Latest Post

बकर ईद म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या देशात जो उत्सव प्रचलित आहे त्याचं खरं नाव ईद उल अज़हा आहे. ईद उल अज़हा म्हणजे आहुती देण्याचा सण होतो. याला त्यागोत्सव  देखील म्हटलं जाऊ शकतो. हा एक संस्कार आहे. आज आपण एका जनावराची आहुती देतोय, पण उद्या सत्यासाठी, मानवी समाज व देशासाठी प्राणाची, मालमत्तेची, वेळ व  कलागुणांची आहुतीही द्यावी लागली तरी त्यासाठी आपण तयार असण्याची त्यागाची मानसिकता या संस्कारातून निर्माण होते. हा कोणताही नवस किंवा बळी देण्याचा अंधश्रद्धेचा प्रकार  नाहिये. उलट मटणाची भाजी खाल्याने पाप लागते, विटाळ होतो, हीच एक अंधश्रद्धा आहे. हीच अंधश्रद्धा अस्पृश्यतेच्या आणि मॉब लिंचिंगच्या मूळाशी आहे. हा खाद्य विटाळ दूर होणे  आज आवश्यक आहे...
हज यात्रेचे सर्व सोपस्कार मक्का शहर व त्याच्या भोवताल परिसरातच पूर्ण केले जातात. दर दरवर्षी अरबी वॅâलेंडरमधील जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला प्रत्यक्ष हजला सुरूवात  होते, तर पुढील पाच दिवस हाजी लोकांचे विविध सोपस्कार केले जाऊन बारा तारखेला त्याची सांगता होते.
खाली लुंगीसारखं एक कापड गुंडाळून आणि वर एका कपड्यानं अंग झाकलं जातं. त्याला अहेराम म्हणतात. पण फक्त या दोन कपड्यांनाच अहेराम म्हटले जात नाही, तर अहेराम ही  एक अवस्था आहे. या अवस्थेत काही विशिष्ट गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या आहेत. जसे शिवलेले कपडे नेसणे, उंच बूट नेसणे, सुगंधीत अत्तर किंवा इतर क्रिम वगैरे लावणे, शरीर- संबंध करणे, शरीरसंबंधांविषयी शृंगारिक चर्चा करणे, विषारी जीवांव्यतिरीक्त इतर जीवांची शिकार करणे, भांडणं करणे, केसं कापणे, नखं कापणे इत्यादी गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या  असून त्यावर या अवस्थेत प्रतिबंध लागू होतात. म्हणूनच अहेराममध्ये पुरूषांनी फक्त दोन कपडे नेसायचे असतात. पायात साधी स्लीपर घालायची असते.
महिलांचा अहेराम म्हणजे फक्त चेहऱ्याला कपडा लागू द्यायचा नाही. त्यामुळे बऱ्याच महिला तिथे एकतर चेहरा उघडा ठेवतात किंवा एक हॅटसारखी टोपी नेसतात आणि त्या टोपीला  एक कपडा जोडून तो खाली लोंबकळता सोडून देतात. महिला अहेरामच्या व्यस्थतीत साधे कपडे नेसू शकतात. त्यावर बुरखा नेसू शकतात. असा अहेराम नेसून मक्का शहरातील  मस्जिद-एहराम येथे भाविक प्रवेश करतात. या मशिदीच्या सर्वसाधारपणे मध्यभागी काबागृह आहे.
हजयात्रेचा केंद्रबिंदू म्हणजे काबागृह. याविषयी कुरआनातील अध्याय क्रमांक ३ मधील श्लोक क्रमांक ९६ मध्ये अल्लाह सांगतो - ‘‘निसंशय (जगातलं) सर्वात पहिलं उपासनागृह (धर्मस्थळ) जे मानवांकरिता बांधण्यात आले आहे, ते (म्हणजे जे) मक्का शहरी विद्यमान आहे.’’
इथे ‘मानवांकरिता’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अल्लाह अन् त्याच्या प्रेषितांशी इमान राखणारा कुणीही तिथं जाऊ शकतो, उपासना करू शकतो, मग तो कोणत्याही जातीपातीत जन्मलेला का असेना, कारण हे धर्मस्थळ मानवांकरिता बांधलेलं आहे. परंतु फक्त पर्यटन म्हणून, मौज मजा करण्याकरिता तीथं जाता येत नाही.
काबागृहाची चारही टोकं ज्या देशांच्या दिशेने आहेत, त्या देशांवर आधारित त्यांची नावं दिलेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे काबागृहाच्या पुर्वेकडे म्हणजे भारताच्या दिशेने असलेल्या कोपऱ्याला चक्क ‘रूवन-उल-हिंद (भारताकडचा कोपरा)’ असे नाव आहे. ही आम्हा भारतीयांसाठी अभिनास्पद बाब आहे. या काबागृहाच्या भोवती विविध देशांतून आलेले अल्लाहचे  भाविक भक्त जेंव्हा गोलाकार रांगेत नमाज पढण्याकरिता उभे राहतात, तेंव्हा जागतिक मानवी एकात्मता अक्षरश: आपण डोळ्याने पाहू शकतो. त्या वेळी एक अश्वेत वर्णीय आफ्रीकन  हा गौरवर्णिय प्रेंâच माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. एक रशियन हा अमेरिकन माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. विविध भाषा बोलणारे इथे एकाच भाषेत  मंत्रोच्चार करतात. हा एक सांस्कृतिक चमत्कारच म्हणावा लागेल. इथे येऊन सगळे वर्णभेद, सगळे जातीभेद, सगळा प्रांतवाद, सगळे राष्ट्रभेद लोकं विसरून जातात. अशा प्रकारे काबा 
हे आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मतेचे केंद्र आहे. ईदच्या दिवशी याच एकात्मेच्या दुधात मानवी प्रेमाची साखर पडते आणि जगभरात बंधुत्त्वाच्या भावनेने ओतप्रोत असं एक उत्साहाचं वातावरण पसरतं.
काबागृहावर नजर पडतातच ही प्रार्थना म्हटली जाते- ‘‘अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर,अल्लाहु अकबर व ला इलाहा इल्लाहो व अल्लाहु अकबर’’ याचा भावानुवाद असा होतो - अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहशिवाय कुणीही उपासना करण्यास लायक नाही, अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे.  याशिवाय आणखीही काही दुआ येथे म्हटल्या जातात. त्यानंतर काबागृहाभोवती सात प्रदक्षिणा घातल्या जातात. नमाज पढली जाते. जवळच असलेल्या सफा व मर्वा या दोन  टेकड्यां दरम्यान धावत पळत सात फेऱ्या मारल्या जातात. याला ‘सई’ म्हणतात. या सईची पाश्र्वभूमीदेखील बोधप्रद आहे. ती पाश्र्वभूमी जाणून घेण्याकरिता आपल्याला प्रेषित इब्राहीम (अ.)   यांचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे.
प्रेषित इब्राहीम (अ.) यांना ईश्वराकडून प्रेषित्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेला सुरूवात केली. चळवळीच्या कामानिमित्त प्रेषित इब्राहीम (अ.) हे ईश्वरी कार्याकरिता  पॅलेस्टीनला जात असताना त्यांची पत्नी हाजरा व त्यांचं तान्हं बाळ (प्रेषित इस्माईल अ.) यांना एकटेच सोडून गेले होते. त्या वेळी मक्का शहर हे पूर्णपणे विराण झालेलं होतं. प्रेषित  नूह यांच्या काळात आलेल्या महाजलप्रलयात कस्रfचत ही वस्ती त्या वेळी उद्ध्वस्त झालेली असणार बहुतेक. त्यामुळे प्रेषित इब्राहीम (अ.) आले त्यावेळी मक्का हे शहर वसलेलं  नव्हतं. काबागृहाचाही जिर्णोद्धार अजून व्हायचा होता. चोहीकडे भयाण प्रचंड वाळवंटी प्रदेश. आजूबाजूला सफा व मर्वा नावाच्या दोन टेकड्या होत्या. आदरणीय हाजरा यांचं लेकरू एकदा  तहानेने रडत होतं. आपल्या लेकराला पाणी पाजण्याकरिता त्या इकडं तिकडं पाहू लागल्या. तेंव्हा त्यांना दूरवरच्या सफा टेकडीवर पाणी दिसू लागलं. हाजरा त्या दिशेने धावत गेल्या.  पण टेकडीवर पोहचल्यावर त्यांना तिथं पाणी सापडलं नाही. वाळवंटी भागात जमिनीतून निघणारी वाफ ही दुरून पाणीच दिसते. याला ‘मृगजळ’ म्हणतात. हाजरांना मृगजळ दिसत  होतं. सफा टेकडीवरून पाहिलं असता त्यांना मर्वा टेकडीवर पाणी असल्याचा भास झाला. म्हणून त्या तिकडेही धावत सुटल्या. पण तिथंही पाणी नव्हतं. तेदेखील मृगजळच होतं. अशा  प्रकारे तहानेने कासाविस झालेल्या आपल्या लेकरासाठी भर उन्हात उजाड- वैराण वाळवंटी सफा-मर्वा टेकड्यांदरम्यान त्या सैरावैरा धावत होत्या. लेकरासाठी धावपळ करणाऱ्या त्या  आईवर अल्लाहला दया आली. हाजरांचं लेकरू ज्याठिकाणी रडत होतं, तिथून अल्लाहने एक झरा फोडला. त्या झऱ्याच्या पाण्याला हाजरांनी वाळूने अडवलं आणि ‘‘ज़म़जम (थांब-थांब)’’  म्हटलं. अशाप्रकारे त्या झऱ्याला ज़म़जम नाव पडलं. आज त्या झऱ्याचं पाणी पाइपद्वारे दूरदरपर्यंत नेण्यात आलं. मस्जिद-एहराममध्ये जागोजागी नळांद्वारे या झऱ्याचं पाणी उपलब्ध  आहे. अतिशय चवदार, पवित्र, आरोग्यदायी व शुद्ध असं पाणी. नेहमी वाहतं पाणीच शुद्ध असते. एका जागी तुंबलेलं पाणी हे शुद्ध असूच शकत नाही. पण ज़म़जम याला अपवाद आहे.   एकाच ठिकाणी साठलेलं हे पाणी हजारों वर्षांपासून शंभर टक्के शुद्ध असल्याचं वैज्ञानिक प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आदरणीय हाजरा यांनी आपल्या तहानलेल्या लेकरासाठी पाणी  आणण्याच्या आशेने सफा व मर्वा या दोन टेकड्यांदरम्यान धावाधाव केली होती. त्या माऊलीची ती धावपळ अल्लाहला इतकी आवडली की, जगाच्या शेवटपर्यंत या दोन टेकड्यांदरम्यान  धावणे हजसाठी येणाऱ्यांकरीता अनिवार्य करून टाकलं. या धावण्याला ‘सई’ म्हणतात. हा अल्लाहने अशा महिलांचा केलेला सम्मान आहे, ज्यांचे पती किंवा वडिल हे सामाजिक  परिवर्तनाच्या चळवळीत गुंतले असल्यामुळे महिलांना कुटुंबाचं आकाश पेलावं लागतं आणि असा संघर्ष करावा लागतो. माता हाजरांच्या त्या लेकींना सलाम! सई केल्यानंतर मस्जिद- ए-हरामच्या बाहेर निघून केसांचं मुंडन केलं जाते आणि अहेराम काढून नेहमीचे कपडे नेसले जातात. या संपूर्ण सोपस्काराला उमरा म्हणतात. हजपूर्वी हा उमरा करावा लागतो. हजचे एकूण सोपस्कार पाच दिवसांत पूर्ण केले जातात. जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला म्हणजे हजच्या पहिल्याच दिवशी अहेराम धारण करून मक्का शहराच्या बाहेर ‘मीना’ नावाच्या  एका मैदानात भाविक एक दिवस व एक रात्र मुक्काम करतात. या दिवशी भावीक भक्त तंबूत राहून नमाज पढतात, यथाशक्ती अल्लाहचं नाम:स्मरण करतात, कुरआन पठन करतात,  तर काही जन आरामही करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला यात्रेकरू ‘अराफात’ मैदानात जाण्याकरिता निघतात. सर्वसाधारणपणे सूर्य डोक्यावरून ढळण्यापूर्वीच या मैदानात  भाविक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या मैदानात सूर्यास्तापर्यंत थांबले जाते. भाविक इथे नमाज पढतात. इमामचे प्रवचन ऐकतात. आपल्या पापांची क्षमा मागतात, अल्लाहची करूणा भाकतात.
भूतलावरील पहिले मनुष्य व इस्लामचे पहिले प्रेषित आदम (अ.) यांना अल्लाहने जन्नतमधून खाली भूतलावर अवतरीत केले. तिथे जन्नतमधूनच आलेल्या त्यांच्या पत्नी व भूतलावरील प्रथम महिला हव्वा यांच्याशी त्याच मैदानात भेट झाली. त्या दोघांनी त्या मैदानात प्रार्थना केली. नंतर ते लगतच्या ‘मुजदलफा’ मैदानात जाऊन तिथे त्यांनी मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ते मीना नावाच्या मैदानात आले आणि नंतर आज जिथे मक्का शहर आहे, तिथे आले. काबागृहाचा जिर्णोद्धार करून त्याला सात प्रदक्षिणा घातल्या. अशाप्रकारे मक्का  शहरातून निघून अराफातमध्ये थांबणे, नंतर मुजदलफा येथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मीना येथे जाऊन तिथे आणखी काही सोपस्कार पूर्ण करून पुन्हा मक्का शहरात परत  येणे आणि काबागृहाला सात प्रदक्षिणा घालणे हे सोपस्कार आजही हजयात्रेत केले जातात. म्हणून हज हा मानवी इतिहासाचा सर्वात जुना धार्मिक संस्कार मानला जातो. तसेच ईद उल  ज़ोहा हादेखील मानवी  इतिहासाचा सर्वात जुना उत्सव मानला जातो. अराफात मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. या मैदानात आज जमतात तसं क़यामत (महाप्रलया)च्या दिवशी असंच  सगळे माणसं याच मैदानात एकत्रित जमणार आणि केल्यासवरल्याचा हिशेब अल्लाहकडून घेतला जाणार आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होऊन सगळी माणसं मरणार आणि ‘हश्र’च्या   दिवशी सगळी माणसं जीवंत होऊन अल्लाहसमोर ज्या मैदानात उपाqस्थत केले जाणार, त्या मैदानाचा केंद्रबिंदू हेच मैदान राहणार असल्याची माहिती इस्लामी ग्रंथात आपल्याला  मिळते. खरंच, एक ना एक दिवस सर्वांना मरण अटळ आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होणारच असल्याचं विज्ञानदेखील मानते. माणूस मेल्यानंतर ़कयामतच्या दिवशी  पुन्हा कसा  काय परत जीवंत होणार याविषयी अल्लाह कुरआनाच्या अध्याय क्रमांक १९ मधील श्लोक क्रमांक ६६ मध्ये सांगतो-
‘‘मनुष्य म्हणतो, काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर आणला जाईन? काय मनुष्याला आठवत नाही आम्ही पूर्वी त्याला निर्माण केले आहे जेव्हा तो  काहीच नव्हता?’’
माणूस आईच्या गर्भात येण्यापूर्वी कुठं असतो? आईवडिलांच्या शरीरातील दोन भिन्न तत्त्वांच्या मिश्रणातून माणूस जन्म घेतो, ते तत्त्व कुठून येते? ते जे अन्न खातात त्यातून. ते  अन्न कुठून येते? जमिनीतून, पाण्यातून. म्हणजे जमीनीतली माती, पाणी, हवा, प्रकाश व इतर तत्त्वे मिळून एक माणूस उत्पन्न होतो. त्यापूर्वी तो कुठेच नसतो. तो मोठा होतो.  मरतो. मरून त्याची माती होते किंवा राख होते. हाडं उरतात. तो जेंव्हा काहीही नसताना अल्लाह (ईश्वर) त्याला उत्पन्न करू शकतो, तेंव्हा त्याचे काहीतरी अवशेष शिल्लक असताना  का नाही त्याला पुन्हा जीवंत करू शकत? त्याला हे शक्य आहे. एक खून करणाऱ्या आणि शंभर खून करणाऱ्यालाही या जगात फक्त एकदाच फाशी दिली जाऊ शकते. तेंव्हा इतर ९९  खुनांची शिक्षा केंव्हा मिळणार? मग ईश्वर जर न्यायी आहे, तर मग तो न्याय केंव्हा करणार? यासाठी नक्कीच तो एक दिवस सर्वांना जमा करून हिशेब घेणारच आहे, यावर इमान  ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेऊन परलोक नाकारणे, हिशेबाचा दिवस नाकारणे म्हणजे त्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उत्पन्न करून त्याचा घोर अपमान करणे होय.   अशा ईशद्रोही लोकांना तो नरकात टाकणार. म्हणून मेल्यानंतर जीवंत होऊ, यावर प्रत्येकाला इमान राखणे गरजेचं आहे. अशाप्रकारे आपण मेल्यानंतर पुन्हा जीवंत होऊन याच मैदानात  येणार आहोत, याची तीव्र जाणीव या मैदानात होते. या अरफातच्या मैदानात पहिले मानव आदम व हव्वा यांची भेट होऊन मानवी समाजाच्या लौकिक कर्मकलापाची सुरूवात इथेच  झाली होती आणि मानवी कर्मांचा हिशेब होऊन लौकिक जीवनाचा शेवटदेखील इथेच, याच मैदानात होणार आहे, इन्शाल्लाह! या ईदच्या दिवशी हजयात्रेकरू व्यतिरिक्त जगभरातील  सक्षम मुसलमान जनावरांची कुरबानी करत असतो. ईदच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या दोन दिवसांतही कुरबानी केली जाऊ शकते. या कुरबानीची जी सामाजिक पाश्वभूमी आहे,  तीदेखील समजून घेणे गरजेचे आहे. कुरबानीचा उद्देश एखाद्या जनावराचा जीव घेणे नाही. एखादा नवस फेडण्याकरिता कुरबानी केली जात नाही की फक्त पार्टी करून मौज मजा  करण्याकरिता कुरबानी केली जात नाही. अल्लाह कुरआनात अध्याय क्रमांक २२, श्लोक क्रमांक ३७ मध्ये सांगतो -
‘‘अल्लाहप्रत त्यांचं (जनावरांचं) मांस किंवा रक्त पोचत नसते तर त्यामागची तुमची निष्ठा पोचते.’’
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दिलेल्या आदेशावरून कुरबानीच्या मटणाचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वत:साठी अन् स्वत:च्या कुटुंबियांकरिता, दुसरा भाग हा आपले नातेवाईक   व मित्रांकरिता पण मटनाचा तीसरा भाग गोरगरिबांसाठी राखून ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारे या कुरबानीच्या निमित्ताने ज्या गोरगरिबांना मटण  हे महिनोगिणती  डोळ्याने पाहायलाही मिळत नाही, अशांना या ईदनिमित्त ते खायला मिळते. म्हणून बळी व कुरबानीत फरक आहे. माणसाच्या नावाने देवासाठी बळी दिला जातो, तर अल्लाहच्या  नावाने माणसासाठी कुरबानी दिली जाते, गोरगरिबांसाठी कुरबानी दिली जाते. फक्त जनावरांचं मांस पाहून नव्हे तर गरिबांची रिकामी खळगी भरलेली पाहून अल्लाह प्रसन्न होत  असतो. त्यासोबतच सामाजिक क्रांतीकरिता आपली व आपल्या कुटुंबियांची कुरबानी देण्यासही ही कुरबानी प्रेरणा देत असते, ही ईद प्रेरणा देत असते. अशा त्याग व कुरबानीचा उत्सव असणाऱ्या ईद-उल-़जोहाच्या आपल्या सर्वांना सदिच्छा!
ईद मुबारक!

- नौशाद उस्मान

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे  आज्ञापालन करावयास हवे).’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ‘‘हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.’’ पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ‘‘आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या  पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.’’ (हदीस : मुस्लिम)
अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा  त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध  घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र  ‘नफ्ल नमाज’ (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ‘‘मी नेहमी ‘नफ्ल रोजे’ (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही’’ आणि तिसरा  म्हणाला, ‘‘मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.’’ (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले,  ‘‘तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!’’ मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ‘‘खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न  करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) ‘नवाफिल’ (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला  पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल,  त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.’’ (हदीस : मुस्लिम)
आयशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अगोदर एक काम करण्यास मनाई केली होती, मग त्यांनी ते काम केले जेणेकरून लोकांना माहीत व्हावे की आता पैगंबर (स.) ते काम करण्याची परवानगी देत आहेत. तरीही काही लोक ते काम करण्यास तयार झाले नाहीत. जेव्हा पैगंबरांना त्यांच्या या धारणेबाबत माहीत झाले तेव्हा त्यांनी भाषण  दिले आणि अल्लाहच्या स्तुती व गुणगान केल्यानंतर म्हणाले, ‘‘मी करीत असलेले काम करण्यापासून काही लोक का धजावत नाहीत. अल्लाह शपथ! मला त्या सर्वांपेक्षा अधिक ज्ञान  आहे आणि त्या सर्वांपेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगतो.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
ज्यूंनी आपला ग्रंथ ‘तौरात’च्या शिकवणींमध्ये फेरफार  केला होता, परंतु त्यामध्ये काही सत्य गोष्टीदेखील होत्या ज्या मुस्लिम लोक ऐकत होते आणि पसंतही करीत होते. जर पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी परवनागी दिली असती तर ‘दीन’ (जीवनधर्म) ला हानी पोहोचली असती. कोणत्या धर्मात काही सत्य व चांगल्या गोष्टी आढळत नाहीत? आदरणीय पैगंबरांनी जे  उत्तर माननीय उमर (रजि.) यांना दिले त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की ज्याच्या घरात स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असेल त्याने खडकाळ जमिनीकडे जाण्याची इच्छा बाळगू नये. 

एकेश्वरत्वाला आणि प्रेषित्वाला मान्यता तोंडी स्वरूपात दिली जाते. ते त्यांच्या शाब्दिक अर्थापेक्षा जास्त काही सूचित करते. ते तोंडी एकेश्वरत्वाचे आणि प्रेषित्वाचे अभिवचन सर्व प्रेषितांना, ईशग्रंथांना, दूतांना तसेच पारलौकिक जीवन आणि नशीब या सर्वांना मान्यता देते. थोडक्यात, हे इस्लामच्या संपूर्ण श्रध्देलाच मान्यता आहे. कारण जो प्रेषित मुहम्मद (स) यांचे प्रेषित्व मान्य करतो त्याच क्षणी तो या सर्व अदृश्य सत्यतेलासुध्दा मान्य करतो की ज्यांना प्रेषितांनी सर्वांपर्यंत पोहचविले आहेत.
एकेश्वरत्वात आणि प्रेषित्वात अंतःकरणपूर्वक श्रध्दा असणे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग त्या श्रध्देला मान्य करणे आणि मानल्यानंतर तोंडी अभिवचन देणे होय, प्रेषितवचनांचा आणि धार्मिक विद्वानांच्या टिकात्मक साहित्याचा अभ्यास केल्यानंतर हे कळून येते की मुस्लिम (श्रध्दावंत) बनण्यासाठी फक्त मनापासून श्रध्दा असणे हे पुरेसे नाही तर त्यासाठी तोंडी अभिवचन अथवा घोषणा करणे हेसुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. तोंडी घोषित केल्याशिवाय श्रध्दा वैध ठरत नाही. तोंडी अभिवचन देणे आणि घोषणा करणे म्हणजे सत्य मान्य करणे की इस्लाम हा धर्म- परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे आणि कुजबुजणारी मुहीम मुळीच नाही. इस्लामच्या कर्तव्यांची पूर्तता एकांतात होऊच शकत नाही. हा तो धर्म आहे जो समस्त मानवतेशी उंच आवाजात संभाषण करीत आहे. (कुजबुज नव्हे) जीवनाच्या प्रचंड अशा गोगांटामध्ये इस्लाम मनुष्याला प्रस्थापित करीत आहे. इस्लाम मनुष्याला चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यानच्या निरंतर चाललेल्या संघर्षात गुंतवून ठेवतो. इस्लाम मुस्लिमाला अविश्वास आणि अनाचाराच्या निरंतर लढाईतील सैनिकांमध्ये सर्वांत पुढे ठेवतो. अशा परिस्थितीत इस्लामचा स्वीकार करण्याची आम घोषणा करणे अत्यावश्यक ठरते. ती त्याच्या श्रध्दाशीलतेने (ईमानने) त्यावर सोपविलेल्या धर्मप्रचारकाची आणि कर्तव्यपूर्तीसाठी लढणारा सैनिकाच्या जबाबदारीची घोषणा आहे. म्हणून इस्लामच्या श्रध्दाशीलतेबद्दल आम घोषणा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मौलिक कार्य आहे.
या मान्यतेचा आणि उद्घोषणेचा आपण जर राजकीय दृष्टिकोणातून विचार केला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. जो कोणी व्यक्ती अल्लाहच्या एकेश्वरत्वाला आणि मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वाला जाहिररित्या मान्य करून विश्वास ठेवतो, त्याला श्रध्दावंत (मुस्लिम) म्हणतात. जरी तो खरोखरच विश्वास श्रध्दा ठेवत नसेल किवा व्यवहारात इस्लामच्या कर्तव्यपूर्तीस अपयशी ठरत असेल. श्रध्दाशीलतेची (ईमानची) जाहिररित्या कबूली देऊन त्या व्यक्तीस इतर मुस्लिमांप्रमाणेच राजकीय आणि सामाजिक फायदे मिळतात. जर दुसरा एखादा व्यक्ती मनापासून इस्लामवर श्रध्दा ठेवून आहे परंतु त्याने त्यास जाहिररित्या कबूली दिली नाही तर त्याला मुस्लिम म्हणून स्वीकारले जाणार नाही. तो तर मुस्लिमेतरच राहील आणि त्याच्याशी तसाच व्यवहार केला जाईल. मनुष्याने जर इस्लामच्या श्रध्देतील अचूकपणा आणि सत्यतेवर निष्ठा ठेवली तर अशी व्यक्ती इस्लामचा मजबूत पाया प्राप्त करून घेते आणि उत्साहाने इस्लामवर श्रध्दा ठेवून जाहिररित्या त्याला मान्य करते. अशा प्रकारे मनुष्य इस्लामच्या प्रथमस्तंभास परिपूर्ण करतो म्हणजेच इस्लामच्या प्रथमस्तंभाची उभारणी करतो.

तथाकथित मुस्लिम। महॉमिडन पर्सनल लॉ मधील कायदे वास्तविक इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे ही हकीकत सिद्ध झाल्यामुळे इतर दूसर्या जमातीच्या व्यक्तिगत कायद्याहून त्याची हकीकत पूर्णपणे भिन्न आहे. इतर जमातीचे व्यक्तिगत कायदे त्यानी स्वतःहून तयार केलेले आहेत. मुस्लिम कायद्याचा उगम मुस्लिमांची बुद्धी, समज, आवडनिवड किवा त्यांचे विचार यातून झालेला नसून त्याचे उगमस्थान पवित्र कुरआन आणि सुन्नत आहे. म्हणून त्याना मुस्लिम किवा महॉमिडन पर्सनल लॉ(मुस्लिम । महॉडिन व्यक्तिगत कायदा) म्हणणे त्या कायद्याच्या मूळ दर्जावर पडदा पाडणे आहे.
वास्तविक या कायद्याला हे नाव ब्रिटिश राजकर्त्याची कुत्सित आणि अशुभ देणगी आहे. ते नेहमी मुस्लिमांची संस्कृती, सभ्यता आणि धर्म याना क्षति पोहोचवून त्यांच्या धारणाना नष्ट करण्याच्या प्रयत्नात असत. इस्लाम धर्माशी शत्रुत्व आणि इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेच्या विचारांच्या परिणतीमुळे या कायद्याला ‘‘कुरानिक लॉ’’ किवा ‘‘इस्लामिक लॉ’’ म्हणण्या ऐवजी ‘महॉमिडन लॉ’ असे नामकरण करण्यात आले. कायद्याच्या पुस्तकातुन आणि न्यायसंस्थेत हेच नांव प्रचल्लित केल्यामुळे खर्या वस्तुस्थितीची शंका सुद्धा येऊ नये अशी मखलाशी करून ठेवली आहे. मुस्लिमांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असणार्या शरीअतच्या कायद्याला ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ नांव दिले गेले. तथापि ते मुस्लिम कायदे नसून इस्लामिक कायदे होते आणि आजही आहेत.
म्हणून या कायद्याना ‘इस्लामी व्यक्तिगत कायदा । इस्लामिक पर्सनल लॉ’ हे नाव देणे सत्य, वास्तवाला आणि प्रामाणिकपणाला धरून होईल. इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेची आज ही परिस्थिती आहे की सुशिक्षित लोकांना सुद्धा ‘इस्लामी’ आणि ‘मुस्लिम’ यातील फरक समजत नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू राहिल्यास त्याचा स्वाभाविक परिणाम असा होईल की, शरीयतच्या आदेशांचे मूळ चित्र सर्वसामान्य लोकांना दिसू शकणार नाहीत. हा तर मुस्लिम पर्सनल लॉ आहे, त्याच्याशी इस्लामचा काही संबंध नाही. असाच लोक विचार करतील. सर्व संबंध केवळ मुस्लिमांशी असून मुस्लिम नावांच्या समाजाचे तसेच सांस्कृतिक कायदे आहेत, जसे जगामध्ये बर्याच अन्य समाजाचे व्यक्तिगत कायदे असून त्यांच्या धर्माशी फारकत घेतलेले आणि केवळ सांस्कृतिक कायदे आहेत. इतका मोठा पायाभूत गैरसमज चालू ठेवणे आणि त्याचीच वृध्दी करत राहणे. प्रामाणिक आणि न्यायसंगत आहे काय?

पवित्र कुरआन व हदीसमध्ये नमाजनंतर सर्वांत अधिक महत्त्व अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास दिलेले आहे. जकात (अडीच टक्केप्रमाणे दान-धर्म) त्याचेच एक कायदेशीर रूप आहे. नमाजद्वारे मनुष्य ही भावना प्रकट करतो की, त्याने हृदय व मेंदू आणि अवयव व त्याचे अंगप्रत्यांग सर्वकाही अल्लाहसमोर नतमस्तक आहेत आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करणे, या गोष्टीचे चिन्ह आहे की, तो संपत्तीला आपली मालमत्ता समजत नाही आणि ती त्या प्रत्येक ठिकाणी खर्च करण्यास तयार आहे, जेथे अल्लाहने खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची मागणी पुरुषाकडेही आहे आणि स्त्रियांकडेदेखील. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे -
‘‘निःसंशय दानधर्म करणारे पुरुष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि ज्यांनी अल्लाहला चांगले ऋृण दिले त्यांना वाढवून दिले जाईल व त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे.’’ (सूरतुल हदीद : १८)
हदीसमध्ये महिलांना विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. यात त्यांच्या स्वभाव, मानसशास्त्र व वातावरणाचेसुद्धा औचित्य पाहिले गेले आहे.
माननीय जाबिर (र) आणि माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (स) कथन करतात की, एका ईदच्या प्रसंगी प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना उद्देशून वेगळे भाषण दिले. त्यात त्यांना दानधर्म पुण्याईचीसुद्धा प्रेरणा दिली. यावर महिलांनी आपले दागिने व अन्य वस्तू सादर केल्या. माननीय बिलाल (र) त्या वस्तू आपल्या चादरीत गोळा करीत होते. (बुखारी (किताबुल ईदैन), मुस्लिम (किताबुल ईदैन)
माननीय अबू बकर (र) यांच्या सुपुत्री माननीय अस्मा (र) यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उपदेश केला.
‘‘खर्च करा. गणना करू नका. (की काय द्यावे आणि काय देऊ नये). नाहीतर अल्लाहसुद्धा मोजूनच देईल. आणि वाचवून सुरक्षित ठेऊ नका. अल्लाहसुद्धा त्याप्रमाणेच देईल.’’ (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात)
माननीय आयेशा (र) म्हणतात की, आम्ही एकदा बकरी कापली (आणि ती वाटून टाकली). प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारणा केली, ‘‘त्यापैकी काही शिल्लक आहे का ?’’ आम्ही सांगितले, ‘‘केवळ फरा उरलेला आहे.’’ ते म्हणाले, ‘‘असे म्हणा फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुज्जकात), तिर्मिजीचे प्रमाण.
अशा प्रकारे प्रेषित मुहम्मद (स) यांनी ही कल्पना समजाऊन दिली की, मनुष्य जे काही दान पुण्य करतो ते वाया जात नाही, तर वाया तर ते जाते तो खाऊन पिऊन समाप्त करतो. दानधर्म, पुण्यच वास्तविकतः शिल्लक उरतात. ते अशासाठी की, त्यांचा मोबदला व पुण्य अल्लाहजवळ सुरक्षित आहे.
काही वेळा मनुष्य अशा स्थितीत नसतो की, एखाद्याला त्याने मोठे सहाय्य करावे आणि थोडीशी मदत करताना संकोच होतो. ही स्थिती विशेषतः स्त्रियांची होते. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना सांगितले, ‘‘दान लहानात लहान वस्तूचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की, गरजूची खरी गरज पुरी होत नसेल. प्रसंगी आधार त्याला मिळू शकतो.’’
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्म्द (स) म्हणाले, ‘‘खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. हा पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे उपयोगी पडतो, त्याचप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’ (मंजुरीच्या कथनानुसार अहमदने ते कथन केले. अत्तर्गीब वत्तरहीब पृष्ठ - १७८.)
उम्मे बुजैद (र) म्हणतात, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाले की, याचक माझ्या दारावर येतो. कधी कधी घरात एखादी वस्तू अशी नसते जी त्याला देता यावी, म्हणून लाज वाटते. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, (याचकाला मोकळ्या हाताने पाठवू नका) ‘‘काही नसेल तर जळलेले खूर का असेना देऊन पाठवा.’’ जळलेले खूर एक निरुपयोगी वस्तू आहे. यात याचकाला मोकळ्या हाताने पाठविण्याची सक्त मनाई आणि त्याला काही न काही देण्याची ताकीद आहे.
स्त्रियांचे संबंध विशेषतः नातेवाईक व शेजाऱ्यांशी असतात. त्यांचा हक्कसुद्धा जास्त असतो. हदीसमध्ये स्त्रियांना हा हक्क देण्याची प्रेरणा दिली गेली आहे.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र) यांच्या पत्नी व एका अन्सारी महिलेने माननीय बिलाल (र) यांच्यामार्फत प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, त्या आपले पति व मुलांवरसुद्धा दानधर्म करू शकतात काय ? प्रेषित म्हणाले, ‘‘होय, त्या त्यांच्यावरसुद्धा दानधर्म करू शकतात.’’
‘‘त्यांना तर दुप्पट मोबदला मिळेल - जवळिकीचा मोबदलासुद्धा व दानधर्माचा मोबदलासुद्धा.’’ (बुखारी (किताबुन्नफकात), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय उम्मे सलमा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘जर मी आपले पति अबू सलमा यांच्या मुलावर खर्च केले, जी माझीच मुले आहेत आणि ज्यांना मी सोडूही शकत नाही, तर महान अल्लाह त्याचे पुण्य देईल का?’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘त्यांच्यावर खर्च करा. तुम्ही जे काही त्यांच्यावर खर्च कराल तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल.’’ (प्रमाण मागीलप्रमाणे)
माननीय मैमूना (र) यांनी एका दासीला मुक्त केले. त्यांनी याचा उल्लेख प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर केला. प्रेषित म्हणाले, ‘‘जर तुम्ही तिला आपल्या मामांना दिले असते तर अधिक पुण्य मिळाले असते.’’ (बहुतेक त्यांना गरज होती.) (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय अबू हुरैरा (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘हे मुस्लिम स्त्रियांनो! तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये. जरी शेळीची खूर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’ (बुखारी (किताबुल हिबा))
याचे दोन अर्थ संभव आहेत. एक असा की, प्रत्येक मुस्लिम स्त्रीने यथाशक्ती आपल्या शेजारणीला नजराणा भेट देत राहिले पाहिजे. जर एखादी मोठी वस्तू देता येणे शक्य नसेल, तर लहानशी वस्तू द्यावी. असा विचार करू नये की, लहानशी वस्तू कशी काय द्यावी. दुसरा अर्थ असा आहे की, ज्याला भेटवस्तू दिली जाईल त्याने हे पाहू नये की कोणती वस्तू दिली आहे आणि त्याची किमत काय आहे. तर त्या भावना, प्रेमाची किमत करावी, जी त्याच्या पाठीमागे आहे आणि लहानात लहान वस्तूसुद्धा रद्द करू नये.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, माझे दोन शेजारी आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या घरी भेटवस्तू पाठवू ? ते म्हणाले, ‘‘ज्याचा दरवाजा तुमच्या जवळ असेल, त्याला पाठवा.’’ (बुखारी (किताबुल हिबा))
यावरून ज्ञात होते की, माननीय आयेशा (र) शेजाऱ्यांचे हक्क जाणत होत्या. तथापि त्या हे समजू इच्छित होत्या की, एकापेक्षा अधिक शेजारी असतील तर कोणाचा अधिकार जास्त आहे ?
या सैध्दांतिक शिक्षणानंतर आता प्रारंभिक काळातील मुस्लिम महिलांच्या अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याच्या प्रवृत्तीचा अल्पसा परिचय दिला जात आहे.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब (र) यांच्यात अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची असीम भावना होती आणि त्या फार दानधर्म व पुण्य करीत असत. इमाम जहबी त्यांच्या वर्णनात म्हणतात -
‘‘धर्म, अल्लाहचे भय, दान-पुण्य व नेकी आणि कल्याणाच्या दृष्टीने त्यांची गणना उत्तम महिलांमध्ये होत असे.’’ (सियरु अअलामिन्नुबलाइ - २ : १४९)
त्यांची स्थिती अशी होती की, परिश्रम करून जे काही कमवीत असत ते गरीब व दीन-दुःखी लोकांना वाटून टाकीत असत.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी आपल्या पत्नींना सांगितले,
‘‘तुमच्यापैकी मला सर्वप्रथम ती भेटेल जिचे हात सर्वांत लांब आहेत.’’
आम्ही आपले हात मापत असू जेणेकरून हे पहावे की, कोणाला मृत्यू प्रथम येईल. माननीय जैनब (र) बुटक्या बांध्याच्या होत्या; परंतु सर्वांत प्रथम त्यांना मृत्यू आला. यावरून आम्हाला कळले की, प्रेषित मुहम्मद (स) यांचा हेतु असा होता की, दानधर्म व पुण्यात जी सर्वांत पुढे आहे, तिला प्रथम मृत्यू येईल. त्या स्वतःच्या हाताने काम करीत असत आणि जे प्राप्त होत असे त्याचे दानधर्म करीत असत. (मुस्लिम (किताबुल फजाइल)
बरजा बिन्ते राफिअ म्हणतात की, माननीय उमर (र) यांनी बारा हजार दिरहम बैतुलमाल (राज्यकोष) मधून माननीय जैनबसाठी पाठवून दिले. जेव्हा ही मोठी रक्कम त्यांच्यापर्यंत पोचली, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी या रकमेचे काय करू ? माझ्या अन्य भगिणी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पवित्र पत्नीं) ही रक्कम गोरगरिबांत वाटण्यास अधिक सक्षम आहेत.’’ त्यांना म्हटले गेले की, ही रक्कम आपल्यासाठीच आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सुबहान अल्लाह ! ही ठेऊन द्या आणि एका कापडाने झाका.’’ मग माननीय जैनब (र) मला म्हणाल्या, ‘‘यात हात घाला आणि एक मूठ अमुकच्या घरी व एक मूठ अमुकच्या घरी पोचवून या.’’ अशा प्रकारे आपल्या नातेवाईकांत व अनाथ लोकांत वाटावयास लावीत राहिल्या. जेव्हा अल्पशी रक्कम उरली, तेव्हा मी म्हणाले, ‘‘यात आमचासुद्धा हक्क आहे ना ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘बरे, आता कापडाखाली जे काही उरले आहे ते तुमचे आहे.’’ हे पस्तीस दिरहम होते. एका कथनात आहे की, जेव्हा ही गोष्ट माननीय उमर (र) यांना कळली की, त्यांनी सर्व रक्कम अशा प्रकारे वाटून टाकली आहे, तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांच्याकडून पुण्याचीच अपेक्षा आहे.’’ मग माननीय उमर (र) स्वतः त्यांच्या घरी आले. दारावर उभे राहून सलाम (अभिवादन) केला. नंतर आणखी एक हजार दिरहम पाठविले आणि विनंती केली की, ही रक्कम स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी खर्च करा. परंतु ती रक्कमसुद्धा त्यांनी वाटून टाकली.
त्या इतक्या स्वाभिमानी होत्या की, राज्यकोषातून मिळालेल्या या अनुदानानंतर आकाशाकडे हात उचलून त्यांनी प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह ! माननीय उमर (र) यांचे अनुदान घेण्यासाठी आता मला जिवंत ठेऊ नकोस.’’ त्यांचे त्याच वर्षी निधन झाले. (तबकाते इब्ने साद - ८ : १०९, ११०.)
त्यांनी आपल्या प्रेतावर पांघरण्यासाठी कापड (कफन) स्वतः तयार करून ठेवले होते. इकडे माननीय उमर (र) यांनीसुद्धा त्यांच्या मृत्यूसमयी राज्यकोषातून पाच कपडे स्वतः निवडून पाठविले. त्याच कपड्यांत त्यांना दफन केले गेले आणि त्यांच्या भगिनी हिमना बिन्ते जहश यांनी ते कापड जे माननीय जैनब यांनी तयार केले होते, दान म्हणून देऊन टाकले. (तबकाते इब्ने साद - ८ : ११०)
माननीय जैनब (र) यांच्या निधनानंतर माननीय आयेशा (र) यांनी उद्गार काढले,
‘‘त्या गेल्या, ज्या प्रशंसनीय, अनुपम, अनाथ व विधवांच्या आश्रयस्थान होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ११०)
उस्मान बिन अब्दुल्लाह जहशी म्हणतात,
‘‘जैनब बिन्ते जहश यांनी एकही दिरहम अथवा दीनार मागे ठेवला नाही. जे काही हाती येई त्याचे दान करीत. त्या गरीब अनाथांचे आश्रयस्थान होत्या.’’
म्हणतात, त्या ज्या घरात राहात होत्या ते घर वलीद बिन अब्दुल मलिक यांनी मस्जिदे नबवीच्या विस्तारासाठी ते पन्नास हजार दिरहममध्ये खरेदी केले होते. (तबकाते इब्ने साद - ८ : ११४)
प्रेषित मुहम्मद (स) माननीय आयेशा (र) यांच्यावर सर्वांत अधिक प्रेम करीत असत. या कारणास्तव माननीय उमर (र) यांनी त्यांचे अनुदानसुद्धा जास्त ठेवले होते. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकी प्रत्येकीला दहा हजार दिरहम व माननीय आयेशा (र) यांना बारा हजार दिरहम नेमुन दिले. (तबकाते इब्ने साद - ८ : ६)
परंतु माननीय आयेशा (र) फार दानी होत्या. जे काही मिळत असे ते दान करण्यात खर्च करीत असत. त्यांच्या दानी वृत्तीचे व अल्लाहच्या खर्च करण्याची कल्पना खालील प्रसंगावरून करता येईल.
उम्मे जराह म्हणतात की, माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर (र) यांनी दोन पिशव्या रक्कम ज्यात एक लक्ष दिरहम असतील, माननीय आयेशा (र) यांच्याकडे पाठविली. त्यांनी थाळी मागितली आणि त्याच्यातूनच रक्कम लोकांत वाटून टाकली. त्या दिवशी त्यांचा रोजा होता. संध्याकाळ झाली तेव्हा मला म्हणाल्या, ‘‘हे मुली ! रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) काही खावयास आण.’’ मी म्हणाले, ‘‘आज आपण एवढी मोठी रक्कम वाटून टाकली. काय हे शक्य नव्हते की इफ्तारसाठी मटण मागविले असते ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘जाऊ दे, बरे-वाईट बोलू नकोस. जर अगोदर तू सांगितले असते, तर मटणसुद्धा मागविले असते. (तबकाते इब्ने साद - ८ : ६७)
अता बिन अबी रिबाह म्हणतात की, एकदा माननीय मुआविया (र) यांनी माननीय आयेशा (र) यांना एक लाख दिरहम पाठवून दिले. त्यांनी ती रक्कम उम्महातुलमोमिनीन (प्रेषितांच्या पवित्र पत्नी) यांच्यामध्ये वाटली. (सियरु आलामिन्नुबलाइ - २ : १४१)
उर्वा बिन जुबैर (र) म्हणतात की, मी पाहिले की, माननीय आयेशा (र) यांनी सत्तर हजार दिरहम दानधर्मामध्ये घातले आणि स्वतः त्यांची स्थिती अशी होती की, त्या आपल्या कपड्यांना ठिगळे लावीत असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ६६)
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते खुजैमा (र) इस्लाम स्वीकारण्यापूर्वीसुद्धा गरीब याचक व दरिद्री लोकांना खूप मदत करीत असत. याच कारणामुळे त्यांना ‘उम्मुलमसाकीन’ (अर्थात-गरीब याचकांची आई) म्हटले जात असे. (तबकाते इब्ने साद - ८ : ११५, अल इस्तीहआब)
उम्मुलमोमिनीन माननीय सौदा बिन्ते जमआ (र) यांना माननीय उमर (र) यांनी दिरहमने भरलेली पिशवी पाठविली. जेव्हा त्यांच्यापर्यंत ही पिशवी पोचली तेव्हा विचारले, ‘‘यात काय आहे ?’’ उत्तर मिळाले, ‘‘दिरहम आहेत’’. त्यांनी विचारले, ‘‘खजुराप्रमाणे दिरहम भरले आहेत काय ?’’ मग एका मुलीला सांगितले, ‘‘एक थाळी घेऊन ये.’’ त्याच थाळीने सर्व रक्कम वाटावयास लावली. (तबकाते इब्ने साद - ८ : ५६)
माननीय अस्मा (र) ह्या माननीय अबू बकर (र) यांची कन्या व माननीय आयेशा (र) यांची सख्खी भगिनी होत्या. मुहम्मद बिन मुनकदिर त्यांच्या बाबतीत म्हणतात -
‘‘त्या स्वभावाने उदार होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)
आपल्या मुलींना व घरातील मंडळींना उपदेश करीत असत की, ‘‘अल्लाहच्या मार्गात खर्च करा आणि दानधर्म करा. असा विचार करीत बसू नका की, स्वखर्चानंतर जे काही उरेल ते पुण्यकार्यात खर्च करू, शिल्लक राहण्याची वाट पाहत राहाल तर कोणतीच वस्तू शिल्लक राहणार नाही आणि खर्च कराल तर काही तुटवडाही पडणार नाही.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)
माननीय उमर (र) यांनी एक हजार दिरहम माननीय अस्मासाठी अनुदान मुकरर केले होते. (तबकाते इब्ने साद - ८ : २५३)
परंतु अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची त्यांची रीत अजब होती. अबुज्जुबैर म्हणतात की, मी माननीय आयेशा (र) आणि माननीय अस्मा (र) पेक्षा अधिक दानशूर कोणालाही पाहिले नाही. परंतु दोघींची पद्धत वेगळी होती. माननीय आयेशा (र) एक-एक वस्तू जमा करीत आणि नंतर जेथे गरज असे तेथे खर्च करीत असत. परंतु माननीय अस्मा (र) उद्यासाठी काहीही शिल्लक ठेवीत नसत. जे काही हाती येत असे ते सर्व खर्च करून टाकीत असत. (अल अदबुल मुफर्रद - १ : ३७७, सियरु आलामिन्नबलाइ - २ : २११)
फातिमा बिन्ते मुंजिर म्हणतात की, जर कधी माननीय अस्मा (र) आजारी होत, तेव्हा त्यांच्यापाशी असलेल्या गुलामांना त्या मुक्त करीत असत. (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)

माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, (एका प्रवासादरम्यान) मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे उंटावर बसलो होतो आणि माझ्या आणि पैगंबरांच्या दरम्यान  ‘क़जावा’ (उंटाच्या पाठीवर घालावयाचा लाकडी हौदा.) चा फक्त मागील भाग होता. पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हे मुआ़ज बिन जबल!’’ मी म्हणालो, ‘‘हुजूर, गुलाम हजर आहे, आदेश  द्यावा.’’ पैगंबर (स.) काही बोललेच नाहीत. मग काही अंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले, ‘‘हे मुआ़ज बिन जबल!’’ मी तेच शब्द पुन्हा उच्चारले जे पहिल्यांदा म्हटले होते. (परंतु पैगंबर  काहीच बोलले नाहीत.) मग काही अंतर पुढे गेल्यानंतर पैगंबर म्हणाले, ‘‘दासांवर अल्लाहचा कोणता अधिकार आहे हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ मी म्हणालो, ‘‘अल्लाह आणि  त्याच्या पैगंबरांनाच खरे काय ते माहीत.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहचा अधिकार दासांवर असा आहे की त्याने (दासाने) त्याचीच उपासना करावी आणि त्याच्या उपासनेत कोणा  दुसऱ्याला अजिबात भागीदार बनवू नये.’’ मग काही अंतर चालल्यानंतर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हे मुआज!’’ मी म्हणालो, ‘‘बोला. हा गुलाम आपले वक्तव्य लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि  प्रामाणिकपणे आपले आज्ञापालन करील.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाला ठाऊक आहे काय की दासांचा अल्लाहवर कोणता अधिकार (हक्क) आहे?’’ मी म्हणालो, ‘‘अल्लाह आणि त्याचे  पैगंबरांनाच उत्तमप्रकारे ठाऊक.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहचे दासत्व करणाऱ्या दासांचा अल्लाहवर असा हक्क आहे की अल्लाहने त्यांची शिक्षा माफ करावी.’’ (हदीस : बुखारी व  मुस्लिम)

स्पष्टीकरण
माननीय मुआज यांच्या कथनाचे स्पष्टीकरण असे आहे की मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अगदी जवळ बसलो होतो, ऐकणे व ऐकवण्यास कसलाही अडथळा नव्हता, पैगंबरांचे वक्तव्य अगदी सहजतेने मी ऐकू शकत होतो परंतु जी गोष्ट पैगंबर (स.) ऐकवू इच्छित होते ती अत्यंत महत्त्वाची होती, म्हणून पैगंबरांनी तीन वेळा हाक दिली आणि ती गोष्ट  सांगितली. असे यासाठी केले जेणेकरून मला या गोष्टीचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळावे आणि मी अगदी लक्ष्यपूर्वक कान देऊन ऐकावे. पैगंबरांच्या वक्तव्याद्वारे ‘एकेश्वरत्वा’चे महत्त्व  स्पष्ट झाले की ते नरकाच्या यातनांपासून वाचविणार आहे. जी गोष्ट अल्लाहच्या क्रोधापासून वाचविणारी असेल आणि स्वर्गाचा (जन्नतचा) हक्कदार बनविणारी असेल, तिच्यापेक्षा  अधिक मौल्यवान गोष्ट दासालाच्या दृष्टीने दुसरी कोणती असू शकते?

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (अब्दुल कैस यांच्या कबिल्याची देखभाल करणाऱ्यांना) विचारले, ‘‘एक अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय?’’ त्यांनी उत्तर दिले,  ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबरच उत्तमप्रकारे जाणतात.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ईमान म्हणजे मानवाने या सत्याची ग्वाही द्यावी की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि  मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत आणि नमाज योग्य पद्धतीने अदा करावी आणि जकात (दानधर्म) द्यावी आणि रमजान महिन्याचे रोजे करावेत.’’ (मिश्कात) माननीय अनस (रजि.)  यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा जेव्हा प्रवचन दिले, की ‘‘ज्याच्यात ठेव नाही त्याच्यात ईमान नाही आणि ज्याच्यात वचनाचे संरक्षण व आदर नाही त्याच्याकडे  दीन (जीवनधर्म) नाही.’’ (मिश्कात)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की जो मनुष्य अल्लाहचे हक्क आणि दासांचे हक्क, ज्यांची पूर्ण यादी अल्लाहच्या ग्रंथात आहे, अदा करीत नाही त्याचा ईमान परिपूर्ण नाही आणि जो मनुष्य एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन देतो, मग ती गोष्ट पूर्ण करीत नाही आणि ते वचन पाळत नाही, तो धर्मपरायणतेच्या ईशदेणगीपासून वंचित राहतो.  ज्याच्या मनात ईमानची मुळे दृढ रुतलेली असतात तो सर्व प्रकारचे हक्क प्रामाणिकपणे अदा करतो. कोणताही हक्क अदा करण्यात कुचराई करीत नाही. अशाप्रकारे ज्या मनुष्यात  धर्मपराणता असेल तो मरेपर्यंत वचनाचे पालन करील. लक्षात असू द्या की सर्वांत मोठा हक्क अल्लाहचा आहे, त्याच्या पैगंबरांचा आहे, त्याने अवतरित केलेल्या ग्रंथाचा आहे आणि  एखाद्या मनुष्याने आपल्या अल्लाहशी आणि त्याने पाठविलेल्या पैगंबराशी आणि पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माशी केलेला करार सर्वांत मोठा करार असतो.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget