केवळ नावाचा फरक आहे का?
हे विचार करण्यासारखे आहे. मनुष्यामनुष्यात इतका मोठा फरक केवळ इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे तर असू शकत नाही की तुम्हाला अब्दुल्लाह व अब्दुर्रहमान आणि अशाच अन्य नावाने बोलविले जाते आणि त्यांना दीनदयाळ व कर्तारसिंह आणि रॉबर्टसनसारख्या नावाने ओळखले जाते. अथवा तुम्ही खतना करवून घेता व तो करवून घेत नाही किंवा तुम्ही मांस भक्षण करता आणि तो ते खात नाही. अल्लाह ज्याने सर्व मानवांना निर्माण केले आहे आणि जो सर्वांचा पालनकर्ता आहे असा जुलूम तर कदापि करू शकत नाही की अशा लहान सहान गोष्टीवरून त्याने आपल्या निर्मितीत फरक करावा आणि एका दासाला जन्नत पाठवावे व दुसऱ्याला जहन्नममध्ये पोहचवावे.
पैगंबर मुहम्मद (स.) लोकांपैकी सर्वांत जास्त दानशूर होते आणि रमजान महिन्यात इतर महिन्यांपेक्षा अधिक दानशूर होत असत. (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण
रमजान महिना हा तर सदाचाराचा महिना आहे. म्हणून या महिन्यात दानशीलतेत वाढ होणे स्वाभाविक आहे.
सहीह बुखारीतील एका हदीसनुसार ज्ञात होते की जिब्रिल (अ.) रमजानच्या प्रत्येक रात्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटत असत आणि त्यांच्यासोबत कुरआन पठण करीत असत. जेव्हा पैगंबर जिब्रिल (अ.) यांना भेटत असत तेव्हा दुसऱ्यांना लाभकारी सिद्ध होण्यास वाहत्या वाऱ्यापेक्षासुद्धा जास्त दानशूर होत असत.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्याकडून उल्लेखित आहे,
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर माझ्याजवळ उहुद पर्वताएवढे सोन्याचे भांडार जरी असेल तरी माझ्या प्रसन्नतेची गोष्ट त्या भांडारातून तीन रात्रीत काहीच शिल्लक राहणार नाही की मी एखादे कर्ज फेडण्यासाठी त्यातून काही घ्यावे.’’(हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण
या हदीसनुसार कळते की दानशीलता पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चारित्र्याचे अत्यंत ठळक वैशिष्ट्य होते. धन प्राप्त करण्यात नव्हे तर धन वितरित करण्यात पैगंबर प्रसन्न होत असत. धन कितीही जास्त असो, त्याचे समाप्त होण्यावर पैगंबर दु:खी होण्याऐवजी आनंदित होत होते.
संकलन
- सय्यद इफ्तिखार अहमद
रात स्त्रीच्या तीन स्पष्ट भूमिका असतात. आई, पत्नी व कन्या. इस्लामने या तिनी भूमिकांना अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.
1.आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा
इस्लाममध्ये अल्लाह आणि पैगंबर यांच्या नंतर आईला सर्वोच्च दर्जा प्राप्त आहे. मुलांना आई-वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि आज्ञा पालनाचा आदेश देतो. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. आई आपल्या बालकास नऊ महिने पोटात वाढविते व दोन वर्षे आपले दूध पाजवीते. त्यामुळे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मुहम्मद पैगंबरांनी तर आईच्या बाबतीत सद्व्यवहाराची ताकीदच केली आहे. माननीय अबू हुरैरा रजि. यांनी सांगितले की, एक इसम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे आला व त्याने पैगंबर (सल्ल.) यांना विचारले, माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, तुझी आई! पुन्हा त्याने तोच प्रश्न दोन वेळेस विचारला. प्रेषितांनी दोन्ही वेळेस आईच सद्व्यवहारास अधिक पात्र असल्याचे सांगितले. व नंतर वडील असे म्हटले. अल्लाहने आईला खूप मोठे श्रेष्ठत्व बहाल केले आहे.
2. पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा
इस्लाममध्ये स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इस्लामची अशी मान्यता आहे की, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही. पैगंबरांना त्यांच्या एका साथीदाराने पत्नीच्या अधिकारा बाबतीत विचारले असता पैगंबर (सल्ल.) म्हणाले, जेव्हा तुम्ही भोजन कराल तेव्हा तिलाही भोजन द्या जेव्हा तुम्ही वस्त्रे परिधान कराला तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. रागाच्या भरात तिला मारहाण करू नका तिला बरे वाईट बोलू नका तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त रहा. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर तिची दुसरी चांगली सवय कोणती आहे त्यावर लक्ष द्या. प्रेषित (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे.
3. कन्येच्या रूपात स्त्रीचा दर्जा -
अज्ञानकाळात म्हणजेच इस्लामपूर्व काळात मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते. परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेशदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलताना देखील त्यांची मान शरमेने खाली जात होती इतकेच नव्हे तर कठोर हृदयी बाप आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली तसेच पैगंबर यांचे म्हणणे असे होते की, तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिणी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर त्याला स्वर्गात निश्चितच स्थान प्राप्त होईल. तसेच एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले जी व्यक्ती दोन मुलींची त्यांच्या तारुण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील, अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने एकत्र येऊ असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखवली. तसेच मुलींशी घृणा करू नका त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत. (हदीस मसनद अहमद). पैगंबर (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार ’’आपल्या त्या मुलीवर उपकार करा जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुमच्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’
पैगंबर (सल्ल.) यांचे हे विचार ऐकूणच मन भरून येते. वरील नैतिक स्वरूपाचे अधिकार व उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे ज्ञान इस्लामने मानवाला प्रदान केले आहेत. इस्लामी शिकवणीचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे अधिकार खालील प्रमाणे सांगितले आहेत.
1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे. कुरआननेे हे अधिकार दिले आहेत. जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जवाब द्यावा लागेल.
2. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण त्यांचे शिक्षण प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ सूचना दिली आहे.
3. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलींच्या परवानगीनेच होईल असे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत विधवा वा घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारीकेची अनुमती घेतल्या शिवाय तिचा विवाह होणार नाही.
4. इस्लाममध्ये ’महेर’ दिला जातो. म्हणजेच लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची रक्कम. हा महिलेचा अधिकार आहे. महिलेला महेर दिलाच जातो तो देणे अनिवार्य राहील. महेर विना विवाह वैध नसेल. विवाह प्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने व संपत्ती देणे अनिवार्य आहे. तिची स्वतःची संपत्ती आहे. यास महेर म्हटले जाते. परंतु ते निश्चित करणे अनिवार्य असते.
5. इस्लाममध्ये स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी विवाहापूर्वी पित्यावर विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी पतीवर येते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित असेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते हा तिचा वैधानिक अधिकार आहे. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग धंद्याचेे स्वातंत्र प्रदान केले आहे. स्त्रियांना वारसा हक्कांबाबत पुरुषांप्रमाणेच हक्क दिलेले आहेत. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मौल्यवान संपत्ती असते. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. उत्तम चारित्र्यवान श्रद्धावंत भोळ्याभाबड्या स्त्रीयांच्या चारित्र्यावर आरोप करण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरूद्ध इस्लामी कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीवर व्याभिचार व चारित्र्य हिनतेचा मिथ्या आरोप करील त्याला 80 फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. इस्लाम स्त्रीस समीक्षण व आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार प्रदान करतो. अशा प्रकारे वरील सर्व बाबीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर इस्लाम धर्माने स्त्रियांवर होणारे अनेक अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना प्रतिष्ठेचे व श्रेष्ठत्वाचे स्थान दिले आहे.
- पूजा वडगावकर
मी तुम्हाला असे सांगत नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने मौलवी (धर्मपंडित) बनावे, मोठमोठ्या ग्रंथांचे अध्ययन करावे आणि आपल्या आयुष्याची दहा-बारा वर्षे शिकण्यात खर्च करावीत. मुस्लिम बनण्यासाठी इतक्या शिक्षणाची गरज नाही. माझी केवळ इतकी अपेक्षा आहे की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने रात्र व दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ एक तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा. कमीतकमी इतके ज्ञान प्रत्येक मुस्लिम मुलाला, म्हाताऱ्याला व तरुणाला प्राप्त झाले पाहिजे की पवित्र कुरआन ज्या उद्देशासाठी व जी शिकवण घेऊन अवतरित झाले आहे त्याच्या सारांशाचेज्ञान त्याला व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) जे नष्ट करण्यासाठी व त्या जागी ज्याची स्थापना करण्यासाठी या जगात आले होते त्याविषयीची चांगली ओळख प्रत्येकाने करून घ्यावी. तसेच त्या विशिष्ट जीवनपद्धतीशी परिचित व्हावे जी अल्लाहने मुस्लिमासाठी ठरवून दिली आहे. इतक्या ज्ञानासाठी काही जास्त वेळेची गरज नाही आणि ईमान (धर्मावरील विश्वास) प्रिय असेल तर त्यासाठी दररोज एक तासाची वेळ काढणे काही कठीण नाही.