Latest Post

इस्लाम आदर्श समाजाची निर्मिती करतो. तिथे शांति व स्वास्थ्य असते. तेथे उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यता जात-पात किवा श्रीमंत-गरिबात कसलाही भेदभाव अगर पक्षपात केला जात नाही. तेथे माणूस दुसर्या माणसांचा दास नसतो. प्रत्येकाला खरेखुरे स्वातंत्र्य प्राप्त असते. प्रत्येक माणूस ताठ मानेने व अभिमानाने चालू शकतो. कोणीही भुकेलेला, उघडा-नागडा अथवा निराधार नसतो. लोक एकमेकांना आश्रय देणारे असावेत. प्रत्येकाला न्याय मिळावा. महिलांना आदर-प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना पुरुषांच्या कामवासनेला बळी पडावे लागू नये. अवैध कृत्ये करणार्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. तेथे नीतीमूल्यांचा आदर केला जातो. तेथे तरुणाचे चारित्र्य विश्वास ठेवण्यासारखे असते आणि ते विधायक कार्यात गढलेले असतात. तेथे भलेपणाच्या कामात चढाओढ केली जाते आणि माणसे स्वच्छतेच्या आणि परिपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असतात.
इस्लाम कसा माणूस घडवितो?
माणसाला सज्जन करण्यासाठी इस्लामपेक्षा अधिक चांगली कोणतीही जीवन व्यवस्था नाही. इस्लाम माणसाला त्याचे अचूक स्थान दाखवून देतो, त्याच्या महानतेचे रहस्य त्याला उलगडून दाखवितो, त्याच्या जबाबदारीची त्याला आठवण करून देतो आणि त्याच्यातील चेतना जागृत करतो. त्याला या गोष्टीची आठवण करून देतो की विशिष्ट उद्दिष्टासाठी त्याला जन्माला घातले गेले आहे. त्याला निरर्थक जन्माला घातले गेले नाही. या जगातील जीवन सुख-विलासासाठी नाही. आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशेब आपल्या स्वामीला द्यावा लागणार आहे. तेथे नीट विचार करून प्रत्येक कृती करायला हवी.
आमच्या येथील कृत्यामुळे समाजात सुगंधही पसरू शकतो आणि दुष्कृत्यांमुळे हे जीवन एक शापही ठरू शकते. इस्लाम जो माणूस घडवितो तो इतरांचा आदर करणारा, सत्यावर अढळपणे राहाणारा, आपल्या वचनांचे पालन करणारा, दुर्बलांचा त्राता व आश्रयदाता बनणारा आणि सत्कृत्यात नेहमी पुढाकार घेणारा असतो. तो स्वतःही दुष्कृत्यांपासून दूर राहातो आणि इतरांनाही तो दुष्कृत्यांपासून रोखत असतो. इस्लामी आदर्शाच्या मुशीतून बाहेर पडलेला माणूस सदाचाराचे प्रतीक व दुराचाराचा शत्रू असतो.
शेवटची गोष्ट
इस्लामच्या या संक्षिप्त परिचयाने, त्याचा अर्थ व जीवनाकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोन आपल्या समोर येतो. धर्म पुरातन काळापासून आहे, हे तथ्यही स्पष्ट होते. ईश्वराने जेव्हा जेव्हा आपले प्रेषित धाडले, तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोचविला. सर्व ईश्वरी ग्रंथांपैकी फक्त कुरआनच आपल्यापाशी शाबूत व सुरक्षित आहे. तसेच सर्व धर्मगुरुंपैकी केवळ मुहम्मद(स.) चे जीवन चरित्र सविस्तरपणे आमच्यापाशी आहे. या दोन्ही गोष्टींकडे आपणाला अशी धाव घेतली पाहिजे, जशी एखाद्या हरवलेल्या व नंतर सापडलेल्या वस्तूकडे आपण आकर्षिले जातो. सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळू शकते, पण आपण परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे. शेवटी प्रेषित युसुफ(अ.) ची गोष्ट सांगून माझे मनोगत संपवू इच्छितो, ती गोष्ट त्यांनी बंदिवासात आपल्या साथीदारांना सांगितली होती. त्यांनी सांगितले होते.
ईश्वराशी कोणाला भागिदार ठरविणे, हे आपले काम नव्हे. खरे तर ईश्वराची आम्हांवर व सर्व लोकांवर मोठी कृपा आहे(की त्याच्याशिवाय अन्य कोणाचाही दास आम्हाला केले नाही.) परंतु अधिकांश माणसे कृतज्ञता दर्शवीत नाहीत. हे तुरुंगातील सोबत्यांनो! तुम्ही स्वतःच विचार करा, भिन्न भिन्न अनेक स्वामी चांगले आहेत की एकच स्वामी, ज्याचे सर्वांवर प्रभुत्व आहे, तो अधिक चांगला आहे? त्याला सोडून तुम्ही ज्यांचे दास्यत्व करीत आहात, ज्यांना तुमच्या पूर्वजांनी नावे दिली आहेत; या शिवाय त्याचे महत्व दुसरे काहीच नाही. आणि अल्लाहने त्यासाठी कसलीही सनद पाठविलेली नाही. शासन करण्याची सत्ता अल्लाहखेरीज अन्य कोणाच्याही हाती नाही. खुद्द त्याचाच आदेश आहे की त्याच्याखेरीज तुम्ही अन्य कोणाचेही दास्यत्व करू नये. हीच थेट व सरळ जीवनप्रणाली आहे, परंतु अधिकांश हे तथ्य जाणत नाहीत.- सूरह : अल् युसुफ - ३८ ते ४०

- वहिदुद्दीन खान

भाषांतर
सलीम अ. अज़ीज़ बुकसेलर


जग हे एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्यासमोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा प्रत्येक शब्द बोलत आहे की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
सदर प्रश्नांना आपण मोजक्या शब्दांमध्ये 'अंतिम सत्याचा शोध' म्हणून संबोधू शकतो, परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बऱ्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा अनेक प्रश्नांचे विवेचन या पुस्तकात केले आहे


आयएमपीटी अ.क्र. 158    -पृष्ठे - 40    मूल्य -16      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xvic399wh5bszve8ummtrmdbhbtf7bo7

दापोडी (वकारअहमद अलीम)-
इस्लामचे अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (स.) हे समस्त जगवासियांचे आदर्श आहेत. त्यांचे आचार, विचार व मार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे ‘दीन’ (इस्लामी जीवनपद्धत) चा ठोस  पाया आहे. आधुनिक शिक्षणाने तुम्ही डॉक्टर, इंजीनियर वा इतर उच्चपदावर जाऊ शकता. परंतु त्या अगदोर तुम्ही सर्वोत्तम मुसलमान बना. यामुळेच भौतिक जगात व पारलौकिक  जगात तुम्ही यशस्वी व्हाल, असे भावपूर्ण उद्गार प्रा. अझहरअली वारसी यांनी येथे व्यक्त केले. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील  ‘इकरा इंग्लिश मेडियम स्कूल’ येथे जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र अंतर्गत येथे नवीन विभाग सुरू करण्यात आला, त्याच्या शुभारंभानिमित्त येथे ‘स्टडी सर्कल’ (चिल्ड्रन सर्कल) चे  आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्याथ्र्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूना कॉलेजचे रसायनशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. वारसी हे  बोलत होते.
इकरा इंग्लीश स्कूलचे चेअरमन मौलाना उबेर काझी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे पुण्याचे अध्यक्ष रिझवान खान, जमाअतचे  पिंपरीचे स्थानिक अध्यक्ष फेरोज खान, जमाअतचे पुणे विभागाचे सचिव तजम्मुल खान, पूना कॉलेजचे इंग्रजी विभागप्रमुख, जमाअतच्या आकुर्डी शाखेचे सदस्य म. सलीम मुजावर   आणि इकरा स्कूलचे सचिव म. सलीम शेख, मौलाना अब्दुल मजीद आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
जमाअतच्या नवनिर्मित दापोडी शाखेचे स्थानिक अध्यक्ष अजीमोद्दीन शेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की वय १४ पर्यंतच्या मुलांमध्ये इस्लामी  जीवनपद्धतीसंबंधी जागृती निर्माण करणे,शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे, अंतिम प्रेषितांचा ज्ञानार्जनासंबंधीचा दृष्टिकोन विद्याथ्र्यांमध्ये आणणे हेच स्टडी सर्कलचे उद्दिष्ट आहे. याद्वारे आईवडिलांची आज्ञाधारकता, शारीरिक व सार्वजनिक स्वच्छता, अपायकारक वस्तूंपासून दूर राहाणे, आदि आदर्श मूल्यांची जोपासना मुलांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच  शालेय स्पर्धा, खेळ इत्यादींमध्ये सहभागी होणे आणि त्याद्वारे निश्चित ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी तयारी करवून घेणे, नमाज वेळेवर अदा करणे, उच्च चारित्र्य निर्माण करण्याचा  उद्देश असून दर रविवारी केवळ इकरा स्कूलचेच नव्हे तर सबंध दापोडी परिसरातील १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन जमाअतच्या स्थानिक शाखेतर्फे करण्यात
येणार असल्याची माहिती अजीमोद्दीन शेख यांनी या वेळी दिली.
इकरा इंग्लीश स्कूलचे सचिव म. सलीम शेख यांनी ‘स्टडी सर्कल’ उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले की स्टडीमुळे मुलांमध्ये मूलगामी बदल होणार आहेत. आमच्या शाळेतील उपस्थित विद्याथ्र्यांमधील नैतिक, चारित्र्यात्मक बदल पाहून परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थीसुद्धा या स्टडी सर्कलमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतील, असा   आशावादही शेख यांनी व्यक्त केला.
लहान मुलांना समजेल व उमजेल अशा अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत मार्गदर्शन करताना प्रा. वारसी यांनी थेट संवाद साधला. ह. मुहम्मद (स.) यांना अल्लाहकडून प्रेषित्वाची  शुभसूचना मिळाली. प्रेषितांनी आपल्या घराण्यातील सर्वांना एकत्रित करून याची उद्घोषणा केली. पण एकानेही प्रेषितांचे म्हणणे मान्य केले नाही. पण प्रेषितांच्या काकांचा ११ वर्षांचा  मुलाग उठून उभा राहिला. वडीलधाऱ्यांसमोर उभारताना त्याचे पाय लटपटू लागले. पण... निश्चय पर्वतासमान. त्याने निर्भीडपणे सांगितले, हे प्रेषिता! आपण अल्लाहचे सच्चे प्रेषित आहात. मी त्यावर श्रद्धा ठेवतो. मी इस्लाम स्वीकारून माझे आचरण आपल्या आदेशानुसार करीन. इतिहासात त्या मुलाचे नाव अजरामर झाले. तेच इस्लामचे चौथे खलीफा ह. अली  (रजि.) होत. प्रेषितांचे ते जावईही झाले.
ही दृढनिश्चयता स्टडी सर्कलद्वारे जमाअत मुलांमध्ये आणू इच्छिते. त्यासाठी प्रत्येक रविवारी विविध विभागांतील तज्ज्ञ मंडळी येतील आणि मुलांना मार्गदर्शन करतील. येणाऱ्या  काळात समाजाचे नेतृत्व यामधूनच फुलू लागेल, असा विश्वासही प्रा. वारसी यांनी व्यक्त केला.
एस.आय.ओ.चे अध्यक्ष रिझवान खान यांनीही आपले विचार व्यक्त केले. मौ. उबेर काझी यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर वकारअहमद अलीम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरूवात सुश्राव्य कुरआन पठणाने झाली. अजीमोद्दीन शेख यांनी अत्यंत सूचकतेने सूत्रसंचालन केले. शेवटी मुलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनंदिन जीवनात कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण होते की निर्णय घेणे फार अवघड जाते. दोन पर्याय समोर असतात आणि त्यांचे दोन परिणामही डोळ्यांसमोर दिसू लागतात. हे  करावे की ते करावे? असा प्रश्न पडतो. अशा वेळी इतरांशीही सल्लामसलत करावी लागते. यातून कितीतरी पर्याय सुचवले जातात. पण प्रश्न नेमका सुटेल याची शाश्वती नसते.
माणसाच्या निर्माणकर्त्याने बरे-वाईट पारखण्याकरिता बुद्धी दिली आहे, जिच्या जोरावर आज झालेली भौतिक प्रगती आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे. तरीही आपण आपल्या  प्रश्नांवर नेमका तोडगा काढण्यात का अपयशी ठरतो?
अशी अडचणीची वेळ फक्त व्यक्तीपुरती मर्यादित नसून सामाजिक स्तरावरही सर्वत्र दिसून येते. सामाजिक जीवनातीलही कित्येक प्रश्नांवर असंतोषाचा भडका उडताना जगभर दिसून  येतो. नवरा-बायकोचे अधिकार व कर्तव्ये यामध्ये समतोल साधता न आल्यामुळे उडणारे खटके, मालकवर्ग आणि कामगारबंधू यांच्या दरम्यान होणारे संघर्ष, व्यक्तीस्वातंत्र्य आणि  समाजहीत यातून निर्माण होणारे वाद इत्यादी बोलकी उदाहरणे आहेत.
जगामध्ये आजपर्यंत जितके वाद, तंटे उद्भवले आणि आजही बघायला मिळतात, त्याचे कारण हेच आहे की तथाकथित बुद्धिजीवींनी अशा समस्यांकडे एकतर्फी नजरेने बघितले आणि  तोडगा म्हणून असमतोल उपाय राबविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिगत असो वा सामाजिक प्रत्येक स्तरावर शांतता भंग होण्याचे मूळ कारण हेच आहे.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धीची माणसे या जगामध्ये पूर्वीही होती आणि आजही आहेत. अशा लोकांनी नेहमीच हे मान्य केले की जीवनरूपी प्रवासात फक्त आपली बुद्धीच आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही तर ज्याने आपल्याला प्रवासाला धाडले आहे त्याची मार्गदर्शिका आपल्या सोबत असणे अत्यंत जरुरी आहे नाही तर प्रवासात खूप अडचणी निर्माण  होतील. विचाराअंती ही माणसे दोन निर्णयांप्रत पोहोचली, एक हा की, ही सृष्टी काही आपोआप निर्माण झालेली नाही तर या सृष्टीचा एक निर्माणकर्ता आहे. दुसरा असा की माणसाचे  जीवन हे फक्त या जगापुरतेच मर्यादित नाही तर पुढे आणखी एक जीवन आहे, ज्यामध्ये जीवनभर केलेल्या बऱ्या-वाईट कर्मांचे परिणाम प्रत्येकासमोर येतील. त्यांनी निरीक्षण केले की  या जगामध्ये कर्मांचे परिणाम साधारणत: निघत नाहीत. येथे तर सदाचारी लोकांच्या नशिबी दु:ख, यातना, कष्ट येतात आणि दुराचारी लोक ऐश व आरामाचे जीवन व्यतीत करतात.  पण सृष्टीचा निर्माणकर्ता न्यायी आहे. तो जरूर प्रत्येकाचा हिशोब घेईल.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धी असल्यामुळे या विचारांप्रत पोहोचल्यावर त्याच्या अंतर्मनाची हीच प्रार्थना होती की हे पालनकर्ता आम्हांस थेट तुझ्यापर्यंत पोहोचणारा मार्ग दाखव  आणि आम्हाला सरळमार्गी बनव. आम्हाला भीती वाटते की सरळमार्गावरून प्रवास करता करता एखाद्या आडवाटेवर आम्ही वळलो तर कदाचित ती वाट आम्हाला भटकवणारी किंवा विनाशाच्या खाईत लोटणारी ठरू शकते.
याच मार्गदर्शनासाठी म्हणजे लोकांचा जीवनप्रवास सुखाचा व्हावा आणि मरणोत्तर जीवनातही ते सफल व्हावेत म्हणून अल्लाहाने जवळपास आपले सव्वा लाख पैगंबर या जगामध्ये  पाठविले आणि त्यांच्यामार्फत आपला संदेश, आपले मार्गदर्शन पोहोचविले. जगामध्ये आलेल्या अनेक पैगंबरांपैकी अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो)  आहेत आणि अवतरित झालेल्या अनेक संदेशांपैकी अंतिम संदेश कुरआन आहे.
कुरआनच्या सुरुवातीला सूरह फातिहा हा अध्याय आहे. हा अध्याय एक प्रार्थना आहे, याचना आहे. ही प्रार्थना कुरआनच्या सुरुवातीला निश्चित करण्याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही या  ग्रंथापासून लाभ घेऊ इच्छिता तर प्रथम अल्लाहकडे अशा प्रकारे प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना कशी करावी? हेही मार्गदर्शन केले गेले आहे.

‘अल्लाहच्या नावाने जो अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करण्यासाठी यापेक्षा अधिक योग्य व चांगल्या शब्दांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या शब्दांमध्ये अल्लाहचा परिचय करून देण्यात आला   आहे आणि त्याच्या गुणांचा उल्लेख आहे. ‘रहमान’, ‘रहीम’ हे शब्द ‘र ह म’ या धातूपासून बनलेले आहेत. ‘रहमान’ ही शब्दरचना जोरदार आणि जोशपूर्ण कैफियत दर्शवणारी आहे तर  ‘रहीम’ या शब्दरचनेत निरंतरता, सदैवपणाची कैफियत आहे; म्हणजे अल्लाहची दया, कृपा बरसणारी आहे आणि ही जोरदार कृपावृष्टी कधीही थांबणारी नाही तर निरंतर होत राहणारी  आहे. कोणत्याही काळापुरती मर्यादित नाही तर ही कृपावृष्टी पूर्वीही होती, आजही होत आहे आणि पुढेही होत राहणार. जसे समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटा आणि निरंतर वाहणाऱ्या  नदीचा प्रवाह यांची एकत्र कल्पना करणे अवघड आहे तसेच अल्लाहाच्या या गुणवैशिष्ट्यांची एकत्र कल्पना करणे आपल्याला शक्य नाही.

‘सर्व स्तुती, कृतज्ञता अल्लाहसाठी आहे जो साऱ्या विश्वांचा स्वामी, पालनकर्ता आहे.’

जगात कुठेही व कोणत्याही स्वरूपात जे सौंदर्य दिसून येते, वैभव-समृद्धी दिसून येते, ज्या ज्या सामथ्र्यांचा आपणास अनुभव होतो त्या सर्वांचा मूळ स्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रत्येक  स्तुती, प्रशंसा याला पात्रही फक्त तोच निर्माणकर्ता आहे. तोच साऱ्या विश्वांचा स्वामी आहे आणि तोच अल्लाह साऱ्या विश्वांचा पालनकर्ताही आहे. त्याने माणसाला असंख्य देणग्यांनी उपकृत केले आहे, हे मान्य करून फक्त त्याचेच कृतज्ञ व आभारी बनून जगले पाहिजे. भूक लागल्यावर आपण जेवण करतो जेवणानंतर त्याचे आभार प्रकट करताना म्हणावे की,
‘‘हे पालनकर्ता! आम्ही तुझे आभारी आहोत, आमच्या
पोटाची आग विझवण्यासाठी तू काय काय निर्माण केले!’’
दिवसभर काम केल्यानंतर माणूस पार थकून जातो व त्याला आपोआप झोप लागते. सकाळी उठल्यावर जेव्हा सारा थकवा निघून जातो तेव्हा माणसाने हे बोलले पाहिजे की, ‘‘हे   अल्लाह काय छान व्यवस्था आहे तुझी! रात्री अंधार झाला म्हणून सर्वत्र शांतता पसरली आणि मला सुखाची झोप लागली ज्यामुळे सारा थकवा दूर झाला, मी तर मेल्यागत झालो होतो.’’
सकाळी उठल्याबरोबर शौचालयाकडे जाणे हा जीवनाचा भाग आहे. तेथून आल्यानंतरही माणसाने हेच म्हणावे की प्रत्येक आभार, धन्यवाद अल्लाहसाठीच आहे, ज्याने शरीरव्यवस्था  अशी बनवली की त्रासदायक वस्तू दूर होऊन तब्येत फ्रेश झाली. यासारख्या आंतरिक व बाह्य कितीतरी देणग्या माणसाला मिळालेल्या आहेत म्हणून ज्याने दिल्या त्याचाच कृतज्ञ व  आभारी बनून राहिले पाहिजे.

‘अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
त्याची, दया, कृपा अनंत आहे. त्याला सीमा नाही. त्याचा दयाळूपणा कायमचा आहे, निरंतर, सदैव आहे. ‘निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा आहे.’ तो फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो  न्यायीसुद्धा आहे. कयामत म्हणजे न्यायनिवाड्याच्या दिवशी जेव्हा संपूर्ण मानवजातीला पुन्हा जिवंत केले जाईल आणि प्रत्येकाच्या जीवनकार्याचा तपास होईल. सदाचारी लोकांना  त्यांच्या सदाचाराचे भरपूर फळ मिळेल आणि दुराचारी लोकांना त्यांच्या कर्माची योग्य ती शिक्षा भोगावी लागेल. जीवनाच्या परीक्षेत कोण सफल झाला आणि कोण असफल ठरला या  निकालाचा तो दिवस असेल. त्या निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा फक्त अल्लाह आहे. न्यायनिवड्याचे सर्वाधिकार फक्त त्याच्याच हातात असतील. शिक्षेपासून सुटण्यासाठी तेथे कसलीही  धनसंपत्ती कामी येणार नाही. नातेवाईक, मित्रमंडळी कोणीही मदतीला येणार नाहीत. राजा असो वा रंक कोणीही कुणासाठीही काहीच करू शकणार नाही, कारण प्रत्येकाला फक्त  स्वत:ची चिंता लागलेली असेल. त्या दिवशी सर्वांना ऐकू येईल की, ‘‘आज सत्ता कुणाची आहे?’’ म्हणजे आज राजाधिराज कोण आहे, वास्तविक साम्राज्य कुणाचं आहे? उत्तर दिले  जाईल, ‘‘एकमेव सामथ्र्यशाली अल्लाहचं.’’ ‘आम्ही फक्त तुझीच भक्ती करतो.’
हे अल्लाह आमच्यावर तुझी अनंत कृपा आहे. तू अत्यंत कृपाळू, दयाळू आहेस आणि तू न्यायीसुद्धा आहेस. तूच आमचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, मालक आहेस. म्हणूनच आम्ही हे  मान्य करतो की आम्ही फक्त तुझेच भक्त, गुलाम, दास आहोत. आम्ही फक्त तुझीच भक्ती, उपासना करतो आणि करत राहणार. फक्त तुझीच आज्ञापालन करतो आणि करत  राहणार.

‘आणि आम्ही फक्त तुझ्याकडेच मदतीची याचना करतो.’
खरा साहाय्यक तूच आहेस. फक्त तुझ्याच मदतीवर आमचा विश्वास आहे. तुझ्याशिवाय आम्ही कोणत्याही पैगंबरांची, संताची, देवदूतांची किंवा तू निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही  वस्तूची आम्ही भक्तीही करत नाही व त्यांच्याकडे मदतीची याचनाही करत नाही. तू दिलेल्या सद्सद्विवेकबुद्धीमुळे आम्ही तुला ओळखू शकलो. आम्ही न मागताही तू आम्हांला भरपूर  दिले. आता आमची गरज एवढीच आहे की,

‘आम्हाला सन्मार्गी चालव.’

आम्हाला तो सन्मार्ग, सरळमार्ग दाखव आणि त्यावर चालण्याची शक्ती दे जो मार्ग थेट तुझ्यापर्यंत पोहोचतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचारविचार, वागणुकीमध्ये आम्हाला तो मार्ग  दाखव जो सत्य आहे, जो या जीवनातही खऱ्या उन्नतीचा, प्रगतीचा जामीन आहे आणि ज्यामध्ये मरणोत्तर जीवनातही कल्याणाची शाश्वती आहे.

‘त्या लोकांचा मार्ग ज्यांच्यावर तू कृपा केलीस.’
तो सन्मार्ग, सरळमार्ग जो तुझ्या प्रियजनांनी अंगीकारला. जगात आलेल्या सर्व पैगंबरांचा मार्ग, त्यांच्या सर्व सत्यनिष्ठ अनुयायींचा मार्ग, अशा मार्गावर चालताना जे शहीद झाले आणि  या सर्वांच्या पावलांवर पावले टाकीत जगणाऱ्या सदाचारी व चारित्र्यवान लोकांचा मार्ग, जे सर्व तुझ्या प्रसन्नतेचे पात्र ठरले.

‘जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.’
अल्लाहचा प्रकोप त्या लोकांवर प्रकटला ज्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा, जीवनपद्धतीचा मनापासून स्वीकार केला नाही. फक्त काही रूढी-परंपरांचा त्यांनी स्वीकार केला. ईशआदेशाच्या  विरुद्ध आपली मनमानी केली, अन्याय अत्याचाराचा मार्ग धरला, अशा सर्व लोकांना सुधरण्यासाठी भरपूर वेळ दिली गेली पण एका ठराविक वेळेनंतर त्यांना या जगातही शिक्षा मिळाली  आणि मरणोत्तर जीवनात अजून हिशोब व्हायचा बाकी आहे.
मार्गभ्रष्ट ते लोक आहेत ज्यांना उत्तम मार्गदर्शन केले गेले पण भावनेच्या भरात त्यांनी धर्मशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींविरुद्ध अवास्तव श्रद्धा बाळगल्या. पैगंबराला अल्लाहचा पुत्र  मानण्याचे महापाप केले. धर्मशास्त्रात निर्देश नसतानाही संसारत्याग करण्यासारख्या नवीन प्रथा सुरू केल्या आणि प्रकृतीच्या विरुद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात सरळ मार्गापासून ते खूप  दूर निघून गेले.

‘हे अल्लाह आमची प्रार्थना स्वीकार कर!’
सूरह फातिहा भक्तांनी मार्गदर्शनासाठी केलेली एक याचना आहे. अल्लाह त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून संपूर्ण कुरआन त्यांच्या समोर ठेवता आणि सांगतो की हाच तो सरळमार्ग आहे  ज्याची तुम्हास तळमळ लागली आहे. हा ग्रंथ तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सरळ मार्ग दाखवेल आणि तुमच्या जीवनातील असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये योग्य दृष्टिकोन   ठेवण्यास मदत करेल. या अध्यायाद्वारे आपणास काही गोष्टींचा बोध होतो. एक हा की, आपल्या जीवनात व्यक्तिगत स्तरावर जेव्हा जेव्हा गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते त्या त्या  वेळी आपण आपल्या निर्माणकर्त्याला, पालनकर्त्याला हाक मारावी आणि फक्त त्याच्याचकडे मदतीची याचना करावी. संबंधित विषयावर त्याने काय मार्गदर्शन केले हे जाणून घेण्याचा  प्रयत्न करावा. कारण माणसाला जीवनातील टप्प्या टप्प्यावर, पावला पावलावर याची गरज भासते.
दुसरा हा की बुद्धिमत्ता ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे आणि त्याचा वापर केव्हा व कसा करावा याबाबतीत ही कुरआनमध्ये भरपूर मार्गदर्शन आहे, पण सामाजिक  स्तरावरील काही मुख्य प्रश्नांवर आपण हे मान्य केलेच पाहिजे की फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण त्यांना सोडवू शकत नाही.
कौटुंबिक वाद निर्माण होण्यास कारणीभूत असणारी समस्या ही आहे की, पती-पत्नीमध्ये अधिकार आणि कर्तव्याबाबतीत कोणते संतुलित नियम असावेत? हे निश्चित करणे मानवाला  शक्य नाही. कारण मानव एक तर स्त्री आहे किंवा पुरुष. या विषयावर जेव्हा स्त्री विचार करेल तेव्हा ती आपली भावना, आपल्या संवेदना यावर लक्ष देईल. पुरुषांच्या भावना, त्यांच्या   जाणिवांची कल्पनाही करणे तिला शक्य होणार नाही. अधिकार व कर्तव्यासंबंधी जेव्हा पुरुष विचार करेल तेव्हा त्याला स्वत:च्या जाणिवा तर माहीतच असणार पण स्त्रीच्या भावना,  संवेदना त्याला काय कळणार? शेवटी तो जे काही नियम बनवेल त्यामध्ये नक्कीच आपले वर्चस्व ठेवणार. फक्त एकच अस्तित्व असे आहे जो दोघांचा निर्माणकर्ता आहे. तो अल्लाह  आहे, जो दोघांवरही प्रेम करतो. तो दोघांचा शुभचिंतक आहे म्हणून या बाबतीत त्याचे मार्गदर्शन घेणे अत्यंत जरुरी आहे.
दुसरे; व्यक्ती आणि सामाजिक संबंधांमध्ये संतुलन कसे राखता येईल? पालकांना, वडीलधाऱ्या माणसांना वाटते की आम्ही जो हुकूम देऊ मुलांनी तो नेहमी मुकाटपणे मान्य करायलाच  हवा. मुलं म्हणतात, आम्हाला स्वतंत्र निर्णय घेऊ द्या. शासन व्यवस्था सांभाळणाऱ्या लोकांना वाटते की आम्ही जे जे निर्णय घेऊ जनतेने त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे. नागरिक  म्हणतात आमच्या स्वातंत्र्यावर का गदा आणता? जगभरात स्वातंत्र्य, फ्रीडम हा नारा किती लोकप्रिय आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. होय! व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य, पण  आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देण्याइतपत व्यक्तीस्वातंत्र्य दिले जावे का? सार्वजनिक ठिकाणी कसलेही चाळे करण्याची खुली मुभा असावी का? कायदेकानू आणि नैतिकतेचा विचार  व्हायला नको? हजारो लोकांचे नुकसान करून एखाद्याने स्वत:चा फायदा करून घेणे हे कसले व्यक्तीस्वातंत्र्य? याच प्रश्नांवर गरज भासते अशा संतुलित नियमांची ज्यामध्ये व्यक्तीही  मोकाट होऊन समाज विघातक बनू नये आणि समाजव्यवस्थाही बेछूट होऊन इतकी सशक्त होऊ नये की व्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाईल. म्हणूनच या प्रश्नावरही आपण आपल्या  निर्माणकर्त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणे जरुरी आहे.
तिसरी मोठी समस्या भांडवलदार आणि श्रमिक वर्गाची आहे. एकीकडे भांडवलदारांचे उत्पन्न अवाढव्य वाढतच आहे तर दुसरीकडे श्रमिकांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर' अशी होत  असल्याचे सामाजिक चित्र आपणासमोर आहे. एकीकडे पैशाची उधळपट्टी तर दुसरीकडे एक वेळच्या जेवणाची गैरसोय. ही विषमता असलेल्या समाजामध्ये भौतिक प्रगतीच्या आणि  विकासाच्या गप्पा मारणे योग्य नाही.
दुसरी बाजू अशी की श्रमिकांना त्यांच्या हक्कांपेक्षा जास्त दिल्यास भांडवल नुकसानीत येण्याचा धोका असतो. ही भीती असेल तर भांडवल व भांडवलदार मैदानात का व कसे टिकेल?  असे कित्येक प्रश्न व समस्या आहेत ज्यामुळे आज जगभरात अशांतता पसरलेली दिसून येते. म्हणूनच जीवन प्रवास सुखात, शांततेत पूर्ण व्हावा आणि या जगातही आणि मरणोत्तर  जीवनातही संपूर्ण मानवजात सफल व्हावी याकरिता सर्वांनी ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे सर्वांच्या भलाईचे आहे.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, (जेव्हा ‘सूरह शुअरा’ची आयत ‘वऩिजर अशीरतकल अ़करबीन’ (आपल्या जवळच्या नातेवाईकांना भय दाखवा) चे अवतरण झाले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरैशांना एकत्र बोलावले आणि म्हणाले, ‘‘हे कुरैशच्या लोकांनो! स्वत:ला नरकाच्या आगीपासून वाचविण्याची चिंता करा, मी अल्लाहच्या कोपाला  तुमच्यापासून जरादेखील टाळू शकत नाही. हे अब्दे मनाफच्या वंशजांनो! मी तुमच्यावरील अल्लाहच्या कोपाला जरादेखील टाळू शकत नाही. हे अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब! (पैगंबरांचे  काका) मी अल्लाहच्या प्रकोपाला तुमच्यापासून जरादेखील हटवू शकत नाही. हे सफिया! (पैगंबरांची आत्या) मी तुमच्यावरील अल्लाहच्या प्रकोपाला जरादेखील हटवू शकत नाही. हे  माझ्या कन्ये, फातिमा! (रजि.) तू माझ्या संपत्तीतील जेवढे काही मागशील ते मी देऊ शकतो, परंतु अल्लाहच्या प्रकोपाला तुझ्यावरून हटवू शकत नाही (तेव्हा स्वत:ला वाचविण्याची  चिंता करा, ईमान आणि अनुसरणच तेथे कामी येईल).’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आमच्या दरम्यान प्रवचन दिले. त्यात त्यांनी ‘माले गनिमत’ (युद्धात सापडलेली संपत्ती) च्या   चोरीची घटना अतिशय महत्त्वपूर्णरित्या सादर केली. मग पैगंबर म्हणाले, ‘‘मला तुमच्यापैकी कोणी अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थिती आढळू नये की त्याच्या मानेवर जोरजोरात   ओरडणारा उंट आहे आणि तो मनुष्य म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा (या पापाच्या संकटापासून वाचवा)! तेव्हा मी म्हणेन, मी तुझी काहीही मदत करू शकत  नाही, मी तुझ्यापर्यंत जगात ही गोष्ट पोहोचविली होती; मला तुमच्यापैकी कोणीही अंतिम निवाड्याच्या दिवशी या स्थितीत आढळू नये की त्याच्या मानेवर एखादा घोडा खिदळत आहे  आणि तो मनुष्य म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! धावा! मला मदत करा. तेव्हा मी म्हणेन, मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मी तुझ्यापर्यंत जगात ही गोष्ट पोहोचविली  होती; मला तुमच्यापैकी कोणीही अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत आढळू नये की त्याच्या मानेवर एखादी शेळी बसली आहे आणि ती ओरडत आहे आणि तो मनुष्य म्हणत   आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा. तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी येथे तुझ्याकरिता काहीही करू शकत नाही, मी तुला जगात आज्ञा पोहोचविल्या होत्या; मी  तुमच्यापैकी कोणाला अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत पाहू इच्छित नाही की त्याच्या मानेवर एखादा मनुष्य बसला आहे आणि तो ओरडत आहे आणि ज्याच्या खांद्यावर  बसलेला आहे तो मनुष्य म्हणत आहे, हे अल्लाहचे पैगंबर! या, मला मदत करा! तेव्हा मी त्यांच्या उत्तरादाखल म्हणेन, मी येथे तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही, मी तुला जगात  ही गोष्ट पोहोचविली होती; मी तुमच्यापैकी कोणास अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत पाहू इच्छित नाही की त्याच्या मानेवर कपड्यांच्या चिंध्या लटकत आहेत आणि तो  म्हणत आहे, हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा, तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही, मी तुला जगात ही गोष्ट पोहोचविली होती; मी तुमच्यापैकी कोणासही अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थिती पाहू इच्छित नाही त्याच्या मानेवर सोने-चांदीचे ढीग आहेत आणि तो म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत  करा! तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी तुझ्या पापाच्या शिक्षेला जरादेखील कमी करू शकत नाही, मी तुला जगात ही गोष्ट पोहोचविली होती.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
जनावरांचे ओरडणे आणि कपड्यांचे लटकण्याचा असा अर्थ आहे की ‘माले गनिमत’ (युद्धात आढळलेली संपत्ती) च्या या चोऱ्या अंतिम निवाड्याच्या दिवशी लपविता येणार नाहीत. प्रत्येक पाप ओरडून ओरडून सांगेल आणि तो पापी असल्याचे जाहीर करील. माहीत असावे की हे फक्त ‘माले गनिमत’च्या चोरीबाबतच विशिष्ट आहे असे नाही, प्रत्येक मोठ्या पापाची  हीच स्थिती असेल. अल्लाह त्या वाईट शिक्षेपासून प्रत्येक मुस्लिमाला वाचवो आणि वाईट स्थिती येण्याअगोदर पश्चात्तापाची ईशकृपा लाभो.

आम्ही सर्व एकाच आई-वडिलांची लेकरे : सलमान अहमद


लातूर (शादाब शेख)
जगातील सर्व मानवजातीचा निमार्ताही एकच आहे आणि मानवजातीची सुरूवातही एकाच आई- वडीलांपासून झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व देशवासी एकमेकांचे बांधव आहोत, एकाच  कुटुंबातील आहोत. हा धागा आम्हाला एका नात्यात गुंफतो. एकमेकांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवितो, असे प्रतिपादन एस.आय. ओ. चे प्रदेशाध्यक्ष सलमान अहमद यांनी  केले. लातूर येथील खोरी गल्ली स्थित स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते ‘एक ईश्वर , एक मानव कुटुंब’ या अभियानादरम्यान ते बोलत  होते. यावेळी प्रदेश सचिव उजेर अहमद रंगरेज, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमैर अहमद सिद्दीकी, खिजर शिबीबी, शहराध्यक्ष अली हैदर पटेल, शहर सचिव अब्दुल्लाह मनियार,  इंजिनिअर शादाब शेख उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, सर्व स्तरांतील, वर्गातील, व्यवस्थेतील लोकांचा ईश्वर एकच आहे. सध्या समाजात आपसात मनभेद वाढलेले असल्याचे दिसत  आहेत. ज्या देशातील लोकांमध्ये जात, पात, धर्म आदींबद्दल मनभेद असतील त्या देशाची प्रगती खुंटते. विद्यार्थ्यांमध्ये ही दिवसेंदिवस वैमनस्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे.  इस्लामबद्दल जाणून बुजून पसरविल्या गेलेल्या गैरसमजामुळे मानवकल्याणाला एका नात्यात गुंफणाऱ्या तत्वापासून लोक दूर आहेत. लोकांची मने यामुळे दुभंगलेली आहेत. एसआयओ  ‘एक ईश्वर एक कुटूंब’ या अभियानाद्वारे सर्व मनभेद, गैरसमज दूर करून सर्व स्तरातील, व्यवस्थेतील, वर्गातील लोकांना मानवतेच्या एका सूत्राचा संदेश समाजाच्या सर्व स्तरात   पोहचवून देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
21 ते 30 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अभियानांतर्गत शाळा, कॉलेज, महाविद्यालय, वैयक्तिक भेटीगाठींद्वारे एकात्मतेचा, एक ईश्वराचा, एक कुटुंबाचा समतेचा, न्यायाचा संदेश  जवळपास साठ लाख लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अभियानादरम्यान एसआयओने एक कारवां (शिष्टमंडळ) बनवून दक्षिण महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यांतून तब्बल दोन हजार  किमीचा प्रवास केला. हा कारवां मूंबई, ठाणे, पालघर, पूणे, पिंपरी चिंचवड , कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद मार्गे दक्षिण महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांतून तब्बल 1500 किमी चा  प्रवास करत लातूरला पोहचला होता. येथून पुढे उदगीर, नांदेड,परभणी, जालना असा प्रवास करत औरंगाबादला याचा समारोप झाला. लातूर येथे पत्रकार परिषद, स्ट्रीट दावत वर्क,  विद्यार्थी संवाद कार्यक्रम, मस्जिद परिचय कार्यक्रम, मानवी साखळी आदी उपक्रमाद्वारे विद्यार्थी व लोकांपर्यत पोहचवून मानवतेला जोडण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही  सर्व एका ईश्वराचे अनुयायी एकाच कुटुंबातील बंधू आहोत. आमच्या मुलभूत प्रश्न आणि गरजा एकच आहेत. आमचे विचार जेव्हा एका सुत्रांत बांधले जातील तर निश्चितच भेदभाव  संपून प्रगतीकडे वाटचाल होईल.
मानवकल्याणाचे हित डोळ्यासमोर ठेऊन,  हा कारवां पुढेही काम करील. या अभियानात हजारो कार्यकर्त्यांनी काम केले. अभियान यशस्वी करण्यासाठी एसआयओच्या दक्षिण महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी मी अल्लाहकडे या अभियानाच्या यशस्वीतेकरीता तसेच समाजात, देशात समता, न्याय, एकात्मता व अखंडतेकरीता प्रार्थना  करत असल्याचे यावेळी इंजि. सलमान अहमद म्हणाले

अरब समाजाचा आणि जगातील इतर राष्ट्रांचासुद्धा इस्लामपूर्व काळ हा अगदीच मार्गभ्रष्ट काळ होता. लिहिण्या-वाचण्याची कमतरता असलेल्या अरब समाजात मात्र कवनशास्त्र खूप प्रगत होते. अरब लोक अशिक्षित व असंस्कृत तर होतेच, परंतु अख्ख्या जगामध्ये कवनशास्त्रात त्यांचा कोणी स्पर्धक नव्हता. उच्च भाषाशैली आणि कविता त्यांच्या स्वभावातच होती. जणू अगदी लहानलहान मुलेसुद्धा कवनशास्त्रात तरबेज असत. एवढेच नव्हेतर गुलामांनासुद्धा कवनशास्त्रावर कमालींचे प्रभुत्व होते. त्या काळात मोठमोठी कविसंमेलने होत असत. या कविसंमेलनात दूरदूरचा प्रवास करून पुरुष व महिला मोठ्या संख्येत सहभागी होत असत. स्त्रियांसुद्धा कवनशास्त्रात खूप तरबेज होत्या. अरबांना आपल्या काव्यशक्तीचा एवढा अभिमान होता की, बिगर अरबांना ते ‘अजमी’(अर्थात बोलता न येणारा) या नावाने संबोधत असत. तसे पाहता ‘अरब’ या शब्दाचाच अर्थ ‘वक्तृत्व कलेत पारंगत असलेला’ असा होतो. आणि त्यांच्या वक्तृत्व प्राविण्यामुळेच ते जगभर ‘अरब’ या नावाने प्रसिद्ध होते.
हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने सर्वांनाच प्रभावित करीत असत. वैयक्तिक आवडीशिवाय हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने आणि काव्याने राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बदलून टाकीत असत. अगदी युद्धाच्या वेळी योद्ध्यांना युद्धप्रेरणा देण्यासाठी सर्वांत जास्त प्रभावी माध्यम वक्तृत्वशास्त्रच होते. एखाद्याचा विरोध करण्यासाठीसुद्धा सर्वांत प्रभावी माध्यम कवनशास्त्रच होते. ‘तलवारीपेक्षाही जास्त तीक्ष्ण असलेले प्रभावी हत्यार म्हणजे कवनशास्त्र’, असेच त्या काळी समीकरण होते. कवनशास्त्राने त्या काळी मोठमोठे शूरवीर आणि योद्धे तयार केले. युद्धातील जय-पराजयाची पूर्ण परिस्थिती आणि सामाजिक व राजकीय परिस्थिती बदलून टाकण्याची अफाट शक्ती त्यांच्या कवनशास्त्रात होती.
अशा काळात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी प्रेषित्वाची घोषणा करताच संपूर्ण अरबस्थान त्यांच्या विरोधात पेटून उठला. त्यांच्या विरोधात या समाजाने तलवार आणि भाल्यासह कवनशास्त्राच्या अतिप्रभावी हत्याराचासुद्धा भरपूर वापर केला. आदरणीय प्रेषितांनी मायभूमीचा त्याग केल्यावरसुद्धा हा विरोध थंडावण्याचे नाव घेत नव्हता. इस्लामद्रोह्यांनी इस्लाम व प्रेषितांविरुद्ध कवितांचा पर्वत रचून संपूर्ण अरब जगतात आणि अरब समाजाच्या प्रत्येक व्यक्तीत इस्लामविरोधी प्रेरणात्मक चळवळ उभी केली होती. इस्लामविरोधी कविता काही दिवसांतच कित्येक मैल दूरवर आपला प्रभाव टाकत होत्या. इस्लामसमर्थकांना रात्रंदिवस अशा काव्यांचा सामना करणे भाग होते. या मानसिक त्रासातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रेषितसोबत्यांनी माननीय अली(र.)यांना विनंती केली की, ‘‘आपण इस्लामद्रोह्यांच्या इस्लामविरोधी काव्यांचे सडेतोड आणि प्रभावी उत्तर देणार्या कविता रचाव्यात’ माननीय अली(र.)यांनी यासाठी आदरणीय प्रेषितांची परवानगी घेण्याची अट घातली. प्रेषितसोबत्यांनी ही विनंती प्रेषितांना केली, तेव्हा प्रेषितांनी या कामाची जबाबदारी माननीय अली(र.)यांच्यावर टाकण्याऐवजी मदीना शहरातील मुस्लिमांची सभा बोलावून आवाहन केले,
‘‘ज्या लोकांनी तलवारीने माझे समर्थन केले, त्यांच्यापैकी कोण आहे जो या इस्लामविरोधी काव्यास तोंड देऊन इस्लामचे समर्थन करील?’’ एवढ्यात एक अन्सारी सोबती उठून उभे राहून म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! मी यासाठी तयार आहे.’’
‘‘तुम्ही त्यांच्या काव्याचा सामना कसा कराल? प्रेषितांनी विचारले,
‘‘हे प्रेषित! मी आपले काव्य इस्लामचे समर्थन आणि इस्लामद्रोह्यांच्या विरोधात तयार करेन.’’
आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली. इस्लामसमर्थक कविता रचणारे हे महान कविवर्य म्हणजेच - ‘माननीय हस्सान बिन साबित अन्सारी(र.)’ होत.
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांनी इस्लामसमर्थनार्थ आपल्या सर्व काव्यशक्ती पणाला लावून संपूर्ण अरब जगतात इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर दिले आणि इस्लामची भरपूर सेवा केली. माननीय हस्सान बिन साबित(र.)हे ‘खजरज’ परिवाराच्या ‘नज्जार’ या प्रतिष्ठित शाखेचे सुपुत्र होत. त्यांची वंश शृंखला अशी आहे.
‘हस्सान’ पिता साबित पिता मंझर पिता हराम पिता अमरु पिता झैद मनात पिता अदी पिता अमरु पिता मालिक पिता नज्जार पिता सआलबा पिता अमरू पिता खजरज.’’ त्यांचे प्रसिद्ध टोपण नाव ‘अबू वलीद’ असे होते. परंतु त्यांना ‘शायर-ए-रसूल’ अर्थात ‘प्रेषितांचे कवि’ या नावानेच जास्त संबोधण्यात येते. त्यांच्या मातेचे नाव ‘फरिआ बिन्त खालिद’ असे होते. त्या ‘खजरज’ परिवाराच्या ‘साअदा’ या शाखेच्या गर्भश्रीमंत असलेल्या ‘माननीय साअद बिन उबादा(र.)’ यांची पुतनी होत. त्यांनासुद्धा इस्लाम स्वीकृतीचे सौभाग्य लाभले होते.
माननीय हस्सान(र.)यांनी एका अशा परिवारात जन्म घेतला, जो पहिल्यापासूनच काव्यशास्त्रात अरब समाजात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित होता. काव्यशास्त्राची या परिवारात परंपरागत आवड होती. त्यांनी आपल्या प्राचीन वाडवडिलांचा हा वारसा मोठ्या कौशल्याने जपला होता. तसेच या परिवाराने अरबी भाषेतील काव्यशास्त्रात नवनवीन संशोधनसुद्धा केले. म्हणून हा परिवार संपूर्ण अरबजगतात नावाजलेला आणि प्रसिद्ध होता.
माननीय हस्सान(र.)यांनी काही दिवसातच इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर देऊन विरोधकांची तोंडे बंद केली. ते हिजरी सन पूर्व ६५ वर्षांपूर्वी जन्मले आणि वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून आपल्या कवन कौशल्याच्या माध्यमाने इस्लामची अभूतपूर्व सेवा केली. इस्लाम स्वीकारण्यापूर्वीही ते अरब जगतात क्रमांक एकचे कवि होते आणि अरब जगातील प्रत्येक व्यक्तीचे ते पहिल्या पसंतीचे नावाजलेले आणि आवडते कवि हते.
इस्लाम स्वीकृतीपूर्वी त्यांचे दिवस-रात्र याच कार्यात व्यतीत होत असे. कबिल्याच्या आपसांतील लढायांमध्ये ते योद्ध्यांना प्रेरित करण्यासाठी आवेशपूर्ण कवन करून त्यांची थैर्यशक्ती वाढवीत असत. युद्धभावना भडकाविण्यासाठी त्यांच्या कविता खूप प्रसिद्ध होत्या.
इस्लामस्वीकृतीच्या वेळी ते वयोवृद्ध होते. परंतु इस्लाम स्वीकृतीमुळे त्यांच्या काव्यात तारुण्य व नवचैतन्य निर्माण झाले. तसेच त्यांच्या काव्यशैलीतसुद्धा कमालीचा बदल झाला होता. प्रेषितकाळामध्ये त्यांनी सर्वांत मोठे ‘जिहाद बिल लिसान’ अर्थात मौखिल धर्मयुद्ध केले. एकीकडे त्यांनी इस्लामद्रोही कविंची आपल्या काव्यशक्तीने सडेतोड उत्तर देऊन तोंडे बंद केली तर दुसरीकडे त्यांनी इस्लामसमर्थनार्थ आणि प्रेषितत्वाच्या समर्थनार्थ सुद्धा प्रभावी काव्यरचना केली. या काव्यामुळे इस्लामसमर्थक वर्गात नवचैतन्य निर्माण झाले.
माननीय हस्सान(र.)हे अतिशय हळव्या स्वभावाचे होते. म्हणून त्यांना युद्धात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. इब्ने यसीर(र.)या इतिहासकाराने लिहिले की, ‘एहजाब’ च्या युद्धामध्ये(हिजरीसन ‘५‘) माननीय हस्सान(र.)यांच्या बाबतीत एक अतिशय विचित्र घटना घडली. या युद्धात सर्व इस्लामद्रोही लोकांनी आणि ‘ज्यू’ लोकांनी संघटित होऊन मदीना शहरावर हल्ला चढविण्याचा निश्चय केला. या कटकारस्थानाची वार्ता प्रेषितांना मिळाली. त्यांनी मुस्लिमांना एका किल्ल्यात थांबविले. कारण या ठिकाणी मुस्लिमांचा लष्करी दस्ता उपलब्ध नव्हता. या किल्ल्यात माननीय हस्सानसुद्धा इतर आबालवृद्धांसमवेत होते. याच काळात एक ‘ज्यू’ किल्ल्याजवळ येऊन परिस्थितीचा आढावा घेऊ लागला. आदरणीय प्रेषितांच्या आत्या सन्माननीय सफया बिन्त अब्दुल मुतल्लिब(र.)त्या ‘ज्यू’ माणसास पाहून हस्सान बिन साबित(र.)यांना म्हणाल्या, ‘त्या ‘ज्यू’ ला जाऊन ठार करा.’ परंतु माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे धैर्य झाले नाही आणि माननीय सफया(र.)यांनी एक लाकडी दांडा त्या शत्रूच्या डोक्यात इतक्या जोरात मारला की तो जागीच कोसळला. आता माननीय सफया(र.)म्हणाल्या, ‘‘आता तरी जाऊन त्याचे शीर धडा वेगळे करा!’’ परंतु माननीय हस्सान(र.)म्हणाले, ‘‘हे अब्दुल मुतल्लिबच्या कन्ये! त्याचे मुंडके कापण्याचे धैर्य माझ्यात नाही.’’
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे बरेच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. शिवाय त्यांचे काव्यसंग्रह भारत, ट्यूनेशिया, ब्रिटेन आणि इतर देशांत प्रकाशित झाले असून बर्याच भाषांमध्ये त्यांचे भाषांतरसुद्धा झाले आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget