Latest Post

prayer

गेल्या दोन महिन्यापासून काउंटडान सुरू होता तो आता संपलेला आहे. रमजानुल मुबारकचा पवित्र महिना आपल्या सगळ्यांना लाभला आहे. यानिमित्ताने आपण ईश्वराचे जितके आभार मानले तितके कमी. कारण आपण जीवंत आहोत, निरोगी आहोत, कित्येक लोक जे मागच्या रमजानमध्ये जिवंत होते हा रमजान बघू शकले नाही. (अल्लाह त्यांची मग्फिरत करो). 

आपणास माहित आहे का असा एक पाहूणा ज्याची वाट संपूर्ण जगभरातील 249 देशांतील लोक पाहतात आणि तो एकमेव असा पाहूणा की वाट पाहत असलेल्या सर्वांच्या घरी एकदाच हजर होतो? तो आहे तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका रमजानुल मुबारक!

रमजानुल मुबारक हा हिजरी कॅलेंडरमधला नववा महिना आहे. त्याला मुबारक (पवित्र) का म्हणतात? तर पवित्र कुरआन हा या महिन्यात अवतरित होण्यास सुरूवात झाली. जो की समस्त मानवतेचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आणि याच महिन्यात ’शबे कद्र’ एक रात्र आहे जी हजार रात्रींपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. रमजान हा पाहूणा फक्त महिनाभर आपल्या सोबत असतो मात्र आपल्याला पूर्ण वर्षभराची ट्रेनिंग देऊन जातो.

रमजानच्या महिन्यात पहाटेपासून ते सूर्य मावळेपर्यंत अन्न, पाणी आणि कामवासना त्यागने याला ’रोजा’ म्हणतात. अरबीमध्ये याला ’सौम’ म्हणतात. हा इस्लामच्या पाच मूलतत्त्वांपैकी एक मूलतत्व आहे.

‘रोजा’चा उद्देश काय?

फक्त उपाशी राहणे हा रोजाचा हेतू नसून माणसात ईश्वराची भीती येणे जेणेकरून तो दुष्टकर्मांपासून लांब राहील व प्रत्येक वाईट गोष्ट करण्याआधी विचार करेल की अल्लाह मला बघत आहे. ही ’’इशपारायणता’’ माणसात निर्माण करणे हाच रोजाचा उद्देश आहे. नमाज (सलात) जकात, हज हे दिसणाऱ्या इबादती आहेत. मात्र रोजा हे अल्लाह आणि बंद्यालाच माहित असते, म्हणून अल्लाह म्हणतो रोजा माझ्यासाठी आहे आणि मीच त्याचा मोबदला देणार आहे. 

रोजा हा पोटाचाच नसून, डोळ्यांचा असतो. डोळ्यांनी काही वाईट बघू नये, कोणावर वाईट नजर टाकू नये, हाताचा असतो, हातांनी कोणाचे वाईट करू नये, पायांचा असतो, पायांनी कोठे वाईट मार्गाला जावू नये, तोंडाचा असतो,  तोंडानी कोणाला वाईट म्हणू नये, खोटे बोलू नये, कोणाच्या पाठीमागे किंवा समोर वाईट म्हणूच नये. कानाचा असतो, वाईट  गोष्टी ऐकू नयेत इत्यादी.

आपण पाहूणे येण्याआदी कितीतरी तयारी (पूर्व नियोजन) करतो, घर साफ ठेवणे, त्यांचे पाहूणचार कसे करायचे हे ठरविणे, कोणते खाद्यपदार्थ बनवायचे? वगैरे. सर्वकाहीचे नियोजन केले जाते. तसेच रमजान या पाहूण्यासाठी ही काही नियोजन आपल्याला करावया लागतील. खरं तर रमजानच्या आधी जो महिना येतो तो असतो ’शाबान’ चा महिना. या महिन्यापासून आपल्याला रमजानची तयारी करावी लागते. पैगंबर मुहम्मद सल्ल. हे शाबान मध्येही रोजे करत होते. बीबी आयशा (रजि.) सांगतात की, ’’आम्ही बघीतले आहे की पैगंबर मुहम्मद सल्ल. हे शाबानमध्येही रोजे ठेवत होते. दुसऱ्या महिन्यापेक्षा जास्त.  

सलमा बिन कुहेल म्हणतात की, शाबानला ’किराअतचा महिना’ कुरआन वाचण्याचा महिना म्हणतात. आमीर इब्ने कैस हे शाबानमध्ये आपले दुकान बंद ठेवून ’’किराअत ’’ करायचे.

सहसा आपण शाबान महिन्याबाबत गाफिल असतो. त्याकडे दुर्लक्ष करतो पण अबुबकर बलखी (रहे.) म्हणतात रजब महिन्याचे उदाहरण शेती लावायची, पेरणी करायची शाबानमध्ये पाणी द्यायचे आणि रमजानमध्ये तिची रास करायचे तर मग ज्याने परेणीच केली नसेल त्याला काय मिळणार? निराश नका होवू, रजब, शाबानचे महिने आपल्या हातातून गेलेत. यंदा मात्र पुढच्या रजब, शाबानमध्ये आपण भरपूर मेहनत करू अशी आशा ठेवत आणि अल्लाहकडे प्रार्थना करत की आम्हा सगळ्यांना पुढचा रजब, शाबान आणि रमजान लाभो आपण रमजानचे स्वागत करू. 

आधीचे लोक 6 महिन्या अगोदरपासून प्रार्थना करायचे.     

’’ हे अल्लाह आम्हाला रमजानपर्यंत पोहोचव’’ रमजान झाल्यानंतर 5 महिन्यांपर्यंत प्रार्थना करायचे की आम्ही केलेले चांगले कर्म स्वीकार कर.

रमजानुल मुबारकच्या पवित्र महिन्यात दाखल होत आहात तर खालील कामे जरूर करा. 

1. सर्वप्रथम आपण केलेले आतापर्यंतच्या चुकांची माफी मागा. अल्लाह अत्यंत दयाळू, कृपा करणारा आहे. तुमच्या सर्व चुकांना तो माफ करेल. अल्लाहकडे माफी तर मागायचीच सोबत कुणाला वाईट बोलले असेल तर त्यांची पण माफी मागायची, गुन्ह्यांचे ओझे घेऊन नाही तर ते त्यांच्यापासून मुक्त होवून रमजानमध्ये दाखल व्हा. 

2. आपल्याला खास प्रार्थना करावी लागणार की ह्या कोरोना महामारीपासून मानवजातीला मुक्ती दे. कोणताही त्रास रमजानमध्ये होऊ नये. शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या चांगले ठेव. 

3. आपली नियत साफ ठेवणे, नियत दुरूस्त करणे, मी जे काही चांगले कार्य करीन, उपासना करेन, रोजा हा सर्व काही फक्त अल्लाहसाठीच कोणाला दाखविण्यासाठी नव्हेच.

4. मनाच्या खुशीने व पुण्याई मिळेल या आशेने रोजे ठेवणे, खूप उन्हं आहे रोजे कसे होतील ही चिंता करायची नाही, मागील 2 वर्षांचा अनुभव आहे ना सुरूवातीला थोडेफार सहन होत नाही तर पुन्हा सवय होऊन जाते आपल्या शरीराला रिफ्रेश करणारे हे रोजे असतात. रिसर्च मध्ये हे आढळून आले आहे की, रोजामुळे शरीरात अ‍ॅटोफॅगी म्हणजे वाईट पेशी संपतात व कँसर सारख्या खतरनाक रोगापासून संरक्षण होते. 

5. मनाची स्वच्छता अतिशय मोलाची. मनात ’’इमान’’ येण्यासाठी त्याला स्वच्छ करणे गरजेचे. मनाला इर्षा, छळ, कपट, वाईट भावनांपासून स्वच्छ करणे हे घर आणि परिसर स्वच्छ करण्याइतकेच महत्त्वाचे. अब्दुल्ला इब्ने मसउद (रजि.) यांना कोणी विचारले की पैंगबरांचे अनुयायी रमजानचे स्वागत कसे करीत असत? त्यांनी उत्तर दिले कोणीही अनुयायी जेव्हा रमजानचा चंद्र पाहत होता त्याच्या मनात थोडाही द्वेष कोणाबद्दल नसायचा. आधीच्या लोकांना मान मिळाला ते जास्त नमाज, रोजामुळे नव्हे हे तर अनिवार्यच आहेत पण त्यांचे हृदय (मन) खूप सुंदर होते ते जनकल्याणाबाबत जागरूक होते. दुसऱ्यांची मदत करणे हे त्यांचे मूलमंत्र होते. साद बिन मुआझ (रजिअल्लाहु अनहु) एक अनुयायी होते. एकदा पैगंबर (सल्लम.) त्यांच्या अनुयायींसोबत बसले होते आणि म्हटले आता जो माणूस येईल त्याला स्वर्ग भेटणार, साद बिन मुआज आले. एका व्यक्तीला खूप आश्चर्य झाले. त्याला फार उत्सुकता झाली की हे असे काय करतात की ह्यांना स्वर्ग मिळणार. जेव्हा ते घरी चालले तर ती व्यक्ती सुद्धा त्यांच्या घरी गेली, 3 दिवस राहिली त्यांना विचारले मी बघायला आलो होतो तुम्ही काय चांगले काम करता, त्यांनी सांगितले माझे मन स्वच्छ आहे. मी कुणाबद्दल वाईट मनात ठेवत नाही आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन करतो, फर्ज आणि नफील नमाज अदा करतो. 

6. आई-वडिलांचे आज्ञाधारक बनले पाहिजे. त्यांची सेवा करणे, त्यांना ’’उफ’’ सुद्धा न म्हणणे, आई-वडिलांची अवज्ञा करून केलेले चांगले कर्म अल्लाह स्वीकार करत नाही.

7. वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे. रमजान हे फक्त खाणेपिणे आणि झोपण्याचा महिना नसून जास्तीत जास्त ’’इबादत’’ करण्याचा महिना आहे. त्यामुळे जसे विद्यार्थी टाईम-टेबल बनवितात तसेच आपल्यालाही टाईम-टेबल बनवायचा आणि त्याप्रमाणे चालायचे आणि रमजानमध्ये यशस्वी व्हायचे आहे. 

8. जास्त वेळ सोशल मीडियामध्ये घालवू नये. बंद करणे शक्य नसेल तर थोडेसे वेळेचे नियोजन करून बघा. 

9. ह्या महिन्यात कुरआन वाचने, त्याच्यावर विचार करणे आणि त्यामधील शिकवणी आचरणात आणणे गरजेचे. फक्त वाचल्यामुळे पुण्याई मिळेल पण ज्या उद्देशासाठी कुरआन अवतरले ते साधता येणार नाही. म्हणून जास्तीत जास्त लक्ष कुरआन समजून वाचण्याकडे देणे हे महत्त्वाचे. हा एकमेव ग्रंथ आहे जो मानवाचे आयुष्य बदलू शकतो. 

10. आपले चरित्र दुरूस्त ठेवणे. तरूणाईत, आपल्याला कोणीतरी काळजी करणारा, स्तुती करणारा, प्रेम करणारा पाहिजे असतो. मग कोणाची तरी स्टाईल आवडते, कोणाचे सौंदर्य आपल्या मनाला भावते, कोणाचे स्टेटस, कोणाच्या ऐश्वर्यावर आपण प्रेम करायला लागतो किंवा कोणीतरी आपल्याला समजून घेतो म्हणून आपण प्रेमात अडकतो. प्रेम करा परंतु, परमेश्वराशी. हेच खरे प्रेम. तोच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा. बाकी सर्व प्रेम श्वासापुरते पण परमेशवराचे प्रेम हे नेहमी राहणारे. मृत्यूनंतरही कामात येणारे, आपण दररोज मृत्यूचे तांडव बघत आहोत मग प्रश्न हा मृत्यू पावलेल्या लोकांचा आत्मा कोठे जाणार? विज्ञान याचे उत्तर देऊ शकत नाही. येथे धर्म आपले मार्गदर्शन करतो की, चांगली आत्मा स्वर्गात व वाईट आत्मा नरकात जाईल. जे कोणी स्वर्गाला नाकारत असतील किंवा परमेश्वरालाच नाकारत असतील त्यांच्यासाठी एक उदाहरण आईच्या पोटात असलेल्या बाळाला आई दिसत नाही म्हणून का त्याने आईचे अस्तित्व नाकारावे? त्या बाळाला आपण पोटाबाहेरच्या जगाची कल्पना देऊ शकतो का? आणि दिली तरी तो त्याच्या बुद्धी बाहेरीलच. तशीच आपली व्यथा, ईश्वर दिसत नाही म्हणून मानायचेच नाही आणि स्वर्ग-नर्क तर आपल्याबुद्धी पलीकडील. मेलं की संपलं असं नाही, सर्व मानवजात आपसात बंधुत्वाच्या नात्याने बांधली गेलेली. त्या एक निर्मात्याच्या प्रेमात पडून आपसात प्रेम करा. कारण त्याचे हेच शिक्षण माणसाचे ऑक्सीजन. 

अनैतिक प्रेमप्रकरणातून दररोज कितीतरी आत्महत्या होतात म्हणून अल्लाहवरच प्रेम करा त्याची सर्व वचने हे खरी आहेत. त्याने मानवासाठी असा स्वर्ग बनवून ठेवला आहे की तो कोणी बघितलेला नाही, न ऐकले, न कुणाच्या मनात, विचारातही आला नाही म्हणून प्रेम फक्त अल्लाहवरच. पूर्ण जगाचा मालक तरी आपल्यावर प्रेम करायला तयार आहे. त्याचा चेहरा पाहण्यासाठी आपल्याला चांगले कर्म करायचे. कारण तो स्वर्गातल्या लोकांना दर्शन देणार.

11. जकात देणे, गोरगरीबांची काळजी करणे आपल्या राशनसोबत त्यांचेही राशन भरणे.

12. आपण पैसा गोळा करतो लग्नासाठी, घर बांधण्यासाठी वगैरे पण आधीचे लोक पैसा गोळा करायचे रमजानमध्ये गोरगरीबांची मदत करण्यासाठी.

13. शेजाऱ्यांची खबरगीरी घेणे, त्यांची मदत करणे. 

14. मोलकरणीचे ओझे हलके करणे तिची मदत करणे ही पुण्याई. घाम वाळण्या अगोदर मजुरी देणे ही पुण्याई.

15. कोणाशी चांगले बोलणे, आनंदीत होवून भेटणे हे ही पुण्याईच.

16. बी.पी. शुगरच्या रूग्णांनी डॉ्नटरांचा सल्ला घेऊन रोजे ठेवावेत. स्वर्गाची आठ दारे आहेत. त्यापैकी एका दरवाजाचे नाव अर-रिय्यान आहे. त्या दाराहून फक्त रोजा ठेवणारे लोकच स्वर्गात प्रवेश करू शकतील, आणि रमजानमध्ये एक पुण्याईचे 10, 70, 700 पर्यंत पुण्य दिले जाते. जणू काही पुण्याई करण्याचेच हे दिवस आहेत. कोठे सेल लागल्यास आपण कसा त्वरा करतो तसेच आपल्याला त्वरा करायची आहे. अर-रिय्यान मधून प्रवेश करण्यासाठी अल्लाह सर्वांना सदबुद्धी देवो आणि सत्कर्मांना स्वीकार करो. (आमीन.)


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935


iftar

पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की पूर्वीच्या लोकांसाठी जसे रोजा (उपवास) करणे अनिवार्य केले होते, तसेच तुमच्यावरही अनिवार्य केले. पवित्र कुरआनच्या अवतरणासाठीही अल्लाहनं रमजान महिन्याचीच निवड केली होती. कुरआन म्हणजेच लोकांसाठी मार्गदर्शनपर ग्रंथ आहे. रोजाचा प्रमुख उद्देश कुरआनमध्ये जो सांगितला आहे, अल्लाहने मानवाला जे मार्गदर्शन दिले आहे त्याचे त्याने आभार मानावे.

मानवाचे अस्तित्व म्हणजे शरीर आणि आत्मा. माणूस आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यात सदैव व्यस्त असतो. जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा जरी क्षुल्लक असल्या तरी त्या कधीही संपत होत नसतात. एकानंतर दुसरी गरज. त्या गरजा पुढे जाऊन आशा-आकांक्षांचे रूप घेतात. माणसाच्या या सुख-सुविधा कधीही संपत नाहीत. एकानंतर दुसऱ्याची इच्छा होत असते.

रमजानचे रोजे महिनाभर एक प्रकारचा प्रशिक्षणकाळ आहे. महिनाभर सारे मुस्लिम श्रीमंत असोत की गरीब राजा असो की प्रजा सर्वचे सर्व रोजाचे पालन करतात. सगळ्यांसाठी एकच नियम. जे सक्षम नसतील, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांना १२ तास जेवण-पाण्याविना राहणे शक्य नाही त्यांना सवलत दिली गेली, पण ती सवलत अशी की त्यांना रमजान महिनाभर एखाद्या वंचित गरीब व्यक्तीला दोन वेळचे जेवण पुरवावे.

रोजा म्हणजे आध्यात्मिक समृद्धी प्राप्त करण्याचे साधन आहे. शारीरिक इच्छापूर्तींना महिनाभर (दिवसा) वर्ज्य करून आत्मिक समाधानासाठी स्वतःला वाहून घ्यावे. अरबी भाषेत रोजाचा अर्थ स्वतःला रोखून ठेवणे, असा होतो. संयम बाळगणे आणि ठामपणे उभे राहण्यासाठीही अरबी भाषेत ‘सौम’ या शब्दाचा वापर केला जातो. ज्याला उर्दू भाषेत रोजा म्हटले जाते. रोजा किंवा उपवास प्रत्येक जनसमूह आणि धर्मात कोणत्या ना कोणत्या प्रकारे आढळतो. म्हणजे मानवजातीसाठी ईश्वराने रोजा (उपवास) करणे अनिवार्य केले आहे.

पवित्र कुरआनविषयी अल्लाहनं असे सांगितले आहे की हे साऱ्या मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे. केवळ मुस्लिमांसाठीच किंवा मुस्लिमांचा हा ग्रंथ नाही. साऱ्या मानवांचा हा ग्रंथ आहे. यातील मार्गदर्शनदेखील साऱ्या मानवांसाठी आहे. या कुरआनच्या दुसऱ्या अध्यायातील सुरुवातीला असे सांगितले आहे की हे त्यांच्यासाठी मार्गदर्शन आहे जे लोक परोक्षावर श्रद्धा ठेवतात, उपासना करतात (नमाज अदा करतात) आणि एवढ्यावरच न थांबता त्यांना जी काही साधने अल्लाहने बहाल केली आहेत त्यातून ते साऱ्या गरजवंतांना पुरवितात. त्यांच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांची पूर्तता करतात, असे लोक सदाचारी आहेत. म्हणजे सदाचारी असण्यासाठी फक्त श्रद्धा पुरेशी नाही तर आपल्या अवतीभवती असलेल्या मानसांची, त्यांच्या गरजांची, त्यांच्या अडीअडचणींची जाणीव ठेवणेदेखील आवश्यक आहे. मग हे लोक कोणत्या का जातीधर्माचे असोत, फक्त मुस्लिमांची काळजी घेणे असे म्हटले नाही. पुढे जाऊन असे म्हटले आहे की असे लोक तुमच्यावर जे अवतरले आहे आणि तुमच्या पूर्वीच्यांवर जे काही पाठवले गेले होते यावर श्रद्धा ठेवतात तर मग हे लोकया जगात आणि परलोकातदेखील यशस्वी ठरतील.

अनाथांना झिडकारणे, त्यांना हाकलून देणे म्हणजे धर्म नाकारणे आहे. जे लोक अनाथांना, गरजूंना जवळ करत नाहीत, त्यांची विचारपूस करत नाहीत, त्यांच्या देखभालीसाठी एकमेकांना प्रोत्साहित करत नाहीत अशा लोकांविषयी पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की ते धर्माचरणाचा देखावा करतात. हे लोकतर आपसातील छोट्यामोठ्या गरजांचीसुद्धा पूर्तता करत नाहीत. हे नमूद करण्याची गरजच नाही की कुरआन साऱ्या मानवजातीसाठी असल्याने त्यातील शिकवणी सगळ्या मानवजातीसाठी आहेत, मग ते कोणत्याही जातीधर्माचे का असेनात.

- सय्यद इफ्तिखार अहमद



उपरोक्त दुसऱ्या आयतीमधील पहिल्या भागात धर्मपरायणता व ईशभयाची विशेष शिकवण देण्यात आली. धर्मपरायणतेचा हक्क असा की, अल्लाहचे आज्ञापालन करीत आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि अगदी अंतिम श्वासापर्यंत याच पद्धतीने जीवन व्यतीत करावे.

अर्थात आपण इस्लामकरिता जीवन समर्पित करावे. व्यक्तिगत व सामूहिक जीवनात, घरात किंवा घराबाहेर, हवेतील किंवा पाण्यावरील प्रवासात प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळेस आम्ही अल्लाहचे सच्चे दास व पैगंबर मुहम्मद  (स.) याचे अनुयायी आहोत. जोवर शक्य आहे आपल्या सर्व पात्रता अल्लाहच्या दासत्वासाठी समर्पित कराव्यात आयतच्या दुसऱ्या भागात ईशआज्ञाधारकतेची नीती जीवनाच्या शेवटापर्यंत कायम राहावी. मृत्यूदूत जेव्हा कधी येईल तेव्हा आम्हाला त्याने धर्मपरायण व ईशपरायणशील पाहावे आणि आम्ही आपल्या पालनकर्त्याचे दासत्व करत करत त्याच्यासमोर हजर व्हावे. याचा अर्थ हासुद्धा आहे की जेव्हा इस्लाम आणि प्राण यापैकी एक निवडण्याचा प्रसंग आल्यास डोळे झाकून इस्लामची निवड करावी. शाश्वत प्रकोप व शिक्षेला कारणीभूत कुफ्र (द्रोह) व विरोधकाच्या स्थितीत मरण आहे आणि त्या मरणापेक्षा श्रेष्ठ मरण दुसरे नाही जे अल्लाहसाठी आणि अल्लाहच्या मार्गात येते. शहीद मरताक्षणी जन्नत प्राप्त करतो. शहादत श्रद्धावंतांचे जीवन ध्येय आहे. शहादाची (वीरमरणाची) तर अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (स.) यांची सुद्धा कामना होती.



माननीय अब्बास (रजि.) हे वर्णन करतात.

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) पावसासाठीची प्रार्थना (इस्तिस्का) करण्यासाठी बाहेर पडले. पैगंबर साज-सज्जारहित साधी राहणी, विनम्रता, विनीत आणि अल्लाहसमोर नतमस्तक होऊन याचना करणारे होते.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चेहऱ्यावरून विनम्रता व विनीतभाव प्रकट होत असे. त्यांच्या चेहऱ्यावरून रुदन व द्रवणशीलतेचा भाव व्यक्त होत होता. पैगंबर पाऊस पडण्यासाठी याचना करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांना याचे पूर्ण भान होते की ईशकृपेला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मग ती कृपा पावसाच्या रूपात किंवा अन्य रूपात असोत, आवश्यक आहे की दासाने आपल्या प्रभुपुढे विनीतभावविभोर होऊन गरजेला प्रस्तुत करावे. मनुष्याला तर प्रत्येक वेळी व प्रत्येक स्थितीत विनीत व आश्रित दास बनूनच राहिले पाहिजे, परंतु संकटसमयी तर अनिवार्यत: दासाला त्याच्या विवशतेचे व आश्रितपणाच्या पूर्ण भान असणे आवश्यक आहे. दासाच्या शरीरावर जे कापड त्याची शोभा वाढवतात ते फक्त विनयशीलतेचे कापड आहे, अन्य दुसरे कोणतेही कापड नाही. ईशप्रेति याच बावनेला मनुष्याच्या आचरणात पूर्णत: आपल्या मार्गदर्शनाद्वारा जागृत करतात.



- सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

साम्राज्यवाद दमन आणि शोषणावर आधारित आहे. परंतु जेव्हा साम्राज्य भांडवलदारांच्या हातात जाते तेव्हा त्याचे परिणाम अतिभयानक होतात. या संपूर्ण व्यवस्थेत प्रसारमाध्यमं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. प्रसारमाध्यमं भांडवलदारांच्या इशाऱ्यावर कशी नाचू लागतात याचा खुलासा या पुस्तिकेत आहे.

या पुस्तिकेत या व्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या दुष्परिणामांना विशद करण्यात आले आहे. स्त्रियांचे शोषण, स्त्री शरीर एक वस्तू, वेश्यावृत्ती, सौंदर्यप्रसाधणे, फॅशन, उपभोक्तावाद यावर चर्चा आली आहे आणि शेवटी यावर इस्लामी उपाय कुरआन व हदीसच्या प्रकाशात विशद करण्यात आले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 253     -पृष्ठे - 44 मूल्य - 20        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/ehr15oakjpubcux9ix4o3ed5xfajmqzr




Ramzan

गत वर्षापासून अख्ख जग कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे जगण्याशी झूंजत आहे लहान, थोर, गरीब, श्रीमंत सर्व स्तरातील नागरिकांची फरफट सुरू आहे अशातच या महामारीमुळे भारतात 1 लाख 66 हजार लोक जग सोडून गेले आहेत तर जगात 28 लाख 7 हजार मृत्यू पावले आहेत. मात्र आपणा सर्वांना यंदाचा रमजान पाहण्याची संधी मिळाली आहे, आपल्या भाग्याची रेषा गडद असल्याचं सध्यातरी वाटत आहे कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागलं त्यामुळे यंदाच्या रमजानमधील रौनकही फिक्कटच राहणार. मात्र जबाबदारी वाढली आहे रमजानचा खरा हक्क अदा करण्याची

संयम, शांती, त्याग, एकात्मता, चारित्र्यसंपन्नता, ईशपरायणता, दानशुरता, प्रेमभाव,  शारीरिक संपन्नता आदी सद्गुणांनी भरपूर रमजान आम्हाला मेजवानी देणार आहे त्याचा लाभ घेणं श्रद्धावान ईमानधारकांसाठी अनिवार्य आहे रोजा इस्लामच्या पाच मुलभूत अनिवार्य कार्यापैकी एक. रोजा इमानधारकांसाठी अध्यात्मिक पर्वणीबरोबरच ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सखोल मार्गदर्शन करतो रमजानमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाल्यामुळे सर्वात मोठं गिफ्ट ईश्वराकडून आम्हाला कुरआन स्वरूपात रमजानमध्येच मिळालेले आहे  म्हणून रमजानचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुरआनमध्ये एकूणएक मानवहितासाठी आवश्यक सर्वच बाबींचा उलगडा करण्यात आला आहे यशस्वी जीवनाची गुरूकुल्ली कुरआनमध्ये सापडते यासाठी प्रत्येक व्यक्ती जो जीवनाचे खरे रहस्य, खरे महत्व व खरे साफल्यता जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे, ईश्वराशी संवाद साधायचा आहे अशी मनोमन इच्छा बाळगतो त्याने कुरआनचं समजून पठन करणं अनिवार्य आहे 

ईश्वराची कृपा पदरी पाडून घेण्यासाठी जगातील सर्व मानवांकरिता रमजानचा महिना अतिमहत्वाचा आहे रोजांचे महत्व अधोरेखित करताना कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘‘ हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.’’ 

‘‘ हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत. तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकाना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल (परंतु उपवास करणार नाहीत) त्यांनी दुर्बलांना मोबदला (फिदिया) म्हणून जेवू घालावे. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वत:साठीच भले आहे. परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.’’ 

‘‘ रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे.’’  (संदर्भ : कुरआन सुरे अलबकरा आयत नं 183 ते 185)

सदर आयातींमध्ये रोजाची अनिवार्यता आणि त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही सांगितल्या आहेत तसेच रमजान रोजेधारकांसाठी तर पर्वणी आहेच शिवाय जे गरीब, गरजवंत आहेत त्यांच्याकरिताही आनंदाचा महिना आहे या महिन्यात जकात, सदका, फित्राच्या माध्यमातून गरीब, गरजवंतांची सेवा करण्याचा मान ऐपतदार ईमानधारकांना मिळतो 

यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे आपसुकच लॉकडाऊनमुळे आपल्यावर बाहेर पडण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी, बाजारात फिरण्यासाठी, हॉटेल आदी ठिकाणी मिष्टांनाचा आस्वाद घेण्यावर बरीचशी बंधने आल्यामुळे रमजानच्या रौनकपासून काही प्रमाणात आम्हाला मुकावं लागणार आहे मात्र स्वत:मध्ये मानवकल्याणासाठी आवश्यक ते बदल करून घेण्याची संधी आहे रोजा फक्त उपवासाचं नावं नाही तर सर्व इंद्रियांचा विकास करण्याची संधी देतो त्यामुळे रमजान महिन्याचं स्वागत करतो आणि आपणां सर्वांना रमजानचा हक्क अदा करण्याची सद्बुद्धी मिळो, हीच अल्लाहकडे प्रार्थना करतो. आमीन.  

- बशीर शेख



statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget