Latest Post


माणसांच्या चुकांचे दोन प्रकार आहेत. एक असे कृत्य आणि चुका ज्या अल्लाहच्या अधिकारांविरूद्ध असतात. दुसऱ्या प्रकारच्या चुका म्हणजे ज्या अल्लाहच्या निर्मिती- माणूस असो की पशू-पक्षी, त्यांच्या हक्कांविरूद्ध केल्या जातात. इतर माणसे आणि सजीव निर्मितीच्या हक्कांविरूद्ध जे कृत्य माणसे करतात त्या गुन्ह्यांना अल्लाह क्षमा करत नाही. अशा अपराधांना माफ करण्याचा अधिकार ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार केला गेला असेल त्यांना आहे. माणसाविरूद्ध आणि इतर सजीवांविरूद्ध अत्याचार करणे म्हणजे अल्लाहच्याही अधिकारांचे हनन करणे होय. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की एका माणसाला फक्त या कारणावरून नरकात टाकले जाईल की त्याने एका मांजराला बांधून ठेवले होते. आणि त्याच्या खाण्यापिण्याची सोयदेखील केली नव्हती. एकेठिकाणी प्रेषितांनी असेही सांगितले आहे की जे पशुपक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत नाहीत, प्राण्यांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेतात त्यांना भयंकर शिक्षा मिळेल. झाडांना विनाकारण तोडण्यासही प्रेषितांनी मनाई केली आहे. जर माणसाने कुणास त्रास दिला असेल तर त्याची माफी मागण्याने प्रकरण संपून जाते, मात्र जर कुण्या माणसाने इतरांच्या मालमत्तेवर कब्जा केला असेल, त्यांचे अधिकार त्यांना परत देत नसेल तर फक्त क्षमा मागणे पुरेसे नसून त्यांना त्यांची मालमत्ता परत करावी लागेल. एकमेकांवर रागावण्याचीही मनाई आहे. कुरआनात म्हटले आहे की “जे लोक टंचाईत असोत की त्यांना भरभराट लाभलेली असो, दोन्ही अपस्थांमध्ये अल्लाहच्या निर्मितीवर खर्च करतात, आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करतात, असे लोक अल्लाहला आवडतात.” (कुरआन-३:१३४) श्रद्धावंतांना संबोधून अल्लाह म्हणतो की, “अल्लाहच्या बाजूने न्यायाची साक्ष देण्यास उभे राहा. एखाद्या जनसमूहाशी शत्रुत्व तुम्हाला त्याच्यावर अन्याय करण्यास प्रवृत्त करता कामा नये. न्याय करा, हा सदाचार आहे. अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही जे काही करता अल्लाहला ते माहीत असते.” (कुरआन-५:८)

- सय्यद इफ्तिखार अहमद



आपण म्हणतो की इस्लाम स्वीकारल्यास मनुष्य मुस्लिम बनतो. प्रश्न असा आहे की इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ काय आहे?काय इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की माणसाने केवळ जिभेने सांगावे की मी मुस्लिम आहे अथवा मुस्लिम झालो आहे, तर काय तो मुस्लिम होतो? अथवा इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण पुजारी काहीही अर्थ न समजता उमजता संस्कृतच्या काही मंत्रांचे पठण करतो, तसेच एका मनुष्याने अरबी भाषेतील काही वाक्ये अर्थबोध न होता जिभेने उच्चारले आणि बस्स, तो मुस्लिम झाला? तुम्ही स्वत: सांगा की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही स्वत: म्हणाल की इस्लामचा स्वीकार करण्याचा अर्थ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जी शिकवण दिली आहे तिचा माणसाने समजून उमजून मनापासून स्वीकार करावा आणि त्यानुसार कृती करावी. जो असे करील तो मुस्लिम आहे आणि जो असे करणार नाही तो मुस्लिम नाही.

प्रथम आवश्यकता - ज्ञान

जे उत्तर तुम्ही द्याल त्यावरून आपोआपच हे स्पष्ट होते की इस्लाम प्रथमत: ज्ञानाचे नाव आहे आणि ज्ञानानंतर कर्म अथवा कृतीचे नाव आहे. एखादा मनुष्य ज्ञानाशिवायसुद्धा ब्राह्मण असू शकतो, कारण त्याचा जन्म ब्राह्मण म्हणून झाला आहे आणि तो ब्राह्मणच राहील. एखादा मनुष्य ज्ञान नसतानाही जाट असू शकतो, कारण तो जाट म्हणून जन्मला आहे आणि तो जाटच राहील. परंतु एखादा मनुष्य ज्ञानाशिवाय मुस्लिम असू शकत नाही कारण मुस्लिम जन्मत: मुस्लिम असत नाही तर तो ज्ञानाने मुस्लिम बनतो. जोपर्यंत त्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कोणती शिकवण दिली आहे हेज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तो त्यावर ईमान धारण कसे करू शकेल? आणि त्यानुसार कसे कर्म करू शकेल? आणि जर त्याने समजून उमजून ईमान धारण केले नसेल तर तो कसा मुस्लिम होऊ शकेल? म्हणून अज्ञानासह मुस्लिम असणे आणि मुस्लिम म्हणून राहणे अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य ज्याने मुस्लिमाच्या घरी जन्म घेतला आहे, ज्याचे नाव मुस्लिमासारखे आहे, जो मुस्लिमासारखे वस्त्र परिधान करतो आणि जो स्वत:ला मुस्लिम म्हणवितो, वास्तविकत: तो मुस्लिम नाही. खऱ्या अर्थाने मुस्लिम तर केवळ तो मनुष्य आहे जो इस्लामचे ज्ञान बाळगतो आणि समजून उमजून त्याला मानतो. एक अनेकेश्वरवादी व एक मुस्लिमात मौलिक अंतर नावाचे नाही. तो रामप्रसाद आहे आणि हा अब्दुल्लाह आहे, म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम. अशाप्रकारे एक अनेकेश्वरवादी व एका मुस्लिमात मौलिक फरक पोषाखाचासुद्धा नाही की तो धोतर नेसतो आणि हा विजार घालतो म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम! तर मूळ फरक या दोहोंमध्ये ज्ञानाचा आहे. तो अनेकेश्वरवादी अशासाठी आहे की त्याला माहीत नाही की अल्लाहचा त्याच्याशी व त्याचा अल्लाहशी काय संबंध आहे? त्याला माहीत नाही की सृजनकर्त्याच्या इच्छेनुसार या जगात जीवन व्यतीत करण्याचा सरळमार्ग कोणता आहे? अशीच स्थिती एखाद्या मुस्लिमाच्या मुलाचीसुद्धा असेल, तर तुम्हीच सांगा की त्याच्यात आणि एक अनेकेश्वरवाद्यामध्ये कोणत्या आधारे फरक कराल आणि म्हणाल की तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम आहे?

बंधुनो! हे मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि शांत मनाने यावर विचार करा. हे चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजे की अल्लाहची ही सर्वांत मोठी देणगी आहे ज्यावर तुम्ही आभार व कृतज्ञता व्यक्त करता ती प्राप्त होणे अथवा प्राप्त न होणे, हे ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञान नसेल तर ही देणगी त्याला प्राप्तच होऊ शकत नाही. समजा थोडी बहुत प्राप्तसुद्धा झाली तर अज्ञानामुळे सदैव ही भीती असते की ही वैभवशाली देणगी त्याच्या हातातून निसटून जाईल. केवळ अज्ञानामुळे तो स्वत:ला मुस्लिम समजत राहील, वास्तविकत: तो मुस्लिम नसेल. ज्या माणसाला ही जाणीवच नसेल की इस्लाम व अनेकेश्वरवादात काय फरक आहे आणि इस्लाम व बहुदेववादात काय अंतर आहे, त्याची स्थिती तर अगदी अशी आहे जणू एखादा मनुष्य अंधारात एखाद्या पायवाटेवरून चालत आहे. सरळ रेषेवर चालता चालता स्वत: त्याचे पाय एखाद्या अन्य मार्गाकडे वळणे शक्य आहे आणि त्याला सरळ मार्गावरून भटकल्याची कल्पनासुद्धा येत नाही. असेसुद्धा शक्य आहे की मार्गात एखादा धोकेबाज उभा असेल आणि त्याने म्हणावे की तुम्ही अंधारात मार्गावरून भटकला आहात, या मी तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत पोहचवितो. बिचारा अंधारातून प्रवास करणारा स्वत:च्या डोळ्याने पाहू शकत नाही की सरळमार्ग कोणता आहे. म्हणून तो अज्ञानाने आपला हात त्या धोकेबाजाच्या हातात देईल आणि तो त्याला मार्गभ्रष्ट करून कोठल्या कोठे घेऊन जाईल. त्या माणसाला या अडचणी तर अशासाठी येतात की त्याच्या स्वत:जवळ कोणताही प्रकाश नाही आणि तो स्वत: आपल्या मार्गावरील खुणा पाहू शकत नाही. त्याच्याजवळ प्रकाश असता तर हे स्पष्ट आहे की तो मार्गही चुकला नसता आणि त्याला दुसरा कोणी मार्गभ्रष्टही करू शकला नसता. बस्स! याच्यावरूनच कल्पना करा की मुस्लिमासाठी सर्वांत मोठा जर कोणता धोका असेल तर हाच आहे की तो स्वत: इस्लामच्या शिकवणींपासून अनभिज्ञ आहे, स्वत:ला हे माहीत नाही की पवित्र कुरआन काय शिकवितो आणि प्रेषित मुहम्मद (स.) कोणता आदेश देऊन गेले आहेत? या अज्ञानामुळेच तो स्वत:ही मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि दुसरे धोकेबाजसुद्धा त्याला मार्गभ्रष्टकरू शकतील. परंतु त्याच्यापाशी ज्ञानाचा प्रकाश असेल तर तो जीवनाच्या प्रत्येक पावलावर इस्लामचा सरळमार्ग पाहू शकेल, प्रत्येक पावलावर अनेकेश्वरवाद, बहुदेववाद, मार्गभ्रष्टता, दुष्कृत्य आणि दुराचाराचे जे वक्र-मार्ग मध्ये येतील ते ओळखून त्यांच्यापासून अलिप्त राहू शकेल, जो कोणी मार्गभ्रष्ट करणारा रस्त्यात त्याला आढळेल त्याचे ऐवूâनच तो या निष्कर्षाप्रत पोहचेल की हा मनुष्य मार्गभ्रष्ट करणारा आहे, याचे अनुयायित्व स्वीकारणे चुकीचे आहे.



माननीय अली (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

अबू जहलने पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितले, ‘‘हे मुहम्मद (स.)!आम्ही कुरैश लोक तुम्हाला खोटे ठरवित नाही. आम्ही तर त्यास खोटे ठरवित आहोत ज्यास तुम्ही घेऊन आला आहात.’’


स्पष्टीकरण

अर्थात आम्हांवर तुमचे सत्य प्रकाशमान व दिवसाच्या उजेडाइतके स्पष्ट आहे. आम्ही कधीही तुम्हाला खोटे बोलताना ऐकले नाही. लोकांत सत्यवादिता व अमानतीच्या दृष्टीने तुम्ही ओळखले जाता. आम्ही खरेतर तुमचा ग्रंथ व शरीयतला अमान्य करतो. आम्ही त्या दिव्य अवतरणाला स्वीकारत नाही ज्यास तुम्ही प्रस्तुत करीत आहात.

कदाचित! सत्यविरोधकाला हे समजले व उमजले असते की जो मनुष्य या जगाच्या मामल्यात लोकांशी खोटे बोलू शकत नाही तो धर्माच्या मामल्यात खोटे कसे बोलेल? ज्या मनुष्याची स्पष्ट विशेषता ही सत्यवादिता आहे तो ईश्वराशी एखादी खोटी गोष्ट कशी संबोधित करील?

खरेतर मक्का येथील कुरैशचे मोठमोठे सरदार ईर्षा, द्वेष, अहंकार व पूर्वग्रहदूषित होते, ज्यामुळे सत्य स्वीकारणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.



त्याचे नाव घेतले की अंगावर शहारे येतात. बहुतांश लोक त्याचे नाव घेणेही पसंत करत नाहीत. किंबहुना अधिकतर लोक भयभीत होतात यातही महिलांची आघाडी आहे. 

मृत्यूला जरी माणूस पसंत करत नसेल तरी माणसाला मृत्यू येणारच. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यापासून माणसाला सुटका नाही. हे माहित असतानाही आपण गाफील असतो. मृत्यूनंतर काय? हा प्रश्न सहसा आपल्याला पडत नाही का? आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या, जीवनाची अगदी मायक्रोप्लानिंग करतात. पण जगणं संपल्यानंतर काय? याला काहीच महत्त्व देत नाही, याची प्लानिंग करायची असते हे ही पुष्कळ लोकांना माहित नसते. कोणी मरण पावलं की आपल्याला थोडसं दुःख होतं, जवळची व्यक्ती असली की जास्त दुःख होते. हे दुःख सहसा तीन दिवस ताजे राहते. पुन्हा आपण हळूहळू त्या व्यक्तीला विसरून जातो. एक वर्ष गेले की असं वाटतं ती व्यक्ती कित्येक वर्षांपासून आपल्यापासून लांब गेली आहे. 

कोरोनाच्या आधी आपल्याला कोठे जायचे झाल्यास आपण किती योजना करत होतो आठवते ना? कोणी जायचे? कधी जायचे? कसं जायचे, किती दिवस राहायचे? सोबत काय घेवून जायचे? शिदोरीला काय करायचे? परत येताना काय आणायचे? अश्या अनेक प्रश्न आपल्याला पडत होते. मृत्यूही दुसऱ्या जीवनाचा एक प्रवास आहे. अशीच योजना आपल्याला मृत्यूची करायची आहे, कारण कधी जावं लागेल? कसं जावं लागेल? आपली किती मानसीक व अध्यात्मीक तयारी करायची आहे हे आपल्याला काहीच माहित नाही.

मृत्यू म्हणजे कम्पलसरी ए्नप्लोजन. बळजबरीने आपल्याला या जीवनापासून त्या जीवनात घेवून जाणे, खुशीने अथवा नाखुशीने जायचे मात्र आहेच. मृत्यू हा जीवनाचा अंत  नसून एक नव्या जीवनाची सुरूवात होय. मृत्यू असा प्रतिस्पर्धी आहे ज्याच्याशी संघर्ष करताना शेवटी पराजयच आपल्या नशीबी येतो. मृत्यूशी काही वेळा आपल्याला जिंकल्यासारखे वाटत जरी असले तरी एक न एक दिवस आपण हारणारच.

मृत्यू असे द्वार आहे ज्याच्यातून प्रत्येकाला जायचेच आहे. मलीकलमौत कधीच आपली परवानगी घेवून येत नाहीत की कोणाच्या अडचणीची काळजी करत नाहीत. न सांगता कधीही मृत्यू येवू शकतो म्हणून अत्यंत हुशार आहे ती व्यक्ती जी आपल्या प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून चांगले आचरण करते. 

खरोखर जीवंत कोण? 

जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूमध्ये आपला मृत्यू बघते म्हणजेच जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूपासून शिकते तीच खरोखर जीवंत होय. मरणारे मेले पण आपल काय? 

आपल्यालाही एक दिवस मरण येईल आणि जग सोडून जावे लागणार म्हणून हे निश्चित केले पाहिजे की आपल्या मृत्यूनंतर लोक आपली आठवण काय म्हणून करतील त्या प्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करावे. उदाहरण जर आपल्याला वाटत असेल की मेल्यानंतर मला सत्यवादी म्हणून ओळखले जावे तर ’’खोटं ’’ हे शब्द आपल्या जीवनाच्या शब्दकोषातून काढून टाकले पाहिजे. जर तुम्ही लोकहितचिंतक म्हणून ओळख बनवू इच्छितात तर लोककल्याणाच्या कामाला जीवनाचा उद्देश बनवायला हवे. पण हे सगळे करताना लोकांसाठी नाही तर अल्लाहला खुश करण्याची नियत ठेवली पाहिजे. अन्यथा लोकतर खुश होतील पण अल्लाहच्या दरबारी ते स्वीकार होणार नाही. 

मनुष्य आपली सगळी शक्ती खर्च करून जास्तीत जास्त पैसे कमाविण्यासाठी प्रयत्न करत असतो. का तर सुख उपभोगण्यासाठी? पण खरोखर तो खुश असतो का? त्याला सुख मिळते का? क्षणिक सुख मिळाले तरी डिप्रेशनमध्ये जाणे, मानसीक ताण जे सावरता न आल्याने आत्महत्या करून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. 

माणूस आपल्या लेकरांच्या तेजस्वी भविष्यासाठी स्वतः झीजत असतो. तेवढ्यातच मृत्यू येतो आणि त्याला अशा भविष्याकडे नेतो ज्याची त्याने काहीच तयारी केलेली नसते. माणूस जास्तीत जास्त जीवन जगण्याची इच्छा बाळगतो परंतु, मृत्यू त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी सज्ज असतो. 

कोणाची पदवी, कोणची लोकप्रियता, कोणाचे ऐश्वर्य, कोणाची सत्ता, काही म्हणजेच काहीच त्याला मृत्यू पासून वाचवू शकत नाही. जीवंत लोकांसाठी मृत्यू हे एक रिमायंडर आहे. 

आपण वाढदिवस साजरा का करतो? 

आपल्याला वाटते आपण मोठे झालो पण खऱ्या अर्थाने काय होते? एक एक वर्षे आपण जुनं होतो, मृत्यूच्या एक वर्ष जवळ जात असतो. आपण साजरा करत असलेल्या वाढदिवस पार्टीमध्ये मृत्यूही येवून जणू आपल्याला सांगत असतो की, तू तुझ्या नातेवाईक, मित्र मैत्रीण पासून एक वर्ष लांब गेला आणि माझ्या एक वर्ष जवळ आला आहेस. पण ही बाब आपल्या लक्षात येत नाही तर आपण मोठे झाल्याच्या भ्रमात मृत्यूचे सिलेब्रेशन करत असतो.

खरंतर आपण विचार केला पाहिजे की माझे वय एवढे झाले आणि मी काय चांगले काम केले आहे? दुसऱ्यांसाठी ? स्वतःसाठी तर जनावरे जगतात, माणसाला ईश्रवाने जनहितासाठी निर्माण केले आहे. बसून विचार करा कधी कुण्या गरीब परिवाराची मदत आपण केली आहे का? आपल्या नातेवाईकांपैकी कोणी गरजवंत तर नाही? कोणी दुःखी तर नाही? त्यांची विचारपूस करण्याचा विचार आपण केला आहे का? रंजले, गांजलेल्यांसाठी आपले नियोजन काय आहे? कधी समाजात रूजलेल्या रूढी, परंपरा पासून माणसाला मुक्त करण्याचा विचार आपण केला का? जेवढा खर्च आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी करतो तेवढा कुण्या गरजवंताला देऊन पहा मनास समाधान वाटेल नक्कीच.

आपण लहान असताना शाळेत मातीचा प्रकार शिकलेले असतो आठवते ना? पण मोठे झाल्यावर ते सगळे विसरून माणसाला दोन प्रकार दिसतात. 1. उभी माती 2. आडवी माती. आणि माणसाचा पैसा, वेळ हे सर्व आडव्या मातीला उभारण्यात खर्च होत असते म्हणजेच माणूस घर बांधणीवर त्याच्या डेकोरेशनवर खूप लक्ष देत आहे पण कधी विचार केला का एवढा खर्च करून बांधलेले आलीशान घर, बंगले, महाल सोडून माणूस का बरं जातो (माफ करा त्याला बाहेर काढले जाते)

श्वास संपला की सारे संपले असे आपल्याला वाटत असले तरी हे जग फक्त एक ट्रेलर आहे. अस्सल चित्रपट तर मेल्यानंतरच सुरू होणार. हे जीवन एक परीक्षागृह आहे. आपल्याला एक ठरावीक वेळ दिलेला आहे. (माहित नाही किती) ती संपताच आपल्याला जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, म्हणून ईश्वराने दिलेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला अगदी अचूक सोडविणे गरजेचे आहे जेणेकरून जेव्हा निकाल समोर येईल तेव्हा आपण यशस्वी व्हावे.

मृत्यू अगोदर माणसाला खूप कामे दिसतात, करायची असतात, पण मृत्यूला याच्याशी काही देणे घेणे नाही, ईश्वराचा आदेश आला आणि यमदूत हजर! आपण म्हणतो एखादी व्यक्ती अपघाताने मेली हे आपल्यासाठी व त्याच्यासाठी अपघात होवू शकते पण हे पूर्णनियोजित असते. आपण जेव्हा आईच्या पोटात असतो. तीन महिन्यानंतर सगळे लिहिले जाते आपण कोठे जन्मनार, काय होणार, कोठे मरणार एवढे की (उर्वरित आतील पान 7 वर)

जेथे मरणार त्या ठिकाणची मातीही आपल्या शरीरात टाकली जाते (आहे ना अद््भूत). मेडिकल सायन्स अजून हे सिद्ध करू शकले नाही हे वेगळेपण एक दिवस जरूर सिद्ध करेन. जसं डीएनएला शोधलं ज्याच्यात आपल्या पूर्ण अस्तित्वाची माहिती असते. माणूस म्हणून ही माणसाची आत्मा नेहमीच राहणार आहे. तिला मरण नाही म्हणून आपल्याला गैरसमज होतो किंवा आपल्याला मृत्यूची आठवण सहसा येत नाही कारण आपल्या डीएनएमध्ये ती कोडिंग नाही. आपण मेल्यानंतर ही मरत नाही फक्त या जगातून त्या जगात प्रवेश करतो. प्रत्येक माणूस चालत आहे, त्याचे चालणे हे मृत्यूवर संपते. मग येथून तो उडायला लागतो, स्वर्ग किंवा नर्काकडे. आपल्याला माहित आहे की मेल्यानंतर पटकन आपल्याला स्वर्गात किंवा नर्कात टाकले जात नाही तर बरजख (एक आड पडदा) आहे. या दुनियेत आणि त्या दुनियेमध्ये. चांगल्या आत्म्यांना इल्लियीन मध्ये आकाशांच्या वर तर वाईट आत्म्यांना सिज्जिन जमीनीखाली ठेवण्यात येते. प्रलयाचा दिवस येईपर्यंत. न्यायनिवाडा होईपर्यंत. 

मृत्यूनंतर काय होते?

1. माणसाचे नाव सर्वप्रथम हरवते, लोक त्याला डेडबॉडी शव (मय्यत) म्हणून ओळखायला लागतात. ज्या नावाला गाजवण्यासाठी त्याने पूर्ण जीवन समर्पित केलेले असते. नमाजे जनाजा अदा करण्यासाठी ’जनाजा आणा’ म्हणतात. माणसाचे नाव घेऊन नाहीत म्हणत. साहेबांना कबरमध्ये घालताना ’मय्यत’ म्हटले जाते. 

2. त्याचा माल वारसदार वाटून घेतात.

3. लेकरं जगविण्यासाठी तो रात्रंदिवस एक करतो. त्याला फक्त कब्रस्तान किंवा स्मशानघाटापर्यंतच साथ देतात. परंतु त्याने केलेली पुण्याई मेल्यानंतरही साथ देते आणि त्याचा मोबदला त्याला मिळणार म्हणून चांगले कर्म करावे हेच आपला खरे इन्व्हेस्टमेंट (निवेश) आहे.

ज्यांना आपण जीवापाड प्रेम करतो ते आपल्याला सोडून का जातात? कोठे जातात? हे असे नियम का आहे? आपण याला मोडू शकतो का? आपली भेट आपल्याला सोडून गेलेल्या आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी वगैरे यांचयशी पुन्हा होऊ शकते. एक मोठी स्पेस निर्माण होते आयुष्यात प्रियजन गेल्यावर भेटावेसे वाटते पण कधी? 

वरील प्रश्नांचे उत्तर :

हे अल्लाहने केलेले नियम आहेत. प्रत्येक सजीवाला मृत्यू येणार म्हणजे येणारच. म्हणूणच आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात. आपल्याला जन्म आणि मृत्यू देणारा अल्लाहच आहे. त्याच्या आदेशाविना कोणी बाळ जन्मू शकत नाही की कोणी मरू शकत नाही. बळजबरीने जसे टाईम ओव्हर झाल्याने उत्तरपत्रिका आपल्यापासून हिसकावून घेतली जाते तशीच मृत्यू येवून आपली आत्मा हिसकावणार. 

हा अल्लाहचा नियम आपण मोडूच शकत नाही. आपली भेट आपल्या पालकांशी व नातेवाईकांशी नक्की होणार आहे म्हणून उदास होऊ नका. मृत्यू ही झोपेची थोरली बहीण आहे. जसं दररोज आपण झोपेतून उठतो तसेच मेल्यानंतर ही कित्येक वर्षे ओलांडले असतील. अल्लाह प्रलयाच्या दिवशी सगळ्यांना परत उठविणार म्हणून मृत्यू हे जीवनाचा अंत आहे असं समजण्याची घोडचूक करू नका. जसं 6,7,8 तास झोपून उठल्यानंतर ही आपल्याला वाटते की काही मिनीटच आपण झोपले तसंच माणसाला प्रलयाच्या दिवशी वाटेल या जगात अर्धा किंवा एकच दिवस राहिले. 

आपल वय काय आहे? अगदी बरोबर सांगा आणि विचार करा की यांच्या आदी आपण कोठे होतो? या जगात आपण आपल्या इच्छेने आलो का? का आपण आपल्या इच्छेने आपले राष्ट्र, जिल्हा, शहर, गांव, घर, आई-वडिल, भाऊ-बहीण, पती-पत्नी, मातृभाषा, रंग, उंची वगैरे निवडले आहे का? मग हे सगळे आपल्यासाठी निवडणारा कोण? निश्चितच एक मात्र अल्लाह. आपले इतके चांगले सुंदर अस्तित्व ही अल्लाहची देणगी आहे. आभार मानावे आणि तोच आपल्याला मृत्यूही देणार. मृत्यूला चव ही असते? माहित आहे का? ’’प्रत्येक जीवाला मृत्यूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे. मग तुम्ही सर्व आमच्याकडेच परतवून आणले जाणार आहात.’’ (सुरे अल अनकबूत)

म्हणून चिंता करण्यासाठी हा मुद्दा मुळीच होऊ शकत नाही की या जगात आपला जीव कसा वाचवावा. परंतु, चिंतेची बाब तर ही आहे की या जगात ईमान कसे शाबूत ठेवावे आणि ईशभक्तीची निकड कशी पूर्ण करावी. अल्लाहकडे हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांचा अंत चांगला होवो आणि मृत्यूचा आस्वाद आपल्याला चांगला लागो. (आमीन.)


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935



अल्लाहचे सर्वांत मोठे उपकार

बंधुनो! प्रत्येक मुस्लिम अंत:करणपूर्वक असे समजतो की जगात सर्वांत मोठी अल्लाहची देणगी म्हणजे इस्लाम होय. प्रत्येक मुस्लिम याबद्दल अल्लाहचे उपकार मानतो की त्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उम्मत (अनुयायी समाज) मध्ये त्याला सामील केले आणि इस्लामची देणगी त्याला प्रदान केली. खुद्द सर्वश्रेष्ठ अल्लाहसुद्धा याला आपल्या दासांना त्याने प्रदान केलेली सर्वांत मोठी देणगी ठरवितो. त्या संबंधाने पवित्र कुरआनमध्ये सांगितले गेले आहे,

‘‘आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे.’’ (कुरआन-५:३)

कृतज्ञ वृत्तीची मागणी

हा उपकार अल्लाहने आपणावर केला आहे त्याचा हक्क अदा करणे आपले कर्तव्य आहे. कारण जो मनुष्य एखाद्याच्या उपकाराची परतफेड करीत नाही किंवा हक्क अदा करीत नाही तो कृतघ्न असतो. सर्वांत वाईट कृतघ्नता माणसाने ईश्वराच्या उपकाराच्या हक्काचे विस्मरण करावे, ही आहे.

आता तुम्ही विचाराल की ईश्वराच्या उपकाराचा हक्क कशाप्रकारे अदा केला जातो? मी उत्तरादाखल असे म्हणेन की अल्लाहने आपणास प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उम्मत (अनुयायी समाज) मध्ये जन्म दिला आहे, तर या उपकाराची योग्य कृतज्ञता प्रेषित मुहम्मद (स.) यांचे पूर्णार्थाने अनुयायी बनणे ही आहे.

अल्लाहने तुम्हाला मुस्लिमांच्या मिल्लत (समाज) मध्ये सामील केले आहे, तर त्याच्या या मेहेरबानीचा हक्क अदा होऊ शकतो, पूर्णार्थाने मुस्लिम बनूनच! याशिवाय अल्लाहच्या या महान उपकाराचा हक्क कोणत्याही प्रकारे अदा होऊ शकत नाही. समजा जर तुम्ही हा हक्क अदा केला नाही तर जितका मोठा अल्लाहचा उपकार तितकाच मोठा त्याच्या कृतघ्नतेचा प्रकोपसुद्धा असेल. अल्लाहने आम्हा सर्वांना त्या प्रकोपापासून वाचवावे. आमीन. (तथास्तु.)

मुस्लिम बनण्यासाठी पहिले पाऊल

यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न कराल की मनुष्य सर्वार्थाने कशाप्रकारे मुस्लिम बनू शकतो? याच्या उत्तरासाठी खूप तपशीलाची आवश्यकता आहे आणि पुढील शुक्रवारच्या प्रवचनात याच्या एक एक भागाचे आपल्यापुढे पूर्ण स्पष्टीकरण केले जाईल. परंतु आजच्या प्रवचनात मी आपल्यासमोर त्या गोष्टीचे वर्णन करतो जी मुस्लिम बनण्यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे. त्यास या मार्गातील प्रथम पाऊल समजले पाहिजे.

काय मुस्लिम एखाद्या वंशाचे नाव आहे?

बुद्धीला थोडे ताण देऊन विचार करा की तुम्ही ‘मुस्लिम’ शब्दाचा प्रयोग करता त्याचा अर्थ काय आहे? काय मनुष्य आईच्या पोटातूनच इस्लाम आपल्याबरोबर घेऊन येतो? काय एखादा मनुष्य केवळ यामुळेच मुस्लिम ठरतो की तो मुस्लिमाचा मुलगा व मुस्लिमाचा पौत्र आहे? काय मुस्लिमसुद्धा अशाप्रकारे मुस्लिम म्हणून जन्म घेतो ज्याप्रकारे एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणून जन्म घेतो, एखाद्या राजपुताचा मुलगा राजपूत आणि एका शूद्राचा मुलगा शूद्र? काय मुस्लिम एखाद्या वंश अथवा जाती अथवा भावकीचे नाव आहे, जसे एखादा इंग्रज, इंग्रजाच्या घरी जन्मल्यामुळे इंग्रज होतो आणि एखादा जाट हा जाट जातीत जन्मल्यामुळे जाट होतो, अशाच प्रकारे एखादा मुस्लिम केवळ या कारणाने मुस्लिम होतो की तो मुस्लिम नावाच्या जातीत जन्माला आला? हे प्रश्न मी तुम्हाला विचारीत आहे, त्यांची उत्तरे तुम्ही काय द्याल?

तुम्ही असेच म्हणाल ना की नाही साहेब! याला मुस्लिम म्हणत नसतात. मुस्लिम जातीमुळे मुस्लिम होत नसतो, तर इस्लामचा स्वीकार केल्याने तो मुस्लिम बनतो आणि त्याने इस्लामचा त्याग केला तर तो मुस्लिम राहत नाही. एखाद्या माणसाने मग तो ब्राह्मण असो अथवा राजपूत, इंग्रज असो किंवा जाट, पंजाबी असो की निग्रो, जेव्हा त्याने इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्याचा मुस्लिमांत समावेश होतो आणि दुसरा एक मनुष्य मुस्लिमाच्या घरात जन्मला आहे आणि त्याने इस्लामचा अवलंब करण्याचे सोडून दिले तर तो मुस्लिमाच्या जमातीतून बाहेर टाकला जाईल, मग तो सय्यदचा मुलगा असो की पठाणचा.

सज्जनहो, तुम्ही माझ्या प्रश्नांची हीच उत्तरे द्याल ना? बरे तर आता खुद्द तुमच्याच उत्तरावरून कळते की अल्लाहची सर्वांत मोठी देणगी म्हणजे मुस्लिम असण्याची देणगी तुम्हाला मिळाली आहे ती काही अशी वांशिक गोष्ट नाही जी आईवडिलांकडून वारसा म्हणून आपोआप तुम्हाला मिळते आणि आपोआपच तुम्हाला आयुष्यभर चिकटून राहणार आहे. मग तुम्ही त्याची पर्वा करा अथवा करू नका. ती तर अशी देणगी आहे ज्यास प्राप्त करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक आहेत. तुम्ही प्रयत्न करून ती प्राप्त केली तरच मिळेल आणि जर त्याची पर्वा केली नाही तर ती तुमच्याकडून fहरावूनसुद्धा घेतली जाऊ शकते.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget