Latest Post


पूर्ण जगामध्ये इस्लामि कॅलेंडर नुसार जिल्हज्जा या बाराव्या महिन्याच्या दहा तारखेला बकरीद ईद साजरी करण्यात येते या ईदच्या दिवसाला आणि या महिन्याला इस्लाम मध्ये अन्यन साधारण महत्व आहे याच महिन्यामध्ये इस्लामच्या अनुयायांसाठी जे पात्र आहेत अर्थात जे हज यात्रेसाठी अरबस्थानातील मक्का याठिकाणी जाऊ शकतात खर्च करण्याची आर्थिक ऐपत आणि शारीरिक ऐपत धारण करतात त्यांच्यासाठी हज यात्रा आवश्यक आहे, हज यात्रा ही एक उपासना विधी आहे ती या महिन्यात आठ ते बारा या ठराविक तारखांना ठराविक पद्धतीने करावयाची असते याच हज यात्रेदरम्यान दहा ते बारा या तारखांना जगातील इस्लामचे संपूर्ण अनुयायी ज्यांना शक्य आहे ते अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी करतात आणि गोर गरीबांमध्ये वितरित करतात 

जगभरातील मुस्लिम बांधव बकरीद मध्ये जनावरांची कुर्बानी का करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेषित इब्राहीम अलै सलाम यांच्या जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज पासून सुमारे चार हजार वर्षापूर्वी अर्थात ईसा पूर्व 2100 वर्षापूर्वी आदरणीय इब्राहीम यांचा जन्म इराकमधील उर शहरात आजर  नावाच्या प्रमुख महांताच्या घरी झाला जे राजपुरोहित तर होतेच मूर्ती बनवून विकण्याचा त्यांचा व्यापारही होता. त्यांच्याकडे अपार संपत्ती होती परंतु हे सर्व मूर्तिपूजक होते स्वतःला चंद्रवंशी व सूर्यवंशी म्हणून घेत मूर्ति तयार करणे आणि तिच्यासमोर नतमस्तक होणे ही बाब आदरणीय इब्राहीम आलै सलाम यांना पटत नव्हती म्हणून ते आपल्या वडिलांना विविध प्रश्न विचारीत परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. प्रेषित इब्राहीम आलै सलाम यांनी लोकांना विविध प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सर्वांना काही ना काही गरजा आहेत माझा अल्लाह, ईश्वर गरजवंत नाही तो एकमेव आहे जमीन आणि आकाशामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता, सर्वांना निर्माण करणारा ,जन्म देणारा, पालन पोषण करणारा, मृत्यु देणारा माझा तुमचा आणि विश्वाचा अल्लाह, ईश्वर आहे तो एकच आहे म्हणून त्यांनी  इतर देवी-देवतांचा इंकार केला येथूनच त्यांची पहिली परीक्षा सुरू झाली.   तेथील राजाने त्यांना जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली पुजाऱ्याचा मुलगा म्हणून अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अल्लाह, ईश्वरा वरील तो एक असल्याचा दृढ विश्वास असल्यामुळे ते डगमगले नाहीत माघार घेतली नाही वडिलांनी घरातून काढून टाकले. राजाच्या आदेशाने अतिशय मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला अग्निकुंडाची आग भयंकर होती तरीपण पर्वता पेक्षा अधिक दृढ हृदय बाळगणाऱे एका ईश्वरावर विश्वास ठेवणारे प्रेषित इब्राहीम विचलित झाले नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले "ज्यांना तुम्ही ईश्वरत्वात भागीदार ठरविता त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही".

राजाच्या आदेशाने शिपायांनी प्रेषित इब्राहीम यांना धगधगत्या अग्निकुंडात फेकून दिले. आदरणीय इब्राहीम अल्लाचे प्रेषित होते अल्लाहने त्यांचे रक्षण केले. अग्नीला आदेश दिला " हे अग्नी, थंड हो शांती, सुरक्षा, सुखदायी हो इब्राहीम साठी " अल्लाह, ईश्वराच्या आदेशाने अग्नी इब्राहीम साठी थंड व शांत बनली अग्नित फेकून देणे इतके महाभयंकर होते की, त्याजागी आदरणीय प्रेषित यांना त्या लोकांमध्ये वास्तव्य करणे अशक्य होते. म्हणून अल्लाने त्यांना स्वदेश त्यागाचा आदेश दिला उर शहराला सोडून निघून जावे.  प्रेषित इब्राहीम यांनी आपली पत्नी व पुतण्या लूत अलैसलाम यांना सोबत घेऊन आपला देश सोडला त्यांनी राजपुरोहिताची गादी, धनसंपत्ती सोडून सीरिया , पॅलेस्टाईन, इजिप्त आणि अरबस्तानातील विविध देशात फिरत राहिले. अल्लाहलाच माहित या प्रवासात त्यांना किती अडचणी आल्या असतील. ते धनसंपत्ती कमविण्याच्या चिंतेत भटकत नव्हते तर लोकांना प्रत्येकाच्या गुलामगिरीतून मुक्त करून फक्त एका अल्लाचे, ईश्वराचे गुलाम बनावे हा संदेश देत होते. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आमची ही परीक्षि आहे. या भ्रमंतीमध्ये लोकांना सत्याची जाणीव करून देताना त्यांना कोठेही शांती लाभली नाही. वर्षानुवर्षे विना बिऱ्हाड भटकत राहिले. अशाच प्रकारे तारुण्य निघून जाऊन केस पांढरे झाले आणि जीवणाची दुसरी परीक्षा सुरू झाली. वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांना संतती प्राप्त झाली नव्हती. अल्लाहने त्यांना 86 व्या वर्षी संतती दिली. ते करत असलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी कोणीतरी वारस हवा म्हणून त्यांनी अल्लाकडे प्रार्थना,  संततीची याचना केली होती.पुत्र प्राप्ती नंतर अल्लाहने त्यांची दुसरी परीक्षा घेतली म्हातारपणी पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद काही औरच होता. कृतज्ञता व्यक्त केली याच काळात अल्लाहचा आदेश मिळाला की काबागृहासाठी जागा निश्चित केलेली आहे तुम्ही तिकडे जा. आपल्या पत्नीला व लहान मुलाला घेऊन आज काबागृह जिथे उभा आहे तेथे पोहोचले हा परिसर निर्जन निर्जल ओसाड निर्मनुष्य होता.

या ठिकाणी दूरदूरपर्यंत वस्ती आणि पाणीही नव्हते. अल्लाहाने पुन्हा आदेश दिला पत्नी व मुलाला येथे सोडून निघूनजा. आदरणीय इब्रहिम  अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक झाले विरान वाळवंटात निर्मनुष्य जागी आपल्या पत्नीला, लहान मुलाला सोडून जाताना त्यांच्या मनस्थितीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही म्हातारपणी नुकतेच  पुत्रप्राप्ति झाली होती की हा आदेश प्राप्त झाला.

पुढे गेल्यावर काबागृहाकडे तोंड करून प्रार्थना केली "हे माझ्या निर्माणकर्त्या प्रभू, मी अशा निर्जन व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू असे मी अशासाठी केले आहे की, या लोकांनी येथे नमाज कायम करावी म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर आणि यांना खावयास फळे दे कदाचित ते कृतज्ञ होतील " प्रेषितांची पत्नी आणि लहान मुल आदरणीय  इस्माईल त्या वाळवंटात एकटे पडले थोडं फार अन्नपाणी होती ते संपले अन्नपाणी नाही म्हणून आईला दूध एत नव्हते. मुलाची परिस्थिती वाईट होती भुकेने व्याकुळ होते कोठे पाणी मिळते काय किंवा कुणीप्रवासी दिसतील तर पाणी मागता येईल कारण मुल रडत होते म्हणून आई हजरा त्या ठिकाणी असलेल्या दोन टेकड्या सफा ,मरवा यावर चढून इकडे तिकडे पाहत होती, प्रार्थना करत होती, दोन्ही टेकड्या मध्ये त्यांनी सात फेऱ्या मारल्या टेकडीवर जात पुन्हा मुल एकटे आहे म्हणून धावून परत येत. जीव कासावीस होत होता मूल रडत होते अल्ला पाहत होता दोन्ही टेकड्यांमध्ये किमान 450 मीटर अर्थात चौदाशे 80 फूट एवढं अंतर होतं 7व्या फेरी  मध्ये 3.15 किमी अंतर त्यांनी पार केलं होतं. शेवटी सातव्या फेरीनंतर त्या ठिकाणी देवदूतांनी पाण्याचा झरा निर्माण केला.  जो जमजम च्या नावाने आजही अस्तित्वात असून जगातील सर्वात वैज्ञानिक दृष्टीने शुद्ध असून अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी संपूर्ण जगातून येणारे लोक घेऊन जातात. पाण्यासाठी आईची ती पराकाष्ठा जगभरातील अनुयायासाठी हज यात्रेतील आवश्यक परंपरा म्हणून अनिवार्य केली  गेली.त्या सात फेऱ्या तशाच पूर्ण केल्याशिवाय हजपूर्ण होत नाही. दुसऱ्यापरीक्षेमध्ये ही प्रेषित इब्राहीम यशस्वी झाले. पाण्यामुळे त्या ठिकाणी वस्ती झाली होती. अधून मधून प्रेषित मुलास भेटण्यासाठी येत. अशाप्रकारे मुलगा, प्रेषित इस्माईल 14 वर्षाचे झाले. आतापर्यंत अल्लाहने प्रेषित इब्राहीम यांना ज्या ज्या परीक्षेत आजमावले त्या सर्व परीक्षेमध्ये ते खरे उतरले. 

आता तिसरी परीक्षा सुरू झाली होती. मुलास भेटावयास गेले असताना आपल्या मुलास त्यांनी जे सांगितले ते कुराणाच्या शब्दात खालील प्रमाणे आहे "तो मुलगा जेव्हा त्यांच्यासमोर धावपळ करण्याच्या वयात आला तेव्हा एके दिवशी प्रेषित इब्राहीम यांनी त्याला सांगितले हे माझ्या मुला मी स्वप्नात पाहतो की, मी तुझा बळी देत आहे आता सांग तुझा काय विचार आहे, मुलाने सांगितले हे पिताजी जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसे करा अल्लाहाने इच्छिले तर आपणास मी  धैर्यशील आढळेल. पूर्ण विश्व पिता पुत्राचा संवाद स्तब्ध होऊन ऐकत होता. कुराणाची स्पष्टोक्ती आहे "सरते शेवटी जेव्हा या दोघांनी अल्लाच्या आज्ञापालनात मान तूकविली आणि प्रेषित इब्राहीम यांनी पुत्राला ओणवे केले." पुत्राला ओणवे करणे यासाठी 

की बळी देताना पुत्राच्या चेहऱ्याकडे पाहून प्रेषित यांचे याचे प्रेम उफाळून येऊ नये आणि त्यांचे हात डगमगायला नको. पुत्राच्या गळ्यावर सुरी फिरवणार तोच अल्लाहने आवाज दिला, आकाशवाणी झाली कुराणात आहे "आणि आम्ही पुकारले हे इब्राहीम तू स्वप्न साकार केलेस,आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो निश्चितच ही एक उघड परीक्षा होती." परीक्षा तर होतीच परंतु अल्लाहने आदरणीय इस्माईल यांना वाचविले. ह्या परीक्षेत आदरणीय प्रेषित इब्राहीम खरे उतरल्यानंतर त्यांना अल्लाहने जे बक्षीस दिले त्याचा उल्लेख कुराणाच्या शब्दात "आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा व गुणगाण भावी पिढ्यांत सदैव ठेवले.  सलाम आहे इब्राहीम अलैसलाम वर आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. अल्लाहने एक सुदृढ मेंढा बळी देण्याचा आदेश दिला हे याच्या साठी होते की आदरणीय इब्राहीम आपल्या मुलाचा बळी देत होते परंतु अल्लाहने योग्य वेळी त्यांना रोखले ह्याचे बक्षीस अल्लाहने अशाप्रकारे दिले की या बलिदानास आदरणीय प्रेषित इब्राहीम यांची परंपरा आणि कार्य घोषित केले. बलिदानाची ही परंपरा श्रद्धावंतासाठी अंतिम दिनापर्यंत जिवंत ठेवली.प्रत्येक वर्षी याच दिवशी म्हणजे या महिन्याच्या दहा तारखेला जनावरांची कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी करताना आदरणीय इब्राहीम यांचे ते बलिदान आठवते जे त्यांनी उर शहरापासून येथपर्यंत केले होते कुर्बानीचा उद्देश ईश्वराचे आज्ञापालन आहे म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरीदच्या दिवशी विश्वाच्या अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी देतात. गोर गरीबांमध्ये वाटतात. ही एक उपासना आहे जी अल्लाच्या आदेशानुसार इब्राहीम आले सलामच्या परंपरेनुसार प्रतीकात्मक देण्यात येते. तसे पाहिले तर हजरत इब्राहीम यांचे पूर्ण जीवन कुर्बानीची, बलिदानाची गाथा आहे. जगातील प्रत्येक वस्तू पेक्षा आपल्या म्हातारपणात प्राप्त झालेल्या मुलांच्या जीवनापेक्षा निर्माणकर्त्या अल्लाचा आदेश महत्त्वाचा आहे. आणि हेच अल्लाच्या दासाचे कर्तव्य आहे. माणसाची परीक्षा आहे आमचं सुध्दा कर्तव्य आहे पालन कर्त्याचा निर्माण कर्त्या, मालकाचा आदेश सर्वपरी म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले जीवन जगावे त्यातच आमचं आमच्या विश्वासचे कल्याण आहे.

- अ. मजीद खान

नांदेड, 

Mo. 9403004232



माझ्या बंधुनो! प्रत्येक मुस्लिम स्वत: असे समजतो आणि तुम्हीसुद्धा असेच समजत असाल की मुस्लिमाचा दर्जा अनेकेश्वरवादीपेक्षा अधिक उच्च आहे. अल्लाहला मुस्लिम (आज्ञाकारी) प्रिय आहेत व अनेकेश्वरवादी (अवज्ञाकारी-काफिर) अप्रिय आहेत. मुस्लिमाला अल्लाहकडून क्षमा मिळेल व अनेकेश्वरवाद्यांना क्षमा मिळणार नाही. आज्ञाधारक स्वर्गामध्ये जाईल व अनेकेश्वरवादी नरकामध्ये जाईल. मला वाटते की आज तुम्ही यावर विचार करा की शेवटी मुस्लिम व अनेकेश्वादीमध्ये इतका मोठा फरक का आहे? अनेकेश्वरवादीसुद्धा प्रेषित आदम (अ.) यांची संतती आहे आणि तुम्हीसुद्धा. अनेकेश्वरवादीसुद्धा असाच मनुष्य आहे जसे तुम्ही आहात. त्याचेसुद्धा तुमच्याप्रमाणेच हात, पाय, डोळे, कान आहेत. तोसुद्धा याच हवेत श्वास घेतो. हेच पाणी पितो. याच पृथ्वीवर राहतो. हेच उत्पन्न खातो. अशाप्रकारे जन्म घेतो व अशाच प्रकारे मरतो. याच अल्लाहने त्यालासुद्धा निर्माण केले आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आहे. मग शेवटी त्याचा दर्जा का खालचा आहे आणि तुमचा उच्च? तुम्हाला जन्नत का मिळेल आणि त्याला जहन्नममध्ये का घातले जाईल?

केवळ नावाचा फरक आहे का?

हे विचार करण्यासारखे आहे. मनुष्यामनुष्यात इतका मोठा फरक केवळ इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे तर असू शकत नाही की तुम्हाला अब्दुल्लाह व अब्दुर्रहमान आणि अशाच अन्य नावाने बोलविले जाते आणि त्यांना दीनदयाळ व कर्तारसिंह आणि रॉबर्टसनसारख्या नावाने ओळखले जाते. अथवा तुम्ही खतना करवून घेता व तो करवून घेत नाही किंवा तुम्ही मांस भक्षण करता आणि तो ते खात नाही. अल्लाह ज्याने सर्व मानवांना निर्माण केले आहे आणि जो सर्वांचा पालनकर्ता आहे असा जुलूम तर कदापि करू शकत नाही की अशा लहान सहान गोष्टीवरून त्याने आपल्या निर्मितीत फरक करावा आणि एका दासाला जन्नत पाठवावे व दुसऱ्याला जहन्नममध्ये पोहचवावे.



माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी सांगितले,

पैगंबर मुहम्मद (स.) लोकांपैकी सर्वांत जास्त दानशूर होते आणि रमजान महिन्यात इतर महिन्यांपेक्षा अधिक दानशूर होत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

रमजान महिना हा तर सदाचाराचा महिना आहे. म्हणून या महिन्यात दानशीलतेत वाढ होणे स्वाभाविक आहे.

सहीह बुखारीतील एका हदीसनुसार ज्ञात होते की जिब्रिल (अ.) रमजानच्या प्रत्येक रात्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटत असत आणि त्यांच्यासोबत कुरआन पठण करीत असत. जेव्हा पैगंबर जिब्रिल  (अ.) यांना भेटत असत तेव्हा दुसऱ्यांना लाभकारी सिद्ध होण्यास वाहत्या वाऱ्यापेक्षासुद्धा जास्त दानशूर होत असत.

माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांच्याकडून उल्लेखित आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर माझ्याजवळ उहुद पर्वताएवढे सोन्याचे भांडार जरी असेल तरी माझ्या प्रसन्नतेची गोष्ट त्या भांडारातून तीन रात्रीत काहीच शिल्लक राहणार नाही की मी एखादे कर्ज फेडण्यासाठी त्यातून काही घ्यावे.’’(हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

या हदीसनुसार कळते की दानशीलता पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चारित्र्याचे अत्यंत ठळक वैशिष्ट्य होते. धन प्राप्त करण्यात नव्हे तर धन वितरित करण्यात पैगंबर प्रसन्न होत असत. धन कितीही जास्त असो, त्याचे समाप्त होण्यावर पैगंबर दु:खी होण्याऐवजी आनंदित होत होते.



पवित्र कुरआनात म्हटले आहे की, “लोकहो, आपल्या विधात्याची भीती बाळगा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले. त्यापासून त्यांची जोडपी निर्माण केली आणि त्या उभयतांपासून असंख्य पुरुष व स्त्रिया विखुरल्या. अल्लाहचे भय बाळगा, ज्याच्या नावानं तुम्ही एकमेकांशी आपल्या हक्कांची मागणी करता. तसेच आपल्या नातेसंबंधांची जाण ठेवा. अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.” (४:१) इस्लामपूर्व काळात लोक पत्नींना काहीच महत्त्व देत नव्हते. त्यांना क्षुल्लक कारणांनी मारझोड केली जायची. तलाक द्यायचे आणि पुन्हा परत घ्यायचे. त्यांना आईवडील असो की पती, मुले-मुली- कुणाच्याही वारसामध्ये हक्क दिला जात नव्हता. एका पत्नीशी विवाहसंबंध संपवायचा असेल तर तिला आई म्हणून जाहीर करायचे. म्हणजे स्त्रीला कोणताही मानवाधिकार नव्हता. इस्लामने जाहीर केले की पतीवर पत्नीचा तेवढाच अधिकार असेल जेवढा एका पतीचा त्याच्या पत्नीवर. पुढे जाऊन पवित्र कुरआनने स्त्रीला प्रत्येक नात्यात पती असो की त्याचे आईवडील, बहीण-भाऊ, तिची संतती, सर्वांच्या मालमत्तेत वारसाहक्क दिला. पती आणि पत्नींना आपल्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकमेकांचा आधार बनविला. ते एकमेकांचे सहचर आहेत. एकमेकांसाठी वस्त्र आहेत ज्यापासून त्यांच्या उणिवांचे रक्षण होते. वस्त्राद्वारे जसे सौंदर्य लाभते तसेच पतीपत्नी एकमेकांचे सौंदर्य आहेत. ते एकमेकांची पूर्तता करतात. पवित्र कुरआनने म्हटले आहे की, “त्या तुमची वस्त्रे आहेत आणि तुम्ही त्यांची वस्त्रे आहात.” वैवाहिक जीवनात पतीला कुटुंबाच्या प्रमुखपदी ठेवतो. कारण आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात तो व्यस्त असतो. पत्नी आपल्या पतीच्या मागे स्वतःचे रक्षण करते. त्याच्या परवानगीशिवाय इतर कोणा पुरुषाला घरी येऊ देत नाही. वैवाहिक जीवनासंबंधी कुरआनात म्हटले आहे की, “अल्लाहच्या संकेतांमधील हे एक संकेत आहे की त्याने तुमच्याच अस्तित्वातून तुमच्यासाठी पत्नींना जन्म दिला जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून सुखसमाधान प्राप्त करावे. तुमच्यामध्ये एकमेकांसाठी प्रेम आणि कृपा निर्माण केली.” (३०:२१)

संकलन

- सय्यद इफ्तिखार अहमद



स्त्री म्हटले की अन्याय सहन करणारी अशी परिभाषा सर्वमान्य झालेली आहे. अगदी त्रेतायुगापासून स्त्री वर अन्याय होत आहे आणि आजही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने चालूच आहे. स्त्री युगानयुगे अन्याय सहन करत आलेली आहे. जगाच्या पाठीवरील सर्वच राष्ट्रात तिच्यावर अन्याय होत आहेत. इतिहासात डोकावून पाहिले तर इराक, भारत, चीन, अरब प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय व तिची अवहेलना व्हायची. यत्र नारिस्ते पूजेतम रमते तत्र देवता, असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या भारत देशांमध्ये स्त्रीला जिवंत जाळण्याची प्रथा होती. ग्रीकमध्ये तर स्त्रीला आत्मा आहे की नाही यावर वाद विवाद होते. स्त्री अगदी अन्यायाने ग्रासून गेली होती. स्त्रीला अधिकार किंवा हक्क हे शब्द सुद्धा माहित नव्हते. मात्र इस्लाम धर्माने स्त्रियांना अन्याय, अत्याचारापासून वाचविले व तिला न्याय दिला. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामी विरुद्ध आवाज उठविला. 

रात स्त्रीच्या तीन स्पष्ट भूमिका असतात. आई, पत्नी व कन्या. इस्लामने या तिनी भूमिकांना अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.

1.आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

      इस्लाममध्ये अल्लाह आणि पैगंबर यांच्या नंतर आईला सर्वोच्च दर्जा प्राप्त आहे. मुलांना आई-वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि आज्ञा पालनाचा आदेश देतो. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. आई आपल्या बालकास नऊ महिने पोटात वाढविते व दोन वर्षे आपले दूध पाजवीते. त्यामुळे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मुहम्मद पैगंबरांनी तर आईच्या बाबतीत सद्व्यवहाराची ताकीदच केली आहे. माननीय अबू हुरैरा रजि. यांनी सांगितले की, एक इसम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे आला व त्याने  पैगंबर (सल्ल.) यांना विचारले, माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, तुझी आई! पुन्हा त्याने तोच प्रश्न दोन वेळेस विचारला. प्रेषितांनी दोन्ही वेळेस आईच सद्व्यवहारास अधिक पात्र असल्याचे सांगितले. व नंतर वडील असे म्हटले. अल्लाहने आईला खूप मोठे श्रेष्ठत्व बहाल केले आहे.

2. पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा 

इस्लाममध्ये स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इस्लामची अशी मान्यता आहे की, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही. पैगंबरांना त्यांच्या एका साथीदाराने पत्नीच्या अधिकारा बाबतीत विचारले असता पैगंबर (सल्ल.)  म्हणाले, जेव्हा तुम्ही भोजन कराल तेव्हा तिलाही भोजन द्या जेव्हा तुम्ही वस्त्रे परिधान कराला तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. रागाच्या भरात तिला मारहाण करू नका तिला बरे वाईट बोलू नका तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त रहा. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर तिची दुसरी चांगली सवय कोणती आहे त्यावर लक्ष द्या. प्रेषित (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे. 

3. कन्येच्या रूपात स्त्रीचा दर्जा -

अज्ञानकाळात म्हणजेच इस्लामपूर्व काळात मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते. परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेशदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलताना देखील त्यांची मान शरमेने खाली जात होती इतकेच नव्हे तर कठोर हृदयी बाप आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली तसेच पैगंबर यांचे म्हणणे असे होते की, तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिणी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर त्याला स्वर्गात निश्चितच स्थान प्राप्त होईल. तसेच एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (सल्ल.) यांनी सांगितले जी व्यक्ती दोन मुलींची त्यांच्या तारुण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील,  अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने एकत्र येऊ असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखवली. तसेच मुलींशी घृणा करू नका त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत. (हदीस मसनद अहमद). पैगंबर (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार ’’आपल्या त्या मुलीवर उपकार करा जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुमच्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’

पैगंबर (सल्ल.) यांचे हे विचार ऐकूणच मन भरून येते. वरील नैतिक स्वरूपाचे अधिकार व उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे ज्ञान इस्लामने मानवाला प्रदान केले आहेत. इस्लामी शिकवणीचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे अधिकार खालील प्रमाणे सांगितले आहेत.

1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे. कुरआननेे हे अधिकार दिले आहेत. जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जवाब द्यावा लागेल.

2. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण त्यांचे शिक्षण प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ सूचना दिली आहे. 

3. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलींच्या परवानगीनेच होईल असे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत विधवा वा घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारीकेची अनुमती घेतल्या शिवाय तिचा विवाह होणार नाही.

4. इस्लाममध्ये ’महेर’ दिला जातो. म्हणजेच लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची रक्कम. हा महिलेचा अधिकार आहे. महिलेला महेर दिलाच जातो तो देणे अनिवार्य राहील. महेर विना विवाह वैध नसेल. विवाह प्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने व संपत्ती देणे अनिवार्य आहे. तिची स्वतःची संपत्ती आहे. यास महेर म्हटले जाते. परंतु ते निश्चित करणे अनिवार्य असते. 

5. इस्लाममध्ये स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी विवाहापूर्वी पित्यावर विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी पतीवर येते.  तसेच महत्त्वाची बाब म्हणजे जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित असेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते हा तिचा वैधानिक अधिकार आहे. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग धंद्याचेे स्वातंत्र प्रदान केले आहे. स्त्रियांना वारसा हक्कांबाबत पुरुषांप्रमाणेच हक्क दिलेले आहेत. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मौल्यवान संपत्ती असते. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. उत्तम चारित्र्यवान श्रद्धावंत भोळ्याभाबड्या स्त्रीयांच्या चारित्र्यावर आरोप करण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरूद्ध इस्लामी कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीवर व्याभिचार व चारित्र्य हिनतेचा मिथ्या आरोप करील त्याला 80 फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. इस्लाम स्त्रीस समीक्षण व आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार प्रदान करतो. अशा प्रकारे वरील सर्व बाबीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर इस्लाम धर्माने स्त्रियांवर होणारे अनेक अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना प्रतिष्ठेचे व श्रेष्ठत्वाचे स्थान दिले आहे. 

- पूजा वडगावकर


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget