Latest Post

माझी गणना आपले वाईट चिंतणार्‍यांमध्ये होईल जर का मी स्पष्टपणे आपल्याला हे नाही सांगितले की, आपल्या जीवनातील खरी समस्या काय आहे? माझ्या मते आपले वर्तमान आणि भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आपण त्या मार्गदर्शनासोबत कसा व्यवहार करताय, जे मार्गदर्शन आपल्यापर्यंत प्रेषित (सल्ल.) यांच्या मार्फत पोहोचलेले आहे. ज्यामुळेच आपल्याला मुसलमान म्हटले जात आहे. आणि त्या मार्गदर्शनाशी तुमच्या असलेल्या संबंधामुळे तुम्हाला आवडो किंवा न आवडो जगामध्ये तुम्हाला इस्लामचे प्रतिनिधी मानले जात आहे. जर आपण या ईश्‍वरीय मार्गदर्शनाची खरी अंमलबजावणी व वकिली केली, आणी आपल्या वाणी व वर्तनाने ती खरी असल्याची साक्ष दिली, शिवाय आपले सामुहिक चारित्र्य इस्लामचे खरे-खुरे प्रतिनिधीत्व करत गेले तर आपण जगातच नव्हे तर आखिरतमध्येही यशस्वी व्हाल. आणि भीती, दुःख, अपमान, निर्धणता, गुलामी आणि पराधिनतेचे हे काळे ढग जे आज आपल्यावर आलेले आहेत, काही वर्षाच्या आत निघून जातील.
    सत्याकडे (सत्यधर्म अर्थात इस्लामकडे) आपले बोलावणे लोकांच्या बुद्धी आणि मनाला मोहित करत जाईल. आपला सन्मान जगात वाढत जाईल. न्यायाची अपेक्षा आपल्याकडून केली जाईल. विश्‍वास आपल्यावर केला जाईल. पुरावा आपण बोललेल्या गोष्टीचा दिला जाईल. कल्याणाची आशा आपल्याकडून केली जाईल. धर्मविरोधी नेत्यांचा सन्मान आपल्या तुलनेत क्षुल्लक होऊन जाईल. त्यांचे सर्व निर्णय राजकीय आणि आर्थिक दृष्टीकोनातून आपल्या खर्‍या आणि सत्याच्या आवडीच्या तुलनेमध्ये खोटे आणि फोल सिद्ध होतील. आणि त्या शक्ती ज्या आज त्यांच्या गोटामध्ये दिसत आहेत लवकरच त्यांच्यापासून विलग होवून इस्लामच्या गोटात येताना दिसतील. इथपर्यंत की एक वेळ अशी येईल जेव्हा साम्यवाद मास्कोमध्ये आपल्या रक्षणासाठी भटकताना दिसेल. भांडवलशाही स्वतः वॉश्िंगटन आणि न्यूयॉर्कमध्ये स्वतःच्या रक्षणासाठी व्याकूळ असल्याचे दृश्य दिसेल. भौतिकवादी आणि नास्तीक (लोक) लंडन आणि पॅरिसच्या विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यामध्ये असमर्थ ठरतील. वंशवादी आणि राष्ट्रवादी लोकांना ब्राह्मण आणि जर्मन लोकांमधून सुद्धा आपले समर्थक मिळणार नाहीत. त्यांचा काळ इतिहासामध्ये केवळ एक बोधकथेच्या रूपामध्ये शिल्लक राहील आणि हे ही नमूद केले जाईल की इस्लामचे समर्थक जागतिक आणि विश्‍वविजयी शक्तीचे प्रतिनिधी कधीकाळी इतके मूर्ख होऊन गेले होते की, मुसा (अलै.) ची काठी त्यांच्या बगलेमध्ये होती आणि खाली पडलेल्या लाठ्या आणि दोर्‍यांकडे पाहून त्यांचा थरकाप उडत होता.
    हे भविष्य तर आपले त्यावेळेस होईल ज्यावेळी आपण इस्लामचे खरे समर्थक आणि खरे साक्षीदार व्हाल. मात्र जर का याच्या विपरित आपले वर्तन राहिले आणि ईश्‍वराने पाठविलेल्या या मार्गदर्शनावर आपण सापासारखे वेटाळा घालून बसाल, न स्वतः त्याचा फायदा घ्याल न दुसर्‍यांना घेउ द्याल. स्वतःला मुस्लिमांच्या प्रतिनिधीच्या रूपाने जगासमोर सादर कराल, परंतु आपली सामुहिक कथनी आणि करनी यातून जी साक्ष जाईल ती अज्ञानतेची, शिर्क, चंगळवादी आणि नैतिक अधःपतनाची जाईल.
    कुरआन घरात उंच जागी ठेवलेला आहे आणि मार्गदर्शनासाठी आपण धर्मभ्रष्ट नेते आणि पथभ्रष्ट करणार्‍या प्रत्येकाशी संपर्क जोडत आहात. आपण दावा अल्लाहच्या बंदगीचा करता आणि प्रत्यक्ष बंदगी सैतान आणि अल्लाहशिवाय इतरांची केली जात आहे. मित्रत्व आणि शत्रूत्व व्यक्तिगत लाभ समोर ठेवून केले जात आहेत. आणि या प्रकारे आपल्या जीवनाला आपण इस्लामच्या आशिर्वादापासून वंचित ठेवत आहात आणि जगालाही इस्लामकडे आकृष्ट करण्याऐवजी त्याला दूर करत आहात. मग अशा परिस्थितीत आपले हे जीवन यशस्वी होईल ना पारलौकिक जीवन. याचा परिणाम तर ईश्‍वरीय नियमानुसारच होईल, जो आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहात आणि शक्यता तर हीच आहे की, आपले भविष्य या वर्तमानापेक्षाही वाईट असेल.
    यापेक्षा इस्लामची मुद्रा उतरवून उघडपणे आपण काफीर (इस्लामचा इन्कार करणारा) होवून जा. म्हणजे किमान आपले हे जीवन तरी तसे बनून जाईल जसे की अमेरिका, रशिया आणि ब्रिटनमध्ये राहणार्‍यांचे बनलेले आहे. मात्र मुस्लिम असूनसुद्धा मुस्लिमासारखे ना राहणे आणि अल्लाहच्या धर्माचे खोटे प्रतिनिधीत्व करून जगातील इतर लोकांच्याही मार्गदर्शनाचा मार्ग बंद करणे एक असा अपराध आहे जो की, आपल्याला या जगामध्ये समृद्ध होऊ देणार नाही. या गुन्ह्याची शिक्षा जी कुरआनमध्ये लिहिलेली आहे आणि जिचा प्रत्यक्ष नमुना ज्यू समाज आपल्यासमोर प्रत्यक्षात दिसत आहे त्या शिक्षेला आपण टाळू शकणार नाही. मग आपण संयुक्त राष्ट्रीयतेच्या दोन वाईट वैशिष्ट्यांपैकी कमी वाईट वैशिष्ट्याला जवळ कराल किंवा आपली वेगळी राष्ट्रीयता असल्याचे बिंबवून ते सर्व मिळवाल जे की, मुस्लिम राष्ट्रीयतेचे समर्थक प्राप्त करू इच्छितात. या शिक्षेला टाळण्याचा फक्त एकच मार्ग आहे तो हा की आपण हा गुन्हा सोडून द्यावा.

जमाअत-ए-इस्लामी हिंदचे मुख्यालय दिल्लीच्या अबुल फजल इन्क्लेव्ह जामिया नगर भागात असून, एका विस्तीर्ण अशा भूखंडावर मुख्यालयातील अनेक इमारती डौलाने उभ्या आहेत. या ठिकाणी दि. 8 ते 14 सप्टेंबर 2019 या कालावधीत एका प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. या प्रशिक्षण शिबिराच्या महत्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे वाटल्याने हा लेखन प्रपंच केला आहे.
परिसर
    नांदेड येथून विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8 सप्टेंबरच्या रात्री 01.00 वाजता पोहोचताच भव्य असे विमानतळ पाहून डोळयाचे पारणे फिटले. देशाच्या राजधानीला साजेशे असे हे विमानतळ असून, तेथून टॅक्सीने जमाअत-ए-इस्लामीच्या मुख्यालयात पोहोचविण्यासाठी टॅक्सीवाल्याने तब्बल 1400 रूपये घेतले. येणेप्रमाणे दिल्लीमध्ये पहिला आर्थिक झटका टॅक्सीवाल्याने दिला.
हॉटेल रिव्हर व्यूव्ह च्या बाजूला जामिया नगर परिसरात असलेल्या जमाअत-ए-इस्लामी हिंद मुख्यालयाची प्रवेशद्वार भव्य असून, तेथे पोहोचताच खाजगी सुरक्षा गार्डनी माझी ओळख पटवून मला प्रवेश दिला. रिसेप्शनवर पोहोचताच तेवढ्या रात्रीही एका तरूणाने अतिशय आत्मीयतेने माझी चौकशी केली आणि माझ्या निवासाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सोबत माणूस दिला. ही जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या मुख्य कार्यालयाची तीन मजली इमारत होती. दुसर्‍या मजल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींची राहण्याची सोय करण्यात आलेली होती.
    9 सप्टेंबरला सकाळी 8.30 वाजता न्याहारी करून 9.00 वाजता मुख्य कार्यालयाच्या शुरा हॉलमध्ये पोहोचलो.  त्या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. ठीक 9.00 वाजता कुरआन पठणाने या सत्राच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर भारताच्या अनेक राज्यातून अनेक राज्यातून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या परिचयाचा कार्यक्रम झाला.
    यानंतर कार्यक्रमाचे संयोजक मौलाना वलीउल्लाह सईदी फलाही (सचिव प्रशिक्षण विभाग) यांनी या प्रशिक्षणामागचा उद्देश सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘मानवतेचे कल्याण हा इस्लामचा मुख्य उद्देश असून, ते साध्य करण्यासाठी कार्यकर्ते तयार करावेत हे या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाचे उद्देश्य आहे.’ त्यानंतर अमीर जमात-ए-इस्लामी हिंद सय्यद सआदत्तुलाह हुसैनी यांचे प्रमुख भाषण झाले. त्यात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करून सांगितले की, ”या प्रशिक्षणादरम्यान सात मुद्यांवर तुम्हा सर्वांना प्रशिक्षण घेऊन आपापल्या ठिकाणी जावून जमाअतच्या इतर सदस्यांना प्रशिक्षित करावयाचे आहे.
1. जाणीवपूर्वक इमानधारण करून इस्लामी श्रद्धेची प्रत्यक्ष अमलबजावणी करून आपल्या समाजाची व देशबांधवांची सेवा करणे.
2. अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या विषयीचे प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न करून त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनकल्याणासाठी स्वतःला वाहून घेणे.
3. इस्लामी इबादती ह्या जाणीवपूर्वक करणे विशेषतः नमाज या महत्त्वाच्या इबादतीमध्ये कुठलीही बारीक सारीक उणीवसुद्धा राहणार याची काळजी घेणे. जेणेकरून तुमचे चारित्र्य उंचावेल.
4. माणसाच्या छोट्या-मोठ्या चुका ज्या अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांच्या नजरेमध्ये गुन्हे आहेत त्यांना सोडणे, कारण अल्लाहचा नूर (प्रकाश बोध) गुन्हेगाराच्या अंतःकरणामध्ये उज्ज्वलता पसरवित नाही. फर्ज आणि सुन्नत नमाजाशिवाय शक्यतेवढ्या जास्त नफ्ल नमाज अदा करण्याचा प्रयत्न करावा.
5. कुठल्याही परिस्थितीत भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमवायची नाही, कारण भ्रष्ट कमाईने खाललेल्या अन्नामुळे दुआ स्विकारली जात नाही, मन साफ होत नाही, त्यामुळे चांगल्या कामामध्ये माणसाचे मन रमत नाही.
6. सातत्याने आपल्या मृत्यूची आठवण ठेवावी. काहीही केले तरी मृत्यू सोडणार नाही, मग वाईट करून आखिरत बर्बाद करून घेण्यापेक्षा चांगले काम करून पुण्य कमवून आखिरतच्या जीवनामध्ये यशस्वी होणे कधीही चांगले. म्हणून मृत्यूची सातत्याने आठवण ठेवा.
7. जास्त खाणे, जास्त बोलणे आणि जास्त झोपणे टाळा.
    त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यात कर्नाटकहून आलेल्या एका प्रशिक्षणार्थ्याने कुरआनचा परिचय करून दिला. त्यानंतर तद्बरूल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर मौलाना हामीद अली फलाही (पश्‍चिमी उत्तर प्रदेश) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मारेफुल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर मौलाना मोहम्मद शर्फ अली कास्मी (तेलंगना) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर तफसीरे उस्मानी या कुरआनच्या भाष्यावर मुबारक अली (राजस्थान) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर तफहीमुल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर श्रीमती शहेनाज बतुल (कर्नाटक) यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेगवेगळ्या कुरआन भाष्यांवर विचार व्यक्त करण्यात आल्यावर त्या सर्वांचा आढावा मौलाना नईमुद्दीन इस्लाही (व्हा. चान्सलर जामियतुल फलाह, आझमगढ) यांनी घेतला.
    त्यानंतर जोहरची नमाज अदा करून जेवण करण्यासाठी सुट्टी देण्यात आली. ठीक 3 वाजता वाचनालयामध्ये सर्वांना एकत्रित बोलावून इस्लामवरील वेगवेगळ्या विषयावरील प्रत्येकी 4 पुस्तके भेट देण्यात आली व त्यातील हदीसच्या पुस्तकाचा एक तास अभ्यास करून घेण्यात आला. त्यानंतर 4 ते 5 वाजेपर्यंत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडीज या संस्थेमध्ये नेवून त्या संस्थेच्या कामकाजाचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर असरच्या नमाजची सुट्टी देण्यात आली. त्यानंतर सामुहिक अभ्यास, परत मगरीबची नमाज, त्यानंतर कुरआनच्या सुरह मरियमचा सामुहिक अभ्यास करण्यात आला. 9 वाजता इशाच्या नमाजसाठी सुट्टी देण्यात आली. नमाजनंतर जेवण करून लगेच झोपण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण दुसर्‍या दिवशी परत पहाटे 3.30 पासून दुसर्‍या दिवसाची दिनचर्या सुरू होणार होती. त्यात तहाज्जुदची नमाज, तजवीदचा क्लास, फजरची नमाज आणि त्यानंतर तज्ज्ञ शिक्षकांकडून योगाचे वर्ग घेण्यात येणार होते. आठवडाभर सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले.
    दुसर्‍या दिवशी कुरआन पठणानंतर महत्त्वाच्या विषयांमध्ये ’दुआ’ या विषयावर आबीद अन्वर फारूकी (बिहार) त्यानंतर ’हया’ (लज्जा) या विषयावर मुहम्मद अहेमद (पंजाब) त्यानंतर ’आर्थिक स्थैर्य’ यावर शेख अन्वर (मुंबई) व त्यानंतर ’वैवाहिक जीवन ’ या विषयावर श्रीमती फय्याजुन्निसा (तेलंगना) त्यानंतर ’हदीसचा अभ्यास आणि महिलांची कामगिरी’ या विषयावर मौलाना वलीउल्लाह सईदी फलाही यांनी आपले विचार व्यक्त केले.
    तिसर्‍या दिवशी कुरआन पठणानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टीने प्रकाश टाकण्यात आला. त्यात प्रथमतः ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नेतृत्व’ यावर जावेद मुहम्मद (पूर्व उत्तरप्रदेश) त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे राज्य’ यावर मुन्नवर पाशा (कर्नाटक), त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नियोजन’ यावर मुहम्मद बशीरोद्दीन (तेलंगना) त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि संगोपनातील कौशल्य’ या विषयावर श्रीमती नफिसा अतीक (महाराष्ट्र), त्यानंतर ’प्रेषित सल्ल. यांच्या जीवनावर असलेल्या दुर्लभ पुस्तकांचा परिचय’ या विषयावर एस.अमीनुल हसन (उपाध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद) यांनी तर ’कायद्याविषयी जागरूकता’ या विषयावर माझे (एम.आय.शेख,लातूर-महाराष्ट्र)) भाषण झाले. त्यानंतर दुपारून  जमाअतच्या प्रकाशन विभागातील ’रेडियन्स’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचे अवलोकन करण्याची संधी मिळाली.
    चौथ्या दिवशी कुरआन पठणानंतर प्रोजेक्टरद्वारे एक व्हिडीओ दाखविण्यात आला, ज्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी जमाअतला 29 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने जे भाषण दिले होते तो युट्यूबर उपलब्ध असलेला ऑडिओ ऐकवण्यात आला. त्यानंतर ’जमाअत-ए-इस्लामी हिंदचा इतिहासाचा परिचय ’ नुसरत अली (अध्यक्ष, शैक्षणिक बोर्ड) यांनी करून दिला. तद्नंतर दुपारून इस्लामी साहित्य ट्रस्ट द्वारे चालवल्या जाणार्‍या मधूर संदेश संगम या संस्थेला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेण्यात आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे इतर नियमित कार्यक्रम पार पडले.
    पाचव्या दिवशी कुरआन पठणानंतर ’इस्लामची आत्मचिंतनाची पद्धती’ या विषयावर मौलाना रजिऊल इस्लाम नदवी यांचे भाषण झाले. त्यानंतर चार विषयावर ग्रुप डिस्कशन (सामुहिक चर्चा) घडवून आणण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांचे चार गट करण्यात आले. पहिल्या गटाला, ’ दिल की दुनिया कैसे बदले?’ दुसर्‍या गटाला ’हम अपनी सलाहियतों को कैसे पहेचाने?’ तिसर्‍या गटाला ’गौर और फिक्र की आदत कैसे पैदा करें?’ आणि चौथ्या गटाला ’तआल्लुक बिल्लाह को कैसे मजबूत करें?’ या विषयावर चर्चा घडविण्यात आली.
    सहाव्या दिवशी कुरआन पठणानंतर ’भारतीय राजकारण’ या विषयावर राजकीय विश्‍लेषक रिजवान एहसन यांचे भाषण झाले. त्यानंतर ’हिंदू सनातन धर्माचा परिचय’ या विषयावर स्वामी लक्ष्मीशंकर आचार्य यांचे भाषण झाले. त्यानंतर ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन व्हिजन 2026 या संस्थेला भेट देऊन संस्था देशभरात करत असलेल्या समाजकार्याची माहिती देण्यात आली.   
    सातव्या म्हणजे शेवटच्या दिवशी कुरआन पठणानंतर ’मध्यपुर्वेतील मुस्लिम देशांचा परिचय’ या विषयावर जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचे प्रा. जावेद अहेमद खान यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी अनेक आश्‍चर्यकारक खुलासे केले. 1930 च्या दशकात ब्रिटीश अभियंत्यांना सउदी अरबच्या जमिनीमध्ये तेल असल्याचा अंदाज आला. त्यावर त्यांनी शोध करून काळेकुट्ट बेंदाडासारखा एक पदार्थ शोधून काढला. एका बॅरेलला दोन डॉलर रॉयल्टी देउन त्यांनी सउदी राजाला खुश केले. दोन अमेरिकी डॉलर प्रती बॅरल बेंदाडाचे मिळत असल्याचे पाहून सउदी राजा आनंदीतच नव्हे तर संतुष्ट झाला आणि त्याने ’अहलन सहलन मरहबा’ म्हणत ब्रिटीशांचे स्वागत केले. या गोष्टीचा अंदाज येताच अमेरिकनही सउदी अरबमध्ये पोहोचले आणि मोठ्या प्रमाणात क्रुड ऑईलचे साठे शोधून काढले. जवळ- जवळ 1973 पर्यंत अमेरिका आणि ब्रिटीश लोकांनी 2 डॉलर रॉयल्टीवर अमाप क्रुडतेलाचा साठा उपसून आपल्या देशात नेला आणि युरोप आणि अमेरिकेची जी प्रगती आज दिसते आहे, ती याच काळात जवळ-जवळ फुकटात मिळालेल्या तेलाच्या बळावर झालेली आहे.
    दरम्यानच्या काळात सउदी तरूण युरोप आणि अमेरिकेमध्ये भ्रंमतीसाठी जावू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडून जे बेंदाडवजा रसायन हे लोक घेवून येत आहेत ते सोन्यापेक्षाही जास्त मुल्यवान असे पेट्रोलियम पदार्थ आहेत. तेव्हा त्यांना जाग आली आणि त्यांनी ओपेकचे गठन केले. मग 1974 ला दोन डॉलर रॉयल्टी स्विकारण्यास त्यांनी इन्कार केला आणि क्रुड ऑईलची विक्री सुरू केली. तेव्हा दोन डॉलर प्रती बॅलर तेलाची किंमत एकदम 100 डॉलर प्रती झाली आणि येथून सउदी अरब सहीत खाडीच्या देशांच्या आर्थिक प्रगतीला सुरूवात झाली. त्यानंतर सउदी अरब व्यतिरिक्त खाडीच्या इतर देशांमध्येही तेलाचे साठे शोधण्यास सुरूवात झाली आणि इराक, इराण, सीरिया, लेबनान इत्यादी मुस्लिम देशांमध्ये प्रचंड तेलाचे साठे मिळून आले. आणि जगाने त्या हदीसला प्रत्यक्ष रूपाने प्रकट होताना याची देही याची डोळा पाहिले की, ज्यात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी भाकित केले होते की, ”एक दिन सरजमीने अरब सोना उगलेगी”
    मात्र तेलाच्या या अमुल्य अशा खजीन्यावर युरोप आणि अमेरिकेने नियंत्रण मिळविले होते. ते आजही काही प्रमाणात तसेच आहे. जेव्हा खाडीच्या अरब देशांनी अमेरिका आणि युरोपच्या पंजातून आपल्या तेलाची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भोळ्या अरबांना आपसात लढवून अमेरिकेने अनेक सशस्त्र गट त्यांच्यात तयार केले. इराक आणि इराण मध्ये युद्ध घडवून आणले. इराक आणि लिबिया यांना उध्वस्त करून टाकले. तेलावर नियंत्रण मिळविण्याच्या रणनितीचा हा एक भाग होता.
    या भाषणानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे अनुभव कथन करण्यात आले, त्यात एकतास प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. शेवटी अमीरे जमाअत सआदतुल्लाह हुसैनी यांच्या समारोपाच्या भाषणाने प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली. याप्रसंगी अमीरे जमाअत यांनी आपल्या दुआमध्ये देश आणि देशातील सर्व लोकांच्या प्रगतीची कामना केली.
    एकंदरित प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने देण्यात आले. त्यात सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय विषयांचा समावेश असल्याने अतिशय समर्पक अशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या. सातत्याने पहाटे तहाज्जुदची नमाज अदा केल्यामुळे तसेच कुरआनच्या विविध पैलूंवर नियमित प्रकाश टाकला गेल्यामुळे एका प्रकारचा अध्यात्मिक आनंद मिळाला. आत्मिक उन्नती झाल्याचा अनुभव आला.

- एम.आय.शेख

माननीय आयशा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना काही नमाजींमध्ये ही दुआ करताना ऐकले, ‘‘अल्लाहुम्मा हासिब्नी हिसाबयं यसीरा’’ (हे अल्लाह! माझ्याकडून सोपा हिशोब घेतला जावा.) तेव्हा मी विचारले, ‘‘सोप्या हिशोबाचा अर्थ काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सोपा हिशोब म्हणजे अल्लाहने आपल्या दासाचे कर्मपत्र पाहावे आणि   त्याच्या वाईट कर्मांना क्षमा करावी.’’ मग म्हणाले, ‘‘हे आयशा! एखाद्याचा हिशोब घेताना एकेका गोष्टीची सखोल चौकशी केली तर त्याचे काही खरे नाही.’’ (हदीस मुसनद अहमद)

स्पष्टीकरण
पवित्र कुरआन आणि दुसऱ्या हदीसींमध्ये स्पष्टपणे अशी शुभवार्ता देण्यात आली आहे की जे लोक अल्लाहच्या मार्गाचा अवलंब करतात आणि दुराचाराच्या शक्तींशी सामना करीत  राहतात, इतकेच नव्हे तर लढता लढता त्यांच्या जीवनाची अवधी संपून जातो, तेव्हा अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह त्याच्या चुका क्षमा करील आणि पुण्यकर्मांची दखल घेऊन  त्यांना स्वर्गात स्थान देईल.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले ‘यौमइ़िजन तुहद्दिसु अ़खबारहा’ (त्या दिवशी जमीन आपल्या सर्व स्थितींचे विवरण  करील) आणि सहाबा (रजि.) (पैगंबरांचे सहकारी) यांना विचारले, ‘‘स्थितीचे विवरण करण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय?’’ लोकांनी म्हटले, ‘‘अल्लाह आणि त्याचे  पैगंबर यांनाच त्याचे ज्ञान आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जमीन अंतिम निवाड्याच्या दिवशी साक्ष देईल की अमुक पुरुष अथवा अमुक स्त्रीने माझ्या पाठीवर अमुक दिवशी आणि अमुक  समयी सत्कर्म अथवा दुष्कर्म केले.’’ हाच अर्थ आहे या आयतीचा. लोकांच्या या कर्मांना वरील आयतीत ‘अ़ख्बार’ म्हटले गेले आहे. (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो आणि विचारले, ‘‘त्या दिवशी ज्याच्या बाबतीत अल्लाहने म्हटले आहे, ‘‘यौमा यकूमुन्नासु लिरब्बिल आलमीन’’ (तू त्या दिवसाच्या बाबतीत विचार कर जेव्हा लोक हिशोब देण्यासाठी जगाच्या पालनकत्र्यासमोर हजर होतील) त्या दिवशी कोण लोक उभे राहू शकतील बरे (जेव्हा तो एक दिवस हजार वर्षांइतका असेल)?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘(त्या दिवसाची कठोरता गुन्हेगार आणि बंडखोरांसाठी आहे, त्यांना तो एक दिवस हजार वर्षांइतका   वाटेल. संकटात सापडलेल्या मनुष्याचा दिवस मोठा असतो, जाता जात नाही.) तो दिवस ईमानधारकांसाठी लहान असेल, फक्त लहानच नाही तर फर्ज नमाज (अनिवार्य प्रार्थना) सारखा  त्याच्या डोळ्यांत गारवा बनून राहील.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
‘कचरा ठेवण्याचे ठिकाण’ म्हणजे ती लहानशी जागा आहे जेथे मनुष्य आपले अंथरुण टाकून पहुडलेला असतो. अर्थात अल्लाहच्या ‘दीन’- जीवनधर्माचे अनुसरण करताना एखाद्याचे  जगच नष्ट झाले, सर्व सामानसुमानापासून वंचित झाला आणि त्या बदल्यात स्वर्गातील मर्यादित आणि लहानशी जमीन मिळाली तर हा फारच क्षुल्लक सौदा आहे, नाशवंत वस्तूच्या  बलिदानाच्या परिणामस्वरूप अल्लाहने त्याला ती वस्तू दिली जी निरंतर राहणारी आहे.

इस्लामवर आरोप करणारे काही भ्रमिष्ट लोक असे म्हटल्याचे ऐकण्यात आहे, की इस्लामी जीवनपद्धत आधुनिक युगाच्या गरजांशी व निकडींशी एकरुप नाही. म्हणून वर्तमान युगातील लोकांना इस्लाम स्वीकारार्ह होऊ शकत नाही. इस्लामचे आदेश केवळ गतकाळाकरिताच होते व आता त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. इतकेच नाही तर प्रगतीच्या मार्गात ते अडथळा होऊन राहिले आहेत, असे त्यांना वाटते ते असे म्हणतात,
  1. व्याज (जी सध्याच्या काळी एक अनिवार्य आर्थिक गरज आहे) देण्याघेण्याला तुम्ही अजून गैर व बेकायदा असे मानता काय?
  2. जकातची रक्कम ज्या वस्तीत गोळा केली जाते, तिचा खर्च निश्चितपणे तेथील रहिवाशांच्याच कल्याणासाठी करावयास हवा काय? पहिली गोष्ट अशी की जकात एक जुनाट व मागासलेली पद्धत आहे व त्यामुळे वर्तमान सरकारच्याही गरजा पुऱ्या होऊ शकत नाहीत. तसेच दुसरी गोष्ट अशी की एखाद्या गावात अगर शहरातील श्रीमंत लोकांकडून गोळा केलेली जकात, तेथील गरिबांना जेव्हा वाटली जाते तेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. कारण त्यांच्या दृष्टीने त्या पैशांचा दर्जा ‘दाना’ पेक्षा काही अधिक नसतो.
  3. तुम्ही मदिरापान, जुगार, स्त्रीपुरुषाचे अनिर्बंध मिसळणे, नाचगाणी, बाई ठेवणे, कामविलास या सर्व गोष्टींवर बंधने घालून त्यांना अवरोध करु इच्छिता? या सर्व गोष्टी तर सामाजिक जीवनात अनिवार्य गरज होऊन राहिल्या आहेत.
    इस्लाम व्याज वर्ज्य करतो हे बरोबर आहे; पण व्याज ही एक आवश्यक निकड विवशता आहे. असे म्हणणे चुकीचे आहे. आजसुद्धा जगात दोन प्रकारच्या जीवनपद्धती इस्लाम व कम्युनिझम अस्तित्वात आहेत. ह्या दोन्ही व्याजावरील आधारलेली आर्थिक व्यवस्थेचा स्वीकार करत नाहीत. दोहोंत फरक एवढाच आहे की कम्युनिझमजवळ आपल्या दृष्टिकोनानुसार आचरण करण्यासाठी व जीवनाला त्याच्या नुसार आकार देण्यासाठी अनिवार्यपणे लागणारी शक्ती तसेच सत्ताही आहे व इस्लामला अशी शक्ती किवा सत्ता प्राप्त नाही. इस्लामला वास्तविक सत्ता प्राप्त असती तर व्याज ही अनिवार्य आर्थिक गरज नाही, हे त्याने शिकविले असते. इस्लामी आर्थिक व्यवस्था व्याजावर उभारली जात नाही, जशी आज रशियाची आर्थिक व्यवस्था व्याजावर उभारलेली नसून व्याजापासून पूर्णपणे मुक्त होऊन उभी आहे.
कोणत्याही दृष्टीने व्याज ही वर्तमान युगाची अनिवार्य आर्थिक गरज आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. जर ती अनिवार्य आवश्यकता असेल तर ती भांडवलदारांकरिताच आहे. कारण त्याच्या शिवाय ते भांडवलशहा होऊच शकत नाहीत. खुद्द पश्चिमेतील काही अर्थतज्ञाच्या शिरोमणीचाही व्याजाला विरोध आहे. ते आम्हाला अशी चेतावनी देत आहेत, व्याजावर जर प्रतिबंध लावला गेला नाही तर हळूहळू सर्व संपत्ती एकवटून काही लोकांच्याच हातात साठली जाईल. गरीब जनता आर्थिकदृष्ट्या बरबाद होऊन ते भांडवलशहांच्या अधीन होऊन त्यांचे गुलाम बनतील. पश्चिमेतील भांडवलशाहीच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांत अर्थतज्ञांचे हे मत अगदी खरे असल्याचे दिसून येते. व्याज व मक्तेदारी पद्धत, जे भांडवलवादांचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत या दोहोंना जेव्हा भांडवलवादाचे अस्तित्वही नव्हते, तेव्हा आजपासून सुमारे चौदा हजार वर्षांपूर्वीच इस्लामने व्याज वर्ज्य असल्याची घोषणा करुन टाकली आहे. इस्लामी जीवनपद्धतीला अवतरित करणारा सर्वशक्तिमान व सर्वज्ञ अल्लाह आहे व तो मागच्या पुढच्या सर्व पिढ्यांतील लोकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवतो व व्याजापासून कोणते बिघाड, आर्थिक दोष व पेच निर्माण होऊ शकतात हे तो चांगले जाणतो.
ज्या देशातील आर्थिक व्यवस्था परकीय मदतीवर अवलंबून असते त्याच्या बाबतीत तर व्याज ही एक मानहानीकारक बाब होऊ शकते, पण इस्लामी अर्थव्यवस्था स्वतंत्र असते आणि स्वंतत्र निकोप पायावर उभारलेली व आधारलेली असते. इतर देशांशी त्याचे संबंध समानतेच्या तत्त्वावर आधारलेले असतात. ते जीहुजुरीवर, आज्ञापालनावर किवा दास्यत्वावर नसतात. त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीत मार्गदर्शन त्या इस्लामी आदेशानुसार व तत्त्वानुसार करतो जे व्याज निषिद्ध व वर्ज्य ठरवितात. या सिद्धान्तांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामी अर्थव्यवस्था आत्सित्वात येते, तिला जगात प्रगती व श्रेष्ठत्वाच्या ध्वजाचे स्वरुप असते.
जकातसंबंधी या अगोदर दाखवून दिले आहे, की हुकूम आहे व तो असा हक्क आहे ज्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्यावर असते.
या प्रकरणात आम्ही जकातसंबंधी असणाऱ्या त्या शंकेचे उत्तर देऊ इच्छितो जी तिच्या स्थानिक बाबतीत म्हणजे जेथे जकात गोळा केली जाते, तेथील गरजू लोकांतच तिचे वाटप व्हावे, या नियमावर केली जाते.
येथील बहुतेक विद्वान पश्चिमेकडून आणलेल्या प्रत्येक व्यवस्थेला व पद्धतीला सुधारणांचे परमोच्च बिदू मानून त्यांना कवटाळीत असतात. ही अत्यंत खेदजनक अवस्था होय. पण तीच गोष्ट जर इस्लामने त्यांच्यापुढे ठेवली तर तिला ते प्रतिगामित्व व अंधश्रद्धा समजू लागतात.
या विद्वानांना, या गोष्टीची आठवण करुन देणे इष्ट ठरेल की, संयुक्त राज्य अमेरिकेची शासकीय चौकट पूर्णतः विकेंद्रीकरणावर आधारलेली आहे. संयुक्त राज्य अमेरिका व त्यामधील राज्यातील प्रत्येक गाव व वस्ती आपल्या सामान्य व्यवस्थेबाबत आर्थिक, राजनैतिक व सामाजिक दृष्टीने स्वयंपूर्ण व स्वतंत्र असते. या स्वतंत्र घटकांच्या नगरपरिषदा आपल्या हद्दीतील रहिवाशांवर कर लागू करतात, ते वसूल करतात व मग आपल्या गावाच्या अगर वस्तीच्या शैक्षणिक, औषधोपचार, परिवहन तसेच इतर सार्वजनिक कार्यावर गरजेनुसार तो खर्च करतात. हा सर्व खर्च करुन काही शिल्लक उरली तर ती राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवून त्यांच्या ताब्यात देऊन टाकतात. या उलट जर गावाचा एकंदर खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असेल तर राज्याकडून तुटीची भरपाई करण्यात येते. निस्संशय ही एक चांगली पद्धत आहे. यात भिन्न मानवी प्रयत्नांना सुरेखपणाने एकवटून खर्चाचा एकंदर भार विभागला जातो व हा सर्व भार एकट्या केंद्रसरकारला वाहावा लागत नाही. या शिवाय खर्चाचा विनिमय, स्थानिक लोकांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या सर्व गरजाही चांगल्यारितीने पुऱ्या होत असतात. कारण स्थानिक मंडळी आपल्या हद्दीतील गरजा केंद्रापेक्षा अधिक चांगल्या रितीने जाणत असतात.
आमच्या देशातील विद्वान, अमेरिकेच्या या पद्धतीची फार प्रशंसा करतात, पण हीच पद्धत इस्लामने तेराशे वर्षापूर्वी स्थापन केली होती ही गोष्ट ते विसरुन जातात. प्रत्येक गावातील पदाधिकारी आपापल्या गावात कर वसूल करीत असत व त्यातून गावाच्या गरजा पुऱ्या करीत असत. खर्च व उत्पन्न यांत जी तफावत असे, त्यात शिल्लक असल्यास राज्याच्या खजिन्यात जमा करीत व तूट असल्यास राज्याकडून कर्जांच्या रुपाने रक्कम घेतली जात असे.
आता उरली जकात वाटपाची समस्या, तर या बाबतीत आम्ही या आधी असे सांगितलेले आहे, की जकात निश्चितपणे रोख रकमेत अथवा असेल त्या स्वरुपात लोकात वाटली गेली पाहिजे, असे सिद्ध करणारे कोणतेही कलम आमच्या कायद्यात नाही. जकात गरिबांच्या शिक्षणासाठी, औषधासाठी व सामाजिक सुखसोईसाठीही खर्च केली जाऊ शकते व त्यातून जे वार्धक्यामुळे, अशक्तपणामुळे व अल्पवयामुळे कामे करण्यास विवश आहेत अशा गरजूंना रोख आर्थिक मदतही दिली जाऊ शकते.
आम्ही आपल्या देशात असे लहान लहान शासकीय घटक स्थापावे, जे राज्यात इस्लामी जगतात व जगाच्या सामूहिक व्यवस्थेत राहून आपल्या स्थानिक समस्या व आर्थिक बाबींची स्वतः देखरेख करुन स्थानिक लोकांच्या गरजा भागविण्यास जबाबदार होतील. असे आज जर इस्लामचे आर्थिक सिद्धान्त वर्तमान समाजात स्थापू इच्छिले तर त्या उद्देशाकरिता आम्हाला फार काही करावे लागणार नाही.

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवन संदेश' जग प्रसिद्ध इस्लामी धर्म पंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानव पीढीला महान मार्गदर्शक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनादर्शाची नितांत आवश्यकता आहे.
    वाचकाने पूर्वग्रह दुषितपणा, संकुचितपणा व मानसिक गुलामी झुगारून पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जीवन संदेश समजण्यासाठी ही पुस्तिका लाभदायी आहे.
   
आयएमपीटी अ.क्र. 154      -पृष्ठे - 24    मूल्य - 16   आवृत्ती - 6 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/lzcqp08tgwu0s2rzj87rtnc1gtq13g5h


चर्चा करताना एक सज्जन उद्गारले, ‘तुम्ही अतिसंकुचित दृष्टीचे व जुन्या चाकोरीतून जाणारे आहात.
‘का?’ मी विचारले.
‘तुम्ही ईश्वराचे अस्तित्वावर ईमान (विश्वास) बाळगता काय?’
‘निश्चितपणे.’
‘त्याची उपासना करता व रोजे (उपवास) करता काय?’
‘अगदी खरे.’
‘छान! मग माझे म्हणणे बरोबर आहे. तुम्ही संकुचित दृष्टीचे व जुन्या चाकोरीतून जाणारें आहात.’
त्यावर मी विचारले, ‘आम्ही संकुचित दृष्टीचे असून जुन्या चाकोरीतून जाणारे आहोत. हे तुम्ही कशावरुन म्हणू शकता?’
‘कारण ज्या गोष्टींवर तुम्ही श्रद्धा ठेवता त्या सर्वच्या सर्व अगदी निरर्थक बडबड व निराधार गोष्टी आहेत, त्यांना कसलीही वास्तवता व अस्तित्व नाही.’
मी विचारले, ‘तुम्ही कोणत्या गोष्टीवर ईमान (श्रद्धा) बाळगता?’
‘ही सृष्टी कोणी निर्माण केली आणि जीव व अस्तित्व कोणी प्रदान केले?’
‘निसर्गाने.’
‘पण निसर्ग म्हणजे काय?’
‘ती प्रकृतीची दडलेली व अमर्यांद अशी शक्ती आहे, जिचे ज्ञान आम्हाला ज्ञानेंद्रियामार्फत होते.’
यावर मी म्हटले, ‘तुम्ही मला अदृष्य शक्ती (ईश्वर) च्या आदेशाधीन होण्यापासून अडवून, मला त्यासदृष्य एका अनभिज्ञ व रहस्यमय शक्ती (प्रकृती) ची आज्ञापालन करणारा बनवू इच्छिता काय? पण प्रश्न असा आहे की ज्यामध्ये मला सर्व प्रकारचे मानसिक व शारीरिक सुख व समाधान तसेच शांती लाभते, त्याला सोडून शेवटी मी या तुमच्या खोट्या उपास्याकडे-प्रकृतीकडे कशाकरिता शरण जाऊ? ती माझी कोणतीही गरज भागवू शकत नाही की माझ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्याची तिच्यांत ताकद नाही?’
या संक्षिप्त संभाषणातून विचारस्वातंत्र्याचे प्रतिपादन करणाऱ्या प्रगतिवाद्यांच्या बुद्धीचा अंदाज सहज केला जाऊ शकतो. त्यांच्या विचार स्वातंत्र्याचा अर्थ असा की इस्लामने आपल्या वास्तविक उपास्यापासून तोंड फिरवावे, पण हा नास्तिपणा असून त्याला विचारस्वातंत्र्य हे नाव कदापिही दिले जाऊ शकत नाही. जे विचारस्वातंत्र्य माणसाला नास्तिकपणाच्या ओटीत टाकते. तसले विचारस्वातंत्र्य, इस्लाम माणसांना देत नाही, असा हे लोक इस्लामवर आरोप करतात. पण प्रश्न असा आहे की विचारस्वातंत्र्य व निरीश्वरवाद वा नास्तिकपणा या दोहोंचा अर्थ एक आहे काय?
युरोपच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करताना हे सत्य ते विसरतात की युरोपातील काही परिस्थितीच्या कारणास्तव तेथे जर निरीश्वरवादाची वाढ झाली असली तरी त्यावरुन जगात सर्वत्र तशीच परिस्थिती असेल व त्याचप्रमाणे निरीश्वर्वाद व नास्तिकपणा वाढेल, असे हे लोक समजतात हीच खरी चूक आहे.
युरोपवासी लोकांसमोर चर्चने ख्रिश्चन धर्माचे जे विचार मांडले, वैज्ञानिक तथ्यांना खोटे ठरविण्याचा जो प्रयत्न केला व विज्ञान शास्त्राचा जो छळ केला; तसेच खोट्या व अंधविश्वासरुपी अंधकाराला ईशधर्म म्हणून जे नाव दिले, या सर्व गोष्टीचा एकंदर परिणाम असा झाला की स्वतंत्र विचारांचे युरोपतील विचारवंत निरीश्वरवादाच्या ओढ्यात जाऊन पडले. कारण त्यांच्या पुढे परस्परांविरुद्ध असलेले जे दोन दृष्टिकोन होते. त्यापैकी एकाचा स्वीकार करण्याखेरीज त्यांना कसलाही मार्ग उरला नव्हता. म्हणून त्यांनी ईश्वरावरील स्वाभाविक श्रद्धेच्या मार्गांचा त्याग करून विज्ञान आणि त्याने दिलेल्या गोष्टीवर श्रद्धा व विश्वास ठेवला. चर्चने युरोपला ज्या द्विधा अवस्थेत आणून सोडले होते त्यापासून काही अंशी सुटका करून घेण्याचा केवळ हाच मार्ग तेथील विचारवंताना दिसला. सारांश असा की चर्चच्या वर्चस्वापासून बाजूला झाल्याची घोषणा उघडपणे करताना त्यांनी म्हटले की, ‘ज्याच्या नावाने तुम्ही आम्हाला दास बनवून ठेऊ इच्छिता अशा ईश्वरापासून आम्ही दूर राहतो. आमच्यावर असह्य कर्तव्यांचे डोंगर लादता व आमची तडकाफडकी मुस्कटदाबी करुन दडपून ठेवता. तुमच्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा होतो, की आम्ही जगाचा परित्याग करुन अरण्यात निर्जन ठिकाणी वास्तव्य करावे. आम्हाला असा ईश्वर व असे निवासस्थान नको आहे. त्याऐवजी आता आम्ही आमच्याकरिता एक नवीन ईश्वर बनवू, त्यात तुमच्या ईश्वराचे सर्व गुण असतील तरीही त्याच्याकडे आम्हाला गुलाम बनवून ठेवण्यासाठी, चर्चप्रमाणे कोणतीही व्यवस्था नसेल. तसेच तो आमच्यावर कोणतीही नैतिक, आध्यात्मिक व भौतिक बंधने घालणार नाही, जी तुमच्या ईश्वराची ठळक वैशिष्ट्ये आहेत.’

माननीय अबु सईद खुदरी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी ऐशोआराम आणि निष्काळजीपणाचे जीवन कसे व्यतीत करू शकतो, जेव्हा इसराफील (अ.)   (अंतिम निवाड्याच्या (कयामतच्या) दिवशी जो मृतात्म्यांना जागे करण्यासाठी सूर नावाची तुतारी फुंकणार आहे तो देवदूत.) सूर (तुतारी) हातात घेऊन, कान लावून, मान झुकवून वाट पाहात आहेत की केव्हा आदेश येतो सूर फुंकण्याचा? (अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या तुतारीची हकीकत कोणाला कशी कळणार?)’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर (स.)! मग  आमच्यासाठी तुमचा काय आदेश आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘याचे पठण करीत राहा- ‘हसबुनल्लाहु व निअमल-वकील.’ (अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो योग्य कार्य  घडविणारा आणि देखरेख करणारा आहे.)’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांची अस्वस्थता आणि काळजी पाहून आणि अधिकच उद्विग्न झाले आणि विचारले, ‘‘जर आपली ही स्थिती आहे तर आमची काय स्थिती होईल? सांगा,  आम्ही काय करावे जेणेकरून त्या दिवशी सफल होऊ.’’ पैगंबरांनी त्यांना सांगितले, ‘‘अल्लाहवर विश्वास ठेवा, त्याच्या देखरेखीत जीवन व्यतीत करा, त्याच्या दासत्वात जीवन व्यतीत  करणारे सफल होतील.’’

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, (अंतिम निवाड्याच्या दिवशी) एक दास अल्लाहच्या समोर येईल, अल्लाह त्याला विचारील, ‘‘हे  अमुक माणसा, मी तुला प्रतिष्ठा दिली नव्हती काय? तुला पत्नी दिली नव्हती काय? तुझ्या ताब्यात घोडे आणि उंट दिले नव्हते काय? आणि मी तुला अवधी दिला नव्हता काय? तू  तुझे राज्य चालवित होता आणि लोकांकडून कर वसूल करीत नव्हता काय?’’ तो त्या ईशदेणग्यांचा स्वीकार करील. मग अल्लाह त्याला विचारील, ‘‘तुला एक दिवस माझ्यासमोर हजर  व्हावे लागेल, असे तुला वाटत होते काय?’’ तो म्हणेल, ‘‘नाही.’’ मग अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘ज्याप्रकारे तू मला जगात विसरला होतास, तसेच आज मी तुला विसरेन.’’ मग असाच   एक दुसरा मनुष्य (अंतिम निवाड्याचा दिवस नाकारणारा) अल्लाहसमोर हजर होईल आणि त्यालादेखील वरीलप्रमाणे प्रश्न केले जातील. मग एक तिसरा मनुष्य हजर होईल आणि  अल्लाह त्यालाही तेच प्रश्न विचारील जे पूर्वीच्या दोन्ही मनुष्यांना (जे सत्य नाकारणारे होते) विचारले होते, तेव्हा हा तिसरा मनुष्य उत्तर देईल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझ्यावर, तुझ्या ग्रंथावर आणि तुझ्या पैगंबरांवर ईमान बाळगले होते, मी नमाज (प्रार्थना) अदा करीत होतो, रोजे (उपवास) करीत होतो, तुझ्या मार्गात माझी संपत्ती खर्च करीत होतो.’’ (पैगंबर  मुहम्मद (स.) पुढे म्हणाले,) आणि अशाचप्रकारचे पूर्ण क्षमतेने आपले आणखीन अनेक पुण्यकर्म सांगेल, तेव्हा अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘थांब, पुरे झाले.’’ मग अल्लाह म्हणेल, ‘‘आम्ही  आता तुझ्याविरूद्ध साक्ष देणाराला बोलवितो.’’
तेव्हा तो आपल्या मनातल्या मनात विचार करील की माझ्याविरूद्ध साक्ष देणारा हा कोण असेल. मग त्याचे तोंड मोहोर लावून बंद केले जाईल. (कारण तो अल्लाहसमोरदेखील खोटे बोलायला मागेपुढे पाहणार नाही, ज्याप्रमाणे जगात पैगंबर आणि ईमानधारकांच्या समोर निर्लज्जपणे खोट्या पवित्रतेचा डांगोरा पिटत होता. मग त्याच्या मांड्या, मांस आणि हाडांना  विचारले जाईल तेव्हा ते सर्व त्या व्यक्तीची एक-एक लबाडी व्यवस्थितपणे सांगतील. मग अशाप्रकारे अल्लाह अनावश्यक संभाषणाचा दरवाजा बंद करील.’’
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हा तोच मनुष्य आहे ज्याने जगात धर्मद्रोह केला आणि हा तोच मनुष्य आहे ज्यावर अल्लाहचा कोप झाला.’’ (हदीस : मुस्लिम)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget