Latest Post

- मु. यूसुफ इस्लाही

    या ग्रंथात नीतीमूल्यांचा संग्रह प्रत्येक वर्ग व वयोगटाच्या वाचकांसाठी लाभकारक आहे. इस्लामशी प्रेम राखणारे बंधु भगिनी या अमूल्य संस्कार व शिष्टाचारांना आणि मांगल्यपूर्ण प्रार्थनांना आचरणात आणून आपले जीवन सुशोभित करतील. किशोर वयातील मुलांना भली माणसं बनविण्याचा प्रयत्न करतील.
    या ग्रंथात इस्लामी संस्कृतीच्या नियम व शिष्टाचारांना सुयोग्य क्रमासह सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कुरआन, प्रेषिताचरण आणि सदाचारी लोकांच्या स्मृतिंच्या प्रकाशात योग्य जीवनशैली शिकविणारा हा ग्रंथ आहे ज्यामुळे सुसंस्कारितांना या जगात आणि परलोकात सुद्धा सफलता प्राप्त होईल.

आयएमपीटी अ.क्र. 142     -पृष्ठे - 320    मूल्य - 160  आवृत्ती - 2 (2014)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ge8jj6q26tcr71peqj08a516u11eyvp5

माननीय अब्दुल्लाह यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि त्याने पैगंबरांना म्हटले, ‘‘मी तुम्हांवर प्रेम करतो.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘जे तुम्ही   म्हणत आहात त्यावर दृढ विचार करा.’’ त्याने तीन वेळा म्हटले, ‘‘अल्लाह शपथ! मी तुम्हांवर प्रेम करतो.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जर तुम्ही आपल्या वक्तव्यावर खरे असाल तर गरिबी  आणि उपासमारीचा सामना करण्यासाठी शस्त्रांची जुळवाजुळव करा. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे गरिबी आणि उपासमार महापुरापेक्षा तीव्र गतीने येतात.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
कोणावर प्रेम करणे आणि त्याला प्रिय बनविण्याचा काय अर्थ होतो? हाच की त्याच्या पसंतीला आपली पसंत आणि त्याच्या नापसंतीला आपली नापसंती बनविणे, प्रिय व्यक्ती ज्या मार्गाने जात आहे त्याच मार्गाला आपल्या जीवनाचा मार्ग बनविला जावा, तिचा निकटवर्ती बनणे, तिची संगती आणि तिच्या खुशीकरिता प्रत्येक वस्तूचे बलिदान द्यावे आणि बलिदान  देण्यासाठी तत्पर असावे. पैगंबर मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ असा होतो की त्यांच्या प्रत्येक पावलांवर पाऊल टाकणे आणि मार्गातील प्रत्येक निशाणी माहीत करून घेणे   आणि त्यानुसार अनुकरण करणे. पैगंबरांनी ज्या मार्गावर संकटांचा सामना केला आहे त्या मार्गावर संकटे सहन करण्याची शक्ती निर्माण केली जावी. ‘हिरा’ नामक गुहादेखील पैगंबरांचा   मार्ग आहे आणि बद्र आणि हुनैनदेखील पैगंबरांचा मार्ग आहे. ‘दीन’ (जीवनधर्मा) च्या मार्गाचा अवलंब करण्याच्या परिणामस्वरूप गरिबी आणि उपासमारीचे संकट निर्माण होते आणि  उपजीविकेचे संकट सर्वांत मोठे संकट आहे. त्याचा सामना फक्त विश्वास आणि अल्लाहवरील प्रेमाच्या शस्त्रानेच केला जाऊ शकतो. ‘मोमिन’ (ईमानधारक) अशा स्थिती विचार करतो   की अल्लाह माझा वकील आहे, मी निराश्रित आहे आणि मी गुलाम आहे, गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची इच्छा पूर्ण करणे असते आणि मी ज्याचे काम करीत आहे तो   कृपावंत आणि न्याय करणारा आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही. त्याचे अशाप्रकारे विचार करणे प्रत्येक संकटावर मात करू शकते, शैतानाचे प्रत्येक शस्त्र निरुपयोगी करू  शकते.

कर्माचे फळ नियतीवर
प्रेषित सुलैमान (अ.) यांना पशु-पक्ष्यांची भाषा अवगत होती. एकदा एका मादी-पक्ष्याने त्यांच्याजवळ तक्रार दाखल केली. एका संत भासणाऱ्या व्यक्तीने, त्याच्या नर-पक्ष्याची धोका   देऊन शिकार केली.
प्रेषित सुलैमान (अ.) यांनी सांगितले, ‘‘पक्षी हे माणसासाठी खाद्य आहेत. शिकार केली त्यात काय चुकले?’’ त्या मादी-पक्ष्याने सांगितले, ‘‘एका पर्वतावर तो माणूस हातामध्ये जपमाळ  घेऊन, ईश्वराचे चिंतन करीत होता. माझा नरपक्षी त्याचे सोज्ज्वळ रूप पाहून बिनधास्तपणे त्याच्या खांद्यावर खेळू लागला. त्या वेळी त्या महात्म्याने माझ्या नराची शिकार केली. ती  व्यक्ती शिकारीच्या उद्देशाने बसली असती तर आम्ही आमचा बचाव केला असता. पण त्या व्यक्तीने ईशचिंतनात मग्न अवस्थेत शिकार केली. ही धोकाधडी आहे.’’
यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की माणसाने रूप पालटून कोणाचीही धोकाधडी करू नये. समाजसेवेच्या नावाने राजकीय नेते, प्रशासनिक अधिकारी अडाणी असलेल्या सर्वसामान्य   जनतेला धोका देतात. सर्वांत चिंतनीय बाब म्हणजे धार्मिक रूप धारण करून क्षुल्लक स्वार्थासाठी विश्वासघात करताना मानवता, नीतिमत्ता पार रसातळाला जाते.
इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, ‘‘माणसाच्या प्रत्येक कर्माचे फलीत त्याच्या नियतीवर अवलंबून असते.’’ (हदीस : बुखारी)
आपण सर्वांनीच अशा धोकाधडीपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

‘‘फोटो काढून आमचं पुण्य कशाला वाया घालवताय?’’ म्हणणाऱ्या जावेद शेखनी प्रत्येकाच्या मनात घर केले. त्यांचा लांबलेला हात खूप दूरवर पोचला. भिडला! पण हे एकमेव नव्हते.  मला माहितीये की हे ‘त्ययांच्यापैकी’ कोणी लिहीणार नाही. पण ज्या दिवशी सांगलीत पाऊल टाकले त्याच दिवशी ठरवले की आपण हे मांडायचे.
इतिहासाची पुस्तके एवढी वाचलीत की टोपी दिसताच औरंगजेब आठवायचा. बिनामिशीचा दाढीवाला दिसला की चंगेजखानापासून (मुस्लिम नसतानाही) ओवेसीपर्यंतचा ‘अंध’ प्रवास  डोळ्यासमोर यायचा. बाबरीपासून कबरीपर्यंत. मन हेलकावत राहायचं. आपली सुटलेली पोटं पाहून ‘‘पंधरा मिनीट के लिये *** की फौज निकालो’’ वाक्य आठवून भिती वाटियची’’ भावा  जावेद सारं विसरायला भाग पाडलंस!
सात दिवस फक्त तीन-तीन तास झोप घेऊन साडेतीनशे तरूणांना पूरग्रस्तांसाठी कामाला लावणारे मुस्तफा सर असो की, पाण्यात राहून पायाला जखम झालेले पोलिस इक्बाल शेख  असो. ‘‘सर तुम्ही आमच्यासाठी इथे आलात, पैसे नकोत.’’ म्हणणारा ऑटोवाला असो, कर्नाटकातील अख्ख्या चिकोडी तालुक्याला रसद पुरवणारा मुस्लिम समाज असो, की शिरोळीतील  मदरशात अन्न पुरवणारा मुस्लिम असो... कितीतरी ज्ञात अज्ञात उदाहरणे. एक गोष्ट मात्र खरी की आपण आधीपासूनच एक होतो, या महापूरने एक असल्याची जाणीव करून दिली.  महापूरही बघा कसा योगायोग घेऊन आला. एकीकडे ३७० कलम, एकीकडे तीन तलाक, एकीकडे मॉब लिंचींग, निवडणुका तोंडावर. पण कृष्णेच्या या पुरात माणूसकीच्या महापुराने मात्र  आपल्या सीमा ओलांडल्या. क्वचित महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं ज्यामध्ये मुस्लिम युवकांचा एवढा सहभाग असेल.
ऐन बकरी ईद रोजी आमचा कॅम्प (सांगली मिरज) कुपवाड येथील एका मशिदीत होता. शंभर एक पुरग्रस्त गैरमुस्लिम आश्रयाला होते आणि त्यांच्यासाठी जेवण बनवण्यात मुस्लिम  बांधव व्यस्त होते. पाठीमागे झोमॅटोवाल्यासोबत झालेला प्रसंग आठवला. कट्टरवाद्यांना दोन्ही बाजूंनी दिलेली ती एक सनसनीत कानाखाली होती. जिथे त्यांना क्षणोक्षणी आपलं देशप्रेम  सिद्ध करावं लागतं तिथे त्यांनीच सिद्ध करून दाखवलं की, अल्लाहचा इस्लाम वेगळा आहे आणि मुल्लाहचा इस्लाम वेगळा आहे. ना इथे कोणी कोणाचे नाव पाहिले ना गाव, ना धर्म ना  वय, ना कोणता फतवा. इथे फक्त माणसासाठी माणूस उभा होता. कोणीतरी आपला नेता हातात डब्बा घेऊन भिक्षा मागत येईल आणि मग आपण मदत करू असा विचार त्यांनी केला  नाही. मिळेल त्या प्रत्येक मार्गाने प्रत्येकाने नि:स्वार्थ प्रयत्न केले. करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
मुस्लिम मित्रांनो तुमचं पुण्य बिलकुल कमी होणार नाही, काळजी नसावी. धन्यवाद तर म्हणणारच नाही. जावेदभाईला कळलं तर आणखी चिडायचे. (टीप : आयुष्यातील पहिली २० वर्षे  कट्टर अशा मराठवाड्यात गेली आणि नंतरची १० वर्षे नागपूरात. इथे मुस्लिमांच्या तोंडून मराठी खूप कमी वेळा ऐकली पण ‘‘आरं खुळ्या उचल की त्यो बॉक्स’’ हे जेंव्हा एका  टोपीधारीच्या तोंडून ऐकलं तेंव्हा उमगलं की मराठीला मरण नाही)

(लेखकाच्या वॉलवरून)

– डॉ. प्रकाश कोयाडे


सर्वात पहिली वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिमांचे कौंटुबिक जीवन आणि दुसर्या व्यक्तिगत बाबीसंबंधी पवित्र कुरआन व हदीस मध्ये उपदेश, मार्गदर्शन आणि आदेश अस्तित्वात आहेत, इतकेच नव्हे तर ते परिपूर्ण व्याख्यानिशी उपलब्ध आहेत म्हणून पवित्र कुरआन आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत आणि या उपदेश, मार्गदर्शन आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करित जावे. निकाह(विवाह)महर(नवर्या मुलाकडून नवरी मुलीला दिली जाणारी रक्कम किवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक(पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ(पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत(घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत(वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा इत्यादि समस्यांपैकी एकही समस्या अशी नाही ज्यासंबंधी चर्चा केली नाही, आदेश दिले नाहीत, मूल्ये आणि कायदा निश्चित केला नाही. ह्या इतक्या उघड वास्तव बाबी आहेत की यासंबंधी पवित्र कुरआनातील संबंधित आयतींचा आणि हदीसांचा हवाला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. इच्छुक व्यक्ति पवित्र कुरआनच्या कोणत्याही अनुवादावर नजर फिरवून त्यांची सत्यता पडताळू शकतो.
व्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये निश्चित व्याख्येसह आहे. जीवनाच्या कोणत्याही पैलू विषयी केलेल्या वर्णनापेक्षा अधिक विस्ताराने या कायद्यांचे वर्णन पवित्र कुरआन व हदीस मध्ये करण्यात आले आहे. नमाज, जकात, रोजा आणि हज यासारख्या मौलिक धार्मिक कार्याविषयी सुद्धा अशा व्याख्या केलेल्या नाहीत. कोणत्याही हिता शिवाय आणि आवश्यकते शिवाय असे होऊ शकत नाही. हित आणि आवश्यकतेच्या निश्चितीकरणात मतभिन्नता होऊ शकते. तथापि व्यक्तिगत कायद्यांच्या विवरणामध्ये वैशिष्टपूर्ण व्याख्या देण्यात आल्यामुळे पवित्र कुरआनच्या दृष्टीत त्याना खास महत्व असल्याच्या पुराव्याबाबत दुमत होऊ शकत नाही.
अल्लाहचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण
कोणत्याही आदेशांचा उल्लेख पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये असल्यास ते आदेश पाळणे मुस्लिमांना बंधनकारक असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्यासंबंधी वादविवाद केला जात आहे, तो व्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीसमध्ये अस्तित्वात असल्यामुळे त्या कायद्याचे मुस्लिमांना अनुसरण करणे अनिर्वाय आहे. या सैद्धान्तिक वास्तवतेवर विसंबवून पवित्र कुरआन या कायद्यांचे केवळ विवेचन करून थांबत नाही तर प्रत्येक स्तरावर त्याचे पालन करणे कसे बंधन कारक आणि आवश्यक आहे तेही सांगितले आहे. उदाहरणार्थ लग्नविधी(निकाह) संबंधी काही आदेश दिल्यानंतर एके ठिकाणी ताकिद केली आहे की,
‘‘अल्लाहने तुमच्यावर ह्याला(या कायद्याला) बंधनकारक ठरविले आहे’’(सुरत निसा आयत २४)
आणखी एका ठिकाणी आदेश दिला आहे की,
‘‘हा अल्लाहचा आदेश, तो तुमच्या बाबतीत निर्णय घेतो’’(सूरत मुम्मतहिना आयत १०)
या प्रमाणे तलाक आणि खुलअ यासंबंधी काही आदेशांचे विवेचन करून सावधान केले जाते की,
‘‘या मर्यादा अल्लाहने ठरविल्या असून त्यांचे उल्लंघन करू नका’’(सूरत बकर आयत २२९)
इद्दत विषयी काही सूचना देऊन आठवण करून दिली जाते की,
‘‘हे अल्लाहचे आदेश, त्याने तुमच्या पर्यंत पोहोचविले आहेत.’’(सूरत तलाक आयत ५)
आणखी एके ठिकाणी तलाक आणि इद्दत या विषयी काही आदेश देऊन त्याना ‘‘हुद्दुल्लाह’’(अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा) असे म्हणून त्यांची ओळख करून देण्यात आली आहे.
वारसा हक्काच्या कायद्या संबंधी तर व्याख्या अगदी स्पष्ट करून त्याचे विवेचन करताना सर्वात प्रथम त्यातच निःसंद्विग्ध हुकूम दिला आहे की,
‘‘माता पित्यानी किवा जवळच्या नातेवाईकांनी सोडून गेलेल्या वारशाच्या संपत्तित पुरूषाचा सुद्धा हिस्सा आहे आणि स्त्रियांचा सुद्धा त्या संपत्तित हिस्सा आहे. संपत्ति कमी असो की ज्यादा, हा हिस्सा निर्धारित केलेला आहे’’(सूरत निसा: आयत ७)
नंतर या कायद्याच्या विवेचनाची सुरवात खालील शब्दानी होते.
‘‘तुमच्या मुलाबाळांच्या वारशासंबंधी अल्लाह तुम्हाला या गोष्टींचा वारसा पत्र करतो की, ’’(सूरत निसा: आयत ११)(म्हणजे वारसदारासाठी अल्लाहनेच वारसा पत्र केले आहे, कुणा व्यक्तिने ते करून ठेवण्याची आवश्यकता नाही)
यानंतर याच कायद्याच्या एका विभागाचे विवेचन पूर्ण होण्यापूर्वी मध्येच थांबून आठवण करून दिली जाते की,
‘‘हे(वारसांचे हिस्से) अल्लाहकडून निर्धारित केले आहेत. अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि सर्वज्ञ आहे.’’(सूरत निसा: आयत ११)
आणि पुन्हा या विवेचनाची समाप्ती खालील शब्दांनी होते.
‘‘हे अल्लाहकडून केलेले वारसा पत्र(अर्थात सक्त आज्ञा आणि हुकूम) आहे आणि अल्लाह सर्व जाणणारा आणि समझदार आहे. या मर्यादा अल्लाहने निर्धारित केल्या आहेत.’’(सूरत निसा: आयत १२-१३)
या प्रमाणे या वारसा हक्का बाबत, शब्द आणि शैली बदलून केवळ एक दोन वेळाच नव्हे तर पाच वेळा खंबीरपणे हे वास्तव सांगून मनावर ठसविले आहे की हे कायदे अल्लाहने निश्चित केलेले असून यांचे पालन करणे अनिवार्य ठरविले आहे.
पवित्र कुरआन मध्ये असलेल्या या निःसंदिग्ध आदेशामुळे, हे कायदे कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक होऊ शकतील हा विचार कोणत्याही अनुचित युक्तिवादाने सुद्धा योग्य ठरवू शकत नाही आणि या कायद्याना आपण बनविलेल्या कायद्याच्या पातळीवर आणता येत नाही.
इस्लामी मूल्यांचे निर्देशक
हे कायदे इस्लामच्या मूळ मूल्यांचे आणि उद्देशांचे पोषक आणि संरक्षक असून त्यात धर्माचा पाया असलेल्या मूल्यांचा आत्मा अस्तित्वात आहे. म्हणून हे कायदे मुस्लिमांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांना व्यवस्थित सोडविण्याचे साधन आहेत. या शिवाय श्रद्धेची आणि इस्लामी मूल्यांची जपणूक करणार्या आवश्यक बाबी एकत्रित ठेवण्याची साधने ही त्या कायद्यात आहेत. उदाहरणार्थ अनेकेश्वरवाद्याशी विवाह करता येत नाही असा एक पायाभूत इस्लामी कायदा आहे. कारण हा कायदा मोडणार्या व्यक्तिस श्रद्धा(ईमान), इस्लामी संस्कार आणि मरणोत्तर जीवनातील सफलता याना ती व्यक्ति पारखी होण्याची सबब बनू शकते असे पवित्र कुरआनांत सांगितले आहे.(सुरत बकरा)
अढळ श्रद्धेची संपत्ति ही मुस्लिमाकरिता सर्वाधिक मूल्यवान बाब असते आणि मरणोत्तर जीवनाची सफलता हा तिचा वास्तविक उद्देश्य असतो. आणि त्या बाबीचे संरक्षण करण्यासाठी अनेकेश्वरवाद्याशी विवाहास प्रतिबंध करणे हा इस्लामचा असलेला मौलिक सिद्धान्त योग्य आणि आवश्यक ठरतो.
त्याच प्रमाणे सर्व पत्नीशी न्यायाने वागण्याच्या अटीसह एकापेक्षा अधिक विवाहास अनुमती दिलेली आहे. त्यास बंदी घातलेली नाही. ही अनुमती अनेक सामाजिक आणि नैतिक कल्याणासाठी दिलेली आहे. आणि त्यात सर्वात महत्वाचा आणि मुख्य उद्देश्य अनाथांच्या संरक्षणाचा आहे.(सूरत निसा)
घटस्फोटाचे आणखी एक उदाहरण घ्या. इस्लामने वैवाहिक नात्याला अतिमहत्वाचे आणि आदरणीय ठरविले असले तरी तलाक आणि खुलअ यांचीही मुभा ठेवली आहे. अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करण्यापासून वाचविणे हा त्यामागे उद्देश्य आहे.(सूरत बकरा: आयत २२९)
आपापसातील घृणा, तिरस्कार आणि उदासीनतेमुळे दांपत्य जीवनातील उद्देशच जर दोघांच्या नजरेतून अदृष्य झाला असेल आणि समेटाची अजिबात आशा उरलेली नसेल तर असे नाते टिकवून ठेवणे म्हणजे आपल्या चारित्र्यावर कलंक लावणे आणि अल्लाहने दाम्पत्यातील प्रत्येकाला दिलेली कर्तव्ये आणि अधिकार यांना हरताळ फासत राहणे म्हणजे उघड उघड सामाजिक वितंडवाद असेल. तथापि इस्लाम हा जीवनाच्या कोणत्याही स्तरावर वितंडवाद, तंटेबखेडे अजिबात पसंद करीत नाही असे वितंडवाद आणि तंटेबखेडे थांबविण्यासाठी पती-पत्नीला वेगळे होण्याशिवाय कोणतीही शक्यता उरत नाही. म्हणून तलाक आणि खुलअची परवानगी देणे आवश्यक समजले गेले आहे.
इस्लामचे व्यक्तिगत कायदे हे केवळ कायदेच नसून त्यांच्या सहाय्याने अपेक्षित मानवी मूल्ये स्थापित करण्यात यावीत असा उद्देश्य या कायद्यात आहे. हे वरील उदाहरणावरून सहज लक्षात येईल.
धर्मावरील दृढ श्रद्धेकरिता आणि मोक्षाकरिता अटी
उपरोल्लेखित कायदे अमलात आणणे इस्लाम धर्मावरील दृढ श्रद्धेसाठी आणि मोक्षासाठी अनिवार्य अटी आहेत हे पवित्र कुरआनच्या शिकवणीने स्पष्ट होते. या वास्तवाला प्रत्यक्ष स्पष्टीकरणाची गरज नाही. कारण अल्लाहचा ग्रंथ आणि प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या हदीस मध्ये या कायद्याचे अस्तित्व असणे म्हणजे ते प्रत्येक मुस्लिमाने अमलात आणणे अढळ श्रद्धा आणि इस्लामसाठी आवश्यक आणि पुरेसे आहे.
याबाबतीत पवित्र कुरआनची शिकवण पहाणे योग्य ठरेल. हे आदेश दृढ श्रद्धेच्या वचनबद्धतेसाठी आवश्यक असून धर्मनिष्ठेचा अविभाज्य अंग आहे. त्यांचे उल्लंघन करणे जुलूम, पापपरायणता, नास्तिकता असून ईश्वरी शिक्षेस कारणीभूत आहे. म्हणून वारसा हक्कासंबंदीच्या कायद्याचे वर्णन केल्यानंतर खालील आज्ञा होते.
‘‘हे(कायदे) अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा आहेत, जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांचे आज्ञापालन करील त्याला अल्लाह अशा बागांमध्ये प्रवेश देईल ज्यांच्या खालून कालवे वहात असतील. ह्या बागांत तो कायम राहील आणि हेच मोठे यश असेल आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांची अवज्ञा करील त्याला तो नरकाच्या आगीत टाकील, त्यात तो कायम राहील आणि त्याच्यासाठी खूप वेदनादायक शिक्षा असेल.’’(सूरत निसा : आयत १३-१४)
वारसा हक्कासंबंधी पवित्र कुरआनने दिलेल्या आज्ञांच्या पालनाचे फळ मृत्यूनंतरच्या निरंतर जीवनाचे साफल्य आणि आज्ञांच्या उल्लंघनाचा परिणाम मृत्यूनंतरच्या कायमच्या जीवनात अपयश पदरी पडेल अशी आज्ञा या गोष्टींची स्पष्ट घोषणा अल्लाह करीत आहे.
त्याच प्रमाणे घटस्फोटाचे काही आदेश दिल्यानंतर अशी आज्ञा केली जाते.
‘‘हा आदेश(अल्लाहच्या हुकूमांचे पालन करण्याचा) तुमच्यापैकी त्या लोकांना केला जात आहे, जे अल्लाह आणि मृत्यूनंतरच्या जीवनाच्या दिवसावर श्रद्धा ठेवतात.’’(सूरत बकराह : आयत २३२)
हे आदेश अमलात आणणे आणि मुस्लिम असणे या दोन्ही गोष्टी पवित्र कुरआनच्या दृष्टीकोनातून परस्पराना पूरक आहेत असा याचा अर्थ होतो.
सूरत मुजादला मध्ये ‘जहार’(पत्नीला माता मानणे) संबंधीच्या आदेशांचे विवेचन केल्यानंतर त्यांचे महत्व खालील शब्दात वर्णन करण्यात आले आहे.
‘‘हे आदेश(अशासाठी दिले आहेत) की तुम्ही अल्लाहवर आणि त्यांच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवणारे बनावेत आणि अल्लाहने निर्धारित केलेल्या या मर्यादा आहेत आणि त्यांचा इन्कार करणार्यासाठी यातनादायक शिक्षा आहेत.’’(सूरत मुजादला: आयत ४)
‘‘व लिल काफिरीन अजाबुन अलीम’’ हे शब्द येथे आले असल्यामुळे पवित्र कुरआनचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की वर विवेचन केलेल्या ‘जहार’ चे आदेश धुडकावून लावणारी व्यक्ति श्रद्धेच्या कक्षेत शिल्लक राहू शकत नाही.
‘‘धर्म श्रद्धेचा अविभाज्य अंग असण्याचा स्पष्ट पुरावा’’
विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा इत्यादि बाबी संबंधी पवित्र कुरआनात जे आदेश दिलेले आहेत त्यांचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद(स.) यानी केलेले आहे. या स्पष्टीकरणास ‘सुन्नत’ असे म्हणतात. पवित्र कुरआन आणि सुन्नतचे आदेश जे व्यक्तिच्या आणि समाजाच्या जीवनाशी संबंधित आहेत, ते आदेश इस्लाम धर्मशास्त्राचे(शरीअतचे) अत्यंत महत्वाचे, अविभक्त आणि अविभाज्य असे अंग आहेत. विवाह घटस्फोट, पोटगी, वारसा इ. बाबतीत पवित्र कुरआनने जे आदेश दिले आहेत त्या सर्वांना एकत्रितपणे शरीअत म्हणतात आणि शरीअतचे संपूर्णपणे पालन करण्याची आज्ञा पवित्र कुरआनने दिली आहे. या शरीअतलाच ‘मुस्लिम पर्सनल लॉ(मुस्लिम व्यक्तिगत कायदा)’ असे सध्या संबोधण्यात येते.

मुस्लिम व्यक्तिगत कायदे मुस्लिमांच्या सामुदायिक व्यक्तिमत्वासाठी तितकेच आवश्यक आहेत, जितके एखाद्या जीवंत शरीरासाठी त्याच्या सर्व अवयवाची आवश्यकता असते. याचे कारण किवा त्याच्या घटकांची सत्यता आकलन करून घेण्यासाठी एखाद्या सामुदायिक आणि सांस्कृतिक गटाच्या रचनेची बारकाईने निरिक्षण करा आणि पहा तो कसा बनला आहे? ती कोणती विशेष तत्वे असतात ज्या योगे एक जनसमूह, दूसर्या जनसमूह आणि गटाहून वेगळे व्यक्तिमत्व राखणारा आणि चिरस्थायी समुदायाची योग्यता दाखवितो.
असा विचार केल्यानंतर लक्षात येते की या प्रकरणात प्रथम महत्व पायाभूत श्रद्धा आणि धारणांना आहे. आणि तेच या समुदायाच्या वैशिष्टयांचे वास्तविक उगमस्थान आहे. परंतु त्याबरोबरच ते आदेश आणि कायदे अमलात आणण्यालाही कमी महत्व असत नाही. या कायद्याच्या अमलाखाली समुदायाच्या व्यक्तिची संपूर्ण आयुष्ये व्यतीत होत असतात. श्रद्धा आणि विचार डोळ्यांना दिसणार्या बाबी नसल्यामुळे ते कोणत्याही समुदायाच्या व्यक्तित्वाचे सूचक किवा चिन्हे बनू शकत नाही. व्यावहारिक दृष्टीने समुदायाची ओळख त्याच्या वैशिष्टयाची दर्शक चिन्हे त्यांच्या वागण्याच्या दृश्य पद्धति आणि ते कायदे व सिद्धान्त असतात. ते पायाभूत श्रद्धेनी आणि धारणानी स्वीकारलेली असतात आणि त्यावर हुकूम त्यांच्या आयुष्याचे व्यवहार होत असतात. समाजाने अमलात आणण्याच्या दृष्टीने आणि सर्वसाधारण आयुष्याच्या व्यावहारिक संपर्काच्या दृष्टीने हे कायदे आणि सिद्धांत समान असत नाहीत म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या रचनेत सुद्धा त्यांची अमलबजावणी दखल घेण्यायोग्य असू शकत नाही.
ज्या कायद्याचा संफ समाजातील लोकांच्या जीवनाशी अधिक असेल त्या समाजाच्या रचनेत त्या कायद्याच्या अंमलबजावणीची दखल तेवढी अधिक असेल. या दृष्टीने व्यक्तिगत कायद्याला विशेष स्थान आहे. विवाह विधी(निकाह), पत्नी व मुलांच्या अन्न वस्त्राची व्यवस्था(नफका), नवर्या मुलाने वधूस भेटी दाखल द्यावयाची रक्कम(महर), पतीकडून घटस्फोट(तलाक), पत्नीकडून घटस्फोट(खुलअ), विवाह विच्छेदन(फस्ख निकाह), दामपत्य अधिकार आणि कर्तव्य, वारसाहक्क, मृत्यूपत्र, रजाअत, हजानत, किफालत इत्यादि बाबींचा आणि प्रकरणांचा व्यावहारिक संबंध समाजातील सर्व लोकांशी असतो आणि याबाबतच्या समस्यांनी समाजातील जवळजवळ सर्व व्यक्ति ग्रासलेल्या असतात. आयुष्यातील याशिवाय दुसर्या समस्या तुलनात्मक दृष्टया कमी किवा मर्यादित प्रमाणात असतात म्हणून आयुष्यातील व्यवहार व्यवस्थित पार पाडण्यासाठी असलेल्या कायद्याचे सामुदायिक महत्व खूप जास्त आणि अधिक नैसर्गिक असते आणि समुदायाच्या वैशिष्टयाचे आणि मुख्य व्यक्तिमत्वाचा आधार या कायद्यावर जितका असतो तितका दुसर्या कायद्यावर कधीही नसतो.
सर्वसाधारण परिस्थितीत हेच कायदे समाजाच्या वैशिष्टयाचा आणि खास व्यक्तित्वाचा आरसा असतो, असे म्हणणे वावगे होणार नाही. याच कायद्यांच्या रचनेमध्ये व्यक्तित्वाचे दर्शन घडणे शक्य आहे.

उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला नियंत्रित केले नाही, तर हा संबंध तुटूही शकतो. प्रारंभिक काळातील पुरुषांप्रमाणे महिलावर्गातसुद्धा उपासनेची फार आवड होती. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सर्व पत्नीं या बाबतीत विशेष उल्लेखनीय होत.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश यांच्या बाबतीत माननीय उम्मे सलमा (र) म्हणतात -
‘‘त्या एक पुण्यशील, फार अधिक उपवास करणाऱ्या आणि रात्री खूप उपासना करणाऱ्या महिला होत्या.’’ (तब्काते इब्ने साद - ८ : १०८)
माननीय आयेशा (र) म्हणतात -
‘‘मी धर्माच्या बाबतीत ईशभीरूतेत, खरेपणा, सुसंबंधात आणि दान-धर्मात त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कोणतीही स्त्री पाहिली नाही.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१६)
एका प्रसंगी खुद्द प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुद्धा त्यांच्या पुण्यशीलता व ईशभीरूतेची साक्ष दिली आहे. जसे त्यांनी माननीय उमर (र) यांना सांगितले -
‘‘जैनब बिन्ते जहश एक चित्त, एकाग्र व अल्लाहचे भय बाळगणाऱ्या आहेत.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१७)
नमाजचा इतमाम
उपासना प्रकारात नमाजचे फार महत्त्व आहे. त्याच्या काही अटी व शिष्टाचार आहेत. त्याकडे लक्ष दिल्याशिवाय नमाजचा हक्कही अदा होऊ शकत नाही आणि त्याचा पूर्ण लाभही घेणे शक्य नाही. या अटीपैकी एक अट अशी आहे की नमाज योग्य वेळेतच अदा केली जावी.
माननीय अनस (र) यांच्या आईने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, रात्री इशाच्या नमाजपूर्वीच मला झोप येऊ लागते. (त्यामुळे नमाज जाण्याचे भय राहते.) प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘अनसच्या आई ! नमाज लवकर अदा करीत जा. जेव्हा रात्रीचा अंधार सर्वत्र पसरतो तेव्हा इशाची वेळ होते. त्यावेळी तुम्ही अदा करीत जा. तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही.’’ (असदुलगाबा - ५ : ४६६)
यावरून कल्पना येते की, त्या नमाजचा किती इतमाम करीत असत. त्यांना याची चिता होती की, एखादेवेळी त्यांची नमाज अवेळी होता कामा नये.
मैमून बिन मेहरान म्हणतात की, ‘‘नमाजच्या वेळी जेव्हा जेव्हा मी माननीय उम्मे दर्दा (र) यांना भेटण्यास गेलो, तेव्हा त्यांना नमाजच्याच स्थितीत पाहिले.’’ (तहजीबुल असमा वल्लुगात - २ : ३६१)
जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये सम्मिलित होणे
स्त्रियांनी मस्जिदमध्ये जमाअतसह नमाजमध्ये सामील होणे आवश्यक नाही. त्यांच्यासाठी अधिक श्रेयस्कर हेच आहे की, त्यांनी घरीच नमाज अदा करावी. परंतु जमाअतसह नमाज अदा करण्याचे फार मोठे लाभ आहेत. जर परिस्थिती अनुकूल असेल आणि कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल, तर त्या मस्जिदमध्ये जाऊ शकतात. याच कारणास्तव शरीअत (इस्लामी धर्म-कायदा) ने एकीकडे त्यांना घरीच नमाज अदा करण्याची प्रेरणा दिली, तर दुसरीकडे परुषांना सांगितले की, ‘‘त्यांनी इच्छिले तर मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका.’’ माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
‘‘तुमच्यापैकी कोणालाही त्याच्या पत्नीने मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागितली तर तिला मनाई करू नये.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन या शब्दांतदेखील आलेले आहे -
‘‘मस्जिदमध्ये महिलांचा जो भाग आहे त्यापासून त्यांना रोखू नका.’’ (मुस्लिम - किताबुस्सलात)
आणखी एका कथनाचे शब्द असे आहेत,
‘‘आपल्या स्त्रियांना मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका; परंतु त्यांची घरेच त्यांच्यासाठी अधिक चांगली आहेत.’’ (अबू दाऊद, किताबुस्सलात)
ही परवानगी जास्त करून रात्रीच्या (इशा) व पहाटेच्या फजरच्या नमाजसंबंधी आहे. कारण असे की, हे कथन खालील शब्दांसमवेत उद्धृत केले गेले आहे.
‘‘जेव्ह तुमच्या स्त्रिया रात्री मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागतील तेव्हा त्यांना परवानगी द्या.’’ (बुखारी, किताबुलअजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
यावरून हे लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात विशेषतः इशा आणि फजरच्या नमाजमध्ये स्त्रियांना सामील होण्याची परवानगी होती. कथनावरून हे देखील कळते की, वास्तविकतः त्या या नमाजमध्ये सामील होत असत. खाली काही कथन उद्धृत केले जात आहेत -
  1. माननीय आयेशा (र) म्हणतात -
    ‘‘प्रेषित मुहम्मद (स) हे फजरची नमाज इतक्या अंधारात अदा करीत असत की, स्त्रिया चादरी गुंडाळून आपल्या घरी परत येत असत आणि अंधारामुळे ओळखल्या जात नसत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम किताबुल मसाजिद)
  2. माननीय उम्मे सलाम (र) म्हणतात -
    ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात स्त्रिया फर्ज नमाजचा सलाम फेरताच उभ्या राहत असत आणि प्रेषित मुहम्मद (स) व त्यांच्या समवेत जे पुरुष नमाज अदा करीत, ते आपल्या जागी जोपर्यंत अल्लाह इच्छील तोपर्यंत बसून राहत (जेणेकरून स्त्रियांनी मस्जिदमधून प्रथम निघून जावे) आणि जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) उठत, तेव्हा ते सुद्धा उठत असत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुल मसाजिद)
  3. माननीय अबू कतादा अन्सारी (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
    ‘‘मी नमाजसाठी उभा राहतो आणि इच्छितो की, त्यात कुरआनचे दीर्घ पठन करावे. इतक्यात एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकतो, तेव्हा नमाज संक्षिप्त करतो. ही गोष्ट चांगली वाटत नाही की, मी त्याच्या आईला त्रासात घालावे.’’ (पूर्वीचे प्रमाण)
  4. एकदा इशाच्या नमाजमध्ये असाधारण विलंब झाला. प्रेषित मुहम्मद (स) नमाज पढविण्यासाठी खोलीतून बाहेर आले नाहीत. माननीय उमर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना सूचना मिळावी म्हणून मोठ्या आवाजात सांगितले की, स्त्रिया व मुले झोपी गेली. हे ऐकून प्रेषित मुहम्मद (स) नमाजसाठी आले. (प्रमाण मागील)
    जैनबुस्सकफया कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
    ‘‘जेव्हा तुमच्यपैकी एखादी स्त्री इशाच्या नमाजमध्ये सामील होईल, तर तिने त्या रात्री सुगंधाचा वापर करू नये.’’ (मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन माननीय अबू हुरैरा (र) द्वारेदेखील झालेले आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या स्त्रीने सुगंधाचा उपयोग केला असेल तिने आमच्या समवेत इशाच्या नमाजमध्ये सामील होऊ नये.’’ (प्रमाण मागील)
या कथनावरून असे कळते की, स्त्रिया इशा आणि फजरच्या नमाजसाठी मस्जिदमध्ये सुद्धा जात असत, जेणेकरून त्यांना जमाअतसमवेत नमाज अदा करता यावी. असे शक्य आहे की, या नमाजमध्ये तरुण व वयस्कर हर प्रकारच्या स्त्रिया सामील होत असाव्यात. अन्य नमाजमध्ये विशेषकरून वयस्क स्त्रिया सामील होत असाव्यात. माननीय उम्मे सलमा बिन्ते अबू हकीम म्हणतात की,
‘‘मी पाहिले की म्हाताऱ्या स्त्रिया प्रेषित मुहम्मद (स) समवेत फर्ज नमाज अदा करीत असत.’’ (अलइस्तीआब - ४ : ३१७

- मौ. अबुल आला मौदूदी (रह.)
   
    या पुस्तिकेत सांगितले गेले की मुस्लिम समाजाचे अस्तित्व कल्याण व उपकाराचे मूर्तीमंत उदाहरण आहे. हा समुह सदाचाराचा विस्तार व दुराचाराचा बिमोड करण्यासाठी आहे.
    आवश्यकता आहे की आम्ही मुस्लिमेतरांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून घ्यावी ज्यामुळे असा कोणताही प्रकार घडता कामा नये की ज्यामुळे इस्लामबद्दल चुकीची धारणा निर्माण होईल. या पुस्तिकेत या संदर्भातच चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 141     -पृष्ठे - 16    मूल्य - 10               आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/gbkblnolpmd3o3dhxyflrzl8uxrni3bj

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget