Latest Post

इस्लाम एकमेव धर्म आहे ज्याला आचरणात आणले जावे. आता इस्लाम हाच एकमेव धर्म आहे ज्याला अल्लाहने मान्यता दिली आहे. अल्लाहने इतर सर्व धर्म रद्दबातल ठरविले आहेत. त्यामुळे सर्व युगांतील, देशांतील लोकांनी इस्लामला आचरणात आणावे. कारण हा धर्म आणि त्याचे प्रेषित समस्त मानवजातीसाठी आहेत. इतर प्रेषितांचे धर्म संपुष्टात आले आहेत. प्रेषित या पृथ्वीवर पाठविण्यात आले याचसाठी की त्यांना ईशप्रेषित मान्य करून त्यांचे आज्ञापालन विनाअट व्हावे. हे सर्वसमक्ष आहे,
‘‘आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे याकरिताच की अल्लाहच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी.’’ (कुरआन ४: ६४)
इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यास अपवाद नाही. वरील तत्त्व सर्व प्रेषितांसाठी आहे. प्रेषित मुहम्मद (स.) हे समस्त मानवजातीसाठी प्रेषित आणि तेसुध्दा अंतिम प्रेषित आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व मानवांची श्रध्दा त्यांच्यावर आहे आणि त्यांचे सर्व अनुयायी आहेत. कोणी त्यांचे प्रेषित्व स्वीकारित नसेल आणि त्यांचे आज्ञापालन (इस्लामचे) करत नसेल तर ती व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशीच द्रोह करीत नाही तर विश्वनिर्मात्याशी द्रोह करते, ज्याने मुहम्मद (स.) यांना संपूर्ण जगासाठी त्याचा अंतिम प्रेषित आणि मार्गदर्शक म्हणून पाठविले.
कुरआनव्यतिरिक्त आज कोणताही दुसरा ईशग्रंथ सुरक्षित नाही किवा त्याची मूळ भाषा जिवंत भाषा म्हणून आज अस्तित्वात नाही. मग दुसऱ्या ग्रंथाचा विश्वासपूर्वक स्वीकार कसा कराल? ही स्थिती इतर ईशग्रंथ आणि धर्मांना त्याज्य करण्यास बळकटी देते कारण आज ते मूळ स्थितीत नाहीत आणि ते कालबाह्य झालेले आहेत. वरील सर्व विवेचन हे न्यायसंगत आणि सुबुध्दीने घेतलेला निर्णय आहे. आता इस्लामचा स्वतःचा निर्णय काय आहे ते पाहू या.
‘‘अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (कुरआन ३: १९)
‘‘इस्लामशिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म (जीवनपध्दती) अंगिकारत असेल, त्याची ती पध्दत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये तो अयशस्वी व विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
वरील दोन्ही आयतींचे शब्द अगदी स्पष्ट आहेत आणि सर्वकाही स्पष्ट करतात. पहिल्या आयतीचा निर्णय ‘‘धर्म अल्लाहजवळ केवळ इस्लाम आहे.’’ हे अगदी स्पष्ट आहे तर दुसऱ्या आयतीचा निर्णय आहे की इस्लामव्यतिरिक्त दुसरा धर्म जर कोणी अंगिकारत असेल तर त्याचा तो धर्म स्वीकृत होणार नाही आणि त्यास अल्लाहची भक्ती म्हणता येणार नाही. यापेक्षा अधिक स्पष्ट निर्णय दुसरा कोणता असू शकतो?
असे समजणे की या दोन आयतींमध्ये इस्लाम हा शब्द साधारण अर्थाने वापरला आहे आणि तो तांत्रिक अर्थाने वापरलेला नाही हे अगदी चुकीचे आहे. साधारण अर्थ म्हणजे सर्व ईशधर्म आणि त्यांचे आज्ञापालन करणे. परंतु हे चूक आहे, कारण कुरआनमध्ये वरील आयतीत (कुरआनवचन) ‘इस्लाम’ नव्हे तर ‘अल्इस्लाम’ हा शब्दप्रयोग आला आहे. अरबी भाषेच्या नियमानुसार, कुरआन जेव्हा ‘अल्इस्लाम’ हा शब्द वापरतो तेव्हा तो साधारण अर्थाने नव्हे तर तांत्रिक अर्थाने (पारिभाषिक) वापरला आहे. अल्लाहजवळ खरा आणि स्वीकार्य धर्म हा आहे की व्यक्तीने अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता स्वीकारावी आणि त्याला पूर्ण शरण जावे. म्हणून अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) आल्यानंतर अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता पूर्ण शरणागती ही आहे की व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा ठेवावी आणि त्यांचे आज्ञापालन करावे. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व वैश्विक आणि शाश्वत असे आहे. जर एखाद्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा नसेल किवा त्यांना ती व्यक्ती प्रेषित मान्य करीत असेल, परंतु त्यांचे आज्ञापालन करीत नसेल तर ही अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता होत नाही आणि असे कृत्य अल्लाहचा उघड उघड विरोध ठरते.
इस्लामची आज्ञाधारकता आवश्यक आहे. याचा पुरावा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचरणात मिळतो. हा महत्त्वाचा पुरावा आहे आज्ञाधारकतेचा जी अनिवार्य आहे अन्यथा अशी व्यक्ती घोर अन्यायी आणि आत्मप्रेमप्रवण असते. ही संकल्पना की सर्व धर्म दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय’ आहे. एकीकडे ते इतर प्रेषितांवर श्रध्दा बाळगून अल्लाहवर श्रध्दा ठेवण्याची गरज पूर्ण करतात आणि दुसरीकडे मुहम्मद (स.) यांना अल्लाहचा प्रेषित अमान्य करून ते अल्लाहच्या ईशत्वाला आणि स्वामीत्वाला विरोध करतात. ही मानसिकता ‘अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह’ आहे. कारण ही संकल्पना अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह करण्यासारखे आहे. हे ‘स्व’पुढे लोटांगण घेण्याससारखे आहे. ग्रंथधारक लोकांच्या या वृत्तीबद्दल कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जे काही अवतरले आहे त्यावर ईमान धारण करा तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर केवळ त्यावर ईमान धारण करतो जे आमच्याकडे (इस्राईलच्या संततीकडे) अवतरले आहे. त्याव्यतिरिक्त जे काही आले आहे ते मानण्याचे नाकारतात.’’ (कुरआन २: ९१)
ग्रंथधारक लोक इस्लाम स्वीकार करण्याच्या आमंत्रणाला जे उत्तर देतात ते अधिक लक्ष देऊन पाहिले पाहिजे, हीच ती मानसिकता आहे आणि तत्त्वज्ञान आहे ज्यावर सर्व धर्म समभावचे तत्त्व आधारित आहे. ते युक्तिवाद करतात की आमचा धर्मसुध्दा ईशधर्म आहे, मग हे पूरेसे नाही की आम्ही त्याचे पालन करतो आणि त्यावर आमचा विश्वास आहे? हे असे का आहे की आमच्यावर दुसऱ्याची आज्ञाधारकता आणि अनुयायित्व लादले जात आहे जे आमच्या धर्मासारखेच सत्य धर्म आहे? अशा आमच्यासारख्याच धर्मावर आम्हाला श्रध्दा ठेवण्यास सांगितले का जात आहे? त्यांचे हे तत्त्वज्ञान अल्लाहने खोटे ठरविले, ज्यात त्यांच्या धर्मासारखेच इतर धर्मांना ते मानतात. अल्लाहने त्यांना (अशा ग्रंथधारकांना) ‘पक्के अश्रध्दावंत’ म्हणून घोषित केले आहे. ग्रंथधारक लोकांनी इस्लामचा स्वीकार करण्यास नकार देणे हे कुरआनच्या दृष्टिकोनातून अश्रध्दावंतांसारखे कृत्य आहे. दोघांचे दुष्परिणाम एकसारखेच आहेत. अल्लाहला त्यांच्या त्या धर्म आणि श्रध्देला चिकटून राहाणे मान्य नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,
‘‘मूसा (अ.) जिवंत असते तर त्यांच्यापुढे माझे अनुयायित्व स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.’’ (मिश्कात)
वरील प्रेषितांचे कथन अगदी स्पष्ट आहे. जर इतर प्रेषित हे सर्वजण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात जिवंत असते तर सर्वांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचेच अनुयायित्व पत्करले असते. त्यांना त्यांच्या धर्मांवर आचरण करण्याचा पर्याय शिल्लक राहिला नसता. अशा स्थितीत सर्वसामान्य माणसाला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञाधारकतेपासून सूट कशी देता येईल? प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित इस्लामच्या उपस्थितीत इतर धर्मांवर आचरण करणे कसे शक्य आहे?
इस्लाम मुक्तीसाठी आवश्यक: दुसरा महत्त्वाचा परिणाम या वैशिष्टपूर्ण गुणाचा हा आहे की पारलौकिक जीवनातील मुक्ती इस्लामवर अवलंबून आहे. प्रत्येकावर इस्लामचे आचरण करणे बंधनकारक आहे आणि इतर धर्म हे अल्लाहजवळ मान्य नाही आणि स्वीकार्यसुद्धा नाहीत. याचाच अर्थ असा आहे की इस्लाममध्येच मुक्ती आहे. आता आपण पाहू या की अल्लाह त्या लोकांना जे इतर धर्म पाळतात त्यांना अल्लाह अमान्य करत आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘इस्लामव्यतिरिक्त अन्य धर्म जो कोणी अंगिकारत असेल तर तो धर्म कदापि स्वीकारला जाणार नाही.’’ (कुरआन ३: ८५)
‘‘मरणोत्तर जीवनात तो अयशस्वी आणि विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वरील कुरआनोक्तींना स्पष्ट करताना सांगितले आहे,
‘‘अल्लाहची शपथ, ज्याच्या हातात मुहम्मद (स.) यांचा जीव आहे ज्या कोणाजवळ माझ्या प्रेषित्वाचा संदेश पोहचेल, मग तो यहुदी असो की ख्रिश्चन, जर त्यांनी माझा संदेश स्वीकार केला नाही तर तो नरकाग्नीचा भक्ष ठरेल.’’
वरील हदीसमध्ये यहुदी आणि ख्रिश्चनांचे नाव उदाहरणाखातर घेण्यात आले आहे. वरील संदेश समस्त मानवजातीसाठी आहे हे अगदी स्पष्ट आहे. कोणताही समाज, कोणत्याही देशाला अथवा धार्मिक गटाला या संदेशापासून सुटका नाही.
हा फक्त अनुमान नाही तर स्पष्ट आणि उघड सत्य आहे, ‘‘जो कोणी मानवी समाजाची व्यक्ती.’’ अर्थातच याचा अर्थ इस्लामकडे आमंत्रिक लोक असा आहे. हा तो लोकसमुदाय आहे ज्यात आदरणीय मुहम्मद (स.) यांना अल्लाहने प्रेषित म्हणून पाठविले आहे. येथे समस्त मानवजातीचा उल्लेख आला आहे. म्हणून हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा ठेवावी. प्रत्येकजण मग तो हयात असेल अथवा पुढील पिढ्यांमध्ये जन्माला येत असेल. म्हणून हा निर्णय इतर सर्वांप्रमाणेच यहुदी आणि ख्रिश्चनांनासुध्दा सारखाच लागू आहे. जगातील समस्त मानवजातीं पैकी यहुदी आणि ख्रिश्चनांनाच कुरआनने ‘ग्रंथधारक लोक’ म्हणून संबोधले आहे. त्यांनाच फक्त प्रेषितांचे अनुयायी आणि ईशधर्माचे अनुयायी म्हणून संबोधले गेले आहे. ज्याप्रमाणे मुक्तीसाठी ग्रंथधारकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आज्ञाधारक बनणे आवश्यक आहे. तितकेच इतर लोकांसाठीसुध्दा आवश्यक आहे. म्हणून आज्ञाधारकता ही इस्लामची अनिवार्यता आहे मुक्ती प्राप्त करण्यासाठी. ज्या माणसाला इस्लामचा संदेश मिळाला नाही त्यालाच या नियमातून वगळण्यात येईल.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याविषयी उल्लेख केला आहे, ‘‘जो कोणी मला ऐकले नसेल.’’
ही व्यवस्था यासाठी आहे की अशा स्थितीत एखादा निरपराध असतो. जोपर्यंत मनुष्य इस्लामचा संदेश प्राप्त करत नाही तोपर्यंत तो आज्ञाधारकतेपासून मुक्त असतो. अशा स्थितीत प्रत्येकाला जबाबदार धरणे हा घोर अन्याय आहे. परंतु ज्याला हा संदेश प्राप्त होऊनसुध्दा त्याने इस्लामवर श्रध्दा ठेवली नाही तर त्यास तो जबाबदार असेल. अशांना शिक्षेविना सोडून देणे न्यायविरोधी कृत्य ठरेल, कारण इस्लामची आज्ञाधारकता स्वीकारण्यास नकार देणे ही काही किरकोळ बाब नाही. सत्य धर्माला स्वीकारण्याला हा त्याचा नकार आहे. हे अल्लाहच्या सार्वभौमत्वाला नाकारणे आहे. अशा द्रोहींना शिक्षा देणे हे अन्यायकारक आणि गैरकृत्य ठरविणे हे सत्याचे विडंबन आहे. अशा बादशाहाची आपण कल्पना करू शकतो की तो आपल्या प्रजेला पूर्ण स्वातंत्र्य देतो की त्याने आज्ञापालन करू नये, त्याच्या सेनापतिचे ऐकू नये आणि ज्यांना बादशाहने काढून टाकले अशांचे आज्ञापालन करावे आणि अशा धर्माचे आज्ञापालन करीत जावे जो राजधर्म नाही? हे अगदी अशक्य आहे. मग हे कसे शक्य आहे की निर्माणकर्त्या स्वामीने तुम्हाला शिक्षा करू नये जेव्हा तुम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांना नाकारता ज्यास अल्लाहने समस्त मानवतेसाठी पाठविले आहे? त्याचा धर्म ज्यास त्या ईश्वराने समस्त मानवतेसाठी मान्य केला, त्याला तुम्ही नाकारल्यानंतर तो ईश्वर तुम्हाला जाब का म्हणून विचारणार नाही? हे किती हास्यास्पद आहे की अल्लाहने ‘अ’ या व्यक्तीला प्रेषित म्हणून समस्त मानवजातींसाठी नियुक्त करावे की त्या प्रेषितांने सर्वांना मार्गदर्शन करावे. परंतु लोकांनी दुसऱ्या कुणाला या कामासाठी स्वतः नियुक्त करावे. हे किती हास्यास्पद आणि विचित्र आहे. जर कुणाचे हे अज्ञान असेल की त्यास ‘अ’ हे अल्लाहचे अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित आहे हे माहीत नाही. परंतु ज्यांना हे माहीत आहे की ईश्वराचा अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित कोण आहे तरी ते आपल्या मनोकामनांचेच बळी ठरतात? त्यांचे हे कृत्य क्षम्य कसे ठरवता येईल?

कुरआनमधील आले इमरान या अध्यायात आयत क्र. 26 मध्ये म्हटले आहे की, ’वतु इज़्ज़ुमनत्तशाऊ वतू ज़िल्लूमनत्तशाऊ’ अर्थात सन्मान आणि अपमान दोन्ही अल्लाहकडूनच  आहेत. सदरची आयत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरित झाली ती प्रलयाच्या दिवसापर्यंत येणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक आहे. याचा अर्थ समजून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी  आवश्यक आहे. या आयातीचा अर्थ लावताना कुरआनच्या अनेक भाष्यकारांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे या आयातीचा उद्देश पुण्यवान लोकांना  अधिक पुण्याची कामे करण्यासाठी प्रेरित करणे आहे.
माणूस जेवढा जास्त नीतिमान होतो आणि पुण्याची कामं करतो तेवढाच तो अल्लाहच्या पसंतीला उतरतो आणि त्या बदल्यात त्याला जगामध्ये सन्मान आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतात.  पुण्याची कामे केल्याने सन्मान आणि प्रसिद्धी विनासायास यासाठी मिळते की, त्या कामामुळे सामान्य जनांना त्याचा सरळ लाभ होतो आणि सामान्य माणसं मग पुण्यवान माणसांची  कदर करू लागतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांचे नाव लोकांच्या तोंडात राहते आणि लोकालोकी त्यांच्या पुण्यकर्माची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते.
जगामध्ये काही असे लोकही आहेत जे स्वार्थी, घमंडी आणि सदैव प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्यांना येनकेन प्रकारेन स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची आणि काहीही करून प्रसिद्धी  मिळवायची इच्छा असते. अशा लोकांना सुद्धा या आयातीमध्ये चेतावनी दिलेली आहे की, तुम्ही कितीजरी प्रयत्न केला तरी जोपर्यंत अल्लाह सन्मान आणि प्रसिद्धी प्रदान करणार नाही  तोपर्यंत तुम्हाला ती प्राप्त होणार नाही. सर्वसाधारणपणे पुण्य न करता प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या लोकांनी आपल्या मनाशी एक खूनगाठ बांधलेली असते की, प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही  स्वतःच्या प्रयत्नांनी अर्जित करता येतात. अनेक लोक बोलूनसुद्धा दाखवितात की, ही प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आम्ही स्वकष्टाने अर्जित केलेली आहे. मात्र ती कमावतांना ते अनैतिक मार्गाचा सुद्धा अवलंब करत असतात. ज्यावेळेस असे लोक अनैतिक मार्गाचा अवलंब करतात तर अल्लाह त्यांना मोहलत (संधी) देत असतो. मात्र काही लोक या संधी मागील ईश्वरीय  मन्सुब्याला ओळखू शकत नाहीत आणि आपल्याच भ्रमात फार पुढे निघून जातात. अशा लोकांना प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही मिळतात पण त्यातील फोलपणा त्यांना कळत नाही. अशा लोकांना मिळालेली प्रसिद्धी ही नकारात्मक असते आणि सन्मान हा फक्त तोंडावर केला जातो. पाठ फिरताच लोक वाईट बोलू लागतात. कारण ज्या पद्धतीने खोटे बोलून, चोरी   करून, फसवणूक करून, अप्रामाणिकपणे असे लोक धन, सन्मान आणि प्रसिद्धी मिळवत असतात त्याबद्दल जनतेला खडा न् खडा माहिती असते. केवळ ते तोंडावर बोलून दाखवत  नाहीत एवढेच. या वाईट गोष्टींबरोबर केली जाणारी प्रगती ही खरी प्रगती नसते. कारण या सगळ्या गोष्टी अल्लाहला नापसंत असून, त्याचा रोष ओढवून घेण्यासाठी पुरेशा आहेत.  अल्लाह आपल्या प्रत्येक बंद्याकडे पाहत असतो. त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माकडे पाहत असतो. ज्याला ज्या पद्धतीने प्रसिद्धी आणि प्रगती हवी असते तो त्याला त्याच पद्धतीने  पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करत असतो. जर वाम मार्गाने सन्मान आणि प्रगती मिळविणारे लोक वेळीच सावधान झाले आणि त्यांनी तौबा केली व वाईट मार्गाचा त्याग करून सन्मार्गाला लागले तर अल्लाह त्यांना क्षमा करतो. मात्र प्रगती आणि प्रसिद्धीच्या नशेमध्ये ती खेचून आणण्याकडेच ज्या लोकांचा कल असतो ते संधी मिळूनही सावध होत नाहीत, असे  लोक जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त पुढे जातात तेव्हा अल्लाह त्यांना त्यांची जागा सुद्धा दाखवून देण्यास मागे पुढे पाहत नाही. हाच या आयातीचा खरा अर्थ आहे.
म्हणजेच अल्लाह ज्याला सन्मान आणि प्रगती देऊ इच्छितो त्यांना ती देतो आणि ज्यांना देऊ इच्छित नाही त्यांना ती बिल्कूल देत नाही. तो अल्लाहच आहे ज्याने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आपलीही रचना त्यानेच केलेली आहे आणि तोच पूजनीय आहे.
अनेक लोक खोट्या सन्मान आणि प्रसिद्धीच्या मागे आयुष्यभर पळत असतात. आजकाल स्वस्थ प्रसिद्धी आणि खोटा सन्मान प्राप्त करण्यामध्ये लोक एकमेकांशी स्पर्धा  करीत आहेत  आणि हीच लालसा त्यांना वाममार्गाकडे घेऊन जात आहे. पण प्रसिद्धीच्या नशेमध्ये झिंगलेल्या या लोकांना आपण काही वाईट करत आहोत, हेच लक्षात येत नाही, असे लोक चांगल्या  लोकांचा दुस्वास करतात, त्यांची इर्शा करतात. अनीतिने कमाविलेल्या पैशाच्या जोरावर सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात.
त्याच वेळेस दूसरे लोक अत्यंत प्रामाणिकपणे अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर चालून कठीण परिश्रम करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात. खऱ्याने वागत असतात.  इतरांची मदत करतात. मग अल्लाह त्यांना त्याच मार्गामध्ये बरकत अता करतो. ज्यामुळे अशा लोकांची प्रगती आणि सन्मान जनतेमध्ये उत्तरोत्तर वाढत जातो. मात्र यामध्ये  कोणताही नकारात्मक पैलू नसतो.
या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात येते की, प्रसिद्धी आणि प्रगती एका गटाला अल्लाहकडून पुरस्कार स्वरूपात मिळत असते तर दूसरा  गट ती स्वतःच्या बळावर खेचून आणण्याच्या प्रयत्नात असतो. अशा लोकांना अल्लाह सन्मार्गावर चालण्याची समज देओ आणि जी प्रगती आणि सन्मान अल्लाहकडून मिळतो त्या  पुण्यवान लोकांची तशीच प्रगती होवो. (आमीन.)

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या प्राचीन संस्कृतीमध्ये ग्रीक, रोमन, सिंधू, इजिप्त यांचा समावेश होतो आणि या संस्कृतीनुसार जीवनपद्धतीने जीवन जगणारे आणि चालणाऱ्या  देशांमध्ये ग्रीक, रशिया, इजिप्त, भारत, इराण, इराक या देशांचा अंतर्भाव होतो. या देशांच्या इतिहासापूर्वी पृथ्वीतलावर एका आदीमानवांचं जोडपं म्हणजे नर-मादी (आदम व हव्वा)  यांचे प्रगटन झाले आणि त्यापासून मानव जातीचा विकास व निर्मिती झाली. स्वतःच्या जीवीताच्या रक्षणासाठी मानव समूह करून राहू लागला व जसजशी मानवांच्या संख्येत वाढ  झाली तसतसा तो नदीच्या बाजूच्या सुपीक प्रदेशात वास्तव्य करू लागला. त्यातून विविध संस्कृतींची निर्मिती झाली. उदा. सिंदू नदीच्या खोऱ्यातील सिंधू संस्कृती तसेच नाईल नदीच्या  खोऱ्यातील इजिप्तची संस्कृती होय.
अशा अनेक संस्कृतीमध्ये जीवन जगत असताना मानवाने आपल्या बुद्धीकौशल्यावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा यथायोग्य प्रयत्न केला.  परिणामी धर्मव्यवस्था प्रचलित झाली. ’’धर्म म्हणजे जीवन जगण्याची नियमावली.’’ निसर्गाद्वारे धर्माची आचारसंहिता अवतरली. एका मूळ धर्माचे अनेक धर्म झाले. नंतर यापैकी अनेक  धर्मांमध्ये काही कालावधीपर्यंत स्त्रीचे स्थान अत्यंत दीन किंवा निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळे तिच्याकडे उपभोग्य वस्तू अथवा निर्जीव वस्तू म्हणून तिला हीन लेखले जात होते.
ग्रीक, रशिया, इजिप्त, इराक, भारत, चीन या प्रत्येक ठिकाणी स्त्रीयांवर अत्याचारच होत होता. बाजार, उत्सव, उरूस यामध्ये स्त्रीयांची कवडीमोल किंमतीत विक्री खरेदी आणि तस्करी होत होती. पैगंबर मुहम्मद (सल्ल.)  यांच्या पूर्वीच्या काळात तर ग्रीकमध्ये स्त्रीला आत्मा आहे की नाही, यावर हजारो वर्ष वादविवाद झाले. पाप-पुण्याच्या कल्पना मांडत असतानाच  पापाचे प्रतिरूप म्हणून स्त्रीकडे पाहिले जाऊ लागले. पापाची सुरूवात स्त्रीच्या जन्मापासून सुरू झाली अशाही अख्याईका रचल्या गेल्या आणि त्याला पौरोहीत्याच्या आधार दिला गेला. त्यामुळे स्त्री जन्माला आल्यापासून ते तिच्या अंतापर्यंतचे संपूर्ण जीवन दुसऱ्याच्या अधिन करण्यात आले. त्याचबरोबर तिला दुसऱ्यावर विसंबुनच जगण्याची व्यवस्था बहुतांशी देशांमध्ये  निर्माण केली गेली. जन्मापासून विवाहापर्यंत तिला वडिलांच्या अधिन ठेवले तर विवाहानंतर वृद्धापकाळापर्यंत पतीच्या तर वृद्धापकाळापासून मृत्यूपर्यंत मुलाच्या अधिन अशाप्रकारची जीवनपद्धती तीच्या नशिबी मारली. एवढेच नाही तर ’’नारी नरक का द्वार है’’ असेही समजले गेले. तर तिचे संपूर्ण जीवन हे हक्काशिवाय होते. त्यामुळे मुलगी जन्माला येणे म्हणजे  पाप समजले जायचे, मुलीच्या जन्माच्या बातमीने पिता अपमानीत व्हायचा आणि तो अपमान रक्ताचा घोट गिळल्यासारखा त्याला गिळंकृत करावा लागायचा. अपमानाने व शरमेने तो  आपले तोंड लपवून फिरायचा तर मान खाली घालून जीवन कंठायचा. अशा प्रकारची स्त्रीविषयी अनास्था अनेक धर्मात थोड्या-अधिक प्रमाणात होती.
पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या पूर्वीच्या काळातही अरबी टोळ्यामध्ये वरील परिस्थितीपेक्षा खूप काही वेगळी गत नव्हती. कारण अरबवासी मुलांना संपत्ती व गर्वाचे साधन समजायचे  तर मुलगी अपमानाचे,क्लेशदायक व लज्जास्पद समजत. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पूर्वीच्या काळामध्ये मुलींच्या बाबतीत काही अरबी टोळ्यामध्ये काही अमानवी प्रथा होत्या.
मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या गळ्यावरून सुरी फिरवली जात असे, डोंगर कड्यावरून खाली फेकून दिले जात असे, पाण्यामध्ये बुडविले जात असे. मुलीच्या जन्मानंतर लगेचच  मारून टाकून कुत्र्याला खायला त्याच्यासमोर टाकले जाई, प्रसुतीसमयी एक खड्डा खोदला जात असे आणि जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीत तिला गाडून टाकण्यात येई,  मुलगी थोडी मोठी झाल्यावर शृंगारसाजासहीत वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्डयामध्ये ढकलून देऊन वरून माती ढकलली जात असे. (संदर्भ : स्त्री भ्रूणहत्या- कारणे व उपाय)

वरील विवरण जरी सत्य असले तरी जेवढया मुली जन्मास येत होत्या त्या सर्वांशीच वरिलप्रमाणे कठोर वर्तन होत होते असे नाही.
जगात जवळपास एक लाख 24 हजार पैगंबरानंतर  पृथ्वीतलावर सर्वांत शेवटी पैगंबर मुहम्मद (स.) हे अंतिम पैगंबर म्हणून आले. त्यानंतर पुन्हा पृथ्वीतलावर दुसरा कोणताही पैगंबर येणार नाही हे निश्चित झाले आणि त्यानुसार  एकमेव ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक क्रांती समाजामध्ये यथायोग्य घडवून आणली. त्यामध्ये स्त्री जातीविषयी अमुलाग्र बदल  घडवून आणले. संपूर्ण जगात स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय असताना सर्वांत प्रथम इस्लाम धर्मामध्ये आपुलकीची व तिच्या अधिकारांची जाणीव करवून दिली जाऊ लागली. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचा संदेश असा की, ’’ मुलीच्या जन्माचे स्वागत करा.’’ आणि या सुधारणेचे सर्वाना पालन करणे अनिवार्य  झाले, कारण इस्लाममध्ये न्यायनिवाड्याच्या दिवसाचा अंतर्भाव झालेला असल्यामुळे प्रत्येकाला ईशभय वाटायला लागले आणि आजच्या स्त्रीभ्रूणहत्या विरोधातील मोहिमेची सुरूवात  चौदाशे वर्षापूर्वी पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लाम धर्मात केली. इस्लाममध्ये स्त्रीभ्रूणहत्या पाप तर आहेच पण ते कृत्य म्हणजे एक सैतानी कृत्य समजले गेले. तसेच अल्लाहच्या  न्यायालयात स्त्रीहत्या करणाऱ्याला कठोर शासनाची तरतूद न्यायनिवाड्याच्या दिवशीच निश्चित केली. मुलीची हत्या झाली तर शेवटच्या महाप्रलयाच्या दिवशी तीचा न्यायनिवाडा होईल  आणि तो न्यायनिवाडा चालू असताना अल्लाह त्या मुलीला विचारेल तुझी हत्या कोणत्या कारणाने केली? किंवा कोणत्या अपराधासाठी तुझी हत्या झाली?
जगातील प्रत्येक मानवाची निर्मिती एक पुरूष आणि एका स्त्रीपासूनच झाली आहे. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी कोणतीही एक व्यक्ती दुसऱ्या नवीन मानवाची निर्मिती करूच शकत  नाही. याचाच अर्थ स्त्री-पुरूष या जोडीपासून मानव जन्मतो. म्हणजे सर्वांना समान अधिकार आहे. स्त्री-पुरूष समानता आहे. ईश्वराचे पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या अनुयायाकडून काही  गोष्टींबाबत वचने घेतात. त्यामध्ये संततीची हत्या करणार नाही हे देखील आहे. मग स्त्री अर्भकाचा संतती या शब्दात अंतर्भाव होतो की नाही? हा प्रश्न आज पुन्हा उभा राहिला.
’’ हे नबी (स.)! जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टींची प्रतिज्ञा करतील की, अल्लाहबरोबर कोणालाही सामील करणार नाही, चोरी  करणार नाही, व्याभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचनार नाही आणि कोणत्याही चांगल्या कामामध्ये तुमची  अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे’’.  (दिव्य कुरआन, 60ः12).
वरील विवेचन हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करून मदिनेत आल्या तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्या महिलेकडून वरील  वचने घेतली. अशा प्रकारचे वचन फक्त स्त्रीयांकडूनच घेतले असे नाही तर ती वचने पुरूषांकडूनही घेतली आहेत.
स्त्री अत्याचारपीडित असताना तसेच चोहोबाजूंनी तिच्याविषयी निषेध होत असताना तिची बाजू घेऊन तिला न्याय मिळवून देण्याचे काम सर्वप्रथम इस्लामने केले आहे. ज्या स्त्रीला जन्माला येण्याचा किंवा जन्मल्यावर जगण्याचा अजिबात अधिकार नसताना त्यांना तो इस्लामने मिळवून दिला. मानवाची मग ती स्त्री असो वा पुरूष उपजीविका अल्लाह चालवितो. तो  दोघांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. त्याचीं उपजीविका सांभाळण्याची जबाबदारी अल्लाहची आहे. त्याला त्यांच्या भाकरीची काळजी आहे. आपण विनाकारण तसा गैरसमज बाळगण्याचे  कारण नाही की दारिद्रयात खितपत पडले असताना मुलगी जन्मास आल्याने ती आर्थिक संकट ठरते. कारण तिची काळजी तुमच्यापेक्षा अधिक नक्कीच अल्लाहला आहे आणि तोच तर  आपल्या सर्वांची उपजीविका चालवितो. मग आपल्या मुलींची उपजीविका चालवणार नाही असा स्त्रीभ्रुणहत्या करणाऱ्या दांम्पत्यास अविश्वास वाटतो की काय? इस्लाममध्ये मुलगी  जन्मास येणे म्हणजे स्वर्गाचे (जन्नतचे) दार खुले करणे आहे. इतर साधनांपैकी ते एक स्वर्गप्राप्तीचे साधन आहे. म्हणजेच ज्याला एक मुलगी असेल तो नरकापासून दूर, ज्याला दोन मुली त्यास स्वर्गप्राप्ती अनिवार्य, ज्याला तीन मुली त्यासुद्धा स्वर्गप्राप्ती. या परिवर्तनाने क्रांती झाली जे अरब मुलींची हत्या करायचे ते मुलींच्या जन्माची वाट बघायचे. एवढेच नाही तर  तिच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करू लागले.
जेवढे स्थान परिवारात मुलाला होते त्यापेक्षा अधिक श्रेष्ठत्व मुलीला देऊ लागले. इस्लामने स्त्रीला जगण्याच्या अधिकाराबरोबर तिला संरक्षणाचाही अधिकार दिला. त्या संरक्षणाची  जबाबदारी पिता, पती व पुत्र यांच्यावर सोपविली.
’’जी व्यक्ती दोन मुलींचे सज्ञान होईपर्यंत पालनपोषन करेल, शिक्षण, प्रशिक्षण, रितीरिवाज, शिष्टाचार, शिकवेल सहानुभूतीने वागवून त्यांचा विवाह करेल, ती व्यक्ती अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी हाताच्या दोन बोटातील अंतराएवढ्यावर माझ्या (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या) इतका जवळ असेल.’’
अशी शिकवण अनुयायांना त्यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे ’’ जसा तुम्ही मुलाशी व्यवहार करता तसाच व्यवहार (वर्तन) मुलीशी करा.’’
जसे शरीराला पोशाख अत्यावश्यक आहे, अन्न पाणी आवश्यक आहे, निवारा आवश्यक आहे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रीला पुरूष आणि पुरूषाला स्त्री अत्यावश्यक आहे. त्यामुळे  प्रत्येक स्त्री-पुरूषाला अगदी आपापल्या आवडीनिवडीचे समान अधिकार आहेत.
इस्लामची शिकवण आहे की, प्रत्येक मुलाला त्याच्या जन्माने नैतिक व कायदेशीर अधिकार क्रमप्राप्त आहेत. त्याच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी त्याच्या पालकांची आहे. जेवढ्या  काळजीने मुलाचे संगोपन केले जाते त्यापेक्षा अधिक काळजीने मुलीचे करावे. मुलगी आपल्या उदरी जन्मास घालून अल्लाह आपल्याला आजमावण्याबरोबरच स्वर्गप्राप्तीची संधी देतो. हे  जग फक्त आणि फक्त अल्लाहच्या देणगीनेच चालते आणि ती देणगी म्हणजे स्त्री. म्हणून जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिला खायला द्या, तुम्ही जेव्हा कपडे घ्याल, तेव्हा तिलाही घ्या.  मुलीला बरेवाईट बोलू नका, मारू नका वा घरातून हाकलू नका. मुलीशी घृणा करू नका कारण ती सहानुभूतीची प्रतिमा आहे. तसेच ती अनमोलदेखील आहे. मुलीच्या सर्व गरजा  भागविण्याबरोबरच तीला मुलाप्रमाणे शिक्षण-प्रशिक्षण देणे हेदेखील अनिवार्य आहे. तिला नुसतेच शिक्षण देणे असे नाही तर तिच्या शिक्षणावर विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. महात्मा जोतीबा फुले म्हणतात, ’’ विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले.’’ शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून इस्लामने जेवढा शिक्षणाचा अधिकार मुलाला दिला तेवढाच मुलीलाही दिलेला आहे. इस्लाममध्ये स्त्रियांना शिक्षणाची दारे चौदाशे वर्षांपूर्वी खुली करण्यात आली आहेत. मुलीचे  शिक्षण-प्रशिक्षण ही बाब पुण्यकार्य वर्तिली आहे. इस्लाममध्ये प्रत्येक स्त्री पुरूषास भक्ती, नैतिकता, शरियतचे सर्व नियम पाळावेच लागतात आणि हे नियम ज्ञानाशिवाय अंमलात येणे  शक्य नाही. याचाच मतितार्थ स्त्री-पुरूष दोघांनी शिक्षण घेऊन ज्ञानी होणे जरूरीचे समजले जाते. इस्लामच्या प्रत्येक अनुयायाला धर्माचे मुलभूत ज्ञान असायलाच पाहिजे.  धर्मज्ञानासाठीही शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाने शहाणा झालेला समूह हा अंधश्रद्धांना बळी पडत नाही. म्हणूनच इस्लाममध्ये अंधश्रद्धा बाळगणे गैर समजले आहे. उदा. गृह-ताऱ्यावरून  भविष्य पाहणे हे अज्ञान काळाचे लक्षण समजले जाते.
स्त्रीला शिक्षणाच्या आधारे उद्योगधंदा, व्यापार, कृषी, देवाणघेवाण, कारागिरी, नौकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता, लेखन या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इस्लामची अनुमती आहे.  पण या क्षेत्रामध्ये कार्य करताना इस्लामने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडता कामा नयेत. स्त्रीने-सन्मानाने व आपल्या अब्रूचे संरक्षण करीत जीवन जगत-जगत विविध क्षेत्रांमध्ये नाव कमवावे. वाड्.मय, साहित्य क्षेत्रात कार्य करताना सामाजिक, सांस्कृतिक, अधिकारदेखील प्रदान केल आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना तिने मिळविलेल्या  मिळकतीवर मालकी दाखविण्याचा पूर्णपणे अधिकार त्या स्त्रीला आहे.

(सदर लेख इस्लामिक मराठी पब्लिकेशनच्या ’इस्लामी सुरक्षित सावलीतील स्त्री’ या पुस्तकातून घेतलेला आहे.)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget