Latest Post

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे  आज्ञापालन करावयास हवे).’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ‘‘हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.’’ पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ‘‘आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या  पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.’’ (हदीस : मुस्लिम)
अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा  त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध  घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र  ‘नफ्ल नमाज’ (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ‘‘मी नेहमी ‘नफ्ल रोजे’ (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही’’ आणि तिसरा  म्हणाला, ‘‘मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.’’ (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले,  ‘‘तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!’’ मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ‘‘खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न  करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) ‘नवाफिल’ (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला  पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल,  त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.’’ (हदीस : मुस्लिम)
आयशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अगोदर एक काम करण्यास मनाई केली होती, मग त्यांनी ते काम केले जेणेकरून लोकांना माहीत व्हावे की आता पैगंबर (स.) ते काम करण्याची परवानगी देत आहेत. तरीही काही लोक ते काम करण्यास तयार झाले नाहीत. जेव्हा पैगंबरांना त्यांच्या या धारणेबाबत माहीत झाले तेव्हा त्यांनी भाषण  दिले आणि अल्लाहच्या स्तुती व गुणगान केल्यानंतर म्हणाले, ‘‘मी करीत असलेले काम करण्यापासून काही लोक का धजावत नाहीत. अल्लाह शपथ! मला त्या सर्वांपेक्षा अधिक ज्ञान  आहे आणि त्या सर्वांपेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगतो.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
ज्यूंनी आपला ग्रंथ ‘तौरात’च्या शिकवणींमध्ये फेरफार  केला होता, परंतु त्यामध्ये काही सत्य गोष्टीदेखील होत्या ज्या मुस्लिम लोक ऐकत होते आणि पसंतही करीत होते. जर पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी परवनागी दिली असती तर ‘दीन’ (जीवनधर्म) ला हानी पोहोचली असती. कोणत्या धर्मात काही सत्य व चांगल्या गोष्टी आढळत नाहीत? आदरणीय पैगंबरांनी जे  उत्तर माननीय उमर (रजि.) यांना दिले त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की ज्याच्या घरात स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असेल त्याने खडकाळ जमिनीकडे जाण्याची इच्छा बाळगू नये. 

एकेश्वरत्वाला आणि प्रेषित्वाला मान्यता तोंडी स्वरूपात दिली जाते. ते त्यांच्या शाब्दिक अर्थापेक्षा जास्त काही सूचित करते. ते तोंडी एकेश्वरत्वाचे आणि प्रेषित्वाचे अभिवचन सर्व प्रेषितांना, ईशग्रंथांना, दूतांना तसेच पारलौकिक जीवन आणि नशीब या सर्वांना मान्यता देते. थोडक्यात, हे इस्लामच्या संपूर्ण श्रध्देलाच मान्यता आहे. कारण जो प्रेषित मुहम्मद (स) यांचे प्रेषित्व मान्य करतो त्याच क्षणी तो या सर्व अदृश्य सत्यतेलासुध्दा मान्य करतो की ज्यांना प्रेषितांनी सर्वांपर्यंत पोहचविले आहेत.
एकेश्वरत्वात आणि प्रेषित्वात अंतःकरणपूर्वक श्रध्दा असणे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग त्या श्रध्देला मान्य करणे आणि मानल्यानंतर तोंडी अभिवचन देणे होय, प्रेषितवचनांचा आणि धार्मिक विद्वानांच्या टिकात्मक साहित्याचा अभ्यास केल्यानंतर हे कळून येते की मुस्लिम (श्रध्दावंत) बनण्यासाठी फक्त मनापासून श्रध्दा असणे हे पुरेसे नाही तर त्यासाठी तोंडी अभिवचन अथवा घोषणा करणे हेसुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. तोंडी घोषित केल्याशिवाय श्रध्दा वैध ठरत नाही. तोंडी अभिवचन देणे आणि घोषणा करणे म्हणजे सत्य मान्य करणे की इस्लाम हा धर्म- परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे आणि कुजबुजणारी मुहीम मुळीच नाही. इस्लामच्या कर्तव्यांची पूर्तता एकांतात होऊच शकत नाही. हा तो धर्म आहे जो समस्त मानवतेशी उंच आवाजात संभाषण करीत आहे. (कुजबुज नव्हे) जीवनाच्या प्रचंड अशा गोगांटामध्ये इस्लाम मनुष्याला प्रस्थापित करीत आहे. इस्लाम मनुष्याला चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यानच्या निरंतर चाललेल्या संघर्षात गुंतवून ठेवतो. इस्लाम मुस्लिमाला अविश्वास आणि अनाचाराच्या निरंतर लढाईतील सैनिकांमध्ये सर्वांत पुढे ठेवतो. अशा परिस्थितीत इस्लामचा स्वीकार करण्याची आम घोषणा करणे अत्यावश्यक ठरते. ती त्याच्या श्रध्दाशीलतेने (ईमानने) त्यावर सोपविलेल्या धर्मप्रचारकाची आणि कर्तव्यपूर्तीसाठी लढणारा सैनिकाच्या जबाबदारीची घोषणा आहे. म्हणून इस्लामच्या श्रध्दाशीलतेबद्दल आम घोषणा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मौलिक कार्य आहे.
या मान्यतेचा आणि उद्घोषणेचा आपण जर राजकीय दृष्टिकोणातून विचार केला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. जो कोणी व्यक्ती अल्लाहच्या एकेश्वरत्वाला आणि मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वाला जाहिररित्या मान्य करून विश्वास ठेवतो, त्याला श्रध्दावंत (मुस्लिम) म्हणतात. जरी तो खरोखरच विश्वास श्रध्दा ठेवत नसेल किवा व्यवहारात इस्लामच्या कर्तव्यपूर्तीस अपयशी ठरत असेल. श्रध्दाशीलतेची (ईमानची) जाहिररित्या कबूली देऊन त्या व्यक्तीस इतर मुस्लिमांप्रमाणेच राजकीय आणि सामाजिक फायदे मिळतात. जर दुसरा एखादा व्यक्ती मनापासून इस्लामवर श्रध्दा ठेवून आहे परंतु त्याने त्यास जाहिररित्या कबूली दिली नाही तर त्याला मुस्लिम म्हणून स्वीकारले जाणार नाही. तो तर मुस्लिमेतरच राहील आणि त्याच्याशी तसाच व्यवहार केला जाईल. मनुष्याने जर इस्लामच्या श्रध्देतील अचूकपणा आणि सत्यतेवर निष्ठा ठेवली तर अशी व्यक्ती इस्लामचा मजबूत पाया प्राप्त करून घेते आणि उत्साहाने इस्लामवर श्रध्दा ठेवून जाहिररित्या त्याला मान्य करते. अशा प्रकारे मनुष्य इस्लामच्या प्रथमस्तंभास परिपूर्ण करतो म्हणजेच इस्लामच्या प्रथमस्तंभाची उभारणी करतो.

तथाकथित मुस्लिम। महॉमिडन पर्सनल लॉ मधील कायदे वास्तविक इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे ही हकीकत सिद्ध झाल्यामुळे इतर दूसर्या जमातीच्या व्यक्तिगत कायद्याहून त्याची हकीकत पूर्णपणे भिन्न आहे. इतर जमातीचे व्यक्तिगत कायदे त्यानी स्वतःहून तयार केलेले आहेत. मुस्लिम कायद्याचा उगम मुस्लिमांची बुद्धी, समज, आवडनिवड किवा त्यांचे विचार यातून झालेला नसून त्याचे उगमस्थान पवित्र कुरआन आणि सुन्नत आहे. म्हणून त्याना मुस्लिम किवा महॉमिडन पर्सनल लॉ(मुस्लिम । महॉडिन व्यक्तिगत कायदा) म्हणणे त्या कायद्याच्या मूळ दर्जावर पडदा पाडणे आहे.
वास्तविक या कायद्याला हे नाव ब्रिटिश राजकर्त्याची कुत्सित आणि अशुभ देणगी आहे. ते नेहमी मुस्लिमांची संस्कृती, सभ्यता आणि धर्म याना क्षति पोहोचवून त्यांच्या धारणाना नष्ट करण्याच्या प्रयत्नात असत. इस्लाम धर्माशी शत्रुत्व आणि इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेच्या विचारांच्या परिणतीमुळे या कायद्याला ‘‘कुरानिक लॉ’’ किवा ‘‘इस्लामिक लॉ’’ म्हणण्या ऐवजी ‘महॉमिडन लॉ’ असे नामकरण करण्यात आले. कायद्याच्या पुस्तकातुन आणि न्यायसंस्थेत हेच नांव प्रचल्लित केल्यामुळे खर्या वस्तुस्थितीची शंका सुद्धा येऊ नये अशी मखलाशी करून ठेवली आहे. मुस्लिमांच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असणार्या शरीअतच्या कायद्याला ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ नांव दिले गेले. तथापि ते मुस्लिम कायदे नसून इस्लामिक कायदे होते आणि आजही आहेत.
म्हणून या कायद्याना ‘इस्लामी व्यक्तिगत कायदा । इस्लामिक पर्सनल लॉ’ हे नाव देणे सत्य, वास्तवाला आणि प्रामाणिकपणाला धरून होईल. इस्लाम धर्माच्या अनभिज्ञतेची आज ही परिस्थिती आहे की सुशिक्षित लोकांना सुद्धा ‘इस्लामी’ आणि ‘मुस्लिम’ यातील फरक समजत नाही. अशा परिस्थितीत मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू राहिल्यास त्याचा स्वाभाविक परिणाम असा होईल की, शरीयतच्या आदेशांचे मूळ चित्र सर्वसामान्य लोकांना दिसू शकणार नाहीत. हा तर मुस्लिम पर्सनल लॉ आहे, त्याच्याशी इस्लामचा काही संबंध नाही. असाच लोक विचार करतील. सर्व संबंध केवळ मुस्लिमांशी असून मुस्लिम नावांच्या समाजाचे तसेच सांस्कृतिक कायदे आहेत, जसे जगामध्ये बर्याच अन्य समाजाचे व्यक्तिगत कायदे असून त्यांच्या धर्माशी फारकत घेतलेले आणि केवळ सांस्कृतिक कायदे आहेत. इतका मोठा पायाभूत गैरसमज चालू ठेवणे आणि त्याचीच वृध्दी करत राहणे. प्रामाणिक आणि न्यायसंगत आहे काय?

पवित्र कुरआन व हदीसमध्ये नमाजनंतर सर्वांत अधिक महत्त्व अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास दिलेले आहे. जकात (अडीच टक्केप्रमाणे दान-धर्म) त्याचेच एक कायदेशीर रूप आहे. नमाजद्वारे मनुष्य ही भावना प्रकट करतो की, त्याने हृदय व मेंदू आणि अवयव व त्याचे अंगप्रत्यांग सर्वकाही अल्लाहसमोर नतमस्तक आहेत आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करणे, या गोष्टीचे चिन्ह आहे की, तो संपत्तीला आपली मालमत्ता समजत नाही आणि ती त्या प्रत्येक ठिकाणी खर्च करण्यास तयार आहे, जेथे अल्लाहने खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची मागणी पुरुषाकडेही आहे आणि स्त्रियांकडेदेखील. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे -
‘‘निःसंशय दानधर्म करणारे पुरुष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि ज्यांनी अल्लाहला चांगले ऋृण दिले त्यांना वाढवून दिले जाईल व त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे.’’ (सूरतुल हदीद : १८)
हदीसमध्ये महिलांना विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. यात त्यांच्या स्वभाव, मानसशास्त्र व वातावरणाचेसुद्धा औचित्य पाहिले गेले आहे.
माननीय जाबिर (र) आणि माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (स) कथन करतात की, एका ईदच्या प्रसंगी प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना उद्देशून वेगळे भाषण दिले. त्यात त्यांना दानधर्म पुण्याईचीसुद्धा प्रेरणा दिली. यावर महिलांनी आपले दागिने व अन्य वस्तू सादर केल्या. माननीय बिलाल (र) त्या वस्तू आपल्या चादरीत गोळा करीत होते. (बुखारी (किताबुल ईदैन), मुस्लिम (किताबुल ईदैन)
माननीय अबू बकर (र) यांच्या सुपुत्री माननीय अस्मा (र) यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उपदेश केला.
‘‘खर्च करा. गणना करू नका. (की काय द्यावे आणि काय देऊ नये). नाहीतर अल्लाहसुद्धा मोजूनच देईल. आणि वाचवून सुरक्षित ठेऊ नका. अल्लाहसुद्धा त्याप्रमाणेच देईल.’’ (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात)
माननीय आयेशा (र) म्हणतात की, आम्ही एकदा बकरी कापली (आणि ती वाटून टाकली). प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारणा केली, ‘‘त्यापैकी काही शिल्लक आहे का ?’’ आम्ही सांगितले, ‘‘केवळ फरा उरलेला आहे.’’ ते म्हणाले, ‘‘असे म्हणा फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुज्जकात), तिर्मिजीचे प्रमाण.
अशा प्रकारे प्रेषित मुहम्मद (स) यांनी ही कल्पना समजाऊन दिली की, मनुष्य जे काही दान पुण्य करतो ते वाया जात नाही, तर वाया तर ते जाते तो खाऊन पिऊन समाप्त करतो. दानधर्म, पुण्यच वास्तविकतः शिल्लक उरतात. ते अशासाठी की, त्यांचा मोबदला व पुण्य अल्लाहजवळ सुरक्षित आहे.
काही वेळा मनुष्य अशा स्थितीत नसतो की, एखाद्याला त्याने मोठे सहाय्य करावे आणि थोडीशी मदत करताना संकोच होतो. ही स्थिती विशेषतः स्त्रियांची होते. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना सांगितले, ‘‘दान लहानात लहान वस्तूचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की, गरजूची खरी गरज पुरी होत नसेल. प्रसंगी आधार त्याला मिळू शकतो.’’
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्म्द (स) म्हणाले, ‘‘खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. हा पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे उपयोगी पडतो, त्याचप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’ (मंजुरीच्या कथनानुसार अहमदने ते कथन केले. अत्तर्गीब वत्तरहीब पृष्ठ - १७८.)
उम्मे बुजैद (र) म्हणतात, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाले की, याचक माझ्या दारावर येतो. कधी कधी घरात एखादी वस्तू अशी नसते जी त्याला देता यावी, म्हणून लाज वाटते. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, (याचकाला मोकळ्या हाताने पाठवू नका) ‘‘काही नसेल तर जळलेले खूर का असेना देऊन पाठवा.’’ जळलेले खूर एक निरुपयोगी वस्तू आहे. यात याचकाला मोकळ्या हाताने पाठविण्याची सक्त मनाई आणि त्याला काही न काही देण्याची ताकीद आहे.
स्त्रियांचे संबंध विशेषतः नातेवाईक व शेजाऱ्यांशी असतात. त्यांचा हक्कसुद्धा जास्त असतो. हदीसमध्ये स्त्रियांना हा हक्क देण्याची प्रेरणा दिली गेली आहे.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र) यांच्या पत्नी व एका अन्सारी महिलेने माननीय बिलाल (र) यांच्यामार्फत प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, त्या आपले पति व मुलांवरसुद्धा दानधर्म करू शकतात काय ? प्रेषित म्हणाले, ‘‘होय, त्या त्यांच्यावरसुद्धा दानधर्म करू शकतात.’’
‘‘त्यांना तर दुप्पट मोबदला मिळेल - जवळिकीचा मोबदलासुद्धा व दानधर्माचा मोबदलासुद्धा.’’ (बुखारी (किताबुन्नफकात), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय उम्मे सलमा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘जर मी आपले पति अबू सलमा यांच्या मुलावर खर्च केले, जी माझीच मुले आहेत आणि ज्यांना मी सोडूही शकत नाही, तर महान अल्लाह त्याचे पुण्य देईल का?’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘त्यांच्यावर खर्च करा. तुम्ही जे काही त्यांच्यावर खर्च कराल तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल.’’ (प्रमाण मागीलप्रमाणे)
माननीय मैमूना (र) यांनी एका दासीला मुक्त केले. त्यांनी याचा उल्लेख प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर केला. प्रेषित म्हणाले, ‘‘जर तुम्ही तिला आपल्या मामांना दिले असते तर अधिक पुण्य मिळाले असते.’’ (बहुतेक त्यांना गरज होती.) (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय अबू हुरैरा (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘हे मुस्लिम स्त्रियांनो! तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये. जरी शेळीची खूर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’ (बुखारी (किताबुल हिबा))
याचे दोन अर्थ संभव आहेत. एक असा की, प्रत्येक मुस्लिम स्त्रीने यथाशक्ती आपल्या शेजारणीला नजराणा भेट देत राहिले पाहिजे. जर एखादी मोठी वस्तू देता येणे शक्य नसेल, तर लहानशी वस्तू द्यावी. असा विचार करू नये की, लहानशी वस्तू कशी काय द्यावी. दुसरा अर्थ असा आहे की, ज्याला भेटवस्तू दिली जाईल त्याने हे पाहू नये की कोणती वस्तू दिली आहे आणि त्याची किमत काय आहे. तर त्या भावना, प्रेमाची किमत करावी, जी त्याच्या पाठीमागे आहे आणि लहानात लहान वस्तूसुद्धा रद्द करू नये.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, माझे दोन शेजारी आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या घरी भेटवस्तू पाठवू ? ते म्हणाले, ‘‘ज्याचा दरवाजा तुमच्या जवळ असेल, त्याला पाठवा.’’ (बुखारी (किताबुल हिबा))
यावरून ज्ञात होते की, माननीय आयेशा (र) शेजाऱ्यांचे हक्क जाणत होत्या. तथापि त्या हे समजू इच्छित होत्या की, एकापेक्षा अधिक शेजारी असतील तर कोणाचा अधिकार जास्त आहे ?
या सैध्दांतिक शिक्षणानंतर आता प्रारंभिक काळातील मुस्लिम महिलांच्या अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याच्या प्रवृत्तीचा अल्पसा परिचय दिला जात आहे.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब (र) यांच्यात अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची असीम भावना होती आणि त्या फार दानधर्म व पुण्य करीत असत. इमाम जहबी त्यांच्या वर्णनात म्हणतात -
‘‘धर्म, अल्लाहचे भय, दान-पुण्य व नेकी आणि कल्याणाच्या दृष्टीने त्यांची गणना उत्तम महिलांमध्ये होत असे.’’ (सियरु अअलामिन्नुबलाइ - २ : १४९)
त्यांची स्थिती अशी होती की, परिश्रम करून जे काही कमवीत असत ते गरीब व दीन-दुःखी लोकांना वाटून टाकीत असत.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी आपल्या पत्नींना सांगितले,
‘‘तुमच्यापैकी मला सर्वप्रथम ती भेटेल जिचे हात सर्वांत लांब आहेत.’’
आम्ही आपले हात मापत असू जेणेकरून हे पहावे की, कोणाला मृत्यू प्रथम येईल. माननीय जैनब (र) बुटक्या बांध्याच्या होत्या; परंतु सर्वांत प्रथम त्यांना मृत्यू आला. यावरून आम्हाला कळले की, प्रेषित मुहम्मद (स) यांचा हेतु असा होता की, दानधर्म व पुण्यात जी सर्वांत पुढे आहे, तिला प्रथम मृत्यू येईल. त्या स्वतःच्या हाताने काम करीत असत आणि जे प्राप्त होत असे त्याचे दानधर्म करीत असत. (मुस्लिम (किताबुल फजाइल)
बरजा बिन्ते राफिअ म्हणतात की, माननीय उमर (र) यांनी बारा हजार दिरहम बैतुलमाल (राज्यकोष) मधून माननीय जैनबसाठी पाठवून दिले. जेव्हा ही मोठी रक्कम त्यांच्यापर्यंत पोचली, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी या रकमेचे काय करू ? माझ्या अन्य भगिणी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पवित्र पत्नीं) ही रक्कम गोरगरिबांत वाटण्यास अधिक सक्षम आहेत.’’ त्यांना म्हटले गेले की, ही रक्कम आपल्यासाठीच आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सुबहान अल्लाह ! ही ठेऊन द्या आणि एका कापडाने झाका.’’ मग माननीय जैनब (र) मला म्हणाल्या, ‘‘यात हात घाला आणि एक मूठ अमुकच्या घरी व एक मूठ अमुकच्या घरी पोचवून या.’’ अशा प्रकारे आपल्या नातेवाईकांत व अनाथ लोकांत वाटावयास लावीत राहिल्या. जेव्हा अल्पशी रक्कम उरली, तेव्हा मी म्हणाले, ‘‘यात आमचासुद्धा हक्क आहे ना ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘बरे, आता कापडाखाली जे काही उरले आहे ते तुमचे आहे.’’ हे पस्तीस दिरहम होते. एका कथनात आहे की, जेव्हा ही गोष्ट माननीय उमर (र) यांना कळली की, त्यांनी सर्व रक्कम अशा प्रकारे वाटून टाकली आहे, तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांच्याकडून पुण्याचीच अपेक्षा आहे.’’ मग माननीय उमर (र) स्वतः त्यांच्या घरी आले. दारावर उभे राहून सलाम (अभिवादन) केला. नंतर आणखी एक हजार दिरहम पाठविले आणि विनंती केली की, ही रक्कम स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी खर्च करा. परंतु ती रक्कमसुद्धा त्यांनी वाटून टाकली.
त्या इतक्या स्वाभिमानी होत्या की, राज्यकोषातून मिळालेल्या या अनुदानानंतर आकाशाकडे हात उचलून त्यांनी प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह ! माननीय उमर (र) यांचे अनुदान घेण्यासाठी आता मला जिवंत ठेऊ नकोस.’’ त्यांचे त्याच वर्षी निधन झाले. (तबकाते इब्ने साद - ८ : १०९, ११०.)
त्यांनी आपल्या प्रेतावर पांघरण्यासाठी कापड (कफन) स्वतः तयार करून ठेवले होते. इकडे माननीय उमर (र) यांनीसुद्धा त्यांच्या मृत्यूसमयी राज्यकोषातून पाच कपडे स्वतः निवडून पाठविले. त्याच कपड्यांत त्यांना दफन केले गेले आणि त्यांच्या भगिनी हिमना बिन्ते जहश यांनी ते कापड जे माननीय जैनब यांनी तयार केले होते, दान म्हणून देऊन टाकले. (तबकाते इब्ने साद - ८ : ११०)
माननीय जैनब (र) यांच्या निधनानंतर माननीय आयेशा (र) यांनी उद्गार काढले,
‘‘त्या गेल्या, ज्या प्रशंसनीय, अनुपम, अनाथ व विधवांच्या आश्रयस्थान होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ११०)
उस्मान बिन अब्दुल्लाह जहशी म्हणतात,
‘‘जैनब बिन्ते जहश यांनी एकही दिरहम अथवा दीनार मागे ठेवला नाही. जे काही हाती येई त्याचे दान करीत. त्या गरीब अनाथांचे आश्रयस्थान होत्या.’’
म्हणतात, त्या ज्या घरात राहात होत्या ते घर वलीद बिन अब्दुल मलिक यांनी मस्जिदे नबवीच्या विस्तारासाठी ते पन्नास हजार दिरहममध्ये खरेदी केले होते. (तबकाते इब्ने साद - ८ : ११४)
प्रेषित मुहम्मद (स) माननीय आयेशा (र) यांच्यावर सर्वांत अधिक प्रेम करीत असत. या कारणास्तव माननीय उमर (र) यांनी त्यांचे अनुदानसुद्धा जास्त ठेवले होते. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकी प्रत्येकीला दहा हजार दिरहम व माननीय आयेशा (र) यांना बारा हजार दिरहम नेमुन दिले. (तबकाते इब्ने साद - ८ : ६)
परंतु माननीय आयेशा (र) फार दानी होत्या. जे काही मिळत असे ते दान करण्यात खर्च करीत असत. त्यांच्या दानी वृत्तीचे व अल्लाहच्या खर्च करण्याची कल्पना खालील प्रसंगावरून करता येईल.
उम्मे जराह म्हणतात की, माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर (र) यांनी दोन पिशव्या रक्कम ज्यात एक लक्ष दिरहम असतील, माननीय आयेशा (र) यांच्याकडे पाठविली. त्यांनी थाळी मागितली आणि त्याच्यातूनच रक्कम लोकांत वाटून टाकली. त्या दिवशी त्यांचा रोजा होता. संध्याकाळ झाली तेव्हा मला म्हणाल्या, ‘‘हे मुली ! रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) काही खावयास आण.’’ मी म्हणाले, ‘‘आज आपण एवढी मोठी रक्कम वाटून टाकली. काय हे शक्य नव्हते की इफ्तारसाठी मटण मागविले असते ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘जाऊ दे, बरे-वाईट बोलू नकोस. जर अगोदर तू सांगितले असते, तर मटणसुद्धा मागविले असते. (तबकाते इब्ने साद - ८ : ६७)
अता बिन अबी रिबाह म्हणतात की, एकदा माननीय मुआविया (र) यांनी माननीय आयेशा (र) यांना एक लाख दिरहम पाठवून दिले. त्यांनी ती रक्कम उम्महातुलमोमिनीन (प्रेषितांच्या पवित्र पत्नी) यांच्यामध्ये वाटली. (सियरु आलामिन्नुबलाइ - २ : १४१)
उर्वा बिन जुबैर (र) म्हणतात की, मी पाहिले की, माननीय आयेशा (र) यांनी सत्तर हजार दिरहम दानधर्मामध्ये घातले आणि स्वतः त्यांची स्थिती अशी होती की, त्या आपल्या कपड्यांना ठिगळे लावीत असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ६६)
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते खुजैमा (र) इस्लाम स्वीकारण्यापूर्वीसुद्धा गरीब याचक व दरिद्री लोकांना खूप मदत करीत असत. याच कारणामुळे त्यांना ‘उम्मुलमसाकीन’ (अर्थात-गरीब याचकांची आई) म्हटले जात असे. (तबकाते इब्ने साद - ८ : ११५, अल इस्तीहआब)
उम्मुलमोमिनीन माननीय सौदा बिन्ते जमआ (र) यांना माननीय उमर (र) यांनी दिरहमने भरलेली पिशवी पाठविली. जेव्हा त्यांच्यापर्यंत ही पिशवी पोचली तेव्हा विचारले, ‘‘यात काय आहे ?’’ उत्तर मिळाले, ‘‘दिरहम आहेत’’. त्यांनी विचारले, ‘‘खजुराप्रमाणे दिरहम भरले आहेत काय ?’’ मग एका मुलीला सांगितले, ‘‘एक थाळी घेऊन ये.’’ त्याच थाळीने सर्व रक्कम वाटावयास लावली. (तबकाते इब्ने साद - ८ : ५६)
माननीय अस्मा (र) ह्या माननीय अबू बकर (र) यांची कन्या व माननीय आयेशा (र) यांची सख्खी भगिनी होत्या. मुहम्मद बिन मुनकदिर त्यांच्या बाबतीत म्हणतात -
‘‘त्या स्वभावाने उदार होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)
आपल्या मुलींना व घरातील मंडळींना उपदेश करीत असत की, ‘‘अल्लाहच्या मार्गात खर्च करा आणि दानधर्म करा. असा विचार करीत बसू नका की, स्वखर्चानंतर जे काही उरेल ते पुण्यकार्यात खर्च करू, शिल्लक राहण्याची वाट पाहत राहाल तर कोणतीच वस्तू शिल्लक राहणार नाही आणि खर्च कराल तर काही तुटवडाही पडणार नाही.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)
माननीय उमर (र) यांनी एक हजार दिरहम माननीय अस्मासाठी अनुदान मुकरर केले होते. (तबकाते इब्ने साद - ८ : २५३)
परंतु अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची त्यांची रीत अजब होती. अबुज्जुबैर म्हणतात की, मी माननीय आयेशा (र) आणि माननीय अस्मा (र) पेक्षा अधिक दानशूर कोणालाही पाहिले नाही. परंतु दोघींची पद्धत वेगळी होती. माननीय आयेशा (र) एक-एक वस्तू जमा करीत आणि नंतर जेथे गरज असे तेथे खर्च करीत असत. परंतु माननीय अस्मा (र) उद्यासाठी काहीही शिल्लक ठेवीत नसत. जे काही हाती येत असे ते सर्व खर्च करून टाकीत असत. (अल अदबुल मुफर्रद - १ : ३७७, सियरु आलामिन्नबलाइ - २ : २११)
फातिमा बिन्ते मुंजिर म्हणतात की, जर कधी माननीय अस्मा (र) आजारी होत, तेव्हा त्यांच्यापाशी असलेल्या गुलामांना त्या मुक्त करीत असत. (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)

माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, (एका प्रवासादरम्यान) मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे उंटावर बसलो होतो आणि माझ्या आणि पैगंबरांच्या दरम्यान  ‘क़जावा’ (उंटाच्या पाठीवर घालावयाचा लाकडी हौदा.) चा फक्त मागील भाग होता. पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हे मुआ़ज बिन जबल!’’ मी म्हणालो, ‘‘हुजूर, गुलाम हजर आहे, आदेश  द्यावा.’’ पैगंबर (स.) काही बोललेच नाहीत. मग काही अंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले, ‘‘हे मुआ़ज बिन जबल!’’ मी तेच शब्द पुन्हा उच्चारले जे पहिल्यांदा म्हटले होते. (परंतु पैगंबर  काहीच बोलले नाहीत.) मग काही अंतर पुढे गेल्यानंतर पैगंबर म्हणाले, ‘‘दासांवर अल्लाहचा कोणता अधिकार आहे हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ मी म्हणालो, ‘‘अल्लाह आणि  त्याच्या पैगंबरांनाच खरे काय ते माहीत.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहचा अधिकार दासांवर असा आहे की त्याने (दासाने) त्याचीच उपासना करावी आणि त्याच्या उपासनेत कोणा  दुसऱ्याला अजिबात भागीदार बनवू नये.’’ मग काही अंतर चालल्यानंतर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हे मुआज!’’ मी म्हणालो, ‘‘बोला. हा गुलाम आपले वक्तव्य लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि  प्रामाणिकपणे आपले आज्ञापालन करील.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाला ठाऊक आहे काय की दासांचा अल्लाहवर कोणता अधिकार (हक्क) आहे?’’ मी म्हणालो, ‘‘अल्लाह आणि त्याचे  पैगंबरांनाच उत्तमप्रकारे ठाऊक.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहचे दासत्व करणाऱ्या दासांचा अल्लाहवर असा हक्क आहे की अल्लाहने त्यांची शिक्षा माफ करावी.’’ (हदीस : बुखारी व  मुस्लिम)

स्पष्टीकरण
माननीय मुआज यांच्या कथनाचे स्पष्टीकरण असे आहे की मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अगदी जवळ बसलो होतो, ऐकणे व ऐकवण्यास कसलाही अडथळा नव्हता, पैगंबरांचे वक्तव्य अगदी सहजतेने मी ऐकू शकत होतो परंतु जी गोष्ट पैगंबर (स.) ऐकवू इच्छित होते ती अत्यंत महत्त्वाची होती, म्हणून पैगंबरांनी तीन वेळा हाक दिली आणि ती गोष्ट  सांगितली. असे यासाठी केले जेणेकरून मला या गोष्टीचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळावे आणि मी अगदी लक्ष्यपूर्वक कान देऊन ऐकावे. पैगंबरांच्या वक्तव्याद्वारे ‘एकेश्वरत्वा’चे महत्त्व  स्पष्ट झाले की ते नरकाच्या यातनांपासून वाचविणार आहे. जी गोष्ट अल्लाहच्या क्रोधापासून वाचविणारी असेल आणि स्वर्गाचा (जन्नतचा) हक्कदार बनविणारी असेल, तिच्यापेक्षा  अधिक मौल्यवान गोष्ट दासालाच्या दृष्टीने दुसरी कोणती असू शकते?

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (अब्दुल कैस यांच्या कबिल्याची देखभाल करणाऱ्यांना) विचारले, ‘‘एक अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय?’’ त्यांनी उत्तर दिले,  ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबरच उत्तमप्रकारे जाणतात.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ईमान म्हणजे मानवाने या सत्याची ग्वाही द्यावी की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि  मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत आणि नमाज योग्य पद्धतीने अदा करावी आणि जकात (दानधर्म) द्यावी आणि रमजान महिन्याचे रोजे करावेत.’’ (मिश्कात) माननीय अनस (रजि.)  यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा जेव्हा प्रवचन दिले, की ‘‘ज्याच्यात ठेव नाही त्याच्यात ईमान नाही आणि ज्याच्यात वचनाचे संरक्षण व आदर नाही त्याच्याकडे  दीन (जीवनधर्म) नाही.’’ (मिश्कात)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की जो मनुष्य अल्लाहचे हक्क आणि दासांचे हक्क, ज्यांची पूर्ण यादी अल्लाहच्या ग्रंथात आहे, अदा करीत नाही त्याचा ईमान परिपूर्ण नाही आणि जो मनुष्य एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन देतो, मग ती गोष्ट पूर्ण करीत नाही आणि ते वचन पाळत नाही, तो धर्मपरायणतेच्या ईशदेणगीपासून वंचित राहतो.  ज्याच्या मनात ईमानची मुळे दृढ रुतलेली असतात तो सर्व प्रकारचे हक्क प्रामाणिकपणे अदा करतो. कोणताही हक्क अदा करण्यात कुचराई करीत नाही. अशाप्रकारे ज्या मनुष्यात  धर्मपराणता असेल तो मरेपर्यंत वचनाचे पालन करील. लक्षात असू द्या की सर्वांत मोठा हक्क अल्लाहचा आहे, त्याच्या पैगंबरांचा आहे, त्याने अवतरित केलेल्या ग्रंथाचा आहे आणि  एखाद्या मनुष्याने आपल्या अल्लाहशी आणि त्याने पाठविलेल्या पैगंबराशी आणि पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माशी केलेला करार सर्वांत मोठा करार असतो.

नमाज कर्तव्यपूर्तीतील पहिली महत्त्वाची पायरी आहे. दुसरे कोणतेही कर्तव्य याबरोबरीचे नाही. श्रध्दावंताचे (मुस्लिम) प्रत्येक कृत्य आज्ञाधारकता आहे. परंतु प्रार्थनेचे (नमाज) कृत्य सर्व कृत्यांपेक्षा श्रेष्ठतम आहे. नमाज प्रार्थना म्हणजे अल्लाहशी दृश्य स्वरुपात आणि परिणामस्वरूपात शरणागती आहे. नमाजकडे एक दृष्टीक्षेप या सत्यतेला स्पष्ट करते. नम्रता, लीनता, स्तुती आणि स्तुतीगान हे सिध्द करते की दास्यतेचे आणि विनम्रतेचे दुसरे एखादे असे नमाजच्या स्वरूपातील उदाहरण मिळणे अशक्य आहे. नमाजमध्ये झुकून दोन्ही हाथ बांधून उभे राहणे, कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होणे, नम्रतेने नतमस्तक (सजदा) होणे आणि सातत्याने स्तुतीगान आणि प्रेमपूर्वक अल्लाहची भीती बाळगून असणे ही सर्व नमाजची अंगभूत लक्षणे आहेत. दिव्य कुरआन आणि प्रेषितकथन (हदीस) हे नमाजच्या सद्गुणांनी आणि सर्वोत्कृष्ठतेने भरलेले आहेत. त्यातील काही स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहेत.
नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण आहे. नमाज प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या परंपरेनुसारच अदा करतात. श्रध्दाशीलता धारण केल्यानंतर सर्वप्रथम श्रध्दावंत नमाज अदा करतो. नमाज त्या सत्यतेचे द्योतक आहे की व्यक्ती श्रध्दाशील आहे, अल्लाहवरच त्याची निष्ठा आहे. अल्लाह एकमेव स्वामीश्रेष्ठ आहे आणि मी त्याचा नम्र दास आहे. हा विश्वास त्याच्या नमाजच्या कर्तव्यपूर्तीतून दिसून येतो. नमाजबद्दल अनेक हदीसींचा उल्लेख आलेला आहे.
याचप्रमाणे दिव्य कुरआनमध्ये अनेक ठिकाणी श्रध्दाशीलतेच्या उल्लेखानंतर त्वरित नमाजचा उल्लेख आलेला आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक श्रध्दा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.’’ (कुरआन २: २७७)
तसेच दुसऱ्या ठिकाणी कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक ग्रंथाचे पालन करतात व ज्यांनी नमाज कायम केली आहे, निश्चितच अशा सदाचारी लोकांचा मोबदला आम्ही वाया जाऊ देणार नाही.’’ (कुरआन ७: १७०)
‘‘परंतु त्याने ना खरे मानले आहे आणि ना नमाज अदा केली’’ (कुरआन ७५: ३१)
हे त्या सत्यतेला स्पष्ट करीत आहे जर मनुष्याच्या हृदयात श्रध्देचे बीजारोपण झाले तर त्यातून पहिले अंकूर फुटेल ते नमाज असेल. नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण फक्त नाही तर ते तर्कशुध्द परिणाम आहे. ज्याचे हृदय श्रध्देने काठोकाठ तुडुंब भरलेले असेल त्याचे मस्तक आज्ञाधारकतेत नमाजमध्ये नतमस्तक होणारच आहे. हे खरोखर तर ती आंतरिक स्थिती आहे ज्याचे प्रकटीकरण नमाजच्या रूपात होत असते. जसे प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून आहे तसेच श्रध्देतून नमाज आहे आणि नमाज श्रध्देसाठी आहे. म्हणून नमाज श्रध्देची अत्यावश्यक बाब आहे हे काही फक्त अनुमान नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अतिस्पष्ट कथन आहे, ‘‘जो कोणी फर्ज नमाज (अनिवार्य प्रार्थना) साठी हलगर्जीपणा करतो, अशा व्यक्तीशी अल्लाहला काही देणेघेणे नाही.’’ (अहमद)
‘‘खरोखरच! नमाज मनुष्याला श्रध्दाहीनतेपासून आणि द्रोहापासून वेगळे करते.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी नमूद करून ठेवले आहे की ज्या वस्तीतून आजान ऐकू येत असे त्या वस्तीवर जिहाद (पवित्र युध्द) केला जात नसे. जेथून अजानचा स्वर ऐकू येत नसे त्या वस्तीवर चढाई केली जात असे. कारण ती वस्ती श्रध्दाहीन लोकांची आहे हे समजून येत असे. म्हणून नमाज श्रध्दाशीलतेचे प्रतीक आहे. श्रध्दावंत व्यक्ती या प्रतीकाशी नमाजशी निगडीत असते.
कुरआनोक्ती आहे की कयामतच्या दिवशी दूत नरकवासींना विचारतील,
‘‘ते (दूत) गुन्हेगारांना विचारतील,‘‘तुम्हाला कोणत्या गोष्टीने नरकात नेले?’’ ते म्हणतील, ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो आणि गरिबांना जेऊ घालत नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४२ - ४३)
नरकवासी लोक उत्तर देतील,
‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४३)
याचाच अर्थ स्पष्ट होतो की जो कोणी नमाज अदा करतो तो श्रध्दावंत असतो आणि त्याची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर निष्ठा असते. हे अगदी स्पष्ट आहे की व्यक्तीची जन्नत (स्वर्ग) अथवा जहन्नम (नरक) साठीची लायकी आणि पात्रता श्रध्दाशीलता आणि श्रध्दाहीनतेवर अवलंबून आहे. जेव्हा मनुष्यांना जहन्नममध्ये (नरकात) डांबले जाईल तेव्हा ते सर्व गुपितांना जाणून घेतील जे अदृश्य सत्य होते. ते मान्य करतील की ही यातना परिणाम आहे त्यांच्या नमाज अदा करण्याच्या हलगर्जीपणाचा! ईमान (श्रध्दा) आणि नमाज कयामतच्या दिवशी एक दुसऱ्यास पूरक आणि वैशिष्ट्यपूर्ण असे असतील. ‘‘जहन्नमी (नरकवासी) त्या वेळी असे म्हणण्याऐवजी की ‘‘आम्ही त्यांच्यापैकी नव्हतो ज्यांनी श्रध्दा ठेवली.’’ (‘‘आम्ही श्रध्दावंतांपैकी नव्हतो.’’) असा पश्चात्ताप करून करून म्हणतील की ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यापैकी नव्हतो.’’
या संकेतवचनांच्या आधारे काही धार्मिक विद्वानांचे मत आहे की जो कोणी हेतुपुरस्सर नमाजची हेळसांड करेल आणि नियमित हे कृत्य करीत राहील तर तो शिरच्छेद करण्याच्या लायक बनतो. ही शिक्षा धर्मद्रोही (विद्रोही) ला दिलेल्या शिक्षेसारखीच आहे.
आणखी एक अतिमहत्वाचे नमाजचे वैशिष्ट्य कुरआन स्पष्ट करीत आहे त्याची पुष्टी हदीसीमध्ये (प्रेषितकथन) सुध्दा आहे, ती म्हणजे नमाजला धार्मिक कृती म्हणून संबोधले गेले आहे. नमाज श्रध्दाशीलतेची (ईमान) रक्षक आहे. नमाज जर कायम केली गेली तर इतर ईश आदेशांचे पालन आपोआप होऊ लागते. याविरुध्द नमाजची हेळसांड झाली तर इतर ईश आदेशांचे उल्लंघन होणे साहजिक आहे. हृदयाचे महत्त्व शरीरात जसे आहे त्यासारखेच नमाजचे महत्त्व श्रध्दाशीलतेसाठी आहे. हृदय जर तंदुरूस्त असेल तर रक्त शरीराच्या सर्व भागांत पसरते आणि पूर्ण शरीर हे कार्यक्षम व तंदुरूस्त बनते. जर हृदयाची स्पदने बंद झाली आणि हृदयक्रिया बंद पडली तर पूर्ण शरीर निर्जीव बनते, अकार्यक्षम बनते. अशा प्रकारची अनेक उदाहरणे कुरआन आणि हदीसीमध्ये स्पष्ट केली गेली आहेत. हदीसीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे इस्लामचा पाया हा पाच स्तंभांवर आधारित आहे आणि तसेच ईमानचा (श्रध्देचा) स्तंभ नमाज आहे, प्रार्थना आहे.
‘‘श्रध्देचे मूळ हे एकेश्वरत्व आणि प्रेषित मुहम्मद (स) यांना मान्य करण्यात आहे आणि श्रध्देचे मूळ (स्तंभ) इस्लाम आहे.’’ (तिरमीजी)
हा एक सज्जड पुरावा आहे या वास्तवतेचा की जकात, हज, रोजे हे श्रध्दाशीलतेचे (ईमानचे) स्तंभ आहेत आणि श्रध्देची इमारत त्यांच्याशिवाय उभीच राहू शकत नसली तरी नमाजचे महत्त्व वेगळेच आहे. नमाजच्या गुणांमुळे नमाज श्रध्देचा सर्वगुणसंपन्न स्तंभ आहे, म्हणूनच नमाजला पूर्ण श्रध्देचे वैशिष्ट्य गणले जाते. जर नमाजला सोडून दिले तर श्रध्दा आपले अस्तित्व गमावून बसते.
आदरणीय खलीफा उमर (र) आपल्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘‘माझ्यासाठी तुमची सर्वात मोठी समस्या नमाज ही आहे. जो कोणी नमाज कायम करील आणि तिला पूर्ण न्याय देईल तर तो पूर्ण श्रध्देचे रक्षण करतो. आणि जो कोणी नमाजला सोडून देतो तर ती व्यक्ती फार काही गमावून बसते.’’ (मालिक)
नमाजच्या वैशिष्ट्यांची कारणे: दिव्य कुरआन आणि हदीसीच्या पुराव्यानुसार नमाजचे महत्त्व लक्षात येते. स्वाभाविकपणे एखादी व्यक्ती विचारू शकते की हे असे कसे की पाच स्तंभांपैकी नमाज एक स्तंभ आहे तर मग नमाज एकटी पूर्ण श्रध्देसारखी कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर हे आणखी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. नमाज काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे? दिव्य कुरआन स्पष्ट करीत आहे की नमाज अल्लाहचे स्मरण आहे.
‘‘मीच अल्लाह आहे माझ्या शिवाय कोणीच ईश्वर नाही. म्हणून तू माझीच भक्ती कर आणि माझ्या स्मरणाकरिता नमाज कायम कर.’’ (कुरआन २०: १२-१४)
नमाज ईशदासाला ईश्वराच्या सान्निध्यात नेते.
‘‘आणि नतमस्तक व्हा (नमाज अदा करा) व आपल्या पालनकर्त्याशी जवळीक साधा.’’ (कुरआन ९६: १९)
मनुष्य अल्लाहच्या अगदी जवळ असतो जेव्हा तो नतमस्तक होतो. (सजदा करतो) म्हणून मनुष्य नमाज अदा करीत असेल तर तो त्या वेळी अल्लाहशी संभाषण साधून असतो. नमाज अदा करताना मनुष्य सर्व गोष्टींपासून अलिप्त होऊन स्वतःला अल्लाहच्या सान्निध्यात आणि अल्लाहसमोर उभा आहे असे समजून अल्लाहशी वार्तालाप करतो.
अल्लाहचे स्मरण करणे, अल्लाहशी जवळीक साधणे आणि अल्लाहशी संभाषण करणे म्हणजेच नमाज अदा करणे होय. याव्यतिरिक्त दुसरे आणखी काय माध्यम असू शकते अल्लाहची शरणागती आणि पूर्ण श्रध्देला प्राप्त करण्यासाठी? नाही! निश्चित नाही!! अल्लाहची भक्ती करण्यासाठीचे प्रत्येक कृत्य श्रध्देचेच फळ आहे. अल्लाहच्या स्मरणाने (नमाज) श्रध्देचे मूळ सशक्त बनते त्यास जोपासले जाते. श्रध्दावंतांना उपदेश केला जातो की त्यांनी खालील महावाक्य सतत उच्चारून श्रध्देला सशक्त बनावे.
‘‘ला ईलाह ईल्ललाह’’
दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह!
अल्लाहशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही.
‘‘लोकहो, तुमची श्रध्दा बळकट करा’’ दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह’’ हे महावाक्य पुन्हापुन्हा उच्चारून!’’ (बुखारी)
जर झाडाच्या मुळांनी त्यांची जीवनशक्ती आणि अन्नपाणी घेण्याचे बंद केले तर झाडाची वाढ खुंटेल आणि झाड वाळून जाईल. तसेच मनुष्याचे हृदय हे जर अल्लाहच्या स्मरणाने खाली असेल तर श्रध्दा जीवंत ठेवणे त्याच्यासाठी अशक्य आहे. ज्या मनुष्याची श्रध्दा डळमळीत आहे, त्याचे प्रत्येक कृत्य हे सत्यतेविरुध्द आणि अल्लाहच्या भयाने रिक्त असे असेल. धर्मनिष्ठ कृत्य (सत्कार्य) त्याच व्यक्तीच्या हाताने पार पडेल ज्याचे हृदय श्रध्देने आणि सामर्थ्याने पुरेपूर भरलेले असेल, ज्यांचा उगम अल्लाहच्या स्मरणात आहे. नमाज अल्लाहचे फक्त स्मरण नाही तर नमाज खरोखरच अल्लाहच्या स्मरणाचे अत्युत्तम, परिपूर्ण आणि कार्यक्षम असे बेजोड माध्यम आहे. म्हणून धर्मनिष्ठा आणि अल्लाहची भक्ती नमाज अदा करण्यात आहे. हे सत्य आपण एक उदाहरण घेऊन स्पष्ट करू या, एखादा भाट (खुशामत्या) जो आपल्या राजासमोर येत नाही आणि त्याच्याविषयी आदर सन्मानसुध्दा दाखवत नाही तर त्याला विश्वासु आणि आज्ञाधारक समजले जात नाही. विश्वासु आणि आज्ञाधारकता त्याच व्यक्तीपासून अपेक्षित आहे जो राजदरबारात राजासमोर हजेरी लावण्यात हलगर्जीपणा करत नाही आणि राजाला आदर सन्मान दाखविण्यात कसूर करत नाही. हे स्वाभाविक आहे की जी व्यक्ती तुमच्याजवळ येत नाही ती तुमच्या इच्छेला आणि प्रसन्नतेला जाणून घेण्यास तयार होऊ शकतच नाही. तुमच्यासाठी अशी व्यक्ती काहीएक त्याग करू शकणार नाही. नमाज हे अल्लाहच्या दरबारात हजेरी लावणे आहे. आणि अल्लाहच्या प्रति निष्ठेचे आणि आदराचे प्रकटीकरण आहे. कोणी अंतकरणाने ही हजेरी देण्यास आणि निष्ठा दाखविण्यास तयार नसेल तर अशी व्यक्ती अल्लाहचे आदेश जीवनव्यवहाराच्या या विस्तृत क्षेत्रात पाळू शकणारच नाही हे अगदी स्पष्ट आहे.
नमाजची पूरक वैशिष्ट्ये: नमाजचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये आपण पाहिलीत, परंतु नमाजचे आणखी काही उपजत अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु ही सर्व पूरक अशी वैशिष्ट्ये आहेत तरी ती अत्यंत महत्त्वाची आणि मौलिक आहेत. त्यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे कारण त्यावरून इस्लामचे दर्शन आणि जीवनप्रणाली कळून येते. हे पूरक आकर्षक गुण आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
१) इस्लाम आपल्या अनुयायींना त्यांचे जीवनकार्य त्यांच्या मनावर बिबवतो. यासाठी ते स्वाभाविकपणे एक शिस्तबध्द सामुदायिक जीवनाचे नेतृत्व करतात. त्यांचा एक नेता असतो जो अल्लाहच्या आदेशांनुसार स्वतः जीवन कंठत असतो आणि समाजापुढे आदर्श ठेवतो. तो ईशआदेशांना प्रस्थापित करतो. त्याच्या नेतृत्वाखाली लोक एक शिस्तबध्द आणि प्रशिक्षित लष्करासारखे वागतात. तो जेव्हा त्यांना हालचाल करण्याची मुभा देतो तेव्हा ते हालचाल करू शकतात आणि जेव्हा तो त्यांना थांबवतो तेव्हा ते थांबतात. अशी ही उच्च प्रतीची शिस्त नमाजमध्ये अंतर्भूत आहे आणि नमाज इस्लामच्या अनुयायींच्या मनावर शिस्तबध्दता ठसवत असते. जेव्हा त्यांना नमाजसाठी बोलविले जाते तेव्हा ते आपले घरदार, कारखानदारी, दुकानदारी सोडून मशिदीची वाट चालू लागतात. मशिदीत ते सरळ रेषेत व रांगेत उभे राहतात आणि नमाजचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे (इमाम) आदेश पूर्णतः पाळतात. एखादा व्यक्ती या सामुदायिक प्रार्थनेत आपल्या नेत्याविरूध्द शारीरिक आणि मानसिक दुर्लक्ष करूच शकत नाही. हे सर्व काही दैवी आदेशांच्या आज्ञाधारकतेनुसार धार्मिक आज्ञा आणि परलोकाची जाण ठेवून पार पाडले जाते. नमाजव्यतिरिक्त या जगात दुसरी कोणती प्रार्थना आहे जी मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण शिस्तबध्दतेने देत आहे?
२) इस्लामला आपल्या अनुयायींमध्ये प्रेमाचे आणि बंधुत्वाचे अतूट नाते स्थापित करणे अपेक्षित आहे. इस्लाम त्याच मुस्लिम व्यक्तीला खरा मुस्लिम सिध्द करतो जो आपल्या भावासाठी तेच पसंद करतो जे स्वतःला पसंद आहे. नमाज माणसामध्ये प्रेम आणि बंधुत्व निर्माण करते. जेव्हा वस्तीतील लोक प्रार्थनेसाठी अल्लाहसमोर एकत्र येतात तेव्हा ते शारीरिक आणि अध्यात्मिक बंधुभाव प्रस्थापित करतात. त्यांचे एकमेकाचे खांदे आणि अंगठे फक्त एकमेकांना भिडलेले असत नाहीत तर त्यांची मनेसुध्दा एकीने बांधली जातात. ते फक्त आपल्या स्वतःसाठीच प्रार्थना करीत नाहीत तर सर्वांसाठी मार्गदर्शन मदतीची आणि क्षमेची याचना करतात. काय यापेक्षा चांगले दुसरे एखादे मार्ग मानवतेवर प्रेम करण्याचे याव्यतिरिक्त आहे? मनुष्य आपल्या बांधवांचा प्रार्थनेत आणि नमाजमध्ये कधीच विसर पडू देत नाही. तो अल्लाहसमोर सातत्याने याचना करतो की,
‘‘आम्हा सर्वांना सरळ मार्ग दाखव.’’ (कुरआन १: ५)
‘‘अल्लाहच्या सर्व सदाचरणी दासांवर शांतीचा वर्षाव सतत होवो.’’
‘‘हे आमच्या पालनकर्त्या ! आम्हाला इहलोकीही चांगले फळ दे आणि परलोका मध्येही चांगले फळ दे आणि नरकाग्नीच्या यातनांपासून आम्हा सर्वांना वाचव.’’ (कुरआन २: २०१)
अति उच्च समजली जाणारी विश्वबंधुत्वाची कल्पना इस्लामच्या या विश्वबंधुत्वाच्या कल्पनेपुढे फिकी आहे. जो दर्जा इस्लामने आपल्या अनुयायींसाठी निश्चित केला आहे तो बेजोड आहे.
३) इस्लाम समस्त मानवांना एक स्वामीचे दास समजतो. इस्लाम समस्त मानवजातीला एका आईवडीलाची लेकरे मानतो. मानव सर्व एकमेकांचे भाऊ भाऊ आहेत.
‘‘हे अल्लाहच्या दासानों तुम्ही सर्व बंधु व्हा.’’ (कुरवादी)
इस्लाम आज्ञा देतो की कोणीही दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखू नये. कुणीही रंगाने, वंशाने, कुळाने, श्रीमंतीने अथवा राष्ट्राने एकमेकात उचनीच नाहीत. ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे,
‘‘मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायणता या सदगुणांवर अवलंबून आहेत.’’
नमाज समाजातील, माणसामाणसातील भेदाभेद दूर करून एकसंघ समाजनिर्मितीचा पाया घालते. राजा आणि रक एकसाथ उभे राहून एकसाथ आपल्या स्वामीपुढे नतमस्तक होतात. हे नमाजच्या प्रक्रियेतील एकतेचे प्रकटीकरण आहे. आध्यत्मिक स्तरावरसुध्दा नमाज सर्वांना एकसमान बनविते. अल्लाहचे महात्म्य आणि मनुष्यांचे पूर्ण नम्रता धारण करणे हे सर्व मनुष्यांच्या मनांमध्ये एकीची भावना जागृत करते. प्रत्येकजण जाणून घेतो की अल्लाह आणि फक्त अल्लाह प्रभुत्वशाली आहे. सर्व माणसे त्याची निर्मिती व दास आहेत. नमाजमुळे प्रत्येकाला त्याच्या तुच्छतेची जाणीव सतत होत राहते. म्हणून असा मनुष्य रंगभेद, जातीभेद, वंशभेद, राष्ट्रभेद, उच्चनीचता या कुकर्मांना कधीच थारा देत नाही. स्वतःलासुध्दा इतरांपेक्षा काही वेगळा अथवा श्रेष्ठ समजत नाही. अशा प्रकारे नमाज या सत्यवचनाला सिध्द करून दाखविते की ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायण या सद्गुणांवर अवलंबून आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget