Latest Post

Allah
जर तुम्हाला कुणी असे सांगितले की ही रेल्वे, जी हजारो प्रवाशांची ने-आण करते, आपोआपच तयार झाली आणि आपोआपच चालते, वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने थांबते आणि वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने पुढच्या स्थानकाकडे रवाना होते, तर तुम्हाला विश्वास तरी होईल काय? तुम्ही म्हणाल की.... मी रेल्वे तयार करणाऱ्यास पाहिले नसले तरी मी तुमच्या बोलण्यावर मुळीच विश्वास ठेवणार नाही की रेल्वे कुणीही न बनविता आपोआपच तयार झाली आणि कुणीही न चालविता आपोआपच चालते.
रेल्वे तर खूप मोठी बाब आहे. तुम्ही तर हेदेखील मान्य करणार नाही की एखादे घर, एखादी खुर्ची, एखादे पेन अगर अशीच एखादी वस्तू कुणीही तयार न करता आपोआपच तयार झाली असावी. आता याच अनुषंगाने या जगाकडे पाहावे. ही पृथ्वी जिच्यावर आपण वास्तव्य करतो, हा चंद्र आणि हा तळपणारा सूर्य, ज्यांमुळे आपल्याला प्रकाश मिळतो, हे कोट्यवधींच्या संख्येत जगमगणारे तारे, हा प्रचंड समुद्र, हा वारा, हे विविध तऱ्हेचे प्राणी, चिवचिवणाऱ्या चिमण्या आणि हे खळखळणारे झरे याबरोबरच आपण सर्व मानव.... हे सर्वकाही आपोआपच तयार झाले आहेत काय? आणि कुणी सांगितलेच की होय! हे सर्व आपोआपच तयार झाले, तर तुमचा विश्वास तरी बसेल काय?
सूर्य हा पृथ्वीपेक्षा लाखो पटीने मोठा असून त्या विश्वात आणखीनही बरेच सूर्य आहेत आणि ते आपल्या या सूर्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठे आहेत. शिवाय आकाशगंगेत असंख्य तारे आपापल्या भ्रमणकक्षेत व्यवस्थितरित्या फिरत आहेत. प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक तारा अगदी नियोजित कक्षेत आणि नियोजित गतीने नियोजित वेळेनुसार भ्रमण करीत असून त्यात तिळमात्र फरक पडत नाही. सूर्याच्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते, हे बाष्प वारा पुढे घेऊन जातो आणि मग परत नियोजित वेळेवरच हेच बाष्प पर्जन्याच्या स्वरूपात बरसते. जणू हे त्यांचे निश्चित ठरवून दिलेले कार्यच! जणू आपापल्या कर्तव्याशी कुणीही तिळमात्र कुचराई करीत नाही.
पाऊस आपल्या जीवनाचा मुख्य सहारा आहे. पाऊस पडतो आणि सर्वत्र वनराई हिरवी होते. तऱ्हे-तऱ्हेची पिके, फुले, फळे, आपल्याला आणि प्राण्यांना प्राप्त होतात. पाऊसच जर पडला नाही तर काय-काय घडू शकते, याची कल्पना न केलेलीच बरी. असे स्पष्टपणे दिसते की ही प्रचंड सृष्टी आणि यातील प्रत्येक घटना अगदी नियोजनबद्धरित्या घडते. जणू हे प्रचंड विश्व एक प्रचंड मोठा कारखानाच आहे.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की हे कारखानारूपी प्रचंड मोठे विश्व आणि यातील या नियोजनबद्ध घटना-कार्य आपोआपच सुरू आहे काय? हे सर्वकाही चालविणारा आणि सांभाळणारा वा निगराणी करणारा कोणी आहे की नाही? तर वस्तुस्थिती अशी आहे की या विश्वाची निर्मिती करणारा निर्माता असून त्याच्याच आदेशाने हे संपूर्ण विश्व कार्यरत आहे. येथे जे काही होत आहे, ते त्याच निर्मात्या आणि संचालकाच्या मर्जीने होत आहे. येथे एक कणसुद्धा स्वत:हून अस्तित्वात आलेला नसून कोणतीही घटना व कार्य आपोआप घडत नाही.
आता आपण स्वत:लाच पाहावे. आपल्याला किती सुंदर आणि सुरेख शरीर मिळालेले आहे. या शरीरात कशा विविध शक्ती व सामर्थ्य आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण केवळ आपली जीभ, कंठ आणि ओठांना कार्यरत करतो आणि मग वाटेल तसा आवाज शब्दाच्या स्वरूपात बाहेर पडतो. या शब्दांना काही अर्थ असतो. जी भावना अगर विचार आपल्या मनात असते, ती शब्दांच्या माध्यमाने इतरांपर्यंत पोचवितो. हे कार्य प्रत्येकजण करू शकतो आणि हे करण्यासाठी कोणतेही कष्ट करावे लागत नाही. म्हणूनच आपले याकडे कधी लक्षदेखील जात नाही की हे बोलणे किती मोठी बाब आहे. आपण असे लोकसुद्धा पाहिलेत, ज्यांना बोलता येत नाही. ते जन्मजात मुके असतात. आजपर्यंत अशा कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा शोध लागला नाही, ज्यामुळे जन्मजात मुक्या व्यक्तीस बोलता येणे शक्य व्हावे.
आपण आपल्या कर्णेंद्रियांनी ऐकतो, याचा अर्थ असा की इतरांच्या आवाजाचा ध्वनी कानांवर आदळतो आणि आपणास समजते की कोण काय बोलत आहे अथवा कोणते पशु-पक्षी कसला आवाज काढत आहेत, अथवा ढोल-ताशा कशा प्रकारे वाजत आहे. आपण हेसुद्धा जाणतो की जे लोक जन्मजात बहिरे असतात अथवा काहीजण नंतरच्या काळात बहिरे होतात, मात्र हरविलेली अथवा जन्मजात नसलेली दृकशक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रदान करू शकत नाही. याच प्रकारे इतर ज्ञानेंद्रियांची अवस्था आहे. अर्थात पाहणे, वास घेणे, विचार करणे, स्पर्श करणे वगैरे हे सर्वकाही अत्यंत आश्चर्यकारक कर्म आहेत की यासाठीची इंद्रियशक्ती एकदा हरविली की जगात कोणातही ही शक्ती देण्याचे सामर्थ्य नाही.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की असा हा बोलणारा, पाहणारा, ऐकणारा गंध घेणारा, विचार करणारा आणि अशा ना-ना प्रकारचे सामर्थ्य असणारा हा विलक्षण आणि विचित्र माणूस, जो असे कार्य करतो, असे प्रताप दाखवितो की माणसाची अक्कल दंग होते. अर्थातच माणसाच्या शरीराचा एकेक अवयव हेच स्पष्ट करतो की हे संपूर्ण मानवी शरीर, हे विलक्षण सामर्थ्यशाली शरीर आपोआपच तयार झालेले नसून ते अत्यंत कौशल्यवान आणि प्रचंड कला-सामर्थ्य असलेल्या, हाडाचा कारागीर असलेल्या अत्यंत बुद्धिमान निर्मात्याने निर्माण केलेले असून त्याच्यासम इतर कोणताही कारागीर असूच शकत नाही. आपल्याला हेदेखील चांगलेच माहीत आहे की माणूस मातेच्या पोटात अथवा गर्भाशयात तयार होतो. मात्र खरे सांगायचे झाले तर मातेच्या गर्भाशयाच्या अथवा माणूस तयार करणाऱ्या या कारखान्याच्या कार्यात मातेचा वाटा नसतो. अखत्यार नसतो. आपण असे म्हणू शकत नाही की आईच मुलाची निर्माती असते. याचप्रमाणे मुलाचा पितादेखील या निर्मितीकार्यात सहभागी नसतो. अर्थात मुलाचे निर्माते माता-पिता नसतातच मुळी. एका लहानशा गर्भाशयात प्रवेश करणारा अत्यंत सूक्ष्म जीव (Sperm) याला मातेच्या रक्तातून पोषक घटक प्राप्त होतात. मग खरे पाहता हे पोषक घटक पुरविणारे रक्त माता स्वत: तयार करते काय? तिला तर हेदेखील माहीत नसते की बाळाला किती प्रमाणात रक्त मिळत आहे आणि त्याची वाढ कशी होत आहे. स्त्री जे काही खाते-पिते, त्यातूनच निर्माण होणारे रक्त हळूहळू मानवी शरीराचे स्वरूप धारण करते. मग असे कोण आणि कशाच्या आधारावर म्हणू शकतो की स्वत: आई हे कार्य करीत आहे?
थोड्याशा काळात या रक्ताचा गोळा शरीराचे स्वरूप धारण करू लागतो. डोळ्यांच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान, हृदयाच्या ठिकाणी हृदय, मेंदूच्या ठिकाणी मेंदू, कानाच्या ठिकाणी कान, यकृताच्या ठिकाणी यकृत, जठराच्या ठिकाणी जठर, फुफुसाच्या ठिकाणी फुफुस, धमण्याच्या ठिकाणी धमण्या आणि मानवी शरीरास आवश्यक असणारे समस्त अवयव अगदी व्यवस्थित व नीटनेटके आपापल्या ठिकाणी तयार होतात. मग या परिपूर्ण शरीरात प्राण येतो आणि मानवात मानवी सामर्थ्य येते. मग मातेचे गर्भाशय अर्थात मानव तयार करणारा हा विलक्षण कारखाना नऊ महिन्यांनंतर बरोबर वेळेवर या अर्भकास बाहेर फेवूâन देतो. बाहेर येताच त्याचे सर्व अवयव कार्यरत होतात. पूर्वीच तयार झालेले आईच्या छातीतील दूध जे स्वत: आई तयार करीत नसते, बाळ गुटू-गुटू प्यायला लागते, श्वास घ्यायला लागते. अशाप्रकारे कोट्यवधी लोक या जगात तयार होत असतात आणि प्रत्येकाचा चेहरा-मोहरा व स्वरूप वेगळे व परस्पर भिन्न असते. प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न असते, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो, प्रत्येकाचा विचार, आवड-निवड, शक्ती, सामर्थ्य कौशल्य, पात्रता आणि भावना भिन्न असतात. या विषयावर जेवढा विचार करण्यात येईल, तेवढेच आश्चर्याचे डोंगर वाढत जाईल आणि आपल्या अंत:करणातून साद निघेल की अशा प्रकारचे विलक्षण कार्य एक प्रचंड कौशल्य-सामर्थ्य असणारा निर्माताच करू शकतो. हा निर्माता तोच अल्लाह ज्याने समस्त जगाची निर्मिती केली असून यात इतर कोणीही त्याचा भागीदार व वाटेकरू असू शकत नाही.
आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती अशी की या जगात लहान वा मोठे कोणतेही कार्य खऱ्या अर्थाने मार्गी लागत नाही. याच्या पूर्ततेकरिता एकावरच याची जबाबदारी असते. कोणत्याही राज्याला दोन राज्यपाल, दोन मुख्यमंत्री, कोणत्याही देशाचे दोन पंतप्रधान, दोन राष्ट्राध्यक्ष कधीच असू शकत नाहीत आणि अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. कारण असे असेल तर कोणतेही राज्य, कोणतेही राष्ट्र आणि कोणताही देश चालू शकत नाही. कारण कर्ताधर्ता आणि जबाबदार केवळ एकच असू शकतो. आता जर आपण आपल्या सभोवतालच्या या अतिविशाल आणि विलक्षण सृष्टीवर नजर टाकली आणि यावर जर विचार केला की ही सृष्टी कशी निर्माण झाली व कशी कार्यरत आहे, आकाशातून होणारी वर्षा, यामुळे फुलणारी, हिरवीगार होणारी वनराई, सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून पाण्याचे होणारे बाष्पीभवन, हे बाष्प वाहून नेणारे वारे, रात्रंदिवस उजाडणारी ही पृथ्वी आणि ग्रह-ताऱ्यांची भ्रमणावस्था, हे सर्वकाही घडत आहे. वैज्ञानिकांनी हेसुद्धा सांगितले आहे की वनस्पतीच्या जीवनासाठी आवश्यक असलेली पोषक माती तयार करण्यासाठी सूक्ष्म कृमी-कीटक कार्य करीत आहेत. ते हवेतून नायट्रोजन प्राप्त करून वनस्पतींना पुरवितात. अर्थातच जमिनीत पेरण्यात आलेले बी मोठे झुडुप आणि वृक्ष होण्यासाठी या विश्वातील समस्त ग्रह-तारे, सूर्य, चंद्र, समूह, पवन, कृमी-कीटक आणि अशा असंख्य वस्तूंना कार्य करावे लागते आणि तेदेखील अगदी वेळेवर, विनातक्रार, व्यवस्थित व नीटनेटके. जणू हे संपूर्ण कार्य एकाच शक्तिशाली सत्तेच्या इशाऱ्यावर चालू आहे.
जरा या विस्तीर्ण आकाशाकडे पाहा, निरखून पाहा. सूर्य हा अगदी निश्चित पद्धतीनुसार कार्य करीत आहे. दिवस आणि रात्र अगदी वेळेवर होत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा वेळेवर होत आहे. चंद्राचे कार्य नेमक्या पद्धतीनुसारच सुरू आहे. त्याच्या भ्रमण गतीमध्ये कसलाही फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर आकाशातील समस्त ग्रह आणि तारे जे कोट्यवधींच्या संख्येत आहेत, अगदी व्यवस्थितपणे आपापले कार्य करीत आहेत. आपापल्या भ्रमणकक्षा सोडून इतरांच्या भ्रमणकक्षेला किंचित स्पर्शसुद्धा करीत नाहीत. नसता एक-दुसऱ्यांची टक्कर होऊन छिन्नविछिन्न झाले असते. असे वाटते जणू हे सर्व ग्रह-तारे एखाद्या यंत्राच्या भागांप्रमाणे आपापले कार्य व्यवस्थितपणे करीत आहेत.
विचार करण्यासारखी बाब आहे की शेवटी हे काय प्रकरण आहे की जमिनीतून वनस्पती उगविण्यासाठी अथवा पिके उगविण्यासाठी व ती वाढविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी व्यवस्थितरित्या घडत आहेत, समस्त वस्तू परस्पर सहकार्याने कार्य करीत आहेत. यापैकी एकही वस्तू आपले कार्य किंचितही सोडायला तयार नाही वा मुळीच हलगर्जी करीत नाही. शेवटी हे काय प्रकरण आणि कोणते गूढ आहे की या प्रचंड आणि विलक्षण विश्वरूपी कारखान्याचे समस्त कार्य वस्तूंच्या परस्पर सहकार्यातून सुरळीपतणे चालू आहे. या प्रश्नाचे केवळ एकच उत्तर असू शकते आणि ते असे की हे पूर्ण कार्य कोण्या एकाच सम्राट आणि प्रभुच्या इशाऱ्यावर होत आहे. केवळ एकाच व्यवस्थापक अर्थात अल्लाहच्या आदेशाने हे विश्व कार्यरत आहे. जर या विश्वाचे संचालक एकापेक्षा जास्त असते तर या कार्यात परस्पर सहयोग आणि सहकार्य शक्यच झाले नसते.

- सानेगुरूजी

साने गुरूजी यांच्या `इस्लामी संस्कृती'या पुस्तकातील संकलन ही पुस्तिका आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अल्पजीवन चरित्र त्यात देण्यात आले आहे. मुहम्मद (स.) यांचे आगमन सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात जगात सर्वत्र धार्मिक अवनती झाली होती. त्याकाळी हिंदुस्थानात सुद्धा अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला होता. नाना देवतांची पुराणे रचली जाऊ लागली. निरनिराळया देवतांचे उपासक आपसात झगडत होते. खरा धर्म लोप पावला होता, सर्वत्र दु:ख होते.
    अशा काळात मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले. त्यांचे येणे आकस्मात नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धीशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले.

आयएमपीटी अ.क्र. 199      -पृष्ठे - 32    मूल्य - 18                आवृत्ती - 4 (2013)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/gbvde8iyrafv7gprvnz17ue1w06ccdiv





लेखक - डॉ. इल्तिफात अहमद

भाषांतर - प्रा. अब्दुर्रहमान शेख


मुस्लिमेतर बांधव दिव्य कुरआनला फक्त मुसलमानांचाच ग्रंथ समजतात. इस्लाम विषयी हा एक फार मोठा गैरसमज त्यांच्या मनात घर करुन आहे. ह्याच मानसिकतेतुन दुसऱ्या धर्माला वेगळा धर्म मानला जावून अनेकानेक धर्म उदयास आले. परंतु त्यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्ट नमूद आहे की एक प्रेषित नंतर दुसरा प्रेषित धरतीवर अनावश्यक येत नाही तर आवश्यकतेनुसारच प्रकट होतो. जर रामाची शिकवण शुध्द स्वरुपात उपलब्ध असती तर कृष्णाची आवश्यकता भासली नसती. आम्ही ह्या पुस्तिकेत प्राचीन धार्मिक ग्रंथातील फेरबदलास त्यांच्याच धर्मपंडितांद्वारे प्रस्तुत केले आहे.


आयएमपीटी अ.क्र. 78      पृष्ठे - 40     मूल्य - 9            आवृत्ती - 1 (JUNE 2004)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/nq5uf6v6x1zqrbfj7igyrna3p1t813bl



तथापि इस्लाम व दुसऱ्या पंथात असा फरक आहे की दुसरे पंथ जर मानवापासून अशा प्रकारची ब्रह्मलीनता व अनुरक्तता आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात तर वास्तविकत: मानवावर हा त्यांचा अधिकार नव्हे, तर ही त्यांची मानवाकडून अयोग्य मागणी आहे. या विपरित इस्लाम मानवापासून याची अपेक्षा करतो तर तो त्याचा योग्य अधिकार आहे. इतर पंथ ज्यासाठी माणसाकडून जीवन आणि संपूर्ण व्यक्तित्वाचा त्यांच्यासाठी त्याग करण्याची मागणी करतात; वास्तविकत: त्यांचा माणसावर हा अधिकार नाही की त्यांच्यासाठी माणसाने आपल्या एखाद्या गोष्टीचा त्याग करावा. परंतु इस्लाम ज्या अल्लाहसाठी मानवाकडून अशा त्यागाची अपेक्षा करतो त्याला वास्तविकपणे हा अधिकार आहे की त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला जावा.
आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते अल्लाहचे आहे. मनुष्य स्वतः अल्लाहचा आहे. जे काही मनुष्याजवळ आहे आणि जे काही मनुष्याच्या आत आहे ते सर्व अल्लाहचे आहे आणि ज्या वस्तूंचा मनुष्य या जगात प्रयोग करतो त्या सर्वदेखील अल्लाहच्या आहेत. म्हणून अगदी न्याय्य व योग्य, विवेकपूर्ण आहे की जे काही अल्लाहचे आहे ते केवळ अल्लाहसाठीच राहावे. अल्लाहच्या परवानगीशिवाय दुसऱ्यासाठी अथवा स्वत:च्या लाभासाठी आणि मनाच्या पसंतीसाठी मनुष्य जो त्याग करतो तो विश्वासघात आहे आणि अल्लाहसाठी जो त्याग केला जातो तो हक्क अदा करणे तसेच कर्तव्य पार पाडणे आहे.
 परंतु हा मुद्दा दृष्टीआड केल्यास त्या लोकांच्या कार्यपद्धतीत मुस्लिमांसाठी एक महान बोध आहे. लोक आपल्या खोट्या पंथासाठी व आपल्या बनावटी ईश्वरांसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत आहेत आणि दृढतेचा परिचय देत आहेत ज्याचे उदाहरण मानवी इतिहासात क्वचितच आढळते. किती आश्चर्याची गोष्ट आहे की असत्यासाठी माणसाकडून इतकी अनुरक्तता व ब्रह्मतीनता प्रत्यक्षात येते परंतु सत्यासाठी त्याचा सहस्रावा भागदेखील प्रत्यक्षात येऊ नये!!

namaz
सामाजिक एकता सबळ व दीर्घकालापर्यंत अस्तित्वात राहावी म्हणून अल्लाहाने काही कर्तव्ये माणसाकरिता अनिवार्य केली आहेत. पहिले (अनिवार्य) कर्तव्य म्हणजे नमाज, जगातील सर्व मुस्लिमांनी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करायला हवी. जगाच्या पाठीवर कुठेही निवास करणाऱ्या मुस्लिमाने पश्चिमाभिमुख (किबलाकडे तोंड करून) होऊन नमाज अदा करावी, असा आदेश आहे. काबागृह हे केंद्र आहे व जगातील सर्व मुस्लिम त्याच दिशेकडे तोंड करून उभे राहतात. कंबरेपर्यंत वाकतात (रुकू करतात), नतमस्तक होतात (सज़दा करतात) व गुडघ्यावर बसतात (कायद्यात बसतात). संपूर्ण जगातील बहुतांश मुस्लिम दिवसातून पाच वेळा नियमितपणे नमाज अदा करतात. एकतेचे हे मनोहारी दृश्य इस्लामशिवाय इतर कोणत्याही धर्मात वा पंथात पाहायला मिळत नाही. पाचही वेळा मुस्लिमांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका ओळीत उभे राहून एकत्रितपणे नमाज अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तो जर एकटा असेल तर त्यास एकटे नमाज पढण्याची मुभा आहे. मात्र एकत्रितपणे एका इमामाच्या पाठीमागे शिस्तबद्धपणे उभे राहून नमाज पढण्यास अधिक प्राधान्य देण्यात येते. म्हणून दोन मुस्लिमांना नमाज अदा करावयाची असल्यास, तिला
एकतेचे स्वरुप देण्याकरिता एकाने नमाजाचे नेतृत्व करावे (इमामत करावी) व दुसऱ्याने मागे (बाजूला) उभे राहून त्याचे अनुकरण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.


सूरह यूनुसच्या आयतीचा मागील अंकात उल्लेख करण्यात आला आहे. ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर विश्वास बाळगणाऱ्यांच्या आणि ‘दीन’च्या मार्गात त्रास सहन करणाऱ्याच्या आणि ‘ईमानी’ (श्रद्धावंताच्या) जीवनासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या आणि अज्ञानतेच्या शासनाशी संघर्ष करणाऱ्यांच्या बाबतीत आहे. अल्लाह म्हणतो, ‘‘लहुमुल बुश्रा फ़िलहयातिद्दुनिया व फ़िल-आ़िखरति.’’ अर्थात- त्यांच्यासाठी शुभवार्ता आहे या जगातही आणि यानंतर येणाऱ्या जीवनातदेखील.

माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक  लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्ट निश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ विंâवा ‘संबंध तोडणे’.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी).

स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचात्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि

एक ऐतिहासिक व्यक्तीमत्व : कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर

Oasis
हजरत अबुबकर यांचे निधन 23 ऑगस्ट 634 रोजी झाले. निधनापूर्वी ते आजारी होते व आपण या जीवघेण्या आजारातून  उठू शकणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी हजरत उमर रजि. यांना आपला उत्तराधिकारी निवडण्याचा विचार केला. याचे कारण असे होते की, प्रेषित सल्ल. यांच्या निधनानंतर सत्तेसाठी जी काही साठमारी झाली होती, त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी मुस्लिमांमध्ये मतभेद होऊन रक्तपात होऊ नये, या प्रामाणिक इच्छेतून त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र याची घोषणा अचानकपणे न करता त्यांनी या संबंधीची पूर्वतयारी अतिशय योजनाबद्ध  पद्धतीने केली.
सर्वप्रथम त्यांनी आशरा-ए-मुब्बशरामधील प्रसिद्ध सहाबी अब्दुरहेमान बिन औफ रजि., हजरत उस्मान रजि. आणि हजरत अली रजि. यांच्याशी याबाबतीत सल्लामस्सलत केली. या तिघांनीही हजरत उमर रजि. यांना खलीफा करण्याबद्दल सकारात्मक मत दिल्यानंतर त्यांनी हजरत उमर यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपला निर्णय कळवला. त्यावर ह. उमर रजि. यांनी स्पष्टपणे सांगितले की, ’’एवढी मोठी जबाबदारी घेण्याची माझी अजीबात इच्छा नाही.’’ त्यावर हजरत अबुबकर यांनी सांगितले की, ’’तुमची इच्छा असण्या किंवा नसण्याचा इथे प्रश्न नाही. मला तुमच्यापेक्षा दूसरी योग्य व्यक्ती या पदासाठी दिसत नाही. म्हणून अपात्र व्यक्तीची निवड  करून मी अल्लाहला तोंड कसे दाखविणार? तुम्हाला या पदाची गरज नाही मात्र या पदाला तुमची गरज आहे. मी याबाबतीत सर्व महत्त्वाच्या व्यक्तींशी सल्लामसल्लत करून हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे सर्व लोक तुम्हाला खलीफा म्हणून स्वीकारण्यास अनुकूल आहेत, म्हणून तुम्हाला हे पद घ्यावेच लागेल.’’ तेव्हा नाईलाजाने हजरत उमर रजि. खलीफा होण्यास होकार दिला.
यानंतर हजरत अबुबकर रजि. यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लोकांसमोर केली. त्यात त्यांनी सांगितले की, ’’मी माझ्या कुठल्याही नातेवाईकाला खलीफा म्हणून निवडलेले नाही. जो तुमच्यापैकी सर्वोत्कृष्ट आहे त्याचीच निवड मी केलेली आहे. कारण माझ्या दृष्टीने जनतेचे हित हेच सर्वोतोपरी आहे. मी हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना खलीफा म्हणून निवडलेले आहे. माझी ही निवड तुम्हाला मान्य आहे का?’’ त्यावर उत्स्फूर्तपणे उपस्थित लोकांनी त्यांच्या निवडीचे समर्थन केले. म्हणून अगदी सहज पद्धतीने सत्तांतर घडून आले. 23 ऑगस्ट 634 रोजी खलीफा अबुबकर रजि.यांचे निधन होताच 24 ऑगस्ट 634 रोजी त्यांनी खलीफा म्हणून शपथ घेतली व लगेच लोकांनी त्यांच्या हातावर हात ठेऊन एकनिष्ठतेची बैत (शपथ) घेतली.
हजरत उमर बिन खत्ताब रजि. हे एक अतिशय कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर होते. दुरून पाहणाऱ्यांना त्यांची भीती वाटे परंतु ज्यांचा त्यांच्याशी संपर्क होई, ते त्यांच्यातील उमदेपणा पाहून भारावून जात.
 हजरत उमर रजि. यांचा खिलाफतीचा कालावधी अतिशय गाजलेला कालावधी आहे. त्यांच्या कालावधीत इस्लाम बळकट झाला आणि इस्लामच्या सीमांचा विस्तार झाला.  हजरत उमर रजि. यांचा जन्म इ.स. 580 मध्ये ’अदि ’ या कुळात झाला. हे कूळ मक्का शहरातील प्रतिष्ठित जरूर होते पण सामार्थ्यवान   नव्हते. धार्मिक दृष्ट्याही या कुळाला बनू हाशीम आणि बनू उम्मैय्या सारखे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त नव्हते. मात्र हजरत उमर रजि. यांनी आपल्या अंगभूत कौशल्य आणि धाडसी स्वभावामुळे मक्का शहरामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. अन्याय सहन करण्याची त्यांची तयारी नव्हती. ते लढाऊ प्रवृत्तीचे होते. न्यायासाठी लढण्यासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांची एक कन्या हजरत हफ्सा रजि. ह्या प्रेषित सल्ल. यांच्या सुविद्य पत्नी होत. मक्कामध्ये जे मुठभर लोक साक्षर होते त्यात हजरत उमर रजि. यांचा समावेश होता. त्यांना हिब्रु भाषा येत होती म्हणून ज्यू लोकांशी त्यांची चांगली मैत्री होती.
ते प्रेषित सल्ल. यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होते व कट्टर मूर्तीपूजक होते. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा इस्लामची घोषणा केली होती तेव्हा त्यांचा विरोध करणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. ते इस्लामचा आणि प्रेषितांचा दुस्वास करीत, परंतु त्यांचे शौर्य आणि धाडसी स्वभाव पाहून प्रेषित सल्ल. सातत्याने अल्लाहकडे दुआ करीत की, ऐ अल्लाह! उमरच्या मनामध्ये इस्लामबद्दल प्रेम उत्पन्न कर. शेवटी ही दुआ स्विकारली गेली. वयाच्या तिसाव्या वर्षी हजरत उमर रजि. यांनी इस्लामचा स्वीकार केला. इस्लामचा स्वीकार करण्याचा त्यांचा किस्साही रोमहर्षक असा आहे.
ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा मक्का शहरामध्ये मुर्तीपूजक कुरैश हे इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा सर्व शक्तीनिशी विरोध करीत होते. तरीही हळूहळू लोक इस्लामचा स्वीकार करीतच होते. ह्या गोष्टीची हजरत उमर रजि. यांना चीड येत होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्ल. यांची हत्या करून हा विषय कायमचा संपविण्याचा निर्णय घेतला व एका दिवशी तलवार हातात घेऊन प्रेषित सल्ल. यांचा शोध घेत निघाले. रस्त्यात त्यांचा एक मित्र नईम बिन अब्दुल्लाह त्यांना भेटला. त्याने हजरत उमर रजि. यांचा अवतार पाहून विचारले, ’’ हे उमर एवढ्या त्वेषामध्ये कुठे निघालात?’’ त्यावर हजरत उमर रजि. उत्तरले, ’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा खून करण्यासाठी निघालो आहे.’’ आज त्यांचा आणि इस्लामचा नायनाट करूनच थांबेन. त्यावर त्यांचा मित्र हसून म्हणाला, ’’अगोदर आपल्या घराची काळजी घ्या’’ तुमची सख्खी बहीण ह.फातेमा रजि. आणि मेव्हणा ह.सईद रजि. दोघेही मुस्लिम झालेले आहेत.’’ हे ऐकताच हजरत उमर रजि. यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी थेट मोर्चा बहिणीच्या घराकडे वळविला. घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर कुरआन पठणाचा ध्वनी आला. ह.उमर रजि. वादळासारखे बहिणीच्या घरात घुसले. त्यांचा उग्र अवतार पाहून कुरआन पठण करणाऱ्या खब्बाब रजि. कुरआनच्या आयाती लपवून ठेवल्या व लपून बसले. उमर यांनी मेव्हण्याला दरडावून विचारले ’’तुम्ही काय वाचत होते?’’ तेव्हा मेव्हण्यांनी काही उत्तर दिले नाही. म्हणून चिडून ह. उमर रजि. यांनी मेव्हण्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांना सोडविण्यासाठी ह.फातेमा रजि. मध्ये पडल्या तर त्यांनाही जबर मारहाण केली. इतकी की त्यांचे डोके फुटून चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यांच्या बहिणीने त्वेषाने हजरत उमर रजि. यांना उत्तर दिले की, ’’ हो! माझ्या शरीरातही खत्ताब यांचे रक्त आहे. मी आणि माझ्या पतीने इस्लामचा स्वीकार केलेला आहे. तुला काय करायचे ते कर, आम्हा दोघांना ठार मार. पण लक्षात ठेव इस्लामची घौडदौड तू मूळीच रोखू शकणार नाहीस.’’ बहिणीचा रक्तबंबाळ चेहरा आणि तिचे कणखर व आत्मविश्वासाने भरलेले बोलणे ऐकताच ह.उमर यांचा राग खर्रकण उतरला. ते शांत झाले व त्यांनी मेव्हण्याला तुम्ही काय वाचत होतात ते माझ्यासमोर वाचून दाखवा, अशी विनंती केली. तेव्हा बहिणीने सांगितले, तू अगोदर गुस्ल (स्वच्छ होणे) कर, पवित्र हो आणि नंतर कुरआन ऐक. त्यावर ह.उमर यांनी अंघोळ केली व कुरआन ऐकण्यासाठी निमुटपणे येवून बसले. तेव्हा लपून बसलेले हजरत खब्बाब रजि. बाहेर आले  त्यांनी त्यांच्या समोर कुरआनच्या आयातींचे खालीलप्रमाणे पठण केले. ’’ताहा ! आम्ही तुम्हांस कष्ट देण्यासाठी हे कुरआन अवतरलं नाही. पण जे भितात त्यांच्यासाठी मात्र हे बोध घडविण्यासाठी आहे. ज्यानं ही धरती आणि उंच-उंच आकाशं निर्माण केलीत त्याच्याकडून अवतरलेला. (जो) महान कृपावंत राजसिंहासनावर आरूढ आहे. आकाश आणि पृथ्वीत आणि त्यांच्या उभयंतात आणि जमिनीखाली सर्वकाही त्याच्याच मालकीचं आहे. तुम्ही मोठ्यानं बोलला तरी आणि जे काही गुप्त अथवा लपलंय ते सर्व त्यास ठाऊक आहे. अल्लाहशिवाय कुणी ईश्वर नाही. सारी सुंदर नावं त्याचीच आहेत.’’ (कुरआन - सुरे ताहा :आयत नं.1-8)
उमर यांनी सुरवातीच्या या आयाती ऐकल्या आणि ऐकतच राहिले. ह. खब्बाब रजि. यांनी दुसऱ्या आयातीचे पठण केले, ’’निश्तिच मीच अल्लाह आहे, माझ्याव्यतिरिक्त कुणी ईश्वर नाही. तेव्हा माझी आराधना करा आणि माझ्या आठवणीसाठी नमाज कायम करा.’’(कुरआन-सुरे ताहा : आयत नं.14)
या आयातींचा जादूसारखा परिणाम ह.उमर रजि. यांच्यावर झाला. ते म्हणाले, ’’निःसंशय हा ईश्वरीय कलाम (साहित्य) आहे’’ त्यांनी बहिण आणि मेव्हण्याची माफी मागितली आणि सरळ घराबाहेर पडले आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. ज्या ठिकाणी आपल्या अनुयायांना दर्स (मार्गदर्शन) देत बसले होते त्या घरासमोर गेले. दारावर तैनात सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. त्यावर ह.उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपण भेटीला आल्याची बातमी देण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना तशी बातमी दिली. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आत बोलावून घेतले. प्रेषित सल्ल. म्हणाले, ’’ बोला उमर कसे काय आलात ? चांगल्यासाठी आलात का वाईट करण्यासाठी आलात?’’ त्यावर हजरत उमर रजि. नम्रपणे उत्तरले, ’’ हे प्रेषित सल्ल. मी आपला सच्चा अनुयायी बणून इस्लामचा स्विकार करण्यासाठी आलोय.’’ तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिमांनी , ’’अल्लाहु अकबर!’’ (अल्लाह श्रेष्ठ आहे) च्या घोषणा दिल्या आणि हजरत उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हातावर हात ठेऊन बैत घेतली आणि इस्लाम व प्रेषित सल्ल. यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय व्यक्त केला.
हजरत उमर रजि. यांनी ज्या दिवशी इस्लामचा स्विकार केला त्याच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी हजरत हम्जा रजि. यांनी इस्लाम स्वीकारला होता. ते ही मक्केतील एक मोठे प्रस्थ होते. या दोन धाडसी लोकांनी इस्लाम स्वीकारल्याने इस्लाम मानणाऱ्यांच्या गटात चैतन्य पसरले तर कुरैशच्या गटामध्ये नैराश्य पसरले.
हजरत उमर रजि. यांच्या द्वारे इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे इस्लामी इतिहासाला कलाटणी मिळाली. इस्लाम स्वीकारताच त्यांनी त्याची जाहीर घोषणा केली. त्यांनी व हजरत हम्जा रजि. यांनी मुस्लिमांच्या एका गटाला घेऊन काबागृहामध्ये जावून तवाफ (काबागृहाला 7 प्रदक्षिणा घालणे)  केला आणि आपण मुस्लिम झाल्याची सार्वजनिकरित्या घोषणा करून टाकली. या दोन योद्धयांच्या इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मूर्तीपूजक कुरैशच्या गटामध्ये खळबळ माजली. हजरत उमर रजि. यांच्या या धाडसी कृतीचा सन्मान म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ह. उमर रजि. यांना ’अल-फारूक’ (सत्य आणि असत्यामध्ये फरक करणारा) ही पदवी बहाल केली. त्यानंतर हजरत उमर रजि. हे हजरत उमर फारूख रजि. या नावाने ओळखले गेले आणि आजही ओळखले जातात.
जेव्हा मुस्लिमांनी मदिनामध्ये हिजरत केली तेव्हा ती गुप्तपणे केली होती. पण ह. उमर रजि.यांना अशी गुपचूप हिजरत मान्य नव्हती. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा त्यांना मदिना येथे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा ते सर्वप्रथम काबागृहामध्ये गेले. तलवार उपसून काबागृहाचा तवाफ केला आणि उपस्थित कुरैश लोकांच्या दिशेने तलवार फिरवून म्हणाले की, ’’तुमचा सर्वनाश होओ! मी मदिनेला जात आहे. कोणाला आपल्या पत्नीला विधवा करायचे असेल तर त्याने समोर येऊन मला थांबवावे.’’ त्यांना अडविण्याची कोणीच हिम्मत केली नाही आणि ते छाती पुढे करून ऐटित काबागृहातून निघाले ते थेट मदिनेला पोहोचले.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे त्यांच्या शब्दाला फार मान होता. ह. अबुबकर रजि. यांच्यानंतर प्रेषितांकडे त्यांचे स्थान होते. त्यांनी प्रेषित सल्ल. यांना जे-जे सल्ले दिले होते त्यापैकी 21 सल्ले असे होते, ज्यांचे समर्थन दस्तुरखुद्द कुरआनच्या आयातींच्या मार्फत झाले. ते प्रेषितांवर जीवापाड प्रेम करीत होते. एकदा अशी घटना घडली की, त्यांच्या घरी एक ज्यू आणि एक मुस्लिम व्यक्ती आले व त्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. त्यांच्यापैकी ज्यू व्यक्तीने गयावया करत ह. उमर रजि. यांना सांगितले की, ’’प्रेषित सल्ल. यांनी आमची गाऱ्हाणी ऐकूण माझ्यातर्फे निर्णय दिलेला आहे.’’ त्यावर हजरत उमर यांनी त्या मुस्लिम व्यक्तीला विचारले की, ’’हा सांगतोय ते बरोबर आहे का? ’’ त्याने सांगितले की हो बरोबर आहे पण मला तुमच्याकडून न्याय हवा. तेव्हा हजरत उमर रजि. रागाने बेभान झाले आणि म्हणाले, ’’ठीक आहे. दोन मिनिटे थांब. मी न्याय देतो.’’ ते आत गेले, तलवार आणली आणि एका झटक्यात त्या मुस्लिम व्यक्तीचे डोके धडावेगळे केले. या घटनेवरून त्यांच्याकडे प्रेषित सल्ल. यांच्या शब्दाला किती मान होता, याचा अंदाज येतो.
त्यांनी इस्लामपूर्व काळात तीन विवाह केले होते. इस्लाम स्विकारल्यानंतर त्यांच्यापैकी एकाच पत्नीने इस्लाम स्विकारला होता. तेव्हा त्यांनी इस्लाम न स्विकारणाऱ्या दोन पत्नींना घटस्फोट देऊन टाकला. त्यांना एकदा कळाले की, प्रेषित सल्ल. यांच्या पत्नींमध्ये काही कारणांमुळे इर्ष्या निर्माण झाली असून, त्यात त्यांची मुलगी हफ्सा सुद्धा सामील आहे. तेव्हा त्यांनी तिचे मुंडके छाटण्याचा इरादा प्रेषित सल्ल. यांच्यासमोर व्यक्त केला होता. तसेच त्यांनी हफ्सा मार्फत प्रेषितांच्या अन्य पत्नींकडेसुद्धा तीव्र शब्दात त्यांच्या इर्ष्यात्मक वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे प्रेषित सल्ल. यांच्या अन्य पत्नीसुद्धा त्यांना वचकून असत.
दि. 24 ऑगस्ट 634 रोजी द्वितीय खलीफा म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी ह. अबुबकर रजि. यांचा सन्मान म्हणून स्वतः खलीफा हे बिरूद लावण्याचा इन्कार केला. तेव्हापासून लोकांनी त्यांना ’अमीरूल मोमीनीन’ म्हणजे मुस्लिमांचा नेता म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. शपथ गृहण केल्यानंतर त्यांनी जे भाषण केले ते खालीलप्रमाणे, ’’ हे श्रद्धावानहो अबू बकर रजि. आता आपल्यात नाहीत. दोन वर्ष नेतृत्व देऊन ते अल्लाहकडे परत गेले आहेत. ते अत्यंत समाधानी असतील की, त्यांनी अथांग सागरात तुफान वादळात सापडलेली मुस्लिम राज्याची नौका सुरक्षितपणे वल्हवीत किनाऱ्याला नेली. धर्मत्यागाविरूद्धचे युद्ध त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यांना धन्यवाद असोत. आता अरबभूमीत इस्लाम सर्वोच्च झालेला आहे. तो आता पुढच्या मार्गावर आहे. आता बायझॅन्टाईन व पर्शिया या बलाढ्य साम्राज्यविरूद्ध अल्लाहच्या नावाने आपला जिहाद चालू आहे...’’
’’ह.अबू बकर रजि. नंतर खलीफापदाचे दायित्व माझ्यावर येऊन पडलेले आहे. मी या पदाची आकांक्षा कधीही धरलेली नव्हती. मी आश्वासन देतो की, या पदामुळे माझ्यावर पडलेल्या अनिवार्य जवाबदाऱ्या व कर्तव्य इस्लामच्या आज्ञेनुसार व माझ्या कुवतीनुसार पार पाडण्याचा मी प्रामाणिक व अहर्निश प्रयत्न करीत राहीन.’’
’’ या माझ्या कार्यात मी पवित्र ग्रंथाचे मार्गदर्शन घेईन व प्रेषितांनी व पहिल्या खलीफांनी घालून दिलेल्या परंपरांचे अनुसरण करीन... जर मी या मार्गापासून विचलित झालो, तर मला दुरूस्त करा.’’ (28-116).
कठोर बनव, मृदू बनव !
यानंतर त्यांनी पुढील प्रार्थना म्हटली व प्रत्येक वेळी ’आमीन’ (तथास्तु) असे म्हणण्यास लोकांना सांगितले :
’’हे अल्लाह! मी कठोर आहे. सत्याच्या प्रस्थापनेसाठी,
तुझ्या आज्ञा अमलात त्यांच्याविरूद्ध मला कठोर बनव...
’’ हे अल्लाह ! मला दांभिकतेपासून मुक्त ठेव. माझा दृढनिश्चय वाढव, जेणेकरून मी जे काही करीन ते केवळ तुझ्या प्रसन्नतेसाठीच असेल...
’’हे अल्लाह ! माझे हृदय श्रद्धावानांसाठी दयाळू बनव, जेणेकरून त्यांच्या गरजांकडे मी समर्पणबुद्धीने लक्ष देऊ शकेन...
’’ हे अल्लाह ! तुझ्या आज्ञापालनात मी कमी पडल्यास मला कार्यप्रवण कर व माझी श्रद्धा वृद्धिंगत कर.. आत्मपरीक्षण करण्याची मला शक्ती दे...’’
हे अल्लाह ! मला कुराणाचा अर्थ समजण्याची बुद्धी व त्यानुसार वागण्याचे सामर्थ्य प्रदान कर..’’ सदरच्या भाषणाचा संदर्भ : चार आदर्श खलीफा, लेखक : डॉ. शेषराव मोरे, पान क्र. 155).

- एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget