Latest Post

प्रेषितांना ओळखण्याचे पुरावे कोणते आहेत व प्रेषिताची वास्तवता काय आहे.? तुम्ही हे पाहता की जगात माणसाला ज्या ज्या वस्तूंची गरज असते. अल्लाहने त्या सर्वांची व्यवस्था स्वतःच केलेली आहे. मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला किती साधनसामग्री देऊन जगात धाडण्यात येते. बघण्यासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, वास घेण्यासाठी तसेच श्वासोच्छवासासाठी नाक, स्पर्शज्ञानासाठी शरीराच्या त्वचेतील स्पर्शाची संवेदना, चालण्यासाठी पाय, काम करण्यासाठी हात, विचारचिंतन करण्यासाठी मेंदू आणि अशाच प्रकारच्या इतर अगणित बाबी, पूर्वयोजनेनुसार त्याच्या सर्व गरजांचा साकल्याने विचार करून त्या चिमुकल्या देहात समाविष्ट केलेल्या असतात. नंतर जेव्हा तो जगात येतो तेव्हा त्याच्या जीवनास आवश्यक असलेल्या गोष्टी इतक्या विपुल प्रमाणात त्याला उपलब्ध होतात ज्यांची मोजदादही तुम्ही करू शकत नाही. हवा, पाणी, प्रकाश, उष्णता, जमीन व मातेचे वक्षस्थळात आधीच निर्माण झालेले दूध, माता पित्यांच्या नातेवाईकांच्या व इतरांच्या अंतःकरणातही त्याच्याबद्दल उत्पन्न होणारी माया व प्रेम, निर्माण केले जाते, ज्यांच्याद्वारा त्याचे पालनपोषण व संगोपन केले जाते. मग जसजसा तो वाढत जातो तसतसे त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी हरप्रकारच्या वस्तू त्याला प्राप्त होत जातात. असे वाटते की, जणू काय पृथ्वीवरच्या व आकाशातील सर्व शक्ती त्याच्या संगोपनासाठी व सेवेसाठी कार्यरत आहेत.

यानंतर आणखी पुढे चला. जगात कार्य करण्यासाठी ज्या क्षमता आवश्यक असतात त्या सर्व माणसाला दिल्या आहेत. शारीरिक शक्ती, बुद्धी व आकलनशक्ती, वाक्शक्ती व अशाच प्रकारच्या इतर अनेक क्षमता प्रत्येक माणसात कमीजास्त प्रमाणात असतात. परंतु या बाबतीत ईश्वराची व्यवस्था एक अजब प्रकारची आढळते. त्याने सर्व प्रकारच्या क्षमता सर्व माणसांना सारख्या प्रमाणात दिलेल्या नाहीत. जर असे झाले असते तर कोणीही कोणाचा गरजू राहिला नसता व कोणीही कोणाची पर्वा केली नसती. म्हणून अल्लाहने सर्व माणसांच्या एकूण गरजांसाठी सर्व क्षमता माणसामध्येच निर्माण केल्या असल्या तरी अशा रीतीने एका माणसाला एक विशिष्ट क्षमता अधिक प्रमाणात दिली तर दुसऱ्या माणसाला वेगळी क्षमता अधिक प्रमाणात दिली. तुम्ही हे पाहता की काही माणसांमध्ये शारीरिक श्रम करण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक असते. काही माणसात एखाद्या विशिष्ट कलेची अगर विशिष्ट व्यवसायाची उत्पन्न क्षमता असते व बाकीचे त्यापासून वंचित असतात. काही माणसे इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. काही माणसे उपजत सेनापती असतात. काही माणसात विशिष्ट शासकीय योग्यता असते. काही माणसे असामान्य वक्तृत्वाची क्षमता घेऊन जन्माला येतात. काही माणसांमध्ये लेखन कलेचे अचाट सामर्थ्य स्वाभाविकतःच असते. एखादा मनुष्य असा जन्मतो की त्याची बुद्धी गणितशास्त्रात अत्यंत तीक्ष्ण असते. ती इतकी की, या शास्त्रातील अत्यंत कठीण प्रश्न व समस्यांची तो अशी चुटकीसारखी सोडवणूक करतो जी इतरांच्या आवाक्याबाहेर असते. दुसरा एखादा मनुष्य असा होऊन जातो जो अद्भूत वस्तु निर्माण करतो व त्यांना पाहून सर्व जग आश्चर्याने थक्क होऊन जाते. आणखी एखादा मनुष्य अशी अपूर्व कायदेविषयक निपुणता बाळगतो की वर्षानुवर्षे कायद्यातील एखाद्या समस्येवर चिंतन केल्यानेही ती सुटू शकत नाही, अशा समस्येवर त्याची दृष्टी आपोआपच पडते. या सर्व ईश्वरी देणग्याच होत. कोणीही आपल्यामध्ये अशा प्रकारच्या क्षमता स्वतः निर्माण करु शकत नाही. शिक्षण व संस्काराने या गोष्टी उत्पन्न होऊ शकत नाहीत. खरे तर या सर्व उपजत क्षमता असून ईश्वर आपल्या चातुर्यानेच त्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीलाच त्या प्रदान करतो.

ईश्वराच्या या देणग्यांवरही विचार व चिंतन केल्यास असे आढळून येते की, मानवी संस्कृतीसाठी ज्या योग्यता व क्षमतांची गरज जास्त प्रमाणात असते, त्या जास्त माणसात निर्माण होतात आणि ज्या क्षमतेची गरज कमी प्रमाणात असते त्या क्षमता कमी लोकांत आढळून येतात. शिपाई जास्त तयार होतात. किसान, सुतार, लोहार व अशाच प्रकारची इतर कामे करणारी माणसे बहुसंख्येने तयार होतात. परंतु विद्वान व बौद्धिक सामर्थ्य असणारे कमी असतात. तसेच सेनापतित्व व राजकीय थोर योग्यता असणारे थोड्या प्रमाणांत जन्माला येतात. जे एखाद्या कलेत व शास्त्रात अत्यंत व असामान्य ज्ञान व क्षमता बाळगतात ते अत्यंत दुर्लभ असतात. कारण त्यांच्या कर्तृत्वाने मानवजातीला शतकानुशतकापर्यंत त्यांच्यासारख्या विद्वानांची गरज उरत नाही.

जनमानसातून इंजिनियर, गणितज्ञ, वैज्ञानिक व कायदेपंडित, राजनीतिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व भिन्न भिन्न व्यवस्थांची क्षमता बाळगणारे लोकच जन्माला यावेत; केवळ हीच एक गरज मानवजातीला या जगात यशस्वी व सफल होण्यासाठी नाही, याचाही विचार व्हायला हवा. या सर्वांहून मोठी आणखी एक गरज आहे व ती अशी की माणसांना ईश्वराचा मार्ग दाखविणाराही कोणीतरी हवा. इतर लोक तर केवळ इतकेच दाखविणारे आहेत की, जगात मनुष्यासाठी काय काय आहे व त्यांचा कशारीतीने वापर व उपयोग केला जाऊ शकतो. परंतु खुद्द माणसाचे अस्तित्व जगात कशासाठी आहे, हे सांगणारा व दाखवून देणाराही कोणीतरी पाहिजेच. तसेच मनुष्याला विश्वातून ही सर्व साधन-सामग्री कोणी प्रदान केली? त्या प्रदान करणाऱ्याची इच्छा काय आहे? हे ही सांगणारा पाहिजेच, जेणेकरून मनुष्याने त्यानुसार आचरण करून निश्चित व शाश्वत सफलता प्राप्त करावी. ही मनुष्याची वास्तविक व सर्वांत मोठी गरज आहे. ज्या ईश्वराने आमची लहानसहान गरज पुरी होण्याची परिपूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे, तो ईश्वर इतक्या महत्त्वपूर्ण गरजेची पूर्तता करण्याबाबत बेसावध असेल; ही गोष्ट मान्य करण्यास बुद्धी नकार देते. असे कदापिही नाही. ज्या प्रकारे ईश्वराने प्रत्येक विद्येची प्रत्येक कलेची व विज्ञानाची योग्यता व क्षमता बाळगणारी माणसे जन्माला घातली त्याचप्रमाणे अशा माणसांनाही जन्माला घातले ज्यांच्यात खुद्द ईश्वरालाच ओळखण्याची सर्वोच्च पात्रता होती. ईश्वराने त्यांना ‘‘दीन’’ (जीवनधर्म), नैतिकता व आचारशास्त्र (शरिअत) चे ज्ञान आपल्याकडून दिले व इतरांना त्यानी या गोष्टींची शिकवणूक द्यावी या सेवा कार्यासाठी त्यांना नियुक्त केले. हेच ते लोक होत ज्यांना आमच्या भाषेत ‘‘नबी’’ अथवा ‘‘रसूल’’ किंवा ‘‘प्रेषित’’ (ईशदूत, संदेष्टा) असे म्हटले जाते.

प्रेषितांची ओळख
ज्याप्रमाणे अन्य विद्या व कलांमध्ये नैपुण्य व कौशल्य असणाऱ्या व्यक्तीमध्ये विशेष प्रकारची बुद्धी व विशिष्ट प्रकारची मनोवृत्ती उपजतच असते, अगदी त्याचप्रमाणे प्रेषितसुद्धा एक विशिष्ट मनोवृत्ती घेऊनच जन्माला येतात.
एखाद्या जन्मजात कवीचे काव्य ऐकल्यावर आमच्या चटकन लक्षात येते की त्याच्यामध्ये उपजतच काव्यप्रतिभा आहे, कारण इतरांनी हवा तितका प्रयत्न करूनही तशी काव्यरचना त्यांना साधत नाही. त्याचप्रमाणे एखादा जन्मजात वक्ता, एखादा जन्मजात प्रतिभासंपन्न लेखक, एखादा जन्मजात संशोधक, एखादा उपजत नेतृत्वगुण असणाऱ्याची ओळख त्याच्या कर्तृत्वामुळे स्पष्टपणे पटते. कारण हे सर्व त्यांच्या अंगी असलेल्या अनन्यसाधारण योग्यतेची चमक प्रकट करतात जी इतर लोकांत नसते. ठीक अशीच स्थिती प्रेषितांचीही असते. त्यांची बुद्धिमत्ता अशा गोष्टींची उकल करते जी इतरांच्या कल्पना-विचारातही नसते. तो अशा विषयांचे विवरण करतो ज्याचे विवरण व विश्लेषण त्यांच्याखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही. त्यांची दृष्टी अशा सूक्ष्म बाबीपर्यंत खोलवर जाते जेथे इतरांची दृष्टी वर्षानुवर्षाच्या चिंतनानंतरही पोहोचू शकत नाही. तो जे काही सांगतो त्याचा आपली बुद्धी स्वीकार करते आणि आपले मन अशी ग्वाही देते की, अवश्य हेच सत्य आहे. जगातील अनुभवावरून व ब्रह्मांडातील निरीक्षणावरून त्यांची प्रत्येक गोष्ट खरी असल्याचे सिद्ध होते. परंतु आपण स्वतःच तशा गोष्टी सांगण्याची इच्छा करू लागलो तर आम्ही ते सांगू शकत नाही. यानंतर त्याची मनोवृत्ती इतकी सोज्वळ, सात्विक व पवित्र असते की तो प्रत्येक व्यवहारात सचोटीचा सद्वर्तनी व सालसपणाचा मार्ग अंगीकार करणारा असतो तो कधीही चुकीची गोष्ट उच्चारत नाही, कसलेही दुष्कर्म करीत नाही आणि सतत चांगुलपणा व सत्यनिष्ठेची शिकवण देत असतो. इतरांना तो जे काही सांगतो त्यावर स्वतः आचरण करून दाखवितो. त्याच्या जीवनात असे एकही उदाहरण आढळून येत नाही की त्याच्या उक्तीविरुद्ध त्याची कृती आहे. त्याच्या कथनात व कृतीत कसलेही स्वहित आढळत नाही. तो इतरांच्या भल्यासाठी स्वतः हानी पत्करतो आणि स्वतःच्या भल्यासाठी इतरांचे नुकसान कदापिही करीत नाही. त्याचे संपूर्ण जीवन सचोटी, सभ्यपणा, पावित्र्य, उच्च व उदात्त विचारसरणी तसेच पराकोटीच्या उच्च माणुसकीचा एक आदर्श असतो. त्यामध्ये शोधूनही कसला दोष आढळत नाही. हे सर्व माहीत झाल्यानेच स्पष्टपणे ओळखता येते की हा मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे.

माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चार गुणवैशिष्ट्ये ज्या मनुष्यात असतील तो पक्का धर्मद्रोही असेल आणि ज्या मनुष्यात त्यापैकी कोणतेही एक गुणवैशिष्ट्य असेल तर त्याच्यात शत्रुत्वाचे एक गुणवैशिष्ट्य असेल, तर ते त्याने सोडून द्यावे. ती चार गुणवैशिष्ट्ये अशी आहेत- जेव्हा त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली तर त्यात अफरातफर करणे, खोटे बोलणे, वचन दिले तर ते न पाळणे आणि जेव्हा त्याचे कुणाशी भांडण झाले तर शिवीगाळ करणे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)


माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत मोठा खोटारडेपणा म्हणजे मनुष्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना ती गोष्ट दाखवावी जी त्या दोन्ही डोळ्यांनी पाहिली नसेल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : म्हणजे त्याने कसलेही स्वप्न पाहिले नाही परंतु जागा झाल्यानंतर अतिशय मजेदार व चांगल्या गोष्टी सांगतो, म्हणतो की हे मी स्वप्नात पाहिले आहे, असे करणे म्हणजे आपल्या डोळ्यांद्वारे खोटे बोलविणे होय.
 माननीय असमा बिन्ते उमैस (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका पत्नीला घेऊन त्यांच्या घरी गेलो. जेव्हा आम्ही पैगंबरांच्या घरी पोहोचलो तेव्हा पैगंबरांनी दुधाचा एक ग्लास काढून आणला, मग त्यांनी आपल्या इच्छेनुसार प्यायले आणि त्यानंतर आपल्या पत्नीला दिला. त्या म्हणाल्या, ‘‘मला इच्छा नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही भूक व खोटारडेपणाला एकत्र करू नका.’’ पैगंबरांना जाणवले की आपल्या पत्नीला भूक लागलेली असूनदेखील त्या औपचारिकपणा दाखवित आहेत, म्हणून पैगंबरांनी खोट्या औपचारिकपणा दाखविण्यास मनाई केली आहे. (हदीस : मुअजम सगीर तिबरानी)
 माननीय सुफियान बिन असीद ह़जरमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आपल्या बंधुला एखादी गोष्ट सांगितली आणि त्याने तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, मात्र तुम्ही जी गोष्ट त्याला सांगितली ती खोटी होती, हा फार मोठा अप्रामाणिकपणा आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
 माननीय अब्दुल्लाह बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) आमच्या घरी आले होते तेव्हा माझ्या आईने मला बोलविले, ‘‘इकडे ये! मी तुला एक वस्तू देईन.’’ तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘तुम्ही त्यांना काय देऊ इच्छिता?’’ आई म्हणाली, ‘‘त्याला खजूर देऊ इच्छिते.’’ पैगंबरांनी आईला म्हटले, ‘‘जर तुम्ही देण्यासाठी बोलविले आणि दिले नाही तर तुमच्या कर्मपत्रात हा खोटारडेपणा लिहिला जाईल.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : सर्वसामान्यपणे आई-वडील आपल्या मुलांशी असे वागतात की काही देण्याच्या बहाण्याने बोलवितात, मात्र देण्याची इच्छा नसते, तेव्हा हा अल्लाहपाशी खोटारडेपणा ठरेल. कर्मपत्रात हा खोटारडेपणाच्या यादीत लिहिला जाईल.
 माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) सांगतात, खोटे बोलणे कोणत्याही स्थितीत वैध नाही, न गंभीरपणे आणि न गंमत म्हणून. आणि हेदेखील वैध नाही की तुमच्यापैकी कोणी आपल्या मुलाला एखादी वस्तू देण्याचे वचन द्यावे आणि ते पूर्ण न करावे. (हदीस : अल अदबुल मु़फरद, पृष्ठ ५८)
 माननीय बह़ज बिन हकीम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्दशा व दुर्दैव आहे त्या मनुष्याकरिता जो लोकांना हसविण्यासाठी खोटे बोलतो, दुर्दशा आहे त्याच्याकरिता, दुर्दशा आहे त्याच्याकरिता.’’ (हदीस: तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये त्या लोकांना सावध करण्यात आले आहे जे बोलताना काही खोट्या गोष्टींचा समावेश करून तीखट-मीठ लावून मजेदार बनवितात आणि त्यापासून आनंद घेतात.
 माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सत्यावर दृढ असणाNया मनुष्याने धर्माच्या बाबतीत वादविवाद न घातल्यास मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या कोपNयांत एका घराची जबाबदारी घेतो, आणि जो खोटे बोलणार नाही, मग ते हसण्याच्या स्वरूपात का असेना; मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या मधोमध एका घराची जबाबदारी घेतो आणि जो आपल्या नीतीमत्तेत सुधारणा घडवील, मी त्याच्यासाठी स्वर्गातील सर्वांत वरच्या भागातील घराची जबाबदारी घेतो.’’ (हदीस : अबू दाऊद)

-एम. एम. शेख
अल्लाहतआला, जो सर्वशक्तिमान आहे, जीवसृष्टीचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. अल्लाहतआलाने या सृष्टीमध्ये अनेक जीवांची निर्मिती केली. जमिनीवर, आकाशात आणि समुद्रामध्ये- पशू, पक्षी, जलचर जीव इत्यादी. परंतु या संपूर्ण जीवांमध्ये मानवी जीवनाला सर्वश्रेष्ठत्व अल्लाहने प्रदान केले. मानवी जीवन एकदाच आहे. पुन्हा पुन्हा जीवन मिळत नाही, हे कुरआनने प्रभावासह स्पष्ट केले आहे. अशा अमूल्य मानवी जीवनासंबंधी कुरआनने अत्यंत स्पष्टपणे मार्गदर्शन केले आहे.

अल्लाहचे प्रेषित ह. मूसा (अ.) यांच्या जनसमूहाला संबोधन करून त्यांना आदेश देण्यात आला आहे.
‘‘ज्याने एखाद्याचा नाहक खून केला (त्या मृत व्यक्तीने एखाद्याचा खून किंवा पृथ्वीतलावर उपद्रव (फितना) माजविण्याचे कृत्य केले नव्हते तर त्याने (खून करणाऱ्याने) जणू समस्त मानवजातीला ठार मारले. आणि जर एखाद्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही समस्त मानवजातीला जीवन प्रदान केले.’’(दिव्य कुरआन, सूरह माइदा, आयत क्र. ३२)
मानववंश टिकून राहण्यासाठी एक दुसऱ्याच्या प्राणाचा आदर प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एक दुसऱ्याच्या जीवनरक्षणाची भावना बाळगणे अत्यावश्यक आहे. जो कोणी अकारण एखाद्याची हत्या करतो तेव्हा तो फक्त एकावरच अत्याचार करीत नाही, तो खुनी दुसऱ्याची नाहक हत्या करून सिद्ध करतो की जीवनाच्या आदरसन्मानाने त्याचे हृदय रिक्त आहे. त्याला मानवी सहानुभूती नाही. म्हणूनच तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. नाहक हत्या करून तो समस्त मानवजातीविरूद्ध पाऊल उचलतो. खरे महत्त्व प्राणाची कदर आहे. मनुष्य हत्या करतो तेव्हा त्याच्या मनात मनुष्यप्राणाविषयी आदर शिल्लक राहत नाही. अशा अवस्थेतील मनुष्य संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरतो. अशा व्यक्तीमध्ये असलेला दुर्गुण इतर मानवांत येत असेल तर संपूर्ण मानवजात नष्ट होऊन जाईल. याविरूद्ध जो मनुष्य एखाद्या मानवाचा जीव वाचवितो, इतरांच्या जीवाचे रक्षण करतो, तो खरे तर समस्त मानवजातीचा आदर करणारा आहे. कारण त्यात जे वैशिष्ट्य सापडते त्यावरच मानवता टिकून आहे.
मानवामध्ये खुनशी वृत्ती का आणि कशी उद्भवते? याचे स्पष्टीकरण कुरआनने स्पष्टपणे उघड केले आहे. आद्य मानव ह. आदम (अ.) हे प्रथम प्रेषित होते. त्यांना दोन पुत्र होते. ‘तौरात’ ईशग्रंथात त्यांची नावे काईन (काबील) आणि हाबील आहेत. मानवजातीच्या आरंभकाळातील एका महत्त्वपूर्ण घटनेचा उल्लेख तौरात (बायबल) मध्ये आहे. परंतु त्यातील बोधप्रद भाग नाहीसा करण्यात आला आहे. दिव्य कुरआनने या घटनेचे काहीही उणेअधिक न करता वर्णन केले आहे, त्याच्या उद्दिष्टासह स्पष्ट केले आहे.
‘‘आणि जरा यांना आदम (अ.) च्या दोन मुलांची गोष्टदेखील पूर्णपणे ऐकवा. जेव्हा त्या दोघांनी (आदमपुत्रांनी) कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली. दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही. त्याने सांगितले, ‘‘मी तुला ठार मारीन.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘अल्लाह तर पापभीरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो. जरी तू मला ठार मारण्यासाठी हात उचलशील तरी मी तुला ठार मारण्यासाठी हात उचलणार नाही.’’ मी समस्त विश्वांचा स्वामी, पालनकर्ता अल्लाहच्या प्रकोपाला भितो.’’ (कुरआन, सूरह माइदा, आयत २७)
काबीलच्या मनात मत्सर निर्माण झाला की हाबीलची कुर्बानी कशी स्वीकृत झाली व त्याची स्वत:ची कुर्बानी का स्वीकृत झाली नाही. या मत्सरापायीच त्याने आपल्या निरपराध भावाला ठार मारले. यावरून निष्पन्न होते की मत्सर असा भयंकर रोग आहे, जो माणसाला हत्येसारख्या घोर अपराधाकरिताही उद्युक्त करतो.
पृथ्वीवर हे पहिले मानवी रक्त होते जे जमिनीवर सांडले गेले होते. त्याच्या रक्तपाताच्या पापात, आदम (अ.) चा पहिला पुत्र सहभागी होतो, कारण तो पहिला मनुष्य आहे ज्याने हत्येची पद्धत प्रचलित केली. (हदीस : मुस्लिम किताबुल कसास)
कुरआनमध्ये या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करण्याचा मूळ उद्देश यहुदी लोकांच्या कटकारस्थानांवर सूक्ष्म दृष्टीने निंदा करणे आहे, जे त्यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्या प्रतिष्ठित सहाबा (सहकारी) यांना ठार मारण्यासाठी केले होते. (कुरआन, अध्याय ५, आयत ११)
आज जगात सर्वत्र द्वेष, मत्सर याचा मोठा पगडा रिवाज आहे. त्यामुळे क्षुल्लकशा कारणामुळे माणूस माणसाला ठार मारण्यासाठी उद्युक्त होत आहे. अशा लोकांची अत्यंत कठोर शब्दांत निर्भत्र्सना करीत कुरआन आदेश देतो की,
जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि पृथ्वीवर उपद्रव माजविण्याकरिता हिंसाचार माजवतात, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील, अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्पर विरूद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापले जातील अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल. हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्यासाठी याहून मोठी शिक्षा आहे.’’ (कुरआन, सूरह ५, आयत ३३)
शेवटी सर्वशक्तिमान अल्लाहकडे मी दुआ करतो की, समस्त मानवांना सुबुद्धी दे. एकमेकांच्या जीवनाचा आदर, रक्षण करण्याची सद्गती दे.
अल्लाहच्या आदेशानुसार (दिव्य कुरआन) आणि अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कृतिशील जीवनानुसार (सुन्नत) प्रत्येकाला जीवन जगण्याचे मार्गदर्शन प्राप्त होवो. द्वेष, मत्सर, हिंसाचारापासून मुक्ती मिळो. (आमीन)

इस्लामची साक्ष काय आहे? हा एक समर्पक प्रश्न आहे. ज्याचे उत्तर हे इस्लामला जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. इस्लाम हा धर्म सत्य धर्म पूर्वनियोजित आहे. तीच स्थिती ‘इस्लामची साक्ष’च्या उत्तराची आणि त्याच्या व्यावहारिक स्वरुपाची आहे. हे नियोजन प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या व्यावहारिक जीवनाची देन आहे. सामान्यतः साक्षीला आपण एखाद्या व्यक्तीचे खरे दस्तऐवज (प्रतिज्ञापत्र) म्हणतो. इस्लामच्या धार्मिक दृष्टिकोनातून हे खरे दस्तऐवज म्हणजे प्रतिज्ञापत्र या जगापुढे सर्व लोकांना दाखविले पाहिजे. सत्याची साक्ष देण्याला दोन अंग आहेत एक शाब्दिक, तोंडी आणि दुसरे व्यावहारिक.
अ) तोंडी साक्ष: तोंडी साक्ष देणे म्हणजे इस्लामबद्दल त्याच्या मूलभूत तत्त्वांपासून ते सर्वकाही माहिती इस्लामच्या आदेशांपर्यंतची मुस्लिमेतर बांधवांना अतिशय योग्य पध्दतीने देणे. माहिती त्यांच्यासमोर अशा पध्दतीने मांडणे की जेणेकरून एक खुला ग्रंथ त्यांच्या पुढे राहावा आणि त्यांना त्यांच्या श्रध्देविषयीचा दोष जाणून घेण्यास व इस्लामचे उघड सत्य आत्मसात करण्यास काही एक अडचण राहू नये. या कार्यासाठी काही अत्यावश्यक बाबींचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे.
१) प्रथमतः चर्चा ही त्यांच्या मूलभूत तत्त्वांविषयी व्हावी जेणेकरून त्यांना त्यांच्या श्रध्देविषयी उघड उघड कल्पना येऊन जावी. इस्लामविषयी माहिती देताना अल्लाह एकमेव ईश्वर आहे (एकेश्वरत्व) प्रेषित्व आणि पारलौकिक जीवनावर उघड चर्चा व्हावी. इस्लामचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ.विषयींचे आदेश त्यांना स्पष्ट करून सांगावेत. इस्लाम मानवी जीवनाच्या समस्या कशा प्रकारे सोडवतो आणि इस्लामच्या आज्ञाधारकतेत या क्षणभंगूर जीवनाचे साफल्य दडून बसले आहे याची स्पष्ट माहिती (उकल) त्यांना करून द्यावी.
२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इस्लाम आणि इस्लामेतर काय आहे याची बौध्दिक आणि तार्किक चर्चा करून गांभीर्याने त्यांना समजून सांगावेत. यासाठी आजचे प्रचलित धर्म तत्त्वज्ञान, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेविषयी इतंभूत माहिती असणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे मुस्लिमेतरांविषयी एक तार्किक बैठक तयार होते आणि त्यामुळे इस्लामेतर तत्त्वांना मुळासकट उखडून टाकण्यास मदतच होते. हे अशा पध्दतीने व्हावे की त्यांच्या भावनांना स्पष्टपणे उघड केले जावे आणि त्यांच्या श्रध्देमुळे आणि धार्मिक आचरणांमुळे मानवतेची कशी हानी होते हे समजून दिले पाहिजे. मुस्लिमेतर श्रध्दा आणि तत्त्वे हे सर्व इस्लामची साक्ष देण्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि त्यांच्याशिवाय साक्ष देणे पूर्ण होऊ शकत नाही. इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देणे म्हणजे नवीन इमारत बांधण्यासारखे आहे आणि नवीन इमारतीसाठी सर्वप्रथम नवीन पाया घालणे अत्यावश्यक आहे. पायाविना इमारत अशक्य आहे. पायाभरणी झाल्यानंतरच इमारत व भिती उभ्या राहू शकतात. जनमानसात इस्लामचा पाया मजबूत व्हावा आणि त्यांच्या मनात आणि हृदयात घर करून राहावे यासाठी जमीन तयार करणे (पाया भरणे) अत्यावश्यक आहे. यासाठी जमिनीची मशागत तेव्हाच होईल जेव्हा आपण जमिनीत उगवलेले खोटे तत्त्व आणि श्रध्दांना उपटून त्यांचे मन निर्मळ बनवू शकू. जहाजात सामान तेव्हाच ठेवता येईल जेव्हा ते रिकामे असेल अन्यथा नाही. याच तत्त्वाने, इस्लाम मनुष्याच्या मनात तेव्हाच घर करून राहील जेव्हा ते इतर श्रध्दांपासून मोकळे आणि निर्मळ होईल. कुरआननुसार एकेश्वरत्व, प्रेषित्व आणि परलोकत्व यांनाच फक्त इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देण्यासाठी उपयोगात आणणे पुरेसे नाही. तर यासाठी अनेकेश्वरत्वाचा, असत्य धर्माचा स्वीकार करण्याचा आणि प्रेषित्वाविषयी आणि पारलौकिक तत्त्वाविषयी श्रध्दाहीनतेचा कडाडून निर्धारपूर्वक विरोध होणे अत्यावश्यक आहे. यासाठी अश्रध्देचे प्रकार आणि ही श्रध्दाहीनता त्यांच्या मनात कशी प्रवेशकरती झाली याचा ऐतिहासिक आढावा घेणे, तसेच त्यांच्या शिळ्या आणि खोट्या मनोकामनांना उघड करणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्यांच्या तत्त्वांची निरर्थकता त्यांच्यासमोर उघड होते आणि त्यांना जमीनदोस्त करण्यास ते स्वतःहून तयार होतात. काबागृहातील ३६० मूर्तींना याच एकमेव पध्दतीने त्या लोकांनी स्वतः जमीनदोस्त केले होते. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली तिला कुरआन स्पष्ट करीत आहे,
‘‘धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी तागूत (मूर्तींचा) इन्कार करून अल्लाहवर श्रध्दा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’ (कुरआन २: २५६)
३) तिसरी बाब आहे इस्लामचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा तसेच इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा मित्रत्वाने, सौजण्याने आणि गोडीने अत्यंत व्यवस्थितपणे मांडला गेला पाहिजे. मृदुभाषेमध्ये लोकांना पटेल अशा प्रकारे तसेच सौहार्दपूर्ण चर्चेतून शास्त्रोक्त पध्दतीने उद्देश प्राप्ती सहज होते. कारण इस्लामचा प्रामाणिकपणा आणि इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा समोर आणणे ही काही फक्त शैक्षणिक बाब नाही. एक सत्यधर्म प्रचार आणि प्रसारकार्य आहे. बुध्दीविवेकास आवाहन करून श्रोत्याच्या मनात आणि हृदयावर इस्लामसंदेशाची खोलवर छाप पडणे आवश्यक आहे, अन्यथा सर्व व्यर्थ. यासाठी समोरच्या श्रोत्याच्या मानसिक स्थितीचा विचार करूनच त्याच्याशी संभाषण व्हावे. आमंत्रण देण्याची पध्दत, भाषा आणि तंत्र कुरआननुसार असणे अत्यंत आवश्यक आहे. कुरआनची पध्दत प्रभावशाली असून कुरआनची भाषाशैलीसुध्दा सुसंगत अशी आहे. कुरआनचा संवाददेखील गोड आहे. गैरसमज निर्माण होईल अशी कुरआन संवादाची भाषाशैली मुळीच नाही. कुरआनची स्पष्ट शैली आहे आणि ती स्फूर्तीदायक आणि आकर्षक भाषणशैली आहे. कारण अरबांना ही शैली फार आवडत होती. दुसरीकडे वैश्विक तत्त्वे, नैसर्गिक नियम आणि दररोजच्या घटनांचा उल्लेख अत्यंत प्रभावीपणे आणि अनुकूल चर्चेतून मांडला गेला आहे. लोकांना इस्लामकडे आमंत्रिक करण्यासाठी अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना खालीलप्रमाणे उपदेश केला,
‘‘हे पैगम्बर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहीत, आणि लोकांशी विवाद करा अशा पध्दतीने जी उत्तम असेल.’’ (कुरआन १६: १२५)
वरील तिन्ही गरजा या मूलाधाराचे व्यावहारिक स्वरूप आहे.
४) चौथी बाब इस्लामकडे आमंत्रण कार्य - हे एखाद्या सहानुभूतीमुळे अथवा राष्ट्राभिमानाने अथवा भाषणकौशल्याच्या प्रेरणेने प्रवृत्त झालेले मूळीच नसावे. जे काही सांगितले गेले ते गांभीर्यपूर्वक, श्रध्दापूर्वक आणि अल्लाहच्या प्रेमातून बाहेर पडले पाहिजे. ते मानवतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे. हृदयातून आपले म्हणणे इतरांच्या चुकांसाठी शोक करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. श्रोत्यांची ही भावना झाली पाहिजे की सांगणारा (प्रचारक) आपणास काही नवीन देत आहे. आपणाकडून काहीही न घेता एक उघड सत्य आपणापुढे मांडत आहे. लोकांना इस्लामच्या कृपाछत्राखाली आणण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांची जी चिता आणि प्रबळ आकांक्षा होती त्याला कुरआनने खालील शब्दांत वर्णन केले आहे,
‘‘बरे तर हे पैगम्बर (स.)! कदाचित तुम्ही यांच्यामागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात, जर यांनी या शिकवणुकीवर श्रध्दा ठेवली नाही?’’ (कुरआन १७: ६)
ब) व्यावहारिक साक्ष: व्यावहारिक साक्ष अथवा पुरावा तो आहे जो इस्लामचा प्रचारक आपल्या प्रत्यक्ष जीवनातून देतो. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीशः आणि मुस्लिम राष्ट्राने इस्लामचे खरे रूप प्रदर्शित केले पाहिजे.
त्यांची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर गाढ श्रध्दा पाहिजे. तसेच प्रेषितवाद आणि परलोकत्वाची श्रध्दासुध्दा अटळ पाहिजे आणि जीवनकार्यात त्याचे प्रतिबिब पडले पाहिजे. त्यांचा स्वभाव आणि वर्तणूक ही इस्लामच्या आदेशाबरहुकूम पाहिजे. त्यांचे संपूर्ण जीवनकार्य कुरआन आणि हदीसनुसार नियंत्रित असणे अत्यावश्यक आहे.
त्यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्य अर्थात संपूर्ण जीवन अल्लाह आणि प्रेषित (स.) यांनी घालून दिलेल्या नियमांनुसारच नियंत्रित आणि संचलित असणे अत्यावश्यक आहे. ह्या प्रकारची आज्ञाधारकता इस्लामचे खरे रुप दर्शविते. ह्या आज्ञाधारकते मुळे जगाला कळून येते की कशा प्रकारचे नागरिक, कशा प्रकारचा समाज आणि सामाजिक व्यवस्था इस्लामला अभिप्रेत आहे.
व्यावहारिक साक्षीची स्थिती ही नैतिक किवा तोंडी साक्षी पेक्षा अत्यंत महत्वाची आहे. की ज्यांत प्रचारकाचे व्यावहारिक रूप लोकांसमोर येत नाही. तसेच नव्वद टक्के लोकांना धर्म प्रचाराचे प्रभावी साधन म्हणून व्यावहारिक साक्ष अथवा पुरावाच अपेक्षित आहे. बौध्दिक आव्हान अथवा भावनात्मक आवाहन त्यांच्या आकलनापलिकडचे असते. ह्या संदर्भात येथे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्राचा पुरावा अपेक्षित आहे जो एक आदर्श आहे. त्यांनी लोकांना इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले तेव्हा ते स्वतः इस्लामचे पाईक म्हणूनच. त्यांनी जेव्हा दुसऱ्यांना इस्लामच्या आदेशांचे पालन करण्यास सांगितले तत्पूर्वी ते स्वतः त्या आदेशा बरहुकूम आचरण करीत राहिले.
इस्लामचे हे खरे स्वरुप आहे. इस्लामचा खरा अर्थ हा आहे जो प्रमाण आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या इस्लामसाठीच्या प्रयत्नांचे मोजमाप करता येते. ह्या प्रमाणाच्या जितक्या जवळ व्यक्ती (मुस्लिम) असेल तितके ते ह्या कामी (इस्लाम प्रचार) यशस्वी ठरतात. ह्या ध्येयापासून दूर तेच राहतात जे ह्या प्रमाणापासून (स्टँडर्ड) पासून अथवा आदर्शापासून दूर राहतात.

ईश्वराचे आज्ञापालन करण्यासाठी ईश्वराच्या सत्तेचे व त्याच्या गुणवत्तेचे व त्याच्या पसंतीच्या पद्धतीचे आणि पारलौकिक जीवनातील शिक्षा तसेच पुरस्कारासंबंधी उचित व खऱ्या ज्ञानाची आवश्यकता आहे. हे ज्ञान असे असावयास पाहिजे की, ज्यावर तुमचा दृढविश्वास (ईमान) आहे.

दुसरे असे की अल्लाहने माणसाला अशा कठीण परीक्षेत तथा कसोटीत टाकलेले नाही की, त्याने स्वतःच आपल्या प्रयत्नाने हे सर्व ज्ञान प्राप्त करावे. उलट त्याने मानवातूनच काही महान व्यक्तींना (प्रेषित) ‘वही’ (दिव्य प्रकटन) द्वारा हे ज्ञान दिले आणि ते सर्व ज्ञान मानवापर्यंत पोहोचविण्याचा त्यांना आदेश दिला.

तिसरी गोष्ट अशी की, सर्वसामान्य माणसांची जबाबदारी केवळ एवढीच आहे की त्यांनी ईश्वराच्या खऱ्या प्रेषितांना ओळखावे. जेव्हा त्यांना हे कळून चुकते की, अमुक एक व्यक्ती ईश्वराचा वास्तविक प्रेषित आहे तेव्हा तो जी काही शिकवण देतो त्याचा स्वीकार करावा. तो जे काही आदेश देतो त्याचे पालन करावे व त्याचे अनुकरण करावे हे त्याचे कर्तव्य ठरते.

माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत वजनदार वस्तू जी अंतिम निवाड्याच्या दिवशी मोमिनच्या तराजूमध्ये ठेवली जाईल ती म्हणजे त्याची नीतीमत्ता होय. अभद्र बोलणारा आणि अर्वाच्च कथन करणाराला अल्लाह अजिबात पसंत करीत नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण : ‘खलकुन हसनुन’चे स्पष्टीकरण देताना अब्दुल्लाह बिन मुबारक यांनी म्हटले आहे, ‘‘हुवा तला़कतुल व़िज्ह व ब़ज्लुल मअरु़फि व क़फ़्फल अ़जा.’’ (मनुष्याने एखाद्या हसतमुखाने भेटणे, अल्लाहच्या वंचित दासांवर धन खर्च करणे आणि कोणालाही त्रास न देणे यालाच चांगली नीतीमत्ता म्हणतात.)
    माननीय अली (रजि.) यांनी सांगितले,     ‘‘अश्लील बोलणारा आणि अश्लील गोष्टींचा प्रसार करणारा हे दोन्ही पाप सारखेच आहेत.’’ (हदीस : मिश्कात)
दुतोंडीपणा
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वांत वाईट मनुष्य तो आढळेल जो जगात दोन चेहरे बाळगत होता. काही लोकांशी एका चेहऱ्याने भेटत होता आणि दुसऱ्या लोकांशी दुसऱ्या चेहऱ्याने.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैहि)
स्पष्टीकरण : दोन मनुष्यांमध्ये अथवा दोन समूहांमध्ये जेव्हा शत्रुत्व निर्माण होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी काही लोक असेही आढळतात जे दोन्हींकडे पोहोचतात आणि दोघांच्या होकाराला हो म्हणतात आणि त्यांच्या आपसांतील शत्रुत्वावर चर्चा करतात व ते वाढविण्याचा प्रयत्न करतात, हा फार मोठा दुराचार आहे.
    त्याचप्रमाणे काही लोक समोर अतिशय दृढ संबंध प्रगट करतात मात्र जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याची निंदा करण्यास सुरूवात करतात, हाच दुतोंडीपणा आहे.
    माननीय अम्मार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगात दुतोंडीपणाने वागणाऱ्या मनुष्याच्या तोंडात अंतिम निवाड्याच्या दिवशी आगीच्या दोन जिव्हा असतील.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : अंतिम निवाड्याच्या दिवशी त्यांच्या तोंडात आगीच्या दोन जिव्हा यासाठी असतील की जगात त्याच्या तोंडातून आग निघत होती जी दोन मनुष्यांच्या आपसांतील संबंधाला जाळून टाकत होती.
चुगलखोरी
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे अधिक ज्ञान आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘चुगलखोरी म्हणजे तू आपल्या बंधुचा उल्लेख त्याला न आवडणाऱ्या पद्धतीने करावा.’’ मग पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘मी उल्लेख करीत असलेली गोष्ट जर माझ्या बंधुमध्ये आढळत असली तरीही ती चुगलखोरीच ठरेल काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही उच्चारलेली गोष्ट जर त्याच्यात आढळत असेल तरीही ती चुगलखोरीच झाली आणि जर ज्याच्यात ती गोष्ट नाही त्या मनुष्याबाबत जर ती गोष्ट म्हटली गेली तर तुम्ही त्याच्यावर आरोप करणे होईल.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : मोमिनला त्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल चांगल्या पद्धतीने टोकले गेले तर निश्चितच त्याला वाईट वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या अपराधाची सूचना त्याच्या वरिष्ठांना दिली गेली तर तेही त्याला आवडेल, कारण हीदेखील त्याच्यात सुधारणा घडविण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही आपल्या मोमिन बंधुला समाजाच्या नजरेतून उतरविण्यासाठी त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या त्रुटी सांगाल तर त्याला खूप वाईट वाटेल. जो मनुष्य उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो आणि कोणत्याही प्रकारे मान्य करीत नाही, त्याचे दुराचरण व्यक्त करणे चुगलखोरी नसून त्याचा स्वभाव समाजासमोर उघड करणे फार मोठे पुण्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याचेच मार्गदर्शन केले आहे.
    माननीय अबू सईद व जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी व्यभिचारापेक्षाही मोठे पाप आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! चुगलखोरी व्यभिचारापेक्षा मोठे पाप कसे आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मनुष्य व्यभिचार करतो, मग पश्चात्ताप व्यक्त करतो तेव्हा अल्लाह त्याचा पश्चात्ताप कबूल करतो, परंतु जोपर्यंत तो मनुष्य ज्याची चुगलखोरी करण्यात आली आहे, त्या माणसाला क्षमा करीत नाही तोपर्यंत अल्लाह चुगलखोरी करणाऱ्याला क्षमा करणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरीचे एक प्रायश्चित्त हे आहे की ज्याची तू चुगलखोरी केली आहे त्या मनुष्याकरिता तू माफीची प्रार्थना करावी. अशाप्रकारे म्हणा– हे अल्लाह! तू माझी आणि त्याची मुक्ती कर.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जर तो मनुष्य उपस्थित असेल आणि त्याच्याकरवी आपला अपराध माफ करविला जाऊ शकत असेल तर करवून घ्यावा आणि जर तो मरण पावल्यामुळे अथवा तो कोठेतरी दूरवर गेल्यामुळे माफीसाठी जागाच उरली नसेल तर त्याच्याकरिता माफीच्या प्रार्थनेव्यतिरिक्त दुसरा मार्गच उरत नाही.
    माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मृतांना वाईट बोलू नका कारण ते आपल्या कर्मांपर्यंत पोहोचलेले आहेत.’’ (हदीस : बुखारी)


लेखक

सय्यद लुत्फुल्लह कादरी फलाही

मराठी अनुवाद

हुसेनखान  चांदखान पठान


सैयद कादरी फलाही यांनी कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात या विषयाला वाचकांपुढे ठेवले आहे. इस्लाम एक सर्वांगीण परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे.

मुस्लिमांचे आचरण सुधारण्यासाठी मातापित्यांशी चांगल्या वर्तणुकीसंबंधी पवित्र कुरआनातील आयती आणि हदीस संक्षिप्तपणे संकलन करून लेखकाने सुंदरपणे मांडणी केली आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाने आणि इस्लामविषयी नसल्यामुळे आज इतरांच्या हक्कांना सर्रास पायदळी तुडविले जात आहेत आणि नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचे प्रकार वाढतच आहेत. या विषयावरील कुरआनोक्ती आणि हदीसकथनांनी अधिकांधिकांवर ईशकृपा होईल आणि ते माता-पिता व नातेवाईकांचे हक्क जाणू लागतील जेणेकरून मोडकळीस आलेली कुटुंबव्यवस्था सावरू लागेल.


आयएमपीटी अ.क्र. 215   -पृष्ठे - 64    मूल्य - 30 आवृत्ती - 1 (2014)


डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/2lq84lw33jkgx6x87chipea7owutbw0c




statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget