Latest Post

हुदैबियाच्या समझोत्यामुळे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणाचा पूर्णतः लाभ उचलत प्रेषित मुहम्मद (स) यांनी ‘मदीना’ या इस्लामी सत्ताकेंद्रास अत्याचार्यांच्या उपद्रवापासून मुक्त केले, तर दुसरीकडे उत्तरेत ज्युडिशियांच्या कटकारस्थानांची सर्व केंद्रे उद्ध्वस्त केली. तिसरे कार्य असे केले की, छोट्याछोट्या कबिल्यांच्या उपद्रवी आणि आंतकवादी कारवायांवर अंकुश ठेवून इस्लामी शासनाची दूरपर्यंत धाक पसरली आणि खंदकच्या युद्धानंतर इस्लामी शासनाचे अगदी निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले. सर्वांना हे कळून चुकले की, सत्य आणि न्यायाची ही नवीन शक्ती क्षणभंगुर नसून स्थायी स्वरुपाची आहे.
आता मदीनाच्या इस्लामी आंदोलनासमोर सर्वांत मोठे सामरिक पर्व एवढेच बाकी राहिले होते की शत्रूच्या शक्तीचे मूळ केंद्र नष्ट करण्यात यावे. अन्यथा लढायांची शृंखला कधीच थांबणार नाही. कुरैशजणांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की, ही शृंखला त्यांनीच सुरु केली होती.
या शृंखलेची पार्श्वभूमी अशी की, मक्का शहराच्या आसपास ‘बक्र’ आणि ‘खुजाआ’ नावाच्या दोन मोठ्या कबिल्यांदरम्यान दीर्घ काळापासून तंटेबखेडे चालू होते. तात्पुरत्या प्रमाणात एवढेच घडले की, ज्या वेळी इस्लामी शक्ती एका प्रतिस्पर्धी शक्तीच्या स्वरुपात प्रकट झाली, तेव्हा कुरैश कबिल्याने इस्लामविरोधी मोर्चास ‘बक्र’ आणि ‘खुजाहा’ या एकमेकांचे शत्रू असलेल्या कबिल्यांना सामील करून घेतले. म्हणून या दोन्ही कबिल्यांतील कायमस्वरूपी वैर काही काळापुरते थंडावले. परंतु जेव्हा हुदैबिया समझोता झाला आणि पूर्ण दहा वर्षांपर्यंत मक्का आणि मदीनादरम्यान युद्धबंदी झाली, तेव्हा ‘बक्र’ आणि ‘खुजाआ’ यांच्यातील हाडवैर परत उफाळून आले व समझोत्याच्या एका अटीनुसार ‘बक्र’ कबिल्याने कुरैश कबिल्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि हे पाहून ‘खुजाआ’ परिवाराने ‘बक्र’ परिवारास संतप्त करण्यासाठी प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या इस्लामी शासनाशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित केले. काही दिवस दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांत तनावपूर्ण शांतता राहिली आणि एके दिवशी अचानक ‘कुरैश’जणांचा मित्रकबिला असलेल्या ‘बक्र’ कबिल्याने ‘खुजाआ’ परिवारावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात ज्या लोकांनी काबागृहात आश्रय घेतला, त्यांनादेखील सोडले गेले नाही. त्यातल्यात्यात कुरैशजणांनी हल्ला करण्यात ‘बक्र’ परिवाराची मदत केली. ‘खुजाआ’ कबिल्याचे प्रतिनिधी ‘अम्र बिन सालिम’ यांनी आदरणीय प्रेषितांच्या दरबारी मदतीची विनंती केली. प्रेषितांनी दूताच्या माध्यमाने कुरैशजणांसमोर तीन अटी मांडल्या.
  1. खुजाआ कबिल्याच्या ठार करण्यात आलेल्या लोकांचा ‘कसास’ (बदला) द्यावा. (अर्थात, ज्यांनी खुजाआ परिवाराच्या लोकांच्या हत्या केल्या त्यांच्याकडून बदला घेण्यात यावा.)
  2. ‘बक्र’ च्या समर्थनातून वेगळे व्हावे किवा
  3. हुदैबिया समझोता संपुष्टात आणण्याची घोषणा करावी. (अर्थात युद्धास तयार व्हावे.)
कुरैशजणांचे आधीच संतुलन बिघडले होते. त्यांनी दूताकरवी प्रेषितांना निरोप पाठविला की, केवळ तिसरी अट मान्य आहे. रागाच्या भरात युद्धाची घोषणा केली खरी, परंतु या अविवेकी निर्णयाचा त्यांना खूप पश्चात्ताप झाला. ते चितातूर झाले होते. कारण त्यांची सैनिकशक्ती नष्ट झाली होती आणि अर्थव्यवस्थासुद्धा खिळखिळी झाली होती. त्यांचे जोरदार समर्थक आणि सहकारी ‘ज्यूडिश’ पराभूताचे जीवन व्यतीत करीत होते. मदीना शासन मजबूत आणि स्थीर झाले होते आणि खूप दूरपर्यंत या शासनाची जबरदस्त धाक बसली होती. केवळ हुदैबियाच्या समझोत्यावर अंमलबजावणी करूनच स्वतःस सुरक्षित ठेवणे शक्य होते आणि तरी देखील स्वतःच समझोता मोडण्याचा मूर्खपणा त्यांनी केला.
शेवटी ‘मक्का’ शहराचा सर्वांत मोठा म्होरक्या, ‘अबू सुफियान’ हा ‘हुदैबिया समझोत्याचे’ नूतनीकरण करण्यासाठी मदीना शहराकडे रवाना झाला. या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरुवातीस तो आपली कन्या ‘माननीय उम्मे हबीबा(र)’ (या प्रेषितांच्या भार्या होत) यांच्याकडे पोहोचला, परंतु त्यांच्याकडे काही जमले नाही. मग त्यांनी माननीय अबू बक्र(र), उमर(र), अली(र) यांची भेट घेऊन समझोता नूतनीकरण करण्याची शिफारस केली. परंतु काहीही साध्य झाले नाही. शेवटी तो रिकाम्याहाती मक्का पोहोचला.
इकडे मानवतेचे उद्धारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना दैवी संकेत मिळाले की, ‘सत्यावर आपल्या प्राणांचे बलिदान देणार्यांनी बलिदनासाठी तयार राहावे.
हा मोठा विचित्र संयोग आहे की, सत्य-असत्याची लढाईसुद्धा (ब्रदची लढाई) रमजान’ महिन्यातच झाली आणि आता अंतिम लक्ष्य पूर्ण करणारी लढाईसुद्धा रमजान महिन्यातच होणार होती.
रमजान महिन्याच्या दहा तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे दहा हजार सैन्य घेऊन मदीनाहून ‘मक्का’कडे निघाले आणि प्राचीन धर्मग्रंथातील भविष्यवाणी सत्य सिद्ध झाली. कुरैशजणांचे लोक ज्या मार्गावर गस्त घालीत होते, तो मार्ग सोडून दुसर्याच मार्गाने प्रेषित आपले सैन्य घेऊन निघाले आणि अचानक मक्का शहरासमोर पडाव टाकला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘जुहफा’ या ठिकाणी पोहोचल्यावर आपले काका माननीय अब्बास(र) हे आपल्या मुलांबाळांसह तेथे पोहोचले आणि प्रेषितांबरोबर सल्लामसलत झाली. त्यांच्या रवानगीच्या वेळी प्रेषितांनी त्यांना आपली स्वारी सोबत देऊन पाठविताना ‘अबू सुफियान’ला सोबत घेऊन येण्यास सांगितले.
यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘मर्रज्जहान’ या ठिकाणी लष्करी तळ लावून सैनिकांना सूचना दिली की सर्व सैनिकांनी आपापल्यासाठी स्वतंत्र चुली पेटवाव्या. रात्रीच्या वेळी मक्का शहराचा सर्वांत मोठा म्होरक्या ‘अबू सुफियान’ आणि त्यांच्यासोबत बडया नेत्यांनी पर्वतावरून हजारोंच्या संख्येत सैन्यांच्या चुली पाहून पार घाबरून गेले. तेवढ्यात ‘माननीय अब्बास(र)’ हे तेथे येऊन त्यांना म्हणाले की, प्रेषित मुहम्मद(स) हे मोठी फौज घेऊन आले आहेत व आता कुरैशजणांचे काही खरे नाही. ‘अबू सुफयान’ने त्यांना विचारले की, ‘आता काय करावे? कसा मार्ग काढावा?’ माननीय अब्बास(र) यांनी म्हटले, ‘‘तुम्ही माझ्यासोबत प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे चला. आपण त्यांच्याशी बोलणी करून काही मार्ग निघतो काय ते पाहू या’ अबू सुफियान हा प्रेषितांनी पाठविलेल्या स्वारीवर स्वार होऊन माननीय अब्बास(र) सोबत प्रेषितांकडे आला. त्याला पाहताच माननीय उमर(र) यांचे रक्त खवळले. त्याला ठार करण्याची त्यांनी प्रेषितांना परवागनी मागितली. परंतु माननीय अब्बास(र) यांनी प्रेषिातंना म्हटले, ‘‘हे प्रेषिता! मी ‘अबू सुफयान’ ला जीवदान देण्याचे वचन देऊन आपल्यासमोर हजर केले आहे.’’
दुसर्या दिवशी सकाळी ‘अबू सुफियान’ याने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर इस्लाम धर्म स्वीकारला. माननीय अब्बास(र) यांनी प्रेषितांच्या सूचनेनुसार एका उंच टेकडीवर अबू सुफियान(र) यांना इस्लामी सैन्याच्या दर्शनास्तव उभे केले. सैन्याने ‘कदा’च्या मार्गाने प्रस्थान केले. वेगवेगळ्या कबिल्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या. ‘अबू सुफियान(र)’ हे प्रत्येक तुकडीच्या बाबतीत काही ना काही विचारत होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी जोरदार घोषणा केली, ‘‘आजचा दिवस हा ‘काबा’ मुक्तीसाठी युद्धाचा दिवस आहे. आजचा दिवस नेकी आणि भलाईचा दिवस आहे.’’ सैन्याच्या प्रस्थानाच्या प्रसंगी प्रेषितांनी घोषणा केली की, ‘‘जी व्यक्ती काबागृहात दाखल होईल तिला अभय! जी व्यक्ती अबू सुफियान(र) यांच्या घरात दाखल होईल तिला अभय! जी व्यक्ती स्वतःच्याच घराचे दरवाजे बंद करून घरातच बसेल तिला देखील अभय! केवळ गुन्हेगारांनाच त्यांना आपल्या गुन्ह्यांची फळे चाखावी लागतील!’’ माननीय अबूसुफयान(र) यांनी प्रेषितांची ही घोषणा शहरात प्रसारित केली.
रमजान महिन्याच्या २० तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपले इस्लामी लष्कर घेऊन कोणतेही विजयी नारे न लावता, ढोल ताशे न वाजवता आणि कोणत्याही प्रकारे आपल्या विजयाचे सूर न काढता अत्यंत नम्रपणे मक्का शहरात दाखल झाले. जगातील सर्वांत महान मानव आदरणीय प्रेषित हे आपल्या स्वारीवर बसून ईश्वरासमोर नतमस्तक झालेले होते. ईश्वराच्या कृतज्ञतेचे भाव त्यांच्या अंतःकरणात होते. ओठांवर दिव्य कुरआनच्या ‘अलफतह’ या सूरहचे पठण चालू होते.
या प्रसंगी कुरैशच्या काही सरदारांनी काही टवाळ तरुणांना फूस लावली आणि त्यात इस्लामी सैन्याचे दोन योद्धे ठार झाले. माननीय खालिद बिन वलीद(र) यांना खबर मिळताच त्यांनी शत्रूपक्षाच्या काहीजणांना कंठस्नान घालविले. अशाच प्रकारचे एक टोळके शहरात उपद्रव करण्यास निघाले. प्रेषितांनी ‘अन्सार’च्या एका तुकडीस बोलावून हे दृष्य दाखविले की, एकीकडे विजयी मुस्लिम शक्ती शत्रुच्या रक्ताचा एक थेंबही सांडू देत नाही तर दुसरीकडे हे उपद्रवी लोक आपल्या म्यानात असलेल्या तलवारी बाहेर काढण्याची चेतावणी देत आहेत. मग प्रेषितांनी आपल्या सैनिकांना उपद्रव्यांचा सफाया करण्याचा आदेश दिला. तेवढ्यात अबू सुफयान(र) हे धावत प्रेषितांजवळ आले आणि म्हणाले, ‘‘हे प्रेषित! कुरैशजण अगोदरच खूप उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना सोडून द्यावे.’’ मग प्रेषितांनी त्यांची विनंती मान्य केली. थोडीशी झडप झाल्यावर उपद्रव्यांनी तेथून पळ काढला.
लोकांनी प्रेषितांना विचारले की, ‘‘आपण आपल्या वडिलोपार्जित घरावर थांबाल काय?’’
‘‘येथील लोकांनी माझे घर ठेवलेच कुठे?’’ प्रेषित म्हणाले, मग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी निवासासाठी एक स्थान निवडले. नंतर ते त्यांना ‘नजरबंद’ करण्यात आलेल्या स्थळावर गेले आणि मग काबागृहात पोहोचले. माननीय बिलाल(र) यांनी काबागृहाच्या उंचीवरून ‘अजान’ पुकारली. आदरणीय प्रेषितांनी काबागृहाच्या ‘अस्वद’ चा मुखस्पर्ष केला आणि मग ते हातात धनुष्य घेऊन एकेका विभूतींजवळ जाऊन हाक देत होते, ‘‘सत्य आले आणि असत्य मिटले. निश्चितच ‘असत्य’ हे मिटणारच होते.’’ धनुष्याच्या इशार्यानेच काबागृहातील मूर्ती तोंडावर पडत होत्या. मग काबागृहाची चावी मागवून प्रवेशद्वार उघडले. आंतमध्ये प्रेषित इब्राहीम(अ) आणि प्रेषित इस्माईल(अ) यांच्या मूर्ती लावलेल्या होत्या. त्या मूर्तींच्या हातात धनुष्यबान होते. मस्जिदीच्या प्रवेशद्वारावर जनसमुदाय जमलेला होता. प्रेषित मुहम्मद(स) यांनी अफाट जनसमुदायास संबोधित करताना म्हटले,
‘‘केवळ एकमेव ईश्वराशिवाय कोणीच उपास्य नाही. त्याचा कोणीच भागीदार नाही. त्याने केलेला वादा सिद्ध झाला. त्यानेच एकट्याने संपूर्ण शत्रूसैन्यास पराभूत केले. आज दंभ, अहं, खुनाचे व हत्यांचे सर्व दावे आणि संपत्तीच्या मागण्या माझ्या पायाखाली आहेत. मात्र हरम (काबागृह) च्या ‘मुतवल्ली’ (विश्वस्त) आणि ‘हज यात्रेकरूंना’ पाणी पाजण्याची जवाबदारी आणि हुद्दे यास अपवाद आहेत.
हे कुरैश आज ईश्वराने तुमचा अज्ञानी अहंकार आणि वंशाभिमान नष्ट केला आहे. संपूर्ण मानवजात ही आदमचीच संतती आहे आणि आदमची निर्मिती मातीपासून करण्यात आली आहे. सर्व मानव एकच आहेत. कोणताच मानव हा वंशाने श्रेष्ठ नसून तो केवळ ईशपरायणतेमुळेच श्रेष्ठ आहे. ईश्वराने मद्य आणि त्याची खरेदी-विक्री निषिद्ध ठरविली आहे.
तुम्हाला माहीत आहे काय की, मी तुमच्याशी कसा व्यवहार करणार?’’
प्रेषितांचे हे शब्द कानी पडताच कुरैशजणांनी प्रेषितांशी केलेल्या धोकेबाजी, अमानुष यातना आणि मानवी हत्यांचे पूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर आले. कारण कुरैशजणांनी या वीस वर्षांत मुस्लिमांवर जे अमानुष अत्याचार केले होते, जी कत्तल केली होती आणि ज्या सामरिक कारवाया केल्या होत्या, त्या आठवून त्यांचे काळीज फाटत होते. त्यांना वाटत होते की, आता प्रेषित या यातनांचा बदला घेतील. थरथरत्या आत्म्याने त्यांनी प्रेषितांना हाक दिली,
‘‘हे मुहम्मद(स)! तुम्ही प्रामाणिक व दयाळू व्यक्तीची प्रामाणिक व दयाळू संतती आहात. आम्हास क्षमादान द्यावे!’’
दयाळू प्रेषित मुहम्मद(स) उत्तरले, ‘‘आज तुम्हा सर्वांना क्षमादान देण्यात येत आहे. आज कोणाचीही पकड होणार नाही. जा! तुम्ही सर्वजण स्वतंत्र आहात!!!’’
प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या सोबत्यांवर कुरैशजणांनी जे अमानुष अन्याय व अत्याचार घडवून आणले होते, ते पाहता जगातील कोणत्याही माणसास असे वाटल्याशिवाय राहणार नाही की, विजय प्राप्त झाल्यावर विजयी पक्ष पराभूत पक्षाकडून बदला घेईल. एकेका छळाचा आणि एकेका रक्ताच्या थेंबाचा बदला घेतला जाईल. कारण क्षमा करण्यासारखा कोणाचाच गुन्हा नव्हता. त्यांच्या अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने रक्ताळळेली होती. परंतु प्रेषितांचे अंतःकरण किती प्रेमळ आणि दयाळू होते. ते केवळ एक विजयी शासक नव्हते, तर ते परम दयाळू आणि कृपाळू ईश्वराचे प्रेषित होते. केवळ मानवावर विजय मिळवून शासन हस्तगत करण्याचा हेतु मुळीच नव्हता, तर सर्व मानवजातीचे नवनिर्माण करण्याचा त्यांचा हेतु होता.
प्रेषितांची ही महीम शान होती की, त्यांनी मुहाजिरीन (ज्यांनी कुरैशजणांच्या अत्याचारांमुळे विवश होऊन वतनत्याग केला होता.) यांना आदेश दिले की, त्यांच्या ज्या जमिनी आणि संपत्तींवर स्थलांतराच्या वेळी ज्यांनी ताब्यात घेतल्या होत्या, त्या त्यांनाच राहू द्या. मग काबागृहाची मागवून घेतलेली चावी ‘उस्मान बिन तलहा’ नावाच्या त्याच माणसाच्या स्वाधीन केली, ज्याने मागे एकदा द्वार उघडण्याची प्रेषितांची विनंती धुडकावली होती. त्यावेळी प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले होते,
‘‘हे उस्मान! निश्चितच एक दिवस असा येईल की चाबी माझ्या ताब्यात येईल आणि मला योग्य वाटेल त्यास मी ही चावी देईन!’’
प्रेषितांच्या ठिकाणी दुसरा विजेता असता तर त्याने ही चावी मागच्या घटनेचा वचपा काढण्यासाठी कोणाच्याही स्वाधीन केली असती आणि ‘उस्मान बिन तलहाची मान त्याच्या तलवारी खाली आली असती.
परंतु प्रेषितांनी म्हटले, ‘‘आजचा दिवस चांगुलपणा भलाईचा व क्षमेचा आहे!’’
मग प्रेषित मुहम्मद(स) हे माननीय उम्मे हानी(र) यांच्या घरी गेले आणि स्नान करून आठ रकअत नमाज अदा करून ईश्वराची कृतज्ञता व्यक्त केली. विजयाच्या दुसर्या दिवशी ‘सफा’ टेकडीवरून संबोधित करताना काबागृहाचे प्रतिष्ठा बहाल केली. सार्वजनिक माफीतून केवळ ‘अब्दुल उज्जा बिन मक्तल’ नावाचा अपराधी वगळण्यात आला होता. त्यास मृत्यूदंड देण्यात आला.
मक्का विजयाशी संबंधित घटनांची एक मोठी शृंखला आहे. बर्याच घटनांना कात्री देण्यात आली. सर्वांत महत्त्वाची बाब जी या विजयाशी संबंधित आहे ती अशी की, जगातील कोणत्याही इतर शक्तीने मागील चौदा शतकादरम्यान विजयाचे असे आदर्श उदाहरण सादर केलेले नाही की, कोणाकडूनही बदला घेतला गेला नाही व कोणाच्याही सन्मानात बाधा येऊ दिली नाही. कोणत्याही महिलेच्या इभ्रतीस हात लावण्यात आला नाही. हे आदर्श उदाहरण केवळ त्याच व्यक्तिमत्त्वाचे (अर्थात प्रेषित मुहम्मद(स) यांनीच) सादर केले जे संपूर्ण मानवतेवर परमोपकारी होय. मग परत समता व न्यायाची ही घोषणा की, ‘‘संपूर्ण मानवजात ‘आदम’चीच संतती असून कोणीही कोणत्याच परिने श्रेष्ठ व नीच नाही. श्रेष्ठ मानव केवळ तोच आहे, ज्याचे आचरण श्रेष्ठ आहे,’’ ही घोषणा संपूर्ण मानवजगताच्या कल्याणासाठीच होती.

- सय्यद अबुल आला मौदूदी
    पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्य जीवनाची सुरुवात झाली, तेव्हापासून समस्त मानव जातीसाठी इस्लामचा उगम झाला, असे या पॉकेट साईझ पुस्तिकेत वर्णन आले आहे. इस्लामचा अर्थ आहे अल्लाहचे आज्ञापालन करणे.
    इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे मनुष्य जातीचा निर्माणकर्ता व पालनकर्ता अल्लाह आहे. अल्लाहने पृथ्वीवर प्रथम मानवी जोडी आदम व हव्वा (अ.) यांना धाडले. त्यावेळी अल्लाहने त्यांना आदेशित केले की सर्वांचे कल्याण माझ्या मार्गदर्शनात जीवन यापन करण्यात आहे.

आयएमपीटी अ.क्र. 95    -पृष्ठे - 08     मूल्य - 06      आवृत्ती - 2 (2011)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/yxwd779ob18p1vqh7i2a1ptqjeq9df7l

समाजामध्ये एकोपा, प्रेम व शांती निर्माण करणारा उपक्रम


कल्याण (शाहजहान मगदुम)-
इस्लाम धर्मातील रूढीपरंपरांची अन्य धर्मीयांना माहिती व्हावी आणि मुस्लिम समाजाबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी, या मस्जिदीत नेमके काय चालते? तसेच मस्जिद  आणि इस्लाम धर्माबाबतचे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने जमात-एइस्लामी- हिंदतर्फे 'मस्जिद परिचय' हा उपक्रम १० फेब्रुवारी २०१९ रविवारी राबवण्यात आला. या माध्यमातून  इस्लाम धर्म आणि मस्जिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आली.
कल्याणमध्ये १६८ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या दूधनाक्यावरील जामा मस्जिदीत झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिमेत्तर समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.  सर्व समाजाला एकत्र आणतो, एकत्र घेऊन चालतो तो खरा धर्म, असे म्हटले जाते. या तत्त्वाला समोर ठेवून जमाअत- ए-इस्लामी-हिंद संस्थेच्या कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे  आयोजन केले होते. मस्जिद पाहण्यासाठी अन्य धर्मांचे येऊ लागताच अकील शेख, मोइन डोन, अ‍ॅड. फैसल काझी इत्यादी इस्लामी विचारवंतांनी उपस्थितांना गटागटांनी माहिती दिली.  आत प्रवेश केल्यावर हातपाय धुऊन नमाज पठणापूर्वी स्वच्छता बाळगली जाते, त्यास वुजू म्हटले जाते. त्याकरिता पाण्याचा हौद बांधण्यात आला असून नळासोबत वुजूसाठी  बैठकव्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे. पाण्याच्या हौदात मासेही सोडण्यात आलेले आहेत. मस्जिदीच्या आतल्या भागात महिरपीसमोर नमाजपठणाचे नेतृत्व केले जाते. नमाजपठण  काबाच्या दिशेने केले जाते. नमाजपठण सूर्योदयापूर्वी, दुपारी, सूर्यास्तापूर्वी, सूर्यास्तनंतर व झोपण्यापूर्वी असे पाच वेळा केले जाते. मस्जिदीमध्ये त्याच्या वेळा नमूद केलेल्या असतात.  शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर मस्जिदीतील मौलाना १५ मिनिटांचे प्रवचन देतात. त्यात प्रथम अल्लाची महती विशद केली जाते. त्यानंतर, आसपासच्या समस्यांवर भर दिला जातो.  नमाजपठण सामूहिक व वैयक्तिक स्वरूपात केले जाते. हे सगळे अन्य धर्मीयांनी या वेळी समजून घेतले.
खास औरंगाबादहून आलेले मुस्लिम धर्माचे विचारवंत प्रा. वाजिद अली खान यांच्या उपस्थितीत उपक्रमाविषयी माहिती दिली गेली. त्यांनी मस्जिद, नमाज, वुजू, शुक्रवारची नमाज तसेच  इस्लामची मूळ शिकवण आणि मरणोत्तर जीवनाविषयी आपले विचार मांडले. जमाअत- ए-इस्लामी हिंद या संस्थेतर्फे हा उपक्रम देशभरात सुरू आहे. यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, मुंब्रा,  पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात येथे हा उपक्रम घेण्यात आला. कल्याणमध्ये त्याची सुरुवात प्रथमच होत आहे.
काही विघातक प्रवृत्ती इस्लामविषयी जाणीवपूर्वक द्वेष व गैरसमज पसरवत आहेत. त्यांना मस्जिददर्शन हा उपक्रम एक प्रकारचे चोख प्रत्युत्तर आहे. मस्जिदीद्वारे अनेक सामाजिक  कामे केली जातात. त्याचा प्रचार व प्रसार केला जात नाही. ज्येष्ठ वकील फैजल काजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. वाजिद अली खान यांच्या व्याख्यानापश्चात सायंकाळचे नमाजपठण कसे केले जाते, याचेही दर्शन अन्य धर्मीयांना घडले. त्यापश्चात अन्य धर्मीयांनी खान यांना काही प्रश्न विचारले. त्याचेही समाधान खान यांनी चांगल्या प्रकारे केले. या  ‘मस्जिद परिचय' कार्यक्रमात सुमारे १२० हून अधिक मुस्लिमेत्तर बांधवांनी भाग घेतला. ९ जणांनी मुस्लिमांसोबत मगरीब या सूर्यास्तावेळीच्या सामूहिक नमाजमध्ये सामील होऊन  नमाजचा अनुभव घेतला. शेवटी आमच्या अन्य धर्मीय बंधुंनी पाठीमागे व वर गॅलरीत बसून प्रत्यक्ष सामूहिक नमाज बघण्याचा अनुभव घेतला.
प्रथमच मस्जिदीत आल्यामुळे अनेक जण भावूक झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि काहींनी स्वत:ला सावरून आपले अभिप्राय दिले. देशात स्फोटक वातावरण  असताना मस्जिदीविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी मस्जिद परिचय हा उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे. आयोजकांनी त्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत  साहित्यिक डॉ. गिरीश लटके यांनी या वेळी व्यक्त केले. देशमुख म्हणाले, ‘‘हे माझ्या जीवनातील सर्वोत्तम क्षण आहेत.’’ अ‍ॅडव्होकेट संकेत सरावते यांनी आपली प्रतिक्रिया देताना  म्हटले की, ‘‘मी या मस्जिदीसमोरून पाचशे वेळा गेलो असेन पण आज मला ही उत्तम संधी मिळाली.’’ राजेंद्र यांनी मुस्लिम बांधवांना विनंती केली की ‘‘निदान प्रत्येक सहा  महिन्यानंतर असा कार्यक्रम आयोजित करा. हा कार्यक्रम समाजात, एकोपा, प्रेम आणि शांती निर्माण करणारा आहे.’’
या कार्यक्रमाला डॉ. गिरीश लटके, कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील, अनंत हलवाईचे अमृत गवळी, कोनगावचे प्रा. विनोद पाटील, अ‍ॅड. संदेश सरावते, गणेश अण्णा पाटील  माजी कोनगाव भाजपा अध्यक्ष, स्वाध्याय परिवारचे भास्कर भोईर, यांच्यासह जमात-ए-इस्लामी हिंद कल्याणचे प्रमुख मिशल चौधरी, मोईन डोन, शरफुद्दीन कर्ते, जामा मस्जिदीचे  इमाम जोहेर डोन, अ‍ॅड. फैसल काझी तसेच कोनगावमधून आलेले स्थानिक जमाअत- ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष इंतेखाब आलम, शोधनचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम, अफसर  खान, आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मानवामानवांमध्ये एकोपा घडवून आणण्याचे एक उत्तम प्रतीक म्हणजे मस्जिद! अशीच भावना या वेळी  अनेक अन्य धर्मीय बांधवांनी व्यक्त केली.

मा. अब्दुल्ला बिन अब्बास (र.) यांचे निवेदन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या ग्रंथाचे (कुरआन) अनुसरण करील, तो न जगात  मार्गहीन राहील ना आखीरतमध्ये (मरणोत्तर जीवनात) त्याच्या वाट्याला वंचितता येईल.’’ (हदीस - मिश्कात)
पवित्र कुरआनात पाच गोष्टी मा. अबु हुरैरा (र.) कथन करतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, पवित्र कुरआनात पाच गोष्टी आहेत. हलाल (वैध), हराम (अवैध),  मुहक्कम (मजबूत), मुतशबा (समान) आणि अमशाल (उहादरणे). तेव्हा हलाल गोष्टीस हलाल समजा, हराम गोष्टीस हराम समजा. मुहक्कम (कुरआनचा तो भाग ज्यात श्रद्धा नियम  इत्यादिची शिकवण दिली गेली आहे), त्या आचरणात आणा आणि मुकशाबा (कुरआनचा तो हिस्सा ज्यात अपरोक्षाच्या गोष्टींचे वर्णन दिले गेले आहे) वर इमान (श्रद्धा) ठेवा. (हदीस :  मिश्कात)

धर्माचे ज्ञान नाहीसे होईल
मा. जियाद बिन लबीद (र.) यांनी कथन केले आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका भयानक गोष्टीचा उल्लेख केला आणि मग म्हणाले, असे त्यावेळी होईल जेव्हा धर्माचे ज्ञान  नाहीसे होईल. तेव्हा मी म्हणालो, हे अल्लाहचे प्रेषित! ज्ञान का म्हणून नष्ट होईल. वास्तविक आम्ही कुरआन पठन करीत आहोत, आणि आपल्या मुलाबाळांना शिकवित आहोत आणि  आमची मुले आपल्या मुलाबाळांना शिकवत राहतील.
प्रेषित (स.) यांनी फर्माविले, ‘‘छान! हे जियाद! मी तुम्हाला मदीननाचा अतिशय समंजस माणूस समजत होतो! काय तुम्ही पाहात नाही की यहुदी व खिश्चन, तौरात व इंजील (हे त्यांचे धर्मग्रंथ) चे केवढे पठन करतात, पण! त्यातल्या शिकवणिंना थोडे तरी आचरणात आणतात काय?’’ (हदीस- इब्ने माजा)

आदर्श व उत्तम आचरण
माननिय आयशा (रजी.) सांगतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचणांचा आदर्श ‘दिव्य कुरआन’ होते. (म्हणजेच दिव्य कुरआनात ज्या उच्चतम नैतिकतेचा आदर्श मांडण्यात आला  आहे, प्रेषित मुहम्मद (स.) नेमक्या त्याच आदर्शाचा नमुना होते.) (हदीस - मुस्लिम)

दिव्य कुरआनचे पठण
मा. अनस (रजी.) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘नि:संदेह मानवापैकी काहीजण ईश्वराचे लाडके दास आहेत.’’ लोकांनी प्रश्न केला की, ‘‘हे प्रेषिता! हे  कोणते लोक आहेत? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘कुरआनवाले लोक, ईश्वरवाले आणि ईश्वराचे विशेष दास!’’ (हदीस - निसई, इब्ने माजा)

स्पष्टीकरण -
ईश्वरवाले लोक म्हणजे दिव्य कुरआनचे पठण करणारे व इतरांना शिकविणारे लोक होय.. तसेच त्याचा अर्थ समजून घेण्याचा व त्याच्या मार्गदर्शनावर आचरण करण्याचा प्रयत्न करणारे लोक होय. कुरआनसंबंधी प्रेषितांची वचने (हदीस) - माझ्या अनुयायांसाठी सर्वात तेजस्वी व अभिमानास्पद ठेवा म्हणजे पवित्र कुरआन. मुक्तीचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पवित्र कुरआन. तुमच्यासाठी कुरआनकरीम सारखा ग्रंथ सोडून जात आहे. त्याप्रमाणे तुम्ही आचरण केल्यास, तुम्ही कधीही पथभ्रष्ट होणार नाही.

ज्यांना ज्यांना अल्लाहने इच्छा आकांक्षा आणि निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आहे त्या निर्मितींपैकी मनुष्यसुध्दा एक आहे. तो फक्त त्यापैकी एक नाही तर त्यांच्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी निर्मिती आहे. म्हणूनच मनुष्याला अल्लाहने दिव्य प्रकटन तथा दिव्य आदेश देऊन मार्गदर्शन केले आहे. दिव्य कुरआननुसार जेव्हा प्रथम मानवाला पृथ्वीवर अल्लाहने पाठविले त्यावेळी अल्लाहने आदेश दिला,
‘‘नंतर जर माझ्याकडून तुमच्याकडे काही मार्गदर्शन लाभले तर जे माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतील तर त्यांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील. आणि जे लोक हे नाकारतील आणि आमच्या वचनांना खोटे ठरवतील तेच नरकाग्नीमध्ये पडतील आणि तिथेच सदैव खितपत राहतील.’’ (कुरआन २: ३८-३९)
या आदेशांना दिव्य प्रकटन (मार्गदर्शन) अवतरित करण्यासाठी अट ‘जरतर’च्या भाषेत घातली आहे. खरे पाहता ती अट नाही, परंतु ती एक अप्रतिम अशी वर्णनशैली आहे आदेश देण्याची! वरील संकेतवचनाचा गर्भितार्थ हा आहे की माझे दिव्य प्रकटन तुमच्याकडे यासाठी येत आहेत की तुम्ही त्यानुसार आचरण करावे.
खालील कुरआनोक्तीमध्ये हेच अधिक प्रभावीपणे स्पष्ट केले आहे,
‘‘आणि कोणताही लोकसमुदाय (राष्ट्र) असा होवून गेला नाही ज्यात कोणी सावध करणारा आला नाही.’’ (कुरआन ३५: २४)
वरील दोन्ही संकेतवचनांद्वारे हे निर्विवाद स्पष्ट होते की मनुष्याचे पृथ्वीवरील जीवन आणि दिव्यप्रकटन हे दोन्ही एक साथ आलेले आहेत आणि हे जग कधीही धर्मविरहित आणि ईशआदेशविरहित नव्हते. आणि एकही असा लोकसमूह (राष्ट्र) पृथ्वीवर नाही की ज्यास दिव्यप्रकटन (मार्गदर्शन) न देता ज्ञानाविरहित ठेवण्यात आले आहे. मनुष्य हा इच्छा-आकांक्षा आणि बुध्दीविवेक ठेवणारा तसेच निवड करण्याची योग्यता असणारा आहे, त्यामुळे त्याला ईशमार्गदर्शनाची गरज आहे. दिव्य प्रकटन आणि ईशधर्म (इस्लाम) मनुष्यासाठी स्वाभाविक आहे.
सर्वांचा धर्म एक: दिव्य प्रकटन तथा ईशआदेश निर्मितीकाळापासून मनुष्याजवळ अल्लाहने अवतरित केले आहेत. अल्लाहच्या आदेशांचे पालन करणे म्हणजे अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारणे होय. म्हणून निर्मितीकाळापासून (प्रारंभापासून) आलेले धर्म दुसरे तिसरे काही नसून इस्लाम आहे आणि त्या धर्मांचे अनुयायी मुस्लिम आहेत. परिणामतः दिव्य कुरआन पूर्ण एकवाक्यतेने, बुध्दीविवेकाने आणि पुराव्यानिशी निर्णय देत आहे. प्रेषित इब्राहीम (अ) यांच्याविषयी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘इब्राहीम (अ.) यहुदीही नव्हता की ख्रिस्तीदेखील नव्हता किबहुना तो तर एक एकचित्त मुस्लिम होता आणि तो कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हता.’’ (कुरआन ३: ६७)
कुरआनमध्ये एकेठिकाणी पुराव्यानिशी स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा पालनकर्त्यांने त्याला सांगितले, ‘‘स्वतःला समर्पित कर.’’ तेव्हा तो त्वरित म्हणाला. ‘‘मी तर साऱ्या सृष्टीच्या पालनकर्त्याला समर्पित झालो आहे!’’ आणि अशाच प्रकारचे आचरण करण्याचा आदेश इब्राहीमने आपल्या मुलाबाळांना दिला होता. आणि तोच आदेश याकूबनेही आपल्या संततीला दिला होता. त्याने म्हटले की, ‘‘माझ्या मुलांनो, अल्लाहने तुमच्यासाठी हा धर्म पसंत केला आहे तेव्हा मरेपर्यंत अल्लाहला समर्पित होऊन राहा.’’ (कुरआन २: १३१-१३२)
अशाच प्रकारची स्पष्टीकरणे कुरआनने लुत (अ), मुसा (अ), सुलैमान (अ), ईसा (अ) आणि इतर अनेक प्रेषितांबद्दल दिलेली आहेत आणि स्पष्ट उल्लेख आहे की हे सर्व प्रेषित आणि त्यांचे अनुयायी मुस्लिम होते आणि त्या सर्वांचा धर्म इस्लाम होता.
मुळचा धर्म इस्लाम: वर उल्लेख केलेल्या स्पष्टीकरणामुळे हे अगदी स्पष्ट आहे की आता नावाबद्दल आणि ईशधर्माबद्दल अर्थ लावण्यासाठी दुमत होऊच शकत नाही. प्रत्येक ईशधर्म मग तो कुरआनप्रणित असो (शरियतनुसार) अथवा तौरेतनुसार किवा आदम (अ) चा धर्म असो की नूह (अ) चा, किंवा इब्राहीम (अ) आणि ईसा (अ) यांच्यावर अवतरित झालेले ईशमार्गदर्शन असोत, प्रत्येकाच्या धर्माचे नाव इस्लाम होते आणि त्यांचे अनुयायी मुस्लिम होते. कारण या सर्वांचे मूलभूत स्रोत आणि वास्तवतः ईशमार्गदर्शन (शरियत) होते. हे दिव्य प्रकटन (ईशमार्गदर्शन व आदेश) हेच इस्लाम आहे आणि त्यांचे अनुयायी मुस्लिम! परंतु प्रत्यक्षमात्र वेगळेच काही घडले. हे अगदी विपरीत आहे. दिव्य कुरआनच्या विशेष अशा परिभाषेत इस्लाम हे त्या धर्माचे नाव आहे जे आदरणीय अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावर अवतरित झाले आहे. म्हणून ‘मुस्लिम’ हे नावसुध्दा प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायींनाच देण्यात आले. जेव्हा कुरआन ‘अल् इस्लाम’ म्हणून उल्लेख करतो त्या वेळी सामान्यतः अर्थ अभिप्रेत नसून फक्त एक धर्म आणि त्याचे दिव्य अवतरणच अभिप्रेत आहेत. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे.’’ (कुरआन ५: ३)
‘‘अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (कुरआन ३: १९)
या संकेतवचनांत ‘अल इस्लाम’ हा शब्द फक्त एकच धर्म दर्शवितो आणि तो म्हणजे कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स) द्वारा अवतरित झालेला इस्लाम होय.
‘मुस्लिम’ या शब्दाबद्दल तर अगदी स्पष्ट आदेश आहे,
‘‘अल्लाहने पूर्वीसुध्दा तुमचे नाव मुस्लिम ठेवले होते आणि या (कुरआनात) मध्येसुध्दा (तुमचे असेच नाव आहे).’ (कुरआन २२: ७८)
या शब्दांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. वरील संकेत वचनांनुसार खात्रीलायक अगदी ठामपणे हे सत्य मांडले आहे की ज्यांनी ज्यांनी प्रेषितांवर विश्वास ठेवला, मग ते कोणतेही प्रेषित असोत, ते सर्व मुस्लिम आहेत. तथापि हा मान त्याच श्रध्दावंतासाठी आहे ज्यांनी मूलभूत धर्म इस्लाम वर श्रध्दा ठेवली व जे आचरणाने मुस्लिम आहेत, हेच लोक मुस्लिम आहेत. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायांव्यतिरिक्त कोणत्याच समुदायाला मुस्लिम म्हटले जात नाही. जरी एखाद्या लोकसमुदायाला ‘मुस्लिम’ हे नाव दिले तरी ‘‘तुम्हाला मुस्लिम नाव बहाल केले गेले आहे’’ या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही. सर्व श्रध्दाशील लोक मुस्लिम होते. तेव्हा त्यांपैकी एखाद्या समाजाला मुस्लिम नावाने ओळखण्याची गरज भासत नव्हती. म्हणून जरी कुरआन एखाद्या लोकसमुदायाला मुस्लिम म्हणून संबोधन करतो त्या वेळी त्या शब्दाचा खरा आशय अभिप्रेत असतो. आपण म्हणू या की इस्लाम त्यांचे गुणवैशिष्ट्य होते आणि नाव अथवा शीर्षक नव्हते.

‘जिल्हज्ज’ महिन्यात प्रेषित मुहम्मद(स) ‘हुदैबिया’ वरुन परत आले. काही दिवस ‘मदीना’मध्ये घालविल्यानंतर ‘मुहर्रम’च्या सुरुवातीस ‘खैबर’कडे कूच केले. ही गोष्ट लक्षणीय आहे की, ‘ज्यू’ समाजाचे लोक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स), मुस्लिम समुदाय आणि इस्लामी शासनाविरुद्ध सतत कटकारस्थाने रचण्यात मग्न होते. मदीना समझोता कराराचे उल्लंघन करणे, मुस्लिम शत्रूपक्षांशी संबंध वाढवून त्यांना मदत करणे, मुस्लिमांमध्ये उपद्रव माजविणे, प्रेषितांसंबंधी अनादरयुक्त चर्चा करून वातावरण गढूळ करणे, प्रेषितांच्या चर्चासभेत हेर पाठवून प्रेषितांचे मनसूबे शत्रूंना कळविणे व न्यायव्यवस्थेत बाधा निर्माण करणे, युद्धप्रसंगी जवाबदार्यांना बगला दाखविणे व यासारख्या अनेकानेक अपराधी कारस्थानात ते गुंतलेले असायचे. या सर्व बाबींवर विस्तारभयास्तव चर्चा टाळण्यात येत आहे. फक्त प्रेषितांच्या हत्येचे कारस्थान आणि षडयंत्र जरी पाहिले, तर ही बाब स्पष्ट होते की, प्रेषित, इस्लामी आंदोलन आणि इस्लामी राज्यासाठी हे किती घातक होते? शेवटी एके दिवशी प्रेषित चौदाशे पायदळ आणि दोनशे स्वार एवढी फौज घेऊन खैबरच्या मार्गावर निघाले. ‘मदीना’मध्ये माननीय सवाअ बिन अर्तफा(र) यांना आपले प्रतिनिधी नियुक्त केले. इस्लामी ध्वज माननीय अली(र) यांच्या हाती दिला. प्रेषितभार्या माननीय उम्मे सलमा(र) आणि काही इतर स्त्रियासुद्धा लष्करासोबत होत्या. पुढील तुकडीचे प्रमुख माननीय उकाशा(र) आणि उजव्या हाती असलेल्या तुकडीचे प्रमुख माननीय उमर(र) होते.
मुजाहिदीन (धर्मयोद्धयांचे) चे हे लष्कर ‘रजीअ’ या स्थानावर उतरले. हे स्थान ‘गतफान’ आणि ‘खैबर’च्या मध्यभागी होते. ‘गतफान’वासीयांना इस्लामी लष्कराची खबर मिळताच ते खैबरवासीयांच्या मदतीसाठी तयार झाले. परंतु त्यांनी विचार केला की, आपण खैबरवासियांच्या मदतीस गेल्यावर आपल्या वस्तीचे संरक्षण कोण करील? म्हणून ते परत फिरले.
आदरणीय प्रेषितांनी असा निर्णय घेतला की, याच जागेवर लष्कराचा तळ राहील आणि वेगवेगळ्या तुकड्या शेजारील वस्त्यांत जाऊन लष्करी कारवाया करतील. माननीय उसमान(र) यांना या केंद्रीय तळाचे प्रमुख नियुक्त केले. स्त्रिया आणि रसद याच ठिकाणी ठेवण्यात आले.
पहिला हल्ला माननीय महमूद बिन मुस्लिमा(र) यांनी ‘नाईम’ किल्ल्यावर केला. परंतु किल्ला फत्ते होण्याच्या एक दिवस पूर्वी ‘माननीय महमूद’ किल्ल्याच्या भितीच्या सावलीत विश्रांतीसाठी पहुडले. तेव्हा वरून एका ‘ज्यू’ ने जात्याचे पाटे त्यांच्या अंगावर टाकले व त्यात ते शहीद झाले. मग मोठे बंधु ‘माननीय इब्ने मुस्लिम(र)’ यांनी मुजाहिदीन (इस्लामी सैनिक) चे नेतृत्व सांभाळले व किल्ला सर केला. याच दरम्यान ‘साब’ किल्लासुद्धा इस्लामी लष्कराच्या ताब्यात आला. या किल्ल्यास माननीय खब्बाब बिन मुंजिर(र) यांच्या नेतृत्वाखाली वेढा देण्यात आला. या किल्ल्यातून भरपूर युद्ध सामग्री आणि संपत्ती इस्लामी लष्कराच्या हाती लागली. त्याचप्रमाणे ‘नुतात’ हा किल्ला जिकण्यासाठी खूप अवघड होता. परंतु किल्ल्यातील एका ‘ज्यू’ माणसाने किल्ल्यात शिरण्याचा गुप्त मार्ग दाखविला आणि किल्ला सर झाला. अशाच प्रकारे ‘शन’ आणि ‘बर्र’ हे किल्लेसुद्धा सर झाले. ‘कमूस’चा किल्ला सर करण्यात काही अडचणी मात्र आल्या. वीस दिवसांचा सतत वेढा देऊनसुद्धा काही निष्पन्न होताना दिसत नसल्याने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी इस्लामी सैन्यास संबोधित करून म्हटले, ‘‘उद्या लष्कराचा झेंडा मी त्या माणसाच्या हाती देईन ज्यावर ईश्वर आणि प्रेषितांचे विशेष प्रेम आहे. दुसर्या दिवशी सकाळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय अली(र) यांना बोलावून त्यांना लष्कराचा ध्वज देऊन म्हटले, ‘‘जा आणि ईश्वराच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध) करा. सुरुवातीस इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण द्या आणि नंतर युद्ध करा!’’ तसेच इस्लामी राज्याच्या मौलिकनीती हा सामान्य कायदा स्पष्ट करून म्हटले की, ‘‘तुमच्यामार्फत केवळ एका व्यक्तीने जरी इस्लाम धर्म स्वीकारला, तर ते अगणित धन व संपत्तीपेक्षा जास्त श्रेष्ठ होय.’’ या वाक्यावरून स्पष्ट होते की, इस्लामी राज्याचा हा मुळीच हेतु नव्हे की अमाप संपत्ती, जय आणि राज्यास विस्तार प्राप्त व्हावा. उलट इस्लामी राज्याचा हा हेतु मुळात एवढाच आहे की, मानवांस ईहलोक आणि परलोकात यश मिळावे.
इस्लामी लष्कराचा ध्वज हाती येण्याचे हे सौभाग्य माननीय अली(र) यांना प्राप्त झाले आणि ईश्वराच्या विशेष कृपेमुळे हा किल्ला इस्लामी लष्कराने सर केला. या पाठोपाठ ‘अल कैतिबा’, ‘वल वतीह’ आणि ‘अस्सलालम’ किल्लेही ताब्यात आले आणि ‘ज्युडिशीयन्स’ ची उरलीसुरली शक्ती नष्ट झाली. आता ‘ज्युडिशीयन्स’ यांनी हत्यार टेकले आणि आत्मसमर्पण करून प्रेषितांना दयेचे मागणी केली. कृपाळू प्रेषितांनी त्यांना माफी दिली.
याच प्रसंगी ‘ज्युडिशीयन्स’ चा सरदार ‘मरहब’च्या बहिणीने प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या सोबत्यांना भोजनाचे निमंत्रण देऊन अन्नामध्ये विष कालवले. जेवणाचा पहिला घास मुखापर्यंत येताच प्रेषितांना कळाले की, अन्नात विष टाकण्यात आले आहे. त्यांनी आपला हात रोखला आणि त्यांच्या अनुकरणास्तव त्यांच्या सोबत्यांनीसुद्धा जेवण बंद केले. केवळ माननीय बिशर बिब करा(र) यांच्यावर विषाचा प्रभाव पडून ते मरण पावले. हे कटकारस्थान सिद्ध होऊनसुद्धा प्रेषितांनी त्या स्त्रीस क्षमा दिली.
‘खैबर’च्या युद्धात १८ मुस्लिम सैनिक शहीद आणि ५० जखमी झाले. तसेच शत्रूपक्षातील मरणार्या सैनिकांची संख्या ९३ होती. ‘ज्युडिशीयन्स’चा या युद्धात पराभव झाला आणि त्यांना इस्लामी शासनात रयतेचा दर्जा देऊन रीतसर नागरिकत्व प्रदान करण्यात आले.
काही ‘ज्युडिशीयन्सनी’ इस्लामचा स्वीकार केला. त्यांच्यापैकी ‘अस्वद दराई’ नावाचा एक गुराखी होता. त्याने युद्धाचे नेमके कारण विचारले. त्यावर ‘ज्यू’ लोकांनी सांगितले की, ‘‘मुहम्मद(स) यांनी प्रेषित्वाचा दावा केला आहे.’’ तो सरळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्या दरबारी हजर झाला. आणि प्रेषितांना विचारले,
‘‘आपली शिकवण काय आहे?’’
‘‘एकमेव ईश्वरच उपासनेस पात्र असून मी ईश्वराने पाठविलेला प्रेषित होय.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून तो तत्काळ मुस्लिम झाला. याच प्रसंगी ‘माननीय जाफर बिन अबू तालीब(र)’ हे आपल्या कित्येक मित्रांसह ‘अॅबीसिनीया’हून परतले.
‘खैबर’ सर झाल्यानंतर ज्युडिशियांचा ‘कुरा’चा खाडीत आणखीन एक गड होता. तो गडसुद्धा काही दिवसांत इस्लामी सैन्याने सर केला.
यानंतर ‘गत्फान’, ‘मुहारिब’, ‘सालबा’ आणि ‘अनमार’ हे कबिले इस्लामी शासनावर हल्ला करीत असल्याची प्रेषितांना खबर मिळाली. प्रेषित चारशे योद्ध्यांची फौज घेऊन निघाले आणि शत्रूंनी युद्धभूमीवरून पळ काढला. या मोहिमेस ‘जातुर्रिकाअ’चे युद्ध म्हटले जाते.
हुदैबिया समझोत्यानुसार ‘कुरैश’जणांकरिता ‘सीरिया’चा राजमार्ग मोकळा झाला होता. परंतु ‘माननीय अबू जुंदल(र)’ हे कुरैशच्या कैदेतून पळून आले. ‘समझोत्यानुसार प्रेषितांनी त्यांना ‘मदीना’मध्ये आश्रय न दिल्यामुळे त्यांनी एका पर्वतावर जाऊन आश्रय घेतला. त्यांनी कुरैशच्या एका काफिल्यावर हल्ला चढवून त्यांची मालमत्ता काबीज केली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शिफारशीनुसार त्यांनी ही संपत्ती परत केली. त्यांच्याबरोबर आणखीन काही कुरैशपीडित तरूणांनी पळ काढून ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांचा आश्रय घेतला. या वेळी कुरैशजणांना खूप पश्चात्ताप होऊ लागला की, जी शर्त त्यांनी स्वतःसाठी लाभदायक समजली होती, त्यामुळेच त्यांना नुकसान सहन करावे लागत होते. अशा प्रकारे हुदैबियाच्या समझोत्याचा लाभदायक पैलू समोर आला.

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (रह.)
    इस्लाम म्हणजे सर्वंकश न्याय हे सत्य या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. सन 1962 साली हजयात्रेकरूंच्या संमेलनात या भाषणाचे वाचन करण्यात आले. न्याय हेच इस्लामचे उदि्दष्ट आहे हे विशद करून इस्लामी न्याय प्रणालीचे वर्णन आले आहे.
    मानवी स्वभावाच्या कमकुवतपणामुळे त्याच्या हातून काही घोड चुका झाल्या आहेत, त्यापैकी काही भांडवलदारी व धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक न्याय व साम्यवाद इ. आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 94    -पृष्ठे - 16     मूल्य - 12      आवृत्ती - 2 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/rx34hfxej7u007939md2wdt9v9alwbli

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget