Latest Post


माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा लोकांना आदेश देत असत तेव्हा त्यांना त्या कर्मांना करण्याचा आदेश देत ज्यांना करण्याची शक्ती व सामर्थ्य त्यांच्यात राहात होते. लोकांनी विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही तुमच्यासारखे अजिबात नाहीत. अल्लाहने तर तुमच्या मागील पुढील सर्व उणिवांना क्षमा केली आहे.’’

यावर पैगंबरांना जास्तच राग आला आणि त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. नंतर पैगंबर म्हणाले, ‘‘मी तुमच्यापेक्षा जास्त अल्लाहचे भय बाळगून आहे आणि तुमच्या सर्वांपेक्षा अल्लाहला जाणणारा मी आहे.’’

स्पष्टीकरण

एक हदीसकथन आहे,

‘‘मी सर्व लोकांपेक्षा जास्त अल्लाहला जाणून आहे आणि सर्वांपेक्षा जास्त ईशभय बाळगून आहे.’’

वरील हदीसचा अर्थ असा आहे की ईशआज्ञापालन व ईशउपासनेची खरी प्रेरक शक्ती अल्लाहची ओळख आणि ईशभय आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणासही याचा प्रेरणास्रोत तसेच प्रेरक शक्ती समजणे चुकीचे आहे, जेव्हा की ईशज्ञान व ईशभय या दोहोंत मी तुम्हा सर्वांपेक्षा जास्त आहे, तेव्हा ईशआज्ञापालन व उपासनेत तुम्हाला माझे अनुसरण केले पाहिजे. माझ्या पद्धतीपासून इतर दुसरी पद्धत जी तुम्ही स्वीकाराल ती चुकीची आणि अल्लाहच्या इच्छेविरूद्ध असेल.

अल्लाहला जाणणे आणि ईशभयाला धारण करण्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापेक्षा जास्त दुसरा कोण असेल? पैगंबरांनी स्वत:चे आणखीन एक वैशिष्ट्य हे सांगितले की ठेव (अमानत) त्या परत देण्यात दुसरा कोणीच त्यांचा मुकाबला करू शकत नाही. एकदा एका यहुदी (ज्यू) माणसाने द्वेषापोटी व शत्रुत्वामुळे जेव्हा पैगंबरांच्या अमानतदारीवर शंका प्रकट केली तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तो खोटारडा आहे आणि तो स्वत: जाणून आहे की मी सर्व लोकांपेक्षा अधिक जास्त अल्लाहचे भय बाळगणारा आणि सर्वांपेक्षा जास्त अमानतींना (ठेव) परत करणारा आहे.’’



परमेश्वराची आज्ञा पाळण्यासाठी ईश्वरी ज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. परमेश्वराने माणसांमधूनच काही माणसांना (प्रेषितांना) ’वह्य’ (बोध) देऊन पाठवले व ज्ञान दुसऱ्या मनुष्यात पसरवण्याची आज्ञा केली. खऱ्या प्रेषितांना ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवणे व त्याने जे सांगितले ते मानणेही आवश्यक आहे. 

प्रेषितांची वास्तविकता

परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला काही न काही गुण दिलेले आहेत. काही व्यक्तीत जन्मतःच नेतृत्वक्षमता असते काहींचे गणितात हात चांगले असते काही नवनवीन आविष्कार करत असतात. 

या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त इंजिनियर, डॉ्नटर, वैज्ञानिक, व्यापारी इ.चीच गरज आहे असे नाही. अश्या व्यक्तींची पण गरज आहे की जो परमेश्वराचा मार्ग दाखवेल जेणेकरून मनुष्य नेहमी राहणारे यश संपादित करू शकेल. अश्या व्यक्तीत परमेश्वराला ओळखण्याची क्षमता खूप होती. परमेश्वराने या व्यक्तींना ईश्वरी ज्ञान दिले व त्याचा प्रसार मानवांत करण्यास सांगितले. हे व्यक्ती म्हणजेच परमेश्वराचे प्रेषित / पैगंबर. 

प्रेषितांची ओळख 

ज्याप्रमारे महान व्यक्ती काही न काही विशेष गुण घेऊन जन्माला येतात त्याप्रमाणेच प्रेषित ही काही विशेष गुणासह जन्माला येतात. 

एखादा व्यक्ती जन्मतःच कवी असतो. एखाद्या व्यक्तीत भाषण कला असते. एक व्यक्ती जन्मतःच नेतृत्व करणारा असतो. त्यांना आपण लगेच ओळखू शकतो. याचप्रमाणे प्रेषितांचेही असते. प्रेषित जे बोलतात त्याचा विचार सामान्य व्यक्ती कधी करूच शकत नाही. त्यांची नजर सूक्ष्म असते. तो जे काही बोलतो त्याला आपले मन मानते. जगाच्या अनुभवावरून व विश्वावर दृष्टीक्षेप टाकल्यास प्रेषितांचे बोलणे आपल्याला पटते. 

प्रेषितांचे व्यक्तीमत्व व चारित्र्य पवित्र असते. तो खरा बोलणारा सभ्य असतो. तो कधी चुकीची गोष्ट बोलत नाही. तो वाईट काम करत नाही. नेहमी चांगले कर्म करण्याची शिक्षा इतरांना देतो. तो दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतः नुकसान करवून घेतो. प्रेषितांमध्ये कुठल्याही प्रकारचे दुर्गूण नसतात. ते सर्वगुणसंपन्न असतात. या गोष्टी बघून ओळखले पाहिजे की हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे. 

प्रेषितांप्रती आज्ञाधारकपणा

जेव्हा आपल्याला माहित होते की, हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणे. त्यांची आज्ञापाळणे व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक असते. 

एखादा व्यक्ती प्रेषितांना मानतो पण त्यांची आज्ञा पाळत नाही तर तो मूर्ख आहे. प्रेषित जो बोलतो आहे ते परमेश्वराचे बोल असतात व परमेश्वराचे बोल नेहमी सत्यच असतात हे जाणून देखील तो व्यक्ती प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टींच्या विरूद्ध काम करतो. 

आपल्याला परमेश्वराचे ज्ञान मिळवायचे असल्यास आपल्याला ते प्रेषितांकडून मिळवावे लागेल व त्यासाठी आपला खरा प्रेषित कोण हे ओळखावे लागेल. चुकीच्या माणसाला आपण प्रेषित मानले तर तो आपल्याला चुकीचा मार्ग दाखवेल. खरा प्रेषित कोण हे ओळखल्यानंतर त्याची आज्ञा पाळावी.

प्रेषितांवर विश्वास ठेवण्याची गरज...

जेव्हा आपल्याला माहित होते की खरा मार्ग तोच जो प्रेषितांनी सांगितलेला आहे तेव्हा प्रेषितांवर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती प्रेषितांना प्रेषित मानतो पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांची आज्ञा पाळत नाही असा व्यक्ती काफिर तर आहेच पण मूर्खही आहे. कारण त्याला सत्य काय हे माहित असूनही तो त्याचा स्विकार करत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला प्रेषितांची आज्ञा पाळायची गरज नाही. आम्ही आमचा मार्ग स्वतः शोधू. गणितात जसे दोन बिंदूंना जोडणारी एकच रेषा असते तसेच माणसाला व परमेश्वराला जोडणारा मार्गही एकच आहे तो म्हणजे ’सिराते मुस्तकीम’(सत्य मार्ग). प्रेषितांनी सांगितलेला मार्ग हाच ’सिराते-मुस्तकीम’ आहे. इतर सर्व मार्ग चुकीचे आहेत. 

पण जो व्यक्ती प्रेषितांवर विश्वास ठेवत नाही त्याला परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्गच सापडणार नाही. प्रेषित हे परमेश्वराने पाठवलेले असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळावी लागते. जे प्रेषितांवर विश्वास ठेवत नाहीत ते बंडखोर असतात. जो व्यक्ती परमेश्वराला मानतो पण त्याने पाठवलेल्या प्रेषिताला नाही तर तो काफिर आहे. 

प्रेषितांचा इतिहास...

आपल्याला माहितच असेल की अल्लाहने सर्वात प्रथम एक मानव तयार केला व त्या मानवापासूनच त्याचा जोडीदार जन्माला घातला व त्या दोघांपासून मानवजातीचा जन्म झाला. मोठमोठे वैज्ञानिक ही मानतात की माणवाचे वंशज हे एकच आहेत. 

इस्लाममध्ये या मानवाला ’आदम’ (अलैहि.) म्हणतात. या शब्दातूनच हिंदीतील ’आदमी’ शब्द निघतो. अल्लाहने सर्वप्रथम आदम (अलैहि.) ला बनवले व त्यांना आज्ञा केली की त्यांनी आपल्या संततीला इस्लामचे शिक्षण द्यावे. परमेश्वर एक आहे व त्याचीच पूजा करावी. त्याच्यासमोरच नतमस्तक व्हावे, त्याच्याशीच मदत मागावी आणि चांगले जीवन जगावे, हे ज्ञान संततीला द्यावे व यापासून भरकटाल तर त्याची शिक्षा मिळेल, याचीही कल्पना द्यावी.

हजरत आदम (अलैहि स.) यांची जी संतान चांगली निघाली त्यांनी आपल्या पित्याची शिकवण लक्षात ठेवली पण जी वाईट संतान होती त्याने सत्याचा मार्ग सोडला व काहींनी सूर्य, चंद्र, हवा, आग इत्यादींची पूजा चालू केली. यामुळे मूर्तीपूजा वाढीस लागली. आदम (अलैहि.)चे वंशज संपूर्ण जगात पसरले व त्यांचे वेगवेगळे वंश बनले. हे आता परमेश्वराला व त्याच्या नियमांना विसरले. त्यांनी सद्सद्विवेक बुद्धीचा त्याग केला.

आता अल्लाहने प्रत्येक वंशात आपले प्रेषित पाठवल्यास सुरूवात केली. या प्रेषितांनी आदम अलै. ने दिलेल्या शिक्षणाची आठवण या वंशांना करून दिली. त्यांना मूर्तीपूजेपासून रोखले. चुकीच्या रीवाजांपासून रोखले. परमेश्वराच्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. जगाच्या प्रत्येक भागात भारत, चीन, ईरान, ईराक, युरोप प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने आपले प्रेषित पाठवले व तेथील लोकांना ईश्वरी ज्ञान दिले. त्या सर्व प्रेषितांचा धर्म इस्लामच होता. मानवजातीचा सुरूवातीला तेवढा विकास झालेला नव्हता त्यामुळे त्यांना ईश्वरी ज्ञानही साध्या प्रकारचे दिले गेले. पण सर्व प्रेषितांचा संदेश एक ईश्वराची पूजा करणे समाजात चांगली माणसे वाढवणे व वाईट प्रवृत्ती नष्ट करणे हा होता. 

प्रेषितांसोबत मानवाने वेगळाच हिशोब ठेवला. सुरूवातीला त्यांना त्रास दिला. त्यांची शिक्षा मानण्यास निकार दिले. काहींचा  बहिष्कार केला. काहींचे खून केले. -(उर्वरित आतील पान 7 वर)

काही प्रेषितांना जीवनभर कष्ट करून हाताच्या बोटावर मोजण्या इतके अनुयायी भेटले तरीपण परमेश्वराचे पाठवलेले हे व्यक्ती आपले काम करत राहिले. काही प्रेषितांचा प्रभाव एवढा होता की एक संपूर्ण राज्य त्यांचे अनुसरन करू लागले. आता प्रेषितांच्या जाण्यानंतर काहींनी त्यांच्या शिक्षणात बदल केला. त्यांच्या ईश्वरी ग्रंथात स्वतःकडून काही लिहिले. काहींनी प्रेषितांची पूजा सुरू केली. कोणी प्रेषितांनाच ईश्वर मानायला लागले. काही प्रेषितांना ईश्वराचा मुलगा मानायला लागले. अशा परिस्थितीत नंतरच्या लोकांना प्रेषितांची खरी शिकवण मिळणे अवघड होते. 

प्रत्येक प्रेषितांनी आपापल्या लोकांत चांगूलपणा सतप्रवृत्ती चांगले आचरण या गोष्टी शिकविल्या व वेगवेगळ्या वंशांना तयार केले की जगात एक धर्म पसरवला जाऊ शकेल जो संपूर्ण मानवजातीसाठी आहे. 

जे काही प्रेषित आले होते ते एका विशिष्ट देशाकरिता वंशाकरिता आले होते. त्यांची शिकवण त्या भूभागापूर्तीच मर्यादित होती. वेगवेगळ्या राष्ट्रांत देवाणघेवाण नव्हती. अशा परिस्थितीत सर्व मानवजातीसाठी शिकवण या सर्व राष्ट्रांत पसरवणे अवघड होते. तसेच या राष्ट्रातील लोकांत अज्ञान वाढले होते. त्यांच्या व्यक्तीमत्वात बिघाड झाले होते. त्यामुळे परमेश्वराने हळूहळू सर्व राष्ट्रांत आपले प्रेषित पाठवून त्यांना सरळ मार्गावर आणले. आता मानवजातीचा विकास झालेला आहे. 

वेगवेगळ्या राष्ट्रातील लोकांचे एकमेकांशी संबंध येऊ लागले. व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत संचार वाढला. लोकांत काही प्रमाणात साक्षरता वाढली. याच काळात मोठमोठे राजे, बादशाह झाले त्यांनी त्यांनी आपले साम्राज्य बनवले. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा एकमेकांशी संबंध येऊ लागला. आजपासून अडची हजार वर्ष पूर्वी अशी परिस्थिती होती की संपूर्ण मानवजातीसाठी एकच धर्माची गरज वाढू लागली होती. बौद्ध धर्म एक संपूर्ण धर्म नव्हता, त्याच्यात आचरणाचे नियम होते. हा धर्म भारतातून निघून चीन, जापान व मंगोलियापर्यंत प्रसार पावला. या धर्माचे धर्मगुरू वेगवेगळ्या देशांत जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचे. याच्या काही शतकानंतर ख्रिश्चन धर्म उदयास आला. हजरत ईसा (अलैहि.) इस्लामचे शिक्षण घेऊन आले होते. परंतु, लोकांनी त्यांच्यानंतर ख्रिश्चन हा अपूर्ण धर्म बनवला. व ख्रिश्चन लोकांनी हा धर्म अफ्रिका, युरोप व दूरदूरच्या प्रदेशांत हा धर्म प्रसारला. यावरून असे लक्षात येते की जग स्वतःला यावेळी एक सर्वांसाठी असलेल्या धर्माची मागणी करत होता. यासाठी त्यांनी अपूर्ण धर्मांचाही स्विकार केला व त्याचा प्रसार केला. क्रमशः...


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल, 

लातूर 

9860551773



पवित्र कुरआनच्या शिकवणी येण्याआधी, अरबस्थानात विविध जाती-जमातींची व्यवस्था होती. प्रत्येकास आपल्या जमातीवर निष्ठा होती. संघटित समाज नव्हता. समाजाचे काही मापदंड विशिष्ट परंपरेवर आधारलेले होते. यासाठी सामाजिक, भौगोलिक सीमा, साधने, अर्थव्यवस्था, भावनात्मक आणि बौद्धिक परिमाण असावे लागते. यातला एकही निकष तत्कालीन अरब समाजाला लागू नव्हता. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सुरुवातीला समाजजीवनाच्या सुधारणेचे कार्य हाती घेतले. पवित्र कुरआनच्या मागदर्शक तत्त्वांनुसार शून्यातून नव्या समाजाची उभारणी करायची होती. त्या काळी अरबस्थानात सामूहिक जीवन नगण्य होते. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक जीवन जगत असे. म्हणून प्रेषितांनी वैयक्तिक जीवनात सुधारण घडवून आणल्या. पारंपरिक रुढी-श्रद्धांना तिलांजली दिली. यासाठी प्रेषितांना त्यांना आध्यात्मिक प्रशिक्षण द्यावे लागले. त्यांना पावन आणि पवित्र काय हे सांगिलते. अनिष्ठ रुढी-परंपरा नष्ट केल्या. प्रेषितांनी ज्या शिकवणी त्यांना देण्यास सुरू केली त्यांचा प्रभाव अनुयायांवर अनन्यसाधारण पडला. ते प्रेषितांकडे येऊन आपला गुन्हा कबूल करायचे आणि त्यांना पावन करण्यास प्रेषितांकडे विनंती करायचे. एका अनुयायीचे उदालरण असे की ते एकदा प्रेषितांचकडे आणि म्हणाले, मी चुकलो. माझ्याकडून व्यभिचार झाला आहे. मला शिक्षा करा. प्रेषितांनी त्यांना तीन वेळा परत पाठवले. त्यांच्या कुटुंबियांना विचारले असता ते म्हणाले की ते व्यवस्थित आहेत. परत चौथ्यांदा जेव्हा ते प्रेषितांकडे आले तेव्हा त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. एका महिलेचेदेखील असेच उदाहरण आहे. तिच्याकडूनही अशाच स्वरूपाचा गुन्हा घडला होता. त्यांनी प्रेषितांकडे शिक्षा करण्याची विनंती केली. प्रेषित म्हणाले, मूल जन्माला आल्यानंतर या. जन्मलेले मूल कडेवर घेऊन त्या परत आल्या. प्रेषित म्हणाले, हे बाळ जेव्हा अन्न खाऊ लागेल तेव्हा या. त्या परत गेल्या आणि दोन वर्षांनी मुलाच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन परत आल्या आणि प्रेषितांकडे हट्ट धरला की आता तरी मला शिक्षा करा. आणि मग प्रेषितांनी त्यांना शिक्षा दिली – तीच मृत्युदंडाची! म्हणजे प्रेषितांचे अनुयायांना पवित्र जीवन जगण्याची किती उत्कटता होती हेच या उदाहरणांवरून दिसून येते. मापतोल करताना पुरेपूर मापून द्या. तोलताना प्रामाणिक राहा. जे तुम्हाला माहीत नाही अशा गोष्टीमागे पडू नका. ऐकणे, पाहणे आणि मनात ठेवणे या सर्वांविषयी विचारले जाईल. पृथ्वीवर उद्दामपणे संचार करू नकोस, तुम्ली पर्वतांएवढी उंची गाठू शकत नाही की धरतीला दुभंगू शकणार नाही. (संदर्भ – पवित्र कुरआन, १७)

नातीप्रधान समाजव्यवस्था

पवित्र कुरआनच्या शिकवणीनुसार समाजव्यवस्था न पुरुषप्रधान आहे न स्त्रीप्रधान. इस्लामी समाजव्यवस्था नातीप्रधान आहे. या नात्यांच्या केंद्रस्थानी पहिले स्थान मातेचे आणि दुसरे पित्याचे. अल्लाहने मानवांची निर्मिती एका पुरुष आणि एका स्त्रीपासून केली. आणि मग त्यापासून संतती चालत येऊन एक समाज निर्माण होतो. या समाजाच्या रचनेत केंद्रस्थानी माता-पिता आणि नंतर रक्ताची नाती, जवळचे नातेवाईस, शेजारी  असे करत हे वर्तुळ विस्तारले जाऊन समाज गोलाकार होतो. धार्मिक विधी, उपासना हे नंतरचे आहेत. पवित्र कुरआननुसार, “तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे केले की पश्चिमेकडे केले हा सदाचार नाही. सदाचार म्हणजे, जे लोक अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, त्याच्या प्रेमापोटी आपल्या संपत्तीतून आपल्या नातलगांना, अनाथांना, निराधारांना आणि जे मागतील त्यांना देणे होय. (२:१७०)” दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की, माता-पित्यांशी औदार्याने वागा, त्यांच्यासमोर ब्र देखील काढू नका. एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला परवानगी द्या जिहादमध्ये सहभागी होण्याची. प्रेषितांनी विचारले, तुमचे आईवडील हयात आहेत? त्यांनी उत्तर दिले, होय, हयात आहेत. मग प्रेषितांनी आज्ञा दिली की, जा त्यांची सेवा करा, हाच तुमचा जिहाद आहे. प्रेषितांचे सोबती अबू हुरैरा म्हणतात की एका व्यक्तीने प्रेषितांना विचारले, कोण माझ्या सदवर्तनास अधिक पात्र आहे? प्रेषित म्हणाले, तुझी आई. दुसऱ्यांदा त्यांनी विचारले, मग कोण? प्रेषित म्हणाले, तुझी आई. तिसऱ्यांदाही प्रेषितांनी हेच उत्तर दिले. मग त्या व्यक्तीने विचारल्यानंतर चौथ्यांदा उत्तर मिळाले, तुझे वडील. आणखी एका अनुयायींनी विचारले, सर्वोत्तम इस्लाम कोणता? प्रेषित म्हणाले, गरीब आणि वंचितांवर प्रेम करा. लोकांना अडचणीत टाकू नका. त्यांच्यासाठी सुलभता, सहजता निर्माण करा. हाच सर्वोत्तम इस्लाम आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सकारात्मक मूल्यांवर सामाजिक सहिष्णुता परस्परांसाठी संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी निर्माण केली. पवित्र कुरआनने यासाठी दिलेली शिकवण समाजरचनेचा पायाभूत बिंदू होता. अल्लाहने माणसांना एकमेकांशी नातेसंबंध जोडून ठेवण्याचे त्यांच्याकडून वचन घेतले असल्याने जर माणूस अल्लाहने सांगितलेले नातेसंबंध जोडण्याऐवजी ते तोडून टाकत असेल तर मग समाजात अराजकता आणि अनाचार माजेल. याचा अर्थ असा की सामाजिक नातेसंबंध जोपासणे माणसांच्या इच्छेवर सोडलेले नाही तर प्रत्येक माणसाने हे नातेसंबंध जोपासण्यासाठी अल्लाहला वचन दिलेले आहे. हा माणसाने माणसाशी करार केलेला नाही. त्याने आपल्या विधात्याला वचन दिलेले आहे. तसेच हा दोन गटांमधील करार नव्हे. करार करणारे दोघे परस्परांशी काही अटी-नियमांवर करार करत असतात. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला वचन देतो तेव्हा ज्याला वचन दिले जाते ते वचन त्याचा अधिकार असतो. वचन करणाऱ्यास मोडण्याचा अधिकार नसतो. अल्लाहशी वचनबद्धतेमुळेच समाजाचा प्रत्येक घटक प्रामाणिकपणे वागत असतो. कुणी दुसऱ्यावर अन्याय करत नाही. सर्वजण मिळून समाजामध्ये संतुलन कायम राखतात. हे संतुलन राखण्याची जबाबदारीदेखील पवित्र कुरआनद्वारे अल्लाहने माणसावर सोपवली आहे. “या ब्रह्मांडामध्ये जसे संतुलन कायम आहे, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह ठराविक हिशोबाने भ्रमण करतात, उत्तुंग आकाश उभारून त्यास समतोल ठेवले.” त्याच प्रकारे माणसांनी संतुलन कायम ठेवावे. व्यवहारात संतुलन असावे. प्रेषितांनी ज्या मूल्यांवर समाज निर्माण केले ते असे (१) कुणाचा द्वेष करू नका, (२) एकमेकांशी शत्रुत्व बाळगू नका, (३) आपसात हेवेदावे करू नका, (४) आपसातील नाती तोडू नका, (५) एकमेकांशी बंधुभावाने वागा, (६) मुस्लिम एकमेकांचे बांधव आहेत. ते कुणावर अत्याचार करत नाहीत. कुणास एकाकी सोडून देत नाहीत. कुणाचा तिरस्कार करत नाहीत.

- सय्यद इफ्तिखार अहमद



माननीय आएशा (रजि.) सांगतात,

एकदा रात्री पैगंबर मुहम्मद (स.) बिछान्यावर न दिसल्याने मी त्यांना शोधू लागले. माझा हात त्यांच्या तळपायावर पडला तेव्हा ते सजदा करत होते (नतमस्तक) आणि म्हणत होते,

‘‘हे अल्लाह! मी तुझ्या प्रकोपापासून सुरक्षित राहण्यासाठी तुझ्या प्रसन्नतेचा आधार घेत आहे. तुझ्या यातनेपासून सुरक्षित राहण्यासाठी तुझ्या क्षमादानशीलतेच्या आश्रयाला येत आहे आणि तुझ्या पकडीतून वाचण्यासाठी तुझ्याच शरणात येत आहे. माझ्यात हे सामर्थ्य नाही की मी तुझी पूर्ण स्तुती करावी. तू असाच आहे जसा की तू स्वत:ची स्तुती आणि प्रशंसा करतो.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या प्रार्थनेचे हे शब्द समजून घेण्यासाठी पर्याप्त आहेत की पैगंबरांचे पवित्र हृदय कोणकोणत्या भावविश्वाने परिपूर्ण होते आणि पैगंबर ईशभयाने किती अधिक प्रमाणात भीत होते!



2015 च्या एका अभ्यासानुसार संपूर्ण जगात जवळपास 180 कोटी इस्लामधर्मीय आहेत. म्हणजे विश्व लोकसंख्येच्या 24.1% इस्लामधर्मीय मुस्लिम लोक जगाच्या विविध देशामध्ये आपली आस्था टिकवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. विश्वातील बहुतांश देशात कमी-अधिक प्रमाणात मुस्लिमांचे अस्तित्व आहे. या साऱ्या मुस्लिमांमध्ये  समान असलेले धागे म्हणजे- त्यांची केवळ अल्लाहवर असणारी श्रद्धा, त्यांचा एक प्रेषित-मुहम्मद(स.अ.स.) , त्यांचा धर्म इस्लाम,त्यांचा एकच ग्रंथ कुरआन मजीद आणि त्यांच्यामध्ये समान असलेल्या काही सांस्कृतिक बाबी.  

        जगभरात मुस्लिम व्यक्ती कुठेही रहात असली तरी काही बाबींचा अवलंब आपल्या जीवनात नकळत करत असते. विश्वातील सारेच मुस्लिम ज्या समान बाबींनी जोडले गेले आहेत, आणि आपल्या दैनंदिन जीवनात इस्लाममुळे ते ज्या गोष्टी सहजपणे करत असतात त्या गोष्टी इतर धर्मीयांना माहीत नाहीत. मुस्लिमांच्या बाबतीतल्या अशा अनेक गोष्टींचा उहापोह या लेखाद्वारे करण्याचा मानस आहे.

कलमा

जगातील सारेच मुस्लिम एकमेकांशी एका विधानाने (लाईलाहा ईल्लल्लाह मुहम्मदुर्रसुल्लुल्लाह) जोडले गेले आहेत, यालाच कलमा असे म्हटले जाते. म्हणजे जगातील सर्व मुस्लिमांच्या या गोष्टीवर विश्वास असतो की अल्लाह शिवाय उपासने योग्य कोणीच नाही आणि मुहम्मद (स.अ.स) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. मुसलमान फक्त अल्लाहची उपासना करतात आणि प्रेषितांना अल्लाहचा संदेश मानवजातीला सांगणारे दूत मानतात.

कुरआन मजीद आणि रिहाल

साधारणपणे जगातल्या सर्व मुस्लिम घरात  कुरआन मजीदची अरबी भाषेतील प्रत असते. तर काही जणांच्या घरी या प्रतीशिवाय स्थानिक भाषेतील कुरआन मजीदच्या भाषांतराची प्रत असते. हा ग्रंथ घरातल्या उंच आणि सुरक्षित ठिकाणी लाकडाच्या किंवा पीव्हीसीच्या फोल्ड होऊ शकणाऱ्या बैठकीवर ठेवले जातो ज्याला रिहाल असे म्हणतात. लहान मुलांकडून किंवा इतर कोणाकडूनही  कुरआन मजीदची बेअदबी होणार नाही याची प्रत्येकाकडून खास काळजी घेतली जाते. प्रत्येक मुस्लिम घरात  कुरआन मजीदची  प्रत असली तरी आपल्या मुलीच्या लग्नानंतर सासरी जाताना तिला कुरआन मजीदची एक प्रत,रिहाल आणि मुसल्ला दिला जातो. कुरआन मजीदचे पठण झाल्यानंतर पठण करणारी व्यक्ती कुरआन मजीद बंद करून ठेवण्याआधी त्याचा अत्यंत आदराने मुका घेते, डोळ्यांना लावते, कधी-कधी आपल्या छातीशीही घट्ट धरते.

मुसल्ला

  प्रत्येक मुस्लिम घरात किमान  एक मुसल्ला किंवा ज्याला जानमाज म्हटले जाते ते असतेच. हा मुसल्ला फक्त नमाज  पढण्यासाठी असतो. मुसल्ला  कापडी, चटईचा अथवा गालिचाच्यारुपात  असतो. कुटुंब कितीही गरीब असले तरी त्या मुस्लिम घरात कुरआन मजीदची प्रत आणि मुस्सल्ला हमखास असतो. या लहान चटईवर,कापडावर किंवा छोटेखानी गालिचावर घरात नमाज पढली जाते. घरातील महिलाही या मुसल्ल्यावर नमाज पढतात,आणि पुरुषही सुन्नत किंवा नफील नमाज याच जानमाजवर  पढतात. अनेक घरात एकापेक्षा जास्त जानमाज आढळतात. अनेकदा नातेवाईक, आप्त, मित्रमंडळी जेव्हा हज यात्रेस जातात तेव्हा आपल्या जवळच्या लोकांसाठी भेट म्हणून जानमाज आणतात. मुसल्ला किंवा जानमाजचा वापर फक्त नमाज पढण्यासाठीच केला जातो, नमाज  व्यतिरिक्त आणखी कशासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. प्रत्येक मुलीच्या लग्नातही सासरी जाताना तिला माहेरकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये जानमाज दिला जातोच.

किबला

                 मक्का या सौदीअरबस्थित शहरास इस्लामधर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी मस्जिद अल-हरम म्हणजेच काबा ही वस्तू आहे. ही जगातील पहिली मस्जिद म्हणून ओळखली जाते. यालाच अल्लाहचे घर असेही संबोधले जाते. ही वास्तू चौकोनी असून अंदाज़े 42ु 36 फूट इतकी असून या वास्तुची उंची 43 फूट इतकी आहे. ही वास्तू काळ्या दगडांनी बांधलेली आहे. या वास्तूस एक दरवाजा असून ती आतून पूर्णपणे रिकामी आहे. ही मस्जिद असुन प्रेषित इब्राहिम (अ.स)यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. ही मस्जिद विश्वाच्या मधोमध आहे आणि विश्वातील सारे मुस्लिम या मस्जिदला आपला किबला मानतात. किबला म्हणजे ज्याकडे तोंड करून नमाज पढली जाते ती दिशा. जगातील सर्व मुसलमान म्नक्यातील काबा या किबला असलेल्या वास्तूकडे तोंड करून नमाज पढतात. आशियातील मुस्लिम पश्चिमेला तोंड करून तर पश्चिमेकडील राष्ट्रातील मुस्लिम पूर्वेकडे म्हणजे मक्का कडे तोंड करून नमाज पढतात.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणताही मुस्लिम काबाकडे पाय करून कधीही झोपत नाही. त्याच प्रमाणे कोणत्याही मुस्लिम घराची रचना अशा प्रकारे केली जाते की ज्यामध्ये स्वच्छतागृह कधीही काबाकडे तोंड करून असत नाही. म्हणजेच मुस्लिम स्त्री-पुरूष शुचिर्भूत होतांना काबाकडे कधीही तोंड करत नाहीत. ते कधीच मल-मूत्र विर्सजन काबाकडे तोंड करून  करत नाहीत किंवा ते त्याकडे तोंड करून कधीही थुंकतही नाहीत.

दस्तरखान                   

 बहुतेक मुस्लिम कुटुंब शक्यतो सर्वजण  एकाचवेळी एकत्र बसून आपले भोजन करतात आणि शक्यतो जमिनीवर बसूनच आपले अन्नग्रहण करतात.  जेवताना ते शक्यतो एकमेकांसमोर बसतात, आणि त्याच्यामध्ये जे कापड अथंरले जाते त्यास दस्तरखान असे म्हणतात, हे दस्तरखान नेहमी स्वच्छ ठेवले जाते. बहुतेक वेळा हे कापड लाल रंगाचे असते. या कापडावरच जेवतांना ताटे ठेवली जातात. शक्यतो सारे कुटुंबिय स्त्री असो की पुरूष आणि मुलेही  एकत्रपणे जेवण करण्याचा  प्रयत्न करतात.  अनेकदा   एका ताटात बसून जेवले जाते. अशाने बरकत येते आणि आपसातील प्रेम वृध्दिगंत होते अशी मुस्लिमांची आस्था आहे.  मुस्लिम लोक एकत्र जेवताना एकमेकाचे उष्टे आहे असे काही मानत नाहीत. आणि ताटात उष्टे अन्नही सोडत नाहीत. अनेकदा दस्तरखानवर पडलेले अन्नही उचलून खाल्ले जाते. अनेकदा पेल्यात पिऊन राहीलेले पाणी दुसरी व्यक्ती त्यातच पाणी टाकून पिते ते पाणी उष्टे आहे असे समजले जात नाही.

सलाम

प्रत्येक मुस्लिम एकमेकांशी बोलण्याआधी अस्सलामु अलैकुम अर्थात तुमच्यावर (अल्लाहची) शांती असो असे अभिवादन करतात. प्रत्येकजण आधी अभिवादन करण्यात पुढाकार घेतो. मग समोरचा व्यक्ती वयाने,मानाने लहान असली तरी कमीपणा वाटून घेत नाही. ओळख असो वा नसो समोरील व्यक्ती मुस्लिम आहे असे वाटल्यास त्या व्यक्तीस तो सलाम करतोच. अशा प्रकारे ते शांतीचा संदेश पसरवत असतात. लहान-लहान मुलेही घरात प्रवेश करतांना सलाम करतात. खरेतर सलाम करणे ही प्रेषित मुहम्मद(स.अ.स) यांची प्रथा आहे. परंतु एखाद्याने सलाम केल्यास त्यास व अलैकुम सलाम अर्थात तुमच्यावरही (अल्लाहची) शांती असो असे प्रतिउत्तर देणे अनिवार्य असते. म्हणजेच दोन व्यक्ती जर एकमेकांशी अबोल्यामध्ये असतील आणि त्यातील एकाने सलाम केला तर दुसऱ्याला त्यास उत्तर देणे अनिवार्य ठरते. सलाममुळे अबोला, दुरावा कमी होण्यास मदतच मिळते.

  आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणत्याही देशातील मुस्लिम एकमेकांना अस्सलाम अलैकुम असेच अभिवादन करतात. फारफार तर अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाही व बरकातुहू  अर्थात तुमच्या वर (अल्लाहची)  शांती असो,अल्लाहची दया आणि आशीर्वाद असो असे प्रति उत्तर देतात.

            

इस्तिंजां

  इस्तिंजा  म्हणजे शुचिर्भूत होणे. अनेकदा आपण मुतारी मध्ये जातो तेव्हा सार्वजनिक मुतारीत काही वेळेला आपणास वीटकराचे  तुकडे आढळतात.  हे तुकडे कोण कशासाठी ठेवतो या प्रश्नाचे उत्तर असे आहे की- प्रत्येक मुस्लीम स्त्री-पुरुष जो पाच वेळा नमाज पडतो त्यास शुचिर्भूत राहणे आवश्यक असते.

     त्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुष खाली बसूनच मूत्र विसर्जन करतो. मुत्राचे थेंब आपल्या अंगावर, कपड्यांवर उडू देत नाही. कारण ज्या वस्त्रांवर मुत्राचे थेंब पडलेले आहेत त्या वस्त्रानिशी नमाज पढता येत नाही. त्यामुळे नमाज पढणारी प्रत्येक व्यक्ती मूत्रविसर्जना नंतर प्रत्येक वेळी आपली मूत्र विसर्जनाची जागा मूत्र विसर्जना नंतर पाण्याने धुवून स्वच्छ करते. त्यामुळे नमाजी मुस्लिम अशा ठिकाणीच मूत्रविसर्जन करण्याचा प्रयत्न करतात ज्या ठिकाणी पाण्याची सोय असते. परंतु जेव्हा केव्हा नमाजी पुरुषाला मूत्रविसर्जन करणे आवश्यक आहे असे वाटते तेव्हा सार्वजनिक ठिकाणी पाणी नसल्यास तो वीटकराच्या तुकड्यांचा  वापर करतो. मुत्राचा अखेरचा थेंब जो शिश्नाच्या टोकास असतो तो थेंब अंगावर, कपड्यावर पडू न देता वीटकराच्या तुकड्याने  टिपून घेतला जातो. मुस्लिम नमाजी स्त्री-पुरुष  वैयक्तिकरित्या किती स्वच्छ असतात हे यावरून लक्षात येते. ही बाब बहुतेक इतर धर्मीयांना माहिती नसते.

गुस्ल 

गुस्ल म्हणजे आंघोळ करणे. परंतु ही आंघोळ साध्या अंघोळी सारखी नसते. केवळ डोके आणि अंगा-खांद्यावर पाणी घेणे म्हणजे गुस्ल नव्हे. जेव्हा-केव्हा पुरुषाला वीर्यस्खलन होते,  एखाद्या स्त्रीस मासिक पाळी येते किंवा पती-पत्नीच्या समागमाने वीर्यस्खलन होते तेव्हा असे स्त्री-पुरुष धार्मिकदृष्ट्या अपवित्र किंवा अशुद्ध होतात. अशा स्थितीत गुस्ल केल्याशिवाय नमाज पढता येत नाही.  कुरआन मजीदचे पठण करता येत नाही. त्यामुळे अशा अशुद्ध किंवा अपवित्र  स्त्री-पुरुषांना गुस्ल  करणे अनिवार्य असते. गुस्ल  करण्याआधी मनात अशी नियत करणेही आवश्यक असते की - हे अल्लाह मी अपवित्र किंवा अशुद्ध आहे मला या गुस्लने शुद्ध आणि पवित्र कर. गुस्ल  करताना सर्व शरीर पाण्याने ओले व्हायला हवे. सर्व अंग पाण्याने भिजायला हवे. अंगावरचा एकही केस सुका राहता कामा नये.  नापाक अपवित्र किंवा अशुद्ध असलेली व्यक्ती गुस्ल  केल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नाही. अनेकदा मुस्लिम मंडळी जुमा के जुमा अंघोळ करतात असे म्हणून त्यांना हिणवले, चिडवले जाते. परंतु एक बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सर्व जगाच्या पाठीवर मुस्लिमांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या प्रदेशांची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळी असते . कुठे कुठे प्रचंड उकडा आणि कडक ऊन्ह  असते  तर काही प्रदेशात गोठवणारी थंडी असते. कडाक्याच्या थंडीत राहणारे लोक रोज आंघोळ करतीलच असे नाही. परंतु  प्रेषितांच्या आदेशानुसार कितीही थंडी असली तरीही नापाक अशुद्ध /अपवित्र झाल्यास गुस्ल अत्यावश्यक असते. त्याच प्रमाणे दर शुक्रवार या दिवशी गुस्ल करणे अनिवार्य असते. तसेच ईदच्या दिवशी ही गुस्ल करणे आवश्यक असते.

वुजू 

      कोणत्याही मशिदीत प्रवेश केल्यास त्या ठिकाणी चार कक्ष हमखास असतात. यामध्ये तहारतखाना (स्वच्छतागृह), गुस्लखाना( स्नान कक्ष), वुजूखाना आणि नमाज पढण्याचा कक्ष असतो. नमाज पढण्याआधी काही अटींचे पालन करावे लागते त्या म्हणजे - ती व्यक्ती पाक असावी, नापाक नसावी. वीर्यस्खलनाने, समागमाने, मासिकपाळीने अशुद्ध अपवित्र नसावी. त्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत त्यावर मल-मूत्राचे, वीर्याचे किंवा रक्ताचे डाग नसावेत. त्याचबरोबर नमाज पढण्याआधी त्या व्यक्तीने वुजू केलेले असावे. म्हणजे नमाज पढण्या आधी किंवा कुरआन पठण करण्याआधी पाक साफ असणे अनिवार्य असते.

         वुजू करताना आधी दोन्ही हात मनगटापर्यंत धुतले जातात, तीन वेळा चूळ भरून तोंड स्वच्छ केले जाते. त्यानंतर तीन वेळा नाक आतून स्वच्छ केले जाते. मग तीन वेळा संपूर्ण चेहरा धुतला जातो. मग कोपरापर्यंत दोन्ही हात तीन वेळा धुतले जातात. हे केल्यानंतर दोन्ही हातात पाणी घेऊन ओले हात डोक्यावरून मानेपर्यंत फिरवले जातात व दोन्ही कानांची छिद्रे आणि कानामागील जागा हाताने स्वच्छ केली जाते. सर्वात शेवटी आधी उजवा पाय आणि मग डावा पाय घोट्यापर्यंत स्वच्छ धुतला जातो. नमाज पूर्वी स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेस वुजू असे म्हणतात. म्हणून प्रत्येक मशिदीत नमाज पढणाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची आणि वुजू करण्याची व्यवस्था असतेच असते. 

एकच नमाज पद्धत

इस्लाम धर्मियांमध्ये वेगवेगळे पंथ असले तरी हे सर्व लोक फक्त अल्लाहलाच  पूजनीय मानतात. प्रेषित मुहम्मद( स. अ. स.) यांना अखेरचे प्रेषित मानतात. इस्लामधर्मीय उपासक अल्लाह शिवाय इतर कोणाचीही उपासना करत नाहीत.  कोणाच्या पायावर आपला माथा टेकत नाहीत. या साऱ्यांचा कयामत (महाप्रलय) वर ठाम विश्वास असतो आणि या कयामतच्या दिवशी सर्व मानवांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब  होईल यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. कयामत नंतरचे मरणोपरांत जीवन हे कधीही न संपणारे असून आपल्या ईहलोकातील जीवनात आपण केलेल्या पाप-पुण्यानुसार जन्नत (स्वर्ग) किंवा  जहन्नम (नरक) मध्ये आपण पाठवले जाणार आहोत यावर त्यांची दृढ श्रद्धा आणि विश्वास असतो. इस्लामधर्मीय सर्व पंथाचे लोक नमाज, रोजा, जकात आणि हजयात्रा याद्वारे अल्लाहची उपासना करतात. 

        कोणताही मुस्लिम मग तो कोणत्याही देशात असो किंवा कोणत्याही भाषेचा असो तो नमाज पढताना संपूर्ण नमाज अरबी भाषेतूनच पढतो. त्यासाठी त्याला कुरआन मजीदमधील छोटे छोटे का  असेना किमान दहा सूरह (प्रकरण) तरी मुखोद्गत असायला लागतात. नमाज नंतर मागितली जाणारी दुआ मात्र तो आपल्या भाषेत मागू शकतो. परंतु नमाज मात्र जगात सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अरबीत पढली जाते. नमाज पढताना हात छातीवर बांधायचे  की पोटावर यात मतभेद असू शकतात. 

     पण मुस्लिमांच्या अशाप्रकारच्या अनेक बाबी  इतर धर्मियांना माहिती नसतात. अशा अनभिज्ञ असणाऱ्या एकमेकांच्या अनेक गोष्टी माहीत करून घेतल्यास आपले सहजीवन सोपे, सहज आणि सुखकर होईल यात शंका नाही. 

- डॉ. इकबाल मिन्ने

7040791137


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget