Latest Post


जो मैं ये साफ-साफ कह दूं 

जो है फर्क तुझ में मुझ में 

तेरा दर्द-दर्द-ए-तनहा,

मेरा ग़म गम-ए-ज़माना

अनेकांना हे सत्य माहित नसेल की  जगामध्ये इस्लाम स्विकारणारी पहिली व्यक्ती महिला होती. पहिली व्यक्ती जिची संपत्ती इस्लामच्या प्रसारासाठी उपयोगी ठरली ती महिला होती. एवढेच नव्हे तर इस्लामच्या नावावर लिंच झालेली पहिली शहीद व्यक्तीसुद्धा महिला होती. प्रेषित सल्ल. हे जेव्हा गारे हिरा मधून जिब्राईल अलै. यांची भेट घेऊन घाबरलेल्या अवस्थेत घरी आले तेव्हा त्यांना दिलासा देणारी पहिली व्यक्तीही  महिला होती. एवढेच नव्हे तर हजरत उमर बिन खत्ताब रजि. सारख्या रागीट, कनखर आणि कट्टर मूर्तीपूजकाला इस्लाममध्ये येण्याची दावत देणारी पहिली व्यक्तीसुद्धा महिलाच होती. सर्व प्रथम ईस्लाम स्विकारणाऱ्या व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना दिलासा देणाऱ्या आणि आपली  संपत्ती इस्लामच्या प्रसारासाठी दान करणाऱ्या महिलेचे नाव हजरत खतिजतुल कुब्रा रजि. आहे. तर पहिल्या शहीद महिलेचे नाव हजरत सुमैय्या रजि. होत्या. हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना इस्लामची दावत देणाऱ्या महिलेचे नाव फातेमा बिन खत्ताब रजि. असे होते.

इस्लामच्या सुरूवातीच्या काळात महिलांनी इतरांपर्यंत सत्याचा संदेश पोहोचविण्यामध्ये जी चमकदार कामगिरी केली त्याचा विसर आजच्या मुस्लिम महिलांना कसा पडला याचेच आश्चर्य वाटते. आज महिला या फक्त गृहिणी म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यातच समाधान मानतात. वास्तविक पाहता शारीरिक रचना व त्या अनुकूल करावयाची  कामांची जबाबदारी वगळता इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांदरम्यान कोणताच भेद नाही. बाकी जबाबदाऱ्या सारख्याच आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची जबाबदारी इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची आहे. ही जबाबदारी दोघांचीही आहे. पुरूषांना तर या जबाबदारीचा काही प्रमाणात तर अंदाज आहे मात्र महिलांमध्ये या जबाबदारी संबंधी मोठी गफलत दिसून येते. याच गफलतीतून बाहेर काढण्यासाठी आणि महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या आठवड्यात चर्चेसाठी हा विषय निवडला आहे.

इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांचे अनेक कर्तव्य समान आहेत. उदा. शिक्षण घेणे दोघांचेही कर्तव्य आहे. या संदर्भात प्रेषित सल्ल. यांनी  फर्माविले आहे की, ’’शिक्षण घेणे हे प्रत्येक स्त्री पुरूषांना अनिवार्य आहे.’’ महिलांना गृहिणीची भूमिका बजावतांना मल्टी टास्कींग (एकाच वेळी अनेक कामं) करावी लागते. त्यांना जर का इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्यावर असलेल्या पैगंबरीय जबाबदारीची व्यवस्थित जाणीव करून दिली तर मला सूर्य तेजस्वी असण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास महिला ह्या आपली ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक चांगल्यापणे पार पाडतील यावर आहे. कारण जमाअते इस्लामी  हिंद महाराष्ट्राच्या महिला विभागाने, जो की या जाणीवेने ओतप्रोत भरलेला आहे, नेहमी इस्लामचा संदेश इतर महिलांपर्यंत पोहोचविण्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. अलिकडेच म्हणजे 22 ते 31 जानेवारी 2021 दरम्यान राबविण्यात आलेल्या ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रभर ज्या उत्साहाने त्यांनी काम केले ते पुरूषांपेक्षा कमी तर नव्हतेच उलट त्यांच्यापेक्षा काकणभर उजवेच होते. हा त्यांच्या मल्टि-टास्कींग अ‍ॅबिलिटीचा करिश्मा होता. सत्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे ही जबाबदारी स्त्रियांवर साक्षात परमेश्वराने टाकलेली आहे, याचे पुरावे खालीलप्रमाणे.

 पैगंबरीय जबाबदारी

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की - 

1. ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.’’  (सुरे आलेइमरान :110)

2. ’’सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा, तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा एक गट तुमच्यात अवश्य असला पाहिजे, अशा लोकांना साफल्य लाभेल.’’  (सुरे आलेइमरान :104). 

वरील दोन्ही आयातींमध्ये असे कुठेच म्हटलेले नाही की, सदाचाराचा आदेश देण्याची जबाबदारी फक्त पुरूषांची आहे. याचाच अर्थ ही जबाबदारी महिलांची सुद्धा आहे. कारण जनसमुदाय आणि गट या दोन्ही शब्दात स्त्री आणि पुरूष दोहोंचाही समावेश होतो. 

3. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’ ऐ मुहम्मद सल्ल. ! ची लाडकी लेक फातेमा रजि. आणि मुहम्मदची लाडकी आत्या सफिया रजि. तुम्ही दोघी नरकापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्याशी तुमचे असलेले नाते त्या ठिकाणी तुमच्या कामी येणार नाहीत.’’ (संदर्भ : औरत और इस्लामी इन््नलाब, लेखक सय्यद असद गिलानी, पान क्र. 13).

4. याशिवाय, प्रेषित सल्ल. यांनी आपल्या शेवटच्या हज यात्रेच्या अंतिम पाडावामध्ये अराफतच्या मैदानात एका टेकडीवर उभे राहून जवळ-जवळ सव्वा लाख मुस्लिमांसमोर बोलताना हा आदेश दिला होता की, ’’तुम्ही सर्व लोक जे या ठिकाणी उपस्थित आहात मी दिलेला इस्लामचा हा संदेश, जे या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्यापर्यंत

ठीक त्याच शब्दांत पोहोचवा ज्या शब्दात मी तुमच्यापर्यंत पोहोचविलेला आहे.’’

प्रेषितांच्या या आदेशाचा अर्थ असा आहे की, इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य सर्वांचेच आहे. त्यात स्त्री-पुरूष असा भेद नाही. सर्वसाधारण मुस्लिम स्त्रियांमध्ये या कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याची मोठी जबाबदारी तहेरीके इस्लामी महाराष्ट्राच्या महिला विभागावर आहे. 

5. ’’म्हणून तुम्ही उपदेश करा, जर उपदेश लाभदायक असेल.’’ (सुरे अलआला:9).

माणसाची मनस्थिती सारखी बदलत असते, अशावेळेस कोणती घटिका असेल ज्यात तो उपदेश स्विकारेल हे सांगता येण्यासारखे नाही म्हणून सातत्याने सत्याचा संदेश देत राहणे हे स्त्री-पुरूष दोघांचेही आद्य कर्तव्य आहे, हे तहेरीके इस्लामीच्या भगिनींनी लक्षात ठेवायला हवे. मुळात हे काम कठीण आणि व्यापक आहे म्हणून हे एकट्याने करता येत नाही. त्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज  आहे आणि त्यासाठी जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग हे अत्यंत उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

महिलांना या कामात येणाऱ्या अडचणी

या कामाचे महत्त्व अधोरेखित झाल्यावर हे काम करण्यासाठी ज्या महिला आणि तरूणी पुढे येतील त्यांच्या मार्गात खालीलप्रमाणे अडचणी येण्याची शक्यता आहे. 

1. पुरूषी मानसिकता :- महिलांना या कामी सर्वात मोठी अडचण त्यांच्याच घरातील पुरूषांकडून निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मुस्लिम पुरूष हे महिलांसंबंधी मोठे पझेसिव्ह (वर्चस्ववादी) असतात. घरातील महिलांना या कामी बाहेर जाण्याची परवानगी देतांना त्यांच्या मनात अनेक शंका, कुशंका जन्म घेतात. म्हणून ते त्यांना बाहेर जाऊ देण्यासाठी उत्सुक नसतात. म्हणून महिलांना त्यांना या कामाचे महत्त्व पटवून देऊन हे काम करण्याची परवानगी मिळविताना त्यांचे कसब पणाला लावावे लागेल, ईश्वराकडे दुआ मागावी लागेल. मला विश्वास आहे की ज्या प्रमाणे महिला विभागाच्या महिला अतिशय सुरक्षित वातावरणात आपले कर्तव्य बजावत आहेत याचे उदाहरण महिलांनी आपल्या घरातील पुरूषांसमोर ठेवल्यास ईश्वराच्या कृपेने ते या कामासाठी त्यांना परवानगी देतील. 

2. महिलांची गफलत :- दूसरी सर्वात मोठी अडचण स्वतः महिलांची मानसिकता आहे. दावते इस्लामीचे काम हे महिलांचेही आहे याचा मागमूससुद्धा बहुतांश महिलांना नाही. त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे मोठे कठीण आव्हान तहेरीके इस्लामीच्या महिलांसमोर आहे. रात्रंदिवस  प्रयत्न करून त्यांना हे आव्हानात्मक काम पूर्ण करावे लागेल. त्यासाठी सुरूवात आपल्या घरातील महिलांपासून करावी लागेल. त्यानंतर शेजारी-पाजारी आणि इतर नातेवाईक महिलांसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने आपले म्हणणे मांडावे लागेल. 

3. शेजाऱ्यांचे टोमणे :- भारतीय मुस्लिम समाज हा अनेक गटांमध्ये विभागला गेलेला असून, जमाअते इस्लामी हिंद सोडल्यास इतर कोणत्याही गटाकडे सत्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची सुसंघटित योजना तसेच यंत्रणा नाही. (अपवाद खेरीज करून) म्हणून महिला जेव्हा या कामासाठी बाहेर पडतील तेव्हा शेजारी-पाजारी महिला त्यांचा संदेश एक तर ऐकण्याच्या मनस्थितीत  नसतील दूसरे त्यांच्या उत्साहावर पाणी  टाकण्याचे काम मात्र व्यवस्थित करतील. या स्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन तहेरीकी (चळवळीतील)महिलांना आपले काम सुरूच

ठेवावे लागेल. त्यासाठी त्यांना प्रेषित सल्ल. व महिला साहबियात रजि. यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी लागेल. त्यांना अगोदर प्रेषित सल्ल. आणि सहाबियात रजि. यांचे चरित्र आवर्जुन वाचावे लागेल.

या कार्यामुळे होणारे दिव्य फायदे हे कठीण काम केल्याने होणाऱ्या फायद्यांचे वर्गीकरण दोन गटात करता येईल. पहिल्या गटात आपल्या स्वतःच्या घरात आणि ज्या मुस्लिम महिलांनी हे काम करण्याची जबाबदारी स्वेच्छेने उचललेली आहे त्यांच्या घरात असलेल्या गैरइस्लामी परंपरा, वाडवडिलांपासून चालत आलेल्या  वाईट चालीरिती बंद पडतील. निकाह सोपा होईल कारण निकाहला्निलष्ट बनविण्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिलांची भूमिका असते हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही. याशिवाय, घराचे वातावरण शुद्ध इस्लामी झाल्यामुळे घरातील मुली आणि मुलं हे पुढे चालून चांगले नागरिक बनतील. मुलं रेपिस्ट बनणार नाहीत आणि मुली आई-वडिलांच्या तोंडाला काळे फासले जाईल, अशी कृत्ये करणार नाहीत. आज मुस्लिम समाजामध्ये अशी कोणती वाईट गोष्ट नाही जी इतर समाजामध्ये आहे. अगदी व्याज खाण्यापासून ते पॉर्नमध्ये काम करण्यापर्यंत मुस्लिमांचा सहभाग  नाकारण्यासारखा नाही. सत्याचा संदेश दूसऱ्यांना देतांना त्याचा सर्वात मोठा फायदा हा होतो की, संदेश देणाऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. अनेक मुस्लिम तरूण, तरूणी मोठ्या संख्येने लग्नापूर्वी प्रेमसंबंध ठवेून आहेत जे की, इस्लाममध्ये हराम आहेत, ते कमी होतील. घरेलू हिंसा कमी होईल, आंतरधर्मीय विवाह कमी होतील.  कारण या संबंधामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. सत्याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास या समस्या आपोआप समाप्त होतील. या चळवळीचा सर्वात मोठा लाभ हा होईल की, इस्लाम हा केवळ ईबादतींपुरता मर्यादित धर्म आहे हा गैरसमज दूर होवून ती एक जीवन जगण्याची एकमेव यशस्वी पद्धत आहे हे महिलांच्या लक्षात येईल. आणि एकदा का मोठ्या प्रमाणात महिलांच्या लक्षात हे सत्य आले की, मुस्लिम समाजामध्ये एक रक्तविरहित अशी सामाजिक क्रांती निर्माण होईल की ज्यामुळे समाज सदाचारी होवून जाईल. त्यातून देशाला प्रामाणिक नागरिक मिळतील आणि कोणत्याही देशासाठी ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. ही उपलब्धी देशाला उपलब्ध करून देण्याचे महान कार्य करण्याची संधी मुस्लिम महिलांकडे चालून आलेली आहे. दूसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रयत्नामुळे ज्यांना इस्लामची समज मिळेल ते त्यांच्या पारलौकीक जीवनामध्ये एक मोठी उपलब्धी ठरेल. म्हणून ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ऐे अल्लाह! आमच्या भगिनींना सत्याचा संदेश इतर महिलांपर्यंत पोहोचविण्याची सद्बुद्धी व शक्ती दे.’’ आमीन. 

- एम.आय.शेख



बंधुनो! तुम्ही स्वत:ला मुस्लिम म्हणून संबोधता आणि तुमचा विश्वास आहे की अल्लाहची मुस्लिमावर कृपा असते. परंतु जरा डोळे उघडून पाहा की काय खरोखर अल्लाहची कृपा तुमच्यावर अवतरित होत आहे? पारलौकिक जीवनात जे काही घडेल ते तुम्ही नंतर पहालच, परंतु या जगात तुमची जी स्थिती आहे त्यावर दृष्टी टाका. या हिंदुस्थानात (लक्षात असावे की ही प्रवचने त्या काळात लिहिली गेली होती जेव्हा हिंदुस्तानची फाळणी झाली नव्हती.) तुमची संख्या नऊ कोटी आहे. तुमची इतकी मोठी संख्या आहे की जर एका एका व्यक्तीने एक एक खडा टाकला तर पर्वत बनेल, परंतु जेथे इतके मुस्लिम आहेत तेथे अनेकेश्वरवादी राज्य करीत आहेत. तुमच्या माना त्यांच्या मुठीत आहेत की तुम्हाला त्यांनी हवे तिकडे वळवावे. तुमचे मस्तक जे अल्लाहशिवाय कोणासमोर नमत नसे ते आता मनुष्यासमोर नमत आहे. तुमची ती प्रतिष्ठा मातीत मिसळून टाकली जात आहे. तुमचा हात जो सदैव उंच राहत असे आता तो खाली असतो आणि तो अनेकेश्वरवाद्यांसमोर पसरला जातो. अज्ञान, गरीबी व कर्जबाजारीने तुम्हाला सर्वत्र अपमानित व लज्जित करून सोडले आहे. काय हीच अल्लाहची कृपा आहे? ही कृपा नव्हे तर हा उघड प्रकोप आहे. हे किती आश्चर्य आहे की मुस्लिमावर अल्लाहचा प्रकोप व्हावा! मुस्लिम आणि तो अपमानित व्हावा! मुस्लिम आणि तो गुलाम असावा! हे तर अशक्य कोटीचे आहे की एखादी वस्तु पांढरी शुभ्र आहे व काळीकुट्टही आहे. मुस्लिम अल्लाहला प्रिय असतो, मग अल्लाहचा प्रिय जगात तो कसा अपमानित व तुच्छ असू शकेल? काय तुमचा अल्लाह अत्याचारी आहे की तुम्ही तर त्याचा अधिकार ओळखावा, त्याच्या आज्ञेचे पालन करावे आणि त्याने अवज्ञा करणाऱ्यांना तुमच्यावर शासक बनवावे? आणि तुम्हाला मात्र आज्ञाधारकतेचा मोबदला म्हणून शिक्षा द्यावी? तुमचा विश्वास आहे की अल्लाह जुलूम करणारा नाही आणि तुमची खात्री आहे की अल्लाहच्या आज्ञापालनाचा मोबदला अपमान म्हणून मिळू शकत नाही. तर तुम्हाला हे स्वीकार करावे लागेल की मुस्लिम असण्याचा जो तुम्ही दावा करता त्यातच काहीतरी चूक आहे. सरकारी कागदपत्रात तर तुमच्या नावाची नोंद मुस्लिम म्हणून अवश्य केली जाते. परंतु अल्लाहच्या न्यायालयात इंग्रज सरकारच्या दफ्तराच्या सनदीवर निर्णय केला जात नाही. अल्लाह आपला वेगळाच दफ्तर ठेवतो. त्यात शोधा की तुमचे नाव आज्ञाधारकाच्या यादीत नोंदले आहे की अवज्ञाकारींच्या यादीत?

अल्लाहने तुमच्याकडे ग्रंथ पाठविला आहे जेणेकरून तुम्ही हा ग्रंथ वाचून आपल्या स्वामीस ओळखावे आणि त्याच्या आज्ञापालनाची पद्धत समजून घ्यावी. काय तुम्ही कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की या ग्रंथात काय लिहिले आहे? अल्लाहने आपल्या प्रेषितांना तुमच्याकडे पाठविले जेणेकरून त्यांनी तुम्हाला आज्ञाधारक (मुस्लिम) बनण्याची पद्धत शिकवावी. काय तुम्ही कधी हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला की त्याच्या प्रेषितांनी काय शिकविले आहे? अल्लाहने तुम्हाला या जगात व पारलौकिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त करण्याची एक आदर्श जीवनपद्धत दाखविली. काय तुम्ही त्यावर चालता? ज्यांच्यामुळे मनुष्य या जगात व पारलौकिक जीवनात लज्जित होतो. काय तुम्ही अशा कामापासून अलिप्त राहता? सांगा, तुमच्यापाशी याचे काय उत्तर आहे? जर तुम्ही हे मान्य करता की तुम्ही अल्लाहचा ग्रंथ आणि त्याचे प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या जीवनापासून कोणतेही ज्ञान प्राप्त केले नाही आणि त्यांनी दाखविलेल्या पद्धतीचे अनुसरणसुद्धा केले नाही, तर तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) तरी कुठे झाला की तुम्हाला याचा चांगला मोबदला मिळेल? ज्या प्रकारचे तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) आहात त्याच प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळत आहे आणि त्याच प्रकारचा मोबदला तुम्ही पारलौकिक जीवनात प्राप्त कराल.

यापूर्वी मी सांगितले आहे की मुस्लिम व अनेकश्वरवाद्यामध्ये केवळज्ञान व कर्माशिवाय अन्य कोणताही फरक नाही. एखाद्या माणसाचे ज्ञान व कर्म अनेकेश्वरवादीप्रमाणेच असेल आणि स्वत:ला तो मुस्लिम म्हणवितो तर तो साफ खोटे बोलत आहे. अनेकेश्वरवादी पवित्र कुरआनचे पठण करीत नाही आणि त्याला माहीत नसते की यात काय लिहिले आहे. हीच स्थिती जर मुस्लिमाचीसुद्धा असेल तर त्याला काय म्हणून मुस्लिम म्हणावे? अनेकेश्वरवादीला जाणीव नसते की प्रेषित (मुहम्मद स.) यांची काय शिकवण आहे आणि त्यांनी ईश्वरापर्यंत पोहचण्याचा कोणता सरळ मार्ग दाखविला आहे. मुस्लिमसुद्धा त्याच्याप्रमाणे अज्ञानी असेल तर तो कसा मुस्लिम असू शकतो? अनेकेश्वरवादी ईश्वराच्या मर्जीप्रमाणे चालण्याऐवजी स्वत:च्या मर्जीप्रमाणे चालतो. मुस्लिमसुद्धा त्याच्या व आपल्या मताप्रमाणेच चालणारा असेल, त्याच्याप्रमाणेच अल्लाहकडून बेपर्वा व आपल्या इच्छेचा गुलाम असेल तर त्याला स्वत:ला मुस्लिम (अल्लाहचा आज्ञाधारक) म्हणण्याचा काय अधिकार आहे? अनेकेश्वरवादी हलाल (धर्मसंमत) व हराम (धर्मनिषिद्ध) मध्ये फरक करीत नाही आणि ज्या कामात स्वत:ला फायदा व गोडी वाटेल त्याचा अवलंब करतो, मग अल्लाहच्या दृष्टीने ते हलाल असो की हराम. आणि असाच व्यवहार मुस्लिमाचासुद्धा असेल तर त्याच्यात व अनेकेश्वरवाद्यामध्ये फरक तो कोणता? याचा अर्थ असा की मुस्लिमसुद्धा इस्लामच्या ज्ञानापासून तितकाच कोरा असेल जितका की अनेकेश्वरवादी असतो, आणि मुस्लिमसुद्धा ते सर्वकाही करतो जे अनेकेश्वववादी करतो तर त्याला अनेकेश्वरवाद्याच्या तुलनेत श्रेष्ठत्व का प्राप्त व्हावे? अंतिमदिनी त्याचा निवाडा अनेकेश्वरवाद्याप्रमाणेच का केला जाऊ नये? ही गोष्ट अशी आहे की जिचा विचार शांत मनाने आम्ही सर्वांनी केला पाहिजे.


माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.


पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणीच सच्चा मुस्लिम असा नाही ज्याला मी या जगात व पारलौकिक जीवनात सर्वाधिक प्रिय नसेन. जर इच्छिता तर वाचा की पैगंबर ईमानधारकांसाठी त्यांच्या जिवांपेक्षासुद्धा अधिक निकट आहे.’’

....म्हणून ज्या ईमानधारकास मृत्यु येतो आणि तो संपत्ती मागे सोडतो तर त्याचे जिवंत नातेसंबंधी त्याचे वारसदार असतील आणि जो कोणी मागे कर्जाची रक्कम सोडून जाईल किंवा लहान मुलं मागे सोडले आणि ते माझ्याकडे आले तर मी त्यांच्यासाठी जबाबदार आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे त्याने त्याच्या मागे धनसंपत्ती सोडली असेल तर ती त्या मृताच्या वास्तविक वारसदारांना मिळेल. जर कोणी आपल्या मागे कर्ज आणि लहान मुलं सोडून जाईल तर अशा मृताचा स्वजन व आत्मिय स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) हे आहेत. त्याचे कर्ज फेडणे व त्याच्या लहान मुलांचे पालनपोषण करणे हे पैगंबरांचे दायित्व आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामी राज्याच्या अध्यक्षाच्या अधिकारात वरील विवेचन केले आहे. यावरून स्पष्ट कळून येते की शासनदायित्व अतिविस्तृत व महत्त्वपूर्ण असते. यावरून इस्लामी राज्याची मानसिकतासुद्धा कळून येते.



माननीय अनस बिन मलिक (रजि.) यांचे कथन आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘काय तुम्हाला माहीत आहे की सर्वांपेक्षा जास्त दानशूर कोण आहे?’’

साथीदारांनी (सहाबा) सांगितले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर मुहम्मद (स.) हेच अधिक जाणणारे आहेत.’’

पैगंबर म्हणाले, ‘‘सर्वांपेक्षा जास्त दानशूर अल्लाह आहे. मग आदमच्या संततीत सर्वांपेक्षा जास्त दानशूर मी स्वत: आहे आणि माझ्यानंतर मानवआंत सर्वांत जास्त दानशूर तो आहे जो ज्ञान प्राप्त करून त्यास प्रसारित करतो. असा मनुष्य कयामतच्या दिवशी एका श्रीमंत मनुष्याच्यारूपात येईल किंवा अशा प्रकारे येईल की त्याला स्वत:मध्ये एक समुदायाची पात्रता प्राप्त होईल.’’ (हदीस : अबू  दाऊद)

स्पष्टीकरण

दानशीलता खरे तर जीवनाचे प्रतीक आहे. जिथे कुठे जितके जीवन आढळते तिथे तितकीच दानशीलतासुद्धा सापडेल. अल्लाह तर सर्वस्वी जीवन आणि जीवनस्रोत आहे. कारण याव्यतिरिक्त कोणत्याच दानशीलतेची मनुष्य कल्पना करू शकत नाही. हे आकाश व पृथ्वी अल्लाहची दानशीलता आणि त्याचे अनुग्रह व अनुकंपेचे बोलके प्रमाण आहे. अल्लाहनंतर दानशीलतेचे गुण सर्वांपेक्षा जास्त ईशपैगंबराला प्राप्त होते, कारण ईशगुणांची प्रतिछाया पैगंबरजीवनात सर्वांपेक्षा जास्त परिलक्षित होते.

दानशीलतेचा संबंध फक्त धनसंपत्तीशीच नसतो. सर्वांपेक्षा जास्त दानशीलता आणि उपकाराची गोष्ट म्हणजे जगाला ज्ञानप्रकाशाने प्रकाशित केले जावे.

याचमुळे या हदीसमध्ये आदमच्या संततीत सर्वांपेक्षा श्रेष्ठ दानशील त्या व्यक्तीला घोषित केले आहे जो ज्ञान व अंतर्दृष्टीने सुसज्जित होऊन जगातज्ञानप्रकाशाला पैâलावित असतो, जेणेकरून लोक पथभ्रष्टतेच्या अंधकारापासून मुक्त व्हावेत. त्या लोकांसाठी खरे सुख प्राप्त व्हावे आणि  त्यांना या जगात तसेच पारलौकिक जीवनात सफलता व कल्याण प्राप्त व्हावे.



आयीन-ए-मुस्तफा के सिवा हल हों मुश्किलें

सब अ्नल का फरेब निगाहों का फेर है

भांडवलशाही व्यवस्थेमध्ये नाव जरी शेतकरी आणि शेतमजुरांचे घेतले जात असले तरी सत्ता ही कायम चालाक आणि धोरणी लोकांच्या हातात असते. सरकारचे समर्थक भांडवलदार आणि कट्टर कार्यकर्ते वगळता बाकी जनता कायम गरीब, अशिक्षित व रोगट कशी ठेवता येईल याकडेच राजकारण्यांचे लक्ष असते. त्यांना हे ही माहित असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांमध्ये पुरेशी गुंतवणूक केली तर जनतेची कायमची गरीबी दूर होऊ शकते परंतु राजकारणी असे करत नाहीत. त्यांचेे धोरणच असे असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रामध्ये पुरेशी गुंतवणूक केल्या जाऊ नये. एवढेच नव्हे तर या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे जेणेकरून सरकार समर्थक भांडवलदार आणि कार्यकर्त्यांना तारांकित शिक्षण संस्थानाचे जाळे विनता येईल व त्यात त्यांनाच लाभ होईल. अलिकडे शेतकऱ्यांविषयक केंद्र सरकारने मान्य केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांचे नव्हे तर भांडवलदारांच्या हितासाठी काढलेले आहेत हे वरील धोरणाचाच एक भाग आहे. लोकशाहीमध्ये त्याच व्यक्ती आणि व्यक्ती समुहांची प्रगती होत असते जे राजकीयदृष्ट्या जागरूक असतात. सरकारवर कुठल्या न कुठल्या पद्धतीने प्रभाव ठेवून असतात. याच कारणामुळे दर पाच वर्षांनी,’’गरीबी निर्मुलनाचे’’ आश्वासन देऊनही गरीबी निर्मुलन होत नाही. 

जनता गरीब व अशिक्षित रहावी म्हणून सरकारी रूग्णालये, शाळा आणि कृषी क्षेत्र ठरवून बकाल ठेवले जातात. म्हणून कुठलीही अस्पृश्यता न बाळगता आपोआप गरीब जनता या तारांकित शाळा आणि रूग्णालयाच्या परिघाबाहेर फेकली जाते आणि यावर कडी म्हणजे कोणाकडे याची तक्रार करता येत नाही. भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक लोकशाहीमध्ये हेच धोरण अघोषितपणे राबविले जाते. जनता अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असेल आणि त्यांच्यातील बहुतेकांचे आरोग्य चांगले नसेल तर गरीबी आपोआप येते व तिच्यासोबत येणाऱ्या वाईट सवई सुद्धा ’एकावर एक फ्री’ या तत्त्वावधानाप्रमाणे आपोआपच येतात. जनतेची पोटा आणि हाताची गाठ घालता-घालता पाच वर्षे कधी निघून गेली व पुढची निवडणूक कधी आली हे जनतेलाच कळत नाही. निवडणुकांच्या तारखा घोषित होताच राजकारणाचा पारा गरीब वस्त्यांमध्ये आपोआप चढतो. कार्यकर्त्यांना अचानक महत्त्व प्राप्त होते, त्यांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि निवडणुकांना उत्सवाचे रूप प्राप्त होते. गरीब कार्यकर्त्यांना खूप महत्त्व दिले जाते. चार पैसे मिळत असल्यामुळे ते ऊर फाटेपर्यंत ढोल, ताशे बढवून साहेबांचा प्रचार करतात. निकाल लागले की साहेब नॉट रिचेबल होऊन जातात. त्यांना मंत्रिपदाचे तर कार्यकर्त्यांना रोजगार हमी योजनेचे वेध लागतात. साधारणपणे या विष्यस्सर्कल मधून बाहेर पडणे कोणालाही शक्य होत नाही. 

थोडक्यात गरीबी हटविण्यासाठी सरकारची स्थापना केली जाते मात्र सरकारच्या गरीबांच्याविरोधी धोरणामुळेच जर गरीबी येत असेल तर तक्रार कोणाकडे करावयाची? एरव्हीपेक्षा यावेळेस तर परिस्थितीही वेगळी आहे. कोविडच्या साथीचे दोन टप्पे पार पडलेले असून, येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तिसरा टप्पा सुरू होईल, अशा बातम्या अधूनमधून कानावर येत आहेत. कोविडमुळे सरकारचे उत्पन्न लक्षणीयरित्या घटले असून, सरकारच्या मनात आले तरी ते जनतेची आर्थिक मदत करू शकणार नाहीत,अशी एकंदरित परिस्थिती आहे. अश्या परिस्थितीमध्ये ’अपनी मदत आप’ या तत्वावधानानुसार आपली गरीबी आपणच दूर कशी करू शकतो, यावर गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. 

गरीबीचे मुख्य कारण

गरीबीचे मुख्य कारण भ्रष्ट-आचरण आहे. शेती वगळता इतर प्रत्येक क्षेत्राला भ्रष्टाचारी अजगराचा मजबूत विळखा पडलेला आहे. भारतासारख्या अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या देशात एवढे भ्रष्टाचारी लोक निर्माण का झाले, याचा जर विचार केला तर लक्षात येते की, आधुनिक जगात यशाची व्याख्याच बदलून गेलेली आहे. यशस्वी तोच ज्याच्याकडे संपत्ती आहे. मग ती संपत्ती त्याने कशी कमावली, याचा कोणीच विचार करायला तयार नाही. त्यामुळे दारू आणि ड्रग्जपासून खाद्य पदार्थात भेसळ आणि औषधांमध्ये काळाबाजार करून संपत्ती कमावण्यास मोकळीक आहे. ज्ञान, त्याग, प्रेम, सदाचार, सम्मान, दया, करूणा या मुल्यांचा यशस्वी होण्यामध्ये काहीएक संबंध राहिलेला नाही. मुंबईच्या सिनेउद्योगामध्ये भरपूर पैसा आहे हे माहित असून देखील पूर्वी चांगल्या घरच्या मुली त्या उद्योगात जात नसत. आता पैशासाठी सिनेउद्योग तर सोडाच पॉर्न उद्योगातही चांगल्या घरच्या मुलींना जातांना लाज वाटत नाहीये. नव्हे राजकुंद्रासारखे उद्योगपती या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी हातभार लावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वदेशी उद्योगाला भरभराटीत आणण्यामध्ये यास्मीन रसूल बेग (40), मुहम्मद आतिफ नासीर अहेमद सैफी (32) अशी सोज्ज्वळ नावे असलेल्या मुस्लिमांचाही सहभाग असल्याची बातमी 19 जुलै 2021 च्या सर्वच वर्तमानपत्रातून झळकलेली आहे. थोडक्यात अवैध मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्यांना समाजामध्ये सन्मान मिळत असल्यामुळे अनेक मुस्लिमही हा सन्मान मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये सामील झालेले आहेत. 

संपत्तीचा संचय दुराचारी लोकांच्या हातात झाल्याने सदाचारी लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा फार कमी वाटा येतो. हे गरीबीचे सर्वात मोठे कारण आहे. देशात संपत्ती संचयाची एक आंधळी स्पर्धा सुरू असून, प्रत्येकजण कुठल्याही परिस्थितीत ती स्पर्धा जिंकण्यासाठीच तिच्यात सहभागी होत आहेत. म्हणून राष्ट्रीय संपत्तीचे अभिसरण अनैतिक उद्योगामध्येच होत आहे. यासाठी सर्व समाज जबाबदार आहे. ज्याप्रमाणे रक्ताचे डाग रक्ताने स्वच्छ होत नाहीत त्याचप्रमाणे वाममार्गाचे मध्ये अडकलेल्या संपत्तीला वाममार्गाने स्वच्छ करता येत नाही. त्याला हराम आणि हलालच्या कसोटीवर कसून सद्मार्गाकडे वळवावे लागते. तेव्हाच संपत्तीचे अभिसरण समाजातील सदाचारी लोकांकडे सुरू होते. त्यासाठी ज्यांच्याकडे कुरआन नावाचा ईश्वरी ग्रंथ आहे त्यांना पुढे यावे लागेल आणि संपत्ती कमाविण्याची व ती खर्च करण्याची ईश्वरीय व्यवस्था काय आहे? हे जनतेसमोर मांडावी लागेल. थोडक्यात गरीबी निर्मुलनाची इस्लामी पद्धत काय आहे? याचा परिचय जनतेला करून द्यावा लागेल. तो परिचय करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हा लेख आहे. 

इस्लाममध्ये संपत्तीचे स्थान

एकेश्वरवादाचा त्याग केल्यामुळे माणसाला कोणतीच भीती राहत नाही व तो संपत्ती कमावण्यात आणि खर्च करण्यात  कुठल्याही आचार संहितेला बांधिल राहत नाही. म्हणून लोक आपल्या खऱ्या-खोट्या ऐपतीचे प्रदर्शन करण्यासाठी अमाप पैसा मिळेल त्या मार्गाने गोळा करत असतात व तो मिळेल त्या मार्गाने खर्च करत असतात. एकेश्वरवादावर विश्वास  माणसाच्या याच प्रवृत्तीला लगाम लावतो. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा व्याज आहे तर इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा कणा जकात आहे. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही खालून वर म्हणजे गरीबांकडून श्रीमंतांकडे जाते. या उलट जकात आधारित इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही वरून खाली म्हणजे श्रीमंतांकडून गरीबाकडे येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाईवर कर लावला जातो त्यामुळे कमाई लपविता येऊ शकते आणि कर वाचविता येऊ शकतो. मात्र इस्लाममध्ये कर बचतीवर लावला जातो आणि बचत मात्र लपविता येत नाही. त्यामुळे जकात अदा करावीच लागते. 

इस्लाममध्ये संपत्तीचे सर्व व्यवहार शरियतच्या कोंदनात बसविलेले असल्यामुळे आर्थिक व्यवहाराचे अधिष्ठान नैतिक मुल्यांवर ठेवलेले असते. म्हणून या व्यवस्थेमध्ये सदाचार, ज्ञान, त्याग, प्रेम, सम्मान, दया, करूणा यांना फार महत्त्व असते. या सर्व कारणामुळे संपत्तीचे अभिसरण समाजामध्ये समप्रमाणात होत असते. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’नमाज कायम करा, जकात द्या आणि पैगंबर (सल्ल.) यांच्या आज्ञा पाळा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल.’’ ( संदर्भ : सूरे अन्नूर : आयत नं. 56). या आयातीमध्ये नमाजसारख्या अत्युच्च उपासनेसोबत जकातची सांगड घातलेली आहे आणि अशा अनेक आयाती कुरआनमध्ये विखुरलेल्या आहेत ज्यामुळे जकातीचे महत्त्व श्रद्धावान मुस्लिमांच्या मनावर बिंबवले गेले आहे. यामुळे जकात न अदा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये येत नाही आणि दरवर्षी नियमितपणे कोट्यावधी रूपये कुठल्याही ईडी आणि सीबीआयच्या बडग्याशिवाय गरीबांच्या खिशात जातात. 

याशिवाय मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपत्तीमध्ये एकीकडे नातेवाईकांचा वाटा ठरविण्यात आलेला असला तरी दूसरीकडे वारस नसलेल्या पण गरीब असलेल्या लोकांचाही समावेश वारसांसोबत केलेला आहे. सुबहान अल्लाह (अल्लाह पवित्र आहे)! किती उच्च आणि दैदिप्यमान असा हा नैतिक विचार आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ व गोर-गरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांनादेखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला.’’(संदर्भः सुरे अन्निसा : आयत नं.8).

इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये गरीबी निर्मुलनासाठी शासनावर जेवढी जबाबदारी टाकली आहे तेवढीच व्यक्तीवरही टाकलेली आहे. शासनाने आपल्या बैतुलमाल (ट्रेझरी)मधून जनकल्याणाच्या अशा योजना हाती घ्याव्यात ज्यामुळे जनतेची गरीबी दूर होईल तसेच प्रत्येक श्रद्धावान मुस्लिमाने आपल्या बचतीमधून जकात द्यावी. त्याशिवाय, सदका (दान), उश्र (कापणीच्या वेळेस धान्याचा विशिष्ट भाग) गरीबांसाठी राखीव ठेवणे, फित्रा इत्यादी मार्गाने गरीबांना आर्थिक लाभ वर्षभर व्यक्तीगत पातळीवरून होत राहील, अशी व्यवस्था केलेली आहे. यामुळे गरीबी निर्मुलनास मदत होते. 

अलिकडे गरीबांना मोफत जेऊ घालण्यासारख्या महत्वाच्या बाबीकडे मुस्लिमांचे दुर्लक्ष होत असून यात शीख बांधवांनी बाजी मारल्याचे दिसून येते. इस्लाममध्ये गरीबांना मोफत जेवण देण्याची अनेक ठिकाणी ताकीद करण्यात आली आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये गरीबांना जेवण न देणाऱ्यांच्या बाबतीत तंबी करताना म्हटले आहे की, 1.’’व गरीबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता’’ (संदर्भ : सुरे अलहा्नका आयत नं.34).

2. ’’आणि गरीबांना जेवू घालत नव्हते’’ (संदर्भ : अलमुदस्सीर आयत नं. 44).

3. ’’आणि गरीबाला जेवू घालण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देत नाहीत’’ (सुरे अल्फज्र आयत नं. 18).

वरील आयातींवरून एक गोष्ट तर वाचकांच्या लक्षात येईलच की, गरीबांना मोफत जेवण न घालणाऱ्या लोकांबद्दल ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भातील अधिक तपशील या लेखात देणे शक्य नाही. म्हणून ज्यांना या संबंधी माहिती हवी असेल त्यांनी रास्त कुरआनमधील या आयातींचा अभ्यास करावा. 

याशिवाय इस्लाममध्ये अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मुस्लिमांना प्रेरित करण्यात आलेले आहे. एके ठिकाणी तर अनावश्यक खर्च करणाऱ्यांना सैतानाचा भाऊ सुद्धा म्हटलेले आहे. अनावश्यक परंपरा आणि रितीरिवाजांचे पालन करण्यामध्ये अनेक मुस्लिम लोक आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात. विशेषतः लग्न सोहळ्यांमध्ये असा अमाप खर्च केला जातो की त्यामुळे अनेक कुटुंबेही लग्नानंतर दारिद्ररेषेखाली जातात. ब्रँडेड कपडे, सुगंध आणि मॉलमध्ये अनावश्यक खरेदी करून मुस्लिम लोक कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. श्रद्धावान मुस्लिमांना अशा अनावश्यक खर्चापासून अलिप्त राहण्याची ताकीद करूनच कुरआन थांबत नाही तर आपण गरजवंत असतांना सुद्धा दुसऱ्या गरवंतांचा आपल्यापेक्षा जास्त विचार करण्याची उच्च नैतिक शिक्षा तो देतो. म्हणून म्हटलेले आहे की, 

3.‘’वायफळ खर्च करणारे सैतानचे बंधू होत, आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे’’ (बनी इस्राईल आयत नं. 27).

4. हे मानवानों! खा, प्या मात्र मर्यादाभंग करू नका. अल्लाह मर्यादा भंग करणाऱ्या लोकांना पसंत करत नाही. (संदर्भ : सुरे आराफ आयत नं. 31). 

या तिन्ही आयातीमध्ये मुस्लिमांना वायफळ खर्च टाळण्यासंबंधी सक्तीने बजावण्यात आलेले आहे. मोफत अन्नछत्र चालवणे आणि वायफळ खर्च टाळणे म्हणजे गरीबीच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांची मदत करण्यासारखे आहे. ह उदात्त शिकवण आजच्या स्वार्थी वर्तणुकीच्या अगदी उलट आहे. कुरआन येथेच थांबत नसून यापुढे म्हणतो की, ’’आणि ते स्वतः (मुस्लिम) गरजवंत असतांना दुसऱ्या गरजूंना आपल्यावर प्राधान्य देतात.’’ (संदर्भ : सुरे अलहश्र, आयत नं.9)

मदीना येथील भातृभाव योजना

एकेश्वरवादाची शिकवण म्नकाच्या मूर्तीपूजकांना मुळीच आवडत नव्हती. त्यामुळे मूठभर मुस्लिम एकीकडे आणि कुरेशचे बलवान मूर्तीपूजक दुसरीकडे असा विषम सामना जेव्हा रंगात आला तेव्हा नाईलाजाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपल्या साथीदारांसोबत मदीना येथे हिजरत करावी लागली. अचानक हिजरत करावी लागल्यामुळे मुस्लिमांना अंगावरच्या कपड्यानिशी जावे लागले. त्यामुळे मदीना शहरात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचीही व्यवस्था नव्हती. अशा वेळेस इस्लामी ब्रदरहुड (भातृभाव योजना)ची ऐतिहासिक घटना घडली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्नकाहून आलेल्या एका मुहाजीरची मदीना येथील एका अन्सारी मुस्लिमांबरोबर जोडी लावून दिली आणि घोषित केले की आजपासून तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात. अशा तऱ्हेने मक्का येथील सर्व स्थलांतरीतांच्या जोड्या मदीना येथील स्थानिकांशी लावण्यात आल्या. तेव्हा जगाने पाहिले की त्यांच्यात असे बंधुत्व निर्माण झाले होते की, त्याचे दूसरे उदाहरण त्यापूर्वी किंवा त्यानंतर जगाने पाहिलेले नाही. अन्सारी मुस्लिमांनी आपल्या भावांसाठी आपल्या सर्व चल-अचल संपत्तीची उभी विभागणी करून अर्धी आपल्या स्थलांतरित भावांना दिली. येणेप्रमाणे स्थलांतरित मुस्लिमांची गरीबी दूर  झाली. म्नकाहून येणारे मुस्लिम व्यापारी होते त्यांना शेती येत नव्हती तर मदीना येथील स्थानिक मुस्लिम शेतकरी होते त्यांना व्यापार येत नव्हता. दोघांच्या जोड्या लागल्यामुळे शेतीबरोबर व्यापारही सुरू झाल्याने अन्सार आणि मुहाजीर दोघांचीही भरभराट झाली. आज जर कोविडच्या परिस्थितीमध्ये रोजगार हरवलेल्या आपल्या शेजाऱ्याची जबाबदारी प्रत्येक मुस्लिमाने स्वीकारली आणि मदीना भातृभाव योजनेप्रमाणे त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि आपल्या संसाधनामधून अर्धे नाहीतरी किमान त्याच्या गरजेपुरती मदत केली तर त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल व बंधूभाव वाढेल तो वेगळा. तसेच वर नमूद कुरआनच्या इतर आयातींप्रमाणे आचरण केले तर कुठलीही फीत न कापता, कुठल्याही पॅकेजची घोषणा न करता, कुठलाही गाजावाजा न करता गरीबी निर्मुलनाची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. यात माझ्या मनात तरी किमान शंका नाही. परंतु असे करण्यासाठी मोठ्या त्यागाची आवश्यकता आहे. मोठा त्याग करण्यासाठी मोठे मन लागते आणि मोठे मन इस्लामवर अढळ श्रद्धा असल्याशिवाय मिळत नाही. नुकतीच त्यागाची शिकवण देणारी ईदुल अज्हा झालेली आहे. 

यानिमित्ताने प्रत्येक मुस्लिमाने आपला एक गरीब शेजारी आर्थिक मदतीसाठी म्हणून दत्तक घ्यावा म्हणजे नक्कीच गरीबी दूर होईल. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आपल्या देशबांधवांची गरीबी दूर करण्यासाठी मदीना येथील भातृभाव योजनेप्रमाणे त्याग करण्याची समज आणि शक्ती दे.’’ आमीन. 

- एम.आय.शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget