Latest Post

जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)
आज मुस्लिम महिला आपल्या परंपरांना तोडून ज्या शक्तीने एकत्र होऊन क्रांती घडविण्यासाठी आपल्या घरातून बाहेर येत आहेत हे पाहता असे लक्षात येते की याद्वारे मुस्लिम स्त्रिया  खूप मोठा बदल घडवून आणित आहेत. परंतु मुस्लिम स्त्रियांनी अशा प्रकारे क्रांती आताच घडविली नाही तर आजपासून १४५० वर्षापूर्वीच त्यांनी या क्रांतीची सुरूवात केली आहे, ८ मार्च  रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. साहिबा खान यांनी आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम अंजुमन पॉलिटेक्निक  सभागृहामध्ये पार पडला. सदर कार्यक्रमाचा विषय होता ‘क्रांतीची मूर्ती आहे स्त्री’. डॉ. साहिबा खान पुढे म्हणाल्या की पैगंबर मोहम्मद (स.) यांच्या काळात महिला सफल उद्योजक,  प्रख्यात पंडित, विचारवंत होत्या. आज आम्ही बाहेर आलो आहोत तर स्वत:साठी नाही, तर आपल्या देशाला आणि संविधानाला वाचविण्यासाठी. लोकांच्या घृणेचा सामना आम्ही  आमच्या देशात करीत आहोत, हे आमच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे. आम्हाला बुरख्यामध्ये पाहून लोकांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलून जातात. अशा वेळी आमच्या मुलींना परीक्षा केंद्रावर संशयाच्या दृष्टीने पहिला जाते. आमच्या तरुण पिढीला लोकांनसमोर मारले जाते. आमची संपत्ती, आमची घरे हे सर्व आगीत भस्म करून टाकल्या जाते. ते म्हणतात की  आम्हाला आर्थिक व शारीरिकरित्या सक्षम केल्या जात आहे, पण आज आम्ही जागृत होऊन घराबाहेर आलो आहोत. आता आम्ही मागे वळून पाहणार नाही. आम्ही मरण पत्करू, नष्ट  होऊ मात्र आम्ही आपल्या मातृभूमीला सोडून कुठेही जाणार नाही.
अरूणा सबाने यांनी सांगितले की जसे स्वातंत्र्य पुरुष मंडळी व मुलांना आहे तसे स्त्रियांना आणि मुलींना नाही. घरी आणि बाहेर सर्वत्र मुली व स्त्रिया अत्याचार सहन करीत आहेत.  स्त्रियांनी शक्तिशाली बनणे गरजेचे आहे. आम्ही मुलांना अशी शिकवण दिली पाहिजे की ज्यामुळे त्यांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे. पत्नीवर पतीच्या अत्याचारात वाढ होत आहे.  स्त्रियांना माहीत आहे की त्यांनी आपला भाऊ, वडील आणि पतीचा किती सन्मान केला पाहिजे, ती सर्वांचा सन्मान करते, तरीसुद्धा त्यांच्यावर होणारा अत्याचार थांबत नाही.
छाया खोबरागडे यांनी ‘नारी शक्ती विकसित समाज’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, आजपर्यंत आम्ही असे समजत होतो की मुस्लिम महिला खूप भित्र्या आहे.  फक्त आपल्या घरातच त्या राहतात. त्यांना डांबून ठेवण्यात येते. परंतु आज मुस्लिम स्त्रियांनी हे सिद्ध केले आहे की असे अजिबात नाही. आज शाहीन बागच नव्हे तर संपूर्ण भारत  देशात त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आज गरज आहे की आम्ही सर्वांनी मिळून समोर आले पाहिजे. आम्हाला संविधानाच्या आधारावर भारताला विकसित करायचे आहे. आम्ही काळ्या  कायद्याचा जोरदार विरोध करीत आहोत.
जेबा खान यांनी ‘नारी शक्ती की उड़ान कितना पैâला आसमान’ या विषयावर मत व्यक्त करताना म्हटले की हजरत मरियम अलैहिस्सलाम या अत्यंत निसर्गसेविका होत्या. बीबी  हाजरा यांनी खाना ए काबाच्या निर्मितीत आपले अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. सहाबियात रजि. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या संरक्षणार्थ आपल्या जीवांची पर्वा करीत नव्हत्या.  राहिला कौसर यांनी म्हटले की स्त्री ही कुटुंबांची मुख्य सदस्य असते. ती महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था सांभाळणारी अर्थतज्ज्ञ असते. बजेट लक्षात घेत आपले घर व्यवस्थितरित्या चालवीत  असते. देशात मुस्लिम महिलांनी संविधान वाचविण्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितत काळ्या कायद्याच्या विरोधात लक्षावधी शाहीनबाग बनवून आपल्या पराक्रमाची छाप सोडली  आहे. आपली छबी समाजासमोर प्रकट केली आहे.
सना यास्मीन यांनी ‘वर्तमान परिस्थितीत मुस्लिम मुलींची भूमिका’ या विषयावरील आपल्या भाषणात मुलींचे शिक्षण किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. जी आई ओ द्वारे  मुलींचे चारित्र्य निर्माण, त्यांचे व्यक्तित्व साकारणे, त्यांना स्वत्वाची जाणीव करून देणे, त्यांना उच्च शिक्षणातसुद्धा बुरखा परिधान करण्याचे प्रोत्साहन मिळते. प्रज्वला तत्ते आणि  जुल्फी शेख यांना ‘शाहीनबाग पारितोषिक’ देण्यात आले. शाहीन नावाचा एक पक्षी आहे जो शायर अल्लामा इकबाल यांच्या साहित्यातील नायक आहे. हा पक्षी खूप उंच भरारी घेतो.  तो  कुणी मारलेली शिकार खात नाही. तो स्वत: आपली शिकार करतो. जीवनाच्या शेवटच्या वेळी तो बसून खातो. तिथे त्याची नखे आणि त्याची त्वचा निघून पडते, तत्पश्चात त्याचे  विचार व नखे त्याला पूणर्जाrवित करतात आणि तो पुन्हा उंच भरारी घेतो.
तत्पश्चात स्त्रीत्व आणि मानवतावाद या विषयावर वाद-विवाद ठेवण्यात आला. प्रज्वला तत्ते, सुनिता जिचकार, सरोज आगलवे, रुमाना कौसर, डॉ साहिबा खान यांनी या वाद-विवादात  भाग घेतला. संपूर्ण शहरात तीन दिवसीय महिला दिनावर कार्यक्रम घेण्यात आले. या वादविवादाचे सूत्र संचालन बेनजीर खान यांनी केले. इरफाना कुलसुम यांनी जमाअत ए इस्लामी  हिंद नागपूरच्या कार्याचा आढावा घातला तर राहिला कौसर यांनी मुस्लिम मुलींच्या संघटनेचा परिचय करून दिला. पवित्र कुरआनमधील सूरह अहजाबच्या ३५व्या ओळीच्या पठणाने  मध्यवर्ती स्थानिक अध्यक्षा जाहिदा अंसारी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. आभार प्रदर्शन संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा शबनम परवीन यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा  सहभाग होता. मंच संचालन सुमय्या खान यांनी केले.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा त्याचे कर्म समाप्त होतात, परंतु तीन प्रकारचे कर्म असे आहेत   ज्यांचे पुण्य मृत्यूनंतरही मिळत राहते. एक त्याने ‘सदक-ए-जारिया’ केला असेल अथवा असे ज्ञान मागे सोडले असावे ज्यामुळे लोकांना लाभ व्हावा तिसरे कर्म म्हणजे त्याच्याकरिता  ‘दुआ’ (प्रार्थना) करीत राहणारा सदाचारी पुत्र.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
‘सदक-ए-जारिया’ म्हणजे असे दान ज्याद्वारे अधिक काळपर्यंत लाभ घेतला जावा. जसे- कालवा खोदण्यात यावा अथवा विहीर खोदली जावी अथवा प्रवाशांकरिता पथिकाश्रम बनविले  जावे अथवा रस्त्याच्या कडेला झाडे लावली जावीत अथवा काही धार्मिक मदरसांमध्ये पुस्तके दान दिली जावीत वगैरे. म्हणजे जोपर्यंत त्या कर्मापासून लोक लाभ घेत राहतील पुण्य  मिळत राहील. अशाप्रकारे त्याने एखाद्याचे अध्यापन केले असेल अथवा धार्मिक पुस्तके लिहिली असतील तर त्याचे पुण्यदेखील त्याला मिळत राहील. निरंतर पुण्य मिळत राहील असे  तिसरे कर्म म्हणजे त्याचा पुत्र, ज्याला त्याने सुरूवातीपासूनच उत्तम शिक्षण-प्रशिक्षण दिले असेल आणि या प्रयत्नांच्या परिणामस्वरूप तो पुत्र सदाचारी आणि संयमी बनला आहे.  जोपर्यंत हा मुलगा जगात जिवंत राहील त्याच्या पुण्यकर्मांचे फळ त्याच्या पित्याला मिळत राहील आणि तो सदाचारी आहे म्हणून तो आपल्या आईवडिलांकरिता दुआ करील.

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने एखाद्या अनाथाला आपल्याबरोबर घेतले आणि त्याला जेवू घातले  तर निश्चितच अल्लाहने त्याच्याकरिता ‘जन्नत’ (नंदनवन) निश्चित केली. मात्र त्याने एखादा अक्षम्य गुन्हा केलेला नसावा. ज्या मनुष्याने तीन मुलींचे अथवा तीन बहिणींचे  पालनपोषण केले आणि त्यांना शिक्षणप्रशिक्षण दिले आणि त्यांच्याशी दयेने वागला, इतकेच काय अल्लाहने त्यांना बेपर्वा केले, तर अशा मनुष्यासाठी अल्लाहने ‘जन्नत’ निश्चित  केली.’’ यावर एका व्यक्तीने विचारले, ‘‘जर दोनच असतील तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘दोन मुलींच्या पालनपोषणासाठीदेखील हाच पुण्यफळ मिळेल.’’ इब्ने अब्बास म्हणतात, जर लोकांनी   एका मुलीच्या बाबतीत विचारले असते तरी पैगंबरांनी एकाच्या बाबतीतदेखील हीच शुभवार्ता दिली असती. पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘आणि ज्या मनुष्याला अल्लाहने त्याच्या दोन उत्तम  वस्तू घेतल्या तर त्याच्यासाठी ‘जन्नत’ निश्चित झाली.’’ विचारले गेले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दोन उत्तम वस्तू कोणत्या आहेत?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे दोन्ही डोळे.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये सांगण्यात आलेली एक गोष्ट अशी की जर एखाद्याला मुलीच मुली असतील तर त्यांच्याशी वाईट वर्तन न करता त्यांचे पूर्णत: संगोपन केले पाहिजे. त्यांना धार्मिक व  नैतिक शिक्षण-प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यांचे लग्न होईपर्यंत त्यांच्याशी करुणेने व प्रेमाने वागावे. जी व्यक्ती असे करेल त्याला पैगंबर मुहम्मद (स.) स्वर्गाची शुभवार्ता देतात.  अशाचप्रकारे एक भाऊ आहे. त्याला लहान-लहान बहिणी आहेत. त्यानेदेखील या बहिणींना आपल्यावर भार न समजता त्यांचा पूर्ण खर्च सहन केला पाहिजे आणि त्यांना शिक्षण- प्रशिक्षण व धार्मिक नीतीमत्तेच्या अलंकाराने सजविले पाहिजे आणि लग्न होईपर्यंत दया केली पाहिजे. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले, ‘‘ज्या मनुष्याच्या घरात एक मुलगी जन्माला आली आणि त्याने अज्ञानकाळातील पद्धतीने जिवंत दफन केले नाही आणि तिला तुच्छ लेखले नाही आणि मुलांना तिच्या  तुलनेत श्रेष्ठत्व दिले नाही, तेव्हा अल्लाह अशा लोकांना स्वर्गात दाखल करील.’’ (हदीस : अबू दाऊद)

Quran
कुरआन कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? कुरआनची अवतरणस्थिती आणि त्याची रचना कशा प्रकारची आहे? कुरआनात चर्चेचा विषय कोणता आहे? त्यातील एकूण संवाद कोणत्या उद्देशांसाठी आहेत? कुरआनातील असंख्य व विभिन्न प्रकारचे विषय कोणत्या मध्यवर्ती कल्पनेशी संलग्न आहेत? उद्दिष्टपूर्तीसाठी कुरआनात कोणती युक्तिवादशैली व वर्णनशैली अवलंबिलेली आहे? हे सर्व आणि अशाच प्रकारच्या इतरही काही आवश्यक प्रश्नांची उत्तरे प्रारंभीच सुस्पष्ट आणि सरळपद्धतीने मिळाली तर वाचक बराचसा धोक्यापासून वाचू शकतो. त्याच्यासाठी कुरआनच्या आकलनाचे व अध्ययनाचे मार्ग मोकळे होऊ शकतात. मनुष्य जेव्हा कुरआनात लेखनात्मक रचना शोधू लागतो व तेथे ती न आढळल्यास तो ग्रंथाच्या पृष्ठांवर भरकटू लागतो. त्याचे गोंधळात येण्याचे खरे कारण हेच आहे की कुरआन वाचनासंबंधीची मौलिकता त्याला माहीत नसते. तो प्रारंभी कल्पना करून असतो की ‘धार्मिक विषयावरील एक ग्रंथ’ वाचण्यासाठी तो निघालेला आहे. ‘धार्मिक विषय’ आणि ‘ग्रंथ’ या दोन्ही गोष्टींसंबंधी त्याची कल्पनाही तीच असते जी सामान्यत: ‘धर्म’ आणि ‘ग्रंथा’संबंधी जनमनात आढळते. परंतु वाचकाला जेव्हा त्याच्या कल्पनेपेक्षा अगदी वेगळ्या स्वरूपाची अनुभूती येते तेव्हा तो स्वत:ला समरस करून घेऊ शकत नाही. लेखनाचा हेतू त्याला न गवसल्यामुळे कुरआनच्या पृष्ठावरील ओळींमध्येच तो भरकटू लागतो जसा एखादा नवखा प्रवासी एखाद्या अपरिचित शहराच्या गल्लीबोळात हरवला जातो. अशा प्रकारच्या हरवण्यापासून तो वाचू शकतो जर त्याला अगोदरच कल्पना दिली गेली की जो ग्रंथ वाचण्यास तुम्ही निघाला आहात तो ग्रंथ सर्व जगाच्या साहित्यातील आपल्या शैलीचा एकमेव ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे संपादन व लेखन जगातील इतर सर्व ग्रंथांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारे झालेले आहे. आपला विषय व उद्देश, आपला संवाद व आपली रचना या दृष्टीनेदेखील तो ग्रंथ एक आगळीच वस्तू आहे. म्हणून आतापर्यंतच्या पुस्तकांच्या वाचनामुळे तुमच्या मनात जो पुस्तकी साचा तयार झालेला आहे तो साचा ‘कुरआन’ला समजण्यासाठी तुमच्या उपयोगी पडणार नाही. विंâबहुना तो साचा तर मार्गातील अडथळाच ठरेल. कुरआनाला समजण्याची इच्छा असेल तर वाचनसंबंधीच्या आपल्या पूर्वकल्पना प्रथम मनातून काढून टाकल्या पाहिजेत व मग कुरआनच्या आश्चर्यकारक वैशिष्ट्यांशी परिचित झाले पाहिजे.

इस्लामच्या सामाजिक व्यवस्थेची आधारशीला "जगाचे सर्व लोक हे एका मातापित्याची संतान आहेत' हे तत्व आहे. अल्लाहने सर्वप्रथम एक मानवी जोडपे जन्मास घातले, या जोडप्यापासून ते सर्व लोक जन्मास आले जे जगामध्ये वसलेले आहेत. सुरवातीस काही काळापर्यंत या जोडप्याच्या संततीचा एकच समाज होता, त्यांचा धर्म एक होता, त्यांची भाषा एक होती, त्यांच्यामध्ये कसलाही मतभेद नव्‌हता, परंतु जसजशी त्यांची संख्या वाढत गेली, ते जमिनीवर पसरत गेले आणि या फैलावामुळे स्वाभाविकरीत्या निरनिराळे वंश, राष्ट्रे व जातीजमातीमध्ये त्यांची विभागणी झाली. त्यांच्या भाषा वेगळ्या झाल्या, त्यांचे पोशाख वेगळे झाले, त्यांची राहणी - सरणी वेगळी झाली आणि ठिकठिकाणच्या हवामानामुळे त्यांचे रंगरूप व आकार बदलले गेले. ही सर्व विविधता स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आणि म्हणून इस्लाम तिचा एक सत्य म्हणून स्वीकार करतो. तो तिला मिटवू इच्छित नाही याउलट तो तिची उपयुक्तता मान्य करतो. एक दुसऱ्याशी परिचय व सहकार्य यामुळेच शक्य आहे. परंतु या विविधतेच्या आधारावर रंग, भाषा, राष्ट्रीयत्व व नागरिकत्व वगैरे जे पूर्वग्रह निर्माण झाले आहेत त्या सर्वांना इस्लाम चुकीचे ठरवितो. माणसामाणसामध्ये उच्चनीचता, पुनीत व पतीत, स्वकीय व परकीय वगैरे जे भेदभाव जन्माच्या आधारावर केले गेले आहेत ते सर्व इस्लामच्या दृष्टीने अज्ञानमूलक आहेत. इस्लाम जगातील साऱ्या लोकांना सांगतो की तुम्ही सर्व एका आई-बापाची संतती आहात, एक दुसऱ्याचे भाऊभाऊ आहात आणि माणसाच्या नात्याने समान आहात.
मानवतेबद्दलच्या या एकत्व विचाराचा स्वीकार केल्यानंतर इस्लाम सांगतो की माणसामाणसामध्ये खरा फरक जर कोणता होऊ शकतो तर तो वर्ण, वंश, राष्ट­, भाषेचा नव्हे तर विचार, आचार व तत्वांचा होऊ शकतो. एका आईची दोन मुले घराण्याच्या दृष्टीने एकच असली तरी त्यांचे आचार व विचार एकदुसऱ्याहून भिन्न असतील तर त्यांचे जीवनाचे मार्गही वेगवेगळे होतील. याउलट एक पूर्वेला व एक पश्चिमेला अशा दूरच्या अंतरावर राहणारी दोन माणसे जाहिरपणे एक दुसऱ्यापासून कितीही दूर असली तरी त्यांचे विचार एक व आचार मिळतेजुळते असतील तर त्यांच्या जीवनाचा मार्ग एक असेल. या दृष्टिकोनाच्या आधारावर इस्लाम जगातील सर्व वंश, जन्मभूमी आणि राष्ट्राच्या आधारावरील समाजाच्या ऐवजी एक वैचारिक, कृतीशील, तात्विक समाजाची उभारणी करतो, ज्यामध्ये माणूस माणसाला आपल्या जन्माच्या आधारावर भेटत नाही तर तो एक लक्ष्य व एक वैचारिक पद्धतीमुळे एक दुसऱ्यात मिसळतो. ती प्रत्येक व्यक्ती जी अल्लाहला आपला स्वामी व उपास्य मानते आणि पैगंबरांनी आणलेल्या शिकवणीला आपल्या जीवनाची नियमावली म्हणून मान्य करते ती या समाजामध्ये सामील होऊ शकते मग ती आफ्रिकेची राहणारी असो वा अमेरिकेची, सामी वंशाची असो वा आर्य वंशाची, मग ती काळी असो वा गोरी, मग ती हिंदी बोलणारी असो वा अरबी. जे लोक या समाजामध्ये सामील होतील त्या सर्वांचे हक्क व सामाजिक दर्जा समान असेल त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वांशिक, राष्ट्रीय वा वर्गय भेदभाव असणार नाहीत, कोणी उच्च-नीच असणार नाही, कसलीही अस्पृश्यता त्यांच्यामध्ये नसेल, एखाद्याचा हात लागला की कोणी अशुद्ध होणार नाही.
रोटीबेटी व्यवहार व परस्पर भेटीगाठीमध्ये त्यांच्या दरम्यान कसलीही अडचण राहणार नाही. व्यवसाय व जन्माच्या आधारावर कोणाला शूद्र व नीच समजले जाणार नाही. जातपात, कुलीनता व घराण्याच्या आधारावर कोणास खास हक्क प्राप्त होणार नाहीत. माणसाची श्रेष्ठता ही त्याच्या घराण्यावर वा त्याच्या संपत्तीवर अवलंबून असणार नाही तर ती फक्त त्याचे आचरण किती चांगले आहे व तो ईशभीरूतेत इतराहून किती पुढे आहे यावर अवलंबून राहील.
हा असा समाज आहे जो वंश, वर्ण आणि भाषा यांच्या तटबंदीला व भौगोलिक मर्यादांना तोडून पृथ्वीच्या पाठीवरील सर्व विभागांमध्ये अस्तित्वात येऊ शकतो आणि याच्या आधारावर लोकांमध्ये विश्वबंधुत्व प्रस्थापित होऊ शकते. वांशिक आणि राष्ट्रीय समाजामध्ये तर निव्वळ ते लोक सामील होऊ शकतात जे त्या वंशात अगर राष्ट्रात जन्मलेले आहेत. त्या बाहेरील लोकांना या समाजाची दारे बंद असतात. परंतु इस्लामच्या या वैचारिक व सैद्धान्तिक समाजामध्ये ती प्रत्येक व्यक्ती समान हक्कासह सामील होऊ शकते, जी एका निष्ठेचा व नैतिक व्यवस्थेचा स्वीकार करते. राहिले ते लोक जे या निष्ठेला आणि व्यवस्थेला मानत नाहीत, अशा लोकांना हा समाज आपल्यामध्ये सामील करून घेत नाही. परंतु मानवी बंधुभावाचा संबंध त्यांच्याबरोबर प्रस्थापित करण्यास आणि त्यांना मानवतेचे हक्क देण्यास तयार असतो. स्पष्ट आहे की, एका मातेच्या दोन मुलांचे विचार जर वेगवेगळे असतील तर साहजिकच त्यांचे जीवनमार्ग वेगवेगळे होतील. परंतु याचा हा अर्थ नव्हे की ते एक दुसऱ्याचे भाऊ राहिले नाहीत. अगदी याचप्रमाणे मानवी वंशाचे दोन गट निष्ठा व विचारामध्ये विरोध बाळगत असतील तर त्यांचे समाज खात्रीने वेगवेगळे असतील. परंतु मानवतेच्या नात्याने ते समानच असतील. या समान मानवतेच्या आधारावर अधिकाधिक हक्काची जी कल्पना केली जाऊ शकते ते सर्व हक्क इस्लामी समाजाने गैर इस्लामी समाजासाठी मान्य केलेले आहेत.
इस्लामी सामाजिक व्यवस्थेच्या आधारमूल्यांना समजावून घेतल्यानंतर आता आपण हे पाहू की ती कोणती तत्वे व त्या कोणत्या पद्धती आहेत ज्या इस्लामने माणसाच्या परस्पर संबंधाच्या निरनिराळ्या पद्धतीसाठी निश्चित केल्या आहेत.
कुटुंब ही मानवी समाजाची सर्वप्रथम पायाभूत संस्था आहे. एक पुरुष व एक स्त्री यांच्या संयोगाने कुटुंब अस्तित्वात येते या संयोगामुळे एक नवा वंश अस्तित्वात येतो. त्याच्यापासून आप्त संबंध, घराणी, बंधुभाव वगैरे दुसरे संबंध प्रस्थापित होतात आणि सरतेशेवटी ही गोष्ट पसरत पसरत एका समाजापर्यंत पोहोचते. कुटुंब हीच ती संस्था आहे ज्यामध्ये एक पिढी आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला मानवी संस्कृतीची व्यापक जबाबदारी सांभाळण्यासाठी अत्यंत प्रेमाने, त्यागाने, कळकळीने व सद्‌भावनेने तयार करीत असते. ही संस्था मानवी संस्कृतीच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी निव्वळ बाजारबुणग्यांचीच भरती करत नाही तर तिचे कार्यकर्ते मनापासून या गोष्टीची इच्छा बाळगून असतात की त्यांची जागा घेणारे लोक त्यांच्यापेक्षा अधिक चांगले असावेत. या आधारावर ही एक वस्तुस्थिती आहे की कुटुंबच मानवी संस्कृतीचे मूळ आहे. या मूळाच्या स्वास्थ्य व शक्तीवरच संस्कृतीचे स्वास्थ्य व शक्ती अवलंबून आहे. इस्लाम सामाजिक प्रश्नात सर्वप्रथम  या प्रश्नाकडे लक्ष देतो की कुटुंबसंस्थेला अत्यंत योग्य व अत्यंत दृढ अशा पायावर प्रस्थापित केले जावे.
इस्लामजवळ स्त्री-पुरुषांच्या संबंधाचे स्वरूप फक्त हे आहे की या संबंधाबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्यांचासुद्धा स्वीकार केला जावा आणि ज्याच्या परिणामस्वरूप एका कुटुंबाची स्थापना व्हावी. स्वैर आणि बेजबाबदारीच्या संबंधांना तो निव्वळ एक निरागस मौज किंवा एक साधारणशी गैतवर्तणुक समजून त्याची उपेक्षा करीत नाही तर त्याच्या दृष्टीने ही गोष्ट मानवी संस्कृतीचे मूळ कापणारी आहे आणि म्हणून अशा संबंधाला तो हराम व कायदेशीर गुन्हा ठरवितो, त्याला कठोर शिक्षेची तरतूद करतो. हेतू हा की समाजामध्ये असे बेजबाबदारीच्या संबंधाना प्रवृत्त करणाऱ्या अथवा त्यासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या कारणांचे उच्चाटन करून समाजजीवन शुद्ध करावे. पडद्याचे आदेश, स्त्री-पुरुषांच्या मुक्त संबंधांना मनाई आणि संगीत व बीभस्त चित्रावर प्रतिबंध, अश्लीलतेच्या प्रसाराला बंदी हे सर्व उपाय ती गोष्ट थांबविण्यासाठीच आहे आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट कुटुंब संस्थेला सुरक्षित व मजबूत करणे हे आहे. दुसरीकडे जबाबदारीचा संबंध म्हणजे विवाहाला इस्लाम केवळ एक उचितच नव्हे तर त्याला एक सदाचार, एक सत्कृत्य व एक इबादत (उपासना) ठरवितो. वयात आल्यानंतर स्त्री-पुरुषांनी अविवाहित राहणे ही गोष्ट त्याला अप्रिय आहे. तो प्रत्येक तरुणाला प्रोत्साहन देतो की संस्कृतीच्या ज्या जबाबदारीचा भाग त्याच्या मातापित्यांनी वाहिला होता तो भाग त्यानेही आपला क्रम येताच वाहावा. इस्लाम वैराग्याला सदाचार समजत नाही. याउलट तो त्याला ईशप्रवृत्तीविरुद्ध एक अनिष्ट रूढी ठरवितो. तो त्या सर्व रीतीरिवाजांनासुद्धा नापसंत करतो ज्यामुळे विवाह ही एक मोठी व कठीण समस्या बनते. समाजामध्ये विवाह ही एक अत्यंत सोपी गोष्ट व्हावी हा त्याचा हेतू आहे. विवाह करणे अवघड व्हावे व व्यभिचार सोपा असावा हा त्याचा हेतू नाही आणि यासाठी त्याने काही आप्तसंबंधांना हराम ठरविल्यानंतर सर्व दूरच्या व जवळच्या नातलगांमध्ये विवाह संबंधांना उचित ठरविले आहे. जातपाताच्या भेदभावांना मिटवून सर्व मुस्लिमांमध्ये आपसात विवाहाला मुक्त परवानगी दिली आहे. "मेहर' व "जहेज' इतका थोडा असण्याबद्दल आदेश आहेत की संबंधित व्यक्तीना ते देणे सोपे जावे आणि विवाहसंपन्न करण्यासाठी एखाद्या काजी, पंडित व पुरोहित किंवा नोंदवहीची काही आवश्यकता नाही. पण प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने विवाहसंबंधांची नोंद ठेवणे उचित आहे. इस्लामी समाजातील विवाह ही एक अशी साधी प्रथा आहे जी दोन साक्षीदारांसमोर वयात आलेल्या वधुवरांच्या "संमती व स्वीकृती' ने अंमलात येते पण हे मात्र आवश्यक आहे की ही "संमती स्वीकृती' गुप्त नसावी तर मोहल्ल्यामध्ये, वस्तीमध्ये व समाजामध्ये त्या बद्दल घोषणा व्हावी.
कुटुंबामध्ये इस्लामने पुरुषाला त्याने आपल्या घरात शिस्त राखावी म्हणून व्यवस्थापकाचे स्थान दिले आहे. पत्नीला पतीचे आणि मुलांना आईवडिलांचे आज्ञापालन व सेवेचा हुकूम देण्यात आलेला आहे. इस्लाम अशा ढिल्या कुटुंबव्यवस्थेस मान्य करत नाही, ज्यामध्ये शिस्त नसते आणि घरातील लोकांचे आचार व व्यवहाराचे योग्य नियंत्रणाला कोणी जबाबदार नसतो. शिस्त ही तर एका जबाबदार व्यवस्थापकामुळेच प्रस्थापित होऊ शकते आणि इस्लामच्या दृष्टीने या जबाबदारीसाठी कुटुंबाचा प्रमुख स्वाभाविकत: पुरुषच होऊ शकतो. परंतु याचा अर्थ हा नव्हे की पुरुषाला घराचा एक जुलमी व रागीट शासक बनविला गेला आहे. आणि स्त्रीला एक असाहाय्य दासी बनवून त्याच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. इस्लामजवळ वैवाहिक जीवनाचा खरा अर्थ दया व माया हा आहे. पतीचे आज्ञापालन हे पत्नीचे कर्तव्य आहे आणि पतीचेही हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर कुटुंबावर अत्याचार करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या सुधारणेसाठी करावा. इस्लाम वैवाहिक संबंधाना तोपर्यंत चालू ठेवू इच्छितो जोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रेमाचा ओलावा किंवा कमीतकमी स्नेहाची भावना शक्य असते. ही शक्यता नाहीशी झाल्यास इस्लाम पुरूषाला "तलाक' व स्त्रीला "खुलाअ' ची परवानगी देतो आणि काही बाबतीत इस्लामी न्याय संस्थेला हे अधिकार देतो की त्याने अशा विवाहांना रद्द करावे जे सुखाऐवजी दु:खास कारणीभूत होतात.
कुटुंबाच्या मर्यादित क्षेत्राच्या बाहेर-जवळची सरहद्द नातलगांची आहे. याचे क्षेत्र फार व्यापक असते. जे लोक आई-बाप अगर भाऊ-बहीण यांच्या संबंधामुळे वा सासरकडील संबंधामुळे एक दुसऱ्याचे नातलग असतात, त्या सर्वांना इस्लाम एक दुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व एक दुसऱ्याबद्दल सहानुभूती व प्रेम बाळगणारे पाहू इच्छितो. पवित्र कुरआनमध्ये जागोजागी ""जिल्‌कुर्बा'' म्हणजे नातलगांच्या बरोबर चांगली वागणूनक ठेवा अशी आज्ञा दिली गेली आहे. हदीसमध्ये आप्तजनाबरोबर प्रेम व त्यांचे साहाय्य करण्याबद्दल वरचेवर ताकीद दिली गेली आहे आणि त्याला मोठे सत्कृत्य म्हणून संबोधिले गेले आहे. ती व्यक्ती इस्लामच्या दृष्टीने अत्यंत नावडती आहे जी नातेवाईकाकडे कानाडोळा व दुर्लक्ष करते. त्याचप्रमाणे नातेवाईकाबद्दल पक्षपाताला इस्लाममध्ये स्थान नाही. आपल्या कुटुंबाचे व घराण्याचे अन्यायी समर्थन इस्लामच्या दृष्टीने रानटीपणा आहे. त्याचप्रमाणे शासनाचा एखादा अधिकारी सरकारी खर्चाने नातलगांना पोसू लागला किंवा न्याय निर्णयामध्ये आपल्या जवळच्या लोकांबद्दल पक्षपात करू लागला तर ते काही इस्लामी कार्य नव्हे- ते सैतानी कार्य आहे. इस्लाम ज्या आप्तजनांबद्दल प्रेम व साहाय्याची आज्ञा करतो ते स्वहस्ते व स्वत:कडून झाले पाहिजे आणि ते सत्य व न्यायाच्या मर्यादेत झाले पाहिजे.
नातलगांबरोबरच्या संबंधानंतर दुसरा जवळचा संबंध शेजाऱ्याशी येतो. पवित्र कुरआनच्या दृष्टीने शेजाऱ्यांचे तीन प्रकार आहेत. एक नातलग शेजारी, दुसरा परका शेजारी, तिसरा तो तात्पुरता शेजारी ज्याच्याबरोबर बसण्याचा व जगण्याचा योग आला असेल. हे सर्व शेजारी इस्लामी आदेशानुसार स्नेह, सहानुभूती सद्‌वर्तनास पात्र आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे.
""मला शेजाऱ्यांच्या हक्काबद्दल इतकी ताकीद केली गेली की मला वाटू लागले की त्यांना कदाचित वारसा हक्कसुद्धा दिले जाईल.''
दुसऱ्या एका ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले,
""तो माणूस मोमिन नाही ज्याच्या कटकटीपासून त्याचा शेजारी सुरक्षित नाही.''
एका दुसऱ्या हदीसमध्ये आले आहे,
""तो माणूस ईमान बाळगत नाही जो स्वत: पोटभर जेवतो पण त्याचा निकटचा शेजारी उपाशी असतो.''
एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
""एक स्त्री पुष्कळ नमाज पढते, नेहमी रोजे करते आणि पुष्कळसा दानधर्मही करते परंतु तिच्या फटकळपणाने तिचे शेजारी त्रस्त झालेले आहेत.'' ""ती स्त्री दोजखी आहे, ती नरकात जाईल.''
लोकांनी सांगितले, ""दुसरी एक स्त्री आहे. तिच्यामध्ये पहिल्या स्त्रीचे हे सर्व गुण नाहीत (मात्र ती अनिवार्य उपासना करते) परंतु ती कधी शेजाऱ्यांना त्रास देत नाही.''
त्यावर पैगंबरांनी सांगितले,
""ही स्त्री जन्नती आहे, ती स्वर्गात जाईल.''
पैगंबरांनी लोकांना इथपावेतो ताकीद दिली होती की,""आपल्या मुलांच्यासाठी फळफळावळ आणाल तर शेजाऱ्यासाठीही आणा. नसता फळांच्या साली बाहेर फेकू नका. तुमचे गरीब शेजारी दु:खी होता कामा नये.''
एके प्रसंगी पैगंबरांनी सांगितले,
"तुझे शेजारी तुला चांगला म्हणत असतील तरच तू खरोखर चांगला आहेस आणि त्यांचे मत तुझ्या बाबतीत वाईट असेल तर तू वाईट आहेस.''
थोडक्यात हे की इस्लाम, त्या सर्व लोकांना जे एकदुसऱ्याचे शेजारी आहेत, आपसात एकदुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व सुख-दु:खाचे वाटेकरी बघू इच्छितो, त्या सर्वामध्ये अशाप्रकारचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो की विश्वास ठेवावा आणि एकदुसऱ्याजवळ आपले प्राण, आपली धनदौलत व आपले शील सुरक्षित समजावे आणि ते समाज जीवन ज्यामध्ये फक्त एका भिंतीच्या आड वर्षानुवर्ष राहणारी दोन माणसे एकमेकाशी अपरिचित असतात त्याचप्रमाणे एका मोहल्ल्यात व पेठेत राहणाऱ्या लोकांमध्ये स्नेह, जिव्हाळा, सहानुभूती व विश्वास नसतो, असे समाज जीवन कदापिही इस्लामी समाज जीवन होऊच शकत नाही.
या जवळच्या संबंधानंतर संबंधाचे ते व्यापक क्षेत्र आहे जे साऱ्या समाजापर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रामध्ये इस्लाम आमच्या सामूहिक जीवनाला ज्या मोठमोठ्या तत्वांवर प्रस्थापित करतो ती थोडक्यात अशी,
1) सदाचाराच्या व संयमनाच्या कार्यामध्ये एकमेकांशी सहकार्य करा आणि दुराचाराच्या व अत्याचाराच्या कामामध्ये कोणास साथ देऊ नका.     (दिव्य कुरआन, 5:2)
2) तुमची मैत्री व तुमचे शत्रुत्व अल्लाहसाठी असले पाहिजे. जे काही द्याल ते अशासाठी द्या की ते देणे अल्लाहला पसंत आहे आणि जे काही रोखाल ते अशासाठी रोखा की ते देणे अल्लाहला पसंत नाही.             (हदीस)
3) तुम्ही तो उत्कृष्ट जनसमूदाय आहात ज्याला लोकांच्या भलाईसाठी निर्माण केले आहे. तुमचे कर्तव्य सदाचाराची आज्ञा देणे व दुराचारापासून रोखणे हे आहे.                   (दिव्य कुरआन, 3:110)
4) आपसात गैरसमज करून घेऊ नका. एकदुसऱ्याच्या व्यवहारांचा छडा लावण्याचा प्रयत्न करू नका. एकाविरुद्ध दुसऱ्याला भडकवू नका. हेव्यादाव्यापासून अलिप्त राहा. एकदुसऱ्याला खजिल करून नका. अल्लाहचे दास आणि आपसात भाऊ बनून राहा.                     (हदीस)
5) एखादा अत्याचारी आहे हे माहीत असता त्याचे साहाय्य करू नका.     (हदीस)
6) अन्यायाच्या कामी आपल्या समूहाचे समर्थन करणे म्हणजे विहिरीत पडत असलेल्या उंटाच्या शेपटीला धरून स्वत:ही विहिरीत पडणे होय.            (हदीस)
7) दुसऱ्यासाठी तेच पसंत करा जे तुम्ही स्वत:साठी पसंत कराल     (हदीस)

- स्वामी लक्ष्मी शंकाराचार्य

भाषांतर
- सय्यद ज़ाकिर अली

खरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय?
सर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग्रंथ कुरआन  अवतरित झाला. त्यांना प्रेषित्व मिळाल्यापासून २३ वर्षांपर्यंत त्यांनी जे काही केले, ते अगदी कुरआननुसारच केले.  दुसऱ्या शब्दांत  सांगायचे झाल्यास मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन कुरआनचेच अर्थात इस्लामचेच प्रात्यक्षिक अगर व्यावहारिक रूप आहे. म्हणून  कुरआन व इस्लामला जाणून घेण्याचा सर्वांत महत्त्वपूर्ण व सोपा मार्ग प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे  आहे, मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र  आणि कुरआन वाचून आपण स्वत: निर्णय घेऊ शकता की ‘इस्लाम एक आतंक आहे की आदर्श!’

आयएमपीटी अ.क्र. 192      -पृष्ठे - 84    मूल्य - 35                आवृत्ती - 4 (March 2015)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/c1md1yvj4u0kbyrescezeujdt8c661ct

पुरूषांनी स्त्रीच्या फॅशनपेक्षा तिच्या पॅशनकडे लक्ष द्यावे, म्हणजे तिच्यातील अंगभूत पॅशनने ती तुमच्या घराचा महत्त्वाचा स्तंभ होण्याचे दायित्व यशस्वीपणे निभाऊ शकेल. आपल्या  कुटुंबातील स्त्री ही आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ म्हणून नेहमी आपल्या पाठीशी आहे. तरी घाबरू नका ! तिचा आधार घ्या आणि तिला आधार द्या (आधार कार्ड नव्हे) आणि जीवनात  यशस्वी व्हा ! महिला दिनानिमित हीच सर्व पुरूष मंडळींना विनंती !

स्तंभ म्हणजे काय? स्तंभ या शब्दाच्या 15 व्याख्या आहेत. प्रामुख्याने स्तंभ म्हणजे आधार देणारी वस्तू. स्तंभ म्हटले की डोळ्यासमोर येतो तो आपल्या लाडक्या तिरंग्यातील अशोक  स्तंभ, दिल्लीतील कुतूब मिनार, भीमा कोरेगावचा विजय स्तंभ, पण स्त्री समाजाचा स्तंभ कशी होऊ शकते? स्त्री आणि स्तंभामध्ये अशा कोणत्या समान गोष्टी आहेत ज्यामुळे तिला  स्तंभ म्हटले जाते? स्तंभ हा मजबूत असतो, तशी स्त्री सुद्धा मजबूत असते. म्हणायला स्त्रीला अबला नारी म्हणून कमकुवत समजण्यात येते. मात्र दिसतं तस नसतं. स्त्री दिसायला  जरी कमकुवत दिसली तरी तिच्या व्यक्तीमत्वात अनेक शक्ती लपलेल्या असतात. उदा. आपल्या मर्जीविरूद्ध केवळ आई-वडिलांच्या समाधानासाठी ते सांगतील त्या व्यक्तीबरोबर लग्न  करण्याचीच नव्हे तर ते निभाऊन दाखविण्याची शक्ती, आपल्या मनाविरूद्ध जावून पतील खुश ठेवण्याची शक्ती, आजकालच्या जिद्दी मुलांना सांभाळण्याची शक्ती, घरचे सगळे काम  करून परत ऑफिसचे काम करण्याची शक्ती, ऑफिसमधील आपले सहकारी आणि अधिकारी यांना तोंड देण्याची शक्ती, सासरच्या मंडळींचे मन जिंकण्याची शक्ती, अनाहुतपणे न  सांगता घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची शक्ती, शेजाऱ्याची काळजी घेण्याची शक्ती, मैत्रिणींसाठी वेळ काढण्याची शक्ती, विविध पाककला आत्मसात करून प्रत्यक्षात त्या  तयार करून घरच्या मंडळींना खाऊ घालण्याची शक्ती, काटकसरीने शॉपिंग करण्याची शक्ती, मुले नालायक निघाली तर आई-वडिलांचा सांभाळ करण्याची शक्ती, न कमाविणाऱ्या किंवा  दारूड्या पतीसोबत संसार करण्याची शक्ती, माणसे जोडण्याची शक्ती. एवढे सर्व करत असताना स्वत:कडे दुर्लक्ष करण्याची शक्ती. ह्या एक ना अनेक शक्तींचा समुचय म्हणजे स्त्री. जी की एका कुटुंबामध्ये एका स्तंभासारखी उभी असते.

स्तंभ आणि स्त्री मधले दूसरे साम्य
म्हणजे स्तंभ, ज्या प्रमाणे अनेक धातूंचा समुच्चय करून बांधण्यात येतो तसेच परमेश्वरांनी स्त्री नावाच्या या स्तंभाला अनेक धातू उदा. माया, करूणा, क्षमा, सहनशिलता यांच्या समुच्चयाने तयार केलेले आहे. स्तंभ आणि स्त्रीमध्ये तिसरे साम्य म्हणजे स्तंभ हे विजयाचे चिन्ह मानले जाते. स्त्री सुद्धा सगळ्या अडचणींवर मात करून स्वत:च नव्हे तर कुटुंबाला  सुद्धा विजयापर्यंत नेते. म्हणून स्त्री ही कुटुंबाचाच नव्हे तर देशाचा स्तंभ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
स्तंभाचे खूप प्रकार असतात. उदा. श्रद्धा स्तंभ. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पत्नी ज्यांना उमहातूल मोमिनात (मुस्लिम समाजाची माता) म्हटले जाते आणि त्यांच्या सोबत काम  करणाऱ्या महिला ज्यांना सहाबियात म्हटले जाते, ते आणि त्यांची जीवन शैली हे आमचे श्रद्धास्तंभ होत. शिक्षणाचे स्तंभ. जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख यांचा आदर्श  आपल्या सर्वासमोर आहेत. करूणा स्तंभ म्हणून मदर तेरेसांचे उदाहरण ठळकपणे समोर येते. शौर्यस्तंभ म्हणून राणी लक्ष्मीबाई, नगरवाली राणी चाँदबीबी, रजिया सुलताना, चित्तोडची  पद्मावती यांना कसे बरे विसरता येईल. आंतरिक्षातील स्तंभ म्हणून कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स् यांचे उदाहरण जगासमोर आहे. धैर्याचे स्तंभ म्हणून श्रीमती इंदिरा गांधी  आणि किरण बेदी यांच्याकडे पाहता येईल. क्रिडा क्षेत्रातील स्तंभ म्हणून मेरी कॉम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी.सिंधू यांना दृष्टीआड करता येत नाही. आज आएएएसमध्ये  अन्ना मलहोत्रा व नेत्रहीन आयएएस प्रांजल पाटील यांच्यासारख्या अनेक महिलांनी देशाच्या प्रशासनामध्ये आपण प्रशासकीय स्तंभ आहोत, हे ही दाखवून दिलेले आहे. बोईंग सारखे  विमान चालवून एक यशस्वी कमर्शियल पायलट सरला ठकराल यांच्याकडे धाडसाचे स्तंभ म्हणून पाहता येईल. ही काही उदाहरणं झाली. विविध क्षेत्रामध्ये स्तंभाप्रमाणे पाय रोवून  आपल्या कार्याने जगाला सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया खरोखरच्याच स्तंभ आहेत की काय? असे वाटावे इतपत दृढता त्यांच्यात आहे. विशेष म्हणजे हे स्तंभ समाजाकडून काय मागतात?  दूसरं काही नाही. फक्त प्रेम, विश्वास आणि त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक. आपण असे झाड पाहिले आहे काय की जे 20 ते 25 वर्षे एका जागी उभा राहते व नंतर त्याला दूसरीकडे  लावलं जातं तरीही ते छान वाढते, फुलं आणि फळं देते. नाही ना ! आपला अंदाज चुकीचा आहे. असा एक वृक्ष आहे ज्याचे नाव ’स्त्री वृक्ष’ आहे. परंतु दुर्दैवाने या वृक्षाला आजकाल  ’मनी प्लांट’ची वेल समजले जात आहे, जी की घरात शोभलीही पाहिजे आणि पैसेही देत राहिली पाहिजे. स्त्री ही समाजाचा अर्धा भाग आहे. जर का स्त्री भ्रुणहत्या नाही झाल्या तर   त्यांची संख्या पुरूषांपेक्षा जास्त होईल. अशा या अर्ध्या समाजाच्या गरजा आपल्याला जाणून घेता आल्या पाहिजेत. त्यांची पहिली गरज जन्माचा अधिकार. दूसरी गरज जगण्याचा  अधिकार. तिसरी गरज चांगलं पालन पोषणाचा अधिकार, चौथी गरज शिक्षणाचा अधिकार, पाचवी गरज तिच्या सन्मानाचा आणि अब्रुच्या रक्षणाचा अधिकार, सहावी गरज  हुंडाबळीपासून मुक्तीचा अधिकार. अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अगोदर नवजात मुलींना जीवंत गाडण्याची प्रथा होती. ती प्रेषित सल्ल. यांनी बंद पाडली आणि तिला  जगण्याचा अधिकार दिला. तिच्या चांगल्या पालन पोषणासाठी लोकांना प्रवृत्त केले आणि तिचे हक्क जे अल्लाहने तिला दिले ते अदा करण्याचे फरमान जाहीर केले. आज बहुतकरून  जगभरातील महिला निर्धोकपणे जन्म घेतात, शिक्षण घेतात आणि आपल्या समाजाला आधार देतात.
प्रेषितांच्या काळात एकटी स्त्री अंगभर सोने घेऊन रस्त्यावरून जात असे. तिला कोणाची भीती नसायची. बलात्कारासारखा प्रकार त्या काळात नावाला नव्हता. दारूला हराम करून स्त्रीयांना दारूड्या नवऱ्यापासून कायमची मुक्ती प्रेषित सल्ल. यांनी मिळवून दिली होती. पुरूषांनी स्त्रीच्या फॅशनपेक्षा तिच्या पॅशनकडे लक्ष द्यावे. म्हणजे तिच्यातील अंगभूत पॅशनने ती  तुमच्या घराचा महत्त्वाचा स्तंभ होण्याचे दायित्व यशस्वीपणे निभाऊ शकेल. आपल्या कुटुंबातील स्त्री ही आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ म्हणून नेहमी आपल्या पाठीशी आहे. तरी घाबरू  नका ! तिचा आधार घ्या आणि तिला आधार द्या (आधार कार्ड नव्हे) आणि जीवनात यशस्वी व्हा. महिला दिनानिमित हीच सर्व पुरूष मंडळींना विनंती.

- डॉ. सीमीन शेख, लातूर
8788327935

वजूदे ज़न से है तस्वीर-ए-कायनात मे रंग
इसी के साज से है जिंदगी का सोज-ए-दरूं
पा श्‍चिमात्य पुरूष फार चलाखअसतात, त्यांना ज्यांच्यावर वर्षभर अत्याचार करावयाचे असतात त्यांचा वर्षातून एक दिवस साजरा करतात. 8 मार्च त्याच दिवसांपैकी एक दिवस. हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही पोलीस स्टेशन, काही उड्डाने आणि काही कार्पोरेट कार्यालये संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित केले जातात, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात, महिलांच्या कामाचे गोडवे गायले जाते, त्यातही कॉमर्स पाहिले जाते, महिला दिनाचे महात्म्य सांगणार्‍या सुविचारांची कार्ड विकली जातात, कर्तृत्वान महिलांना बक्षीसे दिली जातात आणि महिला दिवस साजरा केल्याचे समाधान मानले जाते.
    या सर्व उत्साही वातावरणात एक कटू सत्य विसरले जाते ते म्हणजे महिला कितीही कष्टाळू का असेनात, बुद्धीमान, धाडसी, संयमी, दयावान, त्यागी का असेनात शेवटी त्यांचे मुल्यांकन त्यांच्या सौंदर्यावरूनच केले जाते. एकीकडे त्यांना देवी म्हणून महिमामंडित केले जाते तर दुसरीकडे त्या जन्मालाच येऊ नये, याचीही दक्षता घेतली जाते. समाज प्रतिगामी असो का आधुनिक, दोन्हीमध्ये महिलांचे शोषण केले जाते. महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा लादला जातो, पुन्हा-पुन्हा आई बनण्याच्या त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून त्यांना वंचित केले जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 8 मार्चला मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. याच निमित्ताने समाजात महिलांचे नक्की स्थान कोणते? आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण फक्त इस्लामी व्यवस्थेमध्येच कसे शक्य आहे? या संबंधी थोडेसे विवेचन या आठवड्यात केल्यास ते अनाठायी ठरणार नाही, अशी खात्री असल्याने हा लेखन प्रपंच.
    समाजातील महिलांचे स्थान
    समाजात महिलांचे नक्की स्थान ठरविताना इस्लामखेरीज सर्व मानवी सभ्यतांचा गोंधळ उडालेला दिसून येतो. प्राचीन ग्रीक सभ्यतेमध्ये महिलेला ’पेंडोरा’ म्हणजेच वाईट गोष्टींची जननी समजले गेले तर रोमन संस्कृतीमध्ये त्यांना पतीची मिळकत समजण्याचा प्रघात होता. विशिष्ट अशा चुका केल्यास पतीला प्रसंगी आपल्या पत्नीची हत्या करण्याचा सुद्धा कायदेशीर अधिकार होता. सुरूवातीला ख्रिश्‍चन संस्कृतीमध्ये सुद्धा महिलांसंबंधी अतिशय नकारात्मक विचार प्रचलित होते. टुट्रिलियन नावाच्या ख्रिश्‍चन धर्मगुरूचे स्त्रियांसंंबंधी मत पुढील प्रमाणे होते, ”ती सैतानाचे प्रवेशद्वार आहे. ती वर्जित वृक्षाकडे घेऊन जाणारी आहे. ईश्‍वराचा कायदा मोडणारी आहे. ईश्‍वराच्या संकल्पनेपासून पुरूषाला दूर घेऊन जाणारी आहे.” या ठिकाणी वर्जित वृक्ष म्हणजे स्वर्गातील ते वृक्ष ज्याच्या जवळ सुद्धा फटकू नका, असा आदेश अल्लाहने आदम अलै. आणि हव्वा अलै. यांना दिला होता. आणि सैतानाने आई हव्वा अलै. यांना अमरत्वाचे आमिष दाखवून त्या झाडाची फळं चाखण्यासाठी आदम अलै. यांना प्रेरित केले होते. हा प्रसंग बायबल आणि कुरआन या दोन्ही ईश्‍वरीय ग्रंथांमध्ये आलेला आहे.           
    महिलांविषयी क्राईसोस्टम हा ख्रिश्‍चन धर्मगुरू म्हणतो की, ”एक आवश्यक अशी वाईट बाब, एक जन्मजात अस्वस्थता, एक आवडणारे संकट, एक कौटुंबिक संकट, एक उध्वस्त करणारे प्रेम, एक नटलेली आफत” महिलांबाबतचे हे दोन दृष्टीकोन ख्रिश्‍चन धर्माला मानणार्‍यांमध्ये सुरूवातीच्या काळात होते. मात्र औद्योगिक क्रांती व विज्ञानाच्या प्रगतीबरोबर चर्चची सत्ता कमी-कमी होत गेली व आज अशी परिस्थिती आहे की, आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांना फक्त एक लैंगिक वस्तू समजले जात आहे. पॉर्न  सारख्या समाजघातक उद्योगाला इतकी समाजमान्यता मिळालेली आहे की, डायनासोर व आधारित ’ज्युरासिक पार्क’ चित्रपटांची निर्मिती करणारा हॉलीवुडचा जागतिक किर्तीचा दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग याची मुलगी निकोला हिने मागच्याच आठवड्यात पॉर्न स्टार म्हणून करिअर करण्याची घोषणा केलेली आहे. एकूणच महिलांचे स्थान समाजामध्ये काय असावे, हे आज 21 व्या शतकातसुद्धा जगाला ठरविता आलेले नाही, याला अपवाद फक्त इस्लामचा.
इस्लाममध्ये महिलांना दिलेले अधिकार
    इस्लाममध्ये महिलांचे समाजामधील स्थान नक्की कसे असावे? याबद्दल कुरआनमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. विस्तार भयामुळे त्या संदर्भात एवढेच नमूद करणे पुरेसे आहे की, मुळात त्यांच्यावर घराचे व्यवस्थापन, मानव वंश वृद्धी आणि संस्कारिक नागरिकांचा देशाला अखंड पुरवठा करण्याची जबाबदारी दिलेली आहे व ही जबाबदारी जगातील सर्वश्रेष्ठ जबाबदारी आहे.
    इस्लाममध्ये महिलांना मिळालेल्या अधिकारांचे ढोबळ वर्गीकरण दोन भागांमध्ये करता येईल. एक-आर्थिक अधिकार, दोन- सामाजिक अधिकार. इस्लाम वगळता बाकी सर्व सामाजिक व्यवस्थांमध्ये एकतर महिलांना आर्थिक अधिकार दिलेले नाहीत जे अधिकार दिलेले आहेत ते कायद्याने दिलेले आहेत व्यवस्थेने नव्हे. त्यातही प्रत्यक्षात त्या अधिकारांचा त्यांना स्वत:साठी उपयोग करता येणार नाही, अशी व्यवस्था पुरूषांनी जागतिक पातळीवर करून ठेवलेली आहे. आजच्या आधुनिक काळातही अनेक कामकाजी महिलांचे एटीएम त्यांच्या नवर्‍याच्या ताब्यात असतात. महिन्याला मोजून मापून नवरा त्यांना स्वत:च्या खर्चासाठी पैसे देत असतो. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र करण्याची चळवळ 18 व्या शतकात युरोपमधून सुरू झाली आणि आजमितीला ती सर्वत्र पसरलेली आहे. या चळवळीचा परिणाम असा झालेला आहे की, आता महिलांचे कमविणार्‍या जीवशास्त्रीय यंत्रामध्ये रूपांतर झालेले आहे. धर्माने जरी नाकारले असले तरी आज कायद्याने महिलांना वारसा हक्काचे व्यापक अधिकार मिळालेले आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांना हे अधिकार एक तर मिळत नाहीत किंवा मिळाले तरी त्यांचा त्यांना उपभोग घेऊ दिला जात नाही. या उलट इस्लाममध्ये महिलांवर थोडीशी बंधने घालून कुरआनने त्यांना अर्थप्राप्ती करण्याची परवानगी तर दिलेलीच आहे व त्या मिळकतीवर पतीचा कुठलाही अधिकार नाही, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. पत्नी कितीही कमाविणारी असो तिच्या आणि घराच्या खर्चाची जबाबदारी पतीवर टाकलेली आहे. याशिवाय, महेर आणि वारसा हक्काने संपत्ती मिळविण्याचा अधिकार 1441 वर्षापूर्वी बहाल केलेला आहे.
    सामाजिक अधिकारांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा प्रत्येक मुस्लिम मुलीला आपला पती निवडण्याचा संपूर्ण अधिकार दिलेला आहे. तिच्या मर्जीविरूद्ध तिचा विवाह तिच्या आई-वडिलांना सुद्धा करता येत नाही. एवढेच नव्हे तर तिला विशिष्ट परिस्थितीमध्ये पतीपासून घटस्फोट (खुला) घेण्याचा अधिकारही इस्लामने दिलेला आहे. महिलांचे समाजामध्ये स्थान निश्‍चित करतांना कुरआनने खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
    ”1. पत्नीबरोबर उत्तम व्यवहार करा.” (सुने निसा आयत क्र. 19). 2. ”एकमेकांच्या संंबंधांमध्ये उदारतेला विसरू नका.” (सुरे बकरा आयत नं. 237).
    यात पतीला विशेष करून उदारतेचे पालन करण्यासंबंधीचे निर्देश दिलेले आहेत. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी एक प्रसिद्ध हदीस या ठिकाणी नमूद करण्याचा मोह सोडवत नाहीये. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी म्हटले आहे की, ”तुमच्यापैकी चांगले पुरूष ते आहेत जे आपल्या पत्नींसोबत चांगला व्यवहार करणारे आणि आपल्या आपत्यांबरोबर उदारतेने वागणारे आहेत.”
    वर नमूद अधिकार हे, फक्त नावापुरतेच नसून जर कोणी ते नाकारत असेल तर ते हस्तगत करण्यासाठी महिलेला इस्लामी न्यायालयात संबंधितांविरूद्ध दाद मागण्याचाही अधिकार कुरआनने दिलेला आहे. याशिवाय विधवा आणि घटस्फोटीत महिलांना पुनर्विवाहाचा केवळ अधिकारच बहाल करण्यात आलेला नाही तर असे विवाह करण्यासाठी समाजाला उत्तेजन सुद्धा देण्यात आलेले आहे. पुनर्विवाहनंतर पूर्वीच्या पतीचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा कुठलाही अधिकार महिलेवर राहणार नाही, याचीही व्यवस्था केली गेलेली आहे. दिवाणी आणि फौजदारी कायद्यामध्ये केवळ साक्षीमध्ये अपवाद वगळता कुठलाही भेदभाव केलेला नाही. एक पुरूषाच्या साक्षी बरोबर दोन महिलांची साक्ष हा भेदभाव नसून त्यामागे निश्‍चित असे कारण आहे. ते काय आहे? या संबंधीचे विवेचन पुन्हा कधी तरी करूया.
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना धार्मिक तसेच भौतिक शिक्षण घेण्याचा पुरूषांएवढाच अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र शिक्षणाच्या स्वरूपामध्ये थोडेसे अंतर जरूर केलेले आहे. या संबंधी जमाते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) असे म्हणतात की, ”जहाँ तक तालीम व तरबियत का तआल्लुक है इस्लाम में औरत और मर्द के बीच कोई अंतर नहीं किया गया है. अलबत्ता स्वरूप में अंतर जरूरी है. इस्लामी दृष्टी से औरत की सही तालीम व तरबियत वो है जो उसको बेहतरीन बिवी, बेहतरीन माँ और एक बेहतरीन गृहिणी बनाए. उसका कार्यक्षेत्र घर है. इसलिए उसे विशेष रूप से उन विषयों की तालीम दी जानी चाहिए जो उस क्षेत्र में उसे ज्यादा फायदा पहूंचा सकते हैं. साथ ही वो ज्ञान भी उसके लिए आवश्यक है जो इन्सान को इन्सान बनानेवाले और उसके अख्लाक संवारनेवाले और उसकी नजर को व्यापक बनानेवाले हैं. ऐसी तालीम और ऐसी तरबियत हासिल करना हर मुसलमान औरत के लिए जरूरी है. इसके बाद अगर कोई औरत गैरमामुली ़जहेनी (बौद्धिक) योग्यता रखती हो और उन विषयों के अलावा दूसरे विषयों की तालीम भी हासिल करना चाहती हो तो इस्लाम उसके राह में रोडा नहीं बनता. बशर्ते की उन हदों से वो आगे न बढे जो शरियत ने औरतों के लिए मुकर्रर किए हुए हैं.” (संदर्भ : परदा, पान क्र.197).
    इस्लाम ने महिलांना जरी आर्थिक आणि सामाजिक अधिकार दिलेले असले तरी भारतीय उपमहाद्विपामध्ये या संदर्भात मुस्लिमेत्तरच काय स्वत: मुस्लिम स्त्री-पुरूषांमध्ये सुद्धा या अधिकारासंबंधीच्या जाणीवेची वाणवा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात महिलांना अनेक अधिकार नाकारले जातात. मुलीच्या लग्नामध्ये जो केेलेला अनाठायी खर्च असतो त्यावरच तिची बोळवण केली जाते व त्या खर्चालाच तिच्या वारसा हक्काच्या संपत्तीचा खर्च मानला जातो. या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्याची खुद्द मुस्लिम समाजामध्येच आवश्यकता आहे.
    महिलांचा खरा उद्धार
    महिलांचा खरा उद्धार कसा होईल? यासंदर्भात मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात की, ”सिर्फ अधिकार ही नहीं इस्लामने औरतों पर इससे बडा जो एहसान किया है उसका तो अंदाजा नहीं किया जा सकता. मानव समाज का पूरा इतिहास इस बात पर गवाह है के, औरत का अस्तित्व दुनिया में जिल्लत (अपमानास्पद), शर्म (लज्जास्पद) और गुनाह का वजूद था. बेटी की पैदाईश बाप के लिए बडा ऐब और अपमान का कारण समझी जाती थी. ससुराली रिश्ते रूसवाई के रिश्ते समझे जाते थे. यहां तक की ’ससूर’ और ’साले’ जैसे शब्द इसी अज्ञानता के विचारों के तहेत आज भी गाली की तरह उपयोग में लाये जाते हैं. बहोतसी कौमों में इस रूसवाई से बचने के लिए लडकीयों को पैदा होते ही ़कत्ल कर देने का रिवाज आम हो गया था. आम लोगों को तो छोडिए धर्मगुरूओं तक में प्राचीन काल में मुद्दतों तक इस प्रश्‍न पर बहेस छिडी रही के, औरत इन्सान है भी के नहीं? और खुदा ने उसे आत्मा बक्षी है के नहीं? सदीयों के उत्पीड़न, अधिनता और विश्‍वव्यापी अपमान के बरताव ने खुद महिलाओं के ़जहेन (सोंच) में भी अपनी इज्जत की संवेदना मिटा दी थी. वो खुद भी इस बात को भूल गई थीं के, उनके लिए भी इ़ज्जत की कोई जगह है. पुरूष उन पर ़जुल्म करना अपना अधिकार समझता था तो वो उसके ़जुल्म को सहेना अपना कर्तव्य समझती थी. गुलामी की जहेनियत इस हद तक उसमें पैदा कर दी गई थी के, वो गर्व के साथ अपने आपको अपने पती की दासी कहेती थी.” (संदर्भ : परदा, पान क्र. 198)
    आपल्या देशातच नव्हे तर अनेक देशात आजही या स्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. अगदी अलिकडेच कन्या भ्रुण हत्येसंबंधी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी ’सम-विषम’ या अर्थाने सूचक विधान केले होते. ग्रामीण भागामध्ये आजही महिला आपल्या  पतीला ’मालक’ म्हणतात. एकीकडे आधुनिकतेच्या नावाखाली तिचे शोषण केले जाते तर दूसरीकडे पारंपारिक जीवन पद्धतीमध्ये संस्कृतीच्या नावाखाली तिचे शोषण केले जाते.
स्त्रीच्या अस्तित्वाचा उद्देश्य
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”आणि त्याच्या (अल्लाहच्या) संकेतचिन्हांपैकी (एक संकेतचिन्ह) हे आहे की त्याने (अल्लाहने) तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्‍चितपणे यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात. (कुरआन: सुरे रोम, आयत नं. 21)
    लैंगिक संतोष ही मानवासाठी ईश्‍वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. या एका संतुष्टीमधून ईश्‍वराने अनेक उद्देश्य साध्य केलेले आहेत. पहिला उद्देश्य स्त्री आणि पुरूषांच्या जीवनामध्ये संतोष आणणे, दूसरा उद्देश्य त्यांच्यापासून संतती निर्माण करून मानववंश पुढे चालविणे. ही दोन्ही उद्दीष्टे लग्न न करताही प्राप्त करता येतात. आजकाल पाश्‍चिमात्य देशातच नव्हे तर आपल्या देशातही लग्न न करताच ही दोन्ही उद्दीष्टे प्राप्त करणार्‍या जोडप्यांची संख्या कमी नाही. मात्र इस्लाम विवाहाला एवढे जास्त महत्त्व देतो की, विवाह व्यतिरिक्त या दोन्ही उद्दिष्टांना प्राप्त करण्यास निषिद्ध ठरवितो. एवढेच नव्हे तर विवाह व्यतिरिक्त ही उद्दीष्टे प्राप्त करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्या भयंकर परिणामांची चेतावनी देतो व अशा लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमावितो. विवाहाशिवाय ही दोन्ही उद्दीष्टे प्राप्त करणार्‍या देशांमधील सामाजिक परिस्थिती किती वाईट झालेली आहे हे आपल्याला माहितच आहे. या संदर्भात विस्तार भयामुळे जास्त लिहिण्याचे टाळले आहे. या संदर्भात केवळ एकच गोष्ट नमूद करणे पुरेसे आहे की, अशा विवाहमुक्त संबंधातून जन्माला येणारी पीढि ही देशाच्याही उपयोगाची नाही आणि मानवतेच्याही उपयोगाची नाही. गुन्हेगारीचा जो आगडोंब आज जागतिक पातळीवर उसळलेला आहे तो विवाहशिवाय निर्माण होणार्‍या संस्कारहीन पीढिमुळे उसळलेला आहे, असे म्हटले तरीही चुकीचे ठरणार नाही.
    महिला आणि पुरूष दोहोंना लैंगिक संतुष्टी विवाहाच्या चौकटी बाहेर मिळविण्यासाठी अनेक गुन्हे करावे लागतात व अशा संबंधातून उदयास आलेली पीढि संस्कारहीन निपजते. हीच संतुष्टी जर विवाहाच्या चौकटीत मिळत असेल तर त्यातून निर्माण होणारी संतती ही संस्कारी, लोकहितकारीच नव्हे तर देशालाही उत्तम दर्जाचे नागरिक पुरविणारी ठरते. महिलांनी पादत्राणे निर्मितीच्या कारखान्यात जॉब करण्यापेक्षा घरात राहून आदर्श पीढिच्या निर्मितीच्या जॉबसाठी वाहून घेतले तर या ऐवढे दुसरे उपकार मानवतेवर दुसरे कुठलेच होणार नाही. हे विचार अनेकांना रूचणार नाही. प्रतिगामी आणि संकीर्ण वाटतील. मात्र कोणी मान्य करो अथवा न करो, सत्य हेच आहे. आज अमेरिकेसह जगभरात भारतीय तरूण आपल्या यशाची जी पताका फडकवत आहेत, त्यात त्यांच्या जुन्या पीढितील आई-वडिलांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचा फार मोठा वाटा आहे. मागील काही वर्षांपासून जी संस्कार विहीन पीढि निर्माण होत आहे व त्यातून महिलांवर अत्याचार, गुन्हेगारी बोकाळली आहे, त्याचे हेच कारण आहे की, अलिकडच्या पीढितील जोडप्यांनी पारंपारिक वैवाहिक बंधने एक तर झुगारून दिलेली आहेत किंवा ती सैल केेलेली आहेत.
    शेवटी महिला दिनानिमित्त इस्लाममध्ये महिलांचे नेमके काय स्थान आहे? हे समजून घेण्यासाठी सय्यद अबुल आला मौदूदी यांचे परदा नावाचे अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले पुस्तक जे की हिंदीमध्ये ’परदा’ आणि मराठीमध्ये ’गोशा’ नावाने सुद्धा उपलब्ध आहे ते जरूर वाचावे. जमाते इस्लामीच्या स्थानिक कार्यालयामधून ते सहज मिळविता येते. ते मिळवून पूर्वगृह बाजूला ठेऊन प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वाचावे, असे हे पुस्तक आहे. मला विश्‍वासच नव्हे तर खात्री आहे की, हे पुस्तक वाचणार्‍याच्या मनामध्ये महिलांच्या समाजातील नक्की स्थानाबद्दल खरी जाणीव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुस्तक जरी महिलांविषयी असले तरी ते पुरूषांनी वाचावे असे आहे. नि:संशय महिलांनाही स्वत:ची नव्याने ओळख करून घ्यावयाची असल्यास त्यांनीही हे पुस्तक नक्कीच वाचावे. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.

- एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget