Latest Post

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘नि:संशय सर्वश्रेष्ठ अल्लाहने लोकावर जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरविले आहे. जो त्यांच्या श्रीमंत लोकांकडून घेतला जाईल व त्यास  त्यांच्या गरजवंत गरीब लोकांना परतविला जाईल. (हदीस : मुत्तफिक अलैय्)

भावार्थ
सदका हा शब्द जकातसाठीही वापरला जातो, ज्याचे अदा करणे इस्लामी कायद्यानुसार आवश्यक आहे आणि इथे हाच अर्थ अभिप्रेत आहे. अशा प्रत्येक धनसंपत्तीस लागू पडते, जो मनुष्य आपल्या राजीखुषीने अल्लाहच्या मार्गात खर्च करतो. उपरोक्त हदीस वचनातील शब्द ‘परतविला जाईल’ स्पष्ट दर्शवितो की जकात जी धनवानाकडून वसूल केली जाईल, ती  वस्तुत: समाजातील गरीब आणि गरजवंतांचा हक्क आहे, जो त्यांना मिळवून दिला जाईल. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की ज्या माणसाला सर्वश्रेष्ठ अल्लाहने धन दिले  आणि मग त्याने त्याची जकात अदा केली नाही, त्याचे हे धन कयामतच्या दिवशी अतिशय विषारी सापाचे रूप धारीण करील, ज्याच्या डोक्यावर दोन काळे ठिपके असतील (हे अती  विषारी असण्याचे लक्षण आहे.) आणि तो त्याच्या गळ्याचा हार बनेल. मग त्याच्या दोन्ही जबड्यांना पकडून हा साप म्हणेल, मी तुझे धन आहे, मी तुझा खजीना आहे. त्यानंतर प्रेषित  (स.) यांनी पवित्र कुरआनातील आयतीचे पठन केले जिचा अर्थ असा, ‘‘ते लोक जे आपले धन खर्च करण्यात कंजूसी करतात, त्यांनी असे समजु नये की त्यांचा हा कंजूसपणा  त्यांच्यासाठी अधिक चांगला ठरेल. या उलट तो अधिक वाईट ठरेल. त्यांचे हे धन कयामतच्या दिवशी त्यांच्या गळ्याचा हार बनेल. अर्थात ते त्यांच्यासाठी भयंकर विनाशकारक ठरेल.  (हदीस- बुखारी)

माननीय आयशा (रजी.) सांगतात की, मी प्रेषित (स.) यांचे असे निवेदन ऐकले की, ‘‘ज्या धन-संपत्तीतून जकात न काढली जाईल, त्यातच ती मिसळलेली राहील तर ती त्या  धनसंपत्ती नाश केल्याशिवाय राहात नाही.’’ (हदीस - मिश्कात)

भावार्थ

नाश करण्याशी अभिप्रेत हे नव्हे की, जो मनुष्य जकात देत नसेल आणि स्वत:च खाईल तर अपरिहार्यत: कोणत्याही स्थितीत त्याची सर्व मालमत्ता नाश पावेल. ते धन ज्याचा लाभ घेण्याचा त्याला हक्क नव्हता आणि जो फक्त गरीबांचा हिस्सा होता, तो त्याने गिळंकृत करून आपल्या ईमानाचा सर्वनाश ओढवून घेतला. इमाम अहमद बिन हंबल यांच्याद्वारे हाच खुलासा उल्लेखित आहे, आणि असेही पाहण्यात आले आहे की जकात हडप करून घेणाऱ्याची संपूर्ण मालमत्ता बघता बघता नष्ट झाली आहे.

जकात : दिनदुबळ्यांचे अधिकार
मा. अनस बिन मालिक (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याकडे एक माणूस आला व म्हणाला की, ‘‘हे ईश्वराच्या प्रेषिता! मी खूप श्रीमंत आहे मुलेबाळेही  आहेत, तसेच गुरेढोरेही आहेत. तेव्हा मी आल्या संपत्तीचा व्यय (खर्च) कसा करावा?’’ प्रेषितांनी (स.) उत्तर दिले की, ‘‘तुम्ही आपल्या संपत्तीची जकात द्यावी कारण जकात तुमच्या   आत्म्यास शुद्ध करते.आपल्या नातलगांशी संबंध जोडा व त्यांचे अधिकार पूर्ण करा. याचक, शेजारी आणि दिनदुबळ्यांचे अधिकार त्यांना द्या. (हदीस - मसनद अहमद)

नमाज, रोजा, जकात चा आदेश पूर्ण करणारे आदरणीय आयेशा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘तीन प्रकारच्या लोकांसमोर, तीन प्रकारच्या  अडचणी अजिबात येत नाहीत. १) जे लोक नमाज, रोजा आणि जकात अदा करतात, त्यांच्याशी ईश्वर नमाज, रोजा, जकातची पूर्ती न करणाऱ्याबरोबर होणारा (प्रकोपीय) व्यवहार  करणार नाही. २) ज्या दासाला ईश्वराने त्याच्या भल्या पुण्य कर्मास्तव आपल्या छत्रछायेत व सुरक्षेत घेतले आहे, त्यास कयामतच्या दिवशी इतरांकडे स्वाधीन करणार नाही. ३) जो  माणूस एखाद्या समाजाशी स्नेह ठेवतो, ईश्वर त्याला त्याच्या स्वाधीन करतो. (हदीस - मसनद अहमद)

- मतीन तारिक बागपती
    हे पॉकेट साईझ पुस्तक सुद्धा बाल साहित्याला वाहिलेले आहे. ह्यात लहान लहान गोष्टी आहेत त्या सर्व बोधप्रद आहेत. लहान मुलांचे ह्या गोष्टीतून मनोरंजन तर होतेच परंतु त्याच वेळी त्यांना नैतिक शिक्षण सुद्धा प्राप्त होते.
    ह्यात आंधळा न्याय, सिंह आणि मनुष्य, हिरणी बहिण, तिरळा घुबड, प्रयत्नाचे फळ, लोमडीचे धाडस इ. लहान बोधकथा आल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 117   -पृष्ठे - 24     मूल्य - 06        आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/kpxsj4kmhnn7sb1lx9o7c4qa5nmavd8u

कुरआनचे अध्ययन केल्यास लक्षात येते की, अल्लाह जो विश्वाचा निर्माता, मार्गदर्शक व सर्वांचा पालनकर्ता आहे, केवळ तोच आराध्य आहे, या तत्त्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्यात आली आहे. हीच बाब मानवी मनावर बिबविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले आहेत. कुरआनने ईश्वराचे अस्तित्व पटवून देण्यापेक्षा तोच सर्वांचा पालनकर्ता असून केवळ तोच आराध्य आहे या तत्त्वाची पुष्टी केली आहे. नास्तिकतेबाबत कुरआनात विशेष चर्चा नाही, मात्र अनेकेश्वरवादाचे अनेक श्लकां (आयतीं) द्वारा खंडन करण्यात आले आहे. ईश्वरासह इतरांनाही आराध्य मानण्यासंदर्भात लोक चार प्रकारच्या चुका करतात.
१) ईश्वरासोबत इतरांची आराधना करणे.
२) ईश्वरीय गुण इतरांना प्राप्त असल्याबाबत श्रद्धा बाळगणे.
३) ईश्वरासमान इतरांनाही शक्ती वा सामर्थ्य प्राप्त असते, अशी श्रद्धा बाळगणे.
४) ईश्वराचे हक्क इतरांना बहाल करणे.
१) ईश्वरासोबत इतरांना आराध्य मानण्याचे ठळक उदाहरण द्यायचे झाल्यास ख्रिस्ती धर्मीयांचा उल्लेख करता येईल. ते येशु ख्रिस्तांना ईश्वर-पुत्र मानतात. ईश्वर कोणत्याही सजीव प्राण्याचे रुप घेऊन अवतार धारण करतो, ही कल्पनाच मुळी फोल आहे. ईश्वर जो संपूर्ण विश्वाचा सृजनकर्ता आहे, तो एका माणसाचे रूप धारण करील, ही बुद्धीस न पटणारी बाब आहे. ईश्वराचा पुत्र मानणे म्हणजे माणसाला ईश्वराचा दर्जा देण्याचा अनेकेश्वरवादी दृष्टीकोन आहे. अशाच प्रकारे अनेकेश्वरवादी देवदूतांना ईश्वराच्या मुली मानतात. राम हा ईश्वराचा अवतार होता असे, मानणेही अनेकेश्वरवादी श्रध्देचे उदाहरण आहे.
२) ईश्वरीय गुण इतरांनाही प्राप्त असतात असे मानणे हाही अनेकेश्वरवादाचा प्रकार आहे. ईश्वर संपूर्ण विश्वातील प्रत्येकाचे म्हणणे ऐकत असतो. ईश्वराला संपूर्ण विश्वातल्या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे. जगाच्या पाठीवरून कोणत्याही कानाकोपऱ्यातून दिलेली आरोळी त्यास ऐकू येते. तो एकाच समयी सर्वकाही बघू शकतो. ईश्वर सर्वकाही एकाच वेळी पाहू शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो, अशा प्रकारे दुसऱ्या शक्ती वा व्यक्तींनाही पाहता येते, ऐकता येते, सर्वकाही समजते असे मानणे म्हणजे एकेश्वरवादास नाकारणे होय. एखादी व्यक्ती बिछाण्यावर पडल्या पडल्या एखाद्या महापुरुषाला (संत-साधूला) मदतीकरिता हाक देत असेल, तर तो ईश्वरीय गुण त्या महात्म्यासही प्राप्त आहे असे तो समजत आहे, असा अर्थ निघतो.
३) अशाच तऱ्हेने जे अधिकार ईश्वरास प्राप्त आहेत ते मानवासही प्राप्त आहेत, असे मानणे म्हणजे मानवाची ईश्वराशी बरोबरी करणे मानले जाईल. ईश्वर सर्व प्राण्यांचा भाग्यविधाता आहे. ईश्वराने मनुष्याला जे काही दिले आहे त्यात कोणीही कमी-जास्त फरक करू शकत नाही. ईश्वराच्या इच्छेविरुद्ध कोणीही कोणास ठार करू शकत नाही व ईश्वर एखाद्याला ठार करू इच्छित असेल तर त्याला जगातल्या सर्व शक्ती एकत्र येऊनही वाचवू शकत नाहीत. माणसाने ईश्वराचे अधिकार इतर शक्तींनासुद्धा प्राप्त आहेत, असा विश्वास बाळगणे फार मोठी चूक आहे. ईश्वरीय गुण इतरांनाही प्राप्त असतात, ईश्वर इतर सजीवांचे रूप धारण करतो, ईश्वराचे अधिकार इतर शक्तींनाही प्राप्त असतात या धारणे वा श्रध्देमुळेच माणसे अनेकेश्वरवादी होऊन ईश्वरेतरांची पूजा-अर्चा वा उपासना करण्याची चूक करतात. मनुष्य त्याच शक्ती वा व्यक्तीची उपासना करतो जिच्यापासून त्याचे भाग्य निश्चित होण्याची त्याला शक्यता वाटते. जर त्याच्या मनात दृढ विश्वास असेल की, ईश्वराव्यतिरिक्त इतर कोणत्याच शक्तीला ईश्वरासारखे सामर्थ्य व अधिकार प्राप्त नाही तर तो अनेकेश्वरवादाकडे वळणार नाही.
४) उपरोक्त तिन्ही कारणांमुळे मनुष्य अनेकेश्वरवादाकडे वळतो. माणसांनी ईश्वराची उपासना करायला हवी, त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला हवे, पण चुकीच्या धारणांमुळे तो इतरांची उपासना करू लागतो. कुरआनच्या शिकवणीनुसार, ईश्वराव्यतिरिक्त दुसरा कोणीच आराध्य वा उपास्य होऊ शकत नाही. ईश्वर सर्वकाही ऐकतो, सर्वकाही पाहतो, तो सर्वज्ञ आहे व तोच सर्वशक्तिमान आहे, तोच प्रार्थना ऐकू शकतो, प्रार्थना मान्य करू शकतो. म्हणून त्याचे दासत्व स्वीकार करायला हवे. त्याचीच उपासना करायला हवी. कुरआनात बऱ्याच वेळा याच बाबींचा उल्लेख केला गेला आहे. उद्देश्य हाच की, मनुष्याने ईश्वराशिवाय दुसऱ्या कोणासही पूज्य (आराध्य) मानू नये.
ज्याप्रमाणे आराध्याच्या बाबतीत माणूस चूक करतो, तसाच तो पालनकर्त्याच्या बाबतीतही चूक करतो. ‘रब’ म्हणजे पालनकर्ता. ‘इलाहा’ व ‘रब’ (आराध्य व पालनकर्ता) या दोन्ही संज्ञाच्या बाबतीत मानवाने चुकीच्या धारणा निर्माण करून ईश्वरनिर्मित व ईश्वराद्वारेच अस्तित्वात असलेल्या सजीव व निर्जीवांना उपास्य मानले आहे.
पालनकर्त्याबाबत चुकीचा समज
लोक समजतात ईश्वराव्यतिरिक्त इतरही शक्ती अन्नपुरवठा करतात, पालनपोषण करतात, आरोग्य व सुदृढ देहयष्टी देतात, म्हणून ते त्यांची उपासना करू लागलेत. मानवाने पालनकर्त्या ईश्वराचे पालनपोषणाचे श्रेय इतरांशी निगडीत केले, कारण ते त्यांना अनन्यसाधारण शक्ती व सामर्थ्यांचे धनी वाटतात. काही लोकांना देवदूत तर काहींना माणसे, काहींना ग्रह तर काहींना नक्षत्र, जनावरे, वृक्ष मानवाचे हितकर्ते व मानवाच्या गरजा पुरविणारे वाटतात. काही तर माणसांनाच माणसाचे पालनकर्ते मानतात. सम्राट नमरुद इराकचा शासक होता, सर्व शक्ती त्याच्या हातात एकवटली होती. म्हणून तो स्वतःला तेथील जनतेचा पालनकर्ता समजू लागला. म्हणून इब्राहीम (अ.) यांनी त्यास म्हटले की, माझा पालनकर्ता जीवनदाता आहे व जीवनाचा अंतही करणारा आहे. नमरुद उत्तरला, ‘‘मीही ज्याला हवे त्याला जीवित ठेवतो व नको असेल त्याला मारून टाकतो.’’ मग इब्राहीम (अ.) यांनी सांगितले,‘‘माझा ईश्वर पूर्वेकडून सूर्याचा उदय करतो, तू असे कर की सूर्योदय पश्चिमेकडून करून दाखव.’’ नकारवादी नमरुद निरुत्तर झाला. त्याला ठाऊक होते की, तो स्वतः जगाचा पालनकर्ता नाही. तरीही त्याने लोकांचा पालनकर्ता असण्याचा हट्ट सोडला नाही.
याचप्रमाणे किग फारोह (फिरऔन) ची कथा आहे. फारोहने जाहीर केले होते की, तो सर्वांत मोठा पालनकर्ता आहे. कारण त्याचे संपूर्ण इजिप्तवर वर्चस्व होते. मात्र एकेश्वरवादात पालनकर्त्याचा सहकारी किवा भागीदार नसतो, म्हणून कुरआनात ईश्वरास बऱ्याच ठिकाणी पालनकर्ता संबोधिले गेले आहे. उद्देश हाच की, मानवाच्या मनावर ही बाब खोलवर रुजविली जावी की, ईश्वरच सर्वांचा पालनकर्ता व आराध्य आहे व त्याच्याव्यतिरिक्त साऱ्या मानवजातीचा इतर कोणीही पालनकर्ता नाही व आराधनेस पात्रही नाही. निश्चितच याच दृढ श्रद्धाभावनेने संपूर्ण मानवजातीचे कल्याण व उत्कर्ष साधता येईल.

अब्दुल्ला बिन उमर (रजि.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘रोजा आणि कुरआन ईमानधारकांसाठी शिफारस करतील. रोजा म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी या माणसाला दिवसा खाण्यापिण्यापासून व इतर लज्जतीपासून रोखले, तर याने स्वत:ला रोखून ठेवले. तर हे माझ्या पालनकर्त्या! या माणसाबाबत माझी शिफारस  कबूल कर, आणि कुरआन म्हणेल, ‘‘मी याला रात्री झोप घेण्यापासून रोखले (आपली साखरझोप सोडून नमाजमध्ये कुरआन पठण करीत राहिला) तेव्हा हे अल्लाह! या माणसांबाबत  माझी शिफारस कबूल कर. सर्वश्रेष्ठ अल्लाह दोघांची शिफारस कबूल करेल.’’ (हदीस- बैहकी, मिश्कात)

रोजा : नरकाग्नीपासून बचाव करीता ढाल आहे माननीय जाबीर (रजि.) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांना कआब बिन उज़जा (रजि.) शी संबंधीत होऊन सांगताना ऐकले  की, ‘‘हे कआब बिन उज़जा! ‘नमाज’ ईश्वराशी जवळीकता साधण्याचे माध्यम आहे. तसेच रोजा नरकाग्नीपासून बचावाकरीता ढाल आहे. त्याचप्रमाणे सदका (दान) पापांना असे नष्ट  करतो जसे पाणी अग्नीस विझवतो.’’ हे कआब बिन उज़जा! माणसे दोन प्रकारची असतात. प्रथम प्रकारची माणसे, स्वत:ला या ऐहिक जीवनाच्या अती किरकोळ वस्तुंच्या मोबदल्यात  विकतात. आणि स्वत:ला संकटाच्या स्वाधीन करतात. दुसऱ्या प्रकारची माणसे स्वत:स खरेदी करतात आणि नरकाग्नीपासून स्वत:ची सुटका करतात. (तरहीब व तरगीब)

भावार्थ
अर्थात जगामध्ये दोन प्रकारची माणसे असतात. एक वर्ग, ऐहिक जीवनाच्या भोग-वस्तुंचे पूजारी असतात व हीच माणसे ईश्वरीय कोपास बळी पडतात. दुसऱ्या प्रकारची माणसे ऐहिक  भोगवस्तुपासून स्वत:चा बचाव करतात आणि ईश्वराचे दास्यत्व आणि उपासनेत जीवन व्यतीत करतात. निश्चितच असे लोक नरकाग्नीपासून मुक्त होतील.

रोजाचे महत्त्व
माननीय अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘जो माणूस रमजान महिन्याच्या एक सुद्धा रोजा, कोणत्याही धर्म-संमत कारणाशिवाय (शरअी कारणाशिवाय) सोडून देईल, त्या रोजाची भरपाई, रमजान व्यतिरिक्त काळात आजीवन धरलेल्या रोजामुळे पूर्ण होणार नाही.’’ (हदीस - तिर्मिजी व अबू दाऊद)

भावार्थ
रमजानचे रोजे हे प्रत्येक श्रद्धावंतासाठी फर्ज (अनिवार्य) आहेत. रोजा सोडण्यापासून ज्या कारणांची शरिअतने परवानगी दिली आहे, त्या शरअी कारणाव्यतिरिक्त एखाद्याने, रमजानचा  एक रोजा सुद्धा सोडून दिला तर हा त्याचा अपराध मानला जाईल. त्या व्यक्तीने रमजान व्यतिरिक्त इतर महिन्यात आजीव रोजे धरले तरी, त्या एका अनिवार्य (फर्ज) रोज्याची  भरपाई होणार नाही. म्हणून श्रद्धावंतांनी रमजानचे रोजे, कुठल्याही प्रकारे, नित्यनेमाने हे केलेच पाहिजे.

रोजा : शरीराची जकात
माननीय अबु हुरैरा (रजी.) म्हणतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘प्रत्येक क्लेश दूर करणारी वस्तू ईश्वराने निर्माण केली आहे आणि शरीरास (रोगांपासून)  मुक्त करणारी अथवा पवित्र करणारी वस्तू रोजा आहे आणि रोजा निम्मे सब्र (संयम) आहे.

भावार्थ

आधुनिक संशोधनानुसार संपूर्ण मुस्लिम आणि मुस्लिमेतर डॉक्टर्स यावर सहमत आहेत की, ‘रोजा’मुळे बऱ्याच जीवघेण्या रोगांपासून मुक्ती मिळते. तसेच रोजा, निम्मे संयम असण्याचा  अर्थ म्ह़यणजे, ‘रोजा’ इतर उपसना (इबादत) पेक्षा जास्त शुद्ध आणि प्रामाणिक आहे. त्यामध्ये दांभिकतेचा किंचितसा संशयसुद्धा नसतो. म्हणून मानवीय अभिलाषा व भौतीक सुख  उपभोगण्याच्या इच्छाआकांक्षावर ताबा मिळविण्याची शक्ती मिळते. ही शक्ती इतर संपूर्ण इबादत (उपासना) पासून मिळणाऱ्या क्षमतेच्या निम्मी असते.

जरी दिनदर्शिकेतील नववा महिना हा रमजान महिना होय. रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिन्यांत अग्रस्थानी असलेला व वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा  असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत  मुहम्मद (स.) यांचा सर्वांत प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
इस्लाम धर्मातील हिजरी महिने हे चांद्रिक कालगणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवातदेखील चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते  याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे, म्हणूनच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत (स्वर्ग) चे दार उघडले जाते व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते आणि त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे, त्यांनी पुढे व्हावे व जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत, त्यांनी त्यापासून दूर रहावे.
या महिन्यातील प्रमुख गोष्टी :
१. रोजा
२. नमाज व तरावीहची विशेष नमाज
३. शबे कद्रची रात्र
४. कुरआन
५. जकात उल फित्र

१. रोजा (उपवास) -
रोजा म्हणजे पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी करून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्नपाण्याचा एक कणसुध्दा खाणेपिणे वर्ज्य असते, असे पूर्ण  महिनाभर - अर्थात २९ ते ३० दिवस चालते. रोजा, या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्षे चालणाऱ्या यंत्राला, गाडीला वर्षातून एकदा का होईना  सर्व्हिसिंग करून घेतो - जेणेकरून गाडीचे, यंत्राचे कार्य सुरळीत होवो व त्याचे आयुष्य वाढो. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्नप्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीररूपी यंत्र  सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे, म्हणून रोजा केला जातो. यामुळे शरीराची अन्नप्रक्रिया आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
रोजा असलेल्या रोजादाराच्या पोटात सामान्यापेक्षा दीर्घ काळासाठी अन्नपाणी नसल्याने पोटात एक प्रकारची ऊर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिकरित्या कमी होते. म्हणजेच  रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंतांना भूक व तहान याची प्रचिती करून देतो, ज्यामुळे यांना गरिबीची जाणीव होते. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे पोटभर जेवण न  करता एक वेळ जेवून उपाशी राहून ज्या वेदना/त्रास सहन करतो, त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजांमुळे होते.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात. श्रीमंत लोकांच्या मनात गरिबांबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजांमुळे निर्माण होते. याचा  परिणाम अन्नधान्य, वस्त्र, धन, इत्यादी दान करण्याची इच्छा प्रबळ होऊन - ते दान वास्तवात गरजू असलेल्या गरिबांच्या पदरात पडून बऱ्याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग  मोकळा होतो, तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवयही रोजादारांना या रमजानच्या रोजांमुळे होते.
रोजा हा गर्भवती महिला, प्राणघातक आजार असलेली व्यक्ती (उदाहरणार्थ : कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवनमरणाचा प्रश्न उदभवू शकतो अशा व्यक्ती, लांब  पल्ल्याचे प्रवासी, कमीतकमी सात वर्षे ते अकरा वर्षे वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांना माफ करण्यात आला आहे.

२. तरावीह (रात्रीची विशेष नमाज) :
मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजरची नमाज, दुपारी जोहरची नमाज, दुपारी असरची नमाज (सूर्यास्ताच्या आधी), सायंकाळी मगरीबची नमाज  आणि रात्री इशाची नमाज अशी एकूण पाच वेळेची नमाज आहेत. नमाज हा ही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. नमाजची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द ‘अल्लाहू अकबर’ याचा अर्थ  होतो की, ‘तो सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे’ आणि त्याच्या प्रार्थनेची अर्थात नमाजची वेळ झालेली आहे - मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरिब सर्व जण त्या पवित्र  ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरिक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तरावीहची विशेष अशी नमाज पूर्ण  महिनाभर होते. विविध मस्जिदीत या तरावीहच्या विशेष नमाजमध्ये रोज कुरआनचे पठण केले जाते.

३. शब-ए-क़द्र (पवित्र रात्र) :
सर्वांत पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले. ‘आम्ही याला (कुरआनला) क़द्रच्या रात्री अवतरले आहे.’ (दिव्य कुरआन ९७:१)
या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो, इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या १०००  महिन्यांच्या तुलनेतदेखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.
‘कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.’ (दिव्य कुरआन ९७:३)
या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्त्व आहे. कोणीही खऱ्या भक्तिभावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्चात्ताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली  तर नक्कीच गुन्ह्यांची माफी मिळते, परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.

४. कुरआन :
इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांच्यावर अल्लाहकडून अवतरलेला आसमानी संदेश - कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानवजातीकरिता मार्गदर्शन  आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.
‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले - मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.’ (दिव्य कुरआन २:१८५) 
जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे, तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी ३० खंड, ११४ अध्यायांमध्ये करण्यात आली आहे. यात ६००० पेक्षाही जास्त  आयत आणि विशेष म्हणजे १००० पेक्षा जास्त आयत या आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत. कुरआन हा पवित्र ग्रंथ असून कयामतपर्यंत (अंतिम निवाड्याचा दिवस) हयात आणि  कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत: अल्लाहने स्वीकारलेली  आहे व याच प्रमुख कारणामुळे आज साडे चौदाशे वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या कानामात्रात कोणताही बदल झालेला नाही आणि इन्शाअल्लाह कयामतपर्यंत होणारही नाही.
‘उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वत: याचे संरक्षक आहोत.’ (दिव्य कुरआन १५:९)

५. जकात उल फित्र (दानधर्म) –
हा रमजान महिन्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. ‘जकात उल फित्र’ म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत, सधन आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक  व्यक्तीमागे २.५ किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते, जेणेकरून त्या गरीब  कुटुंबालादेखील ईदच्या सणामध्ये सामील होता यावे. थोडक्यात जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न (सोन्याचांदीचे स्रfगने, भूखंड, बँक बॅलन्स, शेतीतून मिळणारे उत्पन्न) हे एकूण २०  लाख होत असल्यास, त्यास २.५ टक्के प्रमाणे रुपये ५०,००० हे जकात देणे बंधनकारक आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटुंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या जकात उल फित्रचे महत्त्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकात उल  फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाच्या वर्षभराची खाण्यापिण्याची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
वरील माहितीवरून आपल्या असे लक्षात येते की, रोजा (उपवास) म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तरावीहची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरीत  झालेली रात्र), कुरआन, जकात व फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे.
जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खऱ्या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, जुगार या अनैतिक गोष्टींपासून  दूर नसेल तर प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजादाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
महिनाभराच्या उपवासानंतर चंद्रदर्शन होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष हे सुवासिक तेल, अत्तर (इत्र) लावून, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष  नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिदमध्ये जातात. या विशेष नमाजला ‘ईद-ऊल-फित्र’ची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजनंतर एकामेकांना आलिंगण (गळाभेट)  देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार व विविध खाद्यपदार्थांची मेजवानी होते.

- इक्बाल काझी
मो.: ९९२३०४१२३४

जिंदा रहेना है तो हालात से डरना कैसा
जंग लाजिम हो तो लष्कर नहीं देखे जाते
इस्लाम हा समतावादी धर्म असल्या कारणाने पृथ्वीवर जेथे कोठेही त्याचा नावाचा उच्चार केला जातो तेथे प्रस्थापितांमधून त्याचा विरोध सुरू होतो तर सामान्य जनतेतून त्याचे स्वागत  केले जाते. गार-ए-हिरामधून प्रेषित्व बहाल झाल्यावर हजरत मुहम्मद मुस्तफा (सल्ल.) यांनी इस्लामची घोषणा करताच ज्या मक्का शहरामध्ये त्यांना अमीन (विश्वासपात्र) आणि  सादीक (खरा) म्हणून ओळखले जात होते त्याच शहरात त्यांचा विरोध सुरू झाला. हा विरोध शोषित समाजाकडून नव्हे तर प्रस्थापितांकडून झाला.
मक्का शहर त्यावेळी अरबास्थानाची आर्थिक राजधानी होती. तेथील काबागृहामध्ये 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक मुर्ती ही अनेक कबिल्यांची कुलदैवत होती. त्या काळातील  टोळ्यांवर आधारित समाजरचनेमध्ये कुलदैवतेचे अनन्यसाधारण महत्व होते. प्रत्येक टोळीमध्ये ज्या काही चांगल्या घटना घडत होत्या त्या मक्केमधून येऊन आपल्या कुलदैवतेसोबत  साजऱ्या केल्या जात होत्या. वर्षातील 360 दिवस अखंडपणे विविध टोळया मक्का शहरात येत आणि बकरे, ऊंट व पूजेचे इतर साहित्य खरेदी करत. तेथे काही दिवस मुक्काम करत आणि परत जात. त्यामुळे मक्का शहरात चारही बाजूंनी पैशाचा ओघ सातत्याने येत होता. 360 दिवसांचा हा अखंड रतीब तर राहिलेले पाच दिवस हजचा उत्सव, त्यात तर लोकांच्या उत्साहाला उधान येई व पैशांच्या राशी मक्का शहराच्या व्यापाऱ्यांसमोर पडत. थोडक्यात मक्का हे अरबस्थानाचे एकमेव तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र झाले होते. त्यामुळे साहजिकच तेथे राहणारे सर्व कबिले खासकरून ’कुरैश’ कबिला सर्वार्थाने संपन्न झालेला होता. स्पष्ट आहे जेव्हा प्रेषितांनी 360 मुर्त्यांना नाकारून एका ईश्वराची उपासना करण्याचा संदेश दिला तेव्हा  त्या सर्व कबिल्यांचा डोळ्यासमोर त्यांचा आर्थिक मृत्यू दिसायला लागला. त्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा संदेश याच कारणाने त्यांनी नाकारला. त्यांना  स्वतः आपल्या हाताने आपल्या अर्थव्यवस्थेची मान आवळने शक्य झाली नाही. त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा विरोध सुरू केला. मात्र त्याचवेळेस त्याच शहरातील  प्रस्थापितांच्या अत्याचाराला कंटाळलेल्या शोषित लोकांना प्रेषित सल्ल. यांचा संदेश आवडला व तो त्यांनी अत्यंत प्रेमाने स्वीकारला देखील. मुठभर शोषितांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची साथ देण्यास सुरूवात केली तेव्हा प्रस्थापितांना ही गोष्ट रूचली असती तरच नवल. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या गरीबांना त्रास देण्यात सुरूवात केली. इतका त्रास की त्यांना  मक्का शहरात राहणे अशक्य झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्यापैकी काही लोकांना तत्कालीन शेजारील राष्ट्र हबशमध्ये हिजरत (स्थलांतर) करण्याचा आदेश दिला. सातत्याने 13  वर्षे प्रयत्न करूनही मक्का शहरातील प्रस्थापितांनी इस्लामचा स्वीकार केला नाही. याउलट मक्का शहराच्या आजूबाजूच्या इलाख्यामध्ये मात्र इस्लामचा स्विकार करणाऱ्यांची संख्या  सातत्याने वाढत गेली. कारण ते लोक मक्काच्या रहिवाशांसारखे संपन्न नव्हते. विशेषतः मक्क्यापासून जवळ असलेल्या मदिना शहरातील लोकांना प्रेषितांचा संदेश खूप भावला. मक्का  पेक्षा मदिनामध्ये इस्लामचा स्विकार करण्याची संख्या वाढत गेली. मदिनातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत (प्रेषितांच्या हातात हात  देऊन एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे) करत. याला बैत-ए-उक्बा असे म्हटले जाते. एकूण तीन वेळा बैत-ए-उक्बा झाल्या. तिसरी बैत-एउ क्बा प्रेषित्वाच्या बाराव्या वर्षी झाली. झाले  असे की, मदिनाच्या 75 सन्माननीय व्यक्तींचे एक शिष्टमंडळ हजसाठी आले होते. हज झाल्यानंतर त्या शिष्टमंडळाने एका रात्री प्रेषित सल्ल. यांची भेट घेऊन त्यांच्या हातावर बैत  केली व मदिनाला येण्याचे निमंत्रण देऊन सर्वार्थाने साथ देण्याची शपथ घेतली. या घटनेनंतर थोड्याच दिवसात अल्लाहच्या आदेशाने स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना येथे  हिजरत केली. प्रेषितांच्या आगमनाने मदिनाचे एकूण वातावरणच ढवळून निघाले. त्या वातावरणाचे वर्णन ’शोधन’चे माजी संपादक आणि प्रेषितांचे चरित्रकार सय्यद इफ्तखार अहेमद  यांनी खालीलप्रमाणे केलेले आहे. ’’प्रेषितांनी आणलेला धर्म स्विकारणे म्हणजे प्रत्येकाने स्वतःविरूद्ध जाणे आणि सर्व लोकसमुहांनी स्वतः अंगीकारलेल्या वृत्ती, प्रवृत्ती, उद्दिष्टे अशा सर्व  गोष्टींना तिलांजली देऊन नव्या संकल्पना, नवी विचारधारा, जीवनाचा नवा अर्थ, ईश्वराच्या एकत्वाची संकल्पना स्विकारावी लागणार होती. लोक सहजासहजी हे करण्यास तयार नव्हते.’’(संदर्भ : मुहम्मद सल्ल. नवयुगाचे प्रणेते पान क्र. 289- 290).
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या यशस्वी हिजरती व त्यांना मदिना शहरात मिळालेल्या आश्रयामुळे मक्कावासियांचा नुसता जळफळाट झाला. यावर कडी तेव्हा झाली जेव्हा मदिनेहून औस या प्रतिष्ठित कबिल्याचे सरदार सअद बिन मआज रजि. उमराह (काबागृहाच्या दर्शना) साठी मक्का शहरात आले व आपले स्नेही उमैय्या यांचेकडे थांबले. एका दिवशी ते दोघे उमराह  करण्यासाठी काबागृहाकडे निघाले असता कुरैशचा सरदार अबु जहल त्यांना भेटला आणि उमय्या यांना विचारले की, ’’तुमच्या बरोबर हे गृहस्थ कोण?’’ उमैय्या यांनी सआद बिन  मआज रजि. यांचा परिचय करून देताच तो त्यांच्यावर खवळला आणि धमकी दिली की, ’’ तुम्ही उमैय्याचे पाहूणे नसले असते तर जिवंत परत जावू दिले नसते.’’ त्यावर हजरत  सआद रजि. ही चिढले व म्हणाले की, ’’तुम्ही आमच्यावर हज आणि उमराह करण्यासाठी बंदी घातली तर आम्ही मदिनाजवळचा महामार्ग रोखू, मग पाहू तुमचे व्यापारी काफिले कसे  जातात ते?’’ तेव्हा अबु जहलचे डोळे उघडले व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मदिना शहरात हिजरत करण्यामागचा अर्थ त्याला समजला. मक्का शहराचा जवळ-जवळ सर्व व्यापार  यमन आणि सीरियाशी होत होता व व्यापारी काफिले मदिनालगतच्या मार्गानेच जात होते. हजरत सआद रजि. यांनी तो मार्गच तोडण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे कुरैश  हादरले व सर्व व्यापाऱ्यांची तातडीने एक बैठक बोलाविण्यात आली व या विषयावर विचार करण्यात आला. शेवटी असे ठरले की, मदिना शहरामध्ये राहणारा एक सरदार ज्याचे नाव   अब्दुल्लाह बिन उबई होते व ज्याची मदिना शहराचा प्रमुख म्हणून निवड जवळ-जवळ निश्चित झाली होती. मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. मदिना शहरात आल्यामुळे त्याचे प्रमुखपद  आपोआपच रद्द झाले होते. प्रेषित सल्ल. यांचा अघोषितपणे मदिनाच्या बहुसंख्य लोकांनी आपला प्रमुख म्हणून स्वीकार केला होता. म्हणून अब्दुल्ला बिन उबई चिडून होता. याची  माहिती मक्कावासियांना होती. म्हणून त्यांनी त्याला पत्र लिहून प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची सूचना केली व त्यासाठी आवश्यक ती मदद देण्यासाठी तयार असल्याचे पत्रामध्ये नमूद केले.
ही गोष्ट जेव्हा प्रेषित सल्ल. यांना समजली तेव्हा त्यांनी अब्दुल्ला बिन उबईची भेट घेऊन त्याची समजूत काढली व त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली की आमच्या विरूद्ध कारवाई करण्याच्या नादात त्याला स्वतःच्या नातेवाईकांशीच संघर्ष करावा लागेल व त्यात सर्वांची अतोनात हानी होईल. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्याने दोन पत्रे मिळूनही  अब्दुल्ला बिन उबई गप्प बसला. तो काही करत नाहीये हे लक्षात आल्यावर मक्कावासियांनी मदिनावासियांच्या खोडी काढण्यास सुरूवात केली. त्यांच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या बकऱ्या  आणि उंट चोरण्याचा सपाटा लावला. काहीही करून एक मोठी शक्ती बनण्यापूर्वी प्रेषित सल्ल. व त्यांच्या साथीदारांना नामोहरम करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यांना स्वतःच्या  लष्करी शक्तीचा फार अभिमान होता. दरम्यान, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदिना शहरात येताच तेथील अनेक कबिल्यांशी विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चन कबिल्यांशी वाटाघाटी करून  मदिना शहर सुरक्षित करून घेतले होते. इतिहासामध्ये याला मदिना करार म्हणतात. मक्कावासियांचे आक्रमण मदिनावर होणार याची खुनगाठ बांधून त्यांनी सर्व कबिल्यांची एकजूट  केली होती. त्यानंतर त्यांनी कुरैशच्या कुरापतींचे उत्तर कसे द्यावे? यासाठीची योजना आखण्यास सुरूवात केली. त्यांनी मदिना शहरातील सर्व कबिल्यांची बैठक घेऊन मक्कावासियांच्या  संभावित आक्रमणाविरूद्ध कशी रणनिती आखावी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा मदिना वासियांनी विशेषतः अन्सार लोकांनी प्रेषित सल्ल. यांना सर्वाधिकार देऊन निर्णय घेण्याची विनंती  केली व त्यांच्या निर्णयावर जीव ओवाळून टाकण्याचा निश्चय व्यक्त केला.
प्रेषित सल्ल. नेहमी सावध राहत. लवकरच त्यांना एक बातमी समजली की अबु सुफियानच्या नेतृत्वाखाली एक मोठा व्यापारी काफला, व्यापार करून, साधन संपत्ती घेऊन, सीरियाकडून मक्का शहराकडे येत आहे. त्या काफिल्यासोबत 40-50 पेक्षा जास्त सुरक्षा सैनिक नाहीत. तेव्हा मदिनातील बहुतेक लोकांना वाटत होते की, प्रेषित सल्ल. यांनी या काफिल्याला लूटण्याची परवानगी द्यावी. काफिल्याचा प्रमुख अबु सुफियान स्वतः एक अत्यंत हुशार सरदार होता. त्यालाही या गोष्टीचा अंदाज आला होता म्हणून त्याने मदिना  शहराजवळ येण्याअगोदरच एक उंटस्वार मक्का येथे पाठवून लष्करी मदद मागीतली होती. अबु सुफियानचा निरोप मिळाल्याबरोबर कुरेशचे लोक चौताळले व त्यांनी एक हजार लोकांचे  लष्कर घेऊन मदिनाकडे कूच केले.

- प्रत्यक्ष युद्ध -
इकडे अल्लाहने प्रेषित सल्ल. यांना सूचना केली की, दोन पैकी कुठल्याही एकाशी सामना केल्यास त्यांची निश्चितपणे मदद केली जाईल. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी मदिन्यातील सर्व सरदारांची बैठक बोलाविली व त्यांच्यासमोर परिस्थिती विशद केली. काही लोकांचा विचार होता की, काफिल्याला लुटावे. कारण त्यांच्याकडे लोक कमी आणि संपत्ती जास्त आहे. परंतु,  प्रेषित सल्ल. यांना मक्काकडून येणाऱ्या लष्कराशी दोन हात करण्याची इच्छा झाली. कारण जोपर्यंत मक्कावासियांचा निर्णायक पराभव केला जाणार नाही तोपर्यंत त्यांच्यातली खुमखुमी  कमी होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. म्हणून पुरेशी तयारी नसतांनासुद्धा अल्लाहच्या भरोश्यावर त्यांनी मक्काकडून येणाऱ्या कुरैशच्या लष्काराशी दोन हात करण्याचा निर्णय  घेतला. प्रेषित सल्ल. यांच्या या निर्णयाचे मुठभर युवक सोडले तर सर्वांनी समर्थन केले. जेव्हा युद्धाची जुळवाजुळव केली गेली तेव्हा 300 पेक्षा थोडे जास्त लोक उपलब्ध झाले.  ज्यांच्यापैकी फक्त दोन, तीन लोकांकडे घोडे होते. 70 लोकांकडे उंट होते, हत्यारसुद्धा पुरेशे नव्हते. फक्त 60 लोकांकडे चिलखत होते. अशाही परिस्थितीत या 313 लोकांनी आपले शीर  हातावरून घेऊन एक हजार लोकांच्या कुरैशच्या बलाढ्य लष्कराशी युद्ध करण्याची तयारी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर विश्वास ठेऊन दर्शविली. या 313 लोकांना घेऊन 17  रमजान 2 हिजरी, (13 मार्च 624) मंगळवारी प्रेषित सल्ल. यांनी मक्काकडे कूच केले. शत्रूला मदिना शहरापासून 200 किलोमीटर दूर बदरच्या ठिकाणी थोपवून युद्ध करण्याची  प्रेषितांची इच्छा होती. त्याप्रमाणे बदर या गावाजवळ उंच टेकडीवर इस्लामी लष्कराने पाडाव टाकला. पाडाव टाकताच पावसाला सुरूवात झाली. लष्कराने तात्काळ श्रमदान करून  तात्पुरता खड्डा (हौद) बांधून पाणी गोळा केले. इकडे कुरैशचे लष्कर टेकडीखाली येवून ठेपले. पावसामुळे टेकडीचा वरचा भाग पाण्याने अधिक घट्ट झाला होता तर खाली पायथ्याशी चिखल झाला होता. प्रेषितांनी प्रत्यक्ष युद्ध सुरू करण्यापूर्वी अल्लाहशी दुआ केली आणि युद्धाला आणि युद्धाला तोंड फुटले. या 313 च्या लष्कराने परिस्थितीचा लाभ उठवत हजार लोकांच्या कुरेशच्या लष्कराची दानादान उडविली. या युद्धामध्ये मुस्लिमांचे 14 यौद्धे तर कुरैशचे 70 यौद्धे कामाला आले. मुस्लिम सैनिकांनी कुरेशच्या अनेक लोकांना युद्धबंदी बनविले व  पुढे हजरत अबुबकर रजि. यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रेषित सल्ल. यांनी कुरेशकडून काही रक्कम घेऊन युद्धकैद्यांना सोडून दिले. बदरचे युद्ध प्रलयाच्या दिवसापर्यंत मुस्लिमांसाठी प्रेरणादायी  युद्ध ठरले आहे. आजही आपण अनेक मुस्लिम तरूणांच्या मोटारबाईकवर 313 चा अंक लिहिलेला पाहिलेला असेल. अनेक कवी आणि शायर लोकांनी या 313 लष्कराचे गुणगाण  गायलेले आहे. विषम परिस्थितील हे युद्ध जिंकल्याचे दोन परिणाम झाले. एक तर मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढला दोन कुरेशच नव्हे तर समग्र अरबस्थानामध्ये मुस्लिमांच्या लष्करी  ताकदीचा धाक बसला.
बदरच्या युद्धामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, युद्ध हे साधन सामुग्री किंवा सैनिकांच्या संख्या बळावर नव्हे तर धैर्य, साहस आणि अल्लाहवरील दृढ विश्वासाच्या साह्याने जिंकता येते.

- एम.आय.शेख
9764000737

इस्लाममध्ये सामुहिकतेला महत्त्व आहे. प्रत्येक बाबतीत सामुहिकतेला प्राधान्य देण्याकडे इस्लामचा कल असतो. नमाज घरामध्ये सुद्धा अदा करता येते परंतु ती मस्जिदमध्ये जाऊन  सामुहिकरित्या अदा करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. नमाजप्रमाणेच जकातसुद्धा वैयक्तिकरित्या दिली जाऊ शकते आणि बहुतेक करून आजही वैयक्तिकरित्याच दिली जाते.  मात्र जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये द्यावा लागतो. मग  एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागाणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते.  ज्यावर्षी ज्या विभागामध्ये जास्त गरज असेल त्या विभागामध्ये समिती जास्त राशीची तरतूद करू शकते.

जकात कोणाला देते येते?
सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे दान तर खऱ्या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत  आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात  आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.’’
1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वतःच्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत  नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम  मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी -  यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना  घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणतः याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या  माना  काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना  मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
आज साधारणपणे आपल्या देशात जकात ही सामुहिकपणे काढली जात नाही. त्यामुळे त्याची बरकतसुद्धा जाणवत नाही. छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये जकात दिली जात असल्यामुळे  त्याचा फारसा लाभ कोणाला होत नाही. जकात एक सामुहिक-आर्थिक, इबादत आहे. प्रत्येक शहरामध्ये जकात एकत्रित करण्याची व्यवस्था तयार करणे अपेक्षित आहे. आदर्श स्थिती ही  आहे की, प्रत्येक शहरामध्ये जबाबदार आणि अमानतदार लोकांची एक समिती गठित करण्यात यावी. त्या समितीकडे गावातल्या प्रत्येक साहेबे निसाब (जकात देण्यास पात्र) व्यक्तीने  जकात जमा करावी. गोळा झालेल्या जकातीच्या रकमेचा अंदाज घेऊन मग समितीने वर नमूद आयातीमध्ये आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे त्याची विभागणी करावी व  गरजवंतांमध्ये त्याचे वितरण करावे.
भारतामध्ये कुठलेही वर्ष असे जात नाही ज्यावर्षी कुठे ना कुठे दंगली होत नाहीत. दंगलीमध्ये होरपळून गेलेल्या लोकांना शासकीय मदत मिळत नाही. अशा वेळेस जकातीचा काही  निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या भरडल्या गेलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे. शिवाय अनेकवेळेस अपघातामध्ये अनेक कुटुंबामधील कमावती लोकं दगावतात. अशा परिस्थितीत घरच्या परदानशीन महिला आणि मुलं उघड्यार पडतात. अशा लोकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सुद्धा जकातच्या निधीचा उपयोग करता येईल. अनेक तरूण अनेक  वर्षांपासून आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगामध्ये खितपत पडलेले आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलेले आहे. समाजातील कोणीही त्यांची पुढे होवून मदत करण्यासाठी तयार नाही. अशा कुटुंबांच्या मुलभूत गरजा दूर करण्यासाठी व त्या तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा जकातीचा पैश्याचा सदुपयोग करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. मुस्लिम समाजात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संघटित होण्यासाठी ज्या दर्जाचा विचार समाजामध्ये रूजणे आवश्यक आहे तो  गेल्या 70 वर्षात रूजलेला नाही. त्यामुळे असंघटित समाजाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातनांमधून हा समाज जात आहे. समाजातील बुद्धीवंत, उलेमा, प्रेस यांना याबाबतीत  जनजागृती करता आलेली नाही. त्यामुळे घरासमोर जो जकात मागायला येईल, त्याला जकात देऊन जकात अदा केल्याचे समाधान मानण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. अनेक  गैरसरकारी संस्था सुद्धा जकात गोळा करतात. मात्र कुरआनमध्ये सांगितलेल्या आठ विभागात त्याची विभागणी करून त्याचे वितरण काटकोरपणे करत असतील याची शक्यता कमीच  आहे. जमाअते इस्लामी हिंद आणि काही मोजक्या संस्था अशा आहेत ज्या जकात जमा करण्याची आणि त्याचे काटकोरपणे वितरण करण्याची व्यवस्था बाळगून आहेत. या संस्थांच्या  द्वारे स्वतःच्या आर्थिक व्यवहाराची सी.ए.कडून तपासणीसुद्धा केली जाते. एकूणच असंघटित जकात व्यवस्थेमुळे त्याचे हवे तसे परिणाम दिसून येत नाहीत.
खरे तर आजकाल समाजमाध्यमांचा जमाना आहे. रमजानपूर्वी वर्षभर या संदर्भात लोकांचे प्रबोधन करून, रमजानपूर्वी प्रत्येक शहरात जकात गोळा करणारी समिती स्थापन करून  जकात एकत्रित करून त्याचे वितरण केल्यास अनेक गरीब कुटुंबांना त्याचा आधार मिळेल व मोठमोठी कामे लिलया होतील.
जकात एक ईश्वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात.  या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले  आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5  टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा सधन मुस्लिम  स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही संतोषजनक बाब आहे.

- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget