Latest Post

- डॉ. उमर छाप्रा
    या पुस्तकात व्याज मुक्त अर्थ व्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानव जातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल.
    या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात हे व्याज इस्लाममध्ये निषिद्ध आहे का? यावर चर्चा आहे दुसऱ्या प्रकरणात व्याज निषिद्ध असण्याच्या मूळ कारणावर खुलासा आला आहे तर अंतिम प्रकरणात व्याज मुक्त बँकिंग व्यवस्थेच्या काही मूलभूत नियम सांगितले गेले आणि वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 161    -पृष्ठे - 32      मूल्य - 18      आवृत्ती - 2 (2014)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/3uytw1hux2klqash9s0uzyjt6ma747j7

कोल्हापूर (अशफाक पठाण)-
जमाअत ए इस्लामी हिंद, कोल्हापूर शाखेच्या वतीने दि. १३ रोजी ‘मानव सेवा : आपली जवाबदारी व कर्तव्य’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये  करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली. या कार्यक्रमला जमाअतचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मौलाना इलियास फलाही हे ओरंगाबाद येथून उपस्थित होते.  त्याचबरोबर मजहर फारूक, सचिव जनसेवा विभाग, महाराष्ट्र, नदीम सिद्दिकी, अन्वर पठाण, इस्माईल शेख हे उपस्थित होते. कोल्हापूर-सांगली या ठिकाणी आलेल्या महापुरात घरांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या विभागातील घरांच्या पुनर्वसनकार्यात आयडीयल रिलीफ टीमतर्फे शिरोळ व हातकणंगले या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात रिलीफचे काम करण्यात  आले. गावात धान्यावाटप, आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली. त्यासोबत शाळेतील विध्याथ्र्यांना बॅग, वह्यांचे वाटप झाले. या सर्व कामाचा आढावा या वेळी घेण्यात आला व  शिरोळ तालुक्यातील मौजे कणवाड या गावात ४० घरांचे बांधकाम करण्यात येणार असून ग्रंथालयास पुस्तके देण्यात येणार असल्याची माहिती जमाअतचे जनसेवा विभागाचे सचिव  मझहर फारूक यांनी दिली.
मौलाना इलियास फलाही म्हणाले, मुस्लिम समुदायाची जबाबदारी कुरआनमध्ये स्पष्ट सांगण्यात आली आहे. त्यानुसार आज मुस्लिम समाज वागताना दिसत नाही, त्याला आपल्या  जबाबदारीची जाणीव नाही. त्यासाठी कुरआनशी चांगले संबंध निर्माण करणे, कुरआनच्या शिकवणी आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. इस्लाम एकमेव असा  धर्म आहे की ज्यात समाजसेवा किंवा मानवसेवा करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. माणसाच्या जास्तीतजास्त कामी यावे, तरच माणूस म्हणून आपण यशस्वी व्हाल, असे 
त्यांनी सांगितले.
यानंतर जमाअतचे कोल्हापूर शहराध्यक्ष अन्वर पठाण यांनी पुढील महिन्यात प्रेषित जयंतीचे औचित्य साधून ‘प्रेषित मुहम्मद (स.) सर्वांनसाठी’ हे अभियान राबविण्यात येणार  असल्याची माहिती दिली. या अभियानात अंतर्गत मान्यवराच्या भेटी, व्याख्याने, पत्रकार परिषद असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशपाक पठाण  यांनी केले. तर आभार नदीम सिद्दिकी यांनी मानले. या वेळी कोल्हापूर, मिरज व कराड येतील जमाअतचे सदस्य उपस्थित होते.

आता मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे की, आपण कुठल्या उद्देशासाठी उठून उभे राहिलेलो आहोत. आपण सर्व त्या लोकांसाठी जे स्वतःला इस्लामचा पाईक मानतात, हा संदेश देऊ इच्छितो की, त्यांनी वास्तवमध्ये इस्लामला आपला दीन (धर्म / व्यवस्था) बनवायला हवा. त्याला व्यक्तीगत आणि सामुहिक जीवनामध्ये लागू करावयास हवा. त्याच्या इस्लामी तत्वांना आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये , आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, आपल्या साहित्य आणि पत्रकारितेमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये, आपल्या सामाजिक संस्थांमध्ये, आपल्या इतर संघटनांमध्ये आणि सामुहिक रितीने आपल्या कौमी पॉलीसी (मुस्लिम समाजाच्या नीती निर्धारणामध्ये) प्रत्यक्षात लागू करावे आणि आपल्या वाणी आणि कृतीने जगापुढे इस्लाम खरा असल्यासंबंधीची खर्‍या अर्थाने साक्ष द्यावी.
    आम्ही त्यांच्यासमोर हे ही स्पष्ट करू इच्छितो की, मुस्लिम होण्याच्या नात्याने धर्माची स्थापना करणे आणि धर्मासंंबंधीची खरी साक्ष देणे हाच तुमच्या जीवनाचा खरा उद्देश आहे. यामुळे तुमच्या सार्‍या प्रयत्नांचा केंद्रबिंदू याच गोष्टीवर फोकस व्हायला पाहिजे. तुम्हाला ते प्रत्येक काम सोडून द्यावे लागतील जे या उद्देशाच्या विपरीत असतील आणि इस्लामविषयी चुकीचे प्रतिनिधीत्व करत असतील. इस्लामला केंद्रस्थानी ठेऊन आपल्या पूर्ण जीवनाचा आढावा घ्या. पुन्हा एकदा सर्व गोष्टी तपासून पाहा. जेथे त्रुटी आढळतील त्यांना दूर करा आणि आपले सर्व प्रयत्न याच एका मार्गामध्ये लावून टाका जेणेकरून इस्लाम संपूर्णपणे प्रत्यक्षात प्रत्येकाच्या जीवनात आणि समाजात प्रस्थापित होवून जाईल. या संबंधीची साक्ष व्यवस्थित दिली जाईल, याकडे लक्ष द्या. जेणेकरून कोणालाही असे सांगण्याची संधी मिळू नये की, आम्हाला तर सत्यमार्गाची कल्पनाच नव्हती.
    हा आहे जमाअत-इस्लामीच्या स्थापनेमागचा एकमेव उद्देश्य. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी जी पद्धत आम्ही अवलंबिलेली आहे ती ही आहे की, सर्वप्रथम मुस्लिमांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्यावी. स्पष्ट शब्दात त्यांना सांगावे की इस्लाम काय आहे? आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो? मुस्लिम असण्याचा अर्थ काय आहे? आणि मुस्लिम होताच कुठल्या जबाबदार्‍या त्यांच्यावर येतात?
    जेव्हा लोक या गोष्टी समजून घेतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की, इस्लामला अपेक्षित असलेले सर्व काम व्यक्तीगतरित्या साध्य करणे शक्य नाही. त्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. इस्लामचा एक छोटासाच भाग व्यक्तीगत जीवनाशी संबंधी आहे. त्याची स्थापना तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये करूनही घेतली तरी संपूर्ण इस्लामी व्यवस्थेला त्यामुळे समाजात लागू करता येणार नाही किंवा संपूर्ण इस्लाम संबंधीची साक्ष पूर्णपणे देण्याची जबाबदारी पार पाडता येणार नाही. उलट जेव्हा सामुहिक जीवनावर कुफ्र (इन्कार करणार्‍यांची व्यवस्था) कायम असेल. तेव्हा व्यक्तीगत जीवनातील बहुतेक भागांवरही इस्लामी आदेश लागू करता येणार नाहीत आणि सामुहिक व्यवस्थेची पकड दिवसेंदिवस या व्यक्तीगत इस्लामच्या सीमांना कमी-कमी करत जाईल. म्हणून संपूर्ण इस्लामला कायम करण्यासाठी आणि त्याची खरी-खरी साक्ष देण्यासाठी आवश्यक आहे की, ते सारे लोक जे मुस्लिम असल्याच्या नात्याने इस्लामी ज्ञान बाळगून आहेत व प्रामाणिक पणे त्या ज्ञानाला लागू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना संघटित होऊन, संघटित प्रयत्नांद्वारेच इस्लामला प्रत्यक्षात आपल्या व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनामध्ये प्रस्थापित करता येईल. तेव्हाच ते जगाला आपल्याकडे बोलविण्याचा प्रयत्न करू शकतात. सामुहिकरित्याच ते या कामात येणार्‍या अडचणींवर मात करू शकतात. हेच कारण आहे की ज्यामुळे इस्लाममध्ये सामुहिकतेला अनिवार्य करण्यात आलेले आहे. इस्लामची प्रतिस्थापना करण्यासाठी आणि त्याच्या संदेशाकडे दुसर्‍यांना बोलावण्यासाठी, एक क्रम आणि योजना ठेवली गेलेली आहे. म्हणजेच अगोदर एक जमाअत असावी, मग त्या जमाअतने अल्लाहच्या मार्गामध्ये प्रयत्न करावेत. हेच कारण आहे की, जमाअत शिवाय जे लोक जीवन जगतात त्यांना अज्ञानी जीवन जगणारे असे संबोधले जाते आणि जमाअतपासून वेगळे राहणार्‍यांना इस्लामपासून विभक्त राहणार्‍यांच्या बरोबर असल्याचे भाकीत केले गेलेले आहे.
    जे लोक ही गोष्ट समजतात आणि त्यातून त्यांच्यामध्ये मुस्लिम होण्याच्या नात्याने (त्यांच्यावर) येणार्‍या जबाबदार्‍यांची जाणीव एवढी मजबूत होऊन जाते की, ते आपल्या दीनसाठी आपले वैयक्तिक फायदे आणि अहंकाराचा त्याग करून जमाअतच्या अनुशासन आणि व्यवस्थेचा स्वीकार करतात, अशा लोकांसमोर आम्ही स्पष्ट करतो की, आता तुमच्यासमोर तीन मार्ग उपलब्ध आहेत आणि तुम्ही स्वतंत्र आहात की, या तिन्ही मार्गापैकी कुठलाही एक मार्ग स्वतःसाठी निवडू शकता. जर तुमचे मन साक्ष देत असेल की आमचा संदेश (दावत), श्रद्धा (अकीदा),   उद्देश (मक्सद) आणि जमाअतची व्यवस्था व आमच्या काम करण्याच्या पद्धती सर्व काही शुद्ध इस्लामी आहे आणि आम्ही तेच काम करण्यासाठी उभे ठाकलेलो आहोत जे काम कुरआन आणि हदीसच्या अनुसार मुस्लिम उम्मतचे मुलभूत कार्य आहे तर आमच्यासोबत व्हा. जर काही कारणांमुळे तुम्हाला आमच्यावर व आमच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास होत नसेल व तुमच्या नजरेमध्ये दुसरी एखादी जमाअत अशी असेल की जी इस्लामी व्यवस्थेच्या स्थापनेच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन इस्लामी पद्धतीने कार्य करीत असेल तर तुम्ही त्यात सामील होऊन जा. आम्हाला स्वतःला सुद्धा अशी जमाअत आढळून आली असती तर आम्ही तीत सामील झालो असतो, कारण की आम्हाला स्वतःची दीड विटांची वेगळी मस्जिद बनविण्याची इच्छा नव्हती आणि जर का तुम्हाला ना आमच्यावर विश्‍वास आहे ना कुठली दुसरी जमाअत अशी आढळून येते जी की तुमच्या अनुसार शुद्ध इस्लामी पद्धतीने कार्यरत आहे, तेव्हा तुमच्यावर हे अनिवार्य आहे की आपल्या इस्लामी कर्तव्याच्या पुर्तीसाठी स्वतः उभे रहावे आणि इस्लामच्या मुलभूत शिकवणीवर आधारित एक अशी जमाअत तयार करावी, जीचा उद्देश संपूर्ण दीन (इस्लाम)ची स्थापना करणे आणि वाणी आणि वर्तनाने त्याची साक्ष देणे असेल. या तीन मार्गापैकी जो मार्ग तुम्ही अवलंबाल इन्शाअल्लाह तो सत्यमार्ग असेल.
(मौलाना  अबुल आला मौदूदी, शहादत-ए-हक या पुस्तकातून) (भाग - 6)

मला माहीत आहे की माझ्या लेखाचे शीर्षक वाचूनच वाचकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण मला विश्वास आहे की लेख पूर्ण वाचल्यानंतर आपल्या मनात डोकावलेल्या प्रश्नांची  समाधानकारक उत्तरे आपणास मिळतील. भारत हा विविध धर्म व परंपरांनी नटलेला देश आहे. सर्व आबालवृद्धांमध्ये सणाच्या दिवशी आनंद व उत्साहाची लहर असते. हा एक भाग  झाला. पण सण साजरे करण्यामागचा खरा उद्देश असतो की त्या सणाशी निगडीत इतिहास जाणून घेणे व त्यामधून मिळणारी शिकवण, बोध आत्मसात करणे.
१. रामाने रावणाचा वध केला. या विजयास्तव दसरा सण साजरा केला जातो. म्हणजेच कुकर्मावर सत्याचा व हक्काचा विजय, हा बोध हा सण साजरा करण्यामागे असतो.
२. मातृइच्छेला मान देऊन बारा वर्षांचा वनवास संपवून, रावणाचा पराजय करून राम स्वदेशी परतले. या आनंदास्तव दिवाळी साजरी केली जाते.
३. श्रीकृष्णाने जुलमी राक्षस नरकासूराचा वध करून आपल्या बंदिवासात असलेल्या सोळा हजारांपेक्षा अधिक स्त्रियांना मुक्त केले. नरक चतुर्थी साजरी करण्यामागचा हा इतिहास आहे.   म्हणजेच कृष्णाने स्त्रीसन्मान व स्त्रीहक्कांसाठी दिलेला लढा हा या सणामधून मिळणारा बोध आहे.
४. कार्तिक आमावस्येच्या दिवशी पांडव बारा वर्षांच्या अज्ञातवासातून परतले होते आणि त्यांच्या स्वागतास्तव दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर महाभारत घडले.
आपल्याच लोकांना युद्धभूमीवर पाहून धनुष्य खाली ठेवलेल्या अर्जुनाला अन्यायाविरूद्ध लढणे का व कसे आवश्यक आहे हे कृष्णाने केलेले प्रबोधन हाच महाभारताचा गाभा आहे.  म्हणजेच हक्कासाठी व सत्य स्थापनेसाठा rलढणे आवश्यक आहे. हा बोध या सणामधून मिळतो.
५. लक्ष्मीपूजन या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून लक्ष्मीला बळी राजाच्या तावडीतून सोडविले होते. म्हणजे स्त्री अस्मितेसाठी तढा देणे हा बोध यामागे आहे.
६. राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक देखील याच दिवसांत झाला होता. विक्रमादित्य हे जनतेची काळजी घेणारे व शत्रूंशी लढणारे शूर राजा होते. म्हणजेच सामान्य जनतेसाठी शत्रूशी  लढणे महान कार्य आहे हा बोध या उत्सवातून आम्हाला मिळाला.
वरील सर्व इतिहास आणि आख्यायिका वाचल्यानंतर आम्हास समजते की दसरा व दिवाळी हे सण साजरे करण्यामागे ‘सत्याचा असत्यावर विजय’ हा मतितार्थ आहे. म्हणजे दसरा,  दिवाळी साजरी करण्यामागचा उद्देश ‘जिहाद’ होता, असे जर का मी म्हटले तर ते कानांना ऐकण्यासाठी खूप जड जाते. पण हे योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपण  प्रथम ‘जिहाद’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊ या. कारण दुर्दैवाने आमच्यासमोर जिहादची खूप चुकीची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. कुरआनच्या परिभाषेत जिहादचा अर्थ होतो   ‘अन्यायाविदूद्ध लढा देणे, स्वत:मधील व समाजामधील वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.’
जिहाद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे नैतिक जिहाद, आध्यात्मिक जिहाद, रक्षणात्मक जिहाद, वंशभेदविरोधी जिहाद, अन्यायाविरूद्ध जिहाद, सेवात्मक जिहाद इ.  स्वत:पुरते मर्यादित न राहता सर्व समाजाचे भले व्हावे यासाठी पुढाकार घेणे याला ‘जिहाद’ म्हणतात.
म्हणजे अन्यायाविरूद्ध लढा देणे हे स्वत: श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, तर इस्लामी व्याख्येत तो जिहादच झाला. किंवा परस्त्रीवर हात घालणाऱ्या रावणाचा जेव्हा राम अंत करतो, तर  हाही जिहादच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले, स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविला, दारूला हराम केले, व्याजाला हराम केले, असत्याविरूद्ध युद्धे लढली,  हा सर्व जिहादच होता.
जवळच्या भूतकाळात जायचे झाले तर म. गांधी, मौ. आझाद यांच्यासह इतर भारतीयांनी इंग्रजांविरूद्ध दिलेला स्वातंत्र्य लढा हादेखील जिहादच आहे. सध्याच्या काळातील उदाहरण  द्यायचे झाले तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, मेधा पाटकर यांचे वंचितांसाठी लढा देणे हा जिहाद आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा जिहाद आहे.  दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेला प्रयत्न जिहाद आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे आपणास अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या महान व्यक्तींची देता येतील.

जिहाद समजून घ्या
‘जिहाद’ म्हणजेच  अन्यायाविरूद्ध लढणे ही जर का चांगली गोष्ट आहे तर मग जिहादला तलवार व रक्तपात या व्याखेशी का जोडले गेले आहे? याचे उत्तर आहे कुरआनचे अर्धवट  ज्ञान! म्हणजे बघा कुरआनमध्ये म्हंटले आहे, ‘‘युद्ध करणे जरी तुम्हाला नापसंत असले तरी ते तुमचे कर्तव्य आहे.’ (अध्याय २, श्लोक २१६)
हा श्लोक वाचल्यानंतर वाचकाला शंका येते की शांतीचा संदेश देणाऱ्या कुरआनात लढायची गोष्ट का येते? आणि मग वाचक याचा अभ्यास करण्याऐवजी इस्लाम धर्माला वाईट समजू  लागतो. खरे पाहता कुरआनमध्ये जिहादचा आदेश तेव्हाच येतो जेव्हा सत्य व हक्काला दाबून असत्यावर चालणाऱ्या अत्याचारी लोकांचा बिमोड करणे आवश्यक असते. आता असाच  एक श्लोक महाभारतात आहे, ‘‘कृष्ण अर्जुनाला म्हणतो की- अन्यायाविरूद्ध लढणे, शस्त्र उचलणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे.’’ आता या दोन्ही श्लोकांमध्ये केलेले संबोधन एकच आहे.  म्हणजेच कोणाला उगाचच मारणे वा नुकसान पोहचविणे शंभर टक्के चुकीचे आहे. पण पोलिसांनी चोराला पकडणे, गुन्हेगाराला बंदुकीचा धाक देणे, गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने फाशीची  शिक्षा सुनावणे योग्य आहे की अयोग्य? रस्त्यात एकट्या मुलीला छेडणाऱ्या टोळक्याला शक्तीचा वापर करून पळविणे योग्य की अयोग्य? अर्थातच योग्य आहे. नाही तर वाईट  प्रवृत्तींना समाजात आणखी बळ मिळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागेल. कुरआनमध्ये अशा वाईट गोष्टींना ‘फसाद’ असे संबोधले आहे आणि अशा फसादींना  रोका म्हणजे जिहाद करा, असे सांगितले आहे. यासाठी तुमच्या वाणीचा उपयोग करा, समजवा, कायद्याचा उपयोग करा, तुमच्या हातांनी रोका, असे सांगितले आहे. या तुमच्या सर्व  सामूहिक प्रयत्नांना ‘जिहाद’ असे म्हटले गेले आहे.

गैरसमजांची कारणे-
१, प्रसारमाध्यमे- ‘इस्लाम व मुस्लिमांबद्दल शक्य तितके वाईट दाखवा आणि टी.आर.पी. वाढवा’ हे साधे समीकरण आज झाले आहे. कोणतेही चॅनेल उघडा हाच मुद्दा पुन्हा पुन्हा  चघळून तुमच्यासमोर सादर केला जातो आणि त्या आधारे माध्मयांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत.
२. इस्लामोफोबिया- जगात सर्वाधिक जोमाने पसरणारा धर्म म्हणजे इस्लाम होय. याची पडताळणी आपण कोठेही करू शकता. मग या धर्माला रोखण्यासाठी विरोधकांकडून निर्माण  केलेले वैचारिक षङ्यंत्र म्हणजे इस्लामोफोबिया. यामागे पूर्वग्रहावर आधारलेली इस्लामविषयी असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ‘इस्लामोफोबिया’  पसरत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ‘फोबिया' या शब्दाचा अर्थ आहे अतिशयोक्त, नीटपणे मांडता न येणारी व तर्कशुद्ध नसणारी भीती. कोणत्याही बुद्धिनिष्ठ, तर्कसुसंगत  कारणाशिवाय एखाद्या गोष्टीविषयी माणसाला सतत भीती वा संशय वाटत राहिला, तर त्याला 'फोबिया' म्हणतात.
३. खनिज तेल साठे- तिसरे कारण म्हणजे मुस्लिम देशांकडे असलेले तेलसाठे. त्यावर कब्जा करण्यासाठी स्वत:ला महापॉवर म्हणविणाऱ्या देशांकडे कारण हवे होते. मग जिहादी टोळ्यांची उपज करून त्यांना जेरीस आणण्याचा बू करून, युद्धे लादून तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळविणे हा या तथाकथित महाशक्तींनी उद्देश साध्य करून घेतला.

हा जिहाद नव्हे-
दाढी व टोपी धारण केलेल्या दहशतवाद्यांनी सामान्य लोकांवर केलेला गोळीबार.
‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन गोरक्षेच्या नावाखाली सामान्य माणसांची केलेली हत्या.
श्रीलंकेतील चर्चमध्ये खिश्चन बांधवांवर झालेला भ्याड हल्ला.
न्यूझिलंडच्या मस्जिदीमध्ये नमाजींवर झालेला क्रूर हल्ला.
ही सर्व उदाहरणे जिहाद नव्हे. निरपराधांना मारणे जिहाद होऊच शकत नाही. कुरआनात स्पष्ट सांगितले आहे,
‘‘ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली त्याने पूर्ण मानवजातीची हत्या केली आणि ज्याने एका निष्पाप व्यक्तीला वाचविले, त्याने संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले. (मग ती व्यक्ती  कोणत्याही जातीधर्माची असो)’’ (अध्याय ५, श्लोक ३२)
जिहाद असा करा
पाचशे रुपयांचे जेवण व दारू मिळेल त्या राजकीय पक्षासाठी मोर्चे काढणे योग्य आहे का? एका नि:शस्त्र माणसाला शंभर-दोनशे जणांच्या जमावाने काठ्यांनी, दगडांनी, लाथाबुक्क्यांनी  जीव जाईपर्यंत मारणे वीरता आहे का? आजच्या तरुणपिढीला सांगावेसे वाटते की जिहाद करायचाच असेल तर खालील बाबतीत करा-

१) व्यसनमुक्त राहा आणि इतरांनाही व्यसनमुक्त करा.
२) शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना मदत करा.
३) अन्यायाविरूद्ध उभे राहा आणि लढा द्या.
४) गरीब, अनाथ, रुग्ण यांची शक्य तितकी मदत करा.
५) सत्यासाठी उभे राहा, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.
आज दसरा-दिवाळीच्या निमित्ताने ‘जिहाद’बद्दल असलेले आपले गैरसमज दूर झाले असतील असा मला विश्वास आहे.

- -मिनाज शेख, पुणे

माननीय अनस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘ही धर्मद्रोह्याची नमाज आहे, तो सूर्योदयाची वाट पाहात बसतो, अगदी तो उगवतोही आणि  अनेकेश्वरवाद्यांची सूर्यपूजेची वेळ होते तेव्हा हा उठतो आणि घाईघाईत चार रकआत पूर्ण करतो (जसे कोंबडी जमिनीवर चोच मारते आणि वर उचलते). असा मनुष्य आपल्या   नमाजमध्ये अल्लाहचे अजिबात स्मरण करीत नाही.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारा ईमानधारक आणि धर्मद्रोह्याच्या नमाजमधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. ईमानधारक आपली नमाज वेळेवर अदा करतो, रुकुअ आणि सजदा योग्य पद्धतीने
करतो, त्याचे मन अल्लाहच्या स्मरणात गुंतलेले असते आणि धर्मद्रोह्याची नमाज वेळेवर अदा होत नाही, रुकुअ व सजदा योग्य प्रकारे करीत नाही आणि त्याचे मन अल्लाहसमोर  नसते. खरे  पाहता प्रत्येक नमाज महत्त्वाची आहे, परंतु ‘फजर’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व अधिक आहे. ‘अस्र’ची वेळ गफलतीची असते. सर्वसाधारणपणे सर्व लोक आपापल्या  कामात असतात आणि रात्र होण्यापूर्वी आपला व्यापारउदीम आटोपण्याच्या प्रयत्नात असतात आणि आपल्या विखुरलेल्या कामांना पूर्ण करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून  ईमानधारकाची बुद्धी जागृत नसेल तर ‘अस्र’ची नमाज सुटण्याची शक्यता असते. तसेच सकाळच्या नमाजचे महत्त्व यासाठी आहे की झोपेची वेळ असते. सर्वांना ठाऊक आहे की रात्रीच्या शेवटच्या प्रहरची झोप गाढ व गोड असते. जर मनुष्याच्या मनात ईमान जागृत नसेल तर तो आपल्या प्रिय झोपेला सोडून अल्लाहचे स्मरण करण्यासाठी उठू शकत नाही.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जमिनीची देखरेख करणारे रात्र आणि दिवसाचे ‘फरिश्ते’ (देवदूत) आपल्या कामाच्या वेळा बदलत  असतात आणि ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजमध्ये एकत्र येतात, मग जे फरिश्ते तुमच्यात असतात ते आपल्या पालनकर्त्यासमोर जातात तेव्हा तो त्यांना विचारतो की तुम्ही माझ्या  भक्तांना कोणत्या स्थिती सोडले? तेव्हा ते म्हणतात की जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ गेलो होतो तेव्हा ते नमाज अदा करीत होते आणि जेव्हा आम्ही त्यांना सोडले तेव्हा ते नमाज अदा   करीत होते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण 
ही हदीस ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व स्पष्ट करीत आहे. ‘फज्र’च्या नमाजमध्ये रात्रीचे ‘फरिश्ते’ (देवदूत) सहभागी होतात आणि ते फरिश्तेदेखील ज्यांना  दिवसा काम करायचे असते. अशाप्रकारे ‘अस्र’च्या नमाजदेखील दोन्ही वेळचे फरिश्ते ईमानधारकांसह नमाजमध्ये सहभागी असतात. ईमानधारकांना फरिश्त्यांचा सहवास लाभावा यापेक्षा  मोठे सुदैव ते कोणते. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सात प्रकारचे लोक अल्लाह आपल्या छायेत जागा देईल, त्या दिवशी  अल्लाहच्या छायेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही छाया नसेल. (१) न्याय करणारा सम्राट, (२) अल्लाहच्या भक्तीत आपले तारुण्य व्यतीत करणारा तरुण, (३) असा मनुष्य ज्याचे मन   मस्जिदशी अडकलेले असते, जेव्हा तो मस्जिदमधून बाहेर पडतो तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा मस्जिदमध्ये प्रविष्ट होण्याची वाट पाहत असतो, (४) ती दोन माणसे ज्यांच्या मैत्रीचा आधार  अल्लाह आणि अल्लाहचा ‘दीन’ (इस्लाम) आहे, त्याच भावनेसह ते एकत्र येतात आणि त्याच भावनेसाठी ते अलिप्त होतात, (५) तो मनुष्य ज्याने एकांतात अल्लाहचे स्मरण केले  आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, (६) तो मनुष्य ज्याला एखाद्या उच्च कुलीन सौंदर्यवतीने दुष्कृत्यासाठी बोलविले आणि त्याने फक्त अल्लाहच्या भयापोटी तिला नकार दिला  आणि (७) तो मनुष्य ज्याने अशाप्रकारे ‘सदका’ (दानधर्म) केला की त्याच्या डाव्या हातालादेखील माहीत नाही की उजव्या हात काय देत आहे.’’
(हदीस : मुत्त़फक अलैहि)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहर त्याग करून मदीना शहरात वास्तव्य केले आणि संपूर्ण मदीना शहर प्रेषितत्वाच्या सुगंधाने ढवळून निघाले. सर्वत्र मदीना शहरात आनंदाचे वातावरण होते. एके दिवशी काही सोबत्यांनी बारा वर्षे वयाचा एक गोंडस आणि निरागस मुलगा प्रेषितदरबारी हजर केला आणि आदरणीय प्रेषितांना म्हणाले,
‘‘हे प्रेषित! हा मुलगा ‘नज्जार’ परिवाराचा सुपुत्र असून यास दिव्य कुरआनचा अभ्यास करण्याचा खूप छंद आहे. याने आतापर्यंत कुरआनाच्या एकूण सतरा ‘सूरती’ मुखपाठ केल्या आहेत.’’
विश्वकृपाळू प्रेषित मुहम्मद(स.) हे ऐकून खूप आनंदीत झाले. त्यांनी या मुलास दिव्य कुरआनच्या मुखपाठ असलेल्या सूरती वदन्याचा आदेश दिला. या सुकुमाराने तत्काळ आदेशाचे पालन केले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) खूप प्रसन्न झाले आणि आशीर्वाद देऊन त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरविला, हेच बाळ ‘माननीय झैद बिन साबित अन्सारी(र.)होत.
धार्मिक ज्ञानसंपदा आणि शिक्षण-प्रशिक्षणात हाडाचे शिक्षक असलेल्या प्रेषितसोबत्यांपैकी एक असलेले माननीय झैद बिन साबित अन्सारी हे वयाच्या अकराव्या वर्षीच इस्लामचे खंदे समर्थक बनले. त्यांचा जन्म हिजरी सन पूर्व १२ मध्ये झाला. ते ‘अबू सईद’ या टोपणनावानेसुद्धा ओळखले जातात. ते इस्लामी धर्मशास्त्राचे अतिशय महान विद्वान होते. त्यांची वंशपरंपरा अशी,
झैद पिता साबित पिता जहाक पिता झैद पिता लजान पिता अमरु पिता अबद पिता ऑफ पिता गनम पिता मालिक पिता नज्जार.
माननीय झैद बिन साबित(र.)यांचे पिता प्रेषित स्थलांतराच्या पाच वर्षांपूर्वीच वारले होते. लहानपणीच त्यांची पितृछाया हरपल्याने ते माता ‘नवार बिन्त मालिक’ यांच्याच प्रेमळ मायेत वाढले. हिजरी सन पूर्व १ मध्ये इस्लाम धर्माचे प्रचारक व प्रसारक माननीय मुसअब बिन उमैर(र.)हे मदीना शहरी आले, त्याच वेळी त्यांच्या इस्लाम प्रचारकार्यामुळे ‘अवस’ आणि ‘खजरच’च्या घराण्यात इस्लाम धर्मावर चर्चा रंगल्या. याच काळात इस्लाम धर्म स्वीकारण्याचे सौभाग्य मिळविणार्यांपैकी माननीय झैद बिन साबित(र.)सुद्धा आहेत. ईश्वराने त्यांना अत्यंत पवित्र आचरण आणि मनमिळाऊ स्वभावाने वरदानित केले होते. इस्लाम स्वीकारताच त्यांनी दिव्य कुरआनचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांच्या अभ्यासु वृत्तीमुळे ते सर्व अन्सारी सोबत्यांमध्ये प्रतिष्ठित होते. प्रचंड स्मरणशक्ती असल्याने आणि अभ्यासु वृत्तीमुळे सर्वांचे ते खूप लाडके होते. त्यांनी अगदीच अल्पकाळात अरबी भाषेव्यतिरिक्त इतर बर्याच भाषांचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविले होते. त्यांना अरबी, इब्रानी, अॅबिसीनीयन, कब्ती, रोमन, पर्शियन आणि इतर अनेक भाषांतर उत्तम प्रभुत्व मिळविले होते. त्यांचे हस्ताक्षरदेखील अतिशय सुरेख होते. शिवाय कलाकुसरीच्या कामात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते. अंकगणित आणि भूमिती शास्त्रात त्यांनी बरेच संशोधन केले होते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) त्यांच्यातील या सर्व विषयांच्या प्राविण्यामुळे त्यांचा खूप लाड पुरवीत असत. त्यामुळे आदरणीय प्रेषितांवर अवतरित होणारे दिव्य कुरआन लिहिण्याची कामगिरी देखील त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती.(संदर्भ : मुस्नदे अहमद)
‘बदर’च्या रणांगणावरील इस्लाम आणि इस्लामविरोधी शक्तीदरम्यान हिजरी सन २ मधील रमजान महिन्यात झाले. धर्मयुद्धात सहभागी होण्याकरिता वयार्ची पंधरा वर्षे पूर्ण होण्याची अट प्रेषितांनी लावली होती. परंतु धर्मयुद्धाने प्रेरित झालेले माननीय झैद(र.)हे आपल्या सवंगड्यांना घेऊन प्रेषितदरबारी हजर झाले आणि युद्धात सहभागी होण्याची परवानगी देण्याची विनंती केली. परंतु आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली नाही.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ओहदच्या धर्मयुद्धात आपल्या युद्धकौशल्याची चुणूक दाखविली. यानंतर त्यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याबरोबर बर्याच युद्धांत आपले कौशल्य दाखविले. तबूकच्या युद्धात त्यांनी अभूतपूर्व कौशल्य दाखविले. एवढेच नव्हे, तर अतिशय कमी वयात आदरणीय प्रेषितांनी त्यांना लष्कर प्रमुखपदसुद्धा दिले.
माननीय उमर फारुक(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात ते मदीना शहराचे न्यायाधीश होते. एकदा इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)आणि ‘उबै बिनकआब(र.)’ यांच्यात काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले. त्यांचे मतभेद प्रकरण माननीय झैद(र.)यांच्या न्यायालयात दाखल झाले. माननीय उमर फारुक(र.)हे इस्लामी शासक असल्याने माननीय झैद(र.)यांनी त्यांना विशेष आसनाची व्यवस्था केली आणि माननीय उबै बिन कआब(र.)हे सामान्य आसनावर बसले. ही विशेष व्यवस्था पाहून माननीय उमर(र.)खूप नाराज झाले आणि माननीय झैद(र.)यांना म्हणाले, ‘‘न्यायालयात राजा आणि प्रजेदरम्यान असा कोणताच भेद असेलला मी खपवून घेणार नाही आणि ते माननीय उबै बिन कआब(र.)यांच्या बाजूला जाऊन बसले.
माननीय उमर फारुक(र.)यांना माननीय झैद(र.)यांच्या कार्यकौशल्यावर खूप विश्वास होता. ते मक्का शहरी पवित्र हज यात्रेस गेल्यावर माननीय झैद(र.)यांच्यावरच इस्लामी शासनाची जवाबदारी सोपवून गेले होते. शिवाय शासकीय कारभाराचे इस्लामी नियम आणि कायदेकानू तयार करण्यात त्यांनी खूप हातभार लावला. शासकीय वेतनश्रेणी आणि आर्थिक व्यवस्थेचे उत्तम नियम त्यांनी घालून देण्यास मदत केली.
हिजरी सन २४ मध्ये माननीय उमर(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय उस्मान(र.)यांनी इस्लामी शासनाची धुरा सांभाळली, तेव्हासुद्धा त्यांनी इस्लामी राज्यकारभारास भरपूर मदत केली. माननीय उस्मान(र.)सुद्धा त्यांचा खूप आदर करीत असत.
माननीय उस्मान(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय अली(र.)यांनी हाती इस्लामी शासनाची धुरा सांभाळली. त्यांच्या काळातही माननीय झैद बिन साबित(र.)यांनी इस्लामी शासनाची आजीवन सेवा केली.
माननीय झैद(र.)यांना असलेल्या धर्मज्ञानाच्या बाबतीत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) हे स्वतः म्हणत की, इस्लामच्या अनिवार्य कर्माचे सर्वांत जास्त ज्ञान झैद(र.)यांना आहे. वारसाहक्क विधीतील अतिशय कठीण ज्ञानावर त्यांना कमालीचे प्रभुत्व होते. प्रेषितांच्या काळातसुद्धा ते धर्मविधीच्या विविध विषयांवर फतवे देत असत. माननीय उमर फारुक(र.)यांनी मदीना शहरात त्यांची उपस्थिती अगदी अनिवार्य समजली होती. त्याचप्रमाणे माननीय झैद(र.)यांना दिव्य कुरआन, प्रेषितवचने आणि धर्माविधी तत्त्वज्ञानातही पारंगत होते. एवढेच नव्हे तर कुरआनच्या पठनातील उच्चारशास्त्रातही ते कुशल हते. त्यांच्याकडून एकूण ९२ प्रेषितवचने कथन करण्यात आली आहेत.
माननीय झैद(र.)शुद्ध आचरणाचे व्यक्ती होते. त्यांच्या नीतिमत्ता ग्रंथाच्या पानावर इस्लाम स्वीकारण्यातील पुढाकार, ज्ञानार्जनाचा छंद, प्रेषितावरील अपार प्रेम, प्रेषित जीवनचरित्राचे अनुकरण, सत्यवचन आणि नम्रता हे विशेष गुणधर्म स्पष्टपणे आढळतात. त्यांनी जीवनाचा अधिकांश काळ प्रेषितांच्या सोबत व्यतीत केला. सकाळी उठून ते प्रेषितांकडे जात असत. आदरणीय प्रेषितसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करीत असत. त्यांना आपल्याजवळ बसवीत असत. ‘ज्यू’ लोकांकडून होणारा इब्रानी भाषेतील पत्रव्यवहार तेच हाताळत असत. आदरणीय प्रेषितांच्या आदेशामुळेच त्यांनी इब्रानीसह अनेक भाषा अवगत केल्या होत्या.
प्रेषित जीवनाच्या नियमांचा माननीय झैद(र.)अगदी काटेकोरपणे अनुकरण करीत आणि इतरांनाही याचे नियम शिकवीत असत. प्रेषित जीवनाच्या नियमांविरुद्ध कोणाचेही कर्म ते मुळीच खपवून घेत नसत. एके दिवशी आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तीन गोष्टी मुस्लिम माणसाच्या अंतःकरणास चैतन्य प्रदान करतात. प्रथम हे की, प्रत्येक कार्य ईशप्रसन्नतेखातरच करावे. द्वितीय हे की, शासकांना सत्यनिष्ठेचा आग्रह करावा, तृतीय हे की, संघटित राहावे.
माननीय झैद(र.)यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. ते सर्वांनाच मोठ्या आनंदाने, प्रेमपूर्वक व आस्थेने भेटत असत. कोणत्याही लहान-मोठ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत असत. आपल्या ज्ञानावर कधीच गर्व करीत नसत. विद्येबरोबरच त्यांच्यात विनयशीलता होती. अशा या अत्यंत महान आणि सूज्ञ इस्लामी विद्वानाचे जीवनचरित्र आपल्यासाठी मोठाच बोधात्मक उपदेश आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी हिजरी सन ४६ मध्ये हे महान विद्वत्ता, ज्ञान-विज्ञानाचा अभूतपूर्व खजिना संपूर्ण मानवजातीस देऊन परलोकी प्रवासास निघाला.

Islam
आखिरत(पारलौकिक जीवना) च्या मुक्ती आणि कल्याणासंबंधी इतर धर्मांचे सर्वसामान्य मत असे आहे की या संसाराचा त्याग करून पूर्णपणे एकान्त ग्रहण करावा आणि जग व जगातील सर्व रूचि आणि इच्छा-आकांक्षापासून स्वतःला मुक्त करून वन, पर्वत आणि गुफांमध्ये जीवन व्यतीत करावं.
भारतीय मतांपैकी जैन मतानेदेखील यालाच मान्यता दिली आहे. सर्वांत महान गुरू स्वामी महावीर यांनी संसाराचा त्याग करून त्यागी जीवन अंगीकारले आणि या संसारापासून स्वतःला इतके अलिप्त ठेवले की या जगातील वस्त्राचा एक धागा सूत देखील आपल्या शरीराला स्वीकार करू दिला नाही. ते पूर्ण नग्नावस्थेत राहात. म्हणून त्यांचे अनुयायी जे भक्ती आणि दास्यतेचे सर्वोच्च पद प्राप्त करू इच्छितात, स्वामी महावीरांचे अनुकरण करून पूर्णपणे नग्न राहणे आपल्यासाठी अनिवार्य समजतात. आणि जगातील कोणतीही साधन-सामुग्री स्वतः जवळ ठेवीत नाहीत.
याच पध्दतीने बौध्द धर्माच्या दृष्टिकोनातूनदेखील मोक्ष आणि सफलतेकरिता हे आवश्यक आहे की संसार आणि संसारातील प्रत्येक वस्तूपासून मानवाने आपले संबंध तोडून टाकावे, याकरिताच या धर्माचे संस्थापक महात्मा बुध्द यांनी आपले माता-पिता, पत्नी आणि सन्तान आणि सिहासनाचा त्याग करून संन्यास ग्रहण करून टाकले आणि यालाच मुक्तीचे साधन ठरविले.
खुद्द हिंन्दू धर्मामध्ये जीवनयात्रेच्या ज्या टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यातला पहिला टप्पा ज्ञानार्जनाचा आहे, दुसरा घर-गृहस्थी, त्यानंतर वानप्रस्थाचा टप्पा आणि येतो तो पूर्णपणे संन्यासाचा टप्पा आहे. मनुस्मृतीत नमूद आहे की ज्या वेळी माणसाच्या डोक्याचे केस पांढरे दिसू लागतात आणि त्वचेत सुरकुत्या पडू लागतात आणि त्याचा मुलगा स्वतः पुत्रवान होतो, त्या वेळी त्याने वनात आपले निवास ग्रहण केले पाहिजे, सर्व प्रकारचे नगर-आहार, वस्त्रादि सर्व प्रकारच्या उत्कृष्ट पदार्थांचा त्याग करावा आणि आपल्या पत्नीला आपल्या मुलांजवळ सोडून द्यावं किवा तिलादेखील आपल्याबरोबर जंगलात घेऊन जीवन व्यतीत करावं. परंतु हे वनप्रस्थ-आश्रमात आहे. संन्यासाच्या आयुष्यात पत्नीला बरोबर ठेवण्याचा आणि कोणताही सांसारिक संबंध ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जर कोणी धर्मपरायण आणि संन्यासी व्यक्ती बाल्यावस्थेनंतर लगेच संन्यास ग्रहण करून गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रमचा अंगीकार करीत नाही तर या गोष्टीलाही पूर्ण वाव आहे. उलटपक्षी काही स्थितींमध्ये तर ते अधिक उत्तम आणि श्रेष्ठ समजले गेले आहे. परंतु याउलट इस्लाम या जगात राहून आणि त्यातील ईशदेणग्यांचा लाभ उचलण्याचा पारलौकिक मोक्षप्राप्तीत कोणताही अडथळा समजत नाही. उलटपक्षी इस्लाम तर याकरिताच अवतरला आहे की त्याने मानवाला या जगात राहणे शिकवावे. इस्लाम तर आपल्या सिद्धान्तांद्वारा शासन चालवायलादेखील एक पुण्य-कर्म आणि पारलौकिक मुक्तीचे साधन मानतो.
हदीस(प्रेषित कथन) च्या पुस्तकांपैकी सही बुखारी आणि मुस्लिम यांची प्रसिध्द हदीस आहे. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद(स.) सांगतात, सात लोक आहेत, ज्यांना अल्लाह(अंतिम न्यायदिवशी) आपल्या कृपेच्या छत्रछायेखाली जागा देईल. अशा वेळी जेव्हा त्याच्या छायेशिवाय अन्य कोणतीही छाया राहणार नाही. नंतर त्या सात व्यक्तींचे वर्णन करताना सर्वप्रथम फरमावले, ‘‘न्यायदान करणारा शासक.’’
इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मानवाचे मार्गदर्शन करते. म्हणून याच्या सर्व शिकवणुकी त्याच लोकांकरिता आहेत जे या संसारात राहतात आणि संसाराच्या प्रशासनास चालवतात. त्या लोकांकरिता मुळीच नाही जे जगापासून दूर राहून जंगल, पर्वत आणि आश्रमाचे मार्ग पत्करतात. आचरण आणि चारित्र्याची महानता आणि गुण जगातील लोक आश्रम आणि मठांमध्ये शोधतात, इस्लाम त्यांना प्रत्यक्ष जीवनाच्या दगदगीत आणि व्यवहारामध्ये आणू इच्छितो. इस्लामची इच्छा आहे की जगातील सर्वच लोक मग त्यांचा संबंध कोणत्याही क्षेत्राशी असो, स्वतःमध्ये इस्लामचे अभिष्ट गुण आत्मसात करू इच्छितो मग तो शासक असो अगर प्रजा, न्यायधीश असो अगर लोकसभा सदस्य, लष्कर अगर पोलिस असो अगर जनता किंवाशिक्षक असो अगर विद्यार्थी. तात्पर्य असे की तो जो कोणीही असो, त्या सर्वांनी ते गुण आत्मसात करावेत, ज्याची शिकवण इस्लाम देतो.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget