ही खरी घटना मी तुम्हाला का सांगते? आपल्या समाजामध्ये सुद्धा मुलींचे हाल डॉलीपेक्षा वेगळे नाहीत. निर्भया, आसिफा, डॉ. प्रियंका रेड्डी, जैनब ही काही नावे आपल्याला माहित असली तरी खरी संख्या ईश्वरालाच माहित. मला राग येत होता कुत्र्यांचा. पण या घटना पाहता माणूस म्हणविणारे हे लोक कुत्र्यापेक्षाही वाईट आहेत याची मला खात्री पटली. कुत्रे निदान सामुहिक बलात्कार करून, रॉड घालून, जाळून तर टाकत नाहीत ना.
आपण वराहांना किती घाण समजतो. त्यांना घरात शिरू देत नाहीत. कारण ते घाण खातात. पण वराहांचाच एक मानवरूपी प्रकार उदयास आलेला आहे. या मानवरूपी वराहांंना पाहून खरे खुरे वराहही लाजतील. जरी हे वराह वराहासारखे दिसत नसले तरी घाण खाणारे म्हणजेच हुंडा खाणारे हे वराहच आहेत. या वराहांना मात्र आपण घरात शिरू देतो. त्यांचा पाहूणचारही करतो. समाजात वावरणाऱ्या यांच्या पिलावळीकडे आता आपल्याला लक्ष दिले पाहिजे. खरे खुरे वराह तर चांगले काम करतात. रस्त्याच्या कडेला माणसाने केलेली घाण खाउन परिसराला स्वच्छ करतात. पण हुंडा खाणारे हे मानवरूपी वराह मुलीकडच्यांची चांगली मेजवाणी खावून समाजात घाण पसरवितात. हुंड्याचा इस्लाम धिक्कार करतो. म्हणजेच इस्लाममध्ये दारू, व्याज, अनैतिक गोष्टी जश्या अवैध (हराम) आहेत तसाच हुंडाही अवैध आहे. सावधान ! अशा वराहांना ओळखा आणि त्यांना आपल्या घरात शिरूच देवू नका.
मी बीएएमएस डॉक्टर आहे. माझ्या लग्नासाठी म्हणून खूप बायोडाटा, फोटोज यायचे. एमबीबीएस, एम.डी. डॉक्टरची स्थळ पण चालून आली. पण माझे वडील अत्यंत पारखी होते. ते आधीच मध्यस्थांना विचारायचे की वरपक्षाची काही मागणी वगैरे आहे का? लोक सांगायचे 20 लाख द्या. 2006 ची घटना आहे एका एम.डी. डॉक्टरचे स्थळ चालून आले. त्यांची मागणी 20 लाख नगदी आणि सेटल करून द्या, अशी होती. माझे वडील असल्या स्थळांना परस्पर नकार देवून बाहेरच्या बाहेर बोळवण करीत असत. एकालाही त्यांना घरात येउ दिले नाही. त्यांना एक श्रद्धावान जावाई हवा होता आणि मलाही तसाच जोडीदार हवा होता.
मला हिफ्ज करण्याची खूप इच्छा होती. पण आम्ही राहत असलेल्या ठिकाणी जवळपास तशी सोय नव्हती. म्हणून माझी ती इच्छा अपूर्ण राहिली. बाबांच्या म्हणण्यावरून मी डॉक्टर झाले. एमबीबीएसलाही निवड झाली होती पण खूप लांब चंद्रपूरला. सुरक्षा कारणावरून बाबांनी पाठविण्यास नकार दिला. मी बाबांना सांगितले की, माझ्यासाठी हाफिजे कुरआनचे स्थळ बघा. माझी स्वप्नपूर्ती होईल. पण माझ्या मावशीने मला समजावून सांगितले. डॉक्टर अब्दुल खय्युम यांचे स्थळ आल्यावर सर्वांचेच त्यांच्याबद्दल एकमत झाले. मीही होकार दिला. आज मी ईश्वराचे आभार मानते की मला चांगले पती व सासर लाभलं.
इस्लामचा एक कडक नियम आहे की, वयात येताच मुला-मुलींचे योग्य स्थळ पाहून लग्न करून टाकावे. विनाकारण विलंब करू नये. वेळेवर लग्न न झाल्याने अनेक तरूण पिसाळलेले आहेत. म्हणूनच एकानंतर एक बलात्काराच्या घटना देशामध्ये घडत आहेत. कितीही बोला, कितीही लिहा, कितीही मोर्चे काढा, कँडल मार्च काढून पहा, न्यायाची भीक मागून पहा, ह्या घटना काही कमी होत नाहीत. उलट वाढतच चालल्यात, असे का? ’’हा कभी न खत्म होणारा सिलसिला तर नाही ना?’’ असं काही नाही. हे संपवायचं आपल्याच हाती आहे. यावर एकच उपाय आहे. तो म्हणजे इस्लामी शिकवणीचा अंगीकार करणे होय.
1. इस्लाम महिलेला घरात राहण्यास सांगतो. तिच्यावर कमावण्याची जबाबदारी टाकत नाही. पुरूषांना आदेश देतो की, परस्त्रीकडे रोखून पाहू नका.
2. महिलेला घराबाहेर पडायचं असेल तर तिला एक अंगरक्षक (महेरम) अर्थात बाप, भाऊ, पती किंवा पुत्र यांच्यापैकी कोणा एकाला सोबत घेऊन जाण्याचा निर्देश देतो. सुबहानल्लाह! किती ही महिलांची सुरक्षेची काळजी! आता या सुरक्षेच्या उपायांमध्ये कोणाला गुलामगिरीचा वास येत असेल तर त्याच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमीच. खोलात जावून विचार केला तर बलात्काराच्या बहुतेक घटनांमध्ये मुलींना एकटीच बघून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे दिसून येते.
3. ईश्वराची भीती नसणे हे सुद्धा महिलांवरील अत्याचाराचे प्रमुख कारण आहे. ज्या व्यक्तीला ईश्वराची भीती वाटत नाही तो कोणालाच भीत नाही. तो गुन्हे करत जातो आणि माणुसकीचा निच्चांक गाठतो.
वाढत्या आत्महत्येमागची कारणं
अहमदाबादच्या आयेशाची दुःखद आत्महत्या सर्वाना रडवून गेली. वाईट परिस्थितीत समाधान काढायचे शिकविण्याऐवजी आजकालची चित्रपट आत्महत्येला प्रोत्साहित करतात आणि दुसरं म्हणजे असहनशिलता. आपण आपल्या पाल्यांना विपरित परिस्थितीतही जगण्याची कला शिकविली पाहिजे. आयेशाने हसत-हसत मोठी चूक केली हे मान्य. पण हे तिलाही माहित होते की, हे चूक आहे म्हणून. म्हणून तर ती शेवटी म्हणते की, ’’ माहित नाही मला जन्नत मिळेल की नाही’’ याचाच अर्थ तिला या गोष्टीची चांगली कल्पना होती. मुळात आत्महत्येचा विचारही मनात येणार नाही इतकी सकारात्मक ऊर्जा इस्लामी इबादतीमधून मुस्लिमांना मिळते. म्हणून आपण इस्लामी शिकवण आणि इबादतींवर आपले लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे.
आपण आपल्या पाल्यांच्या चांगल्या शिक्षणाची काळजी करतो. चांगली पदवी आणि चांगल्या भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो. मुलंही मेहनत करतात. कष्टाने कमाविलेले लाखो रूपये शिक्षणावर खर्च केले जातात. मात्र हेच करत असतांना नैतिक शिक्षणाकडे मात्र पूर्णपणे डोळेझाक केली जाते. आयेशा उच्चशिक्षित होती. पीएचडीची तयारी करत होती. यावरूनच तिचे शिक्षण एककल्ली झाले होते. याचा अंदाज येतो. आईने समजाविले, वडिलांनी समजाविले, अल्लाहच्या शपथा दिल्या. पण तिने कोणाचेच ऐकले नाही. यावरून तिचे इस्लामिक नैतिक शिक्षण हे कच्चे होते, हे स्पष्ट होते. तिच्या डोक्यात सैतान घुसला होता. सैतान हा संपूर्ण मानवजातीचा शत्रू आहे. सैतानच आत्महत्या करण्याला प्रवृत्त करत असतो. ज्यांचे धार्मिक शिक्षण पूर्ण झालेले असते, असे आलीम आणि आलेमा ह्या कधीच आत्महत्या करत नाहीत. निदान मी तरी ऐकलेले किंवा वाचलेले नाही. हे जीवन फुलांची सेज नसून काटेरी मार्ग आहे. एक कसोटी आहे. प्रत्येकाच्या नशीबी काही ना काही दुःख आहे. म्हणून वाईट प्रवृत्तींना समोर जायचे आणि काटेरी रस्त्यातून मार्ग काढायचा. निश्चितच दुःखानंतर सुख मिळतच असते आणि एखाद्याच्या वाट्याला जरी जास्त दुःख आले तरी धैर्याने नैतिकता सांभाळत मार्गक्रमण केल्यास मोबदल्यात स्वर्ग तर नक्कीच मिळणार.
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी महिला एकत्र येवून विविध प्रकारे महिलांच्या समस्येवर बोलतात. उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या मते महिला दिवस पुरूषांनी साजरा करायला हवा. पुरूषांनी महिलांच्या अधिकारावर फक्त बोलून चालणार नाही तर ते प्रत्यक्षात त्यांना देण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा घडवून आणावी. मी वाट पाहते त्या खऱ्या महिला दिनाची.
इस्लाममध्ये महिलांना दिलेले अधिकार जर त्यांना खरोखर मिळाले तर महिला दिवस साजरा करण्याची गरजच राहणार नाही. कोण्या आयेशाला आत्महत्या करण्याची गरज वाटणार नाही. निर्भया, आसीफा, जैनब, डॉ. प्रियंका रेड्डीच नव्हे तर इतर सर्व महिला सुरक्षित राहतील.
आपणास माहित आहे का की, असे सोनेरी दिवस येणे फक्त स्वप्न नाही तर प्रत्यक्षात अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या प्रिय सहाबा रजि. यांच्या काळात असे सोनेरी दिवस महिलांना उपभोगण्यास मिळालेले होते. त्यांच्या काळात एकटी स्त्री अंगभर सोन्याचे दागिने घालून कोठेही जाउ शकत होती. आणि तिला रानटी जनावरांशिवाय कोणाचीची भीती वाटत नव्हती.
महिला दिनानिमित्त मी सर्व पुरूषांना आवाहन करते की, त्यांनी महिलांशी भांडू नये, त्यांचा आदर करावा. त्यांना त्यांचे अधिकार द्यावेत. महिलांनाही आवाहन आहे की विनाकारण पुरूषांशी भांडू नये. त्यांचे हक्क त्यांना द्यावेत. मुलांनी आई-वडिलांशी तसेच आपसात भांडू नये. आपण सगळे मिळून सैतानाशी भांडू या, तरच आपल्याला चांगले दिवस येतील. चांगले आचार विचार रूजविले तर हुंडाबळी, बलात्कार आणि आत्महत्यासारख्या घटना होणार नाहीत आणि आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल. इन-शा-अल्लाह.
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
भांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे. ज्यामुळे आज मानवतेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपले वायुमंडळ विषारी झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी कमी होत आहे. खाद्यान्न प्रदुषित होऊन लोकस्वास्थ्य बिघडले आहे. लोकांना रोज रोज नवीन रोगांना तोंड द्यावे लागत आहे. हवा दूषित होत आहे.
भांडवलशाहीचे तत्कालीन गंभीर परिणाम गरीबांना भोगावे लागत आहे. विनाशाची ही लक्षणं दिसत असतानासुद्धा भांडवलशाहीचे समर्थक मानवतेच्या विनाशाकडे दुर्लक्ष करुन आहेत याविषयीची चर्चा या पुस्तिकेत करण्यात आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 247 -पृष्ठे - 40 मूल्य - 20 आवृत्ती - 1 (2014)
हे विश्व आणि समस्त मानवांचा निर्माणकर्ता अल्लाह आहे. तोच सर्वांचा पालनकर्ता, रक्षक आणि भाग्यविधाता आहे. आपल्याकडे असलेली प्रत्येक प्रकारची शक्ती, सामर्थ्य आणि पात्रता हे सर्वकाही त्यानेच प्रदान केलेले आहे. त्यानेच आपल्याला अस्तित्व प्रदान केलेले आहे. त्यानेच आपल्याला विचारशक्ती आणि भावना प्रदान केल्या, आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त गरजांची पूर्तता केली. आपल्याला राहण्यासाठी पृथ्वी, श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी, अन्न जे आम्ही खातो, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आणि प्रकाश ज्याच्याशी जमिनीचे व मानवाच्या सर्व कर्मांचा संबंध आहे. मिळणाऱ्या त्या असंख्य सवलती, शक्ती, सामर्थ्य, विचारबुद्धी त्यानेच प्रदान केली. याच संशोधन आणि विचारशक्तीच्या जोरावर मानवाने वैज्ञानिक प्रगतीचा कळस गाठला आहे, चंद्रावर आणि ग्रहतारे तसेच अणुशक्ती व ऊर्जास्त्रोतांवर विकासाचा झेंडा रोवला आहे. समस्त भौतिक सुखसाधने अल्लाहनेच मानवास प्रदान केलेली आहेत. आपली पत्नी, मुले, आई-वडील, सासु-सासरे, नातलग, मित्रमंडळी, घरदार, व्यापार, उद्योग, संपत्ती वगैरे अल्लाहनेच प्रदान केलेले आहे. आपण अल्लाह कृपेवरच जगतो आहोत. त्याच्या अनुग्रहांची गणना करणेदेखील आपल्यासाठी अशक्य आहे. स्वत: अल्लाहने ही वस्तुस्थिती कुरआनात अशा शब्दांत मांडली आहे,
``जर तुम्ही अल्लाहच्या देणगीची गणना करू पहाल तर करू शकणार नाही.'' (दिव्य कुरआन , १४:३४)
अल्लाहच्या या महान आणि अमर्याद उपकारांची फेड आम्ही मुळीच करु शकत नाही आणि याकरिता त्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. म्हणूनच आपण तन-मन-धनासह त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे. आपले मन त्याच्याप्रति प्रेमाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने ओसंडून वाहवे, त्याच्या असीम उपकाराच्या जाणिवेने आपले मनमस्तिष्क त्याच्यासमोर वंदन करीत असावे. त्याचे नेहमी स्मरण करणारे आपले मुख आणि त्याचे महिमत्व व कृतज्ञतेने आपले जीवन त्याचे आज्ञापालक असावे आणि आपण त्याचे आज्ञाधारक व त्याच्या मर्जीवर प्राण देणारे सच्चे उपासक आणि आजीवन दास व्हावे.
`सूरह-ए-फातिहा' ही कुरआनची प्रारंभीची सूरह असून संपूर्ण कुरआनच्या शिकवणीचा सार आणि आत्मा समजले जाते. म्हणूनच ही सूरह नमाजच्या प्रत्येक रकअतमध्ये पठण करणे अनिवार्य ठरविले आहे. `सूरह-ए-फातिहा'ची पहिली आयत `अल हम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन' (अर्थात : स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे, जो समस्त सृष्टींचा रब (पालनकर्ता) आहे.) अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) हेदेखील आपल्या प्रत्येक भाषणाची व प्रवचनाची सुरुवात याच आयतीने करीत असत, म्हणजेच सर्वप्रथम अल्लाहाचे स्तवन करीत असत. हा या गोष्टीचा पुरावा आहे की, इस्लामचा सर्वांत मौलिक आणि भक्कम आधार अल्लाहची मनोभावाने कृतज्ञता व्यक्त करणे आणि आभार मानणे हेच होय. इस्लामी समुदायावर जगाचे नेतृत्व करण्याची आणि सत्याची साक्ष देण्याची जबाबदारी आल्यावर सर्वप्रथम ही मूलभूत शिकवण अशा शब्दांत अल्लाहने दिली,
``तुम्ही माझे स्मरण ठेवा, मी तुमची आठवण ठेवीन आणि माझ्याशी कृतज्ञ राहा, कृतघ्न होऊ नका.'' (दिव्य कुरआन , २:१५२)
साधारणत: माणूस हा सुख आणि भौतिक समाधानात तसेच चंगळवादात असल्यावर त्यास अल्लाहचा विसर पडतो. अहंकार आणि गर्वाच्या नशेत स्वत:च्या वास्तविकतेचा अर्थ हरवून बसतो. संपत्ती, सत्ता आणि सामथ्र्याच्या नशेत दीन-पददलितांवर अन्याय व अत्याचार करतो. इच्छा, आकांक्षा आणि स्वैर अभिलाषांच्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी निष्पाप मानवतेचा निर्घृण बळी देतो. तसेच लग्न समारंभ आणि आनंदाच्या प्रसंगी आपल्या प्रत्येक मित्र व नातलगास खूश करण्याचा आटापिटा करतो आणि अल्लाह व त्याच्या पैगंबर (स.) यांना हेतुपुरस्सर नाराज करतो. पैसा व्यर्थ खर्च करू नये, आपल्याकडे अल्लाहचाच ठेवा असलेल्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करू नये आणि अल्लाहच्या आज्ञेचा भंग करता कामा नये. संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी होणारी पैशांची उधळपट्टी करणे हे मुळात इस्लामी नियमाविरुद्ध आहे.
लग्न-समारंभाच्या प्रसंगी तर सैतान माणसाला तांडव करावयास लावतो आणि आपणही कोणताही सारासार विचार न करता पैशांची उधळपट्टी करीत असतो, हे मात्र इस्लामविरोधी कर्म होय, अपराध आणि गुन्हा होय. यामुळे आपण आपले जीवन आणि पारलौकिक जीवन आपल्याच हाताने उद्ध्वस्त करीत असतो.
असे का होत असते? कारण आपणास याप्रसंगी या गोष्टीचा पूर्णत: विसर पडलेला असतो की आपल्याला प्राप्त होणारा आनंद, सुख आणि यासारखा प्रत्येक अनुग्रह व यश हे केवळ अल्लाहकडूनच मिळत असते. आणि कधीही तो परत घेऊही शकतो. संतती आणि त्याचे सुखदेखील अल्लाहने दिल्यामुळेच आपल्याला मिळालेले असते आणि तो कधीही हे सुख आपल्याकडून हिरावून घेऊ शकतो. शिवाय एकवेळ तर अशी येईलच की समस्त सुख-समाधान एक-एक करून आपल्याकडून हिरावून घेण्यात येईल, म्हणूनच आपण ही सर्व सुखे पाहून आनंदाच्या भरात स्वत:ची वास्तविकता विसरून जाता कामा नये, विवेकशक्ती हरवून बसता कामा नये. आनंद आणि सुख प्रदान करणाऱ्या आपल्या असीम दयाळू आणि कृपाळू अल्लाहसमोर तन-मन-धनाने शरण जावे, त्याची कृतज्ञता व्यक्त करावी, त्याचे स्तवन करावे, त्याचे आभार मानावे; अर्थातच त्याच्या आदेशाची पायमल्ली न करता त्याने दिलेल्या सुख-समाधान आणि संपत्तीचा त्याच्याच मर्जीनुसार वापर करावा. जर आम्ही असे केले तर अल्लाहवर उपकार करीत नाही तर आपलेच भले करील. या वर्तमान जीवनातही आपले भले होईल आणि महत्त्वाचे म्हणजे परोक्षात त्याच्या असीम कृपाफळांचा भोग घेता येईल. नाहीतर आपल्याला या जीवनात आणि परोक्षातही अल्लाहच्या प्रकोपाच्या असह्य यातना सहन करण्याची नामुष्की पत्करावी लागेल, हे विसरता कामा नये. कुरआनात हीच बाब अशा शब्दांत अधोरेखित करण्यात आली आहे,
`` आणि स्मरण ठेवा, तुमच्या पालनकर्त्याने सावध केले होते की जर कृतज्ञ बनाल तर मी तुम्हाला आणखी जास्त उपकृत करीन आणि जर कृतघ्नता दर्शवाल तर माझी शिक्षा फारच कठोर आहे.'' (दिव्य कुरआन , १४:७)
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मला दुसऱ्या कुणाची नक्कल करणे अजिबात आवडत नाही जरी त्यामुळे मला असे आणि असे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण
मला हे कदापि मान्य नाही की एखाद्या कोणाची नक्कल मी करावी. मग ती नक्कल मौलिक स्वरूपाची असो की शारीरिक स्वरूपाची असो. याचे कितीही भौतिक व आर्थिक फायदे जरी होत असतील तरी हे कृत्य मला कदापिही मान्य नाही.
सायनशास्त्राचा ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहित आहे की, कोणत्याही दोन वस्तूंना जवळ आणणारे रसायन हे एक बाँड असते. ते जेवढे ताकदवान असेल तेवढा घट्टपणा आणि मजबूती त्यांच्यात निर्माण होते. किंबहुना बाँड कमजोर झाल्यामुळे वरील प्रोजेक्टमधील नमूद वस्तू चिटकत नाहीत. माणसाच्या नात्यांचेही असेच आहे. ते ही स्ट्राँग बाँडशिवाय टिकून राहत नाहीत. आपले कुटुंब मजबूत बनवायचे असेल तर कुटुंबांच्या सदस्यांत आपसात मजबूत बाँडिंग पाहिजेच.
मजबूत बाँडिंगसाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. 1. एकमेकांचा आदर. 2. एकमेकांची काळजी.
कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांनी एकमेकांचा आदर केला आणि एकमेकांच्या बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंब मजबूत होईल. उदा. आई-वडिल एकमेकांची काळजी घेत असतील आणि एकमेकांना आदर देत असतील तर त्यांच्या मुलातही आपसुकच तो गुण येतो. घरातील वयस्कर व्यक्तींना ओझं न समजता त्यांना मान-सन्मान दिला गेला पाहिजे. वय झाल्यानंतर माणसाला पैशा पेक्षाही नाती जास्त गरजेची असतात. रसायन शास्त्रामध्ये आपल्याला आठवत असेल एक कॅटलिस्ट असते. जी की कमजोर क्रिएशन्सला गती प्रदान करते. तसेच जेथे नात्यामधील मजबुती कमजोर होत आहे असे वाटेल तेथे एक महिलाच कॅटलिस्टचे रूप धारण करू शकते. पुरूष ही कॅटलिस्ट होवू शकतो. थोडक्यात प्रत्येक घरात एक कॅटलिस्ट हवाच.
एक मुलगा आणि एक मुलगी विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले की, ’एका नव्या कुटुंबांची सुरूवात होते. वेल बिगिनिंग इज हाफ डन’ या म्हणीप्रमाणे ही सुरूवात चांगली झाली तर मजबूत कुटुंबाची पायाभरणी आपोआपच होते.
आपल्या घरात येणारी सून म्हणून ज्या मुलीची निवड आपण करतो तेव्हा फक्त तिच्या सौंदर्य किंवा तिची शैक्षणिक पात्रता, नोकरी, पगार, तिच्या वडिलांची सांपत्तिक स्थिती या आधारावर न करता तिची वागणूक, चारित्र्य आणि संस्कारही बघितले पाहिजे. हीच प्रक्रिया जावयाची निवड करताना अवलंबायला हवी. परंतु असा अनुभव आहे की, वधूची निवड करतांना जेवढे चोखंदळपणे पाहिले जाते, वराची निवड करताना पाहिले जात नाही. त्याच्या उत्पन्नाकडेच लक्ष दिले जाते. त्याच्या चारित्र्याकडे लक्ष न देवून त्याचा स्वीकार केल्यास त्याची हानी नवीन कुटुंबाच्या पायाभरणीपासूनच होवू लागते. चार चौघात जरी ’कमाईवाला जावाई’ आहे असे म्हणून मोठेपणा गाजवता येत असला तरी प्रत्यक्षात नवीन बंधनातून निर्माण झालेल्या कुटुंबाची हानीच होते.
अलिकडे विशेष शाखेतील विशेष शिक्षण आणि त्यानंतर कमाईपर्यंतची वाट पाहण्यामुळे मुला-मुलींचे लग्न लवकर होत नाहीत त्यामुळे अनैतिक संबंधामध्ये वाढ होत चाललेली आहे. 24 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षण अहवालामध्ये असे नमूद आहे की, पुण्यातील 75 ट्नक्याहून अधिक मुले आणि मुली वयाची 16 वर्षे पूर्ण होण्याआधीच अनैतिक संबंधांमध्ये गुरफटलेली आहेत. ’प्रयास’ या संस्थेने केलेले हे सर्व्हेक्षण आहे. या सर्व्हेक्षणामध्ये ’रिलेशनशिप’ असे जरी आकर्षक नाव दिले असले तरी हे नाते तिरस्करनीय असे अनैतिक नातेच आहे. जी स्थिती पुण्याची तीच स्थिती कमी अधिक प्रमाणात इतर शहरांची असेल यात शंका नाही. 35 आणि 40 वर्षे वयापर्यंत जर तरूण-तरूणी लग्नाला नकार देत असतील तर हा प्रकार अधिकच वाढत जाणार यातही शंका नाही, हे ओघानेच आले. कायदेशीररित्या वयात आल्यानंतर मुला-मुलींचे लग्न लावले गेले तर त्यांच्याकडे तेव्हा भौतिक वस्तू कमी जरी असल्या तरी मानसिक चैतन्य न्नकीच निर्माण होईल आणि ते जोडपे यशस्वी होईल. कारण त्या वयात त्यांना जे हवे ते कायदेशीररित्या मिळाले तर बाकीच्या भौतिक गोष्टी मिळविण्याची जिद्द त्यांच्यात नैसर्गिकरित्या निर्माण होते.
अलिकडे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले असून, भारतीय समाजमनासाठी ही नवीन बाब आहे. पूर्वी लेकीला सासरी पाठविताना ताकीद करण्यात येत असे की, ‘उभी चालली आहेस आडवी बाहेर नीघ’ ही जरी टोकाची भूमिका असली तरीही सासरी नांदण्यामध्ये मुलीला मदत व्हायची. छोट्या-मोठ्या गोष्टी सहन करण्याची तिच्यात शक्ती उत्पन्न व्हायची. आज मुलीला अडचणीमध्ये नांदण्याचा सल्ला देण्याऐवजी घटस्फोट घेवून मोकळी हो, असा सल्ला देणाऱ्या माहेरच्या मंडळींची संख्या वाढलेली आहे. उच्चशिक्षित लोकांमध्ये असे प्रकार वाढतांना दिसत आहेत. ज्यांचा परिणाम घटस्फोटांची संख्या वाढण्यात होत आहे. मानलं तर आई नाहीतर सासुबाई. मानलं तर वडील नाहीतर सासरे बुवा, मानलं तर बहीण नाही तर नणंद, मानलं तर भाऊ नाहीतर दीर. आईच्या घरातील सुरक्षित वातावरणातून सासरी जाताना नवीन लोक, नवीन नाती, यामध्ये कोणीच सहजासहजी रमत जात नाही. थोडाफार त्रास तर प्रत्येक स्त्रीला होतच असतो. परंतु मनातून आईच्या ठिकाणी सासूला, बहिणीच्या ठिकाणी नणंदेला, भाावच्या ठिकाणी दीराला आणि वडिलाच्या ठिकाणी सासऱ्याला मानल्यास सासरी स्थिर होण्यास मुलीला मदत मिळते. मनाची ही उदारता ही फक्त महिलाच दाखवू शकते. पुरूष सर्वसाधारणपणे असे करू शकत नाहीत. ते सासूला नेहमी सासूच मानतात. ‘तुझी आई’ म्हणूनच संबोधतात. सासूही साधारणपणे सुनेला लेकीसारखी वागवत नाही. सासऱ्याला तर आपली माया दाखवायला वेळच नसतो. नणंदबाई आपल्या वहिणीकडे सोयीपुरतेच पाहतात. दिराला मित्रांशी मेजवाणी करायची असेल तर वहिणीची आठवण येते. थोडक्यात सून ही एक बिनपगारी फुलटाईम 365 दिवस काम करणारी मोलकरीन असल्यासारखी असते. जर ती नोकरी करणारी असेल तर तिची भूमिका दुहेरी मोलकरणीसारखी होवून जाते.
आम्ही महिला कुठल्याही अडचणींना जुमानत नाही. आम्ही खूप सक्षम आहोत. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. फक्त आमच्याकडे मानव म्हणून पाहिले पाहिजे. प्रेम, आदर, आपुलकी देऊन आमची काळजी घेतली पाहिजे.
इस्लाममध्ये गृहिणीला राणीचे स्थान दिलेले आहे. कमावण्याच्या जबाबदारीतून मुक्त करून संपूर्ण लक्ष घरावर केंद्रीत करण्यास सांगितले आहे. प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. स्त्री घराला स्वर्ग किंवा नर्क बनवू शकते. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की, स्त्री घराला स्वर्गासमान किंवा नर्कासमान बनवू शकते. हा केवढा मोठा दर्जा आहे हे चाणाक्ष्य लोकांच्या लक्षात येईलच. घराला स्वर्ग बनविण्याच्या काही यु्नत्या सांगणे या ठिकाणी चुकीचे होणार नाही.
1. सून सासुला आई, दिराला भाऊ आणि नणंदेला बहिण माणून त्यांच्याकडून तशाच आदराची अपेक्षा करते. जेव्हा ते अशा अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत तेव्हा सुनेला त्रास होतो. म्हणून माझे तर असे मत आहे की, सासूला सासूच माना, दीराला दीरच माना, नणंदेला नणंदच माना, सासऱ्याला सासराच माना पण त्यांची काळजी घ्या. बदल्यात त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका.
2. सासरवाडीच्याच नव्हे तर सर्वच लोकांशी एकतर्फी प्रेम करायला शिका. बदल्यात त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. लोक आपल्याशी नीट वागत नसले तरी ते त्यांच्या वागण्याने स्वकर्माच्या रजिस्टरमध्ये स्वतःविरूद्धच नोंद घेण्यासाठी ईशदुतांना भाग पाडत आहेत. याचेच समाधान ठेवा. ईश्वर तुम्हाला तुमच्याच कर्माचा जाब विचारणार आहे, लोकांच्या नाही. तू लोकांशी कशी वागलीस याचीच विचारपूस केली जाईल. लोक तुझ्याशी कसे वागले याच्याशी तुझे काहीच देणेघेणे नाही. त्याची शिक्षा त्यांना तुमच्यातर्फे ईश्वर नक्कीच देईल, याची खात्री बाळगा.
3. आपले मन स्वच्छ ठेवा. आपण स्वतःच्या आणि घराच्या स्वच्छतेकडे जेवढे लक्ष देतो तेवढे मनाच्या स्वच्छतेकडे देत नाही, हे वास्तव आहे. त्याचा स्वीकार करा. मनात कोणत्याच वाईट गोष्टींना किंवा विचारांना थारा देऊ नका. आपले मन आणि लोकांच्या वाईट टोमण्यांमध्ये एक बॅरियर (अडथळा) असला पाहिजे जो की त्यांना आपल्या मनात प्रवेशच करू देणार नाही. जेव्हा आपण लोकांचे बोलणे मनाला लावून घेतो तेव्हा नाती टिकत नाहीत. म्हणून लोकांची वाईट बोलणी एका कानाने ऐकूण दुसऱ्या कानाने सोडून द्या.
(उर्वरित आतील पान 7 वर)
4. लोकांना क्षमा करणे हा फार महत्त्वाचा गुण आहे. तो जाणूनबुजून जोपासा. कारण कोणतेही नाते मजबूत करताना या गुणाचा तुम्हाला मोठा उपयोग होतो. नेहमी आपणच माफ करायचे का? कुठवर माफ करायचे? तर त्याचे उत्तर आहे, हो! आपणच माफ करायचे व मरेपर्यंत माफ करत राहायचे. असं करणं अनिवार्य आहे. ईश्वरही आपल्याला असंख्य वेळा माफ करतच असतो ना. ईश्वराला माफ करणारे लोक पसंत असतात. म्हणून आपला स्वभाव क्षमाशील होईल, याकडे लक्ष द्या.
5. तसे पाहता स्त्री सहनशीलच असते. परंतु काही महिला आक्रस्ताळेपणा करत असतात. सहनशीलतेमुळे कुटुंबात शांतता पसरते. आपल्या घरातीलच नव्हे तर शेजाऱ्यांशी व इतर धर्मियांशी सुद्धा वागताना सहनशिलतेने वागता आले पाहिजे. जसे आपले पुर्वज वागत होते. त्यांना ते सहज जमत होते मग आपल्याला का जमणार नाही? लक्षात ठेवा ! सहनशिलतेमुळेच देश प्रगती करू शकेल.
6. स्वतःच्या अंगी सकारात्मकता बाणवा आणि सकारात्मक महिलांशीच मैत्री करा.
6. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. एक महिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या भक्कम असेल तरच ती कुटुंबाचा आधार बनू शकते.
कोविडच्या नवीन स्ट्रेनला घाबरून जायची गरज नाही. आपल्याला त्याला सामोरे जायचे आहे. सुरक्षेचे सर्व उपाय आतापर्यंत स्पष्ट झाले आहेत. त्यांचा उपयोग करत संतुलित आहार घेत हलकासा व्यायाम केल्यास आपण कोविडला सहज परास्त करू शकतो, हे लक्षात असू द्या. मजबूत कुटुंब आणि मजबूत समाज बनविण्यासाठी सर्वांना माझे आवाहन आहे की, घरीच रहा आणि आपल्या सकारात्मक वागण्याने कुटुंब आणि समाजाला मजबूत बनवा. जमाअते इस्लामी हिंदच्या 19 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या मजबूत कुटुंब मजबूत समाज मोहिमेमध्ये सामील व्हा आणि समाजाला मजबूत बनवा.
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935