Latest Post

- प्रा. खुर्शीद अहमद
    11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस आहे. ह्या घटनेने अमेरिकेलाच नाही तर पाश्चात्य जगताला सुद्धा हलवून सोडले. अमेरिकेची ही एकशे दहा मजली इमारत आर्थिक सत्ता केंद्र होती. अमेरिकेची सशक्त अर्थ व्यवस्था, संपन्नतेचे प्रतीक होती.
    विश्वव्यापी भांडवलशाहीचे वैभवशाली प्रतिरूप म्हणजे वर्ल्डट्रेड सेंटर होते. याविषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तकात केली आहे जेणेकरून वास्तवता वाचकाच्या समोर यावी आणि वाचकास निर्णया प्रत येण्यास मदत व्हावी.

आयएमपीटी अ.क्र. 121   -पृष्ठे - 24     मूल्य - 10      आवृत्ती 

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/6yip84dic1668zm6n0arh12j9khp5ay4


जो विश्वास व श्रद्धा द्वेषापासून व वैरभावापासून निपजलेले नसते आणि त्यापासून प्रेरणा घेतलेली नसते, त्यापासून भौतिक लाभ तत्काळ मिळत नाही. जी श्रद्धा माणसात प्रेम, बंधुभाव, त्याग एवढेच नाही तर आपल्या बांधवाखातर प्राणार्पण करण्याची भावना निर्माण करते; खरे पाहता हीच श्रद्धा मानवतेला वास्तविक व सुदृढ देणग्यांनी व सुखांनी अलंकृत करु शकते आणि भविष्यातील समृद्धी व उन्नतीचे आधार बनू शकते. या विश्वासाचा गाभा ईश्वरावर श्रद्धा व त्याच्याशी मनःपूर्वक प्रेम होय. हा विश्वास व्यक्तिगत जीवनास पावित्र्य देऊन आपल्या निर्माणकर्त्याशी सानिध्य मिळवून देतो; पण पारलौकिक जीवनावरील श्रद्धेखेरीज ईश्वरावरील विश्वास वा त्याच्यावरील प्रेमाला काही अर्थ उरत नाही. परलोकची कल्पना माणसाला एक प्रकारच्या रक्षणाची भावना देत असते. यानंतर मानवाला अशी खात्रीपूर्वक शाश्वती प्राप्त होते जी आपल्या पार्थिव अंतानंतर नष्ट होत नाही. आपल्या जीवनात केलेले प्रयास व कष्ट निष्फळ होत नाहीत. उलट त्याला त्यांचा मोबदला या नश्वर जगात जरी मिळाला नाही तरी तो मोबदला पुढे येणाऱ्या परलोकीय जीवनामध्ये कसल्याही परिस्थितीत मिळल्याशिवाय राहणार नाही.
अशी ही फळे आहेत जी केवळ अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर विश्वासरूपी वृक्षापासून निर्माण होतात; पण इस्लाम केवळ येथेच थांबत नाही याखेरीज आणखी बरेचसे आम्हाला देतो. त्याची कहाणी इतर कहाण्यांपेक्षा भिन्न व अधिक रुचिर आहे.

इस्लामने ’नातेवाईकांशी सदाचाराने वागा’ अशी सूचना केली आहे. पवित्र कुरआनमध्ये ’’नातेवाईकांचे हक्क अदा करा’’ असा आदेश दिला आहे. याचाच अर्थ घरातील स्त्रीवर ही  जबाबदारी अप्रत्यक्षपणे सोपविली आहे. नातेवाईकांशी सद्व्यवहार, सहानुभूती, शुभचिंतनाचा व्यवहार, प्रेम, माया, सुख, दुःखात सहभाग या सर्व गोष्टींचा अंतर्भाव अपेक्षित आहे. परिवाराबरोबर नातेवाईकदेखील जोडले जाणे आवश्यक आहे. हा जोड इतका घट्ट असावा की जर एका नातेवाईकाच्या पायात काटा रूतला तर त्याची कळ दुसऱ्या नातेवाईकाला जाणवावी  आणि तिसऱ्या आप्तेष्ठाच्या डोळ्यांतून अश्रु वहावेत. पवित्र कुरआनमध्ये निवेदन आहे, ’’ ते जोडतात त्या संबंधाना (नात्यांना) ज्यांना जोडण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे. आणि  आपल्या पालनहार अल्लाहचे भय बाळगा’’ (दिव्य कुरआन).
अल्लाहने प्रत्येकाला नाते जोडण्याचा आदेश दिला आहे. नाते जोडणे हे सद्वर्तन समजले आहे. हे सद्वर्तन प्रत्येक स्त्री-पुरूषाने करावे, पण निर्माण झालेले, जोडलेले नाते तुटणार नाही  किंवा त्यात फारकत निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण नाते तोडणे हे इस्लाम अमान्य करतो. नातेसंबंध संपविणे म्हणजे पाप करणे होय आणि यासाठी अल्लाहची भीती  बाळगली जाते. या नातेसंबंधामध्ये रक्ताची नाती आणि मानलेली नाती या दोघांचाही समावेश होतो.
’’ जी पत्नी आपल्या नवऱ्याबद्दल कृतज्ञ नसेल तिला अल्लाहचा आशीर्वाद लाभणार नाहीत.’’
’’उत्तम स्त्री दात्याचे (देणाऱ्याचे) नेहमीचे आभार मानते. कोणत्याही कठीण प्रसंगात धीर दाखविणारी, सांभाळ करणारी, आज्ञाचे पालन करणारी असते.’’
ज्या महिलेला उत्तम स्त्रीत्व प्राप्त करावयाचे आहे तिने नेहमी आपणास मदत करणाराचे, घरात आणून देणाराचे, आपला उदरनिर्वाह चालवणाराचे (पतीचे) आभार मानले पाहिजेत. तसेच त्याच्या ऋणात राहायला पाहिजे. जी स्त्री दात्याचे आभार मानते, त्याच्या ऋणात राहते ती कितीही भयावह प्रसंग आला तरी डगमगत नाही. तिचा निश्चय डळमळीत नसतो. ती  आपल्या निर्णयावर कठीण प्रसंगीही ठाम राहते. ती प्रतिकूल परिस्थितीत इतरांचा सांभाळ करते व आज्ञांचेही पालन करते.
बहुतेक धर्मामध्ये आईची थोरवी गायली आहे. कोणताही धर्म आईशी अवमानकारक वागण्यास प्रवृत्त करीत नाही. सर्वच धर्मात आई अत्यंत आदरणीय, व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे धर्मशास्त्राच्या तत्त्वज्ञानात आईची अवहेलना किंवा कुचंबना अपेक्षित केलेली नाही. तसेच इस्लाम तत्त्वज्ञाने किंवा धर्माने आईचा (स्त्री) सन्मान केलेला आहे. ’’आईच्या पायात  (चरणात) स्वर्ग आहे.’’ ही शिकवण इस्लामचीच आहे. ’’आईची सेवा हे पुण्यकर्म आहे. इस्लामने आपल्या आईविषयी कृतज्ञ राहण्यास सांगितले आहे. आपल्या आईवडिलांचे हक्क  ओळखण्याची ताकीद केली आहे. कारण आईने मरणयातना सहन करून आपल्याला जन्मास घातले आहे. तसेच तिने आपल्यासाठी अन्न त्यागले आहे. (बाळ दूध पित असताना आई  खारट, तिखट, आंबट, खात नाही, कारण त्याचा परिणाम दुधावर होतो व त्यामुळे बाळाला त्रास होईल यासाठी ती अन्न त्यागते.) बाळ आजारी असल्यास आई रात्ररात्र जागते. बाळाच्या  जन्मानंतर सर्वात पहिला गुरू आई होते. आई ज्ञानपीठ आणि न्यायपीठ या दोन्ही व्यवस्था बाळासाठी स्वतः होते. लहान मुलाच्या मेंदूवर संस्कार करते. जगातील सर्वात आदरणीय  सर्वसमावेशक व्यक्ती म्हणजे आई होय. अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ थोडोर रिक त्यांच्या पुस्तकात म्हणतात, (द इमोशनल जिस्पराईट्स) ’प्रत्येक स्त्रीला तिच्या मातृत्वाचा अभिमान  वाटतो.’ तसेच त्यांनी असेही म्हटले आहे, ’स्त्री पुरूषाला अनेक सरस (उत्कृष्ठ) बाबींबद्दल मोठेपणा देते.’
ईश्वराने स्त्रीला बहाल केलेली देणगी म्हणजे तिचे मातृत्व. मातृत्वाच्या देणगीनेच स्त्रीचे प्रतिष्ठा पराकोटीला पाहोचली. कारण मानवाची निर्मिती स्त्री आणि पुरूष यांच्यातून झाली  असली तरी स्त्री जन्मदात्री आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत वंशसातत्याचे काम करते व तिला कायम वाटते की आपण आदर्श माता व्हावे. ’आई’ ही प्रचंड मौल्यवान देणगी आहे.  म्हणूनच  अनेक कवी, साहित्यिक, विचारवंत, व्याख्याते आईचे महत्त्व अनेक शब्दांत सांगतात. जसे ’आईविना माणूस भिकारी’, आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’, आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही’ ’प्रेमसिंधू आई, वात्सल्यसिंधू आई, बोलवू आता कोणत्या उपायी’, अशा अनेक प्रसिद्ध रचना आपणांस ऐकावयास  मिळतात. आज संपूर्ण भारतभर गावागावात आईची थोरवी गाणारी आणि सांगणारी माणसे भेटतात. यावरून आपल्या लक्षात येते की कितीही गडगंज श्रीमंत व्यक्ती असली आणि  तिच्याकडे असंख्य भौतिक सुविधा असल्या आणि त्या व्यक्तीस आई नसली तर तो आईसाठी भिकारी आहे. आई म्हणजे आयुष्यभर पुरणारा एक असा मोठा ठेवा आहे तो पुरतही नाही  आणि संपतही नाही. जगात कोणत्याही व्यक्तीची आई नसेल तो सर्वांत जास्त पोरका आहे. ज्याला आई नाही त्याला काही नाही. तसेच एखाद्याला आई नसली तरी त्याला आई नाही  असेही म्हणवत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांना एका इसमाने विचारले, ’’ मी कोणाची अधिक सेवा करावी.’’ त्यावर पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ पुन्हा तो म्हणाला, ’’त्यानंतर  दूसरे कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ तो माणूस पुन्हा म्हणाला,’’ आणखी कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’ तुमची आई.’’ त्या माणसाने चौथ्यांदा विचारले, ’’यानंतर कोण?’’  पैगंबरानी सांगितले, ’’तुमचे वडील.’’
वरील विवरणावरून आपणास सहज लक्षात येते की इस्लामने प्रथम दर्जा आईला म्हणजेच स्त्रीला दिला आहे, कारण स्त्री आदरणीय आहे. तिचा आदर जेव्हा तीन वेळा होईल तेव्हा  वडिलांचा आदर एक वेळा केला आहे. म्हणजेच पुरूष (वडील) तर आदरणीय आहेच पण त्यापेक्षा आई (स्त्री) तीनपट अधिक आदरणीय आहे. याचा अर्थ स्पष्ट करताना खालील वाक्याचे  पुनर्लेखन करतो, ’’आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.’’ मानव ज्या स्वर्गाच्या अपेक्षेसाठी जीवनभर सद्वर्तन करतो, स्वर्गप्राप्तीसाठी अनेक पुण्यमार्ग अवलंबितो, इस्लामने सांगितले की  आपणास सृष्टी दाखवणारी आपल्या मृत्यूपश्चात स्वर्ग-प्राप्तीची संधी देणारी वात्सल्यसिंधू आहे. त्यामुळे आईचे उपकार स्वतःच्या शरीराची कातडी काढून जरी त्याचे बूट करून आईला  घातले तरी ते कमीच आहे. आई हे असे न्यायालय आहे जिच्यापुढे मुलाचे हजारो अपराध माफ होतात. क्षमा मिळते.
मुलाची तब्बेत (शारीरिक स्वास्थ्य) कितीही उत्तम असले तरी आईच्या नजरेत आपले बाळ हे तब्बेतीने कमकुवत आहे, असे वाटते. कारण तिची माया विलक्षण आहे. मराठीमध्ये एक  म्हण आहे, ’’शेजारणीने भरवला भात आणि आईने फिरवला हात दोन्ही सारखेच.’’ आई एक आदरातिथ्य आहे आणि तिच्या चरणाच्या खालीच स्वर्ग आहे. म्हणजे आपण स्वर्गाच्या  अपेक्षेणे वनवन भटकतो आणि खरा आईच्या पायाखालचा स्वर्ग आपणास दिसत नाही. तिची आपल्या मुलावर अलौकिक माया असते, या मायेला जगात तोड नाही.
पवित्र कुरआनमधील आईचा सन्मानच केला गेला आहे. म्हणून आज मातृप्रेम व सन्मान यासाठी स्त्री पात्रच आहे. ज्ञानी, सुसंस्कृत व्यक्ती कधीच स्वतःच्या आईचा मोठेपणा नाकारू शकत नाही. आई ही संपूर्ण जगाची निर्माती आहे. ती बाळाला जन्म देते आणि रिकामी होते असे नाही. तर ती आपल्या बाळाचे लालनपालन, संगोपन करते. उदरात अर्भक  असल्यापासून ते तिच्या अंतापर्यंत आपल्या बाळावर कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. बाळाच्या नुसत्या रडण्याच्या आवाजाने आईचा पान्हा फुटतो. इस्लामने स्पष्ट  ताकीद केली आहे, ’’आपल्या आई-वडिलांचे अधिकार जाणा.’’
अर्थात आपल्या सुखात, ऐश्वर्यात, समृद्धीत त्यांचा अधिकार आहे, तो म्हणजे केवळ त्यांना सुखात सांभाळण्याचा. त्यांना सांभाळावे, त्यांची परवड होऊ नये याची काळजी घ्यावी.  आपल्या आईवडिलांशी चांगले वर्तन ठेवावे. कारण आईने आपल्या रक्ताचे दूध करून बाळाला पाजलेले असते आणि त्या दुधाचे कर्ज कोणीही आणि कधीही फेडू शकत नाही आणि तसा  हिशोबही करू नये. फक्त त्यांच्याशी सद्वर्तन करावे. आई जेव्हा आपल्या बाळाला छातीशी कवळाटून दूध पाजते तेव्हा ती व ते बाळ यांच्यात अतूट नाते निर्माण होते. म्हणून जितके  महत्त्व बाळाला जन्म देण्याला आहे, त्यापेक्षा नक्कीच अधिक महत्व स्तनपाला आहे.
आज समाजामध्ये स्तनपान करण्यास मातेला वेळ मिळत नाही. (नोकरी, व्यवसाय करणाऱ्या माता) तसेच काही स्त्रिया स्तनपान करण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवतात. त्यांच्यासाठी  किंवा अशा स्त्रिया या गरोदर आहेत व बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपान नाकारण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी सांगणे आहे की, आईचे दूध हा बाळाचा अधिकार आहे, तो स्वतः  आईदेखील त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. इस्लामने बाळाला जन्म देणारी जन्मदात्री जितकी महत्त्वाची तितकीच बाळाला स्तनपान करणारी दूध आई आहे, असे सांगितले  आहे. याचे हिंदू धर्मातील एक उदाहरण आहे ते खालीलप्रमाणे.
छत्रपती शिवरायांच्या पत्नीने (सईबाई) 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर एका मुलास जन्म दिला (संभाजीराजे) पण त्या या बाळंतपणात आजारी पडल्या व त्यांना बाळंतपणाचा रोग जडला व त्यात त्यांचे दूध आटले (दूध आले नाही). तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी पुरंदरजवळच्या कापूरहोळच्या गाडे-पाटील यांच्या घरातील बाळंतीण (जिची मुलगी दगावली होती)  ’’धाराऊ गाडेपाटील’’ हिला गडावर बोलावून घेऊन तान्ह्या संभाजीच्या दुधाची सोय केली. पुढे बाळंतपणाच्या आजारातच 5 सप्टेंबर 1659 रोजी सईचे निधन झाले.
संभाजीच्या जीवनात जेवढे महत्त्वाचे स्थान सईबाईंना होते तेवढेच ’’दुधआई’’ धाराऊ यांना होते. सईबाईंच्या पश्चातसुद्धा धाराऊ अगदी शेवटपर्यंत संभाजीची दूधआई असल्याने त्यांच्या  मृत्यूपर्यंत गडावरच राहिल्या आणि संभाजीला दूध पाजल्याच्या त्यांच्या आयुष्यभर त्यांना मोबदला दिला. स्त्रीला काही कर्तव्ये सांगितली त्यात आपल्या बाळास स्तनपान करणे हे  देखील आहे. पण आज धावत्या युगात स्त्रिया (माता) सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कला, व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना त्यांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांच्यासमोर स्तनपानाची आज समस्या निर्माण झाली आहे. काही स्त्रिया अशा आहेत की ज्या बाळाला स्तनपानास स्पष्ट नकार देतात. कारण त्याने त्यांचे सौंदर्य कमी होईल याची  त्यांना भीती वाटते. स्तनपान न करणे म्हणजे आपल्या बाळाचा हक्क काढून घेणे व एक पाप करणे आहे, याची जाणीव स्त्रियां (माता) मध्ये निर्माण करावी लागेल. आज जगभरात  बाळांसाठी स्तनपानाची जागृतीची मोहिम चालू असलेली पहावयास मिळते व त्यासाठी अब्जावधी रूपयांचा खर्च केला जात आहे. पवित्र कुरआनमध्ये इस्लामच्या अवतरणाच्या वेळीच  स्तनपानाविषयी जागृती केलेली दिसून येते. याचाच अर्थ स्त्री आणि तिच्यापासून जन्मास आलेले अर्भक या दोघांच्या अधिकारांच्या बाबतीत इस्लामी तत्वज्ञान संतर्क होते, सतर्क आहे.
(सदरचा लेख : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री यामधील आहे. प्रकाशक : इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई.)

इस्लाम धर्मातला पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे. कधीतरी मक्केला जाण्याचा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचं स्वप्न असतं. पण पूर्वी व्यापारी केंद्र असलेल्या याच मक्केत  अराजकता माजली होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि आर्थिक शोषण यांचा बोलबाला होता. इस्लामिक क्रांतीमुळे परिस्थिती बदलली. त्या मुहम्मदी विद्रोहावर टाकलेला हा प्रकाश..

इस्लामचा अभ्यास धर्म म्हणून करणाऱ्या सर्वच विद्वानांनी त्याच्या जन्माच्या मुळाशी असणाऱ्या आर्थिक कारणांची चर्चा अभावानेच केली. मक्का शहरातल्या उत्पादन व्यवस्थेत  इस्लामोत्तर झालेले बदल हा विषय अभावानेच धर्मवादी अभ्यासकांना आकर्षित करु शकला. त्यामुळे इस्लामच्या पूर्वीही प्रेषितांनी ‘हिल्फुल फुदुल’ कराराच्या माध्यमातून आर्थिक  शोषणाच्या विरोधात दिलेला लढा हा इस्लामी इतिहासातून दुर्लक्षित राहिलाय.

मक्का शहरातली इस्लामी अर्थक्रांती
मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जन्मापूर्वी आर्थिक  विषमतेने समाजव्यवस्थेला पोखरुन काढलं होतं. मक्का शहराचा हा प्रेषितपूर्व इतिहास मांडताना धर्माचे अभ्यासक त्या काळाला ‘दौर ए जाहिली’ म्हणजे ‘अज्ञानाचा काळ’ संबोधून पुढे  सरकतात. त्यावर चर्चा केलीच तर ते अंधश्रध्दा, रुढी आणि कर्मकांडांची करतात. शहरातल्या आर्थिक शोषणाच्या इतिहासाला त्यांच्या लिखाणात स्थान नसतं. फिलीप के हित्ती सारख्या  आधुनिक इतिहासकारांनी मक्का शहराचा प्रेषितपूर्व इतिहास मांडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. त्यांचा ‘हिस्ट्री ऑफ अरब’ हा ग्रंथ सामाजिक कारणांचा शोध घेऊन तिथे घडलेल्या  ‘मोहम्मदी परिवर्तनाची’ व्याख्या करतो. मॅक्झिम रॅडीन्सन ‘कॅपिटलिझम अँड इस्लाम’मधे इस्लामी अर्थक्रांतीच्या मुळाशी असणारी परिस्थिती कथन करतानाही हित्ती यांच्यासारखी  सुरवात करतात. मात्र त्यांच्या मांडणीचा हेतू, आशय आणि सूत्रं वेगळी असल्याने ते लिखाण ‘इस्लामी इकॉनॉमिक सोशिओ रिव्हेल्युशन’ला अधोरेखित करतं.

स्वातत्र्याचं स्वैराचारात रुपांतर झालं
मक्का शहर कधीच कोणत्याही राजाच्या अधिपत्याखाली राहिलं नाही. समाजाच्या सर्व घटकांवर नियंत्रण मिळवणारी दंडव्यवस्था तिथे कधीच  नव्हती. मक्का शहर बेदुईन या अरबस्तानातल्या मूळनिवासी नागरिकांचं शहर. स्वातंत्र्य हा बेदुईनांचा श्वास होता. या स्वातंत्र्याला कोणतेही निर्बंध नव्हते. त्यामुळे त्याची जागा  स्वैराचाराने घेणं साहजिक होतं. स्वैराचारातून शोषण अशा क्रमाने मक्केतल्या उत्पादनव्यवस्थेत अराजकता शिरली.
मक्का शहरात झालेल्या इस्लामी आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाची ही पार्श्वभूमी होती. या मोहम्मदी क्रांतीला कारणीभूत ठरलेल्या घटकांची माहिती इब्ने खल्दून यांनी दिलीय. ते  लिहितात, ‘कायद्यात, लोकांना वाईट कृत्यापासून रोखण्यात, इतरांकडून होणारे दुर्बलांवरील अन्याय रोखण्यात त्यांना कोणताही रस नव्हता. त्यांना फक्त नफा हवा होता. त्यासाठी ते  लूटमार आणि धोकेबाजी करत.’

मजुरांचं आर्थिक शोषण झालं
इस्लामच्या अभ्यासकांना मक्का शहराच्या इतिहासाचीही माहिती घ्यावी लागते. इतिहासाची संपूर्ण व्याख्या त्याच्या पार्श्वभूमीच्या आकलनाशिवाय करता येत नाही. मक्का हे शहर व्यापारी केंद्र होतं. आंतरराष्ट्रीय मसाला मार्गावर वसलेलं हे शहर अरबांची सांस्कृतिक राजधानी म्हणून इतिहासात ओळखलं जातं. व्यापारासाठी भटकणाऱ्या मक्कावासीयांना भटकंतीमुळे  आणि शहरात येणाऱ्या अन्य रोमन व्यापाऱ्यांमुळे उर्वरीत जगातल्या सांस्कृतिक घडामोडी ज्ञात होत्या.
मक्केतल्या काही व्यापाऱ्यांकडे भांडवलाचं केंद्रीकरण झालं होतं. ते त्यांच्या हिताची व्यवस्था लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरून जन्माला घालत. त्यामुळे कित्येक व्यापारी भिकेला लागले.  शहरात श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण झाली. व्यापारी मार्गावरचं शहर म्हणून बाहेरचे अनेक उद्योजक मक्केत यायचे. नव्या उद्योगांची सुरवात करायचे. तिथल्या कनिष्ठ  वर्गीय मजुरांमुळे आणि भिकेला लागलेल्या लहान व्यापाऱ्यांमुळे मजुरांची संख्या मोठी होती.

तरुणांचा शोषणाविरुद्ध एल्गार
व्यापारी तांड्यासोबत हे मजूर शेकडो मैल चालून जात. आर्थिक शोषणातून मजुरांची स्थिती दयनीय होती. त्यात व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या व्याजखोर सावकरांनी आर्थिक  शोषणाची सीमा ओलांडली. शोषणाचं हे चक्र मक्का शहराच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरत होतं. आर्थिक शोषण सामाजिक अराजकतेला आमंत्रण देतं. त्यातून अरबांच्या प्राचीन धर्मक्षेत्र  असणाऱ्या ‘काबा’ला मूर्तिकेंद्राचं स्वरुप प्राप्त झालं.
अर्थकारणाने अनेक देवता जन्माला घातल्या. काबागृहातील देवता धर्मप्रेरीत अर्थव्यवस्थेचा आधार होत्या. धर्मप्रेरीत भांडवली अधिसत्ता मक्का शहरावर निर्माण झाली. अरबांना प्रिय  असणाऱ्या मक्का शहरात ही अराजकता अरबी मनाला अस्वस्थ करणारी होती. म्हणून कालांतराने ‘हिल्फुल फुदुल’सारखे करार करुन अरबी युवकांनी आर्थिक शोषणाच्या विरोधात  एल्गार केला. तारुण्यात प्रेषित मुहम्मद (स.) हे त्या करारातले एक महत्त्वाचा दुवा होते.
प्रेषित्वाची घोषणा केल्यानंतरही प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आयुष्यात कधीही ‘हिल्फुल फुदुल’सारख्या सामंजस्य करारात सहभागी होण्याची संधी मिळाली, तर आपण त्यासाठी सिध्द  असल्याचं अनेकवेळा सांगितलं.

इस्लामचं अर्थकारण आकर्षित करणारं
इस्लामच्या मुळाशी प्रेषितांच्या आर्थिक बदलाची भावना होती. आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना अर्थव्यवस्थेविरोधातलं आव्हान नको होते. एच. आर. गिब या मताची पुष्टी  करताना म्हणतात, ‘मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना इस्लामने आव्हान दिलं म्हणून नव्हता किंवा त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळेदेखील तो विरोध नव्हता. मात्र त्यांच्या मुळाशी  आर्थिक आणि राजकीय कारणं होती.
त्यांना भीती होती की, मुहम्मद (स.) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृद्धीला प्रभावित करण्याची शक्यता अधिक होती. त्यांच्या मंदिरप्रणित अर्थव्यवस्थेला प्रेषितप्रणित  एकेश्वरवाद उद्ध्वस्त करू पाहत होते. प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते. ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या  हितसंबंधांना जपण्याचं तत्त्व सांगत होते. ज्या व्यापारी गटाचे हितसंबंध उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे दुखावले, त्यांना मात्र इस्लामी अर्थव्यवस्थेची नवी  तत्त्वं आकर्षक वाटत होती.

नवस्थापित इस्लाम, हे तरुणांचं आंदोलन
धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेलं आव्हान मक्का शहरातल्या कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होतं. त्यातही युवकांना इस्लामी परिवर्तनाने आपल्या  बाजूला वळवलं. असगर अली इंजिनियर युवकांच्या सहभागाविषयी माहिती देताना म्हणातात, सुरवातीच्या काळात इस्लामी आंदोलनं समाजातल्या दुर्बल आणि पीडित व्यक्तींच्या  विचारांना अभिव्यक्त करत. त्यामुळेच हे संशोधन रुचीपूर्ण ठरेल की, इस्लामचे आरंभीचे समर्थक कोण होते? अब्दुल मुतअल अस्सईदी नावाच्या एका इजिप्शीयन लेखकाने याविषयी  संशोधन केलंय.
ते म्हणतात, 'नवस्थापित इस्लाम मुळात तरुणांचं आंदोलन होतं. ज्या लोकांच्या वयांची नोंद आढळते. त्यामधे हिजरतच्या वेळी मक्केतून मदीनेत स्थलांतर करणाऱ्यांत ४० पेक्षा कमी  वयाच्या व्यक्तींची मोठी संख्या होती. त्यांनी आठ ते दहा वर्षांपूर्वी इस्लामचा स्वीकार केला. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केतल्या भांडवलदारांना इशारा दिला की, त्यांनी साठेबाजी  करू नये, श्रीमंतीचा अहंकारी अभिमान बाळगू नये. हेच पीडित, गुलाम आणि अनाथांना आधिक आकर्षक वाटत होतं.’

प्रेषितांकडून इस्लामी धर्मक्रांतीचं नेतृत्व
कारण इस्लामच्या तत्त्वज्ञानाने मक्का शहरातल्या सामाजिक तणावांच्या पार्श्वभूमीवर श्रीमंताच्या संपत्तीत गरीबांचा अधिकार सांगितला होता. जकात हा कर संपत्तीवर आकारला.   त्यातून गरीबांना हातभार देण्याची सामाजिक आर्थिक समतेची भूमिका मांडण्यात आली. मक्का शहरात दोन टोकाचे विचार एकमेकांना भिडले. एक धर्मप्रेरीत अर्थव्यवस्था ज्यामधे  भांडवली वर्गाचे हितसंबंध गुंतले होते. तर दुसरीकडे गरीबांकडे लक्ष देण्यासाठी श्रीमंतांना इशारा देणारी विचारधारा अशा दोन टोकाच्या भूमिका होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) फक्त  अर्थव्यवस्था आणि उत्पादनव्यवस्थेतल्या हितसंबंधांना आव्हान देऊन थांबले नाहीत.
त्यांनी सावकारी अर्थकारणाला धुडकावलं. आर्थिक शोषणाचे आणि श्रीमंताना मिळणाऱ्या लाभाच्या प्रमुख स्रोतावर आघात केला. व्याज निषिद्ध ठरवण्यात आलं. कनिष्ठ वर्गीयांविषयीची  सामाजिक संहिता ठरवण्यात आली. गरीबांना साहाय्य करण्याला फक्त सामाजिक नाही तर मूलभूत धार्मिक कर्तव्यात स्थान देण्यात आलं. प्रेषित क्रांतीची ही सामाजिक फलश्रुती होती.  त्यामुळेच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानंतर इस्लामने युनानी तत्त्वज्ञानानेच आव्हान स्वीकारलं.

प्रेषित अर्थक्रांतीचे कृतीशील तत्त्वज्ञ
प्रख्यात इस्लामी विचारवंत इब्ने रश्द यांनी इस्लामच्या भौतिक विचारधारेची आध्यात्मिक वस्तुनिष्ठ मांडणी केली. त्यांनी युनानी तत्त्वज्ञानाच्या मुलाधाराला आव्हान देऊन भौतिकाला  आध्यात्मिक समीक्षेच्या कक्षेत आणलं. इस्लामी भौतिकवाद नावाची संकल्पना आकाराला आली. कालांतराने इब्ने खल्दून सारखा समाजशास्त्राचा जनक मुसलमानांमधे निर्माण झाला.  खल्दून यांचा मुकद्दीमा त्यांनी अर्थव्यवस्थेच्या अनेक अंगावर इस्लामी मुल्यांच्या परिप्रेक्ष्यात भाष्य केलं.
इस्लामी तत्त्वज्ञानावर कोणत्या अंगाने चर्चा करावी याचा पाठच त्यांनी घालून दिला. इस्लामने जी धर्मक्रांती केली त्याच्या मुळाशी आर्थिक कारणं होती. अर्थव्यवस्थेला धर्ममूल्यांच्या  कक्षेत बांधलं. निषिद्ध, अनिषिद्ध ही संकल्पना प्रथमच अरबी समाजात अवतरली. अन्यथा स्वैराचाराने सारे अनिषिध्द ठरवलं होतं. सामाजिक नैतिकतेची संकल्पना देखील अरबांमधे  नव्हती. मुहम्मदी सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्रांतीने या सर्व संकल्पना अरबांच्या गळी उतरवल्या. गरीबांच्या हक्कांसाठीचा हा लढा प्रेषितांच्या नेतृत्त्वाखाली लढला गेला. कोणत्याही  तत्त्वज्ञापेक्षा प्रेषित मुहम्मद (स.) यांना मिळालेले यश आधिक आहे. त्यामुळे प्रेषित अर्थक्रांतीचे कृतीशील तत्त्वज्ञ ठरतात.

मुंबई (मजहर फारूकी)
रमजान महिन्याच्या प्रारंभीच जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रकडून समाजातील गरीब, मिस्कीन नागरिकांसाठी महिनाभराचे राशन भरून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे  महाराष्ट्रातील 44 ठिकाणच्या 9 हजार 351 गरीब कुटुंबांना 1 कोटी 15 लाख 77 हजार 300 रूपयांचे रमजानचे महिनाभराचे राशन किट मोफत पोहोचविण्यात आले. ज्यामध्ये गहू,  तांदूळ, तूर दाळ, मूग दाळ, हरभरा दाळ, गोडतेल, साखर, चहापत्ती, मसाला पावडर, खजूर आणि रूह अफजा आदीचा समावेश आहे.
जमाअते इस्लामी हिंद समाजसेवा विभागाकडून प्रत्येक वर्षी रमजानच्या प्रारंभी गरीब कुटुंबांसाठी राशन किट वितरित केले जाते. गतवर्षी 9 हजार 760 कुटुंबांना राशनचे महिनाभराचे  किट वितरित करण्यात आले होते. यंदाचा आकडा वाढला असून, अजून काही जिल्ह्यांची आकडेवारी येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. तसेच ईदच्या समोर शिरखुर्मा किटचेही  वितरण करण्यात येते. गतवर्षी 3 हजार 201 गरीब कुटुंबापर्यंत शिरखुर्मा किटचे वितरण करण्यात आले होते. त्याची किमत 14 लाख 41 हजार 500 रूपये होती. जमाअत नेहमी  समाजातील सर्व घटकांतील गरीब कुटुंबापर्यंत होईल तेवढा प्रयत्न करीत त्यापर्यंत पोहोचते. त्याचे सर्वेक्षण केले जाते. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते. त्यांची इत्यंभूत  चौकशी करून राशन किट, शिरखुर्मा कीट दिली जाते. ज्या नागरिकांना हे कीट दिले जाते त्यांचे प्रत्येकवर्षी ओळखपत्रही जमात जमा करून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे खऱ्या  गरजवंतांपर्यंत राशन किट पोहोचविण्यात यश मिळते. विशेषतः रमजानमधील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या जकातीचा या निधीमध्ये मोठा भाग असतो. जमाअते इस्लामी हिंद ही धार्मिक  सद्भाव वाढविण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. दावते इफ्तार, ईद मिलन, मस्जिद परिचय, बिनव्याजी वित्तीय संस्था, मुल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, गरीबांचा अत्यल्प दरामध्ये उपचार करणारे वेगवेगळे रूग्णालये आणि मॅटर्निटी होम इत्यादींच्या मार्फतीने व्यापक प्रमाणात समाजसेवेचे काम जमातद्वारे अखंडपणे केले जाते. तसेच प्राकृतीक  आपदा आल्यास जातीधर्माच्या पलीकडे जावून सर्वांची मदत करण्याकडे जमाअतचा कटाक्ष असतो.

जवाल-ए-कौम की तो इब्तदा वो थी के जब
तिजारत आपने की तर्क, नोकरी कर ली


जागतिक व्यापाराचा पाया हा व्याजाधारित भांडवलावर उभा आहे. व्याजदरात वाढ होईल या भीतीने सतत मालाचे दर चढे ठेवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. म्हणून बाजारात वस्तू  चढ्या किमतीने विकल्या जातात. नाईलाजाने लोकांना त्या घ्याव्या लागतात. व्याजाला नफा समजण्याची सामुहिक चूक केल्यामुळे हा भुर्दंड सामान्य माणसांना बसतो.

इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था असल्याकारणाने व्यापारसुद्धा इस्लामी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल की मुस्लिम मार्केटमध्ये  वस्तू ह्या स्वस्त मिळतात. याच आठवड्यात लोकसत्ताच्या दोन प्रतिनिधींनी मुंबईच्या मुहम्मदअली रोडला रमजाननिमित्त भेट देउन रूचकर आणि पौष्टिक अन्न अवघ्या पाचशे रूपयात दोन माणसाचे कसे मिळते? यावर फेसबुक लाईव्ह केला होता. मुस्लिम मार्केटमध्ये वस्तू स्वस्त मिळण्याचे कारण म्हणजे व्याज विरहित भांडवलावर व्यापार करण्याकडे  मुस्लिम व्यापाऱ्यांचा कल असतो. त्यामुळे त्याला व्याजदर वाढतील याची भीती नसते. शिवाय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी व्यापारामध्ये कमी नफा घेण्याबद्दल जी सक्तीने ताकीद  दिलेली आहे त्याचेही मुस्लिम व्यापारी पालन करतात. या दोन कारणांमुळे मुस्लिम मार्केटमध्ये वस्तू स्वस्त असतात.

इस्लामी व्यापाराची तत्वे
इस्लामी व्यापाराचा उद्देश भांडवलशाही व्यवस्थेमधील व्यापाराप्रमाणे केवळ नफा कमविणे नाही. नफ्याबरोबर ग्राहकांची सेवा करणे हा सुद्धा इस्लामी व्यापाराच्या संकल्पनेचा अत्यावश्यक  भाग आहे. म्हणून श्रद्धावंत मुस्लिम जेव्हा व्यापार करतो तेव्हा कमी नफा व कमी भाव ठेवण्याकडे त्याचा कटाक्ष असतो. इस्लामी व्यापार हा नैतिकतेवर आधारित व्यापार असतो. या  संबंधी प्रेषित सल्ल. यांचे मार्गदर्शन खालीलप्रमाणे -
1. ’’ तुम पर तिजारत (व्यापार) को इख्तीयार (अंगीकार)करना लाजीम (अनिवार्य) है. क्यूंके, रिज्क (उपजिविका) के दस में नौ हिस्से फकत इसमे हैं.’’(संदर्भ : अहयाउल उलूम-इमाम  गजाली, भाग वल-नश्र-व-तौज़ी बैरूत, पान क्र. 504). याचा अर्थ उपजिविकेच्या 10 दारांपैकी 9 दार हे व्यापारातून उघडतात. त्यामुळे मुस्लिमांनी व्यापाराला प्राथामिकता देतात हे ओघाणे आले.
2. ’’आदमी का अपने हाथ से कोई काम करना और हर वो तिजारत जो पाकिजगी के साथ हो ’’(मस्नद अहेमद). या हदीसमध्ये पाकिजगी अर्थात पावित्र्याने तिजारत अर्थात व्यापार  करण्याची सूचना प्रेषित सल्ल. यांनी दिलेली आहे.
3. ’’सच्चा और अमानतदार (विश्वासपात्र) ताजीर (व्यापारी) कयामत के दिन अंबिया (प्रेषित), सिद्दीकीन (खरे लोक) और शोहदा (शहीद लोक) के साथ उठाया जाएगा.’’ (संदर्भ : तिर्मिजी).
वरील मार्गदर्शनावरून इस्लामी व्यापारामध्ये खरेपणा आणि पावित्र्याला अतिशय महत्व दिलेले आहे. येथे इतर व्यापारांप्रमाणे जनहिताच्या विरोधात जाऊन त्यांना चढ्या भावाने माल  विकता येत नाही. साधारणपणे सुरूवातीच्या काळापासूनच मुस्लिमांचा कल व्यापाराकडे असल्याचे दिसून येते. भारतातही मलबार येथे सातव्या शतकात मुस्लिम व्यापारी आले होते  याची नोंद इतिहासात नमूद आहे. त्यांनी बांधलेली पहिली मस्जिद जिचे नाव ’चिरामन जामा मस्जिद’ आजही केरळच्या मलबारमध्ये उभी आहे. चीनमध्ये सुद्धा मुस्लिम व्यापाऱ्यांनी  व्यापारानिमित्त प्रवेश केला होता. याचीही नोंद चीनच्या इतिहासामध्ये आहे. एका रिवायतीप्रमाणे चीनमध्ये 8 व्यापाऱ्यांचा एक जत्था माल घेऊन गेला होता व तेथेच स्थायीक झाला.  त्यांच्या सचोटीच्या व्यापाराला चीनच्या नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे ते आठही मुस्लिम व्यापारी त्याच ठिकाणी स्थायीक झाले. आज चीनमध्ये जी आठ कोटींपेक्षा जास्त  मुस्लिम जनसंख्या आहे ती त्या आठ व्यापाऱ्यांचाच विस्तार असल्याची आख्यायिका चीनमध्ये प्रसिद्ध आहे. चीनवर कधीच कुठल्या मुस्लिम राजाने आक्रमण केल्याचे चीनी इतिहासात  नमूद नाही. त्यामुळे चीनमध्ये इस्लामचा प्रचार मुस्लिम व्यापाऱ्यांकडूनच झाला यावर विश्वास ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही.

श्रेष्ठ व्यापारी अब्दुरहेमान बिन औफ रजि.
हजरत अब्दुरहेमान बिन औफ हे आशरा-ए- मुब्बशरा (ते दहा साहबी रजि. ज्यांना जीवंतपणीच जन्नतमध्ये प्रवेश देण्यात आल्याची आनंदवार्ता देण्यात आली होती.) मध्ये सामील   असलेले प्रेषितांचे सोबती होते. ते जेव्हा हिजरत करून मदिनामध्ये गेले तेव्हा त्यांची जोडी मदिनाच्या एका अन्सारी व्यक्तीबरोबर प्रेषितांनी लावून दिली. तेव्हा ते अन्सारी साहबी अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांची मदत करू इच्छित होते. तेव्हा त्यांनी मदत घेण्यास साफ इन्कार केला व त्यांना फक्त दोन प्रश्न विचारले. 1. मार्केट कुठे आहे 2. मार्केटमध्ये  कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे. या दोन्ही प्रश्नाची उत्तरे मिळाल्याबरोबर अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांनी उंटांच्या गळ्यात बांधण्यात येणाऱ्या घंट्यांचा व्यापार सुरू केला व  पाहता-पाहता त्याच्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यापाराचा विस्तार केला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामधून यहूदी व्यापाऱ्यांना जवळ-जवळ हुसकावून  लावले. यहूदी व्यापारी हे चढ्या दराने वस्तू विकत व त्यांचा व्यापार सर्व चक्रवाढ व्याजावर आधारित पतपुरवठ्यावर अवलंबून होता. म्हणून मार्केटमध्ये वस्तू अतिशय महाग होत्या.  यहूदींची त्यावेळेस व्यापाराच्या सर्वच विभागांमध्ये एकाधिकारशाही होती. ती अब्दुरहेमान बिन औफ रजि. यांनी मोडून काढली. ते छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी आणि अत्यल्प नफा  या दोन तत्वावर माल देऊ लागले. त्यामुळे त्यांच्याकडून माल खरेदी करण्याची स्पर्धाच जणू किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये लागली आणि पाहता-पाहता त्यांचा व्यापार इतका वाढला की,  जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या चारही पत्नींना इतकी संपत्ती मिळाली की त्या मदिना शहरातील श्रीमंत महिलांमध्ये गणल्या जाऊ लागल्या.
प्रेषित सल्ल. यांच्या काळापासूनच मुस्लिमांच्या
कमर्शियल सेन्सचा अनुभव जगाला येऊ लागला होता. प्रेषित सल्ल. यांच्या नंतर शंभर वर्षात मुस्लिमांचा व्यापार जगातील तीन खंडामध्ये विस्तारीत झालेला होता. तिन्ही खंडातील  लोक मुस्लिम व्यापाऱ्याकडूनच माल घेण्यासाठी दुकान उघडण्यापूर्वी रांग लावून उभे राहत.’’ इस्लामी तिजारत’’ हा एक ब्रँड नेम त्याकाळी झालेला होता. मुस्लिम व्यापाऱ्याकडून वस्तू  घेणे म्हणजे ती उत्कृष्ट दर्जाची आणि रास्त दराची असेल याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला होता. मुस्लिम व्यापारी ज्या वस्तू विकत तेव्हा त्या वस्तूं संबंधी इत्यंभूत  माहिती ग्राहकांना सांगत. पावसामुळे ओला झालेला गहू ओला आहे म्हणून कमी दरात देत आहोत हे सांगून विकत. दुसरे व्यापारी ओल्या गव्हावर सुके गहू टाकून न सांगता विकत.  एखाद्या कपड्यामध्ये दोष असेल तर मुस्लिम व्यापारी तो दोष स्वतःहून ग्राहकांना दाखवून देत आणि कमी किमतीत विकत. घेतलेली वस्तू ग्राहकांनी परत आणली तर आनंदाने ती  परत घेत व त्याची संपूर्ण किमत त्याला परत देत. ते कधीही शपथा घेऊन माल विकत नसत. या छोट्या-छोट्या नितीमान गोष्टींची भूरळ ग्राहकांवर पडत असे व मुस्लिम लोकांच्या  दुकानावर ग्राहकांच्या उड्या पडत.
पूर्वीसारखे व्यापार तज्ज्ञ मुखलीस (प्रामाणिक) मुस्लिम व्यापाऱ्यांची संख्या आज त्यामानाने कमी झालेली आहे. तरी अल्लाहची कृपा आहे श्रद्धावान मुस्लिम व्यापारी आजही लाखोंच्या  संख्येत देशाच्या प्रत्येक शहरात विखुरलेले आहेत. मात्र इस्लामी व्यापार संहितेची जाण नसलेले, अप्रामाणिक, अश्रद्धावान, फक्त नावापुरत्या मुस्लिम व्यापाऱ्यांचा सुद्धा मार्केटमध्ये  बऱ्यापैकी सुळसुळाट झालेला आहे. त्यांच्यामुळे इस्लामी व्यापाराच्या नाममुद्रेला मोठा फटका बसत आहे.

इस्लामी व्यापाराची मूलतत्वे
1. कुठलाही व्यापार सुरू करण्यापूर्वी त्या व्यापारासंबंधीच्या बारीक-सारीक गोष्टींची इत्यंभूत माहिती करून घेणे, शक्य झाल्यास संबंधित वस्तूंच्या व्यापाऱ्याकडे काही दिवस काम करून त्या व्यापारासंबंधी प्रशिक्षण घेणे.
2. ज्या वस्तू आपल्या मालकीच्या नाहीत किंवा ताब्यात नाहीत, त्यांचा सौदा कधीच करू नये.
3. ग्राहकाला वस्तू देण्यापूर्वी वस्तू संबंधी इत्यंभूत माहिती ग्राहकाला देऊन त्याचे समाधान करणे व त्यानंतरच ती वस्तू त्याला विकणे. विशेषतः वस्तूमध्ये काही वैगुण्य असेल तर ते ठळकपणे ग्राहकाला समजेल अशा पद्धतीने समजून सांगणे.
4. ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करण्याचा प्रामाणिक सल्ला देणे. अनेक व्यापारी ग्राहकाला गरज नसतांना अनेक वस्तू गोडबोलून विकून टाकतात. असे करण्यापासून मुस्लिम व्यापाऱ्याला प्रेषित सल्ल. यांनी सक्तीने मनाई केलेली आहे.
5. ग्राहकाला वस्तूची किंमत स्पष्टपणे सांगणे. अनेक व्यापारी वस्तू विकतांना, ’’साहेब तुम्ही घ्या तर खरं! तुमच्याकडून आम्ही काय जास्त घेणार का?’’ सारखी वाक्य बोलून  साखरपेरणी करतात व ग्राहकाला फसवतात. सकृतदर्शनी मान देऊन त्याची मान कापतात.
6. जर कोणाला उधार माल द्यायचाच असेल तर तो व्यवहार लिहून घ्यावा. ज्यामुळे दोघांच्याही मनामध्ये किंतू राहणार नाही.
वरील तत्वांवर आधारित व्यापार केला गेला तर कोणत्याही मार्केटमध्ये व्यापारामध्ये जम बसविता येतो. मात्र वरील तत्वांवर विश्वास ठेऊन त्यांच्यावर अंमलबजावणी करणे यासाठी  मजबूत इमान आणि दीर्घकाळापर्यंत वाट पाहण्याची क्षमता लागते. आजकालच्या मार्केटमध्ये अशा लोकांची प्रचंड कमतरता आहे. रातोरात श्रीमंत होण्याकडे लोकांचा कल आहे. प्रत्येकाला वाटते की अल्पावधीतच आपण मोठी संपत्ती कमवावी. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जाण्याकडे आजच्या व्यापाऱ्यांचा कल दिसून येतो. निवडणुकांमध्ये राजकीय  पक्षांना मोठी रक्कम ’निधी’ म्हणून व्यापारी देतात आणि ज्यांना निधी दिला ते निवडून आले की, त्यांच्याकडून आपल्या व्यापारास अनुकूल अशा योजना आणि कायदे त्यांच्याकडून  करून घेतात. या व्यवहारामध्ये व्यापारी आणि राजकीय नेते यांचाच लाभ केंद्रस्थानी असतो. या प्रक्रियेमध्ये सामान्य ग्राहकाला कुठलेच स्थान नसते. म्हणून आज अव्वाच्या सव्वा  दरामध्ये लोकांना वस्तू खरेदी कराव्या लागतात. या महागाईला तोंड देण्यासाठी मग ज्याला जसे जमेल, जेथे जमेल तसे व तेथे लोक भ्रष्टाचार करून वरकमई करून महागाईला तोंड  देण्याचा प्रयत्न करत असतात. यात मरण होते ते सामान्य कष्टकऱ्याचे, शेतकऱ्याचे. कारण शेतीमध्ये भ्रष्टाचार करता येत नाही. समाजाच्या अंतिम माणसाला, जो की भ्रष्टाचार करू  शकत नाही, चढ्या दराने वस्तू घ्याव्या लागतात. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिकच रूंद होत जाते.
इस्लामी व्यापारांच्या नीतिनियमांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून आपल्या तरूणांना व्यापाराकडे वळविण्याची मोठी जबाबदारी मुस्लिम समाजावर आहे. या संदर्भात थ्री टीज अर्थात तालीम (भौतिक शिक्षण), तरबियत (इस्लामी संस्कार) आणि तिजारत (मुल्याधिष्ठीत व्यापार) कडे तरूणांना वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेवटी  अल्लाहकडे दुआ करतो की, मुल्याधिष्ठीत इस्लामी व्यापाराच्या फायद्यांची आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव निर्माण व्हावी आमच्यावर कृपा कर. (आमीन).

- एम.आय.शेख
9764000737


प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘नि:संशय सर्वश्रेष्ठ अल्लाहने लोकावर जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरविले आहे. जो त्यांच्या श्रीमंत लोकांकडून घेतला जाईल व त्यास  त्यांच्या गरजवंत गरीब लोकांना परतविला जाईल. (हदीस : मुत्तफिक अलैय्)

भावार्थ
सदका हा शब्द जकातसाठीही वापरला जातो, ज्याचे अदा करणे इस्लामी कायद्यानुसार आवश्यक आहे आणि इथे हाच अर्थ अभिप्रेत आहे. अशा प्रत्येक धनसंपत्तीस लागू पडते, जो मनुष्य आपल्या राजीखुषीने अल्लाहच्या मार्गात खर्च करतो. उपरोक्त हदीस वचनातील शब्द ‘परतविला जाईल’ स्पष्ट दर्शवितो की जकात जी धनवानाकडून वसूल केली जाईल, ती  वस्तुत: समाजातील गरीब आणि गरजवंतांचा हक्क आहे, जो त्यांना मिळवून दिला जाईल. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की ज्या माणसाला सर्वश्रेष्ठ अल्लाहने धन दिले  आणि मग त्याने त्याची जकात अदा केली नाही, त्याचे हे धन कयामतच्या दिवशी अतिशय विषारी सापाचे रूप धारीण करील, ज्याच्या डोक्यावर दोन काळे ठिपके असतील (हे अती  विषारी असण्याचे लक्षण आहे.) आणि तो त्याच्या गळ्याचा हार बनेल. मग त्याच्या दोन्ही जबड्यांना पकडून हा साप म्हणेल, मी तुझे धन आहे, मी तुझा खजीना आहे. त्यानंतर प्रेषित  (स.) यांनी पवित्र कुरआनातील आयतीचे पठन केले जिचा अर्थ असा, ‘‘ते लोक जे आपले धन खर्च करण्यात कंजूसी करतात, त्यांनी असे समजु नये की त्यांचा हा कंजूसपणा  त्यांच्यासाठी अधिक चांगला ठरेल. या उलट तो अधिक वाईट ठरेल. त्यांचे हे धन कयामतच्या दिवशी त्यांच्या गळ्याचा हार बनेल. अर्थात ते त्यांच्यासाठी भयंकर विनाशकारक ठरेल.  (हदीस- बुखारी)

माननीय आयशा (रजी.) सांगतात की, मी प्रेषित (स.) यांचे असे निवेदन ऐकले की, ‘‘ज्या धन-संपत्तीतून जकात न काढली जाईल, त्यातच ती मिसळलेली राहील तर ती त्या  धनसंपत्ती नाश केल्याशिवाय राहात नाही.’’ (हदीस - मिश्कात)

भावार्थ

नाश करण्याशी अभिप्रेत हे नव्हे की, जो मनुष्य जकात देत नसेल आणि स्वत:च खाईल तर अपरिहार्यत: कोणत्याही स्थितीत त्याची सर्व मालमत्ता नाश पावेल. ते धन ज्याचा लाभ घेण्याचा त्याला हक्क नव्हता आणि जो फक्त गरीबांचा हिस्सा होता, तो त्याने गिळंकृत करून आपल्या ईमानाचा सर्वनाश ओढवून घेतला. इमाम अहमद बिन हंबल यांच्याद्वारे हाच खुलासा उल्लेखित आहे, आणि असेही पाहण्यात आले आहे की जकात हडप करून घेणाऱ्याची संपूर्ण मालमत्ता बघता बघता नष्ट झाली आहे.

जकात : दिनदुबळ्यांचे अधिकार
मा. अनस बिन मालिक (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याकडे एक माणूस आला व म्हणाला की, ‘‘हे ईश्वराच्या प्रेषिता! मी खूप श्रीमंत आहे मुलेबाळेही  आहेत, तसेच गुरेढोरेही आहेत. तेव्हा मी आल्या संपत्तीचा व्यय (खर्च) कसा करावा?’’ प्रेषितांनी (स.) उत्तर दिले की, ‘‘तुम्ही आपल्या संपत्तीची जकात द्यावी कारण जकात तुमच्या   आत्म्यास शुद्ध करते.आपल्या नातलगांशी संबंध जोडा व त्यांचे अधिकार पूर्ण करा. याचक, शेजारी आणि दिनदुबळ्यांचे अधिकार त्यांना द्या. (हदीस - मसनद अहमद)

नमाज, रोजा, जकात चा आदेश पूर्ण करणारे आदरणीय आयेशा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘तीन प्रकारच्या लोकांसमोर, तीन प्रकारच्या  अडचणी अजिबात येत नाहीत. १) जे लोक नमाज, रोजा आणि जकात अदा करतात, त्यांच्याशी ईश्वर नमाज, रोजा, जकातची पूर्ती न करणाऱ्याबरोबर होणारा (प्रकोपीय) व्यवहार  करणार नाही. २) ज्या दासाला ईश्वराने त्याच्या भल्या पुण्य कर्मास्तव आपल्या छत्रछायेत व सुरक्षेत घेतले आहे, त्यास कयामतच्या दिवशी इतरांकडे स्वाधीन करणार नाही. ३) जो  माणूस एखाद्या समाजाशी स्नेह ठेवतो, ईश्वर त्याला त्याच्या स्वाधीन करतो. (हदीस - मसनद अहमद)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget