Latest Post


पुणे (कलीम अजीम) 

1857चा स्वातंत्र्य संग्राम मिला-जुला म्हणजे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन लढलेला लढा होता. ह्या एकतेला पाहून इंग्रज घाबरले आणि त्यांनी सत्तेसाठी दोन समुदायामध्ये फूट पाडायचे प्रयत्न सुरू केले. हिंदू-मुस्लिमांना वेगळे पाडले. आपल्याकडील काही स्वार्थी नेते त्याला बळी पडले. आजही हेच सुरू आहे, त्यामुळे दोन सुमदायामध्ये वेगळेपणाची दरी वाढत चाललेली आहे, ही दरी कमी करण्यासाठी समाज संवाद महत्त्वाचा आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.

पुण्यात रविवारी (ता. 23) कौसर बाग मस्जिद येथे समाज संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी देशमुख बोलते होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या मस्जिद परिचय मेळाव्याला परिसरातील अनेक गैरमुस्लिम स्त्री-पुरुष नागरिक व मान्यवर उपस्थित होते. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्याचे पाण्याची बाटली व खजूर देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना नमाजपूर्वी केले जाणारे वजू (स्वच्छता) काय असते, ते कसे करावे व त्याचे महत्त्व सांगण्यात आले.

एसआयओ या विद्यार्थी संघटनेच्या स्वयंसेवकांनी मान्यवरांना बाहरेचा सर्व परिसर फिरवून दाखविला. शिवाय इतर माहितीदेखील दिली. त्यानंतर मस्जिदीच्या गाभाऱ्यात जिथे इमाम नमाजचे नेतृत्व करतो, तिथे सर्वांना घेऊन जाण्यात आले. अली इनामदार यानी मस्जिदीच्या आतल्या रचनेचा परिचय करून दिला. प्रा. रशीद शेख यांनी मस्जिदची रचना, निर्मिती, जानिमाज, पुस्तके, नमाजच्या वेळा, दररोज नमाजमध्ये इमाम कुठली वचने पठण करतो, त्या श्लोकाचे अर्थ इत्यादी समजावून सांगितली.

त्यानंतर अज़ान देऊन त्याचे शब्दश: भाषांतर करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष नमाज अदा करण्यात आली. मुफ्ती नवेद यांच्या मधाळ किराअतने नमाज संपन्न झाली. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी गाभाऱ्यात बसून प्रत्यक्ष नमाज पाहिली. त्यानंतर जमाअते इस्लामी हिंदचे डॉ. रफीक सय्यद पारनेरकर यांनी नमाजमध्ये पठण करण्यात आलेल्या कुरआनच्या वचनांचा सार व त्याचा अर्थ समजावून सांगितला. तत्पूर्वी निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते गाजिउद्दीन रिसर्च सेंटर व डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन प्रकाशित ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. पुस्तकावर बोलताना सरफराज अहमद म्हणाले, हजरत बिलाल हे एक हब्शी गुलाम होते, त्यांना मुक्त करून प्रेषितांनी समानता आणि आदर, सन्मानाचा एक महत्त्वाचा संदेश दिला. इस्लामचे ते प्रथम मुअज्जीन होते. त्यांना काबागृहावर चढून अजान देण्यासाठी प्रेषितांनी निमंत्रण दिले, ती वर्णव्यवस्थेविरोधात इस्लामची पहिली चळवळ होती, असे म्हटले.

मस्जिद परिचयाचा मुख्य कार्यक्रम दीड तास चालला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर परिसरातच समाज संवाद कार्यक्रम झाला. सरफराज अहमद यांनी मस्जिदीचा सामाजिक व सांस्कृति तथा राजकीय इतिहासाची पुनर्मांडणी केली. मस्जिदे ऐकेकाळी राजकीय व सामाजिक कल्याणाची केंद्र होती, ती स्वतंत्र व मुक्त विद्यापीठे होती. इजिप्तचे अल अजहर, देवबंदचे विद्यापीठ हे सुरुवातीला मस्जिदी होत्या. त्यानंतर त्यांचे विद्यापीठात रुपांतर झाले, आज आपल्या मस्जिदी आधुनिक शिक्षणाची केंद्रे व्हावीत, असे ते म्हणाले. इस्लामचा सामाजिक व आर्थिक विचार त्यांनी उपस्थितासमोर मांडला. मस्जिदी गरिब, निराश्रीतासाठी निवारा आहेत, तसेच ते गरजवंतासाठी अन्नछत्र आहेत. मस्जिदींचा वापर फक्त नमाजसाठी न होता, इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी आणि परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांच्या विधायक कार्यासाठीदेखील झाला पाहिजे, असेही सरफराज म्हणाले.  ह्या मेळाव्यात साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी इस्लामी संस्कृतीवर विचार मांडले. वेगेवेगळ्या काळातील समाजाला समजून घेण्यासाठी अशा प्रकारचे संवाद कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे सांगत शिरसाठ म्हणाले, संस्कृती असो किंवा चालिरिती, परंपरामध्ये काळाचा विचार करून काही गोष्टी अंतर्भूत झालेल्या असतात. परंतु काळ बदलतो, परिस्थिती बदलते तसे त्यातले काही कालबाह्य झालेले असते किंवा काही योग्य ठरणार नसते त्यामुळे संस्कृती, समाज पुढे जायचा असेल तर समाजासाठी जे चांगले आहे, परंपरेतून आलेले, धर्मातून आलेले, श्रद्धेतून, विश्वासातून आलेले ते आपण टिकवावे, अधिक समृद्ध करावे. आणि जे-जे कालबाह्य आहे किंवा सदोष आहे, ते मागे टाकून पुढे जायला पाहिजे, असे केले नाही तर समाजाला एक प्रकारचे साचलेपण येते.

दिल्लीहून आलेल्या ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे चेअरमन अ‍ॅड. शरफुद्दीन अहमद यांनी समूह संवादावर भर दिला. तसेच हिंदू-मुस्लिमांनी प्रचारी संदेशांना बळी न पडता, आपल्या आसपासच्या सर्व धर्मीय नागरिकांशी संवाद प्रस्थापित करावा, असे म्हटले.सलोखा मंचचे प्रमोद मुजुमदार उपस्थिताशी संवाद साधत म्हणाले, देशातील, शहरातील अल्पसंख्यांना विश्वासात घेणे ही बहुसंख्याकाची जबाबदारी आहे. सामाजिक सद्भाव टिकवून अल्पसंख्याकाशी, मुस्लिमांशी संवाद साधणे ही आज गरजेचे आहे. धर्मकेंद्री राजकारण होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे मुस्लिम हवालदिल झालेला आहे, अशा मुस्लिमांच्या पाठिशी ‘सलोखा’  आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना विश्वास देतो की, आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. सलोखा मंचच्या डॉ. संजिवनी कुलकर्णी यांनी मुस्लिमांविषयी होत असलेल्या अप्रचाराला बळी पडू नये, असे सांगितले. युक्रांदच्या नीलम पंडित आपल्या एेंशी वर्षीय आईला घेऊन आलेल्या होत्या. मस्जिद पाहून आई खूप कृतार्थ झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या परिचय मेळाव्यात लोकायत, नोइंग गांधी, संविधान संवादक फोरमचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी प्रत्यक्ष मस्जिद पाहून आत्मिक समाधान वाटले, अशा भावना व्यक्त केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तबलीग जमात (पुणे)चे विशेष प्रयत्न होते. असे उपक्रम विविध शहरात व दिल्ली मरकजपर्यंत पोहोचविण्याची हमी तबलीगच्या संघटकांनी दिली. कौसर बाग मस्जिद कमिटीने परिसरातील गैरमुस्लिम सोसायटीमध्ये जाऊन मस्जिद परिचयासाठी अनेकांना निमंत्रणे पाठविली होती. तसेच पोलीस, आईबी यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. सावित्री-फातिमा विचार मंचचे अली इनामदार यांनी समाज संवाद मेळाव्याचे सर्व नियोजन व अन्य व्यवस्थेचे संयोजन केले होते. तसेच उपस्थितांना मार्दगर्शनही केले. कलीम अजीम यांनी सर्व निमंत्रित पाहुण्याचे आभार मानले. मस्जिदमध्ये दाखविण्याकरिता विशेष असे काही नसते. तसेच लपविण्याकरितादेखील असे काही नसते. त्यामुळे अगदी कोणीही, कधीही येऊन मस्जिद पाहू शकतो. मस्जिदीबद्दल होत असलेल्या अप्रचाराला बळी पडण्याआधी परिसरातील एखाद्या मस्जिदला भेट द्या, असेही त्यांनी सांगितले. राहिलेल्या त्रुटी व उणीवा पुढच्या परिचय मेळाव्यात भरून काढण्याचे आश्वासन कलीम यांनी दिले. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटी, तबलीग जमात यांचे विशेष आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचा हातभार लागला, अशा सर्वांचे त्यांनी अभार मानले.

कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दलाचे संदेश भंडारे, सलोखा मंचचे सर्व पदाधिकारी, युक्रांदचे संदीप बर्वे, ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे एड. संतोष जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सर्वजण आपल्या मित्र-सहकाऱ्यांना घेऊन कार्यक्रमाला आले होते. पारनेहूर रफिक सय्यद यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटीचे सेक्रेटरी जफर खान उपस्थित होते. कार्यक्रमाला हजर असेलल्या प्रत्येकांना साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ आणि ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तके वितरित करण्यात आली. तसेच संदेश लायब्ररीच्या कार्यकर्त्यांनी कुरआनची मराठी प्रतही सर्वांना भेट दिली. ह्या समाज संवाद कार्यक्रमाला व्यक्तिगत निमंत्रणे पाठवून निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तसेच काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिलेले होते. विशेष म्हणजे मस्जिद कमिटीच्या नोटीस बोर्डवर मराठी भाषेत सूचना लिहिण्यात आलेली होती. त्यानुसार मस्जिद पाहण्यासाठी हिंदू-मुस्लिम समुदायातील स्त्रिया मोठ्या संख्येने हजर झालेल्या होत्या. कार्यक्रमाला आलेला चांगला प्रतिसाद पाहून नियमित मस्जिद परिचय व समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे सावित्री-फातिमा विचार मंचच्या वतीने कळविण्यात आले.



हजरत जाबिर (र.) म्हणतात, एक दिवस प्रेषित मुहम्मद (स.) बनी अमरो बिन औफ यांच्या मोहल्ल्यात गेले.

प्रेषित म्हणाले, ‘‘हे अनसारचे लोक.’’

तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्ही हजर आहोत. हे अल्लाहचे प्रेषित.’

प्रेषित त्यांना उद्देशून सांगू लागले, ‘‘इस्लामपूर्वीच्या काळात तुम्ही अल्लाहची उपासना करत नसत, दुर्बल आणि निराधार लोकांचा बोजा उचलत असत, आपल्या मिळकतीतून गरीबांना देत होता, प्रवाशी लोकांना मदत करीत, पण जेव्हा अल्लाहनं तुम्हाला आणि प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचे उपकार तुमच्यावर केले तेव्हा तुम्ही आपल्या बागांच्या भोवती भिंती उभ्या करता. माणसांनी जर तुमच्या बागेतले फळ खाल्ले असेल तर अल्लाह तुम्हास त्याचा मोबदला देईल. तसेच पशुपक्ष्यांनी फळं खाल्ली तर त्याचादेखील मोबदला दिला जाईल.’’

हजरत जाबिर (र.) म्हणतात की लोकांनी प्रेषितांचे म्हणणे ऐकून आपल्या बागांभोवतीच्या भिंती काढून टाकल्या. (तरगीब, तरतीब, )

हजरत अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात की जेव्हा कधी प्रेषित मुहम्मद (स.) मला काही माल देत असत मी त्यांना म्हणत होतो, 'जे लोक माझ्यापेक्षा अधिक वंचित असतील अशा लोकांना द्या.'

प्रेषित त्यांना उत्तर देत की ‘‘हा माल घेऊन टाका. जेव्हा कधी तुम्ही कुणाशी काही न मागता माल दिला गेला आणि तुम्ही त्याची अपेक्षाही केली नव्हती, तर असे देणे घेत जा. ते साठवून ठेवा. आवश्यकता असल्यास त्याचा उपयोग करा आणि वाटल्यास ते दान करा. जे तुम्हाला मिळाले नसेल त्याची लालसा करू नका.’’

हजरत अब्दुल्लाह बिन उमरचे पुत्र म्हणतात की म्हणूनच माझे पिता कधी कुणाकडे काही मागत नसत. आणि जर कुणाला न मागताच कुणी काही दिले असेल तर ते नाकारत नव्हते. (बुखारी, मुस्लिम)

ऐनिया इब्ने हसन एकदा आपले चुलते हुर बिन कैस यांच्याकडे गेले, हुर बिन कैस हे खलीफा ह. उमर (र.) यांच्या फार जवळचे होते.

ऐनिया आपल्या चुलत्यास म्हणाले की ‘तुम्हाला ह. उमर (र.) यांची जवळीक लाभली आहे. मला त्यांना भेटायचे आहे. त्यासाठी परवानगी मिळवून द्या.’

ह. उमर (र.) यांनी ऐनिया यांना भेटण्यास परवानगी दिली. ऐनिया ह. उमर (र.) यांच्याशी बोलताना म्हणाले की, ‘तुम्ही आम्हाला काही जास्त माल देत नाही की आमच्या बाबतीत न्याय्य वागणूक सुद्धा देत नाही.’

ह. उमर (र.) यांना याचा फार राग आला. ऐनिया यांना शिक्षा देण्याचा विचार करू लागले.

तेवढ्यात हुर बिन कैस यांनी ह. उमर (र.) यांना पवित्र कुरआनची एक आयत ऐकवली, त्याचा अनुवाद असा,

‘‘लोकांना माफ करा. नेकी आणि परोपकाराचा संदेश द्या आणि अडाणी लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा.’’ (कुरआन, ८:१९९)

‘हे महाशय अशिक्षित आहेत, त्यांची चूक माफ करा.’ हे ऐकून ह. उमर (र.) यांचा राग संपला आणि ऐनिया यांना क्षमा करून टाकले. (बुखारी, इब्ने अब्बास)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या सर्व विधींपेक्षा श्रेष्ठ विधी ’वही’द्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो,ज्ञान पोहोचविणारा ईशदूत असतो तर ज्ञान प्राप्त करणारा जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती ’प्रेषित’ असतो.

इरसाल अब के हक़ ने किया ऐसा एक रसूल

जिसने सरों के साथ दिलों को झुका दिया

गात ज्ञान हस्तगत करण्याची जी साधने आहेत त्यापेक्षा एक अधिकचे साधन प्रेषितांकडे असते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडेही ते साधन होते, ज्याचे नाव वही (वह्य /वहीह) असे आहे. ही वही म्हणजे ईश्वराचा संदेश होता. हा संदेश जिब्राईल अलै. या फरिश्त्या (ईशदूत) च्या मार्फतीने प्रेषित सल्ल. यांच्यापर्यंत पोहोचत होता. याच माध्यमातून संपूर्ण कुरआन अवतरित झाला. अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यातील या संपर्क व्यवस्थेबद्दल मराठी वाचकांसाठी फारसी माहिती उपलब्ध नाही. या विशेषांकाच्या माध्यमातून ती पुरवावी यासाठीचा हा लेखन प्रपंच. 

पहिली वही येण्यापूर्वीची स्थिती

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म 22 एप्रिल 570 रोजी झाला. त्यांच्या जन्माची असामान्य घटना जगाच्या उद्धारासाठी ईश्वरीय योजने (मिशन)चा एक भाग होती. वयाच्या 40 व्या वर्षी सर्वप्रथम त्यांच्यावर वही नाजील (अवतरित) झाली. परंतु तिच्या अवतरणाची पूर्वची तयारी म्हणून ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची 40 वर्षापर्यंत विशेष काळजी घेतली होती. 

त्यावेळी मक्का शहरामध्ये सर्वत्र मूर्तीपूजा प्रचलित होती. चोहिकडे अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि विश्वासघातकीपणाचे वातावरण पसरलेले होते. अशा दुषित वातावरणामध्ये सुद्धा मुहम्मद सल्ल. यांच्या व्यक्तीमत्वामध्ये वाईट गोष्टींचा लवलेशही नव्हता, ही त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा होती. त्यांना मूर्तीपूजेमध्ये  काडीचे आकर्षण नव्हते, ते अनैतिक नव्हते, ते भ्रष्ट नव्हते, उलट मक्कामध्ये सर्वात जास्त नितीमत्तेचे धनी होते. ते एवढे विश्वासू होते की, मक्कावासीय त्यांना सादिक (खरा) आणि अमीन (अमानतदार) म्हणून ओळखत. म्नका शहरातील लोकांना शेती येत नव्हती ते व्यापारी वृत्तीच होते. व्यापारासाठी त्यांना   वारंवार लांबच्या प्रवासात जाण्याचा योग येई, तेव्हा ते आपल्या मौल्यवान वस्तू अमानत म्हणून मुहम्मद सल्ल. यांच्याकडे ठेवत. प्रेषितत्व मिळण्यापूर्वी सुद्धा त्यांची विश्वासर्हता मक्का शहरामध्ये सर्वात जास्त होती. जेव्हा ते अमानती ठेऊन जात तेव्हा मुहम्मद सल्ल. त्या जसच्या तशा जतन करून ठेवत व परत आल्यावर ज्यांच्या त्यांना परत करत. त्यात काडीचा बदल होत नसे. 

मक्का शहरामध्ये चोहीबाजूने वाईट गोष्टींचे थैमान चालत असतांना सुद्धा मुहम्मद सल्ल. यांना कधीच त्याचे आकर्षण वाटले नाही. बालपणी फक्त दोन वेळेस त्यांना ’किस्सा गो’ (मनाने गोष्टी रंगऊन सांगणाऱ्यां) चे किस्से ऐकण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत शेळ्या चारणाऱ्या मुलाकडे आपल्या शेळ्या ठेऊन, ’किस्से’ ऐकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा त्यांना झोप लागली व जाता आले नाही. ही ईश्वरीय व्यवस्था होती. याबद्दल मुहम्मद सल्ल. वाईट गोष्टी, रूढी आणि परंपरा यांची त्यांना प्रचंड चीढ होती. पण त्या वाईट परंपरा मोडून नवीन चांगल्या परंपरा कशा निर्माण कराव्यात या संबंधी त्यांना काहीच माहित नव्हते. चांगले म्हणजे नेमके काय? हे माहित नव्हते. हलाल काय? हराम काय? या संबंधी सुद्धा त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. म्हणून आपसुकच त्यांच्या मनामध्ये यासंबंधीचे चिंतन सुरू झाले. त्यांना तनहाई (एकटेपणा) आवडू लागला म्हणून ते ’सत्तू’ (विशिष्ट प्रकारचे भाजलेले पीठ) आणि पिण्याचे पाणी घेऊन मक्कापासून दोन मैलावर उंच पहाडावर असलेल्या एका गुहेमध्ये जाऊन जिचे नाव,’ गारे हिरा’ होते तिथे एकटे बसू लागले. चांगल्या गोष्टीबद्दल चिंतन करू लागले. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेले हे बदल सुद्धा ईश्वरीय योजनेचाच एक भाग होता. त्यांच्या मार्फतीने ईश्वराला जगाची दिशा बदलावयाची होती. वाईट मार्गावरून जगाला चांगल्या मार्गावर आणावयाचे होते. म्हणून मुहम्मद सल्ल. यांना असे एकटे पाडण्यात आले. मक्काच्या धकाधकीच्या दिनचर्येपासून लांब जावून गारे हिराच्या कुशीत एकट्याने शांत बसण्याची आवड त्यांच्यात निर्माण करण्यात आली. 

वहीच्या प्रत्यक्ष अवतरणाचा सिलसिला

वयाची 40 वर्षे पूर्ण होताच त्यांच्या व्यक्तीमत्वात एक क्रांतीकारक बदल झाला. त्यांना खरी स्वप्ने पडू लागली. ते रात्री स्वप्नात जे पाहत दिवसा अगदी तशाच घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडू लागल्या. अशाच अवस्थेत सहा महिने सरले. असे म्हटले जाते की अगाऊ, खरी स्वप्ने फक्त प्रेषितांनाच पडतात व हा प्रेषितत्वाचा 46 वा भाग असतो. एव्हाना हिरामध्ये चिंतन करत तीन वर्षे संपली होती. अशातच रमजानच्या 21 व्या रात्री म्हणजे 10 ऑगस्ट 610 च्या रात्री ज्यावेळी त्यांचे वय 40 वर्षे, 6 महिने आणि 12 दिवस होते, अचानक ईशदूत जिब्रईल अलै. सलाम गारे हिरामध्ये प्रकट झाले. जिब्रईल अलै. यांच्या अशा अचानक आगमनाने मुहम्मद सल्ल. गडबडून गेले. जिब्राईल अलै. यांच्या आगमनाबरोबर गारे हिरा उज्ज्वल प्रकाशाने उजळून निघाली. इकडे मुहम्मद सल्ल. घाबरलेले होते, तिकडे जिब्राईल आत्मविश्वासाने पावले टाकत पुढ्यात येऊन उभे राहिले व म्हणाले, ’वाचा!’ तेव्हा प्रेषित उत्तरले मला वाचता येत नाही. जिब्राईल अलै. यांनी पुन्हा दोन वेळा, ’वाचा!’ असे म्हटले. मुहम्मद सल्ल. यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. तेव्हा जिब्राईल अलै. यांनी मुहम्मद सल्ल. यांना तीन वेळा करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी जबरदस्त होती की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी नंतर या भेटीचे वर्णन करताना सहाबा रजि. समोर सांगितले होते की, त्यांच्या मिठीने माझ्या शरिरातील जणू सर्व शक्तीच संपून गेली होती. 

तिसऱ्या वेळा वाचा म्हटल्यानंतर मिठी सोडल्यावर जिब्राईल अलै. यांनी कुरआनच्या पहिल्या पाच आयती मुहम्मद सल्ल. यांच्या समोर वाचल्या आणि त्यांना त्या आयातींचे पठण करण्यास सांगितले. त्या आयाती पुढीलप्रमाणे होत, ‘इक़रा बिस्मी रब्बिकलजी खलक-खलकल इन्सान मिन अलक अकरऊ व रब्बकल अकरमू, अल्लजी अल्लम बिल-अ-कलम, अल्लमल इन्सान मआलमू याअलम’ (वाचा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने! ज्याने जन्माला घातले मानवाला मांसाच्या तुकड्यापासून. वाचा! तुमचा पालनहार अत्यंत उदार आहे, त्याने लेखनीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जानत नव्हता.) (संदर्भ : सुरे अल-अलक़ आयतक्र. 1 ते 5.).

वरील पाच आयातींचा संदेश देऊन जिब्राईल अलै. अंतर्धान पावले. तेव्हा मुहम्मद सल्ल. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत घरी परतले. त्यांचे शरीर थरथरत होते. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. घरी येताच त्यांनी आपल्या पत्नी हजरत खतीजा यांना सांगितले की, ’’मला चादरीने पांघरून टाका’’ चादर पांघरून काहीवेळा शांत बसल्यानंतर ते स्थिरावले. त्यानंतर त्यांनी हजरत खतीजा रजि. यांना सर्व घटनाक्रम सांगितला व म्हणाले की, ’या घटनेमुळे मला काय झालंय कळत नाहीये. मला माझ्या जीवाची भीती वाटतेय.’’ त्यावर खतीजा रजि. उत्तरल्या, ’’कदापि नाही! आपल्या जीवाला काहीच धोका होणार नाही. आपण लोकांवर दया दाखविता, अडल्या नडल्यांच्या कामी येता, गरीबांची मदत करता, पाहुण्यांचे स्वागत व आदराआतिथ्य करता, सत्यावर असलेल्या प्रत्येकाची साथ देता, तेव्हा ईश्वर तुम्हाला कदापि धोका होऊ देणार नाही.’’ 

हजरत खतीजा रजि. यांच्या या बोलण्याने मुहम्मद सल्ल. यांना थोडा धीर आला. नंतर हजरत खतीजा रजि. यांनी मुहम्मद सल्ल. यांना आपले चुलतभाऊ ’वरका बिन नौफेल बिन असद बिन अब्दुल उज्जा’ यांचेकडे घेऊन गेल्या. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता, त्यांना इब्रानी भाषा येत होती, ते बायबल हाताने लिहीत, त्यावेळी ते वृद्ध आणि दृष्टीविहीन झाले होते. त्यांनी मुहम्मद सल्ल. यांच्या मुखातून सारा वृत्तांत ऐकला आणि आश्चर्याने ओरडले. ’’अरे ! हा तर तोच ईशदूत आहे ज्याने मुसा अलै. (मोझेस)कडे ईश्वराचा संदेश आणला होता. ओह! कदाचित मी आज सुदृढ असतो किंवा त्या दिवसापर्यंत जीवंत राहू शकलो असतो ज्या दिवशी तुमचे लोक तुम्हाला मक्कामधून घालवून टाकतील तर मी तुमची खूप मदत केली असती’’ यावर प्रेषित सल्ल. यांनी चकित होऊन विचारले की, ’’अच्छा! तर मला आमीन आणि सादीक म्हणणारे माझेच लोक मला मक्कातून काढून टाकतील?’’ तेव्हा वरका बिन नौफेल उत्तरले, ’होय! ईश्वराचा हा संदेश ज्यांनी-ज्यांनी आणला त्यांना-त्यांना त्यांच्याच वंशाच्या लोकांनी शत्रुत्व करून आपल्यातून काढून टाकलेले आहे.’’ 

तबरी आणि इब्ने हश्शाम या इस्लामी पंडितांनी असे नमूद केलेले आहे की, पाच आयातीच्या या अवतरणानंतर घरी परतल्यावर वरका बिन नौफेल यांची भेट घेतल्यानंतर मुहम्मद सल्ल. परत गारे हिरामध्ये जावून बसले. त्यांच्या मनामध्ये नाना-विचार येत होते. पुढे त्यांनी या संबंधी सहाबा रजि. यांच्याशी बोलताना या घटनेसंबंधी असे म्हटले होते की, ’’ अल्लाहने जगामध्ये जेवढे लोक निर्माण केले त्यातील शायर (कवी) आणि पागल (वेडा) हे लोक मला अत्यंत नापसंत होते. इतके की मी त्यांच्याकडे पाहत सुद्धा नसे. परंतु वहीच्या अवतरणानंतर मी माझ्याशीच बोललो की मी त्यांच्यासारखाच आहे की काय? एका दिवशी मी पहाडाच्या टोकाकडे जात होतो, तेव्हा माझ्या मनात विचार आला पहाडावरून स्वतःला खाली झोकून देऊन आत्महत्या करावी व या दबावातून कायमची सुटका करून घ्यावी. हे विचार चालू असतानाच पहाडाच्या मध्यामध्ये मी जेव्हा पोहोचलो तेव्हा आकाशवाणी झाली की, ’’ हे मुहम्मद सल्ल. !  तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात आणि मी ईशदूत जिब्राईल आहे. तेव्हा मी आकाशाकडे पाहिले तेव्हा जिब्राईल अलै. एका माणसाच्या रूपाने आकाशात पाय रोवून उभे होते आणि म्हणत होते. ते पुन्हा म्हणाले, ’’ ऐ मुहम्मद सल्ल.! अल्लाहने प्रेषित म्हणून तुमची निवड केलेली आहे.’’तेव्हा मी एकाच ठिकाणी जड अवस्थेत उभा होतो. न मला एक पाऊल पुढे टाकता येत होते ना मागे घेता येत होते. परंतु मी माझे डोके वर करून आकाशाकडे जिब्राईल अलै. यांच्याकडे व त्यांच्या आजूबाजूला रोखून पाहत होतो. सर्वत्र मला जिब्राईलच दिसत होते. त्यांच्याकडे पाहता-पाहता मी इतका अभिभूत झालो होतो की माझ्या मनातील आत्महत्येचा विचार कधी निघून गेला हे मलाच कळाले नाही. मी निश्चल उभा होतो. शेवटी जिब्राईल अलै. अंतर्धान पावले आणि मी माझ्या घराकडे परत आलो व ह. खतीजा रजि. यांच्या जवळ बसलो. तेव्हा त्यांनी विचारले की, ’’आपण कोठे होतात? मी सेवकाला मक्का शहरामध्ये पाठवून सगळीकडे शोध घेतला.’’ त्यावर मुहम्मद सल्ल. यांनी आकाशात जिब्राईल अलै. यांना पाहिल्याची सर्व घटना सांगितली. तेव्हा हजरत खतीजा रजि. आनंदाने उद्गारल्या,’’ हे चुलत्याचे पुत्र ! आपण आनंदी व्हा आणि दृढ रहा. त्या ईश्वराची शपथ ज्याच्या ताब्यात माझा जीव आहे, मला आशा आहे की आपण एक उत्तम प्रेषित म्हणून आपली कामगिरी बजावाल. त्यानंतर त्यांनी परत वरका बिन नौफेलकडे जाऊन हा घटनाक्रम सुद्धा सांगितला. तेव्हा ते उद्गारले,’’ हे खतीजा ! त्या ईश्वराची शपथ ज्याच्या हातात वरकाचा जीव आहे. मुहम्मद सल्ल. कडे तोच ईशदूत पुन्हा आलेला आहे जो हजरत मुसा अलै. कडे वारंवार येत होता आणि त्याने मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित्वाची शुभवार्ता दिलेली आहे’’ हजरत खतीजा रजि. यांनी घरी येऊन वरका बिन नौफेलशी झालेला वार्तालाप मुहम्मद सल्ल. यांच्याशी कथन केला. त्यानंतर काही अवधी लोटल्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतः वरकाशी भेट घेऊन या घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. तेव्हा त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की, तुम्हाला महान प्रेषित म्हणून ईश्वराने निवडलेले आहे. पुन्हा आलेला ईशदूत हा जिब्राईलच होता. यानंतर काही दिवस जिब्राईल अलै. येण्याचा क्रम बंद झाला. कुठलीही वही अवतरित झाली नाही. त्यामुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. दुःखी होते आणि अनेकवेळा त्या उंच पहाडावर जात होते. त्यांच्या मनात पुन्हा आत्महत्येचे विचार घोळत होते. एक दिवस स्वतःला पहाडावरून झोकून देण्याचा पक्का विचार करून ते पहाडावर पोहोचले तेव्हा जिब्राईल अलै. पुन्हा अवतरित झाले आणि म्हणाले, ’’हे मुहम्मद सल्ल. आपणच खरे रसूल आहात.’’ जिब्राईलच्या भेटीमुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मनाला थोडी शांती लाभली. 

हाफिज इब्ने हजर यांनी म्हटलेले आहे की, ’’वही येण्याचा सिलसिला यासाठी थांबविण्यात आला होता की, प्रेषित सल्ल. यांच्या जीवाला थोडा आराम मिळावा आणि चित्त स्थीर व्हावे. जेव्हा ते स्थिर झाले तेव्हा पुन्हा वही येण्याचा सिलसिला सुरू झाला व दूसरी आयत जी नाजिल झाली ती ’’या अय्युहल मुदस्सीर...’’ हे पांघरून ओढून पहूडणाऱ्या उठा आणि खबरदार करा, आणि पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा आणि आपले कपडे स्वच्छ ठेवा आणि अपवित्रतेपासून दूर रहा आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा जेव्हा प्रलयाच्या दिवशी मोठा आवाज केला जाईल तो दिवस फारच कठीण असेल, अश्रद्धावानांसाठी सोपा असणार नाही.  वगैरे वगैरे...’’ यानंतर वही येण्याच्या प्रक्रियेमध्ये गती आली आणि जगाला चांगले काय? वाईट काय? हराम काय? हलाल काय? इत्यादी संबंधी मार्गदर्शन करण्यात आले व हळूहळू परिपूर्ण इस्लामी जीवन शैलीचा परिचय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने जगाला करून देण्यात आला. ज्यात शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, युद्धनिती, कायदा, न्यायशास्त्र, भौतिकशास्त्र आणि या सर्व शास्त्रांचा उपयोग करण्याची विधी शिकविली गेली. थोडक्यात यशस्वी जीवन जगण्यासाठी माणसाला ज्या-ज्या ज्ञानाची गरज आहे ते-ते ज्ञान अवतरित करण्यात आले अणि या सर्व ज्ञानाचा / शास्त्रांचा पाया नैतिकतेवर ठेवण्याचे व अनैतिकेला नापसंत करण्याचे शिक्षण देण्यात आले आणि वयाच्या 63 व्या वर्षी ज्या तिथीला त्यांचा जन्म झाला होता त्याच तिथीला त्यांना पर्दा फरमाविण्याचा आदेश झाला. 

एकंदरित जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या ज्ञान मिळविण्याच्या विधींपेक्षा श्रेष्ठ विधी वहीद्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो, ज्ञान पोहोचविणारा ईशदूत तर ज्याला ज्ञान प्राप्त झाले तो जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती प्रेषित असतो. आणि शेवटचे प्रेषित म्हणून द मोस्ट ट्रस्टेड मॅन ऑफ द वर्ल्ड असे ज्यांना म्हटले जाते व अल्लाहने स्वतः ज्यांच्याबद्दल असे म्हटले आहे की, ’’हे पैगंबर (सल्ल.) ! आम्ही तुम्हाला संपूर्ण जगासाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (संदर्भ : सुरे अम्बीया आयत क्र. 107). तसेच  ज्यांचा समावेश मायकेल एच. हार्ट आपल्या ’द हंड्रेड मोस्ट इन्फ्लुयन्शल पर्सन्स इन हिस्ट्री’ मध्ये प्रथम स्थानावर करतो, ते मुहम्मद मुस्तफा सल्ल. असतात तेव्हा त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या शिकवणीवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. थोडक्यात वहींचा समुच्चय असलेले कुरआन हे किती कठीण कष्टाअंती प्रेषित मुहम्मद यांनी जगाला दिले या गोष्टीचा आता वाचकांना अंदाज आलाच असेल. कुरआनसारखा परिपूर्ण ग्रंथ मानवाला दिल्याबद्दल ईश्वराचे व अपरिमित कष्ट सहन करून ते आमच्यापर्यंत पोहोचविले, याबद्दल मुहम्मद सल्ल. यांचे कोटी-कोटी आभार.



- एम.आय.शेख


प्रेषित्व मिळाल्यापासून मदीनेला प्रयाण करेपर्यंत म्हणजेच तब्बल 13 वर्षापर्यंत हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या अनुयायींना अतोनात कष्ट सहन करावे लागले. लोखंडी सळईने त्यांना डागले गेले, तापलेल्या वाळूवर नग्नावस्थेत ओढले गेले, त्यांच्या मार्गात काटे टाकले गेले, त्यांना विविध प्रकारे कष्ट देण्यात आले. परंतु, त्यांच्या अनुयायांची नि:स्वार्थता, निर्भयता आणि उच्चदर्जाचे चारित्र्य पाहून हळू-हळू नैसर्गिक जीवन-प्रणालीकडे लोक वळू लागले. पाहता-पाहता अरब देशातले लोकच नव्हें तर संपूर्ण जगातील लोक ईस्लामधर्माकडे आकर्षित होऊ लागले.

प्रेषित हजरत मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम ईस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित आहेत. हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म अरबस्थानात अशावेळी झाला जेव्हा अरबस्थान अधर्म, अशांती आणि अनेकेश्वरवादाच्या भयंकर काळोखात हेलकावे खात होता. वंशवाद, घराणेशाही आणि भूमिवाद इत्यादी कारणावरून नेहमी झटापटी होऊन रक्ताचे पाट वाहत होते. स्त्रियांची अवहेलना करणे, नवजात मुलींची हत्या करणे, जुगार खेळणे, मद्यपान करणे ह्या वाईट रूढींना चोहीकडे उधान आले होते. अरबस्थानात नव्हे तर जगातही अशांततेचा धुमाकूळ माजला होता. सर्वत्र धार्मिक अवनती होत होती. उच्च-नीच पणाला ऊत आले होते, नीतिमत्ता लयाला जात होती. स्वैराचार, अधर्म, अशांतीच्या काळकुट्ट अंधकारातून सुटका कधी होईल असे लोकांना वाटत होते. अखेर 20 एप्रिल 571 इ.स. म्हणजे ईस्लामी सन हिजरीच्या 50 वर्षापूर्वी 12 रबीउल अव्वल ईस्लामी कालगणनेनुसार तिसरा महिना, सोमवारच्या सकाळच्या प्रहरी मक्केच्या एका प्रतिष्ठित कुरैश कुटुंबात हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला. 


हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या वडिलांचे नाव हजरत अब्दुल्लाह आणि आईचे नाव ‘बीबी आमेना’ होते. त्यांच्या जन्माअगोदर 4-5 महिन्यापूर्वी त्यांचे वडील वारले होते. ते सहा वर्षाचे झाल्यावर आईचे छत्रही हरपले. आईच्या निधनानंतर त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांचे आजोबा ‘अबु मुत्तलिब’ यांच्यावर आली. दोन वर्षानंतर आजोबा सुध्दा वारले. अशा प्रकारे वयाच्या आठ वर्षापर्यंत आई-वडील आणि आजोबाविना ते पोरके झाले. आजोबानंतर काका ‘हजरत अबु-तालिब’ यांनी त्यांचे पालन पोषण केले. त्या काळातील परंपरेनुसार ते लहान वयातच आपल्या काकाबरोबर व्यापाराच्या निमित्ताने परदेशात जाऊ लागले. देशात आणि विदेशात ते ‘सादिक’ आणि ‘अमीन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी हजरत खतीजा नामक परमपवित्र विधवा स्त्रीशी ते विवाहबध्द झाले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना ‘प्रेषितावस्था’ प्राप्त झाली आणि तेव्हापासून त्यांच्यावर क्रमाक्रमाने ‘कुरआन शरीफ’ चे अतवरण होऊ लागले. प्रेषित्व मिळाल्यावर लोकांना ईशआज्ञेकडे बोलावण्याची (इस्लामचा प्रसार करण्याची) आज्ञा त्यांना प्राप्त झाली. त्यांनी लोकांना संबोधून सांगितले की, ‘‘लोक हो ! केवळ एकट्या अल्लाहची उपासना (बंदगी) करा. व्याभिचार, चोरी, मद्यप्राशन, जुगार यांचा पूर्णपणे त्याग करा. दुर्बलांची मदत करा, स्त्रियांना त्यांचा हक्क द्या, अल्लाहची भीती बाळगा, लक्षात ठेवा मृत्यु अटळ आहे. मृत्युनंतर निर्माणकर्त्या ईश्वरासमोर सर्वांना जाब दयावा लागणार आहे. बघा, एका मनुष्याची हत्या म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या होय.’ लोक हो ! तुम्ही सर्व एकच आहात. तुमच्यात कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. श्रेष्ठत्व रंगावर अथवा वंशावर नसून ईशभक्ति आणि ईशभितीवर अवलंबून आहे.’’


हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या या प्रचाराचा आरंभ होताच स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारा अधिकारी वर्ग, कट्टर कुरैश आणि अनेकेश्वरवादी त्यांचे शत्रु झाले. प्रेषित्व मिळाल्यापासून मदीनेला प्रयाण करेपर्यंत म्हणजेच तब्बल 13 वर्षापर्यंत हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या अनुयायींना अतोनात कष्ट सहन करावे लागले. लोखंडी सळईने त्यांना डागले गेले, तापलेल्या वाळूवर नग्नावस्थेत ओढले गेले, त्यांच्या मार्गात काटे टाकले गेले, त्यांना विविध प्रकारे कष्ट देण्यात आले. परंतु, त्यांच्या अनुयायांची नि:स्वार्थता, निर्भयता आणि उच्चदर्जाचे चारित्र्य पाहून हळू-हळू नैसर्गिक जीवन-प्रणालीकडे लोक वळू लागले. पाहता-पाहता अरब देशातले लोकच नव्हें तर संपूर्ण जगातील लोक ईस्लामधर्माकडे आकर्षित होऊ लागले. मक्केत शत्रुचे वर्चस्व आणि कष्ट देणे अधिकच वाढल्यामुळे ईस्लाम धर्मियांना तिथे राहणे कठीन झाले होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ईश आज्ञेने मक्केहून मदिनेला प्रयाण केले. त्यांच्या आगमनानंतर मदिना आणि आसपासच्या परिसरात न्याय, शांतता आणि बंधुत्वाचा सुगंध दरवळू लागला आणि दिवसेंदिवस ईस्लाम धर्म प्रफुल्लित होऊ लागला, वाढू लागला. ज्या दिवशी हजरत मुहम्मद सल्ल. यांनी मक्केहून मदिनेत पदार्पण केले त्या दिवसापासून ईस्लामी कालगणना हिजरी-सनाची सुरूवात झाली. ईश्वराचे लाडके प्रणेते आणि ईस्लामचे संदेशवाहक असूनही हजरत मुहम्मद सल्ल. यांची राहणी अत्यंत साधी आणि सरळ होती. खाण्यास जाडे-भरडे अन्न आणि झोपण्यास जमिनीवर फक्त एक चटई. जीवनभर त्यांनी कधीही भरपूर जेवण केले नाही. उलट कधी-कधी तीन-तीन दिवस त्यांना उपाशी राहावे लागत होते. या साध्या राहणीमागचे कारण गरीबी आणि दारिद्रय नव्हते तर त्यांना शतकानुशतकांच्या लोकांचे मार्गदर्शन केवल उपदेश म्हणून नव्हे तर स्वत: त्याच मार्गाचर अनुसरण करून दाखवायचे होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी अरफातच्या मैदानावर एक लाख चोवीस हजार अनुयायांच्या समक्ष जो अतिम संदेश लोकांना दिला तो त्या काळाच्या अनुयायांपुरताच मर्यादित नव्हता तर प्रलयापर्यंतच्या सर्व लोकांवर तो बंधनकारक आहे. या अंतिम उपदेशच्या वेळी त्यांनी लोकांना सांगितले. ‘‘लोक हो ! मला वाटते मी आणि तुम्ही पुन्हा इथे जमणार नाही. आजपासून या शहरात रक्त वाहणे निषिद्ध आहे. म्हणूनच तुमच्यावर हत्या करणे, कुणाचा अवमान करणे, कुणाचा माल हडपणे अपराध हराम ठरविले गेले आहे. लवकरच आपण सर्वांना ईश्वराच्या समोर हाजर व्हायचे आहे आणि सर्वांना आपल्या कृत्यांबद्दल जाब द्यावा लागणार आहे. तेव्हा माझ्यानंतर एकमेकांचे नुकसान करू नये. जे दुष्कृत्य आजपर्यंत घडले त्यांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका!’’ जगाचा निरोप घेतांना, प्राणोत्क्रमणच्या वेळी जमा झालेले सहाबा रजि. (सहकारी) यांना संबोधून ते म्हणाले होते, ‘‘ज्याची मला आज्ञा झाली, आजपर्यंत तेच मी तुमच्यापर्यंत पोहचविले आहे. अल्लाहच्या आदेशात बदल करू नका. लोकांवर बळजबरी करू नका कारण अल्लाहाने फर्माविले आहे की, परलोकाचे घर म्हणजेच ‘जन्नत’ एक असे पवित्र स्थान आहे की त्यावर हक्क त्याच लोकांना मिळणार आहे जे जमीनीवर विद्रोहचे अपराधी नाहीत. जमीनीवर कोणत्याही प्रकारचे दंगे किंवा भांडण करत नाहीत. कारण जन्नत पाक आणि पवित्र लोकांसाठी आहे. पवित्र लोकांच्या कर्माचे ते फळ आहे.’’ हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ज्या इस्लामची शिकवण दिली, जो मार्ग आपल्या जीवनात त्यांनी अवलंबविला, जो संदेश ते घेऊन आले. त्यावरून हे स्पष्ट होते की ते शांतीचे महान प्रणेते होते. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे, आपल्या कृर्त्यांचा जाब विचारणारा आहे, परलोकाविषयीची ही निष्ठा माणसाला स्वैराचार प्रवृत्तींपासून दूर ठेवते. ‘जगत महर्षी’च्या दुस-या पानावर महात्मा गांधीचे म्हणणे उद्धृत केलेले आहे. ज्यात ते म्हणतात, ‘‘नि:संशय ईस्लाम तलवारीने पसरला नसून प्रेषितांचे साधे जीवन, नि:स्वार्थता, प्रेम, निर्भयता, ईश्वरावर दृढ आस्था आणि विश्वास यांच्या बळावर पसरला आहे.’’ संपूर्ण जगासाठी कल्याणाचा मार्ग दाखविण्याकरिता ईश्वराचा संदेश घेवून येणारे रहमतुल्लील आलमीन हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांना ईश्वराने ज्या दिवशी जगात पाठविले होते त्याच दिवशी आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो दिवस म्हणजे 12 रबीउल अव्वलचा सोमवार होय. जगाला ईशभक्ती, शांती-समृध्दी, न्याय-बंधुत्व, एकता आणि नैतिकतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद सल्ल. ज्या दिवशी जगात आले त्याच दिवशी त्यांनी पर्दा फरमाविला. शांतीचे महान प्रणेते हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जीवन, पथप्रदर्शन प्रलयापर्यंतच्या लोकांकरिता आदर्शच आहे. 


- डॉ. अर्जिनबी युसूफ शेख

अकोला

dr.arjinbee@gmail.com. 

मो. 93718 95126 


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget