जर असे नाही तर मग विचार करा की दोहोंमध्ये मूळ फरक काय आहे? याचे उत्तर केवळ एक आहे आणि ते असे की दोहोंमध्ये फरक इस्लाम व अनेकेश्वरत्वामुळे पडतो. इस्लामचा अर्थ अल्लाहची आज्ञा पाळणे आहे. आणि अनेकेश्वरत्वाच अर्थ अल्लाहची अवज्ञा करणे आहे. मुस्लिम व अनेकेश्वरवादी (अल्लाहचा इन्कार करणारे) दोघे मनुष्य आहेत. दोघे अल्लाहचे दास आहेत. परंतु एक मनुष्य अशा कारणाने श्रेष्ठ बनतो की तो त्याच्या स्वामीला ओळखतो, त्याच्या आज्ञेचे पालन करतो आणि त्याच्या अवज्ञेच्या परिणामाचे भय बाळगतो. दुसरा मनुष्य उच्च स्थानावरून या कारणास्तव खाली कोसळतो की तो त्याच्या स्वामीला ओळखत नाही आणि त्याची अवज्ञा करतो. यामुळेच अल्लाह आज्ञाधारकांवर (मुस्लिमांवर) प्रसन्न आहे व अनेकेश्वरवाद्यावर (अवज्ञाकारींवर) अप्रसन्न. तो आज्ञाधारकांना (मुस्लिमांना) जन्नत देण्याचा वायदा करतो आणि अनेकेश्वरवाद्यांना (अवज्ञाकारींना) म्हणतो की जहन्नममध्ये टाकीन.
फरकाचे कारण - ज्ञान व कर्म
यावरून असे कळते की आज्ञाधारकाला (मुस्लिमाला) अनेकेश्वरवादी (काफिर) पासून वेगळे करणारी मूळ कारणे हीच आहेत- एक ज्ञान व दुसरे कर्म. म्हणजे प्रथम तर त्याला हे जाणून घेतले पाहिजे की त्याचा स्वामी कोण आहे? त्याचे आदेश काय आहेत? त्याच्या इच्छेनुसार चालण्याचा अर्थ काय आहे? कोणते कर्म केल्याने तो प्रसन्न होतो व कोणत्या कर्मामुळे तो अप्रसन्न होतो? मग जेव्हा या गोष्टी त्याला कळल्या तेव्हा माणसाचे हे कर्तव्य ठरते की त्याने स्वत:ला स्वामीचा दास बनवावे. जशी मालकाची इच्छा असेल त्याप्रमाणे वागावे आणि जी स्वत:ची इच्छा असेल व मालकाची आज्ञा त्याच्या विरूद्ध असेल तर त्याने मनाचे म्हणणे ऐवूâ नये आणि स्वामीच्या आज्ञेचे पालन करावे. एखादे कर्म त्याला चांगले वाटत असेल आणि स्वामीने त्याला वाईट म्हटले तर त्याला वाईट समजावे. एखादे दुसरे कर्म त्याला वाईट वाटत असेल, परंतु स्वामीने सांगितले की ते चांगले आहे तर त्याला चांगलेच समजावे. एखाद्या कामात त्याला नुकसान दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की त्याने ते करावे तर ते त्याने केलेच पाहिजे. मग ते करण्यात त्याला प्राणार्पण करावे लागो अथवा कितीही सांपत्तिक हानी त्याला सोसावी लागो ते त्याने अवश्य करून दाखवावे. एखाद्या दुसऱ्या कामात त्याला लाभच लाभ दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की ते त्याने करू नये तर मग जरी त्या कामात विपुल संपत्ती त्याला मिळत असेल तरी ते कार्य कदापि करू नये.
हेच ते ज्ञान व कर्म आहे ज्यामुळे मुस्लिम अल्लाहचा प्रिय दास बनतो व त्यावर अल्लाहचा कृपाप्रसाद अवतरित होतो आणि अल्लाह त्याला गौरव प्रदान करतो. अवज्ञाकारी- अनेकेश्वरवाद्याजवळ हे ज्ञान नसते, त्यामुळे त्याचे कर्मसुद्धा तसे नसते. म्हणून तो ईश्वराचा अज्ञानी व अवज्ञाकारी दास बनतो आणि ईश्वर त्याला आपल्या कृपाप्रसादापासून वंचित ठेवतो.
आता स्वत:च न्यायाची कास धरून विचार करा की जो मनुष्य स्वत:ला आज्ञाधारक (मुस्लिम) म्हणत असेल आणि तसाच अज्ञानी असेल जसा एक अनेकेश्वरवादी- अवज्ञाकारी (काफिर) असतो व तसाच अवज्ञाकारी असेल जसा एक अनेकेश्वरवादी असतो तर मग केवळ नाव, पोशाख आणि खाण्यापिण्याच्या फरकामुळे एखाद्या अनेकेश्वरवाद्याच्या- अवज्ञाकारींच्या तुलनेत तो कशा प्रकारे श्रेष्ठ ठरू शकेल? कोणत्या आधारे या जगात व पारलौकिक जीवनात अल्लाहच्या कृपाप्रसादाचा तो अधिकारी ठरू शकेल? इस्लाम कोणत्याही वंश किंवा घराणे अथवा जातीचे नाव नाही. इस्लाम पित्याकडून पुत्रास व पुत्राकडून पौत्रास आपोआप मिळत नाही. इस्लामला मान्य नाही की ब्राह्मणाचा मुलगा कितीही अज्ञानी असो आणि त्याने कितीही दुष्कृत्ये केली तरी तो उच्च कुलीनच राहील, कारण त्याने ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आहे आणि उच्च जातीचा आहे. तसेच चांभाराचा मुलगा मग तो ज्ञान व कर्माच्या दृष्टीने सर्वप्रकारे श्रेष्ठ असला तरी तो नीचच राहील, कारण त्याने चांभाराच्या घरी जन्म घेतला आहे व नीच आहे. इस्लाममध्ये तर अल्लाहने आपल्या ग्रंथात (पवित्र कुरआनमध्ये) स्पष्ट सांगितले आहे,
‘‘अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे.’’ (कुरआन-४९:१३)
प्रेषित इब्राहीम (अ.) एका मूर्तिपूजकाच्या घरी जन्मले. परंतु त्यांनी अल्लाहला ओळखले आणि त्यांनी त्याच्या आज्ञेचे पालन केले म्हणून अल्लाहने त्यांना संपूर्ण जगाचा नेता बनविले. प्रेषित नूह (अ.) यांच्या मुलाने एका प्रेषिताच्या घरी जन्म घेतला, परंतु त्याने अल्लाहला ओळखले नाही आणि त्याची अवज्ञा केली. म्हणून अल्लाहने त्याच्या घराण्याचा विचार केला नाही आणि त्याच्यावर असा प्रकोप केला की ज्यापासून जगाने धडा घ्यावा. म्हणून चांगल्याप्रकारे समजून घ्या की अल्लाहच्या दृष्टीने माणसामाणसात काही फरक आहे तर तो ज्ञान व कर्मामुळे आहे. या जगात व पारलौकिक जीवनातसुद्धा त्याची कृपा केवळ त्याच लोकांसाठी आहे जे त्याला ओळखतात आणि त्याने दाखविलेल्या सरळमार्गाचे ज्ञान बाळगतात व त्याच्या आज्ञेचे पालन करतात. ज्या लोकांत हे गुण नसतील, मग त्यांची नावे अब्दुल्लाह आणि अब्दुर्रहमान असोत अथवा दीनदयाल आणि कर्तारसिंह; अल्लाहच्या दृष्टीने या दोघांत काहीही फरक नाही आणि त्याच्या कृपेतील काहीही हक्क त्यांना प्राप्त होत नाही.
एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे शेळ्यांची मागणी केली ज्या दोन पहाडांमध्ये चरत होत्या. पैगंबरांनी त्या सर्व शेळ्या त्या मनुष्याला देऊन टाकल्या. तो मनुष्य त्याच्या वस्तीत जाऊन म्हणाला, ‘‘हे लोकांनो! मुस्लिम व्हा. ईश्वरशपथ, मुहम्मद (स.) इतके काही देतात की दारिद्र्याची भीती नष्ट होते.’’ (हदीस:मुस्लिम)
स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मागणाऱ्याला कधीही परत पाठविले नाही तर देण्यात अत्यंत दयालुता दाखविली.
माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे की एक व्यक्ती जगासाठी मुस्लिम होतो तेव्हा इस्लाम त्याच्या दृष्टीत समस्त जगांपेक्षा अधिक प्रिय होतो. हा होता सत्यधर्म चमत्कार आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सान्निध्याचा प्रवाभ!अर्थात, भौतिकतेला प्राधान्य देणारेसुद्धा पैगंबरांच्या जवळ येऊन सत्य स्वीकारतात.
या आयतींनुसार सदाचारी लोक म्हणजे जे कुणावर रागवत नाहीत आणि लोकांकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना क्षमा करतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक अनुयायी अबू मसऊद आपल्या गुलामास मारहाण करत होते. त्यांच्या मागून आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) होते आणि म्हणत होते की, “जितके नियंत्रण या गुलामावर तुमचे आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहचे तुमच्यावर आहे.” अबू मसऊद म्हणतात या घटनेनंतर मी पुन्हा आयुष्यात कधी कुणावर रागवलो नाही. तसेच एका अन्य अनुयायींनी प्रेषितांना विचारले, “मी माझ्या सेवेत असणाऱ्यांच्या किती चुका माफ करू?” प्रेषित म्हणाले, “दररोज शंभर वेळा.” क्षमाशीलतेचे वर्णन पवित्र कुरआनात फार सुंदररित्या केले आहे.
“जो लोकांना अल्लाहकडे बोलावतो, नेक कर्म करतो आणि म्हणतो की मी श्रद्धावंत आहे त्यापेक्षा चांगले कुणाचे बोलणे. भले आणि वाईट समान नसतात. जे चांगले असेल त्याद्वारे वाईटावर उपाय करा. त्यामुळे ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते तोच तुमचा जीवलग मित्र होईल. पण जे संयमी लोक असतात त्यांनाच हे लाभते आणि ज्यांचे नशीब मोठे त्यांच्याच भाग्यात हे येते.” (कुरआन-४१)
लोकांना पुरेपूर माप करून देणे हे अल्लाह आणि समाजाशी केलेले वचन आहे. “माप करताना पुरेपूर द्या. वजन करताना प्रमाणित तराजूने तोलून द्या.” (कुरआन-१७)
सगळ्यात महत्त्वाचे वचन म्हणजे माणसांनी अल्लाहशी केलेले वचन होय. हे वचन माणसाने अल्लाहशी केलेले असल्याने समस्त मानवांशी, समाजाशी, जनसमूहांशी त्याचा संबंध आहे. जे लोक अल्लाहशी केलेले वचन पूर्ण करतात, आपसातला करार मोडत नाहीत, असे लोक खऱ्या अर्थाने ज्या नातेसंबंधांना अल्लाहने जोडून ठेवण्याचे आदेश दिले आहेत ते जोडून ठेवतात. (कुरआन-१६)
ईद-उल-अज्हा संपूर्ण जगभर साजरी केली जात आहे. इस्लामी कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यामध्येच ज्याला जिलहज्जा म्हणतात जगाच्या काना-कोपऱ्यामधून लाखो हाजी (भाविक) अल्लाहच्या मार्गामध्ये म्हणजेच हज यात्रे मध्ये सामिल होत असतात व तेथे इब्राहीम अलै. च्या आपल्या सुपूत्राच्या कुर्बानीच्या घटनेची आठवण ठेवून प्रतिकात्मकरित्या बकऱ्याची किंवा उंटाची कुर्बानी देत असतात. जे हजला जावू शकत नाहीत ते आपापल्या ठिकाणी कुर्बानी देवून आपण मानवतेच्या मार्गामध्ये त्याग करण्यासाठी बांधिल असल्याची ग्वाही देतात. परंतु दुर्दैवाने कोरोनामुळे गत आणी ह्या वर्षी सऊदी अरेबिया व्यतिरिक्त इतर देशातील हज यात्रेकरूंना सामिल होण्याची परवानगी नाही.
हज हा खरे तर अरबी शब्द-- त्याचा अर्थ होतो - दर्शन करण्याचा निश्चय करणे. हजसाठी जगभरातील लाखोंच्या संख्येने मुस्लिमबांधव काबाच्या दर्शनाचा निश्चय करुन मक्का या शहराकडे निघतात. हज मुस्लिम बांधवाना संपूर्ण आयुष्यात एकदाच पार पाडण्याचे संकेत देण्यात आले आहेत जो कोणी मक्का शहरापर्यंत जाण्या-येण्याचा खर्च करण्याची क्षमता बाळ्गतो केवळ त्या व्यक्तीवरच हे कर्तव्य अनिवार्य करण्यात आले आहेत. हा खर्च स्वकष्टार्जित असेल तर उत्तमच. त्यामुळेच अवैधमार्गार्तून कमाविलेल्या संपत्तीतून हज यात्रा करता येत नाही.
हजचा इतिहास फार उद्बोधक आहे. आजपासून 4 हजार 500 वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अलै.) यांनी अल्लाह ची उपासणा करण्याखातर एक छोटेसे घर बांधले होते. त्याचा उद्देशच जणू असा होता की जगातील कोणत्याही भाविकाने जो शरिराने तंदुरूस्त असेल आणी आर्थिक क्षमता बाळगू शकतो, त्यानेच काबाचे दर्शन घेण्यासाठी निघावे. परंतु निघताना आपली अंत:करणे निर्मळ ठेवावीत तसेच वासनांवर आवर घालावा. रक्तपात, अनाचार , अर्वाच्य बोलणे ह्या पासून जो संयम राखू शकेल त्यानेच अल्लाहचा गुलाम बनून मार्गस्थ व्हावे. हे नियम अर्थात बंधन घालण्याचे कारण म्हणजे तो काळ असा होता कि बहुतेक सर्वांना अल्लाहचे विस्मरण झाले होते. भानामती, जादुटोना व ताईत्त-गंड्याचे स्त्तोम माजले होते. ह्या अनिष्ट प्रथा, चालीरिति त्यांना सहन होनाऱ्या नव्हत्या. म्हणूनच त्यांनी परिवर्तनचा हा विडा उचलला.
हजरत इब्राहीम (अलै.) व हजरत ईस्माईल (अलै.) यांच्या कारकिर्दित हजला महत्त्वाचे स्वरुप प्राप्त झाले. परंतु त्यांच्या हयातीनंतर हजमध्ये एवढ्या बिघाडाचे स्वरुप आले की अहंकार, स्वार्थ, स्वैराचार, अश्लिलतेने थैमान घातले होते. जणू हा काळ अंधःकारमय म्हणून गणला जावू लागला होता. ही स्थिती अशीच पुढे हजारो वर्षे चालत राहिली.
या काळात कोणी पैगम्बर जन्माला आला नाही की, पैगम्बरांची शिकवण देखील लोकापर्यंत पोहोचली गेली नाही. अखेर हजरत इब्राहीम (अलै.) ह्यांचे भाकित खरे ठरले. त्यांच्या संततीमधून एक परिपूर्ण व्यक्तीमत्व 6 व्या शतकात जन्मास आले. ज्यांचे नाव मुहम्मद बिन अब्दुल्लाह (स.) असे होते. त्यांचा जन्म झाला व अरबस्थानात जणू नवचैतन्य निर्माण झाले. भविष्यातील ज्या कार्याचा आराखडा हजारो वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अ.) ह्यानि बांधला होता. ते पूर्णत्वास तर आलेच परंतु केवळ 23 वर्षाच्या कालखंडात सर्व अनिष्ट प्रथांना पायबंद घालून एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला गेला. असे धाडस आणी कार्य करणारी व्यक्ती सामान्य असूच शकत नव्हती. त्यांचे हे कार्य त्या काळात तर उल्लेखनिय होतेच परंतू आजही 1442 वर्षानंतर सर्व मानव जातीला प्रेरणा देणारे असेच आहे. अज्ञान आणि अंधकारमय युगातील सर्व अनिष्ट प्रथा नष्ट केल्या गेल्या.
’’हज्जचे महिने नियत (निश्चित केलेले) आहेत. जी व्यक्ती ह्या निश्चित महिन्यामध्ये हज करण्याचे ठरवील तर त्याने वैषयिक वासनेपासून दूर रहावे. आणि अभद्र बोलू नये आणि भांडणतंटे करू नये. जे काही तुम्ही सत्कर्मे कराल ते अल्लाह जाणतो आहे आणि हज्जच्या काळांत सोबत शिदोरी घ्या. सर्वोत्तम शिदोरी म्हणजे अल्लाहचे भय बाळगणे होय. आणि हे ज्ञानीजनहो माझे भय बाळगा.’’ (सुरे बकरा :197)
’’नंतर जेव्हा हज्जसंबंधीचा विधी तुम्ही पूर्ण कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही अल्लाहचे स्मरण करा जसे तुम्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत होतात. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक स्मरण करा, (परंतु अल्लाहचे स्मरण करणार्यांमध्येही खूप फरक आहे.) त्यांच्यापैकी काही तर असे आहेत जे म्हणतात कि, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला या लोकीच सर्वकाही दे. अशा व्यक्तीसाठी परलोकमध्ये काहीही वाट्याला येणार नाही.’’ (सुरतुल बकरा :200)
जगभरातून सामील झालेले हाजी यांचा देश, प्रांत बोलीभाषा ही निरनिराळी असू शकते, परंतू त्यांनी परिधान केलेला पोशाख (एहराम) मात्र सारखाच असतो. गरीब असो अथवा श्रीमंत सर्वजण अल्लाहसमोर समसमान. हाच संदेश ह्या यात्रेतुन पहावयास मिळ्तो. हज यात्रेत श्रद्धावंतांच्या समोर जसजसा काबागृह जवळ येवू लागतो, तसतसा हा हाजी अल्लाहच्या भेटीसाठी बेभान होतो. जीवनात केलेली दुष्कृत्यांबद्दल मनात अपराधी भावना निर्माण होतात. तसेच या यात्रेतून मिळालेल्या सकारात्मक उर्जेतून हाजी भविष्यकाळात एक चांगला, आज्ञाधारक व सुजान नागरीक बनण्याची प्रतिज्ञा मनात करूनच मक्का सोडतो.जणू एक वेगळीच उर्जा त्याच्या अंगात संचारते. हज यात्रेत सामिल झालेल्या सर्वच हाजींची हीच अवस्था असते. हज प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक हाजी हा साक्षात अल्लाहच्या भेटीसाठी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीका लकलब्बैक (मी हजर आहे, तुझ्या घराच्या दर्शनासाठी) अशा घोषणा करत पुढे सरकत असतो.
मुहम्मद पैगम्बर (स.) हे अंतिम प्रेषित होत त्यांच्यानंतर कोणी प्रेषित जन्माला येणार नाही हे सत्य आहे. त्यांनी हजमध्ये सामील झालेल्या यात्रेकरुसाठी दिलेले शेवटचे भाषण आजही तेवढेच समर्पक व प्रत्येकाने अनुकरण करावे असेच आहे. ह्या शेवटच्या संवादातून त्यानी सर्व मानव एकमेकांचे बंधूच असून मानवतावाद आणी विश्व- बंधुत्वाचा संदेशच दिला. वास्तविक पाहता जगातील मानवाधिकाराची ही पहिलीच सनद असून, त्यानंतर पुढच्या कालखंडात मानवाधिकाराच्या संवेदना जागतिक स्तरावर लोकांमध्ये जाग्या झाल्या.
- अस्लम जमादार, पुणे
(लेखक परिवर्तन - अल्पसंख्यांक शैक्षणिक चळ्वळीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)
जगभरातील मुस्लिम बांधव बकरीद मध्ये जनावरांची कुर्बानी का करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेषित इब्राहीम अलै सलाम यांच्या जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज पासून सुमारे चार हजार वर्षापूर्वी अर्थात ईसा पूर्व 2100 वर्षापूर्वी आदरणीय इब्राहीम यांचा जन्म इराकमधील उर शहरात आजर नावाच्या प्रमुख महांताच्या घरी झाला जे राजपुरोहित तर होतेच मूर्ती बनवून विकण्याचा त्यांचा व्यापारही होता. त्यांच्याकडे अपार संपत्ती होती परंतु हे सर्व मूर्तिपूजक होते स्वतःला चंद्रवंशी व सूर्यवंशी म्हणून घेत मूर्ति तयार करणे आणि तिच्यासमोर नतमस्तक होणे ही बाब आदरणीय इब्राहीम आलै सलाम यांना पटत नव्हती म्हणून ते आपल्या वडिलांना विविध प्रश्न विचारीत परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. प्रेषित इब्राहीम आलै सलाम यांनी लोकांना विविध प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सर्वांना काही ना काही गरजा आहेत माझा अल्लाह, ईश्वर गरजवंत नाही तो एकमेव आहे जमीन आणि आकाशामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता, सर्वांना निर्माण करणारा ,जन्म देणारा, पालन पोषण करणारा, मृत्यु देणारा माझा तुमचा आणि विश्वाचा अल्लाह, ईश्वर आहे तो एकच आहे म्हणून त्यांनी इतर देवी-देवतांचा इंकार केला येथूनच त्यांची पहिली परीक्षा सुरू झाली. तेथील राजाने त्यांना जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली पुजाऱ्याचा मुलगा म्हणून अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अल्लाह, ईश्वरा वरील तो एक असल्याचा दृढ विश्वास असल्यामुळे ते डगमगले नाहीत माघार घेतली नाही वडिलांनी घरातून काढून टाकले. राजाच्या आदेशाने अतिशय मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला अग्निकुंडाची आग भयंकर होती तरीपण पर्वता पेक्षा अधिक दृढ हृदय बाळगणाऱे एका ईश्वरावर विश्वास ठेवणारे प्रेषित इब्राहीम विचलित झाले नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले "ज्यांना तुम्ही ईश्वरत्वात भागीदार ठरविता त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही".
राजाच्या आदेशाने शिपायांनी प्रेषित इब्राहीम यांना धगधगत्या अग्निकुंडात फेकून दिले. आदरणीय इब्राहीम अल्लाचे प्रेषित होते अल्लाहने त्यांचे रक्षण केले. अग्नीला आदेश दिला " हे अग्नी, थंड हो शांती, सुरक्षा, सुखदायी हो इब्राहीम साठी " अल्लाह, ईश्वराच्या आदेशाने अग्नी इब्राहीम साठी थंड व शांत बनली अग्नित फेकून देणे इतके महाभयंकर होते की, त्याजागी आदरणीय प्रेषित यांना त्या लोकांमध्ये वास्तव्य करणे अशक्य होते. म्हणून अल्लाने त्यांना स्वदेश त्यागाचा आदेश दिला उर शहराला सोडून निघून जावे. प्रेषित इब्राहीम यांनी आपली पत्नी व पुतण्या लूत अलैसलाम यांना सोबत घेऊन आपला देश सोडला त्यांनी राजपुरोहिताची गादी, धनसंपत्ती सोडून सीरिया , पॅलेस्टाईन, इजिप्त आणि अरबस्तानातील विविध देशात फिरत राहिले. अल्लाहलाच माहित या प्रवासात त्यांना किती अडचणी आल्या असतील. ते धनसंपत्ती कमविण्याच्या चिंतेत भटकत नव्हते तर लोकांना प्रत्येकाच्या गुलामगिरीतून मुक्त करून फक्त एका अल्लाचे, ईश्वराचे गुलाम बनावे हा संदेश देत होते. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आमची ही परीक्षि आहे. या भ्रमंतीमध्ये लोकांना सत्याची जाणीव करून देताना त्यांना कोठेही शांती लाभली नाही. वर्षानुवर्षे विना बिऱ्हाड भटकत राहिले. अशाच प्रकारे तारुण्य निघून जाऊन केस पांढरे झाले आणि जीवणाची दुसरी परीक्षा सुरू झाली. वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांना संतती प्राप्त झाली नव्हती. अल्लाहने त्यांना 86 व्या वर्षी संतती दिली. ते करत असलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी कोणीतरी वारस हवा म्हणून त्यांनी अल्लाकडे प्रार्थना, संततीची याचना केली होती.पुत्र प्राप्ती नंतर अल्लाहने त्यांची दुसरी परीक्षा घेतली म्हातारपणी पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद काही औरच होता. कृतज्ञता व्यक्त केली याच काळात अल्लाहचा आदेश मिळाला की काबागृहासाठी जागा निश्चित केलेली आहे तुम्ही तिकडे जा. आपल्या पत्नीला व लहान मुलाला घेऊन आज काबागृह जिथे उभा आहे तेथे पोहोचले हा परिसर निर्जन निर्जल ओसाड निर्मनुष्य होता.
या ठिकाणी दूरदूरपर्यंत वस्ती आणि पाणीही नव्हते. अल्लाहाने पुन्हा आदेश दिला पत्नी व मुलाला येथे सोडून निघूनजा. आदरणीय इब्रहिम अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक झाले विरान वाळवंटात निर्मनुष्य जागी आपल्या पत्नीला, लहान मुलाला सोडून जाताना त्यांच्या मनस्थितीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही म्हातारपणी नुकतेच पुत्रप्राप्ति झाली होती की हा आदेश प्राप्त झाला.
पुढे गेल्यावर काबागृहाकडे तोंड करून प्रार्थना केली "हे माझ्या निर्माणकर्त्या प्रभू, मी अशा निर्जन व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू असे मी अशासाठी केले आहे की, या लोकांनी येथे नमाज कायम करावी म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर आणि यांना खावयास फळे दे कदाचित ते कृतज्ञ होतील " प्रेषितांची पत्नी आणि लहान मुल आदरणीय इस्माईल त्या वाळवंटात एकटे पडले थोडं फार अन्नपाणी होती ते संपले अन्नपाणी नाही म्हणून आईला दूध एत नव्हते. मुलाची परिस्थिती वाईट होती भुकेने व्याकुळ होते कोठे पाणी मिळते काय किंवा कुणीप्रवासी दिसतील तर पाणी मागता येईल कारण मुल रडत होते म्हणून आई हजरा त्या ठिकाणी असलेल्या दोन टेकड्या सफा ,मरवा यावर चढून इकडे तिकडे पाहत होती, प्रार्थना करत होती, दोन्ही टेकड्या मध्ये त्यांनी सात फेऱ्या मारल्या टेकडीवर जात पुन्हा मुल एकटे आहे म्हणून धावून परत येत. जीव कासावीस होत होता मूल रडत होते अल्ला पाहत होता दोन्ही टेकड्यांमध्ये किमान 450 मीटर अर्थात चौदाशे 80 फूट एवढं अंतर होतं 7व्या फेरी मध्ये 3.15 किमी अंतर त्यांनी पार केलं होतं. शेवटी सातव्या फेरीनंतर त्या ठिकाणी देवदूतांनी पाण्याचा झरा निर्माण केला. जो जमजम च्या नावाने आजही अस्तित्वात असून जगातील सर्वात वैज्ञानिक दृष्टीने शुद्ध असून अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी संपूर्ण जगातून येणारे लोक घेऊन जातात. पाण्यासाठी आईची ती पराकाष्ठा जगभरातील अनुयायासाठी हज यात्रेतील आवश्यक परंपरा म्हणून अनिवार्य केली गेली.त्या सात फेऱ्या तशाच पूर्ण केल्याशिवाय हजपूर्ण होत नाही. दुसऱ्यापरीक्षेमध्ये ही प्रेषित इब्राहीम यशस्वी झाले. पाण्यामुळे त्या ठिकाणी वस्ती झाली होती. अधून मधून प्रेषित मुलास भेटण्यासाठी येत. अशाप्रकारे मुलगा, प्रेषित इस्माईल 14 वर्षाचे झाले. आतापर्यंत अल्लाहने प्रेषित इब्राहीम यांना ज्या ज्या परीक्षेत आजमावले त्या सर्व परीक्षेमध्ये ते खरे उतरले.
आता तिसरी परीक्षा सुरू झाली होती. मुलास भेटावयास गेले असताना आपल्या मुलास त्यांनी जे सांगितले ते कुराणाच्या शब्दात खालील प्रमाणे आहे "तो मुलगा जेव्हा त्यांच्यासमोर धावपळ करण्याच्या वयात आला तेव्हा एके दिवशी प्रेषित इब्राहीम यांनी त्याला सांगितले हे माझ्या मुला मी स्वप्नात पाहतो की, मी तुझा बळी देत आहे आता सांग तुझा काय विचार आहे, मुलाने सांगितले हे पिताजी जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसे करा अल्लाहाने इच्छिले तर आपणास मी धैर्यशील आढळेल. पूर्ण विश्व पिता पुत्राचा संवाद स्तब्ध होऊन ऐकत होता. कुराणाची स्पष्टोक्ती आहे "सरते शेवटी जेव्हा या दोघांनी अल्लाच्या आज्ञापालनात मान तूकविली आणि प्रेषित इब्राहीम यांनी पुत्राला ओणवे केले." पुत्राला ओणवे करणे यासाठी
की बळी देताना पुत्राच्या चेहऱ्याकडे पाहून प्रेषित यांचे याचे प्रेम उफाळून येऊ नये आणि त्यांचे हात डगमगायला नको. पुत्राच्या गळ्यावर सुरी फिरवणार तोच अल्लाहने आवाज दिला, आकाशवाणी झाली कुराणात आहे "आणि आम्ही पुकारले हे इब्राहीम तू स्वप्न साकार केलेस,आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो निश्चितच ही एक उघड परीक्षा होती." परीक्षा तर होतीच परंतु अल्लाहने आदरणीय इस्माईल यांना वाचविले. ह्या परीक्षेत आदरणीय प्रेषित इब्राहीम खरे उतरल्यानंतर त्यांना अल्लाहने जे बक्षीस दिले त्याचा उल्लेख कुराणाच्या शब्दात "आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा व गुणगाण भावी पिढ्यांत सदैव ठेवले. सलाम आहे इब्राहीम अलैसलाम वर आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. अल्लाहने एक सुदृढ मेंढा बळी देण्याचा आदेश दिला हे याच्या साठी होते की आदरणीय इब्राहीम आपल्या मुलाचा बळी देत होते परंतु अल्लाहने योग्य वेळी त्यांना रोखले ह्याचे बक्षीस अल्लाहने अशाप्रकारे दिले की या बलिदानास आदरणीय प्रेषित इब्राहीम यांची परंपरा आणि कार्य घोषित केले. बलिदानाची ही परंपरा श्रद्धावंतासाठी अंतिम दिनापर्यंत जिवंत ठेवली.प्रत्येक वर्षी याच दिवशी म्हणजे या महिन्याच्या दहा तारखेला जनावरांची कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी करताना आदरणीय इब्राहीम यांचे ते बलिदान आठवते जे त्यांनी उर शहरापासून येथपर्यंत केले होते कुर्बानीचा उद्देश ईश्वराचे आज्ञापालन आहे म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरीदच्या दिवशी विश्वाच्या अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी देतात. गोर गरीबांमध्ये वाटतात. ही एक उपासना आहे जी अल्लाच्या आदेशानुसार इब्राहीम आले सलामच्या परंपरेनुसार प्रतीकात्मक देण्यात येते. तसे पाहिले तर हजरत इब्राहीम यांचे पूर्ण जीवन कुर्बानीची, बलिदानाची गाथा आहे. जगातील प्रत्येक वस्तू पेक्षा आपल्या म्हातारपणात प्राप्त झालेल्या मुलांच्या जीवनापेक्षा निर्माणकर्त्या अल्लाचा आदेश महत्त्वाचा आहे. आणि हेच अल्लाच्या दासाचे कर्तव्य आहे. माणसाची परीक्षा आहे आमचं सुध्दा कर्तव्य आहे पालन कर्त्याचा निर्माण कर्त्या, मालकाचा आदेश सर्वपरी म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले जीवन जगावे त्यातच आमचं आमच्या विश्वासचे कल्याण आहे.
- अ. मजीद खान
नांदेड,
Mo. 9403004232