Latest Post

जे लोक इस्लामला गतकाळाची गोष्ट समजतात व वर्तमानकाळातील त्याची उपयुक्तता, तसेच आवश्यकता यांचा इन्कार करतात ते वास्तवात इस्लामचे खरे स्वरुप जाणत नाहीत व जीवनातील त्याच्या खऱ्या संदेशासी व ध्येयाशी अनभिज्ञ आहेत. लहानपणी साम्राज्यवाद्यांच्या एजंटांनी नेमलेल्या पाठ्यपुस्तकातून त्यांना जे काही शिकविले गेले तोच शिकविलेला धडा ते आजही गिरवीत आहेत. त्यांच्यामते इस्लामच्या उदयाचा हेतू मानवाला मूर्तीपूजेपासून मुक्त करण्याचा होता. तसेच परस्पराशी वैरभाव बाळगणाऱ्या अरबी टोळ्यांची एकजूट करुन त्यांच्यात बंधुत्व निर्माण करण्याचा होता. तसेच दारु पिणे, जुगार खेळणे, मुलींना जिवंत पुरणे व याप्रकारच्या अनेक नैतिक दोषांपासून मुक्त करण्याचा होता. म्हणून इस्लामने अरबांमधील आपापसातील झगडे व लढाया समाप्त करुन त्यांची शक्ती नष्ट होण्यापासून वाचवली व नंतर जगामध्ये आपल्या संदेशाचा प्रचार करण्याकरिता या शक्तीचा उपयोग केला. या ध्येयासाठी मुस्लिमांना इतर जातीशी अनेक युद्धे करावी लागली. परिणामस्वरुप इस्लामी जग आपल्या वर्तमान मर्यादांसह या विश्वपटला वर उभे राहिले. हा एक असा ऐतिहासिक संदेश व ध्येय आहे ज्याचे कार्य आता पूर्ण झाले आहे. जगात मूर्तिपूजा संपली आहे. अरब टोळ्यांनी आता मोठमोठ्या राष्ट्रांचे रुप धारण केले आहे, म्हणून आता इस्लामची काही गरज उरली नाही. कारण जेथपर्यंत जुगार खेळण्याचा व मदिरा प्राशन करण्याचा संबंध आहे, त्यावर आजच्या संस्कृतीच्या व संस्काराच्या युगात कोणताही पायबंद घालणे शक्य नाही. याचा अर्थ असा की या लोकांमध्ये इस्लाम एका विशेष काळापुरता अतिउचित जीवनव्यवस्था देणारा धर्म होता. पण आज जग इतके पुढे गेले आहे की आज इस्लामच्या मार्गदर्शनाची काही गरज उरली नाही. म्हणून मार्गदर्शन व प्रकाशाकरिता आम्ही त्याच्याकडे पाहू नये. उलट सिद्धान्त व जीवनदर्शनापासून हा प्रकाश व उपदेश घ्यावयास पाहिजे. यातच आमची मुक्ती होऊ शकते व यातच आमचे कल्याण सामावलेले आहे.
पाश्चिमात्यांचे हे पौर्वात्य चेले आपल्या गुरुंच्या वाक्यांचा पुनरुच्चार करुन अनिच्छेने व अज्ञानाने आपल्या संकुचितपणाची जाणीव करुन देतात. हे बिचारे इस्लामला जाणतही नाहीत, तसेच जीवनातील त्याचे वास्तविक उद्देशही त्यांना ठाऊक नाहीत. म्हणून पुढे जाण्यापूर्वी ‘इस्लाम’, त्याचा अर्थ व उद्देश यावर थोडीशी चर्चा आवश्यक आहे.

धर्म आणि फक्त धर्मच जगाला गमावलेली सुख-शांती देऊ शकतो. तो माणसाच्या मनात खऱ्या अर्थाने प्रेम निर्माण करुन त्याला अन्यायाशी सामोरे जाऊन मुकाबला करण्याचे धैर्य प्रधान करतो आणि त्याला दर्शवितो की जर तो आपल्या पालनकर्त्या स्वामीच्या प्रसन्नतेचा इच्छुक आहे, तर त्याने दुष्टपणाचे अधिपत्य करणाऱ्या दैत्यांना नष्ट करून केवळ आपल्या पालनकर्त्याचे शासन स्थापित केले पाहिजे. या मार्गात येणाऱ्या सर्वप्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि केवळ परलोकीय यशावर दृष्टी ठेवली पाहिजे. काय आजच्या जगाला सुख, शांती, समाधान याकरिता धर्माची गरज नाही काय?
धर्माविना जीवनाला आरंभापासून काही अर्थ उरत नाही. परलोकावरील दृढ विश्वास ही धर्माची बहुमोल विशेषता आहे. हा विश्वास प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवन एका नव्या श्रद्धेचे बोट पकडते व त्याच्यासमोर नवनवी क्षितिजे उभी राहतात. परलोकावरील दृढविश्वासाविना मानव नीचतेच्या कष्टदायी अनुभूतीचे लक्ष्य बनतो. मरणोत्तर जीवनाच्या इन्काराचा अर्थ असा होतो की समाजातील एकत्र जीवनाचा, मानवी आयुष्याचा भाग केला जावा व मानवाला आपल्या आंधळ्या व बहिऱ्या वासना, इच्छा, तसेच अंधविश्वास यांच्या दयेवर मोकळे सोडून देण्यात यावे. त्यानंतर माणूस आपल्या इच्छापूर्तीमध्ये स्वतःला हरवून बसतो. जितके अधिक सुख तो मिळवू शकतो, तितके गोळा करावे आणि त्यात इतर कोणालाही वाटेकरी होऊ देऊ नये, हेच त्याच्या सर्व प्रयत्नांचे व पराकष्टेचे ध्येय व लक्ष्य बनते. येथूनच हेवेदावे, झगडे व रक्तरंजित युद्धांचा आरंभ होतो व इच्छादासांनी भरलेल्या या जगामध्ये आपल्यासमोर पसरलेल्या सुखद गोष्टीवर तुटून पडून प्रत्येकजण ते जास्तीतजास्त हस्तगत करु इच्छितो. अधिकाधिक फायदे कमीतकमी वेळात तो एकटा गोळा करु इच्छितो. त्याच्या मनात कोणत्याही उच्चतम सत्तेचे भय असत नाही, कारण त्यांच्यानुसार या जगाचा कोणी ईश्वर नसतो व कोणतीही न्याय व्यवस्था नसते.
पारलौकिक जीवनाच्या इन्कारामुळे माणूस इच्छांच्या खोल गर्तेत बुडून जातो. त्याच्या विचाराची व चितनाची भरारी उदात्ततेपासून वंचित होते आणि त्याचे हेतू व कार्यभाग साधून घेण्याचे मार्ग अधःपतनाचे लक्ष्य बनतात. मानवता आपापसातील झगड्यांचा व लढायांचा आखाडा बनते. त्यानंतर माणसाला इतकी उसंतच मिळत नाही की त्याने उच्च व उदात्त जीवन उद्देशांचा पाठपुरावा करावा. या नवीन जगात प्रेम व सहानुभूतीला काही स्थान नसते. भौतिक सुखाची लालसा व इच्छा वासनांचे अधिपत्य यामुळे जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा व सद्भावांचा आदर करण्याची माणसाची क्षमता लोप पावून असा आदर करण्यापासून तो अक्षम केला जातो.
भौतिक जडवादाचा परिणाम
भौतिकवादी माणसांना काही भौतिक फायदेही मिळून जातात यात शंका नाही, पण भौतिकवादात एक असा शाप आहे की वरपांगी दिसणारे हे फायदेही नाश पावतात. माणूस त्यांच्या लालसेने आंधळा बनून आपल्याच बांधवाशी लढत असतो. इच्छाशक्ती, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, तिरस्कार या कुभावनांवर त्याचा ताबा नसतो आणि तो त्यांच्या बंधनातून कधीही मुक्त होऊ शकत नाही.
ज्या लोकजाती भौतिकतेचा अंगीकार करतात त्यांच्यावर निरंतर एक प्रकारच्या दडपणाचे व गृहकलहाचे वातावरण आच्छादित असते. परिणामस्वरुप समस्त मानवी जीवन अस्तव्यस्त होऊन जाते आणि विज्ञान व त्याची भयानक अस्त्रे मानवी वंशाची सेवा करण्याऐवजी माणसाचा सर्वनाश व संहार करण्यात व्यतीत होऊ लागतात.
संकुचितपणावर उपाय
भौतिकता माणसाच्या संकुचितपणाचे प्रतीक आहे. यातील बिघाडापासून वाचण्याकरिता मानवतेच्या मानसिक क्षितिजांचा विस्तार करण्याची गरज आहे. हा उद्देश केवळ धर्मानेच प्राप्त होऊ शकतो. केवळ तोच मानवतेला नवा विस्तार व नवी उदात्तता प्रदान करु शकतो, कारण धर्माच्या दृष्टीने मानवी जीवन फक्त इहलोकापुरतेच मर्यादित नसून ह्यानंतरचीही परंपरा निरंतर चालू राहत असते. हा विश्वास माणसाच्या मनात एका नवीन आशेची ज्योत प्रफुल्लित करतो, त्याला दुष्टपणा, अत्याचार, तसेच दडपण याविरुद्ध धैर्याने झगडण्याचे साहस प्रदान करतो आणि त्याला हे दाखवून देतो की सारी मानवजात एकमेकांचे बंधू आहेत. प्रेम आपापसांतील सहानुभूती व विश्वबंधुत्व या गोष्टीचे शिक्षण मानवतेला सुखशांती व वास्तविक समृद्धी, तसेच विकास व उन्नती यांनी वैभवसंपन्न करुन टाकतो. अशी वस्तुस्थिती व सत्य असतांना धर्म ही माणसाची अंतिम गरज नाही आणि मानव आजही तिचा गरजवंत नाही, जसा शतकानुशतकापूर्वी होता, असे कोण म्हणू शकतो? जीवनक्षेत्रात धर्म ज्याप्रकारे माणसाला घडवून तयार करतो, त्याप्रकारे दुसरी कोणतीही शक्ती माणसाला घढवू शकत नाही.
दीपस्तंभ
धर्म माणसाला स्वतःसाठी जगण्याऐवजी इतरांसाठी जगण्याचे शिकवितो, त्याला एक उदात्त व पवित्र लक्ष्य देतो आणि हे लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गांत येणाऱ्या कष्टांचे व संकटाचे, खुल्या मनाने स्वागत करण्याचे शिकवितो. धर्मांने प्रदान केलेल्या त्या ईमान (श्रद्धा) व विश्वास यापासून जर मानव वंचित झाला, तर तो स्वतःखेरजी दुसऱ्या कोठल्याही गोष्टीचा विचार करु शकत नाही. सर्व जीवन स्वार्थ व स्वभक्ती याची प्रतिमा होऊन जाते. त्यांच्यात व जंगली श्वापदात काही अंतर उरत नाही. इतिहासात अशा असंख्य व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी आयुष्यभर न्याय व सत्य याच्या रक्षणार्थ ढालीचे कार्य केले आणि त्यामध्ये आपल्या प्रिय प्राणाचीही आहुती व बलिदान केले. त्यांना आपल्या दीर्घ प्रयत्नाचे व त्यागाचे कसलेही फळ या जगात मिळाले नाही. प्रश्न असा आहे की कोणत्या दृष्टीने या लोकांना असा लढा देण्यास उद्युक्त केले? ज्याचा परिणाम असा निघाला की त्यामध्ये त्यांना कसलेही भौतिक यश प्राप्त झालेच नाही, परंतु जे काही त्यांच्यापाशी होते तेही या लढ्यानंतर त्यांच्या हातून निसटले. याचे उत्तर केवल एकच आहे आणि ते म्हणजे श्रद्धा या पवित्र मानवी जीवांचे अस्तित्व याच श्रद्धेचा एक छोटा चमत्कार आहे. याउलट लोभ, मोह, कपट, द्वेष, स्वार्थ तसेच तिरस्कार हे असे नीचतेचे प्रेरक आहेत की ज्यांच्याद्वारा कसलेही वास्तविक व सुदृढ यश प्राप्त होऊ शकत नाही. त्याचा झगमगाट बाह्यत्कारी व क्षणभर होत असतो. त्यांच्या प्रभावाखाली असलेली माणसे तत्काळ लाभाची इच्छा करतात. त्यामुळे माणसात कधीही स्वास्थ्यपूर्ण चारित्र्य वाढीस लागू शकत नाही. तसेच त्यामध्ये एखाद्या उच्च ध्येयासाठी, जगाचा त्याग करुन सोशिकपणाने, सहनशीलतेने व भक्कमपणे सतत प्रयत्न करीत राहण्याची भावना टिकून ती वाढीस लागू शकत नाही.
तिरस्काराचे भक्त
आम्हाला हे माहीत आहे की काही तथाकथित सुधारक प्रेमाऐवजी द्वेष व तिरस्कारद्वारा जगाची सुधारणा करु इच्छितात. द्वेषातच ते सतत गुरफटलेले असतात. त्यापासूनच ते पोषण व शक्ती प्राप्त करतात व त्याच्याच सहाय्याने, दुःखांनी आणि कष्टांनी वेढलेले असतानासुद्धा भक्कमपणे व साहस करुन आपले सुधारणाअभियान चालू ठेवतात. या लोकांच्या तिरस्काराचे लक्ष्य मानवी वंशाचा एखादा विशेष समूहही होऊ शकतो आणि हेही संभव आहे की सामूहिकरुपाने अखिल मानवजात अथवा तो ऐतिहासिक काल त्याचे लक्ष्य होतो, ज्यामध्ये तिरस्काराच्या भक्तास जाग येते. मानवतेपासून दूर असलेले हे वैफल्यग्रस्त ‘सुधारक’ व त्यांचा समूह, आपले उद्देश प्राप्त करणे निश्चतच संभवनीय आहे. तिरस्काराची आग त्यांच्या दुष्ट स्वभावाशी व उपजत अत्त्याचाराची सवय असल्याने हे लोक आपल्या उद्देशपूर्तीकरिता पूर्ण एकोपाही दाखवू शकतात व सर्व प्रकारच्या उणिवाही व वंचितपणा पसंत करु शकतात. परंतु जी श्रद्धा प्रेमाऐवजी तिरस्कारावर आधारलेली असेल त्यापासून, मानवतेला कसलेही कल्याण व यश प्राप्त होऊ शकत नाही. त्यापासून वर्तमान अन्यायाची, तसेच समाजातील प्रचलित वाईट गोष्टीचे परिमार्जन करुन झालेले नुकसान व त्याची भरपाई निसंदेह पुरी केली जाऊ शकते. पण त्याचा हात मानवतेच्या या आजाराच्या रामबाण उपायापासून बिलकूल रिकामा असतो. याच कारणस्तव समाजाचे वर्तमान दोष नष्ट करण्याच्या नावावर केले जाणारे हे सुधारणेचे इलाज व उपाय, त्या दोषांना कमी करुन त्यांना नष्ट करण्याऐवजी, त्यामध्ये अनेक पटीने वृद्धी करतात आणि अशी अवस्था निर्माण होऊन जाते की -
‘जो जो उपाय केला गेला तो तो आजार वाढतच गेला.

आपल्या आजोबाप्रमाणेच आदमच्या संततीवरही अल्लाहची कृपा आहे. आपल्या अपराधानंतरही आदरणीय आदम (अ) जसे अल्लाहच्या कृपेपासून वंचित झाले नाहीत तसेच त्यांची संतती ही गुन्हा व पाप घडल्याकारणाने अल्लाहच्या कृपेपासून वंचित होत नाही. कारण अल्लाह मानवी स्वभावधर्मातील कमकुवतपणा व त्याच्या मर्यादा चांगल्या रीतीने जाणतो व जेवढा भार ते पेलू शकतात तेवढाच भार त्यांच्यावर टाकतो -
‘‘अल्लाह कोणत्याही प्राण्यावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त जबाबदारीचे ओझे लादत नाही.’’ (कुरआन,२:२८६)
सर्व मानव (आदम (अ) ची संतती) अपराधास व चुकास पात्र आहेत व जे आपल्या अपराधासाठी (लज्जित होऊन) क्षमा याचना करतात, ते लोक अपराध्यांमध्ये महान आहेत.’ (तिर्मिजी)
अल्लाहच्या कृपेची व्यापकता
अल्लाहच्या दयेक्षमेबाबत तर कुरआनमध्ये अनेक आयती आहेत, पण आम्ही येथे एकच उदाहरण देतो
‘‘तुमच्या पालनकर्त्यांची क्षमा व स्वर्गाकडे नेणाऱ्या मार्गांने दौडत चला व स्वर्ग, जमीन व आकाशाप्रमाणे विशाल असून ते अशा संयमी जनांसाठी निर्माण केलेले आहे जे, सुस्थितीत तसेच कुस्थितीत संपत्ती खर्च करतात जे क्रोधाला जाळून टाकतात व इतरांच्या चुकांची क्षमा करतात. असे भले व सज्जन ईश्वराला अतिप्रिय असतात. त्यांची अवस्था अशी असते की एखादे कुकर्म त्यांच्या हातून घडते, अगर एखादे पाप करुन स्वतःवर ते अत्याचार करुन बसतात, तेव्हा तात्काळ त्यांना अल्लाहचे स्मरण होते व आपल्या अपराधाबद्दल त्याची क्षमायाचना भाकू लागतात. कारण अल्लाहखेरीज अपराधाची क्षमा कोण करू शकतो व ते हेतुपुरस्सर आपल्या अपराधाचे समर्थन करीत नाहीत. अशा लोकांना त्यांचा पालनकर्ता क्षमा करून, त्यांच्या क्षमायाचनेचा मोबदला देईल व त्यांना स्वर्गांच्या अशा उद्यानात दाखल करील तेथे खालून पाण्याचे कालवे वाहात असतील व तेथे ते चिरकाल राहातील. सद्वर्तन करण्यासाठी किती छान मोबदला आहे.’’ (३:१३३-१३६)
अल्लाहची कृपा किती व्यापक आहे, हे यावरून स्पष्ट होते. तो आपल्या दासांची क्षमायाचना स्वीकारतो एवढेच नाही तर त्या पापाच्या घाणीतून वर काढून व त्याला निर्मळ व शुचिर्भूत बनवून, आपल्या वेचक दासांच्या समूहात त्याचा समावेश करून टाकतो.
अल्लाहच्या कृपेचा एक आश्चर्यजनक पैलू
अशा कृपाळू व मेहेरबान अल्लाहच्या दये व क्षमेबाबत थोडासुद्धा संशय उरतो काय? अल्लाहच्या कृपेच्या अशा व्यापक धारणेमुळे आध्यात्मिक कष्ट व अस्वस्थपणा नष्ट होऊन जातो. तो माणसाला दाखवून देतो की तो आजन्म अपराधी नाही. तसेच त्याच्या पालनकर्त्याची कृपाही त्याच्या अवस्थेबद्दल गाफील नाही. उलट तो जेंव्हा पापाकरिता त्याची अंतःकरणपूर्वक क्षमायाचना भाकतो तेव्हा तो त्याला आपल्या आश्रयस्थानात घेतो. त्याकरिता खरोखरीने व निष्ठेने लज्जित व खजील होण्याखेरीज दुसरी कसलीही अट नाही. ही गोष्ट इतकी स्पष्ट आहे की तिचे समर्थनार्थ आणखी अधिक पुरावे देण्याची गरज नाही, तरी इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या अनुपम वचनावर एक दृष्टिक्षेप टाकू या. मुस्लिमनुसार त्यांनी असे सांगितले,
‘‘ज्याच्या ताब्यात माझा प्राण आहे त्या शक्तिची शपथ, जर तुम्ही कसलेही पाप केले नसते, तर अल्लाहने तुम्हाला नष्ट करुन तुमचे जागी अशा लोकांना निर्माण केले असते, जे पापे करुन त्याची क्षमायाचना भाकीत आहेत व त्याने त्यांना क्षमा केली असती.’’ (मुस्लिम)
असे समजा की, माणसांच्या चुकांकडे डोळेझाक करुन त्यांना क्षमा करणे हाच जणू अल्लाहचा मानस आहे, कुरआनची ही शानदार आयतही हीच गोष्ट उघड करते,
‘‘जर तुम्ही कृतज्ञ भक्त होऊन श्रद्धेच्या मार्गाने गेलात तर शेवटी तुम्हाला अकारण शिक्षा करण्यात अल्लाहला काय स्वारस्य आहे. अल्लाह मोठा गुणग्राही आहे व सर्वांची अवस्था चांगल्या तऱ्हेने जाणतो.’’ (कुरआन ४:१४७८)
निःसंशय अल्लाह माणसाला कष्टात खितपत असलेला पाहू इच्छित नाही. उलट त्याला आपली कृपा व क्षमा प्रदान करतो.

आज विज्ञानाच्या आश्चर्यजनक यशाने पाश्चिमात्य लोकांना असे काही भारून टाकले आहे की त्यांच्यात असा शीघ्रगतीने विचार पसरला आहे, की विज्ञानाने धर्माला कायमचे परागंदा करून टाकले आहे. कारण त्याची उपयुक्तता संपली आहे. मानसशास्त्राच्या तसेच समाजशास्त्राच्या प्रसिद्ध तज्ञापैकी जवळजवळ सर्वांनी अशाप्रकारचे विचार व्यक्त केले आहेत. उदाहरण द्यावयाचे म्हटले तर युरोपमधील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ ‘फ्राईड’ने धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नावर हल्ला व उपहास करताना असे लिहिले की मानवी जीवन तीन प्रकारच्या स्पष्ट मानसशास्त्रीय कालातून जात असतो. रानटीकाल, धर्मकाल आणि वैज्ञानिक काल, आता विज्ञानाचे युग आहे म्हणून धर्माच्या गोष्टीत काही अर्थ व तथ्य नाही, तो संपला आहे व आपले मूल्य हरवून बसला आहे.
धर्माशी वैरभावाचे खरे कारण
धर्माच्या बाबतीत युरोपियन वैज्ञानिकांच्या विरोधी भूमिकेचे खरे कारण तो संघर्ष होता जो त्यांना युरोपीय चर्चच्या विरुद्ध करावा लागला. त्या संघर्षात चर्चने ज्या प्रकारच्या आचरणाचे प्रदर्शन केले ते पाहून ते लोक हेच सत्य आहे असे समजू लागले की धर्म हा प्रतिगामीत्व, रानटीपणा, अंधविश्वास निर्मूल व बिनबुडाच्या विचारांचा परिपाक आहे. म्हणून श्रेयस्कर असे आहे की धर्म कायमचा नष्ठ केला जावा. विज्ञानाला पुष्टी दिली जावी व त्याच्या मार्गदर्शनात मानवजातीची, तसेच संस्कृतीचा विकास चालू राहू शकेल.
युरोपीयन वैज्ञानिकांचे धर्माशी वैर असण्याचे खरे कारण हे होते. धर्माविरुद्ध असणारे काही मुस्लिम या खऱ्या कारणाला समजून घेत नाहीत, तसेच पूर्व व पश्चिमेतील परिस्थितीचा फरक लक्षात घेत नाहीत व धर्माला विरोध करीत असतात. त्यांचा विरोध एखाद्या गंभीर चितन व विचारांती नसतो, किबहुना तो युरोपच्या अंधानुकरणाचे अपत्य आहे. त्यांच्यासमीप विकास व उन्नतीचा तोच एकमेव मार्ग आहे ज्या मार्गाने युरोपियन राष्ट्रे जात आहेत. म्हणून आम्हालाही धर्माची कास सोडून दिली पाहिजे. असे नाही केले तर लोक आम्हाला प्रतिगामी व मागासलेले म्हणून टोमणे मारतील.
दुर्दैवाने हे लोक विसरतात की युरोपियन विद्वानांमध्येही धर्मविरोधाच्या बाबतीत पूर्वी एकमत आढळत नाही. तसेच आताही पूर्ण एकमत आढळत नाही. याउलट काही मोठे विद्वान या निरीश्वरवादी संस्कृतीला विटून हे सत्य उघडपणे बोलू लागले आहेत, की धर्म ही मानवाची अनिवार्य मानसशास्त्रीय व बौद्धिक गरज आहे.
युरोपियन विद्वानांची साक्ष
या विद्वानात प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जेम्स जीन्स प्रमुख आहे. जेम्सच्या जीवनाचा आरंभ एक निरीश्वरवादी व प्रत्येक विषयात शंकादृष्टी ठेवणाऱ्या युवकाच्या रुपात झाला. पण आपल्या अनेक वैज्ञानिक शोधांनंतर शेवटी या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचला की धर्म ही मानवी जीवनातील अनिवार्य गरज आहे, कारण ईश्वरावर आस्था बाळगल्याविना विज्ञानाच्या मूळ समस्या उलगडल्या जाऊ शकत नाहीत. हा प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ जेम्स जीन्ज धर्माच्या समर्थनार्थ इतका पुढे गेला, की त्याने जडवाद व अध्यात्मावाद या दोघांच्या समन्वयावरील विश्वास व आचरण यांचा समतोल एकत्रित करण्याच्या पद्धतीवर इस्लामची उघडपणे स्तुती केली. इंग्लंडचे प्रसिद्ध साहित्यिक ‘समर्सेटमॉम’ने धर्माच्या बाबतीत आजच्या युरोपातील नकारात्मक भूमिकेला या शब्दांत संबोधिल आहे, ‘‘युरोपने आपल्याकरिता एक नवीन ईश्वर ‘विज्ञान’ शोधून काढले आहे आणि जुन्या ईश्वरापासून तोंड फिरविले आहे.’’
युरोपचा नवा ईश्वर
परंतु युरोपचा हा नवीन ईश्वर मोठा ‘‘परिवर्तनवादी’’ निघाला आहे. हा प्रत्येक क्षणी बदलत असतो व त्याचा दृष्टिकोन नेहमी बदल व स्थित्यंतर करण्याकडे असतो. एखाद्या गोष्टीला तो आज ‘सत्य’ मानतो, तर उद्या खोटे, असत्य व फसगत असे म्हणून टाकतो. परिवर्तनाचे हे चक्र असे चालतच राहते. ते कधी संपत नाही आणि त्याचे भक्त नेहमी त्रासलेले असतात. अशा तऱ्हेच्या परिवर्तनशील व प्रत्येकक्षणी बदलणाऱ्या ईश्वराच्या छत्राखाली ते आणखी वेगळी कसली आशा करू शकतात. आजचे पाश्चिमात्य जगत बेचैनी व असंतोषाच्या मेघांनी झाकोळलेले आहे. ते अनेक मानसिक व मानसशास्त्रीय रोगांचे बळी होत आहेत. ती त्यांच्या मूळ आध्यात्मिक रोगाची बाह्यचिन्हे होत.
विज्ञानाचे नवे जग
विज्ञानाला ईश्वरपद बहाल करण्याच्या कृतीचा आणखी एक असा परिणाम निघाला आहे की जेथे तुम्ही आम्ही राहतो, हे जग कुठल्याही स्पष्ट उद्देशापासून अथवा ध्येयापासून बिलकूल वंचित झाले आहे. त्याचा कुठलाही उच्च उद्देश नाही, व्यवस्था नाही तसेच कोणतीही श्रेष्ठ सत्ता वा शक्ती येथे अस्तित्वात नाही, जिच्याद्वारे जगाचे मार्गदर्शन होऊ शकेल. येथे परस्परविरोधी शक्तींमध्ये सतत संघर्ष चालू आहे व येथील प्रत्येक वस्तू परिवर्तनाचे लक्ष्य आहे. आर्थिक पद्धती असो की राजनैतिक तसेच राज्य आणि व्यक्तीचे संबंध असो, येथील प्रत्येक गोष्ट बदलत असते इथपर्यंत की वैज्ञानिक सत्येही बदलतात. उघड आहे की या अंधकारमय व भयानक जगात, मानवाला सततच्या त्रास, बेचैनी व असंतोषाखेरीज काही प्राप्त होऊ शकत नाही. विशेषकरुन अशावेळी जेव्हा वातावरण एखाद्या उच्चतम सत्तेच्या कल्पनेशीही अनभिज्ञ आहे. गुंतागुंतींनी जीवनातील अडचणींनी, दुखांनी पीडित झालेल्यांना व गांजलेल्यांना त्याच्या पदराखाली शरण जावून आश्रय घेतल्याने सुख व शांती प्राप्त होऊ शकेल.

- प्रेमचंद मुन्शी
    प्रसिद्ध हिंदी व उर्दू साहित्यिक प्रेमचंद यांचे हे लिखाण `साप्ताहिक प्रताप' (डिसे. 1925) मधून घेतलेले आहे. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही हजारों वर्षांपासून हिंदुस्थानात राहात आहेत परंतु आजपर्यंत एकमेकांना समजू शकले नाहीत.
    आजही हिंदुसाठी मुस्लिम एक रहस्य आहे तसेच मुस्लिमांसाठी हिंदु एक रहस्य आहे. ते दोन्ही एकमेकांना जाणून सुद्धा घेत नाहीत. ही चिंता या पुस्तकात वर्णन करण्यात आली आहे. संस्कृतीचे तीन प्रकार न्याय, समानता, विश्वबंधुत्व तसेच इस्लामी जीवन संस्कृतीची आणखी काही वैशिष्ट्यें वर्णन केली आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 127    -पृष्ठे - 08  मूल्य - 06      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/p9x27qwhzzkr7evsmku9s53o8tx2o4lz

इस्लाम पुरूषास चार विवाहांपर्यंत मान्यता देतो. इस्लामने बहुपत्नित्वाची अनुमती दिली याचा अर्थ असा नाही की कितीही स्त्रियांशी विवाह करावा. अनेक विवाह करण्यासाठी तशाच  प्रकारच्या अटीदेखील घातलेल्या आहेत. इस्लाम ज्या काळात आणि ज्या प्रदेशात अवतरित झाला त्या वेळेच्या परिस्थितीचा विचार करूनच मान्यता दिली. इस्लामच्या पुनरोद्धारावेळी  स्त्रियांचे प्रमाण मुबलक होते. आज जसे जागतिक पातळीवर स्त्री-पुरूषांच्या प्रमाणात स्त्रीचे प्रमाण कमी आणि पुरूषांचे अधिक आहे, तसे प्राचीन काळी मुस्लिमांमध्ये स्त्रियांचे प्रमाण  पुरूषांच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. म्हणून बहुपत्नित्वाला मान्यता देण्यात आली. स्त्रियांचे प्रमाण अधिक असण्यासही काही बाबी कारणीभूत होत्या. उदा. युद्धे, लढाया, पुरूषांचे स्थलांतर  या कारणांनी पुरूषांची संख्या लढाईत मारले जाऊन कमी होते. पुरूषांचे प्रमाण कमी झाल्याने स्त्रियांना एकटीला जीवन व्यतीत करावे लागेल या कारणास्तव बहुपत्नित्वास मान्यता  आहे. त्या काळात आजच्यासारख्या वैद्यकीय सुविधा विकसित व सुधारित नव्हत्या. त्यामुळे स्त्रियांच्यात आजारपण अधिक होते. इस्लामचा स्त्री-पुरूषांच्या शारीरिक संबंधाला   विवाहाच्या माध्यमातून मान्यता देऊन त्यांच्याकडून आपला वंश वाढविण्यास मान्यता आहे. म्हणजेच विवाह हे यापासून वंश वाढविण्याचेदेखील माध्यम आहे. जर पत्नी वांझोटी असेल  किंवा सतत आजारी असेल तरीदेखील बहुपत्नीवास मान्यता आहे (केवळ चार). काही वेळा विवाहप्रसंगी पती-पत्नी यांच्यात जरी समेट प्रेम असले तरी  पुन्हा एकमेकांत न  पटल्यासारखे होते. कारण दोघांच्या स्वभावात तफावत असल्यास अनंत अडचणी निर्माण होतात आणि जिच्याशी पटत नाही ती एकमेव पत्नी असल्यास वैवाहिक जीवन आनंदी जगता  येत नाही. तसेच त्या काळात विवाह जुळविण्यासाठी बरोबरीची तोलामोलाची स्थळे यांचा अभाव असायचा. माता- पित्यास आपल्या मुलीसाठी उत्तमोत्तम व धनदांडगा पती मिळावा असे वाटायचे. तसा पती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जायचे. परिणामी दोन्ही परिवार सारख्या प्रमाणात नसायचे व चांगल्या स्थळांचा अभाव निर्माण व्हायचा. यामुळे बहुपत्नित्वाने  चांगले स्थळ मिळवण्याची शक्यता निर्माण झाली. युद्धामुळे अनेक पुरूष (सैन्य) मारले जायचे. तेव्हा त्यांच्या बायका विधवा व्हायच्या, तर मुली अनाथ व्हायच्या. प्रत्येकाला दर्जेदार  स्थळ हवे असल्याने अशा अनाथ व विधवा मुली-स्त्रियांची अवहेलना व्हायची व त्यांच्यावर एकलकोंडी जीवन जगण्याची वेळ यायची. याचेही प्रमाण बहुपत्नीत्वामुळे कमी करण्यासाठी हा  उपाय असे.
इस्लामने स्त्रीचा सन्मान करताना विधवा पुनर्विवाहास मान्यता दिली. आज आपण जो इतिहास अभ्यासक्रमात शिकतो त्यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा भारतावर इंग्रजांची सत्ता  असताना गव्हर्नर लॉर्ड डलहौसी याने इ.स.1856 ला केला. यासाठी विशेष प्रयत्न ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केले होते. याच दरम्यान म्हणजे इ.स. 1869 ला क्रांतीज्योती महात्मा  ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला होता. पण वास्तविक पाहता संपूर्ण जगाताचा इतिहास अभ्यासताना इ.स. 1856 च्या पूर्वी (1250 वर्षापूर्वी  अंदाजे) इस्लाममध्ये जगातील पहिला विधवा पुनर्विवाह झाला व तो ही पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केला. तेव्हा त्यांचे वय 25 वर्षे होते व त्यांच्या पत्नी (मक्का येथील) हजरत खदिजा  यांचे वय 40 वर्षे होते व त्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी विवाह करण्यापूर्वी दोन वेळा विधवा झाल्या होत्या.
अनेकेश्वरत्व जोपासणे इस्लामने निषिद्ध केले आहे. कारण एकेश्वरत्व हे इस्लामची मूळ धारणा असून तो निर्विकार, निराकार आहे. त्याची छाया, चित्र, मास, मूर्ती असे काहीही अस्तित्वात नाही. म्हणजेच मूर्तीपूजा त्याज्य आहे. पतीपत्नीने कसे जीवन व्यतीत करावे यासाठीही इस्लामने फार मोठे तत्वज्ञान सांगितले आहे. एकमेकांचा आदर करीत असताना  जर पत्नी आपल्या पतीचा अनादर (अपमान) करीत असेल तर तिला समजावून सांगा. याप्रसंगी हलक्या साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करा.
’’ज्या पत्नीकडून अवज्ञा होण्याचे तुम्हाला भय असेल, त्यांनी उपदेश करा (समजावून सांगा- सामनीती) आणि बिछान्यात त्यांच्यापासून दूर राहा (भेदनिती), मग जर त्या तुमच्या  आज्ञा पाळायला लागल्या तर मात्र जुलूम (दंडनिती) करण्यासाठी निमित्त (कारण) शोधू नका’’

वरील आयातीच्या अर्थातून हे लक्षात येते की पत्नीला सजा करण्याचा अधिकार तिच्या नवऱ्यास दिलेला आहे. तो ही फक्त जर पत्नी पतीचा अपमान करत असेल तर. परंतु तिला अगोदर समजावून सांगा, तिच्यापासून दूर राहा (बिछान्यात). तरीही तिच्या वर्तनात फरक पडत नसेल तर तिला ’किरकोळ मारहाण’ (तोंडावर मारू नका) करा. पत्नीच्या कितीही  मोठ्या पराकोटीच्या अवज्ञेसाठी किरकोळच मारहाण करणे, ही मर्यादा आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणे, विनाकारण मारझोड करणे, छोट्या अवज्ञेसाठी मोठी शिक्षा करणे अथवा  पराकोटीच्या अवज्ञेवर किरकोळ मारहाणीची मर्यादा ओलांडणे हा एक प्रकारचा जुलूम, अत्याचार ठरेल. स्त्रियांवर अन्याय-अत्याचारास सक्त मनाई आहे. इतर बहुतेक धर्म आणि राष्ट्रांत  पुरूषाला स्त्रीवर प्राधान्य दिल्याचे भासवले आहे. याच्याच आधारावर पुरूषांनी स्त्रियांना आपली दासी मानून तिला तुच्छ समजले. तिचा अपमान केला, तिला आर्थिक, सांस्कृतिक,   सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य दिले नाही.इस्लामने तर स्त्रीचा सन्मान केला आहे आणि काही धार्मिक मर्यादेत राहून इच्छिल त्या क्षेत्रात कार्य करण्यास अनुमती दिली आहे.
काही मर्यादांमध्ये स्त्रियांसाठी दागिन्यांच्या संदर्भात इस्लामने जाहीर केले आहे, ’’स्त्रियांनी आपल्याकडील दागिने शरीरावर परपुरूषांना दिसतील असे परिधान करू नयेत. ’’ इस्लाम  शिकवण देतो, ’’ वायफळ खर्च करू नका, वायफळ खर्च करणारे सैतानाचे बंधु होत आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे.’’
इस्लामने अहंकार व घमेंड असणाऱ्यांचा धिक्कार केला आहे. दागिने परिधान करून अथवा दागिन्यांची साठवण करून व्यक्तीमध्ये दिखाऊपणा निर्माण होतो, त्याला त्याचा संपत्तीचा  गर्व वाटतो व अहंकारी व्यक्तीला नरकाचा मार्ग खुला केला आहे. इस्लाम धर्म नातेवाईकांच्या हक्काबरोबरच आपल्या शेजाऱ्यांच्या हक्काबद्दलही जाणीव निर्माण करतो. आपण जर पोटभर जेवण करीत असू आणि आपला शेजारी भुकेने तरसतोय, अन्नअन्न करतोय, त्याला उपाशी न ठेवता त्याच्या जेवणाची काळजी शेजाऱ्याने घ्यावी. म्हणजेच आपण पोटभर  खायचे व शेजाऱ्याने उपाशीपोटी झोपायचे,हे इस्लामविरूद्ध आहे. एखादा शेजारी पुरूष संपूर्ण शरीरावर लाखो रूपयांचे दागिने घालून मिरवत असेल तर आपल्या उपाशी शेजाऱ्याकडे कधीच  लक्ष देणार नाही आणि शेजाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तो कधीही पुढाकार घेणार नाही. तसेच शेजारधर्म निभावण्यासाठी सर्वात पुढे स्त्रीच असू शकते. कारण स्त्रीच आपला शेजारी  कसा आहे, त्याचे वर्तन कसे आहे, त्याच्या घरातील सदस्य काय करतात, त्याची मुले कोणत्या वर्गात आहेत, त्याची आर्थिक परिस्त्तिी कशी आहे? अशा बाबींची माहिती आपल्या  शेजारच्या परिवारातील स्त्रीशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी वागू शकते व जवळीक निर्माण करू शकते.
कर्ज घेऊन इस्लामने मर्यादेपेक्षा अधिक दागीने वापरणे, खरेदी करणे तसेच साठवून ठेवणे याला मज्जाव केला आहे. म्हणून इस्लामने दागिने वापरणे हे अनिवार्य केले नाही. जसे हिंदू  धर्मामध्ये लग्नसमारंभात वराकडून वधूला मंगळसूत्राबरोबर काही दागिने विवाहितेची निशाणी, सौभाग्याचं लेणं म्हणून दिली जातात व त्यातील काही दागिने तिला वापरावेच लागतात.  कारण ते दागिने तिचे स्त्रिधन असते व ते धर्म नियमांनुसार वापरावे लागतात. तशी इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांनी दागिने वापरण्यास अनिवार्यता दर्शविलेली नाही. स्त्री तिच्या व  नवऱ्याच्या आर्थिक कुवतीनुसार साज-शृंगार आपल्या नवऱ्यासाठीच करू शकते. परपुरूषांसमोर दागिने व शृंगार यांचे प्रदर्शन करणे पाप आहे. स्त्री व तिचा नवरा यांची आर्थिक कुवत  जशी असेल तशी ती दागिने खरेदी करू शकते. मात्र वर्षाच्या शेवटी (रमजान ईद) च्या वेळी एकूण दागिन्यांवर त्यांना 2.5 टक्के जकात अदा करावीच लागते. दागिन्याच्या हव्यासापोटी  कोणाचे कर्ज काढून ते घेऊ नयेत. (इस्लाममध्ये व्याज देणे-घेणे निषिद्ध आहे.) मात्र स्त्रीचा स्वभावगुण असल्याकारणाने ती दागिन्यांची अपेक्षा करते. मात्र इस्लाममध्ये मंगळसूत्र वगैरे  दागिने वापरण्यास धर्माचा आधार दिलेला नाही. पण भारतातील काही भागातील (उदा. महाराष्ट्र) स्त्रिया मंगळसूत्र वगैरे दागिने वापरण्यात धर्माचा आधार नसताना ती बाब धार्मिक आहे  (अज्ञानामुळे) भासवतात व गळ्यात विवाहानंतर लच्छा, बोरमाळ (दागिन्यांचा प्रकार) तसेच इतर दागिने वापरणे अनिवार्य भासवतात. पण वास्तविक पाहता धर्माची अनुमती फक्त  आणि फक्त शृंगारासाठीच दागिने वापरण्यास आहे. महाराष्ट्रात अनेक मुस्लिम बांधव इस्लामचे अनुयाची तर आहेत पण त्यांनी इस्लामच्या उपासनेबरोबर इस्लाम जीवनपद्धती  आचरणात आणली नाही. इतर धर्मियांप्रमाणे त्यांच्या जीवनपद्धतीचा शिरकाव त्यांच्यात झाला याला बहुतांशी स्त्री जबाबदार आहे.
इस्लाममध्ये ईश्वराची आराधना प्रत्येकाला अनिवार्य आहे. मग ती स्त्री असेल अथवा पुरूष. स्त्रीयांनादेखील इस्लामच्या ईमान (श्रद्धा) राखणे, नमाज, जकात, रोजा, हज हे करावेच  लागते. स्त्रीने स्वतःची (समाजाबरोबर) कितीही प्रगती केली असली तरी प्रगतीच्या महालात वावरताना धर्मक्षेत्रातही कार्य करावे. धर्माने केलेल्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत.  दिवसभरातील पाचवेळा नमाज अदा केलीच पाहिजे, याला अजिबात सूट नाही. कोणतीही स्त्री नमाजपासून दूर राहू शकत नाही. गरोदर स्त्री  (जिला गर्भातील अर्भकामुळे जमिनीकडे  वाकात येत नाही.) नमाज इशाऱ्याने अदा करू शकते. म्हणजे ईश्वराची आराधना केली पाहिजे. पुरूषांपेक्षा स्त्रीया नक्कीच अधिक धार्मिक असतात, हेही तितकेच खरे आहे. याचा दाखला  म्हणजे जेव्हा इस्लाम धर्म प्रगटला तेव्हा इस्लामची तत्वप्रणाली निश्चित झाली व त्या तत्वाच्या व्यापकतेमुळे इस्लाम स्वीकारायला मोठ्या प्रमाणात आघाड्या वाढल्या. तत्पूर्वी जेव्हा  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामची घोषणा केली. तेव्हा तात्काळ सर्वप्रथम माननीय खदिजा (रजि.) यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. अशा प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर  सर्वप्रथम श्रद्धा बाळगण्याचा सन्मान स्त्रीला प्राप्त झाला.

इस्लाम हा अखिल मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वराने दिलेली एक अनुपम भेट आहे. इस्लाम अखिल मानव जातीसाठी एकमेव ईश्वरी धर्म आहे. हा नुसता धर्मच नसून एक परिपूर्ण  ईश्वरी जीवनव्यवस्था आहे. एक अशी व्यवस्था जी मानवाच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाविषयी तसेच अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, सामाजिक व्यवस्था व  न्यायव्यवस्था इत्यादी सर्वच बाबीबद्दल सखोल चर्चा आणि परिपूर्ण मार्गदर्शन करणारी एकमेव संतुलित आणि आदर्शव्यवस्था आहे.
इस्लाम हा शब्द अरबी आहे. याचा अर्थ शांती, पावित्र्य आणि संपूर्ण जीवन ईश्वरी नियमानुसार जगणे म्हणजेच इस्लाम होय. आणि जो संपूर्ण ईश्वरी नियमानुसार जीवन जगतो तो  मुस्लिम आहे. मुस्लिम होण्यासाठी अनिवार्य आहे की, 1) माणसाने आपल्या अंतःकरणाने अल्लाहाच्या अस्तित्वाला एक मानने. 2) अल्लाहाच्या प्रेषितांवर म्हणजेच आदरणीय  आदमअलैह सलाम पासून ते अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर (सल्ल.) पर्यंत ही प्रेषितांची शृंखला होती त्याला मान्य करणे. आणि अल्लाहाच्या अंतिम प्रेषितावर जी परिपूर्ण ईश्वरी  जीवनव्यवस्था अवतरित झाली होती त्याला मान्य करणे.

इस्लामचे मुलभूत पंचतत्व :- इस्लाम ही एक संपूर्ण जीवनव्यवस्था असल्याकारणाने साहजिकच या जीवनातील प्रत्येक कर्म इस्लामच्या दृष्टीने इबादत (सत्कर्म, उपासना, प्रार्थना)  ठरते. उपासनेचे काही प्रकार असे आहेत जे सर्वांना बंधनकारक व अनिवार्य आहेत. ते मूलतः पाच आहेत. ज्यांना इस्लामचे आधारस्तंभ म्हटले जाते. हेच पाच स्तंभ ईश समर्पित 
जीवनाची रूपरेखा निर्धारित करतात.

1) इमान (श्रद्धा) :- हे मान्य करणे ही की सृष्टी आपोआप अस्तित्वात आलेली नाही आणि असेही नाही की या सृष्टीचे अनेकानेक स्वामी, निर्माते व शासक असावेत. या संपूर्ण  विश्वाचा स्वामी, निर्माता, शासक, नियंत्रक, सामर्थ्यवान, प्रभूत्वशाली एकमेव एकच अल्लाह (ईश्वर) आहे. अर्थात इमानने अभिप्रेत आहे की, साक्ष देणे की, अल्लाह (ईश्वर) शिवाय  कोणीही नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व अंतिम प्रेषित आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांना अंतिम प्रेषित म्हणून मान्य करण्याचा अर्थ हा आहे की, जीवनाच्या प्रत्येक  क्षेत्रात ईश्वरांने जी परिपूर्ण आणि अंतिम जीवनव्यवस्था अंतिम प्रेषितावरती अवतरित केली. तयला मान्य करून त्यानुसार संपूर्ण जीवनात त्याचे अनुसरण करावे.

2) नमाज (प्रार्थना) : प्रत्येक मुस्लिमावर एक अनिवार्य कर्तव्य म्हणून दिवसातून पाच वेळा सामुहिक नमाज अदा करणे बंधनकारक आहे. नमाजच्या माध्यमाने प्रत्येक व्यक्तीचा  अल्लाहशी थेट संपर्क प्रस्थापित होतो. नमाजमध्ये अल्लाह समोर नतमस्तक होताना माणसांतील गर्विष्ठपणा संपुष्ठात येतो. नमाजमुळे संपूर्ण समाजात समता प्रस्थापित होते. नमाज  माणसाच्या चारित्र्य संपन्नतेच्या उच्चतम शिखरावर पोहचविते. नमाज माणसाचे अंतः करण शुद्ध करते व त्याला दुराचार व निर्लज्जतेपासून परावृत्त करते.

3) रोजा (उपवास) - रोजा प्रत्येक मुस्लिमावर रमजान महिन्याचे रोजे अनिवार्य आहेत. याचा उल्लेख कुरआनमध्ये असा करण्यात आला आहे. ’’या अय्युहल्लजीना आमनु कुतिबा  अलैकुमस् सियामु कमा कुतिबा अलल-लजीना निकबलिकुम लाअल्लक्कुम तत्तकून. (सुरे अलबकरा : आयत क्र. 183.)

अर्थ : हे श्रद्धावंतांनों! तुम्हावर उपवास त्याच प्रमाणे अनिवार्य करण्यात आले आहेत, ज्या प्रमाणे तुमच्या पूर्वीच्या उम्मतींच्या अनुयायांवरती अनिवार्य केले गेले होते. जेणेकरून  तुम्हामध्ये तकवा (संयम, ईशपरायणता, चारित्र्यसंपन्नता) निर्माण व्हावा.
रोजा केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे. प्रेषित मुहम्मद (स.) म्हटले ’’ जो रोजा ठेवूनही खोटे बोलणे वागणे सोडत नाही. त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काहीच गरज नाही.’’ पवित्र कुरआनने इशपरायणता हाच रोजांचा खरा उद्देश आहे. असा उल्लेख केला आहे. जो वरील आयातींमध्ये दर्शवितो, ’’तकव्याचा अर्थच आहे  ईशपराणता, ईश-भीरूता, आचार-विचारांची शुद्धता चारित्र्य संपन्नता. ज्याचा परिपूर्णपणे संपूर्ण जीवनावरती परिणाम असावा.

4) जकात : प्रत्येक धनसंपन्न मुस्लिामासाठी त्याच्या पवित्र कमाईतून संपत्तीच्या 2.5 प्रतिशत वर्षा अखेरच्या हिशोबांती ठरवून दिलेली रक्कम होय. जकात ही श्रीमंत लोकांच्या  संपत्तीवरती ज्याचे प्रमाण 52.5 तोळे चांदी (595 ग्रॅम) व 7 तोळे सोने (70 ग्रॅम) यांच्या किमती बरोबरच्या व त्या अतिरिक्त रक्कमेवर सुद्धा 100 रू. वर 2.5 पैसे म्हणजेच 2.5  प्रतिशत यानुसार श्रीमंत लोकांचा संपत्तीवरचा गरीबांचा काढलेला वाटा होय. जकात नियोजन सामुहिकरित्या व्हावे असे निर्देश आहेत. जकातचा उपयोग समाजातील दीन-दुबळ्यांसाठी,  प्रवासी, गुलामांना व कैद्यांना मुक्त करण्यासाठी, सदाचाराच्या संवर्धनासाठी व दृष्टकृत्यांच्या निर्मुलनासाठी, इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी व ईशमार्गात केला जावा, असे संकेत पवित्र  कुरआनात आहेत.

5) हज :- आर्थिक व शारीरिक ऐपत असणाऱ्या प्रत्येक मुस्लिमावर आयुष्यात एकदा हज अनिवार्य आहे. हजमध्ये मक्का येथील पवित्र काबागृहाची प्रदक्षिणा (तवाफ) व हजच्या  इतर  विधिंचा समावेश होतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण (तमाम) मुस्लिम बांधव हजसाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येतात. सर्वांचा एकच पोशाख - एहरामच्या दोन पांढऱ्या  शुभ्र चादरी ! विश्वबंधूत्व व समतेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारा आगळा वेगळा, डोळे दिपवून टाकणारा असा हा महान सोहळा ! इस्लामची वरील पाचही अनिवार्य कर्तव्ये पुरूष व स्त्रिया  दोघांना सारखेच लागू आहेत. हे येथे विषद करणे महत्त्वाचे आहे. सुरूवातीपासूनच इस्लामने स्त्रियांनाही मानाचे स्थान दिले आहे. ईमान, नमाज, रोजे, जकात, हज इत्यादी स्त्रियांसाठी 
बंधनकारक आहे.
जीवनाचा उद्देश :-
अल्लाहने या सृष्टीत व्यर्थ अशी कोणतीही वस्तू निर्माण केली नाही, मग ती कितीही क्षुल्लक का असेना. मग या सृष्टीतील सर्वात महान असलेल्या मानवाची निर्मिती का व्यर्थ असेल?  कदापि नव्हे! हे जीवन प्रत्येक माणसासाठी परीक्षा आहे. साधन-सामुग्री देवून पात्रता देवून, आचार-विचारांचे स्वातंत्र्य देवून, सन्मार्ग व वाम मार्ग स्पष्ट करून येथे प्रत्येकाची वेगवेगळ्या  स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. की कोण स्वेच्छेने ईश सन्मार्गाची निवड करतो कोण वाममार्गाची निवड करतो हे जीवन खरे तर ईश अज्ञांचे अनुपालन करण्यासाठी आहे.  अल्लाहशी कृतज्ञ राहण्यासाठी आहे, कृतघ्नतेसाठी नव्हे.

प्रत्येक व्यक्ती उत्तरदायी :-
सद्य जीवन नाशिवंत असून प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. तद्वतच या संपूर्ण सृष्टिचाही एक ठराविक वेळी अंत होईल. तत्पश्चात समस्त मानवजातीला पुन्हा जीवंत केले जाईल.  न्याय-निवाडा होईल. प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल. ज्यांनी ईशसंदेशाचा स्वीकार करून त्यानुसार कर्म केले, त्यांना पुरस्कृत केले जाईल व ज्यांनी ईश-संदेश  धुडकावून वाममार्ग अंगीकारला, अन्याय-अत्याचार केला व केवळ चंगळवादी जीवन जगले त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. मृत्यू पश्चातचे हे जीवन अविनाशी, निरंतर, आनंत व  शाश्वत असेल.

पवित्र कुरआनातील या सर्वांगीण मार्गदर्शनानुसार प्रेषित मुहम्मदांनी (स.) एक आदर्श राष्ट्र निर्माण केले. कुरआन : अल्लाहने पवित्र कुरआनला दिव्य प्रकरटनाद्वारे (वह्य) प्रेषित मुहम्मदांवर (सल्ल.) अवतरित केले. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अशिक्षित होते. त्यांना ना लिहिता येत होत न वाचता येत होते. त्यांच्या अनुयायांनी पवित्र कुरआनला मुखोदत करून व  लिपीबद्ध करून सुरक्षित ठेवले हे कार्य प्रेषितांच्या देखरेखीत त्यांच्या हयातीतच पूर्ण झाले. ज्या पवित्र कुरआनच्या आधारे प्रेषित मुहमम्मद (सल्ल.) यांनी एक आदर्श राष्ट्र उभे केले. तो  कुरआन आजही अगदी त्याच मूळ स्वरूपात, तंतोतंत जसाच्यातसा उपलब्ध आहे. त्यात यत्कींचितही हेराफेरी झाली नाही. आणि हा पवित्र संदेश अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक  आहे. जगातल्या बहुतेक भाषेमध्ये त्याची भाषांतरे उपलब्ध आहेत.

हदीस : प्रेषित मुहम्मद सल्ल. उपदेशांना हदीस म्हणून संबोधले जाते. मोठी सतर्कता व सावधगिरी बाळगून त्यांच्या अनुयायांनी हदीसचे संकलन केले. कुरआन हा ईशग्रंथ असून हदीस  हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. इस्लामच्या दृष्टीकोनातून सदाचार म्हणजे केवळ नमाज, रोजा, जकात व हज यात्राच नव्हे. तर जीवनातील प्रत्येक पवित्र कार्य हे सदाचार होय. अल्लाह  जवळ प्रार्थना आहे की, तो आम्हा सर्वांना व अखिल मानवजातीला त्याच्या नियमावरती पूर्णपणे सत्यावरती आधारित जीवन जगण्याची सद्बुद्धी देवो व पारलौकीक (मरणोत्तर) जीवनातील यश प्राप्ती होवो. आमीन! सुम्मा आमीन!

- शेख मु. जुबैर अहमद, लातूर

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget