Latest Post

 

wedding

मुस्लिमांच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांपैकी खर्चिक विवाह हा एक मोठा महत्वाचा प्रश्न झालेला आहे. दुर्भाग्याने या प्रश्नाकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने मुस्लिमांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. या प्रश्नाला जर समाज खंबीरपणे सामोरे गेला नाही आणि याचे उत्तर वेळीच शोधले नाही तर स्मार्टफोनच्या या काळात मुस्लिमांची तरूण पिढी वाम मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही.

जर मुस्लिमांनी आपल्या मुलां-मुलींच्या लग्नामध्ये इस्लामी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर केला तर मुस्लिमांचे विवाह ही साधेपणे होतील. त्यात बरकत येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या समाजाला कन्याभ्रुणहत्येसारख्या महापापाला सामोरे जावे लागणार नाही. 

इस्लाममध्ये विवाह म्हणजे एक सामाजिक करार आहे. त्यात दोन व्यक्ती, दोन साक्षीदार, एक वकील आणि एक आलीम एवढेच लागतात. मुलाकडील लोकांना मुलगी पसंद पडली (इजाब), मुलीकडील लोकांना मुलगा पसंद पडला (कुबूल) की लग्न ठरते. दोन साक्षीदार आणि एक वकीलासमोर खुत्बा-ए-निकाह (विवाहाची विधी) अदा केला की विवाह संपतो. या विवाहात फक्त महेरचीच आर्थिक देवाण-घेवाण होते. वराकडून आपल्या होणाऱ्या पत्नीला भेट म्हणून जी रक्कम दिली जाते तिला मेहर म्हणतात. ती दोन्ही पक्षाकडील लोकांच्या संमतीने ठरविली जाते. ही रक्कम नवऱ्यामुलाच्या ऐपतीप्रमाणे ठरविली जाणे अपेक्षित आहे. निकाह अर्थात विवाह मस्जिदीमध्ये केला जातो. विवाहाला यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नसते. जगातील सगळ्यात सुलभ अशी लग्नाची ही पद्धत आहे. मात्र या पद्धतीचे विकृतीकरण करून मुस्लिमांमध्ये खर्चिक विवाह करण्याची परंपरा अलीकडे रूढ झालेली आहे. विवाहाच्या वेळी मुलीच्या परिवाराकडून नवऱ्या मुलाच्या परिवाराला थोडासा पाहुणचार करणे समजण्यासारखे असते. मात्र आजकाल या पाहुणचाराला इव्हेंटचे स्वरूप देण्यात आलेले आहे. हीच बाब चिंतेची आहे. खर्चिक विवाहाचा परिणाम कन्याभ्रूण हत्येच्या रूपाने समोर येतो हे अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. मुस्लिमांमध्येही आता लिंगपरीक्षण करून कन्याभ्रूण हत्या होण्यास सुरूवात झाल्यास नवल वाटून घेण्याची गरज नाही. इतर समाजाप्रमाणे मुस्लिमही आपल्या मुलांमुलींच्या लग्नामध्ये आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करत आहेत. या खर्चामुळे अनेकांचे विवाह रखडलेले आहेत. 30-35 वर्षाच्या वयाची अविवाहित मुलं आणि मुली मुस्लिम समाजामध्येही आजकाल ठळकपणे दिसून येतात. अशी कोणती गोष्ट आहे, जी त्यांना एवढ्या वयापर्यंत लग्नापासून रोखून ठेवते?  स्पष्ट आहे, लग्नातील अवाढव्य मागण्या, शोभेचा खर्च, मोठमोठ्या जेवणावळी, हुंडा, दागदागिने, मंडप, डेकोरेशन या सगळ्या गोष्टी मिळून मुस्लिम समाजामध्येही विवाह करणे अवघड झालेले आहे. 

लग्नाच्या घरी दावत हा  प्रकार मुस्लिमांमध्ये कधीच नव्हता. आजही मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये  लग्नाच्या दिवशी पाहुण्यांना जेवण दिले जात नाही. मात्र भारतामध्ये लग्नाच्या दिवशी वधूपक्षाकडून शेकडो लोकांना जेवण देण्याची परंपराच रूढ झालेली आहे. यात हजारो नव्हे लाखो रूपयांचा खर्च केला जात आहे. मोठ्या शहरांमध्ये 2 लाख जेवणाचे व 2 लाख फंक्शन हॉलचे वेगळे काढून ठेवावे लागतात. तेव्हाच लग्न करणे शक्य होते. त्यानंतरचा इतर खर्च वेगळा. साहजिकच एक साधारण लग्न 6 ते 10 लाखाच्या घरात जाते. एवढी रक्कम तेच लोक खर्च करू शकतात, ज्यांच्याकडे उत्पन्नाचे चांगले-वाईट, मोठे स्रोत असतात. याचा परिणाम सर्वसामान्य मुस्लिमांवर होत आहे. प्रत्येकजण असे लग्न करू पाहत आहे, की तसे लग्न त्या वस्तीमध्ये त्यापूर्वी कोणाचेच झालेले नाही.

एकदा काही बदू (खेडूत  मुस्लिम) चर्चा करीत होते की, त्यांच्यापैकी कोणाचा कबिला (घराणे) श्रेष्ठ आहे. प्रत्येकजण आपला कबिला श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगत होता. बघताबघता प्रकरण चिघळले व हातघाईवर आले. तेव्हा एका बुजुर्ग बदूने सांगितले की, प्रेषित मुहम्मद (स.) आपल्यामध्ये हयात  असताना आपण असे आपसांत भांडणे योग्य नाही. ते आपल्या सर्वांना ओळखतात. आपण त्यांनाच हा प्रश्न विचारू की आमच्यापैकी कोणता कबिला श्रेष्ठ आहे? त्यांनी दिलेल्या उत्तरावर आपल्याला सर्वांना राजी व्हावे लागेल. सर्वांनी या सल्याप्रमाणे प्रेषित (स.) यांच्याकडे जाऊन आपले म्हणणे मांडले व त्यांना विनंती केली की त्यांनी सांगावे की, आमच्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ आहे? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतले व उत्तर दिले की, तुमच्यापैकी तो कबिला सर्वश्रेष्ठ आहे ज्या कबिल्यामध्ये विवाह सुलभ आणि व्यभिचार कठीण आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की हे एक सूत्र आहे जे प्रेषितांनी मुस्लिमांना दिलेले आहे. आज या सूत्रावर आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मुस्लिमांच्या अत्यंत

महत्त्वाच्या प्रश्नांपैकी खर्चिक विवाह हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे. दुर्भाग्याने या प्रश्नाकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने मुस्लिमांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. या प्रश्नाला जर समाज खंबीरपणे सामोरे गेला नाही आणि याचे उत्तर  वेळीच शोधले नाही तर स्मार्टफोनच्या या काळात मुस्लिमांची तरूण पिढी वाममार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने तसे घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी मुस्लिम समाजावर राहील. कुठलाही समाज आदर्श तेव्हा होतो, जेव्हा त्यातील विवाह आणि अन्य सोपस्कार सुलभ असतात. मुस्लिमांना शरियतने अत्यंत सुलभ अशी विवाहाची पद्धत आखून दिलेली आहे. मात्र आपल्या बडेजावाच्या तोऱ्यात आपण सर्वांनी त्या पद्धतीला हरताळ फासलेला आहे. यामुळे नको तेवढी अडचण निर्माण झालेली आहे. या प्रश्नाला सोडवायचे असल्यास व समाजाला जीवघेण्या खर्चिक विवाहातून बाहेर  काढावयाचे असल्यास समाजातील श्रीमंत लोकांना पुढे यावे लागेल. जेव्हा मुस्लिमांतील श्रीमंत लोक कुठलाही बडेजाव न दाखविता साधेपणाने आपल्या पाल्यांचे लग्न करतील तेव्हा समाजातील मध्यम आणि गरीब वर्गातील लोकसुद्धा साधेपणाने लग्न करण्याची प्रेरणा मिळेल. यासाठी सर्वप्रथम लग्न मस्जिदीमध्ये करून मुलीच्या घरी दिल्या जाणाऱ्या शाही मेजवाणीवर प्रतिबंध आणावा लागेल. आजकाल अनेक लग्न मस्जिदीमध्ये होतात परंतु, लग्न होताच मस्जिदीमध्येच घोषणा होते की, अमुकअमुक फं्नशन हॉलमध्ये पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ही पद्धत बंद केल्यास जेवणाचा प्रचंड खर्च, फं्नशन हॉलचे भाडे वाचेल व लग्नाच्या अर्ध्या खर्चाला या ठिकाणी आळा बसेल. दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे मुलींसोबत महागड्या  वस्तू देण्याची प्रथा बंद पाडावी ला- गेल. दहेज-ए-फातमी या नावाखाली आज मुस्लिमांमध्ये नको त्या लाखो रूपयांच्या महागड्या वस्तू मुलींसोबत देण्याची फॅशन रूढ झालेली आहे. यात हजरत फातेमा (रजि.) आणि हजरत अली (रजि.) यांच्या विवाहामध्ये दिल्या गेलेल्या काही वस्तूंचा  हवाला दिला जातो. यासंबंधी सत्य असे आहे की, अली (रजि.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासोबतच लहानाचे मोठे झाले व त्यांच्याबरोबरच राहिले. म्हणून त्यांचे स्वतःचे घर किंवा स्वतःच्या कुठल्याही वस्तू नव्हत्या. जेव्हा प्रेषितांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी त्यांचा वर म्हणून स्वीकार केला तेव्हा अली (रजि.) यांच्या घोड्याची जर्रा (घोड्याच्या पाठीवर ठेवण्याचे चामड्याचे आसन) विकून थोडी मातीची भांडी, एक मिश्कीजा (चामड्याची पाणी भरण्याची पिशवी), नारळाच्या केसरची एक गादी एवढ्या गोष्टी देण्यात आल्या होत्या. या गोष्टीचा दुरूपयोग मुस्लिमांनी इतका केला की, त्या नावाखाली आपल्या मुलींना कार, फ्रीज, टी.व्ही., लाखोंचे दागिने, भांडी, ब्रँडेड वस्तू, देऊन त्यांना सासरी पाठविण्याची प्रथा रूढ केली. हा फार मोठा अपराध या लोकांनी केलेला आहे. जहेज-ए-फातमीच्या नावाखाली एवढा प्रचंड खर्च करणे कुठल्याही इस्लामी चारित्र्यसंपन्न मुस्लिमाला शोभण्यासारखे नाही. विवाहानंतर तआम-ए-वलीमा नवऱ्या मुलाकडून देणे अनिवार्य असते. यातही दोन चुकीचे प्रकार समाजात रूढ झालेले आहेत. एक तर तआमे वलीमा दिला जात नाही. दुसरे हे की वलीमा हा अत्यंत महागड्या स्वरूपात दिला जातो. या दोन्ही रूढी या इस्लामला धरून नाहीत. कुठल्याही पद्धतीने केला गेलेला अवास्तव खर्च इस्लामला मान्य नाही. जर मुस्लिमांनी आपल्या मुलांमुलींच्या लग्नामध्ये इस्लामी आचारसंहितेचा काटेकोरपणे वापर केला तर मुस्लिमांचे विवाह ही साधेपणे होतील. त्यात बरकत येईल. आपल्या समाजाला कन्या भ्रूणहत्येसारख्या महापापाला सामोरे जावे लागणार नाही. सर्वश्रेष्ठ अल्लाह आम्हा सर्वांना आपापल्या पाल्यांची लग्ने इस्लामी शरियत (आचार संहिते)प्रमाणेच करण्याची सद्बुद्धी देवो. (आमीन.)


फेरोजा तस्बीह- 

(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी) 



- तालिबुल हाशमी

या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या महिला अनुयायींचा उल्लेख आला आहे. ही पुस्तिका लिहिण्याचा उद्देश प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला ह्या पवित्र अनुयायी महिलांची माहिती देऊन त्यांस तसे आचरण करण्याची प्रेरणा मिळावी.

पाश्चात्य स्त्रीमध्ये आज स्त्रीत्व उरले नाही. तिला आज केवळ विषय उपभोगाची वस्तू समजले जाते. खेदाने म्हणावे लागते की आज संपूर्ण जग त्यांचे अनुकरण करीत आहेत. त्या संस्कृतीत आज स्त्री-पुरुष संबंधाविषयी स्वैराचार माजला आहे. जगातील स्त्रिया त्या मार्गावर चालून मानवजातीचे कोणते भले करणार आहेत. म्हणूनच ही पुस्तिका वाचून एखादी स्त्रीसुद्धा लाभान्वित झाली तरी कष्टाचे सार्थक होईल, असे लेखकाचे मत आहे.


आयएमपीटी अ.क्र. 230   -पृष्ठे - 64    मूल्य - 30  आवृत्ती - 1 (2014)

 डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3py91r8al9rw6zz550kw99lsjnx1qgjg




 माननीय जाबिर बिन समुरह (रजि.) यांचे कथन आहे,

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) नेहमी मौन पाळत असत.’’ (हदीस : सहरहुस्सुन्नह)

स्पष्टीकरण

अर्थ होतो की मौन व मितभाषिता हे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रमुख गुण होते. अनावश्यक गोष्ट त्यांच्या तोंडून कधीही निघत नसे. जेव्हा कधी आवश्यक वार्ता असल्यासच पैगंबर बोलत असत अन्यथा मौन पाळत असत. दुसऱ्यांसाठी त्यांची हीच शिकवण होती, ‘‘जो कोणी अल्लाह व पारलौकिक जीवनावर ईमानधारक आहे त्याला मुखातून चांगलेच बोलले पाहिजे अन्यथा गप्प राहिले पाहिजे.’’

माननीय खदीजा (रजि.) हे नाव आणि हिंदची माता, ताहेरा (पाक) हे संबोधन ज्यांचे आहे त्यांचा जन्म `आमुलफिल' (हत्तीवाल्यांच्या वर्षापूर्वी) १५ वर्षे म्हणजे इ.स.५५५ मध्ये झाला. बालपणापासून त्या सज्जन आणि पुण्यशील होत्या. वयात आल्यावर त्यांचा विवाह अबुहाल हिन्द बिन नबाश तमीमी यांच्याबरोबर झाला. त्यांच्यापासून त्यांना दोन मुलगे, हाला व हिंद झाले. त्यापैकी हालाचा मृत्यू इस्लामपूर्वीच झाला तर हिंद एक सहाबी (पैगंबर (स.) यांचे शिष्य, सहकारी) झाले.

अबू हालाचा मृत्यु झाला. त्यानंतर खदीजाचा दुसरा विवाह आतिक बिन आबिद मखजुमी यांच्याबरोबर झाला. त्याच्यापासून त्यांना हिन्दा नामक एक कन्या झाली. काही काळानंतर दुसऱ्या पतीचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा तिसरा विवाह पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी झाला.

या लग्नापूर्वी खदीजा (रजि.) या आपला वैधव्याचा काळ जास्त करून एकान्तवासात व्यतीत करीत असत. काही काळ त्या काबागृहात व्यतीत करीत तर काही काळ त्या युगातील प्रसिद्ध व आदरणीय भविष्यवेत्या (काहीना) स्त्रियांबरोबर व्यतीत करीत. त्यांच्याशी त्या काळातील परिवर्तनावर कधीकधी चर्चा करीत असत. कुरैशच्या अनेक मोठमोठ्या सरदारांकडून त्यांना विवाहाबद्दल विचारले जाई, परंतु एकमागून एक संकटांनी (तिन्ही मुले व दोन्ही पती यांचे मृत्यु) त्यांचे मन जगातून उचाट झाले होते. त्यांचे वडील म्हातारपणामुळे मोठा व्यापार-धंदा सांभाळू शकत नव्हते. त्यांचा खदीजा (रजि.) व्यतिरिक्त कोणताही वारस जिवंत नव्हता. त्यामुळे आपल्या अत्यंत बुद्धिमान कन्येच्या सुपूर्द सगळा व्यापारउदीम करून त्यांनी एकान्तवास स्वीकारला. काही अवधीनंतर त्यांचेही निधन झाले.

खदीजा (रजि.) यांनी आपला व्यवसाय उत्तमरीतीने सुरू ठेवला. त्यांचा व्यापार सीरियापासून यमन देशापर्यंत पसरलेला होता. या विशाल व्यवसायासाठी त्यांनी खूप कर्मचारी ठेवले होते. त्यात अरबी, ईसाई, यहुदी आणि काही गुलाम यांचा समावेश होता. व्यापाराचे सुयोग्य धोरण व प्रामाणिकपणा यामुळे त्यांचा व्यापार दिवसेंदिवस वाढतच राहिला. त्यांना अशा एका व्यक्तीची गरज होती जी योग्य, बुद्धिमान, प्रामाणिक असेल आणि जिच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांना देश-विदेशात व्यापारासाठी पाठवता येईल.

भाग २

त्या वेळी मुहम्मद (स.) यांच्या पवित्र विचारसरणीची चर्चा मक्का शहरातील घराघरात होत होती. मुहम्मद (स.) अगदी तरूण होते, त्यांना `अमीन' (ठेव सांभाळणारा प्रामाणिक मनुष्य) या उपाधीने ओळखले जाई. खदीजांच्या कानावर या पवित्र व्यक्तीच्या वागणुकीची बातमी स्वाभाविकरित्याच पोहोचली. त्यांना व्यापाराच्या विकासासाठी अशाच सर्वगुणसंपन्न व सर्वसमावेशक समन्वयकाची आवश्यकता होती. त्यांनी मुहम्मद (स.) यांना निरोप पाठविला की, ``आपण सीरिया देशापर्यंत माझ्या व्यापाराच्या वस्तू पोहचवण्याचे काम कराल तर मी इतरांपेक्षा दुप्पट मोबदला देईन.'' मुहम्मद (स.) त्या काळात आपले चुलते अबू तालिब यांच्या छत्रछायेत राहत होते. त्यांना खदीजा (रजि.) यांच्या व्यापाराबद्दल अधुनमधून माहिती मिळत असे.

त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला व व्यापारासाठी माल घेऊन बसरा शहराकडे रवाना झाले. त्यांच्याबरोबर खदीजा (रजि.) यांनी मयसरा नावाच्या खास गुलामाला त्यांची देखभाल करण्यासाठी पाठविले. त्याला ताकीद दिली की प्रवासात पैगंबर (स.)यांना काहीही त्रास होता कामा नये. या दौऱ्यात पैगंबरांच्या प्रामाणिकपणा, सभ्यता इ. गुणांमुळे व्यापारात व नफ्यात दुप्पट वाढ झाली. काफिल्यातील इतर लोकांबरोबर ते इतके चांगले वागले की प्रत्येक व्यक्ती त्यांची स्तुती करू लागली व त्यांच्यावर जीव टावूâ लागली. मक्केत आल्यानंतर मयसराकडून या दौऱ्याची हकीकत खदीजा (रजि.) यांना कळाली आणि त्या अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी आपल्या नफीसा नावाच्या दासीमार्फत पैगंबरांकडे विवाहाचा प्रस्ताव पाठविला. त्यांचा होकार मिळताच खदीजा (रजि.) यांचे चुलते अमर बिन असद यांना बोलविण्यात आले. त्यांचे त्या वेळी ते पालक होते.

भाग ३

इकडे मुहम्मद (स.) देखील आपले काका अबू तालिब व घराण्यातील बुजुर्ग मंडळीना घेऊन खदीजा (रजि.) यांच्या घरी आले. अबू तालिब यांनी लग्नाचे मंत्र पठण करून त्यांचा निकाह लावून दिला. त्यात ५०० चांदीची (दिरहम) नाणी महर ठरविण्यात आला. त्या वेळी मुहम्मद (स.) यांचे वय २५ वर्षे आणि खदीजा (रजि.) यांचे वय ४० वर्षे होते.

निकाहनंतर मुहम्मद (स.) बहुधा घराबाहेर राहू लागले. कित्येक दिवस मक्केच्या गुफांमध्ये उपासना करीत असत. दहा वर्षे अशीच लोटली. एके दिवशी नेहमीप्रमाणे हीरा या गुफेत चिंतन करीत असताना अल्लाहच्या आदेशाने जिब्रिल (अ.) तेथे आले व म्हणाले, ``क्रम या मुहम्मद!'' (हे मुहम्मद उठा) पैगंबरांनी दृष्टी उचलून पाहिले तर त्यांना एक सुंदर चेहरा दिसला. त्याच्या कपाळावर तैयबाचा कलमा लिहिलेला होता. ते जिब्रिल होते. त्यांनी मुहम्मद (स.) यांना गळामिठी घातली व जवळ दाबत म्हटले, ``वाचा!'' पैगंबर (स.) म्हणाले, ``मी लिहू वाचू शकत नाही.'' परत त्यांना आलिंगन देत ते म्हणाले, ``वाचा!'' पैगंबरांनी तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदाही वाचावयास सांगितले, ``वाचा अल्लाहच्या नावाने ज्याने हे सर्व निर्मिले पाण्याच्या थेंबाने (रक्ताच्या पेशीने) माणसाला बनविले. तुमचा परवरदिगार फार दयाळू आहे, तुम्ही वाचा.'' अल्लाहने माणसाला लेखणीद्वारे ज्ञान शिकविले जे त्याला काही माहीत नव्हते. पैगंबरांच्या पवित्र जिव्हेवर `इकराबिस्मी....'' हे शब्द उमटू लागले. या विचित्र अनुभवाने मुहम्मद (स.) अत्यंत प्रभावित झाले. घरी परतले आणि म्हणाले, (जमलूनी, जमलूनी) ``माझ्यावर पांघरूण घाला.'' माननीय खदीजा (रजि.) यांनी तसे केले व म्हणाल्या, ``आपण कोठे होता? मी अगदी काळजीत होते. कित्येक माणसांना तुमच्या शोधार्थ मी पाठविले होते.'' पैगंबरांनी त्यांना तो सगळा अनुभव सांगितला. माननीय खदीजा (रजि.) म्हणाल्या, ``आपण सत्य तेच बोलता, गरीबांना मदत करता, अतिथ्यशील आहात, दयाळू आहात, ठेव प्रामाणिकपणे जपणारे अमीन आहात, दु:खितांची खबर ठेवता, अल्लाह आपल्याला एकटे सोडणार नाही, एकाकी पाडणार नाही.'' पैगंबरांना घेऊन त्या आपले काका वर्का-बिन-नौफिल यांच्याकडे गेल्या. या काकांनी मूर्तिपूजेला कंटाळून खिस्ती धर्म स्वीकारला होता. पूर्वीच्या दैवी ग्रंथांचे-तौरात, जबूर, इंजील ते गाढे अभ्यासक होते. खदीजा (रजि.)यांनी मुहम्मद (स.) यांचा विचित्र अनुभव त्यांना सांगितला. वर्का ते ऐवूâन म्हणाले, ``हा तोच देवदूत आहे जो मूसाकडे पाठविला गेला होता. जर मी त्या दिवसांपर्यंत जिवंत राहू शकलो असतो, जेव्हा तुमच्या जमातीतील लोक तुम्हाला देशत्याग करावयास भाग पाडतील.'' पैगंबर (स.) यांनी विचारले, ``काय हे लोक मला देशाबाहेर काढतील?'' वर्का म्हणाले, ``होय, तुमच्यावर जे अवतरले आहे ते ज्यांच्या-ज्यांच्यावर अवतरते, जग त्यांचे विरोधी होते. जर मी त्या काळापर्यंत जगलो तर तुम्हाला जरूर मदत करीन.'' यानंतर वर्कांचा लवकरच मृत्यु झाला. खदीज (रजि.)यांना कळून चुकले की आदरणीय मुहम्मद (स.) यांना पैगंबर म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

त्यांनी त्वरीत इस्लाम धर्म स्वीकारला. सर्व इस्लामी ग्रंथ या गोष्टीची पुष्टी करतात की माननीय खदीजा (रजि.) या इस्लामचा स्वीकार करणाऱ्या पहिल्या महिला अनुयायी (सहाबीया) आहेत. पैगंबरांशी विवाहानंतर खदीजा (रजि.) या २५ वर्षे जगल्या. कुरआन अवतरल्यानंतर नऊ वर्षे त्या जगल्या. या काळात त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आत्मिक संघर्षाला हसत हसत साथ दिली व तो सहन करीत पैगंबरांच्या जीवलग व त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या पत्नी सिद्ध झाल्या.

माननीय खदीजा (रजि.) यांनी इस्लाम स्वीकारताच त्यांच्या नातेवाईकांमध्ये इस्लामचे आकर्षण वाढले. तरूणात माननीय अली (रजि.) व वयस्कांमध्ये माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.), जैद बिन हारिसा (रजि.) इत्यादींनी इस्लाम स्वीकारला. तदनंतर हळूहळू अनेक लोक या धर्मात प्रविष्ट होऊ लागले. इस्लामच्या या विस्ताराने माननीय खदीजा (रजि.) आनंदित झाल्या. आपल्या जवळच्या तसेच दूरच्या गैरमुस्लिम नातेवाईकांच्या टीकेची पर्वा न करता त्यांनी पैगंबरांना धर्मप्रचारात मदत केली. त्यांनी आपली सर्व संपत्ती इस्लामला अर्पण केली. त्यातून अनाथ व विधवा यांची देखभाल, निराधारांना मदत, गरजूंना सहाय्य दिले गेले.

इकडे कुरैश लोक नवमुस्लिमांवर अत्याचार करू लागले व इस्लामच्या प्रचारात अडथळे निर्माण करू लागले. त्यांनी पैगंबर व त्यांच्या अनुयायांना छळण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.

भाग ४

जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) काफिरांच्या मूर्ख बडबडीने त्रस्त होत तेव्हा खदिजा (रजि.) त्यांना समजावत, ``हे पैगंबर आपण दु:खी होऊ नका. आजपर्यंत एकही पैगंबर असा झाला नाही ज्याची लोकांनी टर उडविली नसेल.'' हे ऐवूâन पैगंबरांची नाराजगी दूर होत असे. अशा प्रकारे या दु:खदायी काळात खदीजा (रजि.) या पैगंबराच्या समविचारी व दु:खात केवळ सामीलच नव्हत्या, तर प्रत्येक संकटाच्या वेळी त्यांना मदत करीत असत. पैगंबर म्हणत, ``मी जेव्हा काफिराची बडबड ऐवूâन खदिजा (रजि.) याला त्याबद्दल सांगत असे तेव्हा त्या मला धीर देत व कोणत्याही दु:खावर त्यांचे समजावणे हे औषधाप्रमाणे काम करी व माझे दु:ख हलके होत असे. त्या काळातील एक व्यापारी एके ठिकाणी म्हणतो, मी एकदा अज्ञानाच्या काळात मक्का येथे माल खरेदीसाठी आलो असता अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब यांच्याकडे थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अब्बास यांच्यासह बाजारात गेलो. काबागृहाजवळून जात असता एक तरूण आकाशाकडे पाहून नंतर काबागृहाकडे तोंड करून उभा राहिला. थोड्या वेळाने पोरगेलासा मुलगा आला, तो ह्या तरूणाजवळ उभा राहिला. थोड्या वेळाने एक स्त्री आली व या दोघांच्या मागे उभी राहिली. तिघांनी नमाज अदा केली व निघून गेले. मी म्हणालो, `अब्बास मला वाटते मक्का शहरात क्रांती होणार आहे.' ते उत्तरले, ``होय, तुला माहीत आहे का हे दोघे कोण आहेत?'' - `नाही', ते उत्तरले. तो तरूण व तो मुलगा, दोघे माझे पुतणे आहेत. ती स्त्री मुहम्मद (स.) यांची पत्नी खदीजा (रजि.) होती. माझा पुतण्या मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की त्यांचा धर्म दिव्य आहे आणि अल्लाहच्या आदेशानेच तो प्रत्येक काम करतो. अजून तर त्या तिघांखेरीज कोणी त्या धर्माचा अनुयायी झालेला नाही. मला वाटले चौथा अनुयायी मी झालो तर किती बरे होईल!''

भाग ५

वरील उदाहरणावरून दिसून येते की खदीजा (रजि.) यांच्या या प्रेम, सहानुभूती, त्याग इ. गुणांमुळे पैगंबराचे त्यांच्यावर अमर्याद प्रेम होते. त्या जिवंत असेपर्यंत पैगंबरांनी दुसरा विवाह केला नाही. माननीय खदीजा (रजि.) मुलाचे पोषण आणि घरातील कामकाजदेखील उत्तमरित्या करत असत. संपत्ती व ऐशआराम असूनदेखील त्या पैगंबरांची सेवा स्वत: करीत असत. उदा. पैगंबरासाठी काही ताटात घेऊन त्या येत असताना जिब्रिल (अ.) तेथे पोहचले. त्यांनी सांगितले, ``पैगंबर त्यांना माझा आणि अल्लाहचा सलाम सांगा. खदीजा (रजि.) ची पैगंबरांवर एवढी श्रद्धा होती की पैगंबरी मिळण्याआधी व नंतरच्या काळात पैगंबराच्या प्रत्येक वचनावर त्यांनी श्रद्धा ठेवली. त्यामुळे पैगंबर (स.) त्यांची खूप स्तुती करीत असत. पैगंबरी मिळाल्यावर सात वर्षानंतर कुरैशांनी अबू तालिबच्या घराला वाळीत टाकले त्या वेळीदेखील खदीजा (रजि.) त्यांच्यासोबत होत्या. तीन वर्षापर्यंत त्यांनी हा वनवास सहन केला. त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले. ११ रमजान १० नबवी वर्ष हा तो दिवस होता. त्या वेळी खदीजा (रजि.) ६५ वर्षाच्या होत्या.

भाग ६

पैगंबरांना त्यांच्या निधनाने धक्का बसला ते नेहमी नाराज असत त्यानंतर माननीय सौदा (रजि.) त्यांचा विवाह झाला. खुदीजा (रजि.) यांना ते कधी विसरू शकले नाहीत. जेव्हा ते कुर्बानी करीत तेव्हा खुदीजा (रजि.) यांच्या मैत्रिणींना अगोदर त्यातील हिस्सा पोहोचता करीत. खुदीजा (रजि.) यांचा कोणी नातेवाईक त्यांच्याकडे आला तर त्याचे आदरातिथ्य करीत.

खदीजा (रजि.) यांची स्तुती केल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत व घरात प्रवेश करतानाही खुदीजा (रजि.) यांची स्तुती करीत. माननीय आएशा (रजि.) यांनी एकदा इर्षेने विचारले, ``पैगंबर (स.)! ती विधवा व म्हातारी स्त्री होती, अल्लाहने त्यांच्यापेक्षा चांगली पत्नी तुम्हाला दिली आहे.'' ऐवूâन पैगंबरांना राग आला. म्हणाले, ``अल्लाहशपथ! मला खदीजा (रजि.) पेक्षा चांगली पत्नी मिळाली नाही. जेव्हा सगळे काफीर होते त्यांनी इस्लाम स्वीकारला. सगळ्यांनी मला खोटे ठरविले तेव्हा त्यांनीच मला पाठिंबा दिला. आपली सगळी संपत्ती मला अर्पिली.'' आएशा  (रजि.) यांनी घाबरुन निश्चय केला की, ``इथून पुढे मी खदीजा (रजि.) यांना भलेबुरे म्हणणार नाही.''

खदीजा (रजि.) कडून एवूâण सहा अपत्ये पैगंबरांना झाली. पहिले कासीम (रजि.) ते लगेच वारले. मग जैनब (रजि.), अब्दुल्लाह (रजि.) तेही बालपणीच वारले. त्यानंतर रुकय्या (रजि.), उम्मे कुलसुम (रजि.), फातेमा तुज्जोहरा (रजि.) ही मुले जन्मली.


ह्या पुस्तिकेत जमाअत-ए-इस्लामी हिंदचा अल्पसा परंतु उपयुक्त परिचय करून देण्यात आला आहे. अपरिचितांना जमाअतचा परिचय एका दृष्टिक्षेपात व्हावा म्हणून लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली आहे.

जमाअतचे ध्येय-धोरण तसेच मूलभूत तत्त्व सांगून जमाअतचे कार्य व धोरण थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनात्मक कार्य, राष्ट्रीय एकात्मकता आणि निवडणुकीचे राजकारणसुद्धा थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे.             

आयएमपीटी अ.क्र. 229  -पृष्ठे - 08      मूल्य - 06  आवृत्ती - 1 (2014)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/31znn1v7j9uo2l4htgxwug436g4eh4r2


quran

कुरआनकडे आकर्षित होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी आज तीन कारणांची आपण कारणमिमांसा करूया. 

1. सहनशिलता :

कुरआनमध्ये सहनशिलतेचे विस्ताराने वर्णन करण्यात आलेले आहे, ते केवळ वाचनासाठी नसून अनुकरणासाठी आहेत. सहनशीलता माणसाला आज ना उद्या नक्कीच यशस्वी करते. सहनशिल माणूस कधीच पराजित होवू शकत नाही. असहनशिलता ही भौतिक आकर्षण तसेच चंगळवादामुळे माणसांमध्ये निर्माण होते. आपल्या आजूबाजूला असणारे आपलेच लोक जेव्हा चंगळवादी जीवन जगत असतात तेव्हा आपल्या सीमित संसाधनामध्ये समाधानाने जगण्यासाठी सहनशिलतेचाच आधार असतो, नसता अनेक माणसे इतरांसारखे चंगळवादी जीवन जगण्याच्या इच्छेपोटी आपली ऐपत नसतांना अधिक खर्च करतात व त्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी सुरूवातीला अनैतिक आणि नंतर अपराधिक कृत्यामध्ये सुद्धा लिप्त होवून जातात.  सहनशिलते संदर्भात कुरआनमध्ये खालीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. 

अ) ’’जो मनुष्य संयमाने वागेल आणि क्षमा करेल तर हे मोठे साहसी कर्मा पैकी एक कर्म आहे.’’ (सुरह : अश्शुरा, आयत क्र. 43). संयमाने वागणे हे सर्वांनाच जमण्यासारखे काम नाही, त्याला साहसाची गरज असते. असाहसी माणसे सहनशील असू शकत नाहीत. जी माणसं स्वतःच्या इच्छेचे गुलाम असतात त्यांच्यात सहनशीलता नसते. माणसात सहनशीलता निर्माण होण्यासाठी एक ईश्वरावर विश्वास ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. वर नमूद आयतने मला सहनशील बनण्यासाठी भरपूर मदत केलेली आहे. म्हणून मी कुरआनकडे आकर्षित झालो. 

ब) ’’मग हे पैगंबर (सल्ल.) संयम राखा ज्याप्रमाणे दृढनिश्चयी प्रेषितांनी संयम राखलेले आहेत.’’ (सुरह : अलकहफ आयत क्र. 35). जे वाचक प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाशी परिचित आहेत, त्यांना माहिती आहे की, प्रेषितांनी किती कठीण परिस्थितीत जीवन व्यतीत करून मानवतेच्या कल्याणाचे मिशन  पूर्ण केलेले आहे. विशेषतः त्यांच्या मक्काकालीन जवळ-जवळ 13 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना व त्यांच्या साथीदारांना ज्या अत्याचाराला सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांनी ज्या सामुहिक संयमाचा परिचय दिला, तो केवळ अद्वितीय आहे आणि हा संयम कुरआनच्या शिकवणीमधूनच येवू शकतो. म्हणूनच कुरआनच्या या शिकवणीकडे मी आकर्षित झालो. 

2. परोपकार :

परोपकारासंबंधी कुरआनमध्ये एक ड झनापेक्षा जास्त आयतींमध्ये अशी ताकीद करण्यात आलेली आहे की, ज्यांचा कुरआनवर विश्वास आहे त्यांनी जीवनात परोपकार करावेत. प्रेषितांना यासंबंधी ताकीद करतांना ईश्वराने परोपकारासंबंधी इतक्या विस्ताराने सूचना दिल्या की, त्यानंतर प्रेषितांनी श्रद्धावंतांना परोपकाराची ताकीद करतांना आपल्या शब्दांवर एवढा जोर दिला की त्यांच्या साथीदारांना अशी शंका निर्माण झाली की, प्रेषित आता शेजाऱ्याला आमच्या संपत्तीमध्ये वारसाहक्क सुद्धा देतात की काय? या ठिकाणी शेजारी हा कोणत्याही जाती, धर्माचा असो परोपकार करतांना त्याचा पहिला अधिकार कुरआनने मान्य केलेला आहे. म्हणून मी कुरआनकडे आकर्षित झालो. परोपकारासंबंधात कुरआनमध्ये जे अनेक आदेश दिलेले आहेत त्यापैकी दोन निवडक आदेश खालीलप्रमाणे -

1. ’’ईश्वराच्या मार्गात खर्च करा आणि आपल्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका आणि सद्वर्तन करा ईश्वराला सद्वर्तन करणारेच आवडतात.’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं. 195). 

यात ईश्वराच्या मार्गात खर्च करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. स्पष्ट आहे ईश्वराच्या मार्गात खर्च करणे म्हणजे पुण्यकामात खर्च करणे होय. याचाच अर्थ असा की, माणसाने कष्टाने कमाविलेली संपत्ती ही  वाईट किंवा वाममार्गात खर्च करता येत नाही किंवा वाजवीपेक्षा जास्त संचितही करूनही  ठेवता येत नाही. कारण ईश्राच्या मार्गात खर्च करण्याची नुसती सुभाषितवजा सूचनाच करण्यात आलेली नसून, प्रत्यक्षात तो खर्च केला नाही तर स्वतः आपल्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखे आहे, असे म्हटलेले आहे. या शब्दांवर गांभीर्याने विचार करताच प्रत्येक बुद्धीमान माणूस ईश्वराच्या मार्गात खर्च करण्यासाठी प्रेरित झाल्याशिवाय राहत नाही. या आयातीमुळे सुद्धा मी कुरआनकडे आकर्षित झालो.

2. ’’ जे लोक आपली संपत्ती  ईश्वराच्या मार्गात खर्च करतात आणि खर्च केल्यानंतर त्यावर उपकार दर्शवित नाहीत आणि दुःख देत नाहीत त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि त्यांच्याकरिता कोणताही दुःख आणि भयाचा प्रसंग नाही.’’ (सुरह बकरा आयत नं. 262) . 

या आयातीमध्ये जे मार्गदर्शन  करण्यात आलेले आहे त्याच्या उलट लोकांचा व्यवहार असल्याचा आपण याची देही याची डोळा पाहत असतो. कोणाची मदत केली तर लगेच त्याच्यावर आपण उपकार केले अशा पद्धतीने लोक वागू लागतात. विशेषतःसावकारीमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गरीब, शेतकरी किंवा मजूर जेव्हा सावकाराकडून अडल्यावेळी व्याजी ऋण घेतात त्यावेळेस ऋण दिल्यानंतर सावकाराचे त्यांच्याशी वागणे कसे असते हे कोणापासून लपलेले नाही. वास्तविक या ठिकाणी सावकारांनी कर्जदाराची मदत केलेली नसते तर व्याजी पैसे दिलेले असतात. तरी परंतु, त्याचा व्यवहार कर्जदारावर उपकार केल्यासारखा असतो. म्हणून श्रद्धावंतांना ही सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की, कोणाचीही मदत जर करत असाल, ईश्वराच्या मार्गात खर्च जर करत असाल, तर ज्याच्यावर खर्च केला त्याच्यावर चुकूनही उपकार केल्याची भावना उत्पन्न होवू देऊ नका. या आयातीमध्ये मानवाच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या उपकाराच्या भावनेची इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे की, तिच्याकडे कोणताही सद्सद्विवेकबुद्धी असलेला माणूस आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनसुद्धा मी कुरआनकडे आकर्षित झालो. या संदर्भात एक ऐतिहासिक घटना माझ्या वाचनात आली की, एकदा हजरत अबु हनिफा हे भर दुपारी उन्हात कोणाचीतरी वाट पाहत उभे होते. रस्त्याने जाणाऱ्या माणसाने त्यांना हटकले व म्हटले की, ’’इमामसाहेब उन्हात का उभे आहेत बाजूलाच भींतीची सावली आहे तिथे उभे रहा.’’ तेव्हा ते उत्तरले की, ’’मित्रा, मी ज्याची भींत आहे त्याला कर्जाऊ रक्कम दिलेली आहे. त्याच्या भींतीची सावली घेणे म्हणजे त्या रकमेवर व्याज घेतल्यासारखे वाटते. म्हणून मी उन्हात उभा आहे.’’ 

आदर्शवादाची एक अत्युच्च पातळी असनेतून दिसून येते. 

3. बंधुभाव

 ’’ हे श्रद्धावंतांनों ! आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देउन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो आणि ईश्वरावर आणि परलोकावर श्रद्धा ठेवत नाही. त्याच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जणू एक खडक होता, त्याच्यावर मातीचा थर जमलेला होता, त्यावर जेव्हा जोराची वृष्टी झाली तेव्हा सर्व माती वाहून गेली आणि स्वच्छ खडक ते खडकच उरले. असे लोक आपल्यासाठी दान देउन जे पुण्य कमवितात त्यापासून त्यांच्या हाती काहीच लागत नाही आणि श्रद्धावंतांना सरळ मार्ग दाखविणे हा ईश्वराचा शिरस्ता आहे.’’ (सुरह बकरा आयत नं. 264.) आयत क्रमांक 262 मध्ये नमूद केलेल्या मानवी भावनेचा अधिक विस्ताराने आणि प्रभावशाली शब्दांचा वापर करून ईश्वराने ही ताकीद केलेली आहे की दुसऱ्यावर केलेल्या उपकारासंबंधी कधीच गर्व बाळगू नका आणि त्याच्याशी वर्तन करताना त्याच्यावर आपण उपकार केल्याची जाणीव त्याला होवू देऊ नका, असे करणे म्हणजे टणक खडकावर जमलेला मातीचा थर एका हलक्याशा पावसाच्या सरीने जसा वाहून जातो तसे होण्यासारखे आहे. कुरआनच्या या मोहित करणाऱ्या शब्दरचनेमुळे मी त्याकडे आकर्षित झालो आहे. 

(क्रमशः)


- किशन जयवंतराव पाटील 

मुखेड जि.नांदेड 

मो.9175793247

(लेखक हे कुरआनचे अभ्यासक आणि उपासक आहेत.)



हा एकमेव असा सूरह आहे ज्यात मनुष्याबरोबर पृथ्वीवरील दुसरे स्वतंत्र प्राणी-जिन्नाना-संबोधित करण्यात आले आहे. दोघांना अल्लाहचे सामर्थ्य, त्याचे अनेकानेक उपकार आणि त्याच्या तुलनेत निर्मितीच्या असहाय व सामर्थ्यहीन अवस्थांचे वर्णन आले आहे. हिशेब देण्याबद्दलची जाणीव (उत्तरदायित्व) करून त्यांच्या अवज्ञेच्या वाईट परिणामांपासून सावध करण्यात आले आहे.

हा सूरह स्पष्ट करतो की अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आणि कुरआनचे आवाहन हे जिन्न व मनुष्य दोघांसाठी आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व फक्त मनुष्यमात्रापर्यंतच सीमित नाही.

आयएमपीटी अ.क्र. 228   -पृष्ठे - 40   मूल्य - 20  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/lmur3fbpck71kens569b2qu8odl1t0xm


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget