Latest Post

माननीय इब्ने अब्बास यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने अल्लाहकडे बोलविणाऱ्या (मुअ़िज़्जन) चा आवाज ऐकला आणि त्याला त्या आवाजाकडे   जाण्यापासून रोखणारा त्याच्याकडे बहाणाही नसेल तर त्याने एकट्याने अदा केलेली ती नमाज (अंतिम निवाड्याच्या दिवशी) मान्य केली जाणार नाही.’’
लोकांनी त्यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘बहाण्याचा अर्थ काय? आणि कोणकोणत्या बाबी बहाणा बनू शकतात?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘भय आणि आजारपण.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
प्राण जाण्याचे ‘भय’. एखाद्या शत्रूमुळे अथवा एखादे श्वापद आणि सापामुळे आणि मस्जिदपर्यंत जाता येणे शक्य नाही असे ‘आजारपण’. वादळी वारा, पाऊस आणि नेहमीपेक्षा अधिक  थंडीदेखील बहाणा बनू शकते. परंतु थंड हवेच्या ठिकाणी थंडीचा बहाणा केला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे उष्ण विभागांत कधी कधी अधिक थंडी पडते आणि ती त्यांच्या जीवावर  उठण्याची शक्यता असते, अशी थंडी बहाणा बनू शकते. अशाप्रकारे त्या वेळी मनुष्याला कमी-अधिक प्रमाणातील शौच अथवा लघुशंकेची आवश्यकता भासल्यास तेदेखील बहाणा ठरू शकते.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात) आमची स्थिती अशी होती की आजारी व्यक्ती आणि धर्मद्रोही व्यक्तीव्यतिरिक्त  आमच्यापैकी कोणी सामूहिक नमाज चुकवित नव्हता आणि त्या धर्मद्रोही व्यक्तीचे वैमनस्य माहीत होते. तसेच (त्या काळात लोकांची स्थिती अशी होती की) आजारी असूनही काहीजण  दोन माणसांचा आधार घेऊन मस्जिदमध्ये पोहचत होते आणि सामुस्रfयक नमाज अदा करीत होते. अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांनी याबाबतीत सांगितले की, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आम्हाला ‘सुन्नतुल-हुदा’ शिकविल्या. (‘सुन्नतुलहुदा’ म्हणजे मुस्लिम जनसमुदायाला अनुसरण्यास सांगण्यात आलेल्या आणि कायद्यात्मक दर्जा प्राप्त असलेल्या पैगंबराचरण  पद्धती. या पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे ज्या मस्जिदीतून अजान दिली जाते त्या मस्जिदीत नमाज अदा करणे होय.) अशीही एक ‘रिवायत’ (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून  ऐकलेली गोष्ट त्यांच्याच शब्दांत इतरांना सांगणे) आहे की त्यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याला ही गोष्ट पसंत असेल की त्याची आज्ञापालन करणाऱ्या भक्ताच्या स्वरूपात भविष्यात  अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहशी भेट होईल तेव्हा त्याने त्या पाच नमाजींची देखरेख केली पाहिजे आणि त्या नमाजी मस्जिदमध्ये सामूहिकरीत्या अदा केल्या पाहिजेत कारण  अल्लाहने तुमच्या पैगंबरांना (मुहम्मद (स.) यांना) ‘सुन्नते हुदा’चे प्रशिक्षण दिले आहे आणि या नमाजी ‘सुन्नते हुदा’पैकी आहेत आणि जर तुम्ही तुमच्या घरात नमाज अदा कराल,  जसे- हे धर्मद्रोही लोक आपल्या घरांमध्ये नमाज अदा करतात, तर तुम्ही आपल्या पैगंबरांच्या (मुहम्मद (स.) यांच्या) आचरण पद्धती सोडून द्याल आणि जर तुम्ही आपल्या  पैगंबरांच्या आचरण पद्धती सोडल्या तर सरळमार्ग विसरून जाल.’’ (हदीस : मुस्लिम)

- सुलतान अहमद इस्लाही
    आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लाम शासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे.
    आपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची विविध रूपे पाहावयास मिळतात. त्याचे एक रूप `बालमजूरी' आहे. बालमजूरीच्या या तीऋा वणव्यात आपल्या देशातील असंख्य बालकांना बळी पडावे लागत आहे. परिणामी ही फुले उमलण्यापूर्वीच कोमजतात.

आयएमपीटी अ.क्र. 163  -पृष्ठे - 16      मूल्य - 07      आवृत्ती - 1 (2009)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/yjlpftm96q3hcynqtrgagyvnt4xj4rgg

Truth
आम्हीम्ही कधीच हा दावा केलेला नाही आणि आमच्यामध्ये जोपर्यंत थोडीफार समज असेल तोपर्यंत मुळीच हा दावा करू शकणार नाही की, फक्त आमचीच संघटना सत्य मार्गावर आहे आणि जे आमच्या संघटनेमध्ये नाहीत ते सत्यमार्गावर नाहीत. आम्ही कधीच लोकांना आमच्या संघटनेकडे बोलाविलेले नाही. आम्ही तर बोलावतो फक्त त्या कर्तव्याकडे जे कर्तव्य एक मुस्लिम असल्याच्या नात्याने आमच्या आणि तुमच्यावर समानपणे लागू आहेत. जर आपण आधिपासूनच ते कर्तव्य पार पाडत असाल तर आपण सत्य मार्गावर आहात. मग आपण आमच्यासोबत मिळून ते काम करा किंवा स्वतंत्रपणे करा. परंतु ही गोष्ट कुठल्याही पद्धतीने मान्य होण्यासारखी नाही की तुम्ही स्वतःही उठणार नाही आणि जे उठलेले आहेत त्यांचीही साथ देणार नाही. आणि वेगवेगळी कारणे सांगून धर्माच्या स्थापनेपासून आणि लोकांना धर्माची साक्ष देण्याच्या जबाबदारीपासून तोंड लपवाल किंवा आपली शक्ती त्या कामात लावाल ज्यामुळे इस्लामऐवजी दुसरीच कुठलीतरी व्यवस्था स्थापित होत असेल आणि इस्लाम ऐवजी कुठल्या दुसर्‍याच गोष्टीची आपण साक्ष देत असल्याची ग्वाही आपल्या वर्तनामुळे मिळत असेल. हे प्रकरण एखाद्या भौतिक गोष्टीसंबंधी असते तर कदाचित तुमचे हिले-बहाने चालले असते. परंतु हे प्रकरण त्या अल्लाहशी संबंधित आहे जो की तुमच्या मनामधील गोष्टीसुद्धा जाणतो. त्याला कुठल्याही युक्तीने धोका देता येत नाही.
    याबाबतीत कुठलाच संशय नाही की, या एकाच उद्देशासाठी आणि एकाच कामासाठी अनेक संघटना बनविणे सकृतदृष्ट्या चुकीचे वाटत असेल आणि म्हणून या संघटनेमध्ये फूट पडण्याचीही भीती वाटत असेल. परंतु जेव्हा इस्लामी व्यवस्था उध्वस्त झालेली दिसत असेल तर अशा परिस्थितीत प्रश्‍न फक्त त्या व्यवस्थेला चालविण्याचाच नाही तर तिच्या पुनर्स्थापनेचा प्रश्‍न समोर असेल तर हे शक्यच नाही की अगदी सुरवातीलाच अशा प्रकारची एकच संघटना बनू शकेल की जिच्यामध्ये मुस्लिम समाजातील सगळेच लोक सामील होतील, ज्या संघटनेमध्ये सामील होणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य होईल आणि जिच्यापासून विलग राहणार्‍यांना पथभ्रष्ट आणि केवळ संघटनेत न आल्यामुळे धर्मभ्रष्ट मानले जाईल.
    कामाच्या सुरूवातीला याशिवाय कुठला दुसरा मार्ग नाही की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना या कार्यासाठी तयार व्हाव्यात आणि आपापल्या पद्धतीने त्यांनी कामं करावीत. शेवटी या सर्व संघटना एकच होतील, तेव्हा जेव्हा त्या खरोखरच स्वार्थी नसतील आणि खर्‍या मनाने इस्लामच्या पुनर्स्थापनेच्या उद्देशासाठी इस्लामी पद्धतीनेच काम करत असतील. सत्यमार्गावर चलणारे फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. सत्य त्यांना एकत्र केल्याशिवाय राहत नाही. कारण सत्याची प्रवृत्तीच अशी आहे की तो आपल्या मानणार्‍यांना एकत्र जोडतो. एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना उत्पन्न करतो आणि अशा बेमालुपणे एका रंगात रंगतो की, सगळ्या संघटना शेवटी एक रंग होवून जातात. फूट तर केवळ त्याचवेळेस पडते ज्यावेळेस सत्याच्या सोबत काही ना काही असत्याची भेसळ असते किंवा वरून प्रदर्शन फक्त सत्याचे असते आणि आतून असत्य मार्गाची कास धरलेली असते.
    आता मी थोडक्यात हे ही स्पष्ट करू इच्छितो की, जे लोक आमच्या संघटनेला पसंत करतात आणि तिच्यामध्ये येतात, त्यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षा आहे? आणि त्यांच्यासाठी आमच्याकडे कुठले काम आहे? आमच्या संघटनेतील सदस्यांकडे आमची मागणी बिल्कुल तीच आहे जी इस्लामची मागणी प्रत्येक मुस्लिमांकडून आहे. आम्ही इस्लामच्या मागणीपासून यत्कींचितही दूसरी कुठली मागणी वाढवू इच्छित नाही किंवा कमी करू इच्छित नाही. आम्ही प्रत्येक व्यक्तीसमोर इस्लामला कुठल्याही प्रकारची काटछाट न करता सादर करतो आणि त्याला सांगतो की, या व्यवस्थेला जाणून-बुजून, समजून -उमजून स्वीकार करा. हा तुमच्याकडून काय अपेक्षा करतो त्या योग्य पद्धतीने अदा करा. आपले विचार, आपल्या मनातील गोष्टी आणि आपले कार्य यामधून त्या सर्व गोष्टी काढून फेकून द्या ज्या की, इस्लामी आदेश आणि त्याच्या आत्म्याच्या विरूद्ध असतील, आणि जगाला कळू द्या की तुमचं पूर्ण जीवन मूर्तीमंत इस्लाम आहे. तुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे. बस्स हेच आमच्या संघटनेमध्ये सामील होण्याचे शुल्क आहे आणि हाच आमच्या संघटनेच्या सदस्यत्त्वाचा नियम आहे. आमची संघटना, आमच्या संघटनेचे नियम आणि प्रत्येक ती गोष्ट जिच्याकडे आम्ही दुसर्‍यांना बोलावितो सगळ्यासमोर इतक्या स्पष्ट आहेत की, प्रत्येक व्यक्ती त्याचे विश्‍लेषण करून हे स्वतः हे ठरवू शकतो की, आम्ही खर्‍या इस्लाममध्ये, म्हणजे त्या इस्लाममध्ये ज्याचा पाया कुरआन आणि सुन्नाह आहे, यात काही कमी केलेले नाही आणि यात काही वाढविलेले नाही. आणि आम्ही प्रत्येक क्षणी या गोष्टीसाठी तयार आहोत की कोणी आमच्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये अशी कुठलीही गोष्ट दाखवेल जी की कुरआन आणि सुन्नतच्या आदेशांपेक्षा वेगळी असेल तर आम्ही तात्काळ त्या गोष्टीला आमच्यामधून काढून टाकू. आणि ज्या गोष्टीच्या बाबतीत आम्हाला कोणी दाखवून देईल की, अमुक एक गोष्ट कुरआन आणि सुन्नतच्या शिकवणीमध्ये सामील आहे आणि आमच्या संघटनेमध्ये नाही तर कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता आम्ही ती गोष्ट स्विकारू. कारण की आम्ही उठलोच यासाठी की इस्लामला पूर्णपणे, त्यात कुठलीही गोष्ट कमी किंवा जास्त केल्याशिवाय, पुनर्स्थापित करू आणि त्याचीच साक्ष देऊ. जर आम्ही हे करू शकत नसू, तर आमच्यापेक्षा मोठा अत्याचारी आणि पाखंडी कोण असेल?

शदाद बिन औस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याने दाखविण्यासाठी नमाज अदा केली त्याने ‘शिर्क’ केले (अनेकेश्वरत्व अवलंबिले) आणि ज्याने  दाखविण्यासाठी रोजा ठेवला त्याने ‘शिर्क’ केले आणि ज्याने दाखविण्यासाठी ‘सदका’ (दानधर्म) केले त्याने ‘शिर्क’ केले.’’ (हदीस : मुस्नद अहमद)

स्पष्टीकरण
या शिकवणीद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) हे सांगू इच्छितात की प्रत्येक पुण्याईचे कार्य अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असावे. असे कार्य करण्यापूवी असा संकल्प (नियत) असावा की ‘‘हा माझ्या स्वामीचा आदेश आहे आणि मला त्याच्याच प्रसन्नतेची काळजी आहे.’’ दुसऱ्यांच्या दृष्टीने सदाचारी बनण्यासाठी आणि त्यांना खूश करण्यासाठी जे पुण्याचे काम  केले जाईल त्यास कसलेही मूल्य नसते. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठीच्या संकल्पासह करण्यात आलेल्या कार्यालाच किंमत असते.

सामूहिक नमाज
माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे. मूळ हदीसमध्ये ‘फ़ज्ज’ हा शब्द आला आहे, याचा अर्थ आहे ‘अलिप्त राहणे’. सामूहिक (जमाअतसह) नमाजमध्ये सर्व प्रकारचे  मुस्लिम सहभागी असतात. श्रीमंत, गरीब, चांगले कपडे परिधान करणारे आणि फाटके कपडे परिधान करणारेदेखील. ज्या लोकांमध्ये मोठेपणाची घमेंड असते आणि संपत्तीच्या नशेत   धुंद असतात त्यांना त्यांच्याबरोबर दुसरा कोणी उभे राहणे आवडत नाही, म्हणून ते नमाज आपल्या घरात अदा करतात. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या रोगाचा इलास असा सांगितला   आहे, ‘‘सामूहिक नमाज अदा करा, आपल्या घरात अथवा मस्जिदमध्ये एकट्याने नमाज अदा करू नका.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
त्याचप्रमाणे सामान्यत: सामूहिक नमाज अदा करताना ‘शैतानी’ (वाईट) विचार कमी निर्माण होतात आणि मनुष्याचा अल्लाहशी संबंध दृढ होतो. म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यानुसार सामूहिक नमाज अदा करण्याचा दर्जा २७ पटींनी अधिक असतो. हीच हकीकत पुढील हदीस (५३) मध्ये उद्धृत करण्यात आली आहे.

माननीय अबी बिन कअब यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुसऱ्या मनुष्याबरोबर अदा करणाऱ्या मनुष्याची नमाज, त्याने एकट्याने अदा केलेल्या नमाजच्या  तुलनेत अधिक ईमान विकसित होण्याचे कारण बनते. दोन मनुष्यांबरोबर अदा केलेली नमाज, एका मनुष्याबरोबर अदा केलेल्या नमाजच्या तुलनेत अधिक ईमान विकसित होण्याची  सबब बनते. तसेच अधिक संख्येत असलेल्या लोकांसह अदा केलेली नमाज अल्लाहला अधिक पसंत आहे. (तितका अधिक अल्लाहशी संबंध दृढ होईल.)’’ (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, ज्या वस्तीत अथवा गावात तीन मुस्लिम असतील आणि तेथे सामूहिक (जमाअतसह) नमाज अदा केली जात नसेल तर त्यांच्यावर  शैतान प्रभुत्व प्राप्त करतो. तेव्हा सामुस्रfयक नमाज अदा करण्याची स्वत:वर सक्ती करा कारण कोल्हा फक्त त्या शेळीला खातो जी आपल्या चरण्याच्या ठिकाणापासून आणि आपल्या  
कळपापासून वेगळी झालेली असते. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये ही हकीकत व्यक्त करण्यात आली आहे की सामूहिक नमाज अदा करणाऱ्यांवर अल्लाहची कृपावृष्टी होते आणि तो त्यांचे रक्षण करतो, परंतु जेथे ‘जमाअत’सह नमाजचे  आयोजन केले जात नाही तेव्हा अल्लाह आपला रक्षण आणि देखरेखीचा हात काढून घेतो आणि ते लोक शैतानाच्या ताब्यात जातात. मग ते शैतानाला पाहिजे तसे बळी पडतात आणि  हव्या त्या मार्गाने नेतो. जसे- शेळ्यांचा कळप आपल्या कुरणाजवळ असतात तेव्हा दोन प्रकारच्या संरक्षणात असतात, एक मालकाच्या संरक्षणातमुळे आणि दुसरे त्या शेळ्या एकत्रित  असल्याकारणाने (एकता). या दोन्ही कारणांमुळे कोल्हा त्यांची शिकार करू शकत नाही. परंतु जर एखादी मूख शेळी आपल्या मालकाच्या इच्छेविरूद्ध कुरणातून बाहेर पडून मागे राहिली  अथवा पुढे गेली तर अतिशय सहजतेने कोल्हा तिची शिकार करतो, कारण आता ती दुर्बलही आहे आणि मालकाच्या संरक्षणापासूनही स्वत:ला वंचित करून घेतले आहे.

- सय्यद हामिद अली
    या पुस्तकात नास्तिक व अनेकेश्वरवादीच्या विचार सरणीवर चर्चा करण्यात आली आहे. या दोन्ही विचार सरणी सृष्टीतील वस्तुंच्या सामर्थ्यांनी प्रभावित होऊन जन्मल्या आहेत. याउलट एकेश्वरत्वाची विचारसरणी मुळात सृष्टीतील प्रत्येक शक्तीचा इन्कार करण्यावर आधारित आहे. ज्ञानविज्ञान व पाश्चात्य इतिहास जाणकारांना चांगले माहित आहे की इस्लामचा एकेश्वरत्व आणि मुस्लिमांच्या ज्ञानविज्ञान व संशोधनामुळेच युरोप आज प्रगत आहे.
    एकेश्वरत्वाने कोणत्याही अजस्त्र वस्तूला देव मानले नाही आणि त्याची पूजा केली नाही ती भीती बाळगली नाही. उलट निर्भयपणे त्यावर संशोधन केले, अंधश्रद्धा नष्ट केल्या आणि विज्ञान व संशोधनात अभूतपूर्व कामगिरी केली. या उलट चित्र दुसरीकडे सापडते.

आयएमपीटी अ.क्र. 162     -पृष्ठे - 32    मूल्य - 18       आवृत्ती - 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/8e3uf39lokpfz484om9jb94eod4aiyoh

एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना एका लष्करी मोहिमेच्या नेतृत्वासाठी अतिशय बुद्धिमान आणि युद्धकुशल शूरवीराची गरज भासली, म्हणून त्यांनी माननीय अमरु बिन आस(र.)यांना प्रेषितदरबारी हजर राहण्याचे आदेश दिले. माननीय अमरु बिन आस(र.)आदेश मिळताच प्रेषितदरबारी हजर झाले. आदरणीय प्रेषितांनी म्हटले,
‘‘मी तुम्हाला एका मोहिमेवर रवाना करीत आहे. ईश्वराची इच्छा असल्यास तुम्ही सुरक्षित राहाल आणि बरीच संपत्ती तुमच्या पदरी येईल.’’
माननीय अमरु(र.)यांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले,
‘‘हे प्रेषित! मी संपत्ती मिळविण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला नसून केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी इस्लामचा स्वीकार केला आहे.’’
‘‘पवित्र संपत्ती पवित्र आचरण असणार्या व्यक्तीकडे येणे उत्तम आहे.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून माननीय अमरु बिन आस(र.)आनंदाने मोहिमेवर रवाना झाले. त्यांना आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी ‘मर्दे स्वालेह’ अर्थात ‘शुद्ध आचरण असलेले पुरुष’ या नावाने संबोधित केले.
माननीय अमरु बिन आस(र.)हे इस्लामच्या आरंभ काळातील अशा शूरवीरांपैकी आहेत ज्यांच्या शौर्य, युद्धकौशल्य, दमदार नेतृत्व आणि विवेकशील युद्धनीतिमुळे इस्लामी शासनास स्थैर्य लाभले. ते कुरैश कबिल्याचे सुपुत्र होत. त्यांची वंशावळ अशी आहे.
‘अमरु पिता आस पिता वायल पिता हाशिम पिता सईद पिता सहम पिता अमरु पिता हसीस पिता कआब पिता नुवैयी पिता गालिब.’
त्यांच्या मातेचे नाव ‘नाबिगा’ असे होते. त्यांचे पिता ‘आस बिन वायल’ हे कबिल्याचे सरदार व न्यायाधीश होते. तसेच ते अतिशय श्रीमंत असल्याने समाजात त्यांचे वर्चस्व होते. ते इस्लामचे कट्टर विरोधी होते. ते मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवीत नसत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)यांचे कथन आहे की, ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे सुपुत्र ‘कासिम’ आणि ‘अब्दुल्लाह’ यांचे बालपणातच निधन झाले, तेव्हा याच ‘आस बिन वायल’ यांनी उपहासात्मक विधान काढले की,
‘मुहम्मद(स.) यांची वंशवेल समाप्त झाली. त्यांचा एकही पुत्र त्यांचा वारसा चालविण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. आता मुहम्मद(स.) वारले की लोकांचा पिच्छा आपोआपच सुटेल.’ याच प्रसंगी दिव्य कुरआनाची ‘सूरह-ए-कौसर’ अवतरली आणि यामध्ये ईश्वराने आपल्या लाडक्या प्रेषितांच्या सांत्वनास्तव घोषणा केली की, ‘हे प्रेषिता! आपला वारसा निश्चितच चालू राहील. तुम्ही शोकाकुल होऊ नका. ज्यांनी तुमच्यावर उपहासात्मक वाक्य काढले, त्यांचीच वंशवेल आम्ही संपवीत आहोत.’
आणि खरोखरच! आदरणीय प्रेषितांचा उपहास करणार्यांची वंशवेल संपूनच गेली. त्यांच्या वंशाचा कोणीच वारसदार शिल्लक राहिला नाही.
इस्लामच्या या अतिकठोर द्वेष्ट्याच्या घरात इस्लामसाठी जीवन अर्पण करणारे माननीय अमरु बिन आस(र.)जन्मले होते. अमरु बिन आस(र.)हे आदरणीय प्रेषितांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. त्यांच्या इस्लामद्रोही पित्याने त्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले होते. म्हणूनच ते शिक्षण व प्रशिक्षण घेऊन उच्चदर्जाचे युद्धनीतिज्ञ बनले. माननीय अमरु(र.)यांनीसुद्धा इस्लामद्वेषाचा पित्याचा हा वारसा बर्याच काळापर्यंत सुरु ठेवला.
त्यांचे धाकटे बंधू माननीय हिश्शाम बिन आस(र.)यांनी मात्र इस्लामच्या प्रारंभी काळातच इस्लाम स्वीकारला आणि इस्लामद्रोह्यांच्या छळ आणि अमानवी यातनांना बळी पडले. शेवटी त्यांनी ‘अॅबीसीनिया’ कडे स्थलांतर केले. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जोरदार विरोध केला. त्यांनी इस्लामी लष्कराबरोबर घनघोर युद्ध केले.
आपल्या इस्लामस्वीकृतीचा वृत्तांत त्यांनी स्वतःच या शब्दांत मांडला,
‘‘मी ‘एहजाब’च्या युद्धातून परत येत असताना आपल्या हाताखालील तमाम लोकांना निमंत्रित करून सांगितले की, ईश्वराची शपथ! आपण किती जरी प्रयत्न केले तरी मुहम्मद(स.) यांची भूमिका निश्चितच दृढ आणि न्यायनिष्ठ वाटते. तसेच ते नेहमीच आपल्यापेक्षा प्रभावी ठरतात. मुहम्मद(स.)च्या काही सोबत्यांनी ‘अॅबीसीनिया’ देशात राजा ‘नेगूस’चा आश्रय घेतला आहे. आपणही तेथेच स्थायिक होऊ या. येथे मुहम्मद(स.) च्या प्रभुत्वाखाली राहण्यापेक्षा राजा ‘नेगूस’ च्याच आश्रयात राहणे श्रेयस्कर आहे. या ठिकाणी(अर्थात मक्का शहरात) आपल्या समाजाने जर मुहम्मद(स.) यांचा पराभव केला, तरी राजा ‘नेगूस’चे आपल्याबरोबर चांगलेच वर्तन राहील. कारण आपण श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक आहेत.’ माझ्या या विचारावर सर्वच सहमत झाले. मग आपसात सल्लामसलतीत निर्णय झाला की, आपल्याकडील प्रसिद्ध आणि मूल्यवान असलेली वस्तू अर्थात उच्च दर्जाचे चामडे आपण राजाला भेट म्हणून देऊ. तो आपल्यावर खूप प्रसन्न होईल. म्हणून आम्ही विपुल प्रमाणात चामडे घेऊन अॅबीसीनियाकडे निघालो. अॅबीसीनियात पोहोचताच आमची गाठ माननीय इब्ने उमैया(र.)यांच्याशी पडली. त्यांना आदरणीय प्रेषितांनी काही कामानिमित्त राजा नेगूसकडे पाठविले होते. आम्ही राजा नेगूसच्या दरबारी पोहोचलो. मी राजा बेगूसला नीतिनीयमाप्रमाणे साष्टांग नमस्कार केला. त्याने माझे स्वागत करून विचारले, ‘आमच्यासाठी काही विशेष भेट आणली काय?’ आम्ही उच्चदर्जाचे सोबत आणलेले चामडे त्याच्या समोर ठेवले. राजा खूप प्रसन्न झाला. मग मी त्यास म्हणालो, ‘‘राजवर्य! आपल्याकडे आमच्या शत्रू(अर्थात आदरणीय प्रेषित(स.) ने पाठविलेला माणूस आलेला आहे. त्यास(अर्थात माननीय इब्ने उमैया(र.)) ठार करण्याकरिता आमच्या स्वाधीन करावे. त्याने आमच्या बर्याच प्रतिष्ठितांना त्रास दिला आहे.’’ माझे हे वाक्य ऐकून राजा नेगूस अत्यंत क्रोधित झाला. त्याने आपला हात आपल्या माथ्यावर मारला. त्याच्या या कृत्याने मला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. मी म्हणालो,
‘‘हे राजन! मला याची पूर्वकल्पना असती की, माझ्या बोलण्याचे आपणास इतके वाईट वाटेल, तर मी बोललोच नसतो. क्षमस्व!’’ राजा नेगूस क्रोधित होऊन म्हणाला, ‘‘तुम्ही एका अशा पुरुषाच्या सोबत्यास माझ्या हातून ठार करू इच्छिता ज्यावर आदरणीय मूसा(अ.) या प्रेषिताप्रमाणेच दिव्य बोध होतो.’’
मी प्रश्न केला, ‘‘हे राजन! खरोखरच हे सत्य आहे काय?’’ बादशाह उत्तरला, ‘‘अमरु! तुम्ही खरोखरच दुर्दैवी आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे. तुम्ही त्यांना शरण जा. त्यांचे अनुकरण स्वीकारा. ज्याप्रमाणे मूसा प्रेषितांनी ‘फॅरो’ या क्रूर बादशाहाचा पराभव केला होता, त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) सुद्धा आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करतील. म्हणून तुम्ही माझ्या हातावर आदरणीय प्रेषितांच्या सत्य धर्माची दीक्षा घ्यावी.’’ असे म्हणून राजा नेगूस याने आपला हात पुढे केला आणि मी त्याच ठिकाणी इस्लामचा स्वीकार केला. माझ्या विचारातही अभूतपूर्व क्रांती घडून आली होती. दरबारातून मी सरळ आपल्या सवंगड्यांकडे आलो. त्यांच्यासमोर मी इस्लाम स्वीकारण्याची घटना जाहीर केली नाही आणि सरळ मदीनाकडे प्रस्थान केले. रस्त्यात माननीय खालिद बिन वलीद(र.)व उस्मान बिन तलहा(र.)भेटले आणि मी त्यांना विचारले, ‘‘हे खालिद कोठे निघालात?’’ ‘‘ईश्वराची शपथ! आम्ही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडे इस्लाम स्वीकारण्यासाठी निघालो आहोत. मग आम्ही एकत्र प्रेषित दरबारी पोहोचलो. आधी माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी प्रेषितांकडून इस्लामची दीक्षा स्वीकारली मग मी प्रेषितांजवळ जाऊन म्हणालो,
‘‘हे प्रेषित! मी इस्लाम स्वीकारण्यासाठीच हजर झालो. परंतु आपण माझे पाप आणि आपणास केलेला विरोध क्षमा करावा!’’
यावर प्रेषित म्हणाले, ‘‘हे अमरु! इस्लामचा स्वीकार केल्यावर ईश्वर संपूर्ण पाप माफ करतो आणि इस्लामसाठी केलेल्या स्थलांतरामुळेसुद्धा पुर्वी केलेले सर्व पाप धुवून निघतात.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून मला खूप मानसिक समाधान लाभले आणि मी तत्काळ इस्लामचा स्वीकार केला आणि मक्का शहरी परतलो.’’
परंतु आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना सोडून त्यांचे मन मक्का शहरात रमले नाही. त्यांनी काही दिवसांतच मदीनेस स्थलांतर करून प्रेषितांसोबत वास्तव्य केले.
माननीय अमरु बिन आस(र.)यांच्या सर्व लढायांपैकी सर्वांत महत्त्वाचे युद्ध म्हणजे इजिप्तवर केलेली यशस्वी चढाई होय. याच विजयपूर्ण युद्धाने इतिहासात त्यांची विशेष ओळख आहे. सीरियावरील महत्त्वपूर्ण विजयानंतर त्यांनी आपल्या लष्करी कारवाईचा मोर्चा इजिप्तकडे वळविला. यामध्ये त्यांनी अतिशय सुपीक आणि समृद्ध असलेले इजिप्त तर ताब्यात घेतलेच, शिवाय तराबलस आणि जवळपासच्या इतर प्रदेशांवरही सत्य धर्माचा झेंडा रोवून मानवजातीस अन्यायी व अत्याचारी सत्तेच्या जोखडातून मुक्त केले.
इजिप्त देशावर सुद्धा रोमन सम्राटाचा ताबा होता. रोमन सम्राटाच्या हातून ‘सीरिया’ हिसकावून घेतल्यामुळे तो इजिप्तमध्ये इस्लामी लष्करास पराभूत करण्याची जोरदार तयारी करीत होता. इजिप्तवर चढाई करण्यात मोठ्या अडचणी आणि समस्या असूनही माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांची परवानगी मिळविली. हिजरी सन १८ मध्ये माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इजिप्तच्या ‘बेबीलॉन’ शहरावर हल्ला केला. घनघोर युद्धानंतर इस्लामी लष्कराने या शहराचा ताबा घेतला. यानंतर त्यांनी नाईल नदीवर वसलेले प्राचीन शहर ‘गरजुल’ बलाढ्य येथे लष्कर तैनात केलेले होते. या लष्कराने तब्बल एक महिण्यापर्यंत इस्लामी लष्करास झुंज दिली आणि शेवटी शरणागती पत्करली. या किल्ल्याच्या पायथ्याशी नाईल नदी वाहात असे. जहाजे आणि युद्धनौका किल्ल्याच्या मुख्य द्वारावर थांबत असत. अर्थात हे एक बंदरच होते. या किल्ल्यास ताब्यात घेतल्याशिवाय इजिप्त देशात पुढचा विजय मिळविणे अतिशय कठीण व जवळपास अशक्यच होते. माननीय अमरु(र.)यांनी या किल्ल्यास वेढा दिला. हा वेढा बरेच दिवस चालू होता. किल्ल्याच्या रक्षणार्थ असलेल्या लष्कराने देखील खूप निकरीची झुंज दिली. इस्लामी लष्कराने केंद्रीय इस्लामी शासनाकडून मदतीसाठी आणखीन कुमक मागविली. माननीय उमर फारुक(र.)यांनी दहा हजारांचे लष्कर पाठविले . या लष्कराचे नेतृत्व माननीय जुबैर(र.)यांच्याकडे होते. त्यामुळे माननीय जुबैर(र.)यांनी किल्ल्याच्या खंदकाची पाहणी करून रणनीती आखली. तरीदेखील सात महिने उलटूनही किल्ला ताब्यात आला नाही. म्हणून माननीय जुबैर(र.)यांनी एक लांबलचक सोल घेऊन किल्ल्याच्या तटावर चढून आत शिरकाव केला. त्यांच्या मागे इस्लामी लष्करसुद्धा आत शिरले आणि आत जाऊन किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार उघडले. संपूर्ण इस्लामी लष्कर किल्ल्यात शिरले आणि इजिप्शियन सैन्याची तारांबळ उडाली. इजिप्शियन लष्कराने काही सामान्य अटी समोर ठेवून इस्लामी लष्कराबरोबर तडजोड केली. माननीय अमरु(र.)यांनीसुद्धा जास्त रक्तपात घडू नये या पवित्र हेतूने त्यांना अभयदान दिले. या किल्ल्याचे नाव ‘कसर-ए-शमा’ असे होते.
‘कसर-ए-शमा’ येथे काही दिवस वास्तव्य केल्यावर माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इजिप्तचे सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे शहर ‘अस्कंदरीया’ कडे आपला मोर्चा वळविला. रस्त्यामध्ये ‘अश्मून’, ‘आलिया’, ‘कूम’, ‘माफूक’, ‘करयून’ आणि इजिप्तच्या आणखीन काही ठिकाणच्या फौजांनी इस्लामी लष्करास अयशस्वी झुंज दिली आणि पराभव पत्करला. अशा प्रकारे माननीय अमरु(र.)यांनी आपली यशस्वी घोडदौड चालूच ठेवली आणि ‘अस्कंदरीया’ शहरास धडक मारली. या शहरात तब्बल पन्नास हजाराचे रोमन लष्कर इस्लामी लष्कराचा सामना करण्यास सज्ज होते. शहरास चारही बाजुंनी उंच तटबंदी होती. हत्यारे आणि रसदसुद्धा मुबलक प्रमाणात रोमन लष्कराकडे होती.
शिवाय त्यांच्याकडे युद्ध नौकादेखील होत्या. ‘बलाजुरी’ आणि ‘मुकरीजी’ या इतिहासतज्ञांनी लिहिले की, येथील सेनापती ‘मकोकस’ हा इस्लामी लष्करास टक्कर देण्याच्या मनःस्थितीत नव्हता. कुशल योद्धा असल्याने आणि युद्धांचा दीर्घ अनुभव असल्याने इस्लामी लष्कराचे बळ त्याने ओळखले होते. तरीदेखील रोमन सम्राटाच्या मर्जीखातर त्यास हे युद्ध करणे भाग पडले. त्याला याची चांगलीच जाण होती की, रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेले सीरिया आणि इतर भाग इस्लामी लष्कराने मोठ्या जिद्द आणि चिकाटीने हिसकावून घेतले होते. ते सहजासहजी इजिप्त सर केल्या वाचून श्वासही घेणार नाही. म्हणून त्याने माननीय अमरु(र.)यांच्याशी एक गुप्त करार केला की, हे युद्ध आमची मर्जी व इच्छा नसताना रोमन सम्राटाच्या आग्रहाखातर आम्ही करीत आहोत. बळजबरीच हे युद्ध आमच्यावर लादण्यात येत असून इच्छा नसतानाही आम्हास तुमच्याविरुद्ध लढावे लागत आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या समाजाच्या लोकांना ठार करु नये. अशा प्रकारे हे युद्ध टळले आणि इस्लामी लष्कराशी तडजोड झाली.
या घटनेमुळे इजिप्त देशाच्या इतर शहरात राहणार्या रोमन नागरिकांचे धैर्य खच्ची झाले. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इतर शहरांना ताब्यात घेण्यासाठी उमैर(र.), उकबा(र.)आणि खारजा(र.)यांच्या नेतृत्वात लष्करे रवाना केली. बर्याच ठिकाणी रोमन लष्कराशी त्यांचा सामना झाला आणि इस्लामी लष्कराने कोठेच माघार न घेता आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली. अशा प्रकारे अल्पशा काळातच संपूर्ण इजिप्त इस्लामी लष्कराने रोमन सम्राटाकडून हिसकावून तेथील जनतेच अन्यायमुक्त केले.
इजिप्तवर विजय मिळविल्यानंतर माननीय अमरु बिन आस(र.)यांनी आपला मोर्चा ‘बरका’ कडे वळविला. ‘बरका’ हा अतिशय दाट वस्तीचा आणि इजिप्त व पश्चिमी तराबलसच्या दरम्यानचा सुपीक प्रदेश होता. परंतु या ठिकाणी इजिप्तचेच शासन होते. ‘बरका’मध्ये दाखल होताच माननीय अमरु(र.)यांनी येथील सर्वांत महत्त्वाचे केंद्रीय शहर ‘अन्ताबलस’ ला लष्करी वेढा दिला. परंतु येथील नागरिकांनीसुद्धा युद्धाच्या भानगडीत न पडता हे शहर इस्लामी लष्कराच्या स्वाधीन केले. ‘बरका’ ताब्यात घेतल्यावर माननीय अमरु(र.)यांनी ‘उकबा बिन नाफेअ(र.)यांना ‘जवेला’कडे लष्करी कारवाईसाठी रवाना केले. हे शहर सुडानच्या सीमेवर होते. मागील युद्धातील पराभवामुळे आणि इस्लामी लष्कराच्या सहिष्णुतावादामुळे, तसेच त्याच्या उदार नीतीमत्तेमुळे तेथील रहिवाशांनीसुद्धा युद्ध न करताच रोमन साम्राज्य झुगारून इस्लामी शासन व्यवस्था पसंत केली आणि हे शहर इस्लामी लष्कराच्या अधिपत्याखाली आले. यानंतर माननीय अमरु(र.)यांनी आपला मोर्चा रोमन सागराच्या किनार्यावरील आणि आफ्रिका प्रदेशातील ‘तराबलस’कडे वळविला. तराबलसवासियांना इस्लामी लष्कराची वार्ता मिळताच त्यांनी किल्ल्यात आश्रय घेतला. अमरु बिन आस(र.)यांनी पूर्वेकडे पाडाव टाकून पूर्ण किल्ल्यास वेढा दिला. हा वेढा पूर्ण दोन महिन्यांपर्यंत होता. परंतु शहरात प्रवेश करण्याचा कुठलाच मार्ग निघत नव्हता. योगायोगाने इस्लामी लष्कराचे काहीजण शिकारीसाठी गेल्यावर त्यांची दृष्टी किल्ल्याकडे जाणार्या एका मार्गावर पडली. तसेच त्यांना हेदेखील आढळून आले की, समुद्र आणि किल्ल्यादरम्यान कोणतीच तटबंदी नाही. त्यांनी याची भौगोलिक परिस्थिती अमरु बिन आस(र.)यांना तत्काळ कळविली. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी याच मार्गाने शहरात पूर्ण लष्करासह प्रवेश केला आणि रोमन लष्कराची दानादान उडविली. दोन्ही सैन्यांत घनघोर युद्ध झाले आणि त्यांचा इस्लामी लष्करासमोर टिकाव लागला नाही. शत्रूपक्षाने इस्लामी लष्करासमोर शरणागती पत्करली.
‘तराबलस’ वर विजयी पताका रोवून माननीय अमरू बिन आस(र.)यांनी तेथेच तळ ठोकून लष्कराचा एक दस्ता ‘तराबलस’ पासून थोड्या अंतरावर असलेल्या ‘सबरा’ शहराकडे पाठविला. हा दस्ता शहरात दाखल झाला आणि येथील सुरक्षा दलाने इस्लामी लष्करासमोर आत्मसमर्पण केले.
माननीय अमरु बिन आस(र.)यांनी लाखो चौरस मैल क्षेत्रावर इस्लामी शासनाचा झेंडा रोवला आणि आता ते ‘अस्कंदरीया’पासून शेकडो मैल दूरवर एका अशा ठिकाणी वास्तव्यास होते जेथे पाणी कमी हते आणि प्रवासही खडतर होता. परंतु त्यांचे मनोबल खूप कणखर आणि मजबूत होते. आता त्यांना आपली विजयी दृष्टी ट्यूनेशिया, अलजझायर आणि मोरॅक्कोकडे वळली. त्यामुळे त्यांना इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांना पत्र पाठविले की, ‘‘आम्ही ‘तराबलस’पर्यंतचा भाग ताब्यात घेतला. आता येथून टयूनेशिया, अलजसायर आणि मोरॅक्को फक्त नव्वद दिवसांच्या अंतरावर आहे. परवानगी असेल, तर आम्ही या प्रदेशावरही इस्लामी राज्य स्थापन करू. माननीय उमर फारुक(र.)यांनी पत्राचे उत्तर देताना लिहिले,
‘’अफ्रिकया(ट्यूनेशिया, अलझझायर व मोरॅक्को) मध्ये प्रवेश करू नका. हा प्रदेश उपद्रव आणि वैरभावाचे केंद्र आहे. तेथील लोक संघटित नसतात. तेथील पाणीच असे आहे की, त्यास पिणारा माणूस हा कठोरहृदयी होतो.’’ याचबरोबर माननीय अमरु बिन आस(र.)यांना माननीय उमर फारुक(र.)यांनी इजिप्तचे राज्यपालपद बहाल करण्याचीदेखील घोषणा केली. अस्कंदरीयावर ताबा मिळविल्यानंतर बरेच रोमन लोक शहर सोडून रोमन सम्राटाच्या शहरात जाऊन वसले होते. त्यामुळे तेथील बरेच बंगले आणि हवेल्या रिकाम्या होत्या. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी याच ठिकाणी देशाची राजधानी बनविण्याची परवानगी माननीय उमर(र.)यांच्याकडे मागितली. परंतु माननीय उमर फारुक(र.)यांनी परवानगी दिली नाही आणि त्यांना लिहिले की,
‘‘मला योग्य वाटत नाही की, तुमच्या आणि माझ्या दरम्यान एवढी मोठी नदी आडवी असावी आणि एवढे मोठे अंतर असावे.’’
यानंतर माननीय अमरु(र.)यांनी ‘किस्तान’ नावाचे नवीन शहर उभारले आणि याच शहरास येथील इस्लामी सत्तेचे केंद्र बनविले. हे शहर अशा प्रकारे उभारण्यात आले, त्याचा सविस्तर वृतान्त शिबली नोअमानी(र.)या इतिहासतज्ञांनी ‘अल फारुक’ या ग्रंथात अशा प्रकारे सादर केला आहे,
‘‘माननीय अमरु(र.)हे ‘अस्कंदरीया’हून ‘कसर-ए-शमा’ येथे आले. अस्कंदरीयावरील हल्ल्याच्या वेळी ठोकण्यात आलेले तळ अजूनही तसेच रिकामे पडलेले होते. म्हणून त्यांनी याच तळावर नवीन शहर वसविले. प्रत्येक कबिल्याच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आणि ‘मआविया बिन खदीज’, ‘शरीक बिन समी’, ‘अमरू बिन मख्जूम’ आणि ‘इब्ने नाशेरा’ यांना नगररचना करण्याची जबाबदारी सोपविली. येथे एक विशाल ‘जामा मस्जिद’(केंद्रीय मस्जिद) उभारण्यात आली. या अतिविशाल मस्जिदीस तिन्ही बाजुंना द्वार बसविण्यात आले आणि मुख्य प्रवेशद्वार हे राजधानीच्या इमारतीच्या समोरच्या दिशेस ठेवण्यात आले. माननीय अमरु(र.)यांनी इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांच्यासाठीसुद्धा एका निवासाची इमारत उभी केली परंतु माननीय उमर फारुक(र.)यांनी लिहिले की, ‘‘त्याचे मी काय करणार.’’ म्हणून शेवटी ही विशाल वास्तु शहराच्या मुख्य बाजारपेठेसाठी वापरण्यास घेतली. हे शहर हिजरी सन २१ मध्ये उभारण्यात आले.’’
किस्तात शहर उभारण्यास सुरुवात झाली तेव्हाच माननीय अमरु(र.)यांनी शहराच्या समोर आणि नाईल नदीच्या पश्चिमी किनार्यावर एक अस्थायी स्वरुपाची छावणीदेखील उभारली. नंतर माननीय उमर फारुक(र.)यांनी अमरु बिन आस(र.)यांना आदेश पाठविला की, ‘‘शहराच्या चारही बाजूस भव्य तटबंदी उभी करा.’’ हा आदेश मिळताच अमरु बिन आस(र.)यांनी एका भव्य व अलिशान आणि मजबूत किल्ल्याची निर्मिती केली.
माननीय उमर फारुक(र.)यांनी इस्लामी राज्यांच्या सर्व राज्यपालांना आदेश दिला की, त्यांनी ‘हज’ च्या प्रसंगी मदीना शहरी यावे आणि संपूर्ण जनतेस आवाहन केले की, ‘‘जर नागरिकास एखाद्या राज्यपालाविरुद्ध तक्रार असेल, तर ती निर्भयतेने माझ्याकडे करावी.’’ एकदा माननीय उमर फारुक(र.)यांनी अशाच प्रसंगी लोकांना उद्देशून भाषण करताना म्हटले,
‘‘इस्लामी शासनाच्या जनवासियांनो! ज्या लोकांची मी तुमच्या राज्याचे राज्यपालपदी नेमणूक करतो, त्यांना या गोष्टीचा मुळीच अधिकार नाही की, त्यांनी तुम्हास चापट मारावी, तुमची संपत्ती बळकावावी किवा इतर कोणत्याही प्रकारे तुमचा छळ करावा. या उलट मी नेमलेल्या राज्यपालांची जवाबदारी आणि कर्तव्य हे आहे की, त्यांनी तुमच्या प्राण, संपत्ती आणि इभ्रतीचे रक्षण करावे आणि तुम्हाला आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या सत्यमार्गावर आचरणाची दिशा द्यावी. हे प्रत्येक राज्यपालाचे परम कर्तव्य असून ज्या राज्यपालाने या कर्तव्यात थोडी जरी कुचराई केली, त्याच्या बाबतीत निःसंकोचपणे तक्रार करावी. मी या तक्रारीची याच ठिकाणी गंभीर दखल घेऊन फिर्यादीस न्याय देईन.’’
एवढ्यात एक बिगरमुस्लिम इजिप्शियन उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘अमीरुल मुअमिनीन ‘अमरु बिन आस’ या राज्यपालाने मला विनाकारण शंभर कोरडे मारले.’’ माननीय उमर फारुक(र.)यांनी त्यास सांगितले की, ‘‘तुम्हीसुद्धा राज्यपालास शंभर कोरडे मारू शकता आणि ते देखील या सर्व उपस्थितासमोर!’ आणि मग राज्यपाल अमरु बिन आस(र.)यांनी त्यास दोनशे दिरहम घेऊन ही शिक्षा माफ करण्याची विनंती केली व फिर्यादीने ती आनंदाने मान्य केली.
एकदा तर अतिशय विलक्षण घटना घडली. ती अशी की, इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांच्याकडे तक्रार आली की, इजिप्तचे राज्यपाल अमरु बिन आस(र.)यांचा मुलगा ‘इब्ने अमरु’ याने घोडदौडीच्या प्रशिक्षण मैदानावर एका इजिप्शियन बिगर मुस्लिम रहिवाशास असे सांगून बदडले की, ‘मी मोठ्या बापाचा अर्थात राज्यपालाचा पुत्र असल्याने माझ्या सरावाच्या वेळी घोडेस्वारीसाठी येऊन मला त्रास देऊ नकोस.’
माननीय उमर फारुक(र.)यांनी फिर्यादीस आपल्याचकडे थांबवून घेतले. आणि इब्ने अमरु या आरोपीस तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले. त्यांनी फिर्यादीच्या हातात कोरडा देऊन म्हटले,
‘‘या मोठ्या बापाच्या बिघडलेल्या पुत्राचा या कोरड्याने खरपूस समाचार घे. तुझा आत्मा शांत होईपर्यंत मारीत राहा!’’
फिर्यादीने हातात कोरडा घेऊन सर्वांसमक्ष ‘इब्ने अमरु’ अर्थात राज्यपालाच्या पुत्राला बदडण्यास सुरुवात केली. याचबरोबर माननीय उमर फारुक(र.)म्हणत होते,
‘‘मार! आणखीन मार, या मोठ्या बापाच्या लाडात बिघडलेल्या पुत्राला!! आणखीन मार!!!’’
फिर्यादीने त्यास मारुन झाल्यावर माननीय उमर फारुक(र.)यांनी इजिप्तचे राज्यपाल असलले आरोपीचे वडील माननीय अमरु(र.)यांना फिर्यादीसमोर करून म्हणाले,
‘‘तुझी इच्छा असेल तर यांनादेखील चांगले बदडून काढ! याच मोठ्या बापाचा तो बिघडलेला पूत्र आहे!’’ परंतु फिर्यादी म्हणाला, ‘‘हे उमर(र.)! आता माझी तक्रार संपली. मला न्याय मिळाला!’’ आता माननीय उमर फारुक(र.)यांनी या दोन्ही बाप- लेकांना क्रोधपूर्ण शब्दात खडसावले,
‘‘याच्या आईने(अर्थात फिर्यादीच्या आईने) तर याला ‘स्वतंत्र’ मानवाच्या स्वरुपात जन्म दिला, तुम्ही केव्हापासून यास गुलाम बनविले?’’
माननीय उमर फारुक(र.)यांच्या या वाक्याचा अर्थ असा की, प्रत्येक माणूस हा स्वतंत्रपणे जन्मतो. अर्थात स्वातंत्र्य हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून त्याच्यावर अत्याचार करणे म्हणजे त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे व त्यास गुलाम बनविणे होय. इस्लामी शासनाच्या राज्यपालाच्या मुलालासुद्धा जनतेवर अत्याचार करण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून अत्याचारपीडितास समाधान होईपर्यंत आरोपीस शिक्षा मिळालीच पाहिजे. हाच इस्लामी शासनाचा नियम आहे. याच नियमामुळे जनतेने रोमन साम्राज्य झुगारून इस्लामी शासनाची न्यायपूर्ण छत्रछाया स्वीकारली आणि जवळपास ७५ टक्के विश्व इस्लामी शासनाच्या अधिपत्याखाली आले.
इजिप्तच्या इस्लामी राज्यपालपदी असताना माननीय अमरु बिन आस(र.)यांनी ‘नहरे अमीरुल मुआमिनीन’ हा कालवा बांधला. याचा संक्षिप्त इतिहास असा आहे की, हिजरी सन २१ मध्ये मदीना शहर आणि याच्या परिसरात भयंकर दुष्काळ पडला. नद्या-नाले पूर्णतः आटून गेले होते. परिणामी तेथील व्यापारसुद्धा बंद झाला. ही दुष्काळजन्य परिस्थिती हातळण्यासाठी उमर फारुक(र.)यांनी सर्व राज्यपालांना पाचारण केले. सर्व राज्यपालांनी मदीनासाठी भरघोस मदत केली. ‘इजिप्त’ मदीनापासून खूप दूर असल्याने तेथून मदत पोहोचू शकली नाही. म्हणून माननीय उमर(र.)यांनी त्यांना पत्र लिहिले की, ‘तत्काळ मदत पोहोचवावी.’
यावर माननीय अमरु(र.)यांनी उत्तर दिले की ‘हे अमीरुल मुअमिनीन, लवकरच मदत पाठवीत आहे. रसद घेऊन उंटाचा मोठा काफिला रवाना करीत आहे. तसेच समुद्र मार्गानेही रसद येण्याची आशा आहे.’
यानंतर त्यांनी ‘नहरे अमीरुल मुअमीनीन’ या विशाल कालव्याची निर्मिती केली. शेवटी संपूर्ण इजिप्त जिकून इस्लामी शासनास जोडणारा हा थोर सेनापती परलोक मार्गी रवाना झाला.

Person
इस्लामी दृष्टिकोनानुसार मूळ महत्त्व समाजाला नसून व्यक्तीला आहे. याच कारणामुळे आपले उद्दिष्ट साधण्याकरिता, समाजापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व देतो. इस्लाम माणसाच्या अंतरात्म्याला इतका ज्ञानपूर्ण व सभ्य करु इच्छितो की, त्याने स्वेच्छेने आपल्या सर्व सामाजिक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावीत. आपला व्यवसाय त्याने निवडावा, कारण कोणताही व्यवसाय सोडण्यासही त्याच्यावर काही बंधन नसते.
शासकाने जर ईश्वराने ठरवून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन केले तर इस्लामच्या प्रत्येक व्यक्तीला शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार देण्याचा अधिकार प्राप्त असतो. अशा तऱ्हेने, इस्लाम प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या नैतिक तत्त्वांचा रक्षक बनवितो व सर्व सामाजिक बिघाड व दोष दूर करणे, हे व्यक्तीचे कर्तव्य असल्याचे घोषित करतो. कम्युनिझममध्ये व्यक्तीला कसलेही महत्त्व नसते व संपूर्ण आर्थिक उत्पादनाच्या साधनांवर नियंत्रण ठेवण्याचा हुकूमशाही शासनासमोर त्याला हतबल करुन ठेवले जाते, अशा प्रकारच्या समाजात इस्लामचा हा मानस व हेतू पुरा होऊच शकत नाही, हे स्पष्ट आहे.
शेवटी, या संदर्भात ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये की कम्युनिस्ट तत्त्वानुसार सामाजिक संबंधाची बांधणी व तिचा क्रम या संदर्भात, प्रमुख व मूळ महत्त्व केवळ आर्थिक तत्त्वानांच आहे. मानव जीवनातील आर्थिक बाजूला जे महत्त्व आहे, त्याचा इस्लाम निषेधही करीत नाही किवा ते कमीही करीत नाही. एका राष्ट्राच्या जीवनात तेथील आर्थिक सुस्थितीला जे महत्त्वाचे स्थान असते, त्याकडेही इस्लाम डोळेझाक करीत नाही, तसेच नैतिक व सामाजिक आचरणावरील त्याच्या प्रभावाचाही इन्कार करीत नाही. परंतु जीवन म्हणजे आर्थिक समस्यांखेरीज बाकी काहीच नाही, या गोष्टीचा इस्लाम तीव्र विरोध करतो. तसेच माणसाचे आर्थिक प्रश्न सुटले तर त्याचे इतर प्रश्न आपोआपच सुटतील, असे कम्युनिस्टांप्रमाणे इस्लाम मानत नाही. या वास्तवतेचे अधिक स्पष्टीकरण, व्यवहारी जीवनातील खालील उदाहरणांनी चांगले होऊ शकते.
एकसारखी आर्थिक स्थिती असलेल्या दोन तरुणांचे उदाहरण घ्या. यातील एकजण आपल्या आंधळ्या-बहिऱ्या इच्छा वासनांचा गुलाम आहे व भोगविलासप्रिय आहे. दुसरा भोगविलासाऐवजी शिक्षण प्राप्त करण्यात व ज्ञानार्जन करुन आपली बौद्धिक शक्ती वाढविण्यात सदैव मग्न आहे. प्रश्न असा उद्भवतो की या दोघा तरुणांना समान वागणूक दिली जावी काय व त्यांच्या अवस्थेत कसलाही फरक नाही काय? या दोहोंचे जीवन सारख्याच प्रमाणात भलेपणा, चांगुलपणा व सफलता यांची वाढ करणारे मानले जाईल काय?
त्याचप्रमाणे अतिप्रभावी अद्वितीय व्यक्तिमत्त्व असलेल्या एखाद्या माणसाचे उदाहरण घ्या. त्याचे सर्व म्हणणे लोक आनंदाने व आदराने ऐकतात व मानतात. अशा थोर व्यक्तीला अशा दुसऱ्या व्यक्तीसमान मानणे शक्य आहे काय ज्याला कसले व्यक्तिमत्त्व नसून समाजात त्याला कसलीही प्रतिष्ठा अगर आदर नसून केवळ एक ऐतखाऊ व कुचकामाचा आहे तो व इतरांच्या चेष्टेचा विषय बनून राहिला आहे. आर्थिक समस्याच अशा हास्यास्पद माणसाची समस्या आहे काय की जी सुटल्याने त्याच्या इतर सर्व समस्या आपोआप सुटून जातील? अशा प्रकारच्या त्याच्या जीवनात त्या सर्व गुणांची सजावट व शोभा कधीतरी येऊ शकते काय, जी पहिल्या व्यक्तीच्या जीवनात आढळते ?
त्याचप्रमाणे एखादी रुपवती व प्रतिष्ठा असलेली स्त्री आणि दुसरी सौंदर्याचा व प्रतिष्ठेचा अभाव असलेली स्त्री एकमेकांसमान आहेत काय? व सर्व आर्थिक अडचणींची सोडवणूक झाली, तर दुसरी स्त्री ही पहिलीसारखी होऊ शकेल काय?
माणसामाणसांतील हाच फरक डोळ्यांपुढे ठेवून इस्लामने आर्थिक जीवन मूल्यांऐवजी नैतिक मूल्यांना प्राथमिक महत्त्व दिले आहे. कारण त्याच्या दृष्टीने मानवी जीवनाचा आधार आर्थिक मूल्यावर नसून काही बिगर आर्थिक मूल्यावर उभारलेला आहे. ती स्थापित करण्यासाठी, कृतीचे स्वरुप देण्यासाठी तितकेच कष्ट व धडपड करावी लागते जितके आर्थिक मूल्ये जीवनात स्थापन करण्यासाठी लागतात. म्हणून ईश्वर व मानव म्हणजेच स्वामी व दास यांच्या दरम्यान सदासर्वदा असणाऱ्या व टिकून राहाणाऱ्या नात्यावर इस्लाम जोर देतो. कारण हेच अल्लाहच्या व माणसाच्या दरम्यानचे नाते प्रत्यक्ष जीवनातील नैतिक मूल्यांचा संपूर्ण विकास होण्याचे सर्वोकृष्ट साधन होऊ शकते. आपल्या भौतिक गरजांच्या स्वाधीन होऊन सर्वनाश करणारी ओढाताण, तिरस्कार व द्वेष यांना बळी पडलेल्या माणसाला जीवनातील खालच्या पातळीवरुन वर काढतो. इस्लाम मानवाला अशा उच्च स्थानाप्रत पोचवितो जेथे माणूस आपल्या इच्छावासनांचा गुलाम न राहाता जेथे भलेपणा, चांगुलपणा व प्रेम यांचेच जणू शासन असते अशा एक मंगलमय जगात त्याला नेऊन सोडतो.
आध्यात्मिक शक्तींना व मूल्यांना मानवी जीवनात इस्लामच्या दृष्टीने आणखी एक बहुमोल महत्त्व असते. ह्या आध्यात्मिकतेचा मानवी जीवनांवर खोलवर प्रभाव पडतो. त्यांचेकडे नीट लक्ष देऊन त्यांची योग्य बांधणी केली तर ती मानवसमाजाला तितकीच उपकारक व परिणामकारक ठरू शकेल जितके एखादे आर्थिक तत्त्व. उलट सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने त्यांचे क्षेत्र, इतर तत्त्वांच्या क्षेत्रापेक्षा अधिक विस्तृत आहे.
इतिहासाच्या झरोक्यातून
मुस्लिमांचा इतिहास या सत्याचे एक बोलके प्रमाण आहे. म्हणूनच इस्लामचे पहिले खलीफा माननीय अबू बक्र (र) यांना धर्मविन्मुख बंडखोरांच्या विरोधात एकटेच ठामपणें उभे ठाकलेले, आम्ही पाहतो. खरे तर माननीय उमर बिन खत्ताब (र) यांच्या सारखी श्रेष्ठ व्यक्तीसुद्धा, या धर्मांविरुद्ध असलेल्या लोकांशी युद्ध आरंभ करण्याविरुद्ध होती, तरीसुद्धा माननीय अबू बक्र (र) यांचे पाय डळमळले नाहीत व ते दृढनिश्चयाने आपल्या मतावर राहिले. त्यांच्या अशा अतुलनीय धैर्याच्या व ठामपणाच्या पाठीमागे कसला गुण कार्यान्वित होता? तो एखाद्या भौतिक लाभाचा विचार होता काय? की केवळ इहलोकाच्या लाभाची लालसा होती? की कोणत्यातरी सुखाची कल्पना होती ज्यामुळे अशा कठीण समयी त्यांच्यात असे धैर्य व असे मनोबल निर्माण केले व त्यामुळे सरतेशेवटी यश त्यांच्या पदकमलावर येऊन पडले. अशा कठीण प्रसंगी त्यांना कोणत्याही भौतिक लाभाची व सुखाच्या भावनेचे सहाय्य यशप्राप्तीसाठी झाले नाही हे निश्चित. तसे असते तर इतके मोठे कर्तव्य ते यशस्वीरित्या पार पाडू शकले नसते व इस्लामी इतिहासाच्या त्या कठीण काळात आपले कर्तव्य इतक्या उत्कृष्ट रीतीने पार पाडू शकले नसते. त्यांचे ते अतुलनीय धैर्य व संकटाच्या वादळात स्वतःवर इतका ताबा ठेवणे, या गोष्टी त्यांच्या आध्यात्मिक बलाचाच चमत्कार होता. मानव इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. आध्यात्मिक बलामध्ये इतकी प्रबळ भौतिक शक्ती व आर्थिक शक्तीचा समावेश असतो की त्यासारखे दुसरे उदाहरण आढळत नाही, हे यावरुन कळून चुकते. असेच उदाहरण माननीय उमर बिन अब्दुल अजीज (र) यांचे आहे. त्यांनी आपल्या प्रबळ आध्यात्मिक शक्तीच्या सहाय्याने पूर्वीच्या खलीफांच्या सामाजिक नियमांना लागू केले आणि त्यानंतर असे ऐतिहासिक व आर्थिक चमत्कार पाहावयास मिळाले की इस्लामी समाजामध्ये दान घेणारा माणूस पाहावयास मिळत नसे.
म्हणूनच इस्लाम या आध्यात्मिक अंगाला बहुमूल्य महत्त्व देतो, कारण तो मानवाला त्याच्या आश्चर्यकारक विकासाच्या नावाखाली भौतिक साधनांचा वापर करण्यापासूनही रोखत नाही. इस्लाम चमत्काराचाही इन्कार करीत नाही, पण त्याची अपेक्षा करीत, हातपाय नसल्यासारखे स्वस्थ बसून राहणेही त्याला मान्य नाही उलट या संदर्भात त्याचा नियम असा आहे,
‘ज्या गोष्टीना कुरआनद्वारा प्रतिबंध होऊ शकत नाही, त्या सर्व गोष्टींना निस्संशय, अल्लाह आपल्या शक्तीने पायबंद घालीत असतो.’ (तिसरे खलीफा माननीय उस्मान (र) यांचे कथन)
कम्युनिस्टांनी दाखविलेल्या पद्धतीनुसार जो कोणी आपल्या भौतिक व आर्थिक गरजा पुऱ्या करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्या नैतिक व आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष पुरविणे शक्यच होत नाही. याचे कारण असे, कम्युनिझममध्ये सगळे महत्त्व केवळ एकाच अंगाला म्हणजेच आर्थिक बाजूला असते. हे जर मान्य केले गेले तर मानव जीवनाचा सर्वांगीण विकास चालू राहूच शकत नाही. शरीरातील एकाच अवयवाची हृदय किवा यकृत वाजवीपेक्षा अवास्तव वाढ होण्याचे उदाहरण घ्या. अशी एकाच अवयवाची वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात झालेली वाढ, शरीराच्या इतर भागाच्या वाढीस हानिकारक सिद्ध होते व इतर अवयव आपले कार्य सुरळीत करु शकत नाहीत. तशीच अवस्था कम्युनिझममध्ये जीवनाच्या आर्थिक पैलूसंबंधी आहे त्याला असाधारण महत्त्व असल्याने जीवनातील इतर पैलूची वाढ खुंटते.
काही लोक इस्लाम व कम्युनिझमची अशी तात्त्विक तुलना केलेली पसंत करीत नाहीत, हे आम्ही जाणतो. कारण त्यांच्या मते अशा प्रकारची तात्त्विक चर्चा खालच्या दर्जाची असते व त्यापासून काही फायदा होत नसतो. जीवनातील व्यावहारिक समस्यांना मूळ महत्त्व आहे. म्हणून त्यांना तात्त्विक समस्यापेक्षा व चर्चेपेक्षा अधिक प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांना वाटते. म्हणून एखाद्या पद्धतीचा अंगिकार करताना अनावश्यक वादविवाद करून गुंतागुंत निर्मांण करावयास नको. त्यामध्ये आपला दृष्टिकोन असा असावयास हवा, की विचाराधीन पद्धत व्यवहारी व प्रत्यक्ष जीवनात कितपत लाभकारक व व्यवहारी सिद्ध होऊ शकते हे पाहिले जावे. म्हणूनच या महानुभावांचा जेव्हा तात्त्विक चर्चेशी सबंध येतो तव्हा ते त्रासिक बनतात व वैतागतात. व्यवहारी जीवनात शेवटी इस्लाम व कम्युनिझमच्या दरम्यान संघर्ष कसा आढळून येऊ शकतो, ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही. म्हणून या दोहोतील संघर्षाचा ते मुळातच इन्कार करतात.
आमची विचारप्रणाली अशी नाही, कारण कोणत्याही समस्येच्या व्यवहारी व तात्त्विक बाजू वेगळ्या व विभक्त केल्या जाऊ शकत नाही. पण कम्युनिजम व इस्लाममध्ये केवळ तात्त्विक मतभेदच नसून त्यामध्ये खोलवर व्यावहारिक फरकही आहे. या फरकातील काही अंगे आम्ही खालील ओळीत देत आहोत.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget