुर्मास) आणि त्या काळात युध्द करणे निषिध्द आहे. कुरआनचा हा आदेश युध्दशास्त्राबाबतचा आहे. तसेच सामाजिक प्रश्नाशीसुध्दा निगडीत आहे. परंतु कुरआन यास ‘योग्य धर्म’ म्हणून संबोधते. कुरआनचे खालील दिव्य प्रकटन आहे,
‘‘वस्तुस्थिती अशी आहे की, महिन्यांची संख्या, ज्या दिवसापासून अल्लाहने पृथ्वी व आकाशांना निर्माण केले आहे, अल्लाहच्या लेखी बाराच आहेत आणि त्यापैकी चार महिने अवैध आहेत. हाच योग्य धर्म आहे.’’ (कुरआन ९:३६)
या चार महिन्यांचे पावित्र्य राखण्याचा आदेश आणि युध्दाने त्यांचे पावित्र्यभंजन न करण्याचा आदेश हे कृत्य धर्माचा एक भाग आहे आणि त्यात धर्मबाह्य असे काहीही नाही. कुरआन फक्त इस्लामचे सामाजिक कायदे आणि समाज यांना ‘धर्म’ ही संज्ञा देत नाही तर इतर धर्माच्या सामाजिक कायद्यांना आणि समाजास ‘त्यांचा धर्म’ म्हणून संबोधतो. कुरआनोक्ती आहे,
‘‘त्याचे हे काम नव्हते की बादशाहच्या धर्मात (मिस्त्रच्या शाही कायद्यात) आपल्या भावाला पकडावे.’’ (कुरआन १२: ७६)
प्रेषित युसुफ (अ.) यांना हे शक्य नव्हते की त्यांच्या बंधुना मिस्रच्या शाही कायद्याद्वारे पकडावे. याचा अर्थच हा होतो की मिस्र देशाचा कायदा किवा गुन्ह्यासंबंधीचा कायदा त्यांच्या बंधुना लागू होत नाही. कारण ते त्या देशाचे रहिवाशी नव्हते.
वरील उदाहरणे पुरेशी आहेत हे स्पष्ट करण्यासाठी की अल्लाहचा प्रत्येक आदेश आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांची प्रत्येक हदीस इस्लाम धर्माचे अविभाज्य अंग आहे. त्यांच्यापैकी एकालासुध्दा धर्मबाह्य अथवा बाहेरचे म्हणू शकत नाही. इस्लाम जर अल्लाहला पूर्ण शरण जाणे आणि अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारणे आहे तर त्याचे काही आदेशांचे पालन करावयाचे आणि इतर आदेश आज्ञाधारकतेबाहेरचे म्हणून पालन करावयाचे नाही, हे कसे शक्य आहे?
वरील विवेचनाने हेच सिध्द होते की कुरआन आणि हदीस दोघांनी मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाला तसेच मनुष्य जीवनव्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्राला व्यापून टाकले आहे. आणि त्यासंबंधीचे सर्व दिव्य प्रकटने इस्लाम धर्माचा भाग आहेत. अशा परिस्थितीत आपण हे कसे सांगू शकता की इस्लाम व्यक्तिगत जीवनापुरताच आहे आणि सार्वजनिक जीवनाशी त्याचा काडीमात्र संबंध नाही?

‘‘हे पैगंबर (मुहम्मद स.) आम्ही तुम्हास समस्त जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (कुरआन)
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी साने गुरूजी असे म्हणतात की, ‘‘मुहम्मद (स.) चमत्कारावर भर न देता बुद्धीवर भर देतात. विचाराला चालना देतात. भोळसटपणावर भर देणारे ते  नव्हते. प्रज्ञेचा डोळा त्यांना प्रिय होता. बुद्धीची महिमा ते जाणत. पैगंबरांना ही सारी सृष्टी ईश्वराचे अस्तित्व पुकारणारी असे वाटे. सर्वत्र ईश्वरी चमत्कार! सारी सृष्टी ईश्वराची महिमा!  अद्वितीय केवळ एक अशा ईश्वराचा आचार्य. हा आचार्य सृष्टीचाही आचार्य आहे. त्या एक ईश्वराचा हा प्रेषित सृष्टीचाही प्रेषित आहे.’’ (संदर्भ : इस्लामी संस्कृती, साने गुरुजी, पान क्र.  ७१)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की त्यांचे आवाहन वर्ण, वंश, भाषा, देश इ. तमाम भेदांच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीला संबोधन करते.
‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी अदा करा.’’ (हदीस : इब्ने माजा)
काबाडकष्टाने हातावर घट्टे पडलेल्या एका कष्टकऱ्याच्या हाताचे चुंबन घेऊन प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे तर स्वर्गामध्ये जाणारे हात आहेत.’
पर्यावरण संवर्धनासाठी आणि वैश्विक समतोल राखण्यासाठी प्रेषितांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. ते म्हणतात,
‘‘एखाद्याच्या हाती एखादे रोपटे असेल त्याच्या डोळ्यादेखत सृष्टीचा विनाश होत असेल तरी त्याने रोपटे लावावे.’’ (हदीस)
‘‘एखादे झाड तोडावे लागले तर त्याऐवजी एक नवीन झाड लावावे व जोपासावे.’’
‘‘एखाद्याने वृक्षारोपन करून त्याची निगा राखली तर जोवर जग त्यापासून लाभान्वित होईल तोवर त्याच्यासाठी शाश्वत पुण्याई आहे.’’ (हदीस : मुसनद अहमद)
‘‘द्वेष करणाऱ्यांपासून दूर राहा, कारण द्वेष चांगल्या गोष्टी खाऊन टाकतो. जसे अग्नी लाकडाला भस्म करतो किंवा गवताची राख करतो.’’
‘‘जो अत्याचारीला अत्याचार करण्यापास बळ देतो आणि त्याला माहीत असते की तो अत्याचारी आहे, तर अशा मनुष्याने इस्लामचा त्याग केला आहे.’’ (हदीस)
कौटुंबिक जीवनाविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कोणत्याही श्रद्धावंताने श्रद्धावंत स्त्रीशी (पत्नीशी) घृणा करू नये,  तिची एखादी सवय आवडलली नाही तर दुसरी आवडेल.’’ (हदीस)
‘‘ज्या कोणाच्या तीन मुली अथवा तीन बहिणी असतील, अथवा दोन मुली वा दोन बहिणीच असतील आणि त्याने त्यांचे चांगले संगोपन केले आणि त्याच संबंधाने अल्लाहचे भय  बाळगले तर त्याच्यासाठी स्वर्ग आहे.’’ (हदीस)
त्या काळात मुलींना जिवंत गाडण्याची क्रूर प्रथा होती, ती प्रथा पैगंबरांनी संपुष्टात आणली. संपूर्ण स्त्रीजातीला मानसन्मान दिला. स्त्रीयांना आपल्या पसंतीने विवाह करण्याचा हक्क  दिला, मातापित्याच्या, पतीच्या व पुत्राच्या संपत्तीत वाटा दिला. प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश दिला. विधवा व परित्यक्ता विवाह प्रचलित केला. हुडाप्रथा रद्द करून महेर (स्त्रीधन) अनिवार्य  केले. 
आदर्श समाजव्यवस्था निर्मितीसाठी मातापिता व थोरामोठ्यांचा आदर करणे प्रेषितांनी शिकविले त्यानुसार, ‘‘मातापिता प्रसन्न तर अल्लाह प्रसन्न, मातापिता नाराज तर अल्लाह नाराज.’’ (हदीस)
‘‘तो श्रद्धावंत होऊच शकत नाही जो पोटभर खातो, परंतु त्याचा शेजारी मात्र उपाशी राहतो.’’ (हदीस)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी तो श्रद्धावंत परिपूर्ण श्रद्धावंत आहे जो चारित्र्यवान आहे आणि तुमच्यामध्ये सर्वोत्त तो आहे जो आपल्या पत्नीशी उत्तम वागणूक 
ठेवून आहे.’’ (हदीस)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविषयी संत तुकडोजी महाराज म्हणतात, 
‘‘मुहम्मदाने केली प्रार्थना।
विखुरला इस्लाम कराया शहाणा।।
संघटित केले प्यारे स्वजना। त्या काळी
लोक प्रतिमापूजक नसावे
त्यांनी एका ईश्वरासी प्रथावे।।
हा मुहम्मदांचा उपदेश
नव्हे एकच देशासाठी।।’’
(संदर्भ : ग्रामगीता, अध्याय २७, ओवी ९०, पान २५२)

- खालिद जकी, चोपडा,
८९८३१०४६९९

ईश्वर, प्रेषित आणि साक्षात्कार यावरील चिंतन 



भारतात, मध्यपूर्वेत उदयास आलेल्या, सेमिटीक धर्ममतासंबंधी झालेले लिखाण, एकांगी स्वरुपाचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, सेमिटीक धर्ममतासंबंधी गैरसमजच जास्त  दिसून येतात. अलिकडच्या काळात, महाराष्ट्रात तात्त्विक स्वरुपाच्या चर्चा करणारी नियतकालिके फारशी नाहीत. परंतु नागपुरवरुन ‘आजचा सुधारक’ या नावाने तत्त्वज्ञानाची चर्चा  करणारे मासिक काढले जाते. त्यात मुलभूत स्वरुपाची तात्विक चर्चा आणि विवेकवाद यांना प्राधान्य देणारे लिखाण प्रसिध्द केले जाते. त्यामध्ये विवेकवादावर चर्चा करीत असताना एका महाराष्ट्रातील समिक्षकाने, इस्लामच्या संदर्भात, इस्लाम हा सेमिटीक धर्म असल्याने त्यात विवेक, बुध्दीवाद आणि कसलीही मूलभूत तात्विक सुत्रे नसून, इस्लाम केवळ  पोथीनिष्ठता असलेला धर्म आहे, अशा प्रकारचे प्रतिपादन केलेले होते. थोडक्यात, इस्लामच्या बाबतीत केले जाणारे लिखाण केवळ अज्ञानापोटी नसून मोठ्या प्रमाणावर मुद्दाम गैरसमज  पसरविणारे असते. वास्तविक, इस्लाम हा धर्म ग्रंथावर आधारलेला ग्रंथवादी आणि साक्षात्कारवादी धर्म असला तरी, त्यात केवळ शब्दप्रामाण्य नसून विवेकवाद आणि मुलभूत स्वरुपाचे व्यापक तत्वज्ञान आहे.
एका अर्थाने, इस्लाम म्हणजे अल्लाह आणि मानव यांच्या प्रतिकात्मक भेटीचे साकार रुप आहे. येथे अल्लाह याचा अर्थ एका विशिष्ट काळात, एका विशिष्ठ प्रकारे, व्यक्त होणारे परमेश्वराचे स्वरुप, असा होत नाही, तर काळ, इतिहास व घटना यांच्यापासून अलग आणि स्वतंत्र असा परमेश्वराचा, मुलभूत स्वरुपाचा, सृजनशील आत्मप्रत्ययकारी अविष्कार, असा  त्याचा अर्थ होतो. मानव म्हणजे केवळ एक अधःपतित व ईश्वरी चमत्काराची प्रतिक्षा करणारा सामान्य प्राणि, असा त्याचा अर्थ नसून, आपल्या बुध्दीसामर्थ्याच्या जोरावर ‘अल्लाहच्या  पूर्णत्त्वाचे’ स्वरूप देणारा सत्याविष्कार आणि ईश्वराचे सनातन व चिरंतन मूल्य व अस्तित्व यांची जाणीव करुन देणारे सत्य-कथन, असे मानले गेले आहे. त्या अर्थाने, इस्लाममध्ये  मनुष्य आणि ईश्वरी साक्षात्काराकडे वेगळ्या प्रकारे पाहिले गेले.
इस्लामच्या तत्वज्ञानात, अल्लाह म्हणजे ईश्वर आणि माणूस आणि ज्ञानाचा सिध्दांत, यांचे स्वरुप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात ईश्वरी साक्षात्काराला विशेष महत्त्व आहे. इस्लामने ‘अवताराची’ किंवा ‘प्रत्यक्ष ईश्वराच्या अवतरणाची’ संकल्पना स्विकारलेली नाही. कारण, इस्लामी तत्वज्ञानानुसार, ईश्वरी अवताराची कल्पना, मानव, मानवी स्वरुप, ईश्वराच्या   सर्वव्यापी, सर्व कल्याणकारी अनंत स्वरुपावर, एकप्रकारे मर्यादा घालणारे असते किंवा ख्रिश्चन धर्मामधील ईश्वराच्या व्यक्तिकरणाचे स्वरुपदेखील, परमेश्वराच्या अनंतत्वामध्ये, त्याच्या  विेश्वव्यापी चेतना शक्तीला मर्यादा घालणारेच आहे. म्हणून या मुलभूत सुत्राच्या परिणामातून, इस्लामने साक्षात्काराचा सिध्दांत मांडलेला आहे. इस्लामच्या प्रतिपादनानुसार, प्रत्येक  काळात परमेश्वरच माणसाच्या उध्दारासाठी प्रेषित पाठवतो. कारण, मानवी प्रज्ञेला मानवी माध्यमातूनच जास्त प्रत्ययकारी स्वरुपात प्रबुध्द केले जाऊ शकते. इस्लामनुसार, प्रत्येक  काळात पाठविलेले संदेश माणसाला योग्य प्रकारे सुरक्षित ठेवता न आल्याने किंवा त्यांचे योग्य प्रकारे ग्रहण करता न आल्याने, ईश्वराच्या संदेशात विकल्प निर्माण होउन मानवी समाजाचे अधःपतन होत राहिले. म्हणूनच, पुन्हा एकदा हजरत मुहम्मद पैगंबर (सल्ल.)आणि कुराण यांच्या स्वरुपात, मानवी समाजाच्या मार्गदर्शनासाठी साक्षात्कार-रुपाने पाठविले गेलेले संदेश म्हणजे इस्लाम होय.
इस्लामच्या प्रतिपादनानुसार कुरआन हे ईश्वरी संदेशाचे व्यक्त स्वरुप आहे. आणि म्हणून कुरआनमधील तत्वे, मूलभूत प्रेरणा आणि शिकवण यांचे स्वरुप अनादी व चिरंतन आहे. त्यामध्ये जसे तात्कालिक व प्रादेशिक संदर्भ आहेत, त्याचप्रमाणे, आनंदी प्रेरणांची सूत्रेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात आहेत.
इस्लामच्या तत्वज्ञानात, ‘साक्षात्काराच्या संकल्पनेला’ एक विशेष महत्त्व आहे. पैगंबर (सल्ल.) यांना ईश्वरी साक्षात्कार ताबडतोब किंवा अचानक झालेला नाही. त्यांनी आपल्या  आयुष्याची 40 वर्षे संसारात आणि चिंतनात घालविल्यानंतर आणि ‘सत्यवादी’ व ‘परोपकारी’ म्हणून समाजाची मान्यता मिळविल्यानंतर, टप्प्या-टप्प्याने, ईश्वरी संदेशाचे अवतरण झाले  आहे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर पैगंबर (सल्ल.) अंतर्मुख बनत गेले. चिंतनासाठी हिराच्या डोंगरावरील गुहेत बसू लागले. अशा प्रक्रीयेत, 41 वे वर्ष सुरु झालेल्या रमजान महिन्यात  ‘लैलतुल कदर’ च्या रात्री त्यांना ‘अल्लाह’ चा संदेशवाहक ‘जिब्राईल अलै.’ चे दर्शन झाले. परिणामी पैगंबर (सल्ल.) यांच्या भावविेशात आणि मानसिक प्रक्रियेत प्रचंड उलथापालथ झाली.  त्यांचे जीवन नखशिखांत ढवळून निघाले. आपल्याला झालेल्या साक्षात्काराच्या प्रत्ययकारी आणि चेतनामय जाणिवेने पैगंबर (सल्ल.) विव्हळ झाले. त्या प्रत्यकारी अनुभवासाठी तळमळू  लागले. देवदूत जिब्राईलने त्यांच्या ज्ञानचक्षूंचा मार्ग मोकळा करुन, जीवनाला स्थैर्य प्राप्त करुन दिले.
दुसरे म्हणजे ईश्वरी संदेश पैगंबर (सल्ल.) यांना एकाचवेळी प्राप्त झाले नाहीत, तर त्यांच्या 23 वर्षाच्या पुढील कालखंडात वेगवेगळ्या प्रसंगी अनेक प्रश्नांची उकल करीत असतांना,  त्यांना साक्षात्कारी संदेश दिले गेले आहेत. या सर्व संदेशांचे एकत्रित व लिखित स्वरुप म्हणजेच कुरआन होय. याचा अर्थ असा की, इस्लाममधील ईश्वरी संदेश आणि तत्त्वे ही केवळ अधिभौतीक, अगम्य, रहस्यमय सुत्रे, या स्वरुपात दिलेली नाहीत. किंवा सर्वसमावेशक नीतितत्वे किंवा प्रमेये या स्वरुपात दिली गेली नाहीत. कारण, सर्वसमावेशक, नीतितत्वे किंवा  प्रमेये यांचा वापर करीत असताना, माणसांनी त्यात, सर्व प्रकारचे घोटाळे नंतरच्या काळात केल्यामुळे आणि त्या प्रमेयांचे सोयीस्कर अर्थ लावल्यामुळे, अध्यात्मिक अराजकच निर्माण  झाले होते. म्हणून मानवी जीवनात निर्माण होणारी एखादी प्रत्यक्ष समस्या आणि त्या समस्येची कालसापेक्ष व विवेकनिष्ठ उकल करण्यासाठी साक्षात्कार रुपाने दिल्या गेलेल्या संदेशांचे  संकलन, म्हणजे कुरआन आणि इस्लाम आहे. म्हणजे इस्लाममधील साक्षात्काराचे स्वरुप दिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन, म्हणजे कुरआन शरीफ आणि इस्लाम आहे. म्हणजे  इस्लाममधील साक्षात्काराचे स्वरुप समस्याप्रधान व व्यावहारिक जसे आहे, तसेच त्यात अनादी चिरंतन स्वरुपाची प्रमेये देखील दिसून येतात. त्या अर्थाने, कुरआन हा ईश्वराने दिलेला  शेवटचा धर्मग्रंथ मानला गेला आहे. कारण अज्ञेय अधिभौतिक प्रमेयापासून सुरुवात करुन, मानवी जीवनातील प्रत्यक्ष प्रश्नांची इेशरी मार्गदर्शनानुसार उकल करण्यापर्यंतची ही प्रक्रिया  आहे. त्यात जसा अनादी प्रेरणांचा अंश आहे. तसाच मानवी जीवनातील उणीवा आणि माणसाची दुर्बलता आणि विवेकनिष्ठ क्षमता यांचा समन्वय साधून करण्यात आलेले मार्गदर्शन  देखील आहे. हा प्रवास अव्यक्तापासून ते व्यक्त मानवी जीवनापर्यंतचा आहे. त्यात परमेश्वराची प्रचंड अविष्कारी चेतना आणि परमेश्वराचा अंश असणाऱ्या, परंतु विकारी, तसेच विवेकाची क्षमता असलेल्या, मानवी चेतनेचा समन्वय आहे.
याच कारणासाठी हे संदेश पैगंबर (सल्ल.) याना तीन प्रकारे प्राप्त झाले. इस्लामनुसार, ईश्वराच्या संदेशाचे प्रक्षेपण प्रत्यक्षपणे होत नाही तर प्रेषितांच्या मनात जाणिवांच्या माध्यमातून  संदेश प्रक्षेपित केले जातात. स्फूर्तिद्वारे ईश्वराच्या संदेशांची जाणीव करुन देण्यात येते. त्याचे स्वरुप खूपच गूढवादी आणि संपूर्णपणे व्यक्तीगत आत्मजाणिवेचे असते. दुसऱ्या प्रकारात, प्रेषिताला निद्रित अवस्थेत, स्वप्नांच्या माध्यमातून किंवा त्याच्या आत्मचक्षूंना होणाऱ्या भासातून, ईश्वरी ज्ञानाची जाणीव होत असते. तिसऱ्या प्रकारामध्ये ईश्वराच्या देवदूताकडूनच  प्रेषिताला साक्षात्कार रुपे मार्गदर्शन केले जाते.
इस्लामी तत्वज्ञानात, प्रेषित आणि साक्षात्कार यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मुळात, वर म्हटल्याप्रमाणे, प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना ईश्वरी ज्ञानाची जाणीव अचानक झालेली नाही.  तर अनेक वर्षाच्या चिंतनानंतर आणि तसेच जीवनाच्या व्यावहारिक अनुभवांनी परिपक्वता आल्यानंतर त्यांना हे ज्ञान प्राप्त झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी ईश्वरी ज्ञान आणि  मानवी जीवन यांना जोडणारे तत्व दिसून येते. म्हणून इस्लाम हा केवळ ग्रांथिक आणि साक्षात्कारी धर्म राहत नाही तर मानवी मनाच्या परिपक्वतेतून प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून  प्रेषितांना ईश्वरी ज्ञानाची जाणीव साध्य होते. म्हणजे इेशराने सांगितलेल्या ज्ञानासोबतच प्रज्ञा, चिंतन, अनुभव आत्मप्रत्यय आणि विेशभान यांच्या संकल्पीत परिणामातून हे ज्ञान  प्रेषितांना झालेले दिसून येते. इस्लाममधील ही तात्विक प्रक्रियाच मोठी विलक्षण आहे. इस्लाममध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे मानवीपण आग्रहाने वारंवार प्रतिपादन केले आहे.  मुहम्मद सल्ल. तुमच्या सारखे एक सर्वसामान्य माणूसच होते, हे आग्रहाने मांडलेले आहे. तसेच ते केवळ संदेशवाहकच होते हे ठासून सांगितलेले आहे. यात दोन महत्वाच्या गोष्टी  आहेत. एकतर ईश्वरी ज्ञान आणि यासर्व विेशाच्या रहस्यांचे आकलन माणूसच करु शकतो. अवतार किंवा आणखीन दुसरी कोणतीही गोष्ट पुढे आणली की मानव बुध्दी , प्रज्ञा आणि  जाणीव यांचे अवमुल्यन केल्यासारखे होते. कारण या सृष्टीत मनुष्यप्राण्याइतका श्रेष्ठ अन्य कोणीही नाही. म्हणून अवतार कल्पना इस्लामने नाकारुन मानवी श्रेष्ठत्त्वाचा सिध्दांत  मांडला आहे. त्याचबरोबर इेशर अवतार घेतो, या संकल्पनेत मानवी दोषासहित इेशराचे चित्रण करणे म्हणजेच इेशराचे मानवीकरण करणे हे ईश्वर संकल्पनेला आणि पावित्र्याला बाधा  आणणारे असते. हे इस्लामचे सुत्र आहे. म्हणूनच इस्लाम आग्रहाने प्रेषितत्वाचा पुरस्कार करतो.
दुसरी गोष्ट म्हणजे इस्लामने कुरआनमधून श्रेष्ठ बुध्दीवान माणसे आणि सर्वसामान्य माणसे असा भेद ईश्वरी ज्ञानाच्या बाबतीत अमान्य केलेला आहे. ईश्वरी ज्ञान हे खरोखरच जाणीवांचा प्रकाश असेल तर त्याचा बोध सर्वांनाच झाला पाहिजे हि इस्लामची धारणा आहे. म्हणून त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे साधेपण आणि सामान्य आणि सर्वसाधारण  माणसात असणारी प्रज्ञा, यावर भर देण्यात आला आहे. इस्लामचे हे सुत्रच विलक्षण प्रगल्भ आहे. यात समतेचा एवढा खोलवर विचार केला आहे की त्यामध्ये बुध्दीमान आणि  सर्वसाधारण माणूस असाही भेद ईश्वरी ज्ञानाच्या बाबतीत इस्लाम मानत नाही.
म्हणूनच कुरआन शरीफ नुसार परमेश्वराने प्रत्येक विभागात सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शनासाठी संदेश पाठविले. म्हणूनच कुरआनमध्ये एक वचन येते की,  ‘परमेश्वर प्रेषितांत भेद करीत नाही. त्याचबरोबर या प्रेषितांच्या सर्वसामान्यत्त्वाच्या सिध्दांतातून इस्लाम श्रेष्ठीजनाचा सिध्दांत नाकारतो. त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. हे शेवटचे प्रेषित म्हटले गेले आहेत. ते शेवटचे प्रेषित याचा अर्थ असा की, इेशरी ज्ञान जर आतापर्यंत श्रेष्ठीजनांची मक्तेदारी होती. ते ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविले गेले आहे. म्हणजे  ज्ञान हे जेंव्हा सर्वसामान्य माणसांपर्यंत येते, तेंव्हा ज्ञानाचे एक वर्तुळ पुर्ण होते. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे सर्वसामान्य माणसाचे प्रतिक आणि प्रतिनिधी होते. आणि ज्ञान पुन्हा जेंव्हा  सामान्य स्तरापर्यंत येउन पोहचते तेंव्हा परमेश्वराला पुन्हा वेगळा प्रेषित पाठवण्याची गरजच भासत नाही. कारण, आता मानवी बुध्दी आणि प्रज्ञा, यांचा विकास एवढा प्रगल्भ झाला  आहे की, स्वतंत्रपणे साक्षात्काररुपाने किंवा अन्य कोण त्याही प्रकारे ज्ञान पाठविण्याची गरज शिल्लक राहत नाही. आणि म्हणूनच इस्लाममध्ये त्या अर्थाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना  शेवटचे प्रेषित म्हटले आहे. एका अर्थाने, या सुत्रातून इस्लामने मानवी श्रेष्ठत्वाचा सिध्दांतच मांडला आहे.
(क्रमशः)

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले,
‘‘माणसाला त्याच्या व्यभिचाराचा वाटा मिळाल्याशिवाय राहाणार नाही. व्यभिचारी दृष्टीने पाहाणे डोळ्यांचा व्यभिचार आहे. अश्लील व नग्नतेच्या गोष्टी ऐकणे कानांचा व्यभिचार आहे.  या विषयावर बोलणे जिव्हेचा व्यभिचार आहे. या हेतूने स्पर्श करणे हातांचा व्यभिचार आहे. त्यासाठी चालणे पायांचा व्यभिचार आहे. त्याची इच्छा करणे मनाचा व्यभिचार आहे. शेवटी  जननेंद्रिय व्यभिचारी कृत्य करील अथवा त्यापासून अलिप्त राहील.’’

मुस्लिम व अबूदाऊद या हदीससंग्रहांमध्ये पुढे म्हटले आहे की ‘‘आणि (व्यभिचारी हेतूने) चुंबन घेणे तोंडाचा व्यभिचार आहे.’’
(बुखारी, मुस्लिम, अबू दाऊद, निसाई)

निरुपण
हे पैगंबरी (स.) बोल प्रत्येक माणसासाठी दैनंदिन जीवनात फार फार महत्त्वाचे आहेत. पैगंबरांनी ही बाब अधोरेखित केली आहे की माणसाचं मन त्याच्या शरीरातील ‘राजा’समान आहे.  एखादा वाईट विचार मनात आला आणि माणसाने त्याचे संगोपन केले तर मग त्या वाईट कृत्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही. जेव्हा मनातच वाईट विचाराचे संगोपन होते तेव्हा  तमाम अवयव त्या इच्छेची परिपूर्ती करण्याच्या कामाला लागतात. डोळे, कान, जिव्हा, हात-पाय आणि शेवटी जननेंद्रि; सर्व व्यभिचारात सहभागी होतात.
म्हणूनच सज्जन माणसाने वाईट विचारांपासून सदैव जागृत राहिले पाहिजे. एखादा वाईट विचार मनात आल्यास त्वरित त्याला साऱ्या कुवतीने हटविण्याचा प्रयत्न करावयास हवा. या  बाबतीत त्याने गफलत केल्यास अनर्थ होऊ शकतो.
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपदेशातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो तो हा की प्रत्यक्ष व्यभिचाराची कृती होईल तेव्हा होईल, मात्र त्या विचाराने एखाद्या परस्त्रीकडे पाहिले, तर डोळ्यांनी व्यभिचार केला! व्यभिचाराच्या भावनेने माणूस चालला तर पायांनी व्यभिचार केला! याच दुष्ट भावनेने तो बोलतो तर जिव्हेचा व्यभिचार झाला! सावधान!  सावधान!! डोळ्यांच्या, कानांच्या, हातापायांच्या, जिव्हेच्या आणि मनाच्या व्यभिचारापासून सावधान!!! डोळ्यांनी कुणाकडे वाईट नजरेने पाहू नका. जिव्हेला अश्लील वा नग्नतेच्या  गोष्टींची चटक लावू नका. कानांना अशा वाईट गोष्टी ऐकण्याकडे आकर्षित होऊ देऊ नका. अन्यथा, खबरदार! डोळ्यांना, कानांना, जिव्हेला, हातापायांना या दुष्कृत्याचे फळ भोगावे लागेल!
अशी सावधानता जर माणसाने अंगीकारली तर त्याचे चारित्र्य किती उदात्त, किती उच्चकोटीचे होईल, यात शंका ती कोणती!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

संकलन - मौ. मुहम्मद फारूक खान
भाषांतर - प्रा. अब्दुर्रहमान शेख

आयएमपीटी अ.क्र. 77      -पृष्ठे - 32     मूल्य - 22            आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/cvjiai30uiwqw95o1yicy0mfeq45rjcg

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget