Latest Post

माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुमच्यापैकी कोणाच्या दारात एखादा ओढा असेल ज्यात तो दररोज पाच वेळा आंघोळ करीत असेल  तर सांगा त्याच्या शरीरावर थोडादेखील मळ बाकी राहू शकतो काय?’’ सहकाऱ्यांनी उत्तर दिले, ‘‘नाही, त्याच्या शरीरावर अजिबात मळ राहाणार नाही.’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हीच  स्थिती पाच वेळची नमाजांची आहे, अल्लाह त्या नमाजांद्वारे पापक्षालन करतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ही हकीकत स्पष्ट केली आहे की नमाज मनुष्याचे पाप क्षमा होण्याचे माध्यम बनते आणि ही गोष्ट एका अनुभूती होणाऱ्या उदाहरणाद्वारे  समजावून सांगितली आहे. नमाजमुळे मनुष्याच्या मनात कृतज्ञतेची ती स्थिती निर्माण होते जिच्या परिणामस्वरूप तो अल्लाहच्या आज्ञापालनाच्या मार्गावर चालू लागतो आणि  अवज्ञांपासून त्याचे मन दूर जाऊ लागते, इतकेच काय जर त्याच्या हातून एखादी चूक घडते तेव्हा ती जाणूनबुजून घडत नाही आणि लगेच तो आपल्या पालनकत्र्यासमोर लोटांगण  घेतो, रडून रडून क्षमा मागतो. माननीय अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने एका अनोळखी महिलेचे चुंबन घेतले, मग तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे  आला आणि त्यांना या गुन्ह्याबाबत सांगितले तेव्हा पैगंबरांनी या आयतीचे पठण केले, ‘‘व अ़िकमिस्सलाता तऱफन्नहारि व जुल़फम्मिनल्लैलि, इन्नल हसनाति यु़जहिबनस  सय्यिआति.’’ यावर तो मनुष्य म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! ही आयत माझ्यासाठी विशिष्ट आहे काय?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘नाही, माझ्या जनसमुदायतील सर्व लोकांसाठी आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
ही हदीस वरच्या हदीसचे आणखीन अधिक स्पष्टीकरण करते. यात सांगितले गेले आहे की नमाज पापांना नष्ट करते. या हदीसमध्ये ज्या मनुष्याचा उल्लेख करण्यात आला आहे तो  एक ईमानधारक मनुष्य आहे, तो जाणूनबुजून कुकृत्य करीत नव्हता परंतु मनुष्य होता, वाटेत भावनेच्या भरात त्याने एका अनोळखी महिलेचे चुंबन घेतले, त्याबाबत त्याला इतके  अस्वस्थ वाटले की तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘मी शिक्षापात्र एक कर्म केले आहे, मला शिक्षा देण्यात यावी.’’ तेव्हा पैगंबरांनी कुरआनमधील ‘सूरह  हूद’च्या शेवटच्या चरणातील ही आयत त्याला ऐकविली जिचा वर उल्लेख करण्यात आला आहे. या आयतमध्ये अल्लाहने ईमानधारकांना दिवसा व रात्रीच्या वेळी नमाज अदा करण्याचा  आदेश दिला आहे आणि मग सांगितले आहे, ‘‘इन्नल हसनाति यु़जहिबनस सय्यिआति.’’ अर्थात पुण्य पापांना नष्ट करतात आणि त्यांचे प्रायश्चित्त बनतात. यावर त्या मनुष्याचे  समाधान झाले आणि त्याची अस्वस्थता संपुष्टात आली. यावरून लक्षात येते की पैगंबरांनी आपल्या सहकाऱ्यांना किती उच्च दर्जाची शिकवण आणि प्रशिक्षण दिले होते. माननीय उबादह  बिन सामित यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘या पाच नमाजी आहेत ज्यांना अल्लाहने आपल्या दासांवर अनिवार्य केल्या आहेत. ज्या मनुष्याने उत्तम  पद्धतीने वुजू केली आणि त्या नमाजीं निश्चित वेळी अदा केल्या आणि रुकूअ व सजदे योग्य प्रकारे केले आणि त्याचे मन अल्लाहसमोर नमाजींमध्ये नतमस्तक राहिले तेव्हा अल्लाहने  त्याच्या मोक्षाची जबाबदारी घेतली आणि ज्याने असे केले नाही तर त्याच्यासाठी अल्लाहचे हे वचन नाही. जर इच्छिले तर त्याला क्षमा करील आणि इच्छिले तर त्याला शिक्षा देईल.’’ 
(हदीस : अबू दाऊद)

मुंबई (मीरा रोड)-
सामाजिक सुसंवाद, आपुलकी आणि आनंदमय वातावरण असे एक अनोखे दर्शन मीरा रोड व जवळच्या हिंदू, खिश्चन व इतर धर्मीय देशबांधवाना रविवार, ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी येथील स्थानिक मुस्लिम समुदायाने मस्जिदीच्या परिचयासाठी आमंत्रित केले.
जमात-ए-इस्लामी हिंद आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) यांच्या संयुक्त विद्यमाने सना मस्जिद, मील्लत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित, मीरा रोड येथे हा पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला. खरे तर मस्जिद परिचय कार्यक्रमांच्या मालिकेचा हा एक भाग होता, जे राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात आयोजित केले जात आहेत.
छोट्याशा स्वागतपर भाषणाने अनोख्या अशा या कार्यकर्माचा परिचय आणि महत्त्व पटवून देण्यात आल्यानंतर पाहुण्यांना मस्जिदमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना नमाज पठण करणारे (नमाजी) प्रार्थनापूर्व स्वच्छता (वुजू) कशी करतात हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले. नमाज कशी पठण करतात, नमाजचे विधी काय काय असतात? त्यात कशाचे पठण केले जाते याचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आणि मस्जिदचे मेहराब, मिम्बर (प्रवचन देण्यासाठीचा मंच), ग्रंथालय इत्यादींचे महत्त्व सांगण्यात आले.
संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी अजान पुकारल्यानंतर अतिथींना त्याचा अर्थ सांगितला गेला आणि मस्जिदमध्येच पाहुण्यांना बसण्याची विनंती करण्यात आली. त्यांच्यासमोर नमाज पठण करण्यात आली. हा अनुभव एका पाहुण्याच्या शब्दांत चांगल्या प्रकारे स्पष्ट केला जाऊ शकतो, तो असा-
‘‘प्रथमच मला नमाज इतक्या जवळून पाहण्याची संधी मिळाली, नमाजमध्ये दिसणारी सामाजिक समानता आणि शिस्तीने मला सर्वांत जास्त प्रभावित केले. श्रीमंत, गरीब, छोट्यातला छोटा असो की कुणी कितीही मोठा असा कोणताही भेद न करता आणि खांद्याला खांदा लावून उभे राहणे आणि आम्हाला सांगितले गेले की एक नोकरसुद्धा प्रार्थनेचे नेतृत्व करू शकतो आणि इतरांनी त्याचे पालन करणे बंधनकारक असते, मग ते कितीही श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक असोत.’’
आयोजकांशी सुसंवाद साधून लोकांनी आपापले विचार, अनुभव व्यक्त केले. त्यानंतर पाहुण्यांनी उपस्थित केलेल्या शंकाकुशंकाचे निरसन करून समाधानकारक स्पष्टीकरणानंतर त्यांना मस्जिदीबाहेर नेण्यात आले. त्यांना इस्लामविषयी काही मूलभूत पुस्तके भेट म्हणून देण्यात आली आणि तज्ज्ञांशी इस्लामविषयी चर्चा करण्यासाठी आणि मुस्लिमांच्या श्रद्धा व पद्धतींबद्दल अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी इस्लामिक माहिती केंद्राच्या १८००-२०००-७८७ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्वâ साधण्यास सांगितले गेले.
एका पाहुण्याने आज उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने सांगितले की आपल्यापैकी प्रत्येकाने आता आपल्या १०० मित्रांना भेटायला हवे आणि आज आपण जे काही पाहिले आणि ऐकले ते त्यांच्यापर्यंत पोहोचते केले पाहिजे.''
जमाअत-ए-इस्लामी हिंद मीरा रोडचे अध्यक्ष मुहम्मद अताउल हक यांनी सागितले की, ‘‘मस्जिद परिचय हे एक निमित्त होते. घाणेरड्या अशा तुच्छ राजकारणाने आणि आमच्या राजकीय पोटभरू नेत्यांनी आम्हा भारतीय बांधवांमध्ये निर्माण केलेला दुरावा नष्ट करण्याचा या आयोजनामागील मुख्य हेतू आहे.’’
लोकांमधून हा दुरावा कशा प्रकारे दूर केला जाऊ शकतो? असा प्रश्न विचारला असता एसआयओचे जिल्हाध्यक्ष रफीद शहाब यांनी सांगितले की पारंपरिक आमंत्रणपत्रके आणि बॅनर्सव्यतिरिक्त वैयक्तिक भेटीगाठी आणि सोशल मीडियाचा वापर करून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. अशा प्रकारचे आणखी काही कार्यक्रम इन्शा अल्लाह आम्ही आयोजित करू, असा आत्मविश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या दरबारी एकदा माननीय अली(र.)हजर होते. एवढ्यात एक अत्यंत देखणी देहयष्टी, रुंद आणि उंच शरीर, सुंदर आणि बोलके डोळे असलेला एक तरुण आत येण्याची परवानगी मागत होता. त्यांचा आवाज ऐकून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) म्हणाले,
‘‘हे पवित्र आचरणाच्या तरुणा! तुमचे हार्दिक स्वागत असो.’’
हे तरुण ज्यांना स्वयं आदरणीय प्रेषितांनी ‘‘तय्यबुल मुतय्यिब’’(पवित्र आचरणाचा) या अति-प्रतिष्ठित शब्दांनी संबोधिले, हेच माननीय अम्मार बिन यासिर(र.)होत. माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांची गणना प्रेषितांच्या अतिशय लाडक्या सोबत्यांमध्ये होते. त्याचे पिता माननीय यासिर(र.)आणि माता सन्माननीय सुमैया(र.)यांनीदेखील इस्लाम स्वीकारला होता. माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांची वंशशृंखला अशी आहे,
‘‘अम्मार पिता यासिर पिता आमिर पिता मालिक पिता कनाना पिता कैस पिता अलहसीन पिता लूझीम पिता औफ पिता आमिरुल अकबर पिता याम पिता अनस.’’
माननीय अम्मार(र.)यांचे पिता माननीय यासिर(र.)हे ‘कहतानी’ वंशाचे असून ‘येमेन’ चे रहिवासी होते. ते आपल्या हरवलेल्या भावाच्या शोधार्थ ‘मक्का’ शहरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन बंधु ‘मालिक’ आणि ‘हारिस’ देखील होते. त्यांचा भाऊ मक्का शहरात त्यांना सापडला नाही. म्हणून त्यांचे बंधु ‘येमेन’ला परत गेले, परंतु माननीय यासिर मक्का शहरातच स्थायिक झाले. ही घटना प्रेषितजन्माच्या पांच वर्षापूर्वीची आहे. अबू हुजैफा यांनी माननीय यासिर(र.)यांचे लग्न ‘सुमैया’ नावाच्या मुलीशी केले. याच सन्माननीय सुमैया(र.)च्या पोटी अम्मार(र.)आणि अब्दुल्लाह(र.)ही दोन मुले जन्मली. काही काळानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इस्लामचा प्रचार सुरु केला आणि या संपूर्ण कुटुंबाने इस्लामचा स्वीकार केला.
‘सहीह बुखारी’ ग्रंथात आहे की, माननीय अम्मार(र.)यांनी व त्यांच्या परिवाराने अगदीच सुरुवातीच्या काळात इस्लाम स्वीकारला. हा काळ इतका कठीण होता की, इस्लामचे नाव घेणार्यास असीम यातना सहन कराव्या लागत असत. इस्लाम स्वीकारतेवेळेस यांचा परिवार अबू जहल या अत्यंत भयानक इस्लामद्रोह्याचे गुलाम होता. इस्लाम धर्माचे द्रोही आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांनासुद्धा आतोनात अमानवी यातना देत होते. या दोन मुले अर्थात अम्मार, अब्दुल्लाह आणि त्यांचे माता-पिता यासिर आणि सुमैया यांच्यावरसुद्धा खूप अमानवी अत्याचार करण्यात आले. माता सुमैया(र.)आणि पिता यासिर(र.)हे खूप वृद्ध होते. इस्लामद्रोह्यांनी केलेले असीम अत्याचार सोसूनही त्याचे पाय कधीच डगमगले नाहीत. वृद्ध असलेले यासिर(र.)शेवटी शत्रूंचे अत्याचार सहन करताना मृत्यू पावले आणि मग एके दिवशी ‘अबू जहल’ या इस्लामद्रोह्याने अतिशय वृद्ध असलेल्या सुमैया(र.)यांच्या गुप्तांगावर भाला मारून ठार केले. इस्लाम स्वीकारण्यावरून ईश्वरासाठी दिलेले हे इतिहासातील पहिले बलिदान होय. यानंतर अम्मार(र.)यांचे बंधु अब्दुल्लाह(र.)यांनासुद्धा क्रूरकर्मा ‘अबू जहल’ याने ठार केले. आता केवळ अम्मार बिन यासिर(र.)राहिले. त्यांना या घटनांचे अपार दुःख झाले. परंतु क्षणभरही त्यांनी इस्लामचा ध्यास सोडला नाही. माता, पिता आणि बंधुच्या हौतात्म्यानंतर त्यांच्यावर अमानवी अत्याचारांची शृंखला चालूच होती.
मदीनेस स्थलांतरापर्यंत माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांनी इस्लाम द्रोह्यांचे खूप छळ सोसले. दरम्यानच्या काळात अॅबीसीनियामध्ये ते काही काळ राहिले. माननीय अम्मार(र.)प्रेषित स्थलांतरपूर्वी एक महिन्यापूर्वी मदीनेस स्थलांतर केले. त्यांच्यासोबत आणखीन प्रेषितांचे पाच सोबती होते.
माननीय अम्मार(र.)यांनी आधी ‘कुबा’कडे स्थलांतर केले. तेथे माननीय मुबश्शिर(र.)यांनी त्यांना आश्रय देऊन त्यांचा पाहुणचार केला होता. नंतर आदरणीय प्रेषितांनीसुद्धा ‘कुबा’कडे स्थलांतर केले होते. त्यांनी तेथे ‘मस्जिद-ए-कुबा’ची आधारशिला ठेवली. इतर सोबत्यांप्रमाणे माननीय अम्मार(र.)यांनीदेखील या कामात मन लावून भाग घेतला. काही दिवसांनंतर माननीय अम्मार(र.)प्रेषितांसोबत मदीनेस आले. प्रेषितांनी त्यांना कायमस्वरुपी तेथे राहण्याकरिता जागा सुद्धा प्रदान केली.
माननीय अम्मार(र.)हे इस्लामचे शूर शिपाई होते. आदरणीय प्रेषितांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. अगदी ‘बदर’च्या युद्धापासून इस्लामचे अंतिम युद्ध म्हणजे ‘तबूक’पर्यंत प्रत्येक युद्धात ते प्रेषितांबरोबर प्राण पणाला लावून लढले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) सुद्धा त्यांच्या कार्य, प्रामाणिकतेची अगदी मनापासून कदर करीत असत.
एका युद्धाच्या वेळी लष्करप्रमुख खालिद बिन वलीद(र.)आणि अम्मार बिन यासिर(र.)यांच्यात मतभेद झाले. प्रेषितदरबारी आल्यावरसुद्धा खालिद बिन वलीद(र.)यांनी अम्मार बिन यासिर(र.)यांना खूप ठणकावले. तेव्हा अम्मार बिन यासिर(र.)प्रेषितांना म्हणाले, ‘‘हा माणूस आपल्या उपस्थितीतसुद्धा मला दरडावून बोलत आहे.’’ यावर आदरणीय प्रेषित खालिद बिन वलीद(र.)यांना उद्देशून म्हणाले, ‘‘हे खालिद(र.)! तोंड बंद करा! जो अम्मारकरिता वाईट शब्द बोलतो, तो जणू ईश्वराविरुद्ध वाईट शब्द बोलतो. जो अम्मार यांचा द्वेष करतो, तो जणू ईश्वराचा द्वेष करतो आणि जो अम्मार यांचा अपमान करतो, तो जणू ईश्वराचा अपमान करतो!’’ आदरणीय प्रेषितांचे हे शब्द ऐकून माननीय खालिद बिन वलीद(र.)खूप घाबरले. त्यांनी अम्मार(र.)यांची माफी मागितली. माननीय खालिद बिन वलीद(र.)म्हणतात की, ‘‘तो दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता. मी प्रेषितांना विनंती केली की, मी अम्मारची माफी मागितली आणि त्यांनी मला मनःपूर्वक माफ केले. म्हणून आपण ईशदरबारी माझ्या मोक्षाची प्रार्थना करावी.’’
माननीय अबू बकर(र.)यांचा इस्लामी खलीफा खूप आदर करीत असत. इस्लामचे दुसरे खलीफा माननीय उमर फारुक(र.)यांचेदेखील ते खूप जवळचे मित्र होते. एकदा कुरैश कबिल्याचे काही प्रतिष्ठित लोक माननीय अबू सुफयान(र.), माननीय हारिस(र.), माननीय सुहैल बिन अमरु(र.)हे माननीय उमर फारुक(र.)यांच्याकडे आलेले होते. एवढ्यात माननीय अम्मार(र.), माननीय बिलाल(र.)आणि माननीय सुहैब(र.)देखील माननीय उमर(र.)यांना भेटण्यासाठी आले, तेव्हा माननीय उमर फारुक(र.)यांनी प्रथम माननीय अम्मार(र.), बिलाल(र.)आणि सुहैब(र.)यांची भेट घेतली आणि मग माननीय अबू सुफयान(र.)यांना भेटले. हिजरी सन २० मध्ये माननीय उमर फारुक(र.)यांनी माननीय अम्मार(र.)यांची ‘कुफा’च्या राज्यपालपदी नेमणूक केली तेव्हा कुफावासीयांना उद्देशून ‘आदेशपत्र’ पाठविले,
‘‘कुफावासियांनो! मी तुमच्याकडे माननीय अम्मार(र.)यांना राज्यपालपदी पाठविले आणि माननीय इब्ने मसऊद(र.)यांना धर्मशिक्षक आणि मंत्रीपदी पाठविले आहे. हे दोघेजण आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे लाडके आणि बदरच्या युद्धात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळविलेले ज्येष्ठ सोबती आहेत. त्यांच्या आदेशांचे पालन करावे. इब्ने मसऊद(र.)यांना मी तुमच्या भागाच्या आर्थिक प्रकरणांची जवाबदारी पण सोपविली आहे. उस्मान बिन हारिस(र.)यांना पूर्व इराकचे भूमापन आणि महसुलाची जवाबदारी सोपविली आहे. माननीय अम्मार(र.)यांनी एक वर्ष, नऊ महिण्यांपर्यंत ‘कुफा’चे राज्यपालपद भूषविले.
माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. संपूर्ण आयुष्यभर इस्लामची सेवा करण्यात गेले त्यामुळे त्यांना स्वतःचे घर बांधण्याचीसुद्धा सवड मिळाली नाही. ते राज्यपालपदी असतानासुद्धा त्यांच्या राहणीमानात काहीच बदल झाला नाही. ते स्वतःची कामे स्वतःच करीत. बाजारात स्वतः जाऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून स्वतःच्या पाठीवर घेऊन येत. घरातील सर्व कामकाज स्वतःच करीत. पोषाखसुद्धा खूप साधा वापरीत. एखाद्या ठिकाणी फाटल्यास स्वतःच्या हाताने त्यात ठिगळ लावीत. ते अतिशय सौम्य स्वभावाचे होते. धैर्य आणि संयम त्यांच्या स्वभावात होता. कलह आणि भांडणतंट्यापासून ते खूप दूर असत. बदरच्या युद्धात त्यांचा एक कान तुटला होता. एकदा एक टवाळखोराने त्यांना चिडविण्यासाठी आरोळी मारली, ‘‘ए कानकाप्या!’’ माननीय अम्मार(र.)यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय प्रेमपूर्वक स्वरात म्हटले,
‘‘माझा हा कान इस्लामरक्षणार्थ कापण्यात आला व मला याचा अभिमान आहे!’’
त्यांचे माननीय अली(र.)यांच्यावर खूप प्रेम होते. त्यांना कोणी वाईट म्हटलेले ते खपवून घेत नसत. सत्यवचन बोलण्यात ते कोणासमोरही घाबरत नसत. ते प्रत्येक काम ईश्वराच्या प्रसन्नतेखातर करीत असत. सत्यासाठी ते आजीवन लढले.

allah
मनुष्याने स्वतः पूर्ण विचाराअंती निर्णय करावा व आपला मार्ग सुनिश्चित करावा की, तो अंतिम दिवशीच्या कोणत्या परिणामास मान्य करतो व त्याचा काय अंत होणार आहे?
आज संपूर्ण जग अत्यंत व्याकूळ आणि अनिश्चित अवस्थेत आहे. कोठेही शांतता दृष्टीस पडत नाही. जगाच्या विविध भागांत युद्धाचे ढग घोंघावत आहेत. युद्ध आणि आक्रमकता आग ओकीत आहे. अधिकारांचे हनन होत आहे. शक्तिशाली शक्तिहीनास आपल्या जोखडामध्ये बांधत आहे आणि शक्तिहीनाची याचना ऐकणारा कोणी नाही. चोहीकडे अन्याय व अत्याचारचे नग्न नृत्य सुरू आहे. आज अन्याय व अत्याचार व्यक्तीचेच नव्हे तर समाजाचे आचरण बनले आहे. नैतिकतेचे मापदंड जे मानवतेच्या गौरवाचे प्रतीक मानले जाते, ते आज पायदळी तुडविले जात आहे. प्रेम, बंधुता, निष्ठा, सहानुभूती, सत्य, सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा, तसेच वचनाचे पालन यापासून मनुष्याचे नाते संपुष्टात आले आहे. कधी एखादी चांगली गोष्ट नजरेस पडली तरी ती निष्ठा, निस्वार्थ भावना आणि शुभचितन यापासून रिक्त असते. स्वार्थ, सांप्रदायिक स्वार्थ या गोष्टींनी सुंदरता हिरावून घेतली आहे. चोहीकडे भ्रष्टाचार, चोरी, डकैती, लूटमार, रक्तपात सर्रास सुरू आहे. दारू व नशेच्या वस्तु यांचा वापर वाढत आहे. अश्लीलता, नग्नता ही एक सर्वमान्य बाब झाली आहे. ही बाब चोहीकडे विखुरलेली आहे. ही वाईट प्रवृत्ती वेषांतर करून, नवीन नाव धारण करून समोर येत आहे. गरीब लोक छोट्या स्तरावर तर श्रीमंत मोठ्या स्तरावर यामध्ये लिप्त आहेत. या वाईट प्रवृत्तींनी व्यक्तीच नव्हे तर समाज व राष्ट्र यांनासुद्धा गिळंकृत केले आहे. समस्यांचे निराकरण म्हणजे आतंकवाद, रक्तपात समजण्यात येत आहे. मनुष्य न्यायाच्या प्रती निराश होऊन भयभीत जीवन जगत आहे. ही परिस्थिती बदलण्याची त्याची इच्छा आहे, पण त्याचा मार्ग त्यास माहीत नाही.
या जगात जेव्हा काही वाद किवा बिघाड आढळला जो की आज आहे, त्याचे मूळ मनुष्याने स्वतःच्या निर्माणकर्त्यास विसरणे हे आहे. तो स्वतःला विनावेसनी उंटासारखा स्वतंत्र समजत आहे. तो जो काही विचार करतो तो निर्माणकर्त्यास विसरून. तो कोणतेही कार्य करतांना त्याचे भय मनात बाळगत नाही. परलोक ध्यासातच ही शक्ती आहे की, तो मनुष्यास ईशविमुखतेपासून मुक्ती व त्याच्या दुष्परिणामापासून सोडवू शकतो. अंतिम दिवसावरील विश्वास मनुष्याचे नाते निर्माणकर्त्याशी सशक्त व दृढ बनवतो. याचा अंदाज यावरून येतो की सर्वश्रेष्ठ मानव, अल्लाहचे प्रिय आज्ञाधारक प्रेषित मुहम्मद(स) यांना सांगितले जात आहे की,
‘‘सांगा, अल्लाहला सोडून मी इतर कोणाला आपला पालक बनवू काय? त्या अल्लाहला सोडून जो आकाश व पृथ्वीचा निर्माता आहे. तो उपजीविका देतो, उपजीविका घेत नाही. सांगून टाका, मला तर हाच आदेश दिला गेला आहे की, सर्वप्रथम मी त्याच्यापुढे आज्ञापालनार्थ मान तुकवावी.(आणि सक्त सूचना देण्यात आली आहे की, कोणी अनेकेश्वरवादी होत असेल तर होवो) तू कोणत्याही परिस्थितीत अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नकोस. सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला भय वाटते की, एका मोठ्या(भयंकर) दिवशी मला शिक्षा भोगावी लागेल. त्या दिवशी जो शिक्षेपासून वाचेल त्यावर अल्लाहने मोठीच दया केली आणि हेच स्पष्ट यश आहे.’’(कुरआन ६ : १४-१६)
निर्माणकर्त्यास विसरणार्याच्या समोर फक्त जग राहते. तो त्या बाबतीतच विचार करतो व युक्ती बनवतो. त्यासाठीच त्याचा संपूर्ण संघर्ष, संकल्पना व योजना असतात. त्यासाठी तो सर्व उचित आणि अनुचित साधनांचा उपयोग करतो. अत्याचार, छळ, कपट, असत्य, भ्रष्टाचार यासारख्या कोणत्याही मार्गाचा वापर करण्यास तो संकोच करत नाही. तो जगाच्या प्राप्तीसाठी हिंस्त्र पशु बनू शकतो. त्याच्याकडून चोरी, डकैती किवा लूटमार व हत्या हे सर्व संभावित आहे.
जगप्राप्ती हेच मनुष्याचे लक्ष्य ठरल्यास तो इच्छा व आकांक्षाचा दास होऊन जातो. ते त्यास जिथे वाटेल तिथे घेऊन जातात. तो पोटाची मागणी व वासनाप्रेरक गोष्टींच्या मागे धावत राहतो. यामध्ये कोणताही अडथळा त्यास सहन होत नाही. याच मार्गावर नग्नता, निर्लज्जता आणि अश्लीलता यांचा भडीमार असतो आणि मनुष्य यामध्ये प्रसन्नतापूर्वक पाशविक जीवन जगू लागतो.
अंतिम दिवसाचा विचारच त्यास जगाचा पुजारी होण्यापासून वाचवू शकतो. त्यासाठी ही बाब अत्यावश्यक आहे की, मनुष्याच्या मनात ही बाब बिबली गेली पाहिजे की, येथील जीवन अल्प आहे, येथील भोगविलास व त्याची सामग्री क्षणिक आहे. येथील सुख-चैन नाशवंत आणि येथील सर्व सुंदरता, आकर्षण हे क्षणिक आहे. याच्या विरुद्ध अंतिम दिवसानंतरचे जीवन शाश्वत व चिरकालीन आहे. तेथील प्रत्येक भेट पतनहीन व शाश्वत आहे. तेथील सुख-चैन आणि भोगविलास अमर्याद आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लालसा किवा अपयश याचे अस्तित्व नाही. तेथे सर्व मनोकामनापूर्तीची व्यवस्था आहे. तेथे सर्व उपलब्ध आहे, जे डोळ्यांनी कधी पाहिले नाही, कानांनी कधी ऐकले नाही आणि ज्याच्या सौंदर्याची कधी कोणी कल्पना केली नाही व करूही शकत नाही. ही धारणा जेव्हा बुद्धीच्या क्षितिजावर प्रकट होईल व त्याचा प्रकाश पसरेल तेव्हा आपोआप हे जग तुच्छ वाटेल, त्याचे सौंदर्य व आकर्षण संपुष्टात येईल. त्यापेक्षा भाबडा कोण असेल जो सर्वकाही माहीत असतांना या नाशवंत संसारापायी शाश्वत अंतिम जीवन सोडून देईल?
कुरआनमध्ये दोन्ही जीवनांचे चित्र असे रेखाटले आहे,
‘‘लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी, स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग निवडक घोडे, पशु आणि शेतजमिनी अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत. पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. त्यांना सांगा! यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे, ते सांगू? जे लोक अल्लाहच्या कोपाचे भय बाळगून वागतील, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ उद्याने आहेत ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील. तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. पवित्र पत्नीं त्यांच्या सोबती असतील आणि त्या अल्लाहच्या प्रसन्नतेने मान्यवर होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर देखरेख ठेवतो.’’(कुरआन ३ : १४-१५)
कुरआन वारंवार आठवण करून देतो की, हे जग अर्थहीन आणि अस्थायी आहे. वस्तुतः विश्वास केवळ अंतिम दिवसावर आहे. याकरिता या नश्वर जगासाठी आपल्या परलोकाची विल्हेवाट लावली जाऊ नये, जे की शाश्वत नेहमी कायम राहणार आहे.
कुरआन म्हणतो की,
‘‘जे काही तुम्हा लोकांना दिले गेले आहे, ते केवळ जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा सरंजाम आहे आणि जे काही अल्लाहपाशी आहे ते उत्तम आहे आणि सदैव राहणारेदेखील. ते त्या लोकांसाठी आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि जे आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात.’’(कुरआन ४२: ३६)
हीच गोष्ट अन्य प्रकारे अशी आहे की,
‘‘जे काही तुमच्यापाशी आहे ते समाप्त होऊन जाणार आहे व जे काही अल्लाहजवळ आहे तेच बाकी राहणार आहे आणि आम्ही जरूर संयम बाळगणार्यांना त्याचे मोबदले त्यांच्या उत्तम कर्मानुसार देऊ.’’(कुरआन १६ : ९६)
अंतिम दिवसाची सफलता ही ‘‘महान सफलता’’ आणि तेथील असफलता ‘‘स्पष्ट तोटा’’ आहे. ती व्यक्ती सफल आहे जी ही ‘‘महान सफलता’’ प्राप्त करेल व ती अत्यंत तोट्यात आहे जी असफल होईल. तिच्यासाठी सफलतेचे सर्व मार्ग बंद होतील.
‘‘प्रत्येक जीवास मृत्युची चव चाखायची आहे. तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले अंतिम दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.’’(कुरआन ३ : १८५)
त्या दिवशी सफल होणार्यांशी असफलांच्या बाबतीत असे सांगितले जाईल की,
‘‘आणि वजन त्या दिवशी अगदी बरोबर असेल. ज्यांचे पारडे जड असेल तेच सफलता प्राप्त करणारे असतील आणि ज्यांचे पारडे हलके असेल तेच स्वतःला नुकसानीत टाकणारे असतील, कारण ते आमच्या संकेतवचनांशी अत्याचारी वर्तन करीत राहिले होते.’’(कुरआन ७ : ८-९)
हेच खरे सत्य आहे जे की नेहमी समोर असावयास हवे. याचा विसर पडल्यास अंतिम दिवसाची शाश्वत सफलतेची संभावना समाप्त होते आणि केवळ असफलताच शिल्लक राहते.
आजच्या जगातील विकृतीस सतत नवनवीन कायदे करून संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु विकृती(बिघाड) कायद्यांद्वारा संपविला जाऊ शकत नाही. कायदा प्रेम, सहानुभूती आणि निष्ठा निर्माण करू शकत नाही. याद्वारे मन जोडले जाऊ शकत नाही. न्यायाच्या स्थापनेसाठी कायद्याची मदत होऊ शकते, पण त्याद्वारे अन्याय व अत्याचार पूर्णतः समाप्त केला जाऊ शकत नाही. कारण मनुष्य जगातील प्रत्येक कायद्याचे उल्लंघन करण्याचे उपाय शोधू शकतो व त्यापासून मुक्तीचे पर्याय काढू शकतो. सत्य बाब तर ही आहे की, जगातील विकृती आणि वाद याचे निराकरण यामध्येच आहे की, मनुष्याच्या मनामध्ये अंतिम दिवसावर पूर्ण विश्वास असावा व तो सतत त्याच्या मनात तरंगत असावा. त्याला परलोक ध्यास असावा. त्याने या सत्याचा स्वीकार केला पाहिजे की, तो निर्माणकर्त्याचा आज्ञाधारक आहे. त्याचे आज्ञापालन त्यास बंधनकारक आहे. त्याने त्याच्या आज्ञेचे पालन केले, तर तो अल्लाहच्या कृपेस पात्र राहील व त्याच्या बक्षिसांनी अलंकृत होईल. जर त्याने अवज्ञा केली तर तो जगात त्याच्या शिक्षेपासून वाचून जाईल, पण अंतिम दिवशी यापासून वाचणार नाही. त्या ठिकाणी त्यास आपल्या करणीची शिक्षा भोगावीच लागेल. या धारणांचा प्रभाव व त्यामुळे मनुष्याचे आचरण, व्यवहार यामध्ये होणारी क्रांती याचे उदाहरण इतिहासात सुरक्षित आहेत. आज पण त्या गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
हा एक अशा लोकसमूहाचा इतिहास आहे ज्याच्याकडे हत्या आणि रक्तपात, चोरी आणि डकैत, व्याभिचार, दुष्कर्म, दारू पिणे, जुगार खेळणे यासारखे अपराध सर्वमान्य होते. निर्माणकर्ता प्रभुच्या आणि अंतिम दिवसाच्या भयाने त्या लोकसमूहाचा कायापालट करून टाकला. त्या लोकसमूहाने या अपराधांपासून अशा रीतीने क्षमायाचना केली की, त्याकडे फिरकून पाहणेसुद्धा मान्य केले नाही. त्यांच्याकडे जीव, वित्त आणि अब्रू याविषयी सन्मान निर्माण झाला आणि पाहता पाहता पवित्रता, स्वच्छता, विश्वासू ठेवीदार, सत्य तसेच नशा निर्माण करणार्या वस्तूंचे पथ्य यासारखे सद्गुण निर्माण झाले. अपराधांचे प्रमाण इतके कमी झाले की, प्रेषित मुहम्मद(स) आणि चार आदर्श खलीफा यांच्या काळात त्याचे तुरळक उदाहरण आढळते. संपूर्ण समाज सुरक्षित व शांत आढळून येतो. मग हाच विखुरलेला लोकसमुदाय कोणाच्या कायद्याच्या बंधनात अडकणे अशक्य होते. परंतु त्या कायद्याचा एवढा सन्मान करणारा बनला की, तसे उदाहरण मानवी इतिहासात मिळत नाही. अंतिम दिवसाच्या यातनांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्यासमोर शरणागती पत्करणे आणि स्वतःचा जीव देणे त्यांच्यासाठी सहज झाले. ही गोष्ट खालील उदाहरणांवरून स्पष्ट होते.
प्रेषित मुहम्मद(स) मस्जिदमध्ये बसलेले आहेत. त्याच वेळी माननीय माइज बिन मलिक(र) त्यांच्या सेवेत हजर होतात व विचारतात की, ‘‘हे प्रेषित! माझ्याकडून व्याभिचारसारखा गुन्हा घडला आहे. मला पापमुक्त करा!’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांच्याकडून आपले तोंड फिरवून घेतले. त्या व्यक्तीने समोर येऊन आपली गोष्ट पुन्हा सांगितली. प्रेषितांनी त्या बाजूनेही आपले तोंड फिरवून घेतले. पुन्हा ती व्यक्ती त्या बाजुला पोहचली. या प्रकारे त्या व्यक्तीने चार वेळेस आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावर प्रेषित म्हणाले,
‘‘कदाचित तुम्ही चुंबन घेतले असेल किवा डोळ्यांनी इशारा केला असेल किवा पाहिले असेल व त्यास व्याभिचार समजत आहात!’’ त्या व्यक्तीने सांगितले की, ‘‘नाही, असे नव्हे तर मी प्रत्यक्षात व्याभिचार केला आहे. आपण मला पापमुक्त करावे.’’ प्रेषितांनी आपल्या सहकार्यांद्वारे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून ही माहिती घेतली की, ही व्यक्ती वेडी तर नाही ना? माहीत झाले की, ती वेडी नाही. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘याने दारू तर प्राशन केली नाही ना?’’ एका व्यक्तीने तिच्याजवळ जाऊन वास घेतला. तिच्यापासून दारूचा गंध येत नव्हता. प्रेषितांनी विचारले की, ‘‘तुमचे लग्न झाले आहे का?’’ त्याने सांगितले ‘‘होय.’’
माईजच्या मृत्युनंतर कोणी म्हणे की, ही व्यक्ती स्वतःच्या वाईट कृत्यामुळे मारली गेली, तर कोणी तिच्या प्रायश्चित्ताची प्रशंसा केली. दोन-तीन दिवस यावर चर्चा होत राहिली. त्यावर विचार प्रकट होत राहिले. त्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) आपल्या सहकार्यांच्या सभेत आले आणि सांगितले की, ‘‘माईजसाठी मुक्तीची प्रार्थना करा, त्याने असे प्रायश्चित्त केले आहे जे की, सर्व समाजात वाटप केले तर ते सर्वांसाठी पुरेसे होईल.’’(हदीस मुस्लिम)
याच प्रकारे ग्रामीण समुदायाची एक स्त्री प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत हजर होऊन निवेदन करते की, ‘‘मला पापमुक्त करा.’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘तुझे वाईट होओ! जा ईश्वराशी क्षमा माग आणि प्रायश्चित्त कर.’’ तिने सांगितले, ‘‘कदाचित आपण मलाही त्याच प्रकारे परतवीत आहात ज्या प्रकारे सुरुवातीला माइजला परतविले होते किवा आपणास वाटते की, मी भविष्यात आपल्या जबानीचा अस्वीकार करीन. माझी तर गर्भधारणाही झाली आहे.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘ठीक आहे जा, बाळाच्या जन्माची प्रतीक्षा कर.’’
एका व्यक्तीने त्या बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. बाळाच्या जन्मानंतर त्याची सूचना त्या व्यक्तीने प्रेषितांना दिली की, गर्भवती स्त्रीचे बाळ जन्मले आहे. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘आम्ही तिला मृत्यदंड करावा आणि त्याच्या छोट्या बाळास अशा परिस्थितीत सोडून द्यावे की, त्यास दूध पाजणारा कोणी नसावा, असे होऊ शकत नाही. ‘‘एका व्यक्तीने सांगितले की, ‘‘हे प्रेषित! त्यास दूध पाजण्याची जबाबदारी मी स्वीकारतो.’’
हदीस कथन आहे की, प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्या स्त्रीस सांगितले की, ‘‘जा त्या बाळाच्या दूध पिण्याच्या वयापर्यंत त्यास दूध पाज.’’ सरतेशेवटी बाळाचे दूध सुटल्यानंतर ती त्या बाळास घेऊन आली. बाळाच्या हातात भाकरीचा तुकडा होता. तिने सांगितले की, ‘‘हे प्रेषित! बाळाने दूध सोडून दिले आहे. तो जेवू लागला आहे.’’ प्रेषितांनी त्या बाळास एका व्यक्तीकडे सुपूर्द करून तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
त्या स्त्रीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना माननीय खालिद बिन वलीद(र) यांच्या तोंडावर रक्ताचे शितोळे उडाले तेव्हा त्यांच्या तोंडून तिच्या विरोधात काही अपशब्द निघाले. हे ऐकल्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले की, ‘‘खालिद! थांबा! उताविळेपणामध्ये चुकीचे बोलू नका. या स्त्रीने असे प्रायश्चित्त केले आहे की, अत्याचारपूर्वक महसूल वसूल करणार्या प्रशासकाने असे प्रायश्चित्त केले तर त्याची मुक्ती होईल.’’ एका प्रचलनात आहे की, माननीय उमर(र) यांनी प्रेषित मुहम्मद(स) समोर निवेदन केले की, तुम्ही एका दुराचारी स्त्रीच्या अंतिम नमाजमध्ये भाग घ्याल काय? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘तिने तर असे प्रायश्चित्त केले आहे की, ते जर मदीनेतील सत्तर लोकांमध्ये वितरीत केले तर ते त्या सर्वांच्या मुक्तीसाठी परिपूर्ण होईल. यापेक्षा मोठे प्रायश्चित्त काय असू शकते की, तिने आपले प्राण समर्पित केले.’’(हदीस मुस्लिम)
माननीय उम्मे सलमा(र) निवेदन सादर करतात की, प्रेषित मुहम्मद(स) यांच्या समोर दोन व्यक्तींच्या वारसाहक्कासंबंधी प्रकरण आले. दोघांचे म्हणणे होते आपल्याला ही वस्तू वारसाने मिळावी. परंतु दोघांकडे त्यासंबंधी पुरावा नव्हता. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘असे होऊ शकते की, आपल्यापैकी कोणी एक आपल्या वाकचार्तुयाने ती वस्तु आपली आहे हे सिद्ध करून देईल. पण लक्षात ठेवा की, मी त्याच्या बाजुने निर्णय देईन आणि त्याच्या भावाच्या वाट्याचा वस्तुचा भाग त्याला देऊन टाकीन. तर नरकाचा भाग त्याच्या स्वाधीन करीत आहे.’’ हे ऐकून दोघे सांगू लागले की, ‘‘हे प्रेषित! मी माझा अधिकार सोडून देत आहे. माझा वाटा माझ्या सोबत्याचा आहे.’’ प्रेषितांनी सांगितले की, ‘‘असे नका करू, तर तुम्ही दोघे जा आणि ती वस्तू आपसात वाटून घ्या आणि सत्य व न्याय याची आठवण ठेवा आणि मग वाटा करून एक एक भाग घेऊन टाका. त्यामध्ये काही कमी-जास्त झाल्यास तो परस्परांना वैध घोषित करा.’’(हदीस : अबू दाऊद)
अशा प्रकारच्या भरपूर घटना हदीस आणि इतिहास पुस्तकात नमूद आहेत, ज्या हे सिद्ध करतात की, अंतिम दिवसाची विचारपूस व त्यानुसार दंड किवा पुरस्कार याचे भय मनुष्याच्या मनात कायद्याचा आदर निर्माण करते. याशिवाय कायदा फक्त कायद्याची शोभा वाढवेल. पण व्यक्ती स्वतःस कायद्यास समर्पित करणे किवा त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पाडून घेऊ शकणार नाही. कायद्याचे पालन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कायद्याच्या उल्लंघनापासून रोखले जाऊ शकत नाही. कायद्याद्वारा कायद्याचे राज्य निर्माण झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही.
हेच भय आणि अंतिम दिवसाची पकड यामुळे माननीय उमर(र) यांच्यासारखा न्यायनिष्ठ आणि ईशपरायण शासकसुद्धा अल्लाहच्या कोपाच्या भीतीने कंपित होत असे. एकदा प्रेषित मुहम्मद(स) यांचे सहकारी अबु मूसा अशअरी(र) यांनी माननीय उमर(र) यांच्याकडे मोबदला व पुण्य याबाबत विचारणा केली. यावर उमर(र) म्हणाले की, ‘‘मी अल्लाहपाशी बरोबरीत जरी सुटलो तरी भरपूर आहे.’’(हदीस बुखारी) माननीय अनस(र) म्हणतात की, माननीय उमर(र) एका बागेत गेले. त्यांच्या आणि माझ्या दरम्यान एका भितीचा आडोसा होता. मी ऐकले की, ते बागेत एकांतात सांगत होते की, ‘‘उमर बिन खत्ताब! तुम्ही मुस्लिमांचे शासक आहात! फार चांगले, फार चांगले! ईश्वराशपथ तुम्हाला निश्चित त्याचे भय बाळगून वागावे लागेल अन्यथा तो तुम्हाला दंडीत करेल.(हदीस मुवत्ता इमाम मालिक)
अंतिम दिवसाची ही भावना सर्व व्यक्तींमध्ये जागृत झाल्यास मनुष्याच्या आचार-विचार, चारित्र्य आणि संपूर्ण जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागतील. त्याच्या प्रकाशाने जीवनाचे प्रत्येक अंग तेजोमय होईल. मनुष्याचा अल्लाहशी वास्तविक संबंध प्रस्थापित होईल. त्याच्या मनास शांती प्राप्त होईल. मनुष्याचे मनुष्यावरील शासन समाप्त होईल. चोहीकडे अल्लाहचे कायदे प्रस्थापित होतील. कायद्याचे उल्लंघन किवा त्याचा अनादर संपुष्टात येईल. कोणतेही कृत्य करण्यापूर्वी मनुष्य एकदा नव्हे तर हजारदा विचार करेल की, ‘‘मृत्यु माझ्या शिरावर उभा आहे आणि अंतिम दिवस जवळच आहे. मला खूप लवकरच जगाच्या निर्माणकर्त्यासमोर उपस्थित होऊन आपल्या कर्माचा अहवाल सादर करावयाचा आहे.’’ याच धारणेमुळे जगाची दिशा बदलून जाईल. जग अन्याय, अत्याचार, दंगली यांपासून मुक्त होईल. मनुष्याच्या सर्व आवश्यक गरजा कोणाचेही हक्क न हिरावता पूर्ण होतील. चोहीकडे शांतता प्रस्थापित होईल. चांगल्या गोष्टीचा प्रसार होईल तर वाईट गोष्टी संपुष्टात येतील आणि गुन्हेगारी जगत मोडीत निघेल. पुण्याईचा सदाबहार ऋतु येईल. नैतिकतेचे चलन वाढेल. अनैतिकता संपुष्टात येऊन मनुष्यास त्याची लाज वाटेल. असे हे नवीन जग किती सुंदर आणि विलोभनीय असेल!

इस्लाम आदर्श समाजाची निर्मिती करतो. तिथे शांति व स्वास्थ्य असते. तेथे उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यता जात-पात किवा श्रीमंत-गरिबात कसलाही भेदभाव अगर पक्षपात केला जात नाही. तेथे माणूस दुसर्या माणसांचा दास नसतो. प्रत्येकाला खरेखुरे स्वातंत्र्य प्राप्त असते. प्रत्येक माणूस ताठ मानेने व अभिमानाने चालू शकतो. कोणीही भुकेलेला, उघडा-नागडा अथवा निराधार नसतो. लोक एकमेकांना आश्रय देणारे असावेत. प्रत्येकाला न्याय मिळावा. महिलांना आदर-प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना पुरुषांच्या कामवासनेला बळी पडावे लागू नये. अवैध कृत्ये करणार्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. तेथे नीतीमूल्यांचा आदर केला जातो. तेथे तरुणाचे चारित्र्य विश्वास ठेवण्यासारखे असते आणि ते विधायक कार्यात गढलेले असतात. तेथे भलेपणाच्या कामात चढाओढ केली जाते आणि माणसे स्वच्छतेच्या आणि परिपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असतात.
इस्लाम कसा माणूस घडवितो?
माणसाला सज्जन करण्यासाठी इस्लामपेक्षा अधिक चांगली कोणतीही जीवन व्यवस्था नाही. इस्लाम माणसाला त्याचे अचूक स्थान दाखवून देतो, त्याच्या महानतेचे रहस्य त्याला उलगडून दाखवितो, त्याच्या जबाबदारीची त्याला आठवण करून देतो आणि त्याच्यातील चेतना जागृत करतो. त्याला या गोष्टीची आठवण करून देतो की विशिष्ट उद्दिष्टासाठी त्याला जन्माला घातले गेले आहे. त्याला निरर्थक जन्माला घातले गेले नाही. या जगातील जीवन सुख-विलासासाठी नाही. आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशेब आपल्या स्वामीला द्यावा लागणार आहे. तेथे नीट विचार करून प्रत्येक कृती करायला हवी.
आमच्या येथील कृत्यामुळे समाजात सुगंधही पसरू शकतो आणि दुष्कृत्यांमुळे हे जीवन एक शापही ठरू शकते. इस्लाम जो माणूस घडवितो तो इतरांचा आदर करणारा, सत्यावर अढळपणे राहाणारा, आपल्या वचनांचे पालन करणारा, दुर्बलांचा त्राता व आश्रयदाता बनणारा आणि सत्कृत्यात नेहमी पुढाकार घेणारा असतो. तो स्वतःही दुष्कृत्यांपासून दूर राहातो आणि इतरांनाही तो दुष्कृत्यांपासून रोखत असतो. इस्लामी आदर्शाच्या मुशीतून बाहेर पडलेला माणूस सदाचाराचे प्रतीक व दुराचाराचा शत्रू असतो.
शेवटची गोष्ट
इस्लामच्या या संक्षिप्त परिचयाने, त्याचा अर्थ व जीवनाकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोन आपल्या समोर येतो. धर्म पुरातन काळापासून आहे, हे तथ्यही स्पष्ट होते. ईश्वराने जेव्हा जेव्हा आपले प्रेषित धाडले, तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोचविला. सर्व ईश्वरी ग्रंथांपैकी फक्त कुरआनच आपल्यापाशी शाबूत व सुरक्षित आहे. तसेच सर्व धर्मगुरुंपैकी केवळ मुहम्मद(स.) चे जीवन चरित्र सविस्तरपणे आमच्यापाशी आहे. या दोन्ही गोष्टींकडे आपणाला अशी धाव घेतली पाहिजे, जशी एखाद्या हरवलेल्या व नंतर सापडलेल्या वस्तूकडे आपण आकर्षिले जातो. सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळू शकते, पण आपण परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे. शेवटी प्रेषित युसुफ(अ.) ची गोष्ट सांगून माझे मनोगत संपवू इच्छितो, ती गोष्ट त्यांनी बंदिवासात आपल्या साथीदारांना सांगितली होती. त्यांनी सांगितले होते.
ईश्वराशी कोणाला भागिदार ठरविणे, हे आपले काम नव्हे. खरे तर ईश्वराची आम्हांवर व सर्व लोकांवर मोठी कृपा आहे(की त्याच्याशिवाय अन्य कोणाचाही दास आम्हाला केले नाही.) परंतु अधिकांश माणसे कृतज्ञता दर्शवीत नाहीत. हे तुरुंगातील सोबत्यांनो! तुम्ही स्वतःच विचार करा, भिन्न भिन्न अनेक स्वामी चांगले आहेत की एकच स्वामी, ज्याचे सर्वांवर प्रभुत्व आहे, तो अधिक चांगला आहे? त्याला सोडून तुम्ही ज्यांचे दास्यत्व करीत आहात, ज्यांना तुमच्या पूर्वजांनी नावे दिली आहेत; या शिवाय त्याचे महत्व दुसरे काहीच नाही. आणि अल्लाहने त्यासाठी कसलीही सनद पाठविलेली नाही. शासन करण्याची सत्ता अल्लाहखेरीज अन्य कोणाच्याही हाती नाही. खुद्द त्याचाच आदेश आहे की त्याच्याखेरीज तुम्ही अन्य कोणाचेही दास्यत्व करू नये. हीच थेट व सरळ जीवनप्रणाली आहे, परंतु अधिकांश हे तथ्य जाणत नाहीत.- सूरह : अल् युसुफ - ३८ ते ४०

- वहिदुद्दीन खान

भाषांतर
सलीम अ. अज़ीज़ बुकसेलर


जग हे एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्यासमोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा प्रत्येक शब्द बोलत आहे की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
सदर प्रश्नांना आपण मोजक्या शब्दांमध्ये 'अंतिम सत्याचा शोध' म्हणून संबोधू शकतो, परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बऱ्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा अनेक प्रश्नांचे विवेचन या पुस्तकात केले आहे


आयएमपीटी अ.क्र. 158    -पृष्ठे - 40    मूल्य -16      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xvic399wh5bszve8ummtrmdbhbtf7bo7

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget