Latest Post


प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आणि हाताने मुस्लिम सुरक्षित आहेत ती व्यक्ती मुस्लिम आहे. म्हणजे एक मुस्लिम कुणाला वाईट बोलत नसेल आणि कुणाला शारीरिक त्रास देत नसेल तर अशी व्यक्ती मुस्लिम आहे.

ह. अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात, एका व्यक्तीने प्रेषितांकडे इस्लामच्या बाबतीत विचारणा केली असता प्रेषित (स.) म्हणाले, ‘तुम्ही ज्या लोकांना ओळखता आणि ज्यांच्याशी तुमची ओळख नसेल तर अशांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हा उच्चतम इस्लाम आहे.’

ह. हुरैरा यांनी म्हटले आहे की रात्री रस्ता दिसण्यासाठी जसे गावात, शहरांमध्ये प्रकाशाची सोय करण्यासाठी लाईटचे खांब असतात. तसेच इस्लामची वाट दाखवण्यासाठी अल्लाहची भक्ती, त्याच्याबरोबर कुणाला भागीदार न जोडणे, नियमित नमाज अदा करणे, जकात देणे, रोजे ठेणे या सर्व गोष्टी इस्लामचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाशाचे दिवे आहेत. याचबरोबर भल्या गोष्टी लोकांना सांगत राहाणे, वाईटापासून त्यांना रोखणे. आदम (अ.) यांच्या सतती (सबंध मानवजातीतील लोकांना) सलाम करणे, घरात गेल्यावर घरच्या लोकांना सलाम करणे हे सर्व इस्लामचे दीपस्तंभ आहेत. मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा बंधू आहे. एकमेकांनी दुसऱ्यावर अत्याचार करू नये. त्याला अपमानित करू नये. जर कुणी दुसऱ्या मुस्लिमाचा अपमान करत असेल तकर त्याला वाईट समजण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. प्रत्येक मुस्लिमावर दुसऱ्या मुस्लिमाचे रक्त सांडणे, त्याची मालमत्ता हडप करणे आणि त्याची मानहानी करणे निषिद्ध आहे.

ह. उमरो बिन अतबा (र.) म्हणतात की मी प्रेषितांना विचारले, इस्लाम म्हणजे काय? त्यांनी उत्तर दिले, ‘सभ्य बोलणे आणि लोकांना जेवू घालणे.’ मी परत विचारले, ईमान (श्रद्धा) काय आहे? ‘संयम ठेवणे आणि मनाची उदारता.’ कोणता इस्लाम उच्चतम आहे? मी पुन्हा विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘ज्याच्या बोलण्यापासून आणि हातापासून लोक सुरक्षित असतील. तसेच उदार मनाने लोकांशी संभाषण करणे.’ (हदीस : मुस्नद अहमद)

सर्वांत श्रेष्ठ मुस्लिम तो जो चारित्र्यसंपन्न असेल. प्रेषित म्हणतात, सर्वश्रेष्ठ ईमान (श्रद्धा) ही आहे की तुम्ही जिथे कुठे असाल अल्लाह तुमच्या संगे आहे याची जाणीव ठेवणे होय.

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा असा उच्चा केला की ‘अल्लाहची शपथ, ती व्यक्ती श्रद्धावंत होऊच शकत नाही ज्याच्या वाईट वृत्ती आणि इजा पोहोचण्यापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल.’



1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही.

ती खूप आनंदात होती. तिला बाबांसोबत बाहेर जायचे होते ना. आईने तिला छान तयार केले होते. बाबांचा हात धरून बाहेर पडताना तिला व तिच्या आईला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार? कदाचित थोडाही संशय आला असता तर तिच्या आईने तिला बाबांसोबत जावू दिले नसते. बाबांसोबत चालता-चालता ती एका सुनसान रानात आली होती. तेथे बाबांनी माती खणायला सुरुवात केली. ते खणत असताना जी माती बाबांच्या कपड्यांवर, तोंडवर लागत होती ते तिला बघवत नव्हते. आपल्या लहानशा हातांनी ती बाबांच्या अंगावरची माती झटकत, तोंडावर लागलेली माती आपल्या चिमुकल्या हातांनी साफ करत. हे करत असताना तिचे प्रश्न चालू होते की बाबा आपण कोठे आलो आहोत ? आपल्याला तर फिरायला जायचे होते ना? ही मध्येच आपण काय काम काढलात? बाबा ! हा खड्डा कशासाठी? बाबा लवकर चला ना कधी जायचंय? पण बाबा काही न सांगता आपल्या कामातच मग्न होते. खड्डा पूर्ण करून झाल्यावर त्यांनी त्या चिमुकलीला खड्ड्याच्या कडेला उभी करून त्यात तिला ढकलून दिले. ती ओरडत होती परंतु, बाबा तिच्या अंगावर सरसर माती टाकत होता, ती रडत होती, ओरडत होती बाबा हे काय करता, मला वाचवा ना!  बाबा असे करू नका म्हणत तिने आपले प्राण सोडले. अशा सत्य घटना प्रेषित सल्ल. जगात येण्याच्या पूर्वी सतत होत असत. 

स्वतःच्या मुलीला खड्डा खणून जिवंत पुरणे किती ही क्रूरता? त्या माणसाला दया नाही का आली? एवढे निर्दयी कसे होऊ शकते कोणी? ही सत्य घटना त्या इसमाने येऊन प्रेषित मुहम्मद  सल्ल. यांना सांगितली. तेव्हा प्रेषित मुहम्मद सलम् यांच्या डोळ्यांत अश्रू आले. आपल्यालाही डोळ्यांत आले असेल अश्रू नसेल आले तर आणण्याचा प्रयत्न करा, तरी येत नसतील तर रडल्यासारखा चेहरा करून आपले संवेदनशीलतेचे पुरावा द्या, स्त्री जातीसाठी. स्त्रीची अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. काही कबिले आपल्या मुलींना जिवंत पुरून टाकायचे तर काही प्रसूतीच्या वेळेस एक खड्डा तयार ठेवायचे. मुलगी जन्मल्याबरोबरच तिला पुरून टाकायचे.  आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे खंडा खाण्याची गरज नाही नऊ महिने वाट पहायची सुद्धा गरज नाही. चौथा महिना झाला की तपासणी करून स्त्री भ्रून हत्या करण्यात येते.  यावर कायदेशीर प्रतिबंध असले तरी हे कुकर्म थांबत नाही. केवळ आपल्या भारतातच दरवर्षी पाच लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात आणि जगात याबाबतीत भारत सर्वप्रथम येतो. लग्नाच्यावेळी भली मोठी भीक (हुंडापद्धती) मुळे लोक लेकीला ओझे समजतात व या जगात येण्याचा त्यांचा अधिकार देत नाहीत. भारताच्या मागे चीन आणि पाकिस्तान चा नंबर येतो. भारतातही आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. त्यातही परळी वैजनाथ ते गर्भपात केंद्राचे गाव म्हणून कुख्यात आहे. 

महाराष्ट्रातील सहा वर्षाखालील बालिकांचे दरहजारी प्रमाण 913 मुली असे होते. 2001 साली हे प्रमाण 883 पर्यंत घसरले. गेल्या दहा वर्षात 4 लाख 68 हजार 480 स्त्री भ्रूणहत्या झाल्याचे नमूद केले आहे. 1994 मध्ये गर्भलिंगनिदान करणे हे फौजदारी कृत्य म्हणून घोषित केले गेले. व सोनोग्राफी करतांना लिंग सांगणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी तरतूद केली गेली. पीसीपीएनडीटी अ‍ॅ्नट गर्भधारणापूर्वी व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध करणारा कायदा 1994 असे म्हणतात. केंद्र सरकारचा निर्णय 1 जानेवारी 1996 पासून हा कायदा अस्तित्वात आला तरी आजही स्त्रीला अशक्त तुच्छ समजलं जातं. जावईचे नखरे उचलणे पसंत करत नाही. अरबमध्ये रोजच्या युद्धामध्ये लेकिला कैदी बनविले जायचे. स्त्रीची सुरक्षा करावी लागते आणि ती सुरक्षित नव्हती म्हणून तिला पसंत नाही करायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार बंद झाला. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’ आणि स्मरण करा ती वेळ जेव्हा जीवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली.’’ (सुरे अलत्नवीर आयत क्र.9). एकीकडे मुलीसोबत अत्याचार करण्यास नरकाचे यातनामय जीवन तर दूसरीकडे त्या लोकांना आनंदाची वार्ता देण्यात आली ज्यांनी मुलीवर अत्याचार न करता सद्व्यवहार केला आणि मुला-मुली दोघांनाही समान वागणूक दिली. त्यांच्याशी वागतांना कुठलाही भेदभाव केला नाही किंवा करत नाही. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास रजि. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे कथन कथित करतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले, ज्या माणसाला मुलगी झाली त्याने न तिला जीवंत पुरावे न गाडावे न तिला अपमानास्पद वागणूक द्यावी न तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे तेव्हा ईश्वर त्याला जन्नतमध्ये दाखल करेल. (अबु दाऊद)

म्हणजेच 1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही. इस्लाममध्ये मुलीच्या पालनपोषणास विशेष प्रोत्साहन दिले आहे व या कामाला एक पवित्र कर्तव्य घोषित केले आहे. बुखारी व मुस्लिमच्या हदीसमध्ये आलेले आहे की, कन्या देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमाविले आणि त्या माणसाने आपल्या मुलीशी सद्व्यवहार केला तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार त्याच्या नरकाग्नीपासून बचावाचे साधन होईल.’’ जो माणूस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरूण होईपर्यंत करील निवाड्याच्या दिवशी मी आणि तो असे असतील हे सांगतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली दोन बोटे जोडली. (मुस्लिम)

ज्ञान नसेल तर जगून काय उपयोग

स्त्री म्हणजे निम्मी मनुष्य जात. मानव समाजाचा अर्धा वाटा तिचाच. स्त्री ज्ञानी तर पुढची पीढिही ज्ञानी. म्हणून इस्लाममध्ये स्त्री शिक्षणावरही जोर देण्यात येतो. स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी महिलांना दीन आणि दुनिया दोघांचेही ज्ञान शिकण्यास प्रवृत्त केले. ज्ञानाशिवाय, आचरण अशक्य असते. म्हणून धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे स्त्री पुरूष दोघांवरही अनिवार्य आहे. ज्ञान प्राप्त करणे स्त्रीचा कायदेशीर हक्क आहे. स्त्री जर अज्ञानी असेल तर लग्नाआधी तिच्या पित्याचे व लग्नानंतर तिच्या पतीचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी तिला ज्ञान द्यावे. अथवा अशी व्यवस्था करावी की तिला शिक्षण मिळावे. नैतिक मर्यादांचे पालन करून शिक्षण मिळविण्यासाठी ती घराबाहेरही पडू शकते आणि तिच्यावर कोणी बंधनं लादू शकत नाही. प्रेषित सल्ल. यांच्या काळात एकीकडे मुलांना कुरआन तोंडपाठ असायचे तर दूसरीकडे घुडस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजीतही त्या तज्ञ असायच्या. एवढेच नव्हे तर वैद्यकीय ज्ञानही मुलींना अवगत होते. इलिझाबेथ ब्लॅकवेल ह्या 1847 मध्ये जगातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आनंदीबाई जोशी कल्याण या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून 1886 मध्ये पुढे आल्या. हजरत आएशा रजि. यांच्या विवाहावर आक्षेप घेणाऱ्यांना माहीत असायला हवे की, आनंदीबाईचा विवाह ही वयाच्या 9 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे गोपाळरावांशी झाला होता. असो त्या एकच वर्षे डॉ्नटर म्हणून जगल्या. 1887 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

रूफैदा अल असलमिया या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉ्नटर. खरं तर जगातल्याच पहिल्या महिला डॉ्नटर म्हटले तरी बरोबर होईल. कारण त्या आजपासून 1400 वर्षापासून मस्जिदे नबवीजवळ आपली वैद्यकीय सेवा देत. शिक्षणाच्या क्षेत्रात माननीय आएशा रजि. माननीय सफिया रजि., माननीय आसमा बिन बिन्ते अबुबकर रजि., माननीय फातेचा बिन कैस रजि., माननीय उम्मे हबीबा रजि., माननीय खौला रजि. यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

शिक्षणानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो स्त्रिचा विवाह. अनादी काळापासून स्त्रीला विवाहाच्या बाबतीत तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिच्या परिवारातील आई-वडिल आणि बुजूर्ग मंडळी ज्या व्यक्तीबरोबर विवाह करवून देतील निमुटपणे तिला तो निर्णय स्वीकारावा लागेल. त्याविरूद्ध एक शब्दही बोलण्यास तिला अधिकार नव्हता. कोणत्याही मुलीचे आईवडिल तिच्यापेक्षा जास्त अनुभवी असतात आणि मुलीचे शत्रू नसतात आणि शुभचिंतक असतात. मुलींपेक्षा मुलीच्या चांगल्या-वाईटाची त्यांना जास्त काळजी असते. म्हणून तिच्या चांगल्या भविष्याचे निर्णय तेच घेऊ शकतात ही धारणा काही प्रमाणात सत्य असली तरी ही गोष्ट कधीच योग्य नाही की स्त्रीवर तिच्या आवडीविरूद्ध विवाहाचा निर्णय थोपवावा. इस्लाममध्ये विवाहाच्या बाबतीत पालकाच्या मर्जीला महत्व जरूर दिलेले आहे परंतु, विवाहासारख्या महत्त्वाच्या घटनेमध्ये मुलींच्या पसंतीचीही नोंद घेण्यास      -(उर्वरित आतील पान 7 वर)

समाजाला बाध्य केलेले आहे. माननीय अबु हुरैरा रजि. प्रेषितांचे कथन करतात की, त्यांनी एकवेळेस सांगितले, ’’ विधवा आणि तलाकपीढित स्त्रीचा विवाह त्यांचे मत माहित होईपर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगीशिवाय होवू शकत नाही. (बुखारी व मुस्लिम). यावर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सोबती (रजि.) यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तीची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, तीचे मौन धारण करणे हीच तिची परवानगी समजण्यात येईल. जर एखाद्या स्त्रीच्या पालकाने तिचा विवाह केला व त्यास स्त्रीने या विवाहास मान्यता दिली नाही तर हा विवाह रद्दबातल ठरणार. माननीय खन्सा (रजि.) यांचा विवाह त्यांच्या मर्जीविरूद्ध वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी तो रद्दबातल ठरविला.

आपल्याला कोणी भेट वस्तू दिली तर काय होते? खूप आनंद होतो आणि भेट देणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात आपुलकी निर्माण होते. मग आपणही त्याला काही भेट द्यावी, असे वाटते. महेर एक सुंदर भेट आहे. जी पती आपल्या पत्नीला देतो. नवीन जीवनाची सुरूवात या प्रकारे एका सुंदर पद्धतीने होते. 

’’ आणि स्त्रीयांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः  स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता’’ महेर हा केवळ स्त्रीचाच अधिकार आहे. शरियतद्वारे महेर किती असावे याची काही मर्यादा निश्चित केलेली नाही. ती माणसाच्या आर्थीक कुवतीच्या प्रमाणात कमी जास्त असू शकते. इस्लामने महिलांवर पैसा कमाविण्याची जबाबदारी अजिबात टाकली नाही. लग्नाआधी पिता व लग्नानंतर पती यांच्यावर तिच्या खर्चाची जबाबदारी टाकलेली आहे. घराचे काम करणे बंधनकारक नाही. उलट जर कोणती स्त्री ते करत असेल तर तर हे तीचे कुटुंब प्रमुखावर उपकार समजण्यात येईल व तिलाही पुन्य मिळेल. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य व संपत्ती बाळगण्याचा अधिकार तिला आहे. आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क आहे. हा अधिकार इस्लामने 1443 वर्षापूर्वी दिला. तर भारतात आपल्या घटनेद्वारे 1956 मध्ये तो महिलांना मिळाला. 

स्त्रीच्या अब्रूवर दोन प्रकारे हल्ले होतात. एक तिच्यावर व्याभीचाराचा आरोप लावून तिच्यावर मानसिक हल्ला केला जातो आणि दूसरे म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून शारीरिक अत्याचार दिला जातो. आपल्या देशात दररोज साधारणपणे 77 बलात्काराच्या घटना होतात. एखाद्या स्त्रीवर व्याभीचाराचा आरोप सिद्ध झाला तर तिला 80 फटक्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. जबरी लैंगिक अत्याचार केल्यास बलात्काराला तो अविवाहित असेल तर 100 फटके व विवाहित असेल तर रजम म्हणजे दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा शरियतने दिलेली आहे. जी शिक्षा नैसर्गिक आहे. याचा अंदाज अनेक धर्मनिरपेक्ष लोकांनी याच शिक्षेची मागणी निर्भया, जैनब, डॉ. प्रियंका रेड्डी, आसिफा इत्यादींच्या वेळी केली होती. या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास बलात्काराचे प्रमाण निश्चित कमी होणार हे एक सत्य आहे. ज्या देशात या शिक्षेची अंमलबजावणी होते त्या देशाचे बलात्काराचे प्रमाण शुन्यवत आहे. प्रेषित सल्ल. यांच्या काळात तर एक महिला अंगभर सोन्याचे दागिने घालून प्रवास करीत होती. तेव्हा तिला जनावराव्यतिरिक्त कोणाची भीती नव्हती. 

प्रेषित सल्ल. यांचे स्त्री जातीवर खूप उपकार आहेत. त्यांना अल्लाहच्या आदेशावरून जे बदल समाजामध्ये घडवून आणले त्याचे दूसरे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच मिळणार नाही. 

घडस्फोटाला भयानक समजणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवे की, कोणत्याही दाम्पत्याच्या जीवनात अगदी शेवटच्या टोकाचा क्षण येतो. जेव्हा पती व पत्नीच्या स्वभावात अनुकूलता व समन्वय नसल्याने संसाराची गाडी चालविणे अवघड होते. दररोजच्या भांडणामुळे बळजबरीने एकत्र राहून जीवन नरकासारखे होते. तेव्हाच शरियतने घडस्फोटाची परवानगी दिली. जेणेकरून दोघांना वेगळे होवून नवीन जोडीदार निवडून शांतीने जगता यावे. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाबद्दल किती जरी लिहिले तरी मन भरत नाही एवढे त्यांचे उपकार आहेत. वाचकांनी त्यांच्या जीवनाबद्दल सखोल अभ्यास केल्याशिवाय, त्यांनी स्त्रीयांवर केलेले उपकार कळू शकत नाहीत. तरी माझी कळकळीची विनंती आहे की वाचकांनी प्रेषित सल्ल. यांच्या चरित्राचा खोल अभ्यास करावा. अल्लाह सर्व पुरूषांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून स्त्रीयांचे अधिकार देण्याची सद्बुद्धी देवो, आमीन. 

- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, प्रत्येक उगवणाऱ्या सू्र्यासोबतच तुमच्यावर दानधर्म करणे अनिवार्य होते. दोन माणसांमध्ये न्याय करणे, एखाद्याला गाडीत स्वार होताना मदतीचा हात देणे, त्यांचे सामान उचलून गाडीत ठेवणे, लोकांना भलाईच्या गोष्टी सांगणे ही सर्व जणू दानधर्माची कार्ये आहेत. तसेच नमाजसाठी मशिदीकडे जाणे. जाताना रस्त्यात कुणाला इजा होईल अशी वस्तू रस्त्यावर दिसल्यास ती बाजुला सारणे या सगळ्या गोष्टी दान करण्यासारख्या आहेत. कुणाला वाईट कृत्यापासून रोखणे हेदेखील दान केल्यासारखे आहे. (संदर्भ – अबु हुरैरा, बुखारी, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, कोणत्याही सत्कर्मास तुच्छ समजू नका. कुणाला रस्सीचा एक तुकडा दिला, एखादा खिळा दिला असेल, कुणाचे भांडे पाण्याने भरून दिले. आपल्या भावाशी आपुलकीने भेटणे किंवा त्यास नुसते जरी सलाम केला असेल तरी या सर्व गोष्टी सत्कर्म आहेत. प्रेषित नेकीची बरीच कार्ये आपल्या अनुयायींना सांगत असताना म्हणतात की तुमच्या हातून कसलेही सत्कर्म होत नसेल तर कमीतकमी कुणाला इजा पोहोचवू नका. असे करणेदेखील सत्कर्मच आहे. प्रेषितांना विचारण्यात आले की जर एखादा माणूस लोकांना लाजून एखाद्याच्या अंतिम यात्रेत सहभागी होत असेल तर त्याला मोबदला मिळणार का? प्रेषित म्हणाले, “त्यास दुप्पट मोबदला मिळेल. एक अंतिम यात्रेत सहभागी होण्याचा आणि दुसरा आपल्या गल्ली-मोहल्ल्यातील लोकांच्या भावनांचा विचार करून त्यात सहभागी झाल्याचा.”

नेकी ही आहे की अल्लाह, परलोक, पवित्र कुरआन, अल्लाहचे देवदूत आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा ठेवून आपल्या आवडीची संपत्ती आपल्या नातलगांना, गरजवंतांना, अनाथांना, प्रवाशांना आणि गुलामांना देणे. नमाज अदा करत राहाणे आणि जकात देणे, कुणाला वचन दिल्यास ते पूर्ण करणे ही सर्व नेकीची कर्मे आहेत. (संदर्भ – पवित्र कुरआन, २:१७७)



ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा नियम आहे. 

संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत.


जफर आदमी उसको न जानीएगा

हो वो कितना ही साहेबे फहम व जका

जिसे ऐश में यादे खुदा न रही 

जिसे तैश में खौफ-ए-खुदा न रहा

जकाल ’’मानवी गरजां’’मध्ये लोकांच्या ’इच्छा-आकांक्षा’ ही सामील झाल्याने लोकांचे आर्थिक वर्तन बिघडले आहे. यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या असून, अनेक लोकांना अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा जणू मॅनिआच झालेला आहे. त्यामुळे बाजारात कृत्रिम मागणी वाढते आहे. रात्रंदिवस जाहिरातींचा मारा करून अशी मागणी सातत्याने वाढत राहील, याची काळजी कार्पोरेट जगताकडून घेतली जात असल्यामुळे आदर्श आर्थिक वर्तन कसे असावे, यावर विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. 

संपत्ती गोळा करण्याची इच्छा 

मुफलिसी हिस-ए-लताफत को मिटा देती है

भूक आदाब के सांचे में ढल नहीं सकती

प्रत्येक माणसाला संपत्ती गोळा करण्याची नैसर्गिक इच्छा असते. त्यासाठी तो रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो. त्यातून प्राप्त केेलेल्या संपत्तीचा उपयोग करण्यासाठी तो स्वतंत्र असतो. यातूनच माणसाचे आर्थिक वर्तन ठरत असते. मात्र वर म्हटल्याप्रमाणे आधुनिक काळात, ’’गरज’’ या शब्दात चंगळवादी इच्छा आकांक्षांची सरमिसळ झाल्यामुळे बाजाराचे मागणी आणि पुरवठ्याचे गणित सातत्याने बिघडत आहे. श्रीमंत माणसे वाट्टेल ती किंमत देऊन त्यांच्या मनाला येईल त्या वस्तू मग गरज असो की नसो खरेदी करत असतात. त्यामुळे गरजेच्या अनेक वस्तू विनाकारण महाग होत जातात. याचा परिणाम कमी उत्पन्न गटातील लोकांवर होतो. त्यांच्यापर्यंत त्या वस्तूही पोहोचणे दुरापास्त होवून जातात ज्या जीवनावश्यक असतात. जी गत वस्तूंची तीच गत अत्यावश्यक सेवांची. उदा. शिक्षण किंवा आरोग्य सेवा. संपत्ती कमावण्यावर कुठलेही नैतिक बंधन नसल्याकारणाने व कायदेशीर बंधन झुगारण्याजोगे असल्याकारणाने अनेक लोक भ्रष्ट मार्गाने अमाप संपत्ती कमावतात व त्यातून दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा खरेदी करतात. साहजिकच मग या दोन्ही जीवनावश्यक सेवा कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या हाताबाहेर जातात आणि ’आहे-रे’ आणि ’नाही-रे’ या दोन सामाजिक गटातील दरी अधिकाधिक रूंद होत जाते. 

भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या विषमतेवर उपाय नाही. म्हणूनच जगात दिवसागणिक विषमता वाढत आहे. श्रीमंतांची डोळे दिपवणारी आर्थिक वर्तणूक पाहून गरीबांची मानसिक स्थिती  बिघडत आहे. त्यातूनच गुन्हेगारीचा जन्म होत आहे. म्हणूनच आज संघटितरित्या केली जाणारी गुन्हेगारी आधुनिक जगाची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. ’गन कल्चर’ वाढत आहे. माणसं किड्यामुंग्यासारखी मारली जात आहेत. नैतिकता रसातळाला जाऊन पोहोचली आहे. अमाप संपत्तीतून राजकीय पदे व प्रसंगी न्याय खरेदी करून स्वतःला मजबूत करण्यात श्रीमंतांना यश मिळत असल्याने लायक परंतु गरीब लोकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. 

आर्थिक वर्तणुकीचे इस्लामी नियम

भूक में इश्क की तहेजीब भी मिट जाती है

चाँद आकाश में थाली की तरह लगता है

नवश्रीमंतांच्या चमकदार चंगळवादी जीवन शैलीपासून  नैसर्गिकरित्या गरीबांना इर्ष्या होत असते. त्या इर्षेतून जागतिक स्तरावर गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक वर्तन बिघडल्या कारणाने सर्वत्र आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झालेले आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये यावर उपाय नाही. उलट हे आर्थिक वर्तन बिघडण्यासाठी हीच व्यवस्था कारणीभूत असल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. माणसाची आर्थिक वर्तणूक नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक व्यवस्था कुरआनमध्ये दिलेली आहे. परंतु  हा एवढा दुर्लक्षित विषय आहे की, बहुसंख्य मुस्लिम लोकांमध्ये  सुद्धा यासंबंधीची पुरेशी जागरूकता नाही. 

कुरआनच्या शिकवणींचा सार असा आहे की, पृथ्वीच नव्हे तर सर्व सौर मंडलाचा मालक ईश्वर आहे. त्यातील सर्व संपत्तीचा मालक ईश्वर आहे. माणसं जन्माला येतात आणि आपल्या ईश्वरदत्त कौशल्यातून त्या ईश्वरीय संपत्तीचा काही भाग हस्तगत करतात त्याचा वापर करतात व सर्व संपत्ती येथेच ठेवून मरून जातात. कुरआनने माणसाच्या संपत्ती कमावण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत व खर्च करण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत. हे प्रतिबंध, ’’हलाल आणि हराम’’ या सज्ञेच्या माध्यमातून जगाला परिचित आहेत. कुरआनमध्ये हराम गोष्टी कोणत्या आहेत याची यादीच दिलेली आहे. त्या वगळता बाकी सर्व गोष्टी हलाल आहेत. इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा हा पहिला नियम आहे. कुरआनमध्ये असे म्हटलेले आहे की, ’’आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले आणि तुमच्यासाठी तेथे जीवनसामुग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता.’’  (सुरे आराफ : आ.क्र.10)

या आयातीच्या शब्दरचनेवर गांभीर्याने विचार केला असता खालील गोष्टींचा बोध होतो. यात सुरूवातीलाच ईश्वराने मानवाला संबोधित करत म्हटलेले आहे की, आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले. याचा अर्थ मूळ अधिकार माणसाचे नसून ते ईश्वराने प्रदान केलेले आहेत. स्पष्ट आहे मुळात अधिकार ज्याने प्रदान केलेले आहेत त्याच्याच मर्जीप्रमाणे त्या अधिकारांचा वापर केला जावा. तसा तो केला जात नसेल तर यात माणसाचा कृतघ्नपणा दिसून येतो. म्हणून आयातीच्या दूसऱ्या भागामध्ये ईश्वर म्हणतो की आम्ही तुम्हाला अधिकार दिले पण तुम्ही लोक माझ्याप्रती कमी कृतज्ञ आहात. म्हणजे या ठिकाणी ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. फार महत्त्वाचे मत नोंदवितात ते खालीलप्रमाणे,

’’ इन्सान को दुनिया में जिंदगी बसर करने के लिए जिस हिदायत व रहेनुमाई की जरूरत है, अपनी और कायनात की हकीकत और अपने वजूद की गर्ज व गायत समझने के लिए जो इल्म उसे दरकार है, और अपने अख्लाक (चांगल्या सवयी), तहेजीब (सभ्यता), मुआशरत (सामाजिक) और तमद्दुन (संस्कृती) को सही बुनियादों पर कायम करने के लिए जिन उसूलों का वो मोहताज है, उन सबके लिए उसे सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन को अपना रहेनुमा तस्लीम करना चाहिए और सिर्फ उसी हिदायत की पैरवी (अनुसरण) इख्तीयार करनी चाहिए जो अल्लाहने अपने रसूलों के जरीये से भेजी है. अल्लाह को छोडकर किसी दूसरे रहेनुमा की तरफ हिदायत के लिए रूजू करना और अपने आपको उसके रहेनुमाई के हवाले कर देना इन्सान के लिए बुनियादी तौर पर एक गलत तरीकेकार है. जिस का नतीजा हमेशा तबाही के सूरत में निकला है और हमेशा तबाही की सूरत ही में निकलेगा.’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन : खंड 2, पान क्र . 7, अनुच्छेद क्र. 4).

या आयातीचा अर्थ असाही घेतला जाऊ शकतो की, जीवन जगण्यासाठी ईश्वराने मानवाला जे अधिकार आणि वस्तू प्रदान केलेले आहेत ही त्याची केवळ, ’’कृपा’’ आहे. म्हणून त्यांचा वापर आवश्यक तेवढा व न्याय पद्धतीने करावा, असे केल्यास कोणालाच कधीही कसल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. परंतु भ्रष्ट पद्धतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी जी पद्धत जागतिक स्तरावर रूढ झालेली आहे व भांडवलशाही ने त्या पद्धतीला वैधता प्रदान केेलेली आहे त्यातून माणसाचे आर्थिक वर्तन बिघडले असून, त्याची शिक्षा माणसाला या जीवनातही मिळणार व मरणोपरांतही मिळणाार एवढे नक्की. चुकीच्या सामाजिक आणि आर्थिक वर्तनातून जगामध्ये जी अव्यवस्था माजलेली आहे त्यामुळे, ’’नाही रे ची’’ जी हानी होत आहे तिची भरपाई संसाधनांचा दुरूपयोग करणाऱ्यांनाच करावी लागणार आहे. म्हणूनच आपण पाहतो भ्रष्ट मार्गाने अनेकजण गडगंज संपत्ती कमवूनही समाधानी व आरोग्यदायी जीवन जगताना दिसून येत नाहीत. उलट मृत्यूपरांत जीवनामध्ये सुद्धा त्यांना ईश्वरासमोर खजील व्हावे लागेल. तो त्रास वेगळाच. कारण ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा दूसरा नियम आहे. न्याय एक असा ईश्वरी गुण आहे ज्याला माणसाच्या प्रवृत्तीमध्येच ईश्वराने सामील केलेले आहे. म्हणूनच माणसाला न्याय आवडतो व अन्यायाची चीड येते. यावरूनच वाचकांच्या लक्षात एक गोष्ट येईल की जगात चुकीचे आर्थिक व सामाजिक वर्तन करून ज्यांनी संपत्तीच्या बळावर येथून कशीबशी सुटका जरी करून घेतली तरी मरणोपरांत त्यांची गाठ ईश्वराशी आहे, हे सत्य कोणालाच नाकारता येण्यासारखे नाही. कारण जीवनापेक्षा जास्त शास्वत सत्य मृत्यू आहे.

आर्थिक वर्तणुकीचा तीसरा सिद्धांत वैध मार्गाने संपत्ती कमाविणे आहे. हे प्रत्येकावर फर्ज (अनिवार्य) आहे. त्यामुळे योग्यता असूनही जर कोणी वैध मार्गाने काम न करता निरूद्देश जीवन जगत असेल तर तो ही ईश्वराच्या नजरेत गुन्हेगार आहे आणि आपल्या, ’’योग्यते’’चा दुरूपयोग करून भ्रष्ट पद्धतीने जीवन जगत असेल तर तो ही गुन्हेगार आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’ मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादाचा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त होईल.’’ (सुरे जुमआ : आयत नं. 10) 

या ईश्वरीय आदेशातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक अजानची आवाज झाल्याबरोबर मुस्लिमांनी आपल्या सर्व व्यावसायिक गतीविधी तात्काळ थांबवायला हव्यात व नमाजसाठी मस्जिदीकडे जावयास हवे. याचा अर्थ व्यावसाय करणे आवश्यक आहे मात्र नमाज सोडून व्यावसाय करणे प्रतिबंधित आहे. जरी यात शुक्रवारचया नमाजाचा विशेष उल्लेख आहे तरी अजान होताच व्यवसाय थांबविण्याचा हा आदेश सर्वच नमाजांसाठी लागू असल्याचे मत इस्लामी विद्वानांचे आहे. हा आर्थिक गतीविधींचा चौथा सिद्धांत आहे. आपल्या कुवतीप्रमाणे संपत्ती गोळा करण्यासाठी काम धंदा करणे, व्यावसाय करणे हे प्रत्येकावर अनिवार्य करण्यात आले आहे. याचा दूसरा अर्थ असा जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा त्याग करणे (संन्यास घेणे) हराम आहे. तसेच जीवनावश्यक संसाधने गोळा करण्यामध्ये कुचराई करणे हे सुद्धा ईश्वराला नापसंत आहे. म्हणून मुस्लिमांमधील एक वर्ग जो जीवनावश्यक आर्थिक गतिविधींपेक्षा धार्मिक गतिविधींनाच अधिक महत्त्व देतो. त्याचे वर्तनही या आयातीमध्ये नमूद ईश्वरीय आदेशाविरूद्ध आहे. थोडक्यात माणसाची आर्थिक वर्तणूक ही संतुलित असावी. आर्थिक संसाधने गोळा करताना ईश्वर आणि त्याच्या आदेशांची हर हाल जपणूक केली जावी. संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत. हा इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा पाचवा नियम आहे. थोडक्यात आर्थिक वर्तणुकीच्या ईश्वरीय नियमांचा परिचय देशबंधू तसेच बिगर इस्लामी जगाला करून देण्याची मुख्य जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे. दुर्दैवाने मुस्लिम समाजातील बहुतेकांचे स्वतःचेच आर्थिक वर्तन या नियमांउलट असल्याने एवढ्या सुंदर व्यवस्थेचा परिचय आज जगाला नाही. म्हणून ही योग्य वेळ आहे, आता मुस्लिमांनी आपल्या वर्तनात सुधारणा करून ईश्वराला अपेक्षित आर्थिक वर्तणुकीच्या नियमांचा सर्वांना परिचय करून द्यावा. त्याशिवाय, आर्थिक शिस्त राखली जाणार नाही व आर्थिक शोषण कमी होणार नाही. पर्यायाने ’नाही रे’ गटातील शोषण असेच सुरू राहील. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आमचे आर्थिक धोरण तुला आवडत असलेल्या नियमांप्रमाणे सुधारण्याची व जगाला त्याचा परिचय करून देण्याची संधी व शक्ती प्रदान कर.’ आमीन. 



ह. अनस (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की मित्र तीन प्रकारचे असतात. एक मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही कबरीपर्यंत पोहचेपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन.’’ दुसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही गरिबांना जे काही दिलं तेवढंच तुमचं आहे आणि जे तुम्ही कुणाला दिलं नाही, स्वतःसाठी राखून ठेवलं तर ते तुमचं नाही, तर ते तुमच्या वारसदारांचं आहे.’’ ह्या मित्राचं नाव ‘माल’ आहे. तिसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही जथे कुठे असाल कबरीमध्येदेखील मी तुमच्या बरोबर राहीन आणि जेव्हा तुम्ही कबरीतून बाहेर याल त्या वेळेस देखील मी तुमच्या बरोबर राहीन.’’ या तिसऱ्या मित्राचं नाव ‘कर्म’ आहे. माणूस हैरान होऊन म्हणेल की अल्लाहची शपथ! मी तर तुला या इतर मित्रांच्या तुलनेत तुच्छ समजत होतो. (तरगीब, इस्तदराक)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही धनसंपत्ती आणि मालमत्ता गोळा करू नका. तुमच्यामध्ये दुनियेची लालसा घर करेल.’’

ह. आयेशा (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणत होते की, ‘‘ज्या कुणाला अल्लाहच्या भेटीची आवड असते, अल्लाहदेखील त्याच्या भेटीस पसंत करतो. आणि जो व्यक्ती अल्लाहच्या भेटीस पसंत करीत नाही, अल्लाहदेखील त्याला भेटण्यास नकार देतो.’’ ह. आयेशा (र.) यांनी यावर विचारले की अल्लाहच्या भेटीस पसंत न करण्याचा अर्थ काय? कुणीही मृत्यू पसंत करत नाही. असे असेल तर आमच्यापैकी सर्वच जण मृत्युला पसंत करत नाहीत.

प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वर्ग, अल्लाहच्या देणग्यांविषयी सांगितले जाते तेव्हा त्याच्या मनात अल्लाहशी भेट व्हावी अशी इच्छा होते. अशा माणसाशी अल्लाह देखील भेटू इच्छितो. आणि दुसरीकडे नाकारणाऱ्या माणसाला जेव्हा अल्लाहचा प्रकोप, त्याच्या नाराजीबाबत कळवले जाते तेव्हा असा माणूस अल्लाहच्या भेटीला पसंत करत नाही.’’ (मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्या अस्तित्वाची शपथ, ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे, कयामतच्या दिवशी अल्लाह अशा लोकांना यातना देणार नाही ज्यांनी या जगात अनाथांशी दयेचा व्यवहार केला असेल. त्यांच्याशी मायाळूपणे बोलले असतील आणि त्यांच्या अनाथावस्थेची आणि दुर्बलतेची त्यांना कीव वाटली असेल. आपल्या धर्माच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्यांवर दबाव टाकत नसेल.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘हे मुहम्मदच्या उम्मतचे लोकहो, मला शपथ आहे त्या अस्तित्वाची ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे. अल्लाह अशा लोकांच्या दानधर्माला स्वीकारणार नाही ज्याचे नातेवाईक त्याच्याकडून वंचित राहिले असतील.’’ (हुरैरा, तिबरानी)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात.


जिंदगी भर का साथ हो निकाह की मुहब्बत

बेकार सी बात है ये हफ्ते भर की मुहब्बत

स्लाममध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेमाला मान्यता नाही. हे अगोदरच स्पष्ट करून मग या लेखाची सुरूवात करतो. 

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास

अगदी संक्षिप्तरित्या सांगावयाचे झाल्यास इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात रोममध्ये क्लाउडियस नावाचा एक राजा होता. तो शूर पण युद्ध पिपासू होता. वीर्य पतनामुळे सैनिकांची शारीरिक शक्ती कमी होते, असा त्याचा समज होता. म्हणून त्याने आपल्या सैन्याला लग्न न करण्याचे फरमान जारी केले. त्याच्या या जुल्मी आदेशाचा विरोध तत्कालीन सेंट (संत) व्हॅलेंटाईन यांनी करत अनेक इच्छुक सैनिकांचे विवाह गुप्तपणे लावून दिले. क्लाउडियसला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद करून फाशीची शिक्षा सुनावली व  14 फेब्रुवारी 269 रोजी त्यांना फाशीवर लटकावण्यात आले. म्हणजे दुसऱ्यांची लग्न लावताना त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. 

या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस म्हणून ब्रिटनमध्ये पाळण्याची प्रथा 19 व्या शतकात सुरू झाली. वास्तविक पाहता सेंट व्हॅलेंटाईन यांची पुण्यतिथी शांतपणे साजरी करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करून प्रकरण संपवता आले असते. मात्र प्रत्येक गोष्टीत कॉमर्स शोधणाऱ्या पाश्चिमात्य लोकांनी या घटनेचेही व्यापारीकरण केले. सेंट व्हॅलेंटाईन यांनी दुसऱ्यांचे कायदेशीर लग्न लावून दिले, म्हणजे परोपकार केला. अशा या परोपकारी धर्मगुरूंनी उदात्त भावनेतून केलेल्या नैतिक कृतीला व्हॅलेंटाईन डे च्या रूपाने अनैतिक प्रेमाचे उदात्तीकरण करून त्याला बटबटीत रूप देण्याचे पाप या लोकांनी केले. 

व्हॅलेंटाईन डे मागचे अर्थकारण

अमेरिकन ग्रीन कार्ड असोसिएशनच्या आकडेवारीप्रमाणे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे च्या हंगामात जगभरात एक अब्ज कार्डस एकमेकांना दिली जातात व ही आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. वाचकांना माहित असेल भरमसाठ किमतीची ही कार्डे प्रेमात आंधळे झालेले लोक पुढचा-मागचा विचार न करता वेड्यासारखे खरेदी करत असतात. यावरून या मुर्खतापूर्ण व्यवहारात होणाऱ्या अब्जावधी रूपयांच्या उलाढालीचा वाचकांना अंदाज यावा. 

मुळात हा खर्च कमी म्हणून की काय दरवर्षी फेब्रुवारीचा दूसरा आठवडा प्रेमाला समर्पित करण्याची शक्कल पाश्चिमात्य व्यापारी वृत्तीच्या पुरूषांच्या सुपिक डोक्यातून निघाली आणि म्हणूनच 7 फेब्रुवारी - रोज डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमीस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अशा अनेक कार्यक्रमांनी हा आठवडा भरलेला असतो. या सात दिवसांत अब्जावधी रूपयांची होणारी आर्थिक उलाढाला ही व्हॅलेंटाईन डे मागची खरी प्रेरणा आहे, यात दूमत नाही. 

मुळात 18 व्या शतकाच्या शेवटी व 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच युरोपमध्ये मुक्त लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू झाले होते. चर्च प्रभावहीन झाले होते, धार्मिक शिक्षणाची जागा भौतिक शिक्षणाने घेतलेली होती. विज्ञानाचा विकास तीव्र गतीने होत होता. तंत्रज्ञान वेगाने वाढत होते. औद्योगिक क्रांती नुकतीच झालेली होती. त्यामुळे युरोपमधील लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा खुळखुळत होता. 

इतिहास साक्षी आहे की, माणसाच्या हातात जेव्हा-जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आला त्याची पाउले आधी संगीत, मग कोठे व त्यातून मुक्त लैंगिकतेकडे वळली. 18 व्या शतकातसुद्धा औद्योगिक क्रांतीमुळे आलेल्या भरमसाठ पैशाने युरोपीयन लोकांचा प्रवास मुक्त लैंगिकतेकडे सुरू झाला. आधी कार्विंग (कलाकुसर) केलेल्या लाकडांच्या ठोकळ्यांचा वापर करून स्त्री-पुरूषांच्या नग्न मुर्त्या, त्यांच्या गुप्तांगाचे शिल्प तयार करून विकले गेले. फ्रांसमध्ये या वुड पोर्नोग्राफीने अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता गाठली.

1839 मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला. 1855 मध्ये त्याद्वारे नग्न महिलांचे फोटो काढून विकण्याचा प्रयोग सुरू झाला. मात्र बाल्यावस्थेत असलेल्या या कलेची अडचण 1863 मध्ये तेव्हा दूर झाली जेव्हा प्रिंटरचा शोध लागला. आता अश्लिल चित्रांच्या लागेल तितक्या प्रती काढता येऊ लागल्या. जुगाराच्या पत्यांच्या पाठीमागच्या बाजूस अशी नग्न चित्रे वापरली गेली. 1876 मध्ये व्हीडीओ कॅमेऱ्याचा शोध लागला आणि खऱ्या अर्थाने अश्लिल चलचित्रांना चालना मिळाली. पहिला अश्लील चित्रफट लोमीर ब्रदर्सनी 1895 ला फ्रान्समध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक अल्बर्ट कोचर नावाचा व्यक्ती होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली. 

अशा पद्धतीने 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण युरोप अश्लील चलचित्रांच्या गर्तेत ढकलला गेला. चर्च निष्प्रभ झाल्यामुळे सैल झालेल्या धार्मिक बंधनाचा फायदा उचलत चतूर युरोपीयन पुरूषांनी व्यक्तीस्वातंत्र्य व महिला सबलीकरणाच्या नावाखाली घरंदाज महिलांना घराबाहेर काढण्यात यश मिळविले. भारतातही याच काळात अश्लील चित्रफीतिंनी व्हीडीओ कॅसेट, सीडी, डिव्हीडीच्या माध्यमातून मोठा धुमाकूळ घातला. साधारणपणे माणसे फार लवकर लैंगिक इच्छेच्या आहारी जातात. धार्मिक बंधने सैल असलेला समाज याला चटकन बळी पडतो.

आज जेव्हा लैंगिक चित्रफिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर कॅटेगिरीवाईज अश्लील संवादासह उपलब्ध आहेत, सोबतीला भरपूर व्यक्तीस्वातंत्र्य आहे, हातात पैसा आहे, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि कॅम्पस बऱ्यापैकी मुक्त आहेत. तर या सर्वांचा उपयोग, ’अशा उद्योगासाठी’ केला गेला नसता तरच नवल. लक्षात ठेवा मित्रानों! आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या या सर्व गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम महिला आणि मुलांवर होतो. त्यात अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी होते. पुरूष मात्र नामानिराळे राहतात. 

ह्या प्रकारची थेरं ही भारताच्या महान हिंदू संस्कृती आणि महान इस्लामी संस्कृती या दोहोंच्या विरूद्ध आहे. म्हणून खरे तर गरज या दोन्ही समाजातील संस्कृती रक्षकांनी एकत्र येऊन या विदेशी संस्कृतीविरूद्ध एल्गार पुकारण्याची होती. मात्र सध्याच्या सांप्रदायिक वातावरणात हे शक्य नसल्याने किमान मुस्लिमांनी तरी आपले शरई कर्तव्य म्हणून व्हॅलेंटाईन व इतर डेज यांचा सनदशीर मार्गाने व जमेल तसा विरोध करावा. 

मुस्लिमांची जबाबदारी

सुरे बकरामध्ये अल्लाहने फर्माविले आहे की, 

1.’लोक हो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा आणि सैतानाच्या मार्गाचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लिल गोष्टींचा आदेश देत असतो. जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाहीत.’ (सुरे बकरा आयत नं. 168-169).

2. ’ व्याभिचाराच्या जवळपासही फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग’ (सुरे बनी इसराईल आयत नं. 32).

व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.

मुळात ज्या मुस्लिमांचा कुरआनशी प्रत्यक्षात संपर्क तुटलेला आहे, त्यांच्यात आणि वरील प्रमाणे मुक्त वातावरणात राहणाऱ्या इच्छा-आकांक्षांच्या गुलाम प्रवृत्तीच्या लोकांत कोणतेही अंतर नाही. म्हणून असे मुस्लिम सुद्धा सतत मुक्त लैंगिक संबंधाच्या शोधात असतात. स्त्री त्यांच्यासाठी एक सेक्स ऑब्जेक्ट असते. व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात. काही वर्षापूर्वी 31 डिसेंबरच्या रात्री कर्नाटकाच्या बेंगलुरू शहरामध्ये नवीन वर्षे साजरे करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणींचे सामुहिक विनयभंग व वस्त्रहरण करण्यात आले. हा इतिहास पाहता मुलींनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. पोर्नोग्राफीच्या आहारी गेल्यामुळे आज अनेक पुरूष हे लैंगिकदृष्ट्या विकृत झालेले आहेत. वरूण सर्वच पुरूष सभ्य दिसतात. पण त्यांच्यात कोण विकृत आहे याचा अंदाज मुलींना करता येत नाही. म्हणून त्या अशा लांडग्यांच्या हल्ल्यांना बळी पडतात. अशा अनेक घटना रोज वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतात. तरी त्याची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. हे आपले सामाजिक दुर्दैव आहे. याचे कारण असे की, अनैतिक गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातात तेव्हा त्यांच्यासह जगण्याची सवय माणसांना लागते. 

या लांडग्यांची लबाडी उघडी पाडून आपल्या व आपल्या देशबांधवांच्या निरागस मुलींना या शोषणापासून सावध करणे भारतीय मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी आहे. या संबंधीचे जमेल त्या पद्धतीने, जनजागरण करत राहणे व मुलींना यातील धोक्यासंबंधी सावधानतेचे इशारे देत राहणे, तूर्तास एवढेच आपल्या हाती आहे. तेवढेच आपण करावे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तरूण जोडप्यांना गाठून मारहाण करण्यासारखे अघोरी प्रकार कदापी करू नयेत. त्याने फारसे काही साध्य होत नाही. त्यापेक्षा त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करावा.  

यासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाही. मग त्याच्या समोर काही लोक खऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां! हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती. (संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35). 

तरी पालकांनों व मुलींनो व्हॅलेंटाईन डे च्या जाळ्यात अडकू नका. स्वतःची सुरक्षा स्वतः करा. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, व्हॅलेंटाईन डे सारख्या अश्लील उत्सवामध्ये सामील न होण्याची समज व शक्ती आम्हा सर्वांना प्रदान कर आमीन. 

- एम.आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget