Latest Post

one message
‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची घटिका आणि तरीसुध्दा ते गाफीलच आहेत. त्यांच्याजवळ जो उपदेश त्यांच्या पालनकर्त्याकडून येतो, त्याला संकोचाने ऐकतात आणि दुर्लक्ष करतात. त्यांचे मन जगाच्या खेळ-तमाशात दंग आहे. अत्याचारी आपापसात कानगोष्टी करतात की, ‘हा इसम खरे तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे. मग तुम्ही डोळ्यादेखत जादूच्या फंद्यात अडकणार काय?’ प्रेषितांनी उत्तरादाखल सांगितले, माझा पालनकर्ता ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत आहे. तो ऐकणारा व जाणणारा आहे.’’(कुरआन २१:१-४)
ह्या कुरआनच्या सुरह क्र.२१(अंबिया) च्या प्रारंभिक पंक्ती आहेत. यातील पहिलेच वाक्य ‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची वेळ’’ आश्चर्यचकीत करणारे आहे. प्रत्येक मुस्लिमाचा परलोकावर विश्वास असतो. मरणोत्तर जीवनावर विश्वास इस्लामची एक बंधनकारक अट आहे. त्याशिवाय मनुष्य मुस्लिम होऊ शकत नाही. परलोकाचा अर्थ असा आहे की, हे जग एकेदिवशी संपुष्टात येऊन नवीन जग अस्तित्वात येईल. तेथे प्रारंभापासून तर शेवटपर्यंत सर्व मानवजात अल्लाहसमोर हजर होईल. मानवांच्या संपूर्ण आयुष्याचे लेखापरीक्षण होईल. त्यानुसार त्यांना योग्य मोबदला किवा शिक्षा मिळेल. दोन्ही कायमस्वरूपी राहतील. ज्या दिवशी ह्या जगाचा अंत होईल व परलोकाचे जग अस्तित्वात येईल तो दिवस अंतिम निवाड्याचा दिन असेल.
परलोकावरील श्रद्धेचा ईश्वरावरील श्रद्धेशी धनिष्ठ संबंध आहे. ईश्वर आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा नकार तोच करेल जो ईश्वराच्या अस्तित्वाला नकार देतो. कोणी ईश्वरास मान्य करावे व परलोकास अमान्य करावे हे असंभव आहे. बुद्धी याचा स्वीकार करत नाही. ईश्वर असेल तर एक दिवस असा यावयास पाहिजे की, ज्या दिवशी हे पाहिले जाईल की, कोणी ईश्वरास मान्य केले व कोणी अमान्य? ज्याने ईश्वरास मान्य केले त्याने त्याचे आज्ञापालन केले किवा नाही? ज्याने त्यास नकार दिला तर तो का दिला व आयुष्यभर त्याच मार्गावर मार्गक्रमण का केले? यावरच ही गोष्ट समाप्त होऊ नये, तर ही गोष्टही बुद्धीसंगत आहे की, पृथ्वी व आकाशांचा निर्माता व समस्त जगाचा सम्राट याच्या आदेशाचे ज्याने आज्ञापालन केले व त्यासाठी सर्व प्रकारचा त्रास सहन केला, तर त्याला ऐश्वर्य व पुरस्काराने सन्मानित केले जावे. हा पुरस्कार त्याच्याकडून असावा व त्याच्या महान प्रतिमेस साजेसा असावा ज्याच्या आदेशाचे मानवाने पालन केले व ज्याच्या आदेशाच्या उल्लंघनापासून स्वतःस सुरक्षित ठेवले. त्याचप्रकारे ज्याने ईश्वरास नाकारले आणि संपूर्ण आयुष्य त्याच्या आदेशाविरुद्ध कार्य केले, त्याची चौकशी होऊन त्यास त्याच्या गुन्ह्याच्या स्वरुपाने शिक्षा मिळणे बुद्धिसंगत आहे.
परलोकावरील श्रद्धेचा आमच्या जीवनाशी धनिष्ठ संबंध आहे आणि ती जीवनाच्या सर्व अंगांना प्रभावित करते. परलोकावरील श्रद्धा ईश्वरावरील श्रद्धेस बळकट करते आणि त्यास एक शाश्वत सत्य बनवते. ती मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा मनुष्याला ईश्वराच्या अधिक निकट करते व ह्यामुळे एकीकडे ईश्वराविषयी मनात प्रेम निर्माण होते, तर दुसरीकडे ईशकोपाविषयी मनात भय निर्माण होते. परलोकध्यास, ईश्वराची शिक्षा, बक्षीस, दया, कृपा व त्याचा कोप याची सतत आठवण करून देतो. ही श्रद्धा त्याला कुकर्माच्या मार्गापासून रोखून धरते व त्यास ईश्वराच्या आज्ञापालनास बाध्य करते. ही परलोक श्रद्धा माणसात अल्लाहच्या बक्षिसांची ओढ निर्माण करते. ही श्रद्धा त्याच्या यातनांपासून निर्भय होऊ देत नाही. ही श्रद्धा आठवणीने मनास सदैव टवटवीत ठेवते.
परलोकावरील श्रद्धा ही काही निर्जीव बाब नाही. ही श्रद्धा अंतःकरणामध्ये अत्यंत शक्तिशाली व क्रांतिकारी बदल घडवत आहे. तसेच ही श्रद्धा हृदय व मस्तिष्क यामध्ये स्थान प्राप्त केल्यानंतर मनुष्याचा संपूर्ण कायापालट करून टाकते. त्याच्या जीवनास व चारित्र्यास पवित्रता तथा सन्मार्ग प्रदान करते आणि मनुष्य चांगल्या गोष्टींचा ध्वजवाहक बनतो, तसेच वाईट गोष्टींविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करतो. परलोकध्यास पुण्य आणि ईशपरायणतेचा आत्मा निर्माण करतो आणि कुकर्म व पाप याविषयी घृणा निर्माण करतो. ही श्रध्दा भोगवादी माणसात संयम, जबाबदारी व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करुन त्याचे लक्ष सतत मृत्युपश्चातच्या जीवनावर केंद्रीत करते. मनुष्यास अल्लाहच्या आदेशाचा अनुपालक त्याच्या मार्गदर्शनावर मार्गक्रमण करणारा व सत्यधर्माचा ध्वजवाहक बनवते. या श्रद्धेमुळे मनुष्य सन्मार्गाचा संरक्षक व त्याचा निमंत्रक बनतो. ही श्रद्धा मनुष्यामध्ये सत्याचा आदर व त्याची सेवा करण्याची भावना निर्माण करते व त्यासाठी आपले सर्वस्व पणास लावण्याची भावना निर्माण करते. यामुळे असा मनुष्य अस्तित्वात येतो ज्याचे चित्र कुरआनमध्ये अशा प्रकारे रेखाटले आहे की,
‘‘वास्तविकता जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या धास्तीने भयभीत होणारे असतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या आयतीवर(ईशग्रंथ) श्रद्धा ठेवतात. जे आपल्या पालनकर्त्याबरोबर कोणाला भागीदार बनवीत नाही आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात, जे काही देतात आणि त्यांच्या हृदयाचा या विचाराने थरकांप होत असतो की, आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे, तेच भल्या गोष्टीकडे धाव घेणारे आणि सरशी करून त्यांना प्राप्त करणारे आहेत. आम्ही कोणत्याही इसमावर त्याच्या आवाक्यापेक्षा जास्त ओझे लादत नसतो आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे जो(प्रत्येकाची स्थिती) यथायोग्य दाखविणारा आहे.’’(कुरआन २३ : ५७-६२)
जरा विचार करा! जर कोणास या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे व हा विश्वास त्याच्या अंतरंगामध्ये भिनला असेल की, मरणोपरांत एकेदिवशी त्याची विचारपूस होईल. एक-दोन दिवस किवा महिने दोन महिने नव्हे तर जेव्हापासून तो सज्ञान झाला तेव्हापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या संपूर्ण जीवनाच्या एक एक क्षणाचा हिशोब होईल. तर मग तो अंतिम दिवसासारख्या भयावह दिवसास कसा विसरेल? त्यास विसरुन कसे आयुष्य व्यतीत करेल? एखाद्या व्यापार्यास जर थोडीशी पूर्वसूचना मिळाली की, आयकर अधिकारी येणार आहे, तर तो घाबरून आपले लेखाविवरण अद्ययावत करून घेतो. यावरुन आपण विचार करू शकतो की, ज्या व्यक्तीला याचा पूर्ण विश्वास आहे की, त्याचे कोणतेही कृत्य अल्लाहपासून लपलेले नाही. तो त्याच्या प्रत्येक कृत्यावर नजर ठेऊन आहे. त्याच्या व अल्लाहच्या दरम्यान अंतरपाट नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्यावर सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. तो सर्व जाणणारा आणि प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणारा आहे. अंतिम दिवशी तो क्षणा-क्षणाचा हिशोब घेईल आणि मनुष्याच्या लहान-मोठ्या कृत्याचा त्यास मोबदला देईल, तर सांगा की, त्याचे आयुष्य बेफिकीर व बेसावध कसे व्यतीत होईल? त्यावर बेसावधगिरी व बेफिकिरी तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा तो अंतिम दिवसावर विश्वास ठेवणार नाही. ह्याची संभावना आहे की, अंतिम दिवसावर विश्वास असल्याचे तोंडी अभिवचन दिले जावे, मात्र त्याचे मन या विश्वासापासून रिक्त असावे, तर मग तो अंतिम दिवसाचा दावेदार असूनही अल्लाहपासून भयभीत होणार नाही. खर्या अर्थाने अंतिम दिवसाचे भय ज्याच्या मनी असेल त्याच्याबाबतीत असा विचार केला जाऊ शकत नाही की, तो अल्लाह व अंतिम दिवस विसरला असेल आणि त्याचे जीवन पाप व वाईट कृत्यामुळे कलंकित झाले असेल. तो या जगाच्या सर्व अडचणी, व्यस्तता यामध्येसुद्धा त्या दिवसाच्या भयाने भयभीत होईल. कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘(अल्लाहच्या या घरांत) असे लोक आहेत, ज्यांना व्यापार आणि खरेदी-विक्री अल्लाहच्या स्मरणापासून, नमाज प्रस्थापित करण्यापासून व जकात देण्यापासून बेसावध ठेवीत नाही. ते त्या दिवसाची भीती बाळगतात ज्या दिवशी हृदयात खळबळ माजण्याची व डोळे स्थिरावण्याची पाळी येईल.’’(कुरआन २४:३७)
अंतिम दिवसाची वेळ निश्चित आहे त्यास टाळले जाऊ शकत नाही. पृथ्वी, आकाश व संपूर्ण सृष्टी त्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहे. जो दिवस व्यतीत होत आहे तो प्रलयाच्या घटकेला जवळ जवळ करीत आहे. प्रत्येक दिवसाचा उगवता सूर्य स्पष्ट करत आहे की, त्याच्या कालावधीतून एक दिवसाची कपात झाली आहे, परंतु आश्चर्य आहे की, मनुष्य तरीसुद्धा बेसावध, निश्चिंत आहे. जेव्हा त्याला याची आठवण करून दिली जाते तेव्हा तो त्यास अत्यंत निष्काळजीपणाने ऐकतो जसे त्याचे काही महत्त्वच नाही. याकडे जर त्याचे लक्ष असते व आपल्या अवस्थेची त्यास चिता असती तर तो बेसावध राहिला नसता. तो जागरूक राहिला असता व आपला एक एक पाय फुंकून ठेवला असता. अल्लाहच्या कोपाची त्यास भीती वाटली असती व अल्लाहच्या कृपेच्या शोधात तो राहिला असता. परंतु या जगाने त्यास आपल्या कवेत घेतले आहे व अंतिम दिवसाचा विचार त्याच्या नजरेपासून दूर गेला आहे. परंतु ती वेळ तीव्र गतीने येत आहे व त्यास जास्त वेळ नाही जेव्हा या बेसावधपणाचे परिणाम त्याच्या समोर असतील व त्यास भोगण्यासाठी तो विवश असेल. जर त्यास माहीत असते की, त्यावेळी तो किती तोट्यात असेल आणि किती अपयश त्याच्या पदरी येईल, तर खचितच तो असा बेसावध राहिला नसता.
‘‘निःशंक ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे ऐहिक जीवनावर संतुष्ट व समाधानी बनले आहेत व जे लोक आमच्या आयतींपासून बेसावध आहेत, त्यांचे अंतिम ठिकाण नरकाग्नी असेल त्या दुष्कृत्यांपायी जे ते करीत राहिले.’’(कुरआन १०: ७-८)
याचविषयी आणखी एक कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘वस्तुस्थिती अशी आहे की, जे लोक मरणोत्तर जीवन मानीत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या कृत्यांना आकर्षक बनविले आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्यासाठी भयानक शिक्षा आहे आणि मरणोत्तर जीवनात हेच सर्वांत जास्त तोट्यात राहणारे आहेत.’’(कुरआन २७ : ४-५)
पवित्र कुरआन या वास्तविकतेला विविध रूपाने व शैलीने समजावून सांगतो की, अंतिम दिवस येणारच आहे व मनुष्य आपल्या कार्याचे फळ प्राप्त करील. हा अल्लाहचा निर्णय आहे. कोणातही ही शक्ती नाही की, तो त्याच्या निर्णयास बदलू शकेल किवा त्यास लागू होण्यापासून रोखू शकेल. परंतु दुःखद बाब! मनुष्य त्यास अशक्य बाब समजून नाकारून देतो आणि त्याकडे अशा दृष्टीने पाहतो की, जसे ही बाब त्यास शक्य नाही तशीच ईश्वरासाठी शक्य नाही. जर त्यास हे उमगले असते की, ईश्वरास कोणतीही बाब अशक्य नाही! तो अगाध शक्तिशाली आहे. तो जेव्हा व जे इच्छितो ते होते. ज्या ईश्वराने हे विशाल जग निर्माण केले, त्याची एक व्यवस्था निश्चित केली. ही व्यवस्था भंग करून एक दुसरी व्यवस्था नवीन सिद्धांत व नियमांच्या अंतर्गत निर्माण करणे त्यास कसे अशक्य आहे?
‘‘आणि काय या लोकांना हे उमगत नाही की, ज्या अल्लाहने ही पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केले व त्यांना निर्माण करतांना तो थकला नाही, तो खचितच याला समर्थ आहे की, मृतांना जिवंत करील? का नाही. निश्चितच तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे.’’(कुरआन ४६ : ३३)
ह्याची एक बाजू अशी आहे की, या सत्यतेस दर्शविणारा, समजावून सांगणारा कोणी सामान्य व्यक्ती नसून स्वतः ईश्वराचा प्रेषित आहे. ते व्यक्तिमत्त्व आहे ज्याचे सद्आचरण सत्य आणि श्रद्धावंत मित्रच नव्हे तर शत्रुही स्वीकारतात, जो स्वतःच्या जातीसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व्याकूळ राहत असे. जो रात्रंदिवस तडफडत असे की, ही मानवजात ईश्वराच्या कोपाची बळी ठरू नये. तो आपल्या मनाने, संकल्पनेने किवा परंपरेने नव्हे तर ईश्वराकडून सांगत होता की, अंतिम दिवस येईलच. याला खेळ किवा तमाशा समजू नका. ही एखाद्या स्पर्धेच्या निर्णयाची बातमी किवा व्यापारातील उतार-चढावाची सूचना नव्हती, तर ती अशा दिवसाची बातमी होती ज्या दिवशी मनुष्याच्या भविष्याचा निर्णय होईल व तो कायमस्वरुपी असेल. त्यानंतर एक तर स्वर्ग असेल किवा नरकाग्नी. कुरआन दुःखाने सांगतो की, नेहमी सत्य बोलणार्या प्रेषित मुहम्मद(स) यांची इतकी महत्त्वपूर्ण बातमी ऐकल्यानंतरही हे अत्याचारी यास सहजतेने घेत आहेत. आपसात कानगोष्टी करत आहेत की, ही सुद्धा आमच्यासारखीच व्यक्ती आहे. याच्यात असे कोणते वैशिष्ट्य आहे की, आम्ही यास प्रेषित मानून याच्यावर विश्वास करावा? याच्याकडे कोणते धन, ऐश्वर्य, पद किवा अधिकार आहेत? कोणती बाब आहे जी त्यास सरदार किवा नेतृत्वयोग्य बनवते? शेवटी हा कसा ईशदूत बनला व अल्लाहकडून बोलू लागला? हा ईशदूत आणि त्यांच्या सत्यतेविरुद्ध काही तर्क नव्हता. यामुळे त्याच्या सत्यतेचे खंडण होत नव्हते. ही अंधश्रद्धा, अनुचित पक्षपात, परंपरा याचे अंधानुकरण होते, जे एका सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक ठेवीदाराच्या विरोधास प्रोत्साहित करत होते आणि त्याच्या लौकिक आणि परलौकिक दुष्परिणामास पाहू देत नव्हते. हे सर्वकाही होत होते. याव्यतिरिक्त प्रेषित मुहम्मद(स) यांच्या गोष्टी लोकमनावर परिणाम करत होत्या आणि शत्रूपक्षातील जीवनाच्या प्रती गंभीर आणि पुण्यवान लोक सत्य व वास्तविकता याचा मनोभावे स्वीकार करत होते. विरोधक हे पाहून आश्चर्यचकित होत होते. ते म्हणायचे ‘‘हा तर जादूगार आहे, जादू करत आहे. याच्यापासून दूर राहण्यामध्येच आपला फायदा आहे. ही काही बुद्धिमत्ता नाही की आम्ही जाणूनबुजून एखाद्या जादूगारचे अनुकरण करावे.’’ कुरआनने त्यांच्या या अशिक्षित व अप्रगल्भतेचे काहीही उत्तर दिले नाही. त्याने सांगितले की, तुमच्या गोष्टी, तुमच्या कानगोष्टी आणि तुमच्या योजना, त्या मग जग किवा आकाशाच्या कोणत्याही कोपर्यात असू दे, अल्लाह त्यांच्याशी चांगला परिचित आहे. तोच त्यांचा हिशोब घेईल.
‘‘तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतावयाचे आहे आणि तो सर्वकाही करू शकतो. पहा, हे लोक आपली छाती वळवितात की जेणेकरून त्याच्यापासून लपावे. खबरदार, जेव्हा हे वस्त्रांनी स्वतःला झाकतात. अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो व प्रकट गोष्टींनादेखील. त्याला तर रहस्याचेदेखील ज्ञान आहे जे मनात आहे.’’(कुरआन ११ : ४-५)
पुन्हा एके ठिकाणी ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यात आली की,
‘‘ते म्हणतात की, हे वचन केव्हा साकार होईल तर तुम्ही खरे असाल? सांगा, यात काय नवल की, ज्या कोपासाठी तुम्ही घाई करीत आहात त्याचा एक भाग तुमच्याजवळ येऊन ठेपला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, तुझा पालनकर्ता तर लोकांवर फार मेहेरबानी करणारा आहे. परंतु बहुतेक लोक कृतज्ञता दर्शवीत नाहीत. निःसंशय तुझा पालनकर्ता चांगल्याच प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या मनामध्ये दडलेले आहे आणि जे काही ते व्यक्त करतात. आकाश व पृथ्वीची कोणतीही गोष्ट अशी नाही, जी एका स्पष्ट ग्रंथात नमूद असलेली नाही.’’(कुरआन २७:७१-७५)
अंतिम दिवस अवश्य येईल. जेव्हा येईल तेव्हा या जगाची उलथापालथ होऊन त्याच्या जागी जे नवीन जग अस्तित्वात येईल त्याची अवस्था कुरआनमध्ये विविध ठिकाणी आलेली आहे.
याविषयी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल आणि जेव्हा तारे निखळून पडतील आणि जेव्हा पर्वत चालविले जातील आणि जेव्हा दहा महिन्यांच्या गर्भिली उंटिणी आपल्या दशेत सोडून दिल्या जातील आणि जेव्हा वन्य पशु समेटून एकत्र केले जातील आणि जेव्हा समुद्र भडकविले जातील आणि जेव्हा प्राण(शरीरांशी) जोडले जातील आणि जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की, ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली? आणि जेव्हा कर्मनोंदी उघडल्या जातील आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल आणि जेव्हा नरक भडकविले जाईल आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल, त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे.’’(कुरआन ८१ : १-१४)
कुरआनमध्ये दुसर्या एका ठिकाणी आहे की,
‘‘जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि समुद्र फाडून टाकले जातील आणि कबरी उघडल्या जातील, त्यावेळी प्रत्येक माणसाला त्याने पुढचे मागचे केले सवरलेले सर्व कळेल.’’(कुरआन ८२ : १-५)
किती भीतीदायक दृश्य आहे. काय अवस्था असेल जेव्हा ही सर्व जगाची व्यवस्था अस्ताव्यस्त असेल. धरती आणि आकाश टूट-फूटमुळे प्रभावित असतील. सूर्य, चंद्र आणि तारे प्रकाशहीन होतील. ग्रह आणि तारे स्वतःची आकर्षण शक्ती गमावून आपसांत धडकतील. समुद्रांमध्ये अग्नी भडकेल. पर्वत भुगा होऊन पडू लागतील. जंगलातील हिसक प्राणी आपली हिसा आणि पशुता विसरतील. मौल्यवान पाळीव प्राणी, दुभती जनावरे यांना कोणी विचारणार नाही. थडगी उकरून फेकली जातील आणि मनुष्याच्या समोर स्वर्ग आणि नरक असतील. एकीकडे सर्व सुविधायुक्त स्वर्ग तर दुसरीकडे आपल्या रौद्ररूपात नरक असेल.
त्यावेळी आमच्या धरणीची काय अवस्था असेल त्याविषयी कुरआनोक्ती आहे,
‘‘जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हलवून सोडली जाईल आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील आणि मानव म्हणेल की, हिला हे काय होत आहे? त्यादिवशी ती आपले अहवाल निवेदन करील, कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला आज्ञा दिलेली असेल, त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. मग ज्याने तिळमात्र पुण्य केले असेल ते तो पाहील आणि ज्याने तिळमात्र पाप केले असेल तेही तो पाहील.’’(कुरआन ९९ : १-८)
याचाच अर्थ असा की, या संपूर्ण सृष्टीला एक प्रलय अस्ताव्यस्त करून टाकील. पृथ्वी आपल्यातील संपत्ती, खनिज पदार्थ बाहेर टाकून देईल. पृथ्वीवर दुष्कर्मी आणि सुकर्मी गमन करीत आहेत. सर्वांसाठी ती प्रशस्त आहे. इतकेच नव्हे तर अनेक दुष्कर्म तिने झाकून ठेवली आहेत. त्या दिवशी ती ह्या सर्व गुपित गोष्टी स्पष्ट करील आणि आपल्यावरील कर्माची गोष्ट स्पष्ट करील. मनुष्याचे पाऊल ज्या भूभागावर पडले असेल तो भूभाग स्पष्ट करील हे पाऊल सतकृत्यासाठी की वाईट कृत्यासाठी पडले होते. समस्त मानवजात इकडून तिकडे फिरत राहील. समविचारी लोकांचे समुह बनतील. प्रत्येकाच्या समोर त्याच्याकडून घडलेले छोटेसे पाप किवा पुण्य परिणामासह येतील.
अंतिम दिवशी मनुष्याच्या अवस्थेविषयी कुरआनोक्ती आहे,
‘‘लोकहो, आपल्या पालनकर्त्याच्या कोपापासून स्वतःला वाचवा, वस्तुस्थिती अशी आहे की, पुनरुत्थानाचा हादरा महा(भयंकर) गोष्ट आहे. ज्या दिवशी तुम्ही पहाल, की प्रत्येक दूध पाजणारीला आपल्या दूध पिणार्या बाळाचा विसर पडेल. प्रत्येक गर्भवतीचा गर्भपात होईल आणि लोक तुम्हाला नशेत दिसतील. वास्तविक पाहता त्यांनी नशा केली नसेल तर तो अल्लाहचा भयंकर कोपच असेल.’’(कुरआन २२ : १-२)
समस्त मानवजातीस आव्हान करण्यात आले आहे की, अल्लाहची भीती बाळगा, कारण अंतिम दिवस येणार आहे. त्याची उलथापालथ भयानक असेल, त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. आत्ताच गुजरातमध्ये भूकंप आला. हे सर्व जगामध्ये किवा संपूर्ण भारतात नव्हे तर भारतातील एका भागात आला. यामुळे जो भय, आतंक निर्माण झाला होता, लोक आपले घर व्यापार सोडून पळाले होते. हे सर्व आमच्या ताज्या आठवणी आहेत. भूकंपानंतरही लोकांच्या मनात एवढी दहशत होती की, लोक आपल्या मोडक्या तोडक्या घरात जाऊन त्यास पुन्हा पुनर्जीवित करण्यास तयार नव्हते. त्यांच्या मनात भीती होती की, न जाणो केव्हा काय होईल? अंतिम दिवसाच्या अस्ताव्यस्ततेसमोर तर याची काहीच तुलना नाही. जसे कणासमोर पर्वत आहे. अंतिम दिवसाची अवस्था अशी असेल की, अंगावर दूध पाजणारी आई आपल्या मुलाला विसरून जाईल. भीती व आतंक याची ही अवस्था असेल की, मूल आईच्या कुशीत असतांना तिला त्याचे भान नसेल. तिला याचेसुद्धा भान नसेल की, तो दूध पीत आहे किवा नाही. असे आवाज व स्फोट होतील की, लोक आपली मती गमावून बसतील. ही अवस्था काही गुंगी आणणार्या पदार्थांपासून नव्हे तर ती ईश्वराच्या यातनांमुळे होईल.
ही बाब कुरआनात एके ठिकाणी स्पष्ट केली आहे,
‘‘सरतेशेवटी जेव्हा तो कान बधीर करणारा आवाज दुमदुमेल त्या दिवशी माणूस आपला भाऊ आणि आपली आई आणि आपले वडील आणि आपली पत्नी व आपल्या संततीपासून दूर पळेल. त्यांच्यापैकी प्रत्येक माणसावर त्या दिवशी अशी वेळ येऊन ठेपेल की, त्याला आपल्या खेरीज कुणाचेही भान राहणार नाही. काही चेहरे त्या दिवशी चमकत असतील आणि काही चेहर्यांवर त्या दिवशी धूळ उडत असेल आणि काळिमा पसरलेला असेल. हेच अश्रध्दावंत व दुराचारी लोक असतील.’’(कुरआन ८० : ३३-४२)
हीच बाब अन्य ठिकाणी स्पष्ट केली आहे,
‘‘हे लोक त्याला दूर समजतात आणि आम्ही त्याला जवळ पाहत आहोत. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या चांदीसमान होईल आणि पर्वत रंगीबेरंगी पिजलेल्या लोकरीसमान होतील आणि कोणी जिवलग दोस्त आपल्या जिवलग दोस्ताला विचारणार नाही. वस्तुतः ते एकमेकाला दाखविले जातील. अपराधी इच्छिल की, त्या दिवसाच्या कोपापासून वाचण्यासाठी आपल्या संततीला, आपल्या पत्नीला आपल्या भावाला आणि आपल्या निकटतम कुटुंबाला जे त्याला आश्रय देणारे होते आणि पृथ्वीतलावरील सर्व लोकांना, मोबदला म्हणून तो देईल आणि या व्यक्तीमुळे त्याला मुक्ती मिळेल. कदापि नाही, ती तर भडकत्या अग्नीची ज्वाला असेल, जी मांस व कातडीला चाटून टाकील. हाका मारून-मारून आपल्याकडे बोलाविल त्या प्रत्येक माणसाला जो सत्यापासून विमुख झाला आणि ज्याने पाठ फिरविली आणि संपत्ती संचित केली आणि जपून जपून ठेवली.’’(कुरआन ७० : ६ - १८)
त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या हातात त्याचे कार्यविवरण पत्र असेल. त्यामध्ये त्याच्या प्रत्येक सुकर्म व कुकर्म तसेच प्रत्येक लहान-मोठ्या पाप व पुण्यांची नोंद असेल. दुष्कर्मी व दुराचारी लोकांचे कार्यविवरण पत्र त्यांच्या डाव्या हातात दिले जाईल. ते लोक किती भाग्यशाली असतील, ज्यांच्या उजव्या हातात त्यांचे विवरणपत्र असेल; तर दुर्भागी असतील ते ज्यांच्या डाव्या हातात त्यांचे कार्यविवरण पत्र असतील. कुरआनच्या आरशात त्यांची प्रतिमा पाहा,
‘‘तो दिवस असेल जेव्हा तुम्ही हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही. त्यावेळी ज्याच्या कर्मांची नोंद त्याच्या उजव्या हातात दिली जाईल तो म्हणेल, ‘‘घ्या, पाहा वाचा माझी कर्मनोंद. मला वाटत होते की, जरूर माझा हिशोब मला मिळणार आहे.’’ तर तो मनपसंत ऐश्वर्यात असेल. उच्चस्थानी स्वर्गात ज्याच्या फळांचे घड झुकले जात असतील. अशा लोकांना सांगितले जाईल, मजेत खा आणि आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही गत दिवसांत केली आहेत आणि ज्यांची कर्मनोंद त्यांच्या डाव्या हातात दिली जाईल तो म्हणेल. ‘‘हाय हाय माझी कर्मनोंद मला दिली गेली नसती आणि मी जाणले नसते की माझा हिशेब काय आहे, माझा तोच मृत्यू(जो जगात आला होता) निर्णायक ठरला असता. आज माझी संपत्ती माझ्या काहीच उपयोगी पडली नाही. माझी सर्व सत्ता संपुष्टात आली.’’(आज्ञा होईल) धरा याला आणि याच्या मानेत जोखड घाला, मग याला नरकामध्ये झोकून द्या. मग याला सत्तर हात लांब साखळीत जखडा. हा श्रेष्ठ व उच्चतर अल्लाहवर श्रध्दाही ठेवीत नव्हता व गरिबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता. म्हणून आज येथे याचा ना कोणी दुःखाचा वाटेकरी मित्र आहे ना जखमांच्या पूशिवाय त्याच्यासाठी कोणते जेवण, ज्यास अपराध्याशिवाय कोणीही खात नाही.’’(कुरआन ६९ : १८-३७)
अंतिम दिवसाच्या बक्षीस व दंडाचे वर्णन कुरआनमध्ये अन्य अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. याचे चित्र सुरह - ८८(गाशिया) मध्ये असे रेखाटलेले आहे,
‘‘काय तुम्हाला त्या व्यापून टाकणार्या आपत्ती(म्हणजे पुनरुत्थानाची) बातमी पोहचली आहे? काही चेहरे त्या दिवशी भयभीत असतील. कठोर परिश्रम करीत असतील. थकून जात असतील. तीव्र आगीत होरपळून निघत असतील. उकळत्या झर्याचे पाणी त्यांना पिण्यास दिले जाईल. काटेरी वाळलेल्या गवताशिवाय कोणतेही भोजन त्यांच्यासाठी असणार नाही जे ना पुष्ट करील, जे ना भूक शमवील. काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लीत असतील. आपल्या कामगिरीवर आनंदीत असतील. उच्चकोटीच्या स्वर्गामध्ये असतील. तेथे कोणतीही व्यर्थ गोष्ट ते ऐकणार नाहीत, त्यात झरे प्रवाहीत असतील. त्याच्यात उच्च आसने असतील, लोडांच्या रांगा लावलेल्या असतील आणि उत्कृष्ट बिछाने अंथरलेले असतील.’’(कुरआन ८८ : १-१६)

आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
इस्लाममध्ये दहशतवादाला कसलाही वादच नाही. इस्लाम शांततेचा धर्म आहे आणि शांतिच त्याला पसंत आहे. तो माणसाच्या प्राणांचा व त्याच्या मालमत्तेचा आदर करण्यास शिकवितो. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी उचित साधनांचा वापर करण्यास पाठिबा देतो.
धरणीवर बिघाड निर्माण करू नका.- सूरह : बकरा - १९ आणि जमिनीवर सुधारणा घडून आल्यानंतर तेथे बिघाड निर्माण होईल असा प्रसार करू नका, तसेच भयाने किवा लालसेने त्याला(बिघाडाला) बोलावू नका.- सूरह : आराप-५६
धरणीवर ज्या कोणी एखाद्याच्या खुनाचा बदला घेण्याखेरीज अथवा दंगल पसरविणार्याची हत्या करण्याखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी जर एखाद्या माणसाची हत्या केली, तर त्याने अखिल मानवजातीची हत्या करून टाकली आणि जर एखाद्या माणसाचा प्राण कोणी वाचविला तर त्याने सर्व माणसांना जिवदान दिले.’’- सूरह : माइदा - ३२

- मौलाना अमीन अहसन इस्लाही

भाषांतर
सय्यद ज़ाकिर अली


अल्लाह आणि त्याचे गुणधर्म या बाबतीत पवित्र कुरआनने जे काही, ज्या पुराव्यांनिशी सादर केले आहे, त्यांची सूची खूप लांबलचक असली तरी य पुस्तकात संक्षिप्ततेचाच मार्ग अवलंबिलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणात आवश्यक असलेल्या बाबी नमूद केल्या आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 157    -पृष्ठे - 80    मूल्य -20      आवृत्ती - 1 (2009)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/pqwnkicculakp75mtiq5d6rdji3ylmjo

इस्लाम धर्म भोजन आणि आहाराच्या संदर्भात काही नियम प्रस्तुत करतो. तो शाकाहारी पशूंचे मांस खाण्याची अनुमती देतो. विशेषतः आठ प्रवर्गाच्या चतुष्पाद (तो पशू जो दूध देणारा  आणि चार पायांचा असतो अशा) प्राण्यांचे, परंतु मांसाहारी पशुंना खाण्यास मनाई करतो. इस्लाम धर्म ज्या जनावरांना खाण्याची अनुमती देतो त्या जनावरांमध्ये शेळी, मेंढी, बैल, म्हैस  आदींचा समावेश होतो. एवढेच नव्हे तर या वैध (हलाल) ठरविलेल्या जनावरांना हलाल पद्धतीनेच जुबाह (कापले) गेले पाहिजे अन्यथा ते खाण्यायोग्य नाहीत ती जंगली जनावरांची   शिकार करतात, ते वैध (हलाल) नाहीत. येथपर्यंत की शाकाहारी जनावरांपैकी काही जनावरे उदा. डुक्कर मुसलामानांकरिता आणि ज्यूंकरिता हराम (निषिद्ध) आहे.
या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही की मांसाहार लोकांना अधिक हिंसक बनवितो. जसे या आधीच सांगितले गेले आहे की एखाद्या माणसाचे पालनपोषण आणि जगासंबंधी  त्याचा दृष्टीकोन त्याला हिंसक किंवा शांतताप्रिय बनवितो. उदा. जर्मन देशाचा नेता अ‍ॅडॉल्फ हिटलर पूर्णतः शाकाहारी होता. परंतु, त्याच्या अंतःकरणात कुस्तित आणि वाईट   महत्त्वाकांक्षा, अर्थात शेजारी राष्ट्रांना बलपूर्वक ताब्यात घेणे, यासारख्या भयंकर गोष्टी होत्या आणि वस्तुतः तो लक्षावधींच्या नरसंहारास जबाबदार होता. यास्तव अशा मनोरचित  कल्पनांना तिरस्काराने रद्द करण्याची गरज आहे. कारण अशा कल्पित गोष्टी यालाच पात्र आहेत. प्रेम आणि सहानुभूती तसेच तिरस्कार व शत्रुत्व या गोष्टींचा संबंध खाद्य पदार्थांशी व  आहाराशी जोडणे तर्कसंगत ठरत नाही. भारतातील आदिवासी अनेक प्रकारचे मांस खातात, परंतु, त्यांच्याविषयी क्रूरतेची ओरड होत नाही.

- सय्यद हामीद मोहसीन

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जगातील सर्वांत जास्त सुखी नरकवासीला आणले जाईल आणि नरकात टाकले जाईल. जेव्हा आग त्याच्या संपूर्ण शरीरावर आपला प्रभाव दाखवू  लागेल तेव्हा त्याला विचारले जाईल, ‘‘तू कधी चांगली स्थिती पाहिली आहे काय? तू कधी ऐशोआरामात जीवन व्यतीत केले आहेस काय?’’ तो म्हणेल, ‘‘नाही, तुझी शपथ हे माझ्या  पालनकर्त्या! कधीच नाही.’’ मग जगात अत्यंत हलाखीच्या (गरिबीच्या) स्थिती जीवन व्यतीत करणाऱ्या स्वर्गवासीला आणले जाईल. जेव्हा त्याच्यावर स्वर्गातील ईशकृपांचा प्रभाव पडेल  तेव्हा त्याला विचारले जाईल, ‘‘तू कधी हलाखी पाहिली आहेस काय? कधी तुला संकटांना सामोरे जावे लागले आहे काय?’’ तो म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी कधीही हलाखी व  गरिबीत अडकलो नाही, मला कधीच संकटांना सामोरे जावे लागले नाही.’’ (मुस्लिम) पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी सांगितले, नरकाला स्वादांनी व अस्तित्वाच्या इच्छांनी घेरण्यात आले  आहे आणि स्वर्गाला कठोरता व संकटांनी घेरण्यात आले आहे. (बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
जो मनुष्य आपल्या अस्तित्वाची पूजा करील आणि जगातील स्वादांमध्ये गुरफटला जाईल त्याचे ठिकाण नरक आहे आणि ज्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्याने काटेरी मार्ग अवलंबावा, आपल्या अस्तित्वाला हरवून त्यास त्रास व प्रत्येक प्रकारच्या अडचणींना अल्लाहसाठी सहन करण्यास विवश करावे, जोपर्यंत एखादा मनुष्य ही अवघड खाडी ओलांडत नाही,  आराम व सुखात कसा पोहोचेल.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी नरकाच्या आगीपेक्षा अधिक भयानक कोणतीही वस्तू पाहिली नाही, ज्यापासून पळणारा झोपला आहे आणि  स्वर्गापेक्षा अधिक चांगली वस्तू पाहिली नाही, ज्याची इच्छा बाळगणारा झोपला आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
एखाद्या भयानक वस्तूला पाहिल्यानंतर मनुष्याची झोप उडते. तो तिच्यापासून पळत सुटतो आणि जोपर्यंत समाधान वाटत नाही तोपर्यंत झोपत नाही. अशाप्रकारे ज्याला चांगली वस्तू हवीहवीशी वाटू लागते तेव्हा जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत तो झोपत नाही की आरामात बसत नाही. जर ही हकीकत असेल तर स्वर्गाची इच्छा बाळगणारे का झोपले आहेत? ते  नरकापासून पळ काढण्याचा प्रयत्न का करीत नाहीत? ज्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तो बेसावध झोपत नाही आणि ज्याच्या अंतर्गत चांगल्या वस्तूची उत्कटता असते तो  आरामात बसत नाही.

माननीय सहल बिन सअद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी ‘हौज-ए-कौसर’ (स्वर्गातील एक हौद) वर तुमच्या अगोदर पोहोचून  तुमचे स्वागत करीन आणि तुम्हाला पाणी पाजण्याची व्यवस्था करीन. जो माझ्याजवळ येईल तो ‘कौसर’चे पाणी पियील, त्याला पुन्हा कधी तहान लागणार नाही आणि काही लोक माझ्याजवळ येतील, मी  त्यांना ओळखत असेन आणि ते मला ओळखत असतील, परंतु त्यांना माझ्याजवळ पोहोचण्यापूर्वी अडविले जाईल तेव्हा मी म्हणेन, ही माझी माणसे आहेत (त्यांना माझ्यापर्यंत येऊ  द्या), तेव्हा उत्तरात मला सांगितले जाईल, तुम्हाला माहीत नाही की तुमच्या मृत्यूपश्चात तुमच्या ‘दीन’- जीवनधर्मात किती नवीन गोष्टी (बिदआत) घातल्या आहेत, तेव्हा (हे ऐकून)  मी म्हणेन, दूर व्हा, दूर व्हा, त्या लोकांकरिता ज्यांनी माझ्यापश्चात ‘दीन’ (इस्लाम) चा आराखडा बदलला.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
ही हदीस स्वत:च एक शुभवार्ता आहे आणि फार मोठे भयदेखील. शुभवार्ता अशी की पैगंबर मुहम्मद (स.) त्यांनी आणलेला (दीन) जीवनधर्म कसल्याही फेरबदलाशिवाय स्वीकारणाऱ्या  आणि त्याचे अनुसरण करणाऱ्या लोकांचे स्वागत करतील आणि जाणूनबुजून जीवनधर्मात (दीनमध्ये) निषिद्ध असलेल्या नवनवीन गोष्टींची त्यात सरमिसळ करणारे लोक पैगंबरांपर्यंत  पोहोचतील आणि ‘कौसर’चे पाणी पिण्यापासून वंचित राहतील.

धर्मावरील प्रेम ईश्वराचे महान वरदान आहे. स्त्री असो की पुरुष, मूल असो की वृद्ध, ईश्वर ज्याला इच्छितो त्याला हे वरदान देतो. प्रेषितत्वाच्या अंतिम काळात मदीनावासीयांनी एका निरागस मुलामध्ये धर्मश्रद्धा आणि प्रेषितप्रेमाचा एक विचित्र स्वभाव अनुभवला. हा मुलगा नेहमी प्रेषितदरबारी हजर राहात असून मोठ्या तल्लीनतेने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांची वचने ऐकत असे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) भाषणासनावर विराजमान होत असत, तेव्हा हा मुलगा त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे भाषण अगदी तन्मयतेने ऐकत असे. प्रत्येक बोल तो स्मरणात ठेवीत असे. तो प्रेषितांबरोबर नमाज अदा करीत असे आणि रमजान महिन्यात रात्रीच्या वेळी जागून प्रेषिताबरोबर ईशोपासना करीत असे. प्रेषितांचेही त्याच्यावर प्रेम होते. एकदा प्रेषितांच्या सेवेत ‘ताईफ’ शहरातून द्राक्षे पाठविण्यात आली. हा मुलगादेखील तेथे हजर होता. प्रेषितांनी त्यास द्राक्षांचे दोन झुबके देऊन सांगितले की, ‘‘एक तुझ्यासाठी व एक तुझ्या आईसाठी. घरी जाऊन एक झुबका आईस दे .’’ त्याने स्वतःस दिलेला एक झुबका रस्त्यातच खाल्ला. त्यास तो खूप गोड लागल्याने त्याने आईस दिलेला दुसरा झुबका देखील खाऊन घेतला. शेवटी तो लहान मुलगाच होता. त्याने आपल्या आईस या बाबतीत काही सांगितले देखील नाही. काही दिवसांनी प्रेषितांनी त्यास विचारले, ‘‘हे मुला! आईस द्राक्षाचा झुबका दिलास का?’’ ‘‘नाही! हे प्रेषिता (स.)! मी दिला नाही. दोन्ही झुबके मी स्वतःच खाल्ले.’’ प्रेषितांच्या उपदेशाने तो मुलगा सत्यवचनी झाला होता. त्याचे हे उत्तर ऐकून प्रेषितांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले. त्यांनी त्याचा कान धरून लाडिकपणे म्हणाले, ‘‘लबाड कुठला!’’
हा मुलगा ज्याचा आदरणीय प्रेषित अत्यंत लाड पुरवीत असत. तोच मुलगा.. माननीय नोअमान बिन बशीर(र.)होय.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)हे ‘खजरज’ परिवाराच्या ‘हारिस’ शाखेचे सपुत्र होत. त्यांची वंशशृंखला अशी आहे,
‘‘नोअमान पिता बशीर पिता साअद पिता सआलबा पिता खलास पिता झैद पिता मालिक पिता अगर पिता सआलबा पिता कआब पिता खजरज पिता हारिस पिता खजरजुल अकबर.
बदरच्या युद्धाच्या तीन महिन्यांपूर्वी हिजरी सन ‘२’ मध्ये माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांचा जन्म झाला. त्यांनी एक इस्लामप्रिय परिवारात जन्म घेतला. बालपणापासूनच त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण इस्लामी वातावरणात झाले. त्यांचे पिता माननीय बशीर बिन साअद अन्सारी यांनी प्रेषितांच्या अगदी प्रारंभीच्या प्रतिकूल काळात इस्लामचा स्वीकार केला होता. तसेच ते आदरणीय प्रेषितांचे खूप जवळचे श्रद्धाळू आणि सोबती होते. ते बदर, ओहद, एहजाब आणि इतर सर्वच युद्धांत आदरणीय प्रेषितांसोबत शत्रूंशी लढले. आदरणीय प्रेषितांच्या स्वर्गवासानंतर इस्लामी शासनाची धुरा सांभाळण्यासाठी अन्सारी सोबत्यांच्या एका मोठ्या वर्गाची भूमिका होती की, इस्लामी शासनाची धुरा ‘माननीय साअद बिन उबादा अन्सारी(र.)’ यांना सोपविण्यात यावी. परंतु माननीय बशीर बिन साअद(र.)यांनी मुहाजिरीन सोबत्यांचे समर्थन केले आणि सर्व अन्सार सोबत्यांनी माननीय अबू बकर(र.)यांना इस्लामी शासक नेमले.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांच्या माता सन्माननीय ‘उमरा(र.)’ या माननीय अब्दुल्लाह बिन खाहा(र.)यांची बहीण होती. त्यांचे पुत्र नोअमान(र.)वर अपार प्रेम होते. एकदा त्यांनी एक विशिष्ट संपत्ती नोअमान(र.)यांच्या नावे करण्यासाठी आपले पती बशीर(र.)यांचे मन वळविले आणि यासाठी आदरणीय प्रेषितांची साक्ष घेण्यासाठीदेखील तयार केले. माननीय बशीर(र.)हे आपल्या चिमुकल्या नोअमान(र.)यांना प्रेषितांसमोर हजर करून म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! मी आपली अमुक अमुक संपत्ती आपल्या साक्षीने या मुलाच्या नावे करीत आहे!’’ प्रेषितांनी विचारले, ‘‘तुम्ही याच्या इतर भावडांनादेखील या संपत्तीचा वाटा दिला काय?’’
‘‘नाही दिला, हे प्रेषिता!’’ बशीर(र.)उत्तरले. ‘‘तर मग हा अन्याय होईल आणि मी अन्यायाची साक्ष देऊ शकत नाही! हे बशीर! ईश्वराच्या नाराजीचे भय बाळगा. त्याला अन्याय मुळीच पसंत नाही!!’’ प्रेषितांनी सांगितले. प्रेषितांचा आदेश ऐकून माननीय बशीर(र.)यांनी घरी येऊन आपल्या पत्नीस वृत्तांत सांगितला आणि त्यांच्या पत्नीनेसुद्धा प्रेषितांच्या आदेशावर मान झुकविली.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी खूप कमी वयात प्रेषितांची असंख्य वचने मुखपाठ केली होती. ते आठ वर्षे आणि सात महिन्याचे असतानाच आदरणीय प्रेषितांनी परलोकमार्गी कूच केले.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)लहानपणापासूनच प्रेषितांच्या सोबत असल्याने त्यांच्या नीतिमत्तेत खूप पावित्र्य होते. त्यांच्यात धैर्य, संयम, मृदु स्वभाव आणि दानशूरता यासारखे असंख्य गुणधर्म आढळतात. त्यांच्या जीवनाचा एक अतिशय मोठा भाग तंटे-बखेड्यांत व्यतीत झाला, तरी देखील त्यांनी शक्य होईल तेवढे रक्तपातापासून स्वतःस अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. अतिशय नाजूक आणि गंभीर परिस्थितीतही स्वतःस नियंत्रणात ठेवले.
त्यांच्या दानशूरतेबाबत एक विचित्र घटना इतिहासात आढळते. ते ‘हमस’ शहराचे राज्यपाल असताना ‘प्रसिद्ध कवि एअशा हमदानी’ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘मी ‘यजीद’ बादशाहकडे गेलो आणि त्याला मदतीची विनंती केली. परंतु त्याने मला रिकाम्या हाती परत केले. नंतर मी आपल्याकडे खूप आशा व आकांक्षेने आलो आहे. माझ्यावर कर्जाचे प्रचंड ओझे असून मला आर्थिक मदतीची खूप गरज आहे.’’ माननीय नोअमान(र.)यांनी त्यास सांगितले की, ‘‘तुम्हाला देण्यासारखी रक्कम सध्या माझ्याजवळ नाही.’’ ‘एअशा हमदानी’ त्यांचे उत्तर ऐकून फार निराश झाले. माननीय नोअमान(र.)यांचे हृदयदेखील त्यांची ही केविलवाणी परिस्थिती पाहून पाझरले. त्यांनी जनतेस हाक देऊन सांगितले, ‘‘एअशा हमदानी यांना आज आर्थिक मदतीची खूप गरज आहे. म्हणून त्यांची मदत करावी.’’ माननीय नोअमान यांच्या या आवाहनामुळे लोकांनी आपसात वर्गणी करून वीस हजार दिरहमची रक्कम जमा करून त्यांना दिली.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)हे अतिशय उच्च कोटीचे ज्ञानी व विद्वान होते. आदरणीय प्रेषितांच्या काळात वयाने लहान असूनही आपल्या प्रचंड स्मरणशक्तीमुळे त्यांना प्रेषितांची प्रत्येक शिकवण, कार्यप्रणाली, जीवनशैली आणि नीतिमत्तेचे नियम अवगत झाले होते. आदरणीय प्रेषितांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांनी सन्माननीय आयशा(र.)आणि माननीय उमर(र.)यांच्याकडून धर्मज्ञानाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी आदरणीय प्रेषितांचे एकूण १२२ वचने कथन केली. त्यांच्या शिष्यवृंदामध्ये इमाम शैबी, सिमाक बिन हरब, अबुइसहाक, सालिम बिन अबू जाअद, उरवा बिन जुबैर, अबू कलाबा, उबैदुल्लाह, हबीब बिन सालिम, अब्दुल मलिक बिन और यासारखे तज्ज्ञ होत.
माननीय नोअमान(र.)यांनी विविध ठिकाणी राज्यपालपदाच्या जबाबदार्या पार पाडल्या. म्हणून त्यांनी अनेक स्वरुपाच्या प्रकरणांचे निर्णय दिल्याने त्यांचा अनुभव तगडा होता. प्रकरणे हताळताना आणि निर्णय देताना दिव्य कुरआन आणि प्रेषित जीवनचरित्राच्या आधारावर निर्णय देण्यात ते तरबेज होते. शिवाय त्यांची वक्तृत्वशैलीसुद्धा खूप आकर्षक होती. भाषण देताना ते प्रेषितवचनांचे अचूक संदर्भ सादर करीत असत. आपल्या कानांकडे बोट दर्शवून म्हणत की, ‘‘मी आदरणीय प्रेषितांकडून या कानांनी ऐकले.’’
त्यांचे लिखाणशास्त्र माहितीचा खजिना असे. त्यांना भाषाशास्त्र आणि साहित्यात विशेष रस होता. साहित्य आणि कवनशास्त्राच्या नियमांचे काटेकोर पालन करून त्यांनी बरेच साहित्य आणि कविता रचल्या.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी आदरणीय प्रेषितांची जी वचने कथन केली आहेत, त्यापैकी काही वचने या ठिकाणी सादर करीत आहोत.
  1. नमाज पढण्यासाठी करण्यात आलेल्या रांगा सरळ ठेवा अन्यथा ईश्वर तुमच्यात मतभेद निर्माण करील.
  2. तुम्ही श्रद्धावंतांना आपसात दया करणे, प्रेम करणे आणि कृपा व उपकार करण्याच्या बाबतीत अशा स्वरुपात पाहाल जसे शरीराच्या एका अवयवास त्रास अथवा क्षती पोहोचल्यास शरीराचे इतर अवयवदेखील ज्वराने फणफणतात.
  3. जे वैध आणि धर्मसंमत आहे, ते अगदीच स्पष्ट आहे. तसेच जे अवैध आणि धर्मविरोधी आहे, तेदेखील अगदीच स्पष्ट आहे. या दोन्हींच्या दरम्यान केवळ काही बाबीच अस्पष्ट आहेत. बर्याच जणांना याचे ज्ञान नाही. अर्थात जो माणूस एखाद्या बाबीच्या संशयास्पद अथवा अस्पष्ट परिस्थितीतही स्वतःस त्यापासून दूर ठेवील, तोच आपला धर्म आणि आपली इभ्रत सुरक्षित ठेवू शकेल आणि पवित्र व डागरहित असेल. तसेच जो माणूस संशयास्पद अथवा अस्पष्ट बाबीत गुरफटून जाईल, तो अवैध आणि धर्मविरोधी बाबींच्या गर्तेत बुडून जाईल. खबरदार! मानवी शरीरात एक मांसाचा गोळा आहे. तो ठीक राहिल्यास संपूर्ण शरीर सुदृढ असेल आणि तोच बिघडला तर संपूर्ण शरीर बिघडेल. तो मासाचा गोळा म्हणजेच तुझे हृदय होय!
  4. ‘‘प्रार्थना हीच उपासना आहे.’’ असे म्हणून आदरणीय प्रेषितांनी दिव्य कुरआनची ही आयत पठन केली, ‘‘तुमच्या पालनकर्त्याचा आदेश आहे की, माझ्याकडे प्रार्थना करा व मागणी करा. मी(निश्चितच तुमची मागणी) पूर्ण करीन आणि तुम्ही मागितलेली बाब तुम्हास प्रदान करीन. जे लोक माझ्या उपासनेस गर्विष्ठपणाने पाठ दाखवतील त्यांना अपमानित होऊन नरकाग्नीत जावे लागेल.’’
  5. माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी हिजरी सन ६४ मध्ये माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांचे इस्लामी शासन स्वीकारले. अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांनी त्यांना ‘हमस’ च्या राज्यपालपदी नेमले आणि ‘सीरिया’ व इतर भागाच्या राज्यपालपदी ‘जहाक बिन कैस’ यांची नेमणूक केली. तिकडे मलिक बिन मरवान या जुलमी शासकाने ‘जहाक बिन कैस’ यांच्यावर आक्रमक स्वारी केली. माननीय नोअमान(र.)यांनी ‘जहाक बिन कैस’ यांच्या मदतीसाठी कुमक पाठविली. दोन्ही लष्करात घनघोर युद्ध झाले. या युद्धात इस्लामशासित लष्करास पराभव पत्करावा लागला.
माननीय ‘जहाक बिन कैस’ यांच्या पराभवानंतर अब्दुल मलिकच्या लष्कराने माननीय नोअमान(र.)यांना एकटे गाठून ठार करून त्यांचे शीर त्यांच्या पत्नीला दिले. अशा प्रकारे माननीय नोअमान बिन बशीर अन्सारी(र.)यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण इस्लामच्या सेवेत अर्पण केला आणि शेवटी आपले प्राणसुद्धा ईश्वरीय धर्मावर बलिदान केले. ही घटना हिजरी सन ६५ मध्ये घडली. या वेळी त्यांचे वय ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक पत्नी असा परिवार होता.

understanding islam
कोणत्याही लोकसमूहाच्या विचारसरणी व त्यांच्या श्रध्देचे निरीक्षण करून त्यांचे समीक्षण व विश्लेषणाद्वारे त्यांच्यातील सत्य व असत्य वेगवेगळे करणे अत्यंत कठीण काम आहे. अशा प्रकारच्या कार्यात एकतर माणसाच्या वैयक्तिक आवडी आणि स्वजातीय पक्षपातीपणा अडथळे आणीत असतो तर दुसरीकडे वस्तुस्थितीची माहिती नसल्याने माणूस चुकीच्या दिशेने वळत असतो. परिणाम असा होतो की या संबंधाने माणसाचे सर्व परिश्रम निरर्थक ठरत असतात. आपण घेतलेल्या परिश्रमाचे एखादे असे फळ प्रस्तुत करण्यात तो अयशस्वी ठरत असतो. जेणेकरून मानवी मनातील गुंतागुंतीची उकल होऊ शकेल. आणि सत्य व असत्याला निःसंदिग्धपणे पाहिले जाऊ शकेल. किबहुना बहुधा अशा प्रकारचे प्रयत्न उलट आणखीनच गुतागुंती वाढविण्यास कारणीभूत ठरत असतात.
लोक समूहांचा विचार व त्यांच्या दृष्टिकोनासंबंधी जे कार्य केले गेले आहेत त्यांचे आपण निरीक्षण केले तर त्याच्या सत्यतेची आपण ग्वाही दिल्याशिवाय राहणार नाही. माणसाने एखाद्या गोष्टीचा केवळ धोरणात्मक(Objectively) अभ्यास करावा व त्यामुळे तो ज्या निष्कर्षाप्रत येतो त्याला त्याने मनःपूर्वक मान्यही करावे. प्रत्यक्षात असे घडणे संभवनीय नाही. किबहुना सामान्यतः घडते असेच की माणसाचा पूर्वीपासूनच एक निर्णय ठरलेला असतो मग त्याच्या मनात जे ठरलेले आहे त्याची सत्यता सिध्द कशी करता येईल या हेतूनेच त्याचे सर्व प्रयत्न चाललेले असतात. त्यासाठी तो शोध घेत असतो व पुरावे उपलब्ध करीत असतो. आपल्या शोध कार्यात तो ज्या निष्कर्षापर्यंत पोचू इच्छितो त्या प्रत पोचण्यासाठी ज्या गोष्टी सहाय्यक ठरत नाहीत अशा सर्व गोष्टीकडे तो पूर्णपणे दुर्लंक्ष करीत असतो. अशा शोध कार्याला कोणत्याही प्रकारे शास्त्रशुध्द पध्दत म्हटली जाऊ शकत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. वास्तविकपणे हे काम इतके कठीण आहे की माणूस प्रामाणिक आणि निःपक्षपाती जरी असला तरी यथायोग्य निष्कर्षाप्रत पोहचणे अगदी सहजपणे कदापि घडू शकत नाही.
जीवनाच्या इतर बाबींप्रमाणेच या कार्यासाठी देखील ईश्वराच्या मार्गदर्शनाची जरुरी असते. ईश्वराच्या मार्गदर्शनाविना या मार्गातून सुखरूपपणे पार होणे जवळजवळ अशक्य आहे. कुरआन अवतरणापूर्वी दैवीग्रंथ आपल्या मूळस्वरूपात सुरक्षित नव्हते. सत्याचे योग्य प्रतिनिधित्व करत असेल असा एखादा मानवी समूह उरला नव्हता. धर्माची अवस्था विझलेल्या दिव्या समान होती. लोक शतकानुशतके अज्ञानाच्या व शुध्द हरपलेल्या अवस्थेत जीवन जगत होते. त्या काळात शोध घेण्याचे जे प्रयत्न झाले आहेत ते सत्याच्या मार्गाला स्पष्ट करण्याऐवजी त्याला आणखीनच संदिग्ध बनविणारे होते. कुरआन उतरल्यानंतर देखील कुरआनच्या मार्गदर्शनापासून निरपेक्ष राहून जे शोधकार्य होत राहिले आहे त्यांचे स्वरूप कुरआन उतरण्यापूर्वीच्या शोधकार्यापेक्षा काही वेगळे नाही. तसेच असत्याला सत्य आणि सत्याला असत्य सिध्द करून दाखविण्याचा खटाटोप व प्रयत्न आणि असे छिद्रान्वेषण केले गेले आहेत ज्यांचा सत्य व वास्तवतेशी तिळमात्रही संबंध नाही.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget