Latest Post

Ramzan

गत वर्षापासून अख्ख जग कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे जगण्याशी झूंजत आहे लहान, थोर, गरीब, श्रीमंत सर्व स्तरातील नागरिकांची फरफट सुरू आहे अशातच या महामारीमुळे भारतात 1 लाख 66 हजार लोक जग सोडून गेले आहेत तर जगात 28 लाख 7 हजार मृत्यू पावले आहेत. मात्र आपणा सर्वांना यंदाचा रमजान पाहण्याची संधी मिळाली आहे, आपल्या भाग्याची रेषा गडद असल्याचं सध्यातरी वाटत आहे कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागलं त्यामुळे यंदाच्या रमजानमधील रौनकही फिक्कटच राहणार. मात्र जबाबदारी वाढली आहे रमजानचा खरा हक्क अदा करण्याची

संयम, शांती, त्याग, एकात्मता, चारित्र्यसंपन्नता, ईशपरायणता, दानशुरता, प्रेमभाव,  शारीरिक संपन्नता आदी सद्गुणांनी भरपूर रमजान आम्हाला मेजवानी देणार आहे त्याचा लाभ घेणं श्रद्धावान ईमानधारकांसाठी अनिवार्य आहे रोजा इस्लामच्या पाच मुलभूत अनिवार्य कार्यापैकी एक. रोजा इमानधारकांसाठी अध्यात्मिक पर्वणीबरोबरच ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सखोल मार्गदर्शन करतो रमजानमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाल्यामुळे सर्वात मोठं गिफ्ट ईश्वराकडून आम्हाला कुरआन स्वरूपात रमजानमध्येच मिळालेले आहे  म्हणून रमजानचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुरआनमध्ये एकूणएक मानवहितासाठी आवश्यक सर्वच बाबींचा उलगडा करण्यात आला आहे यशस्वी जीवनाची गुरूकुल्ली कुरआनमध्ये सापडते यासाठी प्रत्येक व्यक्ती जो जीवनाचे खरे रहस्य, खरे महत्व व खरे साफल्यता जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे, ईश्वराशी संवाद साधायचा आहे अशी मनोमन इच्छा बाळगतो त्याने कुरआनचं समजून पठन करणं अनिवार्य आहे 

ईश्वराची कृपा पदरी पाडून घेण्यासाठी जगातील सर्व मानवांकरिता रमजानचा महिना अतिमहत्वाचा आहे रोजांचे महत्व अधोरेखित करताना कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘‘ हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.’’ 

‘‘ हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत. तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकाना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल (परंतु उपवास करणार नाहीत) त्यांनी दुर्बलांना मोबदला (फिदिया) म्हणून जेवू घालावे. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वत:साठीच भले आहे. परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.’’ 

‘‘ रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे.’’  (संदर्भ : कुरआन सुरे अलबकरा आयत नं 183 ते 185)

सदर आयातींमध्ये रोजाची अनिवार्यता आणि त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही सांगितल्या आहेत तसेच रमजान रोजेधारकांसाठी तर पर्वणी आहेच शिवाय जे गरीब, गरजवंत आहेत त्यांच्याकरिताही आनंदाचा महिना आहे या महिन्यात जकात, सदका, फित्राच्या माध्यमातून गरीब, गरजवंतांची सेवा करण्याचा मान ऐपतदार ईमानधारकांना मिळतो 

यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे आपसुकच लॉकडाऊनमुळे आपल्यावर बाहेर पडण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी, बाजारात फिरण्यासाठी, हॉटेल आदी ठिकाणी मिष्टांनाचा आस्वाद घेण्यावर बरीचशी बंधने आल्यामुळे रमजानच्या रौनकपासून काही प्रमाणात आम्हाला मुकावं लागणार आहे मात्र स्वत:मध्ये मानवकल्याणासाठी आवश्यक ते बदल करून घेण्याची संधी आहे रोजा फक्त उपवासाचं नावं नाही तर सर्व इंद्रियांचा विकास करण्याची संधी देतो त्यामुळे रमजान महिन्याचं स्वागत करतो आणि आपणां सर्वांना रमजानचा हक्क अदा करण्याची सद्बुद्धी मिळो, हीच अल्लाहकडे प्रार्थना करतो. आमीन.  

- बशीर शेख




धर्मपरायणता आणि ईशभयच्या शिकवणी-व्यतिरिक्त वर पठण करण्यात आलेल्या आयतीमध्ये मानवांचे आणि नातलगांचे हक्क पूर्ण करण्याची विशेष शिकवण देण्यात आली आहे. समस्त मानवांना अल्लाहने निर्माण केले आहे. सर्व मानव हे एकाच माता-पित्याची संतती असल्याने आपण समस्त मानव एकाच परिवाराचे सदस्य आहोत. आपसांत बंधु आणि नातलग आहोत. म्हणून प्रत्येकाचे एकमेकांवर हक्क आहेत. हे हक्क पूर्ण करणे नितांत आवश्यक आहे. जसी अल्लाहची दासत्व हदीसद्वारा माहीत होते अल्लाह कुफ्र व शिर्कशिवाय अल्लाहस वाटल्यास  इतर अपराधांची माफी देईल, मात्र मानवी हक्कांची पायमल्ली मुळीच खपवून घेणार नाही व माफ करणार नाही जोपर्यंत मनुष्य स्वत: माफ करत नाही.

विवाहप्रसंगी मानवाधिकार आणि नातलगांचे अधिकार पूर्ण करण्याची शिकवण अत्यंत महत्त्वपूर्ण असून नववधू आणि वराच्या नातलग व याप्रसंगी हजर असलेल्या लोकांसाठी अमूल्य भेट आहे. पतीने पत्नीचे हक्क पूर्ण केल्यास, मुलांनी मात्यापित्यांचे, मातापित्यांनी मुलांचे आणि नातलगांनी एकदुसऱ्यांचे आणि शेजाऱ्यांने शेजाऱ्याचे तसेच प्रत्येकाने दुसऱ्याचे हक्क जर पूर्ण केले तर या भूतलावर स्वर्गरूपी नंदनवन बहरेल.

या आयतीवरून हे स्पष्ट होते की सर्व मानव एकाच माता-पित्याची संतती असून सर्वजण एकाच परिवार आणि एकाच वंशाचे सदस्य आहेत. म्हणून वर्ण आणि वंश तसेच जाती-पातीच्या आधारे कोणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. त्या आधारावर वरिष्ठ-कनिष्ठ आणि उच्च-नीच भेदभाव इस्लामने नष्ट केला आहे.



माननीय आएशा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माझा आधार घेऊन बसले असताना सांगितले, ‘‘हे अल्लाह! मला क्षमा कर आणि माझ्यावर दया कर आणि माझ्या जगतसखा! मला तुझी भेट घडू दे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

आयुष्यभर ईशमार्गात सक्रिय राहूनसुद्धा अल्लाहपाशी क्षमादान आणि दयेची, कृपेची याचना करीत आहेत आणि कामना करीत आहेत की ‘जीवनसखा’ची भेट घडावी. हीच विनम्रता आणि भक्तीभाव आहे जो ईमान (श्रद्धाशीलते) चा वास्तविक आत्मा, हृदय तथा प्राणसौंदर्य आहे.



- सय्यद सुजाअत हुसैनी

भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. पूर्ण वातावरणच भक्ष्यस्थानी येते. चंगळवादी जीवनशैलीचा परिणाम म्हणून उपभोक्तावाद फोफावतो व सामाजिक समस्या विक्राळ रुप धारण करतात.

ही पुस्तिका वाचकांना भांडवलशाही व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. तसेच यावरील इस्लामीक उपाय कुरआन प्रकाशात कोणते आहेत, याचे विवेचन करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 252     -पृष्ठे - 48 मूल्य - 22  आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/50ia0bgr9huh60hjr2lputz6jsfkevph






हजरत उमर (र.) यांनी सर्वप्रथम प्रतिनिधी सभा आणि मार्गदर्शक मंडळाची संकल्पना प्रस्थापित केली. त्यांनी अनेकदा हे स्पष्ट केले होते की सल्लामसलतीविना खिलाफत अवैध आहे. विशेष प्रसंगी मजलिसे शूरा (मार्गदर्शक मंडळ) भरविल्या जात होत्या. या व्यतिरिक्त दैनंदिन कामकाजासाठी मस्जिदे नबवीमध्ये सभांचे आयोजन होत होते. विविध प्रांत आणि जिल्ह्यांचे जे अहवाल प्राप्त होत असत ह. उमर या सभेत सर्वांना त्याची माहिती देत असत. एखाद्या समस्येविषयी ह. उमर या सभेतील सभासदांशी विचारविनिमय करून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आणि त्यानुसार त्यांचे निवारण केले जात असे.

मजलिसे शुराच्या सभासदांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांनाही शासकीय कामकाजाच्या नियोजनात सहभागी करून घेतले जात असे. जिल्ह्यावर प्रभारींची नियुक्ती जनतेच्या सहभागानने केली जाई. काही प्रसंगी तर निवडणुकीच्या प्रक्रियेतून जिल्ह्यांचे प्रभारी निवडला जात असे. कुफा, बसरा आणि शाम (सीरिया) या जिल्ह्यांतील नागरिकांना असा आदेश दिला होता की त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील अशा व्यक्तींची निवड करावी जो सदाचारी, प्रामाणिक आणि सक्षम असावेत.

लोकतांत्रिक शास्त्र पद्धतीचे सौंदर्य असे की राज्यकर्ता – सत्ताधारी आणि सामान्य नागरिकांना एकसारखे अधिकार प्राप्त असावेत. या उलट कोणते कायदे – नियम केले जाऊ नयेत.

सत्ताधारीला आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता होईल यापेक्षा जास्त त्याने राज्याच्या खजिन्यातून घेऊ नये. सामाजिक क्षेत्रात शासनकर्त्याला कोणते विशेष अधिकार, मानमरातब दिले जाऊ नयेत. त्याचे अधिकार मर्यादित असावेत. सामान्य नागरिकांना आपल्या राज्यक्त्यावर टीका-टिप्पणी करण्याची मुभा असावी. यापेक्षा अधिक अधिकार ह. उमर यांच्या पूर्वीच्या कोणत्याही काळात, कोणत्याही राष्ट्रात, कुण्या शासक-राज्यकर्त्याने दिलेले नव्हते. ह. उमर यांनी आपल्या एका प्रवचनात म्हटले होते की,

"मला राष्ट्राच्या तिजोरीतून इतकाच खर्च दिला जावा, जो एका अनाथाच्या दैनंदिन गरजांची सोय करणअयासाठी आवश्यक असेल. जर मला श्रीमंती लाभली असती तर मला काहीही घेण्याचा अधिकार नसता. माझ्यावर तुमचे अनेकविध हक्काधिकार आहेत, ज्यांचा तुम्ही मला हिशोब मागितला पाहिजे. दुसरे असे की वाममार्गांनी राज्याच्या तिजोरीत भर घालू नये. माझ्या हाती कर आकारणी आणि युद्धापासून मिळालेल्या मालमत्तेच्या संपत्तीचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होता कामा नये. देशाची सुरक्षा आणि तुम्हाला खर्चासाठी सोय करणे माझ्यावर बंधनकारक आहे. त्याचबरोबर कोणत्याही हानीकारक परिस्थितीपासून तुमची सुरक्षा करणं माझे कर्तव्य आहे."

(संदर्भ – अल-फारुक, मौलाना शिवली नुअमानी)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


जगात जेवढे काही धर्म आहेत त्यांना काहीतरी नाव आहे. धर्माचे नाव एका विशिष्ट व्यक्तीवर ठेवले जाते किंवा त्या वंशाच्या धर्मावर असते ज्यात तो वंश उदयास येतो.  उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म हा ईसा (अलैहिस्सलाम) यांच्या नावावर आहे. बौद्ध धर्म गौतम बुद्धांच्या नावावर आहे. ज्यू धर्माचे नाव ज्यूमधील एका कबिल्याच्या नावावर यहूदी ठेवलेले आहे ज्याचे नाव यहुदा होते. असाच प्रकार इतर धर्मांच्याबाबतीत आहे. पण इस्लाम धर्माचे नाव कोणत्या व्यक्ती अथवा वंशाच्या नावावर नाही. इस्लाम ही एक खास / विशिष्ट प्रवृत्तीला जाहीर करतो जी इस्लाम या शब्दात आहे. हे नाव कुठल्याही व्यक्तीने शोधून काढलेले नाही किंवा हे नाव एखाद्या वंशाच्या नावावर ठेवलेले आहे. याचा सबंध कोणा व्यक्ती किंवा देशाशीही नाही. फक्त इस्लामची गुणवैशिष्ट्ये लोकांमध्ये बानवणे याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात ते लोक जे सत्य बोलत होते, पवित्र आचरण करत होते ते सर्व मुस्लिम होते आहे आणि भविष्यातही राहतील. (अरबी भाषेत इस्लामचा अर्थ होतो आदेश मानने. इस्लाम या शब्दाचा दूसरा अर्थ शांती, आश्रय देणे, संरक्षण करणे सुद्धा आहे.) 

आपण पाहतो जगात आज जितक्या काही वस्तू आहेत ते एका नियमात बांधलेल्या आहेत. सूर्य, चंद्र, पृथ्वी सर्व आपल्या ठरवून दिलेल्या कक्षेतच फिरतात. पाणी, हवा, झाड-झुडपे सर्व काही एक नियमानुसार चालतात. मनुष्यासाठीही हे नियम आहेतच तो सुद्धा या नियमाप्रमाणेच श्वास घेतो, पाणी पितो, जेवन करतो त्याच्या शरीराचे सर्व अवयव काम करत असतात.  

या सर्व गोष्टी ज्या निर्मात्याने बनविल्या त्यानेच या नियमात या गोष्टींना बांधले आहे. संपूर्ण सृष्टी त्याचा आदेश मानणारी आहे. त्याप्रमाणे या सर्वांचा धर्म इस्लाम आहे व त्या सर्व गोष्टी मुसलमान आहेत. कारण ते आपल्या निर्मात्याचे म्हणजेच अल्लाहच्या आदेशाचे पालन करीत आहेत. 

सूर्य,चंद्र, तारे, जमीन, वृक्ष, दगड, प्राणी या सर्व गोष्टी मुस्लिम आहेत व सर्व मनुष्यही मुस्लिम आहेत पण काही मनुष्य शिर्क व कुफ्र सारखे गुन्हा करून मुस्लिम बनण्यापासून वंचित राहतात. 

मनुष्याला आपले मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, तो इस्लाम आत्मसात करून मुस्लिम होऊ शकतो पण हे त्याच्या निवडीची बाब आहे. 

एक व्यक्ती आहे जो आपल्या निर्मात्याला ओळखतो व त्यालाच आपला मालक समजतो आणि तो आपल्या जीवनात आपल्या निर्मार्त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतो तो पूर्णपणे मुस्लिम आहे तो आता सत्य व शांतीच्या मार्गाने अनुकरण करेल. 

कुफ्र म्हणजे काय?

आता एक दुसरा व्यक्ती जो जन्मतः तर मुस्लिम आहे पण त्याने अल्लाहचे आदेश मानले नाहीत तर तो व्यक्ती काफीर आहे. कुफ्रचा अर्थ लपवने, नकार देणे किंवा पडदा टाकणे असा होतो. 

कुफ्रचे नुकसान

कुफ्र हे एक अज्ञान आहे, अथवा खरे अज्ञान कुफ्रच आहे. जो व्यक्ती आपल्या निर्मात्याला मानण्यास मनाई करत असेल ज्याने कार्बन, सोडियम व कितीतरी गोष्टींना मिळवून मनुष्य तयार केले. ज्याने एवढे सुंदर जग अगदी काटेकोरपणे बनवले ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे त्याचा आदेश मानण्यास नकार करणाऱ्याला अज्ञानीच म्हणावे लागेल.

त्याने आता जीवनात कितीही ज्ञान आत्मसात केले तरीही त्याचा उपयोग नाही कारण त्याला ज्ञानाचे पहिले टोकच मिळाले नाही. 

सर्वात मोठे अत्याचार / दडपण कुफ्र आहे कारण आपल्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. सर्व गोष्टींची प्रवृत्ती आहे कि ते अल्लाहच्या आदेशाचे पालन करावेत. पण कुफ्र करणारा व्यक्ती या प्रवृत्तीच्या विरूद्ध कामे करतो. 

कुफ्र म्हणजे दडपणे नव्हे तर बंड, कृतघ्नता व नमक-हरामीपण आहे. ज्या अल्लाहने बुद्धी दिली त्याच बुद्धीचा वापर अल्लाहविरूद्ध होत असेल तर त्याला बंड म्हणणार. ज्या अल्लाहमुळे आपण जगतो आहोत त्या अल्लाहचे आभार न मानणे व त्याविरूद्धच कारवाया करणे यालाच नमक-हरामी म्हणतात. 

कुफ्रमुळे जे काही नुकसान होते ते मनुष्याचेच होते. ज्या बादशाहची सल्तनत एवढी मोठी आहे कि वैज्ञानिकांनाही याच्या शेवटच्या टोकाचा शोध घेता आला नाही. त्या अल्लाहचे मनुष्याचे त्याला मानण्या न मानण्याने काही नुकसान होणार नाही.

कुफ्र करणाऱ्याला कधीच सत्याचा मार्ग सापडणार नाही व ज्ञान प्रप्त होणार नाही. त्याचे सामाजिक जीवन खराब होईल त्याची आर्थिक स्थिती खराब होईल. त्याची सत्ता खराब होईल, तो जगात अशांतता पसरवेल. हिंसा करेल, दुसऱ्यांचे हक मारेल, दडपशाही करेल कारण जो आपल्या निर्मात्याला ओळखत नाही त्यात काय नितीमत्ता आणि काय सत्य असणार तो आपली संपत्ती गैरप्रकारे कमवेल. आखिरतच्या दिवशी त्याचेच हात, पाय व इतर अवयव त्याच्या विरूद्ध अल्लाहच्या दरबारात ग्वाही देतील. 

इस्लामचे फायदे

अल्लाहने मनुष्याला विचार करण्याची, बरोबर-चूक कोणते ही ओळखण्याचा विवेक दिला आहे तसेच स्वातंत्र्यही दिले आहे. हे स्वातंत्र्यच खरी परीक्षा आहे. आपण या स्वातंत्र्याचा वापर कसे करतो यावर आपले यश अवलंबून आहे. आपण ईश्वराला ओखळून सत्य व त्याच्या कायद्याचे पालन करत असू तर आपल्याला यश मिळेल अन्यथा नाही. 

जो मुसलमान असेल तो आपल्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याचा कल्याणासाठी करेल तो कधीच स्वतःला कुठल्याही गोष्टीचा मालक समजणार नाही त्यात अहंकार असणार नाही. 

तसेच इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचे ज्ञान मिळवून एक मुस्लिम आपल्या प्रयत्नाने एका काफीरापेक्षा मागे नसेल. पण दोघांत अंतर असेल. एक मुस्लिम चांगल्या पद्धतीने या ज्ञानाचा वापर करेल. भूतकाळात तो वंश ज्या जमाती नष्ट झाल्या त्यांच्यापासून तो बोध घेईल. 

मुसलमानाचे विचार हे सत्य. अल्लाहला मानणारे असतील तो सर्व काही अल्लाहचे आहे असे मोल व अल्लाहने दिलेल्या गोष्टींचा वापर अल्लाहच्या मर्जीच्या प्रमाणे तो करेल. कारण त्याला एकादिवशी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. 

असे ज्याचे विचार असतील तो स्वतःला वाईट कामांपासून मुक्त ठेवेल. तो आपल्या बुद्धीला वाईट विचारांपासून रोखेल. डोळ्यांनी, कानांनी वाईट काम करणार नाही. त्यांच्या तोंडून वाईट गोष्टी निघणार नाहीत. तो आपले हात अत्याचार करण्यासाठी उचलणार नाही, त्याचे पाय चुकीच्या जागी जाणार नाहीत. तो गैरप्रकारे ऐशआरामाचे जीवन जगणार नाही तर तो साधे जीवन जगेल. 

या व्यक्तीसारखा सभ्य कोणीही नसेल तो दोन्ही जगात यश संपादन करेल. त्याच्यासारखा सन्मान कोणाचा नसेल कारण तो अल्लाहशिवाय कोणासमोर झुकत नाही. त्याच्यासारखा ताकतवान कोणी नसेल कारण त्याच्या मनात अल्लाहशिवाय कोणाचीही भीती नाही. तो थोड्या संपत्तीवरच समाधान मानणारा असेल तो सर्वांना प्रिय असेल कारण तो सर्वांची मदत करेल. सर्वांचे हक अदा करेल. 

मुस्लिमाची ही प्रवृत्ती बघितल्यानंतर एक मुस्लिम कधीच अस्वाभीमानी व खालच्या दर्जाचा राहूच शकत नाही.

या जगात अल्लाहच्या आदेशाचे पालन करून व सन्मानाने जीवन जगल्यानंतर त्या जगात अल्लाह कधीही न संपणारे खजीने आपल्या गुलामासाठी खुले करेल व अशाप्रकारे इस्लामचे अनुयायी दोन्ही जगांत यश संपादन करतात. 

इस्लाम हा धर्म कुण्या एका विशिष्ट देशाचे किंवा वंशाचे लोकांचे नाव नसून तो संपूर्ण मानवजातीच्या मालकीचे आहे. प्रत्येक युगात प्रत्येक देशात जो व्यक्ती अल्लाहला जाणला व सत्याचे आचरण ज्याने केले ते सर्व मुस्लिम होते. त्यांचा धर्म इस्लाम होता. (संदर्भ : दिनीयात भाग 1 चा सार. )


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल, 

लातूर 

9860551773

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget