Latest Post


माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

मी एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, ‘‘काय तुम्ही ‘वित्र’ची नमाज अदा करण्याअगोदर झोपता?’’ त्यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे आएशा (रजि.)! माझे डोळे झोपतात परंतु माझे हृदय मात्र झोपत नाही.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे झोपण्याच्या स्थितीतसुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) गफलतीपासून अलिप्त राहत असत. त्यांचा आत्मा निद्रावस्थेतसुद्धा जागृत राहत असे, हे याचे स्पष्टप्रमाण आहे की पैगंबरांच्या पवित्र हृदयावर भौतिकेचे नव्हे तर आध्यात्मिकतेचे वर्चस्व होते. याचमुळे पैगंबरांचे हृदयदीप निद्रावस्थेतसुद्धा प्रज्वलित राहात असे.

शंका : कुरआन शेकडो वर्षे जुना ग्रंथ असल्याने आपल्या मूळ स्वरूपात सुरक्षित नाही, कारण प्राचीन धार्मिक ग्रंथांच्या सुरक्षेसाठी काही साधन नव्हते.

कुरआन हा ईशग्रंथ सिद्ध झाल्यानंतर सर्वांत प्रथम प्रश्न असा की, दीड हजार वर्षे झाल्यानंतर कुरआन आपल्या मूळ स्वरूपात सुरक्षित आहे काय? जरी कुरआन ईशग्रंथ असला तरी इतक्या मोठ्या काळात त्यात फेरबदल आणि परिवर्तन होण्याची संभावना आहे. असे असेल तर त्याचा लाभ समाप्त होईल आणि तो ईशग्रंथ संबोधण्याच्या अधिकारापासून मुक्त होईल.

हा एक स्वभाविक प्रश्न आहे. आजपासून दोन-तीनशे वर्षांपूर्वी पुस्तकांना सुरक्षित ठेवण्याची योग्य साधने नव्हती. मुद्रणालय तर नव्हतेच, लेखनसामुग्रीही उपलब्ध नव्हती. प्राचीन काळी पुस्तकांच्या अनेक प्रति तयार करण्याकरिता लिपिक आपल्या हस्ताक्षरांत लिहीत असे. त्यांत चुका होत असत. वेळोवेळी त्यांत नवीन अंश, भाग जोडले जात आणि काही भाग वगळले जात. किडे, वाळवी आणि अग्नी व पाणी इत्यादीपासून संपूर्ण पाने अथवा पुस्तकाचा काही भाग नष्ट होत असे. त्या क्षतीग्रस्त अथवा हरवलेले भागांना त्या विषयाचे विद्वान पंडित आपल्या स्मरण शक्तीच्या आधारे पुन्हा लिहून काढीत. या प्रकारे पुस्तकाचे बहुमूल्य रूप नष्ट होत असे. हेच कारण आहे की सगळ्या जुन्या पुस्तकांच्या प्रतीत पाठांतर व वेगळे अंश सापडतात.

प्रमाण नसतांना अधिक तर लोक मूर्खपणे श्रद्धा व आस्थेने वशीभूत होऊन अशुद्ध प्रतींना डोळे झावूâन शुद्ध समजतात. जर ते ग्रंथ धार्मिक असतील तर श्रद्धा व भक्तीभावाने अधिक घट्ट धरून ठेवतात. परंतु वैज्ञनिक पद्धतीने तपास केल्यास वादाची पुष्टी तर होत नाही आणि वास्तविकता स्पष्ट होते. हे साशंक तथ्य आहे की, काय पवित्र कुरआनची स्थिती अशीच आहे अथवा याहून भिन्न आहे. शंकांच्या वलयातून निघून विश्वास संपादन करण्याच्या स्थितीत निष्पक्ष भावाने वास्तविकता शोधण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे हे आवश्यक आहे की पवित्र कुरआनच्या सुरक्षा साधनांचे परीक्षण करून त्याचे सुरक्षित असल्याची पुष्टी वैज्ञानिक प्रमाणाच्या आधारे प्राप्त केली जावी, मात्र धार्मिक आस्थेवर विश्वास न ठेवता.

पवित्र कुरआन अल्लाहचा अंतिम ग्रंथ आहे. संपूर्ण मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी त्याचे सुरक्षित राहणे अनिवार्य आहे व हा ईशयोजनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. अल्लाहने सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. याचा स्पष्ट उल्लेख कुरआनमध्ये केलेला आहे. (कुरआन १५ : ९) परंतु ईश्वराने अलौकिक, अप्राकृतिक साधनांचा वापर न करता याची सुरक्षा मानवांद्वारे करवून घेतली आहे जी मानवशक्तीच्या ताब्यात आहे. त्याची पारख केली जाऊ शकते. जर अलौकिक रूपात सुरक्षेची व्यवस्था केली गेली असती तर आमच्यासाठी ती तपासणे व विश्वासपात्र परिस्थितीत पोहोचणे शक्य झाले नसते.

कुरआनच्या सुरक्षेसाठी दोन साधनांचे सहाय्य घेतले गेले. ही दोन्ही साधने अवतरणकाळापासून काही बदल न करता व्यवहारात आणले जात आहेत. पहिले आहे, ``हिफ़्ज करणे'' तोंडीपाठ करणे व दुसरे आहे लिपीबद्ध करून ग्रंथरूपात सुरक्षित करणे.

पवित्र कुरआन थोडे-थोडे करून अवतरित झाला आहे. हे अवतरण देवदूतामार्फत तोंडी ध्वनिउच्चारणासोबत होत असे. अवतरणानंतर तात्काळ पैगंबर मुहम्मद (स.) त्त्वरित पाठ करून घेत आणि त्याचा प्रचार व प्रसारही करीत. पैगंबर स्वत: लिखाण करीत नसत व याकरिता लेखनकार्य करणारे लिपीक या कामासाठी नियुक्त केले होते व ते तात्काळ अवतरित कुरआनचे अंश लिहून घेत असत. कुरआनच्या ``आयती''चे अवतरण झाल्यावर लिपीक बोलविले जात आणि त्या आयतींना लिहून घेतले जाई. लिखित भाग पैगंबर (स.) पठण करवून घेत, कारण योग्य असल्याचे समाधान व विश्वास प्राप्त होई. त्या ``आयती'' अनेक लोक कंठस्थ करून एकमेकांना ऐकवीत. अन्य अनुयायी लोकांना ऐकवीत व संदेशाचा प्रचार-प्रसार करीत. लेखन सामुग्रीच्या रूपात झाडांची मोठाली पाने, उंटाची रूंद हाडे आणि कातडीच्या बारीक सालीचा वापर होत असे. मग त्याची अनेक प्रतिलिपी तयार करून दुसऱ्या मुस्लिमांपर्यंत पोहोचविली जाई व ठेवली जाई. त्यामुळे इतरांना वाचण्याची संधी मिळेल.

कुरआन पठणाला पुण्यकार्यांत सामील केले. त्याचबरोबर दररोज नमाज (प्रार्थना) मध्ये कुरआनच्या काही अंशाचे वाचन (तोंडी) अनिवार्य केले गेले. वर्षांतून एक महिना `रमजान'मध्ये समाजाच्या सर्व लोकांना सामूहिकरित्या नमाज पठणात संपूर्ण कुरआनचे पठण व ऐकणे अनिर्वाय झाले, प्रचलित झाले. ही सर्व कामे पैगंबरांच्या जीवनकाळातच सुरू झाली होती व साऱ्या मुस्लिमांसाठी आदर्श बनली होती.

याप्रकारे कुरआनची शिकवण व उपदेश यांच्या शिकण्या शिकवण्याचे कार्यही जोरात सुरु झाले. पाहता पाहता घरोघरी शिक्षणप्रशिक्षण आणि ज्ञानाच्या ज्योतीची चळवळ सुरू झाली. निरक्षरता व अज्ञानाचा अंधकार दूर झाला. साधारणपणे सर्वच मुस्लिम कुरआन शिक्षणात भाग घेऊ लागले. परंतु जे लक्ष देणारे दक्ष होते ते समाजात विशिष्ट स्थान प्राप्त करत होते. लोकांचा समूह त्यांच्याकडून शिक्षण घेण्याकरिता एकत्र होत असत. हे असे घडत गेले आणि अरब राष्ट्रावर इस्लामचा प्रभाव पडत गेला आणि सत्तास्थानावर मुस्लिम काबीज झाले आणि कुरआनचा आधार घेत सत्ता प्रस्थापित झाली. कुरआनज्ञानात जो श्रेष्ठ ठरला त्याला शासनात उच्च पद बहाल केले गेले. अशा प्रकारे व्यावहारिक जीवनात कुरआन उन्नतीचे साधन बनले. धार्मिक आस्था आणि पुण्य अर्जित करण्याबरोबर भौतिक उन्नतीसाठीचे कारण म्हणून कुरआन-प्रशिक्षणाकडे लोक आकृष्ट होऊ लागले आणि हे स्वभाविक होते. त्या काळी कुरआनव्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रंथांची चलती नव्हती कारण विविध प्रकारच्याज्ञानापासून हे लोक दूर होते. सरकारी व्यवस्थेनुसार कुरआनचे अध्ययन घेण्यावर विशेष भर होता.

वरील कारणांनी लाखों लोक पिढ्या न् पिढ्या कुरआनचे शब्द, आयती, त्यांचे उच्चारण व अर्थज्ञान शिकत गेले. लाखों इसम असे आहेत ज्यांना संपूर्ण ग्रंथ कुरआन क्रमश: कंठस्थ आहे, पाठ आहे. याव्यतिरिक्त लिखित स्वरूपात याचा विस्तार इतका झाला की कोणतेही घर कुरआनच्या प्रतीशिवाय नव्हते. (त्या काळी मुद्रणालय नसतानासुद्धा) कारण ही दैनंदिन गरज होती. ते लिखित प्रती समोर ठेवून पाठ करीत असत. आता मुद्रणव्यवस्था अस्तित्त्वात आल्यानंतर अधिक प्रमाणात कुरआनचे मुद्रण होत आहे.

कुरआनच्या अवतरणकाळापासून ते आजतागायत एक दिवस असा गेला नाही की कुरआन लिखित रूपात नाही अथवा कोणी हाफीज नाही. त्याच्या पाठांतरात आणि मुद्रणांत जेवढी काळजी घेतली जाते, तेवढी अन्य पुस्तकांबाबत घेतली जात नाही. इतिहासातील उल्लिखित प्रमाणाप्रमाणे कुरआनच्या संरक्षणाची सगळी काळजी घेत प्रत्येक प्रत प्रमाणित केली जाते. हेच कारण आहे की जगाच्या कोणत्याही भागात उपलब्ध कुरआनच्या प्रतीमध्ये कमी-जास्त आयती नाहीत, कोणतीही आयत मागे-पुढे नाही, ाâमवारीत त्रुटी नाही आणि पाठांतरात फरक नाही, लाखो प्रतीत अशी आश्चर्यजन्य साम्यता आणि शुद्धता कुरआनव्यतिरिक्त कोणत्याही प्राचीन पुस्तकांत आढळत नाही.



लग्नाला उर्दूमध्ये निकाह म्हंटले जाते. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट मला जी वाटते ती महेर आहे. प्रत्येक निकाहमध्ये वराकडून वधूला निश्चित रक्कम भेट म्हणून दिली जाते. त्याशिवाय निकाहच होत नाही. इस्लामने स्त्रीला महेर घेण्याचा अधिकार दिलेला आहे. महेर किती असावा याबाबत वधू आणि वराकडून जाणकार लोक आपसात चर्चा करून निर्णय घेतात. साधारणपणे महेर रोख रक्कम किंवा सोन्याच्या स्वरूपात असते. मात्र एका मुस्लिम मुलीने यात बदल करून पुस्तक रूपाने महेर मागितल्याची घटना नुकतीच केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात घडली. येथे राहणारी शहला नेचीयिल या मुलीने आपल्या नियोजित पतीकडून  महेरमध्ये 50 दुर्लभ पुस्तकांची मागणी करून सगळ्यांना चकित केले. शहलाचा होणारा पती अनिस आता मल्लापुरम ते हैद्राबाद दरम्यान फिरून प्रत्येक मोठ्या पुस्तकाच्या  दुकानातून आपल्या नियोजित पत्नीला देण्यासाठी पुस्तकांचा शोध घेतोय. शहलाने हैद्राबाद युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्र या  विषयात एम.ए. केलेले आहे. तिने वर पक्षाला 50 पुस्तकांची यादीच  दिलेली आहे. अनिसनेही निर्णय  घेतला आहे की, काहीही करून तो ही पुस्तके मिळविणारच आणि महेरमध्ये देणारच.   महेर हे काही वधूची किमत नाही. हा तर एक सुंदर उपहार आहे. जो पती आपल्या पत्नीला निकाहच्या दरम्यान दोन साक्षीदारांसमक्ष देतो. महेर पत्नीचा अधिकार आहे तर पतीचे कर्तव्य. एकदा महेर दिल्यानंतर त्या रक्कमेचे स्वामीत्व पत्नीकडे जाते. तिला जसे योग्य वाटेल तसे त्या रकमेचा ती विनियोग करू शकते. पती त्या रक्कमेला परतही मागू शकत नाही आणि तिला कसे खर्च करावे, याचे निर्देशही देऊ शकत नाही. इस्लामने महिलांना जे आर्थिक अधिकार दिलेले आहेत त्यातील एक हा अतिशय सुंदर अधिकार आहे. मात्र  आजकाल मुस्लिम समाजातील नव्या पिढीची मुलं महेर देण्यामध्ये जास्त गंभीर नाहीत. निकाहच्या वेळेस महेरची रक्कम उधारीवर  ठेवण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. असे करून ते महेर देण्याचे  टाळत आहेत. एवढेच नव्हे तर इस्लाममध्ये निकाह अतिशय साध्या पद्धतीने मस्जिदीमध्ये करण्याचे शरियाच्या  निर्देशांचीही अवहेलना केली जात आहे. मुस्लिमांमध्येही आता हिंदूंप्रमाणे मोठ-मोठी खर्चिक निकाह केले जात आहेत. लाखों रूपये किंमतीच्या वस्तू दहेजच्या नावाखाली दिल्या जात आहेत.  

बेंगलुरूचे खणन व्यावसायिक आणि कर्नाटक सरकारचे पूर्वमंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या नुकत्याच झालेल्या लग्नात 500 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या लग्नाची चर्चा देशभरात झाली. या लग्नात एक हजार रूपये किमतीची लग्नपत्रिका तयार करण्यात आली होती. जेवणामध्ये 16 प्रकारचे गोड पदार्थ तयार करण्यात आले होते. पाहुण्यांच्या जेवणावर 60 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नवरीच्या आभुषणांवर 150 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नवरीच्या एका साडीची किंमत 40 लाख असल्याचे माध्यमांमधून लोकांना समजले. मंडप वगैरेवर 25 कोटी रूपये तर मेकप आर्टिस्टवर 30 लाख रूपये खर्च करण्यात आले.  

 भारतात मोठ्या घराण्यांमध्ये होणाऱ्या लग्नामध्ये अशा अवाजवी खर्चाची एक मोठी परंपराच आहे. अलिकडे हिंदू धर्मीयांमध्ये मध्यमवर्गीयांची लग्नेही खर्चिक होऊ लागलेली आहेत. हिंदू धर्मातील जागरूक लोकांनी या संबंधी सामाजिक चेतना निर्माण करून लग्नातील खर्च  कमी करण्यासाठी प्रयत्न चालविलेले  आहेत. कारण की, खर्चिक लग्नांचा सरळ संबंध कन्याभ्रुण हत्येशी आहे. अनेक स्तरावर प्रयत्न होवूनही हिंदू  समाजामध्ये होणाऱ्या अवास्तव खर्चाला आळा बसू शकलेला नाही.  

 आजकाल मुस्लिमांमध्ये सुद्धा निकाह दरम्यान अवास्तव  करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत असल्याचे दिसून येत आहे. मुस्लिमांमध्ये गरीबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे भपकेबाज लग्नांचा परिणाम गरीब मुस्लिमांवर होत आहे. त्यामुळे अनेक गरीब मुस्लिमांच्या मुलींची लग्न वेळेवर होत नसल्याचे माझ्या लक्षात आलेले आहे. हुंडा, दहेज, अवास्तव खर्च याला शरियते इस्लामीयाने निषिद्ध ठरवलेले आहे. यासंबंधी उत्तर प्रदेशमध्ये एक चांगली घटना घडलेली आहे. बरेलवी मर्कज दर्गाह आला हजरतशी  संबंधित उलेमांनी एक फतवा जारी करून अशी घोषणा केली आहे की, दहेज मागणाऱ्या लोकांच्या लग्नात ते सामिल होणार नाहीत आणि निकाह लावणार नाहीत.  एकीकडे जनार्दन रेड्डीच्या मुलीच्या लग्नाची नकारात्मक चर्चा देशात सुरू असताना दूसरीकडे औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याच्या मुलीच्या लग्नाची सकारात्मक चर्चाही देशात होत आहे. अजय मुनोत नावाच्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात होणाऱ्या अवास्तव खर्चाला फाटा देवून त्या खर्चात 90 गरीबांना 1 बीएचकेचे पक्के घर बांधून भेट म्हणून दिलेले आहे. ही घरे बांधण्यासाठी दीड कोटी रूपये त्याने खर्च केलेले आहेत. दीड एकर जमीनीत ही कॉलनी बांधण्यात आलेली आहे. मुलीचे लग्न साध्या पद्धतीने करून तो खर्च अजय मुनोतने गरीबांच्या घरासाठी करून एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवलेले  आहे.  मुस्लिम समाजातही महेरची शिफारस शरियतने केलेली आहे तर दहेजची निंदा. समाज कोणताही असो लग्न म्हणजे दोन परिवारांना जवळ आणणारी घटना असते. त्यामुळे लग्न अतिशय साध्या पद्धतीने आणि दोन परिवारांमध्ये आनंद द्विगुणीत अशा पद्धतीने होणे अपेक्षित आहे. 

- मीना नलवार

धर्माबाद



- अता मुहम्मद

अता मुहम्मद यांनी हा ग्रंथ मुख्यत: अरूण शौरीच्या इस्लाम व मुस्लिम स्त्रियांविषयी केलेल्या दुष्प्रचाराला उत्तर आहे. हे लिखाण किती दांभिक स्वरूपाचे आहे हे सत्य समोर आणण्यासाठी लेखकाने ``दै. विश्वमित्र'' दैनिकात लेखमाला प्रसिद्ध केली आणि आज वीस एक वर्षांनी पुस्तकरूपात ``सुखी कुटुंबाचा पर्याय फक्त इस्लाम'' वाचकांसमोर आले आहे.

या ग्रंथात आक्षेपांना सविस्तर उत्तर देण्यात आले आहे. उदा. पडदा पद्धत मुस्लिम स्त्रीवर अत्याचार व अन्याय आहे, बहोपत्नीत्व, स्त्रियांविषयी कुरआन व हदीसमध्ये आलेली विधाने तसेच इस्लाममध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा आहे, इ. आक्षेपांची उत्तरे दिली आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 234   -पृष्ठे - 72    मूल्य - 30  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/mbt98svikqjlym3m7x0qt5f5aagzsafq




जैनब (रजि.) या अत्यंत उदार व दानशूर होत्या. फकीर व गरीबांना मदतीचा हात त्या देत व भुकेलेल्यांना पोटभर अन्न देत असत. यामुळे `उम्मुल मसाकीन' (गरीबांची आई) या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. त्यांचे पहिले लग्न पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आतेभाऊ माननीय अब्दुल्ला बिन जहश (रजि.) यांच्याशी झाले होते. ते फार महान सहाबी (रजि.) होते. ई.स. ३ मध्ये उहुदच्या युद्धाआधी त्यांनी अल्लाहजवळ प्रार्थना केली की, ``हे अल्लाह मला युद्धात असा बरोबरीचा योद्धा दे जो अत्यंत रागीट व पराक्रमी असेल. तुझ्या मार्गात लढताना त्याच्या हातून मला मरण येऊ दे. तो माझे नाक, कान, ओठ कापून टाको. मी तुझ्याकडे येईन तेव्हा तू विचारावेस की हे अब्दुल्लाह (रजि.) तुझे नाक, कान, ओठ कापलेले का आहेत ? तेव्हा मी म्हणावे, ही हे अल्लाह तुझ्या पैगंबरासाठी व तुझ्यासाठी कापलेले आहेत.'' त्यांची ही प्रार्थना मान्य झाल्याची आकाशवाणी झाली. ती ऐवूâन ते म्हणाले, ``माझ्या प्रेताचे तुकडे तुकडे होईपर्यंत मी लढेल. उहुदच्या युद्धात ते जोशात लढले त्यांच्या तलवारीचे तुकडे तुकडे झाले. पैगंबर (स.) यांनी तेव्हा त्यांना खजुरीच्या झाडाची एक काठी त्यांना दिली ती घेऊन तलवारीसारखा तिचा वापर त्यांनी केला. ते या युद्धात शहीद झाले. मूर्तिपूजकांनी त्यांचे नाक, कान, ओठ कापले व ते दोऱ्यात ओवले.

माननीय अब्दुल्लाह (रजि.)च्या निधनानंतर त्या वर्षीच पैगंबरांनी माननीय जैनब (रजि.) यांच्याशी विवाह केला. बारा ओकया महर दिला. त्या वेळी जैनब (रजि.) या जवळपास ३० वर्षाच्या होत्या. त्यानंतर दोन-तीन महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. खुद्द पैगंबरांनी जनाजाच्या नमाजचे नेतृत्व केले. `जन्नतुल बकी' येथे त्यांचे दफन केले. माननीय खदीजा (रजि.) नंतर जैनब (रजि.) यांचेच भाग्य होते की पैगंबर (स.) यांच्या हातून त्यांचे अत्यसंस्कार झाले. पैगंबर (स.) यांच्या इतर पत्नींचा मृत्यू पैगंबर (स.) यांचा मृत्यूनंतर झाला.


 

Islam

बहुतेक मुस्लिमांना इस्लाम एक धर्म (मजहब) म्हणून मान्य आहे मात्र एक जीवनव्यवस्था  (दीन) असल्याची त्यांना जाणीव नाही, अशी परिस्थिती आहे. याला  कारणीभूत पश्चिमी विचारसरणी आहे, ज्यात जीवनव्यवस्थेला धर्मापासून दूर ठेवलेले आहे. वास्तविक पाहता धर्माला राजनीतिमध्ये मान्यता दिल्याशिवाय न्यायाची स्थापनाच होऊ शकत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिश्चन समुदायाने धर्मसत्तेला चर्चमध्ये कोंडून प्रत्यक्ष जीवनामध्ये भांडवलशाही व्यवस्थेचा  स्वीकार केलेला आहे. त्यांच्यासाठी धर्म फक्त संडे प्रेयर पर्यंत संकुचित झालेला आहे. पाश्चिमात्य पद्धतीने शिक्षण घेतलेल्या मुस्लिमांनासुद्धा वाटते की इस्लाम फक्त मस्जिदीपुरता मर्यादित राहावा बाकी जीवनामध्ये त्यांना भांडवलशाही व्यवस्थेप्रमाणे जगण्याची मुभा मिळावी. म्हणूनच इस्लामच्या नावाने स्थापन झालेल्या पाकिस्तानमध्ये 68 वर्षानंतरसुद्धा इस्लामी व्यवस्था आलेली नाही. त्यांची शासन व्यवस्था, न्यायव्यवस्था  ब्रिटीश कायद्याप्रमाणे चालू आहे. घरेलू तंट्यामध्ये थोडा-फार  शरियतचा उपयोग केला जातो. बाकी  सारे खटले ब्रिटीश दिवाणी आणि  फौजदारी कायद्याप्रमाणे चालतात. जी  गत पाकिस्तानची तीच बांग्लादेशची. त्या देशातील सर्व कारभार ब्रिटीश पद्धतीने चालतो.

एवढेच नव्हे तर मध्यपुर्वे तील सर्व मुस्लिम देश, त्यात सऊदी अरबसारख्या कट्टर मुस्लिम देशाची  व्यवस्था फक्त इस्लामच्या नागरी आणि फौजदारी कायद्याप्रमाणे चालत नाही. तेथे आज 21 व्या शतकातही किंग्डम (राजेशाही) अस्तित्वात आहे. इस्लामी लोकशाही नाही. जगात अस्तित्वात असलेल्या 56 मुस्लिम देशांपैकी एकाही देशात इस्लामी जीवनव्यवस्था अस्तित्वात नाही. सकृतदर्शनी मुसलमान इस्लामचे गुणगान करताना थकत नाहीत. इस्लामसंबंधी मोठमोठी पुस्तके लिहिलेली आहेत. प्रभावि भाषणे केली जातात. मस्जिदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रार्थना केली जाते. रमजानचे रोजे ठेवले जातात. कोट्यवधींची जकात काढली जाते. लाखोंच्या       इस्लाम :

संख्येत मुस्लिम हजला जातात. या सर्व धार्मिक गतिविधींमध्ये मुसलमान हिरहिरीने भाग घेतात, मात्र जीवनव्यवस्था म्हणून इस्लामबद्दल चर्चा सुरू झाली की त्यांना ते रुचत नाही, असे का? आज याच विषयावर आपण चर्चा करू. 

मुळात बाराव्या शतकापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम समाज एक सत्ताधारी समाज म्हणून जगाला परिचित होता. त्या काळात अस्तित्वात असलेले आधुनिक ज्ञान आणि विज्ञान मुस्लिमांकडेच होते. म्हणूनच ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये लढल्या गेलेल्या अनेक क्रुसेड वॉरमध्ये मुस्लिमांनी ख्रिश्चनांचा पराभव केला. या सततच्या पराभवानंतर मात्र परिस्थिती बदलली. ख्रिश्चन समाजाने युद्ध बंद करून आपले लक्ष औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती, विज्ञान आणि तंत्रज्ञान याकडे केंद्रीत केले. याउलट मुस्लिमांनी विजयश्रीच्या उन्मादामध्ये शेरोशायरी, भवननिर्मिती, कला, संगीत इत्यादी क्षेत्रांमध्ये आपले लक्ष केंद्रित केले. धर्मसत्तेच्या प्रतिनिधींनी म्हणजेच उलेमांनी आपल्यासाठी मदरसे हे कार्यक्षेत्र म्हणून निवडले. येणेप्रमाणे मुस्लिम समाज दोन भागांत विभागला गेला. एक सत्ताधारी लोक, कला, संगीत इत्यादीमध्ये रममान झाले, दुसरे उलेमा हजरात मदरशांमध्ये व्यस्त झाले. 

औद्योगिक क्रांतीनंतर ख्रिश्चन समाज पूर्ण ताकदीनिशी पुन्हा मैदानात आला. यावेळेस त्यांनी मुस्लिम जगतावर दुहेरी हल्ला केला. एक आधुनिक हत्यारांनी व दुसरा आधुनिक विचारांनी. ख्रिश्चनांनी मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील साहित्य आणि सिनेमाच्या माध्यमातून जगातील सर्वच लोकांना अश्लीलतेच्या मार्गावर खेचून आणले. त्यात मुस्लिमही खेचले गेले. राजकारणापासून धर्म वेगळे करण्याचा सिद्धान्त मांडला. सर्वांप्रमाणे मुस्लिमांनाही तो आवडला. मुस्लिमांची जी मुख्य शक्ती होती ती त्यांच्या विचारधारेत होती. विचारधारेमुळे ते चारित्र्यवान होते म्हणून बलवान होते. मनोरंजनाच्या नावाखाली पसरलेल्या अश्लीलतेमुळे इतर समाजांप्रमाणे मुसलमानही प्रभावित झाले. त्यांची अख्लाकी (नैतिक) शक्ती कमकुवत झाली. त्यातच बंदुकीचा शोध लागल्याने बंदूक ही तलवारीपेक्षा प्रभावशाली झाली. बंदूक आणि अश्लीलता या दोन शस्त्रांद्वारे ख्रिश्चनांनी मुस्लिमांवर हल्ले केले. या दुहेरी आक्रमणांसमोर मुसलमानांचा टिकाव लागला नाही. शेकडो वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या पतनामुळे मुसलमानांच्या चारित्र्याची पाळेमुळे कमकुवत झाली. त्यांच्यामधील तकवा (चांगले चारित्र्य) कमी झाला. हेच कारण आहे की, इस्लामचा मनापासून स्वीकार करूनही, इस्लामी व्यवस्थेला त्यांचा विरोध असतो. इस्लामी जीवनव्यवस्थेला आपल्यामध्ये लागू करण्यासाठी जो सततचा त्याग करावा लागतो तो त्याग करण्याची तयारी आजच्या मुस्लिमांमध्ये नाही. इस्लामविषयी त्यांचे प्रेम कमी होत नाही परंतु त्याग करण्याची तयारीही नाही. अशा द्विधा अवस्थेमध्ये जागतिक मुसलमान जगत आहे. केवळ भाषणबाजीपुरता इस्लाम त्यांच्यामध्ये उरलेला आहे. भावनिक भाषण देण्यामध्ये मुस्लिमांना तोड नाही. लाखों लोकांना आपल्या भाषणामधून ते खिळवून ठेऊ शकतात. मात्र शुद्ध इस्लामी जीवन जगण्यासाठी जो निश्चय लागतो, तो त्यांच्यात राहिलेला नाही. मुसलमान अशा जीवनव्यवस्थेचे गुलाम बनलेले आहेत, जी इस्लामी आणि गैरइस्लामी मूल्यांमध्ये तडजोड करून निर्माण झालेली आहे. सद्यःपरिस्थितीत बहुतेक मुस्लिमांची स्थिती त्या जंगली घोड्यासारखी झालेली आहे जो जन्मापासून स्वतंत्र राहण्याच्या सवयीचा आहे.  

माणसांच्या गतिविधींना प्रेरणा त्या सिद्धान्तामधून मिळत असते ज्या सिद्धान्तावर ते विश्वास ठेवतात. अन्य समुदाय आधुनिक सुखसुविधा मिळविणे आणि जीवनमान उंचावणे या उद्देशासाठी जगत आहेत. याला उर्दूमध्ये जिंदगी बराए जिंदगी असे म्हणतात. म्हणून अशा समुदायाच्या जीवनामध्ये ऐशोआराम, मनोरंजन, नशा आदी गोष्टी स्वीकार्ह असतात. किंबहुना या गोष्टींना त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते. जगातील सर्व सुखसुविधा त्यांना हव्या असतात. त्या मिळविण्यासाठी ते गरिबांचे शोषणसुद्धा करीत असतात. हे शोषण करण्यासाठी त्यांनी एक अर्थव्यवस्था तयार केलेली आहे, जी व्याजावर आधारित आहे.  यात गरीब अधिक गरीब होत जातात व श्रीमंत अधिक श्रीमंत. 

या उलट मुस्लिम समाजाला कुरआनने एक उद्देश दिलेला आहे तो म्हणजे समस्त मानवजातीचे कल्याण. या उद्देशासाठी जगणे आणि याच उद्देशासाठी मरणे हे त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. यालाच उर्दूमध्ये जिंदगी बराए बंदगी असे म्हणतात. मानव कल्याणासारखा श्रेष्ठ उद्देश साध्य करण्यासाठी उच्च नीतीमूल्यांची, उच्च चारित्र्याची गरज असते. त्यात मनोरंजन, अश्लिलता, नशेला स्थान नसते. हा उद्देश साध्य करण्यासाठी व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा सिद्धान्त इस्लाम सादर करतो. पश्चिमेकडून आलेला भोगवादी विचार व मध्यपूर्वेतून आलेला मानवतेच्या कल्याणाचा विचार या दोघांमध्ये गेल्या चौदाशे वर्षांपासून संघर्ष चालू आहे. पश्चिमेचा विचार स्वार्थी आहे. मी माझे कुटुंब इतपर्यंत संकुचित आहे. याउलट मध्यपूर्वेतून आलेला इस्लामी विचार सर्वसमावेशक आहे. स्वार्थाच्या वर उठून इतरांच्या कल्याणासाठी झटण्याचे त्याचे मनसुबे आहेत.

इस्लामी जीवन ज्याचा उद्देश मानवकल्याणासारखा उच्च विचार असल्यामुळे त्यात दर्जाहीन गोष्टींना स्थान नाही. मुसलमान याच ठिकाणी कच खात आहेत. त्यांना इतर समाजाप्रमाणे जीवनाच्या सर्वच चवी चाखायच्या आहेत, सोबत इस्लामही त्यांना हवाय. या परस्परविरोधी वैचारिक संघर्षातून फार कमी लोक आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये शुद्ध इस्लाम अस्तित्वात आहे. बाकी  सर्वांची वाटचाल इस्लाम आणि गैरइस्लाम यांच्या तडजोडीतून सुरू आहे. बहुतेक मुसलमान मानवकल्याणाच्या आपल्या मूलभूत उद्देशापासून भटकलेले आहेत. म्हणून महत्त्वहीन झालेले आहेत. त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस सर्वशक्तिमान अल्लाहच्या इतायती (आज्ञापालन) ची शक्ती क्षीण होत आहे. त्यामुळे त्यांच्यात रूहानियत (आत्मीक शक्ती) कमी होत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा पराभव होत आहे. मग ज्या ठिकाणी ते अल्पसंख्येत आहेत त्या ठिकाणीही आणि ज्या ठिकाणी ते बहुसंख्येत आहेत त्या ठिकाणीही. 

सर्वसाधारण मुस्लिमांच्या नजरेमध्ये आज त्याच मुस्लिमांना सन्मान आहे, ज्यांनी भौतिक क्षेत्रात असाधारण यश प्राप्त केलेले आहे. उदाहरणार्थ सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, ए.आर.रहमान इत्यादी. हे लोक आज मुस्लिम युवकांचे आयकॉन बनलेले आहेत. कारण या लोकांनी इतर लोकांच्या तुलनेत सिनेक्षेत्रात असाधारण असे यश प्राप्त केलेले आहे. मुस्लिम युवक याकडे लक्षच द्यायला तयार नाहीत की या लोकांनी इस्लामी तत्त्वांचा बळी देऊन हे यश प्राप्त केलेले आहे. इस्लामच्या मूळ उद्देशापासून घेतलेली फारकत हीच मुस्लिम समाजाच्या अधोगतीचे मूळ कारण आहे. 

आज इफलास ने खायी है जरो सीम से मात 

लेकिन इसमें तेरे जलवों का कोई दोष नहीं

ये तगय्युर इसी माहोल का परवर्दा है

अपनी बेरंग तबाही का जिसे होश नहीं!

कुठलाही आनंद माणसाच्या विचारांच्या दर्जावर 

आधारित असतो आणि विचारांचा सर्वोच्च दर्जा इस्लाम आहे. जो या रहस्यापर्यंत पोहचेल तो जिंकेल. इबादती (उपासना) जर सोडल्या तर आज मुस्लिमांच्या जीवनामध्ये असली कुठलीही गोष्ट नाही जी शुद्ध इस्लामच्या पायावर उभी असेल. अर्थव्यवस्था नाही, राजनीतिक व्यवस्था नाही की सामाजिक व्यवस्था नाही. वास्तविक पाहता मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यात लढाई नाहीच. लढाई आहे ती इस्लाम आणि भांडवलशाही जीवनव्यवस्थेमध्ये. एकीकडे ख्रिश्चन विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असा गतिशील समाज आहे, तर दूसरीकडे मुस्लिम या गोष्टींपासून दूर आणि जड वादात जखडलेला समाज झालेला आहे. त्यामुळे या दोघांमधील लढाई एकतर्फी होत आहे. म्हणूनच अफगानिस्तान, इराक, सीरियासारखे मुस्लिम देश एकापाठोपाठ उद्ध्वस्त होत आहेत. या पराजयाला घाबरून कोट्यवधी मुसलमान पाश्चिमात्य सभ्यतेकडे ओढले जात आहेत. त्यांच्याच विचारांना, त्यांच्याच शिक्षण पद्धतीला अंगीकारत आहेत. त्यांच्याचसारखे खात आहेत, त्यांच्याचसारखे पीत आहेत, त्यांच्याचसारखे राहत आहेत, त्यांचाचसारखा वेष करत आहेत, त्यांच्याचसारखे गात आहेत, त्यांच्याचसारखे नाचत आहेत. थोडक्यात पश्चिमेकडून जे-जे येईल ते-ते आधुनिक आणि तारक असा समज मुस्लिमांनी  करून घेतलेला आहे. आपल्या अपयशाला ते इस्लामचे अपयश समजत आहेत. वास्तविक पाहता इस्लामची शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, कायदा व्यवस्था, सामाजिक व्यवस्था हीच मानवाच्या हिताची व्यवस्था आहे. यावर त्यांचा विश्वास असावयास हवा होता आणि त्या विश्वासातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून त्यांनी जगाला दाखवून द्यायला पाहिजे होते की, मानवतेच्या कल्याणाचा अंतिम मार्ग हा इस्लामी सिद्धान्तातूनच जातो. भांडवलशाही सिद्धान्तातून नव्हे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर पराजय मुस्लिमांचा होत आहे. परंतु जागतिक माध्यमांनी हा पराजय इस्लामचा आहे, असा देखावा तयार केला आहे. यामुळे ज्यांचा इस्लामी सिद्धान्तांवर विश्वास आहे, त्यांचासुद्धा आत्मविश्वासही कमी होत आहे. यावर एकच उपाय आहे, इज्तेहाद. म्हणजे कुरआन आणि हदीसच्या चौकटीत सध्याच्या जागतिक परिस्थितीचे विश्लेषण करून त्यावर उपाय शोधणे. इस्लामने कधीच आधुनिक शिक्षेचा विरोध केलेला नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करण्यास कधीही आडकाठी केलेली नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्ञान हस्तगत करण्यासाठी गरज पडल्यास चीनपर्यंत जा, असा आदेश देऊन ठेवलेला आहे. स्पष्ट आहे त्या काळात चीनमध्ये इस्लामचे ज्ञान नव्हतेच. म्हणून या ठिकाणी विज्ञान आणि इतर ज्ञान अभिप्रेत आहे. प्रेषितांची दूरदृष्टीचा साक्षात्कार आज आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. तो असा की, चीन आज तंत्रज्ञानामध्ये जगामध्ये सगळ्यात पुढे आहे असे म्हटलें तरी वावगे ठरणार नाही. मुळात इस्लामच्या कोंदनात आधुनिक तंत्रज्ञानाचा हिरा बसविला तर मुस्लिम निर्विवादपणे जगात सर्वसक्षम लोकसमुह म्हणून पुढे येईल. यात माझ्यातरी मनात शंका नाही. हीच गोष्ट सर सय्यद अहमद यांनी वेळीच ओळखलेली होती. म्हणूनच त्यांनी अलिगढमध्ये आधुनिक शिक्षण संस्था सुरू केली होती. जी पुढे अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून नावारूपाला आली. त्यांची इच्छा होती की मुस्लिम युवकांच्या एका हातात कुरआन तर दुसऱ्या हातात विज्ञानाचे पुस्तक असावे.

ख्रिश्चन समाज जरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज जगात क्रमांक एक वर असेल. तरी मात्र त्यांच्या जीवनातून नीतीमूल्यांचा ऱ्हास झालेला आहे. तो समाज मानवतेला उपकारक होणे तर दूरच पृथ्वीला नष्ट करण्याइतपत धोकादायक झालेला आहे. एका मागून एक देश उद्ध्वस्त करत निघालेला आहे. खनिज तेलासाठी त्याने मध्यपूर्वेच्या अनेक देशांना आपल्या पाशवी पंजामध्ये जखडून ठेवलेले आहे. नैतिकतेने रिता समाज मानवतेसाठी धोकादायक असतो. पाश्चिमात्य देशांचे आजकाल तसेच झालेले आहे. सीरिया, म्यानमार, पॅलेस्टीनमध्ये जे काही सुरू आहे, त्याचे कोणत्याही दृष्टिकोनातून समर्थन करता येणार नाही. लाखो निरपराध नागरिक मारले गेलेले आहेत. लाखो विस्थापित झालेले आहेत. तरी परंतु, संयुक्त राष्ट्र गप्प आहे, मीडिया शांत आहे. मुस्लिमांना कमाल (उत्कृष्टता) करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. फक्त शुद्ध इस्लामी आचरणाने ते कमाल करून दाखवू शकतात. इस्लामी आचरण आणि आधुनिक शिक्षण यांच्या संयोगातून निर्माण झालेला आधुनिक मुस्लिम समाज हाच जगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यास सक्षम समाज असेल, यात शंका नाही. मुस्लिम देशांकडे पैशाची कमी नाही. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. भारतातही मुस्लिमांकडे पैशाची कमी नाही. देशभरात साजरी होणाऱ्या ईदुल अजहाच्या पहिल्या दिवसाच्या कुरबानीचे कातडे जरी विकले तरी दरवर्षी देशात एक नवीन खाजगी विद्यापीठ सुरू करता येईल एवढा सक्षम हा समाज आहे. जकात व्यवस्थेचे पुनर्गठन, औकाफच्या संपत्तीचे व्यवस्थापन इस्लामी तत्त्वानुसार केले गेले तरी कुठलेही साहाय्य न घेता, भारतीय मुस्लिम समाज एक आधुनिक मुस्लिम समाज म्हणून नावारूपाला येऊ शकतो. मुस्लिम जगतात सध्या जे नेतृत्व अस्तित्वात आहे, ते अपयशी ठरलेले आहे. दीन आणि दुनियाची व्यापक समज असणारे नेतृत्व मोठ्या प्रमाणात उदयास येण्याची आवश्यकता आहे. शेवटी सर्वशक्तिमान अल्लाहकडे दुआ करतो की, जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर या सर्व आव्हानांना सामोरे जाईल असे नेतृत्व उदयास येवो आणि आपल्या सर्वांनाही या सर्व परिस्थितीचे आकलन होवो व त्यावर उपाय करण्याची सद्बुद्धी व हिेंमत मिळो.(आमीन).

- एम.आय.शेख

9764000737



- सय्यद अबुल आला मौदुदी

या लहानशा पुस्तिकेत इस्लाम मानवतेचा मूळ धर्म आहे आणि जगातील इतर सर्व धर्म त्याचे विकृत रूप आहेत, असे लेखकाने स्पष्ट केले आहे. इतर धर्मात जे सत्य आज आढळते, ते इस्लामचाच प्रभावामुळे आहे. जेवढे सत्य जास्त तेवढा जास्त इस्लाम त्यात अस्तित्वात आहे. इस्लाम सदासर्वदा व सर्वांसाठी आला होता.

सत्य एखाद्या देशाची, वंशाची व समाजाची पारिवारिक मालमत्ता नव्हे तर सकल मानवतेचा संयुक्त वारसा आहे, हे सांगताना लेखक महोदय वाचकाला कळकळीची विनंती करतात की खोट्या सहिष्णुता व औदार्याचे निदर्शन करण्याऐवजी सत्याच्या देणगीचा स्वीकार करावा.

आयएमपीटी अ.क्र. 233   -पृष्ठे - 16    मूल्य - 10 आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ms2wshgaa7cjkvs85mmyyvvt1y8jpcxb



statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget