Latest Post

उपरोक्त संक्षिप्त वर्णनाने हे सिद्ध होते की, एकेश्वरत्व, प्रेषितत्व, पवित्र ग्रंथ कुरआन व मरणोत्तर जीवन या ईशदत्त तत्त्वांच्या आधारे, जगातील लोकांना देश, समाज, वंश, वर्ण, भाषा इत्यादी बाबींनी निर्माण होणारे भेदभाव विसरून, एक जागतिक समाज निर्माण करता येतो. इस्लामने ईश-आराधनेच्या ज्या पध्दती प्रदान केल्या आहेत, त्यांचा स्वीकार केल्यास समाजात निश्चितच एकतेचे वातावरण निर्माण होते. ईश्वराने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) व अंतिम ग्रंथ कुरआनद्वारे सर्व मानव समाजाला अशी परिपूर्ण जीवन व्यवस्था प्रदान केली आहे की, मानवाला कोणत्याही काळात व कोणत्याही स्थळी आपल्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्यासाठी इतरत्र कोणतेच मार्गदर्शन प्राप्त करण्याची निश्चितच गरज भासणार नाही.
मग सत्याचा इन्कार का?
ही अतिशय दुर्दैवाची व शरमेची बाब आहे की, ज्या जनसमूहाला ईश्वराने इतका परिपूर्ण व सर्वंकष जीवनमार्ग दिला होता आणि समता व सामाजिक एकता स्थापित करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती, तसेच इस्लामचा प्रसार करून संपूर्ण मानव समाजास एकत्रित आणण्याचे कार्य दिले होते, तोच जनसमूह त्याला सोपविलेल्या कर्तव्यांची पायमल्ली करून आपल्या एकतेला छिन्न- विच्छिन्न करण्याचे दुष्कर्म करीत आहे. जगातून उच्च-नीच, स्पृश्यास्पृश्यता, परस्पर द्वेष व तिरस्काराची तुच्छ भावना नष्ट करून पृथ्वीवरील अन्याय व अत्याचाराचे वातावरण संपुष्टात आणावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगण्यात आली होती. ईश्वराच्या एकत्वाच्या सत्य मार्गाचा अवलंब करून लोकांत विश्वबंधुत्वाची भावना जागृत करावी, असे कार्य त्यांना सोपविण्यात आले होते, जेणेकरून जुलुमाऐवजी न्याय, युध्दाऐवजी शांती, द्वेष व शत्रुत्वाऐवजी हितचिंतन व आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे व त्यांनीही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासारखे दयावान व कृपाळू सिध्द व्हावे असे अपेक्षित आहे.
असे घडण्याचे कारण काय?
बऱ्याच लोकांनी एकेश्वरत्व, दीन (जीवनशैली) व ईश्वरीय आदेशानुसार अस्तित्वात आलेल्या कायदा व नियमांमध्ये नवनवे विचार समाविष्ट केले आहेत. इस्लामच्या तत्त्वांमध्ये काही नवीन बाबींचा समावेश केला गेला आहे, तर काही नियमांची काटछाट करण्यात आली आहे. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या, त्यांना अवास्तव महत्त्व देण्यात आले आहे व ज्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या, त्यांना गौण स्थान देण्यात आले आहे. याच फेरबदलास (म्हणजे वाढ व काटछाटेस) सत्य मानण्यात येत आहे. याच कारणामुळे मुस्लिम समाज अनेक विरोधी गटांत विभागला गेला आहे. इस्लामी ज्ञानापासून वंचित असलेल्यांना इस्लामचा संदेश देण्याचे काम तर बाजूस राहिले, खुद्द मुसलमानांना दिशाहीन करण्याच्या कामास पुण्यकार्य समजण्यात येत आहे. या विचित्र स्थितीने मुस्लिमांची अवस्था हास्यास्पद झाली आहे व इस्लामवर टीका करणाऱ्यांना नामी संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या मतानुसार मुस्लिमांचा स्वतंत्र समाज मुळी अस्तित्वातच नाही. मुस्लिमांची वर उल्लेखित सद्यस्थिती इस्लामच्या प्रसाराच्या मार्गातील सर्वांत मोठा अडसर आहे. ईश्वर दया करो व आम्हास सरळ मार्गाचा अवलंब करण्याची बुध्दी प्राप्त होवो.

‘‘माननीय मुआज बिन जबल (रजी.) कथन करतात की, जेव्हा जीवनधर्माच्या राजकीय व्यवस्थेत बिघाड होईल, तेव्हा मुस्लीमांवर असे  शासक येतील जे समाजाला चुकीच्या दिशेने नेतील. जर त्यांचे म्हणणे मान्य केले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे म्हणणे कोणी मान्य केले नाही तर ते त्याला ठार  मारतील. तेव्हा लोकांनी प्रेषितांना विचारले, ‘‘अशा परिस्थितीत आम्हाला आपण (स.) कोणते मार्गदर्शन करता? तेव्हा प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला तेच काही त्या  काळात करावे लागेल, जे मरियमपूत्र ईसा (अ.स.) यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यांना करवतीने चिरले गेले आणि सुळावर चढविले गेले. परंतु असत्यापुढे त्यांनी शरणागती पत्करली नाही.  अल्लाहच्या आज्ञा पालनात मरणे, त्या जीवनापेक्षा अधीक चांगले आहे, जे अल्लाहच्या अवज्ञेत व्यतीत व्हावे. (हदीस - तिबरानी)

भावार्थ
उपरोक्त हदीसमध्ये जीवनमार्गासंबंधी मौलीक मार्गदर्शन आहे. मुस्लीम समाजावर शासक म्हणून असे लोक येतील, जे समाजाला चुकीच्या दिशेने येतील. अल्लाहच्या आज्ञा, प्रेषितांचे  मार्गदर्शन यापासून भिन्न अशा पद्धतीने कारभार करणारे शासक, सत्तेवर येतील. त्यावेळी मुस्लीम समाजाची अवस्था अत्यंत बिकट होईल. कारण लोकांनी शासनाचे म्हणणे मान्य  केले तर लोक मार्गभ्रष्ट होतील. म्हणजे शासनाकडून लोकांवर अशाप्रकारचे कायदे लादण्यात येतील, की जर लोकांनी त्यांचे (शासकाचे) म्हणणे, कायदे मान्य केले तर त्यामुळे लोक  मार्गभ्रष्ट होतील आणि जर लोकांनी शासनाचे म्हणणे मान्य केले नाही तर शासन त्यांना ठार मारतील. अशा कठीण प्रसंगी श्रद्धावंतांनी कशाप्रकारे आचरण करावे, यासंबंधी मार्गदर्शन  करताना, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, अल्लाहच्या आज्ञा पालनात मरणे, त्या जीवापेक्षा अधीक उत्तम आहे, जे अल्लाहच्या अवज्ञेत व्यतीत व्हावे. अर्थात, काळ, प्रसंग  कितीही कठीण आला तरी माणसाने अल्लाहची आज्ञेविरूद्ध वागू नये. संयमाने, धैर्यशिलतेने, संकटाला सामोरे जावे. यातच त्याची भलाई आहे.

संयम व स्थैर्य
अबु सईद खुदरी (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, ‘‘जो मनुष्य धीर संयम राखण्याचा प्रयत्न करेल, अल्लाह त्याल संयम प्रदान करील.  आणि संयमापेक्षा अधीक उत्तम आणि अनेक भलाईपूर्ण गोष्टींना गोळा करणारे बक्षीस दुसरे कोणतेही नाही. (हदीस - बुखारी)

भावार्थ
जो मनुष्य कसोटीत पडल्यावर धीर संयम राखतो तर त्यावेळ पावेतो संयम राखू शकत नाही, जोपर्यंत ईश्वरावर त्याला श्रद्धा आणि विश्वास नसावा. तो मनुष्य कदापी धीर संयम पाळू  शकत नाही, ज्याच्या अंगी कृतज्ञता आढळून येत नसेल. अशाचप्रकारे विचार केले तर आपणाला कळून येईल की धीर संयमाचा गुण आपल्या अंगी किती तरी वैशिष्ट्ये सामावून आहे.  यासंबंधी अनस (रजी.) सांगतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, कसोटी जेवढी सक्त असेल, तेवढेच मोठे बक्षीस मिळेल (अर्थात या अटीवर की माणसाने संकटाला  घाबरून सत्य मार्गास सोडून पळ काढू नये.) सर्वश्रेष्ठ अल्लाह जेव्हा एखाद्या समुहांशी प्रेम करतो तेंव्हा त्यांना (अधीक तेजस्वी करण्यासाठी, स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी) कसोटीत  टाकतो. जेव्हा ते लोक अल्लाहच्या निर्णयावर राजी राहिले आणि धीर संयम राखला तर अल्लाह अशा लोकांशी खुष होतो. जे लोक या कसोटीत अल्लाहशी नाराज होतील, तर  अल्लाहदेखील त्यांच्याशी नाराज होतो. (हदीस : तिर्मिजी)

तुमच्यातील सर्वोत्तम तो आहे जो आपल्या पत्नीशी चांगले वर्तन करतो”
    पुरूषाने स्त्रीचा (पत्नीचा) सन्मान करावयास हवा. तिच्याशी अगदी प्रेमाने वागले पाहिजे. अल्लाहने सांगितले आहे,
    ”अल्लाहच्या संकेतापैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्यादरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात”(दिव्य कुरआन, 30ः31)
    हे वर्णन करीत असताना तिचे (पत्नीचे) सर्वच गुण (सवयी) तुम्हाला आवडणारे असतीलच असे नाही. तिच्या बर्याच सवयी आवडणार्या असल्या तरी एखाददुसरी अशी सवय असेल की जी तुम्हाला आवडणार नाही.  तरी श्रद्धावान पुरूषाने आपल्या श्रद्धावंत स्त्रीची घृणा करू नये. कारण तिच्या तुम्हाला न आवडणार्या सवयीच्या बदल्यात तुम्हाला तिच्या आवडणार्या अनेक सवयी बहाल केलेल्या आहेत. म्हणून एका वाईट सवयीमुळे आपण आपल्या पत्नीची घृणा केल्यास तिच्या चांगल्या सवयी (ज्या तुम्हाला आवडतात) पासून वंचित राहाल आणि तिच्या हातून वारंवार तुम्हाला न आवडणार्याच घटना जास्त घडतील. यासाठी आपण काल्पनिक उदाहरणाचा आधार घेऊ या.
    पैगंबरांनी सदाचारी स्त्रीचे काही गुण सांगितले आहेत. जेव्हा पती आपल्या पत्नीकडे पाहील तेव्हा त्याला प्रसन्न करावे. जेव्हा एखादी आज्ञा करेल तेव्हा ती मान्य करावी आणि आपले शील व त्याच्या संपत्तीचे रक्षण करावे आणि त्यात त्याची अवज्ञा करू नये. तात्पर्य, जर आपला पती कामावरून घरी आला तर त्याचे हसतमुखाने स्वागत करावे. घर पती यायच्या वेळी टापटीप करून ठेवावे. घरात प्रसन्न वातावरण निर्माण करावे आणि आपला पती काय आज्ञा करणार याची वाट बघावी व त्याची आज्ञा सिरसावंद्य मानावी. एवढेच नव्हे तर  त्याच्या आज्ञेशिवाय घरातील संपत्ती (पैसा) खर्च करू नये. त्याचे संरक्षण करावे. इस्लामने स्त्रीचा सन्मान केला आहे. एके ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ”सदाचारी पत्नी ही पुरूषाला अल्लाहकडून मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे.”
    इस्लामपूर्व काळात स्त्रिया दोन प्रकारच्या होत्या. (1) पत्नी (जिला फक्त घर होते, प्रतिष्ठा नाही) (2) दासी. दोन्ही प्रकारात स्त्रियांची अवहेलनाच होती. त्यांची तस्करी राजरोसपणे चालायची. पत्नी असणारी स्त्री फक्त घरात सुरक्षित असायची. तिला कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा व स्वातंत्र्य नव्हते. मात्र इस्लामच्या पुनरूत्थानाने स्त्रीला (मुलगी, आई, पत्नी) सन्मान मिळाला व तिच्या जवीनपद्धतीत अमूलाग्र बदल झाला. आस्मानी किताबाच्या (कुरआन) आधारे सांगितले की, ”पत्नी जरी नावडती असली तरी तिचा सन्मान करा कारण या तिच्या नावडती कारणामागे तिच्या पतीचे खूप भले होणार आहे. त्यासाठी सांगितले की, पत्नीचे मन दुखवू नका. ती आपला सर्व परिवार (आई, वडील, भाऊ, बहीण सर्व नातलग) सोडून फक्त आपल्यासाठी आपल्या जोडीदाराच्या हितासाठी सर्व त्यागून आलेली आहे. तिने आपले माहेर विवाहादिवशीच आपल्यासाठी सोडले आहे, तेव्हा तुम्ही रागाच्या भरात (एखाद्या दिवशी) घरदार पत्नी सोडून जाऊ नका. तिला तुमच्याशिवाय जगात कोणीही उरलेला नाही. तिच्या काही गोष्टी नाही आवडल्या तरी तिला टोमणे मारू नका. तसेच घालून पाडून (अपमानित) बोलू नका. तिचा खूपच राग आला तर तिला मारताना तिच्या तोंडावर अजिबात मारू नका. (याचा अर्थ शरीरावर चेहरासोडून कोठेही इजा कराव्यात असे नाही.) म्हणजेच सक्त ताकीद आहे की, आपल्या पत्नीशी दासीसमान व्यवहार करू नये. या सर्व कथनातून हे लक्षात येते की स्त्रीच्या (पत्नी) संगोपनाच्या, अस्तित्वाच्या, संरक्षणाच्या सर्व जबाबदारीबरोबर तिचा सन्मान, आदर, इज्जत करणे हेही पुरूषावर बंधनकारक आहे. तसे स्त्रीचे पतीशी सद्वर्तनच असावे यालाही पर्याय नाही.
विवाहानंतर स्त्री आपल्या पतीची सेविका होत नाही. पत्नीच्या बाबतीत कुरआनची स्पष्टोक्ती आहे, ”अल्लाहच्या संकेतापैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्यादरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात.”  (दिव्य कुरआन, 30ः21).
    वरील सर्व विवरणावरून हे लक्षात येते की अल्लाहने जेव्हा पृथ्वीतलावर पहिला पुरूष आदम आणि प्रथम स्त्री हव्वा यांना पाठविले. म्हणजे ते दोघे एकमेकांसाठी निर्माण केले. या दोघांपासून मानवाची उत्पत्ती आणि उत्क्रांती झाली. पुरूषाची व स्त्रीची निर्मिती एकमेकांप्रती प्रेमाची भावना निर्माण व्हावी. त्या दोघांना एकमेकांचा आधार वाटावा आणि एकत्र सहवासातून दोघांना संतोष प्राप्त व्हावा, एकमेकांसाठी करूणा निर्माण व्हावी म्हणून दोघांनाही काही सूचना केल्या आहेत. पण या सूचना समाजाव्या लागतात. ते सर्वांनाच समजतात असे नाही. त्याला अभ्यासाची आणि चिंतनाची आवश्यकता आहे. म्हणतात ना,” समजदार को इशारा काफी है.” अल्लाहचे संकेत समजण्यासाठी अभ्यासाबरोबर चिंतन मनन आवश्यक आहे. तसेच समजूतदारपणाही अनिवार्य आहे.

अपनी मिल्लत पर कयास अक्वामे मगरीब से न कर
खास है तरकीब में कौम-ए-रसूल-ए-हाश्मी (सल्ल.)
उनकी जमियत का है मुल्क व नसब पर इनहेसार
कुव्वत-ए-मजहब से मुस्तहेकम है जमियत तेरी

रमजान म्हटलं की कुरआनची आठवण यायला हवी, पण ती येत नाही. आठवण येते ती, रंगीबेरंगी कपडे आणि विविध वस्तूंच्या शॉपिंगची, वेगवेगळ्या प्रकारच्या मिष्टान्नांची, उशिरापर्यंत चौका-चौकात उभे राहून जागण्याची, दिवसा झोपण्याची. रमजान म्हटले की असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मुस्लिमांचे हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. वास्तविक पाहता कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि हा जगातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, संपन्नता इत्यादी गोष्टी नंतर येतात. मनुष्य संतुलित असेल तर बाकीच्या गोष्टींचा उपयोग आहे आणि तो असंतुलित असेल तर बाकीच्या गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही.
    आज परिस्थिती अशी आहे की, मनुष्यच बिघडलेला आहे, स्वार्थी झालेला आहे, नफ्स परस्त (इच्छा आणि आकांक्षांचा गुलाम) झालेला आहे, स्वतःच्या लहानशा सुखापुढे त्याला दुसर्याचे हिमालया एवढे दुःखही कस्पटासमान वाटते. असे नसते तर असहाय्य शेतकर्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या नसत्या. सरकार आणि श्रीमंत लोक संवेदनशील राहिले असते तर शेतकर्यांच्या मूळ प्रश्नांवर कधीचाच तोडगा निघाला असता. ”कितीही तूर खरेदी केली तरी रडतात साले”, ”शेतकर्यांची आत्महत्या फॅशन झालेली आहे”, ”ड्रग्ज आणि दारूमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत” सारख्या विशेषनांनी त्यांची संभावना राजकारण्यांकडून केली गेली नसती. कोट्यावधींच्या संख्येने बिपीएल लोक असहाय्यपणे जगत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अब्जावधीचे आयपीएलचे सामने झाले नसते, श्रीमंत आणि गरीबांमध्ये एवढी दरी निर्माण झाली नसती, -
संसाधनांचे समान वाटप झाले असते, सरकारी शाळा आणि रूग्णालये डबघाईला आली नसती. आज देशामध्ये जेवढ्या काही समस्या आहेत त्या कुशासनामुळे निर्माण झालेल्या आहेत. चारित्र्यहीन लोकांच्या हातात सत्तेची सुत्री एकवटलेली असल्यामुळे आज देशाची ही अवस्था झालेली आहे. फुलटाईम राजकारण करणार्यांच्या  संपत्तीमध्ये दर पाच वर्षांनी आपोआप वृद्धी होत आहे. हा या गोष्टीचा पुरावा आहे की, शासनात बसलेले लोक आपल्या राजकीय पोजीशनचा दुरूपयोग करून पैसा कमावित आहेत. कोणत्याही पक्षाच्या पहिल्या फळीतील शंभर नेत्यांच्या संपत्तीचे विश्लेषण केले असता त्यांची संपत्ती ते राजकारणात आल्यानंतर विद्युत गतीने वाढल्याचे सत्य समोर येईल. सत्ताधार्यांच्या दुष्कर्माची चर्चा करीत बसलो तर हा लेखच काय कित्येक पुस्तकेसुद्धा कमी पडतील. म्हणून या ठिकाणी सत्ताधार्यांच्या वाईट कृत्यांचा ओझरता उल्लेख यासाठी केला आहे की, सत्ता हे एक असे साधन आहे, ज्याचा उपयोग करून सत्ताधारी जमात,  जनतेचे कल्याणही करू शकते व तिचा दुरूपयोग करून जनतेची पिळवणूकही करू शकते. राज्यघटना कितीही चांगली असो, व्यवस्था कितीही चांगली असो, वाईट चारित्र्याचे लोक त्याची वाट लावण्यासाठी सक्षम असतात.
    दुर्दैव या गोष्टीचे आहे की, सत्तेचा सदुपयोग कसा करावा? त्यासाठी चारित्र्यवान सत्ताधारी कसे घडवावेत? याचे सविस्तर मार्गदर्शन ज्या कुरआनमध्ये करण्यात आलेले आहे, त्याचा विसर स्वतः मुस्लिमांना पडलेला आहे. 20 कोटी लोकसंख्येच्या या समाजाला कुरआनमधील चारित्र्यवान लोकांची संकल्पनाच समजलेली नाही, किंबहुना ती समजून घ्यावी, असे त्यांना कधी वाटले नाही, ज्यांनी समजून घेतली त्यांनी तिला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करण्याची हिम्मत दाखविली नाही.
    रमजानच्या निमित्ताने चारित्र्यवान लोक कसे घडवावेत? या संकल्पनेला नव्याने समजून घेण्याची संधी अल्लाहने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे. वाचक मित्रानों! जरा क्षणभर दोन्ही डोळे बंद करा, दोन-तीन लांब श्वास घ्या आणि शांतपणे विचार करा, गेल्या रमजानमध्ये आपल्यासोबत असे किती लोक होते जे आज आपल्यात नाहीत? त्यांच्या चेहर्यांची आठवण करा, आज ते कित्येक टन मातीखाली असहाय्यपणे पडून आहेत. जे मागच्या वर्षापर्यंत मोठमोठ्या बाता मारत होते ते आज मातीखाली गाडले गेलेले आहेत. आज जे आहेत माहित नाही त्यांच्यातील किती लोक पुढचा रमजान पाहू शकतील? पुढील रमजान न पाहणार्यांमध्ये तुमचा माझा कोणाचाही समावेश असू शकतो. म्हणून वेळ महत्त्वाची आहे, संधी हाती आलेली आहे, रमजान दारासमोर उभे आहे, स्वतःच्या चारित्र्य संवर्धनाची ही संधी सोडू नका. स्वतःला आणि स्वतःच्या तरूण पिढीला चारित्र्यवान बनविण्यासाठी या महिन्याच्या खडतर प्रशिक्षणाला आनंदाने सामोरे जा.
    रोजे आणि चारित्र्य निर्मितीची प्रक्रिया
    कुरआनमध्ये अल्लाहने म्हटले आहे की, “हे इमानधारकांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्या(लोकां) वर, जेणेकरून तुम्ही चारित्र्यवान व्हाल.” (संदर्भ ः सुरह बकरा आयत नं.183).
    रोजे ठेवल्याने चारित्र्याची निर्मिती कशी होते? हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. मुस्लिम समाजामध्ये दहा-बारा वर्षाची मुलं-मुली रोजे ठेवण्यास सुरूवात करतात. त्या माध्यमातून त्यांच्या बालमनामध्ये अल्लाहबद्दल प्रचंड विश्वास निर्माण होतो. तो कसा होतो? याला काही उत्तर नाही. ती ईश्वरी लीला आहे. एवढे मात्र नक्की की, अगदी तापत्या उन्हांमध्ये सुद्धा दहा-बारा वर्षाची लहान मुलं तहान आणि भुकेने अगदी व्याकूळ होऊन जातात पण संधी असूनही चोरून काही खात-पीत नाहीत. चांगल्या चारित्र्याचा पाया येथूनच रचला जातो. मग जस-जसे वय वाढते, समज वाढते, तस-तसे याच पायावर पाच वेळेसच्या नमाजच्या माध्यमातून चांगल्या चारित्र्याची उत्तूंग इमारत आकार घेते. रोजा आणि नमाज यांच्या पाबंदीमुळे माणसे चारित्र्यवान बनतात. त्यांच्या मनामध्ये अल्लाहविषयी भीती व अल्लाहविषयीचे प्रेम या संमिश्र भावना निर्माण होतात. त्यातूनच त्यांच्यात एकाप्रकारची स्वयंशिस्त निर्माण होते, जी की त्यांच्या हातात आलेल्या पैसा, पद अगर सत्तेचा दुरूपयोग करण्यासापासून त्यांना परावृत्त करते.
    इस्लामी चारित्र्याच्या बळावर सत्ताधारी बनण्याच्या प्रक्रियेविषयी जमाते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”आप तआज्जुब करेंगे के कुरआन ने मुसलमानों की तरक्की और उनके एक हुक्मरान जमात बनने और सबपर गालीब आ जाने का जरिया सिर्फ इमान और अमले सालेह (पुण्यकर्म) को करार दिया है. और कहीं ये नहीं कहा के, तुम युनिव्हर्सिटीयां बनाओ, कॉलेज खोलो, कारखाने कायम करो, जहाज बनाओ, कंपनीयां कायम करो, बँक खोलो, सायंस के आलात (वैज्ञानिक सामुग्री) इजाद करो, और ऊंचे लिबास पहनो, मुआशरतअंदाज व अतवार (सामाजिकरित्या प्रगत लोकांच्या सवयी) में तरक्कीयाफ्ता कौमों की नकल करो. नेज उनसे तनज्जुल व इनहेतात (पतन) और दुनिया व आखिरत की जिल्लत व रूसवाई का वाहिद सबब भी निफाक (मतभेद) को ठहराया न के इन असबाब के फुकदान को जिन्हें आजकल दुनिया असबाबे तरक्की (विकासाचे कारण) समझती है.” (संदर्भ ः ’मुसलमानों की ताकत का असल मंब्बा’, तर्जुमानुल कुरआन जानेवारी 1935).
    आपल्या देशातील चारित्र्यवान लोक
    स्वातंत्र्य लढ्यादरम्यान जी सर्वधर्मीय-सर्वपक्षीय चारित्र्यवान पिढी उदयास आली होती, स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ती पीढि लोपपावली. कोणत्याही देशाला चारित्र्यवान लोकांचा अखंड पुरवठा करत राहणे यापेक्षा मोठी देशसेवा नाही. याचा विसर आज बहुसंख्य दाम्पत्यांना पडल्याने, गरज नसतांनाही अनेक महिला जॉब करण्यामध्ये प्रतिष्ठा समजत आहेत. गृहिणी या पदाचे एवढे अवमुल्यन झाले आहे की, क्षमा करा! तिला मोलकरणीच्या बरोबरीने आणून समाजाने उभे केले आहे. ज्या महिलांनी आपल्या प्रजननक्षम आयुष्यामध्ये किमान चार अपत्यांना जन्म देऊन, त्यांच्यावर चांगले संस्कार करून, त्यांना जबाबदार नागरिक बनवून, देशसेवेसाठी पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वीकारायला हवी, त्या स्त्रियांनी जॉब करण्यात प्रतिष्ठा शोधलेली आहे व जॉबमध्ये ती त्यांना मिळतही आहे. परिणामी, चारित्र्यवान नागरिक घडविण्याच्या त्यांच्या प्राथमिक जबाबदारीवर, त्यांच्या या जॉबमुळे विपरित परिणाम होत आहे. चार पैसे जरूर त्या कमवित आहेत, परंतु त्या मोबदल्यात लहान मुलांवर सुसंस्कार करण्याची त्यांची क्षमता कमी होत असल्याने भ्रष्ट, लिंगपिसाट आणि चारित्र्यहीन नागरिकांचा मोठ्या प्रमाणात देशाला पुरवठा होत आहे. परिणाम सर्वांसमोर आहे. हेच नागरिक शासन आणि प्रशासनात जावून आपल्या चारित्र्याप्रमाणे आपल्या देशाला ’सेवा’(?) प्रदान करीत आहेत. म्हणून आज देशाची अशी अवस्था झालेली आहे.
    कोट्यवधी जबाबदार राष्ट्रवादी मुस्लिम नागरिकांचा एक समुह म्हणून या देशात चारित्र्यवान नागरिकांचा अखंड पुरवठा करण्यास आपण सुद्धा कमी पडलेलो आहोत, हे मान्य केल्याशिवाय आपल्याला यावर उपाय शोधता येणार नाही. एकदा हा गुन्हा मान्य केला की मग यावर उपाय रमजानच्या स्वरूपात आपल्या समोर उभा राहतो. सुदैवाने तो आपल्या समोर आणि आपण त्याच्या समोर उभे आहोत. हा 30 दिवसाच्या रोज्यांचा कठीण काळ, एक खडतर प्रशिक्षणाचा काळ समजून यात जास्तीत जास्त सद्वर्तन करण्याचा, कुरआन समजून घेण्याचा, सचोटीने वागण्याचा, माणुसकी दाखविण्याचा, क्षमा करण्याचा, आपले अधिकार सोडून दुसर्यांचे अधिकार देण्याचा हा काळ आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
    रमजानच्या या खडतर प्रशिक्षणातून ताऊन, सुलाखून निघालेल्या चारित्र्यवान मुस्लिमांचा जेव्हा इतर बहुसंख्य नागरिकांशी संपर्क होईल व जेेव्हा त्यांना खात्री पटेल की अल्पसंख्यांक मुस्लिम समाज हा चारित्र्यवान लोकांचा उपयोगी समूह आहे, तेव्हा ते मुस्लिम समाजाविषयी घृणा करणार नाहीत, उलट प्रेम करतील. कारण उपयोगी माणसे कोणाला नको असतात?
    भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेमध्ये राहून-राहून बहुतेक मुस्लिम नागरिक सुद्धा पाश्चिमात्यांच्या स्वार्थी जीवनशैलीशी एकरूप झालेले आहेत व त्यामुळे त्यांचे चारित्र्य कमकुवत झालेले आहे, त्यांच्यात आपसात प्रचंड मतभेद निर्माण झालेले आहेत, त्यातूनच शिया-सुन्नी आणि इतर भेद निर्माण होऊन आपसात भीषण लढाया होत आहेत. ही अतिशय गंभीर स्थिती आहे. जीचे वर्णन प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी खालील शब्दात केलेले आहे, ”मुझे इस बात का खौफ नहीं के मेरे बाद तुम शिर्क करोगे, मगर डरता इस बात से हूं के, कहीं तुम दुनिया में मुब्तला न हो जाओ और आपस में लढने न लगो, अगर ऐसा करोगे तो हलाक हो जाओगे जिस तरह पहली उम्मते हलाक हो चुकी हैं.”
    तरी समस्त वाचकांना आवाहन आहे की, रमजानच्या मूळ स्पिरिटशी एकरूप होऊन आपले चारित्र्य संवर्धन होईल याकडे लक्ष द्या व रमजान झाल्यावर पुढील रमजानपर्यंत आपल्या चारित्र्याच्या सुगंधाने देशाला शुचिर्भुत करण्याचा प्रयत्न करा, हीच खरी मुसलमानी, हीच खरी देशसेवा, रमजानच्या माध्यमाने संवर्धित करा चारित्र्याचा ठेवा. अल्लाह माझ्या आणि तुमच्यावर या रमजानमध्ये बरकतींचा वर्षाव करो. (आमीन.)

- एम.आय.शेख 
9764000737

सौम अथवा सियाम याचा अर्थ होतो आराम करणे. मनुष्य उपवासाच्या कालावधीत खाणे, पिणे आणि समागम करणे यास पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत आराम देतो.
रोजाची वैशिष्ट्ये: कुरआनने रोजाविषयीचे अनेक फायदे आणि लाभदायक गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. त्यातील काही मौलिक महत्त्वाच्या आहेत. रोजाचे महत्त्व समजण्यासाठी त्याची सुधारणात्मक वैशिष्ट्ये पाहणे आवश्यक आहे.
ईशपरायणता स्रोत: प्रथम आणि अतिमहत्त्वाचा रोजा (उपवास) चा गुण ईशपरायणता आहे. कुरआन, हदीस आणि मानवी बुध्दीने अनेक उदाहरणे याबद्दलची दिलेली आहेत. कुरआनने ही वास्तविकता सांगताना स्पष्ट केले आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (कुरआन २: १८३)
प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथनसुध्दा वरील सत्यता स्पष्ट करीत आहे.
‘‘रोजा (उपवास) तुमच्यासाठी ढाल आहे (कारण या जगात तुम्हाला पापकर्मांपासून ते दूर ठेवते आणि परलोकात तुमचे नरकापासून संरक्षण करते).’’ - मुस्लिम
‘‘रोजा पाफत्यांविरुध्द ढाल आहे’’ म्हणजेच उपवास मनुष्याला पापभिरू आणि ईशपरायण बनवते. खालील प्रेषितकथन स्पष्ट करून सांगत आहे,
‘‘तुम्ही जेव्हा उपवास धराल, तेव्हा तुम्ही वाईट भाषा वापरू नका अथवा मोठ्याने बोलू नका. जर कोणी तुमच्याशी भांडत असेल, शिवीगाळ करीत असेल तर त्याला सांगा की मी उपवास धरलेला रोजादार आहे.’’ - मुस्लिम
याचाच अर्थ होतो की मुस्लिम नेहमीच शिवीगाळ आणि वाईट गोष्टींपासून दूरच राहतो. जेव्हा तो उपवास करतो तेव्हा याचे महत्त्व आणखी वाढते. जर त्याला या दुर्गुणांचा नेहमीच्या जीवनव्यवहारात विटाळ नसेल तर त्याने कमीतकमी उपवास कालावधीत त्या वाईट सवयींपासून दूर राहावे. हे प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन या गोष्टीचा स्वीकार करीत आहे की रोजा (उपवास) हे ईशपरायणता, पापभिरूता, धर्मनिष्ठा प्राप्त करण्याचे एक प्रबळ साधन आहे.
यासाठी कुरआन संकेत सर्वस्वी पुरावे आहेत. यासाठी आणखी चर्चेची मुळीच गरज नाही. परंतु अधिक समाधानासाठी बुध्दीचा वापर करून या वास्तवतेला अधिक स्पष्ट करू या. आपण यावर विचार करू या की रोजा मनुष्यात ईशपरायणता, पापभिरूता आणि धर्मनिष्ठा कशी निर्माण करतो?
आपण अगोदर हे पाहू या की ईशपरायणता (तकवा) म्हणजे काय आहे. हे त्या सखोल काळजीचे नाव आहे ज्यामुळे आपण अल्लाहच्या अप्रसन्नतेपासून आपला बचाव करतो आणि वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आत्मसात करतो. दुसऱ्या शब्दांत ही अशी मनःस्थिती आहे की ज्यामुळे अशी मानसिकता तयार होते की मनुष्य आज्ञाधारकता आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जीवन कंठत असतो. अशी व्यक्ती प्रत्येक क्षणी अल्लाहच्या प्रसन्नतेचा विचार करीत राहते. त्याला अल्लाहची अप्रसन्नता होऊ नये म्हणून एखाद्या कृत्यामुळे अल्लाहची अप्रसन्नता ओढवून घेण्याची भीती त्याच्या मनात नेहमी असते. अल्लाहला प्रसन्न करण्याचा कोणताही प्रसंग अथवा संधीला अशी व्यक्ती हातातून जाऊ देत नाही. ही धडपड आणि आकांक्षा अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करून घेणे आणि अल्लाहच्या अप्रसन्नतेपासून सुरक्षित राहाणे (ईशपरायणता) हे कसे प्राप्त करता येईल? हे तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा मनुष्याला त्याच्या ‘स्व’वर संपूर्ण नियंत्रण असेल आणि मनुष्य आपल्या इच्छा-आकांक्षेच्या आहारी गेलेला नसावा. मनुष्य आपल्या ‘स्व’ला नियंत्रित ठेवून आणि इच्छा-आकांक्षांना बंदिस्त ठेवूनच ‘ईशपरायणता’ प्राप्त करू शकतो. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते, आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.’’ (कुरआन ७९: ४०-४१)
आता आपण ‘रोजा’ म्हणजे काय पाहू या. तीन गोष्टी या रोजासाठी पूर्वअटी आहेत. खाणे, पिणे आणि समागम करणे या तिन्ही गोष्टींचा प्रातःकाळापासून ते सूर्यास्तापर्यंत त्याग करणे. दुसऱ्या शब्दांत मनुष्याने आपल्या ‘स्व’च्या मागणीपासून (तिन्ही गरजांपासून) स्वतःला पूर्ण अलिप्त ठेवणे होय. या तीन गरजा ‘स्व’च्या सामुदायिक गरजांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त करून आहेत. इतर दुसऱ्या कोणत्याच गरजा इतक्या महत्त्वाच्या आणि शक्तिशाली नाहीत. इतर सर्व गरजा या तीन गरजांच्या नंतरच्या आहेत. त्या फक्त इच्छा अथवा गरजा नाहीत तर उत्कट स्वाभाविक इच्छा आहेत. मनुष्याचे अस्तित्वच त्यावर अवलंबून नाही तर त्याची वंशपरंपरा त्यावर अवलंबून आहे. त्याला खाणे आणि पिणे स्वतःला जीवंत ठेवण्यासाठी आणि वंशपरंपरावाढीसाठी समागम अत्यावश्यक आहे.
रोजा या शक्तिशाली उत्कट स्वाभाविक इच्छांवर नियंत्रण ठेवते. महिन्याभराचे आंतरिक प्रशिक्षण दररोज बारा ते चौदा तास निरंतर चालत राहते. मनुष्य या कालावधीत इतका तहानलेला बनतो की त्याला नीटसुध्दा बोलता येत नाही. त्याच्या हातात थंड पाणी आपली तहान भागविण्यासाठी असते. त्याला ते पाणी प्यावेसे वाटते परंतु रोजा असे करण्यापासून त्याला परावृत्त करतो आणि ती व्यक्ती असहाय्य बनते. अशाच प्रकारे इतर दोन, गरजांची स्थिती आहे. महिन्याभरात अशा व्यक्तीमध्ये कशा प्रकारची सहनशक्ती, संयम आणि ईशपरायणता निर्माण होत असेल. याची कल्पना करावी तितकी थोडीच! अशा प्रकारे रोजा (उपवास) मनुष्यामध्ये ‘स्व’ला नियंत्रित करून उत्कट स्वाभाविक इच्छांवर प्रबळ नियंत्रण ठेवते. ही ती शक्ती आहे की जिच्या साह्याने मनुष्य ‘स्व’ अथवा सैतानाने निर्माण केलेले अडथळे (दुराचार) दूर करून शुध्द धर्माचरण करतो. ही शक्ती मनुष्याला पापभीरू बनवते आणि मनुष्यात खऱ्या अर्थाने ईशपरायणता निर्माण होते. आणखी दुसरे महत्त्वाचे कारण उपवासांमुळे पापभीरूता निर्माण होण्याचे आहे. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या कथनानुसार,
‘‘उपवास (रोजा) दांभिकते पासून मुक्त आहे.’’ - फतहलबारी दांभिकतेचा अभाव हे या वास्तवतेची हमी आहे की मनुष्य अल्लाहच्या सान्निध्यात आहे. याव्यतिरिक्त चांगले आणि खात्रीलायक साधन असूच शकत नाही. म्हणून हे ईशपरायणतेच्या अत्युत्तम खाद्यापैकी एक आहे. याबद्दल शंका असू शकतच नाही.
स्वतः प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे की ‘‘रोजा हे एक शाश्वत असे माध्यम आहे दांभिकतेपासून दूर राहण्याचे!’’ तसे पाहता नमाज हे दिखाव्याव्यतिरिक्त अथवा एखाद्याजवळ (नमाजी व्यक्ती) दांभिकता अथवा दिखावा नाही असे खात्रीलायक म्हणू शकतच नाही. हे मात्र रोजाबद्दल घडू शकत नाही.
रोजा हे दिखाव्यापासून आणि दांभिकतेपासून पूर्ण अलिप्त अशी उपासनापध्दती आहे. नमाज, हज आणि जकात या उपासनापध्दतीमध्ये काही अनिवार्य कार्य करावे लागते, नाहीतर ती उपासना ठरत नाही. असे मात्र रोजाबद्दल नाही. ही उपासना कुणीही पाहू शकत नाही की ऐकू शकत नाही. अशी उपासना दिखाऊ स्वरूपाची असूच शकत नाही. इस्लामच्या मूलतत्त्वांपैकी रोजा हे एक असे मूलतत्त्व आहे ज्यास दांभिकतेचा सैतान पछाडू शकत नाही.
‘रोजा’च्या याच गुणवैशिष्ट्यामुळे कुरआन वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करीत आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! विहित केले तुमच्यावर उपवास (रोजा) जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (कुरआन २: १८३)
वरील संकेतवचन फक्त आणि फक्त रोजा (उपवा स) साठीच अवतरित झाले आहे. इतर उपासनापध्दतींद्वारे जरी ईशपरायणता प्राप्त होते तरी त्यांच्यासाठी अशा प्रकारचे वर्णन कुरआनमध्ये कोठेच आलेले नाही. रोजाच्या याच गुणवैशिष्ट्यामुळे अल्लाहने रोजा ‘‘माझा’’ आणि ‘‘माझ्यासाठी’’ हा शब्दप्रयोग केला आहे. उपवासाचा मोबदला आणि बक्षीस सर्वांपेक्षा वजनदार राहील अशी ग्वाही दिली आहे.
‘‘प्रत्येक सत्कृत्याच्या मोबदल्यात सत्कृत्य करणाऱ्यास दहा ते सातशे पटीने बक्षीस दिले जाईल परंतु रोजा यास अपवाद आहे. कारण हे फक्त ‘माझ्यासाठी’ आहे. म्हणून याचा मोबदला मी माझ्या मर्जीनुसार देणार. अल्लाह पुढे म्हणतो की रोजादार (उपासकरू) माझ्यासाठी अन्न-पाणी त्यागून देतो आणि वासनांना आवर घालतो तेसुध्दा माझ्यासाठीच!’’ (मुस्लिम)
‘‘रोजा माझ्यासाठी आहे’’ हेच सिध्द करते की या उपासनेत दिखावा नाही की दांभिकता नाही.
रोजामुळे ईशपरायणता आणि संयम यासारखे सद्गुण निर्माण करण्यावर भर दिला गेला आहे. धर्मशील बनण्यावर मुळीच भर दिला गेला नाही. हे खरे गमक आहे रोजा या उपासनेचे! मनुष्य रोजा कालावधित खाण्या-पिण्यापासून आणि संभोगापासून अलिप्त राहात असतो, याचाच अर्थ असा आहे की इतर वेळी मनुष्य अल्लाहच्या प्रसन्नतेविरुध्द कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणून रोजादार इतर बाबतीतसुध्दा अल्लाहच्या आज्ञापालनात राहतो, त्याच वेळी त्याचा रोजा खरा सिध्द होतो. किबहुना त्याचा रोजा भूक-तहानेशिवाय काहीच नाही. असा रोजा निरर्थक ठरतो. रोजा फक्त भूक-तहान आणि संभोग यापासून अलिप्त राहणे नव्हे. रोजा उपासनेच्या तांत्रिक बाबी आहेत. कोणी रोजाच्या बाह्य आणि तांत्रिक बाबींमुळे संतुष्ट होत असेल तर अशी व्यक्ती रोजा उपासनेच्या आत्म्याला आणि अंतरंगात प्रवेश करू शकत नाही. प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे,
‘‘असे कितीतरी रोजादार (उपासकरू) आहेत ज्यांना भूक आणि तहानेशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडत नाही.’’ (दारीमी)
अशी व्यक्ती कशा प्रकारची असते याबद्दल खालील प्रेषितकथनात स्पष्ट झाले आहे.
‘‘एखादी व्यक्ती खोटे बोलणे अथवा पाप करणे (दुराचार) सोडत नसेल तर अल्लाहला त्याच्या उपाशी राहण्याचे काहीएक देणे-घेणे नाही.’’ (बुखारी)
वरील प्रेषितकथनाने हेच सिध्द होते की रोजामध्ये या तिन्हींपासून (भूक, तहान आणि वासना) परावृत्त रखणे म्हणजे आपल्या ‘स्व’ला ताब्यात ठेवणे होय. रोजा यासाठीच प्रशिक्षण आहे. रोजा कालावधीत या कृती चालू राहिल्या तर अशा व्यक्तीला रोजाचे खरे उद्दिष्ट कळलेच नाही. म्हणून त्याने उपाशी राहण्यासारखेच आहे. रोजादार आणि खोजदार (रोजा न ठेवणारा) या दोन्हींमध्ये अशा वेळी काहीच फरक राहत नाही.
रोजा ईशपरायणतापूर्ण जीवन: दुसरे महत्त्वाचे कारण आहे रोजा हे ईशपरायणता प्राप्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे. त्याच्याशिवाय मनुष्याच्या जीवनात ईशपरायणता येऊ शकत नाही. इतर सद्गुणांमुळे मनुष्य जरूर धर्मशील बनू शकतो, परंतु रोजा या सर्वांपेक्षा प्रभावशाली माध्यम आहे. रोजाची जागा दुसरी कोणतीच उपासनापध्दत घेऊ शकत नाही. कुरआन या संदर्भात स्षष्टोक्ती करीत आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! विहित केले तुमच्यावर उपवास (रोजे) जशे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्यावर जेणे करून तुम्ही ईशपरायण व्हाल.’’ (कुरआन २: १८३)
रोजाचा उद्देश फक्त श्रध्दाळू आणि धर्मशील बनून राहण्याचाच असता तर अल्लाहने ‘‘जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर’’ हे वाक्य (आयत) येथे दिले नसते. हे एक ऐतिहासिक सत्य आहे की तुमच्या पूर्वींच्या लोकांसाठी (पूर्वजांना) सुध्दा रोजा अनिवार्य केला गेला होता. मुस्लिमांना रोजाच्या उद्देशापासून सचेत करण्यात आले आहे. वरील संकेतवचनामध्ये धर्मशीलतेचा उल्लेख आलेला नाही. तर या संकेतवचनांनुसार हेच स्पष्ट होते की ईशपरायण जीवन व्यतीत करण्यासाठी रोजाव्यतिरिक्त अन्य दुसरी अत्युत्तम अशी कोणतीच उपासनापध्दत नाही. दुसरे कोणतेच कृत्य त्याची जागा घेऊ शकत नाही. असे जर नसते तर उपवास प्रत्येक धर्माचा आधारस्तंभ गणला गेला नसता, हे वरील आयतीमुळे स्पष्ट होते. रोजाची अनिवार्यता हे सिध्द करते की नमाज, जकातप्रमाणे रोजासुध्दा धर्माची स्वाभाविक अनिवार्यता आहे. रोजाअभावी नमाजची शिस्तप्रिय व्यवस्था पूर्णतेला पोहचू शकत नाही.
रोजा रोजादार (उपासकरू) मध्ये ईशपरायणता कशा प्रकारे निर्माण करतो हे पाहण्यासाठी वरील स्पष्टीकरणाचा पुन्हा विचार करणे गरजेचे आहे. हे निर्विवादित सत्य आहे की रोजाव्यतिरिक्त अत्युत्तम प्रभावशाली दुसरी कोणतीच उपासनापध्दत (इस्लामचा आधारस्तंभ) नाही ज्यामुळे ईशपरायणता अंगीकारली जाते. त्यात दिखावा नाही की बडेजाव नाही. दांभिकता यात मनुष्याला शिवतसुध्दा नाही. यामुळे रोजा सर्वसामान्यजनांसाठी एक महत्त्वाची आणि आवडती उपासना आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget