Latest Post

तबूक युद्धावरून परतल्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) काही महिण्यांसाठी मदीना शहरीच वास्तव्यास राहिले. यादरम्यान त्यांनी माननीय अबू बकर(र) यांच्या नेतृत्वाखाली तीनशे जणांना ‘हज’ यात्रेवर रवाना केले.
माननीय अबू बकर(र) हज यात्रेस रवाना झाल्यावर ‘सूरह-ए-बरात’ची आयत अवतरली, ज्यामध्ये इस्लाम विरोधकांसाठी वचनभंग करण्याबाबतीत वर्णन होते. तो संदेश ‘हज’ संमेलनात पोहोचविण्याकरिता आदरणीय प्रेषितांनी आपले व्यक्तिगत सचीव माननीय अली(र) यांना रवाना केले की, जेणेकरून ते ‘हज’च्या संमेलनात ‘सूरह-ए-बरात’ विरोधकांसमोर वाचून दाखवतील.
रस्त्यात ‘माननीय अली(र)’ हे जेव्हा ‘हज’ यात्रेकरूंच्या काफिल्यात पोहोचले तेव्हा नियमानुसार ‘माननीय अबू बकर सिद्दीक(र)’ यांनी त्यांना विचारले की, ‘‘आपण कबिलाप्रमुखाच्या नात्याने आलात की आणखीन इतर उद्देशाने आलात?’’ तेव्हा ‘माननीय अली(र)’ यांनी त्यांना सांगितले की, ‘‘मी काफिलाप्रमुखाच्या नात्याने आलेलो नसून ‘सूरह-ए-बरात’च्या विरोधकांसमोर प्रेषितांचा संदेश वाचून दाखविण्यासाठी आलो आहे!’’
हा पहिलाच प्रसंग होता की ‘हज’चा विधी ही प्रेषित इब्राहीम(अ) यांच्या मूळ प्रणालीनुसार अदा करण्यात आला. दिव्य कुरआनने ‘हजविधी’मध्ये ज्या सुधारणा केल्या, त्या खालीलप्रमाणे आहेत.
  1. ‘हजविधी’च्या प्रसंगी भरविण्यात येत असलेल्या जत्रा आणि बाजार बंद करण्यात आले. आत्मप्रतिष्ठेसाठी आणि स्वश्रेष्ठत्वासाठी आयोजण्यात येणारे कवी संमेलन आणि काव्यस्पर्धा बंद करण्यात आल्या.
  2. ‘हजविधी’च्या वेळी होणारा अभद्र शब्दप्रयोग बंद करण्यात आला आणि आत्मश्रेष्ठत्वासाठी होणारा उपद्रव आणि मारामार्या पार बंद करण्यात आल्या.
  3. वाडवडिलांचे स्तुतीगान करून त्यावर फाजील आभिमान वाखाणण्यासाठी जी अज्ञानकाळातील परंपरा होती ती संपूष्टात आणून केवळ एकमेव ईश्वराचे स्मरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
  4. ‘कुरबानी’ (ईश्वराच्या नावावर पशुबळी) करण्याच्या आदेशाबरोबरच या जुन्या प्रथेवर बंदी घालण्यात आली की, बळी दिलेल्या पशुचे मास काबागृहात टांगावे व त्याचे रक्त भितीस लावावे.
  5. मूर्तीपूजेच्या परंपरेनुसार विवस्त्र होऊन प्रदक्षिणा घालण्याच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली आणि अश्लीलपणावर सक्तीने बंदी घालण्यात आली. दिव्य कुरआनने या गोष्टीचे सक्तीने आदेश दिले की, प्रत्येक प्रार्थना व उपासनेच्या प्रसंगी शरीर झाकण्यासारखे वस्त्र अनिवार्यरीत्या वापरावे.
  6. ‘नसी’ची अज्ञानप्रथा बंद करण्यात आली. अर्थात ‘हजविधी’साठी जे चार महिने सन्मानित घोषित करण्यात आलेले होते त्या महिन्यांत अनेकेश्वरवादी लोक आपल्या स्वार्थानुसार बदल करीत म्हणजेच ‘कॅलेंडर’मध्ये बदल करीत असत. त्यावरसुद्धा प्रतिबंध लावण्यात आले.
उपरोक्त उल्लेखण्यात आलेल्या सुधारणांवरून हे लक्षात येते की, कोणतेही सुधारणावादी शासन आणि विशेष करून ‘इस्लामी शासन’ हे विभिन्न तर्हेच्या संस्था आणि प्रकरणांना जशासतसे चालू ठेवू शकत नसून उलट ते उपासना वा प्रार्थनाविधी, परंपरा आणि मानवी संबंधाच्या रचना व बनावटी, तसेच मानवी मूल्यांच्या क्रमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अज्ञानता अथवा असत्य किवा चुकीच्या प्रथांचा प्रभाव पाहते, त्या त्या ठिकाणी त्या असत्य व चुकींच्या प्रथा आणि इतर सर्वच चुकीच्या बाबींचा प्रभाव नष्ट करते. ईश्वराने तर धर्मा(आचरणविधी अर्थात इस्लाम धर्म) चा मूळ उद्देशच स्पष्ट शब्दांत असा सांगितला आहे की, पावित्र्यास अपावित्र्यापासून विभक्त करण्यात यावे.
माननीय अबू बकर सिद्दीक(र) जेव्हा मदीना शहरी परतले तेव्हा आदरणीय प्रेषितांना विचारले, ‘‘हे प्रेषित! माझ्याविरुद्ध एखादा ईश्वरी आदेश आला आहे काय?’’ प्रेषितांनी सांगितले की, ‘‘नाही! मुळीच नाही!!’’ कारण या प्रश्नाचा उद्देश प्रेषितांना चांगलाच माहीत असल्याने ते पुढे म्हणाले, ‘‘हे उचित नव्हते की, माझ्या परिवाराव्यतिरिक्त दुसर्याने ‘समझोत्या’च्या बाबतीत घोषणा करावी!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेल्या या स्पष्टीकरणांमुळे माननीय अबू बकर सिद्दीक(र) यांना खूप समाधान झाले. माननीय अली(र) यांनी आदरणीय प्रेषितांच्या आदेशानुसार ‘सूरह-ए-तौबा’तील ‘बरात’ची घोषणा (अर्थात मुक्तीची घोषणा) वाचून दाखविली. ही घोषणा अशा प्रकारे होती.
  1. स्वर्गात अशी कोणतीच व्यक्ती दाखल होऊ शकणार नाही जी इस्लामचा स्वीकार करणार नाही.
  2. या वर्षापासून पुढे कधीच कोणत्याही मूर्तीपूजकाने ‘हज’करिता येऊ नये.
  3. ईश्वराच्या या घरात चारीबाजुंने नग्न होऊन प्रदक्षिणा करण्याची मनाई असेल.
  4. ज्या लोकांशी प्रेषितांचा करार (समझोता) बाकी आहे, अर्थात ज्यांनी करार भंग केलेला नाही, त्यांच्याशी समझोत्याच्या निश्चित झालेल्या मुदतीपर्यंत करार पाळण्यात येईल.
कुरआनाच्या या मूळ आदेशामध्ये एकूणरीत्या अनेकेश्वरवाद्यांच्या अस्तित्वास एकार्थाने अवैध किवा बेकायदेशीर आणि कायद्याविरुद्ध घोषित करून त्यांना चार महिन्यांची मुदत विचार करण्यासाठी देण्यात आली की, त्यांनी अनेकेश्वरवादावर कायम राहून प्रेषितांशी लढायचे आहे की देश सोडून जावयाचे आहे की इस्लाम स्वीकारून शांतीपूर्ण जीवन जगावयाचे आहे, ते ठरवावे.
‘मदीना’ शहरात लोकांच्या झुंडी येऊ लागल्या
ईश्वराची ही विलक्षण महिमा आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा मानवोपकारी प्रेषित मुहम्मद(स) हे एकेका माणसास शोधून इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा जीवापाड प्रयत्न करीत होते आणि या प्रयत्नात मोठी बाधा येत असे. आता मात्र वेळ अशी आली की, अरब समाजाचे विभिन्न क्षेत्रांचे प्रतिनिधी मंडळ मोठ्या संख्येत प्रेषितदरबारी हजर होऊ लागले आणि स्वतःहून इस्लामच्या मानवकल्याण आंदोलनात सहभागी होऊ लागले.
इतिहासात अगणित उदाहरणे साक्षी आहेत की, प्रत्येक धर्मप्रचार किवा धर्मांदोलन जर आपल्यामध्ये एक क्रांतिकारी प्रेरणा आणि स्पीरिट ठेवीत असेल, अर्थात मानवी चरित्र आणि समाजाच्या सामूहिक व्यवस्थेची जी रचना पहिल्यापासूनच अस्तित्वात असेल, तिला तोडायचे अथवा बदलायचे असेल, तर त्यास म्हणजेच धर्मप्रचार आंदोलणास परंपरागत असलेल्या स्वार्थी शक्तींचा मुकाबला करावा लागतो. पावलोपावली संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष दोन अल्पसंख्याक असलेल्या तत्त्वांच्या दरम्यान होतो. या संघर्षात परंपरागत असलेल्या नेतृत्वाचा विजय झाला, तर जनसाधारण समाज आपल्या जागेवर जशास तसा राहतो. परंतु परिवर्तनवादी शक्ती विकसित होत गेली, तर सर्वसामान्य जनतासुद्धा या शक्तीकडे आकर्षित होत राहते. विशेषकरून ज्या प्रसंगी सर्वसामान्यांच्या लक्षात येत राहिले की, जुनाट परंपरागत नेतृत्व कोलमडत असून आता नवीन शक्तीचे भविष्य उज्ज्वल आहे, तेव्हा ते नवीन शक्तीचे नेतृत्व स्वीकार करतात व या शक्तीभोवती जमा होत जातात.
अरब प्रदेशातसुद्धा नेमके असेच घडले. मक्कातील कुरैश सरदारांनी व त्यांच्या समर्थकांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनास चिरडण्याचा जो भयानक प्रयत्न केला आणि त्यांच्याविरुद्ध संघर्षाची जी शृंखला सुरु केली, त्यात ते सतत पराभूत होत गेले आणि त्यांची शक्ती कमी होत जाऊन प्रेषितांचे मानवकल्याणकारी आंदोलन प्रगती पावत गेले. एवढेच नव्हे तर विरोधी शक्तींचे कंबरडे मोडले. परिणामी अरब समाजाचे सर्व स्तरांतील लोक प्रेषितांच्या हातावर इस्लामची प्रतिज्ञा घेण्यासाठी मोठ्या संख्येत हजर होऊ लागले. म्हणूनच ‘हिजरी सन दहा’ हे वर्षच ‘साले वफूद’ अर्थात प्रतिनिधी मंडळ वर्ष या नावाने नामांकित झाले. तसे पाहता हि. स. नऊ पासूनच लोकांचे प्रतिनिधी मंडळ येऊन प्रेषितांना भेटू लागले होते. दोन तीन प्रतिनिधी मंडळांचा मागे उल्लेख आलेलाच आहे. आता आणखीन काही प्रतिनिधी मंडळांचा या ठिकाणी उल्लेख करू या. कारण सर्वच प्रतिनिधी मंडळांचा उल्लेख करणे या ठिकाणी अशक्य आहे.
‘सकीफ’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
‘मक्का’ आणि ‘हुनैन’च्या विजयानंतर प्रेषित मुहम्मद(स) मदीना शहरी परत येत असताना ‘माननीय उर्वा बिन मसऊद(र)’ यांनी रस्त्यातच प्रेषितांच्या सेवेत हजर होऊन इस्लाम स्वीकारला आणि आपल्या कबिल्यात इस्लामचा प्रचार करण्याची परवानगी मागितली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी शंका व्यक्त केली की, ‘तुमच्या कबिल्याचे अडाणी लोक तुम्हास ठार करतील’ झालेही तसेच. ‘माननीय उर्वा बिन मसऊद(र)’ हे आपल्या घराच्या छतावर जाऊन आपल्या कबिल्याच्या लोकांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देत होते. तेवढ्यात लोकांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करुन त्यांना ठार केले. यानंतर त्या कबिल्याच्या लोकांनी सतत महिनाभर विचार केला की, आता आपण काय करावे? शेवटी ‘अब्द’ हा कबिल्याचा सरदार पाचसदस्यीय प्रतिनिधी मंडळ येऊन प्रेषितदरबारी हजर झाला आणि त्याने प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर तीन विलक्षण प्रकारच्या अटी ठेवल्या.
  1. आम्हास ‘नमाज’ (अनिवार्य असलेली पाच वेळेची ईशप्रार्थना) माफ करण्यात यावी.
  2. आमचे अराध्य दैवत असलेल्या ‘लात’ या देवाची मूर्ती तीन वर्षांपर्यंत तोडू नये.
  3. आमच्या देवीदेवतांच्या मूर्ती आमच्या हाताने तोडण्यास आम्हास भाग पाडू नये.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सुरुवातीच्या दोन्ही अटी मान्य न करता तिसरी अट मान्य केली. मग सर्वांनी प्रेषितांसमोर इस्लामची दीक्षा घेतली. नंतर प्रेषितांनी सोबत्यांचा एक समूह पाठवून ‘लात’ या दैवताची भव्य मूर्ती नष्ट केली.
‘हनिफा’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
‘यमामा’ या ठिकाणाहून शमामा बिन असाल(र) यांच्या प्रचारकार्याने प्रभावित होऊन तेथील लोक इस्लाम धर्मात दाखल झाले. त्यांच्यात मुसैलमा बिन कज्जाब नावाचा एक दांभिकदेखील होता. त्याने प्रेषितांच्या इस्लामी शासनात निम्मा वाटा मागितला. त्याला इस्लामी आंदोलन हे स्वार्थसाधूपणा वाटत असे. त्याने प्रेषितांकडे मागणी केली की, ‘‘आपल्यानंतर आपल्या जागेवर मला स्थानापन्न करावे, तरच मी इस्लामची दीक्षा घेईन.’’ प्रेषितांनी आपल्या हातात असलेल्या खजुरीच्या एका डहाळीकडे इशारा करीत त्यास उत्तर दिले की, ‘‘तुला तर ही डहाळीसुद्धा मिळणार नाही. कारण तू दांभिक आणि खोटारडा आहेस.’’
‘आमिर’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
आमिर परिवाराकडून एक प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले. बोलताबोलताच या मंडळाच्या एका सदस्याने मदीना शहरावर हल्ल्याची धमकी दिली. प्रेषितांनी त्यास सांगितले की, ‘‘ईश्वर तुला याची शक्ती देणार नाही.’’ हे मंडळ परत जाताना धमकी देणार्या या सदस्यास ‘प्लेग’ झाला व तो ठार झाला. बाकीच्या इतर सदस्यांनी इस्लामचा मनःपूर्वक स्वीकार केला.
अशा प्रकारे ‘फजारा’, ‘अब्दुल कैस’, ‘मर्रा’, ‘तै’, ‘हमदान’, ‘असद’, ‘अबस’, नजरान येथील ‘ख्रिस्ती समाज’ आणि इतर शेकडो प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार करून मानवकल्याण आंदोलनात सहभाग घेतला.

अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या स्वाभाविक आकर्षणाचे ध्येय फक्त विशिष्ट जातीचे अस्तित्व टिकवणे आहे. म्हणूनच त्यांच्यात हे आकर्षण फक्त तितकेच ठेवले गेले आहे, जितके प्रत्येक जात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या स्वभावात अशी नियंत्रणशक्ती ठेवली गेली आहे, जी त्यांना कामसंबंधात त्या ठराविक मर्यादेचे उल्लंघन करू देत नाही. या उलट माणसांत ही अभिरुचि असीमित, अनियंत्रित आणि सर्व इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यासाठी वेळ आणि काळाचे कोणतेही बंधन नाही. त्यांच्या स्वभावात अशी कोणतीही नियंत्रणशक्तीसुद्धा नाही जी त्याला एका विशिष्ट मर्यादेवर मज्जाव करील. पुरुष व स्त्रीमध्ये एकमेकासाठी स्थायी आकर्षण असते. त्यांच्यात एकमेकाला आकर्षित करण्याचे अपरिमित साधने एकत्रित केली गेली आहेत. त्यांच्या हृदयात विरूद्ध लिग-जातीबद्दल प्रेम व अनुरक्ततेची एक प्रबळ प्रेरणा ठेवली गेली आहे. त्यांच्या शरीराची रचना आणि त्याचा डौलदारपणा, रंग-रूप आणि त्याचा स्पर्श व त्याच्या अंग-प्रत्यांगात विरुद्ध लिग-जातीसाठी आकर्षण उत्पन्न केले गेले आहे. त्यांचा आवाज, गती, चाल प्रत्येक गोष्टीत आकर्षित करण्याची शक्ती भरली गेली आहे. सभोवतालच्या जगातसुद्धा असली असंख्य साधने निर्माण केली गेली आहे जी दोघांच्या लैंगिक प्रेरणांना गतिमान करतात आणि त्यांना एकमेकाकडे जाण्यास प्रवृत्त करतात. वार्याचे घोंगावणे, पाण्याचा प्रवाह, गवताची हिरवळ, फुलांचा सुगंध, चिमण्यांची चिवचिव, आकाशातील मेघ, चांदण्या रात्रीचे माधुर्यः तात्पर्य असे की, निसर्गाच्या सौंदर्याची लोभनीय शैली आणि ब्रह्मांडाच्या सौदर्याचे चित्र प्रत्यक्ष अथवा परोक्ष रूपाने त्या प्रेरणा गतिमान करण्यास कारणीभूत ठरतात.
याशिवाय माणसाच्या शारीरिक व्यवस्थेचे निरीक्षण केल्यास कळते की यात जो शक्तीचा मोठा खजिना ठेवला गेला आहे, त्यात एकाच वेळी जीवनशक्ती आणि कार्यशक्तीसुद्धा आहे व कामसंबंधी शक्तीसुद्धा. याच ग्रंथी ज्या त्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उत्पन्न करतात.

त्यांनाच ही सेवादेखील सूपुर्द केली गेली आहे की, त्यांनी त्यात कामविषयक शक्तीदेखील उत्पन्न करावी. या शक्तीला गतिमान बनविणार्या भावनांचा विकास करावा. या भावना उत्तेजित करण्यासाठी सौदर्य, रूप, आकर्षकता आणि शोभेच्या विविध साधनांना एकत्र करावे आणि या साधनांतून प्रवाहित होण्याची क्षमता त्याचे डोळे, त्याचे कान आणि त्याच्या घ्राणेंद्रियात व स्पशोंद्रियात, येथपावेतो की त्याच्या कल्पनाशक्तीतसुद्धा एकत्र करावे.

निसर्गाची हीच कार्यशक्ती मनुष्याच्या मानसिक शक्तीमध्येसुद्धा आढळते. त्याच्या मनात जितक्या प्रेरक शक्ती आढळतात, त्या सर्वांचा संबंध दोन प्रबळ संकल्पांशी असतो. एक तो संकल्प जो त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी व आपल्या स्वतःच्या सेवेसाठी तत्पर करतो. दुसरा तो संकल्प जो आपल्या विरुद्ध लिग-जातीशी संबंध ठेवण्यास भाग पाडतो. तारुण्यात जेव्हा मनुष्याची कार्यकारी शक्ती आपल्या चरमसीमेवर असते, तेव्हा दुसरा संकल्प इतका प्रबळ असतो की कधीकधी तो पहिल्या संकल्पाला दाबून टाकतो आणि मनुष्य त्याच्या इतका आहारी जातो की त्याला आपले प्राणसुद्धा गमवावे लागते. स्वतःला विनाशाच्या गतेंत समजून-उमजून ढकलण्यास त्याला यत्किंचितसुद्धा लाज वाटत नाही.
संस्कृतीरचनेवर याचा परिणाम-
हे सर्वकाही कशासाठी आहे? केवळ विशिष्ट जातीच्या अस्तित्वासाठी हे आहे काय? नाही कारण मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तितक्या प्रमाणात संततीच्या उत्पत्तीचीसुद्धा गरज नाही. जितकी मासे, शेळ्यासारख्या अन्य प्राण्यांसाठी आहे. मग याचे काय कारण आहे की, निसर्गाने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक विरुद्ध लिग-जातीचे आकर्षण माणसात ठेवले आहे आणि त्यासाठी सर्वांत जास्त उत्तेजित करणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत? ते केवळ माणसाच्या भोग-विलास आणि रसास्वादनासाठी आहेत काय? असेही नाही निसर्गाने कोठेही मनोरंजन आणि रसास्वादनाला उद्दिष्ट बनविलेले नाही. हे तर मनुष्य व अन्य प्राण्यांना एखाद्या महान उद्देशाच्या सेवेसाठी भाग पाडण्याकरिता स्वाद व रसास्वाद तोंडलावणी म्हणून देत असतो. आता विचार करा की, या बाबतीत कोणता महान उद्देश निसर्गासमोर आहे? आपण जितका विचार कराल, एखादे अन्य कारण याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की निसर्ग, अन्य प्राण्यांच्या उलट मानवजातीला सभ्य व सुशील बनवू इच्छितो. म्हणूनच मानवाच्या हृदयात विरुद्ध लिगासाठी प्रेम व ममतेचा तो संकल्प ठेवला गेलाआहे जो केवळ शरीरसंबंध व सन्तानोत्पत्ती क्रियेचीच निकड दर्शवितो असे नव्हे, तर एक टिकाऊ साहचर्य, हार्दिक संबंध व आध्यात्मिक जवळिकीची निकडदेखील भासवितो.
म्हणूनच माणसात विरुद्ध लिग-जातीविषयी आकर्षण, त्याच्या यथार्थ काम-शक्तीपेक्षा कितीतरी अधिक ठेवले गेले आहे. जर त्याच प्रमाणात, नव्हे तर एकास-दहाच्या प्रमाणात त्याने संततीला जन्म दिला, तर त्याचे आरोग्य बिघडेल आणि दीर्घ आयुष्याला पोहचेपर्यंत त्याची शारीरिक शक्ती संपुष्टात येईल. या गोष्टीचे हे उघड प्रमाण आहे की, मनुष्य परलिग-जातीच्या आकर्षणाच्या आधिक्याचा अर्थ असा नाही की, त्याने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक संभोग करावा, तर याचा अर्थ असा आहे की, स्त्री व पुरुषाची एकमेकाशी बांधिलकी असावी आणि त्यांच्या पारस्परिक संबंधात स्थायित्व व दृढता उत्पन्न केली जावी.
म्हणूनच स्त्री-स्वभावातस जातीय आकर्षण व काम-वासनेबरोबरच लज्जा, संकोच, नकार, पलायन व मज्जावासारखे गुण ठेवले गेले आहेत; जे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्रीमध्ये आढळतात. ही संकोच व पलायनची प्रवृत्ती जरी अन्य प्राण्यांच्या माद्यांमध्येसुद्धा दिसून येते. तरी मानवाच्या नारीजातीत याची शक्ती आणि प्रमाण फार अधिक आढळते आणि ती लज्जा व संकोच्याच्या भावनेद्वारा अधिक तीव्र केली गेली आहे. यावरूनसुद्धा कळते की, मनुष्यात जातीय आकर्षणाचे ध्येय हा एक स्थायी संबंध आहे. असे नव्हे की, प्रत्येक जातीय आकर्षण केवळ मैथुन-क्रियेचा परिणाम आहे.

म्हणूनच मनुष्याच्या अपत्याला सर्व अपत्यांपेक्षा अधिक निर्बल व विवश निर्माण केले गेले आहे. अन्य प्राण्यांच्या उलट मनुष्याच्या अपत्याला अनेक वर्षांपर्यंत आई-वडिलांच्या संरक्षण व देखरेखीची गरज असते आणि त्यात आपल्या स्वतःला सांभाळण्याची व स्वबळावर जगण्याची क्षमता फार उशीरा येते. याचा अर्थ असा आहे की, स्त्री-पुरुषाचे संबंध केवळ लैंगिक संबंधापर्यंत मर्यादित राहू नयेत, तर या संबंधाच्या परिणामाने त्यांना परस्पर सहयोग व सहकार्यास भाग पाडावे.

म्हणूनच मानवाच्या हृदयात इतर सर्व प्राण्यांपेक्षा आपल्या संततीबद्दल अधिक प्रेम ठेवले गेले आहे. अन्य प्राणी काही दिवसांपर्यंत आपल्या संततीची देखरेख केल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होतात; मग त्यांच्यात कोणताही संबंध उरत नाही. नंतर ते एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. या उलट मनुष्य प्रारंभिक पालनपोषण काळ निघून गेला तरी संततीच्या प्रेमपाशात जखडलेला राहतो; येथपावेतो की हे प्रेम संततीच्या संततीपर्यंत चालत राहते. माणसाची स्वार्थपरक पशुतासुद्धा या प्रेमाच्या अधीन इतकी राहते की, जे काही तो केवळ स्वतःसाठी इच्छितो त्यापेक्षा कितीतरी अधिक तो आपल्या संततीसाठी
इच्छितो. त्याच्या हृदयात आतून ही इच्छा उत्पन्न होते की, जितकी शक्त होईल तितकी उत्तमोत्तम सामुग्री आपल्या संततीसाठी एकत्रित करावी आणि आपल्या परिश्रमाचे फळ त्यांच्यासाठी सोडून जावे. ही तीव्र प्रेमभावना उत्पन्न करण्यात निसर्गाचे ध्येय केवळ असेच असू शकेल की, स्त्री व पुरुषाच्या लैंगिक संबंधांना एक स्थायी संबंधात परिवर्तीत करावे आणि त्या स्थायी संबंधाला कुटुंबव्यवस्थेचे साधन बनवावे. शिवाय नातेसंबंधाने प्रेमाच्या माध्यमाने अनेक कुटुंबांना विवाहसंबंधाद्वारे परस्परांना जोडत जावे. याशिवाय प्रेम व प्रियजनांच्या संयोगामुळे त्यांच्यात सहयोग व सहकार्याचा संबंध उत्पन्न करावा आणि अशा प्रकारे एक संस्कृतीव्यवस्था अस्तित्वात यावी.
संस्कृतीची मूळ समस्या-
यावरून असे कळते की, हे सजातीय आकर्षण मानवी शरीराच्या रक्तात आणि त्यांच्या हृदयाच्या कानकोपर्यात वसलेले आहे. त्याच्या सहाय्यासाठी प्रचंड प्रमाणात सृष्टीच्या कणाकणात साधने व प्रेरणा एकत्रित केल्या गेल्या आहेत. त्यामागील उद्देश असा आहे की, मनुष्याच्या वैयक्तिकतेला सामाजिकतेकडे प्रवृत्त करावे. निसर्गाने या आकर्षणाला मानव-संस्कृतीची मूळ प्रेरकशक्ती बनविले आहे. याच मोहकता व आकर्षणाद्वारे मानवाच्या दोन जातीत (स्त्री-पुरुष) आपुलकी उत्पन्न होते आणि नंतर या आपुलकी व जवळिकीने सामाजिक जीवनाचा प्रारंभ होतो.

जेव्हा हे सिद्ध झाले. तेव्हा हेसुद्धा आपोआप स्पष्ट झाले की, स्त्री-पुरुषाच्या संबंधांची समस्या वास्तविकतः संस्कृतीची मूळ समस्या आहे. तिच्याच अचूक सोडवणुकीवर संस्कृतीची सुधारणा व बिघाड, तिचा उत्कर्ष व अपकर्ष आणि तिचे स्थैर्य व अस्थिरता अवलंबून आहे. मानवजातीच्या या दोन्ही भागांत एक संबंध पाश्चिक (अथवा दुसर्या शब्दांत विशुद्ध लैंगिक आणि कामवासनायुक्त) आहे, ज्याचा उद्देश मानवजात अस्तित्वात ठेवण्याव्यतिरिक्त काहीही नाही आणि दुसरा संबंध मनुष्यतेचा आहे, ज्याचे ध्येय असे आहे की, दोघांनी (स्त्री-पुरुष) मिळून संयुक्त स्वार्थासाठी आपापल्या योग्यता व आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार काम करावे. या सहयोगासाठी त्यांचा सजातीय प्रेमसंबंध एखाद्या सूत्राची भूमिका वठवितो. ते पाश्विक व मनुष्यतेचे असे दोन्ही गुण मिळून एकाच वेळी त्यांच्याकडून संस्कृतीचा कारभार चालविण्याची सेवा करून घेतात. हा कारभार चालू ठेवण्यासाठी आणखी अधिकाधिक व्यक्तींना एकत्रित करण्याची सेवासुद्धा संस्कृतीची जडणघडण व बिघाड यावर अवलंबून आहे की, या दोन्ही गुणांचे सामंजस्य अत्यंत संतुलित व अत्यंत योग्य असावे.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सत्यधर्माचे प्रसारकार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे कार्य सुरुच ठेवले. याच कार्याचा एक भाग म्हणजे आदरणीय प्रेषितांनी माननीय हारिस बिन उमैर(र) यांना ‘सीरिया’कडे दूत म्हणून पाठविले. परंतु ‘हिरकल’ सम्राटाचा राज्यपाल शुरह बिल बिन अम्र याने त्यांना रस्त्यातच शहीद केले. हे पातक कृत्य मानवनीतीची पायमल्ली करणारे आणि दूतांचे अधिकृत अधिकार हिरावून घेणारे असल्याने इस्लामी शासन एवढे घोर पाप सहन करण्याएवढे आणि आपले मूल्य पायदळी तुडविताना उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहण्यासारखे तर मुळीच नव्हते.
‘मौता’चे युद्ध अगोदरच घडले होते. ते असे की, हिजरी सन ७ मध्ये ‘जमादिलआखिर’च्या महिन्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय जैद बिन हारिसा(र) यांच्या नेतृत्वात तीन हजारांचे सैन्य ‘सीरिया’च्या ‘बलका’ या प्रदेशाकडे पाठविले होते. हे सैन्य रवाना करण्यासाठी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जातीने मदीना शहराबाहेर त्यांच्यासोबत गेले होते.
हे सैन्य जेव्हा ‘मुआन’ या ठिकाणी पोहोचले तेव्हा ‘सम्राट हिरकल’ तेथे दौर्यावर आल्याचे समजले. त्याच्यासोबत खूप बलाढ्य लष्कर आणि मोठ्या संख्येत ख्रिस्ती समुदाय होता. त्याच्यासोबत असलेल्या लष्कराची आणि ख्रिस्ती समुदायाची संख्या जवळपास एक लाखावर होती. इस्लामी लष्कराच्या अधिकार्यांनी सल्लामसलत करून निर्णय घेतला की शत्रूच्या बलाढ्य सैन्यास न घाबरता त्याचा सामना करू. ‘मुशारिफ’ या ठिकाणी दोन्ही सैन्याची टक्कर झाली. तुंबळ युद्ध सुरु झाले. या युद्धात इस्लामी लष्कराचे सेनापती माननीय जैद बिन हारिसा(र) हुतात्मे झाले. सेनापतींचा झेंडा माननीय जाफर(र) यांनी सांभाळला आणि त्यांनीही शत्रूंचे नव्वद घाव शरीरावर झेलून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. नंतर माननीय खालिद बिन वलीद(र) पुढे सरसावले आणि शत्रूसैन्यावर अक्षरशः तुटून पडले. शत्रूवर हल्ला करताना त्यांच्या हातून नऊ तलवारी तुटल्यात. अंततः शत्रूसैन्य पराभूत झाले. इस्लामी लष्कराचे बारा शूर वीर या युद्धात शहीद झाले.
अत्यंत कमी संख्येत असलेले आणि कमी शस्त्रसामुग्री असलेले इस्लामी लष्कर ही मोहीम फत्ते करून परतले. याच युद्धामधील विजयाचे श्रेय माननीय खालिद बिन वलीद(र) यांना मिळाले आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना ‘सैफुल्लाह’ (अर्थात ईश्वराची तलवार) हा किताब बहाल केला.
हा ‘मौता’ च्या युद्धाचा वृत्तान्त आहे. याच युद्धाचा दुसरा भाग म्हणजेच ‘तबूक’चे युद्ध होय. ‘तबूक’चे युद्ध हे इस्लामी इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय आहे. मक्काच्या विजयानंतर हिजरी सन ०९ च्या रजब महिन्यात खबर मिळाली की, ‘सम्राट हिरकल’चे लष्कर मदीना शहरावर हल्ला करण्याची ‘सीरिया’मध्ये जोरदार तयारी करीत आहे. ‘सम्राट हिरकल’ हा अफाट भूप्रदेशाचा सम्राट होता आणि त्याने ‘ईराण’च्या अफाट शक्तिशाली शासनास पराभूत केले होते. त्यामुळे त्याच्या नावाने संपूर्ण जगाचा थरकाप उडत असे. परंतु इस्लामी शासन मात्र जगातील कोणत्याही शक्तीला न जुमानता सत्यधर्माचा प्रसार करीत होते.
‘मदीना’ शहरास केंद्र बनवून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी मोठ्या त्याग व परिश्रमाने इस्लामी राज्याची स्थापना केलेली होती. त्यामुळे या शासनास क्षती पोहोचणे म्हणजे एक असहनीय बाब होती. म्हणून असा ठाम निर्णय घेण्यात आला की, कोणत्याही परिस्थितीत रोमन सम्राटाच्या सैन्यास अरब प्रदेशात घुसू न देता बाहेरच हे युद्ध सर करावे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी इस्लामी लष्कराने युद्धाची जोरदार तयारी सुरु केली. उन्हाची रखरख वाढलेली होती. दुष्काळही पडलेला होता. अशा विषम परिस्थितीतही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी युद्धासाठी वर्गणी देण्याचे आवाहन करताच मुस्लिमांनी वर्गणीचे असे उदाहरण सादर केले की, ही बाब जगाच्या इतिहासात इतरत्र कोठेच सापडत नाही. एकट्या माननीय उस्मान(र) यांनी नऊशे उंट आणि शंभर घोडे प्रेषितांना सादर केले. माननीय अब्दुर्रहमान बिन औफ(र) यांनी ४० हजार दिरहम (आजचे जवळपास आठ लाख रुपये) चा प्रेषितांसमोर ढीग लावला. माननीय अबू बकर सिद्दीक(र) यांनी तर घरातील संपूर्ण संपत्तीच अगदी झाडू मारून आणून प्रेषितांसमोर हजर करून या देणगीस्पर्धेत बाजी मारली. माननीय उमर(र) यांनी आपल्या पूर्ण संपत्तीचा निम्मा भाग प्रेषितांसमोर ठेवला. परंतु या देणगीकार्यात सर्वांत जास्त पुण्य मिळविणारे एक गरीब श्रमिक होते की, ज्यांनी दिवसभर पाण्याचे डोल खेचून खेचून चार शेर खजुरी मजुरीत मिळविल्या आणि दोन शेर खजुरी आपल्या परिवारासाठी ठेवून दोन शेर खजुरी प्रेषितांच्या सेवेत अर्पण केल्या. त्यांची ही त्यागभावना पाहून सर्वांच्या पापण्या पाणावल्या आणि प्रेषितांनीसुद्धा आपले आनंदाश्रू आवरत त्यांच्या दोन शेर खजुरी सर्वांनी दिलेल्या देणगीच्या ढिगार्यावर ठेवून त्यांचा सन्मान वाढविला. स्त्रियांनीसुद्धा आपल्या त्यागभावनांना वाट काढून देत आपल्या शरीरांवरील सोने-चांदीचे सर्व दागिने प्रेषितांसमोर टाकले.
अशा प्रकारे परिपूर्ण त्याग आणि बलिदानाच्या भावनेतून ३० हजाराचे इस्लामी सैन्य तयार झाले. हे लष्कर ‘तबूक’च्या ठिकाणी पोहोचताच अशी माहिती मिळाली की, आता शत्रूपक्षाने इस्लामी शासनावर हल्ला करण्याचा निश्चय सोडून दिला आहे. खरे पाहता ‘सीरिया’ देशाच्या राजास कोणीतरी चुकीची वार्ता कळविली होती की, प्रेषितांचा देहान्त झाला असून इस्लामी राज्यावर हल्ला करण्याची ही उत्तम संधी आहे. परंतु त्यास जेव्हा सत्य परिस्थिती समजली की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जीवित असून मदीनाचे इस्लामी शासनही अबाधित आहे, तेव्हा त्यांच्या हल्ल्याच्या तयारीवर विरजन पडले.
मग प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘तबूक’मध्ये एक महिनाभर थांबून बरेच कार्य तडीस लावले. या महिन्याभराच्या कार्यकाळात ‘ऐला’ या ठिकाणच्या राजाने आत्मसमर्पण करून कर निश्चित करून समझोता केला. त्याचबरोबर ‘अरबा’ आणि ‘अजरुह’च्या लोकांनीसुद्धा ‘जिजया’ (रहिवासी कर) प्रेषितांना सादर केला. माननीय खालिद बिन वलीद(र) यांना चारशे सैनिकांची तुकडी देऊन ‘दौमतुल जुन्दल’च्या राज्यपाल ‘उकैदर’वर ताबा मिळविण्यासाठी पाठविण्यात आले. या लढाईत ‘उकैदर’चा भाऊ ठार झाला आणि ‘उकैदर’ला कैदी बनविण्यात आले. त्याने ‘जिजया’ देण्याचे स्वीकारले आणि अशा प्रकारे संपूर्ण उत्तर क्षेत्रावर इस्लामी शक्तीचा प्रभाव कायम झाला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) मदीना शहरी परतले. या अतिशय कठीण परिस्थितील युद्धात सामील न होणारे बरेचसे दांभिकजण मदीना शहरात होते. आदरणीय प्रेषितांनी त्यांना युद्धात सामील न होण्याचा जाब विचारला, तेव्हा त्यांनी खोटेनाटे निमित्त प्रेषितांसमोर ठेवले. आदरणीय प्रेषितांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु काही निष्ठावान लोकही असे होते की, ज्यांच्याकडून या महत्त्वाच्या युद्धात सहभागी न होण्याची चूक घडली. नंतर एके दिवशी उन्हाच्या वेळी ते आपल्या परिवारजणांसह थंड सावलीत बसले असताना अचानक उठून म्हणाले की, ‘‘हे ईश्वरा! तुझे प्रेषित तर अशा तीव्र उन्हात युद्धासाठी प्रवासावर निघालेत आणि मी मात्र आपल्या परिवारासह थंड सावलीत आहे!’’ असे म्हणून त्यांनी तत्काळ आपल्या उंटावर स्वार होऊन प्रेषितांच्या लष्करात सहभागी झाले.
या प्रसंगाची आणखीन एक विचित्र घटना अशी घडली की, माननीय काब बिन मालिक(र), हिलाल बिन उमैया(र) आणि माननीय मुरारह बिन रूबैअ(र) हे तिघें प्रेषितांचे निष्ठावंत सोबती असूनही युद्धात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे आदरणीय प्रेषितांनी ईश्वराचा आदेश येईपर्यंत त्यांना सामूहिक जीवनापासून विभक्त होण्याचा आणि आपापल्या पत्नींशी दूर राहण्याचा आदेश दिला. प्रेषितांची ही नाराजी या तिघांना खूप असह्य ठरली. त्यांनी हे दिवस अतिशय शोकावस्थेत काढले. अशा या शोकाकुल अवस्थेत आणि अरिष्टपूर्ण परिस्थितीत मुस्लिम समुदायाची कोणतीच व्यक्ती त्यांच्याशी बोलतदेखील नव्हती. याच काळात ‘गस्सानी’च्या राजाने ‘माननीय काबबिन मालिक(र)’ यांना पत्र पाठविले की,
‘‘आम्हास अशी माहिती मिळाली आहे की, तुमच्या प्रमुख असलेल्या मुहम्मद(स) यांनी तुमच्यावर अत्याचार केला. कदाचित त्यांना तुमची कदर नसावी. तुम्ही सरळ आमच्या छत्रछायेत या. आम्ही तुमची कदर करू आणि तुम्हास वाट्टेल ते देऊ!’’
माननीय काब बिन मालिक(र) यांनी त्याचा प्रस्ताव झुगारून दिला, त्याचे पत्र जाळून टाकले. कारण ते खरोखरच प्रेषितांचे निष्ठावंत असून कोणीही त्यांच्या निष्ठेस खरेदी करण्याच्या लायकीचा नव्हता. जगातील कोणत्याही संपत्तीस ते प्रेषितांच्या निष्ठेवर ओवाळून टाकीत असत. अशा या शोकाकुल आणि कठीण वातावरणात पूर्ण पन्नास दिवस व्यतीत झाले आणि मग ईश्वराने या तिघांना जाहीर माफी दिली. मदीना शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि सर्व बाजूंनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत गेला. माननीय काब बिन मालिक(र) यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि अत्यानंदाच्या भरात त्यांनी आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग दान केला.
हाच आहे तो चारित्रिक आदर्श. हा आदर्श आदरणीय प्रेषितांच्या सत्यधर्म आंदोलनास हवा होता आणि हा आदर्श निर्माण करण्यात इस्लामी विचारशक्तीचा इतिहासात नेहमीच विजय झाला.
आणखीन एक महत्त्वाची घटना अशी की, या युद्धात माननीय अब्दुल्लाह बिन दुबजादैन(र) या तरूणास हौतात्म्य मिळाले. अगदीच तारूण्याच्या उंबरण्यावर त्यांना इस्लामचे निमंत्रण मिळाले आणि त्यांचे अंतःकरण इस्लामच्या विचारसरणीने प्रभावित झाले. परंतु यामध्ये त्यांच्या काकांचा खूप विरोध होता. मक्का विजयानंतर आदरणीय प्रेषितांसह परत आल्यावर त्यांनी आपल्या काकांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देताना म्हटले की, ‘‘हे काकावर्य! आपण इस्लाम स्वीकारण्याची बर्याच वर्षांपासून मी वाट पाहत आहे. परंतु अद्यापही आपले अंतःकरण पाणावलेले नाही. आता मला इस्लाम धर्म स्वीकारण्याची परवानगी द्यावी.’’
परंतु पाषाणहृदयी काकांनी त्यांना खडसावले की, ‘‘जर तुम्हास मुहम्मद(स) यांची साथ द्यायचीच असेल तर खुशाल द्या! परंतु तुमच्या संपूर्ण वडिलोपार्जित संपत्तीतून एक कवडीदेखील मिळणार नाही. शिवाय तुमच्या अंगावरील हे वस्त्रसुद्धा मिळणार नाही. माननीय अब्दुल्लाह(र) म्हणाले, ‘‘हे काका! आता मूर्तीपूजेचा मला खूप कंटाळा आलेला आहे. मी तर केवळ एकाच ईश्वराची उपासना करण्याच्या मानसिकतेत आहे.’’ मग त्यांनी आपल्या आईकडून एक घोंगडी पांघरली आणि शरीरावरील पोषाख काकाच्या स्वाधीन करून आदरणीय प्रेषितांच्या सेवेत हजर झाले.
हे क्रांतिकारी तरूण जिहाद (धर्मयुद्ध) आणि हौतात्म्याची तीव्र प्रेरणा घेऊन प्रेषितांच्या लष्करात सामील झाले आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. मग आदरणीय प्रेषितांनी स्वतःहून त्यांचा दफनविधी केला आणि ईश्वरदरबारी प्रार्थना केली की,
‘‘हे ईश्वरा! मी यांच्याशी राजी आहे. तूसुद्धा यांच्यावर प्रसन्न हो!’’
हे दृष्य पाहून ‘माननीय इब्ने मसऊद(र)’ यांच्या मुखावर शब्द आले की,
‘‘या कबरीत मलादेखील दफन करण्यात आले असते, तर किती चांगले झाले असते!!!’’
‘तबूक’ नंतरच्या दोन महत्त्वाच्या घटना
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘तबूक’च्या युद्धावर रवाना होण्यापूर्वी काहीजण प्रेषितांना येऊन भेटले आणि म्हणाले की, ‘‘आम्ही वृद्ध आणि अपंगांच्या सवलतीसाठी आणि विशेष करून पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘कुबा’ मस्जिदच्या जवळच ‘बनी सालिम’ मोहल्यात एक मस्जिद बांधली असून तिच्या उद्घाटनास्तव आपण येऊन नमाज पढवावी. या प्रसंगी प्रेषितांचे संपूर्ण लक्ष ‘तबूक’च्या मोहिमेच्या तयारीकडे केंद्रित झालेले असल्याने त्यांना सांगितले की, ‘‘‘तबूक’च्या मोहिमेवरून परत आल्यावर पाहू या!’’
ही मस्जिद ९२ दांभिक जणांच्या एका गटाने ‘अबू आमेर’ या दांभिकाच्या नेतृत्वात बांधली होती. त्याने आपल्या गटास सांगितले होते की, ‘‘शक्य होईल तेवढी हत्यारे गोळा करून ठेवावीत. मी रोमन सम्राटाशी साठगाठ करून ‘मुहम्मद(स)’ आणि त्यांच्या सहकार्यांना मदीना शहरातून बाहेर घालवितो.’’ याबरोबरच आपल्या दांभिक अनुयायांना असेदेखील सांगितले होते की, मी प्रत्येक सूचना कोणत्या ना कोणत्या मार्गे तुमच्यापर्यंत पोहोचवीत राहीन. परंतु यासाठी तुम्ही एका मस्जिदीची निर्मिती करावी. त्या मस्जिदमध्ये मी पाठविलेला खबर्या असेल. तो प्रवासी म्हणून तेथे मुक्कामास असेल आणि कोणासही शंकादेखील येणार नाही. अशा प्रकारे इस्लामी शासनाविरुद्ध कट शिजला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे ‘तबूक’च्या मोहिमेवरून परत येताना ‘जी- अवान’ या ठिकाणी पोहोचताच ईश्वराने आपल्या वाणीद्वारे प्रेषितांना या कटाबाबतीत सूचना दिली. याप्रसंगी आदरणीय प्रेषितांनी आपल्या दोन निष्ठावान सहकार्यांना दांभिकांनी निर्माण केलेली मस्जिद जमीनदोस्त करण्याचे आणि तेथील संपूर्ण साहित्यास आग लावून जाळण्याचे आदेश दिले. हे दोन्ही सहकारी तत्काळ दांभिकांच्या मस्जिदवर पोहोचले आणि मस्जिदीस जमीनदोस्त करून सर्व साहित्या जाळून भस्म केले. या मस्जिदच्या बाबतीत ईश्वराने अत्यंत कडक शब्दांत वर्णण केले. ते अशा प्रकारे,
‘‘ज्या लोकांनी इस्लामविरोधी कारस्थानांचा अड्डा बनविण्यासाठी आणि श्रद्धावंतांमध्ये फूट टाकण्यासाठी, ईश्वर आणि प्रेषितांविरुद्ध आणि इस्लामविरुद्ध लढण्यासाठी या मस्जिदीजी निर्मिती केली, तेव्हा त्या मस्जिदमध्ये मुळीच जाऊ नये.’’(दिव्य कुरआन)
या घटनेवरून हा सिद्धान्त समोर येतो की, केवळ मस्जिदीचा सांगडा उभा करून ती इमारत ईशपरायणता, संयम आणि पावनतेचे केंद्र होत नसते. यासाठी इमारत निर्मात्यांच्या निश्चयानुसारच योग्य परिणाम मिळेल. याचबरोबर मस्जिद ही ईश्वर आणि प्रेषितांच्या विरुद्ध कारवाया करण्याचेच केंद्र बनता कामा नये आणि एवढेच नव्हे तर मस्जिद ही मुस्लिमांदरम्यान फूट पाडण्याचे केंद्रसुद्धा बनता कामा नये.
दुसरी महत्त्वाची घटना ही घडली की, इस्लामी शासनाने जकातव्यवस्था स्थापन केली. हिजरत (मदीना स्थलांतर) च्या नवव्या वर्षी मुहर्रम महिन्याची पहिलीच तारीख उगवली असताना संपूर्ण मानवतेचे हितेषी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी देशभर जकात वसुलीची विधिवत वसुलीची व्यवस्था लागू केली. हा महिना म्हणजे जकात (जण कल्याण कर) च्या वसुलीचे स्मरण करून देणारादेखील आहे. जवळच्या आणि दूरवरच्या विविध कबिल्यांकडे जकात वसुलीप्रतिनिधी पाठविण्यात आले. या वसुलीप्रतिनिधींना जमा करून प्रेषितांनी आदेश दिला की, लोकांच्या संपत्तीतून उत्तम प्रतीचा माल गोळा करावा.
या ठिकाणी ही बाब स्पष्ट करणे आवश्यक ठरते की, एकेश्वरवादाच्या मुळावर आधारलेले इस्लामी शासन हे पारलौकिक यशाबरोबरच मानवाच्या रोजीरोटीचा प्रश्नसुद्धा सोडविते. अंतःकरणाच्या पावित्र्याबरोबरच पोटापाण्याची समस्यासुद्धा सोडविते. आजच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास ही बाब अत्यंत प्रखरतेने जाणवते की, रोजीरोटीविना श्रद्धा अथवा ईश्वरी मार्गदर्शनापासून वंचित असलेल्या निधर्मी सत्तेमुळे जग किती भयंकर संकटात सापडलेले आहे. ऐहिक आणि सामाजिक समस्यांना डावलून होणारी ईश्वरभक्ती, तसेच रोजीरोटी सोडविणारी किवा रोजीरोटीच्या वैध अधिकारांचा विसर पाडणारी श्रद्धा म्हणजेच एक अतिशय विषम आणि असंतुलित व अनैसर्गिक बाब होय. अशा बाबींना इस्लाम धर्मात कोणतेच स्थान नाही.
सुरुवातीस ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एकाच ईश्वराच्या उपासनेचा प्रचार केला, त्यात नमाज पढण्याबरोबरच दुर्बलजणांना भोजन देण्याचासुद्धा प्रचार केला. अर्थातच दीनदुबळ्यांच्या पोटापाण्याची समस्या सोडविल्याशिवाय एकेश्वरवादाचा हेतूच मुळी पूर्ण होत नाही. हेच दानधर्म पुढे चालून अनिवार्य करण्यात आले आणि याचेच नाव ‘जकात’ असे होय. कारण याच जकातीच्या अर्थसाह्यावर दीनदुबळ्यांच्या आणि पददलितांच्या सर्व समस्यांचे समाधान होते. म्हणूनच इस्लामी शासनाने ही व्यवस्था सुरु केली. जकातीची मात्रा, प्रमाण व दर निश्चित करण्यात आले, जेणेकरून प्रत्येक सधन व्यक्तीकडून रोकड आणि अन्नाची ठराविक मात्रा घेऊन आर्थिक दुर्बल, निराधार आणि पददलितांना जणांना देण्यात यावी.
वास्तविक पाहता इस्लामी समाजाची व्यवस्थाच बंधुभावावर आधारलेली आहे आणि इस्लामी अर्थव्यवस्थेस आपण ‘आर्थिक भातृत्व’ असे म्हणू शकतो. प्रत्येकाच्या पडत्या अवस्थेत त्याला हात देऊन आणि जीवनाच्या शर्यतीत मागे पडणार्याला हात देऊन पुढे आणण्याची व्यवस्था म्हणजेच ‘जकात’ होय.
एका कबिल्याने या प्रसंगी जकात वसूल करणारे ‘माननीय बिशर(र)’ यांना विरोध करताना म्हटले की, ‘‘ईश्वराची शपथ! येथून एक उंट ही हलू देणार नाही.’’ प्रेषितांना या घटनेची खबर मिळताच पन्नास जणांच्या तुकडीसह ‘माननीय उऐना बिन हिसन(र)’ यांना पाठविले. ‘माननीय उऐना(र)’ यांनी तेथील अकरा पुरुषांना व २१ स्त्रियांना अटक करून प्रेषितांसमोर हजर केले. शेवटी ‘तमीम’ कबिल्याचे प्रतिनिधी मंडळ प्रेषितांना भेटण्यासाठी आले आणि त्यांच्या घरासमोर ओरडून म्हणू लागले,
‘‘हे मुहम्मद(स)! बाहेर या! आम्ही तुमच्याबरोबर कविताशास्त्रात स्पर्धा करु इच्छितो, पाहू या कोण जिकतो ते!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे तर सभ्यता आणि शिष्टाचाराचे आदर्श आणि अग्रदूत होते. प्रेषितांशी असे हे असभ्यवर्तन ईश्वरास नाराज करणारे होते. त्यामुळे ‘सूरह-ए-हुजरात’च्या क्रमांक ४ आणि ५ च्या आयती अवतरल्या. मग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) घरातून बाहेर आले. माननीय बिलाल(र) यांनी जुहरची (दुपारच्या नमाजची) अजान दिली. नमाज आटोपल्यावर प्रेषितांनी मस्जिदीच्या अंगणात येऊन प्रतिनिधी मंडळास येण्याचे कारण विचारले. मंडळाने उत्तर दिले, ‘‘आम्ही आमचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आलो आहोत!’’ (अशा प्रकारे श्रेष्ठत्व सिद्ध करणे हे अरब संस्कृतीचा एक भाग होता.) ‘तमीम’ कबिल्याने आपल्या वाडवडिलांचे गुणगान केले. त्यांच्या उत्तरादाखल प्रेषितांकडून ‘माननीय साबित बिन कैस(र)’ यांनी आपल्या वंशाचे गुणगान न करता ईश्वराचे महिमत्व वर्णन केले आणि प्रतिनिधी मंडळाच्या ‘अकरा बिन हाबिस’ने म्हटले की, ‘‘खरोखरच आमच्या कवी आणि वक्त्यांपेक्षा प्रेषितांचे कवी आणि वक्ते जास्त पारंगत आहेत. वंशश्रेष्ठत्वापेक्षा त्यांनी ईश्वरमहिमेचे गुणगान वर्णन केले!’’ आणि मग या संपूर्ण प्रतिनिधी मंडळाने इस्लाम स्वीकारला. प्रेषितांनी त्यांच्या सर्व कैद्यांना सोडून दिले.

मा. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की, एक माणूस आला व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जवळ बसुन प्रश्न विचारला की, ‘‘हे ईश्वराच्या प्रेषिता! इस्लाम काय आहे? प्रेषितांनी (स.)  यांनी सांगितले, ‘‘ईश्वराच्या उपासनेत कोणाला सामिल करू नये, नमाज प्रस्थापित करावी, ईशमार्गात संपत्ती खर्च करावी, पवित्र रमजानचे रोजे (उपवास) ठेवावेत.’’
प्रेषितांचे उत्तर ऐकून त्याने विचारले की, ‘‘इमान (श्रद्धा) काय आहे’’? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ईश्वर एकच आहे, यावर दृढ असणे, मृत्यूनंतर पुर्नजिवित होण्यावर  विश्वास ठेवणे, आणि जे काही जगांमध्ये घडले ते सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार व त्याच्याच निर्णयानुसार घडते, यावर विश्वास ठेवणे होय.’’ मग त्याने तिसऱ्यांदा प्रश्न केला की  ‘‘एहसान काय आहे?’’ यावर प्रेषितांनी सांगितले, ‘एहसान’ हे आहे की तुम्ही ईश्वराचे असे भय बाळगा की, तुम्ही ईश्वरास पाहात आहात किंवा तुम्ही जरी त्यास पाहु शकत नसाल तर तो मात्र तुम्हाला निश्चितच पाहत आहे’’? यावर तो म्हणाला, ‘‘कयामत  (प्रलयकाळ) केव्हा येईल?’ यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे तुम्हाला हे माहित  नाही, त्याचप्रमाणे मला पण कयामतची निश्चित वेळ माहित नाही. मात्र मी तुम्हाला त्याची काही पुर्नलक्षणे सांगतो. जेव्हा तुम्ही पहाल की, स्त्री आपल्या स्वामीची आई बनेल. जेव्हा  तुम्ही पहाल की, अनवाणी पायी चालणारे, नागवे शरीर ठेवणारे, मुके व बहिरे लोक शासनकर्ते होतील. आणि पशुपालन करणारे उंच-उंच इमारती उभी करण्यात एक दुसऱ्यांशी स्पर्धा करतील. ही कयामत (जग नष्ट होण्याचा दिवस) ची लक्षणे आहेत. (हदीस : बुखारी व मुस्लीम)

भावार्थ- ‘इमान’चा शब्दश: अर्थ विश्वास व भरवसा आहे. ‘इस्लाम’चा अर्थ, ‘‘स्वत:ला ईश्वराच्या स्वाधीन करणे’’ असा आहे. ‘एहसान’चा अर्थ ‘एखादे कार्य कौशल्यपूर्ण व व्यवस्थितरित्या पूर्ण करणे. एखादा माणूस ईश्वराचा उत्तम आणि ईशपरायणदास कसा होऊ शकतो? शुद्ध आचरण आणि शुद्ध अंत:करणाची संपत्ती केवळ अशाच स्थितीत मिळू शकते  की माणसांवर प्रत्येक वेळी ही कल्पना आरुढ असावी की, जणू तो ईश्वराला पाहात आहे, त्याचे अस्तित्व नेहमीच व प्रत्येक वेळेस ईश्वराच्या दृष्टीत आहे, इतके मनोसामर्थ्य नसेल  तर किमान असे समजावे की ईश्वर त्याला पाहात आहे. तात्पर्य हे की तुम्ही स्वत:ला ईश्वरासमोर हजर समजावे अथवा ईश्वराला नेहमी आपल्याजवळ हजर असण्याचा विश्वास असावा. याशिवाय कोणत्याही सत्कार्याला परिपूर्णत: येत नाही. स्त्रीचे आपल्या स्वामीची माता होण्याचा अर्थ म्हणजे पत्नी आपल्या पतीची अवज्ञा करील. दासी आपल्या स्वामीवर प्रभुत्व गाजविल. मुले आपल्या पित्याच्या डोक्यार बसतील - (डोईजड होतील) आणि प्रत्येक धाकटा आपल्या थोरांचा (ज्येष्ठांचा) आदर-सन्मान करणार नाही, हे एक लक्षण झाले. दुसरे  लक्षण असे की, संस्कृती व सभ्यता नसलेल्या आणि बुद्धिमत्ता व आकलनक्षमतांचा अभाव असलेल्या लोकांच्या हाती जमीनीची सत्ता येईल. संपत्तीच्या अवास्तव रेलचेलीमुळे उंचच  उंच व भव्य इमारती बांधण्यात अमाप संपत्तीचा वापर होईल, आणि उंच इमारती बांधण्यामध्ये स्पर्धा होईल. जेव्हा ही लक्षणे प्रकट होतील तेव्हा असे समजावे की, ‘‘कयामत (जग  नष्ट होण्याची वेळ) जवळ येऊन ठेपली आहे. मात्र कयामतची निश्चित वेळ सर्व शक्तिमान ईश्वराखेरीज कोणालाही माहित नाही.

मक्कामधील कुरैशजणांच्या सामरिक शक्तीची पाळे-मुळे सभोवतालच्या परिसरात ‘हकाजन’ आणि ‘सकीफ’ परिवारांपर्यंत पसरलेली होती. हे दोन्ही परिवार ‘ताइफ’ शहरात होते. या ताइफवासीयांचे मक्कातील कुरैशजणांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आर्थिक बाबतीतही त्यांचे घनिष्ट संबंध होते. अर्थातच या कुरैशजणांच्या सहकारी शक्तींचा नायनाट केल्याशिवाय ‘मक्का’ शहरावरील विजय अपुरा समजण्यात येईल.
त्याचे असे झाले की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी उच्च रणनीतीचा अवलंब अशा प्रकारे केला की, मक्कातील कुरैशजणांवर एवढ्या अचानकपणे ताबा मिळविला की, त्यांना सहकार्यांना मदतीस बोलावण्याची संधीच मिळू दिली नाही.
‘हुदैबिया समझोता’ भंग होण्याची जी कारणे होती, त्याचा जो परिणाम समोर येईल. त्याची चांगलीच जाणीव तिकडे ‘हवाजन’ कबिल्याच्या म्होरक्यांना होती. म्हणून या म्होरक्यांनी संभावित परिणामा निपटून काढण्यासाठी सामरिक शक्ती जमा करण्यास सुरुवात केली होती आणि कबिल्यात दौरा करून मुस्लिम शक्तीविरुद्ध उत्तेजना निर्माण करीत होते. मक्केवर मुस्लिमांच्या विजयाची खबर मिळताच त्यांनी तर आपली संपूर्ण शक्ती एकवटून ‘हुनैन’ आणि ‘औतास’ या ठिकाणी मुस्लिम शक्तीस प्रत्युत्तर देण्यासाठी जमा केली. या प्रसंगी मात्र या सामरिक कारवाईतून ‘काब’ कबिला आणि ‘किलाब’ कबिला विभक्त राहिले. ही खूप मोठी कमतरता होती.
इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या कारवाईची सूचना मिळताच ‘अब्दुल्लाह बिन हदरद अस्लमी(र)’ यांना परिस्थितीची शहानिशा करण्यासाठी पाठविले. त्यांनी गुप्त शहानिशा करून पूर्ण वृत्तान्त प्रेषितांना कळविला.
इस्लामी सेनेचे सर्वोच्च सेनापती आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कुरैशजणांच्या छोट्या शक्तीचा पाडाव करण्यासाठी कमी प्रमाणातच मदीनात रसद आणि हत्यारे जमा केली होती आणि त्याची गरजही पडली नव्हती. मात्र ‘हवाजन’ आणि ‘सकीफ’ कबिल्यांचे प्रकरण तसे मोठे असल्याने प्रेषितांनी तत्काळ व्यवस्था करण्यासाठी ‘अब्दुल्लाह बिन रबिया’कडून ३०,००० दिरहम आणि मक्कावासी सरदार ‘सफवान बिन उमैया’कडून १०० सामरिक कवच आणि हत्यार कर्ज स्वरुपात घेतली.
हिजरी सन आठमध्ये शव्वाल महिन्यात मक्केतून १२ हजारांचे इस्लामी लष्कर रवाना झाले. तिकडे मात्र शत्रू सैन्यानेसुद्धा जोरदार तयारी केलेली होती. परंतु या युद्धात ‘ताइफ’ शहरात रक्तपात होऊ न देता प्रेषितांनी ते शहर तसेत ठेवून त्यांना या गोष्टीची संधी दिली की, तेथील लोकांनी नवीन परिस्थितीवर विचार करून स्वयं भावनेने इस्लामचा स्वीकार करावा. या युद्धानंतर शत्रूपक्षाची मोठी संपत्ती हाती लागली. त्यात २४,००० उंट, ४०,००० शेळ्या आणि कित्येक मन चांदी होती. या संपत्तीचा २० टक्के भाग ‘बैतुलमाल’ (जणकल्याणास्तव सरकारी खजीना) मध्ये जमा करून बाकीची संपत्ती लष्करात वाटण्यात आली.
दिव्य कुरआनने विरोधकांची मने वळविण्याकरिता संपत्ती देण्याचा जो आदेश दिला आहे त्या आदेशानुसार, मक्का शहरातील लोकांना आणि पामरांना संपत्ती वाटप करण्यात आली. कारण मक्का शहरातील पूर्वीचे प्रेषितविरोधी आणि शक्तिशाली सरदारसुद्धा याचकांच्या मागील रांगेत उभे होते. त्यांमध्ये काहीजण प्रेषितांचे जवळचे नातलगसुद्धा होते. एवढेच नव्हे तर ६००० कैदी आपल्या नशिबाच्या निर्णयाची वाट पाहत होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे त्या कैद्यांतर्फे कोणीतरी प्रतिनिधी येण्याची दोन आठवड्यापासून वाट पाहत होते. अद्यापही त्यांना घेण्यासाठी कोणीच न आल्याचे पाहून शेवटी प्रेषितांनी या कैद्यांना सैनिकांच्या स्वाधीन केले की त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी. प्रत्येक सैनिकाने कैद्यांच्या उदरनिर्वाहाची जवाबदारी स्वीकारून त्यांना आपापल्या घरी नेले. तेवढ्यात ‘हलीमा सादिया’च्या कबिल्यातील काही प्रतिष्ठित जणांचे एक प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले आणि त्यातील ‘जुहैर बिन अबी सुर्द’ याने प्रेषितांना कळकळीची विनंती करताना म्हटले की,
‘‘हे मुहम्मद(स)! ज्या महिला आपल्याकडे कैद आहेत, त्यांत तुझ्या मावश्या आणि आत्या आहेत. अरबच्या एखाद्या बादशाहने आमच्या परिवारात दूध पिले असते तर आमच्या त्यांकडून खूप अपेक्षा असत्या. परंतु तुमच्याकडून तर आम्हास खूप जास्त अपेक्षा आहेत.’’ (अरब समाजात त्या काळी आईशिवाय इतर स्त्रियांसुद्धा पैसे घेऊन बाळांना दूध पाजण्याची प्रथा होती. ज्या स्त्रीने ज्या बाळास दूध पाजले, तिलादेखील मातेचा दर्जा देण्यात येत असे आणि तिचा सन्मान करण्यात येत असे. त्यांच्या मुलांना भावंडांचा आणि इतर नातलगांनासुद्धा नातलगांचा दर्जा देण्यात येत असे. ‘हलीमा सादिया’ यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना लहानपणी दूध पाजले होते. म्हणून त्या त्यांच्या माता, बहिणी आणि मावश्या होत्या. म्हणून याच सन्मानाचे संदर्भ देऊन त्यांनी प्रेषितांना विनंती केली होती.)
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांचा सन्मान करून अत्यंत नम्रपणे त्यांना सांगितले की, ‘‘मी स्वतःच वाट पाहत होतो की, कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाईल.’’ मग प्रेषितांनी सर्व कैदी प्रतिनिधी मंडळाच्या स्वाधीन केले. बर्याच कैद्यांना प्रेषितांनी वस्त्रदानसुद्धा दिले. हे कार्य आटोपल्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी मक्का शहरात माननीय अत्ताब बिन उतैब(र) यांना राज्यपालपदी नियुक्त करून मदीना रवाना होण्याची तयारी केली.
‘मक्का’ आणि ‘हुनैन’च्या विजयानंतर
वास्तविक पाहता मक्का आणि हुनैनच्या युद्धानंतर इस्लामी क्रांतीच्या विरोधकांचा नायनाट होत होता. त्यांना पळता भुई थोडी झाली होती. काही ठिकाणी उरलेसुरले उपद्रव नष्ट करण्याच्या छोट्याछोट्या कायवाया करण्यात आल्या.
‘तमीम’, ‘खसअम’, ‘किलाब’ आणि जिद्दामधील ‘हब्शी’ कबिल्याच्या दरोडेखोरांना जेर करण्यासाठी मोहीम आखण्यात आली. हिजरी सन नऊच्या ‘रबिउल आखिर’च्या महिन्यात ‘माननीय अली(र)’ यांच्या नेतृत्वात ‘तै’ कबिल्यावर १५० स्वार चढाई करण्यासाठी पाठविण्यात आले. या लष्करास आदेश देण्यात आले होते की, तेथील मोठेमोठ्या मूर्तीगृहांना जमीनदोस्त करण्यात यावे. मदीनाचे आस्थापूर्ण व हेतूपूर्ण राज्य हे आस्था आणि धर्मस्वातंत्र्य बिगरमुस्लिमांना तर देऊ शकत होते. परंतु मूळ तत्त्वांशी अगदीच विरुद्ध असलेल्या प्रतीक आणि संस्थांचे अस्तित्व मुळीच सहन करू शकत नव्हते. कारण याच विभूतींच्या श्रद्धांना बळी पडून लोक उत्तेजित होऊन इस्लामी शक्तींशी लढाया लढत आणि आतंक माजवीत असत. असे कोणतेही कारण नव्हते की, अज्ञानीजण मूर्तीगृह आणि अनेकेश्वरवादाने आणि अंधविश्वासाने भरलेल्या व्यवस्थांना समानांतर स्वरुपात चालू दिले जावे. या विभूती आणि देवतांच्या मूर्ती मुळात एका असत्य जीवनव्यवस्थेचे प्रतीक बनले होते आणि या प्रतिकांना नष्ट करणे खूप आवश्यक होते. ‘तय’ हा कबिला मूर्तीपूजेच्या भावनांच्या आहारी जाऊन मदीना शहरावर हल्ला करण्याची तयारी करीत होता. ‘आदी बिन हातिम’ याने या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वार्या आणि सामरिक हत्यारांची व्यवस्था केली होती.
माननीय अली(र) यांनी ‘कुल्स’ या ठिकाणी पोहोचून सकाळीसकाळीच हल्ला चढविला आदि बिन हातिम याने जीव मुठीत धरून पळ काढला. प्रतिवादी पक्षाने आत्मसमर्पण केले. कैदी, पशु आणि हत्यार इस्लामी लष्कराच्या ताब्यात आली. कैद्यांमध्ये ‘आदी बिन हातिम’ ची वृद्ध बहीणसुद्धा होती. त्यांनी प्रेषितांना मुक्त करण्याची विनंती केली. आदरणीय प्रेषितांनी त्या वृद्ध स्त्रीचा पूर्ण सन्मान करून परत पाठवून दिले. त्यांनी आपले बंधु ‘अदी बिन हातिम’ यास सांगितले की, ‘मी मदीना शहरात आपल्या पित्याप्रमाणे अर्थात ‘हातिमताई’ प्रमाणेच दया, कृपा आणि दानशीलतेचे दृष्य पाहिले आहे. तू मुहम्मद(स) यांच्याशी लढण्याचा विचार सोडून दे आणि तेथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घे. बहिणीच्या सांगण्यावरून ‘आदि बिन हातिम’ तत्काळ प्रेषितदरबारी हजर झाला आणि इस्लाम धर्म स्वीकारला.

- मुहम्मद फारुक खान
    या पुस्तकात काही लेख व प्रश्नोत्तरांचा संग्रह आला आहे. याचा मूळ उद्देश इस्लामची मूळ शिकवण व त्याच्या सत्याचे वास्तविक रूप समजावून सांगणे आहे.
    मनुष्य जीवन ईश्वरालाच अर्पण आहे, मुक्तीची साधनं, रोजा (उपवास) मनुष्य जीवनासाठी वरदान, इस्लाम एक समाज शास्त्रीय विवेचन इ. विषयांचा समावेश आहे ज्यामुळे वाचकास चेतना व बळ प्राप्त होवून योग्य दृष्टिकोन बनतो.

आयएमपीटी अ.क्र. 96    -पृष्ठे - 32     मूल्य - 12      आवृत्ती - 2 (2012)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/gangie0nv44yvfjkqogi5sny9zzcw34b

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget