Latest Post

 - डॉ. इल्तिफात अहमद इस्लाही

भाषांतर - प्रा. शेख अब्दुर्रहमान

ईश्वराने आपले अंतिम प्रेषित आदरणीय मुहम्मद (स.) यांच्याद्वारे एक ग्रंथ अवतरित केला ज्याचे नाव "कुरआन' आहे, जो मानवाला सरळ आणि सत्यमार्ग दाखविण्यासाठी अवतरित झाला आहे. वास्तविकपणे आमच्या सर्व समस्यांवर उपाय फक्त कुरआन आहे.
या पुस्तिकेत ईश्वराचा ग्रंथ कुरआनसंबंधी या सत्याला प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला आहे की हा एक ईश्वरी ग्रंथ आहे ना की मानवनिर्मित याविषयी काही शास्त्रीय पुरावेसुध्दा गोळा केले गेले आहेत. आशा आहे ही पुस्तिका भरकटलेल्या मानवतेसाठी एक आधार सिध्द होईल.

आयएमपीटी अ.क्र. 76       पृष्ठे - 48    मूल्य - 20          आवृत्ती - 2 (DEC. 2010)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/woeavwunh56hn3hhhxu1b6wv1fkkitpx







जाणारे कधी परतत नसतात, जाणाऱ्यांची आठवण येत असते. जेव्हा एखादा आमच्यातून निघून जातो तेव्हा त्याची आठवण खूप येते. मौलाना सिराजुल हसन यांच्या निधनाच्या  बातमीमुळे आठवणींच्या शांत समुद्रात जणू एक लाट उसळली. काय लिहावं आणि काय सोडून द्यावं हेच काही समजत नाही. मौलानांचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो. ते म्हणत असत, ‘‘सोडा हे सगळं, कामं करा’’, पण मनाला राहावत नाही. जेव्हा माणसाचं डोकं एकदम सुस्त होते आणि पेनातली शाई सुकून जाते तेंव्हा माणूस काय करू शकतो? काल संध्याकाळपासून माझे मित्र आजम शहाब आग्रह करीत होते की मी काही लिहावं परंतु व्यक्त होण्याची शक्ती नष्ट झाली नाही तर माणूस हतबल होतो. मंचाशिवाय मौलानांना पहिल्यांदा बेंगलुरू मधे जवळून पाहण्याची संधी मिळाली. कर्नाटकात एस.आय.ओ.नं चांगलंच बस्तान बांधलं होतं तर एस.आय.एम.चं कार्य नगण्य होतं. काही विभागांत थोड्याफार  प्रमाणांत असलेला संपर्क दृढ करण्यासाठी मी बेंगलुरूला गेलो तेंव्हा सर्वप्रथम प्रदेशाध्यक्षांना (जमात-ए-इस्लामी-हिंद, कर्नाटक) भेटण्यासाठी त्यांच कार्यालय गाठलं.
मौलाना सिराजुल हसन यांच्या भेटीनं माझा उत्साह वाढला. त्यांचा दिलखुलासपणा व विशालहृदयतेनं माझं मन मोहित झालं. त्या काळी लोकांनी एस.आय.एम. ला जमाअतची बंडखोर  व अवज्ञा करणारी संघटना ठरवली होती. परंतु याचा मौलाना सिराजुल हसन यांना लवलेशही नव्हता. त्यांनी प्रदेश कार्यालयात मुक्काम करू देण्याची तयारी दर्शविली.
त्या वेळी कार्यालयात सुरू असलेल्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत मला घेऊन गेले आणि सर्व सदस्यांची ओळख करून दिली. मौलानांच्या वागणुकीमुळे एस.आय.एम. आणि एस.आय.ओ. दरम्यानची भिंत क्षणार्धात कोसळली. त्यानंतर मौलाना दिल्लीतील केंद्रीय जमाअतमध्ये सचिवपदी विराजमान असताना तेथील वातावरण अतिशय गंभीर होते. त्यांच्या  आगमनानंतर पहिल्यांदाच केंद्रीय जमाअतमध्ये नाष्ट्याच्या वेळी दिल्लीचे पापे आणि मौलानांचे विनोदी चुटके प्रसिद्ध होऊ लागले. वर्षानुवर्षे ये-जा करूनदेखील परकेपणा बाळगणारे लोक  खळखळून हसू बोलू लागले. हे नवीन पिढीला खूपच आवडत होते.
मौलाना सिराजुल हसन यांच्या खांद्यावर जमाअतच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि त्यांनी आमच्यासारख्यांना जमाअतचे सदस्य बनवून घेतले. दरम्यानच्या काळात जमाअतचे  कार्यालय चितली कबरहून अबुल फजल या ठिकाणी हलविण्यात आले होते. त्या वेळी काही कामानिमित्त दिल्लीला जाण्याची संधी मिळत असे तेव्हा मौलानांना भेटण्याची उत्कट इच्छा असायची.
स्वागतानंतर जमाअतच्या अध्यक्षांची भेट होऊ शकते काय? असे विचारणार इतक्यात पाठीमागून एक कुरवाळणारा हात माझ्या खांद्यावर विसावला. मागे वळून पाहतो तर मौलाना सलामसाठी पुढे सरसावले आणि गळाभेट घेतली. एखाद्या संघटनेचा प्रमुख आपल्या नव्या सदस्याशी इतक्या आत्मीयतेने वागू शकतो, ही गोष्ट कल्पनातीत होती. ते माझा हात पकडून आपल्या खोलीत घेऊन गेले. क्षणार्धात अध्यक्ष आणि नवनियुक्त सदस्य यांच्यातील तफावत दूर झाली. अशा नम्रता आणि मनमोकळेपणाची कल्पनाही करवत नाही. वयोवृद्धांच्या  संगतीत आत्मा समृद्ध व सुशोभित होत असतो, हे पुस्तकांमध्ये वाचलं होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. या भेटीचा सुगंध अंत:करणाच्या कोनाड्यात आजही दरवळतोय.
मुंब्रा येथे सदस्यांचं एक संमेलन माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होतं. मौलानांना आपल्या घरी घेऊन जाण्याबद्दल मी स्थानिक अध्यक्षांना विचारलं, ते म्हणाले की जर ते येऊ इच्छित असतील तर मी नाकारू शकत नाही. मौलानांना मी म्हटलं की चला आमच्या घरी आराम करा, तेव्हा ते म्हणाले की नको इथंच ठीक आहे. विचारलं, का? ते म्हणाले की  तुमच्या घरच्यांना त्रास नको. मी म्हणालो, घरी कोणी असेल तर त्रास होईल! मुलं आपल्या आईबरोबर आपल्या नानानानीकडे  सुट्टी साजरी करताहेत. मौलानांनी होकार दिला. मी  त्यांना शयनागारात आराम करण्यास सांगितलं आणि स्वत: हॉलमध्ये येऊन अंग टाकलं. काही वेळानं ते बाहेर आले आणि मला आत जाऊन झोपण्यास सांगितलं. मी विचारलं, आपण  कुठे आराम करणार? तर म्हणाले, मी इथं बाहेरच्या खोलीत जमिनीवर! तुम्ही आपल्या बिछान्यावर जाऊन झोपा. मी म्हणालो, हे शक्य नाही. ते आग्रह करू लागले तेव्हा मी विचारलं,  मी रात्रभर जागं राहावं अशी आपली अच्छा आहे काय? यावर ते नि:शब्द होऊन आत निघून घेले. यानंतर त्यांना गाढ झोप लागली. परंतु ते आत झोपू शकले की नाही, हे मला ठाऊक  नाही. कुरआनचं मराठीत भाषांतर झालं. त्याचं विमोचन करण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष मौलाना सिराजुल हसन यांचं मुंबईत आगमन झालं. मुंबईतल्या के. सी. कॉलेजचा हॉल बाल्कनीपर्यंत भरला होता. त्या कार्यक्रमात मराठीचे प्रसिद्ध लेखक यू. म. पठाण, प्रसिद्ध पत्रकार अरुण साधू आणि एका न्यायाधीशांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  काही वक्त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी मी पार पाडली. दरम्यान मगरिब नमाजची वेळ होताच दरम्यानच्या काळात ‘सलीमने ओळख करून देणे थांबवावे,’ असे मौलानांनी  स्थानिक अध्यक्षांकरवी सांगितले. मग यापुढील कार्यक्रमात ओळख करून देण्याचे काम कोणा दुसऱ्याला देण्यात यावे. ते म्हणाले, असे केल्यास मौलाना नाराज होतील. मौलाना  सिराजुल हसन यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीचं मन दुखविणे कोणा निष्ठूर अंत:करणाच्या व्यक्तीला शक्य होतं? विषय तेव्हाच संपला आणि आज त्याची चर्चा. महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्षाची निवड होणार होती. मौलाना केंद्रीय कार्यालयाकडून निरीक्षक म्हणून विराजमान झाले होते. त्या बैठकीत नेहमी अतिशय उत्साही असणारं व्यक्तिमत्त्व खूप गंभीर  असल्याचं दिसत होतं.
दिवसभर चर्चा सुरू होती. अनेकांपैकी काहींनी आपलं मत सावधगिरी बाळगत तर काहींनी बेधडकपणे मांडलं. मौलानांनी अतिशय गंभीर रूप धारण केलं होतं. संपूर्ण कार्यवाहीदरम्यान  त्यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. प्रत्येकाला उत्स्फूर्तपणे बोलण्याची संधी दिली आणि स्वत: शांतपणे सर्व काही लिहून घेत राहिले. मौलानांची आवेशपूर्ण भाषणं आणि लहान लहान  विनोदी चुटक्यांचा मजा लुटणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना कोरड्या संघटनात्मक चर्चेतील मौलानांच्या असाधारण रुचीने प्रभावित केलं होतं. ज्या दोन व्यक्तींच्या नावांवर सर्व लोकांनी  चर्चा केली असतानादेखील त्या दोघांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव का सादर केले? असा प्रश्न बैठकीनंतर एकांतात मौलानांना विचारण्यात आले. यावर त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत स्मितहास्य करत ज्ञान व युक्तीने परिपूर्ण वक्तव्य केले की खूप अधिक विचार करणे चांगले नसते. अर्थात त्यांना असे म्हणायचे होते की ‘मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करू नका,  पुन्हा पुन्हा उपस्थित केलेल्या शंका अपराध ठरतात.’ मग त्यापुढे प्रश्न करण्याची हिंमत झाली नाही.
मौलाना सिराजुल हसन यांच्या आश्चर्यकारक लोकप्रियतेचा सुगावा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या हदीसमध्ये आढळतो- एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे येऊन विचारणा  केली, ‘हे पैगंबर! मला एक अशी गोष्ट करण्यास सांगा जी केल्याने अल्लाहदेखील माझ्यावर प्रेम करील आणि लोकसुद्धा माझ्यावर प्रेम करतील.’ येथे अल्लाहवरील प्रेमाच्या सामर्थ्याचा  तगादा नसून अल्लाहच्या प्रेमाची आवश्यकता आहे. सृष्टीनिर्मात्याशी प्रेमाचं नातं जुळावं ही सृष्टीतील अस्तित्वात महान सचोटी आहे.
अल्लाहने स्वत: आपल्या दासावर प्रेम करू लागावे. या हकीगतीचा अंदाज प्रेम करणाऱ्या हृदयाव्यतिरिक्त कुणी दुसरा लावू शकत नाही. एखाद्या दासावर अल्लाह किती प्रेम करतो  हेदेखील आम्हाला कळू शकत नाही, परंतु त्याचे दास कुणावर प्रेम करतात याचा अंदाज सहजगत्या लावला जाऊ शकतो. या स्पष्टीकरणानुसार मौलाना सिराजुल हसन अतिशय हेवा  वाटणारे व्यक्तिमत्त्व होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सहकाऱ्याच्या प्रश्नाचे असे उत्तर दिले की ‘जगाकडून अभिलाषा बाळगू नकोस, अल्लाह तुझ्यावर प्रेम करील आणि  लोकांकडे जे काही आहे त्यापासून नि:स्पृह राहा, लोक तुझ्यावर प्रेम करतील.’
जागतिक अभिलाषा न बाळगणे आणि लोकांपासून नि:स्पृह राहाणे यावर प्रवचन आणि भाषण देणे अगदी सोपे आहे, परंतु हे सर्व आपल्या नसानसांत वसविणे अतिशय अवघड आहे.  मौलाना  सिराजुल हसन यांनी याचे बोलके उदाहरण कशा प्रकारे सादर केले आहे. पाहा जमाअत- ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षांची निवड होणार होती. चौथ्यांदा मौलाना सिराजुल हसन  यांची निवड होण्याची दाट शक्यता होती. तेव्हा मौलानांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले, ‘मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जमाअतचा कोणताही निर्णय नाकारलेला नाही. म्हणून  आपण सर्वांनी मला विवश करू नये. मी घरी जाऊन माझ्या मातेची सेवा करू इच्छितो. कृपया करून माझी विनंती मान्य करावी.’
ईश्वरेच्छेपोटी आपले तारुण्य धर्माच्या उद्धारासाठी व्यतीत केलेल्या व्यक्तीचे हे वक्तव्य होते. चाळीस वर्षांपर्यंत जमाअतद्वारा धर्माची सेवा केल्यानंतर ते आपल्या मातेची सेवा करण्यासाठी अत्युच्च नम्रतेनं निरोप घेऊ  इच्छित होते. नि:स्वार्थ आणि ईशसेवेचे महत्तम उदाहरण सादर करून मौलानांनी केंद्रीय कार्यालयाचा मागे वळून न पाहता निरोप घेतला.
हैद्राबादेत जमाअतच्या संमेलनाचा दुसरा दिवस होता. मौलाना सिराजुल हसन आपली तब्बेत ठीक नसतानाही खाली सामान्य सदस्यांच्या दरम्यान येऊन बसले. आमच्यासारख्या काही  लोकांना हे कळताच त्यांच्याभोवती जमा झालो. स्टेजवर विराजमान होण्याची त्यांना विनंती करण्यात आली. मौलाना नकार देत राहिले, ‘माझा कार्यक्रम नाही. मी फक्त उपस्थित  राहाण्यासाठी आलोय. आपल्या सदस्यांना भेटण्यासाठी आलोय.’ लोकांनी काही एक ऐकलं नाही आणि त्यांना स्टेजवर घेऊन गेले. भाषण देण्यास सांगण्यात आले तेव्हा प्रकृती ठीक   नसतानाही थोडक्यात मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ‘कस्रfचत ही आमची शेवटची भेट असेल.’ त्यांचे हे शब्द खरे ठरले आणि आमच्यासारख्या दूरवरच्या निष्ठावंतांना त्यानंतर  मौलानांच्या भेटीचे भाग्य लाभले नाही. अब्दुल्लाह जावेद यांच्याकडून मौलाना हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. विष संपूर्ण शरीरात पसरल्याचे मुहम्मद  सिद्दीक कुरैशी यांनी व्हिडिओसह लिहिल्याचे वाचले तेव्हा ते पाहाण्याची हिंमत झाली नाही. प्रार्थनेने अनुसरण केले आणि काही दिवसांनंतर पुन्हा अब्दुल्लाह जावेद यांनी सांगितले की  मौलानांना आय सी यू मधून सामान्य वार्डात हलविण्यात आले आहे. त्यानंतर घरी परतल्याची देखील बातमी कळाली. आम्ही सर्वांनी अल्लाहचे आभार मानले, मात्र खुशी फार काळ  टिकली नाही आणि थोड्याच दिवसांत दु:खद वार्ता आली की मौलाना सिराजुल हसन आपल्यातून निघून गेले.
मौलाना रजीउल इस्लाम नदवी यांनी दिवा विझल्याचंही लिहिलं परंतु मनाला पटलं नाही. जर हे खरे आहे तर मनाच्या तळघरात हा उजेड का आहे? मौलानाचं शरीर गेल्या शुक्रवारी  दफन करण्यात आलं, परंतु सिराजुल हसन नामवंत अंत:करण व मस्तिष्कात प्रकाशमान आहे व राहील. मौलानांच्या मनमोहक हास्यात लपलेल्या धर्मनिष्ठेची तडफ खालील ओळींच्या  साक्षीने आमच्या बरोबर राहीलजिया हूं उम्र-भर सो़जे निहां में रहा हूं मिस्ले गुल में इस जहां में।

- डॉ. सलीम खान
(अनुवाद- शाहजहान मगदुम)

माननीय खुवैलिद बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या अल्लाह! मी दोन दुर्बल लोकांच्या अधिकारांना श्रेष्ठ समजतो, म्हणजे अनाथ  आणि पत्नीच्या अधिकाराला.’’ (हदीस : निसाई)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सांगण्याचा हा अंदाज अतिशय प्रभावशाली आहे ज्याद्वारे पैगंबरांनी लोकांना असा उपदेश दिला की अनाथ व पत्नींच्या अधिकारांचा आदर करा. इस्लामच्या पुनरुत्थानापूर्वी अरब जगतात हे दोघे सर्वाधिक अत्याचारपीडित होते. अनाथांशी सामान्यत: वाईट व्यवहार केला जायचा आणि त्यांचा अधिकार हिसकावला जायचा. त्याचप्रमाणे  महिलांनाही कसलेच स्थान नव्हते.

एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘मी गरजवंत आहे, माझ्याकडे काहीही नाही आणि माझ्या देखरेखीत एक अनाथ आहे (ज्याच्याकडे संपत्ती आहे). तेव्हा मी त्याच्या संपत्तीतून स्वत:चा उदरनिर्वाह करू शकतो काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय. तुम्ही आपल्या अनाथाच्या संपत्तीतून स्वत:चा उदरनिर्वाह करू शकता. मात्र अट अशी की व्यर्थ खर्च करू नका आणि कोणतेही काम घाई-गडबडीत करू नका आणि आपली सपत्ती बनविण्याची चिंता करू नका.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
जर एखाद्या अनाथाचे पालनपोषण करणारा श्रीमंत असेल तर त्याने कुरआनच्या उपदेशानुसार (त्या अनाथाकडून) काहीही घेता कामा नये, परंतु जर तो गरीब असेल आणि अनाथाकडे संपत्ती असेल तर तो त्याच्या संपत्तीचे रक्षण करेल. ती वाढविण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून स्वत:चा खर्च भागवेल, परंतु तो अनाथ तारुण्यात येण्यापूर्वी त्याची संपत्ती लवकर  लवकर खाऊन टाकणे त्याच्यासाठी अवैध आहे. तसेच तो अनाथाच्या संपत्तीपासून आपली संपत्ती उभी करू शकत नाही. अल्लाहला न भिणारे बेईमान लोक अनाथांची संपत्ती चलाखीने  आपली संपत्ती बनवितात अथवा त्याच्या प्रौढ होण्यापूर्वी त्याची संपूर्ण संपत्ती खाऊन-पिऊन फस्त करतात.
या हदीसमध्ये देण्यात आलेला उपदेश पवित्र कुरआनमधील सूरह निसामध्ये अल्लाहने अनाथांच्या संपत्तीच्या बाबतीत दिला आहे. अल्लाह म्हणतो, ‘‘आणि अनाथांची काळजी घेत रहा  इथपावेतो की ते विवाहयोग्य वयात येतील. मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा. असे कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा  ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईने गिळंकृत कराल की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्कांची मागणी करू लागतील. अनाथांचा जो पालक धनवान असेल त्याने ईशपरायणतेने  वागावे व जो गरीब असेल त्याने परिचित पद्धतीने खावे. नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना त्यावर साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्लाह पुरेसा आहे.’’ (दिव्य कुरआन, ४:६)

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझ्या आश्रयाखाली असलेल्या अनाथाला कोणत्या कारणासाठी मी मार देऊ शकतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या कारणांसाठी तुम्ही स्वत:च्या मुलांना मार देऊ शकता. खबरदार! आपल्या संपत्तीला वाचविण्यासाठी त्याची संपत्ती नष्ट करू नका आणि त्याच्या संपत्तीद्वारे आपल्या  संपत्तीत वाढ करू नका.’’ (मुअजम तिबरानी)

स्पष्टीकरण
आपल्या मुलाबाळांना शिक्षण व प्रशिक्षणाच्या बाबतीत मार देऊ शकता, त्याचप्रमाणे अनाथालाही धार्मिक आणि शिष्टाचार व सभ्यता शिकविण्याच्या बाबतीत मार दिला जाऊ शकतो.  विनाकारण क्षुल्लक कारणासाठी मुलांना मारहाण करणे पैगंबरांच्या परंपरेच्या विरूद्ध आहे आणि अनाथाला मारणे हे तर फार मोठे पाप आहे.

इस्लाम अल्लाह आणि पैगंबर यांच्यानंतर आईला सर्वोच्च दर्जा देतो. आई व वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि त्यांच्या आज्ञापालनाचा आदेश देतो. कुरआनोक्ती आहे,
"आणि ही वस्तुस्थिती आहे की, आम्ही मानवाला आपल्या मातापित्यांचा हक्क ओळखण्याची स्वत: ताकीद केली आहे. त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध सोडण्यास लागले. (म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की) माझ्याप्रती कृतज्ञता दाखव आणि आपल्या मातापित्यांशी कृतज्ञ राहा.''    (दिव्य कुरआन, 31 : 14)
अल्लाहचे आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.)1 यांनी वडिलांशीदेखील सद्व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे, परंतु आईशी सद्व्यवहार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला आहे.
पैगंबरांचा आदेश आहे,
"मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या पित्याच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो.''     (हदीस : इब्ने माजा)
माननीय अबू हुरैरा (रजि.)2 यांचे कथन आहे की, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला व म्हणाला,
""हे अल्लाहचे पैगंबर (स.)! माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे ?''
पैगंबर म्हणाले, ""तुझी आई!''
त्याने विचारले, ""त्यानंतर कोण ?''
पैगंबर म्हणाले, ""तुझी आई!''
त्याने पुन्हा विचारले, ""त्यानंतर कोण?''
पैगंबरांनी सांगितले, ""तुझी आई!''
त्याने विचारले, ""त्यानंतर कोण?''
मग पैगंबर म्हणाले, ""तुझे वडील!''    (हदीस : अल-अदबुल मुफद्न)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
""आईची अवज्ञा करणे आणि मुलींना जिवंत दफन करणे हे अल्लाहने तुमच्यावर निषिध्द ठरविले आहे.''                                                   (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असेही फर्माविले आहे,
""आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.''    (हदीस)

ज्ञानेंद्रियांवर विश्वास करून मनुष्य जेव्हा या प्रश्नासंबंधी एखादे मत निश्चित करतो तेव्हा अशा विचारसरणीच्या अगदी स्वाभाविक तगाद्यामुळे तो या निष्कर्षापर्यंत येतो की सृष्टीची ही संपूर्ण व्यवस्था म्हणजे अचानकपणे या प्रकटित उत्पत्तीची धामधूम होय. तिच्या उत्पत्तीमागे कोणतेही उद्दिष्ट किंवा हेतू दडलेला नाही, उगीचच या सृष्टीव्यवस्थेने आकार घेतला आहे, उगीचच तिची वाटचाल होत आहे आणि उगीचच फलनिष्पत्तीविना ती अंत पावणार आहे. या सृष्टीव्यवस्थेचा कोणी स्वामी दिसत नाही, म्हणून एक तर त्याचे अस्तित्व असू नये व असले तरी मानवी जीवनाशी त्याचा कोणताही संबंध नाही. मानव एक प्रकारचा प्राणी आहे. कदाचित योगायोगानेच तो येथे उत्पन्न झाला आहे. त्याला कोणी निर्माण केले आहे की तो स्वत:च निर्माण झाला आहे, काही कळत नाही. असो, या प्रश्नांशी काही एक कर्तव्य नाही. आम्ही केवळ हेच जाणतो की, मानव पृथ्वीवर आढळतो, तो काही इच्छा व वासना बाळगतो, त्यांच्या पूर्ततेसाठी त्याची प्रकृती आतून जोर लावित असते, मानव काही सामथ्र्य आणि इंद्रिये व अवयव बाळगतो. ती इच्छा व वासनापूर्ततेची साधने बनू शकतात, त्याच्या सभोवती भूतलावर अमाप व अगणित सामग्री पसरलेली आहे, तिच्यावर मानव आपल्या अवयवांचा व कुवतींचा उपयोग करून आपल्या इच्छेची पूर्तता करू शकतो, म्हणून मानवाच्या कुवतींचा याशिवाय अन्य कोणताही उपयोग नाही की, त्याने आपल्या इच्छा व गरजांना कमाल पातळीने पूर्ण करावे. या जगाची योग्यता याशिवाय अन्य काहीच नाही की, ते लुटालुटीचे एक ताट आहे व ते यासाठी पसरले आहे की, मानवाने त्यावर ताव मारावे. वरती कोणीही शासक नाही, ज्यासमोर मानवाला जाब द्यावयाचे असावे. कोठे ज्ञानाचे उगमस्थान आणि मार्गदर्शनाचे मूलस्त्रोतही नाही की, जेथून मनुष्याला आपल्या जीवनासाठी नियम मिळू शकावेत, म्हणून मानव एक स्वतंत्र आणि बेजबाबदार प्राणी आहे. स्वत:साठी कायदे बनविणे आणि आपल्या कुवतींचा उपयोग ठरविणे, तसेच अस्तित्वात असलेल्या इतर सृष्टीशी आपले वर्तन ठरविणे हे त्याचे स्वत:चे काम आहे. त्याच्यासाठी एखादे मार्गदर्शन आहे तर ते पशुप्र्राण्याच्या जीवनात, दगडांच्या आत्मवर्जनात किंवा स्वत:च्या ऐतिहासिक अनुभवात आहे. त्याला एखाद्यासमोर जाब द्यावयाचा असेल तर त्याच्या स्वत: समोर किंवा त्या सत्तेसमोर जी स्वत: मानवामधूनच उत्पन्न होऊन लोकांवर आरूढ झाली असेल. जीवन जे काही आहे ते केवळ ऐहिक जीवन आहे. कर्माची जी काही फळे आहेत ती याच जीवनाच्या मर्यादेत आहेत, म्हणून योग्य अयोग्य, उपयुक्त आणि हानिकारक, घेण्याचा व त्याज्य करण्याचा निर्णय केवळ त्याच फळांना विचारात घेऊन घेतला जाईल जे या जगात प्रकट होणार आहेत.
असा हा संपूर्ण जीवनासंबंधी एक दृष्टिकोन आहे. यात जीवनाच्या सर्व मूलभूत प्रश्नांचे उत्तर केवळ ज्ञानेंद्रियविषयक निरीक्षणाने दिले गेले आहे. या उत्तरांचा प्रत्येक भाग दुसऱ्या भागाशी कमीतकमी तार्किक संबंध आणि स्वाभाविक अनुकूलता जरूर राखतो. त्यामुळे मनुष्य जगात एक समतल व एकरूप वर्तन अंगिकारू शकतो, याचा विचार न करता की हे उत्तर व त्यामुळे निर्माण होणारे वर्तन आपल्या जागी चूक आहे की बरोबर. आता या उत्तराच्या आधारावर मनुष्य जगात जे वर्तन अंगिकारतो त्या वर्तनावर एक दृष्टिक्षेप टाकू या.
वैयक्तिक जीवनात या दृष्टिकोनाचा अपरिहार्य परिणाम असा आहे की, मनुष्याने प्रथमपासून ते शेवटपर्यंत मुक्त आणि बेजबाबदार वर्तन अंगिकारावे. त्याने स्वत:ला आपल्या शरीराचा व आपल्या शारीरिक कुवतींना मालक समजावे म्हणून आपल्या इच्छेनुसार तो हवे त्याप्रमाणे त्यांचा उपयोग करील. जगाच्या ज्या वस्तू त्याच्या अधिकाराखाली येतील व ज्या माणसांवर त्याला सत्ता प्राप्त होईल, त्या सर्वांशी तो अशा प्रकारे वागेल जणू तो त्यांचा स्वामी आहे. त्याच्या अधिकारांना मर्यादित करणारी गोष्ट म्हणजे केवळ नैसर्गिक नियमांच्या मर्यादा आणि सामूहिक जीवनाची अनिवार्य बंधने असतील. त्याच्या स्वत:च्या मनात अशी कोणतीही नैतिक संवेदना, जबाबदारीची जाणीव आणि कोणाला जाब देण्याची भीती असणार नाही, जेणेकरून तो मोकाट होण्यापासून रोखला जात असावा. जेथे बाøस्वरूपाची बंधने नसतील किंवा जेथे ती बंधने असतानादेखील आपले काम करण्याचे त्याला सामथ्र्य प्राप्त असेल, अशा ठिकाणी तर त्याच्या या धारणेचा स्वाभाविक तगादा असाच आहे की, ती अत्याचारी, बेईमान आणि अपहारकर्ता, दुष्ट आणि उपद्रवकारी असावा. स्वभावत: तो स्वार्थ, भौतिकवादी आणि संधिसाधू असेल. आपल्या मनोकामना आणि पाशवी गरजांची सेवा करण्याशिवाय त्याच्या जीवनाचा अन्य कोणताही हेतू असणार नाही. त्याच्या या जीवनध्येयाच्या दृष्टीने ज्या गोष्टींची किंमत असेल अशाच गोष्टींना त्याच्या दृष्टीत महत्त्व प्राप्त असेल. लोकात अशा प्रकारची नीती व चारित्र्य निर्माण होणे सदरहू धारणेचा स्वाभाविक आणि तर्कशुद्ध परिणाम आहे. आपले हित आणि दूरदृष्टीमुळे अशा माणसाकडून दयाळूपणा, त्याग, आपल्या लोकसमूहाच्या कल्याण व प्रगतीसाठी जिवापाड परिश्रम आणि एकंदरीत त्याच्या जीवनात एक प्रकारची जबाबदारीपूर्ण नैतिकता प्रकट होणे शक्य आहे, यात शंका नाही. परंतु जेव्हा आपण त्याच्या वर्तनाचे पृथक्करण करू तेव्हा कळेल की, वास्तविकपणे त्याच्या स्वार्थपणा व वासनेचेच हे व्यापक रूप आहे. तो आपल्या देशाच्या व राष्ट्राच्या कल्याणात आपले कल्याण पाहतो, म्हणून तो त्यांचे कल्याण इच्छितो. हेच कारण आहे की, असा मनुष्य जास्तीतजास्त केवळ एक राष्ट्रवादीच होऊ शकतो.
मग जो समाज अशा नीतिमत्ता बाळगणाऱ्या माणसांनी बनेल त्या समाजाची गुणवैशिष्टये खालीलप्रमाणे असतील -
1)    राजकारणाचा पाया मानवी सत्तेवर आधारित असेल, मग ती सत्ता एकाधिकारशाही असो, घराणेशाही असो, एखाद्या वर्गाची सत्ता असो की लोकशाही. सामूहिकतेची जास्तीतजास्त उƒ जी कल्पना केली जाऊ शकेल ती केवळ राष्ट्रकुल कल्पना असेल. अशा प्रकारच्या राज्यसत्तेत मानवच कायदे रचणारे असतील, सर्व कायदे इच्छा आणि अनुभवात्मक हिताच्या आधारे बनविले जातील, तसेच हित आणि लाभवाद दृष्टीसमोर ठेवूनच धोरणेही ठरविली जातील व बदलली जातील.
अशा प्रकारच्या राज्यात जे लोक सर्वांत जास्त शक्तिशाली आणि सर्वांत जास्त चलाख, धूर्त, लबाड, दगलबाज, कठोर आणि दुष्ट वृत्तीचे असतील, तेच जोर करून पुढे येतील. समाजाचे मार्गदर्शन आणि राज्याची धुरा त्यांच्याच हातात असेल. त्यांच्या कायदेग्रंथात बळाचे नाव "सत्य' आणि दुर्बलतेचे नाव "असत्य' असेल.
2) कुटुंब आणि संस्कृतीची सर्व व्यवस्था भोगवादावर आधारलेली असेल. सुखोपभोगाची उत्कट इच्छा सर्व प्रकारच्या नैतिक बंधनांपासून मुक्त होत जाईल. नैतिक आचरणाचे सर्व प्रमाण अशा प्रकारे ठरविले जातील की, जेणेकरून सुखोपभोगाच्या मार्गात अडथळे कमीतकमी राहावेत.
3) अशाच विचारसरणीच्या कला व वाLमयावरसुद्धा पडसाद उमटतील. त्याच्यात नग्नता व विषयवासनांचे घटक वाढत जातील.
4) आर्थिक जीवनात काही जागिरदारी व्यवस्थांचे वर्चस्व राहील, तर कधी भांडवलशाही व्यवस्था तिची जागा घेईल, तर कधी कामगार गोंधळ माजवून आपली हुकूमशाही प्रस्थापित करतील. कोणत्याही परिस्थितीत अर्थकारणाचे नाते न्यायाशी जुळू शकणार नाही. कारण जग व संपत्तीसंबंधी या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत वर्तन अशा कल्पनेवर आधारित असेल की, ते लुटालूट करण्यासाठी पसरलेले एक ताट आहे. त्यावर आपल्या इच्छेनुसार व संधीनुसार ताव मारण्यासाठी ती मुक्त आहे.
मग अशा समाजात माणसांना तयार करण्यासाठी संस्कार व शिक्षणाची जी व्यवस्था असेल ती व्यवस्थासुद्धा जीवनाच्या त्याच कल्पनेशी व त्याच वर्तनाशी सुसंगती राखणाऱ्या स्वभावाची असेल. त्या समाजात येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीच्या मनात जग मानव आणि जगात माणूस म्हणून तीच कल्पना बसविली जाईल ज्या कल्पनेचे मी वर स्पष्टीकरण केले आहे. सर्व माहिती मग तिचा ज्ञानाच्या कोणत्याही शाखेशी संबंध का असू नये. येणाऱ्या नवीन पिढीला अशी मांडणी करून ती माहिती दिली जाईल की, आपोआपच त्यांच्या मनात ती कल्पना रुजेल. मग सर्व संस्कार अशा पद्धतीने घडविले जातील की, त्या पिढीने जीवनात समाजात विलीन होण्यासाठी तयार व्हावे. अशा पद्धतीच्या संस्कार व शिक्षणव्यवस्थेसंबंधी आपणास काही सांगण्याची गरज नाही, कारण आपणा सर्वांनाच याची प्रचिती आली आहे. ज्या विद्यालयांत आपण शिक्षण घेत आहात त्यांची नावे जरी इस्लामिया कॉलेज आणि मुस्लिम युनिव्हर्सिटी असली तरी याच विचारसरणीच्या आधारावर ती चालत आहेत.
हे वर्तन ज्याचे आताच मी आपल्यासमोर स्पष्टीकरण केले आहे, ते निव्वळ अज्ञानाचे वर्तन आहे. सदरहू वर्तन अगदी त्या लहान मुलाच्या वर्तनाच्या स्वरूपाचे आहे जो केवळ आपल्या ज्ञानेंद्रियांच्या निरीक्षणावर विश्वास ठेऊन अग्नीला एक सुंदर खेळणे समजतो. फरक केवळ इतकाच आहे की, तेथे निरीक्षणाची चूक अनुभव घेतल्यानंतर लगेच त्याला जाणवते. कारण ज्या अग्नीला खेळणे समजून तो हात टाकण्याचे वर्तन अंगिकारतो तो उष्ण अग्नी असतो. हात लावताक्षणीच त्याला दाखवितो की मी खेळणे नाही. याउलट येथे निरीक्षणातील चूक दीर्घ काळानंतर उघड होते, किंबहुना बहुतेकांवर तर उघडच होत नाही, कारण ज्या अग्नीवर हे हात टाकतात त्याची ज्वाला सौम्य आहे, परंतु चटका देत नाही तर शतकानुशतके तापवित राहते. तरीपण अनुभवापासून बोध घेण्यास एखादा तत्पर असेल तर जीवनाच्या सदरहू दृष्टिकोनामुळे लोकांच्या बेईमानी, पदाधिकाऱ्यांचे अत्याचार, न्यायमूतvचे अन्याय, श्रीमंताचे स्वार्थ आणि जनसामान्यांच्या दुराचारांचा रात्रंदिवस कटू अनुभव त्याला येत असतो. तसेच याच दृष्टिकोनामुळे व्यापक प्रमाणात जातीयवाद, राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, युद्ध, दंगे व उपद्रव, विस्तारवाद आणि वंश व जातीसंहाराच्या ज्या ठिणग्या पडत असतात, त्यांच्या घावापासून तो या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो की, सदरहू वर्तन शास्त्रोक्त वर्तन नाही तर अज्ञानाचे वर्तन आहे, कारण मानवाने स्वत:संबंधी व सृष्टीसंबंधी जे मत निश्चित करून सदरहू वर्तन अंगिकारले आहे ते वास्तविकतेला धरून नाही. एरव्ही त्याचे वाईट पडसाद उमटले नसते.
आता दुसरी पद्धत पडताळून पाहिली पाहिजे. जीवनाच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणाची दुसरी पद्धत अशी की, प्रत्यक्ष निरीक्षणासह कल्पना व अनुमानाचा उपयोग करून सदरहू प्रश्नांसंबंधी एखादे मत निश्चित केले जावे. या पद्धतीद्वारे तीन प्रकारची मते निश्चित केली गेली आहेत. त्या प्रत्येक मतापासून एका विशिष्ट प्रकारचे वर्तन निर्माण झाले आहे.

 - नसीम गाज़ी
भाषांतर - हुसेनखान चांदखान पठान

अज़ान आणि नमाज़संबंधी लोकांना माहिती नसल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. इस्लामसंबंधीच्या अचूक माहिती अभावी इस्लामच्या या पवित्र आणि कल्याणकारी उपासनापद्धतीच्या बाबतीत बेधडक अयोग्य टीका केली जाते आणि त्याबाबतीत खरी माहिती मिळविण्याचे प्रयत्नसुद्धा केले जात नाहीत. अशावेळी ही बाब अधिक दु:खदायक होते. समाजातील अनेक थरांतील लोक हीच नीति स्वीकारतात, त्यात शिक्षितही आहेत आणि सामान्यजन सुद्धा आहेत.
एकमेकांच्या धर्माबद्दल खरी माहिती नसणे यात आजच्या अनेक सामाजिक अल्लाहप्रती आपली भक्ती दर्शविण्यासाठी, त्याच्या दास्यत्वाची (भक्तीची) कर्तव्ये पार पाडण्यासाठी, त्याच्या उपकाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, अल्लाहच्या श्रेष्ठत्वाची आणि सत्तेची स्वीकृती दर्शविण्यासाठी आणि या सर्व बाबी सतत स्मरणात राहण्यासाठी इस्लामने ज्या उपासनापद्धती निर्धारित केल्या आहेत, त्या सर्वांत महत्ववपूर्ण उपासनापद्धत नमाज आहे. नमाजचे महत्व आणि तिच्या आवश्यकतेचा उल्लेख, कुरआन या अल्लाहकडून अवतरीत झालेल्या ग्रंथात आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या हदीसमध्ये खूप वेळा आला आहे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे इस्लामच्या प्रत्येक अनुयायांवर (स्त्री व पुरुष) बंधनकारक आहे. इस्लामच्या कोणाही अनुयायाने नमाज सोडणे (नमाज अदान करणे) अधर्म ठरविले गेले आहे. नमाजशिवाय इस्लामचा अनुयायी होण्याची कल्‌पनासुद्धा केली जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

आयएमपीटी अ.क्र. 70       पृष्ठे - 16    मूल्य - 6          आवृत्ती - 8 (2014)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/0pdw60sao2yzdl8j1aeij8o84glylr8e

देशाची कसोटी : माणुसकी जीवंत ठेवावी

तुम्ही एकाच आई-वडिलांपासून जन्म घेतलेली सगळी लेकंर. जगात कुठेही वावरा तुमचे प्रश्‍न एक, तुम्हाला जडलेल्या आजारांवरील सर्वांना लागू होणारा औषधीही एकच़़ असचं कोरोना विषाणूने काहीशी परिस्थिती जगातील मानवजातीला दाखवून दिली़ जगातील जवळपास 199 पेक्षा अधिक देशाला कोरोना विषाणूजन्य आजारानं वेढलं आहे़ आत्तापर्यंत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येबाबत माहिती देणार्‍या वडोर्मीटर संकेतस्थळानुसार, जगातील 199 देशांमधील 7 लाख 23 हजार 124 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे एक लाख 48 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी, स्पेनमध्ये एका दिवसात 821 जणांचा मृत्यू झाला. तर 6875 नवे रुग्ण आढळले आहेत. इटलीतही परिस्थिती चिंताजनक असून 756 जणांचा एका दिवसात मृत्यू झाला असून आतापर्यंत 10 हजार 779 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात बुधवारपर्यंत 8 लाख 41 हजार 285 जणांना कोरोना बाधा झाली पैकी 41403 जणांना मृत्यू झाला. उपचाराअंती 176097 बरे झाले. भारतात 1900 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 58 रूग्णांचा मृत्यू झाला तर उपचाराअंती 102 घरी परतले.
    चीन, अमेरिका, युरोपसह अन्य विकसित देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलेले आहे़ उच्च कोटीच्या आरोग्य सुविधा असूनही कोरोनासमोर हे देश हतबल झाल्याचे दिसत आहे़ त्यामानाने भारतात उशीरा का होईना पण कडक अंमलबजावणी आणि योग्य जनजागृती होत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली आहे़ त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचं याबाबत कौतूक झालं पाहिजे़ मात्र लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटून गेली असून, जनमाणस हतबल झाल्याचे दिसून येत आहे़     -
कामगार वर्ग तर पुरता हतबल झाला आहे़ राज्यभरात लाखोंची संख्या कामगारांची आहे़ त्यामध्ये ज्याचे हातावट पोट आहे त्यांची संख्याही लक्षणीय आहे़ राज्यात परराज्यातील आलेल्या कामगारांची तर दयनीय अवस्था आहे़ लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने त्यांनी आपल्या मूळ गावाकडे पलायन करणे सुरू केले आहे़ सर्व वाहने बंद असली तरी अत्यावश्यक सुविधा देणार्‍या वाहनांमधून दाटीवाटीने ते प्रवास करीत आहेत़ तसेच शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत ते गावाकडे जात आहेत़ ही अवस्था बघवत नाही़ खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जिथे आहे तिथे राहण्याची विनंती केली असून, पंतप्रधानांनीही 3 महिने घर मालकांनी भाडेकरूंकडून भाडे घेऊ नये असे विनंती केली आहे़  मात्र तेवढी दयावृत्ती अजून आपल्याकडे आलेली नसल्याने काही ठिकाणी भाडेकरू व्यवसाय, नोकरी बंद असल्याने चिंतातूर झाले आहेत़ देशातील खाजगी नोकरवर्गाचाही जीवात जीव दिसून येत नाही़ एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखत आहोत, याचे समाधान होत आहे मात्र नोकरीवर याचे दीर्घकालीन परिणाम होऊन मोठी हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे़ लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बसले आहेत़ कंपन्या बंद झाल्या आहेत़ त्यामुळे पुढील महिन्यांत अनेकांना पगार मिळेल का नाही याची भीती आहे़ यावर सरसकट काही तरी उपाययोजना होणे अपेक्षित आहे़ मात्र ते होईल, असे सध्यातरी वाटत नाही़ गरीबाना तीन महिन्यांचे राशन देण्याचा आवाहन करण्यात आले असले तरी वितरणाची व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र आहे़  काही जणांकडे राशन कार्ड आहे मात्र राशन दुकानात त्याची नोंद नाही, ऑनलाईन जोडणी झालेली नाही़ अनेकजण तर कधी राशन दुकानाकडे फिरकलेही नाही़ यामुळे सर्व गरजूंपर्यंत राशन पोहचेल का नाही, याची चिंता वाटते़
    पोलीस आणि डॉक्टर्सचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे़ मात्र त्यांना कित्येक असुविधांचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे खाजगी दवाखान्यांनी आपली ओपीडी बंद ठेवली आहे़ कोरोनाचा धसका स्वत: डॉक्टर्सनीही घेतला आहे़ जिथे असुविधा आहेत तेथील डॉक्टर्सनी हॉस्पिटल बंद करणे पसंद केले आहे़ जगभरातून कोरोनामुळे डॉक्टर्सच्या मृत्यूंच्या येणार्‍या बातम्यांनी खाजगी डॉक्टर्स हादरले आहेत़ एकंदर काय तर कोरोनाची ही भीषणता कुठे जाऊन थांबेल, ही बाब सध्यातरी अनिश्‍चित दिसत आहे़  अशात माणुसकीचं नातं जपणं फार गरजेचं आहे़
    भारतात एकत्रित कुटुंबात राहण्याची परंपरा जुनीच आहे़ त्यामुळे सर्व लोक कधीनाही तेवढे घरात जमले आहेत़ ते एकमेकांचे जमत नसले तरी जमवून घेत आहेत़ आपुलकीची भावना निर्माण झाली आहे़ मात्र सोशल डिस्टन्सचं अंतर पाळणं कठीण जात आहे़ एकत्रित कुटुंबातील एखादाही व्यक्ती शिंकला, खोकलला की संशयाच्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जात आहे़ शासनानं एक बरं केलं की कोरोनाबाधिताची नावे जाहीर केली नाहीत़ अन्यथा त्या परिवाराशी लोकांनी संपर्कच ठेवणं बंद केलं असतं़ पुणे, मुंबई असो की परदेशातून आलेले नागरिक प्रत्येकाकडे संशयाची सुयी जात आहे़ त्यामुळे त्या लोकांनी स्वत:ची तपासणी करून होम कोरंटाईन करून घेतले पाहिजे़ कुठेही बाहर फिरले नाही पाहिजे़
    धार्मिक कार्यक्रम, स्थळे सर्वच तात्पुरते बंद करण्यात आले आहे़ काहींनी स्वत:हून बंद केले आहेत तर अजूनही काही आडमुठे लोक एकत्रित जमा होत आहेत़ अशा भीषण परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे़ कोरोना संसर्गजन्य आणि गुणाकार पद्धतीने पसरणारा आजार आहे़ त्यामुळे या भयंकर महामारीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे़ त्यासाठी आयसोलेशन शिवाय दूसरा मार्ग नाही.
    कोरोनाने जगभरातील माणसांच्या चेहर्‍यावरचं हास्य ओरबडून घेतलं आहे़ प्रत्येक व्यक्ती चिंताग्रस्त आहे़ अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडताना कुटुंबियांचा जीव भांड्यात पडत आहे़ आनंदाचं हसणं घरातील व्यक्ती विसरल्या आहेत़ सर्व जग धावत असताना कोरोनाने जगाला अचानक ब्रेक लावल्यामुळे प्रत्येकाला इच्छा नसताना घरात रहावं लागत आहे़ जेव्हा इच्छा नसताना कुठलीही गोष्ट केली जाते तेव्हा तेथे विनाकारण वाद उद्भवतात़ तीच परिस्थिती आज मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत़  अशा भीषण परिस्थिती माणुसकीचं, प्रेमाचं, एकात्मतेचं आणि वात्सल्याच दर्शन घडणे गरजेचे आहे़ आज मोठ्या प्रमाणात देशात सामाजिक संस्था, संघटना गरीबांपर्यंत अन्नधान्य व जेवण पोहोचते करत आहेत.  ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. अशांची संख्या कमी आहे मात्र सरकारकडून कामगार, गरीबांपर्यंत अन्नधान्य आणि जेवण पोहोचविण्यासाठी मोठी पावले उचलणे गरजेचे आहे़ येणारा काळ महाभयंकर राहणार आहे़ कामगारांच पलायन वाढलं आहे़ जगण्या-मरण्याची भीतीने मानसिक आजार जडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे कोरोनाचा सामना घरात राहून, सोशल डिस्टन्स पाळून करणं हेच उत्तम़

- बशीर शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget