Latest Post


महागाईच्या झळा त्यानांच बसतात जे हलाल (वैध) पद्धतीने संपत्ती कमावतात मात्र या जगात हराम (अवैध) पद्धतीने संपत्ती कमावण्याची पद्धत एवढी रूढ झालेली आहे की ती वाईट आहे याचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. एवढेच नव्हे तर हराम पद्धतीने संपत्ती कमावणाऱ्यांना सामाजिक मान्यता मिळालेली आहे. यामुळे आर्थिक विषमता एवढी वाढलेली आहे की, आफ्रिकेतील मागास देशातील काही लोक पांढऱ्या मातीचे पेस्ट तयार करून त्यात मीठ मिसळून खात आहेत. तर प्रगत देशामधील लोक पंचपकवाने खाऊन मधुमेहाने मरत आहेत. आपल्या देशातही विषमतेने कळस गाठलेला आहे. तरूणांना रोजगार मिळत नाही. 2019 साली घोषित झालेल्या रेल्वेच्या परीक्षा अद्याप पूर्णत्वास गेेलेल्या नाहीत त्यामुळे संपूर्ण बिहारमधील तरूण पेठून उठलेले आहेत, रेल्वे जाळत आहेत. या पार्श्वभूमीवर ही आर्थिक विषमता का वाढते? तिला रोखण्यासाठी काही उपाय आहे काय? यावर या आठवड्यात चर्चा करणे अनाठायी होणार नाही. 

आर्थिक विषमतेचे मूळ कारण व्याज आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उपभोगतावादी जीवनशैलीला सरकारी मान्यता प्राप्त असते आणि या व्यवस्थेमध्ये सर्वाधिक महत्त्व संपत्तीला असते. विशेष म्हणजे या व्यवस्थेमध्ये अनैतिक पद्धतीने संपत्ती कमाविण्याला वाईट समजले जात नाही. विषमतेची सुरूवात येथूनच होते. भांडवलशाही व्यवस्थेचा पाठीचा कणा व्याज आहे. 

साम्यवादाच्या पाडावानंतर आजमितीला दोन अर्थव्यवस्था जगात अस्तित्वात आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था दूसरी इस्लामी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने जगातील सर्वच देशांचा ताबा घेतलेला आहे तर इस्लामी अर्थव्यवस्था बाल्यावस्थेत आहे. इतकी की तिचा परिचय करून द्यावा लागतो. परंतु ज्या दिवशी या दोन अर्थव्यवस्थांमधील फरक सामान्य लोकांच्या लक्षात येईल त्याच दिवशी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळून पडेल, यात शंका नाही. या दोन अर्थव्यवस्थेतील मूळ फरक व्याज होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाला नफा समजले जाते, तर इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाला आर्थिक शोषणाचे मूळ कारण समजले जाते. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, या दोन विचारांपैकी कोणता विचार खरा आहे? मानवकल्याणासाठी योग्य आहे? 

व्याज म्हणजे काय? 

मूळ रकमेवर कर्जदाराकडून अनिवार्य पद्धतीने वाढीव रक्कम घेणे म्हणजे व्याज होय? ईश्वराने माणसामध्ये जी प्रवृत्ती ठेवलेली आहे त्यात काही गोष्टी चांगल्या म्हणून बाय डिफॉल्ट ठेवलेल्या आहेत. उदा. खरे बोलावे, आई-वडिलांची सेवा करावी, शोषण करू नये इत्यादी. जरा गांभीर्याने विचार केला तर कोणाच्याही लक्षात येईल की, व्याज घेणे मानवी प्रवृत्तीच्या प्रतिकूल असे काम आहे. मुळात माणसाने जे कमाविले ते नशीबाने कमाविलेले असते. त्याच्यात त्याच्या मेहनतीचा फारसा वाटा नसते. कारण मेहनत तर सगळेच करतात. मेहनतीवर श्रीमंती अवलंबून असती तर शेतकरी वर्ग जगातील सर्वात श्रीमंत वर्ग ठरला असता. म्हणून नशीबाने जी संपत्ती मानवाने कमाविलेली आहे ती त्याने स्वतःवर खर्च करावी, आपल्या कुटुंबावर खर्च करावी, योग्य पद्धतीने भविष्यासाठी बचतही जरूर करावी, मात्र एवढं करूनही त्याच्याकडे संपत्ती शिल्लक राहत असेल तर त्याने ती धर्मादाय कामामध्ये खर्च करावी. चॅरिटी करण्याचे धाडस नसेल तर किमान त्याने त्या संपत्तीचा दुरूपयोग तरी करू नये, हा उदात्त हेतू इस्लामी अर्थव्यवस्थेशिवाय कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये नाही. आपल्याकडे असलेली संपत्ती गरजवंतांना कर्जरूपाने देऊन अर्थात सावकारी करून अव्वाच्या सव्वा दराने व्याज घेणे मानवी प्रवृत्तीच्या विरूद्ध आहे. 

व्यापारी बँकांकडून कर्ज घेणे?

व्यापारी बँकांकडून कोणी व्यावसायासाठी कर्ज घेत असेल तर त्याला योग्य म्हणता येणार नाही. कारण कर्जदार व्यावसायिकाला नफा हो का तोटा हो बँकेला व्याजासहित मूळ रक्कम परत करावीच लागते. काही अशा कारणांमुळे व्यावसाय तोट्यात गेला की ज्या कारणावर व्यापाऱ्यांचे नियंत्रण नव्हते. उदा. पूर, भूकंप, लॉकडाऊन वगैरे... तरी व्यावसायिकाला व्याजासह मूळ रक्कम बँकेला परत द्यावीच लागते. व्यवसाय हा नेहमीच नफ्यात राहील, असे छाती ठोकपणे कोणीच म्हणू शकत नाही. अशा परिस्थितीत व्यावसायिकासमोर दोनच पर्याय असतात. एक तर माल्या, मोदी, सारखे विदेशात पळून जाणे किंवा कर्जबाजारी शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करणे. व्याज माणसाला जीवंत राहण्याचा अधिकार हिरावून घेतो.  म्हणून ईश्वराने व्याजाला निषिद्ध घोषित केलेले आहे. 

कमी दरावर व्याज घेणे?

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे श्रद्धावंतांनो! हे दाम दुप्पट व्याज खाण्याचे सोडून द्या आणि अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की सफल व्हाल.’’  (सुरे आले इमरान : आयत नं.130).  या आयातीचा अर्थ लावताना अनेकांची गफलत झालेली आहे. ती अशी की, अव्वाच्या सव्वा दराने व्याज घेऊ नये. मात्र कमी दराने व्याज घेण्यास काही हरकत नाही. हा अर्थ चुकीचा आहे. याचे कारण असे की, कुरआनच्या याच सुरहमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका.’’ (सुरे बनीइसराईल : आयत नं.31). तर याचा अर्थ असा घ्यावा का की, गरीबी व्यतिरिक्त दुसऱ्या कारणाच्या भीतीने संततीला ठार मारणे कुरआन संमत आहे? जसे कुठल्याही कारणास्तव कोणालाही ठार करणे कुरआन संमत नाही त्याचप्रमाणे कुठल्याही कारणाने व्याज घेणे कुरआन संमत नाही. 

इस्लामला भाडे घेणे मान्य आहे तर व्याज का नाही?

इस्लाममध्ये कुठलीही वस्तू भाड्यावर देणे मान्य आहे. उदा. दुसऱ्याच्या उपयोगासाठी आपले घर भाड्यावर देता येते, वाहन भाड्यावर देता येते व त्यावर भाडे घेता येते. तर त्याचप्रमाणे दुसऱ्याला रक्कम देऊन त्यावर व्याज का घेता येत नाही, तेही एका प्रकारचे भाडेच नव्हे काय? तर याचे उत्तर असे की, आपण जेव्हा घर किंवा वाहन भाड्यावर देतो तेव्हा ते नष्ट होत नाही  रक्कम मात्र नष्ट होते. उदा. एखाद्याने मुलीच्या लग्नासाठी एक लाख रूपये कर्ज घेतले तर 1 लाख रूपये लग्नामध्ये खर्च झाले म्हणजे ती रक्कम नष्ट झाली. घर किंवा वाहनामध्ये असे होत नाही. ते मूळ मालकाला परत मिळतात. खर्च झालेली रक्कम नव्याने उभी करावी लागते आणि हे काम अतिशय कठीण असते. त्यावर पुन्हा व्याज देणे ती तर आणखीन कठीण बाब ठरते. त्याची 1 लाख रूपये उभी करण्याची ऐपत असती तर त्याने कर्जच घेतले नसते. अशा परिस्थितीत मूळ रक्कम परत मागणे ठीक आहे पण त्यावर व्याज मागणे हे भाडे मागण्याऐवढे सहज नाही आणि शक्यही नाही. म्हणून इस्लामने रोख रकमेवर मोबदला व्याज रूपाने घेण्यास मनाई केलेली आहे. 

कर्जाऊ रकमेचे अवमूल्यन होते त्याचे काय? 

समजा ’अ’ने 10 लाख रूपये ’ब’ला पाच वर्षासाठी बिनव्याजी कर्जाऊ दिले आणि ’ब’ने प्रामाणिकपणे पाच वर्षांनी त्याचे 10 लाख रूपये परत दिले. तरी ’अ’चे यात नुकसान होते. कारण पाच वर्षात 10 लाख रूपयाचे अवमूल्यन होते. महागाई वाढते. त्यामुळे दहा लाख रूपयांची ’फेस व्हॅल्यू’ जरी तितकीच असली तरी त्या 10 लाख रूपयांचे ’खरेदी मुल्य’ कमी होऊन जाते. अशा परिस्थिती काय करावे? 

इस्लाममध्ये कोणालाही अनुचित लाभ किंवा अनुचित नुकसानीमध्ये टाकण्यास परवानगी नाही. ’अ’ने 10 लाख रूपये देतांनाच ’ब’शी असा करार करावयास हवा की पाच वर्षानंतर 10 लाख रूपये खरेदी मुल्यासह परत करावे. हे खरेदी मूल्य ठरविण्यासाठी कंज्युमर प्राईस इंडेक्स किंवा सोन्याचे दर एकक म्हणून ठरविले जाऊ शकतात. येणेप्रमाणे ’ब’ला पाच वर्षानंतर 10 लाख रूपये नव्हे तर 10 लाख रूपयाचे खरेदीमुल्य जेवढे असेल तेवढे ’अ’ला परत करणे अनिवार्य ठरते, हे मात्र व्याज नाही. याला इस्लाममध्ये परवानगी आहे. 

ईश्वरीय धमकी

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’परंतु जर तुम्ही असे केले नाही, तर सावध व्हा, अल्लाह व त्याच्या पैगंबराकडून तुमच्याविरूद्ध युद्धाची घोषणा आहे. अजूनसुद्धा पश्चात्ताप कराल (आणि व्याज सोडून द्याल) तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कुणावर अत्याचार करू नका न तुमच्यावर कुणी अत्याचार करील  ’’ (सुरे अलबकरा : आयत नं. 279).

कुरआनमध्ये फक्त एकाच ठिकाणी मानवाला धमकी देण्यात आलेली आहे. ते ठिकाण म्हणजे वर नमूद आयात होय. या आयातीचा विषय अर्थातच ईश्वराला तीव्र नापसंत असलेला विषय म्हणजे व्याज होय. आज जगामध्ये सर्वत्र व्याजाधारित अर्थव्यवस्था सुरू आहे. असे समजले जाते की, व्याजामुळे विकास होतो आणि त्यासाठी युरोपियन देशांचे उदाहरण दिले जाते. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमुळे त्यांनी किती विकास केलेला आहे ते पहा.  परंतु एक गोष्ट विसरली जाते की, आयएमएफ आणि वर्ल्ड बँक सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना अव्वाच्या सव्वा दराने अब्जावधींची कर्जे देऊन कोट्यावधी रूपयांचे व्याज वसूल केले जाते आणि त्या व्याजावर ज्याला जग नेत्रदिपक विकास समजतो तो साध्य केला जातो. म्हणजेच हा विकास नैसर्गिक विकास नसून गरीब राष्ट्रांचे रक्त शोषण करून साधलेला विकास आहे. इस्लामला असा विकास मान्य नाही. इस्लामला समतोल विकास मान्य आहे जो की, व्याज विरहित अर्थव्यवस्थेतच शक्य आहे. कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’तुमचा कर्जदार जर हलाखीच्या परिस्थित असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या. आणि जर दान करून टाकाल तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले आहे, जर तुम्ही समजून घ्याल. ’’(सुरे अलबकरा आयत नं. :280)

याचा अर्थ असा आहे की, मानवकल्याण हे सर्वश्रेष्ठ ध्येय असायला हवे. व्यक्तीगत कर्ज असो की, का राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे कर्ज असो, कर्जदार व्यक्ती असो, वित्तीय संस्था असो, उद्योगपती असो की व्यावसायिक असो तो अशा कारणामुळे कर्ज परत करू शकत नसेल की, जी कारणे त्याच्या हातात नाहीत. उदा. प्राकृतीक आपदा वगैरे... अशा परिस्थितीत त्याचे कर्ज माफ करणे आवश्यक ठरते. अमेरिकेमध्ये ’चॅप्टर-11’ नावाचा एक कायदा आहे. ज्यात एखादी बँक, कारखाना, व्यावसाय अशा कारणामुळे इन्सॉल्व्हंट (दिवाळखोर) झाला असेल जे कारण प्राकृतिक असेल, तर त्याला बेलआऊट पॅकेज देऊन दिवाळखोरीपासून वाचविणे सरकारचे कर्तव्य ठरेल, असे म्हटलेले आहे. मुस्लिमांनी कितीही गर्व केला तरी तो कमी आहे. ते यासाठी की आज अमेरिकेने जो कायदा केलेला आहे तो 1443 वर्षापूर्वी कुरआनने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेला आहे. 

व्याजामुळे खरेच संपत्ती वाढते काय?

कुरआनमध्ये आणखीन एका ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’जे व्याज तुम्ही देता जेणेकरून लोकांच्या मालमत्तेत मिसळून त्याची वाढ व्हावी, अल्लाहच्या जवळ ते वाढत नाही. आणि जी जकात तुम्ही अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याच्या इच्छेने देता, ती देणारेच वास्तविकतः आपल्या मालमत्तेत वाढ करतात. ’’ (सुरे अर्रूम आयत नं. 39).

सकृतदर्शनी व्याजामुळे संपत्तीत वाढ होत असतांना दिसत असली तरी त्यातील बरकत निघून गेलेली असते. त्यामुळे प्रत्यक्षात ती वाढ निरूपयोगी वाढ असते. किंबहुना कॅन्सरसारखी वाढ असते, जिच्याद्वारे सामाजिक स्वास्थ्याला गंभीर इजा पोहोचते. ही गोष्ट त्यांच्याच लक्षात येईल ज्यांना डोळसपणाने कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची सवय असते. आज व्याजामुळे मिळत असलेल्या अमाप संपत्तीमुळे किती सामाजिक नुकसान प्रगत राष्ट्रांना होत आहे, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. सध्या फक्त एवढेच लक्षात घेणे गरजेचे आहे की,हराम मार्गाने येत असलेली ही संपत्ती कधीच समाजाचे कल्याण करणारी नाही. 

व्याजाधारित कर्जाचा अंतिम परिणाम

नोव्हेंबर 2021 मध्ये एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) ने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे फक्त एका वर्षात म्हणजे 2020 साली 1 लाख 53 हजार 052 व्यावसायिकांनी व्यवसायात तोटा आल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. 2019 च्या तुलनेत ही आकडेवारी 29 टक्क्यांनी जास्त आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आकडेवारी तर वेगळीच.

एकंदरित एक गोष्ट स्पष्ट आहे की, व्याजामुळेच मानवतेची अपरिमित हानी होत आहे आणि यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. किती दिवस ही हानी सोसायची? याचा किमान बुद्धिवाद्यांनी विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली  आहे. आज ना उद्या जगाला इस्लामच्या व्याजमुक्त अर्थव्यवस्थेकडेच वळावे लागेल. यात शंका नाही. दुर्दैव या गोष्टीचे आहे की, 56 मुस्लिम राष्ट्र असून, एकाही राष्ट्रात शुद्ध अशी व्याजविरहीत अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही. किंबहुना अशी अर्थव्यवस्था जगात कुठल्याच देशात अस्तित्वात येणार नाही, यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश सतत डोळ्यात तेल घालून दक्ष असतात. त्यांना माहित आहे ज्या दिवशी इस्लामच्या कल्याणकारी व मानवतेला तारणारी व्याजविरहित अर्थव्यवस्था एखाद्या देशात यशस्वी होईल त्याच दिवशी कॉपीपेस्टच्या या काळामध्ये त्या अर्थव्यवस्थेचे अनुसरण इतर देशांकडून केले जाईल व आपली अर्थव्यवस्था रसातळाला जाईल. याच भीतीमुळे व्याजविरहीत अर्थव्यवस्थेबद्दल कधीच, कुठल्याच मीडिया हाऊसमध्ये डिबेट आयोजित केल्या जात नाहीत. उलट या विषयाकडे जगाचे लक्ष जाऊ नये म्हणून इस्लाम आणि मुस्लिमांवर वेगवेगळे आरोप मुद्दामहून लावून जगाचे लक्ष विचलित केले जाते. आज मुस्लिमांनी ओरडून जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे की, इस्लामी अर्थव्यवस्थेशिवाय जगाला दुसरी कुठलीही अर्थव्यवस्था तारू शकत नाही, अन्यथा कुठल्याही अणुबॉम्बशिवाय जग आपोआप नष्ट होईल. 


-एम.आय.शेख



हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या कन्या ह. फातिमा (र.) यांच्या घरी गेले, पण त्यांची भेट न घेताच दरवाजातूनच परतले. कारण त्यांनी (ह. फातिमा र. यांनी) आपल्या घराच्या दरवाजावर रंगीत पडदे लावलेले होते. जेव्हा कधी प्रेषित कुठल्या प्रवासावरून परत यायचे तेव्हा ते प्रथम आपल्या कन्येची भेट घेत असत. पण त्या दिवशी प्रेषित त्यांना भेटल्याविनाच परतले होते. जेव्हा ह. अली (र.) (ह. फातिमा र. यांचे पती) घरी आले. त्यांनी फातिमा (र.) यांना दुःखद अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे कारण विचारले. ह. फातिमा यांनी प्रेषितांविषयी सांगितले की ते आपल्या घरी आले होते, पण दारातूनच परतले. हे ऐकून ह. अली (र.) प्रेषितांच्या सेवेत उपस्थित झाले आणि म्हणाले की हे प्रेषित! आपण आमच्या दारातूनच परतलात. यामुळे फातिमा (र.) फार दुःखी आहेत.

यावर प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला या दुनियेच्या वैभवाशी काय देणंघेणं. मला रंगीत पडद्यांचा काय मोह?’’

ह. अली (र.) फातिमा (र.) यांच्याकडे जाऊन प्रेषितांनी जे सांगितले ते कळवले. ह. फातिमा (र.) यांनी ह. अली (र.) यांना सांगितले की तुम्ही जा आणि प्रेषितांना विचारा, त्या पडद्यांचे मी काय करावे?

प्रेषित मुहम्मद (स.) ह. अली (र.) यांना म्हणाले, ‘‘फातिमांना सांगा ते पडदे कुणाला तरी देऊन टाका जेणेकरून ते त्यांचे वस्त्र शिवून परिधान करतील.’’ (मुसनद अहमद बिन हंबल)

ह. शफा बिन्त अब्दुल्लाह (र.) म्हणतात, ‘मी एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे गेले त्यांनी माझी काही मदत करावी म्हणून. पण प्रेषितांनी क्षमा मागितली. मला काही दिलं नाही. नंतर मी माझ्या मुलीच्या घरी गेले. नमाजची वेळ झाली असताना देखील तिचे पती शरजील (र.) घरीच बसून होते. मी त्यांच्यावर रागावले.’ त्यावर शरजील (र.) म्हणाले. ‘मावशी तुम्ही उगाच माझ्यावर रागावत आहात. माझ्याकडे एकच वस्त्र होतं. ते प्रेषितांनी माझ्याकडून मागून घेतलं. मला परिधान करायला आता दुसरे कपडे नाहीत, म्हणून मी मशिदीत गेलो नाही.’ त्यावर ह. शफा (र.) म्हणाल्या, ‘माझे मातापिता प्रेषितांवर कुरबान. मी नाहक त्यांच्यावर रागावले. मला त्यांच्या बाबतीत माहिती नव्हती.’ शरजील (र.) म्हणतात, ‘माझ्याकडे एकच फाटलेले वस्त्र होते ज्यावर मी ठिगळ लावले होते.’ (तिर्मिजी, बहैकी)

मुस्लिमांच्या माता ह. आयेशा (र.) म्हणतात की ह. सफिया (र.) (प्रेषित मुहम्मद स. यांच्या पत्नी) ज्या अगोदर ज्यू धर्मिय होत्या. त्यांचा उंट आजारी पडला. ह. जैनब (र.) यांच्याकडे दोन उंट होते.

त्यांना प्रेषित म्हणाले, ‘‘तुम्ही आपला एक उंट सफिया यांना द्या.’’ ह. जैनब (र.) म्लणाल्या, ‘मी त्या ज्यू धर्मियास माझा उंट का देऊ?’

त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) ह. जैनब (र.) यांच्याशी तीन दिवस काहीच बोलले नाहीत. (अबू दाऊद)



पुणे (कलीम अजीम) 

1857चा स्वातंत्र्य संग्राम मिला-जुला म्हणजे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन लढलेला लढा होता. ह्या एकतेला पाहून इंग्रज घाबरले आणि त्यांनी सत्तेसाठी दोन समुदायामध्ये फूट पाडायचे प्रयत्न सुरू केले. हिंदू-मुस्लिमांना वेगळे पाडले. आपल्याकडील काही स्वार्थी नेते त्याला बळी पडले. आजही हेच सुरू आहे, त्यामुळे दोन सुमदायामध्ये वेगळेपणाची दरी वाढत चाललेली आहे, ही दरी कमी करण्यासाठी समाज संवाद महत्त्वाचा आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.

पुण्यात रविवारी (ता. 23) कौसर बाग मस्जिद येथे समाज संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी देशमुख बोलते होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या मस्जिद परिचय मेळाव्याला परिसरातील अनेक गैरमुस्लिम स्त्री-पुरुष नागरिक व मान्यवर उपस्थित होते. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्याचे पाण्याची बाटली व खजूर देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना नमाजपूर्वी केले जाणारे वजू (स्वच्छता) काय असते, ते कसे करावे व त्याचे महत्त्व सांगण्यात आले.

एसआयओ या विद्यार्थी संघटनेच्या स्वयंसेवकांनी मान्यवरांना बाहरेचा सर्व परिसर फिरवून दाखविला. शिवाय इतर माहितीदेखील दिली. त्यानंतर मस्जिदीच्या गाभाऱ्यात जिथे इमाम नमाजचे नेतृत्व करतो, तिथे सर्वांना घेऊन जाण्यात आले. अली इनामदार यानी मस्जिदीच्या आतल्या रचनेचा परिचय करून दिला. प्रा. रशीद शेख यांनी मस्जिदची रचना, निर्मिती, जानिमाज, पुस्तके, नमाजच्या वेळा, दररोज नमाजमध्ये इमाम कुठली वचने पठण करतो, त्या श्लोकाचे अर्थ इत्यादी समजावून सांगितली.

त्यानंतर अज़ान देऊन त्याचे शब्दश: भाषांतर करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष नमाज अदा करण्यात आली. मुफ्ती नवेद यांच्या मधाळ किराअतने नमाज संपन्न झाली. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी गाभाऱ्यात बसून प्रत्यक्ष नमाज पाहिली. त्यानंतर जमाअते इस्लामी हिंदचे डॉ. रफीक सय्यद पारनेरकर यांनी नमाजमध्ये पठण करण्यात आलेल्या कुरआनच्या वचनांचा सार व त्याचा अर्थ समजावून सांगितला. तत्पूर्वी निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते गाजिउद्दीन रिसर्च सेंटर व डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन प्रकाशित ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. पुस्तकावर बोलताना सरफराज अहमद म्हणाले, हजरत बिलाल हे एक हब्शी गुलाम होते, त्यांना मुक्त करून प्रेषितांनी समानता आणि आदर, सन्मानाचा एक महत्त्वाचा संदेश दिला. इस्लामचे ते प्रथम मुअज्जीन होते. त्यांना काबागृहावर चढून अजान देण्यासाठी प्रेषितांनी निमंत्रण दिले, ती वर्णव्यवस्थेविरोधात इस्लामची पहिली चळवळ होती, असे म्हटले.

मस्जिद परिचयाचा मुख्य कार्यक्रम दीड तास चालला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर परिसरातच समाज संवाद कार्यक्रम झाला. सरफराज अहमद यांनी मस्जिदीचा सामाजिक व सांस्कृति तथा राजकीय इतिहासाची पुनर्मांडणी केली. मस्जिदे ऐकेकाळी राजकीय व सामाजिक कल्याणाची केंद्र होती, ती स्वतंत्र व मुक्त विद्यापीठे होती. इजिप्तचे अल अजहर, देवबंदचे विद्यापीठ हे सुरुवातीला मस्जिदी होत्या. त्यानंतर त्यांचे विद्यापीठात रुपांतर झाले, आज आपल्या मस्जिदी आधुनिक शिक्षणाची केंद्रे व्हावीत, असे ते म्हणाले. इस्लामचा सामाजिक व आर्थिक विचार त्यांनी उपस्थितासमोर मांडला. मस्जिदी गरिब, निराश्रीतासाठी निवारा आहेत, तसेच ते गरजवंतासाठी अन्नछत्र आहेत. मस्जिदींचा वापर फक्त नमाजसाठी न होता, इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी आणि परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांच्या विधायक कार्यासाठीदेखील झाला पाहिजे, असेही सरफराज म्हणाले.  ह्या मेळाव्यात साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी इस्लामी संस्कृतीवर विचार मांडले. वेगेवेगळ्या काळातील समाजाला समजून घेण्यासाठी अशा प्रकारचे संवाद कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे सांगत शिरसाठ म्हणाले, संस्कृती असो किंवा चालिरिती, परंपरामध्ये काळाचा विचार करून काही गोष्टी अंतर्भूत झालेल्या असतात. परंतु काळ बदलतो, परिस्थिती बदलते तसे त्यातले काही कालबाह्य झालेले असते किंवा काही योग्य ठरणार नसते त्यामुळे संस्कृती, समाज पुढे जायचा असेल तर समाजासाठी जे चांगले आहे, परंपरेतून आलेले, धर्मातून आलेले, श्रद्धेतून, विश्वासातून आलेले ते आपण टिकवावे, अधिक समृद्ध करावे. आणि जे-जे कालबाह्य आहे किंवा सदोष आहे, ते मागे टाकून पुढे जायला पाहिजे, असे केले नाही तर समाजाला एक प्रकारचे साचलेपण येते.

दिल्लीहून आलेल्या ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे चेअरमन अ‍ॅड. शरफुद्दीन अहमद यांनी समूह संवादावर भर दिला. तसेच हिंदू-मुस्लिमांनी प्रचारी संदेशांना बळी न पडता, आपल्या आसपासच्या सर्व धर्मीय नागरिकांशी संवाद प्रस्थापित करावा, असे म्हटले.सलोखा मंचचे प्रमोद मुजुमदार उपस्थिताशी संवाद साधत म्हणाले, देशातील, शहरातील अल्पसंख्यांना विश्वासात घेणे ही बहुसंख्याकाची जबाबदारी आहे. सामाजिक सद्भाव टिकवून अल्पसंख्याकाशी, मुस्लिमांशी संवाद साधणे ही आज गरजेचे आहे. धर्मकेंद्री राजकारण होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे मुस्लिम हवालदिल झालेला आहे, अशा मुस्लिमांच्या पाठिशी ‘सलोखा’  आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना विश्वास देतो की, आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. सलोखा मंचच्या डॉ. संजिवनी कुलकर्णी यांनी मुस्लिमांविषयी होत असलेल्या अप्रचाराला बळी पडू नये, असे सांगितले. युक्रांदच्या नीलम पंडित आपल्या एेंशी वर्षीय आईला घेऊन आलेल्या होत्या. मस्जिद पाहून आई खूप कृतार्थ झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या परिचय मेळाव्यात लोकायत, नोइंग गांधी, संविधान संवादक फोरमचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी प्रत्यक्ष मस्जिद पाहून आत्मिक समाधान वाटले, अशा भावना व्यक्त केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तबलीग जमात (पुणे)चे विशेष प्रयत्न होते. असे उपक्रम विविध शहरात व दिल्ली मरकजपर्यंत पोहोचविण्याची हमी तबलीगच्या संघटकांनी दिली. कौसर बाग मस्जिद कमिटीने परिसरातील गैरमुस्लिम सोसायटीमध्ये जाऊन मस्जिद परिचयासाठी अनेकांना निमंत्रणे पाठविली होती. तसेच पोलीस, आईबी यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. सावित्री-फातिमा विचार मंचचे अली इनामदार यांनी समाज संवाद मेळाव्याचे सर्व नियोजन व अन्य व्यवस्थेचे संयोजन केले होते. तसेच उपस्थितांना मार्दगर्शनही केले. कलीम अजीम यांनी सर्व निमंत्रित पाहुण्याचे आभार मानले. मस्जिदमध्ये दाखविण्याकरिता विशेष असे काही नसते. तसेच लपविण्याकरितादेखील असे काही नसते. त्यामुळे अगदी कोणीही, कधीही येऊन मस्जिद पाहू शकतो. मस्जिदीबद्दल होत असलेल्या अप्रचाराला बळी पडण्याआधी परिसरातील एखाद्या मस्जिदला भेट द्या, असेही त्यांनी सांगितले. राहिलेल्या त्रुटी व उणीवा पुढच्या परिचय मेळाव्यात भरून काढण्याचे आश्वासन कलीम यांनी दिले. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटी, तबलीग जमात यांचे विशेष आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचा हातभार लागला, अशा सर्वांचे त्यांनी अभार मानले.

कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दलाचे संदेश भंडारे, सलोखा मंचचे सर्व पदाधिकारी, युक्रांदचे संदीप बर्वे, ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे एड. संतोष जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सर्वजण आपल्या मित्र-सहकाऱ्यांना घेऊन कार्यक्रमाला आले होते. पारनेहूर रफिक सय्यद यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटीचे सेक्रेटरी जफर खान उपस्थित होते. कार्यक्रमाला हजर असेलल्या प्रत्येकांना साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ आणि ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तके वितरित करण्यात आली. तसेच संदेश लायब्ररीच्या कार्यकर्त्यांनी कुरआनची मराठी प्रतही सर्वांना भेट दिली. ह्या समाज संवाद कार्यक्रमाला व्यक्तिगत निमंत्रणे पाठवून निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तसेच काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिलेले होते. विशेष म्हणजे मस्जिद कमिटीच्या नोटीस बोर्डवर मराठी भाषेत सूचना लिहिण्यात आलेली होती. त्यानुसार मस्जिद पाहण्यासाठी हिंदू-मुस्लिम समुदायातील स्त्रिया मोठ्या संख्येने हजर झालेल्या होत्या. कार्यक्रमाला आलेला चांगला प्रतिसाद पाहून नियमित मस्जिद परिचय व समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे सावित्री-फातिमा विचार मंचच्या वतीने कळविण्यात आले.



हजरत जाबिर (र.) म्हणतात, एक दिवस प्रेषित मुहम्मद (स.) बनी अमरो बिन औफ यांच्या मोहल्ल्यात गेले.

प्रेषित म्हणाले, ‘‘हे अनसारचे लोक.’’

तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्ही हजर आहोत. हे अल्लाहचे प्रेषित.’

प्रेषित त्यांना उद्देशून सांगू लागले, ‘‘इस्लामपूर्वीच्या काळात तुम्ही अल्लाहची उपासना करत नसत, दुर्बल आणि निराधार लोकांचा बोजा उचलत असत, आपल्या मिळकतीतून गरीबांना देत होता, प्रवाशी लोकांना मदत करीत, पण जेव्हा अल्लाहनं तुम्हाला आणि प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचे उपकार तुमच्यावर केले तेव्हा तुम्ही आपल्या बागांच्या भोवती भिंती उभ्या करता. माणसांनी जर तुमच्या बागेतले फळ खाल्ले असेल तर अल्लाह तुम्हास त्याचा मोबदला देईल. तसेच पशुपक्ष्यांनी फळं खाल्ली तर त्याचादेखील मोबदला दिला जाईल.’’

हजरत जाबिर (र.) म्हणतात की लोकांनी प्रेषितांचे म्हणणे ऐकून आपल्या बागांभोवतीच्या भिंती काढून टाकल्या. (तरगीब, तरतीब, )

हजरत अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात की जेव्हा कधी प्रेषित मुहम्मद (स.) मला काही माल देत असत मी त्यांना म्हणत होतो, 'जे लोक माझ्यापेक्षा अधिक वंचित असतील अशा लोकांना द्या.'

प्रेषित त्यांना उत्तर देत की ‘‘हा माल घेऊन टाका. जेव्हा कधी तुम्ही कुणाशी काही न मागता माल दिला गेला आणि तुम्ही त्याची अपेक्षाही केली नव्हती, तर असे देणे घेत जा. ते साठवून ठेवा. आवश्यकता असल्यास त्याचा उपयोग करा आणि वाटल्यास ते दान करा. जे तुम्हाला मिळाले नसेल त्याची लालसा करू नका.’’

हजरत अब्दुल्लाह बिन उमरचे पुत्र म्हणतात की म्हणूनच माझे पिता कधी कुणाकडे काही मागत नसत. आणि जर कुणाला न मागताच कुणी काही दिले असेल तर ते नाकारत नव्हते. (बुखारी, मुस्लिम)

ऐनिया इब्ने हसन एकदा आपले चुलते हुर बिन कैस यांच्याकडे गेले, हुर बिन कैस हे खलीफा ह. उमर (र.) यांच्या फार जवळचे होते.

ऐनिया आपल्या चुलत्यास म्हणाले की ‘तुम्हाला ह. उमर (र.) यांची जवळीक लाभली आहे. मला त्यांना भेटायचे आहे. त्यासाठी परवानगी मिळवून द्या.’

ह. उमर (र.) यांनी ऐनिया यांना भेटण्यास परवानगी दिली. ऐनिया ह. उमर (र.) यांच्याशी बोलताना म्हणाले की, ‘तुम्ही आम्हाला काही जास्त माल देत नाही की आमच्या बाबतीत न्याय्य वागणूक सुद्धा देत नाही.’

ह. उमर (र.) यांना याचा फार राग आला. ऐनिया यांना शिक्षा देण्याचा विचार करू लागले.

तेवढ्यात हुर बिन कैस यांनी ह. उमर (र.) यांना पवित्र कुरआनची एक आयत ऐकवली, त्याचा अनुवाद असा,

‘‘लोकांना माफ करा. नेकी आणि परोपकाराचा संदेश द्या आणि अडाणी लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा.’’ (कुरआन, ८:१९९)

‘हे महाशय अशिक्षित आहेत, त्यांची चूक माफ करा.’ हे ऐकून ह. उमर (र.) यांचा राग संपला आणि ऐनिया यांना क्षमा करून टाकले. (बुखारी, इब्ने अब्बास)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या सर्व विधींपेक्षा श्रेष्ठ विधी ’वही’द्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो,ज्ञान पोहोचविणारा ईशदूत असतो तर ज्ञान प्राप्त करणारा जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती ’प्रेषित’ असतो.

इरसाल अब के हक़ ने किया ऐसा एक रसूल

जिसने सरों के साथ दिलों को झुका दिया

गात ज्ञान हस्तगत करण्याची जी साधने आहेत त्यापेक्षा एक अधिकचे साधन प्रेषितांकडे असते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडेही ते साधन होते, ज्याचे नाव वही (वह्य /वहीह) असे आहे. ही वही म्हणजे ईश्वराचा संदेश होता. हा संदेश जिब्राईल अलै. या फरिश्त्या (ईशदूत) च्या मार्फतीने प्रेषित सल्ल. यांच्यापर्यंत पोहोचत होता. याच माध्यमातून संपूर्ण कुरआन अवतरित झाला. अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यातील या संपर्क व्यवस्थेबद्दल मराठी वाचकांसाठी फारसी माहिती उपलब्ध नाही. या विशेषांकाच्या माध्यमातून ती पुरवावी यासाठीचा हा लेखन प्रपंच. 

पहिली वही येण्यापूर्वीची स्थिती

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म 22 एप्रिल 570 रोजी झाला. त्यांच्या जन्माची असामान्य घटना जगाच्या उद्धारासाठी ईश्वरीय योजने (मिशन)चा एक भाग होती. वयाच्या 40 व्या वर्षी सर्वप्रथम त्यांच्यावर वही नाजील (अवतरित) झाली. परंतु तिच्या अवतरणाची पूर्वची तयारी म्हणून ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची 40 वर्षापर्यंत विशेष काळजी घेतली होती. 

त्यावेळी मक्का शहरामध्ये सर्वत्र मूर्तीपूजा प्रचलित होती. चोहिकडे अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि विश्वासघातकीपणाचे वातावरण पसरलेले होते. अशा दुषित वातावरणामध्ये सुद्धा मुहम्मद सल्ल. यांच्या व्यक्तीमत्वामध्ये वाईट गोष्टींचा लवलेशही नव्हता, ही त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा होती. त्यांना मूर्तीपूजेमध्ये  काडीचे आकर्षण नव्हते, ते अनैतिक नव्हते, ते भ्रष्ट नव्हते, उलट मक्कामध्ये सर्वात जास्त नितीमत्तेचे धनी होते. ते एवढे विश्वासू होते की, मक्कावासीय त्यांना सादिक (खरा) आणि अमीन (अमानतदार) म्हणून ओळखत. म्नका शहरातील लोकांना शेती येत नव्हती ते व्यापारी वृत्तीच होते. व्यापारासाठी त्यांना   वारंवार लांबच्या प्रवासात जाण्याचा योग येई, तेव्हा ते आपल्या मौल्यवान वस्तू अमानत म्हणून मुहम्मद सल्ल. यांच्याकडे ठेवत. प्रेषितत्व मिळण्यापूर्वी सुद्धा त्यांची विश्वासर्हता मक्का शहरामध्ये सर्वात जास्त होती. जेव्हा ते अमानती ठेऊन जात तेव्हा मुहम्मद सल्ल. त्या जसच्या तशा जतन करून ठेवत व परत आल्यावर ज्यांच्या त्यांना परत करत. त्यात काडीचा बदल होत नसे. 

मक्का शहरामध्ये चोहीबाजूने वाईट गोष्टींचे थैमान चालत असतांना सुद्धा मुहम्मद सल्ल. यांना कधीच त्याचे आकर्षण वाटले नाही. बालपणी फक्त दोन वेळेस त्यांना ’किस्सा गो’ (मनाने गोष्टी रंगऊन सांगणाऱ्यां) चे किस्से ऐकण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत शेळ्या चारणाऱ्या मुलाकडे आपल्या शेळ्या ठेऊन, ’किस्से’ ऐकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा त्यांना झोप लागली व जाता आले नाही. ही ईश्वरीय व्यवस्था होती. याबद्दल मुहम्मद सल्ल. वाईट गोष्टी, रूढी आणि परंपरा यांची त्यांना प्रचंड चीढ होती. पण त्या वाईट परंपरा मोडून नवीन चांगल्या परंपरा कशा निर्माण कराव्यात या संबंधी त्यांना काहीच माहित नव्हते. चांगले म्हणजे नेमके काय? हे माहित नव्हते. हलाल काय? हराम काय? या संबंधी सुद्धा त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. म्हणून आपसुकच त्यांच्या मनामध्ये यासंबंधीचे चिंतन सुरू झाले. त्यांना तनहाई (एकटेपणा) आवडू लागला म्हणून ते ’सत्तू’ (विशिष्ट प्रकारचे भाजलेले पीठ) आणि पिण्याचे पाणी घेऊन मक्कापासून दोन मैलावर उंच पहाडावर असलेल्या एका गुहेमध्ये जाऊन जिचे नाव,’ गारे हिरा’ होते तिथे एकटे बसू लागले. चांगल्या गोष्टीबद्दल चिंतन करू लागले. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेले हे बदल सुद्धा ईश्वरीय योजनेचाच एक भाग होता. त्यांच्या मार्फतीने ईश्वराला जगाची दिशा बदलावयाची होती. वाईट मार्गावरून जगाला चांगल्या मार्गावर आणावयाचे होते. म्हणून मुहम्मद सल्ल. यांना असे एकटे पाडण्यात आले. मक्काच्या धकाधकीच्या दिनचर्येपासून लांब जावून गारे हिराच्या कुशीत एकट्याने शांत बसण्याची आवड त्यांच्यात निर्माण करण्यात आली. 

वहीच्या प्रत्यक्ष अवतरणाचा सिलसिला

वयाची 40 वर्षे पूर्ण होताच त्यांच्या व्यक्तीमत्वात एक क्रांतीकारक बदल झाला. त्यांना खरी स्वप्ने पडू लागली. ते रात्री स्वप्नात जे पाहत दिवसा अगदी तशाच घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडू लागल्या. अशाच अवस्थेत सहा महिने सरले. असे म्हटले जाते की अगाऊ, खरी स्वप्ने फक्त प्रेषितांनाच पडतात व हा प्रेषितत्वाचा 46 वा भाग असतो. एव्हाना हिरामध्ये चिंतन करत तीन वर्षे संपली होती. अशातच रमजानच्या 21 व्या रात्री म्हणजे 10 ऑगस्ट 610 च्या रात्री ज्यावेळी त्यांचे वय 40 वर्षे, 6 महिने आणि 12 दिवस होते, अचानक ईशदूत जिब्रईल अलै. सलाम गारे हिरामध्ये प्रकट झाले. जिब्रईल अलै. यांच्या अशा अचानक आगमनाने मुहम्मद सल्ल. गडबडून गेले. जिब्राईल अलै. यांच्या आगमनाबरोबर गारे हिरा उज्ज्वल प्रकाशाने उजळून निघाली. इकडे मुहम्मद सल्ल. घाबरलेले होते, तिकडे जिब्राईल आत्मविश्वासाने पावले टाकत पुढ्यात येऊन उभे राहिले व म्हणाले, ’वाचा!’ तेव्हा प्रेषित उत्तरले मला वाचता येत नाही. जिब्राईल अलै. यांनी पुन्हा दोन वेळा, ’वाचा!’ असे म्हटले. मुहम्मद सल्ल. यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. तेव्हा जिब्राईल अलै. यांनी मुहम्मद सल्ल. यांना तीन वेळा करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी जबरदस्त होती की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी नंतर या भेटीचे वर्णन करताना सहाबा रजि. समोर सांगितले होते की, त्यांच्या मिठीने माझ्या शरिरातील जणू सर्व शक्तीच संपून गेली होती. 

तिसऱ्या वेळा वाचा म्हटल्यानंतर मिठी सोडल्यावर जिब्राईल अलै. यांनी कुरआनच्या पहिल्या पाच आयती मुहम्मद सल्ल. यांच्या समोर वाचल्या आणि त्यांना त्या आयातींचे पठण करण्यास सांगितले. त्या आयाती पुढीलप्रमाणे होत, ‘इक़रा बिस्मी रब्बिकलजी खलक-खलकल इन्सान मिन अलक अकरऊ व रब्बकल अकरमू, अल्लजी अल्लम बिल-अ-कलम, अल्लमल इन्सान मआलमू याअलम’ (वाचा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने! ज्याने जन्माला घातले मानवाला मांसाच्या तुकड्यापासून. वाचा! तुमचा पालनहार अत्यंत उदार आहे, त्याने लेखनीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जानत नव्हता.) (संदर्भ : सुरे अल-अलक़ आयतक्र. 1 ते 5.).

वरील पाच आयातींचा संदेश देऊन जिब्राईल अलै. अंतर्धान पावले. तेव्हा मुहम्मद सल्ल. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत घरी परतले. त्यांचे शरीर थरथरत होते. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. घरी येताच त्यांनी आपल्या पत्नी हजरत खतीजा यांना सांगितले की, ’’मला चादरीने पांघरून टाका’’ चादर पांघरून काहीवेळा शांत बसल्यानंतर ते स्थिरावले. त्यानंतर त्यांनी हजरत खतीजा रजि. यांना सर्व घटनाक्रम सांगितला व म्हणाले की, ’या घटनेमुळे मला काय झालंय कळत नाहीये. मला माझ्या जीवाची भीती वाटतेय.’’ त्यावर खतीजा रजि. उत्तरल्या, ’’कदापि नाही! आपल्या जीवाला काहीच धोका होणार नाही. आपण लोकांवर दया दाखविता, अडल्या नडल्यांच्या कामी येता, गरीबांची मदत करता, पाहुण्यांचे स्वागत व आदराआतिथ्य करता, सत्यावर असलेल्या प्रत्येकाची साथ देता, तेव्हा ईश्वर तुम्हाला कदापि धोका होऊ देणार नाही.’’ 

हजरत खतीजा रजि. यांच्या या बोलण्याने मुहम्मद सल्ल. यांना थोडा धीर आला. नंतर हजरत खतीजा रजि. यांनी मुहम्मद सल्ल. यांना आपले चुलतभाऊ ’वरका बिन नौफेल बिन असद बिन अब्दुल उज्जा’ यांचेकडे घेऊन गेल्या. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता, त्यांना इब्रानी भाषा येत होती, ते बायबल हाताने लिहीत, त्यावेळी ते वृद्ध आणि दृष्टीविहीन झाले होते. त्यांनी मुहम्मद सल्ल. यांच्या मुखातून सारा वृत्तांत ऐकला आणि आश्चर्याने ओरडले. ’’अरे ! हा तर तोच ईशदूत आहे ज्याने मुसा अलै. (मोझेस)कडे ईश्वराचा संदेश आणला होता. ओह! कदाचित मी आज सुदृढ असतो किंवा त्या दिवसापर्यंत जीवंत राहू शकलो असतो ज्या दिवशी तुमचे लोक तुम्हाला मक्कामधून घालवून टाकतील तर मी तुमची खूप मदत केली असती’’ यावर प्रेषित सल्ल. यांनी चकित होऊन विचारले की, ’’अच्छा! तर मला आमीन आणि सादीक म्हणणारे माझेच लोक मला मक्कातून काढून टाकतील?’’ तेव्हा वरका बिन नौफेल उत्तरले, ’होय! ईश्वराचा हा संदेश ज्यांनी-ज्यांनी आणला त्यांना-त्यांना त्यांच्याच वंशाच्या लोकांनी शत्रुत्व करून आपल्यातून काढून टाकलेले आहे.’’ 

तबरी आणि इब्ने हश्शाम या इस्लामी पंडितांनी असे नमूद केलेले आहे की, पाच आयातीच्या या अवतरणानंतर घरी परतल्यावर वरका बिन नौफेल यांची भेट घेतल्यानंतर मुहम्मद सल्ल. परत गारे हिरामध्ये जावून बसले. त्यांच्या मनामध्ये नाना-विचार येत होते. पुढे त्यांनी या संबंधी सहाबा रजि. यांच्याशी बोलताना या घटनेसंबंधी असे म्हटले होते की, ’’ अल्लाहने जगामध्ये जेवढे लोक निर्माण केले त्यातील शायर (कवी) आणि पागल (वेडा) हे लोक मला अत्यंत नापसंत होते. इतके की मी त्यांच्याकडे पाहत सुद्धा नसे. परंतु वहीच्या अवतरणानंतर मी माझ्याशीच बोललो की मी त्यांच्यासारखाच आहे की काय? एका दिवशी मी पहाडाच्या टोकाकडे जात होतो, तेव्हा माझ्या मनात विचार आला पहाडावरून स्वतःला खाली झोकून देऊन आत्महत्या करावी व या दबावातून कायमची सुटका करून घ्यावी. हे विचार चालू असतानाच पहाडाच्या मध्यामध्ये मी जेव्हा पोहोचलो तेव्हा आकाशवाणी झाली की, ’’ हे मुहम्मद सल्ल. !  तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात आणि मी ईशदूत जिब्राईल आहे. तेव्हा मी आकाशाकडे पाहिले तेव्हा जिब्राईल अलै. एका माणसाच्या रूपाने आकाशात पाय रोवून उभे होते आणि म्हणत होते. ते पुन्हा म्हणाले, ’’ ऐ मुहम्मद सल्ल.! अल्लाहने प्रेषित म्हणून तुमची निवड केलेली आहे.’’तेव्हा मी एकाच ठिकाणी जड अवस्थेत उभा होतो. न मला एक पाऊल पुढे टाकता येत होते ना मागे घेता येत होते. परंतु मी माझे डोके वर करून आकाशाकडे जिब्राईल अलै. यांच्याकडे व त्यांच्या आजूबाजूला रोखून पाहत होतो. सर्वत्र मला जिब्राईलच दिसत होते. त्यांच्याकडे पाहता-पाहता मी इतका अभिभूत झालो होतो की माझ्या मनातील आत्महत्येचा विचार कधी निघून गेला हे मलाच कळाले नाही. मी निश्चल उभा होतो. शेवटी जिब्राईल अलै. अंतर्धान पावले आणि मी माझ्या घराकडे परत आलो व ह. खतीजा रजि. यांच्या जवळ बसलो. तेव्हा त्यांनी विचारले की, ’’आपण कोठे होतात? मी सेवकाला मक्का शहरामध्ये पाठवून सगळीकडे शोध घेतला.’’ त्यावर मुहम्मद सल्ल. यांनी आकाशात जिब्राईल अलै. यांना पाहिल्याची सर्व घटना सांगितली. तेव्हा हजरत खतीजा रजि. आनंदाने उद्गारल्या,’’ हे चुलत्याचे पुत्र ! आपण आनंदी व्हा आणि दृढ रहा. त्या ईश्वराची शपथ ज्याच्या ताब्यात माझा जीव आहे, मला आशा आहे की आपण एक उत्तम प्रेषित म्हणून आपली कामगिरी बजावाल. त्यानंतर त्यांनी परत वरका बिन नौफेलकडे जाऊन हा घटनाक्रम सुद्धा सांगितला. तेव्हा ते उद्गारले,’’ हे खतीजा ! त्या ईश्वराची शपथ ज्याच्या हातात वरकाचा जीव आहे. मुहम्मद सल्ल. कडे तोच ईशदूत पुन्हा आलेला आहे जो हजरत मुसा अलै. कडे वारंवार येत होता आणि त्याने मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित्वाची शुभवार्ता दिलेली आहे’’ हजरत खतीजा रजि. यांनी घरी येऊन वरका बिन नौफेलशी झालेला वार्तालाप मुहम्मद सल्ल. यांच्याशी कथन केला. त्यानंतर काही अवधी लोटल्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतः वरकाशी भेट घेऊन या घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. तेव्हा त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की, तुम्हाला महान प्रेषित म्हणून ईश्वराने निवडलेले आहे. पुन्हा आलेला ईशदूत हा जिब्राईलच होता. यानंतर काही दिवस जिब्राईल अलै. येण्याचा क्रम बंद झाला. कुठलीही वही अवतरित झाली नाही. त्यामुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. दुःखी होते आणि अनेकवेळा त्या उंच पहाडावर जात होते. त्यांच्या मनात पुन्हा आत्महत्येचे विचार घोळत होते. एक दिवस स्वतःला पहाडावरून झोकून देण्याचा पक्का विचार करून ते पहाडावर पोहोचले तेव्हा जिब्राईल अलै. पुन्हा अवतरित झाले आणि म्हणाले, ’’हे मुहम्मद सल्ल. आपणच खरे रसूल आहात.’’ जिब्राईलच्या भेटीमुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मनाला थोडी शांती लाभली. 

हाफिज इब्ने हजर यांनी म्हटलेले आहे की, ’’वही येण्याचा सिलसिला यासाठी थांबविण्यात आला होता की, प्रेषित सल्ल. यांच्या जीवाला थोडा आराम मिळावा आणि चित्त स्थीर व्हावे. जेव्हा ते स्थिर झाले तेव्हा पुन्हा वही येण्याचा सिलसिला सुरू झाला व दूसरी आयत जी नाजिल झाली ती ’’या अय्युहल मुदस्सीर...’’ हे पांघरून ओढून पहूडणाऱ्या उठा आणि खबरदार करा, आणि पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा आणि आपले कपडे स्वच्छ ठेवा आणि अपवित्रतेपासून दूर रहा आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा जेव्हा प्रलयाच्या दिवशी मोठा आवाज केला जाईल तो दिवस फारच कठीण असेल, अश्रद्धावानांसाठी सोपा असणार नाही.  वगैरे वगैरे...’’ यानंतर वही येण्याच्या प्रक्रियेमध्ये गती आली आणि जगाला चांगले काय? वाईट काय? हराम काय? हलाल काय? इत्यादी संबंधी मार्गदर्शन करण्यात आले व हळूहळू परिपूर्ण इस्लामी जीवन शैलीचा परिचय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने जगाला करून देण्यात आला. ज्यात शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, युद्धनिती, कायदा, न्यायशास्त्र, भौतिकशास्त्र आणि या सर्व शास्त्रांचा उपयोग करण्याची विधी शिकविली गेली. थोडक्यात यशस्वी जीवन जगण्यासाठी माणसाला ज्या-ज्या ज्ञानाची गरज आहे ते-ते ज्ञान अवतरित करण्यात आले अणि या सर्व ज्ञानाचा / शास्त्रांचा पाया नैतिकतेवर ठेवण्याचे व अनैतिकेला नापसंत करण्याचे शिक्षण देण्यात आले आणि वयाच्या 63 व्या वर्षी ज्या तिथीला त्यांचा जन्म झाला होता त्याच तिथीला त्यांना पर्दा फरमाविण्याचा आदेश झाला. 

एकंदरित जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या ज्ञान मिळविण्याच्या विधींपेक्षा श्रेष्ठ विधी वहीद्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो, ज्ञान पोहोचविणारा ईशदूत तर ज्याला ज्ञान प्राप्त झाले तो जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती प्रेषित असतो. आणि शेवटचे प्रेषित म्हणून द मोस्ट ट्रस्टेड मॅन ऑफ द वर्ल्ड असे ज्यांना म्हटले जाते व अल्लाहने स्वतः ज्यांच्याबद्दल असे म्हटले आहे की, ’’हे पैगंबर (सल्ल.) ! आम्ही तुम्हाला संपूर्ण जगासाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (संदर्भ : सुरे अम्बीया आयत क्र. 107). तसेच  ज्यांचा समावेश मायकेल एच. हार्ट आपल्या ’द हंड्रेड मोस्ट इन्फ्लुयन्शल पर्सन्स इन हिस्ट्री’ मध्ये प्रथम स्थानावर करतो, ते मुहम्मद मुस्तफा सल्ल. असतात तेव्हा त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या शिकवणीवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. थोडक्यात वहींचा समुच्चय असलेले कुरआन हे किती कठीण कष्टाअंती प्रेषित मुहम्मद यांनी जगाला दिले या गोष्टीचा आता वाचकांना अंदाज आलाच असेल. कुरआनसारखा परिपूर्ण ग्रंथ मानवाला दिल्याबद्दल ईश्वराचे व अपरिमित कष्ट सहन करून ते आमच्यापर्यंत पोहोचविले, याबद्दल मुहम्मद सल्ल. यांचे कोटी-कोटी आभार.



- एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget