Latest Post

कुरआनमधील आले इमरान या अध्यायात आयत क्र. 26 मध्ये म्हटले आहे की, ’वतु इज़्ज़ुमनत्तशाऊ वतू ज़िल्लूमनत्तशाऊ’ अर्थात सन्मान आणि अपमान दोन्ही अल्लाहकडूनच  आहेत. सदरची आयत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरित झाली ती प्रलयाच्या दिवसापर्यंत येणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक आहे. याचा अर्थ समजून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी  आवश्यक आहे. या आयातीचा अर्थ लावताना कुरआनच्या अनेक भाष्यकारांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे या आयातीचा उद्देश पुण्यवान लोकांना  अधिक पुण्याची कामे करण्यासाठी प्रेरित करणे आहे.
माणूस जेवढा जास्त नीतिमान होतो आणि पुण्याची कामं करतो तेवढाच तो अल्लाहच्या पसंतीला उतरतो आणि त्या बदल्यात त्याला जगामध्ये सन्मान आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतात.  पुण्याची कामे केल्याने सन्मान आणि प्रसिद्धी विनासायास यासाठी मिळते की, त्या कामामुळे सामान्य जनांना त्याचा सरळ लाभ होतो आणि सामान्य माणसं मग पुण्यवान माणसांची  कदर करू लागतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांचे नाव लोकांच्या तोंडात राहते आणि लोकालोकी त्यांच्या पुण्यकर्माची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते.
जगामध्ये काही असे लोकही आहेत जे स्वार्थी, घमंडी आणि सदैव प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्यांना येनकेन प्रकारेन स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची आणि काहीही करून प्रसिद्धी  मिळवायची इच्छा असते. अशा लोकांना सुद्धा या आयातीमध्ये चेतावनी दिलेली आहे की, तुम्ही कितीजरी प्रयत्न केला तरी जोपर्यंत अल्लाह सन्मान आणि प्रसिद्धी प्रदान करणार नाही  तोपर्यंत तुम्हाला ती प्राप्त होणार नाही. सर्वसाधारणपणे पुण्य न करता प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या लोकांनी आपल्या मनाशी एक खूनगाठ बांधलेली असते की, प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही  स्वतःच्या प्रयत्नांनी अर्जित करता येतात. अनेक लोक बोलूनसुद्धा दाखवितात की, ही प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आम्ही स्वकष्टाने अर्जित केलेली आहे. मात्र ती कमावतांना ते अनैतिक मार्गाचा सुद्धा अवलंब करत असतात. ज्यावेळेस असे लोक अनैतिक मार्गाचा अवलंब करतात तर अल्लाह त्यांना मोहलत (संधी) देत असतो. मात्र काही लोक या संधी मागील ईश्वरीय  मन्सुब्याला ओळखू शकत नाहीत आणि आपल्याच भ्रमात फार पुढे निघून जातात. अशा लोकांना प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही मिळतात पण त्यातील फोलपणा त्यांना कळत नाही. अशा लोकांना मिळालेली प्रसिद्धी ही नकारात्मक असते आणि सन्मान हा फक्त तोंडावर केला जातो. पाठ फिरताच लोक वाईट बोलू लागतात. कारण ज्या पद्धतीने खोटे बोलून, चोरी   करून, फसवणूक करून, अप्रामाणिकपणे असे लोक धन, सन्मान आणि प्रसिद्धी मिळवत असतात त्याबद्दल जनतेला खडा न् खडा माहिती असते. केवळ ते तोंडावर बोलून दाखवत  नाहीत एवढेच. या वाईट गोष्टींबरोबर केली जाणारी प्रगती ही खरी प्रगती नसते. कारण या सगळ्या गोष्टी अल्लाहला नापसंत असून, त्याचा रोष ओढवून घेण्यासाठी पुरेशा आहेत.  अल्लाह आपल्या प्रत्येक बंद्याकडे पाहत असतो. त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माकडे पाहत असतो. ज्याला ज्या पद्धतीने प्रसिद्धी आणि प्रगती हवी असते तो त्याला त्याच पद्धतीने  पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करत असतो. जर वाम मार्गाने सन्मान आणि प्रगती मिळविणारे लोक वेळीच सावधान झाले आणि त्यांनी तौबा केली व वाईट मार्गाचा त्याग करून सन्मार्गाला लागले तर अल्लाह त्यांना क्षमा करतो. मात्र प्रगती आणि प्रसिद्धीच्या नशेमध्ये ती खेचून आणण्याकडेच ज्या लोकांचा कल असतो ते संधी मिळूनही सावध होत नाहीत, असे  लोक जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त पुढे जातात तेव्हा अल्लाह त्यांना त्यांची जागा सुद्धा दाखवून देण्यास मागे पुढे पाहत नाही. हाच या आयातीचा खरा अर्थ आहे.
म्हणजेच अल्लाह ज्याला सन्मान आणि प्रगती देऊ इच्छितो त्यांना ती देतो आणि ज्यांना देऊ इच्छित नाही त्यांना ती बिल्कूल देत नाही. तो अल्लाहच आहे ज्याने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आपलीही रचना त्यानेच केलेली आहे आणि तोच पूजनीय आहे.
अनेक लोक खोट्या सन्मान आणि प्रसिद्धीच्या मागे आयुष्यभर पळत असतात. आजकाल स्वस्थ प्रसिद्धी आणि खोटा सन्मान प्राप्त करण्यामध्ये लोक एकमेकांशी स्पर्धा  करीत आहेत  आणि हीच लालसा त्यांना वाममार्गाकडे घेऊन जात आहे. पण प्रसिद्धीच्या नशेमध्ये झिंगलेल्या या लोकांना आपण काही वाईट करत आहोत, हेच लक्षात येत नाही, असे लोक चांगल्या  लोकांचा दुस्वास करतात, त्यांची इर्शा करतात. अनीतिने कमाविलेल्या पैशाच्या जोरावर सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात.
त्याच वेळेस दूसरे लोक अत्यंत प्रामाणिकपणे अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर चालून कठीण परिश्रम करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात. खऱ्याने वागत असतात.  इतरांची मदत करतात. मग अल्लाह त्यांना त्याच मार्गामध्ये बरकत अता करतो. ज्यामुळे अशा लोकांची प्रगती आणि सन्मान जनतेमध्ये उत्तरोत्तर वाढत जातो. मात्र यामध्ये  कोणताही नकारात्मक पैलू नसतो.
या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात येते की, प्रसिद्धी आणि प्रगती एका गटाला अल्लाहकडून पुरस्कार स्वरूपात मिळत असते तर दूसरा  गट ती स्वतःच्या बळावर खेचून आणण्याच्या प्रयत्नात असतो. अशा लोकांना अल्लाह सन्मार्गावर चालण्याची समज देओ आणि जी प्रगती आणि सन्मान अल्लाहकडून मिळतो त्या  पुण्यवान लोकांची तशीच प्रगती होवो. (आमीन.)

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या प्राचीन संस्कृतीमध्ये ग्रीक, रोमन, सिंधू, इजिप्त यांचा समावेश होतो आणि या संस्कृतीनुसार जीवनपद्धतीने जीवन जगणारे आणि चालणाऱ्या  देशांमध्ये ग्रीक, रशिया, इजिप्त, भारत, इराण, इराक या देशांचा अंतर्भाव होतो. या देशांच्या इतिहासापूर्वी पृथ्वीतलावर एका आदीमानवांचं जोडपं म्हणजे नर-मादी (आदम व हव्वा)  यांचे प्रगटन झाले आणि त्यापासून मानव जातीचा विकास व निर्मिती झाली. स्वतःच्या जीवीताच्या रक्षणासाठी मानव समूह करून राहू लागला व जसजशी मानवांच्या संख्येत वाढ  झाली तसतसा तो नदीच्या बाजूच्या सुपीक प्रदेशात वास्तव्य करू लागला. त्यातून विविध संस्कृतींची निर्मिती झाली. उदा. सिंदू नदीच्या खोऱ्यातील सिंधू संस्कृती तसेच नाईल नदीच्या  खोऱ्यातील इजिप्तची संस्कृती होय.
अशा अनेक संस्कृतीमध्ये जीवन जगत असताना मानवाने आपल्या बुद्धीकौशल्यावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा यथायोग्य प्रयत्न केला.  परिणामी धर्मव्यवस्था प्रचलित झाली. ’’धर्म म्हणजे जीवन जगण्याची नियमावली.’’ निसर्गाद्वारे धर्माची आचारसंहिता अवतरली. एका मूळ धर्माचे अनेक धर्म झाले. नंतर यापैकी अनेक  धर्मांमध्ये काही कालावधीपर्यंत स्त्रीचे स्थान अत्यंत दीन किंवा निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळे तिच्याकडे उपभोग्य वस्तू अथवा निर्जीव वस्तू म्हणून तिला हीन लेखले जात होते.
ग्रीक, रशिया, इजिप्त, इराक, भारत, चीन या प्रत्येक ठिकाणी स्त्रीयांवर अत्याचारच होत होता. बाजार, उत्सव, उरूस यामध्ये स्त्रीयांची कवडीमोल किंमतीत विक्री खरेदी आणि तस्करी होत होती. पैगंबर मुहम्मद (सल्ल.)  यांच्या पूर्वीच्या काळात तर ग्रीकमध्ये स्त्रीला आत्मा आहे की नाही, यावर हजारो वर्ष वादविवाद झाले. पाप-पुण्याच्या कल्पना मांडत असतानाच  पापाचे प्रतिरूप म्हणून स्त्रीकडे पाहिले जाऊ लागले. पापाची सुरूवात स्त्रीच्या जन्मापासून सुरू झाली अशाही अख्याईका रचल्या गेल्या आणि त्याला पौरोहीत्याच्या आधार दिला गेला. त्यामुळे स्त्री जन्माला आल्यापासून ते तिच्या अंतापर्यंतचे संपूर्ण जीवन दुसऱ्याच्या अधिन करण्यात आले. त्याचबरोबर तिला दुसऱ्यावर विसंबुनच जगण्याची व्यवस्था बहुतांशी देशांमध्ये  निर्माण केली गेली. जन्मापासून विवाहापर्यंत तिला वडिलांच्या अधिन ठेवले तर विवाहानंतर वृद्धापकाळापर्यंत पतीच्या तर वृद्धापकाळापासून मृत्यूपर्यंत मुलाच्या अधिन अशाप्रकारची जीवनपद्धती तीच्या नशिबी मारली. एवढेच नाही तर ’’नारी नरक का द्वार है’’ असेही समजले गेले. तर तिचे संपूर्ण जीवन हे हक्काशिवाय होते. त्यामुळे मुलगी जन्माला येणे म्हणजे  पाप समजले जायचे, मुलीच्या जन्माच्या बातमीने पिता अपमानीत व्हायचा आणि तो अपमान रक्ताचा घोट गिळल्यासारखा त्याला गिळंकृत करावा लागायचा. अपमानाने व शरमेने तो  आपले तोंड लपवून फिरायचा तर मान खाली घालून जीवन कंठायचा. अशा प्रकारची स्त्रीविषयी अनास्था अनेक धर्मात थोड्या-अधिक प्रमाणात होती.
पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या पूर्वीच्या काळातही अरबी टोळ्यामध्ये वरील परिस्थितीपेक्षा खूप काही वेगळी गत नव्हती. कारण अरबवासी मुलांना संपत्ती व गर्वाचे साधन समजायचे  तर मुलगी अपमानाचे,क्लेशदायक व लज्जास्पद समजत. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पूर्वीच्या काळामध्ये मुलींच्या बाबतीत काही अरबी टोळ्यामध्ये काही अमानवी प्रथा होत्या.
मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या गळ्यावरून सुरी फिरवली जात असे, डोंगर कड्यावरून खाली फेकून दिले जात असे, पाण्यामध्ये बुडविले जात असे. मुलीच्या जन्मानंतर लगेचच  मारून टाकून कुत्र्याला खायला त्याच्यासमोर टाकले जाई, प्रसुतीसमयी एक खड्डा खोदला जात असे आणि जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीत तिला गाडून टाकण्यात येई,  मुलगी थोडी मोठी झाल्यावर शृंगारसाजासहीत वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्डयामध्ये ढकलून देऊन वरून माती ढकलली जात असे. (संदर्भ : स्त्री भ्रूणहत्या- कारणे व उपाय)

वरील विवरण जरी सत्य असले तरी जेवढया मुली जन्मास येत होत्या त्या सर्वांशीच वरिलप्रमाणे कठोर वर्तन होत होते असे नाही.
जगात जवळपास एक लाख 24 हजार पैगंबरानंतर  पृथ्वीतलावर सर्वांत शेवटी पैगंबर मुहम्मद (स.) हे अंतिम पैगंबर म्हणून आले. त्यानंतर पुन्हा पृथ्वीतलावर दुसरा कोणताही पैगंबर येणार नाही हे निश्चित झाले आणि त्यानुसार  एकमेव ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक क्रांती समाजामध्ये यथायोग्य घडवून आणली. त्यामध्ये स्त्री जातीविषयी अमुलाग्र बदल  घडवून आणले. संपूर्ण जगात स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय असताना सर्वांत प्रथम इस्लाम धर्मामध्ये आपुलकीची व तिच्या अधिकारांची जाणीव करवून दिली जाऊ लागली. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचा संदेश असा की, ’’ मुलीच्या जन्माचे स्वागत करा.’’ आणि या सुधारणेचे सर्वाना पालन करणे अनिवार्य  झाले, कारण इस्लाममध्ये न्यायनिवाड्याच्या दिवसाचा अंतर्भाव झालेला असल्यामुळे प्रत्येकाला ईशभय वाटायला लागले आणि आजच्या स्त्रीभ्रूणहत्या विरोधातील मोहिमेची सुरूवात  चौदाशे वर्षापूर्वी पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लाम धर्मात केली. इस्लाममध्ये स्त्रीभ्रूणहत्या पाप तर आहेच पण ते कृत्य म्हणजे एक सैतानी कृत्य समजले गेले. तसेच अल्लाहच्या  न्यायालयात स्त्रीहत्या करणाऱ्याला कठोर शासनाची तरतूद न्यायनिवाड्याच्या दिवशीच निश्चित केली. मुलीची हत्या झाली तर शेवटच्या महाप्रलयाच्या दिवशी तीचा न्यायनिवाडा होईल  आणि तो न्यायनिवाडा चालू असताना अल्लाह त्या मुलीला विचारेल तुझी हत्या कोणत्या कारणाने केली? किंवा कोणत्या अपराधासाठी तुझी हत्या झाली?
जगातील प्रत्येक मानवाची निर्मिती एक पुरूष आणि एका स्त्रीपासूनच झाली आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी कोणतीही एक व्यक्ती दुसऱ्या नवीन मानवाची निर्मिती करूच शकत  नाही. याचाच अर्थ स्त्री-पुरूष या जोडीपासून मानव जन्मतो. म्हणजे सर्वांना समान अधिकार आहे. स्त्री-पुरूष समानता आहे. ईश्वराचे पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या अनुयायाकडून काही  गोष्टींबाबत वचने घेतात. त्यामध्ये संततीची हत्या करणार नाही हे देखील आहे. मग स्त्री अर्भकाचा संतती या शब्दात अंतर्भाव होतो की नाही? हा प्रश्न आज पुन्हा उभा राहिला.
’’ हे नबी (स.)! जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टींची प्रतिज्ञा करतील की, अल्लाहबरोबर कोणालाही सामील करणार नाही, चोरी  करणार नाही, व्याभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचनार नाही आणि कोणत्याही चांगल्या कामामध्ये तुमची  अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे’’.  (दिव्य कुरआन, 60ः12).
वरील विवेचन हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करून मदिनेत आल्या तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या महिलेकडून वरील  वचने घेतली. अशा प्रकारचे वचन फक्त स्त्रीयांकडूनच घेतले असे नाही तर ती वचने पुरूषांकडूनही घेतली आहेत.
स्त्री अत्याचारपीडित असताना तसेच चोहोबाजूंनी तिच्याविषयी निषेध होत असताना तिची बाजू घेऊन तिला न्याय मिळवून देण्याचे काम सर्वप्रथम इस्लामने केले आहे. ज्या स्त्रीला जन्माला येण्याचा किंवा जन्मल्यावर जगण्याचा अजिबात अधिकार नसताना त्यांना तो इस्लामने मिळवून दिला. मानवाची मग ती स्त्री असो वा पुरूष उपजीविका अल्लाह चालवितो. तो  दोघांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. त्याचीं उपजीविका सांभाळण्याची जबाबदारी अल्लाहची आहे. त्याला त्यांच्या भाकरीची काळजी आहे. आपण विनाकारण तसा गैरसमज बाळगण्याचे  कारण नाही की दारिद्रयात खितपत पडले असताना मुलगी जन्मास आल्याने ती आर्थिक संकट ठरते. कारण तिची काळजी तुमच्यापेक्षा अधिक नक्कीच अल्लाहला आहे आणि तोच तर  आपल्या सर्वांची उपजीविका चालवितो. मग आपल्या मुलींची उपजीविका चालवणार नाही असा स्त्रीभ्रुणहत्या करणाऱ्या दांम्पत्यास अविश्वास वाटतो की काय? इस्लाममध्ये मुलगी  जन्मास येणे म्हणजे स्वर्गाचे (जन्नतचे) दार खुले करणे आहे. इतर साधनांपैकी ते एक स्वर्गप्राप्तीचे साधन आहे. म्हणजेच ज्याला एक मुलगी असेल तो नरकापासून दूर, ज्याला दोन मुली त्यास स्वर्गप्राप्ती अनिवार्य, ज्याला तीन मुली त्यासुद्धा स्वर्गप्राप्ती. या परिवर्तनाने क्रांती झाली जे अरब मुलींची हत्या करायचे ते मुलींच्या जन्माची वाट बघायचे. एवढेच नाही तर  तिच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करू लागले.
जेवढे स्थान परिवारात मुलाला होते त्यापेक्षा अधिक श्रेष्ठत्व मुलीला देऊ लागले. इस्लामने स्त्रीला जगण्याच्या अधिकाराबरोबर तिला संरक्षणाचाही अधिकार दिला. त्या संरक्षणाची  जबाबदारी पिता, पती व पुत्र यांच्यावर सोपविली.
’’जी व्यक्ती दोन मुलींचे सज्ञान होईपर्यंत पालनपोषन करेल, शिक्षण, प्रशिक्षण, रितीरिवाज, शिष्टाचार, शिकवेल सहानुभूतीने वागवून त्यांचा विवाह करेल, ती व्यक्ती अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी हाताच्या दोन बोटातील अंतराएवढ्यावर माझ्या (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या) इतका जवळ असेल.’’
अशी शिकवण अनुयायांना त्यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे ’’ जसा तुम्ही मुलाशी व्यवहार करता तसाच व्यवहार (वर्तन) मुलीशी करा.’’
जसे शरीराला पोशाख अत्यावश्यक आहे, अन्न पाणी आवश्यक आहे, निवारा आवश्यक आहे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रीला पुरूष आणि पुरूषाला स्त्री अत्यावश्यक आहे. त्यामुळे  प्रत्येक स्त्री-पुरूषाला अगदी आपापल्या आवडीनिवडीचे समान अधिकार आहेत.
इस्लामची शिकवण आहे की, प्रत्येक मुलाला त्याच्या जन्माने नैतिक व कायदेशीर अधिकार क्रमप्राप्त आहेत. त्याच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी त्याच्या पालकांची आहे. जेवढ्या  काळजीने मुलाचे संगोपन केले जाते त्यापेक्षा अधिक काळजीने मुलीचे करावे. मुलगी आपल्या उदरी जन्मास घालून अल्लाह आपल्याला आजमावण्याबरोबरच स्वर्गप्राप्तीची संधी देतो. हे  जग फक्त आणि फक्त अल्लाहच्या देणगीनेच चालते आणि ती देणगी म्हणजे स्त्री. म्हणून जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिला खायला द्या, तुम्ही जेव्हा कपडे घ्याल, तेव्हा तिलाही घ्या.  मुलीला बरेवाईट बोलू नका, मारू नका वा घरातून हाकलू नका. मुलीशी घृणा करू नका कारण ती सहानुभूतीची प्रतिमा आहे. तसेच ती अनमोलदेखील आहे. मुलीच्या सर्व गरजा  भागविण्याबरोबरच तीला मुलाप्रमाणे शिक्षण-प्रशिक्षण देणे हेदेखील अनिवार्य आहे. तिला नुसतेच शिक्षण देणे असे नाही तर तिच्या शिक्षणावर विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. महात्मा जोतीबा फुले म्हणतात, ’’ विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले.’’ शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून इस्लामने जेवढा शिक्षणाचा अधिकार मुलाला दिला तेवढाच मुलीलाही दिलेला आहे. इस्लाममध्ये स्त्रियांना शिक्षणाची दारे चौदाशे वर्षांपूर्वी खुली करण्यात आली आहेत. मुलीचे  शिक्षण-प्रशिक्षण ही बाब पुण्यकार्य वर्तिली आहे. इस्लाममध्ये प्रत्येक स्त्री पुरूषास भक्ती, नैतिकता, शरियतचे सर्व नियम पाळावेच लागतात आणि हे नियम ज्ञानाशिवाय अंमलात येणे  शक्य नाही. याचाच मतितार्थ स्त्री-पुरूष दोघांनी शिक्षण घेऊन ज्ञानी होणे जरूरीचे समजले जाते. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाला धर्माचे मुलभूत ज्ञान असायलाच पाहिजे.  धर्मज्ञानासाठीही शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाने शहाणा झालेला समूह हा अंधश्रद्धांना बळी पडत नाही. म्हणूनच इस्लाममध्ये अंधश्रद्धा बाळगणे गैर समजले आहे. उदा. गृह-ताऱ्यावरून  भविष्य पाहणे हे अज्ञान काळाचे लक्षण समजले जाते.
स्त्रीला शिक्षणाच्या आधारे उद्योगधंदा, व्यापार, कृषी, देवाणघेवाण, कारागिरी, नौकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता, लेखन या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इस्लामची अनुमती आहे.  पण या क्षेत्रामध्ये कार्य करताना इस्लामने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडता कामा नयेत. स्त्रीने-सन्मानाने व आपल्या अब्रूचे संरक्षण करीत जीवन जगत-जगत विविध क्षेत्रांमध्ये नाव कमवावे. वाड्.मय, साहित्य क्षेत्रात कार्य करताना सामाजिक, सांस्कृतिक, अधिकारदेखील प्रदान केल आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना तिने मिळविलेल्या  मिळकतीवर मालकी दाखविण्याचा पूर्णपणे अधिकार त्या स्त्रीला आहे.

(सदर लेख इस्लामिक मराठी पब्लिकेशनच्या ’इस्लामी सुरक्षित सावलीतील स्त्री’ या पुस्तकातून घेतलेला आहे.)

दुर्दैवाने आजकाल मुलांमध्ये मैदानी खेळामधील रस संपत चाललेला आहे, जो कधीकाळी तरूणांना वेड लावणारा होता. आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की, उन्हाळ्याच्या  सुट्टीमध्ये मैदानात आणि गल्लोगल्ली मुलं आपापली गट करून प्रत्येक खेळ खेळत होती. ज्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ राहत होते. निर्विवादपणे खेळण्याची ती संधी अल्लाह सुबहानहू तआला ने त्यांना दिलेली होती. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल इत्यादी खेळांतून मुलांची आरोग्यदायी वाढ होत होती. हे सर्व खेळप्रकार आता मागे पडलेले असून, तंत्रज्ञानावर  आधारित मोबाईल गेमवर येऊन तरूण पिढी विसावली आहे. या खेळाने खरे पाहता मुलांचं लहानपण हिरावून घेतलेले आहे. आपल्या छोट्याश्या वयामध्ये ते एकटे पडलेले आहेत. त्यांचे  मित्र तुटलेले आहेत. प्रत्येकजण स्वतंत्र राहू इच्छितो.
आता मुलं एकत्रित खेळ खेळत नाहीत की, खळखळून हसत नाहीत. मस्तीसुद्धा करीत नाहीत. आजकाल बुद्धीबळ, कॅरम, लुडो आणि सापशिडी सारखे खेळही त्यांना आवडेनासे झालेले  आहेत. मित्रांबरोबर गप्पा मारण्यातही त्यांना रस उरलेला नाही. आज मुलं पूर्णपणे एकांतात रमतात. त्यांचा सारखा शोध सुरू असतो कधी आणि कुठे त्यांना एखादा रिकामा कोपरा  मिळेल आणि ते तिथे निवांत बसून आपल्या प्रिय मित्र म्हणजेच स्मार्टफोनमध्ये मग्न होऊन जातील.
असेही ऐकण्यात आले आहे की, दज्जाल एका डोळ्यांनी आंधळा असेल आणि लोकांना पथभ्रष्ट करेल. लक्षपूर्वक पाहता मोबाईल फोनलाही एकच डोळा (कॅमेरा) असतो. या मोबाईल फोनमध्ये लहान, मोठे, स्त्री, पुरूष सर्वच एवढे गुंग होत आहेत की, त्यात त्यांचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे आरोग्य उध्वस्त होत आहे, हे ही त्यांना कळेनासे झाले आहे.  इतपत या फोनचा वापर वाढलेला आहे. मोबाईल फोन कधीचाच मैदानी खेळांचा पर्याय म्हणून लोकांच्या जीवनात आलेला आहे. एका अंदाजाप्रमाणे 50 ट्न्नयापेक्षा जास्त लोक या  फोनच्या मायाजालात अडकलेले आहेत.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा एक अंगठी बनविली आणि आपल्या बोटात घातली व फर्माविले की, ’ इसने आज मेरी तवज्जोह तुम्हारी तरफ से हटा दी है, एक नजर इसे देखता  हूं और एक नजर तुम्हे’ आणि त्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी ती अंगठी काढून टाकली. (संदर्भ : नसाई 5301).
यावरून स्पष्ट होते की, प्रेषित सल्ल. यांना अंगठी बोटात घातल्यावर त्यांचे लक्ष वारंवार त्या अंगठीकडे जात होते. प्रेषित जेव्हा आपल्या सोबत्यांसोबत बसले असले तरी त्यांचे लक्ष  बोटाकडेच जात होते. आपल्यामध्ये होत असलेला हा बदल त्यांनी तात्काळ अनुभवला. त्यांच्या लक्षात आले की, आपले लक्ष या अंगठीमुळे विचलित होत आहे. आपल्या महान  उद्देशापासून ही अंगठी काही प्रमाणात का होईना आपल्याला दूर घेऊन जात आहे. म्हणून तात्काळ त्यांनी ती अंगी काढून टाकली.
ज्याप्रमाणे आज लोकांनी स्वतःला मोबाईल फोनशी जोडून घेतलेले आहे. हे मोबाईल तर इतके लक्षवेधी आहे की, पाहणाऱ्याचे नुसते लक्षच विचलित होत नसून, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. आपल्या महान प्रेषितांच्या या कृतीचा गांभीर्याने विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे की, मोबाईल फोनमध्ये एवढा  जीव गुंतविणे योग्य नाही. जो की तुम्हाला तुमच्या आप्तस्वकीयांपासून सुद्धा दूर घेउन जात आहे. मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय, खोट्या सबबी सांगण्याची सवय ही केवळ मोबाईलफोनमुळे वाढत आहे. मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेटवर ते काय- काय पाहत असतील, कोणत्या गोष्टी आणि गीत ऐकत असतील, कोणते फोटो पाहत असतील, हे  त्यांचे त्यांनाच माहित. एवढे मात्र नक्की की मोबाईलवर पाहिल्या जाणाऱ्या सामुग्रीमुळे मुलं वाममार्गाकडे वेगाने जात आहेत. आज इंटरनेट हेच लहान मुलांपासून त्यांचे बालपण हिसकावून घेत आहे आणि तारूण्यामध्ये प्रवेश करणाऱ्या मुलां-मुलींना वाममार्गाला लावत आहेत. मुलां-मुलींना फॅशनच्या नावाखाली अर्धनग्नतेला प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे नवीन  पिढी निर्लज्जपणे वागत आहे.
मोबाईलने आज नवीन पिढीच्या त्या सर्व गोड आठवणी हिरावून घेतल्या आहेत. ज्याचा अनुभव मागच्या पिढीने काही वर्षापूर्वीच घेतला होता. किती चांगले झाले असते जर आपण व आपल्या मुलांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर नमूद हदीसचा विचार करून मोबाईल फोनचा चुकीच्या वापर करून आपण स्वतःला रोखू शकलो असतो. मोबाईलशी एवढे प्रेम करू  नये की, ज्यामुळे आपण आपले आरोग्य, मित्र, शिष्टाचार, संस्कृती, आणि धार्मिक आचरणापासून दूर होऊन जावू.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

माननीय अबू सईद खुदरी (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘तुमच्यापैकी ज्याने आपल्या समाजात वाईट कर्म पाहिले आणि बलपूर्वक वाईट  कर्मास रोखले, त्याने आपले कर्तव्य पार पाडले. ज्याने शक्ती आणि पात्रता असुनदेखील आपल्या जिभेचा वापर केला व त्याविरूद्ध आवाज उठविला, त्याने सुद्धा आपले कर्तव्य पूर्ण केले.  तसेच ज्याच्यामध्ये तोंड उघडण्याची व जीभेने विरोध करण्याचीही शक्ती नसेल आणि केवळ आपल्या मनात त्यास वाईट समजत असेल तर तो सुद्धा जबाबदारीतून मुक्त होईल, परंतु  हा इमान (श्रद्धा) चा किमान दर्जा आहे.’’ (हदीस : तऱगीब व तरहीब, निसाई)

भावार्थ
या हदीसचा अर्थ असा आहे की, कूकर्म संपविण्याची शक्ती असतानादेखील, ते कूकर्म न संपविल्यास ईश्वराच्या कोपास बळी पडण्यापासून राहणार नाहीत. त्याकरीता माणसाने  आपली सर्व शक्ती व पात्रता पणाला लावून दुष्कर्माविरूद्ध कंबर कसली पाहिजे, अट मात्र एवढीच की दुष्कर्मिकाविरूद्ध बळाचा वापर करण्याच्या परिणामस्वरूप एखादे मोठे संकट उभे  राहू नये. या हदीसमध्ये हे स्पष्ट होते की, असत्य आणि दुष्कर्माच्या वर्चस्वकाळात सत्यवानांनी कोणत्याही परिस्थितीसमोर आत्मसमर्पण करून आरामाची झोप घेणे निर्लज्जतेचे आणि  सत्याची प्रेम नसल्याचे लक्षण आहे.
अल्लाह दासांची परीक्षा घेण्यासाठी जी पद्धत स्विकारतो, त्यापैकी एक पद्धत ही आहे की जेव्हा कधी व्यक्ती किंवा समुदायात अवज्ञा वाढत जाते तर त्याच्यासमोर अवज्ञेच्या संधीचे दार उघडले जाते. ह्यामुळे त्याची इच्छा जी आत लपलेली असते ती स्पष्टत: समोर येते. ज्या अपराधांद्वारा ते आपल्या स्वत:ला कलंकित करू इच्छितात, ते यामुळे वंचीत राहू नये की  त्यांना संधीच मिळाली नाही. प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘अल्लाह थोरामोठ्यांच्या अपराधांसाठी जनसामान्यांना शिक्षा देत नाही जोपर्यंत जनसामान्य आपल्या डोळ्यांसमोर वाईट  कृत्ये होतांना पाहतात, आणि त्या दुष्ट कामांचा प्रतिबंध करण्याचे सामर्थ्य ठेवून सुद्धा त्याविरूद्ध रोष व्यक्त करीत नाहीत, जेव्हा लोकांची ही अवस्था होते, तेव्हा सामान्य, असामान्य, सर्वावर अल्लाहचा कोप कोसळतो.’’
सामुहिक उत्पाताची आग जेव्हा भडकते, त्यात चांगले आणि वाईट, सगळेच त्याचे भक्ष ठरतात. यापासून सुरक्षीत राहण्यासाठी समाजाचे सामुहिक अंतर्मन जागृत असावे. एखादा उत्पात  डोके काढीत असलेला पाहून, तत्क्षणीच तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करावा. आग लावणाऱ्याचे हात त्याचवेळी धरावेत. या आज्ञेनुसार जोपर्यंत मुसलमान वागत राहिले, तोपर्यंत त्याच्यात कोणत्याही उत्पाताने डोके वर काढले नाही.

धन, संपत्ती माझ्या समुदायाचा (उत्पात) फितना
ह. क़ाब बिन अया़ज (रजी.) म्हणतात की, ‘‘प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, प्रत्येक मानवी समुहाचा उत्पात (फितना) वेगवेगळा आहे, धनसंपत्ती माझ्या समुहाचा  फितना आहे.’’(हदीस : तिर्मिजी)
वेगवेगळ्या काळात, मानवी समुहाला, ईश्वराने वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या समुहाची परीक्षा धनसंपत्तीद्वारे होईल. भौतीक जगालाच जीवनाचे सार्थक एखादी व्यक्ती समजत असेल तर त्याची धन, संपत्ती त्याच्यासाठी एक कठीणतम परीक्षा सिद्ध होईल. अर्थात यामध्ये तो (असफल) नापास होईल.

पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व अनैतिकतेची ही सद्यस्थिती आमच्या देशाची ‘विशेषता’ बनली आहे... ज्या देशाला गर्व आहे धर्मप्रधान समाजाचा, अहिसा व अध्यात्मिकतेचा व स्त्रीत्वाच्या गौरवाचा व महिमेचा!!
तसे पाहता प्राचिन इतिहासामध्ये स्त्री कौटुंबिक व सामाजिक जीवनाच्या निच्चतम श्रेणीमध्ये दृष्टीस पडते परंतु ज्ञान, विज्ञानाची प्रगती तसेच संस्कृती व सभ्यता यामधील उत्क्रांतीमुळे परिस्थितीमध्ये बदल नक्कीच घडला आहे. तरी देखील अपमान, दुर्व्यवहार, अत्याचार व शोषणाच्या काही नवीन व आधुनिक (कु) परंपरांद्वारे आमच्या संवेदनशीलतेला खुले आवाहन दिले जात आहे. कन्या वधाच्या सीमित समस्येला विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे ‘‘गर्भ लिग चिकित्से’’ द्वारे व्यापक प्रमाणावर ‘‘स्त्रीभ्रूणहत्या’’ बनविले गेले. शैक्षणिक व आर्थिक दृष्टया पुढारलेल्या वर्गामध्ये ही प्रवृत्ती जोमाने फोफावत आहे, ही जास्त चितेची बाब आहे.
या व्यापक समस्येला थोपविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चिता व्यक्त होऊ लागली आहे. घोषवाक्यांपासून कायदे बनविण्यापर्यंतच्या सर्व वाटा चोखाळून झाल्या आहेत. जेथ-पावेतो कायदा व प्रशासनाचा प्रश्न आहे तेथे तर विटंबनाच ही आहे की, अपराध तीव्रगतीने पुढे पुढे जात असून कायदा व प्रशासन हळूहळू व तेही अंतर राखून चालले आहे. स्त्री मुक्ती आंदोलने अधुन मधुन चिता व्यक्त करीत असली तरी नाईटक्लब संस्कृती, सौंदर्य प्रतियोगिता संस्कृती, कॅटवॉक संस्कृती, पब संस्कृती, कॉलगर्ल संस्कृती, वॅलेन्टाईन संस्कृती, आधुनिक तसेच अतिआधुनिक संस्कृती मधील अनिर्बंध स्वैराचार, या सर्वांबाबत आणि (अमूल्य अशा मानवाधिकारांचा हवाला देवून) विकास व प्रगती बाबत जो उत्साह दाखविला जातो त्यांच्या तुलनेने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याबाबत कमी तत्परता दाखविली जाते.
काही वर्षांपूर्वी (मानव अधिकारांविषयी आयोजित) एका मुस्लिम सम्मेलनामध्ये बोलताना एका प्रसिद्ध व प्रमुख एन.जी.ओ. (बिगर शासकीय सेवा भावी संस्था) च्या विभागीय (महिला) सचीव उद्गारल्या की ‘‘देशातील पुरुष-स्त्री प्रमाणातील तफावत वाढत चालली आहे (१००० : ९७० ते १००० : ८४०). तरी देखील तुलनेने इतर समाजापेक्षा मुस्लिमांमध्ये ती तफावत नगण्य आहे. मी मुस्लिम समाजाला विनंती करते की, त्यांनी याबाबतीत इतर समाजाचे व राष्ट्राचे मार्गदर्शन व मदत करावी.
वर उल्लेखित लिग असंतुलनाबाबत एकाबाजूने हीच चिंता आमचे समाजधूरीण व्यक्त करीत असतात. दूसरीकडे प्रकर्षाने ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. या परिस्थितीची कारणे व कारण घटक तुलनात्मक विश्लेषणानंतरच स्पष्ट होऊ शकतील. मुस्लिम समाजात सून पेटविली जात नाही, बलात्कार करून हत्या होत नाही, आईबापाच्या खांद्यावरून हुंडा व लग्नाच्या खर्चाच ओझ दूर करण्यासाठी मुली येथे आत्महत्या करीत नाहीत. पत्नीशी पटत नसेल तर सुटका करून घेण्यासाठी ‘हत्ये’ ऐवजी ‘तलाक’ चा विकल्प आहे. या उप्पर स्त्री भ्रूणहत्येचा शाप मुस्लिम समाजामध्ये नाही.
वस्तुतः भारतीय मुस्लिम समाज पूर्णपणे एतद्देशीय असून भारतीय समाजाचे एक अंग आहे. येथील उपजत परंपरा व रीतिरिवाजां मधील निरंतर सहजीवन व देवाण घेवाणी मुळे मुस्लिम समाजावर प्रभाव पडला आहे व यामुळे तो स्वतःला आदर्श इस्लामी समाज बनवू शकला नाही. खूपशा कमतरता त्यामध्ये आहेत. तरी देखील जे वैशिष्टयपूर्ण सद्गुण आढळतात त्याचे कारण इतर काही देखील नसून या समाजाच्या प्रगती व जडणघडणीमधील इस्लामचे योगदान व प्रभावशाली भूमिका हेच आहे.
१४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामचा प्रवेश अरब द्वीपकल्पामध्ये वाळवंटातील त्या असभ्य व निरक्षर समाजामध्ये झाला तेव्हा त्या समाजामध्ये अनैतिकता, चारित्र्यहीनता, अत्याचार, अन्याय, नग्नता व अश्लीलतेबरोबर स्त्रीजातीच्या उपमर्दाचे व कन्या हत्येचे असंख्य प्रकार प्रचलित होते. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे दैवी कार्य ही काही एक अशी ‘समाज सुधारणा मोहीम’ नव्हती तिचा प्रभाव जीवनाच्या काही अंगावर मर्यादीत कालावधी करिता पडावा व नंतर पुन्हा ‘‘येरे माझ्या मागल्या’’ व्हावे.या उलट प्रेषित (स.) चे लक्ष्य ‘संपूर्ण-परिवर्तन’ तसेच सर्वसमावेशक व स्थायी ‘क्रांती’ चे होते. याच करीता प्रेषित (स.) नी मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्यांना अलग अलग सोडविण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे कार्य केले. इस्लामच्या दृष्टीकोनातून या समस्येचा मूल बिदू सामाजिक व्यवस्था अथवा कायदा व प्रशासन नसून स्वयं ‘मानव’ आहे... अर्थात व्यक्तीचे अंतरंग, अंतरात्मा, त्याची प्रकृती व मनोवृत्ती, त्याचा स्वभाव, सद्सदविवेक बुद्धी, त्याच्या धारणा व अवधारणा, विचारसरणी, मानसिकता तसेच मनोप्रकृती होय !!
इस्लामच्या धोरणानुसार मानवाचा आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराशी वास्तविक व नैसर्गिक संबंध जितका कमजोर असतो, समाजात तितके बिघाड निर्माण होतात. याचकरीता इस्लामने मानवामध्ये एकेश्वरवादाची भक्कम धारणा व पारलौकिक जीवनातील कर्मानुसार चांगला अथवा वाईट मोबदला (कर्मावर आधारित स्वर्ग अथवा नरक) मिळण्याचा अटूट विश्वास निर्माण करून पहिले पाऊल टाकले. पुढील पाऊल हे होते की, याच धारणेलाव विश्वासाला पायाभूत ठरवून समाजामध्ये सत्कर्याच्या प्रस्थापनेसाठी व संवर्धनाकरीता तसेच वाईट प्रवृत्ती व दुःष्कृत्यांचे दमन व निर्मूलनाचे कार्य करावे. इस्लामची संपूर्ण जीवन व्यवस्था याचसिद्धांतावर आधारित असून याच द्वारे कुप्रवृत्ती व दुष्कृत्यांचे निवारण होते.
कन्यावधाला समुळ नष्ट करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) नी अभियान चालविण्याऐवजी, भाषण करण्याऐवजी, आंदोलन करण्याऐवजी, कायदा-पोलीस, न्यायालय-जेल हे चालविण्याऐवजी फक्त एवढेच विधान केले, ‘‘ज्याला एक (अथवा अधिक) मुली असून तो त्यांना (प्रचलित प्रथेनुसार) जीवंतच गाडून टाकून हत्या करीत नसून, त्यांचे प्रेमाने व आपुलकीने पालनपोषण करील, त्यांना (सत्कर्म, शालीनता, सदाचारण व ईशपरायणतेचे) उत्तम ज्ञान देईल, तसेच मुलांना त्यांच्यावर प्राधान्य देणार नाही व उत्तम वर बघुन त्यांची गृहस्थी वसवून देईल, तो पारलौकिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये माझ्या सोबत राहील.’’
पारलौकिक, जीवनावर दृढ विश्वास करणाऱ्या लोकांवर वरील संक्षिप्त शिकवणीने जादुप्रमाणे प्रभाव टाकला. ज्यांचा चेहरा मुलीच्या जन्मामुळे काळवंडत असे (कुरआन १६ : ५८) त्यांचे चेहरे या विश्वासाने उजळले की त्यांना स्वर्गप्राप्तीचे साधनच मिळाले. तद्नंतर मुलगी शाप नव्हे तर वरदान, ईश कृपा, सौभाग्य व भरभराट समजली जाऊ लागली आणि पाहता पाहता समाजाने कात टाकली.
मानवी स्वभावानुसार मानव एखादे कृत्य कधई लाभाच्या आशेने करतो, तर कधी भीती, भय व नुकसानी पासून वाचण्याकरिता करतो. मानवाच्या निर्माणकर्त्या ईश्वरा व्यतिरिक्त इतर कोण बरे मानवी प्रवृत्ती व प्रकृतीला जाणू शकेल? यास्तव कन्या हत्या करणाऱ्यांना अल्लाहने चेतावणी दिली आहे. या अजब चेतावणीची शैली अशी आहे की, अपराध्याला नव्हे तर हत्या केल्या गेलेल्या मुलींना संबोधून कुरआन मध्ये प्रश्न केला गेला आहे.
‘‘आणि जेव्हा (परलोकांत हिशोबाच्या व न्यायनिवाडाच्या दिवशी) जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला (ईश्वराकडून) विचारले जाईल, की तुझी हत्या कुठल्या अपराधापाई केली गेली.’’ (कुरआन ८१ : ८, ९)
या ऋचेनुसार कन्याहत्या करणाऱ्यांना सक्त चेतावणी दिली गेली असून सर्वोच्च व सर्वशक्तीमान न्यायाधीश अल्लाहच्या न्यायालयात कठोर शिक्षा मिळणे ठरलेले आहे. एकेश्वरवादाच्या धारणेचा व त्या अंतर्गत पारलौकिक जीवनावरील दृढविश्वासाचाच हा चमत्कार होता की मुस्लिम समाजामधून कन्याहत्येचा शाप समूळ नाहीसा झाला. गत १४०० वर्षांपासून हाच विश्वास, हीच धारणा सूप्तपणे मुस्लिम समाजामध्ये कार्यरत आहे आणि आज देखील भारतीय मुस्लिम समाज कन्याहत्येपासून दूर, सुरक्षित आहे. देशाला या शापापासून मुक्त करण्यासाठी इस्लामच्या चीरस्थायी व प्रभावशाली विकल्पाचा परिचय करुन देणे ही सद्यस्थितीची नितांत गरज आहे.

कुरआन मुस्लिमांचा धर्मग्रंथ मानला जातो. वास्तविकपणे अखिल मानवजातीसाठी त्यांच्या निर्माणकर्त्या स्वामीने पाठविलेला तो संदेश आहे. ईशग्रंथापैकी ती परिपूर्ण आणि शेवटचे संकलन आहे. पवित्र कुरआननंतर कोणताही ईशग्रंथ जगात अवतरल्याचे आढळून येत नाही. हा ग्रंथ सर्व माणसांच्या मार्गदर्शनासाठी अवतरला असून जीवनाच्या प्रत्येक अंगात तो मागदर्शक आहे. जगाकडे पाहाण्याचा माणसाचा दृष्टिकोन तो स्पष्ट करतो, त्याला जीवन व्यतीत करण्याची पद्धत शिकवितो, त्याला त्याच्या कर्तव्यांचे स्मरण करून देतो, त्याला सत्कर्मांची फळे दाखवून देतो व दुष्कर्मांच्या वाईट परिणामांची भयसूचना देतो.
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर हा ग्रंथ जसा अवतरला होता, अक्षरशः त्याच अवस्थेत आजही तो आमच्यापाशी उपलब्ध आहे. इस्लामच्या पहिल्या शताब्दीपासून ते आजपर्यंतच्या कुरआनच्या हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत. या प्रती एकमेकांना प्रमाणित करतात आणि पुष्टी देतात. कुरआन हे जगातील पहिले असे पुस्तक आहे, ज्याला प्रत्येक कालखंडात, जगातील लाखो माणसांनी मुखोद्गत केले आहे. संपूर्ण कुरआन मुखोद्गत करणार्याला ‘हाफीज’ असे म्हटले जाते. रमजान महिन्यात दररोज रात्री संपूर्ण कुरआनचे पठन केले जाते. अशा प्रकारे सबंध जगातील लाखो मस्जिदींमध्ये संपूर्ण कुरआनचे पुनःर्पठण केले जाते.
या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी तो संपूर्णपणे लिहून मुहम्मद(स.) यांच्याकडे देण्यात आला नव्हता. प्रेषितपद प्राप्त झाल्यानंतरच्या त्यांच्या २३ वर्षांच्या जीवनकाळात तो टप्प्याटप्प्याने अवतरित होत राहिला. कुरआनच्या अवतरणाची या शृंखलेचा, मुहम्मद(स.) यांच्याद्वारा इस्लाम धर्माच्या स्थापनेशी थेट संबंध होता.
प्रेषित मुहम्मद (स.)
पवित्र कुरआन जसा मुस्लिमांचा धर्मग्रंथ समजला जातो. त्याचबरोबर मुहम्मद(स.) यांनाही मुस्लिमांचे प्रेषित मानले जाते. वास्तवतः ही गोष्ट खरी नाही. अल्लाहने मुहम्मद(स.) यांना अखिल मानवजातीसाठी आपला प्रेषित बनवून धाडले होते.
जगात आजवर होऊन गेलेल्या धर्मगुरूंपैकी प्रेषित मुहम्मद(स.) यांचे जीवनचरित्र सर्वांहून अधिक तपशिलासह आणि विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध आहे. त्यात त्यांचे जीवन व त्यांची शिकवण या दोहोंचा समावेश आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म कालौघाच्या अशा वळणावर झाला, जेव्हा संस्कृतीचा प्रकाश पसरला होता आणि मानवजात आधुनिक युगात प्रवेश करीत होती.
प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म मक्केत झाला. त्या काळी मक्का एक छोटे शहर होते. त्यांचा जन्म झाला, तेव्हा परिस्थिती अत्यंत विपरित होती. जन्मापूर्वीच त्यांच्या पित्याचे निधन झाले. मातेची मायाही त्यांना अधिक काळ मिळू शकली नाही. एखादा थोरला भाऊही नव्हता, त्यांचे चुलते अबू तालीब यांचा थोडासा आधार होता. आर्थिक स्थितीही हलाखीची होती. यासाठी त्यांना शेळ्या चारावयास नेण्याचे आणि दुसर्या लोकांचा व्यापारी माल विक्रीसाठी नेण्याचे काम करावे लागले. त्यांचे मोठे धन, त्यांच्या नैतिक चारित्र्यात होते, ज्याचा सुगंध मक्केतील सर्व लोकांना जाणवत होता. विश्वासू व प्रामाणिक म्हणून त्यांना ओळखले जाई. आपल्या मौल्यवान वस्तू त्यांच्यापाशी ठेवून सुरक्षिततेचा निःश्वास सोडीत असत. लोक त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकत, त्यांचा शब्द मानीत असत. एखादे भांडण झाले आणि ते मिटण्याचे लक्षण दिसले नाही, तर लोक त्यांना पंच म्हणून निवड करीत व त्यांनी दिलेला निर्णय स्वीकार करीत असत.
त्यांचे वय चाळीस वर्षांचे झाले तेव्हा अल्लाहने त्यांना आपला प्रेषित म्हणून घोषित केले. आणि त्यांच्याकडे पवित्र कुरआनचे अंश येऊ लागले. अल्लाहचा संदेश घेऊन ते लोकांपाशी गेले. त्यांना सांगितले की केवळ एकमेव अल्लाहचीच उपासना करा आणि मूर्तिपूजा सोडा. लोकांना सांगितले की खरे बोला, न्यायाने वागा, कोणाचीही संपत्ती हडप करू नका, सर्व माणसे एकाच माता-पित्याची संतती आहेत. त्यांच्यात कसलाही भेदभाव करू नका. या गोष्टी ऐकून मक्केचे लोक बिथरले, किबहुना ते प्रेषितांचे शत्रू बनले. त्यांचा छळ केला गेला. त्यांना ठार मारण्याचा कट शिजवला गेला. तेव्हा प्रेषितांनी मक्का शहर सोडण्याचे ठरविले. मदिन्याच्या लोकांनी त्यांना साथ देण्याची शपथ घेतली व आपल्या शहरात त्यांना जागा दिली. काही दिवसांतच तेथे एक आदर्श इस्लामी समाज स्थापन झाला. मक्केचे लोक तेथेही लढाई करायला आले, पण पराजित होऊन परतले. शेवटी मुहम्मद(स.) व त्यांच्या सोबत्यांची सत्ता मक्केवरही प्रस्थापित झाली. मुहम्मद(स.) यांच्या नंतरही इस्लामी राज्याचा विस्तार होत राहिला. राज्यच नव्हे, तर त्यांच्या शिकवणींचा व पवित्र कुरआनचा प्रसार सर्वदूरपर्यंत झाला.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget