Latest Post

मानवतेच्या विकासामध्ये अडसर बनणाऱ्या व त्याला सन्मार्गांपासून रोखणाऱ्या, हरप्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करुन स्वातंत्र्य देण्याचे नाव इस्लाम आहे, असे एका वाक्यात आम्ही म्हणून शकतो. माणसांचे प्राण, संपत्ती, अब्रू, स्वाभिमान तसेच आत्मविश्वास या सर्वांची लूट करणाऱ्या हुकूमशहापासून तसेच अन्याय व अत्याचार करणाऱ्यापासून मुक्तीचा हा संदेश आहे. इस्लाम मानवाला शिकवितो की सत्तेचा खराखुरा स्वामी अल्लाह आणि अल्लाहच आहे. तोच मानवाचा खराखुरा शासक आहे, सारी प्रजा त्यानेच निर्माण केलेली आहे. तोच माणसाच्या दैवाचा धनी आहे, त्याच्या मर्जीशिवाय कोणीही कोणाला फायदा देऊ शकत नाही, तसेच कोणीही त्रास व दुःखे दूर करु शकत नाही. निवाड्याच्या दिवशी सर्व मानव त्याच्या समोरच गोळा केले जातील आणि तो त्यामधील प्रत्येकाच्या जीवनकार्यांचा हिशेब व आढावा घेईल. इस्लामचे हे शिक्षण माणसाला भय, अन्याय, अत्याचार व इतरांच्या संपत्तीचा अपहार व शोषण वगैरे गोष्टींपासून मुक्ती प्रदान करते.
एवढेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन इस्लाम माणसाला इच्छा, आकांक्षा यांच्या दास्यत्वातून मुक्त करतो. येथपर्यंत की जगण्याच्या इच्छेपासूनही त्यांचे संबंध तोडून टाकतो. ‘‘जीवनासक्ती’’ हाच मानवी कमकुवतपणा आहे व हुकूमशहा याच गोष्टीचा लाभ घेऊन इतर माणसांना आपले दास बनवित आले आहेत. जर माणसात हा कमकुवतपणा नसता तर तो कधीही व कोणतेही दास्यत्व पत्करण्यास तयार झाला नसता व या क्रूर दैत्यांना असे सैतानी नाच करु दिले नसते. अत्याचार व क्रौर्य यांच्या समोर गुडघे टेकून शरण जाण्याऐवजी वीरश्रीपूर्वक मुकाबला करण्याचे शिक्षण देऊन इस्लामने मानवतेवर महान उपकार केला आहे. कुरआनमध्ये आले आहे,
‘‘हे नवी ! त्यांना सांगा की जर तुमचे बाप व तुमचे मुलगे आणि तुमचे भाऊ व तुमच्या पत्नी व तुमचे सगेसोयरे व तुम्ही शिल्लक ठेवलेली संपत्ती व जो कारभार मंदावेल असे भय तुम्हाला वाटते तो सर्व व्यवहार व तुम्हास प्रिय असलेले तुमचे घर, जर तुम्हाला अल्लाह व त्याचा प्रेषित व त्याच्या मार्गाने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यापेक्षा अधिक प्रिय आहे, तर तोवर प्रतीक्षा करा जेव्हा अल्लाह आपला निर्णय तुमच्यासमोर आणील व अल्लाह अवज्ञा करणारांचे मार्गदर्शन करीत नाही.’’ (कुरआन ९:२४)
इस्लाम माणसाला अल्लाहचे प्रेम शिकवितो. ज्याला सहानुभूती, चांगलुपणा, सत्य तसेच अल्लाहच्या मार्गात म्हणजेच जीवनातील सर्व उच्च, पवित्र उद्देशाकरिता जिहाद असे नाव दिले जाऊ शकते; ते तसेच वासनांशी व इच्छाआकांक्षांशी झगडण्यास प्रवृत्त करते व त्यांना आपल्या काबूत राखण्याचे शिक्षण देते. आधळ्या, बहिऱ्या इच्छा वासनारुपी माजलेल्या अश्वांना तो अल्लाहवरील प्रेमाद्वारे ताब्यात ठेवण्यास शिकवितो, तसेच जीवनात तो फक्त अल्लाहच्या प्रेमाला सर्वश्रेष्ठ मूल्य व मूळ कार्यशील शक्तीच्या स्वरुपात पाहू इच्छितो. जो या धनापासून वंचित आहे तो मुस्लिम होऊच शकत नाही.
इहलोकभक्तांचा गैरसमज
लोभ, लालसा व इच्छा वासनांचा एखादा दास आपल्या चुकीच्या अनुमानाच्या कारणास्तव असा विचार करु लागतो की इतरांच्या तुलनेत त्याचे जीवन अधिक सफल व सुखपूर्ण आहे; असे होणे संभवनीय आहे. परंतु त्याच्या उणिवांची शिक्षा त्याला फारच लवकर भोगावी लागते. जेव्हा तो आपल्या या स्वप्नवत अवस्थेतून बाहेर येतो तेव्हा त्याला आढळते की आपण इच्छा वासनांचे विवश गुलाम बनलो आहोत. त्याच्या भाग्यात वंचना, दुर्भाग्य तसेच हालअपेष्टा व विवशताखेरीज आणखी काही असत नाही. कारण एकदा माणूस आपल्या इच्छा लालसांना शरण गेला तर तो कधीही त्यांना आपल्या काबूत आणू शकत नाही, उलट त्याचा उदंडपणा जसजसा वाढत जातो तसतशी त्याची तृष्णाही वाढत जाते. अशाप्रकारे माणसाचे पशुपेक्षाही खालच्या स्थरावर पतन होते आणि आस्वाद घेण्यात तो अशाप्रकारे निमग्न होत जातो की त्यांना इतर कुठल्याही वस्तुचे भान राहत नाही. यावरुन हे स्पष्ट होते की जीवन व त्यातील अनेक समस्यांच्या बाबतीत अशातऱ्हेचे मार्गक्रमण मानवतेला कसल्याही भौतिक वा आध्यात्मिक प्रगतीपर्यंत नेऊन पोचवू शकत नाही. प्रगती मग ती भौतिक असो वा आध्यात्मिक असो त्याकरिता माणसाला आपल्या इच्छा लालसेच्या गुलामगिरीतून मुक्त होणे ही पहिली अट आहे. यानंतरच विज्ञान, कला व धर्माच्या क्षेत्रात प्रगती होणे संभवनीय आहे.

- सय्यद जलालुद्दीन उमरी
   
    आजकाल स्त्रीचे अधिकार या विषयावर चोहोबाजूने प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर आधुनिक बुद्धिवाद्यांनी बराच गदारोळ माजविला आहे आणि आक्षेपांची बरसात केली आहे.
    या पुस्तकात प्रथमत: संक्षिप्तपणे `इस्लामने' स्त्रीला प्रदान केलेल्या अधिकारांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यानंतर याविषयी घेण्यात आलेल्या ठळक आक्षेपांचा समीक्षात्मक वेध घेण्यात आला. सुरवातीला स्त्री स्वातंत्र्याच्या पाश्चात्य विचारसरणीचा समाचार घेण्यात आला. हा एक छोटासा रक्षणात्मक प्रयत्न आहे.

आयएमपीटी अ.क्र. 146   -पृष्ठे- 192     मूल्य - 100            आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/jqazzqeot7xzksv45cntywwtrnvspnx2


व्यक्तिगत कायदे इस्लामी समाजाच्या सामुदायिक आत्म्याचे रक्षक सुद्धा आहेत. कारण सामुदायिक जीवन आणि मृत्यू संबंधीच्या समस्या मध्ये खोलात शिरून पाहिल्यास असे दिसून येईल की कोणत्याही समाजाच्या व्यक्तिगत कायद्यांच्या अत्सित्वाचा संबंध या त्यांच्या श्रद्धा आणि विचाराशी जीवन जोडले गेलेले असते. म्हणून या पायाभूत मूळ कायद्यांची अत्यंत आवश्यकता असते.
याचे उदाहरण वृक्षासारखे आहे. वृक्षाच्या फांद्या, पाने जरी मुळातून निघत असली आणि हिच मूळे त्याना जीवन आणि हिरवेपण देत असली तरी मूळे सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनासंबंधी आणि समृद्धते संबंधी निस्पृह किवा बेपर्वा असत नाहीत. म्हणून जेव्हा मूळे कापली जातात किवा सुकून जातात तेव्हा फांद्या आणि पानेही सुकून जातात. त्याच प्रमाणे जर फांद्या आणि पानेही कापली गेली किवा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तर मुळांची शक्ती आणि जिवंतपणा शिल्लक राहू शकत नाही. हळू हळू सडून तेही सुकून जातात. अगदी हीच परिस्थिती समुदांयाचे विचार आणि धारणांची सुद्धा असते. जेव्हा धारणा जीवनामध्ये अंमलात असतात तो पर्यंत या धारणामध्ये सुद्धा जीवन आणि शक्ती असते. जेव्हा या धारणा अंमला मध्ये नसतात तेव्हा धारणाच्या नाडीचे ठोके क्षीण होत जातात.
मौलिक धारणा, ज्यांच्या अंतर्गत समाज आपले जीवन व्यतीत करीत असतो, त्या अमलात आणण्यासाठी हे सर्व कायदे आवश्यक असतात. त्यांच्या व्यक्तित्वासाठी त्यांच्या व्यक्तिगत कायद्याचे व्यावहारिक महत्वही सर्वात अधिक असते. म्हणून या कायद्यामधून त्यांचा व्यावहारिक सहयोग किवा असहयोग याचे परिणाम सुद्धा त्याची आपली मौलिक धारणांची बाजू अधिक स्पष्ट होते. हे कायदे मजबूतीने अंमलात आणल्यामुळे या धारणाशी मानसिक संफ अवश्य शाबूत राहतो. पण जर या कायद्याशी व्यावहारिक नाते कापले गेले तर तो संफ कमजोर, अर्ध जीवित आणि शेवटी प्राणहीन होणे क्रमप्राप्त होते. कारण ह्या कायद्याशी सरळ नाते तोडल्याचा अर्थ असा होईल की आता ते समाजाच्या दृष्टीने योग्य आणि स्वीकारार्ह राहिले नाहीत. त्यांना अयोग्य अस्वीकारार्ह ठरविण्याचा निश्चित अर्थ हा होईल की ते ज्या पायाभूत विचार आणि धारणा अंतर्गत निर्माण झाले आहेत, मूळात त्या स्वतः धारणांची महानता आणि सत्यता आता त्यांचे जवळ मान्यता प्राप्त आणि विश्वासार्ह राहीली नाही. दूसरे असे की, त्याला आपल्या या विश्वासार्ह किवा विश्वासाच्या कमतरतेची कारणे स्वतःला सुद्धा समजत नाही.
नंतर हे मानसिक परिवर्तन या मर्यांदे पर्यंतच थांबणार नाही. उलट ते जरूर वाढत जाईल आणि समाज दूसरे विचार आणि दूसर्या धारणांनी प्रभावित होत जाईल. कारण जेव्हा तो(समाज) आपल्या व्यक्तिगत कायद्याशी फारकत घेईल तेव्हां त्याची पोकळी दूसर्या कायद्याच्या संग्रहाशी नाते जोडण्याची आवश्यकता निर्माण होईल. हे दूसरे कायदे दुसर्या कोणत्या तरी धारणा आणि दृष्टीकोनावर निर्माण झालेले असतील हे स्पष्टच आहे ज्या धारणांच्या आधारावर बनलेले व्यक्तिगत कायदे अंगिकारले आहेत खुद्द त्यांच्यासाठी त्यांच्या मनाचे दरवाजे उघडले जातील. त्यामुळे त्यांच्या आपल्या वैशिष्टयांचा संबंध कमकुवत होईल. म्हणून ते या हल्ल्याचा सामना करण्यास सबल असणार नाहीत. परिणामतः त्यांचा पायाभूत विचार आणि धारणा यांचा पाया निश्चित ढासळेल आणि समजुन उमजुन किवा न समजता ते त्यात बदल करण्यास तयार होतील. म्हणून हे वास्तव आहे की कोणत्या ही समाजाचा व्यक्तिगत कायदा हा जिथे त्यांच्या व्यक्तित्वाचे शरीर असते तेथे त्यांच्या आत्म्याचा रक्षकही असतो. राष्ट्राच्या आणि समाजाच्या इतिहासात या बाबींचे पुरावे भरपूर आढळतात. खुद्द इस्लामी समुदायाच्या इतिहासात सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत.
व्यक्तिगत कायद्याला वंचित होणे म्हणजे सामाजिक व्यक्तिमत्वाचा मृत्यू ओढवणे
आपल्या व्यक्तिगत कायद्याला वंचित झाल्यामुळे समाजाचे व्यक्तित्व कोणत्याही प्रकारे जीवंत राहू शकत नाही. कारण व्यक्तिगत कायद्याचे महत्व त्या जमातीच्या वैशिष्टयपूर्ण व्यक्तिमत्वाचा ढाँचा ही असतो आणि त्याच्या आत्म्याचा रक्षक ही असतो. त्यालाच तो वंचित झाल्याने त्याचे व्यक्तित्व शिल्लक राहत नाही. यावर कोणत्याही युक्तिवादास वाव नाही. ही वंचितता म्हणजे त्या जमातीचे अस्तित्व नाकारणे आहे. म्हणून त्यांचा व्यक्तिगत कायदा समाप्त करून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या खास निशाण्या आणि रुपरेषा मिटवून त्यास दुसर्या शरीरात प्रविष्ठ करण्यास भाग पाडणे असा याचा अर्थ होतो. या परिवर्तनामुळे त्यांची वैचारिक आणि काल्पनिक मूळे उखडली गेल्यामुळे कमजोर होतील आणि शेवटी यापुढे त्याचे नियमानुसार जीवंत राहणे संभवनीय असेल कां?
या क्रान्तीनंतर दूसर्या कोणत्या तरी सांस्कृतिक समूहात, पावसाच्या थेंबाप्रमाणे सामावून जाणे हेच त्याच्या नशिबी असेल. या समाजाचे किवा धर्माचे लोक सुद्धा शिल्लक राहणार नाहीत, असा याचा अर्थ नाही, ते शिल्लक राहतील आणि हेही शक्य असेल की ते आपल्या जीवनात प्रगतिवर प्रगति करीत जातील तथापि त्या धार्मिक समूहाचे आणि समाजाचे नांव पुसले जाईल. या धार्मिक समूहाचे लाखो करोडो लोक उपलब्ध असताना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तित्वाच्या कथा मात्र भूतकाळ बनून राहतील.
व्यक्तिगत कायद्याची समाप्ति करणेहे एक धोकादायक पाऊल ठरेल.
जमाती आणि धर्मांच्या व्यक्तिगत कायद्याना असाधारण महत्व असते त्यामुळेच कोणत्या जमातीला किवा धर्माला त्यात स्वाभिमान आणि स्वतःला ओळखण्याची थोडीतरी क्षमता असते. आपला व्यक्तिगत कायदा त्यांना प्राणापेक्षा प्रिय असतो आणि कोणतीही किमत देऊन त्याचे रक्षण ते करू इच्छितात. त्याना त्या कायद्याशी सैध्दातिक नाते तर असतेच शिवाय तीव्र भावनात्मक संबंध सुद्धा असतात, त्या भावना फार नाजुक असतात. त्यांचा नायनाट किवा संपविण्याचा प्रयत्न त्या समाजाला सहन होणे शक्य नाही.
दुसर्या कोणत्याही बाबीपासून वंचित होण्यास तो समाज सहन करील परंतु अशा सैद्धांतिक आणि भावनात्मक बाबीपासून दुरावण्याचा विचार सुद्धा तो समाज करू शकत नाही. याच कारणामुळे भूतकाळातील महान आणि शक्तिशाली साम्राज्यानी त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या प्रजेकडून सर्वकाही हिसकावून घेतले तथापि व्यक्तिगत कायद्याना हात लावण्याची हिम्मत त्यानी केली नाही.
रशियन साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्य यांची उदाहरणे अगदी जाहिर आहेत. ब्रिटिशानी हिन्दुस्थानावर शासकीय कब्जा केल्यावर, त्याकाळात हिदुस्थानात जे इस्लामी कायदे लागू होते ते हळूहळू समाप्त करून त्यानी बनविलेले कायदे लागू केले. तथापि येथील नागरिकांचे व्यक्तिगत कायदे रद्द केले नाहीत. कारण येथील मुस्लिमांचे आणि हिदूचे आपापल्या व्यक्तिगत कायद्याशी तीव्र भावनात्मक संबंध आहेत आणि त्यासाठी ते आपले प्राण त्यागही करतील परंतु आपापल्या या कायद्याना रद्दबातल करणे ते कधीही सहन करणार नाहीत ह्या वस्तुस्थितीची त्याना जाणीव होती. म्हणुन या नाजुक भावनाशी छेडछाड करणे म्हणजे त्यांच्यावर अत्यंत हानिकारक परिणाम होतील हे ते जाणून होते.
आता पर्यंत जे वास्तव आहे ते आज अवास्तव होऊ शकत नाही. व्यक्तिगत कायद्याचे हे महत्व इतर जमाती आणि धर्माच्या बाबतीत ही नाकारणे योग्य नाही त्याचप्रमाणे इस्लामी समुदाया संबंधी सुद्धा नाकारणे योग्य होणार नाही. मुस्लिमांचा व्यक्तिगत कायदा त्यांच्या व्यक्तित्वासाठी शरीर आणि त्याच्या समुदायासाठी आत्म्यांची भूमिका राखून आहे आणि त्यापासून वंचित होण्याचा परिणाम त्यांच्या सामुदायिक मृत्यूच्या स्वरुपात समोर येतो. म्हणून जरी त्यांचे नाते धर्म आणि श्रद्धा यांच्याशी जोडलेले नसते तरी हे त्यांच्यासाठी प्राणापेक्षा कमी प्रिय राहिले नसते.

- मु. यूसुफ इस्लाही

    या ग्रंथात नीतीमूल्यांचा संग्रह प्रत्येक वर्ग व वयोगटाच्या वाचकांसाठी लाभकारक आहे. इस्लामशी प्रेम राखणारे बंधु भगिनी या अमूल्य संस्कार व शिष्टाचारांना आणि मांगल्यपूर्ण प्रार्थनांना आचरणात आणून आपले जीवन सुशोभित करतील. किशोर वयातील मुलांना भली माणसं बनविण्याचा प्रयत्न करतील.
    या ग्रंथात इस्लामी संस्कृतीच्या नियम व शिष्टाचारांना सुयोग्य क्रमासह सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कुरआन, प्रेषिताचरण आणि सदाचारी लोकांच्या स्मृतिंच्या प्रकाशात योग्य जीवनशैली शिकविणारा हा ग्रंथ आहे ज्यामुळे सुसंस्कारितांना या जगात आणि परलोकात सुद्धा सफलता प्राप्त होईल.

आयएमपीटी अ.क्र. 142     -पृष्ठे - 320    मूल्य - 160  आवृत्ती - 2 (2014)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ge8jj6q26tcr71peqj08a516u11eyvp5

माननीय अब्दुल्लाह यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि त्याने पैगंबरांना म्हटले, ‘‘मी तुम्हांवर प्रेम करतो.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘जे तुम्ही   म्हणत आहात त्यावर दृढ विचार करा.’’ त्याने तीन वेळा म्हटले, ‘‘अल्लाह शपथ! मी तुम्हांवर प्रेम करतो.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जर तुम्ही आपल्या वक्तव्यावर खरे असाल तर गरिबी  आणि उपासमारीचा सामना करण्यासाठी शस्त्रांची जुळवाजुळव करा. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे गरिबी आणि उपासमार महापुरापेक्षा तीव्र गतीने येतात.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
कोणावर प्रेम करणे आणि त्याला प्रिय बनविण्याचा काय अर्थ होतो? हाच की त्याच्या पसंतीला आपली पसंत आणि त्याच्या नापसंतीला आपली नापसंती बनविणे, प्रिय व्यक्ती ज्या मार्गाने जात आहे त्याच मार्गाला आपल्या जीवनाचा मार्ग बनविला जावा, तिचा निकटवर्ती बनणे, तिची संगती आणि तिच्या खुशीकरिता प्रत्येक वस्तूचे बलिदान द्यावे आणि बलिदान  देण्यासाठी तत्पर असावे. पैगंबर मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ असा होतो की त्यांच्या प्रत्येक पावलांवर पाऊल टाकणे आणि मार्गातील प्रत्येक निशाणी माहीत करून घेणे   आणि त्यानुसार अनुकरण करणे. पैगंबरांनी ज्या मार्गावर संकटांचा सामना केला आहे त्या मार्गावर संकटे सहन करण्याची शक्ती निर्माण केली जावी. ‘हिरा’ नामक गुहादेखील पैगंबरांचा   मार्ग आहे आणि बद्र आणि हुनैनदेखील पैगंबरांचा मार्ग आहे. ‘दीन’ (जीवनधर्मा) च्या मार्गाचा अवलंब करण्याच्या परिणामस्वरूप गरिबी आणि उपासमारीचे संकट निर्माण होते आणि  उपजीविकेचे संकट सर्वांत मोठे संकट आहे. त्याचा सामना फक्त विश्वास आणि अल्लाहवरील प्रेमाच्या शस्त्रानेच केला जाऊ शकतो. ‘मोमिन’ (ईमानधारक) अशा स्थिती विचार करतो   की अल्लाह माझा वकील आहे, मी निराश्रित आहे आणि मी गुलाम आहे, गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची इच्छा पूर्ण करणे असते आणि मी ज्याचे काम करीत आहे तो   कृपावंत आणि न्याय करणारा आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही. त्याचे अशाप्रकारे विचार करणे प्रत्येक संकटावर मात करू शकते, शैतानाचे प्रत्येक शस्त्र निरुपयोगी करू  शकते.

कर्माचे फळ नियतीवर
प्रेषित सुलैमान (अ.) यांना पशु-पक्ष्यांची भाषा अवगत होती. एकदा एका मादी-पक्ष्याने त्यांच्याजवळ तक्रार दाखल केली. एका संत भासणाऱ्या व्यक्तीने, त्याच्या नर-पक्ष्याची धोका   देऊन शिकार केली.
प्रेषित सुलैमान (अ.) यांनी सांगितले, ‘‘पक्षी हे माणसासाठी खाद्य आहेत. शिकार केली त्यात काय चुकले?’’ त्या मादी-पक्ष्याने सांगितले, ‘‘एका पर्वतावर तो माणूस हातामध्ये जपमाळ  घेऊन, ईश्वराचे चिंतन करीत होता. माझा नरपक्षी त्याचे सोज्ज्वळ रूप पाहून बिनधास्तपणे त्याच्या खांद्यावर खेळू लागला. त्या वेळी त्या महात्म्याने माझ्या नराची शिकार केली. ती  व्यक्ती शिकारीच्या उद्देशाने बसली असती तर आम्ही आमचा बचाव केला असता. पण त्या व्यक्तीने ईशचिंतनात मग्न अवस्थेत शिकार केली. ही धोकाधडी आहे.’’
यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की माणसाने रूप पालटून कोणाचीही धोकाधडी करू नये. समाजसेवेच्या नावाने राजकीय नेते, प्रशासनिक अधिकारी अडाणी असलेल्या सर्वसामान्य   जनतेला धोका देतात. सर्वांत चिंतनीय बाब म्हणजे धार्मिक रूप धारण करून क्षुल्लक स्वार्थासाठी विश्वासघात करताना मानवता, नीतिमत्ता पार रसातळाला जाते.
इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, ‘‘माणसाच्या प्रत्येक कर्माचे फलीत त्याच्या नियतीवर अवलंबून असते.’’ (हदीस : बुखारी)
आपण सर्वांनीच अशा धोकाधडीपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

‘‘फोटो काढून आमचं पुण्य कशाला वाया घालवताय?’’ म्हणणाऱ्या जावेद शेखनी प्रत्येकाच्या मनात घर केले. त्यांचा लांबलेला हात खूप दूरवर पोचला. भिडला! पण हे एकमेव नव्हते.  मला माहितीये की हे ‘त्ययांच्यापैकी’ कोणी लिहीणार नाही. पण ज्या दिवशी सांगलीत पाऊल टाकले त्याच दिवशी ठरवले की आपण हे मांडायचे.
इतिहासाची पुस्तके एवढी वाचलीत की टोपी दिसताच औरंगजेब आठवायचा. बिनामिशीचा दाढीवाला दिसला की चंगेजखानापासून (मुस्लिम नसतानाही) ओवेसीपर्यंतचा ‘अंध’ प्रवास  डोळ्यासमोर यायचा. बाबरीपासून कबरीपर्यंत. मन हेलकावत राहायचं. आपली सुटलेली पोटं पाहून ‘‘पंधरा मिनीट के लिये *** की फौज निकालो’’ वाक्य आठवून भिती वाटियची’’ भावा  जावेद सारं विसरायला भाग पाडलंस!
सात दिवस फक्त तीन-तीन तास झोप घेऊन साडेतीनशे तरूणांना पूरग्रस्तांसाठी कामाला लावणारे मुस्तफा सर असो की, पाण्यात राहून पायाला जखम झालेले पोलिस इक्बाल शेख  असो. ‘‘सर तुम्ही आमच्यासाठी इथे आलात, पैसे नकोत.’’ म्हणणारा ऑटोवाला असो, कर्नाटकातील अख्ख्या चिकोडी तालुक्याला रसद पुरवणारा मुस्लिम समाज असो, की शिरोळीतील  मदरशात अन्न पुरवणारा मुस्लिम असो... कितीतरी ज्ञात अज्ञात उदाहरणे. एक गोष्ट मात्र खरी की आपण आधीपासूनच एक होतो, या महापूरने एक असल्याची जाणीव करून दिली.  महापूरही बघा कसा योगायोग घेऊन आला. एकीकडे ३७० कलम, एकीकडे तीन तलाक, एकीकडे मॉब लिंचींग, निवडणुका तोंडावर. पण कृष्णेच्या या पुरात माणूसकीच्या महापुराने मात्र  आपल्या सीमा ओलांडल्या. क्वचित महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं ज्यामध्ये मुस्लिम युवकांचा एवढा सहभाग असेल.
ऐन बकरी ईद रोजी आमचा कॅम्प (सांगली मिरज) कुपवाड येथील एका मशिदीत होता. शंभर एक पुरग्रस्त गैरमुस्लिम आश्रयाला होते आणि त्यांच्यासाठी जेवण बनवण्यात मुस्लिम  बांधव व्यस्त होते. पाठीमागे झोमॅटोवाल्यासोबत झालेला प्रसंग आठवला. कट्टरवाद्यांना दोन्ही बाजूंनी दिलेली ती एक सनसनीत कानाखाली होती. जिथे त्यांना क्षणोक्षणी आपलं देशप्रेम  सिद्ध करावं लागतं तिथे त्यांनीच सिद्ध करून दाखवलं की, अल्लाहचा इस्लाम वेगळा आहे आणि मुल्लाहचा इस्लाम वेगळा आहे. ना इथे कोणी कोणाचे नाव पाहिले ना गाव, ना धर्म ना  वय, ना कोणता फतवा. इथे फक्त माणसासाठी माणूस उभा होता. कोणीतरी आपला नेता हातात डब्बा घेऊन भिक्षा मागत येईल आणि मग आपण मदत करू असा विचार त्यांनी केला  नाही. मिळेल त्या प्रत्येक मार्गाने प्रत्येकाने नि:स्वार्थ प्रयत्न केले. करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
मुस्लिम मित्रांनो तुमचं पुण्य बिलकुल कमी होणार नाही, काळजी नसावी. धन्यवाद तर म्हणणारच नाही. जावेदभाईला कळलं तर आणखी चिडायचे. (टीप : आयुष्यातील पहिली २० वर्षे  कट्टर अशा मराठवाड्यात गेली आणि नंतरची १० वर्षे नागपूरात. इथे मुस्लिमांच्या तोंडून मराठी खूप कमी वेळा ऐकली पण ‘‘आरं खुळ्या उचल की त्यो बॉक्स’’ हे जेंव्हा एका  टोपीधारीच्या तोंडून ऐकलं तेंव्हा उमगलं की मराठीला मरण नाही)

(लेखकाच्या वॉलवरून)

– डॉ. प्रकाश कोयाडे


सर्वात पहिली वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिमांचे कौंटुबिक जीवन आणि दुसर्या व्यक्तिगत बाबीसंबंधी पवित्र कुरआन व हदीस मध्ये उपदेश, मार्गदर्शन आणि आदेश अस्तित्वात आहेत, इतकेच नव्हे तर ते परिपूर्ण व्याख्यानिशी उपलब्ध आहेत म्हणून पवित्र कुरआन आणि हदीस यांची पृष्ठे उलटत जावीत आणि या उपदेश, मार्गदर्शन आणि आदेशांचे व्यवस्थित अध्ययन करित जावे. निकाह(विवाह)महर(नवर्या मुलाकडून नवरी मुलीला दिली जाणारी रक्कम किवा वस्तू), नफका(पत्नी व मुलासाठी अन्नवस्त्र), तलाक(पतीने पत्नीला दिलेला घटस्फोट), खुलअ(पत्नीने पतीला दिलेला घटस्फोट), इद्दत(घटस्फोटा आधीची मुदत), विरासत(वारसा), वसीअत(वारसापत्र, मृत्यूपत्र), इला, नसब, वक्फ, हिबा इत्यादि समस्यांपैकी एकही समस्या अशी नाही ज्यासंबंधी चर्चा केली नाही, आदेश दिले नाहीत, मूल्ये आणि कायदा निश्चित केला नाही. ह्या इतक्या उघड वास्तव बाबी आहेत की यासंबंधी पवित्र कुरआनातील संबंधित आयतींचा आणि हदीसांचा हवाला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. इच्छुक व्यक्ति पवित्र कुरआनच्या कोणत्याही अनुवादावर नजर फिरवून त्यांची सत्यता पडताळू शकतो.
व्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये निश्चित व्याख्येसह आहे. जीवनाच्या कोणत्याही पैलू विषयी केलेल्या वर्णनापेक्षा अधिक विस्ताराने या कायद्यांचे वर्णन पवित्र कुरआन व हदीस मध्ये करण्यात आले आहे. नमाज, जकात, रोजा आणि हज यासारख्या मौलिक धार्मिक कार्याविषयी सुद्धा अशा व्याख्या केलेल्या नाहीत. कोणत्याही हिता शिवाय आणि आवश्यकते शिवाय असे होऊ शकत नाही. हित आणि आवश्यकतेच्या निश्चितीकरणात मतभिन्नता होऊ शकते. तथापि व्यक्तिगत कायद्यांच्या विवरणामध्ये वैशिष्टपूर्ण व्याख्या देण्यात आल्यामुळे पवित्र कुरआनच्या दृष्टीत त्याना खास महत्व असल्याच्या पुराव्याबाबत दुमत होऊ शकत नाही.
अल्लाहचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण
कोणत्याही आदेशांचा उल्लेख पवित्र कुरआन आणि हदीस मध्ये असल्यास ते आदेश पाळणे मुस्लिमांना बंधनकारक असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्यासंबंधी वादविवाद केला जात आहे, तो व्यक्तिगत कायदा पवित्र कुरआन आणि हदीसमध्ये अस्तित्वात असल्यामुळे त्या कायद्याचे मुस्लिमांना अनुसरण करणे अनिर्वाय आहे. या सैद्धान्तिक वास्तवतेवर विसंबवून पवित्र कुरआन या कायद्यांचे केवळ विवेचन करून थांबत नाही तर प्रत्येक स्तरावर त्याचे पालन करणे कसे बंधन कारक आणि आवश्यक आहे तेही सांगितले आहे. उदाहरणार्थ लग्नविधी(निकाह) संबंधी काही आदेश दिल्यानंतर एके ठिकाणी ताकिद केली आहे की,
‘‘अल्लाहने तुमच्यावर ह्याला(या कायद्याला) बंधनकारक ठरविले आहे’’(सुरत निसा आयत २४)
आणखी एका ठिकाणी आदेश दिला आहे की,
‘‘हा अल्लाहचा आदेश, तो तुमच्या बाबतीत निर्णय घेतो’’(सूरत मुम्मतहिना आयत १०)
या प्रमाणे तलाक आणि खुलअ यासंबंधी काही आदेशांचे विवेचन करून सावधान केले जाते की,
‘‘या मर्यादा अल्लाहने ठरविल्या असून त्यांचे उल्लंघन करू नका’’(सूरत बकर आयत २२९)
इद्दत विषयी काही सूचना देऊन आठवण करून दिली जाते की,
‘‘हे अल्लाहचे आदेश, त्याने तुमच्या पर्यंत पोहोचविले आहेत.’’(सूरत तलाक आयत ५)
आणखी एके ठिकाणी तलाक आणि इद्दत या विषयी काही आदेश देऊन त्याना ‘‘हुद्दुल्लाह’’(अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा) असे म्हणून त्यांची ओळख करून देण्यात आली आहे.
वारसा हक्काच्या कायद्या संबंधी तर व्याख्या अगदी स्पष्ट करून त्याचे विवेचन करताना सर्वात प्रथम त्यातच निःसंद्विग्ध हुकूम दिला आहे की,
‘‘माता पित्यानी किवा जवळच्या नातेवाईकांनी सोडून गेलेल्या वारशाच्या संपत्तित पुरूषाचा सुद्धा हिस्सा आहे आणि स्त्रियांचा सुद्धा त्या संपत्तित हिस्सा आहे. संपत्ति कमी असो की ज्यादा, हा हिस्सा निर्धारित केलेला आहे’’(सूरत निसा: आयत ७)
नंतर या कायद्याच्या विवेचनाची सुरवात खालील शब्दानी होते.
‘‘तुमच्या मुलाबाळांच्या वारशासंबंधी अल्लाह तुम्हाला या गोष्टींचा वारसा पत्र करतो की, ’’(सूरत निसा: आयत ११)(म्हणजे वारसदारासाठी अल्लाहनेच वारसा पत्र केले आहे, कुणा व्यक्तिने ते करून ठेवण्याची आवश्यकता नाही)
यानंतर याच कायद्याच्या एका विभागाचे विवेचन पूर्ण होण्यापूर्वी मध्येच थांबून आठवण करून दिली जाते की,
‘‘हे(वारसांचे हिस्से) अल्लाहकडून निर्धारित केले आहेत. अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि सर्वज्ञ आहे.’’(सूरत निसा: आयत ११)
आणि पुन्हा या विवेचनाची समाप्ती खालील शब्दांनी होते.
‘‘हे अल्लाहकडून केलेले वारसा पत्र(अर्थात सक्त आज्ञा आणि हुकूम) आहे आणि अल्लाह सर्व जाणणारा आणि समझदार आहे. या मर्यादा अल्लाहने निर्धारित केल्या आहेत.’’(सूरत निसा: आयत १२-१३)
या प्रमाणे या वारसा हक्का बाबत, शब्द आणि शैली बदलून केवळ एक दोन वेळाच नव्हे तर पाच वेळा खंबीरपणे हे वास्तव सांगून मनावर ठसविले आहे की हे कायदे अल्लाहने निश्चित केलेले असून यांचे पालन करणे अनिवार्य ठरविले आहे.
पवित्र कुरआन मध्ये असलेल्या या निःसंदिग्ध आदेशामुळे, हे कायदे कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक होऊ शकतील हा विचार कोणत्याही अनुचित युक्तिवादाने सुद्धा योग्य ठरवू शकत नाही आणि या कायद्याना आपण बनविलेल्या कायद्याच्या पातळीवर आणता येत नाही.
इस्लामी मूल्यांचे निर्देशक
हे कायदे इस्लामच्या मूळ मूल्यांचे आणि उद्देशांचे पोषक आणि संरक्षक असून त्यात धर्माचा पाया असलेल्या मूल्यांचा आत्मा अस्तित्वात आहे. म्हणून हे कायदे मुस्लिमांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांना व्यवस्थित सोडविण्याचे साधन आहेत. या शिवाय श्रद्धेची आणि इस्लामी मूल्यांची जपणूक करणार्या आवश्यक बाबी एकत्रित ठेवण्याची साधने ही त्या कायद्यात आहेत. उदाहरणार्थ अनेकेश्वरवाद्याशी विवाह करता येत नाही असा एक पायाभूत इस्लामी कायदा आहे. कारण हा कायदा मोडणार्या व्यक्तिस श्रद्धा(ईमान), इस्लामी संस्कार आणि मरणोत्तर जीवनातील सफलता याना ती व्यक्ति पारखी होण्याची सबब बनू शकते असे पवित्र कुरआनांत सांगितले आहे.(सुरत बकरा)
अढळ श्रद्धेची संपत्ति ही मुस्लिमाकरिता सर्वाधिक मूल्यवान बाब असते आणि मरणोत्तर जीवनाची सफलता हा तिचा वास्तविक उद्देश्य असतो. आणि त्या बाबीचे संरक्षण करण्यासाठी अनेकेश्वरवाद्याशी विवाहास प्रतिबंध करणे हा इस्लामचा असलेला मौलिक सिद्धान्त योग्य आणि आवश्यक ठरतो.
त्याच प्रमाणे सर्व पत्नीशी न्यायाने वागण्याच्या अटीसह एकापेक्षा अधिक विवाहास अनुमती दिलेली आहे. त्यास बंदी घातलेली नाही. ही अनुमती अनेक सामाजिक आणि नैतिक कल्याणासाठी दिलेली आहे. आणि त्यात सर्वात महत्वाचा आणि मुख्य उद्देश्य अनाथांच्या संरक्षणाचा आहे.(सूरत निसा)
घटस्फोटाचे आणखी एक उदाहरण घ्या. इस्लामने वैवाहिक नात्याला अतिमहत्वाचे आणि आदरणीय ठरविले असले तरी तलाक आणि खुलअ यांचीही मुभा ठेवली आहे. अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करण्यापासून वाचविणे हा त्यामागे उद्देश्य आहे.(सूरत बकरा: आयत २२९)
आपापसातील घृणा, तिरस्कार आणि उदासीनतेमुळे दांपत्य जीवनातील उद्देशच जर दोघांच्या नजरेतून अदृष्य झाला असेल आणि समेटाची अजिबात आशा उरलेली नसेल तर असे नाते टिकवून ठेवणे म्हणजे आपल्या चारित्र्यावर कलंक लावणे आणि अल्लाहने दाम्पत्यातील प्रत्येकाला दिलेली कर्तव्ये आणि अधिकार यांना हरताळ फासत राहणे म्हणजे उघड उघड सामाजिक वितंडवाद असेल. तथापि इस्लाम हा जीवनाच्या कोणत्याही स्तरावर वितंडवाद, तंटेबखेडे अजिबात पसंद करीत नाही असे वितंडवाद आणि तंटेबखेडे थांबविण्यासाठी पती-पत्नीला वेगळे होण्याशिवाय कोणतीही शक्यता उरत नाही. म्हणून तलाक आणि खुलअची परवानगी देणे आवश्यक समजले गेले आहे.
इस्लामचे व्यक्तिगत कायदे हे केवळ कायदेच नसून त्यांच्या सहाय्याने अपेक्षित मानवी मूल्ये स्थापित करण्यात यावीत असा उद्देश्य या कायद्यात आहे. हे वरील उदाहरणावरून सहज लक्षात येईल.
धर्मावरील दृढ श्रद्धेकरिता आणि मोक्षाकरिता अटी
उपरोल्लेखित कायदे अमलात आणणे इस्लाम धर्मावरील दृढ श्रद्धेसाठी आणि मोक्षासाठी अनिवार्य अटी आहेत हे पवित्र कुरआनच्या शिकवणीने स्पष्ट होते. या वास्तवाला प्रत्यक्ष स्पष्टीकरणाची गरज नाही. कारण अल्लाहचा ग्रंथ आणि प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या हदीस मध्ये या कायद्याचे अस्तित्व असणे म्हणजे ते प्रत्येक मुस्लिमाने अमलात आणणे अढळ श्रद्धा आणि इस्लामसाठी आवश्यक आणि पुरेसे आहे.
याबाबतीत पवित्र कुरआनची शिकवण पहाणे योग्य ठरेल. हे आदेश दृढ श्रद्धेच्या वचनबद्धतेसाठी आवश्यक असून धर्मनिष्ठेचा अविभाज्य अंग आहे. त्यांचे उल्लंघन करणे जुलूम, पापपरायणता, नास्तिकता असून ईश्वरी शिक्षेस कारणीभूत आहे. म्हणून वारसा हक्कासंबंदीच्या कायद्याचे वर्णन केल्यानंतर खालील आज्ञा होते.
‘‘हे(कायदे) अल्लाहने निर्धारित केलेल्या मर्यादा आहेत, जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांचे आज्ञापालन करील त्याला अल्लाह अशा बागांमध्ये प्रवेश देईल ज्यांच्या खालून कालवे वहात असतील. ह्या बागांत तो कायम राहील आणि हेच मोठे यश असेल आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे प्रेषित(स.) यांची अवज्ञा करील त्याला तो नरकाच्या आगीत टाकील, त्यात तो कायम राहील आणि त्याच्यासाठी खूप वेदनादायक शिक्षा असेल.’’(सूरत निसा : आयत १३-१४)
वारसा हक्कासंबंधी पवित्र कुरआनने दिलेल्या आज्ञांच्या पालनाचे फळ मृत्यूनंतरच्या निरंतर जीवनाचे साफल्य आणि आज्ञांच्या उल्लंघनाचा परिणाम मृत्यूनंतरच्या कायमच्या जीवनात अपयश पदरी पडेल अशी आज्ञा या गोष्टींची स्पष्ट घोषणा अल्लाह करीत आहे.
त्याच प्रमाणे घटस्फोटाचे काही आदेश दिल्यानंतर अशी आज्ञा केली जाते.
‘‘हा आदेश(अल्लाहच्या हुकूमांचे पालन करण्याचा) तुमच्यापैकी त्या लोकांना केला जात आहे, जे अल्लाह आणि मृत्यूनंतरच्या जीवनाच्या दिवसावर श्रद्धा ठेवतात.’’(सूरत बकराह : आयत २३२)
हे आदेश अमलात आणणे आणि मुस्लिम असणे या दोन्ही गोष्टी पवित्र कुरआनच्या दृष्टीकोनातून परस्पराना पूरक आहेत असा याचा अर्थ होतो.
सूरत मुजादला मध्ये ‘जहार’(पत्नीला माता मानणे) संबंधीच्या आदेशांचे विवेचन केल्यानंतर त्यांचे महत्व खालील शब्दात वर्णन करण्यात आले आहे.
‘‘हे आदेश(अशासाठी दिले आहेत) की तुम्ही अल्लाहवर आणि त्यांच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवणारे बनावेत आणि अल्लाहने निर्धारित केलेल्या या मर्यादा आहेत आणि त्यांचा इन्कार करणार्यासाठी यातनादायक शिक्षा आहेत.’’(सूरत मुजादला: आयत ४)
‘‘व लिल काफिरीन अजाबुन अलीम’’ हे शब्द येथे आले असल्यामुळे पवित्र कुरआनचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की वर विवेचन केलेल्या ‘जहार’ चे आदेश धुडकावून लावणारी व्यक्ति श्रद्धेच्या कक्षेत शिल्लक राहू शकत नाही.
‘‘धर्म श्रद्धेचा अविभाज्य अंग असण्याचा स्पष्ट पुरावा’’
विवाह, घटस्फोट, पोटगी, वारसा इत्यादि बाबी संबंधी पवित्र कुरआनात जे आदेश दिलेले आहेत त्यांचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद(स.) यानी केलेले आहे. या स्पष्टीकरणास ‘सुन्नत’ असे म्हणतात. पवित्र कुरआन आणि सुन्नतचे आदेश जे व्यक्तिच्या आणि समाजाच्या जीवनाशी संबंधित आहेत, ते आदेश इस्लाम धर्मशास्त्राचे(शरीअतचे) अत्यंत महत्वाचे, अविभक्त आणि अविभाज्य असे अंग आहेत. विवाह घटस्फोट, पोटगी, वारसा इ. बाबतीत पवित्र कुरआनने जे आदेश दिले आहेत त्या सर्वांना एकत्रितपणे शरीअत म्हणतात आणि शरीअतचे संपूर्णपणे पालन करण्याची आज्ञा पवित्र कुरआनने दिली आहे. या शरीअतलाच ‘मुस्लिम पर्सनल लॉ(मुस्लिम व्यक्तिगत कायदा)’ असे सध्या संबोधण्यात येते.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget