Latest Post

जगात जितके धर्म आहेत. त्यातील प्रत्येक धर्माचे नामकरण एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावरून केले गेले आहे. अथवा ज्या जातीत व ज्या राष्ट्रात त्या धर्माचा जन्म झाला त्याच्यावरून केले गेले आहे. उदाहरणार्थ धर्माचे नाव, येशू ख्रिस्तांशी निगडीत असलेल्या कारणाने ‘ख्रिश्चन’ धर्म असे केले गेले आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध होते, म्हणून त्यांच्या नावावरून त्या धर्माचे नाव ‘बौद्ध’ धर्म असे ठेवले गेले. झरतुष्ट्र धर्माचे नाव, त्याचे संस्थापक ‘झरतुष्ट्र’ यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. यहुदी (ज्यू) धर्म हा ‘यहुदा’ नामक एका विशिष्ट वंशात जन्मला म्हणून त्या धर्माचे नाव यहुदी धर्म असे ठेवले गेले. अशीच अवस्था अन्य धर्माच्या नावासंबंधी आहे. परंतु ‘इस्लाम’ चे वैशिष्ट्य असे आहे की, त्याचे नामकरण कोणत्याही व्यक्तीशी अथवा जाती अगर वंशाशी संबंधित नाही उलट त्याचे नामकरण एक विशिष्ट गुण प्रकट करते. या गुणाचा अविष्कार ‘इस्लाम’ शब्दाच्या अर्थामध्ये आढळतो. हे नामकरण स्वतःच असे स्पष्ट दर्शविते, की ते कोणाही व्यक्तीच्या बुद्धीची निपज नाही. तसेच कोणाही एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही. त्याचा संपर्क कोणाही व्यक्तीशी, देशाशी भूभागाशी अथवा जातीशी नाही. जनमानसात ‘इस्लाम’ चा गुणधर्म निर्माण करणे हाच त्याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात व प्रत्येक जातीत व वंशात ज्या सज्जन व सद्वर्तनी लोकांमध्ये हा गुण आढळून आला ते सर्व मुस्लिम होते. मुस्लिम आहेत व पुढेही ते मुस्लिम असतील.

‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ
अरबी भाषेत ‘इस्लाम’ शब्दाचा अर्थ संपूर्ण आत्मसमर्पण व संपूर्ण शरणागती तसेच आज्ञापालन असा आहे. (‘इस्लाम’ शब्दाचा दुसरा अर्थ, शांती, कुशलता, संरक्षण, शरण इ. मनुष्याला वास्तविक शांती त्याचवेळेस प्राप्त होते, जेव्हा तो स्वतःला अल्लाहपुढे अर्पण करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनशांती प्राप्त होते आणि समाजात खरी शांती नांदू लागते.) अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसार आचरण हाच इस्लाम आहे व म्हणूनच या धर्माचे नाव ‘इस्लाम’ असे ठेवले गेले आहे.

- वहीदुद्दीन खान
    मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती? उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला हजर व्हावे लागणार आहे. या वास्तवतेशी आज मनुष्य गाफिल बनला आहे.
    मनुष्याने जीवनाची वास्तवता जाणून घेतली तर विद्यमान जगातील नव्हे तर पारलौकिक जीवनाची खरी समस्या तो जाणून घेईल, हेच सत्य या पुस्तकांत आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 108    -पृष्ठे - 16    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/f8rw0o2iz06bhjs2zhza13ue9u78nazq


जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांची निवड नुकतीच झाली. त्यांचा जन्म 1973 चा असून, ते इले्नट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर  आहेत. त्यांची स्वतःची एक संगणक कंपनी आहे. त्यांना इस्लामची अत्यंत चांगली समज असून, आत्तापर्यंत त्यांनी 12 पुस्तके आणि 200 पेक्षा जास्त लेख उर्दू आणि इंग्लिशमध्ये  लिहिलेले आहेत.
या पदावर निवड होण्यापूर्वी ते जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी ते स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते बोर्ड ऑफ ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन  दिल्लीचे सदस्य असून, सेंटर फॉर स्टडी अँड रिसर्च दिल्लीचे संचालक आहेत. इदारतुल तहेकीक व तसनीफ-ए-इस्लामी अलिगढचे ते आजीवन सदस्य असून, इस्लामिक अ‍ॅकॅडमिक ट्रस्ट  दिल्लीचे विश्वस्त आहेत. शिवाय, बोर्ड ऑफ इस्लामिक पब्लिकेशन दिल्लीचे सदस्यही आहेत. शिवाय, एडिटोरियल बोर्ड ऑफ तसनीफी अ‍ॅकॅडमी, एमएमआय पब्लिशर्स दिल्लीचे सदस्य  असून, अ‍ॅडव्हायझरी बोर्ड जमियतुल फलाह आजमगढचे माजी सदस्य राहिलेले आहेत. ते आपल्या लेखन शैली आणि विचारपूर्ण भाषणांसाठी इस्लामी जगतामध्ये परिचित आहेत. त्यांची  ही निवड 4 वर्षासाठी म्हणजे 2023 पर्यंत झालेली आहे. अगदी साधी राहणीमान आणि विनम्रतेने परिपूर्ण व्यक्तीमत्व असलेले हुसैनी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी प्रसिद्ध आहेत.  भारतीय इस्लामी जगतात अंत्यत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पदावर निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होतोय. जमाअतच्या देशभरातील सदस्यांनी मतदान करून  निवडून दिलेले प्रतिनीधी दर चार वर्षांनी अमीर (अध्यक्ष) निवडत असतात. जमाअतची ही लोकशाहीजन्य इस्लामी पद्धतही कौतुकास्पद आहे.

जमाअते इस्लामीच्या अध्यक्षांची निवड कशी होते?
जमाअते इस्लामी हिंदची स्थापना ऑगस्ट 1941 मध्ये अखंड भारत असताना लाहौर येथे झाली. देशाच्या फाळनीनंतर 1948 साली जमाअते इस्लामी हिंद नावाची स्वतंत्र संघटना अस्तित्वात आली जिचा जमाअत-ए-इस्लामी पाकिस्तानशी कुठलाच संबंध नाही. जमाअतए- इस्लामी हिंदचे पहिले अध्यक्ष अबुलैस इस्लाही नदवी हे होते. आतापावेतो या संघटनेचे पाच  अध्यक्ष झालेले असून, मागच्या आठवड्यात मौलाना जलालुद्दीन उमरी यांच्या ठिकाणी तरूण अभियंते व जमाअतचे उपाध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड कशी होते? याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. लोकांना वाटते की, इतर संघटनांच्या निवडीप्रमाणेच या संघटनेध्येही काही लोक अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल   करत असतील, उमेदवार जोरदार प्रचार करत असतील आणि शेवटी त्यावर मतदान होऊन अध्यक्षाची निवड होत असावी. मात्र असा काही प्रकार येथे होत नाही. जमाअत-ए-इस्लामी  हिंद हिची व्यवस्था शुराई निजाम म्हणजे एकमेकांच्या सल्लामसलतीने चालणाऱ्या व्यवस्थेवर अवलंबवून आहे. जी की पूर्णपणे देशाच्या घटनेच्या आधीन काम असून नोंदणीकृत  संघटना आहे. जमाअत-ए-इस्लामीचे जवळ-जवळ 12 हजार पेक्षा अधिक सदस्य भारताच्या 20 मोठ्या राज्यात आहेत. 31 मार्च 2019 रोजी मागच्या अध्यक्षांची 4 वर्षांचा कार्यकाळ  संपला होता. पुढील अध्यक्षांच्या निवडीसाठी देशभरातून मजलिस-ए-नुमाईंदगान (प्रतिनिधी सभा)चे 157 सदस्य दिल्लीत जामिया नगरमधील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुख्य  कार्यालयात 1 एप्रिलपासूनच जमा झाले होते. त्यांची निवड याआधीच झालेली होती. प्रतिनिधी सभेच्या सदस्यांची निवडसुद्धा फेब्रुवारी 2019 मध्ये झाली. यांची निवड दोन टप्प्यामध्ये  झाली.
पहिल्या टप्प्यामध्ये जमाअते इस्लामीच्या प्रत्येक सदस्याने आपल्या पसंतीच्या राज्याबाहेरील सदस्याचे नाव सुचवायचे असते व दूसऱ्या टप्प्यात स्वतःच्या राज्यातील पसंतीचे नाव  सुचवायचे असते. यात स्वतःचे नाव सुचविता येत नाही. जमाअते इस्लामी हिंदचे वैशिष्ट्ये असे की, या संघटनेमध्ये कोणत्याही पदासाठी कोणालाही स्वतःचे नाव सुचविता येत नाही किंवा त्यासाठी लॉबिंग करता येत नाही. तसे काही आढळून आल्यास तात्काळ त्या सदस्याची संघटनेतून हकालपट्टी केली जाते.
दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर प्रतिनिधी सभेचे सर्व सदस्य दिल्ली येथे जमा झाले. प्रतिनिधी सभा ही जमाअते इस्लामी हिंदची सर्वात मोठी आणि प्रभावशाली सभा असते. या  सभेच्या सदस्यांना अमीरे जमाअतच्या निवडीचे व त्यांना काढून टाकण्याचे सुद्धा अधिकार असतात. शिवाय, चार वर्षाच्या काळामध्ये जमाअतची ध्येय धोरण ठरविणे तसेच कामाचे नियोजन करणे हे अधिकार याच प्रतिनिधी सभेला असतात. यावर्षी 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 157 सदस्यांनी आपसात विचारविमर्श  करून अनेक नावांपैकी सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केली. येथेही सआदतुल्लाह हुसैनी यांनी स्वतःला अध्यक्ष करावे म्हणून नामांकन  दाखल केले नव्हते किंवा लॉबिंगही केलेली नव्हती. उलट ही जबाबदारी मला नको, असे ते म्हणत होते. उपस्थित 157 सदस्यांपैकी काही सदस्यांनी काही लोकांची नावे या पदासाठी  सुचविली होती. त्यावर ज्यांची नावे या पदासाठी सुचविली गेली होती. त्यांना बैठकीत सामील न करता त्या सर्व नावावर प्रतिनिधी सभेमध्ये सखोल चर्चा झाली. जमाअतच्या  संविधानाप्रमाणे अध्यक्षामध्ये जी गुणवत्ता हवी ती सुचविल्या गेल्या लोकांपैकी कोणामध्ये जास्त आहे. त्यांची बलस्थाने कोणती आहेत इत्यादीवर सखोल चर्चा झाली व त्यानंतर  सआदतुल्ला हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड मजलिसे नुमाईंदगान ने एकमताने 7 एप्रिल रोजी केली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्षपद तर सोडा साध्या सदस्यात्वासाठीही जर कोणाची निवड करायची असेल तरी त्याचे चारित्र्य तपासले जाते, त्याचे व्यवहार तपासले जातात व  जमाअतच्या संविधानाच्या कलम 8 आणि 9 प्रमाणे त्याचा दर्जा आहे काय, हे पाहिले जाते. जमाअतचे सर्व व्यवहार पारदर्शक आणि काटेकोरपणे केले जातात.

हमारा काम ही दुश्मन से प्यार करना है
जमाने भर को दिया दर्स-ए-दोस्ती हमने
श्रद्धा आणि वर्तनाच्या आधारे जर का माणसांचे वर्गीकरण केले तर साधारणपणे तीन प्रकारची माणसं असतात. एकप्रकार अशा माणसांचा असतो की ज्यांना कुठलीच बंधने मान्य  नसतात. व्यक्ति स्वातंत्र्य हीच त्यांची विचारसरणी असते. प्रत्येक बाबतीत त्यांची स्वतःची अशी मतं असतात. असे लोक प्रचंड बुद्धी प्रामाण्यवादी असतात. कोणताही निर्णय ते  आपल्या बुद्धी प्रमाणे घेतात. त्यांना स्वतःच्या बुद्धीवर प्रचंड विश्वास असतो. अशा लोकांना कुठल्याही धर्माची बंधने आवडत नाहीत. स्वतःला एथिस्ट (नास्तीक) म्हणवून घेतांना त्यांना कोण कौतूक वाटतं.
दुसऱ्या प्रकारची माणसे एखाद्या धर्माला जरूर माणतात. परंतु धर्माचरणामध्ये स्वतःच्या बुद्धीलाच प्रमाण माणतात. जी धार्मिक बंधने त्यांच्या बुद्धीला पटतात त्या बंधनाची ते  अंमलबजावणी करतात जी पटत नाहीत त्यांचा ते विरोध करतात. त्यांची स्वतःची अशी जीवनशैली असते. त्यानुसार ते जगत असतात. त्यांच्यात काही प्रमाणात धार्मिकता तर काही प्रमाणात धर्म विरोध दोन्ही असतात. एकंदरित ते धर्माप्रमाणे चालत नाहीत तर धर्माला आपल्या प्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करत असतात.
तीसऱ्या प्रकारचे लोक स्वतःच्या बुद्धीचा अजीबात वापर करत नाहीत तर वाडवडिलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जीवन जगत असतात. त्यांना दुसऱ्यांचे अंधानुकरण करतांना काहीच वाईट  वाटत नाही उलट अभिमान वाटतो.
पहिल्या प्रकारची माणसे स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतेही योग्य नियंत्रण सुद्धा नाकारतात. स्वैराचाराला सुद्धा स्वातंत्र्य समजण्याइतपत काहींनी प्रगती (?) साधलेली असते. त्यांना ही  गोष्टच मान्य नसते की विचार आणि वर्तनाच्या स्वातंत्र्यावर थोडी तरी बंधने असावित. मग अशा प्रकारची माणसं जेव्हा सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडतात तेव्हा अनियंत्रित होऊन  समाजाला हानी पोहचविण्यास सुरूवात करतात.
जी माणसं प्रत्येक बाबतीत स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात, आपल्या विचारांनाच सर्वश्रेष्ठ समजतात व त्यानुसारच आचरण करतात. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीप्रमाणेच सोडविण्याचा आग्रह धरतात. दूसऱ्यांच्या विचारांना काडीची किमत देत नाहीत. अशा माणसांचा असा समज असतो की त्यांना जगातल्या साऱ्या गोष्टी कळतात. त्यांच्या बुद्धीच्या वर  कुठलीच गोष्ट नाहिये. त्यांना प्रत्येक गोष्टींचा बारिक सारिक तपशील, आरंभ आणि अंत सर्व काही माहित आहेत. अशा अविर्भावात ते जगत असतात. आपण कुठल्याही परिस्थितीचे  विश्लेषण करून त्याचे अचूक निदान करू शकतो, यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. आपण धर्मचिकित्सा करू शकतो, त्यातील क्लिष्ट गोष्टी सुद्धा आपणास समजतात. प्रत्येक  मार्गाचा शेवट आपल्याला तसाच माहित आहे जसा त्याचा आरंभ. अशा पद्धतीने जगणाऱ्या माणसांचे विचार जेव्हा त्यांच्या स्वतःच्या धर्मातील कांही संज्ञाशी जुळत नाहीत, तेव्हा असे  लोक त्या संज्ञाच बदलून त्या आपल्या विचारानुरूप करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. कुरआनमध्ये बनी इसराईल नावाच्या ज्या लोकसमुहाचा उल्लेख केलेला आहे ते लोक असे  करण्यात तरबेज होते. कुरआन अशा लोकांना मुनाफिक (पाखंडी) असे म्हणतो. धर्माविरूद्ध बंड करण्याइतपत धाडस त्यांच्यात नसते म्हणून ते धर्मात राहून त्याच्या विरूद्ध आचरण करत असतात.
तिसऱ्या वर्गातील लोक तर बौद्धिकरित्या दिवाळखोर असतात. आपल्या घराण्या किंवा समुदायाच्या चालीरितींची डोळे झाकून अंमलबजावणी करीत असतात. त्यातील उघड हानी सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. पहिल्या दोन वर्गातील लोक किमान बुद्धीचा बरा-वाईट कसा का असेना वापर तरी करत असतात. पण या तिसऱ्या वर्गातील माणसे तर चक्क बुद्धी गहाण  ठेवल्यागत वागत असतात. त्यांच्या एवढे सुद्धा लक्षात येत नाही की भुतकाळातील सर्वच रूढी ह्या योग्य नसतात. आजच्या काळात मोठ्या संख्येने जी माणंसे ज्या प्रमाणे वागत  आहेत ते सुद्धा सगळे योग्यच आहेत, असेही नाही. हंसक्षीर न्यायाने त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन वाईट गोष्टींचा त्याग करावा हे सुद्धा त्यांच्या गावी नसते. यांची सर्वात मोठी चुकी  ही की हे लोक अकलेचा वापरच करत नाहीत.
म्हणजे गंमत पहा, पहिल्या दोन वर्गातील लोक बुद्धीचा क्षमतेपेक्षा अधिक वापर करतात तर तिसऱ्या गटातील लोक तिचा वापरच करत नाहीत. केवळ परंपरांचे अनुकरण करत  असतात. बुद्धीच्या दिवाळखोरीचे यापेक्षा मोठे उदाहरण ते कोणते? असे लोक म्हणत असतात की, आम्ही असे यासाठी वागतो की ही आमची वाडवडीलांपासून चालत आलेली परंपरा  आहे. किंवा असे म्हणतात की अमुक लोकांनी असे वागून प्रगती सधलेली आहे म्हणून आम्ही सुद्धा असेच वागतो. या काळात हे लोक सत्तेवर आहेत म्हणूनच ते योग्य आहेत. म्हणून  आम्ही सुद्धा त्यांच्या सारखेच वागतो. असे समजणे सुद्धा बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण होय. त्यांच्याकडे स्वतःचे असे कोणतेच एकक नाही की जे चांगले-वाईट, खरे-खोटे यात फरक करू  शकेल. ते समाजा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कुठल्यातरी घराण्यात जन्मले असते तर त्यावरच ते आपला जीव ओवाळून टाकणार. योगयोगाने त्यांच्या काळात ब्रिटीश सत्तेवर  असतील तर ते ब्रिटिशांप्रमाणे वागणार, चिनी सत्तेवर असतील तर चिन्यांसारखे वागणार व त्यांच्या चालीरितीने श्रेष्ठ समजणार किंवा एखादा आफ्रीकण गट सत्तेवर असेल तर हे  आफ्रिकन चालीरितींना स्वतःच्या साठी श्रेष्ठ समजणार कारण यांचे स्वतःचे असे काही मतच नाही. मुळात कुठल्याही गोष्टीला श्रेष्ठ समजण्यासाठी हा युक्तीवाद होऊच शकत नाही के  ती आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली गोष्ट आहे किंवा जगात आजकाल असेच होत आहे. जगात तर यापूर्वी ही फार काही झालेले आहे, आजही होत आहे, म्हणून ते सगळेच  चांगले आहे? असे नाही. आपले काम त्यांचे अंधानुकरण करणे नाही. अल्लाहने बुद्धी यासाठी दिलेली आहे की चांगले आणि वाईट त्यातील फरक माणसाने करावा. हे काम बुद्धी अगदी  चांगल्या प्रकारे करू शकते. कुणामागे जाण्यापूर्वी त्याला चांगल्या प्रकारे पारखून घेणे की तो आपल्याला कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे? हे कामही बुद्धि चांगल्या प्रकारे करू शकते.

इस्लामच्या दृष्टीने श्रेष्ठ कोण?
इस्लाम वर नमूद तीन्ही प्रकारच्या माणसांना नाकारतो. पहिल्या वर्गाबद्दल इस्लामचे म्हणणे आहे की या वर्गातील लोक कुणाचेच मार्गदर्शन स्वीकारत नाहीत. त्यांचे असे मत आहे की,  त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की ते जगातील सर्वच गोष्टी स्वतः च्या बुद्धीच्या बळावर समजू शकतात. त्यांचे उदाहरण अशा लोकांसारखे आहे की जे अंधारामध्ये केवळ अंदाजावरून  चालत आहेत. शक्य आहे की ते, सरळही जाऊ शकतात व हे ही शक्य आहे की ते एखाद्या खड्ड्यात जाऊन पडू शकतात. कारण अंदाजावर मार्गक्रमण करणे कधीही विश्वासार्ह ठरू  शकत नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्यता आहेत. किंबहुना वाईट घडण्याचीच जास्त शक्यता आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,

’’जो लोग खुदा के सिवा दुसरों को खुदाई का हिस्सेदार ठहराते और उनको पुकारते हैं जानते हो वो किस चीज के पैरो हैं? वो सिर्फ गुमान के पैरो हैं और महेज अंदाजे पर चलते हैं.’’ (सुरे युनूस)
जेव्हा कुरआन अवतरित होत होते त्याच काळात बनी इसराईल स्वतःला प्रेषित मुसा अलै. यांना पैगंबर तर तौरातला अल्लाहचा ग्रंथ मानत होते. मात्र त्यांचे वर्तन या दोहोंच्या  विरोधात होते. त्या दोहोंच्याही शिकवणीचा अर्थ त्यांनी आपल्या मर्जी आणि सोयीप्रमाणे लावून ईश्वरीय मार्गदर्शनाचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
तिसऱ्या वर्गातील लोकांच्या बाबतीत जे बुद्धिमान असतानाही तिचा उपयोग न करता कोणाचेतरी अनुकरण करतात अशा लोकांना कुरआन खालील शब्दात संबोधतो. ’’ हे बहिरे, मुके  (व) आंधळे आहेत. तेव्हा हे मागे परतणार नाहीत.’’ (सुरे बकरा आयत नं. 18). इस्लाम त्यांना जनावरांपेक्षाही कमी समजतो. कारण जनावरांना तर बुद्धीच नसते. हे लोक तर बुद्धी असूनसुद्धा ती नसल्यासारखे इतरांचे अंधानुकरण करतात. या तिन्ही वर्गातील लोकांची विचारसरणी असंतुलित आहे, असे इस्लामचे म्हणणे आहे. या तीन वर्गाव्यतिरिक्त समाजामध्ये  इस्लाम एक चौथा वर्ग स्थापन करू इच्छितो ज्या वर्गातील लोक संतुलित विचार करणारे, आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करणारे तसेच योग्य मार्गाने जाणारे असतील. आता प्रश्न उत्पन्न होतो की, संतुलित विचार म्हणजे काय? बुद्धीचा संतुलित वापर कशाला म्हणतात? आणि योग्य मार्ग कुठल्या मार्गाला म्हणावे? तर याचे उत्तर असे की, बुद्धी ज्या आणि जितक्या कामासाठी बनविण्यात आलेली आहे, त्या आणि तितक्याच कामासाठी तिचा उपयोग करावा. तिच्यावर अधिक भार टाकला तर ती हँग होते, हे लक्षात घ्यावे. सर्वप्रथम बुद्धिचा  खरा वापर म्हणजे काय, हे ओळखण्यासाठी खालील प्रश्न स्वतः ला विचारावेत. 1. ही सृष्टी कोणी निर्माण केली? 2. ईश्वर एक आहे का अनेक? 3. माणसाला सद्मार्गावर चालण्यासाठी ईश्वरीय मार्गदर्शनाची गरज आहे किंवा नाही? 4. अल्लाह आणि त्याचे प्रेषित (अल्लाह क्षमा करो) खरे आहेत की खोटे? कुरआन  जीवन जगण्याचा जो मार्ग लोकांसमोर मांडतो तो  सरळ आहे का वाकडा?
वरील सर्व प्रश्नांवर सांगोपांग विचार केल्यानंतर जर तुमचे मन साक्ष देईल की, एका ईश्वराला मानने ही बाब तुमच्या प्रवृत्तीत सामील आहे, तुम्हाला खरोखरच असे वाटत असेल की,  सरळ मार्गाने जीवन जगण्यासाठी एक ईश्वरीय मार्गदर्शनाचा प्रकाश आवश्यक आहे आणि तो प्रकाश वेळोवेळी पृथ्वीच्या अनेक भागात पाठविण्यात आलेल्या पैगंबरांनी आणलेला प्रकाश  होय.
जर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पवित्र जीवन आणि वर्तनाचा अभ्यास केल्यानंतर तुमचा असा विश्वास झालेला असेल की, एवढ्या उच्च चारित्र्याच्या माणूस खोटे बोलून जगाला  धोका देणार नाही. त्यांनी अल्लाह एक आहे व स्वतः त्याचे अंतिम प्रेषित असल्याचा जो दावा केलेला आहे तो खोटा असूच शकत नाही. माणसांसाठी योग्य मार्ग हाच आहे. वरील सर्व  प्रश्नांचा वेध घेतांना जी चिकित्सा करावी लागते ती करणे म्हणजेच बुद्धिचा संतुलित वापर करणे होय. एकदा का या सगळ्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केल्यावर विश्वास बसला की,  मग जगाच्या विरोधाची परवा न करता, कोणाचीही भीती न बाळगता, कुठल्याही हानीची तमा न करता हा मार्ग स्वतःसाठी निवडा व ह्याच मार्गावर आपल्या घरातील इतर सदस्य,  त्यानंतर गल्लीतील लोक, त्यानंतर शहरातील, त्यानंतर राज्यातील, त्यानंतर देशातील व शेवटी जगातील सर्व लोक चालतील, यासाठी यथायोग्य, निरंतर आणि आयुष्यभर प्रयत्न करत रहा. व्यापक मानवकल्याण हाच या जीवन पद्धतीचा हेतू आहे, म्हणून इस्लाममध्ये रंग, रूप, नाते संबंध, भाषा, प्रदेश, वंश याला काडीचे महत्व नसून केवळ श्रद्धेला महत्व आहे.  इस्लाममध्ये सर्वांचा दर्जा समान व सर्वांना समान काम दिलेले आहे. एकदा का प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगासमोर मांडलेल्या एक ईश्वर, एक ग्रंथ, एक प्रेषित या विचारांचा तुम्ही स्विकार केला की, तुमच्या बुद्धीचा अनिर्बंध वापर करण्याचा तुमचा अधिकार संपला. आता तुम्हाला कुरआन आणि हदीस यांच्या चौकटीत राहूनच बुद्धीचा वापर करावा लागेल, त्याबाहेर तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला कोणताही निर्णय, कोणताही निवाडा स्वतःच्या मर्जीने करता येणार नाही. तो तुम्हाला अल्लाहच्या मर्जीनेच व प्रेषित सल्ल. यांच्या पद्धतीनेच करावा  लागेल. त्यावर टिका करण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला राहिलेला नाही. आता तुम्हाला तुमच्या बुद्धी कौशल्याचा वापर अल्लाहने दिलेल्या आदेशामागील आणि प्रेषितांनी घालून दिलेल्या पद्धतीमागील कार्यकारणभाव शोधण्यासाठीच करता येईल. मात्र तुमच्या बुद्धिला एखाद्या आदेशामागील कार्यकारणभाव उमजला नाही. तरी तुम्हाला त्या आदेशाच्याविरूद्ध जाता येणार  नाही.
एखादा निर्णय तुमच्या हिताच्या विरोधात जरी जात असेल तरी तुम्हाला विरोध करता येणार नाही. तेव्हा असे म्हणता येणार नाही की अल्लाहचा हा आदेश आमच्या घराण्याच्या किंवा आजकालच्या रीतिरिवाजांच्या विरूद्ध आहे. म्हणून याचे पालन मला करता येणार नाही. जो काही विचार करायचा तो इस्लाम स्विकारण्याच्या पूर्वीच करायचा. एकदा का इस्लाम  स्विकारला की अनिर्बंध विचार स्वातंत्र्याचा अधिकार संपतो व शरियतच्या चौकटीत राहूनच विचार करण्याचे बंधन येते. खरे पाहता बुद्धीला सुद्धा हीच गोष्ट पटते की कुठलाही अधिकार  अमर्याद नसावा मग तो विचार स्वातंत्र्याचा का असेना. जीवनाचा हाच मार्ग इस्लाम आहे आणि या मार्गावर चलणारेच मुस्लिम आहेत. आता प्रत्येक मुस्लिमाने ज्यांनी आपले नाव  आणि धर्म जनगणनेमध्ये मुस्लिम आणि इस्लाम लिहिलेला आहे त्यांनी स्वतः स्वतःचा आढावा घ्यावा की, वर नमूद अटी व शर्तींमध्ये किती बसतो? (संदर्भ : जमाअते इस्लामीचे  संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचा तर्जुमानुल कुरआन नोव्हेंबर 1933 मध्ये प्रकाशित ’मुसलमान का हकीकी मफहूम’ या लेखावर आधारित)

एम.आय.शेख
9764000737

हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे निवेदन आहे की प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तरूणांनो! तुमच्यापैकी जो कोणी निकाहच्या जबाबदाऱ्या उचलण्याचे सामर्थ्य राखतो, 
त्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा नजर खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो. (म्हणजे मानवी नजरेला इतस्तत: फिरविण्यापासून आणि वासनाशक्तीला  बेलगाम होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही, त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधूनमधून रोजे राखावेत. (हदीस : बुखारी,  मुस्लिम)
हजरत अबू हुरैरा कथन करतात की प्रेषित (स.) यांनी सांगितले की, स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो. तिच्या धनसंपत्तीच्या आधारावर, तिच्या वंशिक सभ्यतेच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर, आणि तिच्या दीनधर्माच्या आधारावर. जेव्हा तुम्ही धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्रीला प्राप्त करा, तुमचे भले होवो. (मुत्तफिक अलैया)

भावार्थ
या हदीसवचनाचा अर्थ असा आहे की, स्त्रीच्या संदर्भात चार गोष्टी आढळून येतात. कोणी धनसंपत्ती पाहतो, कोणी वंशप्रतिष्ठेचा विचार करतो, तर कोणी तिच्या रूपसौंदर्यावर भाळून तिच्याशी विवाह करतो. आणि कोणी तिची धर्मपरायणता पाहतो. प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी समस्त मुस्लिमांना ताकीद केली आहे की खरी गोष्टी जी पाहण्याची आहे ती  म्हणजे स्त्रीचे धार्मिक प्रवृत्ती आणि तिची ईशपरायणता. याखेरीज इतर सर्व गुणवैशिष्ट्ये तिच्यात असतील तर अतिशय उत्तम, पण धार्मिकतेला दृष्टीआड करणे आणि केवळ  धनसंपत्ती, तिचे रूपसौंदर्य, तिचा सामाजिक दर्जा, यांच्याच आधारावर विवाह करणे, हे ईमानधारकाचे काम नव्हे. प्रेषितांनी सांगितले की स्त्रियांशी त्यांच्या सौंदर्यामुळे विवाह करू नका.  संभवत: त्यांचे सौंदर्य त्यांचा सर्वनाश करेल. त्यांच्या धनवान असल्यामुळे त्यांच्याशी विवाह करू नका, शक्य आहे त्यांची धनसंपत्ती त्यांना गर्वोन्नमत्त करून टाकील. किंबहुना  धर्माच्या आधारावर त्यांच्याशी विवाह करा. काळ्या रंगाची दासी जर धर्मपरायण असेल तर ती अल्लाहच्या नजरेत गोऱ्या उच्चकुलीन स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे.

हजरत सुफियान सुरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) यांनी आदेश दिला आहे, हे ईमानधारकांनो! अल्लाहचा कोप होण्यापासून आपला बचाव करण्याची पुरेपूर काळजी घ्या.  आणि मरेपर्यंत ईशआदेशांचे पालन करण्यात मग्न राहा. आपल्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून स्वत:चा बचाव करीत राहा. ज्यांनी तुम्हाल एका जिवापासून निर्माण केले आणि  त्यापासून त्याचा जोडा (जीवनसाथी) बनविला. मग त्या दोघांद्वारे अनेक पुरुष व स्त्रिया जगात पसरविले. तेव्हा अशा रचयित्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून भय बाळगत राहा.  ज्यांच्या नावाने तुम्ही आपापसांत एकमेकांजवळ आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेवाईकांच्या हक्कांचीही जाणीव राखा. लक्षात ठेवा अल्लाह तुमच्यावर देखरेख ठेवणार
आहे.
भावार्थ
हा खुतबा (प्रवचन) आहे जो प्रत्येक निकाहच्या प्रसंगी दिला जातो. इथे त्याचा उल्लेख करण्याचा हेतू हे दर्शविणे आहे की निकाह केवळ आनंदोत्सव नव्हे तर तो एक वचनकरार आहे. तो एक पुरुष आणि स्त्री यांच्या दरम्यान ठरविला जातो की आम्ही दोघे जीवनभरचे साथी आणि सहाय्यक बनलो. हा करार करताना ईश्वव आणि उपस्थित लोक दोघांनाही साक्षीदार  बनविले जाते. निकाहच्या खुतब्याच्या आयती या गोष्टीकडे स्पष्ट इशारा करतात की,जर या वचनकरारारत पती किंवा पत्नीकडून एखादा बिघाड निर्माण केला गेला, आणि त्याचे  यथायोग्य पालन केले गेले नाही, तर अल्लाहचा कोप त्याच्यावर कोसळेल. ते जहान्नुमच्या शिक्षेस पात्र ठरतील.

वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः समाजावर अत्यंत वाईट दुःष्परिणाम होत आहेत. समाजातील विचारवंत चिताग्रस्त असून या दुर्गुणापासून वाचण्याचा उपाय शोधत आहेत. स्वयंसेवी संघटना देखील प्रयत्न करीत असून आपल्या कुवतीनुसार उपाययोजना करीत आहेत. शासकीय स्तरावर याला थोपविण्याकरीता कायदे बनविले गेले आहेत. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असून देखील या समस्येचा अंत दृष्टीक्षेपात नाही. ईश निर्मित निसर्ग व्यवस्थेमधील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या गडबडीचे व असंतुलनाचे दुःष्परिणाम मानवाला भोगावेच लागत आहेत.
सर्वप्रथम वाढत्या लोकसंख्येला मुख्य समस्या म्हणून पुढे केले गेले व याच्या निवारणाकरीता ‘‘कुटुंब नियोजन’’ व इतर योजना मांडल्या गेल्या, जन्म नियंत्रणाचे कायदे बनविले गेले. पुढे मागे मग गर्भलिग निर्धारणाचे प्रयत्न व्हायला लागले. विभिन्न उपकरणांद्वारे मातेच्या उदरामधील भ्रूणाचे लिग माहिती करून घेण्याचे प्रयत्न होत असून स्त्री गर्भ असल्यास गर्भपात करविले जात आहेत.
फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हीच परिस्थिती आहे. याचमुळे जागतिक स्तरावर या समस्येविषयी चिता व्यक्त केली जात असून उपाय सुचविले जात आहेत.
जगभरात एकूण लोकसंख्येमध्ये मुलींची व मुलांची सरासरी १००:१०७ आहे. फ्रांसमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज तर्फे आयोजित ऑक्टोबर २००५ मधील सर्वेक्षणानुसार चीनमध्ये सरासरी १०० मुली व १३४ मुले आहेत. हे असेच चालू राहिले तर २०१५ ते २०३० च्या दरम्यान अडीच कोटी नवयुवकांना पत्नी मिळणे अशक्य होईल अशी आशंकाही यामध्ये व्यक्त केली गेली आहे. संन्हुआ संवाद समितीच्या माहितीनुसार सन २००३ मध्ये (चीन) देशातील २४ परगण्यांमध्ये ‘‘राष्ट्रीय लोकसंख्या व कुटुंब नियोजन आयोगा’’ द्वारे ही स्थिती सुधारण्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प राबविला गेला. या योजने अंतर्गत निव्वळ मुली असलेल्या कुटुंबाला रोख रकमेव्यतिरिक्त इतर सामाजिक फायदे पुरविण्याची तरतूद आहे. मागील तीन वर्षापासून या प्रकल्पाअंतर्गत मुली व मुले यांच्यातील तफावत १००:१३३.८ पासून १००:११९.६ पर्यंत घटविण्याचे लक्ष्य ठरविले गेले आहे. हा प्रकल्प आता सर्व राज्यांमध्ये व विभागांमध्ये राबवायची योजना आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ उर्दु १८ ऑगस्ट २००६)
भारतामध्ये दर १० वर्षानी लोकसंख्या मोजली जाते. इ. सन २००१ मध्ये लोकसंख्येने एकशे दोन कोटी सत्तर लाख पंधरा हजार (१,०२,७०,१५,०००) ची संख्या पार केली. यामध्ये एकूण ५३,१२,७७,००० पुरुष व ४९,५७,३९,००० महिला होत्या अशी माहिती दिली गेली. अर्थात १०० पुरुषांच्या तुलनेने ९३ स्त्रीया आहे. इ. सन १९९१ मधील लोकसंख्या सर्वेक्षणाच्या तुलनेने हे अंतर जास्त आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ७ सप्टेंबर २००६)
देशामधील कित्येक राज्यांमध्ये मुलामुलींमधील ही तफावत खूपच जास्त आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेश उल्लेखणीय आहेत. या राज्यांमध्ये १००० मुलांमागे ८०० ते ९०० मुली आहेत. १९९१ च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये १००० मुलांमागे ८७५ मुली होत्या आणि २००१ मध्ये ती तफावत ७९३ वर पोहोचली. याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये १९९१ च्या जनगणनेनुसार १००० मुलांमागे ९४८ मुली होत्या तर २००१ मध्ये ९१७. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ २९ मे २००६)
मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. मुलांच्या तुलनेने मुलींना कनिष्ठ समजले जाते. त्यांच्या अस्तित्वाला माता पिता स्वतःवरील ओझे समजतात. त्यांचे पालन पोषण, त्यांची सुरक्षा, विवाहाबाबतीच्या अडीअडचणी इ. त्यांच्या (पालकां) करिता एक ओझे बनून जाते. या व्यतिरिक्त मुलींच्या बाबतीत अशा नाजुक आणि गंभीर समस्या उभ्या रहात आहेत की, मुलीला जन्माला न घालणेच बरे असे आईवडलांना वाटते.
अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझेच समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका रहात असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळी मध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारु त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे.
‘‘आणि त्यांपैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खूषखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळिमा पसरतो आणि तो रक्ताचा घोट गिळून बसतो. लोकांपासून लपतछपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवायचे, विचार करतो की, अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीमध्ये गाडावे? पहा कसे वाईट निर्णय घेत आहेत.’’ (कुरआन १६ : ५८, ५९)
मुलीपासून सुटका होण्याकरिता इस्लाम पूर्व अरबी टोळ्यांमध्ये काही अमानवी प्रथा खालील प्रमाणे होत्या.
  1. ‘‘प्रसुती समयीच एक खड्डा खोदला जात असे. जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीतच तिला गाडून टाकण्यात येत असे.’’ (इब्ने अब्बास)
  2. ‘‘मुलीला जन्मानंतर लगेचच मारून टाकुन कुत्र्यासमोर टाकले जाई.’’ (कतादा)
  3. डोंगरकड्यावरुन खाली फेकुन दिले जाई.
  4. पाण्यामध्ये बुडविले जात असे.
  5. गळ्यावरुन सुरी फिरवली जात असे.
  6. थोडी मोठी झाल्यानंतर साज शृंगारासहित वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्ड्यामध्ये ढकलूनदेऊन वरुन माती ढकलली जात असे. (तफसी कबीर)
आजही वेगळी परिस्थिती नाही. जैसलमेर (राजस्थान) मधील ‘‘देवडा’’ या गांवाबद्दल प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये हे नमुद केले गेले आहे की, तेथे मागील १०० वर्षामध्ये एकाही मुलीचे लग्न झालेले नाही. जन्मतःच त्यांना मारुन टाकले जात आहे. कधी कधी तर हे काम जन्मदाती आईच करीत असे. मातेच्या दूधाबरोबरच नवजात मुलीला अफू चारली जाते. अथवा नाकावर वाळू भरलेली पिशवी ठेवली जाते किवा नाका तोंडामध्ये वाळू भरली जाते. गोधडी अथवा उशी चेहऱ्यावर टाकून ठेवली जाते जेणेकरून श्वास बंद पडावा नाहीतर तोंडामध्ये मिठाचा तोबारा भरला जातो. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ ९ सप्टेंबर २००६)
स्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिग करुन मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याच साठी १९९४ मध्ये एक कायदा बनविला गेला होता. Natal Diagnostic Technique Regulation & Prevention of Misuse Act. या कायद्यान्वये गर्भलिग निदान गुन्हा ठरविला गेला असून देखील दरवर्षी ५ ते ७ लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ६ जून २००६)
अशा Fertility Centres वर वेळोवेळी छापे घातले जात आहे. हे कार्य करणाऱ्या डॉक्टरांना अटक केली जाते, त्यांच्या विरुद्ध खटले चालतात आणि त्यांना शिक्षा देखील दिली जाते. तरी देखील या सामाजिक कुकर्माला थोपविणे तर दूरच उलट त्याचा प्रसार व फैलाव देखील थांबविता आला नाही.
इस्लामी उपाय
इस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो, व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या ज्या कारणांमुळे अथवा आशंकांमुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालन पोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे खूपच उत्तमप्रद सिद्ध झाले आहे.
सर्व प्रथम जनसामान्यांची मानसिकता तयार करण्याचे काम इस्लामने केले. कारण कुठलाही कायदा तोपर्यंत प्रभावशाली होत नाही जोवर जनसामान्य त्याला जुमानित नाही किवा जोवर त्याच्या गुणधर्मांचे आकलन होत नाही. तसेच न जुमानल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव त्यांना होत नाही.
इस्लामने प्रतिपादन केले की हे एक शैतानी कृत्य आहे. ‘‘आणि अशाच प्रकारे कित्येक बहूदेववादीसाठी त्यांच्या भागिदारांनी (कल्पित देवांनी) त्यांच्या संतानाच्या हत्येला आकर्षक बनविले आहे, जेणे करून त्यांना विनाशात टाकावे व त्याकरीता त्यांचा धर्म धूसर बनवून टाकावा.’’ (कुरआन ६ : १३७)
‘‘खचित नुकसानीमध्ये आहेत ते लोक ज्यांनी अज्ञान व मुर्खपणाखातीर आपल्या मुलांना ठार केले.’’ (कुरआन ६ : १४०)
काही अरबी टोळ्या मुलींना आर्थिक लचांड समजून त्यांना मारुन टाकत असत. कारण मुले मोठी झाल्यानंतर कामामध्ये मदत करतील परंतु मुली काहीच कामाच्या नसतात.
कुरआनने स्पष्ट केले की उपजीविकेच्या किल्ल्या अल्लाहच्या हाती आहेत. या धरतीवरील सर्व सजीवांच्या उपजीविकेची जबाबदारी ईश्वराने घेतली आहे. सशक्त असो वा अशक्त, धष्टपुष्ट असो वा अपंग, स्वतः उपजीविकेकरिता धावपळ करीत असो वा दुसऱ्यावर निर्भर असो, सर्वांना भाकरी मिळते ती अल्लाह (ईश्वरा) च्या आज्ञा व मर्जीनेच.
‘‘आणि आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार मारु नका, आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील (देतो).’’ (कुरआन ६ : १५१)
‘‘आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करु नका. आम्ही त्यांनादेखील उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा. वस्तुतः त्यांची हत्या करणे एक मोठा अपराध आहे.’’ (कुरआन १७ : ३१)
इस्लाम मध्ये मुलींची हत्या त्या अपराधांमध्ये गणली जाते ज्यांना अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी अवैध ठरविले आहे.
‘‘अल्लाहने तुम्हांकरिता अवैध ठरविले आहे, मातापित्यांची अवज्ञा, मुलींना जिवंत गाडून टाकणे व वायफळ खर्च करणे.’’ (मुस्लिम)
मुलींच्या हत्येला त्या घृणित कार्यांमध्ये समाविष्ट केले आहे ज्याबाबत परलोकामध्ये प्रश्नोत्तरे होतील.
‘‘आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली?’’ (कुरआन ८१ : ८,९)
संततीची हत्या न करण्याची प्रतिज्ञा
ईश्वराचे दूत आदरणीय मुहम्मद साहेब आपल्या अनुयायाकडून ज्या ज्या गोष्टींचे वचन घेत असत त्यामध्ये संततीची हत्या न करण्याचे देखील कलम होते. हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करुन मदिना पोहोचल्या. ईश्वराने आपल्या प्रेषितांना त्यांकडून वचन घेण्याचा आदेश दिला.
‘‘हे नबी (स.) जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की अल्लाहबरोबर कुठल्याही वस्तूला सामील करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचणार नाही आणि कुठल्याही चांगल्या कामामध्ये तुमची अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा. निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे.’’ (कुरआन ६० : १२)
असेच वचन व प्रतिज्ञा प्रेषितांनी पुरुषांकडूनही घेतल्या, मदिनेला स्थलांतरापूर्वी ज्या ज्या नशीबवान लोकांनी ईशदूताच्या हातावर प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये आदरणीय उबादा बिन सामित (रजि.) होते. ते कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले,
‘‘माझ्या जवळ या गोष्टींची प्रतिज्ञा करा की, अल्लाहच्या बरोबरीने इतर कोणालाही सम्मिलीत करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही आणि आपल्या संततीची हत्या करणार नाही.’’ (बुखारी)
मुलीचे अस्तित्व पुरुषाकरिता संकट अथवा झंझट आहे हे इस्लामला मान्य तर नाहीच उलट त्याने मुलीला स्वर्गप्राप्तीचे साधन ठरविले आहे.
आदरणीय अनस बिन मालिक (रजि.) उल्लेख करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले की, ‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलीचे पालन पोषण सज्ञान होई पर्यंत केले तो अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी माझ्या इतका जवळ राहील (हे शब्द उच्चारतांना प्रेषित (स.) नी आपली दोन बोटे जुळवून दाखवली.)’’ (मुस्लिम)
दुसऱ्या प्रेषित कथनामध्ये असे शब्द आहेत -
‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलींचे पालन पोषण केले, ती व्यक्ती आणि मी स्वर्गामध्ये अशा प्रकारे प्रवेश करु (यावेळी प्रेषित (स.) नी आपल्या दोन बोटांना दर्शविले.)’’ (तिरमिजी)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) कथन करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले -
‘‘ज्याच्या दोन मुली असून त्या जवळ आहेत तोपर्यंत तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल, तर त्या त्याच्याकरीता स्वर्गप्राप्तीचे साधन बनतील.’’ (सुनन इब्ने-माजा)
आदरणीय उकबा बिन आमिर (रजि.) उल्लेख करतात की, प्रेषित (स.) यांचे कथन आहे की,
‘‘ज्याला कुणाला तीन मुली असून त्याने संयम बाळगला तसेच आपल्या कुवतीनुसार त्यांना खाऊ पिऊ व लेवू घातले तर ते कर्म प्रलयाच्या दिवशी नरकापासून त्याच्याकरिता ढाल बनेल.’’ (सुनन इब्ने - माजा)
प्रेषितांच्या कथनामध्ये मुलीच्या शिक्षण व प्रशिक्षणाबाबत सक्त ताकीद केली गेली आहे. आदरणीय अबूसईद अल-खुदरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) नी सांगितले की,
‘‘ज्या व्यक्तीने तीन मुलींचे पालन पोषण केले, त्यांना समाज-रीत व शिष्टाचार शिकविला, त्यांचे विवाह करून दिले आणि त्यांच्याशी सद्व्यवहार करित राहीला, त्याच्याकरिता स्वर्ग आहे.’’ (अबू दाऊद)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) उल्लेख करतात की, ईश्वराच्या प्रेषितांनी सांगितले की,
‘‘ज्याने तीन मुलींचे अथवा भगिनींचे पालन पोषण केले, त्यांना शिष्टाचार शिकविला, त्याबरोबर सहानुभूतीने वागला येथपावेतो की ईश्वराने त्यांना (मुलींना) तृप्त केले, त्याच्या करीता ईश्वराने स्वर्ग अनिवार्य केला आहे.’’
कथन करणाऱ्यांनी नमूद केले आहे की, हे सर्व ऐकून एकाने विचारले ‘‘हे प्रेषित (स.) जर एखाद्याला दोनच मुली अथवा भगिनी असतील आणि तो असाच त्यांच्याशी वागला तर...?’’ प्रेषित (स.) नी सांगितले ‘‘त्याच्यासाठी देखील हेच प्रतिफल आहे.’’
कथनकर्ता खाली हे देखील नमूद करतो की, जर उपस्थितांपैकी एखाद्याने एका मुलीबरोबर अथवा एका बहिणीबरोबर सद्व्यवहाराबद्दल विचारले असले तर प्रेषित (स.) नी हेच उत्तर दिले असते. (शरह-अल-सुन्ना)
इस्लामच्या या शिकवणी नी मुलींना समाजामध्ये इतकी प्रतिष्ठा व सन्मान दिला आहे. यापेक्षा वेगळी कल्पना केलीच जाऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्याठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची मदत होऊ शकते.

मानव-जीवनाला कल्याण व सदाचाराच्या मार्गावर चालविण्यासाठी एखाद्या आदर्शाची आवश्यकता असते. आदर्श खरे पाहता मापदंडाचे काम करतो. यावर मापून तोलून हे कळते की एखाद्या व्यक्तीच्या व्यवहाराचा किती भाग खरा व किती भाग खोटा आहे. मापदंड अथवा आदर्श काल्पनिक देखील असतात, जे कथा-गोष्टीच्या रूपाने उपदेशांत सांगितले जातात व ते ऐकून लोक आनंदित होतात. परंतु त्याचा कोणताही प्रत्यक्ष लाभ वैयक्तिक किवा सामाजिक जीवनात होत नाही. आदर्श बनण्यासाठी केवळ इतकेच आवश्यक नाही की ते शक्य व व्यावहारिक असावे, तर हे देखील गरजेचे आहे की तो आदर्श एखाद्याचे जीवन बनलेले असावे व त्याने त्यावर चालून आदर्शाचा प्रत्यक्ष नमुना प्रस्तुत केला असावा. त्या माणसाच्या हृदयात मानवासाठी इतके प्रेम असावे की कोणीही त्याला आपला हितचितक मानावे. त्याच्या प्रेमात निमग्र होऊन त्याचे आदर्श आत्मसात करण्यासाठी त्याला नेऊ लागावे. यासाठी त्याने केवळ धनसंपत्तीची लयलूट करण्याचीच तयारी ठेवावी असे नव्हे, तर त्याने आपल्या प्राणाचे बलिदान करण्याची देखील तयारी ठेवावी.
इतिहासात अशा अगणित महापुरुषांचा उल्लेख आहे, ज्यांनी आपल्या सर्वस्वाची मानवतेच्या उत्थान व मुक्तीसाठी होळी केली. मानवाला योग्य मार्गदर्शन केले. त्या सर्वांवर ईश्वराची अपार कृपा असो! जगाच्या कोणत्याही कोपर्यात, इतिहासात कोणत्याही काळात आणि मानवांच्या कोणत्याही जातीत त्यांचा जन्म झालेला असो; आम्ही त्यांना प्रणाम करतो व आपले हार्दिक श्रध्दा-सुमन त्यांना अर्पित करतो. ते सर्वजण आमच्यासाठी आदर्श पुरुष होत.
असे असले तरी ही गोष्ट नाकारता येत नाही की कालांतराने त्यांचे जीवन-चरित्र व त्यांच्या शिकवणी सुरक्षित राहू शकली नाहीत. काही असले पुरावे उपलब्ध आहेत ज्यावरून असा निष्कर्ष काढता येतो की त्यांच्या जीवनप्रणाली व त्यांच्या शिकवणीसंबंधी विस्ताराने माहिती मिळविण्यासाठी आमच्याजवळ कोणतेही प्रामाणिक साधन नाही. ईश्वराची ही मोठी कृपा होय की त्या महान विभूतींपैकी एका महान व्यक्तीचे संपूर्ण जीवन इतिहासाच्या प्रकाशझोतात आहे. त्यांच्या जीवन आणि शिकवणीसंबंधी जी काही माहिती आम्हाला हवी ती मिळू शकते. त्यात अंदाज लावण्याची गरज नाही. त्यांचे व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन व राजकीय जीवन सर्वकाही प्रकाशासारखे स्पष्ट आहे. हा प्रकाश-पुंज संपूर्ण मानवजातीची अमुल्य ठेव आहे. हे व्यक्तित्व आहे हजरत मुहम्मद(स.) यांचे.
जीवनाची एक झलक
हजरत मुहम्मद(स.) यांचा इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील ‘मक्का’ या शहरात जन्म झाला. त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांचे वडील परलोकवासी झाले. त्यांच्या बालपणांतच त्यांची आई व आजोबा थोड्या-थोड्या अंतराने हे जग सोडून गेले. त्यांच्या चुलत्याने त्यांचे पालन-पोषण केले. बालपणापासूनच त्यांच्या स्वभावात अशी नम्रता होती की संपूर्ण कुटूंब व शहरातील लोक त्यांचा आदर करीत असत. त्यांच्या खरेपणा व पुण्यशीलतेची चर्चा सर्वत्र होऊ लागली. बालपणी ते शेळ्या-मेंढ्या चारीत असत. तारुण्यात त्यांनी व्यापार सुरू केला. खदीजा(रजि.) नावाच्या एका धनाढ्य विधवेचा व्यापारिक माल लाटून नेत व बाजारपेठेत ते विकत असत. त्यांचा प्रामाणिकपणा व सदगुण पाहून त्या विधवेने त्यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव केला व तो त्यांनी मान्य केला. ते त्या काळातील सामाजिक कुरीती व लोकांच्या दुःखाने अत्यंत दुःखी होत होते. ते एका गुहेत बसून ईश्वराने चितन व समाजाच्या उद्धारासाठी प्रार्थना करीत असत. त्याच गुहेत त्यांना ईश्वरी आदेश येत असत. त्यांच्यावर ईश्वराकडून मानवजातीला मार्गदर्शन करण्याची मोठी कठीण जबाबदारी घातली गेली होती. ईश्वराने मानवकल्याणासाठी त्यांच्यावर ‘पवित्र कुरआन’ हा ग्रंथ उतरविला. ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते मानवजातीला मार्गदर्शन करीत असत. समाजातील स्वार्थी व सत्ताधारी लोकांनी त्यांना तीव्र विरोध केला. सज्जन आणि उपेक्षित लोकांनी त्यांची शिकवण आत्मसात केली. त्यांना व त्यांच्या साथीदारांना मक्का येथील दुष्ट लोकांनी घोर यातना दिल्या. त्यांना मक्का सोडून जाण्यास भाग पाडले. त्यांनी सुदूर मदीना शहरात आश्रय घेतला. मक्का वासियांनी तेथे सुध्दा आक्रमण केले. अनेक युद्धे झाली, तरीदेखील हजरत मुहम्मद(स.) यांनी त्यांच्याशी दयापूर्ण व्यवहार केला. जेव्हा मक्का शहरात दुष्काळ पडला तेव्हा, त्यांनी मदीना शहरात उंटावर धान्य लादून पाठविले. इस्लामी शिकवणींचा प्रचार चालूच राहिला. जेव्हा अरबस्तानात इस्लामचा सर्वत्र प्रसार झाला आणि अधिकांश मक्कावासियांनी इस्लामचा स्वीकार केला तेव्हा मक्का शहरावर हजरत मुहम्मद(स.) यांना विजय प्राप्त झाले व ते परत मक्का शहरी परतले. ही अशी वेळ होती जेव्हा त्यांना विरोधकांवर भरपूर सूड उगवता आला असता, परंतु त्यांनी त्या दुष्ट व अत्याचारी मंडळींना क्षमा केली. इतकेच नव्हे तर त्यांना सन्मान व श्रेष्ठत्व दिले. विजेत्याच्या या व्यवहाराने लोक अत्यंत प्रभावित झाले व त्यांनी मान्य केले की सत्य हजरत मुहम्मद(स.) यांच्या बाजूने आहे आणि त्यांनी सुद्धा सत्याच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले.
त्यांच्या जीवनकाळातच एका मोठ्या प्रदेशावर सत्याचे राज्य स्थापित झाले. या राज्यात गरीब, अनाथ आणि पीडित व उपेक्षितांना संपूर्ण सन्मान मिळाला. माणसामाणसांतील सर्व प्रकारचे भेद-भाव संपले. हजरत मुहम्मद(स.) यांनी शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. ते स्वतः अत्यंत साधे जीवन जगत राहिले. दुसर्यांच्या सेवेकडे त्यांचे इतके लक्ष होते की स्वतः न खाता दुसर्यांना ते खाऊ घालीत असत. त्यांच्या घरी कित्येक दिवस चूल पेटत नसे. काही खजूर खाऊन पाणी पीत असत. असे होते राज्याच्या सर्वोच्च अधिकार्याचे जीवन.
आपल्या अनुयायांत सुद्धा त्यांनी असेच गुम रूजविले की ते निःस्वार्थीपणे ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी सेवा-कार्यात निमग्र राहत असत. स्वार्थ व भोगविलापासून ते दूर पलायन करीत. त्या सर्व लोकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे पाहता पाहता आशिया, युरोप व आफ्रिका खंडांच्या मोठ्या भू-भागात इस्लामचा प्रसार झाला. काळे-गोरे, उच्च-नीच, सबल-निर्बल यासारखे भेदभाव संपुष्टात आले. अज्ञान व अंधःकार नाहीसा होऊ लागला. बुद्धी व विज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. इस्लामचा आदर्श संपूर्ण जगात पसरला. मानवाधिकार, न्यायाधिष्ठित राज्य शांती-स्थापना, सहानुभूति, स्वातंत्र्य व संपूर्ण मानवजातीशी बंधुत्वाची वागणूक यासारख्या तत्त्वांचा त्यांना स्वीकार करावा लागला, ज्यांनी प्रत्यक्षपणे इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता. हे सिद्धांत अस्तित्वात असून देखील जगात सध्या अन्याय व अराजकता पसरलेली आहे. याचे मूळ कारण असेच आहे की या शिकवणींचा स्वीकार मनापासून केला गेला नाही. केवळ लोकांना फसविण्यासाठी या आदर्शांचे प्रदर्शन केले जाते आणि त्यांच्या आडून स्वतःच्या स्वार्थाची पूर्तता केली जाते.
हजरत मुहम्मद(स.) यांच्या जीवन-व्यवस्थेचा सार असा आहे की सत्य मार्गावर चालण्याची प्रेरक शक्ती ईश्वरावर विश्वास आणि त्याच्याशी प्रेम व त्याचे भय होय. तो न्यायपूर्ण रीतीने माणसांच्या कर्माचे फळ देणारा आहे. कोणताही चांगुलपणा अथवा वाईटपणा त्याच्यापासून लपविणे शक्य नाही. ईश्वर-प्रेमात मग्न होऊन त्याची प्रसन्नता व बक्षीस मिळविण्याची इच्छा मानवाला सत्य-मार्गावर चालण्यास प्रवृत्त करते. त्याच्या कठोर यातनांपासून स्वतःचा बचाव करण्याची चिता त्याला दुष्कृत्यापासून अलिप्त ठेवते. खरी गोष्ट अशी आहे की ईश्वरात आस्था व परलोकातील जीवनाची कल्पना स्वीकारल्याशिवाय माणसांत टिकाऊ उत्तम गुणांचा अविर्भाव शक्य नाही.
आज सर्वात मोठी आवश्यकता अशी आहे की पुन्हा त्या शिकवणी आत्मसात केल्या जाव्यात ज्या जीवनाला सत्य-मार्गावर नेऊ शकतात. असे न केल्यास मानवता वेदना व दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही.

शिकवणींची एक झलक (हदीस व कुरआनवरून संकलित)

संपूर्ण सृष्टीचा निर्माता एकच ईश्वर आहे. तो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. त्याचीच भक्ती करा आणि त्याच्याच आज्ञेचे पालन करा.
ईश्वराने मानवावर अगणित उपकार केलेले आहेत. पृथ्वी आणि आकाशातील सर्व शक्तींना मानवाच्या सेवेला लाविले आहे. तोच पृथ्वी आणि आकाशाचा स्वामी आहे, तोच तुमचा पूज्य ईश्वर आहे.
ईश्वराला(वास्तविक स्वामीला) सोडून अन्य कोणाची पूजा करणे सर्वात मोठा जुलूम व व्याभिचार आहे.
ईश्वराची अवज्ञा करून तुम्ही त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. आज्ञाधारक बनून राहा, यातच तुमचे कल्याण आहे.
ईश्वराच्या स्मरणाने आत्म्याला शांती लाभते. त्याच्या पूजेने मनाचे मळ नाहीसे होते.
ईश्वराच्या निशाण्यांवर(दिवस, रात्र, पृथ्वी, आकाश, झाडे-झुडुपे, जीव-जंतूंची रचना) विचार करा. यामुळे ईश्वरावरील विश्वास दृढ होईल आणि संकुचित विचारांपासून मुक्ती मिळेल.
मला(हजरत मुहम्मद स.) ईश्वराने जगाचा मार्गदर्शन म्हणून नेमला आहे. मला मार्गदर्शनासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नाही. माझे म्हणणे ऐका आणि माझ्या आज्ञेचे पालन करा.
मी काही वेगळा आणि परिचित प्रेषित नाही. माझ्या अगोदर जगात मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रेषित आलेले आहेत, आपल्या धर्म-ग्रंथात पहा अथवा एखाद्या ज्ञानी माणसाकडून माहिती करून घ्या.
मी पूर्वीच्या प्रेषितांच्या शिकवणींची पुनर्स्थापना करण्यासाठी व कपटीपणा करणार्यांच्या बंधनातून मानवाला मुक्त करण्यासाठी आलो आहे.
मला अशासाठी पाठविले गेले आहे की मी नैतिकता व उत्तम आचरणाला अंतिम शिखरापर्यंत पोचवावे.
मी लोकांची कंबर धरून धरून त्यांना अग्नीत पडण्यापासून वाचवीत आहे, परंतु लोक मात्र अग्नीकडेच धाव घेत आहेत.
मला जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे. तुम्ही लोकांसाठी सोयी करा, संकटे उभी करू नका.
आई-वडिलांची सेवा करा. त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलू नका. त्यांचे तुमच्यावर मोठे उपकार आहेत, म्हणून तुम्ही त्यांचे आज्ञाधारक बनून रहा.
जर आई-वडिलांनी अन्याय करण्याची आज्ञा दिली तर ती मान्य करू नका. अन्य बाबींत त्यांच्या आज्ञेचे पालन करा.
संपूर्ण मानवजातीला एकाच ईश्वराने निर्माण केले आहे, एकाच आई-वडिलांची संतती आहे. त्यांच्यात रंग, वंश, जात, भाषा, क्षेत्र वगैरेंचा भेदभाव करणे घोर अन्याय होय.
सर्व माणसे आदमची संतती होत. त्यांच्यावर प्रेम करा, तिरस्कार करू नका. त्यांना आशावान बनवा, निराश करू नका.
मानवांत श्रेष्ठ तो आहे जो दुसर्यांचा हितचितक, पवित्र आचरण करणारा व ईश्वराची आज्ञा पालन करणारा असतो.
तुम्ही जगवासियांवर दया करा, आकाशवाला(ईश्वर) तुमच्यावर दया करील.
ती व्यक्ती सर्वात चांगली आहे जी स्वतःच्या घरवाल्यांसाठी व शेजार्यांसाठी चांगली आहे.
स्त्रिया, गुलाम व अनाथांवर विशेषतः दया करा.
जो आपल्या मुले व मुलीत भेदभाव करीत नाही आणि मुलींचे चांगल्या प्रकारे पालन-पोषण करतो, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्ता करतो; तो स्वर्गात जाईल.
जो वडीलधारी मंडळींचा आदर व लहानांवर प्रेम करीत नाही तो आमच्यापैकी नव्हे.
तुम्ही ऐहिक जीवनात उन्मत्त होऊन हे विसरून जाऊ नका की तुम्हा सर्वांना तुम्ही केलेल्या कर्मांचा हिशेब आपल्या ईश्वराला द्यावयाचा आहे. परलोकातील यशच खरे यश होय.
परलोकातील यातना फार कठोर आहेत. तेथे कुळ-वंश, सख्खे-सोयरे, धन-संपत्ती आणि कोणाचीही शिफारस उपयोगी पडणार नाही. ईश्वराची आज्ञा-पालन व उत्तम आचरणच(त्या) यातनांपासून स्वतःला वाचविण्याचे एकमात्र साधन होय.
स्वतःला व आपल्या कुटुंबियांना नरकाच्या अग्नीपासून वाचवा. तुमच्या संपत्तीत तुमचे आप्तेष्ट, गरीब व अनाथांचा वाटा आहे. त्यांची वाटणी त्यांना द्या.
दुसर्यांची संपत्ती बेकायदेशीर खाऊ नका. व्यापार अथवा करारपत्राद्वारे कायदेशीर धन प्राप्त करा.
वस्तूमध्ये भेसळ करू नका, मोज-माप करण्यात कमी करू नका. व्यापारांत फसवेगिरी करू नका. जो फसवितो तो आमच्यापैकी नव्हे.
बाजारात भाव वाढावेत म्हणून(धान्य वगैरे) वस्तू न विकता(साठा करून) ठेवू नका असे करणारा घोर यातनेला पात्र आहे.
धन मोजून-मोजून संचय करू नका आणि वायफळ खर्च सुद्धा करू नका. मध्यम मार्ग स्वीकारा.
दुसर्यांचे अपराध क्षमा करीत जा. दुसर्यांच्या दोषांचा प्रचार करू नका, ते लपवा, ईश्वर तुमच्या दोषांवर पांघरूण घालील.
खोटे बोलणे, चहाड्या करणे, खोटे आरोप करण्यापासून दूर रहा. लोकांना वाईट नावाने हाक मारू नका.
अश्लीलता व निर्लज्जतेपासून दूर रहा, मग ती उघड असो की गुप्त.
दिकाऊपणाचे कृत्य करू नका. गुप्त-दान करा. उपकार करून त्याची जाणीव करून देऊ नका.
रस्त्यावरील त्रासदायक वस्तू(काटे, दगड वगैरे) काढून टाका.
पृथ्वीवर हळूहळू चला. गर्व व अहंकार करू नका.
जेव्हा बोलाल तेव्हा चांगले बोला नाहीतर गुपचूप रहा.
आपले वचन व प्रतिज्ञा पूर्ण करा.
सत्य व न्याय्य साक्ष द्या, मग तुमचे स्वतःचे अथवा तुमच्या कुटुंबियांचे नुकसान झाले तरी बेहतर.
अन्यायाविरुद्ध लढणारा ईश्वराला प्रिय असतो.
एखाद्या पैलवानाला चित करण्यात शौर्य नाही तर खरी शूरता माणसाने रागावर ताबा मिळविण्यात आहे.
मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजूरी द्या. कोणत्याही नोकराकडून त्याच्या शक्तीप्रमाणे काम करून घ्या. त्याच्या विश्रांतीकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःजे खाल ते त्याला द्या व ते स्वतः परिधान कराल ते त्याला सुद्धा नेसण्यास द्या.
जनावरावर दया करा, त्यांच्या शक्तीपेक्षा अधिक काम करवून घेऊ नका.
कोणत्याही वस्तूचा गरजेपेक्षा अधिक उपयोग करू नका. पाण्याचा दुरुपयोग करू नका, मग तुम्ही नदीच्या काठी का असाना.
आपले शरीर, कपडे व घर स्वच्छ ठेवा. झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम दोन्ही हात धुवा. तुम्हाला माहीत नसेल की तुमचे हात झोपेत कोठे कोठे गेले असतील.
युद्धात स्त्रिया, मुले, आजारी आणि बिनहत्यारी सैनिकांवर हात उचलू नका. फळधारी झाडांना कापू नका.
युद्धात पकडलेल्या सैनिकांशी चांगला व्यवहार करा, त्यांना यातना देऊ नका.
एखादी वाईट गोष्ट पाहिली तर तिला प्रतिबंध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. जर ते शक्य नसेल तर तिला मनापासून वाईट समजा.
सर्व कर्म इच्छेवर आधारित आहेत. वाईट इच्छेने केलेल्या चांगल्या कर्माचे सुद्धा फळ ईश्वराजवळ मिळणार नाही.
ईश्वर-मिलनाची आशा बाळगून जीवन जगा. आशेप्रमाणेच मानवाच्या क्रियाकलाप होत असतात.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget