Latest Post

रोजे अर्थात उपवासाची संकल्पना सर्वच धर्मात आहे, मात्र रमजानचे रोजे थोडेशे वेगळे आहेत. यामध्ये सुर्योदयापूर्वी जेवण करणे अपेक्षित आहे तर सूर्योदयानंतर जेवण करण्याची परवानगी आहे. दरम्यानच्या 14 तासाच्या काळात काही सुद्धा खाण्यापिण्याची परवानगी नाही. हे रोजे सतत 30 दिवस ठेवणे अनिवार्य आहे. रोजांचा हा काळ शरिराची अत्यंत कठोर परीक्षा घेणारा असतो. मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक हे खडतर रोजे जरी लिलया ठेवत असले तरी मुस्लिमेत्तर बंधूंना त्याचे नवल वाटते. काहींचा असा ही अंदाज असतो की येवढे खडतर रोजे ठेवल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असावा. म्हणून आज याच विषयावर चर्चा करूया.
    मुळात रोजा ठेऊन जो उद्देश साध्य करावयाचा आहे तो शारीरिक नसून मानसिक आहे. तथापि मानसिक फायद्यांबरोबर रोजांचे अनेक शारीरिक फायदे ही आपोआप प्राप्त होतात हे ओघानेच आले. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” हे श्रद्धावंत मुस्लिमानों ! तुमच्यावर रोजे अनिवार्य करण्यात आलेले आहेत ज्या प्रमाणे तुमच्या अगोदरच्या प्रेषितांच्या समुदायांवर अनिवार्य केले गेलेले होते. यामुळे आशा आहे की, तुमच्यामध्ये तक्वाचे (चारित्र्याचे) गुण उत्पन्न होतील.”  (सुरे बकरा आयत नं.183).
    याचा अर्थ रोजे मुसलमानांमध्ये चांगले चारित्र्याला आवश्यक असणारे गुण निर्माण करतात. ते गुण कसे निर्माण होतात? हा आजाचा विषय नाही, म्हणून आपण तो सोडून देऊ. आजचा विषय रोजांमुळे आरोग्याला काय फायदे होतात? हा आहे. 

    शारीरिक फायदे
    1. वजन कमी होते : सतत एक महिना नियमितपणे 14 तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाल्ल्याने शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
    2) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो : अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची मात्र सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो.
    3) पचनक्रिया मजबूत होते : आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास 32 वेळा चाऊन खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. त्यांना एवढे सुद्धा कळत नसते की घास खूप चाऊन त्याची पेस्ट करून पोटात ढकलायचा असतो, कारण दात तोंडात असतात पोटात नाही. नशा करणार्‍या लोकांबद्दल तर काही बोलायला नको. जरी दारू सेवनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत असली तरी त्यामुळे स्वत:च्या पचन संस्थेला जबर नुकसान सोसावे लागते. घास व्यवस्थितरित्या चर्वन न करण्याची सवय ही सामान्य सवय आहे. म्हणून अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले जात असल्याने पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त तान पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला स्वत:च्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात पचन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने 14 तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अ‍ॅडीपोनेक्टिन नावाचेे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत 30 दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते.
    4) वाईट सवईपासून सुटका : तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू सतत काहीबाही खाने, सतत गोड आणि तळलेले पदार्थ खाने, पाकेट बंद फरसान फस्त करणे, चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स पीनेे या सारख्या वाईट सवई रमजानच्या 30 दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते. सहसा या गोष्टी सोडण्यासाठी जो मनोनिग्रह लागतो तो फार कमी लोकांत असतो. ज्यांच्यात नसतो रमजान त्यांच्यासाठी या सवई सोडण्याची सुवर्ण संधी असते. रोजांच्या सायकलमध्ये जराशी इच्छा शक्ती दाखवली तरी ती या सर्व व्यसनांपासून मुक्त होण्यास पुरेशी असते. 

    घातक आजारांपासून सुटका
    सतत उपाशी राहिल्याने आपल्या शरिरातील पेशी ह्या अगोदर आपल्या शरिरातील अतिरिक्त चर्बी व त्यानंतर अतिरिक्त पेशींना खाऊन नष्ट करतात याला ऑटोफॅगी प्रक्रिया असे म्हणतात. यामुळे शरिरातील वाईट पेशी नष्ट होतात. रोजांमुळे ही प्रक्रिया नकळत आपल्या शरिरात घडते व आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या शरिरात निर्माण झालेल्या वाईट (जहरी) पेशी ज्यात कँसरच्या पेशी सुद्धा असू शकतात सततच्या रोजांमुळे कधी नष्ट होतात ते. ही एक मोठी रिसर्च आहे जिचा गाभा मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. ऑटोफॅगी एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ ’स्वत:ला खाऊन टाकने’ असा होतो. हा शोध एवढा महत्वपूर्ण होता की 2016 चा नोबेल पुरस्कार ऑटोफॅगी सिद्धांतांचे जनक शरिर शास्त्राचे जपानचे वैज्ञानिक योशिनोरी ओसुमी यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
    येणेप्रमाणे रोजांमुळे शरिराला अनेक फायदे मिळतात पण हो! हे फक्त निरोगी व्यक्तींना मिळतात. जे लोक आजारी असतील व सतत मेडीकल सुपरविझन खाली असतील हे फायदे त्यांच्यासाठी नाहीत हे ओघाने आलेच.
चुकीच्या सवयी
 अडानीपणा आणि आरोग्यविषयक जागरूकतेच्या अभावामुळे अनेक मुस्लिम दिवसभर रोजा ठेऊन संध्याकाळी इफ्तार करतांना भयंकर चुका करतात. रस्त्यावर विक्रीला ठेवले गेलेले व तळलेले अनेक पदार्थ उदा. भजे, मिर्च्या, समोसे, चिकन 65 सारखे मैद्याचे व निकृष्ट हरभर्‍याच्या पिठाचे पदार्थ खातात. हे पदार्थ चवीला जेवढे रूचकर असतात तेवढेच पचनसंस्थेला घातक असतात. यांच्याशिवाय टरबूज, खरबूज व अनेक फळे सुद्धा इफ्तारमध्ये खाल्ली जातात. आणि लगेच भरपूर जेवण केले जाते व ढसाढसा पाणी पिले जाते. हा अतिशय चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. यामुळे पोटात या विषम पदार्थांची सरमिसळ होऊन पचनसंस्थेवर अधिक ताण पडतो. हेच कारण आहे की, रमजानमध्ये अनेक लोकांना अपचनाचा विकार जडतो. म्हणून इफ्तारमध्ये चार दोन खजूर आणि चार-दोन फळांचे घास घेऊन थोडेसे साधे पाणी पिऊन ते पचेपर्यंत साधारणत: एकाद तास थांबून जेवण करणे केव्हाही हिताचे. तरावीहच्या नमाजनंतर जेवण केले तर ते अधिक चांगले. जेवणानंतर साधारणत: एक-दोन किलोमीटर पायी चालणे गरजेचे असते. सहेरीमध्ये सुद्धा हलके आणि थोडे जेवण अपेक्षित असते. रमजान दरम्यान खाण्या-पिण्याच्या सवयी राखण्यात ज्यांना अपयश येते त्यांचे रमजान नंतर वजन वाढल्याचे सुद्धा लक्षात येईल. म्हणून कमी खाणे, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच कमी पाणी पिणे वगैरे सवयी लावून घेतल्या पाहिजेत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारण 45 मिनिटानंतर भरपूर पाणी पिल्यास हरकत नाही. 

    मनोवैज्ञानिक फायदे
    फक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलने, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रींची 20 रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे. एरव्ही माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढचा स्वत: होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे ’मी रोजादार आहे’ येवढंच उत्तर देणे, गरीबांना आपल्या बचतीतून 2.5 टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या 30 दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते व रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळते की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. आज जगाला चारित्र्यवाण लोकांची किती गरज आहे हे आपल्यातील प्रत्येकजण जाणून आहे. नमाजी, रोजादार, दाढी, टोपी ठेवणारे लोक ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात आपल्या चांगल्या चारित्र्याने वेगळा ठसा उमटवत असतात. अशा लोकांवर विश्‍वास ठेवतांना कोणालाच अडचण वाटत नाही. किंबहुणा अनेक लोक अशाच लोकांशी व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.
    अलिकडे मीडियाच्या दुष्प्रचारामुळे अनेक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या जात आहेत. ताजे उदा. पहा, लॉकडाऊनमध्ये दूध आणायला जाणारे लोक पोलिसांचा मार खात आहेत आणि दारू आणायला जाणारे लोक सुरक्षित आहेत. असेच काहीशे मुस्लिमाबद्दल झालेले आहे. मुस्लिमांमध्ये असलेल्या नसलेल्या दुर्गुंणाचेच चर्वण नियमितपणे माध्यमांवर केले जात असल्यामुळे सामान्य जनतेला इस्लाम काही तरी भयंकर आणि मुस्लिम म्हणजे दानव वाटत आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाही. इस्लाम नितांत सुंदर धर्म आहे आणि रोजे मुस्लिमांना दरवर्षी मानसिक व शारीरिक बळ प्राप्त करून देण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा करतात.

- एम.आय.शेख

आपण सर्व लॉकडाऊनमध्ये आहोत. काही दिवसात दोन महिने पूर्ण होतील. लॉकडाऊनमुळे लोकांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरिबांव्यतिरिक्त सामान्य कामगार वर्गही व्यवसाय बंद पडल्यामुळे बेरोजगार झाला आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत रमजानचा पवित्र महिनाही सुरू आहे. लोक स्वत:च्या घरात इबादत करत आहेत. आमच्या मस्जिदी बंद आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार काही दुकाने आणि शॉपिंग मॉल्स सुरू करण्यास परवानगी  दिलेली आहे. या भारी लॉकडाऊनमध्ये दुकाने आणि मॉल्स उघडण्याचा काय अर्थ आहे याचा स्वत: चा विचार करा. अशा परिस्थितीत दुकाने उघडल्यास लोक खरेदीसाठी तुटून पडतात. ज्यामुळे लोकांमध्ये शारीरिक अंतर राखता येणार नाही. कोरोना पसरविण्याचा धोका वाढेल. यापूर्वी तबलीगी जमात सदस्यांवर आरोप होता की त्यांच्यामुळेच कोरोना पसरला आहे. तर ईदच्या शॉपिंगच्या बहाण्याने आपण आणखी एक आरोप स्वत:वर लावून घ्यायचा काय? आणि गोदी मीडियाला मग पुन्हा एकदा मुस्लिमांना जबाबदार धरायला आवडेल. यावेळी निश्‍चय करूया की, आपण कोरोना संपेपर्यंत कोणतीच अनावश्यक खरेदी करणार नाही. गरिबांना या पैशातून मदत करू आणि आपल्या अल्लाहला संतुष्ट करू जेणेकरुन आपण या साथीच्या रोगापासून लवकर मुक्त होऊ शकू.
    जेव्हा ही सवलत चालू असेल तेव्हा रमजान महिन्याचे शेवटचे दहा दिवस असतील. ईद म्हणजे आनंदाचे नाव आणि प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार हा आनंद साजरा करतो. आम्ही महिनाभर उपवास ठेवल्यानंतर ईद उल-फितर साजरी करतो. ही सर्वशक्तिमान अल्लाहकडून भेट आहे; खासकरुन जे उपवास करतात त्यांच्यासाठी. इस्लामने आपल्याला शरीयतच्या मर्यादेत आनंद मिळविण्याचा अधिकार दिलेला आहे. ईदचा दिवस संपूर्ण मुस्लीम उम्माहसाठी महत्वाचा आहे. नवीन कपडे, नवीन पादत्राणे, बांगड्या, झुमके, नवीन चादरी, पडदे आणि कानातील बाली आणि अन्य आनंददायी वस्तूंची खरेदी करण्याचा हा मौसम आहे. सर्व लोक आपल्या आसपासच्या भागात एकाच ठिकाणी एकत्र जमतात आणि ईदची नमाज अदा करतात, सर्वजण हसून आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देतात. ईद साजरी करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चांगले वस्त्र परिधान करणे होय. ईदच्या दिवशी नवीन कपडे आणि शिरखुर्मापान बंधनकारक जरी नसले तरी आपल्या संस्कृतीमध्ये या दिवशी शिरखुर्म्याची देवाणघेवाण आवश्यक अशी रीत झालेली आहे. ईद-उल-फितरच्या दिवशी प्रेषित सल्ल. विषम संख्येत खजूर खाल्यानंतर प्रार्थनेला जात असत. खजूर तर उपलब्ध असल्यास उत्तमच असतात. नवीन कपडे शिवणे, ते घालणे देखील योग्य आहे. हजरत मुआद बिन रजि. ने यांनी सांगितले की, मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे, ”जिस शख्स ने अल्लाह तआला के डर से लिबास में फुजूल खर्ची से अपने आप को बचाया, हालांके वो उसपर कादिर था, तो कल कयामत के रोज अल्लाह तआला तमाम इन्सानों के सामने इस को बुलायेगा और जन्नत में जेवरात में से जो वो चाहेगा पिनायेगा (तिर्मिजी).” हजरत जाबिर रजि. यांच्याकडून वर्णन आहे की, एक व्यक्ती नबी सल्ल. यांच्या सेवेत मळकट कपडे परिधान करून आला होता त्यावेळेस त्यास म्हटले होते की, ”तुम्हाला कपडे धुवायला काही सापडले नाही काय?” (निसाई, मुसनद अहमद).
    शक्यतो पैशाची उधळपट्टी न करता एखाद्याने चांगले आणि स्वच्छ कपडे घालावेत असे गृहित धरुन तथापि, ईदच्या दिवशी नवीन किंवा चांगले कपडे घालणे मुस्तहब (अल्लाहला पसंत ) आहे. अल्लाहने जर एखाद्याला संपत्ती दिली असेल तर ईदच्या दिवशी नवीन कपडे घालण्यास काहीच हरकत नाही. परंतु प्रत्येक गोष्टीत संयम असणे आवश्यक आहे आणि कपड्यांमध्ये गर्विष्ठपणा, गर्व आणि उच्छृंखलता टाळणे आवश्यक आहे.
    जगभरात कोरोना विषाणूच्या साथीचा रोग सुरू आहे आणि त्यामुळे जगभरात लॉकडाउन सुरू आहे. ज्यामुळे लोक चिंतेत आहेत, लोक बेरोजगार आहेत. तथापि, लोक सर्व प्रकारच्या अडचणीत आहेत. या निमित्ताने मुस्लिमांचे उच्च नेतृत्व आणि थोर विद्वान लोक जनतेला यावर्षी स्वत: साठी कपडे शिवू नयेत, असा सल्ला देत आहेत. मुलांनाही यंदा ईदसाठी नवीन कपडे मिळणार नाहीत, असा सल्ला देण्याचे आवाहन करीत आहेत. खरेदी करेल त्याऐवजी ते या पैशातून गरिबांना मदत करतील. आपण बरीच वर्षे ईदसाठी नवीन कपडे परिधान केलेले आहेत. एक वर्ष ईदची खरेदी न करता आपण आपल्याकडे असलेल्या कपड्यांमधून एखादा चांगला जोड परिधान करावेत. तसेच परिसरातील गरीब व्यक्तींनाही शिल्लक जोड द्यावेत.
    ईद-उल-फितरच्या दिवशी कोणतीही खरेदी करु नये असे मी संपूर्ण मुस्लीम उम्माह यांना आवाहन करते. एक प्रकारे हे आमचे संरक्षण असेल. मॉल खुले असले तर तिथे गर्दी असणारच. लॉकडाऊन शिथिल केल्याने काय परिणाम होउ शकतात याची चुनूक 4 मे रोजी दारूची दुकाने उघडली होती तेव्हा दिसून आलीच ना. मग पुन्हा मॉलमध्ये जावून विषाची परीक्षा कशाला पहायची.चांगले होईल जर आहे आमच्या मस्जिदी उघडल्या जातील. आम्हाला असेही माहित आहे की असे बरेच लोक आहेत जे फक्त ईदच्या निमित्ताने कपडे खरेदी करतात. पण आता अल्लाहला खुश करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान माना. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की हे, लॉकडाऊनच्या काळात ईद खरेदीसाठी झुंबड होणार नाही आणि शारीरिक अंतर राखले जाईल, यासाठी पोलीस आणि महानगरपालिका, नगरपालिकाच्या लोकांना निर्देश द्यावेत. जेणेकरून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका राहणार नाही.

सय्यदा तबस्सुम मंजूर नाडकर, मुंबई
(लेखिका : गोशा महिला आणि मुले स्टार न्यूज टुडे व गोशा वूमन अँड चिल्ड्रेन इंडिया उर्दू टाईम्सच्या संपादिका आहेत. मो. 9870971871.)

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी
 

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार

आयएमपीटी अ.क्र. 52     पृष्ठे - 64      मूल्य - 12          आवृत्ती -  (2016)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/bsg8cfjj6p8q55pdsdouy41hyuzlfup3

माननीय सहल बिन सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकसमुदायाचा प्रमुख त्या लोकसमुदायाचा सेवक असतो. अल्लाहच्या मार्गातील हौतात्म्यव्यतिरिक्त लोकांची सेवा करण्यात पुढाकार घेणाऱ्याच्या कर्मापेक्षा कोणतेही पुण्यकर्म श्रेष्ठ असत नाही.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
एखाद्या समूहाबरोबर प्रवास करणाऱ्या मनुष्याने त्या समूहातील लोकांची सेवा करावी, त्यांची गरजांची पूर्तता करावी आणि त्यांना प्रत्येक प्रकारचे साहाय्य करण्याचा प्रयत्न करावा, याचे  फार मोठे पुण्य आहे. या पुण्यापेक्षा श्रेष्ठ जर कोणते पुण्य असेल तर ते म्हणजे मनुष्याने अल्लाहच्या मार्गात युद्ध करताना हौतात्म्य पत्करणे होय.

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, एकदा आम्ही प्रवासात असताना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ एक मनुष्य उंटिणीवर स्वार होऊन आला, मग त्याने उजव्या  व डाव्या बाजूला वळून पाहण्यास सुरूवात केली, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या मनुष्याकडे एखादे अतिरिक्त वाहन असेल त्याने ते वाहन नसलेल्या व्यक्तीला द्यावे आणि ज्या कोणाकडे  अतिरिक्त भोजन असेल त्याने ते ज्यांच्याकडे जेवणाचे पदार्थ नसलेल्याला द्यावे.’’

अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या मते पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आमच्याकडील अनेक प्रकारच्या सामानाचा अंदाज घेतला, त्यावेळी आम्हाला वाटले की एखाद्याच्या आवश्यकतेपेक्षा  अधिक सामानावर आमच्यापैकी कोणाचाही अधिकार नाही. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
आलेल्या व्यक्तीने उजवीकडे व डावीकडे पाहिले कारण खरे तर तो गरजवंत होता, म्हणून लोकांनी त्याची मदत करावी अशी त्याची इच्छा होती.

माननीय सईद बिन अबू हिंद अन् अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘काही उंट शैतानाचा भाग असतात, काही घरे शैतानाचा भाग असतात,  शैतानांचे उंट मी पाहिले आहेत, तुमच्यापैकी कोणी आपल्याबरोबर अनेक उंटिणी घेऊन निघतो आणि त्यांना खूप  चारा-पाणी देऊन ताजेतवाणे करून ठेवले आहे आणि त्यांच्यापैकी  कोणत्याही एकावर तो स्वार होत नाही. जेव्हा तो आपल्या वाहन नसलेल्या बंधुजवळून जातो तेव्हा तो आपल्या उंटिणींवर बसवत नाही. शैतानांच्या घरांबाबत म्हणायचे झाले तर ते मी  पाहिलेले नाहीत. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
‘शैतानांची घरे’ म्हणजे जी घरे लोक फक्त आपले मोठेपण दाखविण्यासाठी अनावश्यक निर्माण करतात. ते लोक स्वत: त्यात राहात नाहीत अथवा इतर गरजवंत लोकांना राहायला देतही नाहीत. इस्लाम संपत्तीच्या अशाप्रकारच्या देखाव्याला पसंत करीत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अशी घरे पाहिलेली नाहीत. त्या काळात असे देखावा करणारे लोक नव्हते.  होय, नंतर आमच्या वाडवडिलांनी अशी घरे पहिली आणि आम्हीही आमच्या काळातील श्रीमंत मुस्लिमांची अशी दिखाऊ घरे पाहतो आहोत.

 अनेकेश्वरवादिता व पथभ्रष्टता मुळात कोठून निघते. पवित्र कुरआन आम्हाला सांगतो की हे  दुर्दैवी संकट येण्याचे तीन मार्ग आहेत

(१) मनाची गुलामी
पहिला मार्ग मानवाच्या स्वतःच्या मनाच्या इच्छा आहेत
"अर्थात त्याच्यापेक्षा मोठा पथभ्रष्ट कोण असू शकेल ज्याने अल्लाहच्या आदेशांच्याऐवजी आपल्या मनाच्या इच्छांचे अनुसरण केले?  अशा अत्याचारी लोकांना अल्लाह सन्मार्ग दाखवीत नाही."
- सूरतुल कसस : ५०
याचा अर्थ असा की सर्वात अधिक माणसाला मार्गभ्रष्ट करणारी गोष्ट माणसाच्या स्वतःच्या मनातील इच्छा आहे. जो मनुष्य  इच्छेचा गुलाम झाला तो अल्लाहचा दास बनणे कदापि शक्य नाही. जरी अल्लाहने त्याला मनाई केली तरी तो सदेव असेच पाहील  की मला कोणत्या कामात धन-प्राप्ती होईल, मला सन्मान व प्रसिद्धी कोणत्या कामात मिळेल, मला आमोद-प्रमोद व आनंद कोणत्या  कामात मिळेल; मला आराम व ऐश्वर्य कोणत्या कामात प्राप्त होईल. बस्स, या गोष्टी ज्या कामात असतील त्यांचाच तो अवलंब  करील. या गोष्टी ज्या कामात नसतील त्या तो कदापि करणार नाही, मग त्याची आज्ञा अल्लाहने का दिलेली असेना. तर मग याचा  अर्थ असा की अशा माणसाचा ईश्वर महान अल्लाह नसून त्याचा ईश्वर त्याचे मन आहे. त्याला सबुद्धी कशी मिळू शकेल? हीच  गोष्ट पवित्र कुरआनमध्ये अन्य

ठिकाणी अशाप्रकारे सांगितली आहे.
"हे पैगंबर! तुम्ही त्या मनुष्याच्या स्थितीवर विचार तरी केला काय की ज्याने आपल्या मनाच्या इच्छेला आपला ईश्वर बनविले  आहे? काय तुम्ही अशा माणसावर नजर ठेऊ शकता? काय तुम्हाला असे वाटते की या लोकांपैकी बरेचजण ऐकतात व समजतात?  कदापि नाही, हे तर जनावराप्रमाणे आहेत. नव्हे तर त्यांच्यापेक्षाही हीन दर्जाचे आहेत.'
सूरतुल फुरकान : ४३,४४
मनाचे गुलाम जनावरापेक्षा अधिक वाईट असणे एक अशी गोष्ट आहे ज्यात कोणत्याही शंकेला स्थान नाही. कोणतेही जनावर  आपणास असे आढळणार नाही जे अल्लाहने ठरवून दिलेल्या सीमेला सोडून पुढे जात असेल. प्रत्येक प्राणी तीच दप्तु खातो जी  अल्लाहने त्याच्यासाठी ठरवून दिलेली आहे. तितकीच खातो. जितक्या प्रमाणात ठरवून दिलेली आहे आणि जितके काम ज्या  प्राण्यासाठी ठरविले आहे तितकेच तो करतो. परंतु मनुष्य एक असा प्राणी आहे की जेव्हा हा आपल्या इच्छेचा गुलाम बनतो तेव्हां  तो असली-असली कृत्ये करतो की सैतानाला सुद्धा लाज वाटावी.

(२) वाड- वडिलांचे अंधानुकरण

हा तर मार्गभ्रष्टता येण्याचा पहिला रस्ता आहे. दुसरा मार्ग असा आहे की वाड-वडिलांपासून ज्या चालीरीती, ज्या श्रद्धा व विचार, ज्या  प्रकारचे वागणे चालत आलेले आहेत त्यांचा मनुष्य गुलाम बनतो आणि अल्लाहच्या आज्ञेपेक्षा त्यांना श्रेष्ठ समजू लागतो आणि त्या  उलट जर अल्लाहची आज्ञा त्याच्यासमोर प्रस्तुत केली गेली तर सांगतो की मी तर तेच करीन जे माझे वाड-वडील करीत असत  आणि जी माझ्या घराण्याची व टोळीची पद्धत आहे. जो मनुष्य असल्या रोगाने पछाडलेला आहे तो बरे अल्लाहचा दास कसा बनू  शकेल? त्याचे ईश्वर तर त्याचे वाड-वडील व त्याच्या घराण्याचे व टोळीचे लोक आहेत. त्याला हा खोटा दावा करण्याचा कोणता  अधिकार आहे की मी मुसलमान आहे? पवित्र कुरआनमध्ये सुद्धा यावर कठोरपणे खबरदार केले आहे.

.
"आणि जेव्हा जेव्हां त्यांना सांगितले गेले की जी आज्ञा अल्लाहने पाठविली आहे तिचे अनुसरण करा. तेव्हा त्यांनी हेच सांगितले की  आम्ही तर त्या गोष्टीचे अनसरण करू जी आम्हाला बाड-वडिलांकडून मिळाली आहे. जर त्यांच्या वाड-वडिलांना एखादी गोष्ट कळाली  नसेल आणि ते सरळ मार्गावर नसतील तरी सुद्धा हे त्यांचेच अनुकरण करीत राहतील काय?
- सूरतुल बकराह : १७०
दुसऱ्या ठिकाणी सांगितले आहे -
"आणि जेव्हां त्यांना सांगितले गेले की या फर्मानाकडे या जो अल्लाहने पाठविला आहे आणि या पैगंबर (स.) यांच्या पद्धतीकडे या.  तेव्हां त्यांनी सांगितले की आमच्यासाठी तर केवळ तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना पाहिले आहे. काय  हे वाडवडिलांचेच अनुकरण करीत राहतील. मग त्यांना कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नसो आणि ते सरळ मार्गावर नसोत? हे  ईमानधारकांनो! तुम्हाला तरी स्वतःची काळजी असली पाहिजे. जर तुम्ही सरळ मार्गाला लागाल तर दुसऱ्या कुणाच्या मार्गभ्रष्टतेने  तुम्हाला नुकसान पोहचणार नाही, शेवटी तर सर्वाना अल्लाहकडे परत जावयाचे आहे. त्यावेळी अल्लाह तुम्हाला तुमच्या चांगल्या व  वाईट कृत्याविषयी सर्व काही सांगेल."
सूरतुल माइदाह : १०४,१०५
ही अशी पथभ्रष्टता आहे ज्यात जवळजवळ प्रत्येक काळातील अज्ञानी लोक गुरफटलेले आहेत आणि नेहमी अल्लाहच्या पैगंबरांचे  मार्गदर्शन स्वीकारण्यापासून हीच गोष्ट माणसाला रोखत असते. हजरत मूसा (अले.) यांनी जेव्हां लोकांना अल्लाहच्या शरीअतकडे  (कायद्याकडे, मार्गाकडे) बोलाविले होते तेव्हां देखील लोकांनी असेच म्हटले होते,"काय तू आम्हाला त्या मार्गापासून हटवू इच्छितोस  ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना चालत असताना पाहिले आहे?"
-सूरह यूनुस : ७८
हजरत इब्राहीम (अलै.) यांनी जेव्हा आपल्या टोळीवाल्यांना

अनेकेश्वरवादापासून रोखले तेव्हा त्यांनी सुद्धा असेच सांगितले होते -
"आम्ही आपल्या वाड-वडिलांना याच ईश्वरांची उपासना करताना पाहिले आहे."
-सूरतुल अंधिया : ५३
थोडक्यात असे की अशाचप्रकारे प्रत्येक पैगंबरासमोर लोकांनी हाच मुद्दा सांगितला की तुम्ही जे म्हणता ते आमच्या वाड-वडिलांच्या  पद्धतीविरुद्ध आहे म्हणून ते आम्ही मान्य करीत नाही. पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे -
"म्हणजे असेच होत राहिले आहे की जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीत भीती दाखविणारा म्हणजे पैगंबराला पाठविले तेव्हां तेव्हा  त्या वस्तीच्या सुखवस्तु लोकांनी असेच सांगितले की आम्ही आपल्या वाड-वडिलांना एका पद्धतीचा अवलंब करताना पाहिले आहे  आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत. पैगंबरांनी त्यांना सांगितले की, जर मी याच्यापेक्षा चांगली गोष्ट  तुम्हाला सांगितली की ज्यावर तुमचे वाड-वडील चालत असता तुम्ही पाहिले आहे तर काय असे असून देखील तुम्ही तुमच्या वाड- वडिलांचे अनुकरण करीत रहाल? त्यांनी उत्तर दिले की, आम्ही ती गोष्ट मान्य करीत नाही जी तुम्ही घेऊन आला आहात. मग  जेव्हा त्यांनी असे उत्तर दिले तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना खूप शिक्षा दिली आणि आता पहा की आमचे आदेश खोटे ठरविणाऱ्यांचा कसा शेवट झाला आहे."
-सूरतुज्जुखरुफ़ : २३-२५
हे सर्व काही सांगितल्यावर महान अल्लाह फर्मावितो की एक तर वाडवडिलांचेच अनुकरण करा अथवा आमच्या आदेशांचे पालन  करा. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत. मुसलमान बनू इच्छिता तर सर्व काही सोडून केवळ तीच गोष्ट मान्य करा  जी आम्ही सांगितली आहे -
"म्हणजे जेव्हां त्यांना सांगितले गेले की त्या आज्ञेचे पालन करा जी अल्लाहने पाठविली आहे. तेव्हां ते म्हणाले की, नाही. जरी  शैतान आम्हाला नरकाच्या प्रकोपाकडे बोलावीत असला तरी सुद्धा आम्ही ती गोष्ट अवलंबू जिघा अवलंय आम्ही आमच्या वाड- वडिलांना करताना पाहिले आहे. जो कोणी स्वतःला पूर्णपणे अल्लाहच्या सुपुर्द करील आणि


सत्कर्म करणारा असेल त्याने तर दोरी मजबूत धरली आणि शेवटी सर्व बाबी अल्लाहच्या हातात आहेत आणि जो कोणी याचा इन्कार करील तर हे नबी, तुम्हाला त्याच्या इन्काराने दु:खी होण्याची गरज नाही. ते सर्व आमच्या कडे परत येणार आहेत. मग आम्ही त्यांन्या त्यांच्या कृत्यांचा परिणाम दाखवून देऊ."    - सूरह लुक़मान : २१-२३

(३) अल्लाहशिवाय इतरांच्या आज्ञेचे पालन

हा पथभ्रष्टता येण्याचा दुसरा मार्ग होता. तिसरा मार्ग पवित्र करआनने असा सांगितला आहे की मनुष्य जेव्हां अल्लाहची आज्ञा सोडून  दुसऱ्या लोकांची आज्ञा पाळू लागतो आणि असा विचार करतो की अमुक मोठा मनुष्य आहे अथवा अमुक माणसाच्या हातात माझी  रोजी आहे म्हणून त्याचे म्हणणे ऐकले पाहिजे. अमुक मनुष्य मोठा पदाधिकारी आहे म्हणून त्याची आज्ञा पाळली पाहिजे. अमुक महाशय आपल्या शापाने मला नष्ट करतील किंवा आपल्या बरोबर स्वर्गात घेऊन जातील म्हणून ते जे सांगतील तेच खरे आहे. अमुक  जात फार प्रगती करीत आहे. तिच्या पद्धती अवलंबिल्या पाहिजेत. तर असंल्या माणसासाठी सद्बुद्धी प्राप्त होण्याचा मार्ग बंद पडतो.

"जर तू पृथ्वीवर राहणाऱ्या त्या लोकांच्या आज्ञेचे पालन केले तर ते तुला अल्लाहच्या मार्गावरून पथभ्रष्ट करतील."
-सूरतुल अनआम : ११६

म्हणजे मनुष्य सरळ मार्गावर तेव्हां असू शकतो जेव्हां त्यांचा ईश्वर एक असेल, ज्याने शेकडो हजारो ईश्वर स्वीकारले असतील आणि  जो कधी या ईश्वराच्या म्हणण्यानुसार तर कधी त्या ईश्वराच्या म्हणण्यानुसार चालत असेल तर त्याला कसा मार्ग मिळू शकेल?

आता आपणास कळले असेल की पथभ्रष्टतेची प्रमुख कारणे तीन आहत १) मनाची गुलामी, २) वाड-वडील, घराणे आणि टोळीच्या  प्रथांची गुलामी, ३) सामान्यपणे जगातील त्या लोकांची गुलामी ज्यात श्रीमंत लोक, तत्कालीन शासक आणि भोंदू धर्मगुरु व पथभ्रष्ट जाती सर्व यात सामील आहेत.

या तीन मोठ्या मूर्त्या आहेत ज्या ईश्वराच्या दावेदार बनल्या आहेत. जो मनुष्य मुसलमान बनू इच्छितो त्याला सर्वप्रथम या तिन्ही  मूर्त्या फोडल्या पाहिजेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने तो मुसलमान बनेल, ज्याने या तिन्ही मूर्त्या आपल्या हृदयात बसविल्या असतील  तो ईश्वराचा दास बनणे कठीण आहे. तो दिवसात पन्नास वेळा नमाज पढून व दाखविण्यासाठी उपवास ठेऊन आणि मुसलमानाप्रमाणे चेहरा बनवून लोकांना फसवू शकतो. स्वतः आपल्या मनाला सुद्धा फसवू शकतो की मी पक्का मुसलमान आहे. परंतु तो अल्लाहला फसवू शकत नाही.

धर्म व जग एक असण्याचा हा अर्थ पूर्णत: चुकीचा आहे, जो बहुतेक धर्मपरायण लोक लावतात, की उपासना तर अल्लाहची करावी. अनिवार्य धार्मिक कृत्ये व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केलेली कामे तर अल्लाहच्या आज्ञेनुसार अदा केली जावीत. उरल्या जागतिक बाबी, जशा राजनीती, सामाजिकता, अर्थकारण, सामूहिकता वगैरे. तर या बाबतीत त्याचप्रमाणे कृती केली जावी जशी दुसरे लोक करतात. राजनीतीत तशाच प्रकारे भाग घेतला जावा जसा एखाद्या अन्य व्यक्तीचा सर्वसत्ताधिकार मानणारे घेतात आणि समाधान मानावे की, इस्लामी राजनीतिचा हक्क अदा झाला. जर हे बरोबर असेल तर ही गोष्ट या टोकापर्यंत पोचेल की, 'बिस्मिल्लाह' (आरंभ करतो, अल्लाहच्या नावाने) म्हणून उजव्या हाताने दारू पिणे, पैगंबर मुहम्मद (स.) च्या कृतीचे अनुकरण ठरेल. राजनीतिक व्यवस्था इस्लामी असो अथवा गैरइस्लामी त्याचा पाया घातला जातो सर्वसत्ताधिकाराने, पहिले पाऊल म्हणून सर्वसत्ताधिकाराची समस्या सोडविली जाते. कोणत्याही राजनीतिक व्यवस्थेसंबंधी पहिला प्रश्न असा असतो की, त्यात सर्वसत्ताधिकारी कोणाला मानले गेले आहे? या प्रश्नाच्या उत्तरानेच इस्लामी राजनीती दुसऱ्या राजनीतीपेक्षा भिन्न आहे हे स्पष्ट होते. इस्लाममध्ये रूपावर अधिक चर्चा नाही. सांस्कृतिक व वैचारिक उन्नतीने कोणतेही रूप धारण करावे. जर त्यात सर्वसत्ताधिकारी म्हणून अल्लाहला मानले असेल आणि त्यात नागरिकाची स्तिती वेसणरहित उंटाची नसेल. आपल्या स्वामीच्या इच्छेच्या अधीन एका सहाय्यकाची आहे, तर ती इस्लामी राजनीती होय. जर अल्लाहशिवाय कुणा दुसऱ्याचा सर्वसत्ताधिकार मानला जात असेल, तर ती इस्लामी राजनीती नव्हे. मग ती चालविणारी चाळीस दिवस जप-तप करण्यामध्ये लागलेली व्यक्ती असो अथवा हातात पवित्र कुरआन धारण करणारे धर्मपंडित असोत. कारण ज्या प्रकारे अल्लाहच्या उपासनेत इतर कोणाला सामील करणे अनेकेश्वरत्व आहे, तसेच त्याच्या सर्वसत्ताधिकारी असण्याच्या त्याच्या गुणात सामील करणे अथवा स्वत: सामील होणे अनेकेश्वरत्व व त्याच्याशी बंडखोरी आहे. "ला इलाहा इल्लल्लाहु"चा अर्थ जेथे अल्लाहशिवाय इतर कोणी उपास्य नाही असा आहे, तेथेच अल्लाहशिवाय अन्य कोणीही शासनकर्ता नाही असासुद्धा आहे. यापैकी एक मान्य करणे आणि दुसरे अमान्य करणे एकेश्वरत्वाच्या श्रद्धेच्याच काय बुद्धीच्यासुद्धा उलट आहे. जर हे अनेकेश्वरत्व आहे, तर हा मोठा अत्याचार आहे. “इन्नशिर्का लजुलमुन अजीम' अर्थात नि:संशय अनेकेश्वरत्व मोठा जुलूम आहे. या मोठ्या जुलमासह जर नकळत नसेल तर उपासना, नामस्मरण मी सांगू शकत नाही की, अल्लाहच्या तराजूत किती वजन प्राप्त करू शकतील. महान अल्लाह नि:संशय क्षमा करणारा व दयाळू आहे. परंतु जर तो तसाच भोळा-भाबडा असता, जसा की आमचे भोळे-भाबडे धार्मिक लोक त्याला समजतात, की केवळ तोंडी जमाखर्च करणाऱ्यांना तो आपल्या प्रामाणिक लोकांच्या समूहात सामील करून घेईल, तर किती चांगले झाले असते! पण वस्तुस्थिती अशी आहे की, एक मूर्ख मनुष्यदेखील जेव्हा एखाद्याला मित्र बनवितो तेव्हा त्याच्या सुंदर वर्णनशैली व दीर्घ वर्णनाने समाधानी होत नाही, तर त्याला विविध पद्धतीने तपासतो व पारखतो.
तर बंधुनो! “एकेश्वरत्व काय आहे?" चे हे उत्तर. याचा अर्थ असा की, महान अल्लाहच्या उपास्याच्या गुणाला व त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला वेगवेगळे ठेवले जाऊ नये आणि असेही केले जाऊ नये की, त्याच्या उपास्याच्या गुणाला व्यावहारिकरीत्या मानले जावे आणि त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला केवळ डोक्यात व पुस्तकात राहू दिले जावे. त्याचे व्यावहारिक स्वरूप असेच होऊ शकते की, आम्ही आपल्या उपासनेच्या भावनेला आणि आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या आवश्यकतेला दुसऱ्या सर्वसत्ताधिकाराच्या दावेदाराकडून व आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या दाव्याकडून तोंड फिरवून आणि एकाला दुसऱ्यात समाविष्ट करून आपल्या जुलूम करणाऱ्याला महाकोपी, शुचिर्भूत व पवित्र, अत्यंत मेहरबान व दया करणाऱ्या अल्लाहच्या हुजुरात सादर करावे. जर या दोघांना वेगवेगळे केले तर दोघे निर्जीव होतील. हा अल्लाहचा सर्वसत्ताधिकारदेखील एवढी मोठी कृपा आहे व त्यात इतकी विपुलता आहे की त्यांची गणना करणे अशक्य आहे, ज्याप्रमाणे त्याच्या अन्य बक्षिसांची गणना संभव नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहचा सर्वसत्ताधिकार मान्य करवून त्याच्या आज्ञा लागू करण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी जी युद्धे केली, तह केले, करार केले आणि एक राज्यप्रमुख म्हणून ते सर्वकाही आपल्या विशिष्ट शैलीत व अत्यंत पावित्र्य व शुचिर्भूततेने केले, जे अन्य सर्वसत्ताधिकाराच्या दावेदारांचे प्रतिनिधी करतात. तर मग त्यांना शासनाची रूची आणि ऐश्वर्याचा शौक होता काय? मग हे सर्वकाही त्यांनी का केले? ही गोष्ट स्पष्ट आहे की, बालकाचे शिक्षण केवळ प्रेम व ममता आणि प्रलोभन व प्रोत्साहनाने होत नाही, तर तंबी व शिस्तपालनाचीसुद्धा गरज असते. अगदी तसेच प्रत्येक चिंतन कृतीची व्यवस्था आपल्या गरजेप्रमाणे लोक तयार करण्यासाठी शक्तीचा प्रयोग करतात. इस्लामसुद्धा हेच करतो. अल्लाहच्या आवडीची माणसे तयार करण्यासाठी जेथे धर्मावरील दृढ श्रद्धा व सदाचार, प्रलोभन व प्रोत्साहन आणि धार्मिक प्रवचन व उपदेश आवश्यक आहे, तेथे शक्तीचा सोटासुद्धा आवश्यक आहे. आता ही गोष्ट प्रकाशमान दिनाप्रमाणे स्पष्ट झालेली आहे की, शक्तीचा हा सोटा जर अल्लाहच्या सर्वसत्ताधिकारी असण्याशी व त्याच्या प्रसन्नताप्राप्तीशी जोडलेला असेल, तर ही अल्लाहची मोठी कृपा आहे. जर हा सोटा या गोष्टीपासून मुक्त होऊन अपात्र हातात गेला तर माणसासाठी तितकेच मोठे संकट ठरेल.
पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास या प्रकाशात करा. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की, जर माणसांची एखादी जमात त्या सत्य उपास्यांच्या सेवेत निमग्न होऊन त्याच्याच सर्वसत्ताधिकाराची गुलाम बनल्यास तिला या जगात असा सन्मान व प्रतिष्ठा, अशी शांतता व पवित्र जीवन मिळेल जे एखाद्या अन्य पद्धतीने मिळू शकत नाही. अल्लाहचा गुलाम आणि तो निराश्रित असावा, हे कसे शक्य आहे? आणि अशातली गोष्ट नव्हे की कधी काळी असे घडले होते, तर -
'आज भी हो जो इब्राहीम सा ईमा पैदा।
आग कर सकती है अंदाजे गुल्सिता पैदा॥'
अर्थात - जर आजसुद्धा पैगंबर इब्राहीम (अ.) सारखी अढळ श्रद्धा निर्माण झाली तर पैगंबर इब्राहीम (अ.) यांना आगीत टाकले असता अल्लाहच्या कृपेने ती आग एका उद्यानात परिवर्तित झाली होती. तसला चमत्कार पुन्हा घडेल व आजदेखील आग उपवनात बदलेल.

इस्लामच्या जीवनपद्धतीमध्ये पवित्र व महत्त्वपूर्ण मानला जातो. पवित्र रमजानचे रोजे अर्थात उपवासाचे शुभागमन झाले आहे. चांद्रदर्शन झाल्यानंतर हा पवित्र महिना सुरू होतो. सर्वशक्तिमान परमकृपाळू, दयाळू ईश्वराकडून पवित्र रमजान महिन्याचे आगमन झाले आहे.
रमजान महिन्यात पवित्र कुरआन अवतरित झाले. जे मार्गदर्शन आहे अखिल मानवजातीसाठी आणि मार्गदर्शनाचे सुस्पष्ट प्रमाण आणि सत्य व असत्यादरम्यान फरक करणारी कसोटी आहे. पवित्र कुरआन ईश्वराकडून अखिल मानवजातीसाठी मोठी देणगी आहे. मानवी जीवन सुखी, समाधानी व आनंदी असावे हा कुरआनचा मुख्या उद्देश आहे. रमजान महिन्यात कुरआनचे अवतरण झाल्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूळ अरबी भाषेतील कुरआनचे मराठी, इंग्रजी, हिंदीसह जगातील अधिकांश भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत.
आपले आचारविचार व व्यवहार आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराच्या इच्छेनुसार आयुष्य घडविण्याचा आणि अखिल मानव समूहामध्ये प्रेम, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारा हा पवित्र रमजान आहे. या महिन्यात मानवाला सच्चरित्राचे प्रशिक्षण लाभते. मुस्लिम बांधवांकडून या महिन्यात पुण्यकर्म केले जाते. जणू एक पुण्यकर्म केले तर एक हजार पुण्यकर्म केल्याचे श्रेय मिळते. एक वेळची नमाज पठण कराल तर सत्तरपटीने त्याचे पुण्य ईश्वर देत असतो.
परमकृपाळू ईश्वराने रोजाची म्हणजेच उपवासाची आज्ञा दिली. इतर उपवासांपेक्षा या अनिवार्य उपवासाचे स्वरूप वेगळे आहे. उपवास फक्त पोटाचा नाही तर शरीरातील अवयवांचा आहे. डोळ्यांचा- कोणतीही वाईट गोष्ट पाहू नये, हाताने वाईट कृत्य करू नये, जिभेने वाईट संभाषण करू नये. कानाने वाईट शब्द ऐकू नये. पायाने वाईट मार्गावर चालू नये. अशा प्रकारे उपाशी राहून या पद्धतीने आचरण केले तर ईश्वराजवळ हा उपवास मंजूर होतो. उपवासामुळे अन्नपाण्याविना राहाव्या लागणाऱ्या वेदणेची जाणीव होते. भुकेलेल्यांना अन्नपाणी किती गरजेचे आहे कळते.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘रमजान सहानुभूतीचा, आपुलकीचा, दु:खनिवारण करण्याचा महिना आहे. मानवाची सेवा करून पुण्य मिळवा. मानवांची सेवा हीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. निराधार विधवा स्त्री, अनाथ मुले, वृद्ध आईवडिलांची सेवा करा, तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल.’
ईश्वराने श्रद्धावंतांवर जकात अर्थात कर अनिवार्य केला आहे. आपल्या उत्पन्नाच्या अडीच टक्के हिस्सा जकातीपोटी दान करावा. दानामुळे मानवी मनातील स्वार्थ आणि लालसेला पायबंद घालण्याचा प्रयत्न आहे. जकातीची रक्कम गोरगरीब, अडलेले, निराधार विधवा स्त्री, अनाथ मुलामुलींच्या कल्याणासाठी वापरावी. दीनदलितांचे दु:ख दूर करणे ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. जकात अशी द्या एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताला कळू नये. जकात देण्याची ऐपत असेल अशा श्रद्धावंतांनी जकात द्यावी. परंतु सदका-ए-फित्र हे अनिवार्य दान कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून पावणे दोन किलो गहू किंवा त्याची रक्कम गरजू व्यक्तीला द्यावी. सदकारूपी दान हे पवित्र रमजान महिन्यामध्येच दिले जाते.
कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीच्या या काळात पवित्र रमजान महिन्यात श्रद्धावंतांनी उपवास, नमाज, तरावीह ही आपापल्या घरीच करावे जेणेकरून कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये. केंद्र व राज्य शासनाचे आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शासनाला सहकार्य करावे. अखिल मानवजातीला या महाभयंकर आजारापासून ईश्वर मुक्त करेल.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘जर कुणी तुमच्याजवळ एखादी बातमी घेऊन आला तर तिची चौकशी करा. सत्यता पडताळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या मानवबंधूचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका. कुणाचीही बदनामी करू नका. इतरांचे नुकसान करणारी व्यक्ती ईश्वराला अजिबात आवडत नाही.’
अखिल मानवजातीला ईश्वर कोरोनामुक्त करो, हीच प्रार्थना!

-जमीर नारदेकर,  कसबे डिग्रज, (जि. सांगली)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget