Latest Post


प्रत्येक संस्कृती-सभ्यतेत जनसमूहात आनंद साजरा करण्याचे प्रसंग येत असतात, सण साजरे केले जातात. हे प्रसंग मानवी स्वभावाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येक माणसाला आनंद लुटण्याची इच्छा असते आणि ती साहजिकच स्वाभाविक आहे. त्याचबरोबर माणसांना संकटांनी घेरले तर तो घाबरून जातो. कारण संकट येणे माणसाला पसंत नाही. पसंत नसले तरीदेखील सुख आणि दुःख हे जीवनाचे कालचक्र आहे. अल्लाह म्हणतो की आनंदाने भारावून जाऊ नका आणि दुःख कोसळल्यास घाबरून जाऊ नका. लोक दुःखासाठी नैसर्गिक, दैवी शक्तींना जबाबदार ठरवतात, तर आनंदाच्या प्रसन्नतेच्या प्रसंगांचे स्वतःला श्रेय देतात. पवित्र कुरआनात अल्लाहने म्हटले आहे, “जगातील जीवन खेळ करमणूक देखावा एकमेकांशी दुराभिमान, संतती व संपत्तीविषयी ऐश्वर्याच्या चुरशीशिवाय काही नाही, शेतात आलेल्या पिकामुळे शेतकरी आनंदित होतो. ती वाढत जाऊन पिवळी पडते आणि नंतर तिचा भुसा होऊन जातो.” असेच या जगातील माणसाचे जगणे आहे. सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात आणि निघून जातात तेव्हा माणसाने प्रसन्नतेच्या वेळी घमेंड करू नये. एकमेकांशी दुराभिमान बाळगू नये. “तुमच्या हातातून निसटून जात त्यावर निराश होऊ नये आणि जे तुम्हाला देणगीने मिळेल त्यावर फुलून जाऊ नये.” तात्पर्य हे की माणसाला जेव्हा प्रसन्नता लाभते तेव्हा त्याने त्यासाठी अल्लाहचे आभार मानावे. जास्तच काही मिळाले असल्यास त्याने अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) असेच करत होते. त्यांचे अनुयायी सुद्धा अशाच प्रकारे प्रेषितांचे पालन करायचे. आनंद साजरा करणे म्हणजे त्या दिवशी काहीही करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे नाही. कुठल्याही प्रकारे नैतिक मर्यादा ओलांडण्याची अनुमती नाही. जुगार, दारू, इत्यादी करमणुकीची मुभा नाही. सामान्य दिवसांमध्ये ज्या मर्यादा घातलेल्या असतात त्या मर्यादा कितीही मोठा आनंद प्राप्त झाला तरी त्यांना ओलांडण्याचा प्रश्नच नाही. प्रेषित मुहम्मद (स.) काळात ईदच्या दिवशी प्रचलित परंपरा पाळल्या जात होत्या. डफ-वाजवून गीत गायले जाई, खेळांच्या स्पर्धा भरविल्या जात, परंतु कसल्याही प्रकारचा अनैतिक जल्लोष साजरा केला जात नव्हता. ईदचा मानवतेसाठी ‘पयाम’ म्हणजे सणासुदीच्या जल्लोषात गोरगरीब वंचितांना विसरून जाऊ नये.


जर असे नाही तर मग विचार करा की दोहोंमध्ये मूळ फरक काय आहे? याचे उत्तर केवळ एक आहे आणि ते असे की दोहोंमध्ये फरक इस्लाम व अनेकेश्वरत्वामुळे पडतो. इस्लामचा अर्थ अल्लाहची आज्ञा पाळणे आहे. आणि अनेकेश्वरत्वाच अर्थ अल्लाहची अवज्ञा करणे आहे. मुस्लिम व अनेकेश्वरवादी (अल्लाहचा इन्कार करणारे) दोघे मनुष्य आहेत. दोघे अल्लाहचे दास आहेत. परंतु एक मनुष्य अशा कारणाने श्रेष्ठ बनतो की तो त्याच्या स्वामीला ओळखतो, त्याच्या आज्ञेचे पालन करतो आणि त्याच्या अवज्ञेच्या परिणामाचे भय बाळगतो. दुसरा मनुष्य उच्च स्थानावरून या कारणास्तव खाली कोसळतो की तो त्याच्या स्वामीला ओळखत नाही आणि त्याची अवज्ञा करतो. यामुळेच अल्लाह आज्ञाधारकांवर (मुस्लिमांवर) प्रसन्न आहे व अनेकेश्वरवाद्यावर (अवज्ञाकारींवर) अप्रसन्न. तो आज्ञाधारकांना (मुस्लिमांना) जन्नत देण्याचा वायदा करतो आणि अनेकेश्वरवाद्यांना (अवज्ञाकारींना) म्हणतो की जहन्नममध्ये टाकीन.

फरकाचे कारण - ज्ञान व कर्म

यावरून असे कळते की आज्ञाधारकाला (मुस्लिमाला) अनेकेश्वरवादी (काफिर) पासून वेगळे करणारी मूळ कारणे हीच आहेत- एक ज्ञान व दुसरे कर्म. म्हणजे प्रथम तर त्याला हे जाणून घेतले पाहिजे की त्याचा स्वामी कोण आहे? त्याचे आदेश काय आहेत? त्याच्या इच्छेनुसार चालण्याचा अर्थ काय आहे? कोणते कर्म केल्याने तो प्रसन्न होतो व कोणत्या कर्मामुळे तो अप्रसन्न होतो? मग जेव्हा या गोष्टी त्याला कळल्या तेव्हा माणसाचे हे कर्तव्य ठरते की त्याने स्वत:ला स्वामीचा दास बनवावे. जशी मालकाची इच्छा असेल त्याप्रमाणे वागावे आणि जी स्वत:ची इच्छा असेल व मालकाची आज्ञा त्याच्या विरूद्ध असेल तर त्याने मनाचे म्हणणे ऐवूâ नये आणि स्वामीच्या आज्ञेचे पालन करावे. एखादे कर्म त्याला चांगले वाटत असेल आणि स्वामीने त्याला वाईट म्हटले तर त्याला वाईट समजावे. एखादे दुसरे कर्म त्याला वाईट वाटत असेल, परंतु स्वामीने सांगितले की ते चांगले आहे तर त्याला चांगलेच समजावे. एखाद्या कामात त्याला नुकसान दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की त्याने ते करावे तर ते त्याने केलेच पाहिजे. मग ते करण्यात त्याला प्राणार्पण करावे लागो अथवा कितीही सांपत्तिक हानी त्याला सोसावी लागो ते त्याने अवश्य करून दाखवावे. एखाद्या दुसऱ्या कामात त्याला लाभच लाभ दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की ते त्याने करू नये तर मग जरी त्या कामात विपुल संपत्ती त्याला मिळत असेल तरी ते कार्य कदापि करू नये.

हेच ते ज्ञान व कर्म आहे ज्यामुळे मुस्लिम अल्लाहचा प्रिय दास बनतो व त्यावर अल्लाहचा कृपाप्रसाद अवतरित होतो आणि अल्लाह त्याला गौरव प्रदान करतो. अवज्ञाकारी- अनेकेश्वरवाद्याजवळ हे ज्ञान नसते, त्यामुळे त्याचे कर्मसुद्धा तसे नसते. म्हणून तो ईश्वराचा अज्ञानी व अवज्ञाकारी दास बनतो आणि ईश्वर त्याला आपल्या कृपाप्रसादापासून वंचित ठेवतो.

आता स्वत:च न्यायाची कास धरून विचार करा की जो मनुष्य स्वत:ला आज्ञाधारक (मुस्लिम) म्हणत असेल आणि तसाच अज्ञानी असेल जसा एक अनेकेश्वरवादी- अवज्ञाकारी (काफिर) असतो व तसाच अवज्ञाकारी असेल जसा एक अनेकेश्वरवादी असतो तर मग केवळ नाव, पोशाख आणि खाण्यापिण्याच्या फरकामुळे एखाद्या अनेकेश्वरवाद्याच्या- अवज्ञाकारींच्या तुलनेत तो कशा प्रकारे श्रेष्ठ ठरू शकेल? कोणत्या आधारे या जगात व पारलौकिक जीवनात अल्लाहच्या कृपाप्रसादाचा तो अधिकारी ठरू शकेल? इस्लाम कोणत्याही वंश किंवा घराणे अथवा जातीचे नाव नाही. इस्लाम पित्याकडून पुत्रास व पुत्राकडून पौत्रास आपोआप मिळत नाही. इस्लामला मान्य नाही की ब्राह्मणाचा मुलगा कितीही अज्ञानी असो आणि त्याने कितीही दुष्कृत्ये केली तरी तो उच्च कुलीनच राहील, कारण त्याने ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आहे आणि उच्च जातीचा आहे. तसेच चांभाराचा मुलगा मग तो ज्ञान व कर्माच्या दृष्टीने सर्वप्रकारे श्रेष्ठ असला तरी तो नीचच राहील, कारण त्याने चांभाराच्या घरी जन्म घेतला आहे व नीच आहे. इस्लाममध्ये तर अल्लाहने आपल्या ग्रंथात (पवित्र कुरआनमध्ये) स्पष्ट सांगितले आहे,

‘‘अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे.’’ (कुरआन-४९:१३)

प्रेषित इब्राहीम (अ.) एका मूर्तिपूजकाच्या घरी जन्मले. परंतु त्यांनी अल्लाहला ओळखले आणि त्यांनी त्याच्या आज्ञेचे पालन केले म्हणून अल्लाहने त्यांना संपूर्ण जगाचा नेता बनविले. प्रेषित नूह (अ.) यांच्या मुलाने एका प्रेषिताच्या घरी जन्म घेतला, परंतु त्याने अल्लाहला ओळखले नाही आणि त्याची अवज्ञा केली. म्हणून अल्लाहने त्याच्या घराण्याचा विचार केला नाही आणि त्याच्यावर असा प्रकोप केला की ज्यापासून जगाने धडा घ्यावा. म्हणून चांगल्याप्रकारे समजून घ्या की अल्लाहच्या दृष्टीने माणसामाणसात काही फरक आहे तर तो ज्ञान व कर्मामुळे आहे. या जगात व पारलौकिक जीवनातसुद्धा त्याची कृपा केवळ त्याच लोकांसाठी आहे जे त्याला ओळखतात आणि त्याने दाखविलेल्या सरळमार्गाचे ज्ञान बाळगतात व त्याच्या आज्ञेचे पालन करतात. ज्या लोकांत हे गुण नसतील, मग त्यांची नावे अब्दुल्लाह आणि अब्दुर्रहमान असोत अथवा दीनदयाल आणि कर्तारसिंह; अल्लाहच्या दृष्टीने या दोघांत काहीही फरक नाही आणि त्याच्या कृपेतील काहीही हक्क त्यांना प्राप्त होत नाही.



माननीय अनस (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे शेळ्यांची मागणी केली ज्या दोन पहाडांमध्ये चरत होत्या. पैगंबरांनी त्या सर्व शेळ्या त्या मनुष्याला देऊन टाकल्या. तो मनुष्य त्याच्या वस्तीत जाऊन म्हणाला, ‘‘हे लोकांनो! मुस्लिम व्हा. ईश्वरशपथ, मुहम्मद (स.) इतके काही देतात की दारिद्र्याची भीती नष्ट होते.’’ (हदीस:मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मागणाऱ्याला कधीही परत पाठविले नाही तर देण्यात अत्यंत दयालुता दाखविली.

माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे की एक व्यक्ती जगासाठी मुस्लिम होतो तेव्हा इस्लाम त्याच्या दृष्टीत समस्त जगांपेक्षा अधिक प्रिय होतो. हा होता सत्यधर्म चमत्कार आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सान्निध्याचा प्रवाभ!अर्थात, भौतिकतेला प्राधान्य देणारेसुद्धा पैगंबरांच्या जवळ येऊन सत्य स्वीकारतात.



जसे वचनबद्धता अल्लाहचे वैशिष्ट्य आहे तसेच क्षमा करणेदेखील अल्लाहचे मानवतेला मोठे वरदान आहे. जर असे नसते तर अल्लाहने या जगाला आणि यातील मानवजातीला कधीच नष्ट केले असते. पवित्र कुरआननात म्हटले आहे की, “तोच आपल्या मानवांचा पश्चात्ताप स्वीकारतो आणि त्यांच्यातील अवगुणांना माफ करून टाकतो.” (कुरआन) जर अल्लाहची तशी इच्छा असती तर माणसांच्या वाईटपणासाठी त्यांचा नाश केला असता. अशाच प्रकारे मानवांना म्हटले आहे की, “जर तुम्ही कुणाच्या वाईट कृत्यांना क्षमा केले तर अल्लाह तुम्हालादेखील माफ करण्याचे सामर्थ्य राखतो.” (कुरआन-३) माणसांनी एकमेकांना क्षमा केली पाहिजे. असे केल्यास अल्लाह माणसांना क्षमा करतो, कारण तो परमदयाङू आहे. अल्लाह म्हणतो, “तुमच्या विधात्याने आपल्या दयेने आणि क्षमाशीलतेने तुमच्यासाठी जो स्वर्ग निर्माण केला आहे त्या स्वर्गाकडे धाव घ्या, ज्याचा विस्तार सबंध आकाश आणि साऱ्या धरतीसमान आहे. हा स्वर्ग अशा सदाचारी लोकांसाठी तयार केला गेला आहे जे टंचाईत असोत की भरभराटीत आपली साधने लोकांच्या सेवेत बहाल करतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करून टाकतात. अशाच लोकांना अल्लाह पसंत करतो.” (कुरआन)

या आयतींनुसार सदाचारी लोक म्हणजे जे कुणावर रागवत नाहीत आणि लोकांकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना क्षमा करतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक अनुयायी अबू मसऊद आपल्या गुलामास मारहाण करत होते. त्यांच्या मागून आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) होते आणि म्हणत होते की, “जितके नियंत्रण या गुलामावर तुमचे आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहचे तुमच्यावर आहे.” अबू मसऊद म्हणतात या घटनेनंतर मी पुन्हा आयुष्यात कधी कुणावर रागवलो नाही. तसेच एका अन्य अनुयायींनी प्रेषितांना विचारले, “मी माझ्या सेवेत असणाऱ्यांच्या किती चुका माफ करू?” प्रेषित म्हणाले, “दररोज शंभर वेळा.” क्षमाशीलतेचे वर्णन पवित्र कुरआनात फार सुंदररित्या केले आहे.

“जो लोकांना अल्लाहकडे बोलावतो, नेक कर्म करतो आणि म्हणतो की मी श्रद्धावंत आहे त्यापेक्षा चांगले कुणाचे बोलणे. भले आणि वाईट समान नसतात. जे चांगले असेल त्याद्वारे वाईटावर उपाय करा. त्यामुळे ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते तोच तुमचा जीवलग मित्र होईल. पण जे संयमी लोक असतात त्यांनाच हे लाभते आणि ज्यांचे नशीब मोठे त्यांच्याच भाग्यात हे येते.” (कुरआन-४१)



दिलेले वचन पूर्ण करणे हे स्वतः अल्लाहचे वैशिष्ट्य आहे. पवित्र कुरआनात अल्लाह स्वतःविषयी असे म्हणतो की, निश्चितच अल्लाह कधीही वचनभंग करत नाही. अल्लाहने केलेले हे वचन आहे आणि तो कधीच आपल्या वचनाच्या विरोधात जात नाही. अल्लाह कधीही आपला शब्द टाळत नसतो. अल्लाहपेक्षा आपल्या वचनाशी बांधिल इतर कोण असू शकतो? (पवित्र कुरआन, विविध अध्यायांतील आयती) साधारणपणे दोन माणसांनी आपसात केलेल्या करारास वचन म्हटले जाते. पण जीवनातील प्रत्येक क्षेत्रात वचनपूर्ती करावी लागत असते. मग ते सामाजिक असो की आर्थिक, संस्कृती-सभ्यतेशी निगडीत असो की राज्यव्यवस्थेशी संबंधित असो; प्रत्येक क्षेत्रात माणसाने वचनबद्धता पाळली पाहिजे. मुस्लिमांच्या बाबतीत असे म्हटले गेले आहे की जर ते आपले वचन पाळत नसतील तर त्यांची श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. जे वचन पाळतात अशा श्रद्धावंतांसाठी कुरआनात म्हटले आहे की, “असे लोक त्यांच्याकडील अमानती परत करतात. वचनभंग करत नसतात. आपल्या नमाजांविषयी (उपासना) ते दक्ष असतात. तेच लोक स्वर्गाचे वारस असतील. अशाच लोकांना उच्च दर्जाच्या स्वर्गांचा वारसा लाभेल, कारण ते लोक आपल्या विधात्याच्या आयतींवर श्रद्धा ठेवतात, त्यास भागीदार जोडत नाहीत. त्यांना जे काही जमेल ते इतरांना देतात. अशाच लोकांच्या हृदयांना आपल्या विधात्याकडे परतण्याची सतत भीती असते.” (पवित्र कुरआन-२३)

लोकांना पुरेपूर माप करून देणे हे अल्लाह आणि समाजाशी केलेले वचन आहे. “माप करताना पुरेपूर द्या. वजन करताना प्रमाणित तराजूने तोलून द्या.” (कुरआन-१७)

सगळ्यात महत्त्वाचे वचन म्हणजे माणसांनी अल्लाहशी केलेले वचन होय. हे वचन माणसाने अल्लाहशी केलेले असल्याने समस्त मानवांशी, समाजाशी, जनसमूहांशी त्याचा संबंध आहे. जे लोक अल्लाहशी केलेले वचन पूर्ण करतात, आपसातला करार मोडत नाहीत, असे लोक खऱ्या अर्थाने ज्या नातेसंबंधांना अल्लाहने जोडून ठेवण्याचे आदेश दिले आहेत ते जोडून ठेवतात. (कुरआन-१६)



ईद-उल-अज़्हा ला आपल्याकडे बकरी ईद ही म्हटले जाते जे की चुकीचे आहे. ही ईद केवळ बकऱ्याची कुर्बानी देण्यापर्यंत मर्यादित नसून या ईदच्या मागे फार मोठा इतिहास आहे. हजरत इब्राहिम अलै. आपले एकुलते एक सुपूत्र इस्माईल अलै. यांची अल्लाहच्या आदेशाने कुर्बानी देण्याची तयारी असल्याच्या घटनेची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. या ईदचा थोडक्यात संदेश त्याग आहे. आपण स्वतः या घटनेपासून प्रेरणा घेऊन गरीबांसाठी, देशासाठी काय त्याग करू शकतो याचा वार्षिक आढावा घेण्याची संधी प्रत्येकाला ही ईद उपलब्ध करून देते.   ईदनिमित्त आजच्या महामारीच्या युगात रक्त, प्लाज्मा दान तसेच वंचित घटकांसाठी आपण काय त्याग करु शकतो, हा विचार मनात येणे आणी तो प्रत्यक्षात रुजविने हे जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने ईदुल अज्हा  साजरी करण्याचे सार्थक होईल आणी खऱ्या अर्थाने आपण इब्राहीम अलै. यांचे अनुयायी असल्याचे सिद्ध होईल.

ईद-उल-अज्हा संपूर्ण जगभर साजरी केली जात आहे. इस्लामी कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यामध्येच ज्याला जिलहज्जा म्हणतात जगाच्या काना-कोपऱ्यामधून लाखो हाजी (भाविक) अल्लाहच्या मार्गामध्ये म्हणजेच हज यात्रे मध्ये सामिल होत असतात व तेथे इब्राहीम अलै. च्या आपल्या सुपूत्राच्या कुर्बानीच्या घटनेची आठवण ठेवून प्रतिकात्मकरित्या बकऱ्याची किंवा उंटाची कुर्बानी देत असतात. जे हजला जावू शकत नाहीत ते आपापल्या ठिकाणी कुर्बानी देवून आपण मानवतेच्या मार्गामध्ये त्याग करण्यासाठी बांधिल असल्याची ग्वाही देतात. परंतु दुर्दैवाने कोरोनामुळे गत आणी ह्या वर्षी सऊदी अरेबिया व्यतिरिक्त इतर देशातील हज यात्रेकरूंना सामिल होण्याची परवानगी नाही.

हज  हा खरे तर  अरबी शब्द-- त्याचा अर्थ होतो - दर्शन करण्याचा  निश्चय करणे. हजसाठी जगभरातील लाखोंच्या संख्येने मुस्लिमबांधव काबाच्या दर्शनाचा निश्चय करुन मक्का या शहराकडे निघतात. हज मुस्लिम बांधवाना संपूर्ण  आयुष्यात  एकदाच पार पाडण्याचे  संकेत देण्यात  आले आहेत जो कोणी मक्का शहरापर्यंत जाण्या-येण्याचा   खर्च करण्याची क्षमता  बाळ्गतो केवळ त्या व्यक्तीवरच हे कर्तव्य अनिवार्य करण्यात  आले  आहेत. हा खर्च स्वकष्टार्जित असेल तर उत्तमच. त्यामुळेच अवैधमार्गार्तून कमाविलेल्या संपत्तीतून हज यात्रा करता येत नाही.  

हजचा इतिहास फार उद्बोधक आहे. आजपासून 4 हजार 500 वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अलै.) यांनी अल्लाह ची उपासणा  करण्याखातर एक  छोटेसे  घर बांधले होते. त्याचा उद्देशच जणू असा होता की जगातील कोणत्याही भाविकाने जो शरिराने तंदुरूस्त असेल  आणी आर्थिक क्षमता  बाळगू  शकतो, त्यानेच काबाचे दर्शन घेण्यासाठी निघावे. परंतु निघताना आपली अंत:करणे निर्मळ ठेवावीत तसेच वासनांवर आवर घालावा. रक्तपात, अनाचार , अर्वाच्य बोलणे ह्या पासून जो संयम राखू शकेल त्यानेच अल्लाहचा गुलाम बनून मार्गस्थ व्हावे. हे नियम अर्थात बंधन घालण्याचे कारण म्हणजे तो काळ असा होता कि बहुतेक सर्वांना अल्लाहचे विस्मरण झाले होते. भानामती, जादुटोना व ताईत्त-गंड्याचे स्त्तोम माजले होते. ह्या अनिष्ट प्रथा, चालीरिति त्यांना सहन होनाऱ्या  नव्हत्या. म्हणूनच त्यांनी परिवर्तनचा हा विडा उचलला. 

हजरत इब्राहीम (अलै.) व हजरत ईस्माईल (अलै.) यांच्या कारकिर्दित हजला महत्त्वाचे स्वरुप प्राप्त झाले. परंतु त्यांच्या हयातीनंतर हजमध्ये एवढ्या बिघाडाचे स्वरुप आले की अहंकार, स्वार्थ, स्वैराचार, अश्लिलतेने थैमान घातले होते. जणू हा काळ अंधःकारमय म्हणून गणला जावू लागला होता. ही स्थिती अशीच पुढे हजारो वर्षे चालत राहिली. 

या काळात कोणी पैगम्बर जन्माला आला नाही की, पैगम्बरांची शिकवण देखील लोकापर्यंत पोहोचली  गेली नाही. अखेर हजरत इब्राहीम (अलै.) ह्यांचे भाकित खरे ठरले. त्यांच्या  संततीमधून एक परिपूर्ण व्यक्तीमत्व 6 व्या शतकात  जन्मास  आले. ज्यांचे नाव मुहम्मद बिन अब्दुल्लाह (स.) असे होते. त्यांचा जन्म झाला व अरबस्थानात जणू नवचैतन्य निर्माण झाले. भविष्यातील ज्या कार्याचा आराखडा हजारो वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अ.) ह्यानि बांधला होता. ते पूर्णत्वास तर आलेच परंतु केवळ 23 वर्षाच्या कालखंडात सर्व अनिष्ट प्रथांना पायबंद घालून एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला गेला. असे धाडस आणी कार्य करणारी व्यक्ती सामान्य असूच शकत नव्हती.  त्यांचे हे कार्य त्या काळात तर उल्लेखनिय  होतेच परंतू आजही 1442 वर्षानंतर सर्व मानव जातीला प्रेरणा देणारे असेच आहे. अज्ञान आणि अंधकारमय युगातील सर्व अनिष्ट प्रथा नष्ट   केल्या गेल्या.

’’हज्जचे महिने नियत (निश्चित केलेले) आहेत. जी व्यक्ती ह्या निश्चित महिन्यामध्ये हज करण्याचे ठरवील तर त्याने वैषयिक वासनेपासून दूर रहावे. आणि अभद्र बोलू नये आणि भांडणतंटे करू नये. जे काही तुम्ही सत्कर्मे कराल ते अल्लाह जाणतो आहे आणि हज्जच्या काळांत सोबत शिदोरी घ्या. सर्वोत्तम शिदोरी म्हणजे अल्लाहचे भय बाळगणे होय. आणि हे ज्ञानीजनहो माझे भय बाळगा.’’  (सुरे बकरा :197)

’’नंतर जेव्हा हज्जसंबंधीचा विधी तुम्ही पूर्ण कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही अल्लाहचे स्मरण करा जसे तुम्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत होतात. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक स्मरण करा, (परंतु अल्लाहचे स्मरण करणार्यांमध्येही खूप फरक आहे.) त्यांच्यापैकी काही तर असे आहेत जे म्हणतात कि, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला या लोकीच सर्वकाही दे. अशा व्यक्तीसाठी परलोकमध्ये काहीही वाट्याला येणार नाही.’’  (सुरतुल बकरा :200) 

जगभरातून सामील झालेले हाजी यांचा देश, प्रांत बोलीभाषा ही निरनिराळी असू शकते, परंतू त्यांनी परिधान केलेला पोशाख (एहराम) मात्र सारखाच असतो. गरीब असो अथवा श्रीमंत सर्वजण अल्लाहसमोर समसमान. हाच संदेश ह्या यात्रेतुन पहावयास मिळ्तो. हज यात्रेत श्रद्धावंतांच्या समोर जसजसा काबागृह जवळ येवू लागतो, तसतसा हा हाजी अल्लाहच्या भेटीसाठी बेभान होतो. जीवनात केलेली दुष्कृत्यांबद्दल मनात अपराधी भावना निर्माण होतात. तसेच या यात्रेतून मिळालेल्या सकारात्मक उर्जेतून हाजी भविष्यकाळात एक चांगला, आज्ञाधारक व सुजान नागरीक बनण्याची प्रतिज्ञा मनात करूनच मक्का सोडतो.जणू एक वेगळीच उर्जा त्याच्या अंगात संचारते. हज यात्रेत सामिल झालेल्या सर्वच हाजींची हीच अवस्था असते. हज प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक हाजी हा साक्षात अल्लाहच्या भेटीसाठी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीका लकलब्बैक  (मी हजर आहे, तुझ्या घराच्या दर्शनासाठी) अशा घोषणा करत पुढे सरकत असतो.

मुहम्मद पैगम्बर (स.) हे अंतिम प्रेषित होत त्यांच्यानंतर कोणी प्रेषित जन्माला  येणार नाही हे सत्य आहे. त्यांनी  हजमध्ये सामील झालेल्या यात्रेकरुसाठी दिलेले शेवटचे भाषण आजही  तेवढेच समर्पक व प्रत्येकाने अनुकरण करावे असेच आहे. ह्या शेवटच्या संवादातून त्यानी सर्व मानव एकमेकांचे  बंधूच असून मानवतावाद आणी विश्व- बंधुत्वाचा संदेशच दिला. वास्तविक पाहता जगातील मानवाधिकाराची ही पहिलीच सनद असून, त्यानंतर पुढच्या कालखंडात मानवाधिकाराच्या संवेदना जागतिक स्तरावर लोकांमध्ये जाग्या झाल्या.

- अस्लम जमादार, पुणे

(लेखक परिवर्तन - अल्पसंख्यांक शैक्षणिक चळ्वळीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)




statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget