Latest Post

जर इस्लामी शिकवणींचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे खालील अधिकार आढळून येतात.

1) एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे.
    अरबांच्या काही जमातीतील लोक आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. कुरआनने त्या मुलींना जिवंत राहण्याचा अधिकार दिला आणि म्हटले की, जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जाब द्यावा लागेल. कुरआनोक्ती आहे,
    "तो क्षण आठवा, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली?''    (दिव्य कुरआन, 81 : 8-9)
2)    इस्लामनुसार प्रत्येक मुलास त्याच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि आपल्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवला जाऊ नये, या नैतिक व वैधानिक अधिकारांसह तो जन्म घेत असतो. पवित्र कुरआनचा असा आदेश आहे,
    "ज्या मातापित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपानकाल पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी - आपल्या मुलांना पूर्ण दोन वर्षे स्तनपान करावे. अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पध्दतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.''    (दिव्य कुरआन, 2 : 233)
3)    इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभसूचना दिली आहे.
4)    इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास व संरक्षकास निश्चितच महत्त्व दिले आहे. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की विवाह त्या मुलींच्या परवानगीनेच होईल. जर महिला विधवा वा घटस्फोटिता असेल तर स्पष्टपणे आपली मान्यता व्यक्त करील आणि कुमारिका असेल तर तिच्या मौनास मूक संमती समजली जाईल. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
    "जोपर्यंत विधवा व घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारिकेची अनुमती घेतल्याशिवाय तिचा विवाह होणार नाही.''    (हदीस)
5)    इस्लामने "महर' (लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची कबूल केलेली रक्कम) ला महिलेचा अधिकार म्हटले आहे आणि पुरुषास असा आदेश दिला आहे की,
ज्या महिलेशी त्याचा विवाह होईल, त्याने कोणत्याही परिस्थितीत "महर'ची रक्कम तिला देणे अनिवार्य राहील. "महर'विना विवाह वैध नसेल. कुरआनने स्पष्ट शब्दांत घोषणा केली आहे,
    "स्त्रियांना "महर' (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा.''            (दिव्य कुरआन, 4 : 4)
    विवाहप्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने वा संपत्ती इ. देणे अनिवार्य आहे, ज्यास "महर' म्हटले जाते. "महर' उधारदेखील असू शकतो. परंतु तो निश्चित करणे अनिवार्य असते. "महर' स्त्रीची स्वत:ची संपत्ती आहे, तिला त्यावर पूर्ण अधिकार आहे. तिच्या संरक्षकाचा त्यामध्ये कसलाही अधिकार नाही.
6)    इस्लाम स्त्रीचे पालनपोषण करण्याचा अधिकार मान्य करतो. विवाहापूर्व मुलींच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी तिच्या पित्यावर असते आणि विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी तिच्या पतीवर येते. जर महिला श्रीमंत असेल तर तिच्याकरिता पती नोकरसुध्दा ठेवील. जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित नसेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते. हा तिचा वैधानिक अधिकार आहे आणि पतीने तो पूर्ण करणे आवश्यक आहे.
7)    इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग-धंद्याचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. तिला व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व कारागिरी, नोकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता व लेखनकार्य- सर्व वैध कार्य करण्याची अनुमती आहे. त्यासाठी ती घराच्या बाहेरदेखील पडू शकते, परंतु कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कसलाही बिघाड वा बाधा निर्माण होऊ नये आणि तिच्या स्थिरतेत विघ्न निर्माण होऊ नये, याकरिता तो (इस्लाम) तिच्यावर काही बंधने अवश्य लावतो.
8)    इस्लामने धन-संपत्तीत स्त्रीच्या मान्यतेसंबंधीच्या अधिकारास मान्य केले आहे आणि त्यातील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपास अनुचित व अवैध ठरविले आहे. ज्याप्रमाणे मिळकतीचा हक्क पुरुषाला आहे अगदी तसाच अधिकार स्त्रीलादेखील आहे. कुरआनचा आदेश आहे,
    "जे काही पुरुषांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे स्त्रियांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे.''     (दिव्य कुरआन, 4 : 32)
    वारसाहक्काबाबत कुरआन म्हणतो,
    "पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडिलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे.''        (दिव्य कुरआन, 4 : 7)
9)    इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मोठी मौल्यवान संपत्ती आहे. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. एखाद्या स्त्रीच्या सतीत्वावर आक्षेप घेणे आणि तिच्यावर व्यभिचार व चरित्रहीनतेचा आरोप करणे इस्लामच्या दृष्टिकोनातून हे सर्व मोठे अपराध व गंभीर गुन्हे आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माणसाला नष्ट करणाऱ्या सात गुन्ह्यांपैकी एकाचा उल्लेख असा केला आहे.
    "उत्तम चारित्र्यवान, श्रध्दावंत, भोळ्या-भाबड्या स्त्रियांवर मिथ्या आरोप करणे.''
    इस्लामने कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या निर्दोष स्त्रीवर व्यभिचार व चरित्रहीनतेचा मिथ्या आरोप करील त्याला ऐंशी फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये.
10) इस्लाम स्त्रीस समीक्षा व आपले मत व्यक्त करण्याचादेखील अधिकार प्रदान करतो. कुरआनने पुरुष व स्त्री दोघांना चांगुलपणाचा आदेश देण्याचा आणि कुकृत्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे. कुरआनोक्ती आहे,
    "ईमानधारक पुरुष व ईमानधारक स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.''            (दिव्य कुरआन, 9 : 71)
यामध्ये धर्माचा प्रसार-प्रचाराचे, समाजाच्या विकासाचे कार्य, वैचारिक व प्रशासकीय विद्वान आणि अधिकाऱ्यांचे समीक्षा, टीका-टिप्पणी सर्व काही येते. स्त्रीने आपल्या मर्यादेत राहून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे हे तिचे कर्तव्य आहे.

लेखक    :    डॉ. फजर्लुरहमान फरीदी
अनुवाद    :    प्रा. अब्दुर्रहमान शेख


मुस्लिमांचा हा दृढविश्वास आहे की इस्लाम हा प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करतो. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु दुर्देवाने योग्य दृष्टीकोनाचा अभाव आहे. मुस्लिम हे अशा स्थितीत वागण्याबद्दलचे मार्गदर्शन नीटपणे समजून घेण्यास उत्सुक दिसत नाही. परिणामत: फक्त मुस्लिम समाजाचीच हानी होत नाही तर इस्लामची प्रतिमा मलिन होते आणि प्रमुख हेतुला मोठी हानी पोहचते.
वैविध्यपूर्ण समाजातील आज्ञाधारक जीवन व्यवहार पार पाडणे सामान्य मुस्लिमांना अधिक जड जाते. मुस्लिम व्यक्तीला सतर्क राहावे लागते कारण त्याच्या प्रत्येक जीवन व्यवहाराने एक संदेश जातो. त्याने आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारात इस्लामी शिकवणींचा अवलंब केला तर तो इस्लामचे योग्य चित्र इतरांपुढे ठेवत जातो. नाहीतर त्याच्या द्वारे इस्लाम बद्दल एक चुकीचा संदेश इतरांना पोहचतो. ह्यापेक्षा अधिक वाईट गोष्ट दुसरी असूच शकत नाही.
ह्या विद्वत्ता पूर्ण ग्रंथाद्वारे सुशिक्षित मुस्लिम व्यक्तीला काय करावे आणि काय करू नये याचे ज्ञान होते आणि सर्वसामान्य मुस्लिमांसाठी सुध्दा ते उपयुक्त ठरते.

आयएमपीटी अ.क्र. 109       पृष्ठे - 80    मूल्य - 20          आवृत्ती - 1 (2004)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/mioryvqvbgnduxfxnyh5hws6gf1435yw


पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. जगभरातील तब्बल १८० कोटी मुस्लिम बांधवांना इतिहासात प्रथमच एक अनोखा रमजान साजरा करण्याचे खडतर आव्हान असणार आहे.
एक मात्र खरे की बहुतांशी सर्व मुस्लिम राष्ट्रे तसेच युरोपमधील ब्रिटन, तुर्कस्थान असो की सौदी अरेबिया, इराण, इजिप्त तसेच मलेशिया, इंडोनेशिया ह्यांनी एकमताने कोरोनामुळे होणाऱ्या धार्मिक रूढी, परंपरांमध्ये बदल स्वीकार केला असून लागलीच कार्यवाहीदेखील अमलात आणली आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.
रमजान म्हणजे खरे तर शांतीचा संदेश देणारा महिना. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने जे जगभर थैमान घातले आहे त्यामुळे सर्व जगात लॉकडाउन आहे. जगातील मक्का, मदीनासह ब्रिटन, टर्की, मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रातील सर्व मस्जिदी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
रोजच्या नमाजबरोबर पवित्र रमजान महिन्यातील तरावीहची विशिष्ट नमाज कुठे अदा करावी? याबाबत भारतातील मुस्लिम विशेषता खेड्यापाड्यांतील अशिक्षित मुस्लिम बांधव मात्र संभ्रमात आहेत. यापूर्वी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे कर्नाटकातील मुस्लिम बांधवांना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले, तेही मस्जिदीमध्ये. याहून आमच्या समाजाचे दुर्भाग्य ते काय असू शकते? आम्हीदेखील या घटनेला जबाबदार आहोत. अशा घटना केवळ पाहून चालणार नाही. या रमजान महिन्यात अशी एकही घटना घडणार नाही यासाठी मात्र सर्वांनी सतर्क राहाण्याची आणि एकमेकांना आधार व मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्व मुस्लिमांनी तरावीह नमाज घरातच अदा करावी, असे स्पष्ट संकेत "FIQH RULING SPERTAINING TO PERFORMING THE TARAWIH PRAYER IN OUR HOMES" या प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शेख सुलेमान अर् रूहाली जे इस्लामिक विद्यापीठ, मदीनाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि काबा मस्जिद, मदीनाचे इमाम म्हणून कार्यरत आहेत.
काय म्हटले आहे या अहवाल मध्ये?
१- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये तरावीह नमाज अदा केली होती आणि यावर्षी कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
२- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये काही कारणास्तव तरावीह नमाज अदा केली नव्हती आणि या वर्षी मस्जिदीमध्ये तरावीह नमाजसाठी निश्चय केला असेल परंतु कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
३- घरात अदा केलेली तरावीह नमाजलादेखील सुन्नह म्हणून गृहीत धरले जाईल.
४- एकाच कुटुंबातील व्यक्तींनी घरामध्ये सोशल डिस्टन्सिंगनुसार सामूहिक नमाज अदा करावी.
५-एकट्यानेदेखील तरावीह नमाजला मान्यता आहे, परंतु घरातील सर्वांनी त्यात सामील होताना सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास त्यास अधिक प्राधान्य असेल.
या काळात बुद्धिजीवी मुस्लिमवर्ग, वैचारिक संघटना, सेवाभावी संस्थांनी प्रामुख्याने पुढे येऊन सामान्य मुस्लिम बांधवांचे प्रबोधन करण्याची अत्यंत गरज आहे.
या रमजानच्या काळात मुस्लिमांना खालील जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. ज्या महाराष्ट्र शासनाने बंधनकारक ठरविल्या असून तसे आदेश दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहेत.
१- कोणत्याही परिस्थित मस्जिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी हजर राहू नये.
२- घरच्या /इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
३- मोकळ्या मैदानावर /ईदगाह येथे एकत्र जमून नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
४- घरातच नमाज, तरावीह आणि इफ्तार कार्यक्रम पार पाडावेत.
खरे तर कोरोनाचे आव्हान आम्ही सकारात्मक स्वीकारले तर अनेक बाबी उलघडू लागतात. या रमजानचा विचार केल्यास ‘वर्क फ्रॉम होम’प्रमाणे ‘नमाज फ्रॉम होम’ हे सर्व जण स्वीकारत आहेत. त्याचबरोबर कुरआनचे पठण यापूर्वी वेळ नसलेल्यांना लॉकडाऊनमधील फावला वेळ सत्कारणी लावता येणार आहे. हा रमजान म्हणजे न भूतो न भविष्यती असाच असणार आहे. प्रत्येकाच्या जीवनातील हा पहिलाच अकल्पित असा प्रसंग अनुभवावा लागणार आहे. रोजा स्वत: उपाशीपोटी राहून इतरांची भावना ओळखण्याबरोबर निराधार, गरीब मजूर यांच्या पोटासाठी धावून जाणे शिकवत आहे. या कोरोनाने आमचे रियल हिरो हे चित्रपटातील कलाकार, खेळांमधील आंतरराष्ट्रीय नावाजलेले खेळाडू नसून आजमितीला आमच्या जीविताचे रक्षण करणारे हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स असो की पोलीस कर्मचारी किंवा शेतात राबणारे शेतकरी हेच आमचे देवदूत असणार आहेत हे सिद्ध होते.
कोरोनामुळे रमजान दैनदिनीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. जगभरातील बहुतांशी मस्जिदींतील समित्यांनी गरजूंच्या सेवेसाठी  वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. या काळात अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी, इफ्तारच्या माध्यमातून अन्न पदार्थांचे पॅकेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची योजना आखली आहे. भारतामध्येदेखील जमाअत-ए-इस्लामी हिंद ही सामाजिक संघटना दरवर्षी गरीब, निराधार व गरजूंपर्यंत रमजानच्या काळात अन्नपदार्थ व जीवनावश्यक वस्तू पोहोचवत असतेच. आता मात्र प्रत्येक गावागावांमधील मस्जिदींच्या समित्या असतील, मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीने, सेवाभावी संस्थांनी रस्त्यावरील गरीब, मजूर, निराधार यांच्यापर्यंत अन्नदान आपआपल्या परीने नियोजनबद्धरीत्या पोहोचवले पाहिजे. त्याचबरोबर अहोरात्र सेवेसाठी झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न केला तर उत्तमच...!
या कामी कॉर्पोरेट व्यवस्थापनासारखे तंत्र अवलंबणे महत्त्वाचे ठरेल. कालानुरूप सर्वांना बदलावे लागणार आहे. उदा. मस्जिदीच्या परिघात किती मुस्लिम कुटुंब राहातात त्यांची यादी कुटुंबप्रमुख, कुटुंबातील एकूण लोकांची संख्या, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यासह समाज सुधारणेसाठी ते कुटुंब काय योगदान देऊ शकते? याचा आढावा घेतला पाहिजे. या सूचीवरुन नेमके गरजू शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल. केवळ पैसाच नव्हे तर एखाद्या मुस्लिम मानसोपचारतजज्ञाचा समुपदेशांनासाठीदेखील मोठा उपयोग होईल. एखाद्या तरुणाचा त्याच्या क्षमतेचा उपयोग दुसऱ्याच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी होऊ शकेल.
कोरोनामुळे अनेक बुद्धिजीवी वर्गातील घटक एकत्र येऊ लागले आहेत. सर्वप्रथम मुस्लिम पत्रकारांना एकत्र येऊन सध्याचा काळात मुस्लिमांवर लागणारे दोषारोप कसे दूर करता येतील यासाठी पुढाकार घेऊन काम करावे लागणार आहे. मुस्लिम समाजात हळू हळू बदल घडू लागले आहेत, ही जमेची बाजू असली तरी सर्व बुद्धिजीवी घटकांनी मोठ्या प्रमाणात पुढे येणे काळाची गरज ठरणार आहे. पत्रकारांसोबत डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजीनियर्स, शासकीय सेवेतील अधिकारी यांचे स्वतंत्र ग्रूप तयार होऊन प्राथमिक स्वरुपात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर महाराष्ट्र असे सुरू करावेत. तीन महिन्यांतून या सर्व ग्रुपनी एकत्र जमा होऊन विचारांची देवाणघेवाण अर्थात ‘थिंक-टँक’ बनवावेत. समाजातील उपेक्षित जे घटक आहेत ज्यांना पैशाची, कर्जाची गरज भासते, तसेच शिक्षणासाठी गुणवत्ता असूनदेखील प्रवेशाला मुकावे लागते, अशांसाठीही इस्लामिक बँक प्रणाली महत्त्वपूर्ण ठरू शकते. या कामी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज आणि निवृत्त शिक्षित मुस्लिमांचा मोठा हातभार लाभू शकतो. गावागावांतील सर्वांनीच एकजुटीने समाज सुधारणेसाठी (टीमवर्कने) काम करणे अपेक्षित आहे. या कामी धर्मगुरू, उलेमा, जमाअतचे सहकार्यदेखील मोठी दिशा देऊ शकते.
रमजानच्या निमित्ताने दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे इफ्तार पार्टी, त्यासाठी लाजवाब पदार्थ हे सर्वत्र पाहावयास मिळतात. परदेशीच काय पण भारतामध्ये शहरांमधून सर्रास स्टॉल लावले जातात. मुस्लिमच नव्हे तर इतर धर्मीयदेखील या खाद्य पदार्थांचा मोठ्या आनंदाने आस्वाद घेत असतात. या वर्षी मात्र या सर्व बाबींना मुकावे लागणार आहे.
परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मुस्लिम राष्ट्रांमधून तसेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रिटन, फ्रान्समध्ये रमजान इफ्तार स्टॉल्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्देश सोशल डिस्टन्सिंग हाच होय. यामुळे मात्र केटरिंग व्यवसाय धोक्यात आला असून वर्षभरातील ३० ते ४५ टक्के रमजानमध्ये होणारा व्यवसाय लयास गेला आहे.
या रमजानमध्ये खरे गरजू शोधून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. प्रत्येक मुस्लिम कुटुंबाने किमान एका व्यक्तीसाठी दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचे सत्कर्म जरी घडवून आणले तरी हजचे पुण्य पदरी पडल्याचे भाग्य मिळू शकेल.
नमाजपूर्वी अजान देण्याच्या माध्यमातून मस्जिदीत प्रार्थनेकरिता येण्याचे आवाहन करण्यात येते. आता मात्र या कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी अजानमधून ‘घरातच नमाज अदा करा’ किंवा ‘जिथे असाल तिथेच नमाज अदा करा’ असे बदलाचे सुतोवाच संपूर्ण जगभरातून विशेषता मुस्लिम राष्ट्रांत स्वीकारण्यात आले आहे. ही खरोखरच इस्लामध्ये धार्मिक विधींबाबत विशिष्ट प्रसंगी सवलतीची पोचपावती म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
मुस्लिमांना मानवसेवा करण्याची इतिहासातील ही अनोखी संधी कोरोना अर्थात रमजानच्या निमित्ताने चालून आली आहे, तिचा सकारात्मकदृष्ट्या स्वीकार हा करावाच लागेल!

- अस्लम जमादार

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे मुस्लिम महिलांनो! एखाद्या शेजारणीने आपल्या शेजारणीला भेटवस्तू दिल्यास ते तुच्छ समजू नये, मग  ते एक बकरीचे खूर का असेना!’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
महिलांचा स्वभाव असा असतो की एखादी क्षुल्लक वस्तू आपल्या शेजारणीच्या घरी पाठविणे तिला आवडत नाही. त्यांची इच्छा असते की त्यांच्याकडे एखादी चांगली वस्तू पाठवावी. म्हणून पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी महिलांना उपदेश केला आहे की लहानात लहान भेटवस्तूदेखील आपल्या शेजारणीकडे पाठवा आणि ज्या महिलांकडे शेजाऱ्यांकडून भेटवस्तू आली आणि ती क्षुल्लक असेल तरीही  ती प्रेमाने स्वीकारली पाहिजे. त्यास तुच्छ समजू नये आणि त्यात कसलीही खोट काढू नये.

माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझे दो शेजारी  आहेत. त्यांच्यापैकी कोणाकडे भेटवस्तू पाठवू?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्या शेजाऱ्याकडे ज्याचा दरवाजा तुमच्या दरवाज्यापासून जवळ असेल.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण
शेजाराचा परीघ आसपासच्या चाळीस घरांपर्यंत आहे आणि त्यांच्यापैकी सर्वात जास्त हक्कदार ते आहेत ज्यांचे घर सर्वांत जवळ असेल.

माननीय अब्दुर्रहमान बिन अबू किराद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह व पैगंबर (स.) यांनी आपल्यावर प्रेम करावे असे ज्या मनुष्याला वाटत असेल  त्याने संभाषण करताना खरे बोलावे, जर त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली असेल तर ती त्या ठेवीच्या मालकाला त्याने सुखरूप परत करावी आणि त्याने आपल्या शेजाऱ्यांशी चांगला व्यवहार  करावा.’’ (हदीस : मिश्कात)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘अमुक महिला खूपच जास्त ऐच्छिक (नफ्ल) नमाज अदा करते, ऐच्छिक रोजे करते आणि दान  देते आणि त्यामुळे ती प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या शेजाऱ्यांना आपल्या वाणीने त्रास देते.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती नरकात जाईल.’’ तो मनुष्य पुन्हा म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अमुक महिलेच्या  बाबतीत म्हटले जाते की ती कमी प्रमाणात ऐच्छिक रोजे करते आणि खूपच कमी प्रमाणात ऐच्छिक नमाज अदा करते आणि पनीरचे काही तुकड्यांचे दान (सदका) देते, मात्र आपल्या वाणीने   शेजाऱ्यांना त्रास देत नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती स्वर्गात जाईल.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
पहिली महिला नरकात जाईल कारण तिने अल्लाहच्या दासांच्या अधिकारांचे हनन केले आहे. शेजाऱ्याला त्रास न दिला जावा हा त्याचा हक्क आहे आणि तिने हा हक्क अदा केला नाही आणि  जगात तिने आपल्या शेजाऱ्यांची क्षमादेखील मागितली नाही म्हणून तिला नरकातच जावे लागेल.

माननीय उकबा बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,  ‘‘ज्या दोन व्यक्तींचा खटला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वप्रथम सादर करण्यात येईल त्या
शेजारी असतील.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
अंतिम निवाड्याच्या दिवशी (कयामतच्या दिवशी) अल्लाहच्या दासांच्या अधिकारांच्या बाबतीत सर्वप्रथम अल्लाहसमोर दोन व्यक्ती सादर होतील. त्या जगात एकमेकांच्या शेजारी असतील आणि  एकाने दुसऱ्याला त्रास दिला आणि अत्याचार केला असेल. या दोघांचा खटला सर्वप्रथम सादर होईल.

येत्या दोन दिवसात रमजानचे आगमन होत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र इतर वर्षांप्रमाणे या वर्षाचे रमजान वेगळे असून, संपूर्ण लॉकडाउनमध्ये रमजानचा महिना आलेला आहे. हा महिना कसा साजरा करावा, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वेही ठरवून दिलेली आहेत. देशाचा कायदा पाळण्याचा आदेश आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीतून मिळतो. म्हणून शारीरिक अंतर राखून लांब राहून हे रमजान साजरे करावे लागणार आहेत. म्हणून पाचवेळेसची नमाज आणि तरावीहची विशेष नमाज मस्जिदमध्ये जावून अदा करणे यावर्षी शक्य होणार नाही, याची खंत आपल्या सर्वांनाच आहे. मात्र कोरोनाला हरविण्यासाठी हृदयावर दगड ठेउन आपल्याला मस्जिदीपासून लांब रहावे लागणार आहे. रमजान म्हटलं की, सार्‍यांची लगबग असते. मार्केटमध्ये प्रचंड उलाढाल होते. रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत असते. वेगवेगळे चमचमीत पदार्थांनी हॉटेल आणि गाडे सजलेले असतात. यावर्षी मात्र असे काहीच होणार नाही. एका दृष्टीने जरी हिरमोड करणारी ही परिस्थिती असली तरी दुसर्‍या दृष्टीने आत्मचिंतन करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एकांतामध्ये अभ्यास चांगला होतो. रमजानमध्ये कुरआनला समजण्यासाठी एकांताममध्ये अभ्यास करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एरव्ही तर कुरआन समजून घेण्याला अनेक लोकांना वेळ नसतो. पण आता ही वेळ चालून आलेली आहे. म्हणून प्रत्येकाने ही संधी सोडू नये. कारण कोणी काहीही म्हणो, कुरआन हीच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे.
    अल्लाहवर विश्‍वास ठेवणार्‍या प्रत्येक नागरिकासाठी ही एक चारित्र्यसंवर्धनाची संधीच आहे. आज भारतामध्ये पाश्‍चात्य असभ्यतेचा प्रभाव खोलपर्यंत रूजलेला आहे. पावलापावलावर खोटेपणा, विश्‍वासघातकीपणा, अश्‍लिलता इत्यादी विकारांनी थैमान घातलेले आहे. चांगल्या माणसांना जगणे मुश्किल करून टाकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांचे हे राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे कि, आपल्या प्रिय देशबांधवांपर्यंत सत्य आणि चांगुलपणाचा संदेश पोहोचविणे. रमजान म्हणताच सगळीकडे एक चैतन्याचे वातावरण निर्माण करते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना रोजे ठेवण्याचा उत्साह असतो. दिवसभर उपाशी राहून इबादत केल्याने एका वेगळ्याच आत्मीक आनंदाची अनुभूती होते. वर्षभर जे लोक इस्लामी उपासनेपासून अंतरराखून असतात ते सुद्धा रमजानच्या महिन्यामध्ये मनापासून इबादत करण्यामध्ये तल्लीन होतात. अनेक लोक ठरवून सुट्ट्या घेतात व या 30 दिवसाच्या तजकिया-ए-नफ्स (आत्म्याचे शुद्धीकरण) मोहिमेमध्ये उत्साहाने सहभागी होतात. तसे पाहता प्रत्येक समाजामध्ये उपवास ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. मात्र रमजानमधील रोजे हे इतर उपवासापेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे असतात. सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पेय आणि पदार्थाचे सेवन न करता राहणे हे केवळ आत्मीक बळानेच शक्य होते. नसता दुपारच्या जेवणाला तासभर उशीर झाला तर सहन होत नाही. रमजानमध्ये मात्र महिनाभर दिवसभर उपाशी राहूनसुद्धा माणसे शांत राहतात. सर्वश्रेष्ठ अल्लाहनी माणसाची रचना दोन गोष्टींपासून केलेली आहे. एक त्याचे शरीर आणि दूसरे त्याची आत्मा. शरीर रक्त, मांस, हाडे यांच्यापासून बनलेले आहे व दृश्य आहे. (उर्वरित  मात्र आत्मा अदृश्य आहे. आत्म्याच्या बाबतीत कुरआनमध्ये म्हटलेले आहे कि, हा आत्मा म्हणजे ’अम्र-ए-रब्बी’ म्हणजेच अल्लाहचा आदेश आहे. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याप्रमाणे आत्मा सुद्धा आजारी पडतो. ज्याप्रमाणे शरीराला पोषणाची गरज असते त्याप्रमाणे आत्म्यालाही पोषणाची गरज असते. शरीराचे पोषण अन्न, पाण्याने होते तर आत्म्याचे पोषण इबादते इलाही(अल्लाहच्या उपासने) ने होते. आणि उपासनेचा उत्कृष्ट आविष्कार नमाज आणि रोजा आहे. रोजा ही एक अदृश्य इबादत आहे. एखाद्या माणसाने रोजा ठेवला म्हणजे स्वखुशीने त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. कोणासाठी? फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहासाठी. म्हणजे रोजा एक अशी इबादत आहे, ज्याचा संबंध अल्लाह आणि त्याचा बंदा दोघांमध्येच आहे. नमाजला जात असतांना सगळे लोक पाहत असतात. पण रोजा आहे का नाही? हे लोकांना कळत नाही. हे फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहला कळते. रोजामुळे तक्वा (चांगले चारित्र्य) वाढतो. लहापणापासून मुस्लिम मुलांना रोजा ठेवण्याची सवय लावली जाते. त्यातून त्यांचे चारित्र्य घडते, ते असे की- लहान मुले जेव्हा रोजा ठेवतात तेव्हा ते अल्लाहला घाबरून संधी असूनही पाणीही पीत नाहीत आणि जेवणही करीत नाहीत. समजा त्यांनी लपून घोटभर पाणी पीले तरी त्यांना कोणी पाहणारा नसतो. मात्र ते स्वमर्जीने अल्लाह पाहत आहे, म्हणून पाणी पीत नाहीत. यात त्यांच्या आत्म्याचे प्रशिक्षण होते. अल्लाहचे भय मनात निर्माण होण्यासाठी मदत होते. हीच मुले मोठी हाऊन देशाचे नागरिक बनतात आणि अल्लाहच्या भयाने वाम मार्गापासून दूर राहतात. लहानपणी जर का पूर्वजाद्वारे व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले नाहीत तर हीच मुले मोठी झाल्यावर वाईट गोष्टींच्या प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. रोजाचा मूळ उद्देशच चारित्र्य संवर्धन असल्यामुळे या महिनाभरात रोजदारांकडून कसून मेहनत घेतली जाते. भल्या पहाटे उठून मर्जी नसतानांनाही, भूक नसतांनाही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून काहीतरी खावं लागतं. त्यानंतर दिवसभर इच्छा असूनही, भूक असूनही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून अन्न आणि पाण्यासारख्या एरव्ही हलाल असलेल्या गोष्टींपासून दूर रहावे लागते. परत त्यात पाच वेळेसची नमाज आली. त्याशिवाय, 20 रकात अतिरिक्त तरावीहची नमाज आली. म्हणजे एकंदरित इबादतीचा भरगच्च कार्यक्रम असतो . मात्र यावेळेस सामुहिक नमाज वगळता बाकीचे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पाडता येवू शकतात. त्यातही शासकीय निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. 30 दिवसाच्या सततच्या या खडतर जीवन व्यवस्थेमुळे माणसाला एवढी उर्जा मिळते की, पुढच्या रमजानपर्यंत ती टिकते. पुढच्या रमजानपर्यंत 11 महिन्याचा जो काळ असतो त्या काळात येणार्‍या वेगवेगळ्या प्रलोभनांना रोजातून मिळालेल्या उर्जेमुळे मुस्लिम व्यक्ति बळी पडण्याची शक्यता कमी असते. रोजाच्या संदर्भात नुसते उपाशी राहून उपयोग नाही. यासंबंधी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे, रोजा फक्त उपाशी राहण्याचे नाव नाही. तर डोळ्याचा रोजा, हाताचा रोजा, पायाचा रोजा, कानाचा रोजा सर्वार्थाने रोजा म्हणजे रोजा ठेवणार्‍याने डोळ्यांनी वाईट पाहू नये, हाताने वाईट करू नये, त्याची पावले वाम मार्गाकडे उठू नये, कानांनी वाईट ऐकू नये, कोणाशी भांडू नये, कोणी भांडायला आला तर त्याला नम्रपणे सांगावे की मी रोजात आहे. एकंदरित ही एक महिन्याची पवित्र जीवनपद्धती रोजा ठेवणार्‍या व्यक्तिस एवढी आत्मीक शक्ती प्रदान करते की, समाजासाठी ती व्यक्ति उपयोगी होवून जाते. आज समाजामध्ये राहणारे अनेक लोक समाजहिताच्या विरूद्ध वागताना दिसून येतात. त्यांचे अस्तित्व समाजासाठी उपकारक ठरण्याऐवजी अपकारक ठरत असते. रोजाच्या माध्यमातून आदर्श व्यक्तिंची निर्मिती करावी, ज्यायोग्य एक आदर्श समाजाची रचना होईल, हाच उद्देश आहे. शऊरी (समजून उमजून) पद्धतीने रोजा ठेवणे यासाठी प्रचंड माणसिक तयारीची गरज लागते. तर मित्रांनों! या दोन दिवसात आपली मानसिक तयारी करून घ्या आणि रमजानच्या स्वागतासाठी तयार व्हा.

- बशीर शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget